२४ तास

कथा * विपिन चाचरा

समीरला जाग आली तेव्हा सकाळचे ८ वाजले होते. वंदनाला इतका वेळ शेजारी झोपलेले पाहून त्याला एकदा आश्चर्य वाटले, पण नंतर आठवले की ते दोघेही त्याची बहीण सीमाच्या घरी आले आहेत. त्याने वंदनाला उठवण्याचा प्रयत्न केला नाही, तितक्यात अचानक बाहेरून दरवाजावर टकटक झाली त्यासोबतच त्याला शेजारी राहणारी सीमाची मैत्रीण अंजूचा प्रसन्न आवाज ऐकू आला, ‘‘समीर, वंदना, गरमागरम चहा आणला आहे.’’

समीरने पटकन दरवाजा उघडला आणि आश्चर्याने विचारले, ‘‘तू चहा घेऊन का आलीस?’’

‘‘कारण सीमा घरी नाही. वंदना, उठ आता,’’ अंजू जवळ गेली आणि वंदनाला हलवू लागली.

‘‘सीमा सकाळीच कुठे गेली?’’

‘‘ती पती आणि मुलासोबत कुठेतरी सहलीला गेली असावी,’’ अंजूने वंदनाला उठवले आणि कपांमध्ये चहा ओतू लागली.

‘‘आम्हाला न सांगताच कशी गेली?’’ समीरच्या चेहऱ्यावर काळजी होती.

‘‘सीमाने तुम्हा दोघांसाठी पत्र दिले आहे, ते दिवाणखान्यातील टेबलावर ठेवले आहे.’’

समीरने लगेच तिकडे जाऊन टेबलावर ठेवलेले पत्र उचलले. शेजारी ठेवलेला लाल गुलाबांचा सुंदर पुष्पगुच्छ पाहून त्याला आणखीनच आश्चर्य वाटले.

सीमाने पत्रात लिहिले होते :

‘‘आम्ही तिघे कुठे गेलो आहोत, का गेलो आणि तुम्हा दोघांना काहीच का सांगितले नाही, अशा सगळया प्रश्नांची उत्तरे आम्ही उद्या सकाळी परत आल्यावर देऊ.

‘‘समीर, आजचा दिवस वंदनासाठी खूप विशेष आहे. कृपा करून आज तिला जे हवं ते करू दे, ती गुलाबाच्या फुलासारखी सुंदर राहिली पाहिजे.

‘‘मौजमजेने भरलेल्या एका दिवसासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा.’’

सुंदर गुलाब बघून वंदना आनंदाने खुलली आणि तिने समीरला विचारले, ‘‘हा सुंदर पुष्पगुच्छ कोणी आणला आहे?’’

‘‘ताई आणि भाओजींनी तो आपल्याला दिला आहे. आज कोणता विशेष दिवस आहे?’’ वंदनाकडे पुष्पगुच्छ देताना समीरने गंभीर स्वरात विचारले.

थोडावेळ कसलातरी विचार केल्यानंतर वंदनाने नकारार्थी मान हलवत उत्तर दिले, ‘‘मला काहीच आठवत नाही. तू सांग.’’

समीरने शांतपणे पत्र तिच्या हातात दिले आणि मग अंजूकडून कप घेऊन चहा पिऊ लागला. पत्र वाचून वंदना गूढपणे हसली आणि म्हणाली, ‘‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक विशेष दिवस आहे, उद्या या प्रश्नाचे उत्तर फक्त सीमा ताईच देऊ शकेल, पण तिने तुला दिलेला सल्ला मला खूप आवडला.’’

‘‘कोणता सल्ला?’’

‘‘आज तू मला जे पाहिजे ते करू दे. हा दिवस मला माझ्या पद्धतीने जगू दे.’’

‘‘मी तुला कैद करुन ठेवले आहे का?’’

कदाचित अंजू तिथे असल्यामुळे समीर वंदनाचे बोलणे ऐकून चिडला.

वंदना पलंगावरून खाली उतरली, एक दीर्घ श्वास घेऊन, तिने गुलाबंचा सुगंध घेतला आणि मग समीरकडे जात आनंदी स्वरात म्हणाली, ‘‘आज तुझ्या नाराजीचा आणि रागाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. सुखाची, आनंदाची सोबत आज तू सोडू नकोस आणि मीही सोडणार नाही.’’

समीरच्या जवळ जाऊन वंदनाने पाय उंचावत त्याच्या गालाचे चुंबन घेतले आणि तो काही बोलण्याआधीच ती लाजत आंघोळीला गेली.

‘‘वंदना आज खूप रोमँटिक झाली आहे,’’ असे म्हणत अंजू खोडकरपणे मोठयाने हसली आणि समीरलाही त्याचे हसू आवरता आले नाही.

‘‘प्रेमाच्या गप्पा मारण्यासाठी मी तुम्हा दोघांना फक्त एक तास देते, त्यानंतर माझ्या घरी नाश्ता करायला या,’’ अंजू जाण्यासाठी उठून उभी राहिली.

‘‘तू का त्रास करून घेतेस? नाश्ता तर वंदना…’’

नाहणीघराच्या दारातून डोकावत वंदनाने लगेच समीरला रोखले, ‘‘मी आज स्वयंपाकघरात जाणार नाही. धन्यवाद अंजू ताई. मी काल रात्रीही जेवले नाही. आम्ही तुझ्या घरी ठरलेल्या वेळी नाश्ता करायला येऊ.’’

‘‘दुपारचे जेवण वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रंजनाकडे आहे.’’

‘‘छान, खूप छान. रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला कोणाकडे जावे लागेल?’’ वंदनाने हसत विचारले.

‘‘सीमाने संध्याकाळच्या चित्रपटाची दोन तिकिटे मला दिली आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर रात्रीचे जेवण बाहेरून करून या बाईसाहेब.’’

‘‘खूप छान. खूपच छान,’’ खूप आनंदी दिसत असलेल्या वंदनाकडे समीरने नाराजीने पाहिले. त्यावेळी वंदनाने त्याला चिडवले आणि नाहणीघराचा दरवाजा बंद केला.

बाहेर जाण्यापूर्वी अंजूने विचारले, ‘‘आज असा कोणता विशेष दिवस आहे की, वंदना इतकी आनंदी दिसत आहे?’’

‘‘मला खरंच माहीत नाही, अंजू,’’ समीरने उत्तर दिले,

‘‘जर तिचा किंवा तुझा वाढदिवस असता तर तुला माहीत असते. तुमच्या लग्नाला फक्त ५ महिने झालेत, त्यामुळे तुमच्या लग्नाचा वाढदिवसही असू शकत नाही. वर्षभरापूर्वी या दिवशी तू वंदनाला प्रेमाच्या जाळयात ओढले होतेस का?’’

‘‘आमचा प्रेम विवाह नाही, अंजू’’

‘‘काल रात्री ती मला भेटली तेव्हा खूप शांत आणि उदास दिसत होती, रातोरात अशी काय जादू झाली की, ती इतकी आनंदी दिसत आहे?’’

‘‘मला माहीत नाही, सीमा आणि वंदना यांच्यात नक्कीच संगनमत झाले असावे, असा माझा अंदाज आहे.’’

‘‘कारण काहीही असो, वंदना रोमँटिक झाल्यामुळे आज तू खूप मजा केली पाहिजेस,’’ अंजूने मिश्कीलपणे डोळे मिचकावले आणि मग हसत तिच्या घरी गेली.

समीर सोफ्यावर बसून सर्व घडामोडींचा विचार करू लागला.

‘‘तुमच्या दोघांकडे एक महत्वाचे काम आहे. लवकर आमच्या घरी पोहोचा,’’ वंदनाला संध्याकाळी तिच्या मेव्हण्याकडून असा मेसेज मिळाल्यावर ती काल रात्री नऊच्या सुमारास इथे पोहोचली.

अंजू काही वेळाने त्याला भेटायला आली होती. वंदना रात्री शांत आणि उदास होती, हे अंजूने बरोबर ओळखले होते.

आदल्या दिवशी संध्याकाळी घरातील सर्व सदस्यांसमोर तो वंदनाला मोठयाने ओरडला होता. त्याची आई आणि धाकटी बहीण स्वयंपाकघरात काम करत असताना वंदना टीव्ही बघत बसल्याचे पाहून तो रागावला होता.

‘‘दादा, वहिनी भाजी बनवून गेली होती. तिने तिच्या वाटणीचे काम केले आहे,’’ त्याच्या बहिणीने वहिनीची बाजू घेत भावाचा राग कमी करण्याचा प्रयत्न केला.

‘‘सुनेला रडवण्यात याल काय आनंद मिळतो काय माहीत? बघावे तेव्हा तिच्या मागे लागलेला असतो. स्वयंपाक आणि घरातील इतर कामांमध्ये तो इतका लक्ष का घालतो, हेच समजत नाही.’’ वंदनाला अश्रू ढाळताना पाहून आई समीरला ओरडली.

समीरने मनातल्या मनात मान्य केले की, त्याच्या आईचे म्हणणे चुकीचे नाही. लग्न झाल्यापासून त्याने वंदनाचा अपमान करायचा जणू विडा उचलला होता.

वधूच्या रुपातील वंदनाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले होते. ती घरातली सर्व कामं कुशलतेने करत असे. स्वभावानेही ती खूप मनमिळाऊ होती, तिचा पगारही समीरच्या पगारापेक्षा ५ हजार रुपये जास्त होता.

या सर्व कारणांमुळे, प्रत्येक नातेवाईक आणि ओळखीचा वंदनाचे कौतुक करायचा आणि समीरला नशीबवान म्हणायचा. हे सर्व ऐकून समीर कंटाळला होता. वंदनासोबत एकांतात असताना त्याचा वेळ खूप मजेत जायचा, पण इतर लोकांच्या उपस्थितीत वंदनाचे हसणे – बोलणे त्याला खटकत होते. लोक तिचे कौतुक करताना थकत नव्हते आणि तो तिच्या प्रत्येक कामात, तिच्या वागण्यात चुका शोधण्यात हुशार झाला होता, वंदनाने गर्विष्ठ होऊ नये, असे त्याला वाटत होते.

‘‘प्रत्येकाने तुझी स्तुती करावी, यासाठी त्यांच्यासमोर सतत जाऊ नकोस, तुझे जास्त हसणे-बोलणे शोभून दिसत नाही. यामुळे तुझे चारित्र्य बरे नसल्याचे तुझ्या सहकाऱ्यांना वाटेल, असा गैरसमज होण्याची त्यांना संधी का देतेस?’’ वंदनाच्या कोणत्याही सहकाऱ्याने दिलेल्या पार्टीतून आल्यानंतर समीर अनेकदा तिला असे खोचकपणे बोलत असे.

‘‘तुझा माझ्यावर विश्वास असायला हवा,’’ सुरुवातीला समीरचे असे बोलणे ऐकून वंदना खूप नाराज व्हायची.

‘‘माझा विश्वास जिंकण्यासाठी तुझे वर्तन बदल.’’

‘‘माझे वागणे ठीक आहे. तुझी विचारसरणी चुकीची आहे.’’

‘‘माझ्या मर्जीप्रमाणे नाही वागलीस तर तुला पश्चात्ताप होईल.’’

‘‘विनाकारण आणि कोणाच्याही समोर माझा अपमान करत राहिलास तर आपलं नातं कधीच फुलणार नाही.’’

‘‘माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नकोस.’’

‘‘मी काही अशिक्षित आणि असंस्कृत स्त्री नाही, जी तिचे व्यक्तिमत्व पुसून टाकेल आणि तुझ्या हातातली बाहुली बनून राहील.’’

सुरुवातीला असे बोलून वंदना त्याच्याशी वाद घालत असे. त्यानंतर एके दिवशी वंदना असा वाद घालत असताना समीरने तिच्या ५-६ कानाखाली मारून तिची बोलती बंद केली.

ही घटना सुमारे २ महिन्यांपूर्वी घडली होती. त्या दिवसानंतर वंदनाला त्याच्याशी बोलायची हिंमत झाली नाही. बहुतेकदा ती त्याच्यासमोर गप्प आणि नाराज असायची.

‘मी तिची समजूत काढली तर ती पुन्हा आगाऊपणा करेल’, असा विचार करून समीरने वैवाहिक जीवनातील तणाव कायम राहू दिला.

समीरला वाटेल तेव्हा तो वंदनावर रागवायचा. ती गप्प बसून अश्रू ढाळायची तेव्हा त्याला विलक्षण समाधान मिळायचे.

काल रात्री वंदना शांत आणि उदासपणे सीमाच्या घरी गेली. त्यानंतर लगेच आज सकाळी तिला खूप प्रसन्न पाहून समीर आश्चर्यचकित झाला. बराच वेळ डोकं खाजवूनही त्याला पत्नीच्या बदलाचे कारण सापडले नाही. त्याने उगाचच खांदे उडवले आणि वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. वंदना त्याच्या मागे उभी राहून त्याच्या डोक्याला मालिश करू लागली, तेव्हा वृत्तपत्रातील बातम्यांवरून त्याचे लक्ष विचलित झाले.

‘‘वा, खरंच खूप छान वाटतेय,’’ समीरने मालिशचा आनंद घेण्यासाठी डोळे मिटले.

‘‘मलाही अशी मालिश करायला मजा येते,’’ वंदनाचे हात झपाटयाने फिरू लागले.

‘‘आज मी तुलाही मालिश करून देतो.’’

‘‘राहू दे, आजपर्यंत कधी नाही केलीस, आता काय करणार?’’

‘‘यावेळी निरर्थक वाद घालणं खरंच गरजेचं आहे का?’’

‘‘रागावू नकोस,’’ वंदनाने खाली वाकून त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मग मनापासून मालिश करू लागली. मालिश झाल्यावर समीर सोफ्यावर झोपला, पण वंदनाने त्याला ओढत नाहणीघरात नेले. तिथे तो तिला आपल्या बाहूंच्या कैदेतून सोडायच्या मनस्थितीत नव्हता.

‘‘साहेब, मला पुन्हा अंघोळ करायची इच्छा नाही,’’ वंदनाने त्याला दूर लोटले आणि हसत बाहेर आली.

‘‘नेहमी रात्री तू दुसऱ्यांदा अंघोळ करतेसच. रात्री ऐवजी आताच दुसऱ्यांदा माझ्यासोबत अंघोळ कर ना.’’

‘‘माझ्यासोबत अंघोळ करायची असेल तर रात्रीची वाट बघा साहेब.’’

‘‘उगाच लाडात येऊन प्रेमाची ही संधी गमावू नकोस.’’

‘‘मी चहा बनवते. तू लवकर अंघोळ कर.’’ त्याच्या अंगावर आपल्या हाताने एक चुंबन सोडून वंदना स्वयंपाकघराकडे निघाली.

तिची मादक चाल पाहून समीरच्या डोळयात तीव्र इच्छा उमटल्या. त्यावर नियंत्रण ठेवत त्याने हसतमुखाने दरवाजा बंद केला आणि तो अंघोळ करू लागला.

काही वेळाने त्यांनी अंजूच्या घरी सांभार-डोसा मनसोक्तपणे खाल्ला. वंदनाने तिचा ५ वर्षाचा मुलगा अमितसोबत खूप गप्पा मारल्या. ती त्याला जवळच्या बाजारात घेऊन गेली आणि तिने त्याच्या आवडीचे चॉकलेट घेऊन दिले तेव्हा अमितची ती सर्वात जास्त आवडती झाली.

नाश्ता करून वंदना अंजूसोबत बाहेर पडली.

‘‘कुठे जात आहात?’’ समीरचा हा प्रश्न ऐकून वंदना आणि अंजू गूढपणे हसू लागल्या.

‘‘मला परत यायला दीड-दोन तास लागतील, तोपर्यंत तुम्ही भाओजींशी गप्पा मारा,’’ वंदनाने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.

‘‘तू कुठे जातेस, ते का सांगत नाहीस?’’ समीरला राग आला.

‘‘रागावू नकोस. मी परत आल्यावर सांगेन,’’ समीरची हनुवटी प्रेमाने हलवून वंदनाने अंजूचा हात धरला आणि मुख्य दरवाजाच्या दिशेने निघाली.

सुमारे २ तासानंतर दोघीही परतल्या. वंदनाचा चमकणारा रंग आणि कापलेले केस पाहून वंदना ब्युटी पार्लरमध्ये गेल्याचे समीरच्या लक्षात आले.

समीर काहीच बोलला नाही, पण अंजूच्या पतीने वंदनाच्या सौंदर्याचे मनापासून कौतुक केले.

‘‘तुमच्या दोघांसाठी ही संध्याकाळच्या चित्रपटाची तिकिटे आहेत,’’ अंजूने तिकिटे त्यांच्या हातात दिली. ‘‘आता १२ वाजले आहेत. बरोबर २ वाजता आपण सगळे रंजनाच्या घरी जेवायला जाऊ, तोपर्यंत तुम्हा दोघांनाही जे काही करायचेय ते करा.’’

अंजूचे असे बोलणे ऐकून वंदनापेक्षा जास्त समीर लाजला. स्वादिष्ट नाश्त्याबद्दल त्यांचे आभार मानून दोघेही सीमाच्या घरी आले.

‘‘मी छान दिसत नाही का?’’ लांबलचक आरशात रूप न्याहाळत वंदनाने समीरला विचारले.

‘‘प्रिये, तू एखाद्या अभिनेत्रीसारखी दिसतेस,’’ समीर तिच्या मागे उभा राहिला आणि त्याने वंदनाला मिठीत घेतलं.

‘‘मग तू मला पाहताच माझी स्तुती का केली नाहीस?’’

‘‘अंजूचा पती भरभरून तुझी स्तुती करत होता ना?’’

‘‘तू तर नाही केलीस ना?’’

‘‘स्तुती करण्याची माझी पद्धत वेगळी आहे.’’

‘‘कोणती पद्धत आहे साहेब?’’

‘‘ही,’’ असे म्हणत समीरने तिला उचलून घेतले आणि तिच्या अंगातून येणाऱ्या मादक सुगंधाचा आनंद घेत पलंगाकडे निघाला.

वंदना त्याला त्याचा चांगला मूड बदलू देत नव्हती. वेळोवेळी ती त्याच्या डोळयांकडे प्रेमाने पाहायची, बहुतेकदा ती त्याच्या जवळ बसायची आणि जेव्हा तिला संधी मिळायची तेव्हा ती गुपचूप त्याचा हात दाबायची किंवा त्याचे चुंबन घ्यायची. तिने तिच्या पतीला तिच्याशी वाद घालण्याची संधीच दिली नाही.

समीरने आपल्या मेहुण्याला अनेकदा फोन केला, पण त्याने प्रत्येक वेळी फोन कट केला, त्याचे हे वागणे समीरला गोंधळात टाकण्यात यशस्वी ठरले.

दुपारच्या जेवणानंतर दोघे काही वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले आणि नंतर चित्रपट पाहायला गेले. निळी जीन्स आणि लाल टॉपमध्ये वंदना खूपच मादक आणि सुंदर दिसत होती. हे कपडे तिने तिच्या नणंदेच्या कपाटातून काढले होते.

वंदनाने तिच्याकडे पाहणाऱ्या लोकांची कधीच पर्वा केली नव्हती, पण त्या संध्याकाळी समीरच्या डोळयात मात्र नाराजीचे भाव दिसू लागले, तरीही त्याने वंदनाला एकदाही फटकारले नाही.

इंग्रजी चित्रपट अॅक्शन आणि रोमान्सने भरलेला होता. दोघांनाही चित्रपट आवडला. चित्रपटगृहातून बाहेर पडून ते चायनीज रेस्टॉरंटमध्ये गेले, तिथे त्यांनी एकत्र नूडल्स, मंचुरियन आणि त्यानंतर दोघांची आवडती रसमलाई खाल्ली.

रात्री ११ च्या सुमारास दोघेही फ्लॅटवर परतले. वंदना कपडे बदलण्यासाठी नहाणीघरात जाऊ लागली, तेव्हा समीरने हसत तिचा रस्ता अडवला, ‘‘तुला वचन आठवत नाही का?’’ त्याने खोडकरपणे विचारले.

‘‘कोणते वचन?’’ पतीच्या डोळयातले भाव वाचून वंदनाचे गाल गुलाबी झाले.

‘‘माझ्यासोबत अंघोळ करण्याचे वचन.’’

‘‘तू रात्री अंघोळ करत नाहीस ना?’’

‘‘आज मला करायची आहे, प्रिये.’’

‘‘मग उशीर कशाला?’’ वंदनाने त्याच्या गालावर अनेक चुंबनं घेतली आणि मग त्याला नाहणीघरात नेले.

लहान मुलांसारखा खोडसाळपणा करत दोघांनी एकत्र अंघोळ केली. हसून हसून त्यांचे पोट दुखायला लागले होते.

त्यानंतर समीरचे आवडते अत्तर लावून वंदना पलंगावर त्याच्या शेजारी जाऊन झोपली, तिचे उत्कटतेने चुंबन घेतल्यानंतर समीर तिच्या कानात भावनिक होऊन बोलला, ‘‘आजपासून तू माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.’’

‘‘आभारी आहे, माझ्या लाडक्या,’’ डोळयात अचानक आलेले अश्रू समीरपासून लपवण्यासाठी तिने एखाद्या वेलीप्रमाणे समीरला मिठी मारली.

दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी ८ वाजता, समीर मोबाईल वाजल्यामुळे गाढ झोपेतून जागा झाला. त्याची बहीण सीमाने फोन केला होता.

‘‘मी झोपेतून उठवले का तुला?’’ सीमाने विचारले.

‘‘तू आहेस कुठे? काल न सांगता…’’

‘‘वंदना काय करतेय?’’ सीमाने त्याला थांबवत विचारले.

‘‘झोपलीय. आता माझ्या प्रश्नाचे…’’

‘‘गेले २४ तास तुम्हा दोघांसाठी कसे होते?’’

‘‘खूप छान… खूपच छान,’’ समीरचा चेहरा लगेचच उजळला.

‘‘वंदना खुश आहे का?’’

‘‘खूप जास्त.’’

‘‘मला तुला काही महत्वाचं सांगायचं आहे समीर.’’

‘‘बोल ताई.’’

‘‘परवा रात्री तू वंदनावर ओरडून तिला रडवले होतेस ना?’’

‘‘ताई, तिला जरा काही बोलले तरी ती रडू लागते.’’

‘‘तुझ्या त्या जराशा बोलण्यामुळेच वंदनाने तुला सोडून कायमचे माहेरी जाण्याचा ठाम निर्णय घेतला होता,’’ सीमाने सांगितले.

‘‘मला हे खरं वाटत नाही,’’ समीरने चिडून उत्तर दिले.

‘‘तुला हे खरं का वाटत नाही?’’ सीमाने रागाने विचारले. ‘‘दिवस-रात्र ओरडा खाणे आणि स्वत:चा अपमान सहन करणे, हे कोणत्या स्वाभिमानी स्त्रीला आवडेल? ती लोकांशी हसतमुखाने बोलली तर तुला ती चरित्रहीन वाटते.’’

‘‘हे सगळं काही खरं नाही,’’ समीरला राग आला होता.

‘‘खरं-खोटं करण्यापेक्षा मी तुला जे समजावून सांगतेय ते नीट समजून घे समीर, नाहीतर नंतर तुला पश्चाताप होईल.’’

‘‘काल संध्याकाळी फोनवर माझ्याशी बोलत असताना वंदना रडायला लागली, म्हणून आम्ही तुम्हा दोघांना इथे बोलावलं. मी तुझ्या सुंदर, विनम्र आणि हुशार पत्नीशी रात्री उशिरापर्यंत बोलले आणि मला समजले की, तुझ्या कठोर वागण्यामुळे ती खूप दु:खी आहे आणि कंटाळून तिला तिच्या माहेरी जायचे आहे.

‘‘मी समजावल्यानंतर तिने तुझ्या चुकीच्या वागणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि तुझे जीवन २४ तासांसाठी सर्व सुखांनी, आनंदाने भरून देण्याचे मान्य केले.

‘‘माझ्या भावा, मागील २४ तास आठव आणि माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे, तुला ती सगळी सुखं आणि आनंद हवा आहे की, वंदनाला सतत हिणवल्यामुळे मिळणारे अहंकाराचे समाधान हवे आहे?’’ बोलता बोलता भावूक झाल्याने सीमाचा कंठ दाटून आला.

काही क्षणांच्या शांततेनंतर समीरने उत्तर दिले, ‘‘ताई, कालचा दिवस…मगाचे २४ तास, आम्हा दोघांसाठी अविस्मरणीय आहेत. मला माझी चूक समजली आहे. या क्षणापासून मी स्वत:ला बदलणार आहे.’’

‘‘मला जे सांगायचे होते, ते तुला समजले, यातच सर्व काही आले.’’

‘‘हो, चांगलेच समजले. फक्त तू आणि भाओजी माझायासाठी आणखी एक काम करा.’’

‘‘बोल, काय करू?’’

‘‘तुम्ही जसे वंदनाला २४ तास दिलेत तसे मला १२ तास द्या. मी माझ्यातील बदल दाखवून वंदनासोबतच्या माझ्या प्रेमाच्या नात्याचीमुळे आणखी मजबूत करेन.‘‘

‘‘ठीक आहे. आम्ही रात्री परत येऊ. नवीन सुरुवातीसाठी आमच्याकडून तुला शुभेच्छा,’’ सीमाने फोन ठेवताच धावत जाऊन वंदनाला मिठी मारण्यासाठी समीर आतूर झाला.

उशीरा का होईना

कथा * पूनम औताडे

रात्रीचा एक वाजला होता. स्नेहा अजूनही घरी परतली नव्हती. सविताच्या फाटकापासून घरापर्यंत फेऱ्या सुरू होत्या. ती फार काळजीत होती. पती विनय आपल्या स्टडीरूममध्ये काम करत होते. सविताची बेचैनी त्यांना कळत होती. ते एका मोठ्या फर्ममध्ये सी.ए. होते. काम तसंच ठेवून ते स्टडीरूममधून बाहेर आले. सविताला दिलासा देत ते म्हणाले, ‘‘तू झोप आता…मी अजून जागा आहे. मी बघतो.’’

‘‘झोपू तरी कशी? झोप यायला हवी ना? पोरीला समजावून समजावून थकले…पण तिला समजतच नाही…’’

तेवढ्यात कार थांबल्याचा आवाज आला. स्नेहा कारमधून उतरली. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाशी काहीतरी बोलली…जोरात हसली अन् घराकडे आली. विनय अन् सविताला जागे बघून म्हणाली, ‘‘ओ मॉम, डॅड, तुम्ही अजून जागेच आहात?’’

‘‘तुझ्यासारखी मुलगी असल्यावर झोप कशी येणार? तुला आमच्या तब्येतीचीही काळजी नाहीए का गं?’’

‘‘म्हणून मी काय लाइफ एन्जॉय करणं सोडून देऊ का? ममा, डॅड, तुम्ही बदलत्या काळाबरोबर बदलत का नाही? ‘सायंकाळी सातच्या आत घरात’ असं नसतं हल्ली.’’

‘‘कळतंय मला, पण काळ रात्री दीडपर्यंत बाहेर राहण्याचाही नाहीए,.’’

‘‘तुमचं भाषण ऐकायच्या मूडमध्ये मी नाहीए. उगीचच तुम्ही काळजी करत बसता. आता गुडनाईट,’’ कुठलं तरी गाणं गुणगुणत ती आपल्या बेडरूममध्ये गेली.

सविता आणि विनयनं एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या नजरेत काळजी अन् उदासपणा होता. ‘‘चल, झोपूयात. मी कागदपत्रं आवरून आलोच,’’ विनयनं म्हटलं.

सविताला झोप येत नव्हती. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एकुलत्या एका लाडक्या पोरीला कसं समजवायचं, हेच तिला कळत नव्हतं. सविता स्वत: गावातील एक प्रसिद्ध वकील होती. तिचे सासरे सुरेश रिटायर्ड सरकारी अधिकारी होते. त्या एका घरात मोजून चार माणसं होती. स्नेहाला सगळ्यांकडून प्रेम अन् कौतुकच वाट्याला आलं होतं. खरं तर आईवडिलांनी चांगलं वळण लावलं होतं, पण ती थोडी मोठी होता होता तिचं वागणं बदलत गेलं. ती आत्मकेंद्री झाली. फक्त आपलाच विचार, लाइफ एन्जॉय करणं, अत्याधुनिक वेशभूषा, वागण्यात निर्लज्जपणा…नित्य नवे बॉयफ्रेण्ड, एकाशी ब्रेकअप केला की दुसरा बघायचा. त्याच्याशी नाही पटलं तर तिसरा. पार्ट्यांना जायचं, डान्स करायचा, सेक्स करणं तिच्या दृष्टीनं आधुनिकपणा होता. सविता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची, पण स्नेहा ऐकून न घेता भांडणं करायची. आईशीही अत्यंत वाईट भाषेत बोलायची. स्नेहा सुरेश आजोबांची फार लाडकी होती. त्यांनीच तिला लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये पाठवून तिचं शिक्षण केलं होतं. ती आता एका लॉ फर्ममध्ये अॅनालिस्ट म्हणून काम करत होती. सविता अन् विनयचे खूपच घनिष्ठ मित्र होते अभय आणि नीता. ती दोघंही सी.ए. होती अन् त्यांचा मुलगा राहुल वकील होता.

ही दोन्ही कुटुंब खूपच मैत्रीत होती. समान विषय, समान आवडी यामुळे त्यांच्यात अपार जिव्हाळा होता. राहुल अत्यंत गुणी आणि संस्कारशील मुलगा होता. त्याचं खरं तर स्नेहावर प्रेम होतं पण तिची ही बदललेली वागणूक त्यालाही आवडत नव्हती. त्यानं त्याचं प्रेम बोलून दाखवलं नव्हतं. तसं त्यानं तिच्या वागण्यावर पण आपलं मत व्यक्त केलं नव्हतं. स्नेहा मात्र तिला काहीही प्रॉब्लेम आला की सरळ राहुलला फोन करायची. तेवढ्यापुरतीच तिला राहुलची आठवण यायची. तो ही सगळी काम सोडून तिच्यासाठी धावून यायचा.

सविता अन् विनयची इच्छा होती की राहुलशीच स्नेहानं लग्न करावं अन् सुखाचा संसार करावा. पण स्नेहाच्या वागण्यानं ते इतके लज्जित होते की राहुल किंवा अभय नीताकडे हा विषय काढायचं धाडस त्यांना होत नव्हतं. राहुलचं स्नेहावर इतकं प्रेम होतं की तो तिच्या सगळ्या चुकांना क्षमा करत होता. पण राहुलच्या दृष्टीनं प्रेम, आदर, सन्मान, काळजी घेणं, जबाबदारी उचलणं, माणुसकी जपणं या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. मात्र स्नेहाला या शब्दांची किंवा त्यांच्या अर्थाचीही ओळख नव्हती.

भराभर दिवस उलटत होते. स्नेहा आपल्या मर्जीनं घरी यायची. केव्हाही निघून जायची. आईवडिलांच्या रागावण्याचा, बोलण्याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. त्यात कहर म्हणजे सुरेश आजोबा तिला अधिकच लाडावत होते, ‘लहान आहे. येईल समज?…’ हल्ली ते आजारी असायचे. त्यांचा जीव स्नेहाभोवतीच घुटमुळत असे. आपण आता फार जगणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी आपली सर्व संपत्ती स्नेहाच्या नावे करून दिली.

एका रात्री ते जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. तिघांनाही फार वाईट वाटलं. खूप रडले. कितीतरी दिवस सर्व नातलग येतजात होते. हळूहळू पुन्हा सर्व नॉर्मल झालं. स्नेहालाही आपली लाइफस्टाइल आठवली. तसंही फार काही गांभीर्यानं घ्यावं असा तिचा स्वभाव नव्हता. आता तर आजोबांची सगळी संपत्ती तिच्या हातात आली होती. इतका पैसा बघून तर ती हवेतच तरंगत होती. तिनं आईवडिलांना न सांगता एक कार खरेदी केली.

सविता म्हणाली, ‘‘एवढ्यात गाडी कशाला गं, घेतलीस? आम्हाला निदान विचारायचंस तरी?’’

‘‘मॉम, मला माझ्या इच्छेप्रमाणे जगू द्या ना. लाइफ एन्जॉय करायचं आहे. गाडीमुळे मी आता स्वतंत्र आहे. रात्री कुणी सोडेल का ही काळजी नको. मी इंडिपेंडट झाले यात आनंद मानायचा सोडून कटकट काय करताय? आजोबांनी इतका पैसा दिलाय, तर मी आपल्या इच्छेनुसार का जगू नको?’’

‘‘अजून तुला गाडीची प्रॅक्टिस नाहीए. काही दिवस माझ्याबरोबर ड्रायव्हिंगला चल,’’ विनयनं म्हटलं.

‘‘आता गाडी घेतली आहे. तर प्रॅक्टिसही होईलच ना? माझं ड्रायव्हिंग लायसेन्सही तयार झालंय. आता तुम्ही दोघं थोडं रिलॅक्स राहायला शिका ना?’’

आता तर स्नेहाच्या वागण्याला काही ताळतंत्रच राहिलं नव्हतं. केव्हाही खायची, केव्हाही जायची. गाडी फारच जोराच चालवायची. सवितानं एकदा म्हटलं, ‘‘गाडी इतकी वेगात चालवू नकोस. मुंबईचं ट्रॅफिक अन् तुझा स्पीड…भीती वाटते गं…’’

‘‘मॉम, आय लव्ह स्पीड, आय एम यंग, वेगाने पुढे निघून जायला मला फार आवडतं.’’

‘‘तू पार्टीत डिंक्कस घेतेस, दारू पिऊन गाडी ड्राइव्ह करणं किती धोक्याचं आहे, कळतंय का तुला? भलतंच काही घडलं तर?’’

‘‘ममा, मी थकलेय तुझा उपदेश ऐकून ऐकून, काही घडेल तेव्हा बघू ना?

आत्तापासून काळजी कशाला?’’ रागानं पाय आदळत स्नेहा गाडीची किल्ली घेऊन निघून गेली.

सविता डोकं धरून बसून होती. या मुलीला कधी समज येणार? सविता अन् विनयला सतत टेन्शन असे.

एका रात्री स्नेहानं पार्टीत भरपूर दारू ढोसली. आपल्या नव्या ब्रॉयफ्रेंडसोबत, विकीसोबत खूप डान्स केला. मग ती विकीला त्याच्या घरी सोडायला निघाली. गाडीपर्यंत येतानाही तिचा तोल जात होता. कशीबशी ती ड्रायव्हिंह सीटवर बसली. विकीनं विचारलंदेखील, ‘‘तू कार चालवू शकशील ना? की मी चालवू.’’

‘‘डोंट वरी, मला सवय आहे.’’ स्नेहानं गाडी सुरू केली. नेहमीप्रमाणे खूप वेगात. तिला भीतिही वाटत नव्हती की कोणाची काळजीही नव्हती.

अचानक तिचा गाडीवरचा ताबा सुटला अन् गाडी उलट दिशेला वळली. समोरून येणाऱ्या गाडीला तिने जोरदार धडक दिली गेली. दोन्ही गाड्यांमधून किंकाळ्या उठल्या…दोन्ही गाड्या थांबल्या…दुसऱ्या कारमध्ये एक पुरुष ड्रायव्हर सीटवर होता. शेजारी बायको, मागच्या सीटवर मुलगा. स्नेहालाही खूप लागलं होतं. विकी खूप घाबरला होता. कसाबसा गाडीतून उतरला. स्नेहाला बाहेर यायला मदत केली. समोरच्या गाडीपाशी ती दोघं पोहोचली. आतलं दृश्य बघून स्नेहानं हंबरडाच फोडला. तिघंही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले…बहुधा मृत झालेले.

‘‘स्नेहा…सगळंच संपलंय…आता पोलीस केस होईल…’’ विकीनं म्हटलं.

स्नेहाची दारूची धुंदी खाडकन् उतरली. ती रडायला लागली. ‘‘विकी, आता काय करायचं रे? प्लीज हेल्प मी…’’

‘‘सॉरी स्नेहा, मी काहीच करू शकत नाही. आता पोलीस केस होईल…प्लीज माझं नाव यात गोवू नकोस. माझे डॅडी मला घरातून हाकलून देतील. आय एम सॉरी, मी जातोय…’’

‘‘काय?’’ स्नेहाला धक्काच बसला, ‘‘अरे…इतक्या रात्री, अशा अडचणीच्या वेळी तू मला सोडून जातो आहेस.’’

विकीनं उत्तर दिलं नाही. तो उलट दिशेने पळत सुटला. दिसेनासा झाला. जखमी अवस्थेत, निर्मनुष्य रस्त्यावर मध्यरात्री स्नेहा एकटीच उभी होती. तिला त्यावेळी एकच नाव आठवलं…तिनं ताबडतोब राहुलला फोन केला. नेहमीप्रमाणे राहुल लगेच मदतीला आला. त्याला बघून स्नेहा जोरजोरात रडायला लागली. ती खूप घाबरली होती. भीतिनं थरथर कापत होती. तिचं रडणं थांबेना.

राहुलनं तिला जवळ घेतलं. मायेनं थोपटत शांत केलं. ‘‘घाबरू नकोस स्नेहा, मी आहे ना? मी करतो काहीतरी. तुला खूप लागलंय. तुला डॉक्टरकडे नेतो. त्या आधी दोन जरूरी फोन करतो,’’ त्यानं त्याचा पोलिस इन्स्पेक्टर मित्र राजीव अन् डॉक्टर मित्र अनिलला फोन केला.

अनिल अन् राजीव आले. डॉक्टर अनिलनं त्या तिघांना बघितलं. तिघंही मरण पावले होते. स्नेहाला तर जबरदस्त मानसिक धक्का बसला होता. आधी तिला हॉस्पिटलला नेलं.

सरिता अणि विनयही तिथं पोहोचले. स्नेहाला तर आईवडिलांकडे बघायचं धाडस होत नव्हतं. कित्येक दिवस पोलीस, कोर्टकचेरी, वकीलांचे प्रश्न, उलटतपासणी यात गेले. शारीरिक जखमा अन् मनावरचा ताण यामुळे स्नेहा पार थकली होती. तिची तब्येत खालावली होती. एका क्षणात आयुष्य एन्जॉय करण्याची, आधुनिक लाइफ स्टाइलची कल्पना पार बदलली होती. ती कायम कुठंतरी नजर लावून हरवल्यासारखी बसून असे. तिच्या मूर्खपणाने तीन जीव हकनाक बळी गेले होते. ती स्वत:ला क्षमा करू शकत नव्हती. स्वत:च्या वागणुकीची तिला खूप लाज वाटत होती. वारंवार ती राहुलची अन् स्वत:च्या आईवडिलांची क्षमा मागत होती. सविता आणि राहुलनंच तिचा खटला चालवला. त्यासाठी दिवसरात्र श्रम केले. खूपच मोठ्या रकमेच्या जामिनावर तिला काही दिवस सोडण्यात आलं. किती तरी दिवसांनी तिनं मोकळा श्वास घेतला. तिची तब्येत अजूनही सुधारत नव्हती. तिची नोकरी सुटली होती. पार्टीतले मित्र मैत्रिणी कुठं नाहीसेच झाले होते. हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या ती आपल्या आयुष्याचा विचार करायची. रात्री बेरात्री दचकून उठायची. कार एक्सिडेंट अन् तीन मृत्यू सतत डोळ्यांपुढे दिसायचे. कोर्टकचेरीच्या जंजाळातून सविता अन् राहुलनं तिला सोडवलं होतं. पण स्वत:च्या मनाच्या न्यायालयात ती स्वत:च दोषी ठरत होती.

आईवडिल, राहुल व त्याचे आईवडिल सतत तिच्यासोबत होते. तिला समजावत होते. धीर देत होते. तिला शारीरिक व मानसिक विश्रांती कशी मिळेल हे बघत  होते. त्यांच्या प्रेमळ सान्निध्यात ती हळूहळू सावरत होती. आता तिला आईवडिलांच्या प्रेमाचा, काळजीचा अर्थ समजला होता. माणुसकी, मैत्री, जबाबदारीचा अर्थ कळला होता. आधुनिकता अन् वागणूक, राहणीमान विचारसरणी सगळ्याच गोष्टी आता तिला पूर्णपणे लक्षात आल्या होत्या.

एक दिवस हॉस्पिटलमध्ये विनय, सविता, अभय आणि नीता तिच्याभोवती होते तेव्हा तिनं आईकडून मोबाइल मागून घेतला अन् राहुलला फोन करून तिथं बोलावून घेतलं.

नेहमीप्रमाणेच काही वेळात राहुल तिथं येऊन पोहोचला. स्नेहाच्या बेडवर बसत त्यानं विचारलं, ‘‘का मला बोलावलंस?’’

बेडवर उठून बसत स्नेहानं त्याचा हात हातात घेतला. ‘‘यावेळी कामासाठी किंवा मदतीसाठी नाही बोलावलं मी.’’ स्नेहानं म्हटलं, ‘‘सगळ्यांच्या समोर कबूल करायचं आहे, आय एम सॉरी, फॉर एव्हरी थिंग. तुम्हा सगळ्यांची मी क्षमा मागते. तुम्ही सगळीच माणसं खूप खूप चांगली आहात…राहुल, तू खूप चांगला आहेस, पण मी फार वाईट आहे रे…’’ बोलता बोलता स्नेहा रडायला लागली अन् तिनं राहुलला मिठी मारली. प्रथम तर राहुल थोडा गडबडला. पण मग त्यानंही तिला मिठीत घेत थोपटून शांत करायला सुरूवात केली. उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान, संतोष होता. डोळे मात्र पाणावले होते. मनातली इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळाले होते.

दिसतं तसं नसतं

कथा * मीना साळवे

‘‘लग्नाच्या वाढदिवसा प्रित्यर्थ मन:पूर्वक अभिनंदन, तूलिका ताई,’’ माझ्या वहिनीनं फोन करून मला शुभेच्छा दिल्या.

‘‘लग्नाचा वाढदिवस आहे ना? खूप खूप?शुभेच्छा आणि आशिर्वाद,’’ आईनं म्हटलं.

बाबाही बोलले, ‘‘अगं, जावई कुठं आहेत? त्यांनाही माझे आशिर्वाद व शुभेच्छा.’’

‘‘सांगते बाबा, ते ऑफिसला गेले आहेत.’’

‘‘काही हरकत नाही. मी नंतर बोलेन त्यांच्याशी.’’

त्यांचा फोन ठेवतेय तोवर धाकटी बहीण कांचनाचा अन् तिच्या नवऱ्याचाही फोन येऊन गेला.

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण माझ्या नवऱ्यानं मात्र काहीच उत्साह दाखवला नव्हता. ऑफिसला निघण्यापूर्वी तो माझ्याशी धड बोललाही नव्हता. मला मान्य आहे की सध्या त्याला ऑफिसात फार काम पडतंय, कामाचा ताण खूप आहे पण म्हणून काय झालं? लग्नाचा वाढदिवस रोज रोज थोडाच येतो?

जाता जाता रवीनं एवढं म्हटलं होतं, ‘‘तूलिका, आज मी लवकर घरी येतो. आपण आज बाहेर जेवायला जाऊयात.’’

सकाळची दुपार झाली. दुपारची सायंकाळ अन् आता रात्र झालीय. अजून रवी घरी परतले नाहीत. कदाचित माझ्यासाठी गिफ्ट घेऊन येत असतील अशी मी माझीच समजूत काढत होते.

‘‘आई, भूक लागलीय,’’ माझ्या पाच वर्षांच्या मुलीनं मला भंडावून सोडलं.

तिच्यासाठी तिच्या आवडीचं खायला करून दिलं, तेवढ्यात दाराची घंटी वाजली.

रवी आले होते. ‘‘तूलिका, क्षमा कर गडे, अगं, बॉसनं अचानक मीटिंग बोलावली. माझा नाइलाज झाला. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’’ माझ्या हातात फुलांचा गुच्छ देत त्यांनी म्हटलं. ‘‘फुलांसारख्या टवटवीत माझ्या पत्नीसाठी ही प्रेमाची भेट. सात वर्षं झालीत ना आपल्या लग्नाला? खरं तर खूप इच्छा होती आज छान सेलिब्रेट करण्याची.’’

मी त्यांच्या बोलण्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. फुलांचा गुच्छही एका बाजूला ठेवला. रवी म्हणाले, ‘‘अगं, आज हॉटेलातही खूप गर्दी होती. तरीही मी तुझ्या आवडीचे जेवणाचे सर्व पदार्थ पॅक करून आणले आहेत. जेवण एकदम गरम आहे. पटकन् वाढतेस का? जेवूया आपण. फार भूक लागलीय अन् दमलेही आहे मी.’’

‘‘एवढी भूक लागली आहे तर बाहेरच जेवायचं ना? घरी घेऊन कशाला आलात? अन् एवढा पैसा त्या बुकेवर खर्च करण्याची तरी काय गरज होती? तुम्ही जेवून घ्या. मला भूक नाहीए,’’ मी रागातच बोलले.

‘‘अगं, क्षमा मागतोय ना? बॉसनं मीटिंग ठरवल्यावर मला काहीच म्हणता आलं नाही. मलाही खूप वाईट वाटतंय, पण काय करू शकतो? माफ कर दो यार, दिल साफ करो, चल, जेवूयात. मी आलोच फ्रेश होऊन.’’

‘‘मला जेवायचं नाहीए. मी झोपायला जातेय.’’

‘‘उपाशी झोपू नकोस, तूलिका…’’ रवीनं पुन्हा विनवलं. पण मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून बेडवर येऊन झोपले.

रवीनं सगळी अन्नाची पार्सलं फ्रीजमध्ये ठेवली अन् तेही न जेवताच झोपले.

कुठल्या माणसासोबत मी लग्न करून बसले…लग्नाला इतकी वर्षं झालीत पण कधी कौतुक नाही, कसली हौसमौज नाही. आज निदान हॉटेलात जेवायला तर जाता आलंच असतं.

एक हा माझा नवरा आहे अन् दुसरा माझ्या धाकट्या बहिणीचा नवरा…किती प्रेम करतो तिच्यावर, किती किती, काय काय आणत असतो तिच्यासाठी. माझा राग कमी होत नव्हता. उपाशी पोटी झोपही येत नव्हती. पण मी ग्लासभर पाणी पिऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागले. रवीला झोप लागली असावी. त्याला कधीच का समजत नाही. मला काय हवंय? मला काय आवडतं? धुमसत असतानाच कधी तरी मला झोप लागली.

‘‘गुडमॉर्निंग राणी सरकार,’’ सकाळी मला मिठीत घेत रवीनं म्हटलं. तो नेहमीच मला सकाळी गुडमॉर्निंग करायचा,पण आज मला त्याची मिठी अजिबात नकोशी झाली होती.

त्याला दूर ढकलत मी डाफरले, ‘‘हे प्रेमाचं नाटक बंद करा. जितके साधे सरळ दिसता, तसे तुम्ही नाही आहात…मला तुमचं खरं रूप कळतंय.’’

‘‘आता मी जसा आहे, तुझा आहे. काल खरंच तुझी खूप निराशा झाली. पण खरंच सांगतो गं, माझ्या बॉसचा मलाही राग आला होता…पण नोकरी तर करावीच लागेल ना? पगार मिळाला नाही तर संसार कसा करणार?’’

‘‘नोकरी, नोकरी, नोकरी!! अशी काय मोठी लाखभर रूपये देणारी नोकरी आहे तुमची? काय असं घेतलंय तुम्ही माझ्यासाठी नोकरीतून? रोज दोन्ही वेळ जेवायला मिळतंय. अंगभर कपडे आहेत अन् हे घर आहे. या व्यतिरिक्त काय दिलंय?’’

‘‘तूलिका, अगं याच तर मूलभूत गरजा आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा काही लोकांना हेसुद्धा मिळत नाही. आता सोड ना राग…तू रागावलीस ना की अगदीच छान दिसत नाहीत. तू आनंदात राहा, चल, आज आपण बाहेर जाऊ, मनसोक्त भटकू, जेवण करू, तुझी इच्छा असली तर सिनेमाही बघू. आजच्या सुट्टीचा उपयोग पुरेपूर करू. लग्नाचा बिलेटेड वाढदिवस साजरा करतोय. चल ना, अजून किती वेळा सॉरी म्हणू? प्लीज एकदा हस ना?’’

‘‘मला कुठंही जायचं नाहीए. अन् पुन्हा माझ्याशी बोलायचा प्रयत्नही करू नका. तुमच्याशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतोय मला. काय माझ्या बाबांनी बघितलं तुमच्यात अन् माझं लग्न करून दिलं तुमच्याशी. किती, किती दिलं होतं बाबांनी मला, सगळं तुमच्या आईवडिलांनी ठेवून घेतलं. केवढी स्वप्नं होती माझी. लग्नानंतर काय काय करेन म्हणून. पण तुम्हाला कसली हौसच नाही. आता मी काहीही मागणार नाही तुमच्याकडे, काय हवं ते माझ्या बाबांकडून मागून घेईन. तुमच्यासारख्यांनी खरं तर लग्नच करू नये…उगीच एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं…’’ मी अगदी ताबा सोडूनच बोलत होते.

‘‘मी तुझ्या बाबांना आधीच सांगितलं होतं, मला काहीही नको म्हणून. माझीही काही तत्त्वं आहेत, जीवनमुल्य आहेत. माझ्या प्रामाणिकपणाच्या कमाईवरच मला संसार करायचा आहे. तुलाही सुखी ठेवायचं आहे. मी माझ्या वडिलांकडून पैसे घेतले नाहीत, तुझ्याही बाबांकडून घेतले नाहीत. तुझ्या बाबांनी दिले अन् माझ्या बाबांनी घेतले, त्याला मी काय करू? सध्या घराच्या लोनचे हप्ते फेडतोय. एका वर्षांत तेही फिटतील. मग तुझ्या हातात भरपूर पैसा असेल…आपण तेव्हा खूप काही करणार आहोत. तूलिका, मला खात्री आहे स्वत:बद्दल, तूही माझ्यावर विश्वास ठेव. माझं प्रेम आहे तुझ्यावर, तुला सुखात ठेवायचं वचन दिलंय मी स्वत:लाच.’’

रवी परोपरीनं मला समजवत होते, पण माझं डोकंच फिरलं होतं. माझा राग संपतच नव्हता. सगळा सुट्टीचा दिवस तसाच गेला. सायंकाळी लेक मागे लागली बाहेर जाऊयात. रवी तिला घेऊन बाहेर गेले. मलाही आग्रह केला पण मी हटूनच बसले. नाहीच गेले.

त्याच वेळी वहिनीचा फोन आला, ‘‘तूलिका कशी आहेस? तुम्हा दोघांना डिस्टर्ब नाही ना केलं?’’

‘‘नाही वहिनी. बोल, काय म्हणतेस?’’

‘‘अगं, आजच कांचना आलीय नवऱ्यासोबत, तर आईबाबांची इच्छा होती की तुम्हीही चार दिवस यावं, सगळे एकत्र जमूयात.’’

‘‘वहिनी, रवींना विचारून तुला सांगते. मला आवडेल सगळ्यांना भेटायला.’’ मी फोन ठेवला. मनात आलं कांचना किती भाग्यवान आहे? आत्ताच नवऱ्यासोबत सिंगापूरला फिरून आलीय. लगेच माहेरीही आली.

मी ठरवलं, काही दिवस माहेरी जातेच. थोडी लांब राहीन घरापासून तर माझं बिथरलेलं डोकंही शांत होईल. मला रवीला धडाही शिकवायचाच होता. तो तर मला पूर्णपणे गृहीतच धरतो.

‘‘आई…’’ लेकीनं येऊन मला मिठी मारली. कुठंकुठं फिरली, काय काय बघितलं, काय काय खाल्लं, सगळं सगळं सांगत होती. खूप आनंदात होती. ‘‘आई, बाबांनी तुझ्यासाठीही आईस्क्रीम आणलंय,’’ निमा म्हणाली.

‘‘मला नाही खायचं. बाबांना म्हणा. तुम्हीच खा. अन् बाबांना म्हणा, आम्हाला आजोबांकडे जायचंय, आमचं तिकिट काढून द्या.’’

‘‘बाबा, आम्ही आजोबांकडे जाणार आहोत. आमचं तिकिट घेऊन या.’’

‘‘निमू, तुझी आई माझ्यावर रागावली आहे म्हणून ती मला सोडून जाते आहे…ठिक आहे, मी तिकिट काढून आणतो,’’ निमाला जवळ घेत, माझ्याकडे बघून रवीनं म्हटलं.

रवी जेव्हा मला व निमाला गाडीत बसवून देण्यासाठी आले, तेव्हा ते फार उदास होते. गाडी हलली, रवी हात हलवून आम्हाला निरोप देत होते.. निमा बाबा, बाबा ओरडत होती. रवी सतत माझ्याकडे बघत होता. मला त्या क्षणी वाटलं, मी माहेरी जाते आहे ही चूक आहे का? क्षणभर वाटलं, गाडीतून उतरावं, पण एव्हाना गाडीनं स्पीड घेतला होता. प्लॅटफॉर्मही संपला होता, मला आता वाटत होतं, मी रवीशी फार वाईट वागले…सकाळी आम्ही माझ्या माहेरी पोहोचलो.

सगळे भेटले…छान वाटलं मला. आईबाबांना तर खूपच आनंद झाला. रवीबद्दल सर्वांनी विचारलं, मी म्हटलं, ‘‘सध्या त्यांना रजा मिळाली नाही, पुढे येतील.’’

इथं येऊन चार पाच दिवस झाले होते. रवी रोज सकाळ संध्याकाळ फोन करत होते. कांचना अन् परेशचं प्रेम जणूं उतू जात होतं. ते बघून माझा जळफळाट होत होता. आत्ताच बाबांनी त्यांना सिंगापूर ट्रिप गिफ्ट केली होती. रवीलाही विचारलं होतं. त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. माझी तेव्हा चिडचिड झाली होतीच. आईबाबांच्या खोलीवरून जाताना माझ्या कानावर शब्द पडले, ‘‘थोरले जावई खूपच समजूतदार व स्वाभिमानी आहेत. कांचनाला लग्नातच तूलिकापेक्षा किती तरी जास्त दिलं होतं. आत्ताच सिंगापूर ट्रिप झाली. जावई आता युरोप टूर मागताहेत,’’ बहुतेक बाबा आई किंवा दादाजवळ बोलत असावेत.

त्या दिवशी आईबाबा आणि दादा वहिनींना रात्री कुठंतरी लग्नाला जायचं होतं. मी आणि निमा हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो होतो. ‘‘मोठ्या ताई, स्वयंपाक करून ठेवलाय. तुमच्या सोयीनं तुम्ही जेवणं आटोपून घ्या.’’ असं सांगून स्वयंपाकीण निघून गेली.

आठ वाजता निमाला भूक लागली. अन्न गरम करायचं का की गरम आहे हे बघायला मी स्वयंपाकघरात जात होते. तेवढ्यात कांचनाच्या खोलीतून हसण्याबोलण्याचा अन् इतरही काही विचित्र आवाज कानावर आला. मी चिडचिडून स्वत:शीच बोलले, ‘‘या कांचनाचा अन् परेशचा पोरकटपणा, थिल्लरपणा संपत नाहीए. निदान अशावेळी खोलीचं दार तरी बंद करून घ्यावं.’’

मी स्वयंपाकघरातून निमाचं ताट तयार करून आणतेय तोवर मला कांचना फाटकातून येताना दिसली.

‘‘काचंना बाहेरून येतेय, मग तिच्या खोलीत कोण होतं?’’ मी चक्रावले. मला विचित्र शंका आली. मी पटकन् पुढे होऊन तिला विचारलं, ‘‘बाहेर गेली होतीस?’’

‘‘हो ना ताई, शेजारच्या स्वाती वहिनी कधीपासून बोलवत होत्या. त्यांना भेटायला गेले तर त्यांनी मला इतका वेळ थांबवून घेतलं,’’ ती म्हणाली.

‘‘कांचना, हे निमाचं ताट घेऊन माझ्या खोलीत जा. मी तिला घेऊन येतेच.’’ मी तिला व निमाला खोलीत ढकललीच. मागे वळून बघते तर शेजारी स्वाती वहिनीकडे कपडे धुणारी कम्मो ब्लाउजची बटणं लावत हसत हसत कांचनाच्या खोलीतून बाहेर पडताना दिसली. साडी, केस अस्ताव्यस्त होते. माझ्याकडे लक्ष जाताच ती चपापली अन् घाबरून पटकन् मागच्या दारानं निघून गेली.

माझे हातपाय गार पडले. परेश एका मोलकरणीशी असे संबंध ठेवतो? किती हलकट आहे हा माणूस? अन् माझ्या वडिलांच्या पैशावर पण त्याचा डोळा आहे? माझ्या बहिणीशी प्रेमाचं नाटक करतोय? मी कशीबशी खोलीत पोहोचले.

खोलीत निमा मावशीकडून गोष्ट ऐकत जेवत होती. ‘‘ताई, हिचं जेवण आटोपलंय.’’ कांचना म्हणाली.

‘‘तू जा आता. मी तिला झोपवते,’’ मी कांचनाला निरोप देत म्हणाले.

देवा रे! अजून माझं डोकं भणभणंत होतं. मी परेशला पैसेवाला, कौतुक करणारा नवरा समजत होते. बिचारी कांचना तिचाही विश्वासघात करतोय हा नालायक परेश…

रवी तर माझ्या सुखात आपलं सुख बघतो. मी किती वाईट वाईट बोलले त्याला…त्यानं कधी माझ्या बाबांकडून एका पै ची अपेक्षा ठेवली नाही. कधी तो दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघत नाही. माझ्यासाठी निमासाठीच इतके कष्ट करतोय. माझे डोळे भरून आले. रवीची खूपच आठवण यायला लागली.

सकाळी नेहमीप्रमाणे रवीचा फोन यायला हवा होता पण आला नाही. मीच फोन लावला तर उचलला गेला नाही. मी पुन्हापुन्हा फोन लावत होते. उचलला जात नव्हता. मी बेचैन झाले, काळजी दाटून आली. शेवटी ऑफिसात फोन केला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, ‘‘आज रवी सर ऑफिसला आलेच नाहीत. कालही सायंकाळी लवकर घरी गेले. त्यांना बरं नाहीए असं वाटत होतं.’’

माझी काळजी खूपच वाढली. मी आईबाबांना म्हणाले, ‘‘रवींना बरं नाहीए. त्यांच्या ऑफिसमधून कळलं. मला लवकर घरी गेलं पाहिजे.’’

‘‘काळजी करू नकोस. तुला विमानाचं तिकिट काढून देऊ का?’’ बाबांनी विचारलं.

‘‘नको, मी रेल्वेनंच जाईन,’’ मीही म्हणाले. कारण रवीला मी वडिलांचा पैसा वापरलेला आवडत नसे.

प्रवासभर माझं मन थाऱ्यावर नव्हतं, रवी कसा असेल. त्याला काय झालं असेल, सतत काळजी जीव पोखरत होती. सकाळी सात वाजता आम्ही घरी पोहोचलो. बेल वाजवली. दार उघडलं नाही. मी माझ्याजवळच्या किल्लीनं लॅच उघडलं. आम्ही दोघी आत गेलो तर सोफ्यावर रवी झोपलेले. अंगाला हात लावला तर लक्षात आलं ते तापानं फणफणले आहेत. मी ताबडतोब डॉक्टरांना फोन केला. त्यांनी येऊन तपासलं. इंजेक्शन दिलं.

आम्हाला घरात बघून ते चकित झाले, ‘‘अरे? तुम्ही दोघी परत कधी आलात? तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तब्येत बरी नसल्याचं कळवलं नाही तुम्हाला,’’ रवीचे डोळे भरून आले. माझे हात हातात घेऊन ते म्हणाले, ‘‘सॉरी तूलिका, तुला उगीचच माहेरहून लवकर परत यावं लागलं.’’

‘‘सॉरी मी म्हणायला हवंय. किती वाईट वागले मी तुमच्याशी.’’ माझे डोळे जणू अश्रू गाळत होते. रवी सतत माझा विचार करायचे. मीच करंटी..त्यांचा विचार कधी केलाच नाही मी.

निमाला काय घडतंय ते धड समजत नव्हतं. मी रवीला मिठीच मारली. ‘‘सॉरी रवी.’’ मी म्हटलं, त्यांनीही मला घट्ट मिठीत घेतलं. ‘‘तूलिका, मनातलं सगळं किल्मिष काढून टाक, आपण दोघं एकमेकांचे आहोत आणि एकमेकांसाठीच आहोत. आपण कधीच एकमेकांना अंतर देणार नाही,’’ रवीनं म्हटलं.

निमानंही आम्हाला मिठी मारली. खरंच आम्ही एकमेकांचे अन् एकमेकांसाठीच होतो.

केवढे क्रौर्य हे – भाग-2

(शेवटचा भाग)

कथा * पूनम अहमद

पूर्व कथा :

मुंबईतल्या मुस्लिम बहुल वस्तीतल्या शौकतअली अन् आयेशा बेगमला तीन मुली अन् एक मुलगा अशी चार अपत्यं होती. सना, रूबी, हिबा या तीन मुलींवर झालेला मुलगा हसन आईच्या अतोनात लाडामुळे बिघडलाच होता. आईला वाटे दर्ग्याजवळ बसणाऱ्या जमाल बाबामुळे हसनला धर्माच्या चार गोष्टी शिकता येतील. तंत्रमंत्र चमत्कार करून जमालबाबा लोकांची फसवणूक करत होता. पण भोळ्या लोकांना काहीच संशय येत नव्हता. हळूहळू हसन बदलत होता. स्वत:च्या सख्ख्या बहिणींकडे तो वाईट नजरेनं बघत होता. लग्न होऊन बहिणी सासरी गेल्या. शिक्षण पूर्ण होऊन हसनला नोकरी लागली. चांगली बायकोही मिळाली. आता त्याला नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी तो बहिणींकडे कर्ज म्हणून पैसे मागत होता. त्यांचे दागिने तरी त्यांनी द्यावे म्हणून त्यांच्यावर दबाव आणत होता.            – आता पुढे वाचा..

त्या रात्री सगळेच काळजीनं ग्रासले होते. झोपायला गेल्यावरही कुणाला झोप येईना. हिबानं बहिणीला विचारलं, ‘‘बाजी, कसला विचार करते आहेस? हसननं तर भलतंच संकटात टाकलंय आपल्याला. माझे दागिने मी त्याला कशी देऊ? सासूबाई, सासरे, नवरा सगळ्यांना विचारावं लागेल…त्यांना काय वाटेल? अन् न दिले तर हा काय करेल ते सांगता येत नाही…’’

‘‘तेच तर गं? काय करावं काही समजत नाहीए. आईचा चेहरा तर बघवत नाहीए. तिच्यासाठी तरी असं वाटतं की हसनला थोडी मदत करावी. अब्बूंनी जरी नाही म्हटलं तरी मी रशीदशी या बाबतीत बोलेन म्हणतेय.’’

दुसऱ्या दिवशी रशीद अन् जहांगीर आले तेव्हादेखील हसनचा मूड चांगला नव्हताच. त्या दोघांनी त्याला हसवायचा, बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण तो गुश्श्यातच होता. बहिणींनी त्यांना खूण करून गप्प बसायला संगितलं, मग त्यांनीही विषय फार ताणला नाही.

दोघी बहिणी आपापल्या कुटुंबासोबत त्यांच्या घरी निघून गेल्या. शौकतनं हसनला बोलावून घेतलं अन् प्रेमानं म्हणाले, ‘‘बाळा, ही चूक करू नकोस, चांगली नोकरी मिळाली आहे. नियमित पैसा मिळतोय…बिझनेसचा ना तुला अनुभव आहे ना पैसा आहे…हे खूळ डोक्यातून काढून टाक.’’

हसन भांडण्याच्या पवित्र्यात बोलला, ‘‘माझा निर्णय झाला आहे. तुम्हा सर्वांनी मला मदत केलीच पाहिजे…नाहीतर…रागानं आई वडिलांकडे बघत तो निघून गेला.’’

मुलाचा हा अवतार बघून आयेशाला तर घेरीच आली.

marathi -katha

हसन आता ३५ वर्षांचा झाला होता. पूर्णपणे जमाल बाबाच्या आहारी गेला होता. त्याच्या शब्दासाठी तो वाट्टेल ते करायला तयार झाला असता. बाबाला खात्री होती, त्याच्या सर्व शिष्यांमध्ये सर्वात मूर्ख अन् हट्टी हसनच होता.

शौकतनं बजावून सांगितलं होतं तरीही आयेशानं हसनसाठी मुलींपुढे पदर पसरला.

सना रशीदशी बोलली. तो ही थोडा विचारात पडला. पण मग म्हणाला, ‘‘८-१० लाखांपर्यंत व्यवस्था करू शकेन. तसं खरं अवघडच आहे, पण शेवटी तुझा एकुलता एक भाऊ आहे. प्रेम करतो तुमच्यावर, घरी सगळ्यांना जेवायला बोलावतो. आम्हाला मान देतो. स्वत: स्वयंपाकघरात राबतो…अशा भावाला मदत करायलाच हवी. बोल त्याच्याशी…एवढीच रक्कम मला देता येईल अन् हे कर्ज असेल…’’

नवऱ्याच्या समजूतदारपणामुळे सना भारावली. अश्रू भरल्या डोळ्यांनी तिनं त्याला धन्यवाद दिले.

सनानं हिबाला फोन करून रशीदचा निर्णय सांगितला. त्यावर हिबा म्हणाली, ‘‘मी पण जहांगीरशी बोलले…कॅश तर आम्ही देऊ शकणार नाही, पण माझे दागिने देता येतील. जहांगीरही म्हणाले की इतकं प्रेम करणारा, वारंवार भेटायला, जेवायला बोलावणारा भाऊ आहे. त्याला त्याच्या अडचणीच्यावेळी मदत करायलाच हवी.’’

सना अन् हिबा एकत्रच माहेरी पोहोचल्या. शौकत अली कामावर गेले होते पण हसन घरीच होता. झोया, लहानग्या शान अन् आयेशा या दोघींना बघून आनंदले.

सनानं रशीद काय म्हणाला ते सांगितल्यावरच हसन आनंदला. ‘‘रशीद जिजाजी खूपच सज्जन अन् दयाळू आहेत. मी त्यांचे पैसे लवकरच परत करेन.’’ तो म्हणाला.

हिबानंही दागिन्यांचा डबा त्याच्या हातात दिला. त्यानं डबा उघडून दागिने बघितले. ‘‘खूप मदत झाली. हिबा बाजी, तुझेही दागिने मी ठेवून घेणार नाही. लवकर परत देईन.’’ मग आयेशाकडे वळून म्हणाला, ‘‘अम्मी, मी आता बिझनेसच्या तयारीला लागणार. मी विचार करतोय. झोयाला तीन चार महिन्यांसाठी माहेरी पाठवून द्यावं.’’

झोयाला पुन्हा दिवस गेले होते. यापूर्वी तिला माहेरी पाठवण्याबद्दल हसन तिच्याशी काहीच बोलला नव्हता. ती चकित झाली. ‘‘तुम्ही इतका अचानक असा सगळा कार्यक्रम ठरवलात…मला निदान विचारायचं तरी?’’

‘‘त्यात तुला काय विचारायचं? आईकडे जा. थोडी विश्रांती मिळेल तुला. मीही आता फार कामात असेन. बाळंतपणानंतर मी तुला घ्यायला येईन ना?’’

झोयानं सासूकडे बघितलं, ‘‘खरंच जा झोया. इथं तुला विश्रांती मिळत नाही. काही महिने आराम मिळायला हवाच आहे तुला….’’ आयेशानं म्हटलं.

झोयानं होकारार्थी मान डोलावली. पण मनातून तिला वाटलंच की असा कसा शौहर आहे, मला आईकडे जायचं, किती दिवस राहायचं हे सगळं मला न विचारता, परस्पर कसं ठरवतो हा?

दोन दिवसांनी हसननं झोयाला माहेरी नेऊन सोडलं. आता तो घरात फारसा नसायचा. कधीतरी यायचा, कधीही जायचा. बाबाकडे जाऊन बसायचा. इकडे तिकडे भटकायचा. बहिणींनी दागिने व पैशांची मदत केलीय हे त्यानं बाबाला सांगितलं.

बाबा म्हणाला, ‘‘मला तुझ्यासाठी खूप काही करायचं आहे. तू इथून थोड्या अंतरावर एक खोली भाड्यानं घे. तिथं मी माझ्या मंत्रतंत्राच्या शक्तिनं तुझं भविष्य चांगलं घडवण्यासाठी बरंच काही करू शकतो. इथं सतत लोक येत असतात. त्यांच्या समक्ष मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. अल्लातालानं मला दिलेल्या विशेष शक्तीचा वापर मी तुझ्यासारख्या खुदाच्या नेक धंद्यासाठी करू शकतो.’’

‘‘ते ठिक आहे. पण मी बहिणींचा सर्व पैसा त्यांना परत कसा करणार? तुम्ही सांगितल्यामुळे मी नोकरीही सोडलीय. आता मी काम काय करू?’’

‘‘सध्या तरी बहिणींच्या पैशानं स्वत:चे खर्च चालू ठेव. मी माझ्या शक्ती वापरून लवकरच तुला खूप श्रीमंत करून टाकतो.’’

हसननं बाबाच्या दर्ग्यापासून काही अंतरावर एक वनरूम किचन फ्लट भाड्यानं घेतला. बाबा एकदम खुश झाला. बाबा खुश झाला म्हणून हसनही आनंदला की त्यानं बाबांच्या मर्जीचं काम केलंय. आता बाबा सांगेल तसं काही सामानही तो त्या घरात नेऊन ठेवत होता.

शौकत अलींनी बराच विचार केला. त्यांनाही वाटलं की मुलगा धंद्यासाठी पैसा उभा करण्यासाठी बराच धडपड करतोय. त्यांनी हसनला जवळ बोलावून विचारलं, ‘‘हसन, तू काय काम करायचं ठरवलं आहेस?’’

‘‘अजून काहीच ठरवलं नाहीए अब्बू. जमाल बाबा म्हणतात की मी धंद्यात खूप यश व पैसा मिळवेन. तेवढ्यासाठी मी नोकरीही सोडलीय.’’

अजून शौकत अलींना याची कल्पनाचा नव्हती. त्यांना धक्का बसला, रागही आला. पण राग आवरून त्यांनी हसनला त्यांची काही जमीन होती, त्यातील अर्धा भाग विकून पैसा उभा करता येईल असं सांगितलं.

हसनला वडिलांकडून इतक्या मोठ्या मदतीची अपेक्षा नव्हती. अन् वडिलांकडे अशी प्रापर्टी आहे हे ही त्याच्या लक्षात नव्हतं.

जमिनीची किंमत खूपच आली. बाबाकडे जाऊन हसननं त्याला ही बातमी दिली. बाबा मनातून आनंदला पण वरकरणी उदास अन् गप्प बसून राहिला. हसननं कारण विचारल्यावर म्हणाला, ‘‘माझ्या गावातली एक निराधार विधवा माझ्याकडे मदत मागायला आलीय. तिला घरच्यांनी हाकलून दिलंय. मी हा असा फकीर. तिला मी काय मदत करणार? आता तिला माझ्या झोपडीत आश्रय दिलाय. पण मी तिला रात्री तिथे ठेवू शकणार नाही.’’

बाबानं कमालीच्या दु:खी आवाजात म्हटलं, ‘‘तुझ्या पाहण्यात तिला राहता येईल अशी एखादी जागा आहे का?’’

‘‘बाबा, तुम्ही तंत्रमंत्र करण्यासाठी जी जागा घ्यायला लावलीत, तिच माझ्याकडे आहे…पण तिथं एकांत हवा आहे तेव्हा…’’

‘‘हरकत नाही, काही दिवसांची सोय झाली. मी लवकरच तिची काहीतरी व्यवस्था करतो. पण सध्या तुझ्या खोलीची किल्ली मला दे अन् हो, त्या विधवेबरोबर तिची तरूण मुलगीही आहे…’’

हसननं खोली घेतल्याचं घरातल्या कुणालाही माहिती नव्हती. हसननं खोलीची किल्ली बाबाला दिली. बाबाला त्याच्या मूर्ख शिरोमणी शिष्याकडून हीच अपेक्षा होती. ती विधवा म्हणजे बाबाची रखेलच होती. तिच्या चारित्र्यहीनतेमुळेच सासरच्यांनी तिला घराबाहेर काढली होती. तिची तरूण मुलगीही आईप्रमाणेच चवचाल होती. तिचं नाव अफशा. आईचं नावं सायरा. बाबानं दोघी मायलेकींची हसनशी ओळख करून दिली. तरूण अन् सुंदर अफशाला बघताच हसन तिच्यावर भाळला. दोघी मायलेकींच्या ते बरोबर लक्षात आलं.

बाबा संधी मिळेल तेव्हा सायराच्या संगतीतवेळ घालवत होता. अफशानं हसनला बरोबर जाळ्यात ओढलं होतं. एका पोराचा बाप, दुसरं मुल होऊ घातलेलं, झोयासारखी सर्वगुण संपन्न पत्नी असूनही हसन अफशाच्या नादी लागला होता. तिला भरपूर पैसे देत होता. तिच्यावर हवा तसा पैसा उधळत होता. घरी कुणालाही याबद्दल काहीही माहीत नव्हतं.

एक दिवस सना दुपारची माहेरी आली होती. त्यावेळी काही सामान घेण्यासाठी तिची अम्मी बाजारात गेली होती. अब्बू कामावरून सायंकाळीच परतायचे. सनानं रूबीला जवळ घेऊन तिचे लाड केले. हसन त्याचवेळी बाहेरून आला. निकहत जी रूबीला सांभाळायची, ती चहा करायला आत गेली. हसनला बघताच रूबीनं सनाचा हात घट्ट धरला अन् ती घशातून विचित्र आवाज काढायला लागलीय. तिला बोलता येत नसे. तिनं सनाला घट्ट मिठी मारली अन् ती रडू लागली.

हसननं बहिणीला दुआसलाम करून रूबीकडे रागानं बघितलं अन् वरच्या आपल्या खोलीत निघून गेला.

रूबीच्या डोक्यावरून हात फिरवत सनानं विचारलं, ‘‘काय झालं रूबी?’’

हसनच्या खोलीकडे बघंत रूबीनं काही खुणा केल्या. सनानं घाबरून विचारलं, ‘‘हसन काही म्हणाला?’’

रूबीनं होकारार्थी मान हलवून आपल्या शरीरावर काही ठिकाणी खुणा करून जे सांगितलं ते सनाला बरोबर कळलं. संतापानं ती थरथरायला लागली.

आपल्या अपंग मतीमंद बहिणीवर हसननं बलात्कार केला होता.. तिनं ताबडतोब हिबाला फोन करून सगळं सांगितलं अन् लगेचच निघून यायला सांगितलं.

आयेशा अन् हिबानं एकाचवेळी घरात प्रवेश केला. हिबाचा रागानं लाल झालेला चेहरा अन् एकूणच देहबोली बघून दारातच आयेशानं विचारलं, ‘‘काय झालं? इतकी संतापलेली का आहेस?’’

तिनं बाजार करून आणलेल्या पिशव्या हिबानं उचलून आत नेऊन ठेवल्या अन् म्हटलं, ‘‘तुमच्या खोलीत चल, बाजी पण आलीय.’’

आयेशा खोलीत पोहोचली. सनाचा चेहरा बघूनच तिच्या लक्षात आलं प्रकरण गंभीर आहे. ‘‘काय झालं सना? तुम्ही दोघी इतक्या रागात का?’’

सनाचा आवाज संतापानं चिरकत होता. ‘‘लाज वाटतेय हसनला आमचा भाऊ म्हणताना…अम्मी तुला कल्पना आहे त्यांनं काय केलंय याची?’’

घाबरून आयेशानं विचारलं, ‘‘काय…काय केलंय त्यानं?’’

‘‘त्यानं आपल्या असहाय, विकलांग बहिणीवर बलात्कार केलाय. बोलता बोलता सनाला रडू फुटलं.’’

आयेशाला हे ऐकून इतका धक्का बसला की एखाद्या दगडी मूर्तीसारखी ताठर झाली. तेवढ्यात बाहेर सनाला काहीतरी चाहूल लागली. तिनं बघितलं तर हसन जाताना दिसला. त्यानं सगळं बोलणं ऐकलं होतं.

स्वत:चं कपाळ बडवून घेत आयेशा म्हणाली, ‘‘स्वत:च्या पोरीची काळजी मला घेता आली नाही यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही.’’

सायंकाळी शौकत अली घरी आले, तेव्हा त्यांना हसनचं घृणास्पद कृत्य सांगण्यात आलं. संतापानं ते पेटून उठले. ‘‘आत्ताच्या आत्ता त्याला घराबाहेर काढतो,’’ ते गरजले. मग मुलींना धीर देत म्हणाले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. त्याला शिक्षा नक्कीच होईल.’’ दोघी मुली आपापल्या घरी निघून गेल्या.

निकहत घरात असायची अन् घरातली बरीच कामंही करायची. रूबी झोपलेली असेल तेवढ्या वेळातच ती कामं आटोपायची व उरलेला सर्व वेळ रूबीसोबत असायची. पण आयेशा जेव्हा बाहेर जायची, तेव्हाच काहीतरी काम काढून हसन निकहतलाही बाहेर पाठवून द्यायचा अन रूबीवर बलात्कार करायचा. चाकूचा धाक दाखवून तिला गप्प बसायला सांगायचा. तिचं घाबरलेपण अन् एकूण स्थिती बघूनही आयेशाला वाटायचं की तिच्या मानसिक अस्वस्थतेमुळे ती अशी वागते. हसनच्या अशा वागण्याची तर स्वप्नातही तिने कल्पना केली नव्हती. त्यातून आयेशा कायम हसनच्या कौतुकात अन् सरबराईत असल्यामुळे रूबी दोघी बहिणींशीच रूळलेली होती. आईला ती आपली कुंचबणा, भीती, त्रास सांगू शकली नव्हती.

रात्री कुणीच जेवलं नाही. रूबीला औषधं देऊन झोपवलं होतं. हसन घरी आल्यावर शौकत त्याच्यावर ओरडले, ‘‘या क्षणी घरातून निघून जा.’’

‘‘का म्हणून? हे घर माझंही आहे.’’ तो निर्लज्जपणे म्हणाला. ‘‘मला या घरातून कुणीही काढू शकत नाही, समजलं का?’’

आयेशानं त्याच्या थोबाडीत मारली. ‘‘हसन या क्षणी निघून जा. निर्लज्ज कुठला…वडिलांशी इतक्या गुर्मीत उलटून बोलतो आहेस…’’

‘‘मी पुन्हा सर्वांना एक दिवस मारून टाकेन,’’ खिशातून चाकू काढून तो खुनशीपणानं बोलला, ‘‘तुम्हा सर्वांचा तिरस्कार वाटतो मला.’’

शौकत अन् आयेशा मुलाचं हे रूप बघून चकित झाले. मनातून घाबरलेही.

हसननं सुरा दाखवत पुन्हा म्हटलं, ‘‘पुन्हा सांगतो, तुमची सगळी संपत्ती फक्त माझी आहे. त्यावर फक्त माझा हक्क आहे.’’ रागानं अम्मी अब्बूकडे बघून तो आपल्या खोलीत निघून गेला व धाडकन् दार लावून घेतलं.

हसनचा बराच वेळ आता अफशाबरोबरच जायचा. भरपूर पैसे हातात होते. बाबा त्याच्याकडून मंत्रतंत्रसाठी मोठमोठ्या रकमा मागून घ्यायचा. आपण लवकरच मालामाल होऊ या आशेवर असलेला हसन बाबावर पूर्णपणे विसंबून होता.

झोयाला मुलगी झाली. सगळ्यांना आनंद झाला. पण हसनशी कुणीच बोलत नव्हतं. आयेशा तेवढी थोडंफार बोलायची.

सना अन् हिबा तर भावावर खूपच नाराज होत्या. स्वत:च्या नवऱ्यालाही त्या याबद्दल सांगू शकत नव्हत्या. त्यांनी आपला पैसा व दागिने परत मागून घ्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे दोघी एकदा ठरवून हसन घरी असेल अशा वेळी आल्या.

दोघींनीही प्रथम त्याला भरपूर रागावून घेतलं अन् सरळ आपलं पैसे व दागिने परत करण्यास परखडपणे सांगितलं.

हसनला वाटलं होतं की ओरडतील, रागावतील अन् निघून जातील. पण त्या पैसे व दागिने परत मागतील असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. पण यावेळी त्यानं एकदम नमतं घेतलं. ‘‘मला क्षमा करा..माझं फारच फार चुकलंय. मला लाज वाटतेय स्वत:चीच… मला माफ करा.’’

‘‘नाही हसन, या गुन्ह्याला क्षमा नाहीए.’’

‘‘मी उद्या झोयाला घ्यायला जातोय. तुमचे पैसे मी अगदी लवकरात लवकर परत करतो.’’

झोया सर्वांची लाडकी होती. त्यातून ती बाळंतीण, तान्ह्या लेकीला घेऊन येईल, तेव्हा आपोआपच सगळ्यांचा राग निवळेल ही हसनची अटकळ खरी ठरली. त्याच्या कृष्णकृत्याबद्दल झोयाला कुणीच काही सांगणार नाही याची त्याला खात्री होती.

दुसऱ्याच दिवशी तो झोयाला घेऊन आला. लहानगी माहिरा व शान आल्यानं घरातलं तणावाचं वातावरण थोडं निवळलं. झोयाला काही कळू नये म्हणून सगळेच जपत होते. तरीही झोयाला काही तरी शंका आलीच…‘‘मी गेल्यानंतर घरात काही घडलंय का?’’ तिनं हसनला विचारलं, ‘‘सगळे गप्प का असतात?’’

‘‘काही नाही गं! मी जरा धंद्याच्या कामात गुंतलो होतो. अम्मी अब्बूशी बोलायला वेळ नसायचा. त्यामुळे ती दोघं नाराज आहेत. आता तू अन् मुलं आला आहात तर सगळं छान होईल. तू दोघी बाजींना फोन करून जेवणाचं आमंत्रण दे. खूपच दिवस झालेत. बाजी अन् मुलं आली नाहीएत.’’

झोयानं हसून होकार दिला.

हसन तिथून निघाला तो सरळ जमालबाबाकडे आला. ‘‘बहिणींनी पैसे परत मागितले आहेत. त्या फार नाराज आहेत.’’ त्यानं सांगितलं. बाबा जरा दचकला अन् मग त्यानं बऱ्याच उलटसुलट गोष्टी सांगून हसनचा ब्रेनवॉश केला. अल्ला, खुदा, मजहब वगैरेबद्दल बोलून तू खुदाचा बंदा आहेस, मोठं काम तुला करायचं आहे. जन्नतमध्ये तू जाशीलच. तुझ्या घरच्यांनाही जन्नत मिळेल.

अफशासारख्या दुर्देवी मुलीशी निकाह करून तू तिची जिंदगी सावर…एक ना दोन..बाबाच्या बोलण्यानं हसन खूपच भारावला. आता तो नेहमीचा हसन नव्हता. पार बदलला होता तो. खुदाचा खास बंदा जो सगळ्यांना जन्नत दाखवणार होता. सैतानच जणू त्याच्या शरीरात येऊन दडला होता.

झोयानं फोन केल्यामुळे शनिवारी दोघी बहिणी मुलांसह आल्या. हसनशी त्या बोलल्या नाहीत. पण झोया, शान व लहानग्या माहिराला बघून खूप आनंदल्या. माहिरासाठी आणलेली खेळणी, कपडे वगैरे त्यांनी झोयाला दिले.

हसन नेहमीप्रमाणे झेयाला स्वयंपाकात मदत करत होता. त्यामुळे बहिणीभावांमधला अबोला झोयाला कळला नाही.

रात्री सगळी एकत्र जेवायला हसली. हसन त्यावेळी मुलांना जेवायला वाढत होता. झोया मोठ्या मंडळींची काळजी घेत होती. झोयानं छान चविष्ट स्वयंपाक केला होता.

शौकत अन् आयेशालाही सगळी एकत्र आल्यानं बरं वाटलं होतं. झोयाकडे बघून सगळी गप्प होती. हसनबद्दल कुणाचंच मत चागलं नव्हतं. दहा वाजेपर्यंत जेवणं आटोपली. दोघी बहिणींनी झोयाला सगळं आवरायला मदत केली. हसन मुलांमध्येच खेळत होता. मुलं खूप धमाल करत होती.

हसननं झोयाला म्हटलं, ‘‘मी सगळ्यांसाठी सरबत करून आणतो,’’ झोयानं प्रेमानं हसनकडे बघून हसून मान डोलावली.

हसननं सरबत तयार केलं. सावधपणे पॅन्टच्या खिशातून एक पुडी काढली अन् बाबानं दिलेली एक पावडर त्या सरबतात मिसळली. व्यवस्थित ग्लास भरून प्रथम मुलांना अन् मग मोठ्यांना सरबत दिलं.

त्यानं स्वत: नाही घेतलं, तेव्हा झोयानं विचारलं, ‘‘तुम्ही नाही का घेतलं सरबत?’’

‘‘नंतर घेतो. आत्ता नको वाटतंय.’’

सगळ्यांचं सरबत घेऊन झाल्यावर त्यानं ग्लासेसही उचलून नेले. अर्ध्या तासातच सगळ्यांना झोपेनं घेरलं. जिथं जागा मिळेल तिथं लोक आडवे झाले. शौकत, रूबी, सनाची तीन मुलं, हिबा अन् तिची तीन मुलं हॉलमध्येच झोपी गेली. शानही तिथंच झोपला होता.

हसननं आधी घराचं मेन गेट अन् नंतर सर्व खिडक्या व दारं आतून लावून घेतली. नंतर अत्यंत थंडपणे त्यानं एका धारदार चाकूनं प्रथम शौकत, मग हिबा, रूबी, हिबाची तीन मुलं, सनाची तीन मुलं, स्वत:चा मुलगा शान अशा सर्वांची गळ्याची शीर कापून खून केला. त्याच्यात सैतान पूर्णपणे भिनला होता. आपण काय करतोय ते त्याला कळत नव्हतं. तरीही तो अजिबात न डगमगता वर गेला.

प्रथम त्यानं झोया अन् नंतर तान्ह्या माहिराला गळ्याची शीर कापून मारलं. सनाच्या गळ्याची शीर कापताना सनाला शुद्ध आली. दुखल्यामुळे ती जोरात किंचाळली. बाकी लोकांचे प्राण गेले होते. सनाचा जीव गेला नव्हता. ती त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या किंचाळण्यामुळे आयेशालाही जाग आली. झोया अन् माहिराला रक्ताच्या थारोळ्यात बघून ती किंचाळली, ‘‘काय केलंस हसन?’’

‘‘अजून काम संपलं नाहीए माझं. तू अन् तुझा लेक जिवंत आहात अजून.’’

‘‘अरे बाळा, मला मारू नकोस,’’ हात जोडून आयेशानं प्राणाची भीक मागितली.

‘‘मी कुणालाही सोडणार नाही, सगळे लोक मेले आहेत. तू ही मर. खरं तर आता तुम्ही हे घाणेरडं जग सोडून स्वर्गात जाल. मी तुम्हाला तिथंच भेटेन.’’ हसननं वेळ न घालवता आयेशालाही मारून टाकलं.

एव्हाना सना खाली धावली होती. रक्तानं माखली होती, तरीही तिनं कसाबसा किचनचा दरवाजा गाठला अन् आतून बंद करणार तेवढ्यात हसननं तिच्या पोटात सुरा खुपसला. तरीही तिनं त्याला धक्का देऊन दरवाजा बंद केला. ती जोरजोरात ओरडत होती. एक ग्लास घेऊन ग्रीलवर जोरात आवाज करत होती.

त्या आवाजानं शेजारी जागे झाले. त्यांनी दुसऱ्या शेजाऱ्याला उठवलं सगळे धावत किचनकडे आले. ‘‘हसननं सगळ्यांना मारून टाकलंय.’’ सनानं म्हटलं. तिघा चौघांनी ग्रिल तोडून सनाला बाहेर काढलं. रात्रीच्या शांततेत आवाजानं लोक गोळा होत गेले. कुणी तरी पोलिसांना फोन केला. तिच्या हातातच सनानं प्राण सोडला. हसन आतून सगळं ऐकत होता.

खरं तर सगळ्यांना मारून तो अफशाबरोबर पळून जाणार होता. पण सनामुळे त्याचा बेत फसला होता. पोलिसांची गाडी आली होती. काही पोलीसांनी त्या ग्रिलमधून सनाला बाहेर काढलं होतं. तिथून आत गेले. असं दृश्य त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. सगळीकडे प्रेतंच प्रेत. रक्ताची थारोळी खाली अन् वरही. अन् आईच्या ओढणीने गळफास घेऊन लटकत असलेला हसन.

त्याला खाली काढलं पण प्राण गेलेला होता. लहानपणापासून मुलगा म्हणून फाजिल लाड झाले होते. धार्मिक अंधश्रद्धांनी डोकं भडकावलं होतं. पैशाचा मोह, झटपट श्रीमंत होण्याची लालसा या सगळ्यामुळेच ही परिस्थिती झाली होती.

खूप गर्दी जमली होती. दर्ग्यातून जमाल बाबाही आला होता. परिस्थितीचा अंदाज येताच त्यानं मागच्या मागे पोबारा केला.

केवढे क्रौर्य हे

(पहिला भाग)

कथा * पूनम अहमद

सगळ्या खोलीत रक्ताचा सडा पडलेला अन् रक्तात लडबडलेले मृतदेह…मुलं, मोठी माणसं, स्त्रिया सगळेच आपल्या माणसांकडून मारले गेले होते. वर जाणाऱ्या जिन्यावर रक्तात भिजलेल्या बुटाचे ठसे होते. एवढे कठोर हृदयाचे पोलीस…पण समोरचं दृश्य पाहून तेही हादरले. वर ही प्रेतं अन् आईच्या ओढणीने गळफास घेतलेला हसन.

मुंबईच्या ठाणे भागातल्या या मुस्लिमबहुल वस्तीत, कासारवडावलीत लहानलहान बोळ्यांच्या दुतर्फा दुकानं होती. अधूनमधून लोकांची घरं होती. कुणाची दुमजली, कुणी तिमजली घराचा मालक. एकूण वातावरण जुनाट अन्  मुस्लिम वस्तीत असतं तसंच. स्त्रिया मुली बुरखा घालूनच बाहेर पडायच्या. लोक आर्थिकदृष्ट्या सधन होते पण राहाणी अन् विचारसरणी जुनीच होती. मुलींना फारसं शिकवत नसत. त्यांची लग्न लवकर केली जात. मुलं मात्र शिक्षण पूर्ण करून बऱ्यापैकी नोकरी करत होती.

शौकत अली अन् आयेशा बेगमना तीन मुली होत्या. सना, रूबी अन् हिबा. तिघींमध्ये दोन दोन वर्षांचं अंतर होतं. धाकटा हसन हिबाहून पाच वर्षं लहान होता. आयेशाला तर लेकाला कुठे ठेवू अन् कुठे नको असं व्हायचं. तो वंशाचा दिवा म्हणून त्याचे लाडच लाड व्हायचे. हसनची काळजी एखाद्या राजपुत्राप्रमाणे घेतली जायची.

रूबी थोडी विकलांग मतिमंद अशी होती. तिला शाळेत घातलीच नव्हती. पण सना अन् हिबाला दहावीपर्यंत शिकवून त्यांची शाळा बंद केली होती. वडिलांची म्हणजे शौकत अलींची इच्छा होती, मुलींना पुढे शिकवावं पण आईने सक्त विरोध केला. ‘‘त्यांची लग्नं करण्याचं बघा, पैसा हसनच्या शिक्षणावर खर्च करायचा. हसन म्हणजे म्हातारपणीची काठी आहे. त्याची काळजी घ्यायला हवी,’’ या फाजील लाडामुळे खरं तर हसन बिघडला होता. शौकत एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करत होते. कुटुंबाचा खर्च अगदी आरामात भागेल एवढं त्यांना उत्पन्न होतंच. रूबीला उपचारांमुळेही फारसा फायदा झाला नव्हता. मुळात तिला बोलता येत नसे. उठणं, बसणं, चालणं, झोपणं या क्रियाही करताना मदत लागायची. खुणा करून ती थोडंफार सांगू शकायची. पण एकंदरीतच तिची परिस्थिती अवघड होती. हसन तिला फार त्रास देत असे.

जसजसा हसन मोठा होत होता त्याचं वागणं बिघडत होतं. पण त्याला कुणी काही म्हटलेलं आयेशाला खपत नव्हते. ती पटकन् त्याला पाठीशी घालायची.inside-pic

घराच्या जवळच एक दर्गा होता. तिथे एका कोपऱ्यात एक बाबा दिवसभर बसून असायचा. तो झाडफूंक करतो, भूतं उतरवतो, त्याला सिद्धा प्राप्त आहे असं लोकांना माहीत होतं. त्याच्याकडे दु:खावरचा उतारा घ्यायला खूप लोकांची गर्दी असायची. हसनला कधी बरं वाटत नसलं तर आयेशा त्याला पटकन् बाबाकडे न्यायची. तिचा त्याच्यावर फार विश्वास होता.

एकदा तिने बाबाला म्हटलं, ‘‘बाबा, हसनला काही धर्माच्या चार गोष्टी सांगा. तुमच्या पायाशी बसून त्याला जर धर्माबद्दल ज्ञान मिळालं तर त्याच्यासोबत आमचंही भलं होईल. मी रोज पाठवते त्याला तुमच्याकडे.’’

हसन आता बाबाकडे यायचा. त्याचे मित्र कमी झाले होते. बाबा काय सांगायचा कुणास ठाऊक, पण हसन थोडा शांत झाला होता. त्याच्या मनात कुठल्या विषवृक्षाची बिया पेरल्या जाताहेत याची अजिबात कल्पना नसलेली आयेशा मात्र आनंदात होती.

शौकतमियांना जेव्हा कळलं की हसन त्या बाबाकडे जातो तेव्हा ते भडकले, ‘‘तिथे बसून वेळ वाया घालवण्याऐवजी अभ्यास कर, वेळ सत्कारणी लागेल,’’ त्यांनी हसनला म्हटलं.

आयेशा उसळून म्हणाली, ‘‘असे कसे काय आहात हो तुम्ही? अभ्यासासोबत तुमचा मुलगा धर्माबद्दलही जाणून घेतोए, धर्माच्या मार्गाने जातोए म्हणताना तुम्हाला आनंद व्हायला हवा. बिचारे ते बाबा…चांगल्या गोष्टीच सांगता ना?’’

शौकत गप्पच झाले. सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांच्याही मनात मजहब, धर्म याविषयी अनामिक भीती होती.

काही वर्षं उलटली. सनासाठी स्थळं येऊ लागली. आयेशाने लेकाला म्हटलं, ‘‘आता सनाच्या लग्नाचं बघायला हवं.’’

तो ताडकन् उत्तरला, ‘‘अम्मी, तुझ्या मुलीच्या लग्नाशी माझा काहीही संबंध नाही. अब्बूच्या त्या लाडक्या आहेत, त्यांनी बघून घ्यावं. मला इतरही कामं आहेत.’’

शौकतना हे ऐकून धक्काच बसला. हताश होऊन ते उद्गारले, ‘‘शाब्बास बेटा, हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून…आयेशा, ऐकलंस ना?’’

आयेशाचाही आपल्या कानांवर विश्वास बसेना, ‘‘हसन? अरे तुझ्या बहिणी आहेत, तुला किती प्रेमाने सांभाळलंय त्यांनी…किती माया करतात तुझ्यावर?’’

‘‘तर मी काय करू? त्यांनी करायला हवं होतं. अन् हे बघ. या असल्या फालतू गोष्टी माझ्याशी बोलायच्या नाहीत. मी काही तरी वेगळं, मोठं काम करण्यासाठी जन्म घेतलाए. अशा बारीकसारीक गोष्टींमध्ये मला अडकवू नकोस.’’ रागारागांत आरडाओरडा करून पाय आपटत तो निघून गेला.

पहिल्यांदाच आयेशाचा चेहरा फटफटीत पांढरा झाला होता. मुलगा इतकं काही बोलेल, असे वागेल याची तिला कल्पनाचा नव्हती. ‘‘तुझ्या अति लाडानंच तो बिघडला आहे, अजूनही लक्ष दे,’’ शौकतने तिची समजूत काढली.

काही तरी चुकलंय हे कळलं तरी काय चुकलंय हे आयेशाला समजलं नाही. काय करावं हेही समजेना.

भिवंडीहून सनासाठी रशीदचं स्थळ आलं. तो बँकेत नोकरीला होता, समजतूदार, सुसंस्कृत, शांतवृत्तीचा रशीद शौकतना आवडला. त्याच्या घरीही सना सर्वांना पसंत पडली.

लग्नाची तारीख ठरली. एवढ्यात हसनचं वागणं बदलल्याची जाणीव सनाला झाली. एकदा दुपारी ती थोडी विश्रांती घेत आडवी झाली होती. हसन येऊन तिला चिकटून झोपला. तिने चमकून विचारलं, ‘‘काय रे, काय झालं?’’

‘‘काही नाही, माझ्या ताईजवळ झोपू शकत नाही का?’’ सना हसली. बहीण सासरी जाणार म्हणून बहुधा त्याला प्रेम वाटायला लागलं, तिच्या मनांत आलं.

हसनने मग तिच्या अंगावरून हात फिरवत काही बाही बोलायला सुरूवात केली. सना पटकन् उठून बसली. तिला काही तरी विचित्र जाणवलं. मनात आलं हसनला एक थोबाडीत द्यावी, वयात येण्याच्या काळातच मुलींना वेगळे स्पर्श कळायला लागतात. पण ती त्या क्षणी गप्प राहिली. तिथून उठून जायला निघाली.

‘‘बाजी, कुठे जातेस, थांब ना…’’ हसन म्हणाला. तशी ती म्हणाली, ‘‘नाही, अम्मीने काही कामं सांगितली होती. मला कामं आटपायला हवीत,’’ त्याच्या डोळ्यात तिला खटकणारं असं काही जाणवत होतं. नंतरच्या काळातही हसनचं येऊन मिठी मारणं, चिकटणं, इथे तिथे स्पर्श करणं तिला फार खटकत होतं, कडेखांद्यावर खेळवलेल्या धाकट्या भावाविषयी आपल्या मनात असं येतंय, याचाही तिला त्रास व्हायचा.

आयेशा म्हणायची, ‘‘बस, भाऊ आहे तुझा, त्याला प्रेम वाटतंय तुझ्याविषयी.’’

मधली रूबी मतिमंद विकलांग होती त्यामुळे हिबा अन् सनामध्ये अधिक जवळीक होती. हिबालाही हसनच्या अशा वागणुकीचा प्रत्यय आला होता पण तीही तोंड मिटून गप्प होती. दोघी मिळून मधलीला जपायच्या. आई सतत हसनमध्ये गुंतल्यामुळे मुलींच्या वाट्याला उपेक्षाच आली होती. दोघी बहिणींनी शेवटी विचारांती निर्णय घेतला की हे सांगायला हवं.

आयेशाचा विश्वास बसेना. पण मग तिच्याही ते लक्षात आलं. घरात लग्नाची गडबड होती. उगीच कुणाला काही कळून गोंधळ व्हायला नको म्हणून सगळं दाबून टाकायचं ठरवलं. पण आयेशा सतत हसनच्या मागावर राहायची. तो आईवर चिडायचा, ओरडायचा पण आयेशाने मुलींना त्याच्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवलं.

घराबाहेर हसन शांत अन् सभ्य मुलगा होता. पण घरात मात्र वाह्यात अन् बिघडलेलाच होता. सनाचं लग्न छान झालं. ती सासरी गेली अन् हीबा एकटी पडली.

कॉलेजच्या वेळाव्यतिरिक्त हसन जमाल बाबाजवळच बसायचा. धर्माच्या लंब्याचौड्या गप्पा करायचा. बाहेर लोकांना वाटायचं किती शांत, अमनपसंद, मजहबी मुलगा आहे, खरं काय ते घरातल्यांना ठाऊक होतं.

सनाच्या प्रयत्नांनीच हीबाचं लग्न जहांगीरशी झालं. तोही फार चांगला होता. सासची माणसंही छान होती. दोघी मुली चांगल्या घरी पडल्यामुळे शौकत अन् आयेशा फार समाधानी होती.

सनाने रूबीसाठीही एक चांगला पर्याय शोधला होता. माहितीतली एक घटस्फोटित स्त्री तिने दिवसभर रूबीच्या परिचर्येसाठी नेमली होती. रात्री ती आपल्या घरी जायची. दोन लहान मुलांना घेऊन ती एकटीच कामं करून जगत होती. तिलाही काम व पैसे मिळाले. रूबीची काळजी ती प्रेमाने घ्यायची. रात्री रूबी अन् आयेशा एकत्र असायच्या.

हसनला बी. कॉम झाल्यावर एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी लागली. सगळ्यांनाच बरं वाटलं. नोकरीनंतरचा वेळ जमाल बाबाकडे जायचा. जमाल बाबाने त्याला सांगितलं, ‘‘तू खुदाचा बंदा आहेस,’’? ‘‘खास माणूस आहेस.’’ हसनला ते पटलं.

बाबा लबाड, भोंदू होता. गोष्टी मोठमोठ्या अन् पोटात पाप…‘‘खुदाच्या मर्जीने मी तुमची दु:खं दूर करायला आले आहे…तुमचं मन माझ्यापाशी मोकळं करा, लोकांना काही तरी आधार हवाच असतो.’’

म्हणायला बाबा स्वत: पैसे घेत नव्हता. त्याच्यासमोर एक चादर अंथरलेली असायची. लोक त्यावर पैसे, धान्य वगैरे ठेवायचे. रात्री बाबा आपल्या खोलीत जाऊन पैसे मोजायचा. त्याचं दुसऱ्या शहरात दुमजली घर होतं. बायको व तीन मुलं होती. तो पैसे घेऊन गावी जायचा. तसं लोकांना वाटे हा काम करून पैसा मिळवतो. इकडे या लोकांना वाटायचं सहा महिन्यांसाठी बाबा नवीन ज्ञान, सिद्धी मिळवण्यासाठी गेलाय. एकूण मूर्खांच्या या बाजारात बाबा मालामाल झाला होता अन् मान, सन्मान मिळवून होता.

बाबांच्या सगळ्या शिष्यात हसनएवढा मूर्ख कोणीच नव्हता. हसनसाठी बाबा बोलेल ते प्रमाण होतं.

एकदा त्याने म्हटलं, ‘‘बाबा, नोकरीत मन रमत नाही…’’

‘‘मग सोड ना नोकरी.’’

‘‘अन् काय करू?’’

‘‘स्वत:चा व्यसाय कर. तुझ्याजवळ तर भरपूर गुण आहेत. कौशल्यं आहेत, तुला नोकरीची गरज काय?’’

‘‘पण व्यवसाय धंदा करायला पैसा कुठे आहे माझ्यापाशी?’’

‘‘का? तुझे अब्बू आहेत, बाजी आहेत, त्यांचे नवरे आहेत, ते करतील ना तुला मदत? शेवटी तू घरातला एकुलता एक मुलगा आहेस…’’

ही गोष्ट हसनला एकदम पटली. त्याने विचार केला, बहिणींकडून पैसा घ्यायचा तर त्यांना आधी खूश केलं पाहिजे. त्यांच्या मनातला त्याच्याविषयीचा राग अन् तिरस्कार दूर करायला हवा. अर्थात्  त्यासाठी थोडा वेळ लागेल. पण काम हमखास होईल. आत तो घरात अधिक वेळ देऊ लागला. बहिणींशी फोनवर बोलू लागला. त्यांना नवल वाटायचं. हसनने रशीद अन् जहांगीरशीही मैत्री वाढवायला सुरुवात केली. सना अन् हीबाने आपसात चर्चा केली.

‘‘हसन थोडा बदललाय ना?’’

‘‘खरंच, खूप बदलला आहे. पण कारण काय?’’

‘‘वाढत्या वयाबरोबर समजूत वाढली असेल, आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असेल.’’

‘‘तसं असेल तर चांगलंच आहे. हे टिकून राहू दे.’’ मधल्या काळात सनाला दोन मुली एक मुलगा झाला होता. हिबालाही दोन मुली एक मुलगा होता. हसनला मुली सांगून येत होत्या. झोया नावाची एक देखणी, कुललशीलवान मुलगी पसंत केली गेली. लग्न झालं. हसनचं आयुष्य थोडं बदललं; पण डोक्यातून अजून बिझनेसचं भूत गेलं नव्हतं.

झोयाच्या लाघवी स्वभावाने तिनं आल्या आल्या सगळ्यांना आपलंसं केलं होतं. हसनही तिच्याशी छान वागत होता. त्याचं चिडणं, संतापणं कमी झालं होतं. शौकत अन् आयेशाही मुलांचं सगळं आनंदात चाललेलं पाहून निवांत झाली होती.

अजूनही हसन त्या बाबाकडे कधीमधी जातच होता. त्याच्या डोक्यात काय शिजत होतं त्याची कुणालाच कल्पना नव्हती. त्याने दोघी बहिणींना फोन करून सांगितलं की, ‘‘येत्या शनिवारी तुम्ही दोघी, जहांगीर व रशीद अन् सगळी बच्चा कंपनी लंचला या. रात्रीचं जेवणही एकत्रच करू.’’

मधल्या काळात मुलींनी माहेरपणाला येणं बंदच केलं होतं. हे आमंत्रण मिळाल्यामुळे त्याही आनंदल्या. हसनने स्वत: स्वयंपाकघरात झोयाला खूप मदत केली. उत्तम स्वयंपाक तयार झाला. सहा मुलं खूप खेळत खिदळत होती. घरात कितीतरी वर्षांनी इतका आनंद, उत्साह, उल्हास होता.

हसनने म्हटलं, ‘‘माझ्या असं मनात आहे की दर शनिवारी अन् रविवारी लंच आपण एकत्रच घेऊयात.’’

रशीदने म्हटलं, ‘‘याचा अर्थ असा की शनिवारी रात्री मी व जहांगीर सोडून इतर सर्व इथेच राहातील.’’

जहांगीरनेही म्हटलं, ‘‘काही हरकत नाही. या एकत्र भोजनाच्या आनंदासाठी एवढं करायला काहीच हरकत नाही.’’

आणखी काही महिने गेले. झोयाला सुंदर मुलगा झाला. त्याचं नाव शान ठेवलं. बाळाच्या जन्माचा आनंदोत्सव सर्व बहीणभाऊ व कुटुंबियांनी साजरा केला. बहीणभावांचं प्रेम बघून आईवडील कृतार्थ व्हायचे.

पुन्हा एक शनिवार आला. जेवणं आटोपली. हसन गप्प गप्प होता. मुलांची दंगामस्ती सुरू होती. सनाने विचारलं, ‘‘ काय झालंय? कसली काळजी आहे? असा गंभीर अन् गप्प का?’’

‘‘काही नाही, बाजी.’’

हिनानेही म्हटलं, ‘‘काही तरी आहेच.’’

शौकत अन् आयेशाही तिथेच होती. त्यांनी खोदून खोदून विचारल्यावर म्हणाला, ‘‘बाजी, मला काही पैसा हवेत. मला स्वत:चा व्यवसाय करायचा आहे.’’

‘‘अरे? इतकी चांगली नोकरी आहे तुला. हे व्यवसायाचं काय मध्येच?’’

‘‘मी नोकरी सोडतोय…मला पैशांची फारच गरज आहे. कुठून, कशी व्यवस्था करू तेच मला कळत नाहीए.’’

शौकत रागावून म्हणाले, ‘‘ही बिझनेसची कल्पनाच अगदी भिकार आहे. आपण नोकरी करणारी माणसं…आपल्या घरात कुणीच, कधीही व्यवसाय केलेला नाही. इतका पैसा आणायची कुठून? कर्ज काढलं तर फेडणार कसं? मुळात कर्ज देणार कोण? नकोच तो व्यवसाय. शिक्षणाच्या हिशेबाने तुला चांगली नोकरी मिळाली आहे. मुकाट्यानं तीच सुरू ठेवायची.’’

‘‘अब्बू, मी सगळा विचार केलाय. मी पैन् पै फेडेन ना?’’ तो उदास चेहऱ्यानं कपाळावर हात ठेवून बसून राहिला.

किती वर्षांनी मुलगा जरा माणसात आला होता. घरात आनंद, उल्हास वाटत होता. अन् आज तो पुन्हा उदास बसलेला बघून आयेशाला वाईट वाटलं. ती प्रेमळपणे म्हणाली, ‘‘हा विचार मनातून काढून टाक रे बेटा, आपल्याकडे एवढा पैसा नाहीए.’’

हिबाने सहजच विचारलं, ‘‘किती पाहिजेत?’’

‘‘२५-३० लाख.’’

‘‘काय?’’ सगळेच दचकले.

‘‘एवढे पैसे कुठून आणायचे, हसन?’’ सनाने काळजीने विचारलं.

झोया बिचारी गुपचूप बसून होती, तिचा नवरा खरं तिला आजतागायत समजलाच नव्हता. तो कधी काही बोलायचा, कधी कधी एखाद्या धर्मगुरूसारखं मोठमोठ्या गोष्टी करायचा, कधी अगदीच मवाली, बेजबाबदार माणसासारखा वागायचा.

हसन म्हणाला, ‘‘झोयाचे सर्व दागिने विकले तरी पैसा उभा राहाणार नाही. बाजी, तुम्ही मला काही रक्कम द्या. मी तुमची पैन् पै परत करेन. लवकरात लवकर!’’

सनाने आश्चर्याने अन् काळजीने विचारलं, ‘‘हसन, अरे आम्ही पैसा आणायचा कुठून?’’

‘‘तू रशीद आईंशी बोल. ते मला कर्ज मिळवून देतील. बँकेत आहेत ना ते?’’

हिबा म्हणाली, ‘‘मी नाही मदत करू शकणार. अजून माझ्या दोन नणंदा लग्नाच्या आहेत. जहांगीर एकटाच मुलगा आहेत घरातला. त्यांच्यावरच सगळी सगळी जबाबदारी आहे.’’

‘‘तर मग तुझे दागिने दे मला.’’

हिबा दचकली, घाबरून म्हणाली, ‘‘दागिने कसे देऊ? हसन काय बोलतो आहेस?’’

‘‘बाजी, तुमच्या भावाने आयुष्यात प्रथमच तुमच्याकडे काही मागितलं आहे. मी वचन देतो की तुमची पैन् पै मी परत करेन. तुम्ही समजून का घेत नाही?’’ अन् मग एकाएकी धमकी दिल्यासारखा आवाजात म्हणाला, ‘‘जर तुम्ही मला मदत केली नाही तर फार वाईट होईल.’’

शौकत अलींनी दरडावून म्हटलं, ‘‘हसन, बिझनेसचं हे भूत डोक्यातून काढून टाक. अरे, बहिणींकडून पैसा घेऊन व्यवसाय करशील? काही गरज आहे का? या घरच्या त्या माहेरवाशिणी आहेत. त्यांना संकटात टाकू नकोस.’’

हसन प्रचंड संतापला, ‘‘कायम तुम्ही मुलींचीच कड घेतली. सतत त्यांचंच कौतुक केलंत. माझ्यासाठी कधी काही केलंत का? मुलीच तुमच्यासाठी सर्वस्व आहेत.’’ रागाने पाय आपटत हसन घराबाहेर निघून गेला.                       (क्रमश:)

आई होण्याचं सुख

कथा * आशा सोमलवार

शाळेतून आलेल्या तारेशनं संतापानं आपलं दफ्तर फेकून आईकडे धाव घेतली, ‘‘आई, कसलं घाणेरडं नाव ठेवलं आहेस गं माझं. तारेश…वर आणखी आडनाव तारकर. मुलं मला चिडवतात. सर्व हसतात…’’ बोलता बोलता तो रडकुंडीला आला.

आईनं त्याला जवळ घेत विचारलं, ‘‘काय म्हणतात?’’

‘‘तारू तारकर कुत्र्यावर वारकर…’’

‘‘वेडी आहेत ती मुलं…अरे, तुझ्या आजीनं ठेवलंय हे नाव, तू झालास त्या दिवशी पौर्णिमा होती. तारेश म्हणजे ताऱ्यांचा राजा म्हणजे चंद्र. इतकं सुंदर नाव आहे. तुझ्या रूपाला ते शोभतंही आहे…’’

‘‘पण माझं नाव आजीनं का ठेवलं? शाळेत मला जायचंय, आजीला नव्हतं जायचं…मला नाही आवडत हे नाव…बदलून टाकूयात.’’ तारेशचा थटथयाट संपत नव्हता.

‘‘अरे, तू तारेश आहेस म्हणूनच तुला चंद्रिका भेटेल…सुंदर सून आम्हाला मिळेल,’’ आईनं समजूत घालत म्हटलं.

‘‘नकोय मला चंद्रिका…मला तर सूर्य आवडतो. झगझगीत प्रकाश अन् ऊब देणारा.’’ तारेश म्हणाला. तेव्हा त्याला कुठं समजत होतं की त्याला चंद्रिका का नको होती अन् सूर्यच का आवंडत होता?

‘‘अभिनंदन सर! मुलगी झाली आहे,’’ नर्सनं येऊन सांगितलं तसा तारेश भानावर आला.

‘‘मी तिला बघू शकतो? हात लावू शकतो?’’ त्यानं अधीरपणे विचारलं.

‘‘हो…हो…या, आत या.’’ नर्सनं हसून म्हटलं. नर्सनं हळूवारपणे ते बाळ तारेशच्या हातात दिलं. किती नाजूक, केवढीशी…गोरीपान, मिटलेले डोळे…काळं भोर जावळ…तारेशनं हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले अन् पुन्हा नर्सच्या हातात तिला सोपवलं. नर्सनं तिला तिच्या सरोगेट आईजवळ झोपवलं. तारेश मनात म्हणाला, ‘‘सोमल, तुझी आठवण आली या बाळाला बघून…अगदी तुझंच रूप आहे रे…’’

शाळकरी वयातच तारेश इतर मुलांपेक्षा वेगळा होता. अभ्यासात तो भलताच हुशार होता. पण त्याच्या मनात मुलींविषयी अजिबात आकर्षण नव्हतं. मात्र त्याला त्याचे स्पोर्ट्स सर अशोक फार आवडायचे. त्यांचा सहवास मिळावा म्हणून तो गेम्स पीरियड कधी टाळत नसे. जिमनास्टिक शिकवताना सरांचा हात अंगाला लागला की तो मोहरून जायचा. त्या स्पर्शानं तो सुखावत असे. अशोक सर फक्त तो एक मेहनती विद्यार्थी आहे म्हणून त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचे. यापलीकडे त्यांना तारेशविषयी फार काही वाटलं नव्हतं.

कॉलेजच्या वयाला जेव्हा इतर मित्र मुलींवर इंप्रेशन मारण्यात दंग असायचे. तेव्हा तारेश स्वत:तच दंग असे. पण सोमलला बघितलं अन् तो जणू त्याच्या प्रेमातच पडला. सोमललाही तारक आवडला. त्यांची चांगलीच मैत्री झाली. ज्या दिवशी कॉलेज नसे, त्या दिवशी तारकच्या जिवाची घालमेल व्हायची. सोमल कधी एकदा दिसतो असं त्याला व्हायचं.

कॉलेजचं शिक्षण संपलं अन् बिझनेस मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री घ्यायची असं दोघांनी ठरवलं. दोघं एकत्र राहतील, एकमेकांची सोबत, मदत होईल या उद्देशाने दोघांच्या घरच्यांनीही आनंदानं परवानगी दिली. दिल्लीच्या उत्तम कॉलेजात दोघांना एडनिशन मिळालं. एका जवळच्याच कॉलनीत वन रूम किचन फ्लॅट दोघांनी मिळून भाड्यानं घेतला.

कॉलेज व्यवस्थित सुरू होतं. कधी ते दोघं घरीच स्वयंपाक करायचे, कधी बाहेर जेवण घ्यायचे. दोघांची जोडी कॉलेजात ‘रामलक्ष्मण’ म्हणून ओळखली जायची. अभ्यासात दोघंही हुशार होते. प्रोफेसर्स त्यांच्यावर खुश होते.

बघता बघता शेवटचं सेमिस्टर सुरू झालं. कॉलेजात कॅम्पस इंटरव्ह्यू सुरू झाले होते. अनेक मुलं चांगल्या चांगल्या कंपन्यांनी निवडून घेतली. सोमलला हैदराबादच्या कंपनीत नोकरी मिळाली तर तारेशला बंगलोरच्या कंपनीत. दोघांनाही उत्तम कंपनीत भरगच्च पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे त्यांना आनंद तर झाला होता. पण एकमेकांपासून दूर राहावं लागेल हा विचार मात्र अस्वस्थ करत होता. दोघंही निर्णय घेताना हवालदिल झाले होते. नोकरी घ्यायची म्हटलं तर मित्र सोडावा लागणार. मित्राजवळ रहायचं तर नोकरी सोडावी लागणार…कठिण अवस्था होती.

त्या रात्री एकमेकांना मिठी मारून दोघंही खूप रडले. जेवणही करायला सुचलं नाही. त्या रात्री त्यांना कळलं की ते एकमेकांसाठीच आहेत. का त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही, का ते एकमेकांशिवय राहू शकत नाही याचा उलगडा त्यांना त्या रात्री झाला. जगाच्या दृष्टीनं त्यांचं नातं, धर्माविरूद्ध किंवा अनैसर्गिक होतं. कारण दोघंही ‘गे’ होते. पण त्यांना त्याची खंत नव्हती.

दोघांनीही आपल्या प्लेसमेंट रद्द केल्या. त्यांनी दिल्लीत राहूनच काम मिळवण्याचा प्रयत्न केला अन् योगायोग असा की दोघांनाही एकाच मल्टीनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी मिळाली. दोघांचंही आयुष्य रूळावर आलं.

शिक्षण झालं. उत्तम नोकरी मिळाली म्हणताना दोघांच्याही घरी आता त्यांच्या लग्नाचा विषय ऐरणीवर आला. दोघांच्या घरी मुली बघायला सुरूवात झाली. पण हे दोघं आपल्यातच दंग! त्यांचं जगच वेगळं होतं. बाहेर केवढं वादळ घोंगावतंय याची त्यांना कल्पनाही नव्हती.

वारंवार जेव्हा मुली नाकारल्या जायला लागल्या, तेव्हा तारेशच्या आईच्या मनात शंका आली. त्याचं कुठं प्रेमप्रकरण तर नाहीए? कुणी मुलगी त्यानं पसंत करून ठेवली आहे का?

सोमलच्याही घरी हीच परिस्थिती होती. नेमकं काय कारण आहे, सोमल न बघताच मुली का नाकारतो आहे हे जाणून घेण्यासाठी सोमलची आई दिल्लीला त्यांच्या फ्लॅटवर पोहोचली. येण्याबद्दल तिनं काहीच कळवलं नव्हतं. त्यांचे दोघांचे हावभाव बघून तिला काही तरी संशय आला. तिने फोन करून तारेशच्या आईवडिलांना व सोमलच्या घरच्यांनाही बोलावून घेतलं.

सगळेच एकत्र समोर बसलेले…दोन्ही मुलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहेत. एकमेकांसोबतच आयुष्य घालवू इच्छितात. त्यांच्यासाठी मुली बघणं बंद करा. प्रथम तर दोघांच्याही घरच्यांनी समाजात केवढी ब्रेअब्रू होईल, लोक काय म्हणतील वगैरे सांगून बघितलं. सोमलच्या आईनं तर ‘‘तुझ्या बहिणीचं लग्न अशामुळे होणार नाही,’’ असा धाक घातला. पण दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. मुलं ऐकत नाहीत म्हणताना चिडलेल्या अन् दुखावल्या गेलेल्या दोघांच्याही घरच्यांनी एकमेकांच्या कुटुंबांना भरपूर दोष दिला. खूप भांडाभांडी झाली. बातमी सर्व अपार्टमेंटमध्ये पसरली. घरमालकांन जागा सोडा म्हणून फर्मान काढलं.

एवढ्यावरही थांबलं नाही. बातमी त्यांच्या ऑफिसमध्येही पोहोचली. प्रत्येक जण त्यांच्याकडे विचित्र नजरेनं बघत होता. जणू ते परग्रहावरून आलेले लोक आहेत. कालपर्यंत जे सहकारी एकत्र काम करत होते, एकत्र जेवत होते, पार्ट्या, पिकनिक करत होते ते आता चक्क टाळू लागले. बघताच तोंड फिरवू लागले. दोघांना अस्पृश्य असल्यासारखे वागवू लागले. त्यांना ऑफिसात काम करणं अशक्य झालं.

सोमलच्या बॉसनं तर त्याला एकट्याला बोलावून घेऊन समजावलं, ‘‘हे बघ सोमल, तुमच्यामुळे ऑफिसातलं वातावरण बिघडतंय. ऑफिसमध्ये लोक कामं कमी करताहेत, तुमच्याबद्दलच्या चर्चेत वेळ जास्त घालवताहेत. मला वाटतं, तुम्ही दोघांनी राजीनामा द्यावा. आम्ही तुम्हाला काढलं तर तुम्हाला इतरत्र नोकरी मिळवताना अडचण येईल. तुम्ही राजीनामा दिला तर तुमच्या चांगल्या सीपीमुळे तुम्ही दुसरीकडे कुठं पुन्हा जॉब मिळवू शकाल.’’

काळ तर कठिणच होता. शेवटी दोघांनी दिल्ली सोडायचा निर्णय घेतला. त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. तेवढ्यात सोमलच्या एकुलत्या एका बहिणीचं राखीचं लग्नही झालं, पण घरच्यांनी त्याला कळवलंही नाही.

घरच्यांनी नाव टाकलं होतं. दिल्लीतल्या मित्रांशी संपर्क तुटला होता. ऑफिसचे सहकारीही दुरावले होते. मुंबईत त्यांना कुणीही ओळखत नव्हतं. त्यांचं जग त्या दोघांपुरतंच मर्यादित होतं. पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य सुरू झालं होतं.

सोमलच्या एका चुलत वहिनीनं लीनानं मात्र एवढं सगळं झाल्यावरही सोमलशी संपर्क ठेवला होता.

एकदा अवचितच लीना वहिनीचा फोन आला की राखीच्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. ऐकून सोमलला फारच दु:ख झालं. बहिणीवर फार माया होती त्याची.

यावेळी तिला आधाराची गरज असेल असा विचार करून तो तडक तिकिट काढून गाडीत बसला.

राखीच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याला मिठी मारून राखी रडू लागली. तेवढ्यात तिची सासू आली अन् तिला ओढत आत घेऊन गेली. सोमलला ऐकवलं, की त्यान पुन्हा या घरात पाय ठेवू नये. तिच त्याची व राखीची शेवटची भेट होती.

एका सुट्टीच्या दिवशी दोघं एक सिनेमा बघत होते. त्यात तीन पुरूष एका बाळाला वाढवतात. त्या बाळाला आई नसते.

सोमलनं विचारलं, ‘‘तारेश, आपल्याला बाळ होऊ शकतं?’’

‘‘कुणास ठाऊक! पण बाळ तर आईच्या गर्भाशयातच वाढतं ना? मग कसं होणार?’’ तारेशनं म्हटलं.

‘‘काही तरी मार्ग असेलच ना? विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे…आपण सरोगसीची मदत घेतली तर?’’

‘‘तसं करता येईल. पण त्यात काही कायदेशीर अडचणी असू शकतात. कायद्यानं आपल्यासारख्यांना सरोगसीची परवानगी आहे का हे बघावं लागेल. आपल्यात सरोगेट मदर कोण देणार? आपले दोघांचेही नातलग आपल्याला दुरावले आहेत, तरीही आपण या विषयातल्या एखाद्या तज्ञाला भेटूयात. त्याच्याकडून खात्रीची माहिती मिळेल. आता हा विषय नकोच!’’ तारेशनं त्या दिवशी तो विषय तिथंच थांबवला.

एकदा काही कारणानं तारेश एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथं आयव्हीएफ सेंटर बघून त्याचे पाय तिथंच थबकले. त्याला एकदम सोमलचं स्वप्नं ‘आपलं बाळ असावं’ आठवलं. त्यानं आत जाऊन तिथल्या प्रमुख डॉक्टर सरोज यांची अपॉइंटमेंट मिळवली अन् ठरलेल्या दिवशी सोमलला बरोबर घेऊन तो तिथं पोहोचला.

डॉ. सरोजनं त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं अन् सांगितलं की सोमलचं पिता बनण्याचं स्वप्नं आयव्हीएफ अन् सरोगसीच्या माध्यमातून वास्तवात येऊ शकतं.

दोघांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघून डॉ. पुढे म्हणाल्या, ‘‘तुम्ही ऐकलंच असेल की अभिनेता तुषार कपूर या सरोगसीच्या टेक्निकचा वापर करून सिंगल पिता झाला आहे. सरोगसी टेक्निकच्याच माध्यमातून कुणा फिल्म इंडस्ट्रीवाल्याला जुळी मुलं आहेत. आमच्याकडे बऱ्याच सिंगल पुरूषांनी आई, वडिल होण्याची इच्छा दर्शवली आहे आणि त्यासाठी रजिस्ट्रेशनही केलं आहे. तुम्हीही रजिस्ट्रेशन करू शकता.’’

‘‘पण भाड्यानं गर्भाशय कसं मिळेल?’’

‘‘त्यासाठी तुम्हाला तुमच्या कुणा जवळच्या नातलग किंवा मित्रांची मदत घ्यावी लागेल.’’

‘‘आता कुणाची मदत घ्यायची ते तुम्हीच बघा. ठरवा त्या बाबतीत. मी मदत करू शकत नाही,’’ एवढं बोलून डॉक्टरांनी पुढल्या व्हिजिटरसाठी बेल वाजवली.

दोघं घरी परतले. सोमलला एकदम लीना वहिनीची आठवण झाली. त्यानं तिला फोन लावला. ‘‘हॅलो वहिनी, कशी आहेस?’’

‘‘सोमल भाऊजी, आज कशी काय आठवण आली?’’ तिनं प्रेमानं विचारलं. मग सोमलनं तिला सर्व परिस्थिती सांगितली अन् तिची मदत मागितली.

तिनं शांतपणे ऐकून घेतलं. मग म्हणाली, ‘‘मला क्षमा करा, सोमल भाऊजी, पण मी तुमची मदत करू शकणार नाही. मुळात तुमचे भाऊ तयार होणार नाहीत आणि माझ्यासाठी माझा नवरा आणि कुटुंब महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळतंय ना? मला क्षमा करा.’’

सोमलच्या मनातली अंधुकशी आशाही संपली. पण तारेशनं ठरवलं, इंटरनेटची मदत घ्यायची. इंटरनेटवर हवी ती माहिती मिळवता येते. दोघंही आता उत्साहानं इंटरनेटवर शोध घेऊ लागले. त्यातच एका प्रेस रिपोर्टरची कव्हर स्टोरी त्यांच्या वाचण्यात आली. तिनं लिहिलं होतं की गुजरातमध्ये आणंद या गावी ‘सरोगेट मदर’ सहज उपलब्ध होतात. इथं सरोगसीच्या माध्यमातून किमान १०० बाळं जन्माला आली आहेत. हे वाचताच दोघांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी सरळ आणंद गाठलं. कारण इथंच त्यांचं स्वप्नं प्रत्यक्षात येणार होतं. तिथं एका टेस्ट ट्यूब बेबी क्लिनिकच्या बाहेरच त्यांना एक दलाल भेटला. त्यांचं नवखेपण आणि बाळाबद्दलची अतोनात ओढ अन् असोशी बघून त्यांच्याकडून भरपूर पैसे घेतले. हा दलाल सरोगसीसाठी भाड्यानं गर्भाशय मिळवून देण्याचा व्यवसाय करत होता. त्यानं आपल्या गर्भाशयात मूल वाढवण्यासाठी तयार असलेल्या स्त्रीशी त्यांची भेट घडवून आणली. दोनच दिवसात सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता करून दोघं मुंबईला परत आले

तेवढ्यात एक दुदैर्वी घटना घडली आणि तारेशच्या आयुष्यात अंधारच पसरला. दोघं मित्र पिता होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी आणि पहिल्या पावसात मनसोक्त भिजण्यासाठी खंडाळ्याला जायला निघाले होते. तेवढ्यात हायवेवर भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रकनं त्यांच्या गाडीला धडक दिली. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल केलं, पण सोमल हे जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकूनही घरून कोणी आलं नाही.

एका महिन्याने त्या दलालाचा फोन आला. तारेशनं त्याला घडलेली घटना सांगितली आणि मृत सोमलची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचेच गोठवलेले शुक्राणू वापरून बाळ जन्माला घालण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी दलालानं अजून काही रकमेची मागणी केली. तारेशनं साठवलेला सर्व पैसा खर्च केला.

सगळ्या औपचारिक बाबींची पूर्तता झाली आणि तारेशचे स्पर्म बँकेत सुरक्षित ठेवलेले शुक्राणू अन् आईचं स्त्रीबीज यांचा संयोग घडवून सरोगेट आईच्या गर्भाशयात भ्रूण वाढेल अशी व्यवस्था केली गेली. नऊ महिने पूर्ण झाले अन् बाळाचा जन्म झाला. ती मुलगी होती…सोमलची मुलगी.

एकट्यानं तान्हं बाळ वाढवणं सोपं नाही हे तारेश जाणून होता. पण सोमलचं स्वप्नं पूर्ण करणं हाच त्याच्या आयुष्याचा एकमेव उद्देश उरला होता. त्यासाठी तो मानसिक दृष्ट्याही स्वत:ला सक्षम करत होता.

कॉन्टॅ्रक्टप्रमाणे सरोगेट आईनं दोन महिने मुलीला आपलं दूध पाजलं आणि नंतर तारेशच्या हातात ते बाळ ठेवून ती निघून गेली.

त्या एवढ्याशा मुलीला घेऊन तारेश सोमलच्या घरी गेला. ही मुलगी सोमलची आहे. त्याची इच्छा होती म्हणूनच या मुलीचा जन्म झाला आहे, हे सांगितलं. सोमलची विधवा बहिण राखी पटकन् पुढे आली. तेवढ्यात त्याच्या आईवडिलांनी तिला अडवलं.

तारेश म्हणाला, ‘‘मला ठाऊक आहे, तुम्ही माझा तिरस्कार करता. तुमचा माझ्यावर राग आहे. पण या बाळात तुमच्या मुलाचा अंश आहे. सोमल जिवंत असता तर त्यालाही बाळासाठी आजीआजोबा व आत्याचे आर्शिवाद व प्रेम मिळायला हवं हेच वाटलं असतं. मी हर प्रयत्नानं या बाळाला वाढवीन. मोठं करीन. कारण ही मुलगी सोमलची आहे. तुम्ही तिला नाकारलीत तरी मी तिला वाढवीनच.’’ तो मुलीला घेऊन माघारी वळला.

दाराबाहेर त्याचं पाऊल पडण्याआधीच मागून सोमलच्या आईची हाक ऐकू आली, ‘‘थांब…’’

तारेशनं वळून बघितलं. बाळाचे आजीआजोबा आपले अश्रू पुसत पुढे येत होते.

आजोबा म्हणाले, ‘‘आमचा मुलगा गेला तरी त्याची ही मुलगी आम्ही आमच्यापासून दूर होऊ देणार नाही. आम्ही हिला वाढवू.  उत्तम सांभाळू. आमची दुधावरची साय आहे ती. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही…’’

तो म्हणाला, ‘‘पण, ही मुलगी हे आम्हा दोघांचं स्वप्नं होतं?’’

‘‘होय…तूच या मुलीचा बाप असशील पण आता तिला आईची जास्त गरज आहे…कळतंय ना तुला? तुझी हरकत नसेल तर राखी या बाळाची आई होईल.’’ सोमलची आई म्हणाली.

‘‘पण…पण तुम्हाला खरं काय ते ठाऊक आहे. राखीला मी पत्नीसुख देऊ शकत नाही.’’ गोंधळलेल्या तारेशनं म्हटलं.

‘‘मला पत्नीचं नाही, आईचं सुख हवंय, मी आई होण्याचं सुख अनुभवू इच्छिते.’’

राखीनं पुढं होऊन बाळाला आपल्याकडे घेत म्हटलं.

राकेशला वाटलं, ‘बाळाच्या त्या निरागस चेहऱ्यात जणू सोमलचाच तृप्त, समाधानानं उजळलेला चेहरा तो बघतोय…’

मतपरिवर्तन

कथा * शन्नो श्रीवास्तव

या नव्या कॉलनीत येऊनही मला खरं तर बरेच दिवस झाले होते. पण वेळ मिळत नसल्यानं माझं कुणाकडे जाणं, येणं होत नसे. मुळात ओळखीच झाल्या नव्हत्या. मी शाळेत शिक्षिका होते. सकाळी आठला मला घर सोडावं लागायचं. परतून येईतो तीन वाजून जायचे. आल्यावर थोडी विश्रांती, त्यानंतर घरकाम, कधी बाजारहाट वगैरे करत दिवस संपायचा. कुणाकडे कधी जाणार?

माझ्या घरापासून जवळच अवंतिकाचं घर होतं. तिची मुलगी योगिता माझ्याच शाळेत, माझीच विद्यार्थिनी होती. मुलीला सोडायला ती बसस्टॉपवर यायची. तिच्याशी थोडं बोलणं व्हायचं. हळूहळू आमची ओळख वाढली. मैत्री म्हणता येईल अशा वळणावर आम्ही आलो. सायंकाळी अवंतिका कधीतरी माझ्या घरी येऊ लागली. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या.

तिचं बोलणं छान होतं. राहणी टापटीप होती. तिचे कपडे, दागिने, राहाणीमान यावरून ती श्रीमंत असावी असा माझा कयास होता. नव्या जागी एक मैत्रीण भेटल्यामुळे मलाही बरं वाटत होतं.

योगिता अभ्यासात तशी बरी होती पण तिचा होमवर्क कधीच पूर्ण झालेला नसे. अगदी सुरुवातीला मी तिला एकदा रागावले की होमवर्क पूर्ण का केला नाही, तेव्हा ती रडवेली होऊन म्हणाली, ‘‘बाबा मम्मीला रागावले, ओरडले म्हणून मम्मी रडत होती. माझा अभ्यास घेतलाच नाही.’’

नंतरही तिचा होमवर्क पूर्ण झालेला नसायचा अन् कारण विचारल्यावर ती नेहमीच आईबाबांच्या भांडणाबद्दल सांगायची. अर्थात्च एक टीचर म्हणून कुणाच्याही घरगुती बाबतीत मी नाक खुपसणं बरोबर नव्हतं. पण पुढे जेव्हा आमची मैत्री झाली अन् योगिताच्या अभ्यासाचा प्रश्न असल्यामुळे मी एकदा अंवतिका घरी आलेली असताना तिला याबद्दल विचारलं. तिनं डोळ्यांत पाणी आणून मला सांगितलं, ‘‘घरातल्या अशा गोष्टी बाहेर कुणाजवळ बोलू नयेत हे मला समजतं. पण आता तुम्हाला आमच्या भांडणाबद्दल समजलंच आहे तर मी ही तुमच्याशी बोलून माझ्या मनावरचा ताण कमी करून घेते. खरं तर माझ्या नवऱ्याचा स्वभावच वाईट आहे. ते सतत माझे दोष हुडकून माझ्यावर खेकसत असतात. कितीही प्रयत्न केला तरी हे खूश होत नाहीत. त्यांच्या मते मी मूर्ख अन् गावंढळ आहे. तुम्हीच सांगा, मी वाटते का मूर्ख अन् गावंढळ? मी थकलेय या रोजच्या भांडणांनी…पण सहन करण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाहीए माझ्याजवळ.’’

‘‘मी खरं म्हणजे तुमच्या पतींना भेटलेय दोन चारदा बसस्टॉपवर. त्यांना बघून ते असे असतील असं वाटत नाही.’’

‘‘दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. खरं काय ते जवळ राहणाऱ्यालाच माहीत असतं.’’ ती म्हणाली.

भांडणाचा विषय टाळत मी म्हटलं, ‘‘तुम्ही बोलत होता की तुमचा नवरा बरेचदा ऑफिसच्या कामानं बाहेरगावी जातो. अशावेळी तरी तुम्ही योगिताच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हरकत नाही. कारण घरात तुम्ही दोघीच असता.’’

‘‘मी एकटीनंच का म्हणून लक्ष द्यायचं? मुलगी माझी एकटीची नाही. त्यांचीही आहे. त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव नको का? समजा नाही घेतला तिचा अभ्यास तर निदान सतत खुसपटं काढून माझं डोकं तडकवू नका. मला, तर खरंच असं वाटतं की त्यांनी टूरवरच राहावं. घरी राहूच नये.’’

तिचं बोलणं ऐकून माझं तिच्या नवऱ्याबद्दलचं मत खूपच वाईट झालं. दिसायला तर तो सज्जन, शालीन वाटतो. मोठ्या पोस्टवर आहे म्हणजे शिकलेला असणारच. असा माणूस घरात, आपल्या बायकोशी वाईट वागतो म्हणजे काय? मला त्याचा राग आला.

आता अवंतिका मला तिच्या घरातल्या, आयुष्यातल्या गोष्टी विनासंकोच सांगू लागली. ते ऐकून मला तिच्याविषयी सहानुभूति वाटायची. माझ्या मनात यायचं एका चांगल्या मुलीचं आयुष्य चांगला नवरा न भेटल्यामुळे उगीचच नासतंय. पूवी जेव्हा केव्हा अवंतिकाऐवजी तिचा नवरा योगिताला सोडायला यायचा तेव्हा मी त्याच्याशी बोलायची, पण आता त्यांचं हे रूप कळल्यावर मी त्याला टाळायलाच लागले. जो माणूस पत्नीचा मान ठेवू शकत नाही, तो इतर स्त्रियांना काय मान देणार?

एक दिवस अवंतिका खूपच वाईट मूडमध्ये माझ्या घरी आली. रडत रडतच म्हणाली, ‘‘योगिताच्या स्कूल ट्रिपचे दोन हजार रुपये तुम्ही तुमच्याकडून भरु शकाल का? माझा नवरा टूरवरून परत आला की मी तुमचे पैसे परत करते.’’

मीच योगिताची क्लास टीचर असल्यामुळे मला स्कूल ट्रिपबद्दल माहिती होती. ‘‘मी भरते पैसे’’ मी तिला आश्वस्त केलं. पण तरीही मी विचारलंच की तिला कुणा दुसऱ्याकडून पैसे घेण्याची वेळ का आली?

अवंतिकाचा बांध फुटला जणू. ‘‘काय सांगू तुम्हाला? कसं आयुष्य काढतेय मी या नवऱ्याबरोबर माझं मला ठाऊक. मला भिकाऱ्यासारखं जगावं लागतंय. मला एक एटीएम अकाउंट उघडून द्या म्हटलं तर ऐकत नाहीत. माझ्याकडे कार्ड असलं तर मला अडीअडचणीला पैसे कुणाकडे मागावे लागणार नाहीत. एवढंही त्यांना कळत नाही. त्यांना वाटतं मी वायफळ खर्च करेन. अहो काय सांगू? बाहेरगावी जाताना मला पुरेसे पैसेही देऊन जात नाहीत. आता बघाना, दोन दिवसांच्या टूरवर गेलेत. काल मला एक सूट आवडला तर मी तो विकत घेतला. तीन हजार तर तिथंच संपले. हजार रुपये ब्यूटीपार्लरचे झाले. काल मला स्वयंपाकाचा कंटाळा आला होता म्हणून हॉटेलमधून पिझ्झा मागवला. त्याचे झाले सहाशे रुपये. म्हणजे आता माझ्या हातात फक्त चारशे रूपये उरलेत. शाळेत दोन हजार कुठून भरू? माझ्यापुढे दोनच पर्याय उरलेत एक तर लेकीला सांगायचं, घरी बैस, मुकाट्यानं…शाळेच्या ट्रिपबरोबर जायचं नाही किंवा कुणाकडे तरी हात पसरायचे. लेकीचा उतरलेला चेहरा बघवेना म्हणून शेवटी तुमच्याकडे आले पैसे मागायला.’’

अवंतिकाचा धबधबा थांबला तेव्हा मी विचारात पडले की शाळेच्या ट्रिपचे पैसे बरेच आधी सांगितले होते. पाच हजार रुपये हातात असताना तीन हजाराचा स्वत:चा ड्रेस आणि हजार रुपये ब्यूटीपार्लरवर खर्च करायची गरजच काय होती? दोन हजार रुपये ट्रिपचे भरून झाल्यावर मग इतर खर्चासाठी बाकीचे पैसे ठेवायचे. दोघीच जणी घरात होत्या. योगिताच्या आवडीचा एखादा पदार्थ घरीच केला असता तर पिझ्झाचे सहाशे रुपयेही वाचवता आले असते. कुठलीही जबाबदार गृहिणी, पत्नी किंवा आई स्वत:च्या ड्रेसवर किंवा पार्लरवर असा खर्च करत नाही, करायलाही नको. कदाचित अवंतिकाची ही सवय ठाऊक असल्यामुळेही तिचा नवरा एटीएम तिला उघडून देत नसेल. असो, मी योगिताचे ट्रिपचे पैसे भरले. यथावकाश अवंतिकानं मला माझे पैसे परतही केले. तो विषय तिथेच संपला.

मध्यंतरी काही महिने उलटले. शाळेला ओळीनं तीन दिवसांची सुट्टी होती. त्यामुळे मला बऱ्यापैकी वेळ मोकळा मिळाला होता. अवंतिका नेहमी मला तिच्या घरी बोलवायची पण मला जमत नव्हतं. मी विचार केला या निमित्तानं आपण अवंतिकाच्या घरी एकदा जाऊन यावं. मी तिला तिच्या सोयीची वेळ विचारून घेतली अन् त्या प्रमाणे अमूक दिवशी, अमूक वेळेला तिच्याकडे पोहोचतोय हे फोन करून कळवलं.

मी तिच्या घरी पोहोचले तेव्हा आतून जोरजोरात भांडणाचे आवाज येत होते. डोअरबेल वाजवण्यासाठी उचललेला माझा हात आपोआप खाली आला. तिच्या नवऱ्याचा आवाज ऐकू आला, ‘‘किती वेळा सांगितलंय तुला की माझी सूटकेस नीट पॅक करत जा. पण तू कधीही ते काम नीट करत नाहीस. यावेळी माझी बनियान अन् शेव्हिंग क्रीम ठेवलं नव्हतं. अगं, जिथं आम्हाला थांबवलं होतं ते गेस्ट हाऊस शहरापासून किती लांब होतं तुला कल्पना नाहीए, किती त्रास झाला मला.’’

‘‘हे बघा माझ्यावर ओरडू नका. तुम्हाला माझं काम पसंत पडत नाही तर स्वत:च भरून घेत जा ना आपली बॅग, मला कशाला सांगता?’’

‘‘नेहमी मीच माझी बॅग भरतो ना? पण कधी कधी ऑफिसातून ऐनवेळी टूरवर जाण्याची सूचना होते, अशावेळी घरी येऊन बॅग भरायला वेळ तरी असतो का? तरीही मी तुला तीन तास आधी सूचना दिली होती.’’

‘‘तुमचा फोन आला तेव्हा मी चेहऱ्याला पॅक लावला होता. तो वाळेपर्यंत मी काम करू शकत नव्हते. थोडी आडवी झाले तर मला झोपच लागली. त्यानंतर आलाच की तो तुमचा शिपाई बॅग घ्यायला. घाईत राहिलं काही सामान तर एवढे ओरडताय कशाला?’’

‘‘अगं, पण असं अनेकदा झालंय. बिना बनियान घालता शर्ट घालावे लागले. कलीगकडून शेव्हिंग मागून दाढी करावी लागली. यात तुला काहीच गैर वाटत नाहीए? निदान ‘चुकले, सॉरी’ एवढं तरी म्हणता येतं.’’

‘‘का म्हणायचं मी सॉरी? तुम्हाला तर सतत अशी खुसपटंच काढायला आवडतात. एवढंच आहे तर आणा ना दुसरी कुणी जी तुमची सेवा करेल.’’

अवंतिकाची शिरजोरी बघून मी चकितच झाले. टूरवर नवऱ्याला आपल्या चुकीमुळे त्रास झाला याची तिला अजिबात खंत नव्हती. उलट ती वाद घालत होती. मला तिचं हे वागणं खटकलं. आल्यापावली परत जावं म्हणून मी माघारी वळणार तेवढ्यात आतून अवंतिकाचा नवराच दार उघडून बाहेर आला.

मला बघताच तो एकदम गडबडला, ‘‘मॅम, तुम्ही? बाहेर का उभ्या आहात? या ना आत या.’’ त्यानं मला बाजूला सरून आत यायला वाट करून दिली.

‘‘अगं अवंतिका, मॅडम आल्या आहेत.’’ त्यानं तिलाही आत वर्दी दिली.

मला बघताच अवंतिका आनंदली. नवऱ्याच्या चेहऱ्यावर ओशाळलेपणा होता, पण अवंतिकाच्या चेहऱ्यावर त्याचा मागमूसही नव्हता.

अवंतिकाच्या घरातला पसारा बघून मी हादरेलच. आधीच त्यांचं भांडण ऐकून मन खिन्न झालं होतं. त्यातून ते अस्ताव्यस्त घर बघून तर माझं मन विटलंच. स्वत: अवंतिका कायम चांगले कपडे, मेकअप, व्यवस्थित केस, नेलपेण्ट अशी टेचात असते. पण घर मात्र कमालीचं गचाळ होतं. हॉलमधला सोफा सेट महागाचा होता पण त्यावर मळक्या कपड्यांचा ढीग होता. डायनिंग टेबलवर खरकटी भांडी अन् कंगवा, तेलाची बाटलीही पडून होती. आतून बेडरूममधला पसाराही दिसतच होता. मी मुकाट्यानं कपडे बाजूला सरकवून स्वत:ला बसण्यापुरती जागा करून घेतली.

‘‘मॅम, तुम्ही घरी येणार हे कळल्यावर योगिता खूपच खुश आहे. आत्ता ती मैत्रिणीबरोबर खेळायला गेली आहे. येईल थोड्यावेळात,’’ अवंतिकानं म्हटलं. ती पाणी आणायला आत गेली. तिचा नवरा म्हणाला, ‘‘तुला माहित होतं ना की मॅम येणार आहेत. तरी घर इतकं घाण ठेवलंस? काय वाटेल त्यांना?’’

‘‘त्या कुणी परक्या थोडीच आहेत? त्यांना काही वाटणार नाही. तुम्ही पटकन् मला चहापत्ती अन् खायला काहीतरी आणून द्या.’’ तिनं नवऱ्याला घराबाहेर पिटाळलंच.

अवंतिकाकडे मला धक्क्यावर धक्के बसत होते. तिची घराबाहेरची राहणी, वागणूक अन् घरातला पसारा, नवऱ्याशी भांडण करणं, याचा कुठेच मेळ बसत नव्हता. तीन दिवसांपूर्वीच तिनं माझ्याकडून डबाभर चहापत्ती नेली होती. ती संपलेली चहा पूड अजूनही घरात आली नव्हती. सतत ती मला बोलवायची. म्हणून अगदी ठरवून पूर्वसूचना देऊन मी घरी आले तर घरात ही परिस्थिती.

एकटीनं बाहेर बसण्यापेक्षा तिच्यासोबत स्वयंपाकघरात गप्पा माराव्यात म्हणून मी आत गेले अन् तिथला खरकटवाडा बघून, वास मारणारं सिंक बघून उलट्यापावली परत फिरले.

माझं मत आता बदललं होतं. अवंतिकाला फक्त नटायला, भटकायला, बाहेर खायला आवडत होतं. घरातली जबाबदारी अजिबात नको होती. नवऱ्याविरूद्ध गरळ ओकून ती लोकांकडून सहानुभूती मिळवत होती. नवऱ्यानं दिलेले पैसे नको तिथं उधळून पुन्हा नवरा पैसे देत नाही म्हणून रडत होती. कष्ट करून पैसे मिळवणाऱ्या नवऱ्यालाच दोष देत होती. त्याच्या सुखसोयीचा विचारही तिच्या मनात येत नव्हता.

घाणेरड्या कपातला चहा कसाबसा संपवून मी पटकन् तिथून उठले. आता माझं मत परिवर्तन झालं होतं. अवंतिकाचं खरं रूप माझ्यासमोर आलं होतं.

अवंतिकाचा नवरा खरोखर सज्जन होता. त्याला चांगल्या गोष्टींची आवड होती म्हणूनच घरात असे महागडे सोफे व इतर फर्निचर अन् महागाचे पडदे व सुंदर शोपीसेस होते. एवढा खर्च त्यानं केल्यावर घर स्वच्छ व चांगलं, व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी अर्थात्च अवंतिकाची होती. पण तिला मुळातच या गोष्टींचा कंटाळा असल्यामुळे त्या दोघांची भांडणं होत असावीत. अवंतिकाला नोकरीची दगदग नको होती. म्हणून तिनं हाउसवाइफचा पर्याय निवडला होता, पण तेवढंही काम करणं तिला अवघड होत होतं.

उच्चपदावर काम करणाऱ्या, त्यासाठी भरपूर पगार घेणाऱ्या पुरुषांना नोकरीत अनेक ताणतणाव असतात. अशावेळी घरी परतून आल्यावर स्वच्छ घर, हसऱ्या चेहऱ्याची बायको अन् आपुलकीचे दोन शब्द त्यांना हवे असतात. पण अवंतिकाच्या घरात स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यवस्थिपणा अन् प्रेमाच्या शब्दांचाही अभावच होता. तिच्या नवऱ्याला तिचं वागणं अन् एकूणच कामाची पद्धत आवडत नव्हती यात नवल काय? एवढं करून ती त्यालाच दोष देत होती. वाईट ठरवत होती. मीच नाही का तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तिच्या नवऱ्याविषयी वाईट मत करून घेतलं होतं? मलाही वाटलं होतं की हा माणूस बायकोचा मान ठेवत नाही. तिला पैसे देत नाही, घराकडे लक्ष देत नाही.

परिस्थिती उलटी होती. तो माणूस सज्जन होता. बायको, मुलीसाठी भरपूर पैसा खर्च करत होता. पण त्याला सुख नव्हतंच. माद्ब्रां मतपरिवर्तन झालं होतं. आता माझ्या मनात अवंतिकाविषयी राग होता अन् तिच्या नवऱ्याविषयी आदर.

दोन्ही हातात लाडू

कथा * सुनीता भटनागर

ऑफिसमधले सर्व सहकारी रंजनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मागे लागले होते. खरं तर त्यांनी तिच्यावर दबावच आणला होता. तिने मोहितला फोन केला, ‘‘ही सगळी मंडळी उद्याच्या वेडिंग अॅनव्हरसरीची पार्टी मागताहेत. मी त्यांना काय सांगू?’’

‘‘आईबाबांना विचारल्याशिवाय कुणालाही घरी बोलावणं बरोबर नाही.’’ मोहितच्या आवाजात काळजी होती.

‘‘पण मग यांच्या पार्टीचं काय?’’

‘‘रात्री विचार करुन ठरवूयात.’’

‘‘ओ. के.’’

रंजनाने फोन बंद केला. त्याचं म्हणणं तिने सर्वांना सांगितलं तसे सगळे तिला ताणायला लागले. ‘‘आम्ही व्यवस्थित गिफ्ट घेऊन येऊ. फुकट पार्टी खाणार नाही.’’

‘‘अगं, सासूला इतकी घाबरून राहाशील तर सगळं आयुष्य रडतंच काढावं लागेल.’’

थोडा वेळ सर्वांचं ऐकून घेतल्यावर रंजनाने एकदम मोठ्या आवाजात म्हटलं, ‘‘हे बघा, माझं डोकं खाणं बंद करा. मी काय सांगतेय ते नीट लक्षपूर्वक ऐका. उद्या, म्हणजे रविवारी, रात्री आठ वाजता तुम्ही सर्व जेवायला ‘सागररत्न’ रेस्टॉरण्टमध्ये येता आहात. गिफ्ट आणणं कम्पल्सरी आहे अन् गिफ्ट चांगली आणा. आणायचं म्हणून आणू नका. गिफ्ट घरी विसरून येऊ नका.’’

तिच्या या घोषणेचं सर्वांनीच टाळ्या वाजवून स्वागत केलं.

ऑफिस सोडण्यापूर्वी संगीता मॅडमने तिला एकटीला गाठून विचारलं, ‘‘रंजना, तू हे पार्टीचं आमंत्रण देऊन स्वत:वर संकट तर नाही ना ओढवून घेतलंस?’’

‘‘आता जे होईल ते बघूयात, मॅडम,’’ रंजनाने हसून म्हटलं.

‘‘बघ बाई, घरात फारच टेन्शन असलं तर मला फोन कर. मी सगळ्यांना पार्टी कॅन्सल झाल्याचं कळवेन. फक्त उद्याचा दिवस तू रडू नकोस, उदास अन् दु:खी होऊ नकोस..प्लीज…’’

‘‘नाही मॅडम, जे काही रडायचं होतं ते मी गेल्यावर्षी पहिल्या मॅरेज अॅनव्हरसरीलाच आटोपून घेतलंय. तुम्हाला माहीतंच आहे सगळं.’’

‘‘हो गं! तेच सगळं आठवतंय मला.’’

‘‘माझी काळजी करू नका मॅडम; कारण एका वर्षात मी खूप बदलले आहे.’’

‘‘हे मात्र खरंय. तू खूप बदलली आहेस. सासूचा संताप, सासऱ्याचं रागावणं, नणंदेचं टोचून, जिव्हारी लागेल असं बोलणं याचा अजिबात विचार तुझ्या मनात नाहीए. तू बिनधास्त आहेस. हे खरंच कौतुकास्पद आहे.’’

‘‘हो ना मॅडम, आता मी टेन्शन घेत नाही. उगाचच भिऊनही राहात नाही. उद्या रात्री पार्टी नक्की होणार. तुम्ही सरांना अन् मुलांना घेऊन वेळेवर पोहोचा.’’ रंजनाने हसून त्यांचा निरोप घेत म्हटलं.

रंजनाने त्यांची परवानगी न घेता ऑफिस स्टाफला पार्टी द्यायची ठरवलंय हे ऐकून तिची सासू एकदम भडकली. ज्वालामुखीचा स्फोट म्हणायला हरकत नाही.

‘‘आम्हाला न विचारता असे निर्णय घ्यायचा हक्क तुला कुणी दिला, सूनबाई? इथल्या शिस्तीप्रमाणे, नियमांप्रमाणे वागायचं नसेल तर सरळ वेगळं घर करून राहा.’’

‘‘आई, ते सगळे माझ्या इतके मागे लागले होते की काय सांगू? पण तुम्हाला जर ते आवडलं नसेल तर मी सगळ्यांनाच फोन करून पार्टी कॅन्सल केल्याचं कळवून टाकते,’’ अगदी शांतपणे बोलून रंजनाने तिथूच काढता पाय घेतला. ती सरळ स्वयंपाकघात जाऊन कामाला लागली.

सासू अजूनही संतापून बडबडत होती. तेवढ्यात रंजनाची नणंद म्हणाली, ‘‘आई, वहिनीला जर स्वत:च्याच मर्जीने वागायचं आहे तर तू उगीचच आरडाओरडा करून स्वत:चं अन् आमचंही डोकं का फिरवते आहेस? तू इथे तिच्या नावाने शंख करते आहेस अन् ती मजेत आत गाणं गुणगुणते आहे. स्वत:चाच पाणउतारा करून काय मिळतंय तुला?’’

संतापात आणखी तेल ओतणारं आपल्या लेकीचं वक्तव्य ऐकून सासू अधिकच बिथरली. खूप वेळ तिची बडबड सुरूच होती.

रंजना मात्र शांतपणे कामं आवरत होती. सर्व स्वयंपाक तिने व्यवस्थित टेबलवर मांडला अन् मोठ्यांदा म्हणाली, ‘‘जेवायला चला, जेवण तयार आहे.’’

सगळी मंडळी डायनिंग टेबलाशी येऊन बसली. नणंद, सासू अन् नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग अजून दिसत होता. सासरे मात्र हल्ली निवळले होते. सुनेशी चांगलं वागायचे. पण सासू त्यांना सतत धाकात ठेवायची. आत्ताही ते काही तरी हलकंफुलकं संभाषण काढून वातावरण निवळावं असा प्रयत्न करत होते पण सासूने एक जळजळीत दृष्टिक्षेप त्यांच्याकडे टाकून त्यांना गप्प बसवलं.

रंजना अगदी शांत होती. प्रेमाने सर्वांना वाढत होती. नणंदेच्या कडवट खोचक बोलण्यावर ती हसून गोड भाषेत उत्तर देत होती. सासूला रंजनाच्या गप्प बसण्यामुळे भांडण वाढवता आलं नाही.

आपल्या खोलीत ती पोहोचली तेव्हा मोहितनेही आपला राग व्यक्त केलाच. ‘‘इतर कुणाची नाही तर निदान माझी परवानगी तरी तू निर्णय घेण्यापूर्वी घ्यायला हवी होतीस. मला तुझा निर्णय मान्य नाही. मी उद्या पार्टीला असणार नाही.’’

खट्याळपणे हसत, खांदे उडवून रंजनाने म्हटलं, ‘‘तुमची मर्जी.’’ अन् त्याला काही कळायच्या आत त्याच्या गालावर एक चुंबन देऊन ती वॉशरूमकडे गेली.

रात्री बारा वाजता रंजनाच्या मोबाइलचा अलार्म वाजल्यामुळे दोघांचीही झोप मोडली. ‘‘हा अलार्म का वाजतोए?’’ मोहितने तिरसटून विचारलं.

‘‘हॅप्पी मॅरेज अॅनव्हसरी स्वीट हार्ट.’’ त्याच्या कानाशी ओठ नेऊन अत्यंत प्रेमासक्त स्वरात रंजनाने म्हटलं.

रंजनाचा लाडिक स्वर, तिच्या देहाला येणारा सेंटचा मादक सुगंध अन् डोळ्यातलं आमंत्रण बघून मोहित तर राग विसरला, सुखावला अन् त्याने रंजनाला मिठीत घेतलं.

त्या रात्री रतिक्रीडेत आपलं सर्व कौशल्य पणाला लावून रंजनाने मोहितला तृप्त केलं. नकळत तो बोलून गेला. ‘‘इतकी चांगली गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.’’

तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत, रंजनाने विचारलं, ‘‘उद्या माझ्याबरोबर चलाल ना?’’

‘‘पार्टीला?’’ मघाचं सर्व प्रेमबीम विसरून मोहितने कपाळावर आठ्या घालत विचारलं.

‘‘इश्श! मी सकाळी पार्कात फिरायला जाण्याबद्दल विचारत होते.’’

‘‘असं होय? जाऊयात की!’’

‘‘खरंच? किती छान आहात हो तुम्ही.’’ त्याला मिठी मारत रंजनाने शांतपणे डोळे मिटून घेतले.

सकाळी सहालाच उठून रंजनाने आपलं आवरलं. छानपैकी तयार झाली. जागा झालेल्या मोहितने तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘यू आर ब्यूटीफूल.’’ रंजनाला हे कौतुक सुखावून गेलं.

मोहित तिला जवळ घेणार तेवढ्यात त्याला चुकवून हसत हसत ती खोलीबाहेर पडली.

स्वयंपाकघरात जाऊन तिने सर्वांसाठी चहा केला. सासूसासऱ्यांच्या खोलीत चहाचा ट्रे नेऊन ठेवला अन् त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

चहाचा कप हातात घेत सासूशी रागाने तिच्याकडे बघत विचारलं, ‘‘सकाळी सकाळीच माहेरी जाते आहेस का?’’

‘‘आम्ही पार्कात फिरायला जातोए, आई,’’ अगदी नम्रपणे रंजनाने म्हटलं.

सासूबाईंनी काही म्हणण्याआधीच सासरे चहा पिता पिता म्हणाले, ‘‘जा, जा, सकाळी फिरणं आरोग्याला हितकारक असतं. तुम्ही अवश्य जा.’’

‘‘जाऊ ना, आई?’’

‘‘कुठलंही काम करण्यापूर्वी माझी परवानगी घेणं कधी सुरू केलंस, सूनबाई?’’

आपला राग व्यक्त करण्याची संधी सासूबाईंनी सोडली नाही.

‘‘आई, तुम्ही माझ्यावर अशा रागावत जाऊ नका ना? आम्ही लवकरच येतो,’’ म्हणत लाडक्या लेकीने आईच्या गळ्यात पडावं तशी ती सासूच्या गळ्यात पडली अन् त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या गालाचा हलकेच मुका घेऊन प्रसन्न वदनाने खोलीबाहेर पडली.

बावचळलेल्या सासूला बोलणं सुधरेना. सासरे मात्र खळखळून हसले.

मोहित आणि ती पार्कात पोहोचली तेव्हा तिथे त्यांच्या परिचयाचे अनेक लोक वॉकसाठी आले होते. वॉक घेऊन ती दोघं तिथल्या प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात गेली. दोघांनी फेमस आलू कचोरी अन् जिलेबी खाल्ली. घरच्या लोकांसाठी बांधून बरोबर घेतली.

आठ वाजता ती घरी पोहोचली अन् बरोबर आणलेल्या वस्तू ब्रेकफास्ट टेबलवर मांडून सर्वांना खायला बोलावलं. इतका चविष्ट अन् रोजच्यापेक्षा वेगळा नाश्ता बघूनही सासू व नणंदेची कळी खुलली नाही.

दोघीही रंजनाशी बोलतंच नव्हत्या. सासरेबुवांना आता काळजी पडली. बायको अन् मुलगी दोघींचीही सुनेच्या बाबतीतली वागणूक त्यांना अजिबात आवडत नव्हती. पण ते बोलू शकत नव्हते. एक शब्द जरी ते सुनेची कड घेऊन बोलले असते तर मायलेकींनी त्यांना फाडून खाल्लं असतं.

ब्रेकफास्ट अन् दुसरा चहा आटोपून रंजना आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने ती खूप छान नटूनथटून आली अन् स्वयंपाकाला लागली. नणंदेने तिला इतकी सुंदर साडी स्वयंपाक करताना नको नेसू असं सुचवलं, त्यावर ती हसून म्हणाली, ‘‘त्याचं काय आहे वन्स, तुमच्या भावाने आज या साडीत मी फार छान दिसतेय असं म्हटलं आहे. त्यामुळे आता ही साडी अन् हा सगळा साजशृंगार मी रात्रीच उतरवणार आहे.’’

‘‘अगं, पण इतक्या महाग साडीवर डाग पडतील, ती भिजेल, चुरगळेल याची भीती किंवा काळजी नाही वाटत तुला?’’

‘‘भीती अन् काळजीला तर मी कधीच ‘बाय बाय’ केलंय, वन्स.’’

‘‘माझ्या मते एखादा मूर्खच आपल्या वस्तुच्या नुकसानीची काळजी करत असेल.’’ संतापून मेधा म्हणाली.

‘‘मला वाटतं, मी मूर्ख नाहीए, पण तुमच्या भावाच्या प्रेमात मात्र पार वेडी झाले आहे. कारण तो फार चांगला आहे, तुमच्यासारखाच!’’ हसत हसत रंजनाने लाडाने मेधाचा गालगुच्चा घेतला अन् तिची गळाभेट घेतली. अकस्मात घडलेल्या या प्रसंगाने मेधा बावचळली, गोंधळली अन् मग स्वत:ही हसायला लागली.

रंजनाने फक्त एक भाजी बाहेरून मागवली होती. बाकी सर्व स्वयंपाक तिने घरीच केला होता. ‘पनीर पसंदा’ ही भाजी मोहितला अन् मेधाला फार आवडते त्यासाठी तिने मुद्दाम ती बाहेरून मागवली होती.

जेवायला सर्व मंडळी टेबलापाशी आली तेव्हा आवडता मेन्यू बघून मेधाची कळी खुलली मात्र सासूबाईंनी राग बोलून दाखवलाच.

‘‘हल्लीच्या मुलींना ना, उठसूठ पैसे खर्च करायचा सोस आहे. पुढे येणारा काळ कसा असेल सांगता येत नाही, त्यासाठीच आधीपासून बचत करून पैसा शिल्लक टाकावा लागतो. जे लोक पैसा वाचवत नाहीत त्यांना पुढे पश्चात्ताप करावा लागतो.’’

रंजनाने वाढता वाढता हसून म्हटलं, ‘‘खरंच आई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.’’ त्यानंतर जेवणं मजेत झाली. सासूच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला रंजना हसून प्रतिसाद देत होती.

त्या दिवशी गिफ्ट म्हणून मोहितला शर्ट अन् रंजनाला साडी मिळाली. त्यांनीही मेधाला तिचा आवडता सेंट, आईंना साडी अन् बाबांना स्वेटर दिला. गिफ्टच्या देवाण-घेवाणीमुळे घरातलं वातावरण जरा आनंदी अन् चैतन्यमय झालं.

सगळ्यांनाच ठाऊक होतं रात्री आठ वाजता ‘सागररत्न’मध्ये पार्टी आहे. पण सहाच्या सुमारास जेव्हा मोहित हॉलमध्ये आला तेव्हा एकूणच वातावरण भयंकर टेन्स असल्याचं त्याला जाणवलं.

‘‘तुम्हाला पार्टीला जायचं आहे तर आमच्या परवानगीविना जा,’’ त्याच्याकडे लक्ष जाताच आईने ठणकावून सांगितलं.

‘‘आज खरं म्हणजे आपण सगळे मिळून कुठे फिरायला किंवा सिनेमाला गेलो असतो तर चांगलं झालं असतं,’’ मेधाने फुणफुण केली.

‘‘रंजना पार्टीला जायचं नाही, म्हणतेय,’’ मोहितच्या या बोलण्यावर ती तिघंही दचकली.

‘‘सूनबाई पार्टीला का जाणार नाही म्हणतेय?’’ काळजीच्या सुरात बाबांनी विचारलं.

‘‘तिचं म्हणणं आहे, तुम्ही तिघं पार्टीला आला नाहीत, तर तीही पार्टीला जाणार नाही.’’

‘‘अरे व्वा? नाटक करायला छान येतंय सुनेला,’’ वाईट तोंड करत सासूबाई वदल्या.

मोहित डोळे मिटून सोफ्यावर गप्प बसून होता. त्या तिघांचेच वाद सुरू होते.

शेवटी बाबांनी अल्टिमेटम दिलं. ‘‘आपल्या सूनबाईचा असा अपमान करण्याचा काहीच हक्क नाहीए. तिच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा आपल्याबद्दल किती वाईट समज होईल याचा विचार करा. अन् शेवटचं सांगतोय, तुम्ही दोघी पटापट आवरा अन् आपण निघूयात. तुम्ही माझं ऐकलं नाही तर आजपासून मी या घरात जेवण घेणार नाही.’’ बाबांची धमकी मात्र लागू पडली.

सर्व कुटुंब अगदी बरोबर वेळेत ‘सागर रत्न’ला पोहोचलं. रंजनाच्या सहकाऱ्यांचं स्वागत सर्वांनी मिळून, प्रेमाने, आपलेपणाने केलं. संपूर्ण कुटुंब असं प्रसन्न मुद्रेत बघून सर्व पाहुणे मनोमन चकित अन् हर्षिंत झाले होते.

पार्टी छानच झाली. भरपूर गिफ्ट्स मिळाल्या. हास्यविनोदात वेळ इतका छान गेला. त्यासोबत चविष्ट जेवण. होस्ट अन् गेस्ट सगळेच खूष होते.

संगीता मॅडमने तेवढ्यात रंजनाला एकटीला एकीकडे गाठून विचारलं, ‘‘कसं काय राजी केलंस तू सर्वांना?’’

रंजनाचे डोळे चमकले. हसून ती म्हणाली, ‘‘आज मी तुम्हाला माझ्यातला बदल कसा झाला ते सांगते.’’

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी खूप रडले. दु:खी झाले. रात्री पलंगावर पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं, मला रडताना बघून त्यावेळी कुणी हसत नव्हतं. पण मला उदास, दु:खी बघून माझ्या सासूच्या व नणंदेच्या डोळ्यांत आसूरी आनंद दिसत होता. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की घरातल्या खास आनंदाच्या प्रसंगी कुरापत काढून, समारंभाचा विचका करून, दुसऱ्याला दु:खी करूनच काही लोकांना आनंद मिळतो. हा साक्षात्कार झाला अन् मी ठरवलं यापुढे या लोकांना तशी संधीच द्यायची नाही. आपला आनंद आपण जपायचा. विनाकारण वाद घालायचा नाही. चेहरा पाडायचा नाही, गप्प बसायचं, प्रसन्न राहायचं.

लोकांना मी दोन कॅटेगरीत टाकलंय. काही लोक माझ्या आनंदाने सुखावतात, आनंदी होतात. काहींना माझा आनंद सहन होत नाही. मी या दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांना भाव देत नाही. त्यांना जे करायचं आहे ते करू देत, आपण शांतच राहायचं. प्रेमाने वागायचं.

आता वन्स काय, सासूबाई काय कुणीच मला चिडवू शकत नाहीत, रडवूही शकत नाहीत. मोहितलाही मी सतत तृप्त ठेवते. त्यामुळे आमच्यात भांडणं होत नाहीत अन् तोही माझं ऐकतो.

पूर्वी मी रडायची. आता हसत असते. आपला आनंद, आपल्या मनाची शांतता का म्हणून कुणाला हिरावून घेऊ द्यायची?

ज्यांना मला दु:खी करायचं असतं, ते मला प्रसन्न बघून स्वत:च चिडचिडतात, त्रासतात. मला काहीच करावं लागत नाही अन् त्यांना धडा मिळतो. माझ्या शुभचिंतकांना तर माझा आनंद हवाच असतो. मीही प्रसन्न तेही प्रसन्न!

आता माझ्या दोन्ही हातात लाडू आहेत. मी मजेत जगते आहे. एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे की आपण आनंदी राहातो तेव्हा आपला राग करणारी माणसंही हळूहळू निवळतात. माझी सासू अन् नणंद त्यामुळेच इथे आल्या आहेत आणि त्यांच्या येण्याने मी अधिकच आनंदात आहे.

संगीता मॅडमनने प्रेमाने तिला आलिंगन देत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ‘‘तुझ्यासारखी सून सर्वांना मिळो गं पोरी…अगदी मलासुद्धा!’’ त्या कौतुकाने बोलल्या.

‘‘व्वा! मॅडम किती छान कॉम्प्लिमेंट दिलीत. थँक्यू व्हेरी मच.’’ त्यांच्याशी हस्तांदोलन करताना रंजनाच्या डोळ्यांत अश्रू आले पण ते आनंदाचे अन् समाधानाचे होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें