* शैलेंद्र सिंह
नेहाचे लग्न होऊन ५ वर्ष उलटलीत. ती तिच्या पतीसोबत इतकी खुश होती की तिला कशाचेही भान नसायचे. तिचा पती तिला समजावत असे, तेव्हा ती म्हणत असे की तू असताना मला हे सगळे समजून घ्यायची काय गरज आहे. त्यामुळे राकेशला स्वत:चे बरेचसे काम स्वत:लाच सांभाळावे लागायचे. सगळे पैशांचे हिशोब तो स्वत:च ठेवायचा. तिला पैसे तेवढेच हवे असायचे, जेवढे तिला खर्चाला लागायचे.
अचानक राकेशला काही काळ सरकारी कामासाठी परदेशी जावे लागले. सुरुवातीला तर नेहा खुश होती की तिलाही जायला मिळेल. पण जेव्हा सरकारने परवानगी नाकारली, तेव्हा तिला घरी एकटे राहावे लागले. आता घराची सगळी जबाबदारी नेहावरच आली. पण तिने कधी घरातले काम समजून घेतले नव्हते. त्यामुळे तिच्यासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. कधी एलआयसी पॉलिसी, कधी वीज, पाण्याचे बिल भरण्यात अडचण. नेहाच्या आता लक्षात येऊ लागले की ही कामं जर तिने आधीच शिकून घेतली असती तर तिला आता इतके कठीण गेले नसते.
नेहापेक्षाही जास्त कठीण परिस्थितीत सीमा फसली होती. तीसुद्धा घरातील कामाकडे लक्ष देत नव्हती. एक दिवस तिच्या पतीचा अपघात झाल्याने त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले. आता सीमाला कळत नव्हते की आजारासाठी पैसे कुठून आणायचे, कारण तिला माहीतच नव्हते की बँकेचे पासबुक कुठे ठेवले आहे, एटीएमचा पिन काय आहे. ती संकटात सापडली होती. जवळ पैसे असुनूही तिला नातेवाईकांकडे, मित्रमैत्रिणींकडे पैसे मागावे लागले होते. शॉपिंग, किटी पार्टंयामध्ये मैत्रिणींमध्ये दंग असलेल्या सीमाला आता जाणवू लागले की आधीपासूनच जर तिने ही कामं समजून घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.
नेहा, सीमाच्या उलट रश्मी आपल्या पतीची सगळी कामं स्वत: सांभाळते. तिचा नवरा आपला सगळा पगार त्यांच्या जॉईंट अकाउंटमध्ये टाकतो. त्यातून सगळे काम रश्मी स्वत: करते. तिच्या नवऱ्याचे सगळे लक्ष नोकरीत असते. त्यामुळे त्याला नोकरीत पदोन्नतीही मिळत आहे. त्याच्या मार्गात कोणत्याही अडचणी नाहीत. रश्मीलाही लहानसहान कामांसाठी नवऱ्याची वाट बघत बसावी लागत नाही. दोघांचीही गाडी जीवनाच्या मार्गावर सुसाट पळत आहे. जी पत्नी पतीची सहयोगी बनून त्याला मदत करते ती नवऱ्यालाही आवडते.