कथा * पूनम औताडे
रात्रीचा एक वाजला होता. स्नेहा अजूनही घरी परतली नव्हती. सविताच्या फाटकापासून घरापर्यंत फेऱ्या सुरू होत्या. ती फार काळजीत होती. पती विनय आपल्या स्टडीरूममध्ये काम करत होते. सविताची बेचैनी त्यांना कळत होती. ते एका मोठ्या फर्ममध्ये सी.ए. होते. काम तसंच ठेवून ते स्टडीरूममधून बाहेर आले. सविताला दिलासा देत ते म्हणाले, ‘‘तू झोप आता...मी अजून जागा आहे. मी बघतो.’’
‘‘झोपू तरी कशी? झोप यायला हवी ना? पोरीला समजावून समजावून थकले...पण तिला समजतच नाही...’’
तेवढ्यात कार थांबल्याचा आवाज आला. स्नेहा कारमधून उतरली. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मुलाशी काहीतरी बोलली...जोरात हसली अन् घराकडे आली. विनय अन् सविताला जागे बघून म्हणाली, ‘‘ओ मॉम, डॅड, तुम्ही अजून जागेच आहात?’’
‘‘तुझ्यासारखी मुलगी असल्यावर झोप कशी येणार? तुला आमच्या तब्येतीचीही काळजी नाहीए का गं?’’
‘‘म्हणून मी काय लाइफ एन्जॉय करणं सोडून देऊ का? ममा, डॅड, तुम्ही बदलत्या काळाबरोबर बदलत का नाही? ‘सायंकाळी सातच्या आत घरात’ असं नसतं हल्ली.’’
‘‘कळतंय मला, पण काळ रात्री दीडपर्यंत बाहेर राहण्याचाही नाहीए,.’’
‘‘तुमचं भाषण ऐकायच्या मूडमध्ये मी नाहीए. उगीचच तुम्ही काळजी करत बसता. आता गुडनाईट,’’ कुठलं तरी गाणं गुणगुणत ती आपल्या बेडरूममध्ये गेली.
सविता आणि विनयनं एकमेकांकडे बघितलं. त्यांच्या नजरेत काळजी अन् उदासपणा होता. ‘‘चल, झोपूयात. मी कागदपत्रं आवरून आलोच,’’ विनयनं म्हटलं.
सविताला झोप येत नव्हती. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. एकुलत्या एका लाडक्या पोरीला कसं समजवायचं, हेच तिला कळत नव्हतं. सविता स्वत: गावातील एक प्रसिद्ध वकील होती. तिचे सासरे सुरेश रिटायर्ड सरकारी अधिकारी होते. त्या एका घरात मोजून चार माणसं होती. स्नेहाला सगळ्यांकडून प्रेम अन् कौतुकच वाट्याला आलं होतं. खरं तर आईवडिलांनी चांगलं वळण लावलं होतं, पण ती थोडी मोठी होता होता तिचं वागणं बदलत गेलं. ती आत्मकेंद्री झाली. फक्त आपलाच विचार, लाइफ एन्जॉय करणं, अत्याधुनिक वेशभूषा, वागण्यात निर्लज्जपणा...नित्य नवे बॉयफ्रेण्ड, एकाशी ब्रेकअप केला की दुसरा बघायचा. त्याच्याशी नाही पटलं तर तिसरा. पार्ट्यांना जायचं, डान्स करायचा, सेक्स करणं तिच्या दृष्टीनं आधुनिकपणा होता. सविता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायची, पण स्नेहा ऐकून न घेता भांडणं करायची. आईशीही अत्यंत वाईट भाषेत बोलायची. स्नेहा सुरेश आजोबांची फार लाडकी होती. त्यांनीच तिला लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये पाठवून तिचं शिक्षण केलं होतं. ती आता एका लॉ फर्ममध्ये अॅनालिस्ट म्हणून काम करत होती. सविता अन् विनयचे खूपच घनिष्ठ मित्र होते अभय आणि नीता. ती दोघंही सी.ए. होती अन् त्यांचा मुलगा राहुल वकील होता.