* रोहित सिंह
वडीलधाऱ्या माणसांच्या हातावर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, पण त्यांना रिल्स पाहाण्याची वाईट सवय लागली आहे. फोन वापरण्यास सक्षम झालेली ही वडीलधारी मंडळी थरथरत्या हातांनी सतत रिल्स पाहाण्यात व्यस्त आहेत. पूर्वी तेच आपल्या लहान मुलांना वेळेचे महत्त्व सांगायचे. जेव्हा वेळ नसायचा तेव्हा जुन्या गोष्टी सांगायचे, पण आता ते स्वत:च तासन्तास मोबाईलवर असतात.
या लोकांनाही मोबाईलचा मोह आवरता आलेला नाही. त्यांच्या एका डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे, तरीही एका डोळ्यावर पांढरी पट्टी लावलेली असतानाही ते दुसऱ्या डोळ्याने रिल्स पाहाण्यात व्यस्त आहेत. जोपर्यंत कोणी त्यांना रोखत नाहीत तोपर्यंत ते आपली नजर स्क्रीनवरून दूर करत नाहीत.
रिल्स पाहाण्याचे वेड इतके आहे की, सून स्वयंपाकघरातून ‘बाबा, दिवाणखान्यात जेवायला या’, अशी हाक मारत असतानाही ते त्यांच्या खोलीत मोबाईल पाहाण्यात व्यस्त आहेत. जेवण थंड होत आले तरी ते काही अंथरुणातून उठत नाहीत.
आश्चर्याची गोष्ट
जे वडील आधी घाई करून वेळेवर जेवणाचे महत्त्व सांगायचे, आता त्यांनाच मोबाईल वाजवून जेवणाला बोलवावे लागत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते जेवतानाही रिल्स बघत आहेत. थोडा वेळ फोन बाजूला ठेवायला सांगितले तर ते नाराज होऊन जेवण जेवायचे सोडून देत आहेत.
सासूचीही तीच अवस्था आहे. पूर्वी ज्या सासूबाईंचे काम दिवसभर आपल्या सुनेवर लक्ष ठेवणे, तिला डाळ- मिठाचे भाव सांगणे, तिला सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देणे, तिला सतत टोमणे मारायचे होते, त्या सासूही आता अलार्म वाजल्याशिवाय उठत नाहीत. अलार्मदेखील ४-५ लावावे लागतात. पहिल्या वेळी तो वाजल्यावर केवळ पापण्यांचीच हालचाल होते.
या वृद्धांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. रात्री उशिरापर्यंत जागे राहिले जात आहे. सासू आणि सून एकाचवेळी झोपून उठतात. घरात अगदी समान वातावरण आहे. नव्या जमान्यातील सून रिल्स बनवताना आपल्याच सासूला त्यात ओढत आहेत. स्वत: नाच करताना चार उड्या मारत आहेत तर एक उडी सासूला मारायला लावत आहे. सासूही आता गाण्यांवर लिप्सिंग करायला शिकली आहे. ‘मेरे पिया गये रंगून...’ ऐवजी आता ती ‘तेरे वास्ते फलक से चाँद...’ हे गाणे गुणगुणत आहे.





