* नसीम अन्सारी कोचर
मिनूची अशी तक्रार आहे की, लग्नाच्या ५ वर्षांतच तिच्या पतीला तिच्याबद्दल प्रेम राहिलेले नाही. जेव्हा भेटते तेव्हा एकच रडगाणे गाते. आता ते माझ्यावर प्रेम करीत नाहीत. सतत स्वत:च्या कामातच मग्न असतात. सुट्टीच्या दिवशीही जास्त वेळ बाहेरच घालवतात. कधी जवळ बसून प्रेमाने बोलत नाहीत. मी कशी आहे, असे कधीच विचारत नाहीत. मग माझी गरजच काय उरली आहे?
त्यानंतर ती असा संशयही व्यक्त करते की, कदाचित त्यांच्या आयुष्यात दुसरी एखादी स्त्री आली असेल.
मिनू माझी बालपणीची मैत्रीण आहे. दिसायला अतिशय देखणी. खरे सांगायचे तर उंच, गोरा रंग असलेल्या मिनूकडे पाहून मला कधीकधी तिचा हेवा वाटत असे. माझा रंग सावळा असल्यामुळे अनेकदा मी उगाचच चीडचिड करीत असे. रंग उजळविण्यासाठी जगभरातील लेप लावत असे. ब्यूटी पार्लरच्या फेऱ्या तर ठरलेल्याच होत्या. माझा सर्व पॉकेटमनी सुंदर दिसण्यासाठीच खर्च करीत असे. पण मिनूला या सर्वांची कधीच जास्त गरज भासली नाही. पावडर आणि सौम्य लिपस्टिक लावली तरी ती खूपच सुंदर दिसत असे.
स्वत:कडे दुर्लक्ष नको
एमएचा अभ्यास करीत असताना तिची सचिनसोबत ओळख झाली. सचिन दिसायला खूपच देखणा होता. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर आमचे दोघींचे भेटणे कमी झाले. कारण माझे सासर मेरठला होते. लग्नानंतर माझे दिल्लीला येणे-जाणे कमी झाले.
यंदाच्या दिवाळीला मात्र माझे दिल्लीला येणे झाले. मला बघून माझ्या आईवडिलांना खूपच आनंद झाला. लग्नानंतर माझ्या चेहऱ्यावर लाली आली होती. येथे आल्यानंतर ज्यांना भेटली त्या प्रत्येकाने सांगितले की, लग्नानंतर मी सुंदर दिसायला लागली आहे. माझी अशी स्तुती ऐकून मला आनंद झाला. लग्नापूर्वी ज्या सावळया रंगामुळे माझी चीडचिड होत असे लग्नानंतर तोच सावळा चेहरा माझ्या पतीच्या माझ्यावरील प्रेमामुळे खुलला होता. लग्नापूर्वी चांगले दिसण्यावर मी बरेच लक्ष केंद्रित करीत असे. लग्नानंतर हीच सवय मला उपयोगी पडली. माझ्या नटूनथटून सुंदर राहण्यामुळे खुश असलेल्या पतीच्या प्रेमामुळे, कौतुकामुळे माझ्या चेहऱ्यावर तेज आले होते आणि हेच तेज माझ्या पतीला माझ्यात गुंतवून ठेवण्यासाठी पुरेसे होते. त्यामुळेच घरी असताना तो सतत माझ्या मागेपुढे घुटमळत असे.