कथा * प्राची भारद्वाज
गिरीश सायंकाळी ऑफिसातून घरी आला, तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. पण आता त्याला या गोष्टीची सवय झाली होती. अशावेळी त्याला चेतन भगतचं वाक्य आठवायचं, ‘‘घरच्या पुरूषानं गरम पोळीचा हट्ट धरला नाही तर त्या घरातली स्त्री घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसह स्वत:चं करियरही उत्तम सांभाळू शकेल,’’ या वाक्यामुळे तो शांत चित्ताने वावरू शकायचा. सुमोनाच्या अन् त्याच्या पहिल्या भेटीत तिनं ऐकवलं होतं, ‘‘माझा स्वत:चा मेंदू आहे तो स्वत:चा विचार करतो अन् त्याप्रमाणेच चालतो.’’
तिचा तडकफडक स्वभाव, तिचा फटकळपणा वगैरे लक्षात आल्यावरही तिच्यावर भाळलेल्या गिरीशनं तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. अन् एकदा लग्न झाल्यावर त्यानं कायम सहकार्यही केलं.
घरकामात तो तिला जमेल तेवढी मदत करायचा. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तो वॉशिंगमशीनमधून कपडे धुवून वाळत घालायचा. तेवढ्या वेळात सुमोना दोघांचे डबे अन् ब्रेकफास्ट बनवायची. बाई नाही आली तर सुमोना केरफरशी करायची, तोवर तो भांडी धुवून ठेवायचा. पण त्याला स्वयंपाकघरात मात्र काही करता येत नव्हतं. एकटा कधीच राहिला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर स्वयंपाक करायची वेळच आली नव्हती. आधी आईच्या हातचं जेवायचा. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, तेव्हा अॅफिसच्या कॅन्टीनचं जेवण जेवू लागला. तेवढ्यात घरच्यांनी लग्न करून दिलं अन् सुमोनानं स्वयंपाकघर सांभाळलं.
घरात आल्यावर एक ग्लास गार पाणी पिऊन गिरीश घर आवरू लागला. अजून सुमोना घरी आली नव्हती. आज बाईनं दांडी मारली. त्यामुळे सकाळी अगदी गरजेचं तेवढंच घरातलं आटोपून दोघंही ऑफिसला गेली होती.
‘‘अरे, तू कधी आलास? मला यायला जरा उशिरच झाला.’’ घरात येता येता सुमोनानं म्हटलं.
हॉलमधलाला पसारा आवरत गिरीश म्हणाला, ‘‘हा काय एवढ्यातच आलोय, जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील.’’
‘‘आज आमच्या टीममध्ये पुन्हा जोरदार वादविवाद झाला. त्यामुळेच थोडा उशीर झाला. त्या संचितला ओळखतास ना?’’
तो म्हणाला, ‘‘बायकांना प्रमोशन सहज मिळतं...बस्स, बॉसकडे हसून बघायचं की मिळालं प्रमोशन...’’ हे काय बोलणं झालं? मला रागच आला...मीही ऐकवलं त्याला, ‘‘आम्ही ही अभ्यास करतो, मेहनतीनं चांगले मार्क मिळवून डिग्री घेतो अन् कॉम्पिटिशनमध्ये बरोबरीनं राबून नोकरीतलं प्रमोशन मिळवतो. खरं तर आम्हालाच उलट घर, मुलं अन् नोकरी सांभाळताना जास्त श्रम करावे लागतात. ग्लास सीलिंगबद्दल ऐकलं नाहीए बहुतेक.’’