* सोमा घोष
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेली अभिनेत्री जुई भागवत ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या लोकप्रिय मालिकेत बाल कलाकाराच्या भूमिकेत दिसली. तिने वडिलांकडून संगीताचेही प्रशिक्षणही घेतले आहे. संगीताच्या अनेक कार्यक्रमातही तिने भाग घेतला होता. कलेच्या वातावरणातन जन्मलेल्या जुईची आई दीप्ती भागवत या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि अँकर आहेत तर वडील मकरंद भागवत हे एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक आहेत. दीप्ती भागवत यांनी अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिकांसोबतच सहाय्यक भूमिकाही केल्या आहेत.
जुई भागवतने ‘उंच माझा झोका’, ‘पिंजरा’, ‘स्वामिनी’, ‘मोगरा फुलला’ यांसारख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. तिने झी मराठीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. ज्यामध्ये मकरंद देशपांडे परीक्षक होते. तिने यात भावनाप्रधान अभिनयासाठी पुरस्कार मिळवला. सध्या जुई सोनी मराठीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेत सावनीच्या मुख्य भूमिकेत आहे, ही आतापर्यंत तिला मिळालेली सर्वात मोठी भूमिका आहे, जी प्रेक्षकांच्या अत्यंत आवडीची आहे. चित्रिकरणात व्यस्त असलेल्या जुईने वेळात वेळ काढून खास ‘गृहशोभिके’साठी गप्पा मारल्या. त्यातील हा काही भाग :
अभिनयाच्या क्षेत्रात येण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कुटुंबाचा पाठिंबा किती होता?
माझे आईवडील आणि नातेवाईक सर्वजण सर्जनशील, कल्पक क्षेत्रात आहेत. माझी आई मराठी अभिनेत्री आहे आणि वडील संगीतकार आहेत. संपूर्ण घरातील वातावरण सर्जनशील असल्यामुळे मी बालपणीच कथ्थक आणि गाणे शिकायला सुरुवात केली. मला आठवते की, वयाच्या ८व्या वर्षी मी एकदा आईच्या सेटवर गेले होते, तिथे गेल्यावर मला वाटले, हे माझे क्षेत्र आहे. मी तिथल्या दिग्दर्शकांकडे माझे ऑडिशन घेण्याचा हट्ट धरला. माझ्यातील आत्मविश्वास पाहून त्यांनी लगेचच माझे ऑडिशन घेतले आणि मी एक छोटीशी भूमिकाही साकारली. मला कोणत्याही स्पर्धेत भाग घ्यायला, जिंकायला आणि बक्षिसे मिळवायला खूप आवडायचे. कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मी महाविद्यालयापासूनच रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. पदवीचा अभ्यास करताना ५ वर्षे अभिनयही केला. त्यानंतर अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आणि या क्षेत्रात पदार्पण केले. त्या दरम्यान ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. तिथे मला सर्वोत्कृष्ट भावनाप्रधान अभिनयासाठी ‘बेस्ट एक्सप्रेशन ऑफ दि सीझन’ हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर कोविड आला. त्या काळात मला ही मोठी मालिका मिळाली. यात माझ्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरा वेलनकरसोबत काम करताना मला मजा येत आहे.