* अनुराधा चितके
जवळ जवळ वीस वर्षांनंतर मी एक दिवस अल्पनाला भेटलो तेव्हा मला कल्पनाही नव्हती की मी अमेरिकेला परत जाताना अल्पनाही तिच्या मुलीसह माझ्याबरोबर असेल.
त्या दिवशी ड्रायक्लिन होऊन आलेल्या माझ्या कपड्यांमध्ये माझ्या लहेंग्याऐवजी एक लेडीज डे्स आला होता, तो परत करून माझे कपडे घेण्यासाठी मी ड्रायक्लिंग करणाऱ्या माणसाच्या दुकानावर गेलो तेव्हा तिथे एक तरुणी त्याच्याशी जोरजोरात भांडत होती. तिचा आवेश, तिची भाषा बघून मला खरंच वाटेना की ती अल्पना असेल...पण ती अल्पनाच होती.
काही वेळ मी त्या दोघांमधलं भांडण थांबेल म्हणून वाट बघितली, शेवटी दुकानदाराला जरा मोठ्या आवाजातच म्हटलं, ‘‘अहो भाऊ, माझ्या कपड्यांच्या ऐवजी हा एक लेडीज डे्स चुकून आलाय तेवढा परत घ्या अन् माझा लहेंगा झब्बा मला परत करा,’’ मी डे्स दुकानातल्या फळीवर ठेवला.
‘‘अरेच्चा? हाच तर माझा डे्स...तुमच्याकडे कसा आला? चार पाच दिवस यांच्याकडे शोधतेय मी...इतके दिवस काय झोपला होता का तुम्ही?’’ तिचं अजूनही माझ्याकडे लक्ष नव्हतंच. तिने झडप घालून तो डे्स उचलला.
मीच म्हटलं, ‘‘अगं अप्पू? तू, तुम्ही अल्पना आहात ना? इथे कशी तू?’’
तिने माझ्याकडे बघितलं अन् मग हसून म्हणाली, ‘‘होय, मीच अल्पना. तुझा बेस्ट फ्रेण्ड. पण अरुण तू इथं कसा? तू तर अमेरिकेत सेटल झाला होतास ना?’’
नंतरच्या वीस मिनिटांत तिने गेल्या वीस वर्षांमधल्या सगळ्या घडामोडींची माहिती मला दिली. मी अमेरिकेला गेल्यानंतर लगेचच तिचं लग्न झालं होतं. पण दुर्दैवाने श्रीमंत घरातली लाडकी लेक असूनही तिला अन् तिच्या आईवडिलांना या स्थळाच्या बाबतीत अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागलं होतं. नवरा कुठल्या तरी प्रायव्हेट कंपनीत होता. घरची परिस्थिती अगदीच सुमार होती. त्यामुळे अल्पूला तिची गव्हर्नमेंटची नोकरी अजूनही करावी लागत होती. तिला एकच मुलगी आहे अन् ती इंजिनिअरिंगच्या फायनलला आहे. काय न् काय अल्पना अखंड वटवटत होती अन् मी फक्त तिच्याकडे बघत होतो.