जेव्हा खरेदी कराल ऑनलाईन सौंदर्य उत्पादनं

* पारुल भटनागर

शॉपिंग साइट्स पूर्वी केवळ कपडयांसाठी प्रसिद्ध होत्या, परंतु आज या कॉस्मेटिक प्रोडक्टसाठीदेखील ग्राहकांची पहिली पसंत बनत आहेत. तुम्ही एखादी साईट खोला तुम्हाला तिथे सर्व ब्रँडची सौंदर्य उत्पादनं स्वस्तपासून महागपर्यंत मिळतील, जी तुम्हाला आकर्षित करण्याबरोबरच तुमचं सौंदर्यदेखील उजळतील.

या साइट्सवर विजीट केल्यावर तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्सदेखील पाहायला मिळतात. परंतु या ऑफर्समध्ये अडकण्याऐवजी तुमच्या हुशारीचा वापर करत सौंदर्य उत्पादनं ऑनलाइन विकत घ्या म्हणजे तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही. जाणून घेऊया या संबंधित सतलीवाच्या को फाउंडर नम्रता रेड्डी सीरूपाकडून ऑनलाइन सौंदर्य उत्पादनं विकत घेतेवेळी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे :

खात्रीलायक साइट्सवरून खरेदी करा

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की जेव्हादेखील आपण ऑनलाईन काही सर्च करतो तेव्हा आपल्याला त्याच्या आजूबाजूला अनेक जाहिराती दिसून येतात, ज्या आपण सर्च केलेल्या असतात त्याच्याशीच मिळत्याजुळत्या असतात आणि उत्सुकतेने आपण त्या खोलून त्या अनोळखी साइट्सवरून काही खरेदीदेखील करतो.

एक लक्षात घ्या की ही मार्केटिंगची एक पद्धत आहे म्हणजे पाहणाऱ्याला नेहमी त्याच गोष्टीच्या अवतीभवती ठेवायचं म्हणजे वारंवार तुमच्या डोळयासमोर ते खरेदी करण्यासाठी तुम्ही विवश व्हाल. तुमच्या लक्षातही येत नाही की अनेकदा अनोळख्या साइट्सवरून शॉपिंग करून तुम्हाला तुम्ही फसले जाता.

अशावेळी गरजेचं आहे की जेव्हादेखील ऑनलाईन सौंदर्य उत्पादनं विकत घ्याल तेव्हा खात्रीलायक साइट्सवरूनच त्या विकत घ्या. म्हणजे तुमच्या प्रोडक्टची तुम्हाला गॅरंटी मिळेल. कारण नामवंत साईट्स स्वत:चं नाव खराब होऊ देत नाही. अनेकदा अनोळखी साईटस स्वस्त प्रोडक्त देतात परंतु जेव्हा आपण त्याचा वापर करतो तेव्हा समजतं की ही बनावट आणि निकृष्ट दर्जाची असल्यामुळे आपल्याला त्या स्वस्त मिळत आहेत आणि अनेकदा तर पेमेंट होऊनदेखील आपल्याला ते प्रोडक्ट मिळत नाही.

म्हणून सौंदर्य उत्पादनं नेहमीच खात्रीदायक साइट्सवरून जसं की अॅमेझान, फ्लिपकार्ट, नायका, पर्पल, मित्रा, लॅक्मे, लोटससारख्या ऑनलाइन साइट्सवरूनच खरेदी करायला हवीत. याबरोबरच हेदेखील चेक करा कि साईट सिक्युअर आहे की नाही. तसंच पेमेंट गेटवेदेखील सिक्युअर आहे की नाही. यामुळे तुमच्या डिटेल्सदेखील सुरक्षित राहतील.

त्वचेचा पोत लक्षात घ्या

जेव्हादेखील ऑनलाईन एखादं ब्युटी प्रॉडक्ट विकत घ्याल तेव्हा जेदेखील प्रॉडक्ट तुमच्या मनात आहे वा एखादं नवीन प्रोडक्ट जे तुमच्या त्वचेचा पोत लक्षात घेऊनच विकत घ्या. अन्यथा त्वचेचा पोत लक्षात न घेता घेतलेलं ब्युटी प्रॉडक्ट तुमच्या त्वचेवर सूट होणार नाही आणि सोबतच तुमचे पैसेदेखील वाया जातील ही वेगळी गोष्ट.

तुम्हाला ऑनलाईन फाउंडेशन विकत घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तुमच्या त्वचेच्या पोताबद्दल माहिती असायला हवं. जर तुमची त्वचा नॉर्मल असेल तर तुमच्या त्वचेवर कोणतही फाउंडेशन चालेल. परंतु तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्हाला सिरम वा लिक्विड फाउंडेशन वापरायला हवं.

जर तुमची त्वचा तेलकट व कॉम्बिनेशनमध्ये असेल तर यासाठी मुज, पावडर वा क्रीम फाउंडेशन योग्य आहे. सोबतच तुम्ही फाउंडेशन योग्य पद्धतीने वापरला नाही तर तुमची त्वचा एकतर खूप डार्क, ग्रे दिसेल वा खूपच पांढरी दिसू लागेल, जे तुमच्या त्वचेचा नॅचरल टच संपून टाकण्याचं काम करते. म्हणून गरजेचं आहे की जेव्हादेखील ऑनलाइन फाउंडेशन विकत घ्याल तेव्हा तुमच्या स्किन टोनच्या दोन शेड खालचं टोन विकत घ्या.

प्रयत्न करा की तुम्ही ते अगोदर ऑफलाईन टेस्ट करून चेक करा. यामुळे गडबड होण्याचे चान्सेस कमी होतात आणि जर असं शक्य झालं नाही तर तुम्ही ते प्रोडक्ट युट्यूब, इंस्टाग्राम वगैरेवरचे व्हिडिओज चेक करा. म्हणजे तुमच्या स्कीन टाईपनुसार पूर्ण माहिती मिळेल. ज्यामुळे तुम्हाला प्रॉडक्ट विकत घेण्यामध्ये सहज सोपं होईल.

प्रयत्न करा तुम्ही अशा साईट्स वरूनच विकत घ्या. जिथे स्किन टाइपनुसार प्रोडक्ट्स टेस्टिंगदेखील ऑप्शन मिळतं. यामुळे समाधान मिळेल की तुम्ही योग्य प्रॉडक्ट विकत घेत आहात.

अशाच प्रकारे त्वचेसाठी मॉइश्चरायझर, क्रीम लिपस्टिक, विकत घेतेवेळी देखील स्किन टाइप लक्षात ठेवा आणि जर एखादं नवीन प्रोडक्ट विकत घ्यायचं असेल तर त्यापूर्वी त्याचा एक छोटसं पॅकेट विकत घ्या. म्हणजे जर तुम्हाला पसंत नाही पडलं तर अधिक नुकसान होणार नाही.

रिव्यू आणि रेटिंग नक्की पहा

हे नक्की पहा की जे रेटिंग व रिव्यू आहेत ते सीमित नसावेत म्हणजे १-२ लोकांचेच नसावेत. कारण या साइट्स स्वत:च्यादेखील असू शकतात. म्हणून कोणत्याही प्रोडक्टचा जेवढा जास्त रिव्यू व रेटींग असेल त्या प्रॉडक्टची तुम्हाला अधिक माहिती मिळण्याबरोबरच तुम्हाला ते प्रॉडक्ट विकत घेतेवेळी सहज सोपं होईल. तुम्ही या प्रोडक्टचे रिव्यू व रेटिंग जाण्यासाठी या प्रॉडक्टचे व्हिडिओ नक्की पहा.

इन्ग्रेडियंटसदेखील जाणून घ्या

अनेकदा प्रॉडक्ट पॅकिंग एवढे जबरदस्त असतं की आपण काहीच विचार न करता ते विकत घेतो. परंतु जेव्हा याचा वापर करतो तेव्हा समजतं की सर्व खेळ पॅकिंगचा होता, खरं तर प्रॉडक्टमध्ये काहीच दम नाही आहे. अशावेळी जेव्हा ऑनलाईन सौंदर्य उत्पादनं विकत घेत असाल तेव्हा इन्ग्रेडियंटसकडे लक्ष देणं खूपच गरजेचं आहे.

तर जाणून घेऊया एक्सपर्टकडून वेगवेगळ्या प्रकारचे ब्युटी प्रॉडक्टमध्ये काय आहे आणि काय नाही आहे. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट्स निवडण्यास मदत होईल.

हेअर प्रॉडक्ट

हार्मफुल इन्ग्रेडियंटस : ट्रिकलोसन, एस एल एस.

युजफुल इन्ग्रेडियंटस : कॅस्टर ऑइल, कोकोनट ऑइल.

बॉडी लोशन

हार्मफुल इन्ग्रेडियंटस : कोलतार, पेट्रोलियम, परफ्युम, फ्रेग्रेन्स.

युजफुल इन्ग्रेडियंटस : उपयोगी फॅटी अॅसिड्स, कॅरामाईड.

आय प्रॉडक्ट्स

हार्मफुल इन्ग्रेडियंटस : अॅल्युमिनियम, प्रोपाइलिन ग्लाईकोल.

डे अँड नाईट क्री

हार्मफुल इन्ग्रेडियंटस : रॅतिनोईक अॅसिड.

तुलना करून पहा

आजची जनरेशन दुकानातच जाण्याऐवजी ऑनलाइन शॉपिंग करणं पसंत करते. कारण एक तर घर बसल्या सामान मिळतं आणि दुसरं बाहेर जाण्याऐवजी स्वस्त किमतीतदेखील आणि तेदेखील इजी टू रिटर्न पॉलिसी सोबत. अशावेळी जर ऑनलाइन ब्युटी प्रॉडक्टस विकत घेण्याबद्दल तुम्ही विचार करत असाल तर फक्त एका साइटवर पाहून ते खरेदी करण्याचं ठरवू नका. उलट प्रोडक्ट्स अनेक विश्वसनीय साइट्सवर पहा. अगदी ऑफलाइनदेखील त्याचा अगोदर रेट काढून पहा. कारण जेव्हादेखील तुम्ही साइट्सवर तुलना करून ब्युटी प्रॉडक्ट विकत घ्याल तेव्हा जास्त फायदा हा होईल की कदाचित दुसऱ्या साईट वरती स्वस्त प्रॉडक्ट मिळेल. कारण कोणत्या ना कोणत्या साइटवर पाहिल्यामुळे तुम्हाला प्रॉडक्ट स्वस्त मिळण्याबरोबरच कॅशबॅक, एखाद्या कार्डवर दहा टक्के सूटसारख्या सुविधादेखील मिळतील. ज्यामुळे तुम्ही हे प्रॉडक्ट विकत घेतल्यावर फायदा होऊ शकतो. परंतु या गोष्टीचीदेखील काळजी घ्या की स्वस्त घेण्याच्या नादात एखाद्या अनोळखी साइट्सवरून प्रॉडक्ट विकत घेऊ नका. उलट समजूतदार ऑनलाइन ग्राहक बनून शॉपिंगचा आनंद घ्या.

आरोग्य विम्याचे आहेत अनेक फायदे

* गरिमा पंकज

कोरोना महामारी अजूनही मुळासकट संपलेली नाही. एखाद्या व्यक्तीला कोरोना किंवा त्यासंबंधित गुंतागुंतीचा आजार झाल्यास आणि त्या व्यक्तीने खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास, एकूण खर्च रूपये १० लाखांपासून ते रूपये १२ लाखांपर्यंत जाऊ शकतो. कोरोना व्यतिरिक्तही अनेक प्रकारचे आजार आहेत जे लोकांना त्रासदायक ठरतात आणि त्यांच्या उपचारात त्यांची सर्व बचत संपून जाते. त्यामुळेच आरोग्य विम्याचे महत्त्व नाकारता येत नाही.

कोरोना काळात आपल्या सर्वांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की, अचानक उद्भवलेल्या आजाराशी सामना करण्यासाठी, योग्य उपचार तसेच कुटुंबाच्या संरक्षणासाठी रूपये २-३ लाखांचा साधा आरोग्य विमा काढायला काहीच हरकत नाही. घरातील एकापेक्षा जास्त व्यक्ती आजारी पडल्यावर याचे महत्त्व अधिकच समजते. कोरोना काळात असा आजारी पडण्याचा प्रकार तुमच्या आजूबाजूच्या अनेक घरांमध्ये पाहायला मिळाला असेल. म्हणूनच तुमच्याकडे कोणतीही आरोग्य विमा पॉलिसी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चांगली पॉलिसी घ्या.

जर तुम्ही एम्प्लॉयी ग्रुप इन्शुरन्स कव्हर अंतर्गत येत असाल तरीही, तुम्ही स्वत:साठी किमान रूपये २५ ते रूपये १० लाखांचा आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. जरी तुम्ही विमा घेतला असेल तरी सध्याच्या परिस्थितीनुसार त्यात  बदल करणे आवश्यक आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही एका विमा कंपनीतून दुसऱ्या विमा कंपनीकडेही जाऊ शकता. अधिक सुविधा देणारी कंपनी निवडू शकता.

चला, याविषयी जाणून घेऊया :

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना

जवळपास प्रत्येक विमा कंपनी मूलभूत आरोग्य विमा संरक्षण देते, ज्यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा खर्च, रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च, औषधांचा खर्च, डॉक्टरांचे शुल्क आणि चाचण्या इत्यादींचा सहभाग असतो. प्राथमिक आरोग्य विम्याचे २ प्रकार आहेत – पहिला वैयक्तिक आणि दुसरा फॅमिली फ्लोटर. वैयक्तिकमध्ये तुम्हाला फक्त कव्हरेज मिळते तर फॅमिली फ्लोटरमध्ये संपूर्ण कुटुंबाला कव्हरेज मिळते.

फॅमिली फ्लोटर आरोग्य विमा योजना सहसा एखादी व्यक्ती, तिचा जोडीदार आणि त्यांच्या मुलांना संरक्षण देते. परंतु, काही विमा कंपन्या विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्याचे आई-वडील, भावंडे आणि सासू-सासऱ्यांनाही संरक्षण देतात. फॅमिली फ्लोटर आरोग्य विम्याचा एक फायदा म्हणजे संपूर्ण कुटुंबाला थोडया प्रमाणात संरक्षण मिळते.

मर्यादा/उपमर्यादा असलेली योजना घेऊ नका

अनेक आरोग्य विमा योजनांमध्ये रुग्णालयातील खोलीच्या भाडयावर मर्यादा घालण्यात आली आहे. अशा मर्यादा असलेली पॉलिसी घेणे टाळा.

उपचारादरम्यान तुम्हाला कुठे ठेवायचे, हे तुमच्या हातात नसते. असे असले तरी कोरोना काळात आपण पाहिले आहे की, अचानक एखादा गंभीर आजार होऊ शकतो आणि त्यानंतर कित्येक आठवडे रुग्णालयात राहावे लागते. त्याशिवाय विलगीकरणात म्हणजे वेगळया खोलीत क्वारंटाईनमध्ये राहण्याचीही गरज भासते. अनेकदा जो बेड किंवा रूम मिळेल ती घ्यावी लागते. आपण असे म्हणू शकत नाही की, स्वस्त बेडवर शिफ्ट करा.

आजीवन नूतनीकरण सुविधा

आयुष्यात कधीही नूतनीकरण करता येईल अशी पॉलिसी घ्या. खरेतर वृद्धापकाळात उपचारासाठी पैशांची जास्त गरज असते, कारण वृद्धापकाळात रोगांचे आक्रमण अधिक होते. सहसा या वेळेपर्यंत ती व्यक्तीही सेवानिवृत्त झालेली असते. त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसतात. आरोग्य विमा काढताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

कोरोना कवच

तुम्ही कोरोनाच्या उपचारासाठी स्वतंत्र पॉलिसीही घेऊ शकता. आयआरडीएआरच्या सूचनेनुसार विमा कंपन्यांनी कोरोना विशेष पॉलिसी उपलब्ध करून दिली आहे. यालाच कोरोना कवच म्हणतात. यासाठी विम्याची रक्कम रूपये ५० हजार ते रूपये ५ लाखांपर्यंत आहे. कोरोना कवच पॉलिसी कमी कालावधीसाठी म्हणजे साडेतीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिन्यांसाठी असू शकते.

घरी उपचार घेतल्यावरही विम्याचा फायदा

कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराच्या या युगात अनेक कंपन्या घरी राहून उपचारांवर होणारा खर्चही भागवत आहेत. याशिवाय अनेक विमा कंपन्या सरकारने स्थापन केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेण्यावर होणारा खर्च भरून काढत आहेत. विमा घेताना तुमची कंपनी ही सुविधा देत आहे की नाही, हे तपासा.

महामारीला कव्हर करा

बहुतेक आरोग्य विमा पॉलिसी कोरोनासारख्या साथीच्या आजारांना कव्हर करतात. हे प्रामुख्याने त्या पॉलिसीवर अवलंबून असते. अशा काही पॉलिसी आहेत ज्यात महामारीचा समावेश नसतो. तुम्ही पॉलिसी दस्तावेज वाचून त्यानुसार पॉलिसी घ्या ज्यामध्ये हे सर्व समाविष्ट असेल.

गुंतवणूक सल्लागार मनीषा अग्रवाल सांगतात की, कोणतीही पॉलिसी घेताना काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.

कॅशलेस पॉलिसी अधिक उत्तम

अशी विमा पॉलिसी घ्या जी कॅशलेस सुविधा देत असेल. कॅशलेस विमा पॉलिसीचा फायदा असा की, पॉलिसीधारकाला रुग्णालयाचे बिल भरावे लागत नाही, उलट तो त्यासाठी थेट विमा कंपनीशी संपर्क साधू शकतो.

आरोग्य विमा पॉलिसी घेताना हेही तपासून पाहा की, तुम्ही राहता त्या शहरातील मोठया आणि सुसज्ज रुग्णालयांचा कॅशलेस रुग्णालयांच्या यादीत समावेश आहे का? यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

दावा निकाली काढणे

ज्या कंपनीचे दाव्याचे प्रमाण चांगले आहे, म्हणजेच जे जास्तीत जास्त लोकांचे दावे निकाली काढत आहेत आणि जे तुमच्या अपेक्षित सर्व गरजा पूर्ण करणार आहेत.

रिफिल लाभ पर्याय

जर तुमची रूपये ५ लाखांची पॉलिसी असेल आणि ते पैसे एखाद्या आजारपणात खर्च झाले आणि ३ महिन्यांनंतर तुम्हाला दुसरा आजार झाला तर अशी पॉलिसी घ्या ज्यामध्ये रिफिलचा पर्याय असेल, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या आजारासाठीही पैसे मिळतील.

बहुतेक पॉलिसींमध्ये हा फायदा समान व्यक्ती समान रोग आणि भिन्न व्यक्ती पण एकाच रोगासाठीही उपलब्ध आहे.

सह-पेमेंट टाळा

काही पॉलिसीमध्ये, सह-पेमेंटचीही तरतूद असते, म्हणजेच पॉलिसीधारकाला एखाद्या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाच्या काही टक्के रक्कम भरावी लागते. काही अशा योजनाही आहेत जिथे ६० वर्षांवरील लोकांसाठी खास सह-पेमेंटचा पर्याय असतो, म्हणजे संपूर्ण रक्कम कंपनीकडून दिली जात नाही तर तुम्हाला यातील काही खर्च करावा लागतो.

टॉप अप योजना

सध्याची परिस्थिती पाहाता अनेक कंपन्यांनी टॉप-अप योजना आणल्या आहेत. म्हणजेच समजा तुमचा रूपये ५ लाखांचा विमा असल्यास दीड-दोन हजारांच्या छोट्या रकमेतूनही हजारांच्या तुम्हाला अतिरिक्त रूपये ५ लाख टॉपअप मिळेल. म्हणजेच आधीच चालू असलेली पॉलिसी रूपये ५ लाखांची आहे आणि तुम्ही रूपये ५ लाखांचा टॉपअप घेतला तर तुम्हाला एकूण रूपये १० लाखांचे विमा संरक्षण मिळेल. साहजिकच अशी योजना फायददेशीर ठरते.

प्रत्येक विमा कंपनीचे स्वत:चे नियम असतात. त्यामुळे आरोग्य विमा घेण्यापूर्वी त्यात किती आणि काय कव्हर केले जाईल हे जाणून घ्या. चाचणी खर्च आणि रुग्णवाहिकेचा खर्च यासारख्या जास्तीत जास्त गोष्टींचा समवेश असलेली पॉलिसी घ्या, जेणेकरून तुम्हाला खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

खुलेल वैवाहिक जीवन जेव्हा रहाल नटूनथटून

* नसीम अन्सारी कोचर

मिनूची अशी तक्रार आहे की, लग्नाच्या ५ वर्षांतच तिच्या पतीला तिच्याबद्दल प्रेम राहिलेले नाही. जेव्हा भेटते तेव्हा एकच रडगाणे गाते. आता ते माझ्यावर प्रेम करीत नाहीत. सतत स्वत:च्या कामातच मग्न असतात. सुट्टीच्या दिवशीही जास्त वेळ बाहेरच घालवतात. कधी जवळ बसून प्रेमाने बोलत नाहीत. मी कशी आहे, असे कधीच विचारत नाहीत. मग माझी गरजच काय उरली आहे?

त्यानंतर ती असा संशयही व्यक्त करते की, कदाचित त्यांच्या आयुष्यात दुसरी एखादी स्त्री आली असेल.

मिनू माझी बालपणीची मैत्रीण आहे. दिसायला अतिशय देखणी. खरे सांगायचे तर उंच, गोरा रंग असलेल्या मिनूकडे पाहून मला कधीकधी तिचा हेवा वाटत असे. माझा रंग सावळा असल्यामुळे अनेकदा मी उगाचच चीडचिड करीत असे. रंग उजळविण्यासाठी जगभरातील लेप लावत असे. ब्यूटी पार्लरच्या फेऱ्या तर ठरलेल्याच होत्या. माझा सर्व पॉकेटमनी सुंदर दिसण्यासाठीच खर्च करीत असे. पण मिनूला या सर्वांची कधीच जास्त गरज भासली नाही. पावडर आणि सौम्य लिपस्टिक लावली तरी ती खूपच सुंदर दिसत असे.

स्वत:कडे दुर्लक्ष नको

एमएचा अभ्यास करीत असताना तिची सचिनसोबत ओळख झाली. सचिन दिसायला खूपच देखणा होता. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर आमचे दोघींचे भेटणे कमी झाले. कारण माझे सासर मेरठला होते. लग्नानंतर माझे दिल्लीला येणे-जाणे कमी झाले.

यंदाच्या दिवाळीला मात्र माझे दिल्लीला येणे झाले. मला बघून माझ्या आईवडिलांना खूपच आनंद झाला. लग्नानंतर माझ्या चेहऱ्यावर लाली आली होती. येथे आल्यानंतर ज्यांना भेटली त्या प्रत्येकाने सांगितले की, लग्नानंतर मी सुंदर दिसायला लागली आहे. माझी अशी स्तुती ऐकून मला आनंद झाला. लग्नापूर्वी ज्या सावळया रंगामुळे माझी चीडचिड होत असे लग्नानंतर तोच सावळा चेहरा माझ्या पतीच्या माझ्यावरील प्रेमामुळे खुलला होता. लग्नापूर्वी चांगले दिसण्यावर मी बरेच लक्ष केंद्रित करीत असे. लग्नानंतर हीच सवय मला उपयोगी पडली. माझ्या  नटूनथटून सुंदर राहण्यामुळे खुश असलेल्या पतीच्या प्रेमामुळे, कौतुकामुळे माझ्या चेहऱ्यावर तेज आले होते आणि हेच तेज माझ्या पतीला माझ्यात गुंतवून ठेवण्यासाठी पुरेसे होते. त्यामुळेच घरी असताना तो सतत माझ्या मागेपुढे घुटमळत असे.

दिल्लीत आल्यानंतरही सर्वांकडून माझ्या होत असलेल्या कौतुकामुळे मी खूप आनंदात होते. २ दिवसांनंतर थोडासा वेळ मिळताच मी मिनूला भेटायला गेले. अचानक जाऊन आश्चर्याचा धक्का द्यावा, असे ठरवून जाण्यापूर्वी मी तिला फोन करायचे टाळले. जुन्या मैत्रिणीला भेटायचा आनंद होता. मी रिक्षा करून तासाभरात तिच्या घरी पोहोचले. दरवाजावरची बेल वाजवली. ज्या महिलेने दरवाजा उघडला तिला पाहून मला मात्र आश्चर्याचा धक्का बसला. हीच मिनू आहे का? मी आश्चर्याने तिच्याकडे पाहातच राहिले. ५ वर्षांत कशीतरीच दिसू लागली होती. गोरा रंग झाकोळला गेला होता. निस्तेज त्वचा, डोळयांखाली काळी वर्तुळे, रुक्ष आणि विस्कटलेल्या केसांची ती महिला माझी मिनू असूच शकत नाही. तिने जुनाट, डिझाईन उडालेली, मळकट मॅक्शी घातली होती. तिला अशा अवतारात पाहून यावर विश्वास ठेवणे कठीण होते की, ही तीच मिनू आहे जिच्या सौंदर्याचा एके काळी मला हेवा वाटत असे.

स्वत:ला कसे ठेवाल आकर्षक

मला भेटून मिनूला आनंद झाला. ती पट्कन स्वयंपाकघरात गेली आणि माझ्यासाठी चहा बनवून घेऊन आली. मला तिच्या सासू-सासऱ्यांच्या खोलीत घेऊन गेली आणि त्यांची ओळख करून दिली. तिचा मुलगा बहुतेक शाळेत गेला होता आणि नवरा कामाला. आम्ही गप्पा मारतच तिच्या बेडरूममध्ये गेलो आणि पलंगावर निवांत बसलो. मला अचानक आलेले पाहून मिनूला अत्यानंद झाला होता, पण काही वेळातच हा आनंद तिच्या रडगाण्यात बदलला. पती आता तिच्याकडे लक्ष देत नाही, अशी तिची तक्रार होती.

मी एक साधासा प्रश्न तिला विचारला, ‘‘मिनू, तू घरात नेहमी अशीच गचाळ राहतेस का?’’

ती म्हणाली, ‘‘घरातही नटूनथटून बसायचे का? आता मी एका मुलाची आई आहे.’’

‘‘संध्याकाळी जेव्हा सचिन येतो तेव्हाही तू त्याच्यासमोर याच अवस्थेत जातेस का?’’ मी विचारले.

‘‘हो, त्यात काय झाले. घरात तर वावरायचे आहे ना? बाहेर जाताना मी मेकअप करते. घरात उगाचच नटूनथटून बसू का? कितीतरी कामे असतात,’’ तिने सांगितले.

माझे असे बोलणे ऐकून मिनू माझ्याकडे आश्चर्याने बघतच राहिली.

मी तिची समजूत काढत म्हणाले, ‘‘मिनू, जन्मजात तुला सौंदर्य लाभले, पण तुला त्याची किंमत नाही. तुझ्या याच सौंदर्यामुळे सचिन तुझ्या प्रेमात पडला. पण आता तेच सौंदर्य तुझ्या दुर्लक्षामुळे झाकोळले गेले असेल तर सचिन तुझ्याकडे कशाला बघेल? तुझ्या जवळ कशाला बसेल? त्याचा दुसऱ्या कोणा स्त्रीशी काहीही संबंध नसेल. उलट तूच असे गचाळ राहून त्याला स्वत:पासून दूर केले आहेस. पुरुष नीटनेटकेपणा, सौंदर्याकडे आकर्षित होतात. तू तर हे सर्व गमावून बसली आहेस. तू स्वत:च स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहेस. मग आता रडतेस कशाला?’’

जीवनात नेहमीच पुढे रहा

प्रत्यक्षात माणूस नेहमीच सुंदर गोष्टींकडे आकर्षित होतो. सौंदर्य दुसऱ्याच्या डोळयांनाच दिलासा मिळवून देत नाही तर आपण स्वत:ही त्यामुळे आनंदी होतो. तुम्ही चांगले कपडे परिधान केले असतील, केस व्यवस्थित बांधले असतील आणि चेहऱ्यावर पुरेसा मेकअप असेल तर तुमचा स्वत:चा आत्मविश्वासही वाढतो. प्रसन्न वाटते. घराबाहेर जायचे असेल तरच नीटनेटके रहायला हवे, हा समज चुकीचा आहे. घरातही तुम्ही नटूनथटून वावरलात तर बिघडले कुठे? उलट यामुळे घरातील सदस्यांचे लक्ष तुमच्याकडेच खिळून राहील. ते तुमचे कौतुक करतील. तुमच्याशी गप्पा मारतील. त्यामुळे कुठलाच तणाव, कसलेच दु:ख उरणार नाही.

संध्याकाळी पती दमून घरी आल्यानंतर जुन्या मळकट मॅक्शीमधील तणावात त्याच्या समोर उभी असलेली बायको पाहून त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजणारच. याउलट जर दरवाजा उघडताच त्याच्यासमोर नटलेली, ओठांवर सौम्य लिपस्टिक लावलेली, हसतमुखाने त्याचे स्वागत करणारी बायको उभी असेल तर तिच्यावर आपल्या प्रेमाची उधळण करण्यास तो आतुर होणार नाही का?

हीच गोष्ट पुरुषांनाही लागू होते. जे पुरुष घरात मळकट, फाटलेली बनियन घालतात, विस्कटलेले केस, वाढलेली दाढी-मिशी आणि खराब लेंगा घालून वावरतात त्यांच्याकडे घरातील सर्व दुर्लक्ष करतात. पत्नी त्यांना टाळते आणि मुलेही लांबूनच नमस्कार करून पळून जातात.

५ गोष्टी नाकारतात प्रपोजल

* पारुल भटनागर

जेव्हा प्रपोज करण्यात नेहमीच अपयश येते तेव्हा हृदय तुटते. आपल्यात काय कमी आहे की ज्यामुळे आपले प्रेम अधुरे राहिले, हे समजेनासे होते. अशा परिस्थितीत, तुम्हाला नकार का मिळाला हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे असते. चला, या संदर्भात जाणून घेऊया…

अॅटिट्यूड असलेले प्रपोजल

भलेही तुम्ही तुमच्या क्रशला प्रपोज केले असेल, पण जर प्रपोज करताना तुम्ही अॅटिट्यूड, तुमचा अहंकार दाखवला तर सतत तुम्हाला नकारच मिळेल, कारण तुम्ही कितीही सुंदर दिसत असला तरी तुम्ही ज्याला प्रपोज कराल त्याला हे अजिबात आवडणार नाही की, ज्याच्याशी तो संबंध जोडणार आहे त्याच्यामध्ये अॅटिट्यूड आहे.

टीप : तुम्ही प्रपोज करायला जाल तेव्हा तुमच्यात रुबाब किंवा अॅटिट्यूड नसावा तर तुमची प्रपोज करण्याची पद्धत प्रेमळ आणि आकर्षक हवी.

दिसायला सुंदर नसणे

असे होऊ शकते की, जेव्हा तुम्ही तुमच्या क्रशला प्रपोज करता तेव्हा तुम्हाला सतत नकारच ऐकायला मिळत असेल, कारण तुम्ही प्रपोज करायला जात असाल, पण स्वत:च्या दिसण्याकडे अजिबात लक्ष देत नसाल. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या क्रशकडून नकारच ऐकायला मिळेल, कारण कोणत्याही मुलीची इच्छा नसते की, तिचा जोडीदार दिसायला चांगला नसावा.

टीप : तुम्हाला जरी टापटीप राहायची आवड नसली तरी तुम्ही जेव्हा तुमच्या क्रशला प्रपोज करणार असाल तेव्हा टापटीप राहा जेणेकरून तुम्ही तिच्या पहिल्याच नजरेत भराल आणि ती तुमचे प्रपोजल नाकारू शकणार नाही. सुंदर, देखणा मुलगा प्रत्येक मुलीला हवा असतो.

खाणाखुणा करून प्रपोज करणे

काही मुलांना सवय असते की, ते आधी खाणाखुणा किंवा इशारे करून आपल्या भावना आपल्या आवडीच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मुली मात्र अशा मुलांपासून दूर राहण्यातच शहाणपणा मानतात, कारण अशा मुलांची नियत मुलींना योग्य वाटत नाही. आता जो अशा हरकती करतो, तो किती खालच्या थराला जाईल हे सांगता येत नाही, असे त्यांना वाटते. त्यामुळेच त्याने प्रपोज करताच ती त्याला स्पष्टपणे नकार देते.

टीप : ज्याच्यावर तुमचा क्रश आहे आणि तुम्ही त्याला प्रपोज करायचा विचार करत असाल तर विशेष काळजी घ्या. तुम्ही त्याला गुपचूप जरी पाहिले तरी त्याला इशारे किंवा खाणाखुणा करू नका. तुम्ही प्रपोज कराल तेव्हा तुमच्या डोळयात विचित्र खोडकरपणा नव्हे तर प्रेम दिसले पाहिजे.

दिखाऊपणा करून प्रपोज करणे

जर तुम्ही तुमच्या क्रशला प्रपोज करणार असाल आणि तुमच्या पैशांचे स्टेटस दाखवून किंवा पैशांचा मोठेपणा दाखवून प्रपोज करणार असाल तर विश्वास ठेवा, तुम्हाला कधीच होकार ऐकायला मिळणार नाही, कारण जो सुरुवातीला असा मोठेपणा दाखवतो तो पैशांच्या जोरावर  समोरच्याचा अपमानही करू शकतो, या विचाराने ती मुलगी तुम्ही दिसायला सुंदर असूनही तुम्हाला नकार देणेच शहाणपणाचे समजेल.

टीप : प्रपोज करायला जाताना हे लक्षात ठेवा की, तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि प्रपोज करण्याच्या पद्धतीत पैशांचा कोणताही दिखावा नसावा.

अतिहुशारी दाखवणे

काही मुलांना सवय असते की, ते मुलींसमोर स्वत:ला आवश्यकतेपेक्षा जास्त हुशार दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेव्हा ते प्रपोज करतात तेव्हा त्यांच्यातील ही अतिहुशारी नकाराच्या रूपात समोर येते, कारण कोणत्याही मुलीला अतिहुशार मुलगा आवडत नाही. ते मात्र हा विचार करत राहातात की, प्रपोज करायला आपण स्वत:हून पुढाकार घेऊनही त्या मुलीने आपल्याला का नाकारले?

टीप : अतिहुशारी बाजूला ठेवा आणि शांतपणे अशा प्रकारे प्रपोज करा की, तुमचा क्रश तुम्हाला होकार दिल्याशिवाय राहू शकणार नाही.

‘‘प्रत्येक व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागतो’’ – जुई भागवत

* सोमा घोष

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली अभिनेत्री जुई भागवत ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेत बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली. तिने वडिलांकडून संगीताचेही प्रशिक्षणही घेतले आहे. संगीताच्या अनेक कार्यक्रमातही तिने भाग घेतला होता. कलेच्या वातावरणातन जन्मलेल्या जुईची आई दीप्ती भागवत या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि अँकर आहेत तर वडील मकरंद भागवत हे एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहेत. दीप्ती भागवत यांनी अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक भूमिकाही केल्या आहेत.

जुई भागवतने ‘उंच माझा झोका’, ‘पिंजरा’, ‘स्वामिनी’, ‘मोगरा फुलला’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तिने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये मकरंद देशपांडे परीक्षक होते. तिने यात भावनाप्रधान अभिनयासाठी पुरस्कार मिळवला. सध्या जुई सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत सावनीच्या मुख्य भूमिकेत आहे, ही आतापर्यंत तिला मिळालेली सर्वात मोठी भूमिका आहे, जी प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जुईने वेळात वेळ काढून खास ‘गृहशोभिके’साठी गप्पा मारल्या. त्यातील हा काही भाग :

अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कुटुंबाचा पाठिंबा किती होता?

माझे आईवडील आणि नातेवाईक सर्वजण सर्जनशील, कल्पक क्षेत्रात आहेत. माझी आई मराठी अभिनेत्री आहे आणि वडील संगीतकार आहेत. संपूर्ण घरातील वातावरण सर्जनशील असल्यामुळे मी बालपणीच कथ्थक आणि गाणे शिकायला सुरुवात केली. मला आठवते की, वयाच्या ८व्या वर्षी मी एकदा आईच्या सेटवर गेले होते, तिथे गेल्यावर मला वाटले, हे माझे क्षेत्र आहे. मी तिथल्या दिग्दर्शकांकडे माझे ऑडिशन घेण्याचा हट्ट धरला. माझ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी लगेचच माझे ऑडिशन घेतले आणि मी एक छोटीशी भूमिकाही साकारली. मला कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायला, जिंकायला आणि बक्षिसे मिळवायला खूप आवडायचे. कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मी महाविद्यालयापासूनच रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. पदवीचा अभ्यास करताना ५ वर्षे अभिनयही केला. त्यानंतर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि या क्षेत्रात पदार्पण केले. त्या दरम्यान ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. तिथे मला सर्वोत्कृष्ट भावनाप्रधान अभिनयासाठी ‘बेस्ट एक्सप्रेशन ऑफ दि सीझन’ हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोविड आला. त्या काळात मला ही मोठी मालिका मिळाली. यात माझ्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा वेलनकरसोबत काम करताना मला मजा येत आहे.

तुला पहिला ब्रेक कधी मिळाला?

मला पहिला मोठा ब्रेक ‘तुमची मुलगी काय करते’मध्ये मिळाला. ही मालिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. चित्रिकरणादरम्यान, मला उतारावरून कार चालवून अभिनय करायचा होता. मी काही दिवसांपूर्वीच कार चालवायला शिकले होते. त्यामुळे मी खूपच तणावात होते, पण सर्व व्यवस्थित पार पडले.

तुमची मुलगी काय करतेया मालिकेतील व्यक्तिरेखा तुझ्या स्वभावाशी किती मिळतीजुळती आहे?

या मालिकेतील माझी भूमिका आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सावनी मिरजकरची आहे. या मालिकेतून आजच्या तरुणाईची विचारसरणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, कारण महाविद्यालयात जाणारी मुले जेव्हा अमली पदार्थांचे सेवन, एखादे व्यसन किंवा समवयस्कांच्या दबावाला बळी पडतात तेव्हा त्यांच्या नकळत एक वेगळीच व्यक्ती होऊन जातात. ही एक सत्यकथा आहे, जी हरवलेल्या मुलीच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. ती बेपत्ता झाल्यानंतर तिला कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि कुटुंबाची काय स्थिती होते, यावर आधारित हे कथानक आहे. यात शांत महिला ते प्रसंगी वाघिणीचे रूप धारण करणाऱ्या आईची कणखर वृत्ती दाखवण्यात आली आहे. ही व्यक्तिरेखा माझ्या स्वभावापेक्षा खूप वेगळी आणि अवघड आहे. माझ्यासाठी ही पहिलीच मोठी मालिका आहे. ती साकारताना मला खूप काही शिकायची संधी मिळत आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्याचा अभिनय करणे सोपे नाही, कारण मुळात मी तशी नाही. त्यासाठी मला खूप संशोधन करावे लागले. या व्यक्तिरेखेत अनेक चढ-उतार आहेत.

एखाद्या मोठया कलाकारासोबत काम करण्यासाठी तुला किती तयारी करावी लागते?

खूप तयारी करण्याबरोबरच, योग्य शॉट मिळण्याची काळजी घेणेही महत्त्वाचे असते, कारण या मालिकेतील माझे सर्व सहकारी मुरलेले कलाकार आहेत आणि जवळपास सर्वच रंगभूमीवरून आलेले आहेत. अशा कलाकारांचे काम चोखंदळ असते, त्यामुळे त्यांच्या तोडीचे काम करणे सोपे नसते, पण मला सर्वांचे सहकार्य मिळाले. तांत्रिक ज्ञानही खूप जास्त मिळत आहे.

कोणत्या मालिकेमुळे तुझे आयुष्य बदलले?

मला याच मालिकेतून मोठे नाव मिळाले. प्रेक्षक मला ओळखू लागले. ते कुठेही भेटले तरी मला मालिकेतील नावानेच हाक मारतात.

आईवडील मराठी इंडस्ट्रीत असल्यामुळे तुला काम मिळणे सोपे झाले का?

माझ्यासाठी काहीही सोपे नाही, मात्र इंडस्ट्रीतील लोकांची माझ्यासोबतची वागणूक खूप चांगली असते, पण यामुळे मला कोणतीही संधी मिळाली नाही आणि मला ती नकोही होती. रंगभूमीवर काम करताना मला ही भूमिका मिळाली. मला कोणीतरी ओळखल्यानंतर दडपण येते, कारण माझी तुलना माझ्या आईशी होऊ लागते.

तुला हिंदी चित्रपटात काम करायची इच्छा आहे का?

हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे, काही स्क्रिप्टही मिळाल्या आहेत. चांगले कथानक मिळाल्यास नक्कीच काम करेन. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबतही काम करण्याची माझी इच्छा आहे.

रिजेक्शन म्हणजेच नकाराचा सामना तू कसा करतेस?

रिजेक्शनला अनेकदा सामोरे जावे लागले, पण ज्या मालिकेत मला नकार मिळाला, ती न मिळणे माझ्यासाठी फायदेशीर ठरले. म्हणूनच मी कोणत्याही प्रकारे नाराज झाले नाही. प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी खूप काही माहीत करून घ्यावे लागते. मी नेहमी प्रयत्न करत राहाते.

तुझ्या स्वप्नांचा राजकुमार कसा आहे?

ज्याच्याशी सूर जुळतील आणि सहजतेने वागता येईल, तोच माझ्या स्वप्नांचा राजकुमार असेल.

आवडता रंग – फिकट जांभळा, फिरोजी.

आवडता पोशाख – भारतीय, पाश्चात्य.

आवडते पुस्तक – अल्केमिस्ट.

पर्यटन स्थळ – हिमालय ट्रेकिंग, युरोप.

वेळ मिळाल्यास – कथ्थक किंवा संगीताचा सराव.

सामाजिक कार्य – वृद्ध, अनाथ मुलांची सेवा.

आवडता पदार्थ – आईच्या हातची पुरणपोळी.

जीवनातील स्वप्न – कलेशी जोडलेले राहाणे.

जीवनातील आदर्श – शिकत राहाण्याची इच्छा.

हवामान आणि मूड

* शकुंतला सिन्हा

पावसाळयाच्या ऋतूत मुलांचे बाहेर जाऊन खेळणे बंद होते आणि ती म्हणतात – रेन रेन गो अवे… अशाच प्रकारे अति उष्मा किंवा हिवाळयाला कंटाळून आपण म्हणतो की, हा ऋतू कधी संपणार? हवामानाचे स्वत:चे नैसर्गिक चक्र असते आणि ते सहसा एखाद्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत स्वत:च्या वेळेनुसार येते. मात्र, सध्या वातावरणातील बदलामुळे अवेळी हवामानातही बदल पाहायला मिळतो.

कोणतीही परिस्थिती जसे की, खूप पाऊस किंवा खूप उष्णता किंवा खूप थंडी जास्त काळ राहाते तेव्हा त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे चीडचिड होते, पण हवामानाचा आपल्या मनस्थितीवर खरोखर परिणाम होतो की, हा केवळ मनाचा खेळ आहे? हे जाणून घेण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी या विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा ७० च्या उत्तरार्धात आणि ८० च्या दशकाच्या सुरुवातीस या दोघांमधील संबंध समोर येऊ लागले.

हवामान आणि मनस्थितीमधील संबंध : हे नाते अतिशय गढूळ आहे, ज्याला तुम्ही अस्पष्ट, अंधुक, फिकट किंवा घाणेरडे काहीही म्हणू शकता. विज्ञानानुसार, हवामान आणि मूड किंवा मनस्थितीचा संबंध वादाने वेढलेला आहे आणि दोन्ही प्रकारचे वाद वेगवेगळे असू शकतात. १९८४ मध्ये, शास्त्रज्ञांनी मनस्थिती बदलाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. राग, आनंद, चिंता, आशा, निराशा किंवा आक्रमक वर्तन यासारखे मनस्थितीमधील बदल सूर्यप्रकाश, तापमान, वारा, आर्द्रता, वातावरणाचा दाब इत्यादी घटकांवर अवलंबून असल्याचे अभ्यासात आढळून आले.

अभ्यासात असे दिसून आले की, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रतेचा मनस्थितीवर सर्वात जास्त परिणाम होतो. विशेषत: जेव्हा आर्द्रता वाढते तेव्हा एकाग्रता कमी होते आणि सतत झोपायची इच्छा होते. २००५ च्या अभ्यासात असे दिसून आले की, चांगल्या हवामानात घराबाहेर किंवा इतरत्र वेळ घालवल्याने मनस्थिती आणि स्मरणशक्तीही सुधारते.

बरे आणि वाईट

मूड किंवा मनस्थिती ही वसंत ऋतूमध्ये सर्वोत्तम आणि उन्हाळयात सर्वात वाईट असते. काही शास्त्रज्ञांना मात्र हा अभ्यास मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी २००८ मध्ये वेगळा अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी असे निरीक्षण नोंदवले की सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता यांचा मनस्थितीवर कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत नाही. तो पडलाच तरी नगण्य असतो. २००५ च्या अभ्यासात नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, चांगल्या हवामानाचा मनस्थितीवर अतिशय माफक सकारात्मक परिणाम होतो.

हवामान आणि मनस्थिती या विषयावर आणखी अभ्यासाची गरज आहे, पण एक गोष्ट ज्यावर जवळपास सर्वांचेच एकमत आहे ती म्हणजे हवामानाचा माणसावर होणारा परिणाम एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर अवलंबून असतो, जो प्रत्येकासाठी सारखा नसतो.

प्रत्येक माणूस हवामानानुसार बदलतो का? : हवामानाचा परिणाम किंवा संवेदना ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, स््नष्ठ (सीजनल इफैक्टिव डिसऑर्डर) ज्याला ऋतूनुसार मनस्थितीत झालेला बदल म्हणतात, त्याचा विचार केल्यास काही लोकांमध्ये हिवाळयात दिवस कमी झाल्यामुळे उदासीनता दिसून आली, ज्याला विंटर ब्लू असेही म्हणतात.

शास्त्रज्ञांच्या मते, जगातील ६ टक्के लोकसंख्येमध्ये विंटर ब्लू सिंड्रोम दिसून आला. याला मनस्थितीसंबंधी दुर्मिळ विकार म्हणतात. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या मते, हा अतिशय सौम्य पातळीचा विकार आहे.

भकास उन्हाळा : अभ्यासात असे दिसून आले की, काही लोकांना उन्हाळयात उदास किंवा भकास वाटते. विशेषत: बायपोलर डिसऑर्डर या आजारात लोकांना उष्णतेमुळे स्ट्रोक किंवा झटके येऊ शकतात. काही लोक उन्हाळयात चिंताग्रस्त, चीडचिडे किंवा हिंसक होऊ शकतात.

काही प्रकरणांमध्ये, खराब हवामानात (जास्त उष्णता किंवा थंडी किंवा पाऊस काहीही असू शकते) खराब मनस्थिती जास्तच खराब होऊ शकते.

संबंधित प्रतिक्रिया

२०११ मध्ये पुन्हा एक अभ्यास करण्यात आला, ज्यामध्ये असे नमूद केले आहे की, भलेही थोडया लोकांवर होत नसला तरी हवामानाचा परिणाम अनेकांच्या मनस्थितीवर नक्कीच होतो. ज्या लोकांचा अभ्यास करण्यात आला त्यापैकी ५० टक्के लोकांवर हवामानाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही तर उर्वरित ५० टक्के लोकांवर त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून आला.

या सर्व अभ्यासानंतर, अभ्यासात सहभागी लोकांमध्ये हवामानाशी संबंधित खालील ४ गोष्टी किंवा प्रतिक्रिया दिसून आल्या –

हवामान आणि मनस्थितीचा संबंध नाही : ज्यांच्यावर हवामानाचा परिणाम होत नाही त्यांच्या मते, मूड आणि हवामानाचा काहीही संबंध नसतो

उन्हाळा प्रेमी : उन्हाळा आणि सूर्यप्रकाशात काही लोकांची मनस्थिती खूप चांगली असते.

उन्हाळा न आवडणारे : हिवाळा आणि ढगाळ वातावरणामध्ये अशा लोकांचा मूड किंवा मनस्थिती चांगली असते.

पाऊस न आवडणारे : काहींना पावसाळा अजिबात आवडत नाही. अशा दिवसांत त्यांचा मूड किंवा मनस्थिती खराब होते. सुमारे ९ टक्के लोक या श्रेणीत येतात. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉ. टॅक्सिया एवर्स यांच्या मते, पावसाळयात काळोख्या रात्री एकटेपणा आणि भीती सतावते आणि त्यामुळे मनस्थिती चांगली राहात नाही.

हवामान आणि सेक्समध्ये संबंध आहे का : हवामान आणि लैंगिक संबंधांबद्दल असा कोणताही सामान्य नियम नाही जो प्रत्येकाला लागू होईल. असे असले तरी, हवामानाचा परिणाम काही प्रमाणात सेक्स ड्राइव्हवर होतो.

उन्हाळयात सेक्स ड्राइव्ह हिवाळयापेक्षा चांगले : थंडीपेक्षा उष्ण वातावरणात सेक्सची इच्छा जास्त असते. शास्त्रज्ञांच्या मते, यासाठी हार्मोन कारणीभूत ठरतात. महिलांमध्ये सेक्स हार्मोन्स उष्णता आणि सूर्यप्रकाशात अधिक तयार होतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सेक्स ड्राइव्ह वाढते. याशिवाय, सेरोटोनिन, फील-गुड न्यूरो ट्रान्समीटर हा वसंत ऋतू आणि उन्हाळयात महिला आणि पुरुष दोघांमध्ये जास्त प्रमाणात तयार होतो, ज्यामुळे मूड चांगला राहातो.

हिवाळयातील सेक्स ड्राइव्ह : या ऋतूत चांगले हार्मोन्स, सेरोटोनिनचे उत्पादन कमी होते आणि महिलांमध्ये इस्ट्रोजेनही कमी तयार होते, ज्यामुळे सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. याशिवाय थंडीत अंगावर नेहमी जास्त कपडे घातल्याने त्वचेतील एक्सपोजर कमी होते, त्यामुळे काही प्रमाणात परस्पर आकर्षण कमी होते. या ऋतूत कमी कपडेही घालता येत नाहीत. पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी ड जीवनसत्त्वाची कमतरता हेही यामागचे एक कारण ठरू शकते.

सेक्ससाठी मान्सून सर्वोत्तम : सेक्ससाठी पावसाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गर्जनेने एक वेगळीच भीती जाणवते आणि सेक्सची इच्छा जागृत होते.

थंड वारा आणि पावसाच्या सरी सेक्सची इच्छा निर्माण करतात. पावसात मिठी मारल्याने प्रेम संप्रेरक ऑक्सिटोसिन वाढते, ज्यामुळे दोन्ही जोडीदारांमधील लैंगिक इच्छा वाढते.

सारांश : या अभ्यासांवरून असे दिसून येते की, काही व्यक्ती बदलत्या हवामानाशी मिळतेजुळते घेतात, म्हणजे एक प्रकारे हवामानरोधक असतात, त्यांच्यावर कोणत्याही हवामानाचा विशेष परिणाम होत नाही. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बहुतेक पुरुष नैसर्गिकरित्या हवामानानुसार स्वत:मध्ये बदल करून त्यानुसार वागतात. दुसरीकडे काही लोक हवामानाबद्दल संवेदनशील असतात आणि हवामान बदलाची तीव्रता त्या विशिष्ट व्यक्तीच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते.

स्वत:चा छंद जिवंत ठेवा

* पूनम अहमद

कोरोनाने सर्वांना आपापल्या घरात कैद होण्यास भाग पाडले. अशा परिस्थितीत आपल्याकडे दोनच मार्ग आहेत, एकतर या वेळेला सतत दोष देत बसणे किंवा या वेळेचा अशा प्रकारे वापर करणे की, आपले मन प्रसन्न होईल. मग या वेळेत असा एखादा छंद जोपासायला काय हरकत आहे, जो धकाधकीच्या जीवनात मागे राहून गेला.

तुमच्या स्क्रॅपबुकवर काम करणे असो, तुमच्या बागकामाचे कौशल्य जोपासायचे असो किंवा काही बदल करून घराची अंतर्गत सजावट करायची असो, असे अनेक छंद आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही हा वेळ मजेत घालवा.

वेळेचा सदुपयोग करा

तुम्हाला शिवणकाम, विणकाम किंवा भरतकाम कसे करावे हे माहीत असेल आणि बऱ्याच काळापासून हा छंद तुम्ही जोपासला नसेल, तर या वेळेचा फायदा घ्या, तुम्ही क्रॉस स्टिचिंग, आर्म विणकाम, लूम विणकाम आणि सुई पॉइंट असे बरेच प्रयोग करू शकता. तुमच्या प्रियजनांसाठी चांगल्या, नवीन, वेगळया भेटवस्तू तयार करू शकता आणि ठेवू शकता.

नेहा अस्वस्थ होती. ऑगस्टमध्ये तिने एका मुलीला मुंबईत जन्म दिला तेव्हा प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे बाळासाठी तिला कोणतीही पूर्वतयारी योग्य प्रकारे करता आली नाही. त्यानंतर संसर्गाच्या भीतीने ती बाजारात जाणे टाळत होती, बाळासाठी तिला कपडे हवे होते, कारण जे होते ते पावसामुळे नीट सुकत नव्हते.

नेहाला अस्वस्थ पाहून तिच्या शेजारी अनिता म्हणाल्या, ‘‘का काळजी करतेस? बाजारात जाऊन धोका कशाला घेतेस, तुझ्याकडचे जुने कपडे मला दे, मी त्यातून बाळाला काहीतरी नवीन शिवून देईन.’’

नेहा आश्चर्यचकित झाली, ‘‘तुम्हाला शिवणकाम येते का काकी?’’

‘‘ते आधीपासूनच येत होते, पण आता वर्षानुवर्षे त्याची गरजच भासली नाही, पण तुझ्यासाठी मी प्रयत्न करेन.’’

काहीतरी वेगळे करा

नेहाने अनिताला जुने कुरते आणि सलवार दिली. अनिताच्या घरी तिचा नवरा आणि मुलगा घरातून काम करायचे. ते कामात व्यस्त असायचे. अनितालाही आजकाल खूप कंटाळा येत होता. काहीतरी कल्पक, नाविन्यपूर्ण करावे, असे तिला वाटत होते, पण काय करावे ते कळत नव्हते. नेहाला काहीतरी मदत करण्याचा विचार त्यांच्या मनात येताच त्यांच्यात नवा उत्साह संचारला. त्यांनी त्यांचे शिलाई मशीन साफ केले. ते पुन्हा काम करण्यायोग्य करण्यासाठी त्यांना वेळ लागला. मशीन नीट होताच त्या उत्साहाने कपडे शिवायला लागल्या.

पती आणि मुलानेही त्यांचा उत्साह वाढवला. २ दिवसांत त्यांनी बाळाच्या गरजेचे अनेक कपडे शिवले. ते पाहून नेहा आणि तिचा नवरा अनिल आश्चर्यचकित झाले. ते अनिता यांचे आभार मानत राहिले तर आपला छंद पुन्हा जोपासता आल्याचा आनंद अनिता यांना झाला.

त्यांचे शिलाई मशीन सुरू झाले आणि त्यांच्या हातात जणू जादूची कांडी आली. हळूहळू त्यांनी जुन्या कपड्यांमधून सुंदर डिझायनर टॉप्स शिवले. त्यातील एक टॉप घालून त्या भाजी आणायला गेल्या तेव्हा तिथे भेटलेल्या मैत्रिणीने टॉपचे कौतुक केले आणि स्वत:साठी तसाच एक टॉप शिवून देण्याची विनंती केली.

नीताला तो कुरता प्रचंड आवडला. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, नंतर तिसऱ्यापर्यंत असे करत हळूहळू अनिताच्या या कौशल्याची चर्चा इमारतीभोवती रंगू लागल्या. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांच्या अनेक गरजा होत्या. ते बाहेर पडू शकत नव्हते आणि त्यांना अशा काही गोष्टींची गरज होती, ज्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. हळूहळू अशी बरीच कामे अनिता यांच्याकडे आली. त्या भरतकामही उत्तम करायच्या.

असा वाढवा आत्मविश्वास

अशीही वेळ आली की, लॉकडाऊन उघडल्यानंतरही अनिता यांनी घराच्या एका कोपऱ्यात स्वत:च्या कामासाठी जागा बनवली जिथे त्या आरामात काम करू लागल्या. काम करताना त्यांना वेळेचे भान राहायचे नाही. हळूहळू त्या व्यावसायिक झाल्या. बरेच लोक त्यांच्याकडून खरेदी करू लागले. ज्यांना बाजारात जाऊन खरेदी करण्यापेक्षा स्वच्छ घरातून सामान आणणे जास्त सुरक्षित वाटत होते त्यांना अनिता यांच्या रुपात नवा पर्याय सापडला. अनिता यांच्याकडून केलेल्या खरेदीमुळे त्यांच्या घराला नवी झळाळी मिळाली. लॉकडाऊनमुळे मरगळलेल्या घरात ठेवलेल्या या नव्या वस्तूंमुळे त्यांच्या घरातील वातावरण प्रसन्न झाले.

तुमचा वेळ नवीन भाषा शिकण्यासाठी वापरा. याचे अनेक फायदे असतात. आजकाल अनेक अॅप्स आणि ऑनलाइन प्रोग्राम्स उपलब्ध आहेत, ज्यांच्याशी कनेक्ट होऊन तुम्ही कोणतीही नवीन भाषा शिकू शकता. सोशल डिस्टन्सिंगच्या काळात नवीन गोष्टींशी कनेक्ट झाल्याने तुम्हाला चांगला अनुभव मिळेल.

छंदातून आनंद

आजकाल तुम्ही यूट्यूबवर काहीही शिकू शकता. प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती देणारे व्हिडीओ उपलब्ध आहेत. इकडेतिकडे निरर्थक गोष्टीत मौल्यवान वेळ वाया घालवून हाती काहीही लागणार नाही. त्यामुळे काहीतरी कल्पक करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मानसिक आणि आर्थिक फायदा होईल. कोणतीही नवीन गोष्ट शिकणे कधीही नुकसानकारक नसते.

आजचे युग फ्युजनचे आहे, नवीन आणि जुन्या गोष्टी एकत्र करा आणि काहीही बनवा. शिवणकाम आणि भरतकामाचा छंद स्त्रियांसाठी खूप चांगला ठरू शकतो, कारण प्रत्येक स्त्रीमध्ये ही कला थोडीफार असतेच. फक्त ती चांगल्या प्रकारे जोपासून तिचा सदुपयोग करण्याची गरज असते.

छंद किंवा आवड गरजेची

आधुनिकीकरणाने छंदाला ज्या प्रकारे प्रोत्साहन दिले आहे, त्यामुळे आता काम सुरू राहील की नाही याची चिंता राहिलेली नाही. या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी अनेक अभ्यासक्रम आहेत, ज्यांचे प्रशिक्षण शहरांपासून खेडयांपर्यंत दिले जाते. काळ महामारीचा असल्याने लोकांना फारसे बाहेर जावेसे वाटत नाही, पण वाटल्यास महिला घरात राहूनही या वेळेचा पुरेपूर उपयोग करुन घेऊ शकतात. यासाठी त्या कोणत्याही प्रशिक्षकाकडून अभ्यासक्रम किंवा ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात.

ही कला शिकण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही, फक्त छंद, आवड हवी. संधीबाबत बोलायचे तर, शिवणकाम, भरतकाम हे फॅशन डिझायनिंग अंतर्गत येते. त्याने बॉलीवूडपासून ते सर्वसामान्यांच्या जीवनातही आपले स्थान निर्माण केले आहे. आता प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे आहे. त्यासाठी ड्रेसवर खूप लक्ष दिले जाते. या कलेत आपले कौशल्य दाखवून अनेक महिला आज प्रसिद्ध फॅशन डिझायनर बनल्या आहेत.

कटिंग आणि टेलरिंग

तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कटिंग आणि टेलरिंगसह डिझायनिंगचेही ज्ञान असायला हवे. सोबतच बाजारात येणाऱ्या कपडयांच्या नवनवीन डिझाईन्स आणि ते तयार करण्याचे कौशल्यही शिकून घेतले पाहिजे. आता तुम्ही यूट्यूबच्या मदतीने खूप काही शिकू शकता.

हे कौशल्य शिकण्याचा हा सर्वात स्वस्त मार्ग आहे. सर्वात मोठी गोष्ट अशी की, तुम्ही येथे अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहू शकता. जसे की, तुम्हाला तुमचे स्वत:चे कुरते शिवायचे असतील तर तुम्ही येथे ते शिवण्याचे अनेक मार्ग बघू शकता, शिवाय सर्व काही विनामूल्य असेल. पैसे वाचवण्यासोबतच शिवणकाम आणि भरतकाम शिकण्याचे अनेक फायदे आहेत. जसे की, तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे शिवू शकता. शिंप्याकडे जाण्यासाठीचा वेळ वाया जात नाही. तुम्हाला पाहिजे त्या वेळेत तुम्ही ते शिवू शकता.

स्वावलंबी होणे गरजेचे

महिलांनी स्वावलंबी असणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मुंबईत जन्मलेल्या फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. एकेकाळी त्यांनी २ मशिनच्या मदतीने शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला होता. आज संपूर्ण जगाला त्यांचे नाव माहीत आहे. त्यांचे ब्रँड जगभर प्रसिद्ध आहेत.

त्यांचे नाव २०१७ च्या सर्वात शक्तिशाली व्यावसायिक महिलांमध्ये गणले जाते आणि आज त्यांची गणना जगातील सर्वात यशस्वी महिलांमध्ये केली जाते. त्यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, धाकटया बहिणीसोबत त्यांनी हे काम घराच्या बाल्कनीतून सुरू केले होते.

तुम्हीही तुमचा एखादा छंद तुमच्या आतच दबून जाऊ देऊ नका. टीव्हीवरील निरर्थक अंधश्रद्धाळू कार्यक्रम पाहणे बंद करा आणि काहीतरी नवीन शिका, पुढे जा. स्वत:चा वेळ काहीतरी चांगले करण्यासाठी सार्थकी लावा. तुम्हाला अनेक फायदे होतील.

कारण तुमची सुरक्षा आहे गरजेची

* प्रतिनिधी

सोलो ट्रिप, नवीन ठिकाणांचा शोध घेणे, अनोळखी व्यक्तींना भेटणे, रात्री उशिरा कॅबमध्ये प्रवास करणे हे सर्व महिलांसाठी असुरक्षित समजले जाते. जगाचा आर्थिक विकास झपाटयाने होत आहे आणि त्यासोबतच सर्व वयोगटातील आणि लिंगांच्या लोकांसाठी हिंसाचाराच्या घटनाही वेगाने वाढत आहेत, मात्र अधिकाधिक हिंसाचाराला महिलाच बळी पडत आहेत. या धोक्यामुळे घरातील सदस्यांकडून त्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा इतर ठिकाणी एकटे जाण्यापासून रोखले जाते. काही वेळा महत्त्वाचे काम असले तरीही त्यांना बाहेर जाता येत नाही. यामुळे त्यांची पुढे जाणारी पावले जिथल्या तिथे थबकतात. काही वेळा ते त्यांच्या शिक्षणाच्या किंवा कामाच्या अधिकाराचा पूर्ण वापर करण्यापासून वंचित राहतात. आपल्या शहरांमध्ये निर्भयासारख्या घटना वारंवार ऐकायला मिळतात. त्यामुळेच सूर्यास्तानंतर प्रवास करणे बहुतेक महिलांसाठी धोक्याचे ठरते. मुलांचेही असेच असते. पालकांना त्यांच्या सुरक्षेची चिंता असते.

सुरक्षा गरजेची

भारतामध्ये सुरक्षा हा प्राधान्याचा विषय आहे. मग ती सार्वजनिक वाहतूक असो, रस्ते, कामाचे ठिकाण किंवा घर असो. सुरक्षेची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. लोकांना सुरक्षित ठेवण्याच्या आणि त्यांचा प्रवास त्रासमुक्त गतिशील होण्याच्या उद्देशाने, त्यांना प्रियजनांच्या संपर्कात राहण्याची संधी मिळण्याच्या उद्देशाने आघाडीचे जागतिक व्यासपीठ, टूकॉलरने एक वैयक्तिक सुरक्षा अॅप गार्जियंस सादर केले आहे. लोकांना त्यांच्या डिजिटल जीवनात सुरक्षित ठेवण्यासाठी टूकॉलरची निर्मिती केल्यानंतर आता ही स्वीडिश कंपनी गार्जियंससोबत वास्तविक जीवनात सुरक्षिततेसाठीची त्यांची वचनबद्धता सिद्ध करत आहे.

गार्जियंस आहे तुमचा सुरक्षारक्षक

गार्जियंस अँड्रॉइडवर उपलब्ध आहे आणि ते गूगल प्ले स्टोअर, अॅप्पल स्टोअर किंवा मोफत डाऊनलोड करता येते. याचे सर्व फीचर्स मोफत आहेत आणि यात कुठलीही जाहिरात किंवा सशुल्क सदस्यत्व नाही. हे अॅप आणि त्याचे सर्व फीचर्स कायमच निशुल्क म्हणजे मोफत असतील – ही वैयक्तिक सुरक्षेसाठीची टूकॉलरची वचनबद्धता आहे.

तुमच्या संपर्क यादीतील विश्वासाहार्य लोकांना स्वत:चा गार्जियन निवडता येतो आणि तुम्ही कुठे आहात हे पाहण्यासाठी सक्षम बनवले जाते. कुठलीही चुकीची घटना घडली तरी तुम्ही स्वत:च्या सुरक्षेबाबत बिनधास्त राहू शकता. आजच्या काळात सर्वांकडेच स्मार्टफोन आहेत आणि ते गार्जियंससारख्या अॅपच्या मदतीने सुरक्षेचे प्रभावशाली साधन बनू शकतात. मार्च २०२१ मध्ये हे अॅप पहिल्यांदा लॉन्च करण्यात आले, मात्र यात सातत्याने नवीन फीचर्स जोडले जात आहेत. या अॅपची वाढती लोकप्रियता ही त्याच्या डाऊनलोडसच्या वाढत्या संख्येवरून (वर्तमानात १० लाखांहून जास्त) सहज लक्षात येते. मागील काही आठवडयांमध्ये यात नव्याने जोडले गेलेले काही फीचर्स आहेत.

सॅटेलाईट व्यू : युजर्स सॅटेलाईट व्यूला टर्नऑन करू शकतात आणि अचूक भौगोलिक तपशिलासह पृथ्वीचा वास्तविक नकाशा पाहू शकतात. यात डिफॉल्ट मॅप व्यूप्रमाणे गुगल सॅटेलाईट इमेजरीही मिळते.

ठिकाणावर आधारित अलर्ट: अॅपच्या या फीचरसह युजर्स घर, शाळा किंवा कार्यालयीन ठिकाणासारख्या सतत जाव्या लागणाऱ्या स्थानांना चिन्हांकित करू शकतात. ही ठिकाणे त्यांची सुरक्षित ठिकाणे बनू शकतात. जेव्हा कोणी या सुरक्षित ठिकाणांहून बाहेर जाते तेव्हा गार्जियंसला त्याची सूचना मिळते.

हालचालींवर आधारित अलर्ट : हे फीचर आफ्ट इन आहे. त्यामुळे युजर्सना याचा वापर करण्यासाठी त्याला इनेबल करावे लागेल. हालचालींवर आधारित अलर्ट तुमच्या हलचालींच्या आधारावर दिला जातो. यासाठी अँड्रॉईड अॅक्टिविटी रिकग्निशन एपीआयचा वापर केला जातो. गार्जियंस अॅप लवकरच तुमच्याद्वारे वॉकिंग किंवा ड्रायव्हिंग सुरू केल्यानंतर ट्रिगर होऊन नोटिफिकेशन पाठवू शकेल. हे वेगावर आधारित अलर्टचे शेअरिंगही करू शकेल. जसे की, तुम्ही वेगाने चालल्यास किंवा धावल्यास अथवा तुम्ही ५० किलोमीटर प्रति तासांहून जास्त वेगाने वाहन चालवाल तेव्हा अलर्ट येईल.

लोकांना डिजिटल जीवनात सुरक्षा देणारे अॅप विकसित केल्यानंतर वास्तविक जीवनात टूकॉलर सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. ब्रॅण्डच्या रूपात आम्ही स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांसोबत काम करण्यास तयार आहोत, कारण प्रत्येक व्यक्ती आणि त्यांच्या प्रियजनांना सुरक्षित ठेवता येईल. गार्जियंस गुगल प्ले स्टोअर आणि अॅप्पल अॅप स्टोअरवरून नि:शुलक डाऊनलोड करता येते.

गार्जियंस कसे काम करते : गार्जियंसमधील ऑनबोर्डिंगची प्रक्रिया सोपी आहे. जर तुम्ही टूकॉलर युजर नसाल तर एक मिस्ड कॉल किंवा ओटीपीद्वारे तुमचाच फोन आहे का, हे तपासले जाईल. या अॅपसाठी फक्त ३ परवानग्या गरजेच्या असतात. तुमचे लोकेशन म्हणजे ठिकाण, कॉन्टॅक्ट अर्थात संपर्क नंबर (जेणेकरून तुम्ही तुमच्या वैयक्तिक गार्जियंसना निवडून आंमत्रित करू शकाल) आणि फोनची परवानगी (ज्यामुळे तुमचे गार्जियंस तुमच्या फोनची स्थिती पाहू शकतील).

गार्जियंस गुगल टाईम अॅप्लिकेशनवर संपूर्ण नियंत्रण ठेवते. तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट यादीतून तुमचे वैयक्तिक गार्जियन म्हणजे रक्षक निवडू शकाल. लोकेशन शेअरिंगला स्टॉप/स्टार्ट करू शकाल किंवा मग निवडलेल्या गार्जियंससोबत स्थायी सेटअप करू शकाल. जर तुम्ही एखाद्या खास प्रवासासाठी लोकेशन शेअर करत असाल तर बॅकग्राऊंडमध्ये गार्जियंस गुपचूप काम करत राहाते.

आपत्कालीन परिस्थितीसाठी वेगवेगळे मोड

इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन मोडमध्ये तुमच्या गार्जियंसना सूचना मिळेल. ते तुमचे ठिकाण अगदी अचूक पाहू शकतील आणि तुम्ही तुमच्या ठिकाणावर कधी पोहोचलात हे जाणून घेऊ शकतील किंवा मदत पाठवू शकतील. सामान्य मोडमध्ये हे अॅप बॅकग्राऊंडला शांतपणे काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे बॅटरी लाईफ वाचवत वेळोवेळी तुमच्या गार्जियनसोबत लोकेशन शेअर करते.

आमचे वचन : गार्जियंस आपल्या स्वत:च्या टूकॉलर अॅपसह एखाद्या थर्ड पार्टी अॅपसोबत कमर्शियल उपयोगासाठी कुठलीही वैयक्तिक माहिती शेअर करत नाही. वैयक्तिक सुरक्षेसाठी ही आमची वचनबद्धता आहे.

गार्जियंसबाबत

गार्जियंस वैयक्तिक सुरक्षेचे एक अॅप आहे ज्याचा विकास टूकॉलरचे क्रिएटर्स, टू सॉफ्टवेअर स्कॅन्डिनेविया एबीद्वारे करण्यात आला आहे. टूकॉलर जगातील २८० मिलियन अॅक्टिव्ह युजर्ससाठी दैनंदिन संचाराचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे आणि याला लॉन्चनंतर अर्ध्या बिलियनवेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. गार्जियंस मोफत आणि संपूर्ण जगात उपलब्ध आहे. ते दोन्ही मोबाइल प्लॅटफॉर्मवर सहजतेने काम करते. ते वैयक्तिक सुरक्षा आणि सोपी हाताळणी लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. टू सॉफ्टवेअर स्कॅन्डिनेविया एबीचे मुख्यालय स्टॉकहोम, स्वीडनमध्ये आहे. कंपनीची स्थापना २००९ मध्ये एलन ममेडी आणि नामी जैरिंघलम यांनी केली. याच्या गुंतवणूकदारांमध्ये कॅपिटल, एटोमिको आणि क्लेनर पर्किंस आहेत.

७ गृहसजावटीचे ट्रेंण्डस

* रेशम सेठी, आर्किटेक्ट, ग्रे इंक स्टुडिओ

गृहसजावटीमध्ये आजकाल मिनिमलिस्टिक डिझाइन हा सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. तुम्ही तुमचा इंटिरिअर थीम काहीही ठेवा, तुमची पसंती मिनिमलिस्टिक डिझाइनला असेल तर तुमचे घर ट्रेंडी दिसेल. यात सर्व गोष्टी कमीतकमी ठेवल्या जातात, मग तो रंग असो, फर्निचर असो वा डिझायनर पीस असो. मिनिमलिस्टिक डिझाइनमध्ये खोल्या थोडया मोकळया, परंतु शोभिवंत दिसतात. बहुसंख्य लोकांना याबरोबरच घराला सफेद रंग देणे आवडते. जरी इतर रंग निवडले गेले, तरी त्याचा टोन म्युटेड ठेवला जातो. मिनिमलिस्टिक डिझाइन पॅटर्न आणि निओ क्लासिकल थीम डिझाइन सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे, ज्यात आधुनिक आणि शास्त्रीय वास्तुकलेचा मिलाफ दिसून येतो.

झुंबर

पूर्वी राजामहाराजांच्या आणि श्रीमंतांच्या राजवाडयांमध्ये आणि हवेल्यांमध्येच झुंबरांचा वापर केला जात होता, परंतु २१व्या शतकात झुंबर हा गृहसजावटीत एक महत्त्वाचा घटक बनला आहे.

याची दोन मुख्य कारणे आहेत – पहिले म्हणजे लोक आपले घर सजवण्यासाठी पैसे खर्च करण्यास तयार असतात, दुसरे म्हणजे आता बाजारामध्ये पारंपरिक झुबंरांबरोबर नवीन डिझाइनचे झुंबर उपलब्ध आहेत. हे झुंबर निओ क्लासिक होम डेकोरसह घराला लुक देतात.

पेंटिंग

आजकाल इंटिरिअर पेंटिंगमध्ये सफेद, पिस्ता ग्रीन, फिकट राखाडी, गडद हिरवा, सॉफ्ट क्ले, फिकट निळा, मस्टर्ड, मिस्ट (पेस्टल ब्लू आणि ग्रीन यांचे मिश्रण), मशरूम कलर, हिरवा वगैरे रंगांचा ट्रेंड सुरू आहे.

तसे, बोल्ड रंगदेखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये चैतन्य यावे असे वाटत असेल तर बोल्ड रंगांची निवड करण्यास अजिबात संकोच करू नका. बोल्ड रंग खोल्यांना डेप्थ आणि टेक्सचर देतात. तसे आजकाल इंटिरिअर पेंटिंगमध्ये काळा रंगदेखील ट्रेंडमध्ये आहे, परंतु या बोल्ड रंगांचा टोन म्यूट ठेवला जातो. आजकाल ग्लास, सॅटिन, एग शेल, मॅट टेक्सचरचा ट्रेंड आहे.

इनडोअर व्हर्टिकल गार्डन

इनडोअर व्हर्टिकल गार्डनदेखील सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. आज असे गार्डन लावणे खूप सोपे झाले आहे. ते तुमच्या घराच्या भिंतींना एक वेगळा लुक आणि टेक्सचर देते. ते आकर्षक तर दिसतेच, पण थर्मल इन्सुलेटर म्हणूनही काम करते. ते उन्हाळयात खोली थंड आणि हिवाळयात उबदार ठेवते.

डबल हाइट पॅसेज

जर तुम्ही नवीन बांधकाम करत असाल, तर तुम्ही डबल हाइट पॅसेज ही कॉन्सेप्ट निवडू शकता. यात जागा मोठी दिसते. साधारणत: छप्पर ९-११ फूट उंचीवर असते. डबल हाइट सीलिंगमध्ये ते यापेक्षा दुप्पट किंवा थोडया कमी वा जास्त उंचीवर असू शकते.

उंच भिंतींवर भित्तीचित्रे आणि कलाकृती ठेवता येतात. मोठमोठया दरवाज्यांसह त्या अतिशय ग्रँड लुक देतात. डबल हाइट पॅसेजमध्ये पारंपरिक झुंबरदेखील अतिशय रॉयल लुक देतात.

प्लँट्स आणि फ्लॉवर्स

तसेही गृहसजावटीत वनस्पती आणि फुलांचे विशेष महत्त्व अबाधित असले, तरी कोरोना महामारीनंतर त्यांचा वापर अधिकच वाढला आहे. ते घराला आकर्षक बनवण्याबरोबरच त्याला नॅचरल लुकही देतात. इनडोअर प्लँट्स एक नैसर्गिक रूम फ्रेशनर म्हणून काम करतात.

तुम्ही त्यांना बाल्कनी आणि टेरेसवरदेखील ठेवू शकता. टेरेस गार्डनची हिरवळ रंगीबेरंगी फुले, ताजी हवा आणि मोकळया आकाशासोबत एक नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देते.

वॉर्डरोब डिझाइनिंग

सध्या जो निओ क्लासिकल ट्रेंड सुरू आहे त्यामध्ये १९व्या शतकात प्रचलित असलेले फ्लुटेड आणि फॅब्रिक फिनिश ग्लास पुन्हा ट्रेंडमध्ये आले आहेत. ते स्टायलिश असण्याबरोबरच नाजूक आणि सुंदरही दिसतात.

तुम्ही त्यांचा वॉर्डरोब डिझायनिंग आणि स्लायडिंग डोअरमध्येही वापर करू शकता. हे इनडोअर प्रायव्हसीसाठी प्रायव्हसी स्क्रीन म्हणूनही वापरले जातात. त्यामुळे बेडरूम-स्टडीरूम, बेडरूम-ड्रेसिंगरूममध्ये पार्टिशनसाठी त्यांचा वापर केला जातो.

फ्लुटेड ग्लासेस व्यतिरिक्त फॅब्रिक फिनिश ग्लासदेखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. यामध्ये पातळ फॅब्रिकची जाळी २ ग्लासच्यामध्ये बसवली जाते. यामध्ये वापरण्यात येणारी जाळी वेगवेगळया रंगांची आणि डिझाइनची असू शकते. तुम्ही तुमच्या घराच्या थीम आणि गरजेनुसार त्यांची निवड करू शकता.

विणकामाच्या सोप्या टीप्स

* प्रतिनिधी

लोकरीचे सुंदर कपडे कसे विणायचे, याचे रहस्य तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर चला, आमच्यासोबत विणकामात नैपुण्य मिळविण्याच्या काही सोप्या पद्धती शिकून घ्या.

चांगल्या लोकरीची निवड

एखादा पोशाख तयार करण्यासाठी वापरलेल्या लोकरीच्या दर्जावरूनच त्या पोशाखाची ओळख ठरते. विणकाम कशासाठी करणार आहात, हे नजरेसमोर ठेवून त्यानुसारच लोकर निवडा. अगदी मनापासून आणि मेहनतीने विणकाम करणार असाल तर लोकरीच्या दर्जाशी कधीच तडजोड करू नका.

योग्य नंबरच्या सुईची निवड

विणकाम सुरू करताना सर्वप्रथन एक वीण घालून हे पाहून घ्या की, ती जास्त घट्ट किंवा जास्त सैल तर होत नाही ना? यासाठी योग्य नंबरच्या सुईची निवड करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे केलेली योग्य सुईची निवड तुम्ही विणून तयार केलेल्या पोशाखाला अधिकच उठावदार करेल.

नियमितपणे तुम्ही केलेले काम तपासून पहा

जेव्हा तुम्ही विणकाम करता तेव्हा नियमितपणे तुम्ही केलेले काम तपासून पहा. यामुळे झालेल्या छोटया, मोठया चुका वेळेवर लक्षात येऊन त्या सुधारता येतील आणि तुमचे विणकाम अधिक चांगल्या प्रकारे होईल. असे केल्यास चुकीच्या वीण उसवण्यासाठी पुढे जो काही जास्तीचा वेळ लागतो तोही वाचेल.

एक साखळी एकाच बैठकीत पूर्ण करा

ही छोटीशी युक्ती नेहमी लक्षात ठेवा. विणकाम थांबवण्यापूर्वी ते मध्येच कुठेतरी न थांबवता एक संपूर्ण साखळी एका बैठकीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा साखळी अर्धवट ठेवून ती नंतर पूर्ण केल्यास त्यातील तफावत तो पोशाख परिधान केल्यानंतर जाणवत राहील.

पॅटर्न लक्षपूर्वक पाहून घ्या

विणकाम करण्यापूर्वी तुम्ही जो कोणता पॅटर्न तयार करणार असाल त्याची लक्षपूर्वक माहिती करून घ्या. व्यवस्थित अभ्यास करा. तो पॅटर्न तयार करण्यापूर्वी वीण कशा प्रकारे घातल्या आहेत, हे समजून घ्या. सोबतच त्या कशा पूर्ण करीत जावे लागेल याचा अंदाज घ्या. यामुळे एक चांगला पोशाख तयार करण्यासाठी तुम्हाला मदत होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें