कथा * प्रियदर्शिनी
त्या वेळच्या किटी पार्टीची थीम ‘वनपीस’ होती. पार्टी निशाच्या घरी होती. निशा म्हणजे एकदम मॉडर्न, स्मार्ट, स्लिम अॅन्ड फिट. अशा थीम्स तिलाच सुचायच्या. मागची भिशी अमिताकडे झाली, तेव्हाच निशानं सांगून टाकलं होतं, ‘‘माझ्या पार्टीची थीम ‘वनपीस’ आहे.’’
यावर गोल गुबगुबीत नेहानं तिला म्हटलं, ‘‘वेड लागलंय का तुला? सोसायटीत कार्टून म्हणून बघतील आमच्याकडे. आमचं काय वय आहे का ‘वनपीस’ घालण्याचं?’’
निशा तशी आडमुठीच, थोडी हट्टीसुद्धा. तिनं शांतपणे म्हटलं, ‘‘जो घालणार नाही, त्याला दंड भरावा लागेल.’’
नेहानं गुरूगुरत विचारलं, ‘‘किती घेशील दंड? १०० रुपयेच ना? दिला...’’
‘‘नाही, शंभर रुपये नाही, किमान हजार रुपये, शिवाय हॉटेलात डिनर.’’
दोघींचं बोलणं ऐकणाऱ्या अंजलीनं गोडीनं म्हटलं, ‘‘निशा, प्लीज...‘वनपीस’ नको ना, दुसरं काही ठरव. का उगीच लोकांना या वयात आपल्यावर हसण्याची संधी द्यायची?’’
‘‘नाही. सगळ्यांनी वनपीसमध्ये यायचं. ठरलं म्हणजे ठरलं.’’
रेखा, मंजू, दीया, अनिता, सुमन, कविता, नीरा या सगळ्या आपापल्या प्रोग्रॅम ठरवू लागल्या.
रेखानं म्हटलं, ‘‘तू तशी हट्टीच आहेस, पण निशा अगं, माझ्या घरात सासूसासरे आहेत याचा तरी विचार कर. माझ्या नवऱ्याला एक वेळ मॅनेज करेन मी, पण सासूबाईंचं काय? त्यांच्या समोरून वनपीस घालून कशी निघणार मी?’’
‘‘तर पर्समध्ये घालून आण. माझ्या घरी येऊन बदलता येतं ना?’’ निशाजवळ उत्तर तयार होतं.
‘‘हो हो, हे जमेल बरं का?’’
मंजू, दीया, अनिता यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांच्याकडे असे ड्रेसेस असायचे. त्या घालायच्याही. पण नीरा, अनिता, सुमन आणि कवितानं त्यांची अडचण सांगितली. ‘‘आमच्याकडे वनपीस ड्रेस नाहीए. मग?’’
‘‘मग? मग काय? विकत घ्या. असे प्रसंग तर आता येतच राहतील?’’ शांतपणे निशानं म्हटलं.
त्याही सगळ्या ड्रेस विकत घ्यायला तयार झाल्या.
अंजलीचा प्रॉब्लेम जरा वेगळा होता. ती म्हणाली, ‘‘अगं, अनिलना असे मॉडर्न ड्रेस आवडतात, पण माझी तरूण मुलं हल्ली फारच कटकट करत असतात. त्यांना मी साडीखेरीज इतर कोणताही पोशाख घातलेला खपत नाही...मला नाही वाटतं की मला ती पोरं वनपीस घालू देतील.’’