गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  श्रीखंड

 साहित्य

  • 1 लिटर दूध
  • 2 चमचे दही
  • दिड कप पिठी साखर
  • काजू बदाम पिस्त्याचे काप
  • वेलची पावडर, केशर.

 कृती

सर्वप्रथम 1 लिटर दूध गरम करून कोमट करून घ्यायचं. त्यात दोन चमचे दही एकत्रित करुन विरजनासाठी 7-8 तास ठेऊन द्यायचं. सकाळी दही होण्यासाठी लावलं असेल तर रात्री ते दही एका सूती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं. रात्रभर सर्व पाणी निघून जातं आणि मस्त चक्का तयार होतो. चक्का एका टोपात काढून घ्यायचा त्यामध्ये दीड कप पिठीसाखर टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं. काजू, बदामा, पिस्त्याचे पातळ काप,  वेलची पावडर आणि केशर (अर्धा वाटी कोमट दुधामध्ये केशर टाकून थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे छान रंग तयार होतो. ) नंतर एका मोठ्या भांड्यात चक्का काढून घेतला की ते नीट फेटून घ्यायचं. त्यात पिठीसाखर टाकून पुन्हा फेटून घ्यायचं. मग केशर आणि वेलची पावडर टाकून पुन्हा नीट फेटून घ्यायचं. पिठीसाखर आपल्या आवडीप्रमाणे कमी-अधिक घ्यायची. तयार झालेलं श्रीखंड एका डब्यात काढून घ्यायचं आणि त्यावर आपल्या आवडी प्रमाणे काजू, बदाम, पिस्ता काप डेकोरेट करायचे. फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  बासुंदी

 साहित्य

  • 2 लिटर दूध
  • दिड कप साखर
  • सुकामेवा, केशर, वेलची पावडर

कृती

सर्वप्रथम एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध मंद आचेवर गरम करत ठेवायचं. दुधावरची साय येताच ती बाजूला काढून ठेवायची. यामध्येच केशराच्या काड्या भिजत ठेवायच्या. साधारणपणे दूध निम्मं झाल्यावर त्यामध्ये साखर विरघळऊन घ्यायची. आच बंद करुन घट्ट झालेल्या दुधात केशरमिश्रित साय, सुकामेव्याची जाडसर भरड आणि वेलची एकत्रित करून घ्यावी. नंतर फ्रिजमध्ये ठेऊन द्यावी. ही बासुंदी जेवढी घट्ट आणि मुरेल तेवढी अधिक चवदार होईल. सुकामेव्याच्या भरडीमुळे बासुंदी दाट होते. गरमागरम पुरीसोबत तसंच जिलेबी सोबत अधिक आस्वाद घेता येतो.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  खीर

तांदळाची खीर

 साहित्य

  • 1 वाटी बासमती तांदूळ
  • 1 लिटर दूध
  • 1 वाटी साखर
  • काजू, बदाम, पिस्ते, मनुका, केशर, वेलची पावडर
  • 2 चमचे तूप.

 कृती

एक वाटी बासमती तांदूळ (इतर कोणतेही घेऊ शकतो ) स्वच्छ धुवून अर्धा तास  पाण्यात भिजवायचे मग त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकून ते कणीदार जाडसर वाटून घ्यावेत. जाड बुडाच्या पातेल्यात दूध उकळत ठेवावे. त्या दुधाला एक उकळी आली कि वाटलेले तांदूळ त्यात घालून सतत ढवळत राहावे ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. तांदूळ मऊ होऊ लागल्यावर त्यात आवडीनुसार साखर घालावी व ढवळत राहावे. भात पूर्ण मऊ झाला कि गॅस बंद करून त्यात वेलची-जायफळ पूड घालावी. केशर टाकावं. काजू ,बदाम, पिस्त्याचे पातळ काप एकत्रित करावे. शेवटी 2 चमचे तूप पसरावं. ही खीर गरम किंवा थंड कशीही छान लागते .

# टीप: तांदळाची खीर जसजशी थंड होते तशी ती सुकत जाते घट्ट होत जाते , त्यामुळे आपण त्यात सोयीनुसार गरम किंवा थंड दूध घालून  पुन्हा थोडी पातळ करून सर्व्ह करू शकतो.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  आमरस

 साहित्य

  • 3 हापूस वा रायवळ आंबे
  • अर्धा कप घट्ट साईचं दूध
  • वेलची पावडर.

कृती

3 हापूस आंब्यांचा रस काढून घ्यावा. रस मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप घट्ट साईचं दूध आणि वेलची पावडर एकत्रित करून घ्यावं. शक्यतो साखर वापरू नये. आवडतं असल्यास साखर आणि थोडंसं तूप घ्यावं. गरमागरम पुरीसोबत वा पुरणपोळी सोबत आस्वाद घ्यावा.

गुढीपाडवा स्पेशल – मराठी पारंपारिक पदार्थ

* नम्रता विजय पवार

  •  पंचामृत

 यादिवशी कडुलिंबाच्या नवीन मोहराचा वापर जेवणात करतात. म्हणजेच कुठल्यातरी पदार्थात शास्त्रापुरती ही फुलं घालायची. पंचामृत हे एक आंबट, तिखट, गोड असं तोंडीलावणं आहे.

साहित्य

 

  • 5-6 हिरव्या मिरच्यांचे तुकडे
  • अर्धी वाटी दाण्याचं कूट
  • अर्धी वाटी तिळाचं कूट
  • अर्धी वाटी चिंचेचा कोळ
  • अर्धी वाटी किसलेला गूळ
  • पाव वाटी ओल्या खोब-याच्या कातळ्या
  • ७-८ कढीपत्त्याची पानं
  • मोहरी-हिंग-हळद
  • १ टेबलस्पून तेल
  • मीठ आणि २ टीस्पून काळा मसाला.

कृती

एका कढईत तेल गरम करून नेहमीसारखी मोहरी-हिंग-हळद अशी फोडणी करा. त्यात कढीपत्ता आणि मिरच्यांचे तुकडे घाला. जरासं परतून त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. गूळ वितळून हे सगळं एकजीव झालं की त्यात खोब-याच्या कातळ्या घाला. एक कपभर पाणी घाला. चांगली उकळी आली की मीठ, काळा मसाला, दाण्याचं आणि तिळाचं कूट घाला. नीट हलवून घ्या. जितपत घट्ट-पातळ हवं असेल तितकं पाण्याचं प्रमाण वाढवा. मंद गॅसवर पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. यामध्ये कडुलिंबाची फुले घाला.

होळी स्पेशल गोडधोड

– पाककृती सहकार्य : कमलेश संधू

 

  1. मेवा चूरा

साहित्य

* १ वाटी गव्हाचे पीठ

* १ वाटी रवा

* २ वाटी पाक

* ५०-५० ग्रॅम काजू

* बदाम

* किसमिस

* मगज आणि डिंक सगळे वेगवेगळया तुपात तळून बारीक करून घ्या

* थोडी पिठीसाखर

* दीड वाटी तूप

* थोडा नारळाचा किस.

कृती

अर्धा कप तूप गरम करून त्यात सगळा सुका मेवा एकापाठोपाठ एक सोनेरी होईपर्यंत परतवून बाजूला ठेवा. थंड झाल्यावर बारीक करून घ्या. आता याच तूपात रवा टाकून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. हे थोडे थंड होऊ द्या. उरलेल्या तूपात पीठ खरपूस भाजून घ्या. मग गॅसवरून उतरवून थंड होऊ द्या. नारळाचा किस परतू नका. पीठ हलके गरम असताना त्यात हे सगळे साहित्य घालून चांगले मिसळून जारमध्ये भरा. हा मेवा चूरा २०-२५ दिवस टिकतो

2. गाजर पाक

साहित्य

* २ लिटर फुलक्रीम दूध

* ७०० ग्रॅम किसलेला गाजर

* १५० ग्रॅम साखर

* १०० ग्रॅम काजू पावडर

* २ मोठे चमचे तूप.

कृती

दूध कढईत टाकून मंद आचेवर ठेवून सतत ढवळत राहा आणि आटवून घ्या. जेव्हा दुध अर्धे होईल, त्यात गाजर घालून ढवळत राहा. जेव्हा खव्याप्रमाणे हे घट्ट होईल, तेव्हा त्यात साखर घालून ती विरघळेपर्यंत ढवळत रहा. जेव्हा साखर सुकेल, तेव्हा त्यात तूप टाकून शिजवा. जेव्हा खुपच घट्ट होईल, तेव्हा गॅसवरून उतरवा व थंड होईपर्यंत ढवळत राहा. नंतर त्यात काजू पावडर टाकून थाळीत पसरवा. जेव्हा हे मिश्रण व्यवस्थित सेट होईल, तेव्हा त्याचे तुकडा कापा. जसे बर्फीचे तुकडे कापतात. काजू अथवा खव्याने सजवू शकता.

3.  रवा गुपचुप

साहित्य

* २०० ग्रॅम रवा

* थोडे थेंब केवडा इसेन्स

* २५० ग्रॅम साखर

* २ मोठे चमचे दूधपावडर

* २ छोटे चमचे काजू पावडर

* २ छोटे चमचे पिठीसाखर

* चिमूटभर वेलची पूड

* ३०० मिलिग्रॅम दूध

* १०० ग्रॅम नारळाचा किस.

कृती

कढईत रव्याला हलके भाजून घ्या आणि मग त्यात दूध टाकून ढवळत राहा. जेव्हा रवा खरपूस भाजला जाईल, तेव्हा ताटलीत काढून थंड झाल्यावर त्यात २-३ चमचे नारळाचा किस, २-३ चमचे काजू पावडर व इसेन्स मिसळून चांगले मऊ होऊपर्यंत मळा. त्याचे लांबट गोळे बनवून बाजूला ठेवा. दुसऱ्या कढईत पाक बनवण्यासाठी २५० एमएल पाणी घ्या. यात तितकीच साखर घाला. जेव्हा एकतारी पाक तयार होईल, तेव्हा त्यात वेलची पावडर घाला. नंतर त्यात हे लांब गोळे टाकून मंद आचेवर ४-५ मिनिटं शिजू द्यावे. मग उलटपालट करून गॅस बंद करा. कढईतच हे थंड होऊ द्या. आता एका ताटलीत नारळाचा किस पसरवून १-१ गोळा त्यात घोळवा.

आंब्याचे रसरशीत पदार्थ

*प्रतिनिधी

मँगो कोल्ड सूप

साहित्य

* २ आंबे

* अर्धा छोटा चमचा जलजीरा

* ६० ग्रॅम दही
* १ मोठा चमचा लोणी

* पाव छोटा चमचा पांढरी मिरीपूड

* शेव इच्छेनुसार

* १ मोठा चमचा क्रीम

* अर्धा छोटा चमचा गुलाबपाणी

* मीठ व साखर चवीनुसार.

कृती

आंब्याचा गर काढून घ्या. मिक्सरमध्ये आंब्याचा गर, दही, साखर, मीठ, जरजीरा, काळीमिरी पूड, गुलाबपाणी व क्रीम घालून मिक्समधून फिरवून घ्या. कढईत लोणी गरम करून त्यात हे तयार मिश्रण ओतून शिजवून घ्या. फ्रिजमध्ये थंड करून मँगो कोल्ड सूपवर आंब्यांचे तुकडे, जलजीरा पावडर, शेव व क्रीम घालून सर्व्ह करा.

मँगो भल्ले

साहित्य

* २ आंबे

* १०० ग्रॅम मूगाची डाळ

* अर्धा छोटा चमचा आले किसलेले

* २०० ग्रॅम दही

* १ मोठा चमचा चिंचेची चटणी

* १०० ग्रॅम तेल

* अर्धा छोटा चमचा भाजलेले जिरे पूड

* १ मोठा चमचा बेसन पीठ

* १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर चटणी

* साखर व लाल तिखट चवीनुसार

* मीठ चवीनुसार.

कृती

मूगाची डाळ ३ तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर अर्धी डाळ भरड व अर्धी डाळ व्यवस्थित बारीक वाटून घ्या. एक आंब्याचा गरही मिक्सरवर फिरवून घ्या. एका भांड्यात डाळ, २ मोठे चमचे आंब्याचा गर, आले, बेसनपीठ व इतर मसाल्याचे साहित्य घालून व्यवस्थित मिसळून घ्या. कढईत तेल गरम करून भल्ले सोनेरी रंगावर तळून घ्या. गरम पाण्यात तयार भल्ले टाका. दह्यामध्ये आंब्याचा गर व मसाले घालून फेटून घ्या. दह्यात मँगो भल्ले पाणी निथळून घेऊन घाला. त्यावर चिंचेची चटणी, मीठ, जिरे, मिरची पूड, आंब्याचा गर, कोथिंबीरीची चटणी घाला. फ्रिजमध्ये थंड करा. सर्व्ह करताना पुन्हा थोडी चिंच व कोथिंबीर चटणी, आंब्याचे काप व जिरेपूड घालून सर्व्ह करा.

आंब्याचे रसरशीत पदार्थ

*प्रतिनधी

मँगो रबडीचे श्रीखंड

साहित्य

* १ लिटर दूध

* पाव छोटा चमचा वेलची पूड

* पाव छोटा चमचा दूधात भिजवलेले केशर

* १ छोटा चमचा ताजे दही

* २ आंबे

* १ छोटा चमचा गुलाबाचे सरबत

* साखर आवडीनुसार.

कृती

कढईत दूध तोपर्यंत उकळा जोपर्यंत ते ४०० ग्रॅमपर्यंत आटत नाही. थंड झाल्यावर ते काचेच्या बाउलमध्ये काढून घ्या. त्याचे दही होण्यासाठी ठेवून द्या. दही मलमलच्या कापडात बांधून १ तास लटकवून ठेवा. आंबा कापून सोलून घ्या व मिक्सरमधून फिरवून घ्या. तयार दही रबडीमध्ये साखर, वेलची पूड, केशर, आंब्याचा गर आणि गुलाब सरबत घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. फ्रिजमध्ये थंड करून मँगो रबडीच्या श्रीखंडावर आंब्याचे छोटेछोटे तुकडे, केशर व वेलची पूड घालून सर्व्ह करा.

मँगो सॅण्डविच

साहित्य

* १ आंब्याचे तुकडे

* २०० ग्रॅम दूध

* ८ ब्रेडस्लाइस

* अर्धा छोटा चमचा वेलची पूड

* अर्धा छोटा चमचा दूधात भिजवलेले केशर

* १०० ग्रॅम तूप

* साखर आवडीनुसार.

कृती

दूध उकळून रबडी बनवून घ्या. ब्रेडस्लाइस वाटीने गोल कापून १ तास सुकवा. कढईत तूप गरम करून ब्रेडस्लाइस सोनेरी रंगावर तळून घ्या. आंब्याचे तुकडे मिक्सरमध्ये फिरवून घ्या. काचेच्या भांड्यात रबडी, आंब्याचा गर, साखर, थोडी वेलची पूड व थोडे केशर घालून मिश्रण करा. दोन ब्रेडस्लाइसवर मिश्रण लावून दुसरा ब्रेडस्लाइस मिश्रण लावलेल्या पहिल्या ब्रेडस्लाइसवर ठेवा. मँगो सॅण्डविचवर केशर आणि वेलची पूड घालून सर्व्ह करा.

आंब्याचे रसरशीत पदार्थ

*प्रतिनिधी

आंब्याचे हिंगातील लोणचे

साहित्य

* ५०० ग्रॅम कैऱ्या

* ५० ग्रॅम मीठ

* १ मोठा चमचा हळद पूड

* पाव मोठा चमचा हिंग पावडर

* दीड मोठे चमचे लाल तिखट

* पाव मोठे चमचे मोहरीचे शुद्ध तेल.

कृती

कैऱ्या स्वच्छ धुऊन सोलून घ्या. छोटे छोटे चौकोनी तुकडे कापून घ्या. एका मोठ्या वाटीत कैरीच्या तुकड्यांना हळद व मीठ लावून काचेच्या बरणीत भरून ३-४ दिवस उन्हात ठेवा. नंतर भांड्यात काढून घेऊन मिरची पूड, हिंग व तेल (तापवून गार केलेले) मिसळून पुन्हा बरणीत भरून ४-५ दिवस उन्हात ठेवा. लोणचे तयार होईल.

बेबी कॉर्न लोणचे

साहित्य

* १ कप बेबीकॉर्न

* २-३ हिरव्या मिरच्या

* पाव छोटा चमचा लाल मिरची पूड

* पाव छोटा चमचा गरम मसाला

* २ लसूण पाकळ्या चिरलेल्या

* पाव छोटा चमचा हळद पूड

* अर्धा छोटा चमचा लिंबाचा रस

* पाव छोटा चमचा मोहरी पूड

* पाव कप शुद्ध मोहरीचे तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

बेबीकॉर्न धुवून १ से.मी. तुकड्यांमध्ये कापून १-२ मिनीटे पाण्यात उकळून घ्या. तेल गरम करा व चिरलेला लसूण, हिरव्या मिरच्या व इतर मसालेही मिसळा. आता यात बेबीकॉर्न व लिंबाचा रस मिसळा. थंड करून बरणीत भरा.

 

आमरस

साहित्य

* १ किलो आंब्याचा गर

* पाव छोटा चमचा केशर

* १ कप साखर

* अडीच कप थंड दूध.

कृती

सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून तयार मिश्रण ग्लासात घालून गारगार सर्व्ह करा.

 

आंब्याचे रसरशीत पदार्थ

*प्रतिनिधी

मँगो लस्सी

साहित्य

* २ कप आंब्याचा गर

* १ कप दही

* अर्धा लिटर दूध

* साखर चवीनुसार

* अर्धा कप आमरस

* पाव छोटा चमचा वेलची पूड

* पाव छोटा चमचा केशर सजवण्यासाठी.

कृती

सर्व साहित्य एकत्र मिसळून ब्लेंडरमधून फिरवून घ्या व केशराने सजवून सर्व्ह करा.

कैरीचे पन्हे

साहित्य

* २ कैरीचे साल काढून कापलेले तुकडे

* अर्धा कप साखर

* पाव छोटा चमचा केशर

* अर्धा छोटा चमचा वेलची पूड.

कृती

एका भांड्यात कैरीचे तुकडे व साखर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. हे मिश्रण ब्लेंड करून यात वेलची पूड व केशर मिसळा आणि सर्व्ह करा. जर थोडे पातळ हवे असेल तर इच्छेनुसार पाणी मिसळा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें