स्वल्पविराम

 * डॉ. विलास जोशी

लग्नाला दहा वर्षं होता होता प्रेम पूर्णपणे मरतं का? पतिपत्नीचं नातंही इतकं यांत्रिकपणे पार पाडायचं असतं? अर्थात् हे सर्वच विवाहित स्त्रीपुरुषांच्या बाबतीत घडतं की फक्त स्वरा आणि आलोकच्याच बाबतीत घडलं आहे? या क्षणी तरी स्वराला असंच वाटतंय.

त्यांच्या लग्नाला दहा वर्षं होऊ घातलीत. आठ वर्षांचा शिव नावाचा एक गोड पोरगा आहे. आलोक नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने पैशाला तोटा नाही. घरात आधुनिकपणा अन् संपन्नतेच्या सर्व खुणा सर्वत्र दिसतात. शिवच्या जन्माआधी स्वरा शाळेत नोकरी करायची. नंतर तिने जॉब सोडला. आता शिव बऱ्यापैकी मोठा झालाय अन् स्वराचा वेळ शॉपिंग, गॉसिप्स असल्या गोष्टीत जातोय.

आजही बराच वेळ निरर्थक गोष्टींचा विचार करून थकल्यावर तिने सहज घड्याळाकडे बघितलं. शिवला यायला अजून वेळ होता. आलोकच्या येण्याची नक्की वेळ अशी नसतेच. बसूनबसून कंटाळली तेव्हा स्वयंपाक्याला काय स्वयंपाक करायचा याच्या सूचना देऊन गाडी घेऊन ती घराबाहेर पडली.

मॉलमध्ये फिरताना तिचं लक्ष लोकांकडे होतं. किती तरी जोडपी एकत्र फिरत होती. खरेदी करत होती. आलोक आणि ती अशी एकत्र फिरून किती तरी वर्षं उलटली होती. हल्ली तर आलोकला रोमँटिक गोष्टी म्हणजे हसण्याचा विषय वाटतो. अन् फॅमिली आउटिंग तो टाळतच असतो. प्रेमही त्याचं यांत्रिकपणे उरकतो. त्याचा दिवस, म्हणजे रात्रही ठरलेली असते सॅटरडे नाइट. आता तर तिला आलोक रात्री जवळ आला तरी मळमळायला लागतं. ती टाळायलाच बघते. कधी जमतं, कधी आलोकची सरशी होते. तिच्या मनात येतं प्रेम असं ठरवून करायची गोष्ट आहे का? प्रेम तर उन्माद असतो. वादळासारखं ते घोंघावतं, शरीर, मनाचा ताबा घेतं, सुखाची लयलूट करून शांत होतं…पण हे आलोकला कुणी समजवायचं? तो तर हल्ली प्रेमही ऑफिसच्या मीटिंगप्रमाणे करतो. पूर्वी असं नव्हतं. पण मग आता उर्वरित आयुष्य असंच काढायचं का?

‘‘एक्सक्यूज मी, मॅडम, एक फॉर्म भरून द्याल का?’’ एक तरुण तिच्या जवळ येऊन अदबीने म्हणाला, तशी ती विचारांच्या तंद्रीतून भानावर आली.

‘‘काय आहे? कसला फॉर्म?’’

‘‘ही आमच्या कंपनीची स्पेशल स्कीम आहे. या फॉर्ममधून दोन फॉर्म्सची निवड होईल अन् लकी विजेत्यांना गोव्याची तीन रात्री चार दिवसांची सहल फुकट मिळेल.’’

‘‘आता नको, मला वेळ नाही,’’ स्वरा त्याला टाळायला बघत होती.

‘‘पण मला वेळ आहे. भरपूर वेळ आहे.’’ कुणीतरी मध्येच बोललं. स्वरा अन् तो मुलगा दोघंही दचकली.

‘अरेच्चा? हा तर किशोर…’ तिच्याबरोबर कॉलेजात होता. त्यावेळी बावळा वाटणारा हा किशोर आता कसला स्मार्ट अन् डॅशिंग वाटतोय. तिला एकदम हसू आलं. तिने त्या मुलाचा नंबर घेऊन त्याला वाटेला लावलं अन् ती किशोरशी बोलत मॉलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली. गप्पांमध्ये वेळ कसा गेला तिला कळलंच नाही. तेवढ्या वेळात तिला शिवचीही आठवण आली नाही. दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

घरी आली तरी डोक्यातून किशोरचा विचार जाईना. किती जुन्या आठवणी त्यांनी काढल्या होत्या. किशोर सतत तिच्या गुणांचं, तिच्या रूपाचं कौतुक करत होता. फार दिवसांनी असं स्वत:चं कौतुक ऐकून तीही मोहरली होती.

रात्री जेवण आटोपून झोपायला जात होती तेवढ्यात फोन वाजला. फोन किशोरचा होता. एक क्षण मनात आलं की त्याला दटावून म्हणावं अवेळी फोन करत जाऊ नकोस म्हणून, पण तसं म्हणू शकली नाही अन् मग त्यांच्या गप्पा रात्री एकपर्यंत चालू होत्या.

अन् मग हे रोजचंच झालं. ती दोघं भेटायची किंवा तासन्तास फोनवर गप्पा मारायची. स्वरा हल्ली खुषीत होती. आयुष्यातला हरवलेला आनंद तिला पुन्हा गवसला होता. त्यांच्या गप्पांमध्ये विविध विषय असायचे. कॉलेजच्या जुन्या आठवणींपासून, हल्लीची राजकीय परिस्थिती ते शिक्षणाचा झालेला बाजार. किशोर हिरिरीने मतं मांडायचा. तिला ते आवडायचं. आलोकशी हल्ली असा संवादच घडत नव्हता. तिच्या मनात यायचं, आलोकपेक्षा हा किती वेगळा आहे. आलोकच्या संवेदनाच हल्ली बोथट झाल्या आहेत. किशोर किती संवेदनशील आहे? तिच्या नकळत ती किशोरकडे ओढली गेली होती.

एक दिवस अचानक किशोरने फोन करून स्वराला मॉलमध्ये बोलावून घेतलं. ती तिथे पोहोचली तेव्हा तो म्हणाला, ‘‘स्वरा, मी एक महिन्यासाठी कंपनीच्या कामाने न्यू जर्सीला जातोय…उद्याच निघायचंय…’’

‘‘इतके दिवस?’’

‘‘हो, एवढे दिवस लागणारच! खरं तर जायची अजिबात इच्छा नाहीए पण बिझनेस म्हटला की जबाबदाऱ्याही आल्याच.’’

‘‘नाही रे, तसं नाही, तुला जायलाच हवंय, तू जा. आपण फोनवर बोलूयात.’’

‘‘स्वरा-’’

‘‘बोल ना,’’

‘‘माझ्या मनात एक गोष्ट आहे.’’

‘‘काय?’’

‘‘जाण्यापूर्वी तुझ्याबरोबर काही वेळ घालवायचाय.’’

‘‘तेच तर करतोय आपण…’’

‘‘असं नाही. मला तुला एकांतात भेटायचंय…मी काय म्हणतोय, लक्षात आलंय तुझ्या?’’

थोडा विचार करून स्वराने म्हटलं, ‘‘कुठे जाऊयात?’’

‘‘कोणताही प्रश्न विचारू नकोस, फक्त माझ्याबरोबर चल…माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘चल, जाऊयात.’’

किशोरने गाडी एका पंचतारांकित हॉटेलसमोर थांबवली.

स्वराला काहीतरी खटकत होतं…‘‘आपण कुठे आलोय?’’?शंकित सुरात तिने विचारलं.

‘‘स्वरा, मला जे काही बोलायचंय ते शांतपणे, एकांतातच बोलायचंय…’’

स्वरा मुकाट्याने गाडीतून उतरली अन् किशोरबरोबर चालू लागली. आलोकला लग्नाआधी ती भेटायची त्यावेळी जशी रोमांचित व्हायची तसं काहीसं तिला वाटत होतं. पण ती ऊर्मी नैसर्गिक होती. त्यात चोरटेपणाची भावना नसायची. आज काही तरी चुकतंय असं वाटत होतं.

रूम उघडून आत जात किशोरने म्हटलं, ‘‘स्वरा, ये ना, आत ये…तू अशी अस्वस्थ का? माझ्यावर विश्वास आहे ना?’’

‘‘आहे रे बाबा, पुन:पुन्हा का विचारतो आहेस? विश्वास नसता तर इथवर आले असते का?’’

स्वराच्या हाताला धरून किशोरने तिला सोफ्यावर बसवलं. स्वत: तिच्या पायाशी बसला.

‘‘हे काय? खाली का बसलास?’’

‘‘मला जे सांगायचंय ते इथेच बसून, तुझ्या डोळ्यांत डोळे घालून सांगायचं आहे.’’

‘‘असं काय सांगायचंय?’’

‘‘स्वरा, तू भेटण्यापूर्वी माझं आयुष्य फार नीरस होतं. ऑफिस ते घर, घर ते ऑफिस…बायको सतत भिशी, किटी पार्टी, शॉपिंग यातच मग्न…फक्त दोन मुलांसाठी जगत होतो. पण अचानक तू भेटलीस अन् आयुष्यच बदललं…जग सुंदर वाटायला लागलं. माझ्या लक्षात आलं की आपण दोघंही समदु:खी आहोत. नीरस आयुष्याच्या तुरुंगातले कैदी म्हणून जगतो आहोत. आपण एकमेकांचे होऊयात…सुंदर आयुष्य जगूयात…माझी होशील तू?’’ तो तिच्या एकदम जवळ आला. तिला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते.

कधी तरी हा क्षण येईल असं स्वरालाही कुठे तरी जाणवलं होतं. त्या क्षणाच्या वेळी ती मोहरेल, रोमांचित होईल असंही तिला वाटलं होतं. वैवाहिक आयुष्यातला कंटाळवाणेपणा, नीरसपणा, मरगळ निघून जाईल असं वाटलं होतं…पण प्रत्यक्षात मात्र तिला किशोरचं जवळ येणं अजिबात आवडलं नाही. त्या क्षणी तिला जाणवलं की मनातून ती कायम आलोकच्याच जवळ आहे. तेवढी जवळीक दुसऱ्या कुणाला शक्यच नाही. फक्त तिला या क्षणी झालेली जाणीव किंवा साक्षात्कार आलोकलाही करून द्यायला हवाय. किशोर मित्रच राहू दे. आलोकची जागा तो कधीच घेऊ शकणार नाही. ती जागा दुसऱ्या कुणाची असूच शकत नाही…ती झटक्यात उठून उभी राहिली.

‘‘काय झालं, स्वरा? काही चुकलं का?’’

‘‘नाही किशोर, चूक नाही…तुझ्यामुळे मला कळलं की आलोकवर माझं किती प्रेम आहे. आम्ही एकमेकांचेच आहोत. आमच्या वैवाहिक आयुष्यात एक स्वल्पविराम आला होता, मी वेडी त्याला पूर्णविराम समजले होते. पण आता गैरसमज दूर झालाय. तो स्वल्पविराम मी प्रयत्नपूर्वक दूर करेन आणि माझा गैरसमज दूर करण्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! प्रिय मित्रा, लेट अस बी फ्रेण्ड्स अॅण्ड फ्रेण्ड्स ओन्ली…’’

स्तंभित झालेल्या किशोरला तिथेच सोडून स्वरा हॉटेलबाहेर आली. पहिला फोन तिने टूर बुकिंग ऑफिसला करून गोव्याची टूर बुक केली. आईला फोन करून शिवला तिच्याकडे ठेवणार असल्याचं सांगितलं अन् तिसरा फोन आलोकला करून ती दोघं गोव्याला जाणार आहेत, रजा टाक असं सांगितलं.

वेडींग मटेरीयल

कथा * अर्चना पाटील

मंजिरी आणि मानस यांच्या लग्नाला एक आठवडा झाला. पण मानस काही हनिमुनचं नाव घेत नव्हता. शेवटी मंजिरीनेच एका रात्री विषय काढला.

‘‘काहो, माझी रजाही संपली आता. आपण कुठेच फिरायला गेलो नाही. माझ्या मैत्रिणी शिमला, कुलु…फार नाही तर महाबळेश्वरला तरी जातात.’’

‘‘जाऊ ना नंतर ..आईबाबा काय म्हणतील…अजून अख्खं आयुष्य पडलं. झोप आता.’’

‘‘काय बोरींग आहे हा! आईबाबांसाठी हनिमूनला जायला घाबरतोय हा…’’

मनातल्या मनात नवऱ्याला दोन तीन शिव्या देऊन मंजिरी झोपली. दुसऱ्या दिवसापासून मंजिरी आणि मानस दोघेही ऑफिसला जायला लागले. संध्याकाळी मंजिरी सहालाच घरी आली. स्वयंपाक वगैरे आटोपून ती बसली होती. तेवढयात मंजिरीचा दिर वेद कामावरून आला.

‘‘काय मग वहिनी, चलता का आइस्क्रिम खायला? पैसे मीच देईन चिंता करु नका.’’

‘‘अरे व्वा, नक्कीच येणार मी.’’

मंजिरी आणि वेदची चांगलीच मैत्री जमली. आठवडयातून तीन चार वेळा तरी ते एकमेकांसोबत घराबाहेर कोणत्या तरी बहाण्याने जात होते. कधी किराणा आणायला, कधी नातेवाईकांना भेटायला. मानस आणि मंजिरी फक्त रात्रीच बेडवर थोडेफार बोलत होते आणि दिवस जात होते. मानस दिवसांतून एकही फोन मंजिरीला करत नसे. याउलट वेद दिवसातून वेळ काढून एक फोनतरी न चुकता आठवणीने करत असे. एक दिवस मंजिरीने आपल्या वैवाहिक गोष्टी वेदला सांगायला सुरुवात केली.

‘‘वेद, मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय रे. तुझा भाऊ घाबरतो आईबाबांना. त्याला लाज वाटते बायकोसोबत फिरण्याची. आज लग्नाला सहा महिने होऊन गेले तरी कुठे जायचा विषयही काढत नाही. माझं मेलीचं नशीबच फुटकं. बापपण तसाच आणि नवरापण तसाच भेटला. आम्हीही चार बहीणी त्यामुळे माहेरीपण बापाने कधीच कुठे फिरायला नेले नाही की हौस पूर्ण केली नाही…’’ बोलता बोलता मंजिरी रडायलाच लागली.

‘‘जाऊ दे गं वहिनी, मी नेतो तुला फिरायला. सांग कुठे जायचं आहे?’’

‘‘कुलु, शिमला, मनाली…’’

‘‘बस्स इतकंच ना, मी नेतो तुला. तू फक्त घरातल्यांना सांभाळ.’’

‘‘तू तिकीट बुक कर. मी सांगते, मी माहेरी जाते आहे आणि माहेरी सांगेन की मैत्रीणींसोबत फिरायला जाते आहे, कारण माझा नवरा मला सोबत कुठे नेत नाही आहे.’’

‘‘वेलडन, करतो मी तिकीट बुक.’’

इतक्या दूर प्रवासाला गेल्यावर वेद आणि मंजिरीला एकांत मिळाला आणि दोघांनीही आपली मर्यादा ओलांडून चुकापण केल्या. पण घरी आल्यावर दोघांमधेही अपराधीपणाची जाणीव नव्हती. उलट मंजिरी आपली फिरण्याची हौस पूर्ण करून घेण्यासाठी वेदच्या पूर्णपणे आहारी गेली. हळूहळू त्यांच्यातली जवळीक सासुबाईंना घरात जाणवू लागली. सासुबाईंनी ताबडतोब मंजिरी आणि मानसला दुसरा फ्लँट घेऊन दिला. पण यामुळे उलट मंजिरीवर कोणाचे बंधनच राहीले नाही. ती आता शहरातही वेदसोबत फिरू लागली.

‘‘सध्या काय खुष दिसते आहे माझी राणी.’’ मानवने विचारलं.

‘‘कुछ लोग गुलजार की गजलोंकी तरह होते है, हर हालमें अच्छेही लगते है…मेरी जान. आप नहीं समझेंगे…सिनेमाला गेले होते मी आज. खुपच सुंदर सिनेमा होता. अहो…कीचनमधे फॅन बसवा ना. एक लाख पगार घेतो आपण दोघे मिळून.’’

‘‘चालू झाले का तुझे…हो सांगितले आहे ना मी तुला…मी तुला नाही म्हणतोय का…’’

‘‘नेहमीसारखं तेच गुळचट उत्तर…नवीन फ्लॅटमधे येऊन तीन महिने झाले, पण हॉलमध्ये एका बेडशिवाय दुसरं काही नाही. दोन पाहुणे आले की लगेच शेजाऱ्यांकडून खुर्च्या मागाव्या लागतात. कंटाळा आला आहे मला या माणसाचा. वेद असता तर पहिले त्याने हॉल सजवला असता, सगळया मित्रांना एक पार्टी दिली असती. वेदची प्रत्येक गोष्टच निराळी.’’ मंजिरी मनातल्या मनात कुढत होती.

मानस संध्याकाळी सहाला घरी येत असे. चहा घेतला की अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसत असे. मंजिरीने जेवायला बोलवलं की तू जेऊन घे हे उत्तर ठरलेले असे. दोन-तीन आठवडयातच मंजिरीचे जेवण्यासाठी फोन करणे बंद झाले कारण त्याची गप्पांची मैफील त्याला मंजिरीपेक्षा जास्त महत्त्वाची असे. रात्री अर्धा-एक तास बायकोसोबत फॉरमॅलिटी पूर्ण करणे म्हणजे लग्न का? असा प्रश्न आता मंजिरीला पडायला लागला. लग्नाला एक वर्ष झाले. पण मंजिरीसाठी मानससोबत राहणे म्हणजे मन मारून जगणे होते आणि अख्खं आयुष्य कसं घालवायचं असं? मुलबाळ नाही आहे तोपर्यंत काही तरी निर्णय घेऊन मोकळं व्हावे असं मंजिरीला वाटत होते. मंजिरीने वेदजवळ विषय काढला.

‘‘तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी मानसपासून घटस्फोट घेते. असं लपूनछपून किती दिवस भेटायचं. उद्या तुझंही लग्न होईलच की…तुला मी खरंच आवडते का?’’

‘‘आवडते म्हणून तर फिरवतो ना तुला राणी…’’

‘‘मी ठरवलंय, मी मानसला सगळं खरंखरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे.’’

‘‘ठीक आहे, असंही तुझ्या आशाअपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार नाही आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो.’’

दुसऱ्याच दिवशी मंजिरीने स्वत:च्या आईबाबांना बोलावून घेतले. मानसलाही संध्याकाळी लवकर घरी बोलावले.

‘‘आईबाबा, मी आता जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल पण तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा. मला आता यापुढे मानससोबत विवाहबंधनात राहायचं नाही आहे. मानसकडे गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे पण फोरव्हीलर काढायला जर तो सतत पेट्रोल, पेट्रोल करत असेल तर तो पगार काय कामाचा? आज या फ्लॅटमधे येऊन तीन महिने झाले तरी फॅन, कुलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही. जास्त हट्ट केला तर भांडण होतं आणि या माणसाचं शेवटचं वाक्य ‘तू घेऊन ये मग’ असे असते. आठवडयातून एक दिवस भाजी व महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काहीही उपयोग नाही. पुढे मुलबाळ झाले तर गुंता वाढतच जाईल, त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेले बरे.’’

‘‘जावईबापू, आताच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या. तुम्ही वेडींग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरलात. तिचा जो निर्णय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही. कारण तिने आनंदात वैवाहिक आयुष्य व्यतीत करावे एवढेच मलाही वाटते,’’ मंजिरीच्या बाबांनी विचार करून हळुवारपणे मत दिले.

‘‘अहो, काय बोलताय तुम्ही. तिच्या नादाला काय लागत आहात तुम्ही! अगं ये सोनु, लग्न कोणी असं मोडतं का लगेच. होईल सुधारणा हळुहळु त्यांच्यात. त्यांना एक संधी तरी दे.’’ मंजिरीची आई काकुळतीला येऊन बोलत होती.

‘‘आई, संधीचा प्रश्न नाहीए. मी जी काही कारणे सांगत आहे, तो त्यांचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही. असंही माझ्यासाठी कोणीतरी स्वत:ला बदलून घ्यावे हे मलाच पटत नाही.’’

‘‘मंजिरी मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत रहावे हे मला आवडणार नाही. मी खूपच साधा मुलगा आहे. सतत ग्रिटींग देणे, गाणी म्हणणे, कलरफुल कपडे घालणे, पार्टी, टुरीझम हे मला नाही जमणार. मला माफ कर, तुला अपेक्षित असलेलं वेडींग मटेरिअल नाही आहे मी. मी तुला मोकळं करायला तयार आहे.’’

‘‘थांबा, मला अजून काहीतरी सांगायचे आहे. मी तुमचा लहान भाऊ वेदशी लग्न करणार आहे.’’

हे वाक्य ऐकताच मानसची नस तडकली. डोळे रागाने लाल झाले. पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला.

सहा महीन्यांनी वेद आणि मंजिरीने रजिस्टर लग्न केले आणि पुन्हा संसार सुरु केला. वेदचे आईबाबा आणि मानस यांचा विरोध पत्करून हा विवाह पार पडला. दोन वर्षांनी पुन्हा मानसचा विवाह झाला. एक गावाकडची सुंदर मुलगी त्याला मिळाली. दोघांचाही संसार सुखाचा सुरू झाला. कालांतराने मंजिरी, मानस आणि वेद या तिघांनाही आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे जाणवले. केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोसे असलेले संसाराचे गाडे ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते.

अशी केली युक्ती

मिश्किली * पारुल पारवे

‘‘प्रिया, कुठं आहेस तू? जरा चाखून बघ आणि सांग बरं, भाजी कशी झाली आहे?’’ सासूबाईंची अशी हाक ऐकली की माझी भीतिनं गाळण उडते. अगदी निर्मनुष्य रस्त्यावर एखाद्या जुनाट पडक्या हवेलीतून काही आवाज ऐकल्यावर एकट्या वाटसरूची कशी अवस्था होईल तशी माझी अवस्था होते. म्हणजे माझ्या सासूबाई चेटकिणीसारख्या भेसूर, विद्रूप वगैरे नाहीएत. त्या छान गोऱ्यापान, सुंदर, नीटनेटक्या, थोडक्यात म्हणजे सुनेला चॅलेंज देणाऱ्या मॉडर्न सासूबाई आहेत.

आता तुम्ही म्हणाल, मग एवढं घाबरण्याचं कारण काय? घाबरायला होतं त्यांच्या स्वयंपाकामुळे, होय स्वयंपाकामुळेच निसर्गानं त्यांना रूप, सौंदर्य भरभरून दिलं, पण स्वयंपाकाची कला अजिबातच दिली नाही. माहेरी सुंदर म्हणून खूप कौतुक झालं. स्वयंपाकघरात कधी पाय ठेवला नाही. स्वयंपाक कधी केलाच नाही. सासरी सौंदर्याचं कौतुक नव्हतं. झपकन स्वयंपाक करावा लागला. पण त्यांनी काय शिजवलं अन् घरातल्यांनी काय खाल्लं याचा कधी ताळमेळ बसला नाही.

घरातली पुरूष मंडळी उगीच वाद घालत बसली नाहीत. त्यांनी घरातल्या जेवणाचा अनादर करायचा नाही म्हणून पहिलं वाढलेलं जेमतेम संपवून हात धुण्याचा मार्ग निवडला…मग उदर भरण्यासाठी बाहेर हॉटेल्स, रेस्टॉरंट, टपऱ्या, धाबे असं खूप काही असतंच, पण घरात अजून एक सदस्य आहे ज्यांना सासूबाईंचं रूप काय, रांधणं काय, काहीच आवडलं नाही. या म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूबाई. नाही नाही गैरसमज नको. माझे सासरे खूपच सज्जन आहेत. त्यांचं एकच लग्न झालंय. या दुसऱ्या सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या थोरल्या जाऊ. म्हणजे माझ्या सासूबाईच झाल्या ना! यांना माझ्या सासूचं पाककौशल्य अजिबात आवडत नाही. त्या म्हणतात, ‘‘कधी आपल्यासारख्या फक्क गोऱ्या भाज्या करते, म्हणजे तिखट, हळद, मसाले काहीच न वापरता भाज्या करते तर कधी सूड उगवल्यासारख्या काळ्या ठिक्कर…म्हणजे भाज्या जाळून ठेवते…एकूण स्वयंपाक बेचवच!’’

आता या घरातली सध्या तरी मी एकुलती एक सून. त्यातून नाव प्रिया. मला सगळ्यांची प्रिय बनून राहणं भाग आहे. सुरूवातीला मी दोघींनाही खुश ठेवण्यासाठी त्या म्हणतील तसं करायची. परिणाम असा झाला की एकीचं ऐकलं की दुसरीला वाटे मी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानांत गेलेय. एक माझा हात धरून तिच्याकडे ओढायची, दुसरी माझी पाय धरून तिच्याकडे ओढायची.

काही दिवस बेचव जेवण जेवल्यावर माझं वजन कमी झालं, कारण मला घराबाहेर पडायची सोय नव्हती. मग मी माझ्या सासूबाईंना अगदी प्रेमानं म्हटलं, ‘‘सासूबाई, आता मी आलेय ना, आता या वयात तुम्ही स्वयंपाक कशाला करता? मी करत जाईन दोन्ही वेळचा स्वयंपाक.’’हे ऐकताच त्यांनी दुर्गेचा अवतार धारण केला, ‘‘या वयात म्हणजे काय? माझं काय वय झालंय का? तुझ्यापेक्षा जास्त काम करू शकते मी. अन् हे माझं घर आहे.मला हवे तेवढे दिवस मी काम करेन.’’

त्यांना कसं समजावून सांगू की सगळ्या भाज्या मला विनवताहेत, बाई गं, तुझ्या सासूच्या तावडीतून आम्हाला सोडव. खरंतर घरातील सर्वांवरच अत्याचार सुरू होता, पण उगीच बोलून वाईटपणा कोण कशाला घेईल?

खरं तर तो बेचव स्वयंपाक बघूनच माझी भूक मरायची. तो स्वयंपाक पाण्याच्या घोटाबरोबर घशाखाली ढकलताना जीभ सहकार्य नाकारायची. नातं सासूसुनेचं. कसं सांगायचं त्यांना? पुन्हा मी नवी एकुलती एक सून…रोजच मला त्या विचारायच्या, ‘‘स्वयंपाक चांगला झालाय ना?’’ मी त्यांच्या नजरेला नजर न देता इकडेतिकडे बघत म्हणायची, ‘‘बरा झालाय की!’’

एवढ्यावर सगळं थांबलं असतं तर प्रश्नच नव्हता. नेमकं अशावेळी दुसऱ्या सासूबाई प्रगट व्हायच्या, ‘‘कालच्या भाज्यांचा रंग तर बघवत नव्हता बाई! भाजी उपवर कन्या म्हणून उभी असती तर लग्न झालंच नसतं. कुष्णी कुष्णी पसंत केली नसती. इतकी वर्ष लग्नाला झालीत, पण एक दिवस धड जेवायला मिळालं नाहीए.’’ (आता या मोठ्या होत्या तर त्यांनी स्वयंपाकघराचा ताबा घ्यायला काय हरकत होती?)

त्यांनी एवढं म्हणताच धाकट्या सासूबाईंना एकदम जोर चढला. त्या माझ्याच साक्ष काढतात, ‘‘काय गं प्रिया, काय वाईट होता स्वंयपाक? यांना तर माझ्या प्रत्येक कामात दोष काढायला फारच आवडतं, लग्न होऊन आल्यापासून यांनी कधी प्रेमाचा शब्द उच्चारला नाहीए. कधी जिवाला विसावा नाही मिळाला.’’

दोघी सासवा माझ्या  खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकींवर फैरी झाडतात. मधल्यामध्ये माझी कुंचबणा होते. मला लवकरात लवकर यातून बाहेर पडायचं होतं. मी सतत विचार करत होते. शेवटी एक आशेचा किरण दिसला. दुसऱ्याच दिवशी मी जाहीर केलं की आजपासून मी एक स्पेशल डाएट प्लॅन माझ्यापुरता तयार केलाय अन् तो मी अंमलातही आणणार आहे. मी काय खायचं, केव्हा खायचं, कसं खायचं हे सगळं मीच ठरवणार आहे तर रोजच्या स्वयंपाकात मला धरू नका. ही योजना बऱ्यापैकी यशस्वी झाली. एकतर त्या बेचव स्वयंपाकातून सुटका झाली, दुसरं म्हणजे दोघी सासूबाईंच्या ओढाताणीतून मला मोकळीक मिळाली. पण पंधरा वीस दिवसातच मी त्या डाएट प्लॅनला कंटाळले. आता पुन्हा घरच्या त्या बेचव स्वयंपाकाला शरण जाण्याखेरीज पर्याय नव्हता. पुन्हा तेच, ये रे माझ्या मागल्या…

मी डाएट प्लॅन बंद केल्यावर तर सासूबाईंचा उत्साह अजूनच ओसंडू लागला. त्या काहीतरी शिजवून आणायच्या अन् ‘‘प्रिया बघ बरं, सांग चव कशी आहे?’’ असं म्हणून मला खायला द्यायच्या. मी एखादा कोपरा मला कुशीत घेईल का म्हणून बघायची. म्हणजे त्यांच्या नजरेला पडायला नको किंवा वाऱ्याचा जोराचा झोत तरी यावा अन् त्यानं मला दुर कुठं तरी उडवून न्यावं असं वाटायचं. पण त्यातलं काहीच प्रत्यक्षात येत नसे. एकदा एक मैत्रीण घरी आली होती. तिनं अमेरिकेतून चुइंगम आणलं होतं. एक मी

सहज म्हणून तोंडात टाकलं. नेमक्या त्याचवेळी सासूबाई कशाची तरी चव दाखवायला म्हणून आल्या. मी म्हटलं, ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

त्या बिचाऱ्या हिरमुसल्या होऊन परत किचनमध्ये निघून गेल्या. मला एकदम कल्पना सुचली, आता त्या मला चव दाखवायला आल्या की मी म्हणायची ‘‘माझ्या तोंडात चुइंगम आहे.’’

काही दिवस असे गेले. पण सासूबाई माझ्यापेक्षा हुशार होत्या. आता त्या स्वयंपाकघरातूनच मला हाक मारायच्या, ‘‘प्रिया, जरा इकडे ये बरं.’’

मी तिथं गेले की पटकन् विचारायच्या, ‘‘तोंडात चुइंगम नाहीए ना?’’ मी कावरीबावरी व्हायची, त्या पटकन् काहीतरी मला खायला द्यायच्या. एकूण ‘चव बघणं’ या कामातून मला सुटका नव्हती.

एकदा सासूबाईंनी कुठं तरी वाचलं की मोहरीचं तेल हार्ट अॅटकपासून वाचवतं. त्यानं आरोग्य चांगलं राहतं. इतर तेलांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल फार अधिक प्रमाणात असतं. झालं! त्या दिवसापासून आमच्याकडे सरसोंचं म्हणजे मोहरीचं तेल स्वंयपाकात वापरलं जाऊ लागलं. इकडे थोरल्या सासूबाईंनी फर्मान काढलं, ‘‘मला मोहरीच्या तेलाची अॅलर्जी आहे. मी त्या तेलातला स्वयंपाक खाणार नाही. पुन्हा  मधल्यामध्ये माझी पंचाइत झाली. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये समझोता कसा करावा मला सुधरत नव्हतं. मला खूपच टेंशन आलं. त्यावर उपाय सापडत नव्हता.’’

मला वाटलं लवकर या समस्येवर उपाय मिळाला नाही तर माझं बी.पी. तरी वाढेल, माझी शुगर तरी शूट होईल नाही तर मी डिप्रेशनमध्ये तरी जाईन. नवरोजीला काही म्हणण्यात अर्थच नव्हता. माझी समस्या त्यांना समजणारच नव्हती. रात्रभर मी विचार करत होते, तळमळत होते, अन् शेवटी मी एका निर्णयाप्रत पोहोचले होते.

सकाळी न्याहारीच्या वेळी मी माझ्या दोन्ही सासूबाईंना सांगितलं की माझ्या माहेरची एक नातलग स्त्री आहे. काही कारणानं त्यांची आर्थिक परिस्थिती घसरली आहे, त्यांना स्वयंपाकाचं काम मिळालं तर हवंय. आपण त्यांना कामावर ठेवून घेऊ. त्यांना आर्थिक मदत होईल अन् त्या स्वयंपाकघर पूर्णपणे सांभाळतील.

आधी तर दोघींनी एकजुटीनं विरोध केला. ‘‘कशाला उगीच! आहोत की आपण करायला, खर्च वाढेल ना? वगैरे वगैरे…’’ मग मी जरा कठोरपणे अन् अगदी ठामपणे

सांगितलं, ‘‘मग मी त्यांना दर महिन्याला काही पैसे तसेच देईन. त्यांना काम द्यायचं नसेल तर नका देऊ.’’

मग दोघींनी एकदमच सूर बदलला, ‘‘चल, येऊ देत त्यांना, गरजू आहेत, कष्ट करून पैसा मिळवू बघताहेत, आपण मदत नाही करायची तर कुणी करायची? वगैरे वगैरे.’’ मी मनांतल्यामनांत जाम खुश झाले, आता चांगल्या चवीचा स्वयंपाक होणार अन् पोटभर जेवता येणार, कारण मी एका चांगल्या स्वयंपाकिणीशी बोलणी करून ठेवली होती. आता जे काय करायचं ते ती बघून घेईल. दुसऱ्यादिवशी बरोबर अकरा वाजता दरवाज्याची घंटी वाजली. मी दार उघडलं. दारात ‘ती’ होती. माझ्या समस्येचं उत्तर…दोन सासवांच्या जात्यात मी उगीचच भरडून निघत होते. शेवटी उपाय सापडला. तिलाही आधीच घरातली परिस्थिती समजावून सांगितली होती. ती म्हणाली, ‘‘मी बघेन सगळं. घेईन सांभाळून, तुम्ही काळजी करू नका.’’

अन् मी निश्चंत झाले.

शेवटचं ते स्मितहास्य

कथा * कुसुम अंतरकर

एकदाच, फक्त एकदाच प्राची होकार दे गं, अगदी थोडक्या वेळाचा प्रश्न आहे. नंतर तर सर्वांचं आयुष्य पुन्हा जसं होतं तसंच सुरू राहील. या गोष्टीचा कोणताही दुष्परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही ही माझी जबाबदारी.’’

शुभाचं बोलणं प्राचीच्या कानावर पडलं तरी ते मेंदूत शिरलं नाही. कदाचित ती समजून घ्यायला बघत नव्हती. हे असं नाटक करता येईल, ती करू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती.

‘‘सॉरी शुभा, हे मला नाही झेपणार, तुला नाही म्हणताना मलाही खूप यातना होताहेत पण, नाही गं! नाही…नाहीच झेपणार मला.’’

‘‘एकदाच गं! दिव्यचा थोडा विचार कर, तुझ्या या निर्णयामुळे त्याला केवढा आनंद मिळणार आहे.’’

या गोष्टी शुभानं प्राचीला सांगायची गरज नव्हती. ती तर सदैव दिव्यच्याच विचारात गुंतलेली असायची. दिवस रात्र तिच्या मनात दुसरा विचारच नव्हता.

प्राची बोलत नाहीए हे बघून शुभा तिथून उठली अन् प्राचीला पुन्हा जुन्या आठवणींचे कढ आवरेनात.

दिव्य आणि प्राचीची भेट एका मॉलमधल्या लिफ्टमध्ये झाली होती. लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे प्राचीचा जीव घाबरा झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली. पटकन् दिव्यनं तिला मदत केली. काही क्षणांतच लिफ्टही सुरू झाली. दिव्यनं तिला घरापर्यंत सोबत केली.

त्यानंतर त्याच्या भेटीगाठी वाढल्या. ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. दोघांचं एकमेकांच्या घरी जाणंयेणं होतं अन् घरातून लग्नाला विरोधही नव्हता.

दिव्यला एक धाकटी बहीण होती. प्राची तर एकुलती एकच होती. दोन्ही घरांमध्ये या लग्नामुळे आनंदच झाला होता. सगळं कसं छान चाललेलं अन् अचानक या आनंदाला ग्रहण लागलं.

दिव्यच्या पोटात अधूनमधून दुखायचं. प्रथम त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस दुखणं असह्य झाल्यावर त्यानं डॉक्टरला दाखवलं. त्याला तपासताना डॉक्टर गंभीर झाले. त्यांनी केस तज्ज्ञ डॉक्टरकडे रेफर केली. अनेक तपासण्या, सोनोग्राफी व इतर सोपस्कार झाले अन् निदान झालं कॅन्सरचं. अमांशयाचा कॅन्सर तोही लास्ट स्टेजमधला. दीव्य अन् त्याच्या घरच्यांच्या अंगावर तर जणू वीज कोसळली. जेमतेम चार ते सहा महिनेच आयुष्य उरलं होतं दिव्यचं.

घरात आता काळजी आणि अश्रू होते. या बातमीनं दोन्ही घरातला आनंद हिरावून घेतला होता. केवढी स्वप्नं बघितली होती दोघांनी…प्राची आणि दिव्यनी. पण आता तर सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. कुणाच्याच डोळ्यातळे अश्रू थांबत नव्हते.

एक दिवस दिव्यजवळ बसलेल्या प्राचीला त्यानं म्हटलं, ‘‘प्राची, सगळं संपलंय गं आता…तू इथं येत जाऊ नकोस,’’ वेदनेनं त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता.

‘‘नाही दिव्य, असं म्हणू नकोस. तिला जर इथं येऊन तुझ्याजवळ बसून बरं वाटत असेल तर तिला येऊ देत ना.’’ शुभानं त्याला म्हटलं, ‘‘जेवढं आयुष्य आहे ते अगदी आनंदानं, पूर्णपणे उपभोगून घे, या उरलेल्या दिवसात तुला जे करायचं आहे ते करून टाक. मृत्यूपूर्वी सगळ्या इच्छा पूर्ण व्हायलाच हव्यात. त्यामुळे तुला मृत्यूची भीती वाटणार नाही.’’

‘‘या दु:खाच्या, वेदनेच्या सावटातही तू तुझं आयुष्य असं जगून घे की मृत्यूलाही वाटलं पाहिजे की चुकीच्या जागी आलोय की काय? क्षण अन् क्षण आनंद साजरा करूयात. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. यापुढे आजारपण वगैरे काहीच बोलायचं नाही.’’

शुभाच्या म्हणण्यानंतर दोन्ही घरातलं वातावरण एकदमच बदललं. काळजी अन् दु:खाची जागा, आनंदानं, आशेनं अन् हास्यविनोदानं घेतली. छोट्यातला छोटा आनंदही थाटात साजरा केला जात होता. घरात कायम उत्सवाचं वातावरण असायचं. दिव्यला कुठलाही त्रास होणार नाही. याकडे शुभा जातीनं लक्ष देत होती.

एक दिवस शुभानं आईला म्हटलं, ‘‘आई तुझी इच्छा होती ना दिव्यचं लग्न खूप थाटात करायचं म्हणून? दिव्य तुझा एकुलता एक मुलगा आहे, मला वाटतं तुझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी.’’

आईनं तिला थांबवत म्हटलं, ‘‘शुभे, अगं बाकी सगळं जे काही तू करते आहेस ते ठिक आहे, पण लग्न? अगं, दिव्यही या गोष्टीला तयार होणार नाही. अन् थाटात लग्न करायचं तर पैसा हवा ना? आपले सगळे पैसे दिव्यच्या उपचारांवरच खर्च होताहेत…’’ आईला पुढे बोलवेना. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले.

आईचे डोळे पुसत शुभानं म्हटलं, ‘‘तुझ्या भावना कळताहेत मला. पण अगं, प्राची अन् दादाला कित्येकदा मी त्यांच्या लग्नाच्या संदर्भात बोलताना ऐकलंय. नवरदेवाचा वेष घालून लग्नाला उभं राहण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहायला नको. मी लग्नासाठी त्याचं मन वळवेन. अन् हे लग्न म्हणजे खरं लग्न नाहीए गं! फक्त जाणाऱ्या जिवाच्या समाधानासाठी, त्याची अखरेची इच्छा पूर्ण करणं आहे. लग्नाचं नाटकच समज गं! फक्त तू मानसिक तयारी ठेव. मी बाबांनाही सगळं समजावून सांगते.

उद्याच मी प्राचीच्या घरी जाते. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. दादाच्या मृत्यूची घटका कधीही येऊ शकते. आपल्याला घाई केली पाहिजे. राहिला प्रश्न पैशांचा, तर ती ही व्यवस्था मी करते. नातलग, मित्र, परिचित सगळ्यांची मदत घेईन.’’

त्याप्रमाणेच शुभा प्राचीला भेटायला गेली होती, पण प्राचीनं तिला नकार दिला. तरीही शुभा निराश झाली नाही.

‘‘मी माझ्या दिव्य दादाचं लग्न थाटात करेन. त्याला सर्व आनंद मिळवून देईन. करवली म्हणून त्याच्या लग्नात मिरवून घेईन. काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही.’’

ती घरी येताच दिव्यनं विचारलं, ‘‘प्राची तयार झाली?’’

‘‘हो झाली ना. तिचं खरोखरंच प्रेम आहे तुझ्यावर.’’ शुभाचं बोलणं ऐकून दिव्यच्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज बघून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला.

शुभानं दिव्यच्या लग्नाची कल्पना अन् त्यासाठी लागणारी आर्थिक मदत या बाबतीत सगळ्या सोशल साइट्सवर पोस्ट टाकली आणि सर्वच संवेदनशील मित्र, परिचित, नातलगांनी आपापल्या परीनं मदत केली. पुरेसा पैसा मिळाला अन् लग्नाची तयारी सुरू झीली.

कुठल्याही लग्न घरात जसं वातावरण असतं तसंच वातावरण दिव्यच्या घरात होतं. नवरी व नवरदेवाचे पोशाख, घराची साधी व कलात्मक सजावट, फराळाचे पदार्थ, शिंपी, कासार, सोनार वगैरेंची वर्दळ यामुळे लग्नघर गजबजलं होतं.

लग्न चार दिवसांवर आलेलं अन् शुभाला खूपच काळजी पडली होती की नवरी आणायची कुठून? तिनं सर्वांना खोटंच सांगितलं होतं की प्राची आणि तिच्या घरची मंडळी लग्नाला तयार आहेत म्हणून. आता काय करायचं?

‘एकदा पुन्हा प्राचीला विनंती करून बघूयात,’ असं ठरवून शुभानं पुन्हा एकदा प्राचीचं घर गाठलं.

प्राचीनं खोलीचं दार उघडलं नाही. पण प्राचीची आई शुभाशी अत्यंत प्रेमानं वागली. ‘‘शुभा, पोरी तुझ्या भावना आम्हाला समजतात गं! आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, पण प्राचीला समजावणं किंवा राजी करणं आम्हाला जमणार नाही. दिव्यचा अंतिम क्षण ती बघू शकणार नाही. कदाचित त्यामुळेच ती तयार होत नाहीए. तशीही ती खूप भावनाप्रधान आहे आणि दिव्यच्या या जीवघेण्या आजारानं अधिकच हळवी झाली आहे.’’ प्राचीच्या आईनं शुभाला सांगितलं.

‘‘पण मावशी, दिव्यचं काय? त्याचा काय दोष आहे म्हणून नियतीनं त्याला अशी शिक्षा द्यावी? तो जर इतकं भोगतोय, सोसतोय तर प्राचीला थोडं नाटक करायला काय हरकत आहे?’’ शुभा संतापून म्हणाली.

‘‘तू चुकतेस, शुभा, दिव्य इतकंच प्राचीही भोगतेय, सोसतेय. तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर, म्हणूनच तिचा जीव तुटतोय. तू एक लक्षात घे. काही दिवसांतच दिव्य हे जग सोडून जाईल. त्याच्याबरोबर त्याच्या यातना, वेदना, सोसणं, भोगणं सगळं सगळं संपेल. पण प्राचीला तर सगळा जन्म हे दु:ख घेऊनच जगावं लागणार आहे. तिची स्थिती तर दिव्यपेक्षाही दयनीय आहे. म्हणूनच आम्ही तिच्यावर दबाव आणू शकत नाहीए.

‘‘शिवाय समाजाचा अन् प्राचीच्या भविष्याचाही विचार करायला हवा. लग्न झाल्याझाल्या पतिचा मृत्यू अन् तिच्यावर वैधव्याचा शिक्का बसणार…कुणा कुणाला सांगणार की हे फक्त नाटक होतं. तुला वाटतं तेवढं ते सोपं नाहीए,’’ प्राचीच्या आईनं शुभाला नीट समजावून सांगितलं.

त्यादिवशी शुभाला प्रथमच दिव्यपेक्षाही प्राचीची दया आली. पण तिनं हुशारीनं या परिस्थितीवरही तोडगा काढला.

‘‘मावशी, आपण एक युक्ती करूयात. हल्ली दिव्यला थोडं कमी दिसायला लागलं आहे. आपण प्राचीच्या जागी तिच्याशी बऱ्यापैकी साम्य असलेली मुलगी नवरी म्हणून उभी केली तर? दिव्यला कळायचंही नाही…’’

‘‘अगं हो, प्राचीची एक मैत्रीण आहे. खूप साम्य आहे दोघींमध्ये. एकदा एका नाटकात दोघींनी जुळ्या बहिणीची भूमिका केली होती. लोकांनाही खूप कौतुक वाटलं होतं. शिवाय ती खूप गरीब कुटुंबातली आहे. पैसा मिळतोय, त्यातून पुन्हा हे माणुसकीचं काम आहे म्हणून ती तयार होईल…पण एक मात्र खरं की सप्तपदी, होमकुंडाभोवतीचे फेरे वगैरे खूप सगळं खोलात जाऊन नको करायला. कारण अजून तिचंही लग्न व्हायचंय.’’

‘‘मावशी, अगदी निर्धास्त असा तुम्ही. आपण अगदी नाटकच करतो आहोत. पुन्हा सर्व विधी करण्याइतकी दिव्यची तब्येत बरोबर नाही, तो फार वेळ बसूही शकणार नाही.’’

लग्नाचा दिवस उजाडला. घराजवळच्या एका बागेत छोटासा मांडव घातला होता. दिव्य नवरदेवाच्या वेशात नटला होता. जवळचे आप्त, मित्र जमले होते. सजवलेल्या एका कारमधून वधू अन् तिचे नातलगही येऊन पोहोचले.

लग्नाचे औपचारिक विधी झाले. दिव्य तर इतका आनंदात होता की हा काही दिवसांत मरणार आहे हे खरंच वाटत नव्हतं. शुभाला तेच हवं होतं.

नवरी लेहेंगा चुनरी या पोशाखात होती. तिनं चक्क घुंगटही घेतला होता.

‘‘चला आता सप्तपदी, मंगळसूत्र वगैरे विधी सुरू करू.’’

लगेच प्राचीचे आईवडिल व शुभा सावध झाली. आता नवरीला इथून बाजूला करायला हवं, नाही तर खरोखरीचं लग्न लागेल अन् अनर्थ होईल. प्राचीच्या आईनं म्हटलं, ‘‘गुरूजी, नवरीला जरा बरं नाहीए, जीव घाबरतोय तिचा, तिला थोडी विश्रांती घेऊ द्या. मग पुढले विधी करूयात. तोपर्यंत नवरदेवही थोडी विश्रांती घेतील.’’

तेवढ्यात आपला घुंगट बाजूला करून नवरीनं म्हटलं, ‘‘नाही गुरूजी. माझी तब्येत इतकीही बिघडलेली नाहीए की मला विश्रांती घ्यावी लागेल.’’ नवरीकडे बघताच शुभासकट सगळ्यांनाच धक्का बसला. कारण नवरी स्वत: प्राचीच होती.

झालं असं की जेव्हा प्राचीला कळलं की शुभानं दिव्यच्या नवरीसाठी ईशाची, तिच्या मैत्रिणीची निवड केली आहे, तेव्हा त्या लग्नात दिव्यची नवरी दुसरी कुणी असणं प्राचीला पटलं नाही. दिव्यची नवरी फक्त प्राचीच असणार म्हणून प्राची स्वत:च नवरीच्या वेशात तयार होऊन आली होती.

तिच्या डोळ्यात आज अश्रू नव्हते. चेहऱ्यावर आनंद आणि ओठांवर हसू होतं. आपलं सर्व दु:ख पोटात दडवून ती दिव्यच्या आनंदोत्सवात सहभागी झाली होती. हाच दिव्यला मिळणारा शेवटचा आनंद होता. तो प्राचीनंच त्याला द्यायला नको का?

शुभानं तर आनंदातिशयानं प्राचीला मिठीच मारली. प्राचीनं तबकातला हार दिव्यच्या गळ्यात घातला. त्याचे हात हातात घेऊन त्या हाताचं चुंबन घेतले. दिव्यच्या चेहऱ्यावर, ओठांवर इतकं लोभस हास्य विलसत होतं की लोक बघत राहिले. पण एवढे काही त्याच्या अशक्त शरीराला झोपले नाहीत. तो खाली कोसळला अन् बेशुद्ध झाला. त्याचे प्राण अनंतात विलीन झाले पण हासुद्धा चेहऱ्यावरचं ते दिव्य स्थित तसंच होतं.

प्राचीच्या या अप्रत्याशित निर्णयानं दिव्यचे कुटुंबीय भारावले. जन्मभर ते तिच्या ऋणातून मुक्त होणार नव्हते. यापुढे प्राचीची संपूर्ण जबाबदारी आता त्यांची होती.

सांझ की दुलहन – पहिला भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(पहिला भाग)

‘‘कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुलहन बदन चुराए, चुपके से आए, मेरे खयालों के आंगन में…’’ गाणं गुणगुणतच राजन बाथरूममधून बाहेर आला अन् म्हणाला, ‘‘वहिनी, माझा ब्रेकफास्ट…मला लवकर जायचंय आज.’’

त्याच्याकडे बघत हसून राधिकेनं म्हटलं, ‘‘काय भाऊजी? विशेष खुशीत दिसताय?

हल्ली रोजच ‘सांझ की दुलहन’ आठवतेय तुम्हाला?’’

‘‘काही नाही गं, रेडियोवर ऐकलं अन् सहज गुणगुणलो.’’

‘‘एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं त्याचं काय कारण असतं माहीत आहे?’’

‘‘मला नाही माहीत,’’ काहीशा बेपवाईनं राजननं उत्तर दिलं.

‘‘याचा अर्थ असा की गाण्याचे शब्द तुमच्या हृदयात खोलवर झिरपले आहेत. एखादं गाणं जेव्हा नकळत ओठांवर येतं, तेव्हा मनात ती प्रतिमा आधीच तयार झालेली असते.’’

‘‘काही तरीच काय वहिनी…तू ही ना…’’

‘‘ऑफिसात कुणी बघून ठेवली आहे का? असेल तर मला सांगा, मी सांगते तुमच्या दादांना. ठरवून टाकूयात लग्न.’’

‘‘नाहीए गं कुणी, असती तर सांगितलंच असतं ना?’’

‘‘खरं?’’

‘‘अगदी खरं!’’ हसून राजननं म्हटलं अन् तिच्याकडे बघत म्हणाला, ‘‘एक सांगू?’’

‘‘सांग ना.’’

‘‘वहिनी, मला ना, सांझ की दुलहनच पाहिजे.’’

‘‘आता ती कशी असते बाई? आम्ही तर अशी कुणी नवरी बघितलीच नाहीए?’’

‘‘खूप खूप सुंदर! उतरून येणाऱ्या सायंकाळसारखी शांत, सर्व प्रकाश आपल्यात समावून घेतलेली, डोंगरामागे दडणाऱ्या सूर्याच्या सावळ्या प्रकाशासारखी, पानांमधून डोकावणाऱ्या कवडशांसारखी, रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशासारखी, डोळ्यातल्या स्वप्नासारखी…अतिशय सुंदर…!!’’

‘‘म्हणजे थोडक्यात तुम्हाला कवितेशी लग्न करायचंय.’’

‘‘कविता नाही वहिनी. ती प्रत्यक्षात असणार आहे. जशी सोनेरी गुळाबी संध्याकाळ स्वप्नातली असूनही प्रत्यक्षात असतेच ना? मला तिच हवीय, हुंडा नाही, मानपान नाही, काही नको.’’

‘‘म्हणजे तुम्ही शोधताय?’’

‘‘नाही, अजून तसं काहीच नाही.’’

‘‘मग?’’

‘‘आता तर फक्त मिटल्या डोळ्यातून डोकावते.’’

‘‘असं  मग काय म्हणते? सांगा की…’’

‘‘काही नाही. फक्त येते अन् जाते, उद्या येते एवढं वचन देते.’’

‘‘भाऊजी, स्वप्नं बघायला लागलात…चांगला संकेत आहे. बाबांना सांगते,’’

नाश्त्याची बशी त्याच्या हातात देत राधिका हसून बोलली.

राधिकेचा दीर राजन खूपच संवेदनशील, अतिशय सज्जन, मनाचा निर्मळ अन् खूप प्रेमळ. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा. सगळ्या सोसायटीत राजनदादा म्हणून प्रसिद्ध. कॉलनीतले सगळेच त्याच्या ओळखीचे. वाटेत चालताना, भेटलेल्या कोणी, आजही अडचण सांगितली की राजननं त्याला मदत केलीच म्हणून समजा. अन् वर सहजपणे म्हणेल, ‘‘त्याला गरज होती, मी मदत करू शकत होतो…केली!’’

‘‘असे बरे भेटतात तुम्हाला चालता चालता?’’ राधिका म्हणायची.

‘‘भेटतात खरे!’’

‘‘भाऊजी मग ‘ती’ का नाही भेटत?’’

‘‘ती अशी नाही भेटायची वहिनी.’’

‘‘मग कशी भेटायची?’’

‘‘त्यासाठी तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चालता चालता साधी सामान्य माणसं भेटतात. पण वहिनी, ‘ती’? ती स्पेशल आहे ना?’’

इतके दिवस सगळे त्रस्त होते. राजन लग्नाला होकात देत नव्हता. लग्न करणारच नाही म्हणायचा. पण आज मात्र त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितली होती.

राजन ऑफिसला निघून गेला अन् राधिका विचार करू लागली की इतका निर्मळ मनाचा अन् भाबडा आहे हा मुलगा, त्याला हवंय तसं पवित्र सौंदर्य आजच्या काळात असेल का? कुठं अन् कशी शोधावी त्याच्या आवडीची ‘सांझ की दुलहन’?

तेवढ्यात तिचा नवरा शिबू खोलीतून बाहेर आला. ‘‘कसला विचार करतेस?’’ त्यानं विचारलं.

‘‘इतकी सुंदर अन् पवित्र कुठं मिळेल?’’

‘‘काय घ्यायचंय तुला? कसली खरेदी?’’

‘‘भाऊजींसाठी नवरी…सांझ की दुलहन’’

‘‘उगीच चेष्टा करू नकोस.’’

‘‘अहो, एवढ्यात सांगून गेलेत, त्यांना कशी नवरी हवी आहे ती. स्वप्नातल्या सांजवेळेसारखी सुंदर, आज तर तुमचा भाऊ अगदी कवीच झाला होता.’’

‘‘भाऊ कुणाचा आहे? अन् लाडका दीर कुणाचा आहे?’’ राधिकेकडे हसून बघत शिबूनं म्हटलं, ‘‘चला, काही तरी बोलला एकदाचा.’’

‘‘काहीतरी नाही, बरंच बोललेत.’’

‘‘तर मग शोध ना जे काही हवंय त्याला ते.’’

‘‘कुठून आणायची अशी परी? तिचे चोचले असणार? ते कुणी पुरवायचे?’’

‘‘दीर भावजय आहेत ना चोचले पुरवायला. त्यानं बघून ठेवलीय का?’’

‘‘नाही.’’

‘‘मग?’’

‘‘अजून कल्पनेतच आहे. पण ती प्रत्यक्षात येईल म्हणालेत.’’

‘‘मग एखाद्या कवीला गाठा, कविता लिहून घ्या अन् द्या त्याला दुलहन म्हणून.’’

‘‘अहो पण निदान आता लग्नाला होकार तरी दिलाय ना? प्रयत्न करायलाच हवेत.’’

‘‘तर मग करा प्रयत्न. येडाच आहे…मी निघालो कामावर?’’ अन् शिबू निघून गेला. हा आणखी एक येडा. सतत काम काम. थांबायचं नाव नाही. सतत उंच आकाशात भराऱ्या जमीनीवर येणं ठाऊकच नाही. कुणी अडवणारं नव्हतं. शिबूनं आपल्या कामाचा पसारा एवढा वाढवालाय की आता त्याला स्वत:साठी वेळ देता येत नाहीए.

राधिका त्या उंच उडणाऱ्या पक्ष्याकडे बघत होती. आता कधी तरी रात्रीच तो खूप उशिरा घरी परतणार…सायंकाळी परतणारे पक्षी वेगळेच असतात. शिबू चांगला होता, पण बायकोची काळजी घेणं त्याला जमत नव्हतं. त्याचा तो पिंडच नव्हता.

तेवढ्यात बाहेरून सासरे म्हणाले, ‘‘सूनबाई, दूधवाला आलाय.’’

‘‘हो बाबा…’’ तत्परतेनं पातेलं घेऊन राधिका बाहेर धावली. दूध घेतलं अन् म्हणाली, ‘‘बाबा, तुम्हीही नाश्ता करून घ्या.’’

‘‘मांड टेबलवर, आलोच.’’

त्यांना वाढता वाढता राधिकेनं म्हटलं, ‘‘बाबा, एक सांगायचं होतं…’’

‘‘बोल ना?’’

‘‘राजन भाऊजी लग्न करायला तयार झालेत.’’

‘‘अरे व्वा! कशी हवीये मुलगी?’’

‘‘खूप खूप सुंदर हवी आहे.’’

‘‘एवढंच ना? अगं वाटेल तेवढ्या सुंदर मुली आहेत. त्यानं फक्त पसंत करावी, बार उडवून देऊ. सूनबाई, तू ही आघाडी सांभाळ. मी ती सांभाळतो.’’ बाबांनाही एकदम उत्साह आला होता.

‘‘कधीपासून दुसऱ्या सुनेची वाट बघत होतो शिवाय…’’

‘‘शिवाय काय बाबा?’’

बाबा काहीच बोलले नाहीत.

राधिकाला कळत होतं. तिच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. अजून घरात बाळाची चाहूल लागली नव्हती. बाबांची तिच खंत होती.

बाबांकडे एक नातलग आले होते. ते म्हणाले, ‘‘अहो, मुलगी तुम्ही बघा, होकार द्यालच. एकदा त्यांच्या घरी जाऊन या.’’

बाबांनी त्या नातलगानं दिलेली माहिती राधिकेला दिली. राधिका सगळ्या घरादाराची काळजी घेते. सगळ्यांना आनंद वाटावा म्हणून झपाटते. तिच्या मनांत शंका आली. राजन खूपच भाबडा आहे अन् ही मुलगी हॉस्टेलला राहिलेली. घरात जमवून घेईल का?

रात्री उशिरा शिबू आल्यावर तिनं विषय काढला.

शिबूनं समजूत काढली, ‘‘होस्टेलला राहणारी प्रत्येक मुलगी लवंगी मिरची नसते गं! स्मार्ट असेल, कारण तिथलं वातावरणच तसं असतं…तू काळजी करू नकोस.’’

बाबांनी फर्मान काढलं, ‘‘आज सगळे अमुक अमुक ठिकाणी जाणार आहेत. राजन, तुलाही यावं लागेल.’’

राजननं काहीही न विचारता ‘हो’ म्हटलं. ‘खरंच किती साधा आहे, कुठं जाणार, कशाला जाणार एवढंही विचारलं नाही,’ राधिकेच्या मनात आलं.

त्यांच्या घरी गेले. मुलगी समोर आली…खरोखरच अप्रतिम लावण्य होतं. बघताच राधिका म्हणाली, ‘‘भाऊजी, सांझ की दुलहन, हीच आहे.’’

हसून राजननं संमती दिली.

इतर काही ठरवायचं नव्हतंच. पण बाबांनी ठामपणे एवढं मात्र सांगितलं, ‘‘आम्हाला काहीही नको, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, त्याचा राग मानू नये. आमच्या घरात मोठी सून आहे. सगळं घर ती कौशल्याने सांभाळते. तिच्यामुळेच घरात शांतता, सौख्य, समाधान अन् आनंद आहे. नव्या सुनेनं ते सौख्य, तो आनंद, समाधान कायम ठेवावं.’’

राधिका विचार करत होती, या सुंदरीनं स्वत:च्या हातानं कधी ग्लासभर पाणीही घेतलं नसेल…किती नाजूक आहे ही…नखशिखांत सौंदर्य आहे.

घरी आल्यावर एकदाच राधिकेनं म्हटलं, ‘‘एवढं हे सौंदर्य, हे लावण्य आपण सांभाळू शकू? ती छान काम करेल?’’

‘‘नाही केलं तर आपण करू,’’ सहजपणे राजन उद्गारला.

‘‘तिचे नखरे, कोडकौतुक, चोचले झेपतील आपल्याला?’’

‘‘मी करेन ना सर्व,’’ राजन म्हणाला.

शिबूनं म्हटलं, ‘‘राधिका, नको काळजी करूस.’’

बाबांनीही म्हटलं, ‘‘सूनबाई, सगळं राजनवर सोपव. ती अन् तो बघून घेतील.’’

दिवसभर कामानं क्षीणलेली राधिका अंथरूणावर पडली, पण झोप लागत नव्हती. एकच गोष्ट मनात येत होती, राजन फार सरळ मनाचा अन् भाबडा आहे. ही सुंदरी त्याला समजून?घेईल का?

लग्नघरात जोरात तयारी सुरू झाली. राधिकेलाच सगळं बघायचं होतं. प्रत्येक जण तिलाच हाक मारायचा. पायाला चक्र लावून ती फिरत होती. नवरानवरीच्या पोषाखाबद्दल चर्चा झाली.

बाबांना गंमत वाटायची. ते म्हणायचे, ‘‘मॉडर्न युग आहे, चालू द्या.’’

नवरीच्या साड्या खरेदी केल्यावर राजननं राधिकेला विचारलं, ‘‘वहिनी, तुझी साडी मी पसंत करू की दादा करेल?’’

‘‘तुमच्या दादानं यापूर्वी कधी काही पसंत केलं होतं तर आत्ता करतील?’’ राधिकेनं म्हटलं. तिच्या मनात आलं की शिबूनं तर एवढ्या वर्षांत कधी म्हटलं नाही की ही साडी तुला शोभून दिसतेय की या साडीत तू किती सुंदर दिसतेस…आतासुद्धा त्याला खरेदीला चल म्हटलं तर ‘‘तुम्हीच जा’’ म्हणाला अन् कामावर निघून गेला. नकळत तिचे डोळे पाणावले.

‘‘वहिनी, काय झालं?’’

‘‘काही नाही…चला माझी साडी निवडूयात.’’

दुकानदारानं बऱ्याच साड्या दाखवल्या, जरीची सुंदर काळी साडी राजननं निवडली.

‘‘नाही भाऊजी, लग्नात काळा रंग अशुभ मानतात.’’

‘‘कुणी सांगितलं?’’

दुकानदारही म्हणाला, ‘‘मॅडम हा रंग तर सध्या फॅशनमध्ये आहे. तुमच्या गोऱ्या रंगावर ती खूप खुलून दिसेल.’’

शेवटी एक काळी अन् एक हिरवीगार अशा दोन साड्या राजननं वहिनीसाठी खरेदी केल्या.

घरी परतताना राजन म्हणाला, ‘‘तुझं दु:ख मला कळतंय वहिनी. मी मात्र सुंदरीला सुखात ठेवणार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत हे मी बघेन अन् आलेच अश्रू तर ओठांनी टिपून घेईन.’’

‘‘भाऊजी, तुम्ही खरोखर खूप चांगले आहेत.’’ उदास हसून राधिका म्हणाली.

‘‘वहिनी, तिला एकदा घरात येऊ दे, ती तुझी मैत्रीण म्हणूनच वागेल. तू तिची थोरली ताई असशील.’’

राधिकेला तर आता त्या संध्यासुंदरीचा हेवाच वाटायला लागला. पण ती खुशीत होती. घर पाहुण्यांनी गजबजलं होतं. सगळे राधिकेच्या व्यवस्थापनाचं कौतुक करत होते. त्यामुळे ती सुखावली होती. थोरली जाऊ म्हणून कामं करत मिरवतही होती. बाबांनी तीन दिवस सतत सनई चौघडा लावला होता. सनईच्या सुरातच नव्या सुनेनं उंबरठ्यावरचं तांदळाचं माप ओलांडून घरात प्रवेश केला. कुणीतरी म्हणालं, ‘‘सूनबाई तांदूळ उधळेल अन् राजननं ते गोळा करायचे.’’

राधिकेच्या मनात आलं तिला आधीच सांगायला हवं होतं, माप हळूच ढकलं…पण तो बोलली नाही.

काही दिवसातच राधिकेच्या मनातली शंका खरी ठरली. सुंदरी खरोखर राणीच होती. सकाळी दहा वाजता झोपून उठायची. बाबांना चोरून राजन तिला चहा करून द्यायचा.

बाबांनी सुंदरीला म्हटलं, ‘‘राधिकेला घरकामात मदत करत जा,’’ तरी ती असहाय्यपणे म्हणाली, ‘‘मला येत नाहीत कामं करायला…मी कशी करू? काही बिघडलं तर?’’

राधिकानं बाबांना सांगितलं, ‘‘असू देत बाबा, ती झोपूनच उठते किती उशीरा.’’

तिचं स्वर्गीय सौंदर्य कोमेजून जाऊ नये म्हणून राधिका तिला स्वयंपाकघरात येऊच देत नसे. तिच्या ते पथ्यावरच पडायचं. तिचे सगळे नखरे राधिका सहन करत होती.

सुंदरी घरात आल्यावर राधिकेला मैत्रीण मिळाली नाही, उलट ती अधिकच एकटी झाली. कारण आता राजनही सतत सुंदरीभोवती असायचा. पूर्वी राधिका आपलं सुखदु:ख त्याच्याजवळ बोलायची. स्वयंपाकघरात ती काम करत असताना तो तिच्याबरोबर गप्पा मारायचा. पण आता तो सुंदरीजवळ असायचा. आपलं सगळं वागणं राधिका सहन करते, तिच्या चुकाही ती सावरून घेते. तिला कधी कुणासमोर उघडं पडू देत नाही हे सुंदरीच्या लक्षात आलं होतं. त्याचा ती पुरेपूर फायदा घेत होती. घरातलं वातावरण बिघडत होतं. राधिका जिवाचा आटापिटा करून सगळं सांभाळत होती. वातावरण आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करत होती. पण सुंदरीनं जणू घरातली शांतता भंग करण्याचा, घरातले नियम, मर्यादा मोडण्याचा चंगच बांधला होता. रोज मैत्रिणीबरोबर पार्टीला जायचं.

एक दिवस बाबांनी यावर आक्षेप घेतला.

‘‘मी करते त्यात वाईट काय आहे? माझ्या मैत्रीणींबरोबरच असते ना?’’ तिनं बाबांनाच उलट विचारलं.

‘‘राजनला विचारत जा.’’

राजननं हो म्हटलं.

तिचा घराबाहेर राहण्याचा वेळ वाढत होता. बाबांनी म्हटलं, ‘‘राजन, अरे इतकी सूट देणं किंवा तिनं एवढं स्वैरपणे वागणं बरोबर नाही. शेवटी ती घरातली सून आहे. तुझी वहिनीही आहे ना घरात? ती कधी अशी वागली नाही.’’

‘‘ठिक आहे बाबा, तिच्या मैत्रिणीबरोबरच जाते ना? तुम्ही नका टेंशन घेऊ…मी आहे?’’

‘‘तुला ठाऊक आहे का, यावेळी होस्टेलची मुलंही बरोबर आहेत?’’ बाबा जरा रागानंच म्हणाले.

पहिल्यांदाच, आयुष्यात पहिल्यांदाच राजननं बाबांना प्रत्युत्तर दिलं, ‘‘बाबा, ती होस्टेलमध्ये राहून शिकली आहे. मोकळ्या वातावरणात वाढली, वावरली आहे. तिला एकदम कसं नको म्हणू? हळूहळू समजेल तिला. मी समजावेन.’’

बाबा बोलले नाहीत. पण ते दुखावले गेले आहेत हे राधिकेच्या लक्षात आलं.

चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ आली. कोमलपणे म्हणाली, ‘‘बाबा, सध्या नवी आहे ती. एखादं बाळ झालं की आपसूक घरात राहील. बघा तुम्ही…’’ तिनं चहाचा कप बाबांच्या हातात दिला. दोघंही एकमेकांकडे बघून हसली.          (क्रमश:)

आंनदाची दिवाळी

* जयलक्ष्मी राजगोपाळ

दिवाळीला फक्त एक दिवस उरला होता. सोसायटीच्या बहुतेक घरांमध्ये रंगरंगोटी आणि लाइटिंगचं काम पूर्ण झालं होतं आणि लोक दिवाळीच्या तयारीसाठी इथे-तिथे फेऱ्या मारत होते. मिठायांचा गंध सोसायटीभर दरवळत होता. अधूनमधून फटाक्यांचे आवाजही ऐकू येत होते. सर्वत्र लगभग सुरू होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं.

या सर्व गोंधळात कॉलनीतील एक घर शांत होतं. ते होतं मिनी, रिनी आणि बबलूचं घर. तिन्ही मुलं पुन्हापुन्हा गॅलरीत जाऊन उभी राहत आणि आस लावून विचार करत होते, ‘आईबाबा आले असते तर आपणसुद्धा दिवाळी साजरी केली असती.’

त्यांचे वडिल ५ दिवस आधी कार अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल झाले होते आणि अजूनही रुग्णालयातच होते. त्यांची काळजी घेण्यासाठी आईसुद्धा तिथेच होती.

इतके दिवस तीन मुलांनी कसंकसं घर सांभाळलं होतं. जेवण करून खाणं, ते शाळेत घेऊन जाणं इ. ते स्वत: करत होते. पण आता आईबाबांशिवाय सण कसा साजरा करणार?

‘‘आता आईबाबा कदाचित दिवाळीनंतरच घरी येतील.’’ रात्री जेवताना रिनी आणि बबलू मिनीला म्हणाले.

‘‘हं…कदाचित डॉक्टरांनी बाबांना घरी जाण्याची परवानगी दिली नसेल,’’ मिनी उदास होऊन म्हणाली.

रिनी आणि बबलूने एकमेकांकडे पाहिलं आणि गप्प बसले. हॉस्पिटल जवळ असतं तर ते केव्हाच जाऊन बाबांना भेटून आले असते. पण हॉस्पिटल दूर होतं आणि ते कोणाला सोबत घेतल्याशिवाय जाऊ शकत नव्हते. या ५ दिवसांत ते फक्त एकदा आईबाबांना भेटले होते.

मान खाली घालून जेवणाऱ्या रिनी आणि बबलूला पाहून मिनी विचारात पडली. आईबाबा नसल्याने गेल्या काही दिवसांत त्यांच्यात किती बदल झाला  होता. आधी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणारे आता एकजूट झाले होते. या पाच दिवसांत एकदाही त्यांच्यात भांडण झालं नव्हतं.

आईबाबा असते तर आज घरात किती आनंदी वातावरण झालं असतं, किती फटाके आले असते, किती मिठाया आणल्या असत्या आणि असं शांतशांत बसलेल्या रिनी आणि बबलूने धमाल केली असती. आपल्या लहान भावंडांकडे पाहून मिनीने एक निर्णय घेतला.

‘‘उद्या आपण दिवाळी साजरी करायची.’’ तिने घरातली शांतता भंग करत म्हटलं.

‘‘खरंच.’’ रिनी आणि बबलूचा चेहरा फुलला. ‘‘पण कशी?’’

‘‘आपल्या पद्धतीने,’’ मिनी हसून म्हणाली.

‘‘खीर बनवू, नवीन आणलेले कपडे घालू आणि थोडेसे फटाके आणि भेटवस्तूही खरेदी करू.’’

‘‘ठीक आहे…ठीक आहे…’’ रिनी आणि बबलू उत्साहाने म्हणाले, ‘‘पण यावेळी भेटवस्तू आईबाबांसाठीसुद्धा घेऊया.’’

हे ऐकून मिनी अचंबित झाली. रिनी आणि बबलूने तर तिच्या मनातलं ओळखलं होतं.

‘‘हो, सगळ्यांसाठी खरेदी करायची,’’ ती आनंदाने म्हणाली, ‘‘आणि संध्याकाळी आईबाबांना दिवाळीच्या शुभेच्छाही देऊन येऊ.’’

रिनी आणि बबलू आनंदाने झोपी गेले.

मिनीने उद्याचं बजेट बनवलं. तिच्याकडे आईने दिलेले ५००० रूपये होते आणि तेवढ्याच पैशात त्यांना दिवाळी साजरी करायची होती.

दिवाळीची पहाट झाली. तिन्ही मुलं लवकर उठली. घराची साफसफाई करून झाल्यावर अंघोळ करून, नवीन कपडे घालून ते तयार झाले. बबलूने    दरवाज्याला छानसं तोरण बांधलं. रिनीने अंगणात छोटीशी रांगोळी काढली. मिनीने नाश्ता करताना थोडीशी खीरसुद्धा बनवली.

नाश्ता करून मिनी घराजवळच्या बाजारात गेली. बाबांसाठी एक शर्ट, आईसाठी परफ्युम, बबलूसाठी व्हिडिओ गेम सीडी, रिनीसाठी बार्बी डॉल, स्वत:साठी एक क्लच पर्स आणि फटाके, मिठाई घेऊन ती लवकर घरी पोहोचली.

रिनी आणि बबलू आपापल्या भेटवस्तू घेऊन खूश झाले. मिनीने दिलेला फुलबाजाही त्यांनी आनंदाने घेतला. खरंतर दरवर्षी फटाके वाटून घेताना त्यांच्यात लुटूपुटूची लढाई व्हायची. अशावेळी मिनीसुद्धा त्या भांडणात सामील व्हायची. आज मिनीने स्वत:साठी काहीच घेतलं नाही. सगळे फटाके आपल्या लहान भावंडांमध्ये वाटून टाकले.

‘‘शाब्बास, माझ्या लेकरांनो शाब्बास…’’

घरात अचानक कुणाचातरी आवाज ऐकून मुलांनी मान वर केली आणि पाहातच राहिले. आईबाबा कधी आले कळलंच नाही. दोघंही प्रेमाने मुलांकडे पाहात होते. बाबांच्या हातपायाला बँडेजसुद्धा लावलेलं होतं. पण ते आता बरे वाटत होते.

‘‘आई, बाबा…’’ तिन्ही मुलं एकसाथ ओरडत आईबाबांच्या कुशीत शिरली. ‘‘आज खरोखरंच आनंदाची दिवाळी आहे.’’

आईने तिघांनाही मिठीत घेतलं आणि म्हणाली, ‘‘खरंय मुलांनो, तुमच्यासारखी शहाणी बाळं ज्या घरात असतात तिथे दिवाळी एक दिवस नाही तर रोज असते.’’

बाबा काहीच म्हणाले नाहीत. पण मुलांनी आणलेल्या भेटवस्तू पाहून त्यांचे डोळे आनंदाने भरून आले. दिवाळीच्या रोषणाईने त्यांचं घरही उजळून निघालं  होतं.

अल्पना

* अनुराधा चितके

जवळ जवळ वीस वर्षांनंतर मी एक दिवस अल्पनाला भेटलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी अमेरिकेला परत जाताना अल्पनाही तिच्या मुलीसह माझ्याबरोबर असेल.

त्या दिवशी ड्रायक्लिन होऊन आलेल्या माझ्या कपड्यांमध्ये माझ्या लहेंग्याऐवजी एक लेडीज डे्स आला होता,  तो परत करून माझे कपडे घेण्यासाठी मी ड्रायक्लिंग करणाऱ्या माणसाच्या दुकानावर गेलो तेव्हा तिथे एक तरुणी त्याच्याशी जोरजोरात भांडत होती. तिचा आवेश, तिची भाषा बघून मला खरंच वाटेना की ती अल्पना असेल…पण ती अल्पनाच होती.

काही वेळ मी त्या दोघांमधलं भांडण थांबेल म्हणून वाट बघितली, शेवटी दुकानदाराला जरा मोठ्या आवाजातच म्हटलं, ‘‘अहो भाऊ, माझ्या कपड्यांच्या ऐवजी हा एक लेडीज डे्स चुकून आलाय तेवढा परत घ्या अन् माझा लहेंगा झब्बा मला परत करा,’’  मी डे्स दुकानातल्या फळीवर ठेवला.

‘‘अरेच्चा? हाच तर माझा डे्स…तुमच्याकडे कसा आला? चार पाच दिवस यांच्याकडे शोधतेय मी…इतके दिवस काय झोपला होता का तुम्ही?’’ तिचं अजूनही माझ्याकडे लक्ष नव्हतंच. तिने झडप घालून तो डे्स उचलला.

मीच म्हटलं, ‘‘अगं अप्पू? तू, तुम्ही अल्पना आहात ना? इथे कशी तू?’’

तिने माझ्याकडे बघितलं अन् मग हसून म्हणाली, ‘‘होय, मीच अल्पना. तुझा बेस्ट फ्रेण्ड. पण अरुण तू इथं कसा? तू तर अमेरिकेत सेटल झाला होतास ना?’’

नंतरच्या वीस मिनिटांत तिने गेल्या वीस वर्षांमधल्या सगळ्या घडामोडींची माहिती मला दिली. मी अमेरिकेला गेल्यानंतर लगेचच तिचं लग्न झालं होतं. पण दुर्दैवाने श्रीमंत घरातली लाडकी लेक असूनही तिला अन् तिच्या आईवडिलांना या स्थळाच्या बाबतीत अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलं होतं. नवरा कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत होता. घरची परिस्थिती अगदीच सुमार होती. त्यामुळे अल्पूला तिची गव्हर्नमेंटची नोकरी अजूनही करावी लागत होती. तिला एकच मुलगी आहे अन् ती इंजिनिअरिंगच्या फायनलला आहे. काय न् काय अल्पना अखंड वटवटत होती अन् मी फक्त तिच्याकडे बघत होतो.

अंगाने थोडी भरली होती तरी अजूनही ती तेवढीच देखणी दिसत होती. रंग गोरापान, नितळ कांती, मोठे टपोरे डोळे, रेखीव नाक, खांद्यापर्यंतच्या बॉबकटमध्ये अधिकच स्मार्ट वाटत होती.

मी काही बोलायचा प्रयत्न करणार तेवढ्यात तिने विचारलं, ‘‘तू आलास कधी अमेरिकेहून? मृणाल कुठाय? कशी आहे? मुलंबाळं किती? परत जातो आहेस अमेरिकेला की आता इथेच राहाणार?’’

‘‘अगं, आता इथेच सगळं रस्त्यात उभं राहून बोलणार आहेस का? चल, माझ्या घरी जाऊयात. इथे जवळच राहातो आहे मी. चल…’’

‘‘नको, नको, आज मी घाईत आहे, पुन्हा कधी तरी येते मी तुझ्याकडे. तुझं कार्ड दे मला.’’

‘‘मघा दुकानदाराशी भांडताना घाई नव्हती तुला…अन् आता घाईत आहेस?’’

‘‘पण भांडणाचा फायदा झाला ना? एक तर तू भेटलास अन् दुसरं म्हणजे लेकीचा हरवलेला डे्सही मिळाला.’’

‘‘पण तू भाडंणात तरबेज झाली आहेस हं! नवऱ्याशीही अशीच भांडतेस का?’’

‘‘मग काय तर? अरे बायकोला नवरा केवळ भांडायसाठीच मिळालेला असतो. मृणालने शिकवलं नाही तुला?’’

आम्ही बोलत बोलत माझ्या गाडीजवळ आलो होतो. माझी नवी मर्सिडीज बघून अल्पनाचे डोळे विस्फारले, ‘‘वाऊ…मर्सिडीज? ऐट आहे बाबा तुझा.’’ एखाद्या लहान मुलीसारखे निरागसपणे अल्पनाने गाडीकडे बघत म्हटलं.

‘‘चल, तुला तुझ्या घरी सोडतो, त्या निमित्ताने तुझं घरही बघून होईल..बस्स.’’

‘‘वाऊ? दॅट्स ग्रेट! पण दहा मिनिटं थांब. त्या समोरच्या गल्लीत एक डे्स शिवायला दिलाय. तो घेऊन येते. गल्ली अरुंद आहे. तुझी मर्सिडीज तिथे जाऊ शकत नाही. मला फक्त दहा मिनिटं लागतील…चालेल?’’

‘‘अगदी चालेल. मी इथेच गाडीत बसतो…तू डे्स घेऊन ये. मी वाट बघतो.’’

‘‘ठीकाय…मी आलेच!’’

गाडीत बसल्या बसल्या माझ्या मनात वीस वर्षांपूर्वीच्या किती तरी आठवणी पिंगा घालू लागल्या.

वीस वर्षांपूर्वी इथे दिल्लीतच लाजपतमध्ये आमची दोघांची कुटुंब शेजारी शेजारी राहात होती. दोन्ही घरांचं अंगण एकच होतं. अल्पनाच्या घरात तिच्यासकट धाकटा भाऊ व आईवडील मिळून चारजण होते. आमचं कुटुंब मोठं होतं. आईबाबा, आम्ही चार भावंडं, आमची आजी अन् एक आत्या अशी आठ माणसं होती. त्या एरियात मराठी कुटुंबं आमची दोनच असल्यामुळे आपसात आमचं खूपच सख्य होतं.

अल्पनाची आई माझ्या आईहून दहा-बारा वर्षं लहान असल्यामुळे माझ्या आईचा सल्ला घ्यायला, काही विचारायला नेहमीच आमच्याकडे यायची. अल्पनाचा धाकटा भाऊ तिच्याहून दहा वर्षांनी लहान असल्यामुळे दोन्ही घरात खूप लाडका होता. अल्पनाचे बाबा बँकेत खूपच वरच्या पोस्टवर होते त्यामुळे सतत कामात बिझी असायचे. अल्पना दिसायला सुंदर होती, गुणी अन् हुशार होती शिवाय खूप हसरी, बडबडी अन् प्रेमळही होती. माझ्या दोघी बहिणींची ती फार लाडकी होती. ती जरी माझी समवयस्क होती तरी आमची सगळ्यांचीच बेस्ट फ्रेण्ड होती. आमचा दादा सगळ्यात मोठा होता. त्याने स्वत:च धंदा सुरू केला होता अन् तो त्यातच आकंठ बुडाला होता.

बारावीपर्यंत मी अन् अल्पना एकाच शाळेत होतो. मग मी इंजिनिअरिंगसाठी मुंबईला गेलो. तिथेच वर्गातल्या मृणालशी ओळख, मैत्री अन् प्रेम जमलं. लग्न करून आम्ही दाघे अमेरिकेत निघून गेलो. त्यानंतर इकडच्या आठवणी पुसट होत होत्या.

मी अमेरिकेला असतानाच अल्पनाचं लग्न झालं. आईबाबा असेपर्यंत भारतातल्या, दिल्लीतल्या बातम्या कळायच्या. आई अन् बाबा गेल्यानंतर मात्र अल्पनाच्या कुटुंबाची काहीच बातमी कळली नव्हती. त्या कुटुंबाचा अन् आमचा जणू संबंधच संपला होता.

खरोखंरच आयुष्य इतकं गतिमान अन् धकाधकीचं झालंय की जे आज, आता घडतंय तेवढ्याशीच आपला संबंध असतो. तेवढ्याचाच आपण विचार करतो. कधीतरी अल्पनाच्या रूपात भूतकाळ समोर येतो तेव्हा त्याबद्दल आपण विचार करू लागतो.

मी आठवणीत रमले असतानाच अल्पना आली. मी गाडीचं दार उघडून तिला गाडीत घेतली.

‘‘मन अमेरिकेत गेलं होतं का?’’ गाडीत बसत तिने विचारलं, ‘‘अमेरिकेहून कधी आलास? इथेच कायमचा राहाणार आहेस की परत जायचंय तिथे?’’

‘‘परत जायचंय. इथे एका प्रोजेक्टसाठी वर्षभर पाठवलंय कंपनीने. इथे जवळच भाड्याचं घर घेतलंय. हल्ली भारतातही खूप सोयीसुविधा झाल्या आहेत.’’

‘‘मृणाल कशी आहे? मुलं काय करतात?’’

‘‘एकच मुलगा आहे.’’

‘‘काय करतोए?’’

‘‘इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे.’’

‘‘म्हणजे तुलाही एकच मुलगा आहे?’’

‘‘हो ना. तुझ्याप्रमाणेच आम्ही दोघं आमचा एक असं कुटुंब आहे.’’

बोलत बोलत आम्ही अल्पनाच्या घरी पोहोचलो. अल्पनाच्या आग्रहामुळे मी तिचा फ्लॅट बघायला वर गेलो.

छोटासा दोन रूमचा फ्लॅट होता, पण अत्यंत कलात्मक पद्धतीनं सजवला होता. घराच्या दारातच फुललेला मोगरा, डायनिंग टेबलशेजारच्या खिडकीवरचा बहरलेला हिरवागार मनीप्लँट, कोपऱ्यातून काचेच्या फळ्यांवर मांडलेले अभिजात शोपीसेस. प्रत्येक गोष्ट घराच्या मालकिणीच्या उत्तम अभिरूचीची साक्ष देत होती. अभाविपणे मी बोलून गेलो, ‘‘सुरेख आहे तुझं घर. नोकरी करून एवढं सगळं कसं काय सांभाळेतस?’’

माझं बोलणं पूर्ण होतंय तोवर आतून एक अत्यंत देखणा पुरुष संतापून ओरडतच बाहेर आला. ‘‘इतका वेळ कुठे उंडारत होतीस? मला कामावर जायचंय, विसरलीस का? तुझ्याप्रमाणे माझा ऑफ नाहीए.’’

अल्पनाची परिस्थिती खूपच विचित्र झालेली. मीही अवघडून कधी तिला तर कधी त्याला बघत होतो.

‘‘हे माझे मिस्टर शशीकांत अन् शशी हा अरुण. आमच्या शेजारी राहायचे. मी सांगितलं होतं ना तुम्हाला?’’ अल्पनाने आमची ओळख करून दिली.

‘‘ठीकाय…पण आता मला अजिबात वेळ नाहीए अन् असला तरी तुझ्या जुन्या यार दोस्तांना भेटण्याची मला अजिबात हौस नाहीए.’’ मी हात मिळवण्यासाठी पुढे केलेल्या माझ्या हाताकडे न बघता तो आत निघून गेला.

मी अवाक्…मग म्हटलं, ‘‘ठीकाय, अल्पू, मी निघतो. मृणाल वाट बघत असेल,’’ अल्पूकडे न बघताच मी घराबाहेर पडलो.

गाडीत बसताना नजर वर गेली. घराच्या बाल्कनीत अल्पू उभी होती. डोळ्यांतलं पाणी पुसत होती. तिची असहायता चेहऱ्यावर दाटून आली होती. तिची करूण मूर्ती घरापर्यंत माझ्यासोबत करत होती.

घरी पोहोचताच मृणालला सगळं सांगितलं. तिलाही ऐकून बरं वाटलं नाही. आमच्या लग्नापासून मृणालही अल्पना व तिच्या कुटुंबाला ओळखत होती. अल्पनाच्या आईने मृणालला लग्नात दिलेली कांजीवरम साडी अजूनही तिने जपून ठेवली आहे. अल्पनाचं सौंदर्य, तिचा स्वभाव यामुळे मृणालही तिच्या प्रेमात पडली होती. कधी कधी मला ती चिडवायचीही, ‘‘अरे अरुण ही माधुरी दीक्षित तुझ्या शेजारी असताना तू माझ्या प्रेमात कसा पडलास?’’

बराच वेळ आम्ही अल्पनाबद्दल बोलत होतो. तेवढ्यात माझा मोबाइल वाजला.

‘‘मी…मी…अल्पना बोलतेए.’’

‘‘बोल…’’

‘‘तुला सॉरी म्हणायला फोन केलाय. पहिल्यांदाच तू माझ्या घरी आलास अन् विनाकारण तुझा अपमान झाला.’’

‘‘नाही गं…अपमान वगैरे काही नाही, पण मला सांग, खरं खरं सांग, तुझा अन् शशीचा काही प्रॉब्लेम चाललाय का?’’

‘‘प्रॉब्लेम? माझा काही प्रॉब्लेम नाहीए…सगला प्रॉब्लेम शशीचा आहे.’’

‘‘जरा नीट सांगशील का? मी काही मदत करू शकेन.’’

‘‘आता फोनवर नाही सांगू शकत पण…एक गोष्ट नक्की की शशीचा तापट, संतापी स्वभाव अन् संशयी वृत्ती माझ्या सहन करण्यापलीकडची आहे. त्याच्या अशा स्वभावामुळे मी कुणाकडे जात नाही, कुणाला घरी बोलावत नाही. आज तू अवचित भेटलास अन् मी तुला वर यायला म्हटलं.’’

‘‘हे सगळं तुझ्या आईबाबांना माहीत आहे?’’

‘‘सुरूवातीला सांगायचा प्रयत्न केला होता…त्याचाच परिणाम आजतागायत भोगते आहे.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तुला ठाऊक आहे, माझे बाबा फार संतापी होते. त्यांना जेव्हा याचं वागणं कळलं तेव्हा ते संतापून शशीला खूपच टाकून बोलले, नको नको ते बोलले.’’

‘‘अरे, माझ्या लग्नापासून शशी बाबांना कधी आवडला नव्हता. त्यांच्या मते त्याची नोकरी, त्याचा पगार, त्याचं शिक्षण, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, काहीच त्यांना पसंत नव्हतं. त्यांच्या मते तो माझ्यासाठी पूर्णपणे अयोग्य होता. पण तो दिसायला इतका देखणा होता की त्याला बघताच मी त्याच्यासाठी वेडी झाले. आईबाबांनी किती समजावलं पण मला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. शेवटी आमचं लग्न झालं. आम्ही दोघं जेव्हा आईबाबांना भेटायला जात असू तेव्हाही शशीला सतत वाटायचं की ते त्याला मान देत नाहीत, त्याच्या पगाराबद्दलचा, नोकरीबद्दलचा तिरस्कार त्यांच्या डोळ्यांतून दिसतो.’’

‘‘अन् मी जेव्हा शशीबद्दल बाबांकडे तक्रार केली तेव्हा ते त्याला म्हणाले की तू आमच्या मुलीच्या लायकीचा कधीच नव्हताच अन् यापुढेही असणार नाहीस.’’

‘‘त्यानंतर माझं माहेर सुटलंच. शशी अधिक वाईट वागायला लागला. असा आहे माझा संसार. आईबाबा आता सुरेशकडे अमेरिकेत असतात. छान सेटल झाले आहेत. ते कधीही माझ्याकडे आले नाहीत अन् मीही त्यांच्यांकडे गेले नाही. फक्त माझी लेक प्रिया हीच माझ्या आयुष्यातली हिरवळ आहे, तिच्यासाठीच मी जगते आहे, तीच माझा आधार आहे.’’

‘‘तिच्याशी कसे वागतात शशी?’’

‘‘प्रियावर फार जीव आहे त्यांचा. पण त्यांच्या स्वभावामुळे प्रिया त्याला खूपच घाबरून असते. आमच्या भांडणात ती उगीचच भरडली जाते. भेदरलेल्या हरणासारखी जगतेय ती…’’

‘‘खरं तर तू काही दिवस आईबाबांकडे जाऊन राहायला हवं.’’

‘‘सुरेशकडे ती दोघं सुखात आहेत. सुरेश व त्याची बायको दोघांची खूप सेवा करतात. त्यांना तिथली सिटीअनशिपही मिळाली आहे. पण मला वाटतं माझं दु:ख मी त्यांना सांगून त्यांच्या आयुष्यात वादळ उठायला नको…बरं ते सगळं सोड, एक महत्त्वाचं म्हणजे मी उद्या चारच्या सुमारास तुझ्याकडे येते. आईबाबांना काही पेपर्स द्यायचे आहेच, तू तिथे गेल्यावर ते पेपर्स त्यांना मेल कर.’’

‘‘नक्की…नक्की करेन, उद्या तू ये. मी अन् मृणाल तुझी वाट बघूं. लेकीलाही घेऊन ये, तिची ओळख होईल?’’ मी फोन बंद केला.

पण दुसऱ्या दिवशी चार वाजेपर्यंत आम्हाला वाट बघावीच लागली नाही. सकाळी सातलाच प्रियाचा फोन आला. ती खूप घाबरली होती. ‘‘मामा, तुम्ही ताबडतोब आमच्या घरी या. काल बाबांनी आईला खूप मारलंय. आईनेच तुम्हाला फोन करायला सांगितलंय.’’

मी ताबडतोब गाडी काढली. मृणाललाही सोबत घेतलं. पोलीस इन्स्पेक्टर मित्र राणालाही फोन करून बोलावून घेतलं. आम्ही अल्पनाच्या घरी पोहोचलो. अल्पनाची परिस्थिती फारच वाईट होती. एक डोळा सुजला होता. काळानिळा झाला होता. चेहऱ्यावर माराचे वळ होते. हाताला फ्रॅक्चर असावं बहुतेक. ती घाबरली होती. रडत, कण्हत होती. प्रिया तिला चिकटून बसली होती. पलंगावर डोकं धरून शशीकांत बसला होता.

आम्हाला अन् पोलीसच्या युनिफॉर्ममधल्या राणाला बघून प्रथम तो घाबरला. पण एकदम उसळून अल्पनाकडे बघत विचारलं, ‘‘तू यांना बोलावलंस?’’

‘‘मी इन्स्पेक्टर राणा. तुमच्या मुलीच्या फोनमुळे मी इथ तपास करायला आलोय.’’ खणखणीत आवाजात राणानं म्हटलं तसा शशीकांत घाबरला. मी अन् मृणाल मुकाट उभे होतो.

आधी राणाने शशीकांतला अटक केली. मी अन् अल्पना त्या दोघांबरोबर पोलीस चौकीला गेलो. मृणाल प्रियाजवळ थांबली. शशिकांतविरूद्ध एफआयआर नोंदवली. मग प्रिया व मृणालसह आम्ही घरी आलो.

घरी येताच प्रथम मृणालने तिच्या डॉक्टर मैत्रिणीला फोन केला. मग सगळ्यांसाठी चहा केला. थोडं खाणं झालं. डॉक्टरने अल्पनाला औषधोपचार केले. जरा सगळं निवळल्यावर मी अल्पूला म्हटलं, ‘‘हे असं नेहमीच होतं का? तुझ्या नवऱ्याला हे माहीत नाही का बायकोला मारणं हा गुन्हा आहे?’’

‘‘ हे दुसऱ्यांदा झालंय, दोन तीन वर्षांपूर्वी मला एकदा ऑफिसात चक्कर आली. तब्येत खूपच बिघडली. तेव्हा एक कलीग त्याच्या गाडीने घरी सोडून गेला तेव्हाही शशीनं मला फार मारलं होतं. माझ्या बाबतीत तो फार पद्ब्रोसिव्ह आहे.

मला कुठल्याही पुरुषाबरोबर तो बघू शकत नाही.’’

‘‘अगं पण हे सगळं तू का सहन करतेस? त्याला तुझा पैसा हवाय अन्  मग इतकं पद्ब्रोसिव्ह असणं?’’

‘‘हजारदा मनात आलं वेगळं व्हावं…पण मुलीचा विचार मनात येतो…अन् मी सहन करते.’’

‘‘अगं पण सहन करण्याचीही एक सीमा असते. मानलं की आईबाबा, सुरेश, त्याची बायको यांना आपलं रडगाणं सांगायला नको म्हणून तू आजवर गप्प बसलीस…पण हे असं कुठवर सोसशील?’’

‘‘आता नाही सोसणार. प्रियानेच मला वेगळं व्हायला सुचवलंय. मी आता घटस्फोट घेणार.’’

‘‘फारच छान. आमचा तुला पाठिंबा आहे.’’

आम्ही अमेरिकेला जायला निघालो तेव्हा प्रिया व अल्पना पण आमच्या सोबत होत्या. त्यांना सुरेशकडे पोहोचवण्याची जबाबदारी मीच घेतली होती.

अंतरीचे दीप

* आशा लागू

‘‘अगं रागिणी, २ वाजलेत. घरी जायचं नाहीए का? ५ वाजता परत स्पेशल ड्युटीसाठीही यायचं आहे,’’ सहकारी नेहाच्या आवाजाने रागिणीची तंद्री भंगली. दिवाळीत स्पेशल ड्युटी लावल्याची ऑफिस ऑर्डर हातात घेऊन रागिणी गेल्या दिवाळीच्या काळरात्रीच्या काळोखात भटकत होती. जी तिच्या मनातील काळोखाला अजून काळाकुट्ट करत होती. द्वेषाची एक काळी सावली तिच्यात पसरली होती. त्यामुळे पाहता-पाहता सणाचा सगळा आनंद, सर्व उत्साह लोप पावला. रागिणी निराश मनाने नेहासोबत चेंबरच्या बाहेर निघाली.

असं नव्हतं की तिला प्रकाशाचा त्रास होत होता. एक काळ होता, जेव्हा तिलाही दिव्यांचा सण खूप आवडत होता. घरात सर्वात लहान आणि लाडकी असलेली रागिणी नवरात्र सुरू झाल्यानंतर आईसोबत दिवाळीच्या तयारीलाही लागत असे. संपूर्ण घराची साफसफाई करणे, जुने भंगार, वर्षभर न वापरलेले सामान, छोटे झालेले कपडे आणि रद्दी इ. बाजूला काढणे व त्यानंतर घराच्या सजावटीसाठी नवीन सामान खरेदी करणे तिचा आवडता छंद होता. या सर्व कामात तुळशीबाई व पूजाही तिला मदत करत असत आणि सर्व काम हसत-खेळत पूर्ण होत असे.

दिवाळीच्या सफाई अभियानात अनेकदा स्टोरमधून जुनी खेळणी आणि कपडे निघत असत. ते रागिणी व पूजा घालून पाहत असत आणि आईला दाखवत. कधी तुटलेल्या खेळण्यांनी खेळून जुने दिवस पुन्हा जगत असत…आई कधी चिडत असे, कधी हसत असे. एकूणच हसत-खेळत दिवाळीच्या स्वागताची तयारी केली जात असे.

‘‘पूजा त्यांची घरातील नोकराणी तुळशीबाईंची एकुलती एक मुलगी होती आणि दोघी मायलेकी छतावर बनलेल्या छोट्याशा खोलीत राहत होत्या. पूजाच्या वडिलांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला होता. पतिच्या मृत्यूनंतर तरुण विधवा तुळशीबाईंवर त्यांच्या झोपडपट्टीतील प्रत्येक पुरुष वाईट नजर ठेवू लागला, तेव्हा तिने रागिणीची आई शीलाकडे त्यांच्या घरी राहण्याची परवानगी मागितली. शीलाला तशीही एका फुल टाईम मोलकरणीची गरज होती. तिने आनंदाने होकार दिला. तेव्हापासून या संपूर्ण दुनियेत रागिणीचे कुटुंबच त्यांचे कुटुंब झाले. पूजा रागिणीपेक्षा जवळपास १० वर्षांनी लहान होती. सुंदर, गुटगुटीत पूजा तिला एखाद्या बाहुलीप्रमाणे भासत असे आणि ती तिला बाहुलीप्रमाणेच नटवत असे, केस विंचरत असे आणि तिच्यासोबत खेळत असे.

काळानुसार दोन्ही मुली मोठ्या होत होत्या. रागिणीने इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बीटेकची डिग्री घेतली आणि स्पर्धा परीक्षा पास होऊन वीज विभागाच्या राजकीय सेवेत आली. रागिणीला पहिली पोस्टिंग जैसलमेरजवळील एक छोटेसे खेडेगाव फलौदीमध्ये मिळाली. रागिणीचे आई-बाबा तिला आपलं शहर जोधपूरपासून दूर एकटीला पाठविण्यास कचरत होते. तेव्हा तुळशीबाईंनी तिची समस्या हे सांगत सोडवली, ‘‘ताई लहान तोंडी मोठा घास घेत एक सांगू? तुम्ही पूजाला रागिणी बेबीसोबत पाठवा. ती तिचं छोटं-मोठं काम करेल. दोघींचं मनही रमेल आणि तुम्हाला काळजी राहणार नाही.’’

अर्थात, असा विचार शीलाच्या मनातही आला होता, पण ती असा विचार करून गप्प राहिली की परक्या मुलीच्या शंभर जबाबदाऱ्या असतात. उद्या काही कमी-जास्त झालं तर तुळशीला काय उत्तर देणार?

आणि मग रागिणी जेव्हा आपलं संपूर्ण कुटुंब म्हणजेच आईबाबा, तुळशीबाई आणि पूजासोबत नोकरी जॉईन करायला आली, तेव्हा सर्वांना पाहून तिच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं हसून स्वागत केलं. ४ दिवस रेस्ट हाउसमध्ये थांबून स्टाफच्या मदतीने ऑफिसच्या जवळच २ खोल्यांचा एक छोटासा फ्लॅट भाड्याने घेऊन रागिणी व पूजाला तिथे शिफ्ट करण्यात आले. आता आईबाबा रागिणीबाबत पूर्णपणे चिंतामुक्त झाले होते.

रागिणीचा फिल्डचा जॉब होता. नेहमीच तिला साइट्सवर दूरदूरवर जावे लागत असे. काही वेळा परतायला रात्रही होत असे. परंतु तिचे अधिकारी व स्टाफ सर्वांचा स्वभाव चांगला होता. त्यामुळे तिला काहीही अडचण येत असे. घरी येताच पूजा गरमागरम जेवण बनवून तिची वाट पाहत बसलेली दिसे. दोघीही सोबत जेवत. रागिणी दिवसभराच्या गोष्टी पूजाला सांगत असे. तिला दिवसभर भेटणाऱ्या वेगवेगळ्या लोकांबाबत सांगत असे आणि दोघीही खूप हसत असत. एकूणच सर्व ठीक चालले होते.

४ महिन्यांनंतर रागिणीचा खास सण दिवाळी आला. ती सणाला आपल्या घरी जाऊ शकत नव्हती. ज्याप्रकारे पोलिसांची होळीला आणि पोस्टमनची रक्षाबंधनाला स्पेशल ड्युटी लागते, तशाप्रकारे वीज विभागाच्या इंजीनियर्सची दिवाळीला स्पेशल ड्युटी लावली जाते. जेणेकरून विजेची व्यवस्था नीट राहावी आणि लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय सण साजरा करता यावा.

रागिणीची धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत ३ दिवस संध्याकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत स्पेशल ड्युटी लावण्यात आली. पहिल्या २ दिवसांची ड्युटी आरामात पार पडली. रागिणीची खरी परीक्षा आज म्हणजे दिवाळीच्या मुख्य सणाच्या दिवशी होती. ती निश्चित वेळी आपल्या सबस्टेशनवर पोहोचली. संध्याकाळी जवळपास ७ वाजता फीडर्सवर विजेचा लोड वाढू लागला. ८ वाजेपर्यंत लोड स्थिरावला आणि या दरम्यान कोणत्याही प्रकारची काही ट्रिपिंगही आली नाही. म्हणजे सर्वकाही सामान्य होते.

‘आता लोड वाढणार नाही. मला एरियाचा एक राउंड मारला पाहिजे,’ असा विचार करत रागिणी गाडी घेऊन राउंडला निघाली. आपल्या गल्लीजवळून जाताना अचानक पूजाची आठवण झाली, तर विचार केला की, ‘आलेच आहे, तर घरात दीवाबत्ती करून जाते. नाहीतर पूजा रात्री १२ वाजेपर्यंत काळोखात बसून राहील.’

तिला पाहताच पूजा खूश झाली. पहिल्यांदा दोघींनी घरात दिवे लावले आणि थोडेसे खाऊन रागिणी पुन्हा आपल्या ड्युटीवर निघाली.

आता बस अशा प्रकारचंच शेड्यूल बनलेलं होतं. दर दिवाळीला रागिणी ५ वाजता ड्युटीवर जात असे आणि ८ वाजता पुन्हा ड्युटीवर जात असे. मग दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आठवड्याभराची सुट्टी घेऊन दोघी बहिणी आईवडिलांजवळ जोधपूरला सण साजरा करण्यासाठी आणि थकवा उतरावायला जात असत.

गेल्या ३ वर्षांमध्ये रागिणी आणि पूजाच्या जीवनात खूप काही बदललं होतं. २ वर्षांपूर्वी अचानक तुळशीबाईंचा हार्टअटॅकने मृत्यू झाला होता. पूजा अनाथ झाली होती. रागिणीच्या आईवडिलांनी तिला विधीपूर्वक दत्तक घेऊन आपली मुलगी बनवलं. रागिणी तर कायमच तिच्यावर छोट्या बहिणीप्रमाणे प्रेम करत असे. आता या नात्यावर सामाजिक मोहोरही लागली होती.

वर्षभरापूर्वी रागिणीचं लग्न विवेकशी झालं. विवेकही तिच्याप्रमाणेच विद्युत विभागात अधिकारी होता. त्याची पोस्टिंग जैसलमेरमध्ये होती. लग्नानंतर त्यांची ही पहिली दिवाळी होती. पण नेहमीप्रमाणे दोघांचीही ड्युटी आपापल्या सबस्टेशन्सवर लागली होती. त्यामुळे दोघांनाही आपली पहिली दिवाळी सोबत साजरी न करण्याचं दु:ख होतं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रागिणी विवेककडे जैसलमेरला आणि पूजा आईबाबांकडे जोधपूरला निघून गेली. पहिल्यांदा दोन्ही बहिणी वेगवेगळ्या बसेसमधून प्रवास करत होत्या.

रागिणी आणि तिच्या घरच्यांना वाटत होते की विवेक आणि तिची बदली एकाच ठिकाणी व्हावी. म्हणजे ते रागिणीच्या काळजीतून मुक्त होऊन पूजाच्या लग्नाबाबत विचार करतील. दोन्ही कुटुंबांनी खूप प्रयत्न केला, अनेक नेत्यांची शिफारस दिली, सरकारी नियमांचा हवाला दिला आणि जवळपास वर्षभराच्या मेहनतीनंतर शेवटी रागिणीची बदली फलौदीमधून जैसलमेरमध्ये झाली. रागिणी खूप खूश होती. आता तिला विवेकचा विरह सहन करावा लागणार नव्हता. आता तिचं कुटुंब पूर्ण होऊ शकेल आणि पूजाचंही लग्न होईल. अनेक स्वप्न पाहू लागली होती रागिणी.

बदलीनंतर पूजाही रागिणीसोबत जैसलमेरला आली. इथे विवेकला मोठेसे क्वार्टर मिळाले होते. एक नोकरही मदतीसाठी होता. पण तो केवळ बाहेरचीच कामे पाहत असे. घरातील सर्व व्यवस्था पूजाच सांभाळत असे.

आता रागिणीही हाच प्रयत्न करत असे की तिला जास्त वेळ बाहेर राहावे लागू नये. तिला ऑफिसमधून लवकर घरी येऊन जास्तीत जास्त वेळ विवेकसोबत घालवायचा होता. नेहमीच दोघंही संध्याकाळी फिरायला जात असत आणि रात्री उशिरा घरी परतत असत, पण भले कितीही रात्र होऊ दे, रात्रीचं जेवण ते पूजाबरोबरच करत असत. सुट्टीच्या दिवशी रागिणी पूजालाही आपल्यासोबत घेऊन जात असे. कधी पटवोंची हवेली, कधी सोनार किल्ला, कधी गढीसर लेक आणि कधी समच्या धोरोंवर. तिघंही खूप मस्ती करत असत. पूजाही अधिकाराने विवेकला जीजू जीजू म्हणत मस्करी करत असे. संपूर्ण घर तिघांच्या हास्याने उत्साहित राहत असे.

पाहता-पाहता पुन्हा दिवाळी आली. यावेळी रागिणी पूर्ण उत्साहाने सण साजरा करणार होती. नेहमीप्रमाणे दोघींनी मिळून साफसफाई केली. अनेक प्रकारच्या नवीन सजावटी वस्तू खरेदी करून घर सजवलं. २ दिवस आधी दोघांनी मिळून अनेक प्रकारच्या मिठाया व खमंग पदार्थ बनवले. नवीन कपडे खरेदी करण्यात आले. संपूर्ण घरावर रंगीत विजेची तोरणे लावण्यात आली. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर यावेळी पूजाने सुंदरशी रांगोळीही काढली होती.

नेहमीप्रमाणे संध्याकाळी ५ वाजता रागिणी आपल्या ड्युटीवर निघून गेली आणि विवेक त्याच्या. धनत्रयोदशी आणि छोटी दिवाळी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली. आज दिवाळीचा मुख्य सण होता. रागिणीला विवेकला सरप्राइज द्यायचं होतं. ती जवळपास ८ वाजता ऑफिसमधून निघाली आणि सरळ मार्केटमध्ये गेली. ज्वेलरीच्या शोरूममधून विवेकसाठी सोन्याची चेन घेतली, जी तिने धनत्रयोदशीला बुक केली होती आणि घराच्या दिशेने गाडी वळवली.

घरी पोहोचण्यापूर्वीच का कुणास ठाऊक, काहीतरी अघटित घडणार असण्याची पाल तिच्या मनात चुकचुकू लागली. आज पूजाने घराबाहेर रिवाजाचा एकही दिवा लावलेला नव्हता. घराचा दरवाजाही आतून बंद होता. दिवाळीच्या दिवशी तर पूजा घराचा दरवाजा एक मिनिटासाठीही बंद करायला देत नसे. तिला काही झालं नाही ना… घाबरलेली रागिणी जोरजोरात दरवाजा ठोकू लागली. दरवाजा काही वेळात उघडला. तो उघडताच पूजाने रडत रागिणीला मिठी मारली.

पूजाचे अश्रू आणि विवेकने घाबरून आपली पँट घालून बाहेर निघून जाणं, तिथे घडलेली घटना सांगण्यास पुरेसे होते. रागिणी दगडासारखी स्तब्ध झाली. तिने लगेच पूजाचा हात पकडला आणि घरातून बाहेर पडली. संपूर्ण रात्र दोघींनी रडत-रडत विभागाच्या गेस्टहाउसमध्ये काढली आणि सकाळ होताच, दोघी जोधपूरला रवाना झाल्या.

मागोमाग विवेकही माफी मागायला आला होता. परंतु रागिणीला अशा व्यक्तिची साथ मुळीच स्वीकार नव्हती, ज्याने आपल्या बहिणीसारख्या मेव्हणीवर वाईट नजर ठेवली. आईबाबांनीही तिचं समर्थन केलं आणि दोघांचं नातं बहरण्यापूर्वी तुटलं.

आज तिला विशालची खूप आठवण येत होती, जो कॉलेजच्या काळात तिला खूप पसंत करत होता, तिच्याशी लग्न करायची इच्छा होती. धर्माच्या ठेकेदारांच्या मते तो खालच्या जातीचा होता. त्यामुळे आईबाबांसमोर त्याचा उल्लेख करण्याची रागिणीची हिंमत झाली नव्हती. हो, पूजाला जरूर सर्वकाही माहीत होतं. विवेकशी नातं जुळल्यानंतर रागिणीने आपल्या अव्यक्त प्रेमाला मनाच्या एका कोपऱ्यात दफन करून केवळ विवेकवरच लक्ष केंद्रित केलं होतं.

एकच विभाग आणि एकच शहर असल्यामुळे रागिणीचा विवेकशी सामना होणे साहजिकच होतं. तिने पुन्हा प्रयत्न करून आपली ट्रान्सफर फलौदीला करून घेतली. पूजाने सर्व चूक आपली असल्याचं म्हणत कधीही लग्न न करण्याचा व रागिणीसोबत राहण्याचा हट्ट पकडला. पण आपल्या बहिणीचं आयुष्य असं बर्बाद व्हावं, अशी रागिणीची मुळीच इच्छा नव्हती. काही दिवसांपूर्वीच एक चांगलासा मुलगा पाहून आईबाबांनी पूजाचं लग्न लावून दिलं.

या दिवाळीला रागिणी अगदी एकटी होती. शरीरानेही आणि मनानेही… आज दिवाळीचा मुख्य सण होता. ती निराश मनाने आपली ड्युटी करत होती. नेहमीप्रमाणे ती रात्री ८ वाजता एरियाच्या राउंडवर निघाली, तेव्हा आपसूकच गाडी घराच्या दिशेने वळली. हे काय? घराबाहेर दिवे कोणी लावले? घराचा दरवाजा उघडा होता. दरवाजात उभी रागिणी संभ्रमात पडली होती. इतक्यात, कोणीतरी मागे येऊन तिला आलिंगन दिलं, ‘‘दिवाळीच्या शुभेच्या ताई.’’

‘‘अगं पूजा, तू इथे? येण्याबाबत कळवायचं तरी होतंस. मी स्टेशनला गाडी पाठवली असती.’’

‘‘मग हा आनंद कुठे पाहायला मिळाला असता आम्हाला, जो तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय, ताई,’’ पूजा तिचा चेहरा आपल्या हातात घेत म्हणाली. पूजाच्या पतिने वाकून रागिणीला नमस्कार केला.

‘‘आणि हो, आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की यापुढे येणारी प्रत्येक दिवाळी आपण पूर्वीप्रमाणे एकत्र मिळून साजरी करू,’’ पूजा पुन्हा आपल्या बहिणीला बिलगली.

‘‘अरे बाबांनो, अजूनही खूप सारे लोक आलेत,’’ मागून आईबाबांचा आवाज आला, तेव्हा रागिणीने वळून पाहिलं. आईच्या मागे उभा असलेला विशाल मिश्कीलपणे हसत होता. आई रागिणीचा हात विशालच्या हातात देत म्हणाली, ‘‘पूजाने आम्हाला सर्वकाही सांगितलं आहे. तुम्हा दोघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.’’ हे ऐकताच रागिणीची नजर लाजेने झुकली.घराच्या छतावर, भिंतींवर झगमगणाऱ्या दिव्यांप्रमाणे रागिणीच्या मनातील आनंदही झगमगू लागला.

‘‘चला, चला, लवकर जेऊन घेऊ. मग आतषबाजी करू या. ताई, तुला ड्युटीवरही जायचं आहे ना,’’ पूजा म्हणाली, तर सर्व हसले. रागिणी आईच्या खांद्यावर डोकं     टेकून घरात गेली. सर्वात मागून चालणाऱ्या बाबांनी सर्वांची नजर चुकवून हळूच आपले अश्रू पुसले.

का हा अबोला?

कथा * प्रा. रेखा नाबर

मी जर्मन रेमिडीज या कंपनीत मेडिकल ऑफिसर असताना घडलेली ही गोष्ट आहे. एका वर्षासाठी मला गोवा डिव्हिजनला पोस्टिंग मिळाले. गोव्याच्या निसर्ग सौंदर्याच्या मी प्रेमात आहे. त्याशिवाय जवळच असलेल्या सावंतवाडीतील आजोळच्या मधाळ आठवणींनी मी आनंदित झालो. दोन वर्षं माझे शालेय शिक्षण तिथे झाले होते. त्यावेळचा माझा जीवश्च कंठश्च मित्र रमाकांत मोरचकर (मोऱ्या) मला साद घालू लागला. गोव्याला बाडबिस्तरा टाकून सावंतवाडीला मोऱ्याला न कळविता दाखल झालो. ‘येवा, कोकण आपलाच असा’ या वृत्तीची ही माणसं दिलखुलास स्वागत करतात. त्याच्या घरात एक प्रकारचा सन्नाटा जाणवला. माझ्या मामेभावाने तर तशी काही बातमी दिली नव्हती. मी कोड्यात पडलो.

‘‘काय मोरोबो, सगळं क्षेमकुशल ना?’’

‘‘हो. तसंच म्हणायचं.’’

‘‘न सांगता आलो म्हणून नाराज आहे की काय?’’ वहिनी पाणी घेऊन बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसले. तब्येतही काहीशी उतरलेली वाटली. मी कोड्यात.

‘‘सवितावहिनी, कशा आहात?’’

‘‘ठीक आहे,’’ चेहरा निर्विकार.

‘‘चहा टाक जरा आंद्यासाठी.’’ (आंद्या म्हणजे मी… आनंद).

देवघरात काकी (मोऱ्याची आई) जप करीत होत्या. त्यांना नमस्कार केला. ‘‘बस बाबा.’’ त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी.

माजघरात नजर टाकली तर एक १४-१५ वर्षांची मुलगी शांतपणे बसली होती, जे तिच्या वयाला अजिबातच शोभत नव्हते. कृश हातपाय व चेहेरा फिकुटलेला. मी निरखून बघितले.

‘‘ही सुरभी ना? सुभ्या, ओळखलं नाहीस चॉकलेट काकाला? हो कळलं, चॉकलेट दिन नाही म्हणून रागावलीस ना? हे घे चॉकलेट, चल ये बाहेर.’’

तिने चॉकलेट घेतले नाहीच, उलट ती रडायलाच लागली.

‘‘आंद्या, तिला बोलायला येत नाही,’’ काकींनी धक्कादायक बातमी दिली.

‘‘काय? लहानपणी चुरूचुरू बोलणाऱ्या मुलीला बोलता येत नाही. पण का? आजारी होती का? अशक्त वाटतेय. का रे मोऱ्या?’’

चहा घेऊन आलेल्या वहिनींनी आणखी एक धक्का दिला.

‘‘गेल्या वर्षी एक दिवस शाळेतून आली, तेव्हापासून मुकीच झाली.’’

‘‘काहीतरीच काय? आता शाळेत जात नाही वाटतं?’’

‘‘शाळेत जाऊन काय करणार? बसली आहे घरात.’’ वहिनींचा उदास स्वर.

मी धक्क्यातून सावरलो. सुरभीचा गळा, कान, नाक वगैरे तपासले.

स्वीच ऑडिओ माझा विषय नसला तरी डॉक्टर असल्यामुळे प्राथमिक ज्ञान होते.

‘‘मोऱ्या, मला सांग हे नक्की कधी झालं? कळवायचं नाही का रे मला?’’

‘‘गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात मैत्रिणींबरोबर शाळेतून येत असताना एकदम हिचा आवाज बसल्यासारखा झाला आणि काही वेळाने बाहेरच पडेना. तेव्हापासून असंच आहे.’’

‘‘अरे त्या झाडाखालून आली होती ते सांग ना,’’ काकींची सूचना.

‘‘कोणत्या झाडाखालून? त्याची फांदी पडली का हिच्या अंगावर?’’

‘‘पिंपळाखालून. फांदी कशा पडायला पाहिजे. त्या झाडाखालून अमावस्येच्या दिवशी आलं की असंच होतं. शिवाय दुपारी बाराला.’’

‘‘ही एकटीच होती का?’’

‘‘नाय रे, होत्या तीनचार जणी. पण हिलाच धरले ना. अण्णा महाराजांनी सगळं सांगितलं मला,’’ काकींचे विवेचन अगाध वाटले.

‘‘आता हे अण्णा महाराज कोण?’’

‘‘गेल्या वर्षींपासून गावाच्या बाहेरच्या मळात येऊन राहीलेत. बरोबर एक शिष्य आहे. पूजा पठण, जप असा त्यांचा कार्यक्रम असतो. भक्तांना काही समस्या असल्या तर त्यांचं निवारण करतात. काही तोडगे सुचवतात. जडीबुटीची काही औषधंसुद्धा आहेत त्यांच्याकडे. गावात बऱ्याच जणांना गुण आलाय.’’

‘‘मग तू गेला होतास की काय त्याच्याकडे?’’

‘‘आई घेऊन गेली होती सुरभीला. बघताक्षणीच त्यांनी सांगितलं की पिंपळाखालची बाधा आहे. मंतरलेले दोरे दिलेत. हिला उपास करायला सांगितलेत. करतेय ती.’’

‘‘दिसतंय ते वहिनीच्या तब्येतीवरून, कसला रे गंड्या दोऱ्यांवर विश्वास ठेवतोस? ही अंधश्रद्धा आहे. अज्ञानातून आलेली. विज्ञानयुगात आपली विचारसरणी बदलली पाहिजे. या बुवाबाबांच्या औषधाने गुण आला तर वैद्यकशास्त्र का मोडीत काढायचं? बी.ए.पर्यंत शिकलास ना तू? डॉक्टरांना दाखवलं नाहीस का?’’

‘‘दाखवलं ना! गोव्याहून येणाऱ्या स्पेशालिस्टना दाखवलं. त्यांनी सांगितलं स्वरयंत्राचं ऑपरेशन करावं लागेल. एक तर ते खर्चिक आहे आणि यशाची खात्री नाही. म्हणून मनात चलबिचल आहे.’’

‘‘ठीक आहे. हिच्या ज्या मैत्रिणी त्यावेळी बरोबर होत्या, त्यांना मी भेटू शकतो का?’’

त्या मैत्रिणींशी बातचित करून मी मनाशी काही आडाखे बांधले. पिंपळाखालची जागा बघून आलो. मोऱ्या, त्याची आई व पत्नी संभ्रमात होते. ‘‘मोरोबा, उद्या सकाळी आपण गोव्याला जाऊ या. माझा मित्र नाक, कान, घसा यांचा तज्ज्ञ आहे. त्यांचा सल्ला घेऊ या.’’

‘‘गोव्याच्याच डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय ना? मग हा काय निराळं सांगणार? जायचा यायचा त्रास आणि जबरदस्त फी.’’

‘‘त्याची तू काळजी करू नकोस. जाताना माझी गाडी आहे. येताना तुम्हाला कदंबच्या बसमध्ये बसवून देतो. रात्रीपर्यंत परत याल.’’

‘‘पण अण्णा महाराजांनी सांगितलंय की डॉक्टर काही करू शकणार नाहीत.’’ काकींचा विरोधाचा सूर.

‘‘काकी, त्यांचे दोरे आहेतच हातात. आता हे डॉक्टर काय म्हणतात बघू.’’

नाखूशीनेच मोऱ्या तयार झाला. बाहेर पडल्यामुळे सुरभीची निराशा कमी झाल्यासारखी वाटली. डॉक्टरांनी तपासून गोळ्या दिल्या. त्या कशा घ्यायच्या ते सांगितलं. नंतर चर्चा करून आम्ही कार्यवाही ठरविली.

सुरभीच्या तब्येतीविषयी मी फोनवर चौकशी करत होतो व माझ्या भावालासुद्धा लक्ष ठेवायला सांगितले होते. त्याच्या मुलीला सुरभीसोबत वेळ घालविण्याची विनंती केली होती. उपाय-तापास, गंडेदोरे, अण्णा महाराजांकडे खेटे घालणे चालूच होते. पंधरा दिवसांनी मी पुन्हा सावंतवाडीला मोऱ्याकडे हजर झालो, यावेळी सुरभीनेच पाणी आणले.

‘‘काय सुभ्या, थोडंसं बरं वाटतयं ना?’’

मानेनेच होकार देत तिने हातातील चॉकलेट घेतले व किंचित हसलीसुद्धा.

‘‘मोऱ्या, ही हसली का रे? आता हे बघ त्या डॉक्टरने सुरभिला पंधरा दिवसासाठी गोव्याला बोलावलं आहे. तिथे तिची ट्रिटमेंट होईल.’’

‘‘अरे बाप रे, म्हणजे पंधरा दिवस हिला हॉस्पिटलमध्ये ठेवायची? मला नाही रे हा खर्च परवडणार.’’

‘‘गप रे. माझं घर हॉस्पिटलच्या आवारातच आहे. तुझी वहिनीसुद्धा आली आहे. दोन दिवसांनी येऊन मी सुरभीला घेऊन जातो. ही तिला रोज हॉस्पिटलमध्ये नेईल. ट्रिटमेंट पंधरा दिवस चालेल. परिमाम पाहून नंतरची कार्यवाही ठरवू.’’

‘‘पण ट्रिटमेंट काय असेल?’’ वहिनीने घाबरतच विचारले.

‘‘ते डॉक्टर ठरवतील. पण ऑपरेशन नक्कीच नाही,’’ सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सुरभीची ट्रिटमेंट वीस दिवसांपर्यंत लांबली. त्या दरम्यान दोन वेळा मोऱ्या आणि वहिनी येऊन गेल्या. वीस दिवसांनी मी व माझी पत्नी सुरभीला घेऊन सावंतवाडीला गेलो.

‘‘सुभ्या बेटा, आईला हाक मार.’’

सुरभीने जोर लावून ‘‘आ आ…’’ असे म्हटले. वहिनींचा आनंद गगनात मावेना.

‘‘सुभ्या, बाबाला नाही हाक मारणार?’’

पुन्हा तिने ‘बा…बा…’ असे म्हटले. दोघांच्या डोळ्यांतून आंनदाश्रू पाझारले.

‘‘भाऊजी, सुरभी बोलायला लागलीय. पण नीट बोलत नाही आहे.’’

‘‘वहिनी, इतके दिवस तिच्या गळ्यांतून आवाज फुटत नव्हता. आता नुकता फुटायला लगलाय. प्रॅक्टिस केल्यावर होईल सुधारणा.’’

‘‘पण इथे कसं जमणार हे सगळं?’’

‘‘इकडच्या आरोग्य केंद्रात शितोळे नावाच्या बाई येतात. त्या हिच प्रॅक्टिस करतात. त्याला स्वीच आणि ऑडिओ थेरपी म्हणतात. त्या सराव करून घेतील. मग लागेल ती हळूहळू बोलायला.’’

काकींनी आपले घोडे पुढे दामटले. ‘‘अण्णा महाराजांनी वर्षभर उपाय केले. सुनेने उपास केले त्याचं फळ आहे हे आंद्या. तुझा डॉक्टर एक महिन्यांत काय करणार?’’

‘‘काकी, जे वर्षांत झालं नाही ते पंधरवडयात झालं. कारण वैद्यकिय ज्ञान. तरीही सुरभी अजून पूर्णपणे बरी झालेली नाही.’’

‘‘पण झालं तरी काय होतं तिला?’’

‘‘आपण सर्व अण्णा महाराजांकडे जाऊनच खुलासा करू?’’

आमची वरात मठात दाखल झाली.

‘‘नमस्कार अण्णा महाराज, सुभ्या बेटा, अण्णांना हाक मार.’’

ना…ना… अशी अक्षरे ऐकून अण्णा चपापले पण क्षणभरच.

‘‘अहो साहेब, वर्षभर आम्ही कसून प्रयत्न करतोय. माईंची तपस्या, वहिनींचे उपासतापास आणि आमचे उपाय..आला ना गुण?’’

‘‘अरे व्वा. पण काय झालं होतं हिला?’’

‘‘अहो काय सांगू? त्या पिंपळाला टांगून एका मुलीने जीव दिला होता. तिच्या भुताने हिला झपाटलं. आता जायला लागलंय ते भूत.’’

‘‘पण मी त्या पिंपळाला लोबंकळलो. हिच्या मैत्रिणींनासुद्धा करायला लावलं. आम्हाला कुणाला नाही झपाटलं.’’

‘‘सगळ्यानाच झपाटत नाही. या मुलीचं प्राक्तनच होतं तसं.’’

‘‘आणि तुमच्या प्राक्तमनांत हिच्या पालकांचा पैसा होता.’’ मीसुद्धा आवाज चढवला.

‘‘काय म्हणायचंय तुम्हाला? माझ्यावर संशय घेताय?’’ अण्णा गरजले.

‘‘ओरडण्याने खोट्याचं खरं होत नाही. तुम्हाला लबाडी करून लोकांना लुबाडण्याच्या वृत्तीने झपाटलंय, खरी गोष्ट फार निराळी आहे,’’ मी चवताळून बोललो.

‘‘काय आहे सत्य?’’ अण्णांचा आवाज नरमला होता.

‘‘सुरभी जन्मत:च मुकी नाही. ती बोलत होती, पण तोतरी. वर्गातल्या मुली तिला ‘तोतरी तोररी’ असं चिडवायच्या. त्यामुळे ती बोलणं टाळायला लागली. आतल्या आत कुढायला लागली. कायमचे आघात झाल्यामुळे तिचं मन काही व्यक्त करणं विसरूनच गेलं. त्याचा परिपाक म्हणजे मुकेपणा. कायम दाबून ठेवलेल्या भावना तिला निराशेच्या गर्तेत नेऊ लागल्या होत्या. ही शारीरिक नाही तर मानसिक समस्या होती.’’

‘‘मग याच्यावर तू उपाय तरी काय केलेस? फक्त त्या गोळ्या?’’

‘‘त्या गोळ्या शक्तीवर्धक म्हणजे टॉनिक होत्या. खरं टॉनिक हवं होतं तिच्या मनाला. ते माझ्या डॉक्टर मित्राने ओळखलं. पण ही सगळी पार्श्वभूमी मला सुरभीच्या मैत्रिणींनी सांगितली. गोव्याला गेल्यावर तिचं समुपदेशन केलं. निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं. नंतर बोलण्याचा प्रयत्न करायला शिकवलं. अजून जवळजवळ दोन महिन्यांनी ती व्यवस्थित बोलायला लागेल.’’

‘‘हे सगळं आपणहून होईल का?’’ वहिनींची रास्त शंका.

‘‘आपणहून कसं होईल वहिनी? त्यासाठी इथल्या आरोग्य केंद्रात तिला रोज जावं लागेल. एवढं तुम्हाला करावं लागेल.’’

‘‘करेन मी भावोजी. तुम्ही खूपच मदत केलीत आम्हाला.’’

‘‘मग माझी वर्गणी?’’

‘‘कोंबडी वडे.’’

‘‘एकदम बरोबर. राहणार आहे मी दोन दिवस. आता आधी या अण्णा महाराजांना कोणता नैवेद्य द्यायचा ते बघू, काय म्हाराजा?’’

‘‘काही नको. मी जातो दुसरीकडे.’’

‘‘आधी सुरभीच्या हातातले गंडेदोरे सोडा. दुसरीकडे अजिबात जायचं नाही. कारण तिकडच्या लोकांच्या हातात गंडेदोरे बांधून त्यांना गंडवणार. तेव्हा इथेच या मठात राहायचं. काम करून खायचं. फुकटचं नाही. हे गाव तुम्ही सोडूच शकत नाही. तुमचे फोटो आहेत माझ्याकडे. माझा भाऊ पोलिसांत आहे. तो तुम्हाला कुठनही शोधून काढील. काय, आहे का कबूल?’’

‘‘हो डॉक्टरसाहेब, तुम्ही सांगाल तसंच वागेन.’’ अण्णा नरमले.

घरी आल्यावर मी त्या सर्वांचं बौद्धिकच घेतलं.

‘‘मोऱ्या, काकूंचं एक राहू दे. पण तुसुद्धा सारासार विचार करू शकला नाहीस? अंधश्रद्धा आणि कर्मकांडामुळे आपल्या सर्वस्वाचा नाश होतो. गंडेदोरे, अंगारेधुपारे यांनी कुणाचा उद्धार होत नाही. मनात श्रद्धाभाव जरूर असावा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या गोष्टीवर, व्यक्तिवर किंवा शास्त्रज्ञावर आपली श्रद्धा असते. डॉक्टरांनी दिलेलं औषध विश्वासाने घेतलं तरच गुण येतो. सकारात्मक विश्वासाला श्रद्धा म्हटलं तर नकारात्मक विचाराला अंधश्रद्धा म्हणता येईल. स्वा. सावरकर म्हणत, ‘‘श्रद्धा माणसाला प्रगतीपथावर दौडण्याची शक्ती देते व अंधश्रद्धा माणसाच्या बुद्धिला पंगू बनवून एकाच जागी जखडून ठेवते.’’ म्हणूनच बुद्धिचा कस लावून विचार करावा.’’

दीड दमडीची नोकरी

कथा * भावना गोरे

‘‘हॅलो,’’ फोनवर विद्याचा परिचित आवाज ऐकून स्नेहा खुशीत आली.

‘‘आणि काय विशेष? सगळं सरोगाद आहे ना?’’ वगैरे औपचारिक गप्पा झाल्यावर दोघीही आपापल्या नवऱ्याबद्दल बोलू लागल्या.

‘‘प्रखरला तर घराची, संसाराची काही काळजीच नाहीए. काल मी त्याला म्हटलं होतं, घरी जरा लवकर ये. चिंटूचे शाळेचे बूट अन् अजून थोडंफार सामान घ्यायचं आहे. पण तो इतका उशिरा आला की काय सांगू?’’ विद्या म्हणाली.

स्नेहानं म्हटलं, ‘‘रूपेश पण असंच करतो. अगं, शुक्रवारी नवा सिनेमा बघायचा प्लॅन होता आमचा. पण हा इतक्या उशिरा आला की आम्ही पोहोचेपर्यंत तिथं मध्यांतर व्हायला आलं होतं.’’

विद्या आणि स्नेहा दोघीही गृहिणी होत्या. दोघींचे नवरे एकाच कंपनीत काम करत होते. मुलंही साधारण एकाच वयाची होती. कंपनीच्या एका पार्टीत दोघी प्रथम भेटल्या. दोघींच्याही लक्षात आलं की त्यांचे स्वभाव, त्यांच्या समस्या साधारण सारख्याच आहेत. प्रथम त्या मुलं, त्यांचे अभ्यास, महागाई वगैरेवर बोलायच्या. नंतर मात्र नवऱ्याला सतत नावं ठेवणं हाच त्यांच्या गप्पांचा विषय झाला.

तेवढ्यात स्नेहाच्या घराची डोअरबेल वाजली. तिनं म्हटलं, ‘‘विद्या, बहुतेक मोलकरीण आलेली आहे. मी फोन ठेवते.’’ फोन ठेवून तिनं दार उघडलं अन् रखमा आत आली. आली तशी मुकाट्यानं भराभरा कामं आटोपू लागली.

‘‘काय झालंय गं रखमा? आज एवढी गप्प का? फार घाईत दिसतेस?’’ स्नेहानं विचारलं तशी ती रडू लागली.

‘‘काय झालं?’’ घाबरून काळजीनं स्नेहानं विचारलं.

‘‘काय सांगू बाई, माझा धनी एका शाळेच्या बसचा ड्रायव्हर म्हणून काम करतो. काल चुकून एका मुलाला शाळेतून घरी न्यायला विसरले तर शाळेनं त्याला ड्यूटीवरून काढून टाकलंय.’’ रखमानं रडत रडत सांगितलं.

‘‘हे तर वाईट झालं,’’ स्नेहानं सहानुभूती दाखवली.

रखमा काम आटोपून गेली अन् स्नेहाला आठवलं आज भाजी नाहीए घरात. लव आणि कूश शाळेतून घरी येण्याआधी तिला भाजीबाजार गाठायला हवा. घाईघाईनं आवरून ती भाजीच्या मोहिमेवर निघाली. मनातून रूपेशला भाजीही आणून टाकायला जमत नाही म्हणून चिडचिड चाललेलीच होती. घरी येऊन स्नेहानं स्वयंपाकाला सुरूवात केली. मुलं शाळेतून आल्यावर त्यांची जेवणं, थोड्या गप्पा, त्यानंतर शाळेचं होमवर्क, त्यानंतर पार्कात खेळायला घेऊन जाणं, आल्यावर उरलेला अभ्यास की लगेच रात्रीचा स्वयंपाक. तेवढ्यात रूपेश येतो, जेवतो की लगेच झोपतो. हीच त्यांची दिनचर्या होती.

कधीकधी स्नेहाला या सगळ्याचा वैताग यायचा. मग ती रूपेशशी भांडायची. ‘‘माझ्यासाठी नाही तर निदान, मुलांसाठी तरी थोडा वेळ काढता येत नाही का तुला?’’

रूपेशही चिडून म्हणायचा, ‘‘अख्खा दिवस घरात असतेस तू. काय करतेस बसून? बाहेर मला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं. ते तुला कुठं माहीत आहे?

विद्याला विचार, प्रखरही माझ्याबरोबर थांबून काम करत होता. सध्या आमच्या कंपनीची परिस्थिती वाईट आहे. एक नवी कंपनी आल्यामुळे आमचा बिझनेस एकदम डाऊन झाला आहे.’’

‘‘पुरे हो तुमचं! तुमच्या कंपनीत रोजच काहीतरी प्रॉब्लेम निघतो. इतकी कंपनीची अवस्था वाईट आहे तर सोडून द्या ही नोकरी,’’ स्नेहा रागानं फणफणत असते.

दुसऱ्या दिवशी फोनवर हा सगळा मसाला विद्याला पोहोचवला जातो.

एकदा मात्र विद्या अन् स्नेहानं बराच प्रयत्न करून एका रविवारी पिकनिकचा बेत जमवला. गप्पा, खादाडी, हसणं, मुलांचे खेळ यातही प्रखर अन् रूपेश मात्र त्यांच्या कंपनीच्याच कामांबद्दल बोलत होते.

शेवटी वैतागून स्नेहानं म्हटलं, ‘‘तुम्ही दोघं ही कंपनी सोडून स्वत:चा बिझनेस का सुरू करत नाही?’’

‘‘बिझनेस?’’ तिघांनी एकदमच विचारलं.

‘‘हो ना. थोडं लोन घेऊ, थोडा पैसा आपलं सोनंनाणं गहाण ठेवून उभा करता येईल. छोटासा बिझनेस छोट्याशा भांडवलावर उभा करता येईल की?’’

स्नेहाची कल्पना सर्वांना पसंत तर पडली. पण व्यवसाय म्हणजे काही पोरखेळ नसतो. प्रखरनं तर स्पष्टच नाही म्हटलं, ‘‘बिझनेसमध्ये फार रिस्क असते. आपला व्यवसाय चालेल, न चालेल, कुणी खात्री द्यायची? नको रे बाबा…मी नाही करणार बिझनेस…’’

विद्याला मात्र कल्पना आवडली. ‘‘स्नेहा बरोबर म्हणते आहे. स्वत:चा बिझनेस म्हणजे कुणाचं बॉसिंग नाही, मनांत येईल तेव्हा सुट्टी घ्यावी. बॉसच्या मिनतवाऱ्या करायला नकोत.’’ ती म्हणाली.

‘‘पण व्यवसाय म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे. सगळं काही डावावर लावलं तरी जिंकूच याची खात्री नसेल.’’ प्रखर म्हणाला. मग तो विषय तिथंच संपला.

रूपेशचं खरं तर बायको, मुलांवर, संसारावर खरोखर खूप प्रेम होतं. त्यांना फिरायला न्यावं, त्यांना वेळ द्यावा असं त्यालाही वाटायचं. पण बॉसच्या धाकानं तो कधी मोकळेपणानं वागू शकत नव्हता. स्नेहाच्या म्हणण्यावर तो गंभीरपणे विचार करू लागला.

दुसऱ्या दिवशी स्नेहानं विद्याला फोन करायला म्हणून रिसीव्हर हातात घेतला अन् डोअरबेल वाजली. रखमा आली वाटतं. असं पुटपुटतं तिनं दार उघडलं तर समोर रूपेश उभा. तिला नवलच वाटलं.

‘‘तुम्ही एवढ्यात तर ऑफिसला गेला होता, मग इतक्या लवकर परत कसे आलात?’’

‘‘मी आता ऑफिसला जाणारच नाही. नोकरी सोडून आलोय मी,’’ हसत हसत रूपेशनं सांगितलं.

स्नेहाला काहीच कळेना. ‘‘बॉसशी भांडण झालं का? अशी कशी नोकरी सोडलीत?’’

‘‘अगं बाई, यापुढे स्वत:चा व्यवसाय करायचा आहे ना? बिझनेस?’’

रूपेशच्या बोलण्यावर स्नेहा हसली खरी. पण मनातून खरं तर ती घाबरली होती. तिच्या मनात होतं प्रखरही धंद्यात राहिला तर दोघांच्या मदतीने व्यवसाय करता येईल. एकावर एक अकरा होतातच ना? प्रखरनं स्पष्टच नकार दिल्यावर मग तिनंही त्यावर विचार केला नाही. पण रूपेश आता जॉबच सोडून आलाय म्हटल्यावर…स्नेहा काही बोलणार तेवढ्यात रखमा आली. स्नेहा तिच्याकडून स्वयंपाकघराची स्वच्छता करून घेऊ लागली.

‘‘रूपेश, मी भाजी घेऊन येते,’’ म्हणून स्नेहा निघाली. तसा रूपेश म्हणाला, ‘‘मी पण चलतो.’’

भाजीवाल्यानं रुपेशला बघितलं तर हसून म्हणाला, ‘‘साहेब, आज तुम्ही कसे? कामावर नाही जायचं का?’’

‘‘मी नोकरी सोडलीय,’’ हसून रुपेशनं म्हटलं.

‘‘काय?’’ दचकून भाजीवाल्यानं विचारलं अन् रूपेशकडे अशा नजरेनं पाहिलं जणू तो रखमाचा नवरा आहे, ज्याला कामावरून काढून टाकण्यात आलंय.

स्नेहा बिचारी गप्प बसली. घरी येऊन तिनं भाजी केली. कोथिंबीर, उसळ केली. कणिक भिजवून वरणाला फोडणी घातली. भराभरा कामं आटोपून तिनं रूपेशला म्हटलं, ‘‘मी भाताचा कुकर लावून जाते. तीन शिट्या झाल्या की गॅस बंद कर.’’

‘‘मी चलतो तुझ्यासोबत, आल्यावर कुकर लाव.’’ म्हणत रूपेशही तिच्याबरोबर निघाला.

बाबांना बघून मुलांनाही आश्चर्य वाटलं.

‘‘बाबा, आज तर ‘रेनी डे’ नाहीए. तुम्ही कसे सुट्टीवर?’’ धाकट्यानं निरागसपणे विचारलं.

घरी आल्यावर स्नेहानं कुकर लावला. जेवायला वाढेपर्यंत पोरांनी ‘भूक भूक’ करत भंडावून सोडलं.

जेवणं झाल्यावर रुपेश म्हणाला, ‘‘चल, जरा निवांत बिझनेस प्लॅनिंग करूयात.’’

पण स्नेहाला स्वयंपाकघर, ओटा स्वच्छ करायचा होता. अजून धुणं व्हायचं होतं. ती म्हणाली, ‘‘तुम्ही जरा मुलांचं होमवर्क आटोपून घ्या. मी कपडे धुवून येते. मग प्लॅन करू.’’

मुलांचं होमवर्क घेणं रूपेशला जमेना. त्याला त्यातलं काहीच ठाऊक नव्हतं.

धाकट्यानं विचारलं, ‘‘भोपळा अन् वांग यात काय अन् कसा फरक आहे?’’

रूपेशनं म्हटलं, ‘‘लिहि ना, भोपळा पिवळा आणि वांग जांभळं काळं असतं,’’ हे ऐकून दोघं मुलं हसायला लागली. धाकटा तर टाळ्या वाजवू लागला.

दंगा ऐकून बाथरूममधून स्नेहा बाहेर आली. ‘‘हे काय अभ्यास का करत नाहीए?’’ मुलानं तोच प्रश्न आईला विचारला.

‘‘भोपळा हा वेलावर लागतो. क्रीपर म्हणजे वेल. वांगं रोपावरझाडावर लागतं. श्रब असा शब्द आहे.’’

मुलं वडिलांकडे बघून पुन्हा हसू लागली. त्यांना नीट अभ्यास करण्याची तंबी देऊन स्नेहा कपडे धुवायला गेली.

रूपेश डोळे बंद करू आडव झाला. मुलांनी काहीतरी विचारलं, पण त्यानं उत्तर दिलं नाही. त्याला झोप लालगी आहे असं समजून मुलं खेळायला निघून गेली.

रूपेशला खरंच झोप लागली. जागा झाला तेव्हा सायंकाळ झाली होती.

स्नेहा मुलांना रागवत होती, ‘‘तुम्ही अभ्यास पूर्ण केला नाहीत, खेळायला निघून गेलात. आता आपण आधी अभ्यास, करूयात.’’

तेवढ्यात रूपेश उठलेला बघून तिनं त्यांचा दोघांचा चहा केला. मुलांना दूध दिलं अन् चहा घेऊन ती मुलांचा अभ्यास घ्यायला लागली.

रूपेशच्या मनात आलं, सकाळपासून स्नेहा कामं करतेय. ती बिझनेससाठी वेळ कसा अन् कधी काढेल?

पुन्हा रात्रीचा स्वयंपाक…ओटा धुणं, अन्नाची झाकपाक, मुलांची उद्याची तयारी…

दुसऱ्या दिवशी रूपेश कामावर गेला नाही. रखमा कामावर आली. काम करता करता म्हणाली, ‘‘बाई, तुम्ही माझ्या नवऱ्याला कामावर ठेवून घ्यायला साहेबांना सांगा ना? त्याला काम नाही लागलं तर माझ्या मुलांची शाळा बंद होईल.’’

स्नेहाच्या सांगण्यावरून रखमानं मुलांना चांगल्या शाळेत घातलं होतं. आता स्नेहा तिला काय सांगणार की तिचाच नवरा नोकरी सोडून आलाय म्हणून. तो रखमाच्या नवऱ्याला कुठून काम देणार?

रखमा गेली अन् रूपेशनं म्हटलं, ‘‘स्नेहा, जरा तुझे दागिने आण बघू. बघूयात त्यात किती पैशाची सोय होऊ शकतेय.’’

स्नेहानं कपाटाच्या लॉकरमधून दागिन्यांचा डबा काढून आणला. रूपेशच्या हातात डबा देताना तिचे हात थरथरत होते.

तेवढ्यात विद्याचा फोन आला. ‘‘आज ऑफिसची पार्टी आहे, तू येणार आहेस ना?’’

‘‘बघते,’’ तिनं कसंबसं म्हटलं अन् फोन ठेवला. दागिने नाहीत म्हटल्यावर आता यापुढे पार्ट्यांना कसं जायचं?

ती रूपेशकडे येऊन म्हणाली, ‘‘दागिने दोन तीन दिवसांनी विकले किंवा गहाण ठेवले तर चालेल का?’’

‘‘चालेल ना!’’ रूपेशनं डबा तिला देत म्हटलं.

त्या निर्जीव दागिन्यांबद्दल स्नेहाल इतका प्रेमाचा उमाळा दाटून आला. या पाटल्या माझ्या आईनं दिलेल्या. या बांगड्या आजी अन् मामाकडची भेट. ही अंगठी ताईनं दिलेली, हा नेकलेस अन् सेट रूपेशने किती प्रेमानं माझ्यासाठी आणला होता. तिचे डोळे भरून आले. एकेका दागिन्याचा ती मुका घेऊ लागली.

तेवढ्यात फोन वाजला. विद्या विचारत होती, ‘‘अगं, तू येते आहेस की नाहीस पार्टीला? काहीच कळवलं नाहीस?’’

‘‘हो, हो, अगं राहिलंच ते. पण एक सांग, पार्टी आहे कशासाठी?’’

‘‘बॉसचा वाढदिवस आहे. म्हणूनच ऑफिसला दोन दिवस सुट्टी दिलीय ना?’’

‘‘बरं, मी येतेय पार्टीला,’’ तिनं फोन ठेवला अन् सरळ रूपेशपाशी गेली.

‘‘मला बुद्धु बनवलंत तुम्ही, म्हणे नोकरी सोडून आलोय, खरं तर बॉसच्या वाढदिवसाची सुट्टी आहे तुम्हाला.’’

‘‘हो गं! ऑफिसला सुट्टी आहे हे खरंय. पण मी खरंच विचार करतोय की नोकरी सोडावी म्हणून. मी आजच्या पार्टीतच माझा राजीनामा देणार होतो. हे बघ, लिहून तयारच आहे.’’

दोन दिवसांपूर्वी लिहिलेला राजीनामा त्यानं तिला दाखवला. म्हणजे रूपेश खरोखर नोकरी सोडतोय तर!

सायंकाळी पार्टीसाठी तयार होत असताना स्नेहाला सारखं भरून येत होतं. आता हे दागिने तिला परत कधीच बघायला मिळणार नाहीत किंवा काही वर्षांनंतर जेव्हा व्यवसाय छान चालेल, भरपूर पैसा हातात येईल तेव्हा नवे दागिने घेता येतील. पण निदान सध्या काही वर्षं तरी दागिन्यांशिवाय राहावं लागेल.

गाडीतून पार्टीला जाताना तिच्या मनात आलं जर रूपेशनं नोकरी सोडली नाही तर रखमाच्या नवऱ्याला ते लोक ड्रायव्हर म्हणून ठेवून घेऊ शकतील.

रूपेशही काळजीतच होता. स्नेहानं धंद्यात मदत करायची म्हटलं तर तिच्याकडं जास्तीचा वेळ कुठं होता? मुलं अजून पुरेशी मोठी झालेली नव्हती. सासर माहेर कुठूनच कुणी वडिलधारं येऊन राहील अशी परिस्थिती नव्हती. सगळा वेळ तर घरकामात अन् मुलांमध्ये जातो. मग धंदा कसा होणार?

ती पोहोचली तेव्हा पार्टी सुरू झाली होती. प्रखर आणि विद्या त्यांची वाटच बघत होते. पार्टीच्या शेवटी बॉस बोलायला उभे राहिले. सगळ्या स्टाफला उद्देशून ते म्हणाले, ‘‘आजची पार्टी माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या पत्नींना समर्पित आहे. त्या सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पूर्णपणे सांभाळतात आणि ऑफिसच्या कामासाठी आपल्या नवऱ्यांना पूर्ण मोकळीक देतात म्हणूनच आमचं ऑफिस व्यवस्थित चाललंय. झोकून देऊन ऑफिसचं काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या पत्नींचा मी आभारी आहे. आज की शाम…बीबीयों के नाम…’’’

स्नेहाला भीती वाटत होती की रूपेश आता त्याचा राजीनामा सादर करतो आहे की काय? हृदय धडधडत होतं. नोकरी सुटली तर पार्ट्या वगैरे बंदच होतील.

घरी परतताना रूपेशनं म्हटलं, ‘‘स्नेहा, तू माझ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, संसारासाठी खरोखर खूप राबतेस. बॉस बरोबर बोलले. तू घर सांभाळतेस म्हणूनच मी ऑफिसची जबाबदारी सांभाळू शकतो. मी उगीचच तुझ्याशी भांडलो, ओरडलो…सॉरी, माझं चुकलंच!’’

‘‘नाही रूपेश, माझंच चुकलं. मी तुमच्या नोकरीला दीडदमडीची ठरवत होते. पण ती किती महत्त्वाची आहे, हे मला आता कळतंय. आज जो काही संसार आहे तो तुमच्या नोकरीमुळेच आहे. तुमच्या कष्टाचं फळ आहे. पण मला त्याची सवय झालीय ना, म्हणून मी उगीचच चिडचिड करत बसते. जर हे सगळं नसलं तर मी कशी राहीन? काय काय करीन? बरं झालं तुम्ही राजीनामा दिला नाहीत ते.’’

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें