सत्य वचन वदली प्रिया

मिश्किली * डॉ. गोपाळ नारायण आवटे

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आमच्या बायकोला व्हॉट्सअॅपचं वेड लागलंय. रात्र रात्र जागून मेसेज पाठवत असते. मेसेज वाचत असते. एकदा रात्री जागा झालो अन् सौ.ला बघून घाबरलोच. ती चक्क एकटीच हसत होती. आम्ही घाबरून विचारलं, ‘‘काय झालं गं?’’

हसू आवरत ती उत्तरली, ‘‘एक जोक आलाय. ग्रूपला जॉइन झेलेय ना मी, त्यामुळे फोटो आणि मेसेजेस येत असतात. ऐकवू?’’ ती फारच उत्साहात होती.

रात्रीचे दोन वाजले होते. आम्ही झोपाळू आवाजात म्हणालो, ‘‘ऐकव.’’

बायको ऐकवत होती. जेव्हा तिचं ऐकवून झालं, तेव्हा तिला बरं वाटावं म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘व्वा! फारच छान.’’

‘‘एक बोधकथाही आलीए. तीही ऐकवू?’’ अन् आमच्या ‘हो, नाही’ची वाटही न बघता ती वाचायला लागली.

सौ.च्या गदागदा हलवण्याने आम्ही दचकून जागे झालो. ‘‘का गं? काय झालं?’’

‘‘कशी होती बोधकथा?’’

‘‘कोणाची बोधकथा?’’

‘‘जी मी आता वाचली ती…’’

‘‘सॉरी डियर, आम्हाला झोप लागली होती.’’

‘‘मी कधीची तुम्हाला वाचून दाखवतेय…’’ सौ. रूसून म्हणाली.

‘‘माय लव्ह, रात्री तीन वाजता माणूस झोपेलच ना? रात्रभर जागलो तर सकाळी लवकर उठणार कसे? दुपारी ऑफिसात काम कसं करणार?’’ डोळे चोळत आम्ही म्हणालो.

‘‘तुमचं मुळी माझ्यावर प्रेमच नाहीए,’’ सौ. आता संतापण्याच्या बेतात होती.

आम्ही पटकन् उठून बसलो, ‘‘बरं, वाच,’’ म्हटल्याबरोबर ती मोबाइलवरची कथा वाचायला लागली. साडेतीनपर्यंत आम्ही जागलो अन् ऑफिसला उशिरा पोहोचलो.

पूर्वी बायको आमच्याशी बोलायची. आम्ही ऑफिसातून परतून आलो की चहाफराळाचं बघायची. पण हे व्हॉट्सअॅप आलं अन् ती पार बदलली की हो, आता ती कुणास ठाऊक कुणाकुणाशी सतत मोबाइलवरून मेसेजची देवाणघेवाण करत असते. नेट अन् मोबाइलचं बिल आम्ही भरतोए. अन् जेवायला अगदीच काही तरी थातुरमातुर समोर येतंय अन् सकाळसंध्याकाळच्या ब्रेकफास्ट अन् स्नॅक्सची तर अजूनही वाईट परिस्थिती आहे.

आम्ही विचार केला सासूबाईंची मदत घ्यावी, त्या काही तरी तोड काढतील. तर त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘बेबीला रागावू नका…सामोपचाराने तोडगा काढा.’’

आमची प्रौढावस्थेतील सौ. तिच्या आयेला अजून बेबीच वाटतेय…तर आम्ही ठरवलं सौ.शी बोलूयात.

एका रजेच्या दिवशी आम्ही प्रेमाने तिला म्हटलं, ‘‘असं सतत स्मार्ट फोनवर असण्याने डोळे बिघडतील तुझे…’’

‘‘नाही बिघडणार…एक काम करा ना, तुम्हीही एक फोन घ्या अन् आमच्या  ग्रूपमध्ये या. खरंच, अहो आमच्या मित्रांचा एक खूप चांगला ग्रूप आहे. खूप मजा करतो आम्ही. खूप गप्पा करतो. खरंच, किती किती छान शोध लावलाय या मोबाइल फोनचा अन् व्हॉट्सअॅप तर काही विचारूच नका.’’ सौ. आपल्यातच गुंग होती. आम्ही तिला किती वेळा समजावून सांगितलंय, ‘‘हे जग खरं नसतं. हे सगळं आभासी जग आहे,’’ पण ती त्या दुनियेतच रमलेली असते.

आमचं वैवाहिक आयुष्य पार ढवळून निघालंय. आम्ही काय करावं ते सुचत नाहीए. त्यावरचा उपाय आम्हाला सापडत नाहीए.

शनिवारी रात्री आम्ही झोपण्याच्या तयारीत असताना सौ.ने जवळ येऊन प्रेमाने म्हटलं,

‘‘अहो. ऐकलंत का?’’

‘‘काय?’’

‘‘या व्हॉट्सअॅपमुळे ना, खूप चांगल्या लोकांशी मैत्री होते. नव्या नव्या मोठ्या लोकांशी ओळखी होतात.’’

‘‘असं?’’

‘‘खूप श्रीमंत अन् खूप वरपर्यंत पोच असलेल्या स्त्रियांशी गप्पा होतात,’’ सौ. सांगत होती.

आम्हाला त्यात गम्य नव्हतं. आम्ही गप्प होतो.

‘‘मी तर कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या आयुष्यात मी वेगवेगळ्या ग्रूप्समधल्या दीड हजार लोकांशी मैत्री करेन. दीड हजारांची लिस्ट आहे.’’

‘‘ज्याला इतके मित्र असतात त्याचा कुणीही मित्र नसतो. कारण खरे मित्र आयुष्यात एक किंवा दोनच असतात.’’ आम्ही चिडून बोललो.

‘‘तुम्ही जळताय का? जेलस?’’

‘‘हॅ, आम्ही का जळू?’’

‘‘माझे सगळे फ्रेंड चांगल्या खानदानी कुटुंबातले आहेत. शिवाय श्रीमंत आहेत.’’

‘‘तर मग आम्ही काय करू?’’ आमचा संताप संताप चाललेला.

‘‘अहो, मी तर एक खास गोष्ट तुम्हाला सांगणार होते.’’

आम्ही सावध झालो. ‘‘कसली गोष्ट.’’

‘‘माझ्या दोनतीन मैत्रिणी उद्या मला भेटायला येताहेत. त्या खूप श्रीमंत आहेत.’’

‘‘तर? आमचा काय संबंध?’’

‘‘प्लीज, उद्या मला बाजारातून छान छान पदार्थ आणून द्या नाश्त्यासाठी…काही मी घरी करेन. अहो, आम्ही ना प्रथमच भेटणार आहोत. अहाहा…किती रोमांचक क्षण असेल ना तो?…अपरिचित मैत्रिणींशी भेट!!’’

‘‘त्या भवान्या राहातात कुठे?’’

‘‘इथेच भोपाळमध्येच!’’

‘‘अच्छा…तर उद्या पार्टी आहे?’’

‘‘पार्टीच समजा, त्या तिघी आहेत. त्या येतील, मग मी पुढे कधी तरी त्यांच्या घरी जाईन. आयुष्य म्हणजे तरी काय हो? एकमेकांना भेटणं, एकमेकांचे विचार जाणून घेणं याचंच नाव आयुष्य!’’ तत्त्ववेत्त्वाच्या थाटात सौ. बोलत होती.

‘‘ए बाई, प्लीज आम्हाला झोपू दे. अगं महिन्याचा शेवटचा आठवडा आहे अन् तुला पार्ट्या कसल्या सुचताहेत?’’

‘‘तुम्ही काळजी करू नका. मी खर्च करेन ना?’’ सौ.ने समजूत घातली.

‘‘खर्च तू कर किंवा मी कर, पैसे माझेच जातील ना? माय डियर, या आभासी जगातून बाहेर ये. त्यात काही तथ्य नाहीए.’’ आम्ही समजावलं.

‘‘अहो, पण त्या उद्या येताहेत?’’

‘‘येऊ देत. आपण घराला कुलूप घालून बाहेर निघून जाऊ.’’

‘‘छे : छे:, भलतंच काय? असं नाही चालणार. हे तर वचनभंग करण्यासारखं आहे.

मला ते मान्य नाही. मी तसं करणार नाही,’’ सौ. बाणेदारपणे म्हणाली.

‘‘मग? काय करायचं म्हणतेस?’’

‘‘त्यांच्यासाठी खानदानी ब्रेकफास्टची व्यवस्था करा.’’

‘‘एकदा पुन्हा विचार कर. ज्या फेसबुकच्या आभासी दुनियेत तू वावरतेस, तिथल्या लोकांना तू ओळखत नाहीस, कधीही भेटलेली नाहीस, तरी कशाला आमंत्रण देऊन बोलावतेस?’’ आम्ही वैतागून बोललो.

‘‘प्लीज, फक्त एकदा बघूयात. हा अनुभव वाईट ठरला तर मी व्हॉट्सअॅपला कायमचा रामराम ठोकेन.’’ सौ.ने आम्हाला आश्वस्त केलं.

दुसऱ्या दिवशी सौ. पहाटेलाच उठली. भराभर स्वत:चं आवरलं. घर साफसूफ केलं. ड्रॉइंगरूम नीटनेटकी केली. नाश्त्यासाठी काही पदार्थ तयार केले. नंतर चहा करून आम्हाला उठवलं. आम्ही निवांतपणे चहा घेतल्यावर ती म्हणाली, ‘‘दहापर्यंत त्या येतील. त्या आधी तुम्ही बाजारातून एवढं सामान आणून द्या.’’

भली मोठी यादी आमच्या हातात देऊन सौ. इतर कामाला लागली.

ती यादी बघूनच आमचा जीव दडपला. बाप रे! एक वेळचा ब्रेकफास्ट आहे की महिन्याभराचं घरसामान? ज्या मिठायांची नावं कधी ऐकली नाहीत, जी फळं बापजन्मात कधी बघितली नाहीत, ती सर्व नावं त्या यादीत होती. पैसे दिलेच नाहीत. आम्ही आमचं पाकीट अन् जुनी खटारा स्कूटर घेऊन बाजारात गेलो. येताना ऑटोरिक्षात सर्व सामान भरून आणलं.

आनंदाने सौ. ने आम्हाला मिठीच मारली. आम्ही आमची कशीबशी सुटका करून घेतली अन् खोलीत गेलो.

सौ. स्वयंपाकघरात पदार्थांची मांडामांड करण्यात दंग होती. आम्ही बावळटासारखे विचार करत होतो. ओळख ना पाळख अन् एवढा स्वागतसत्काराचा सोहळा. तेवढ्यात तिच्या मोबाइलवर मेसेज आला, ‘‘घर शोधतोए, सापडत नाहीए.’’

सौ.ने मेसेज टाकला, ‘‘घिस्सू हलवायाच्या दुकानाशी माझा नवरा तुम्हाला भेटेल.’’

तिने आमच्याकडे बघितलं. आम्ही मुकाट्याने स्कूटर काढली. घिस्सू हलवाई आमच्या एरियातला प्रसिद्ध मिठाईवाला होता. सौ.ने मोबाइलवरून त्यांना आमच्या रंगरूपाची, कपड्याची, स्कूटरच्या रंगाची इत्थंभूत माहिती दिली. आता ओळखायला त्यांना अजिबात त्रास होणार नव्हता.

घिस्सू हलवायाच्या दुकानाशी एक काळ्या रंगाची चकचकीत महागडी मोटार येऊन थांबली. त्यातल्या ड्रायव्हरने आम्हाला विचारलं, ‘‘मिस्टर अमुकतमुक आपणच का?’’

‘‘होय मीच!’’

‘‘तुमच्या घरी जायचंय.’’

‘‘आम्ही घ्यायलाच आलो आहोत.’’ आम्ही वदलो. आत कोण आहे ते दिसत नव्हतं. महागड्या पडद्यांनी गाडीच्या खिडक्या झाकलेल्या होत्या.

आमची खटारा स्कूटर पुढे अन् ती आलीशान गाडी आमच्या मागेमागे.

थोडं पुढे जाऊन आम्ही स्कूटर थांबवली. कारण पुढल्या अरुंद गल्लीत ती भव्य गाडी जाऊ शकत नव्हती. आम्ही वदलो, ‘‘यापुढे पायीपायी जावं लागेल.’’ आम्ही स्कूटर एका घराच्या भिंतीला टेकवून उभी केली.

गाडीचा दरवाजा उघडला. आतून तीन धष्टपुष्ट, भरपूर मेकअप केलेल्या, दागिन्यांनी मढलेल्या महागड्या साड्या नेसलेल्या महिला उतरल्या. आमचं हृदय धडधडू लागलं. प्रथमच बायकोचा अभिमान वाटला की तिच्या मैत्रिणी इतक्या श्रीमंत आहेत.

आमच्या मागे येणारी वरात बघायला मोहल्ल्यातील घरांच्या खिडक्याखिडक्यांतून माणसं गोळा झाली. आश्चर्याने त्यांचे डोळे विस्फारले होते. आमच्यासारख्यांकडे असे भव्यदिव्य पाहुणे म्हणजे नवलच होतं. आम्ही घरापाशी आलो. सौ.ने बसवलं. पंखा सुरू केला. त्या इकडेतिकडे बघत होत्या. बहुधा ए.सी. शोधत असणार.

आमच्या लक्षात आलं, वरवर सौ. प्रसन्न दिसत असली तरी मनातून ती आनंदली नव्हती. काही तरी खटकलं होतं. काय ते आम्हाला कळत नव्हतं.

सौ.ने भराभर पाणी आणलं. खाण्याचे पदार्थ आणून मांडले. एकूणच तिला पाहुणे लवकर जावेत असं वाटत होतं. आम्हाला आपलं वाटलं की आपल्या गरिबीचं टेन्शन तिला आल्यामुळे ती अशी वागतेय की काय. ती फार बेचैन वाटत होती. गप्पाटप्पा, खाणंपिणं झालं. मैत्रिणी जाण्यासाठी उठल्या. आम्हीही निरोप द्यायला सामोरे आलो.

‘‘बराय, भावोजी, येतो आम्ही,’’ एक पुरुषी आवाज कानावर आला.

‘‘बराय, बराय.’’

आम्ही त्यांच्यासोबत निघणार तोच दुसरीने म्हटलं, ‘‘असू देत हो, आता आमचे आम्ही जाऊ,’’ तो आवाजही काहीसा वेगळाच, विचित्र वाटला.

निरोप घेऊन त्या गेल्या अन् कपाळावरचा घाम पुसत सौ. सोफ्यावर बसली. एकाएकी आम्हाला उमजलं अन् आम्ही जोरजोरात हसायला लागलो.

हा.हा.हा.हा.हा.हा…

‘‘आता पुरे.’’ सौ. रागावून खेकसली.

‘‘तर या होत्या तुझ्या किन्नर सख्या…’’ आम्हाला पुन्हा हसायला येऊ लागलं.

‘‘त्यांनी ही गोष्ट लपवली होती माझ्यापासून,’’ सौ.ने आपल्याकडून सफाई दिली.

‘‘म्हणजे तुमच्या आभासी जगातल्या, फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवरच्या मैत्रिणी अशा असतात तर?’’ आम्ही पोट धरून पुन्हा हसू लागलो.

आता मात्र सौ. एकदम भडकली. ती एकदम म्हणाली, ‘‘का? किन्नर माणसं नसतात? कुणाशी?भेटावं, बोलावं, मैत्री करावी अशी इच्छा त्यांना होत नसेल? कुणी चांगली मैत्रीण मिळावी, जिवाभावाचा मित्र मिळावा, त्याच्याकडे जावं, आपल्याकडे त्याला बोलवावं असं त्यांना वाटलं तर त्यात गैर काय आहे? सामान्य माणसासारखं जगण्याचा त्यांचा हक्क नाकारण्याचा आपल्याला काय अधिकार आहे? किती काळपर्यंत आपण त्यांची चेष्टामस्करी करणार? त्यांना दूर ठेवणार? त्यांचे प्रश्न आपण समजून घ्यायला हवेत. त्यांना सन्मानाचं आयुष्य जगता येईल असं व्यासपीठ आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवं. सामान्य माणूस म्हणूनच त्यांना मित्रत्त्वाच्या भावनेने जवळ करायला हवं.’’

तिचं हे बोलणं ऐकून आमचं हसणं थांबलं. ती जे बोलली ते शंभर टक्के खरं होतं. आपण विचार करायला हवा. माणुसकी जपायला हवी. सौ.चा आम्हाला अभिमान वाटला.

वस्तुस्थिती

 * कमल कांबळे

अरुण आणि संदीप बालमित्र होते. अरुणचं पूर्वाशी लग्न झालं तेव्हापासून संदीपशी ओळख झाली होती. अरुणच्या घराच्या मागच्या बोळातच संदीपचं घर होतं. केव्हाही दोघं एकमेकांकडे जायची. पण पूर्वाच्या लग्नानंतर जवळजवळ नऊ वर्षांनी संदीपचं लग्न झालं होतं. कारण त्याला कुणी मुलगी पसंतच पडत नव्हती. शेवटी एकदाची साक्षी पसंत पडली. संदीपच्या बहिणीच्या दिराच्या मुलीकडच्या मंडळींमध्ये साक्षी दिसली अन् बघता क्षणीच संदीप तिच्या प्रेमात पडला. आईबाबांचा एकुलता एक मुलगा अन् दोन बहिणींच्या पाठीवर आलेला लाडका भाऊ म्हणून खूप थाटात लग्न झालं. साक्षी सुंदर, हुशार, गुणी अन् सालस होती. फक्त घरची गरिबी असल्याने संदीपच्या आईचा तिच्यावर राग होता. साक्षीला वडील नव्हते. एक धाकटी बहीण अन् विधवा आई. संदीपने साखरपुडा वगैरे समारंभ न करता सरळ साधेपणाने लग्न केलं अन् साक्षी गृहलक्ष्मी म्हणून घरात आली.

पूर्वाला ती पहिल्या भेटीतच आवडली. दोघींचे सूर छान जमले. मनातलं दु:ख बोलायला साक्षीला पूर्वाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. लग्नानंतर पाच महिन्यांनी साक्षीला दिवस गेले आणि संदीपचा जीव सुपाएवढा झाला. खूप जपायचा बायकोला, खूप कौतुकही करायचा. पण सासूच्या तिरकस बोलण्याने अन् सतत टोमणे देण्याने साक्षी कोमेजून जात असे. त्यातून मुलगाच व्हायला हवा असा सासूचा ससेमिराही होता.

साक्षीला मुलगी झाली. तिच्याचसारखी सुंदर, साक्षीला वाटत होतं सासू आता कडाडेल… पण सासूने त्या सुंदर बाळाला प्रेमाने हृदयाशी कवटाळलं. माझी सोनसाखळी गं ती.’’ म्हणून तिचे पटापट मुके घेतले. त्या क्षणापासून बाळाचं नाव सोना, सुवर्णा पडलं.

हळूहळू गरीब घरातल्या साक्षीने श्रीमंत सासरच्या घरात सगळं व्यवस्थित जमवून घेतलं. आता सगळं सुरळित चाललेलं असतानाच साक्षीला पुन्हा दिवस गेले. सोना त्यावेळी चार वर्षांची होती. दिवस गेले अन् मुलगा होईल की नाही या काळजीने साक्षी धास्तावली.

‘‘पूर्वावहिनी, मी सोनोग्राफी करवून घेते. गर्भ मुलाचा असला तर ठेवीन नाही तर गर्भपात करवून घेईन.’’

‘‘भलतंच काय बोलतेस, साक्षी? अगं, मुलगी झाली तर बिघडलं कुठे? भलतासलता विचारही मनात आणू नकोस.’’ पूर्वाने तिला प्रेमाने दटावलं.

‘‘नाही वहिनी, तुम्हाला कल्पना नाहीए मुलीला काय काय सहन करावं लागतं, तुम्हाला बहीण नाही, शिवाय मुलगीही नाही. म्हणून असं म्हणताय,’’ उदास चेहऱ्याने साक्षी बोलली.

‘‘अगं, इतक्यातच अशी उदास होऊ नकोस. सकाळीच साक्षी आली. चेहरा पांढराफटक पडलेला. ‘‘पूर्वावहिनी, सोनोग्राफीचा निकाल आलाय. मुलगीच आहे दुसरी मला, अॅबॉर्शन करवून घ्यावं लागेल.

‘‘अगं पण का? संदीपभावोजी काही म्हणाले का?’’

‘‘नाही वहिनी, ते खूप चांगले आहेत. ते काहीच म्हणाले नाहीत, म्हणणारही नाहीत. पण मी खूप सोसलंय मुलगी म्हणून… माझ्या आईने, माझ्या धाकट्या बहिणीनेही. वडील गेले तेव्हा मी दहा वर्षांची, स्वाती सहा वर्षांची अन् धाकटी मीना सवा वर्षांची होती. वडिलांच्या जाण्याचा आईला एवढा धक्का बसला की, तिला नर्व्हस ब्रेकडाउन झाला. मीनाकडे दुर्लक्ष ?ाझाल्याने तिला डायरिया झाला. उपचारांसाठी पैसे नव्हते. ती शेवटी मेली. तरुण, सुंदर विधवा, पदरात दोन देखण्या पोरी, हातात पैसा नाही, नातलग नाहीत कसे जगलो आमचं आम्हाला ठाऊक. मी त्या नरकातून बाहेर पडले, पण आई व स्वाती तिथेच आहेत. संघर्षाच्या आगीत होरपळण्यासाठी आणखी एका मुलीला जन्म मी देणार नाही.’’

‘‘हेच शेवटचे शब्द ऐकले पूर्वाने, तिच्या लाडक्या साक्षीचे. पूर्वा भावाच्या लग्नासाठी दिल्लीला जाऊन आली. अन् आल्या आल्या तिला साक्षीच्या मृत्युचीच बातमी समजली. अरुण व पूर्वा ताबडतोब तिकडे धावले. साक्षीचा मृतदेह चटईवर होता. साक्षीची सासू धाय मोकलून रडत होती. साक्षीची आई भकास चेहऱ्याने तिच्या उशाकडे बसली होती. एका कोपऱ्यात सोनाला जवळ घेऊन स्वाती अश्रू गाळत होती. पूर्वाच्या मनात आलं, आता रडतेय ही सासू, पण हिच्याचमुळे साक्षीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. हिचीच सतत कुणकुण होती, ‘मुलगा हवा, मुलगा हवा.’ आता नक्राश्रू ढाळून काय फायदा? तेव्हाच तिला अडवलं असतं, तर मुलीसकट साक्षी आज जिवंत असती.

साक्षीचा देह बघता बघता चितेच्या ज्वालांनी आपल्या कवेत घेतला. कितीतरी दिवस पूर्वा व अरुण रोज संदीपकडे जात होती. स्वाती व स्वातीची आई तिथेच राहात होत्या. तेरावं चौदावं झालं अन् पुन्हा प्रत्येकाचं आयुष्य सुरू झालं.

सोना स्वातीबरोबर रूळली होती. एवढ्याशा जिवाला आईचा मृत्यू म्हणजे काय हे कळलं नव्हतं. पण आई नाही तर मावशीचा आधार होता. बहिणीच्या मृत्युचं दु:ख गिळून स्वाती तिच्या मुलीला जिवापाड सांभाळत होती. स्वातीच्या आठवणी काढत दु:ख विसरण्याचा प्रयत्न सगळेच करत होते. संदीप या दु:खातून सावरणार नाही असं अरुण व पूर्वाला वाटत होतं. पण काळासारखं औषध नसतं हेच खरं… सगळ्यात मोठी काळजी होती सोनाची, तिला सांभाळणार कोण? आजी व मावशीने न्यायचं म्हटलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती अन् राहाण्याची जागा या कोवळ्या जिवाला सांभाळण्यासारखी नव्हतीच.

स्वातीची व तिच्या आईची तुटपुंज्या पगाराची नोकरी, त्या दोघींची गुजराण कशीबशी होईल इतकाच पैसा येत होता. पूर्वा व अरुणही काळजीतच होते.

तेवढ्यात एक दिवस सकाळीच फोन आला. खरं तर रविवार होता. पूर्वा व अरुणला रजा होती. थोडं उशिरापर्यंत झोपावं असा पूर्वाचा बेत होता. पण शेजारच्या कमलवहिनींचा फोन आला. ‘‘अग पूर्वा, तुझे संदीपभावोजी भलतेच स्मार्ट निघाले की! अगं, त्यांनी चक्क दुसरं लग्नं केलं.’’

‘‘काही तरीच काय बोलताय, वहिनी?’’

‘‘खरं तेच सांगतेय, काल बागेत आली असतीस तर त्या दोघांना तूही बघितलं असतंस. तिच्या गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र होतं. हातात हिरवा चुडा होता. मी तिचा चेहरा नीट बघू शकले नाही, पण बऱ्यापैकी देखणी होती मुलगी.’’

‘‘तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल.’’

‘‘नाही गं! संदीपला मी ओळखते ना? चूक होणार नाही माझ्याकडून…’’

पूर्वाने फोन ठेवला. संदीप कालपरवापर्यंत साक्षीच्या आठवणीने हळवा व्हायचा. आज लग्नही केलं? साक्षीला विसरले ते  सहा महिनेच तर झालेत साक्षीला जाऊन?’’

पूर्वाला अजूनही तो दिवस आठवतोय. रात्री उशिराच्या गाडीने ती भावाच्या लग्नाहून आपल्या गावी परतली होती. थकवा अन् झोप अनावर झाली होती. आल्याआल्या अंथरुणावर पडल्याबरोबर सगळेच गाढ झोपले. सकाळी फोनच्या आवाजाने जाग आली. फोन संदीपचा होता.

‘‘पूर्वावहिनी, मी संदीप…’’

‘‘अरे? इतक्या सकाळी फोन? सगळं ठीक आहे ना, संदीपभावोजी?’’ तिने आश्चर्याने विचारलं होतं.

‘‘काहीच ठीक नाही, वहिनी, साक्षी गेली…’’ तो गहिवरून बोलत होता.

‘‘गेली? कुठे गेली? तुमचं भांडण झालं होतं का? तुम्ही तिला अडवली का नाहीत?’’ पूर्वा बोलत सुटली.

‘‘वहिनी… ती गेली… नेहमीसाठी… सोडून गेली.’’

‘‘काय बोलताय, भावोजी? कुठे आहे साक्षी?’’ पूर्वा किंचाळली…

‘‘पूर्वा, आम्ही इस्पितळात आहोत. साक्षी मरण पावली… अॅबॉर्शन करवून घेताना ती व तिचं बाळ दोघंही गेली…’’ संदीपच्या बहिणीने फोनवर सांगितलं.

‘‘बॉडी मिळायला थोडा वेळ आहे. दोन तासांत घरी पोहचतोय आम्ही, त्यानंतर लगेचच नेऊ… पूर्वा, तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? तुझ्या मैत्रिणीला अखेरचं बघून घे.’’ सुनंदाताईने फोन बंद केला.

कमलवहिनींच्या फोनमुळे जागी झालेली पूर्वा चहा करायला स्वयंपाकघरात आली. चहा तयार करून ट्रे घेऊन ती बेडरूममध्ये आली तर अरुणही जागा झाला होता.

‘‘ज्यांच्याशिवाय जगताच येणार नाही असं वाटतं, त्यांना लोक किती पटकन विसरतात?’’ पूर्वाने चहाचा कप अरुणच्या हातात देत म्हटलं.

प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे बघितलं अरुणने, मग चहाचा घोट घेत विचारलं, ‘‘कुणाबद्दल, कशाबद्दल बोलते आहेस?’’

‘‘कमलवहिनींचा फोन होता. तुमच्या संदीपने दुसरं लग्नं केलंय.’’

हे ऐकून अरुण दचकला नाही, चकित झाला नाही. फक्त गंभीर चेहऱ्याने बसून राहिला.

चकित झाली पूर्वा… ‘‘अरुण, तुम्ही काहीच बोलत नाहीए? तुम्हाला नवल वाटलं नाही? राग आला नाही? बरोबरच आहे म्हणा, तुम्ही पुरुष, म्हणून मित्राचीच बाजू घ्याल. पण जर हेच संदीपच्या बाबतीत घडलं असतं, तर साक्षीने असं एवढ्यात दुसरं लग्नं केलं असतं?’’

‘‘नाही, नसतं केलं… नक्कीच केलं नसतं. मला ठाऊक आहे. स्त्रीमध्ये जी शक्ती असते त्याचा शतांशही आम्हा पुरुषात नसतो. म्हणूनच मी स्त्रीला मान देतो. तिचा आदर करतो. कमलवहिनी अन् त्यांच्यासारख्या इतर बायकांनी तुला उलटसुलट काही सांगण्यापेक्षा मीच तुला खरं काय ते सांगतो. काल मी संदीपबरोबर होतो. ऑफिसच्या कामाने बाहेर गेलो नव्हतो, तर संदीपच्या कामात गुंतलो होतो.’’

‘‘तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीत? ती मुलगी कोण आहे?’’ दुखावलेल्या स्वरात पूर्वाने विचारलं.

‘‘स्वाती… साक्षीची बहीण.’’

‘‘स्वाती? साक्षीची बहीण?’’ आश्चर्यच वाटलं पूर्वाला.

‘‘संदीपभावोजी असं कसं करू शकले? अन् ती साक्षीची आई? किती दुटप्पी वागणारी, माणसं आहेत ही? त्यावेळी तर स्वातीला कशी सगळ्यांच्या नजरेपासून दूर ठेवत होती. मला म्हणाली, ‘‘आम्ही खूप गरीब आहोत, पण चारित्र्य अन् नीतीला फार महत्त्व देतो आम्ही. या लोकांनी माझ्या एका पोरीचा जीव घेतलाय, आता दुसरीला मी खूप जपणार आहे. अन् ती स्वाती? भावोजी, भावोजी म्हणायची संदीपला, आता त्याच्याशीच लग्न केलंय? अन् संदीप साक्षीवर एवढं प्रेम करणारा… साक्षी मेली अन् लगेच तिच्या बहिणीशी लग्न करून मोकळा झाला? दुसरी कोणी नव्हती का या जगात? लग्न करायला ती स्वातीच भेटली त्याला?’’ पूर्वाला संताप अनावर झाला होता. खरं तर ती शांत स्वभावाची अन् समंजस होती, पण आज मात्र एकदम खवळली होती. तिला अजूनही खूप काही बोलायचं होतं; पण संदीपने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला अन् तो शांतपणे म्हणाला, ‘‘पूर्वा, शांत हो…ऐकून घे मी काय म्हणतोय ते… अगं, हे सगळं स्वाती काय किंवा संदीप काय, कुणासाठीच सोपं नव्हतं. राहिला प्रश्न साक्षीच्या आईचा. तर हा निर्णय तिचा नव्हता… स्वातीचा होता. स्वातीचं म्हणणं होतं की, आता फक्त सोनाच साक्षीची एकमेव खूण उरली आहे. तिच्याखेरीज रक्ताचं नातंच नाहीए. मी सोनाशिवाय अन् सोना माझ्याशिवाय राहू शकणार नाही. सोनाला दुसरी आई आणली तर ती आम्हाला सोनाला भेटूही देणार नाही… शिवाय ती सोनाशी कशी वागेल याचीही खात्री नाही. लग्न मला आज ना उद्या करायचंच आहे तर मग संदीपशीच केलं तर काय हरकत आहे? सगळेच प्रश्न मिटतील.’’

साक्षीच्या आईने मला एका बाजूला बोलावून घेतलं अन् म्हटलं. ‘‘अरुण, मी जे बोलले होते, त्याच्या विपरीत आज घडतंय… मीच खूप ओशाळले आहे. पण काय करू? संदीपशी स्वातीचं लग्न न करण्याचा निर्णय एका आईच्या हृदयाचा होता; अन् आता लग्न करण्याला संमती देण्याचा निर्णय एका आईच्या बुद्धीने घेतलाय. माझ्यापाशी पोरीला उजवायला पैसा नाहीए. असता तर कधीच तिला उजवली असती.’’

‘‘पूर्वा, तू तिथे नव्हतीस, त्या खूप काही बोलून गेल्या, तोंडातून अक्षरही न बोलता… त्यांची गरिबी तू बघितली नाहीएस, पण मी बघितली आहे. सोनाला घेऊन तिथे राहाणं अशक्य आहे.

‘‘राहिला प्रश्न संदीपचा. तो म्हणाला, अरुण, आई माझं दुसरं लग्न केल्याशिवाय ऐकायची नाही. एकुलता एक मुलगा आहे मी. शिवाय सोनाला बघायला कुणी तरी हवंच ना? मग स्वातीच काय वाईट आहे? शिवाय तिचं माझं दु:ख एक आहे. ती जेवढं माझं दु:ख समजून घेईल तेवढं दुसरी कुणी समजून घेणार नाही. सोनाला दुसरी कुणी एवढी माया देऊ शकणार नाही. सगळंच उद्ध्वस्त होण्यापेक्षा हे बरं नाही का?’’

पूर्वा गप्प बसून होती. अरुणने तिचे खांदे धरून हलवत म्हटलं, ‘‘पूर्वा, अशी गप्प राहू नकोस, काही तरी बोल गं!’’

पूर्वाने मान वर करून अरुणकडे बघितलं. एक स्निग्ध हसू तिच्या चेहऱ्यावर उमटलं. ती म्हणाली, ‘‘मी पुन्हा एकदा चहा करते. मग अंघोळी वगैरे करून आपण संदीपला भेटून येऊ. स्वातीला काहीतरी लग्नभेट द्यायला हवीय. तिलाही बरं वाटेल. आता मला स्वातीतच साक्षी शोधायला हवी. खरं ना?’’

पूर्वाचा निवळलेला चेहरा बघून अरुणही समाधानाने हसला. वस्तुस्थिती कळल्यावर तिचा राग जाईल हे तो जाणून होता.

विस्तवाशी खेळ

कथा * रवी चांदवडकर

रात्रीचे बारा वाजले तरी स्वातीच्या डोळ्यांत झोप नव्हती. शेजारी झोपलेला नवरा मजेत घोरत होता. दिवसभर दमल्यावरही स्वाती मात्र या कुशीवरून त्या कुशीवर होत झोपेची आराधना करत होती. पुन:पुन्हा तिच्या डोळ्यांपुढे तो दुपारचा प्रसंग येत होता. ज्याला ती सहज, हलकाफुलका खेळ समजत होती तो साक्षात विस्तवाशी खेळ होता, या जाणिवेने ती हवालदिल झाली होती. पुरुषांशी मोकळेपणाने बोलणं, हलकेफुलके विनोद करणं, फ्लर्टिंग ही तिच्या मते फारसं गंभीरपणे घेण्याची बाब नव्हती.

स्वाती मैत्रिणींना, नातलगांना नेहमी सांगायची, ‘‘मार्केटमध्ये माझी इतकी ओळख आहे की कोणतीही वस्तू मला स्पेशल डिस्काउंटवर मिळते.’’

स्वाती आपल्या माहेरीही वहिनींना, बहिणींना सांगायची, ‘‘आज मी वेस्टर्न ड्रेस घेतला. खूप स्वस्त पडला मला. डिझायनर साडी घेतली दीड हजाराची, साडी मला फक्त नऊशेला मिळाली, हिऱ्याची अंगठी मैत्रिणींकडून ऑर्डर देऊन करवून घेतली. दोन लाखाची अंगठी मला दीड लाखात पडली.’’

माहेरच्या लोकांच्या नजरेत स्वातीविषयी हेवा, अभिमान अन् कुतूहल असायचं. तिची हुशारी, बारगेनिंग पॉवर अन् वाक्पटुता सगळ्यांना ठाऊक होती. कुणाला काही घ्यायचं असलं तर ते स्वातीला फोन करायचे अन् स्वाती त्यांना हवी असलेली वस्तू योग्य त्या किमतीत मिळवून द्यायची.

आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, शिकलेली, चतुर स्वाती लहानपणापासूनच खरेदी करण्यात हुशार होती. तिला खरेदी करायला फार आवडायचं. एखाद्याला वाचन आवडतं, कुणाला इतर काही आवडतं तसं स्वातीला खरेदी करायला आवडायचं. मोठमोठ्या रकमेच्या वस्तूही ती घासाघीस करून कमी किमतीत अन् थोडक्या वेळात खरेदी करायची. सासरी, माहेरी सर्वत्र तिचं कौतुक व्हायचं.

स्वातीचं माहेर तसं मध्यमवर्गीय. त्यातही निम्न मध्यमवर्गीय. पण लग्नं झालं ते मात्र एका व्यावसायिक घराण्यातल्या अत्यंत श्रीमंत कुटुंबातल्या मुलाशी. कोट्यधीशांच्या घरात येऊन इथले रीतिरिवाज तिने शिकून घेतले पण मुळची काटकसरी वृत्ती मात्र सोडली नाही. घरखर्चात काटकसर करून पैसे वाचवणं अन् त्यातून मनसोक्त खरेदी करणं तिला फार आवडायचं. नवरा भरपूर पैसे हातात देत होता. शिवाय त्याच्या पाकिटातून पैसे लांबवणं हाही स्वातीचा लाडका उद्योग होता. शिकलेल्या, संस्कारवान अन् समजूतदार स्वातीला एक गोष्ट चांगलीच लक्षात आली होती…पुरुषांना काय आवडतं, त्यांचा ‘वीक पॉइंट’ काय असतो, त्यांच्याकडून कमी भावात वस्तू कशी खरेदी करायची हे गणित तिला बरोबर जमलं होतं. ज्या दुकानात किंवा शोरूममध्ये पुरुषमालक असेल तिथेच ती खरेदीला जायची. सेल्समन, सेल्सगर्ल्सना ती म्हणायची, ‘‘तुम्ही फक्त सामान दाखवा. मालकांशी बोलून मी किंमत ठरवीन.’’

खरेदी झाल्यावर हिशेब करताना ती शेठच्या डोळ्यांत डोळे घालून लाडिकपणे म्हणायची, ‘‘भाऊ, किंमत बरोबर लावायची हं! आजची नाही, गेली दहा वर्षं तुमची ग्राहक आहे मी. तुमच्या दुकानाची जुनी कस्टमर.’’

‘‘वहिनी, किंमत जास्त लावणार नाही. काळजी करू नका,’’ दुकानमालक म्हणायचा.

‘‘नाही हो, तुम्ही चक्क जास्त पैसे लावलेत. तुमच्या दुकानावर मला नेहमीच स्पेशल डिस्काउंट मिळतो.’’ बोलता बोलता स्वाती सहजच केल्यासारखा त्याच्या हाताला स्पर्श करायची. ‘‘भाऊ, हे बघा, तुम्ही माझ्या धाकट्या दिरासारखे आहात. दीरभावजयीच्या नात्यात असे रुपयेपैशांचे हिशेब कशाला आणता?’’

बहुधा दुकानदार स्वातीच्या गोड गोड गोष्टींना भुलायचा अन् १५ टक्के, २० टक्के डिस्काउंट द्यायचे.

एका ज्वेलरशी तर स्वातीने चक्क भावजी मेहुणीचं नातं जोडलं होतं. दागिने हा बहुतेक बायकांचा वीक पॉइंट असतो. स्वातीचाही होता. स्वाती खूपदा त्या ज्वेलरच्या दुकानांत जायची. काय काय नवी डिझाइन्स आली आहेत हे नुसतं बघायला गेली, तरी काहीतरी त्यातलं आवडायचं. मग ‘जिजू अन् साली’च्या नात्यात चेष्टामस्करी सुरू व्हायची.

‘‘भावोजी, मी तुमची मेहुणी आहे. तुम्हाला हिंदीतली ती म्हण ठाऊक आहे ना, ‘साली आधी घरवाली…’ माझा हक्कच आहे तुमच्यावर, मी एवढीच किंमत देणार.’’

स्वातीच्या स्पर्शाने सुखावलेला ज्वेलर मिळालेली किंमत मुकाट घ्यायचा. त्याच्या मनात मात्र हे स्पर्शसुख अधिक मिळवण्याचं प्लॅनिंग सुरू असायचं. अर्थात्  स्वाती चतुर होती. ती पैसे दिले की ताबडतोब निघायची. हाती लागणं दूरच होतं.

त्या दिवशी तिच्या वहिनीचा फोन आला. स्वातीला भाचीच्या लग्नासाठी दागिने खरेदी करायचे होते. स्वाती खरेदी करतेय म्हटल्यावर ती ‘स्वस्त आणि मस्त’ असणार हे वहिनी जाणून होती.

स्वातीने घरून निघण्याआधीच ज्वेलरला फोन करून सांगितलं होतं, ‘‘माझ्या भाचीचं लग्न आहे. मी खरेदीसाठी येतेय. तुम्ही चांगली चांगली निवडक डिझाइन्स आधीच बाजूला काढून ठेवा. माझ्याकडे फार वेळ नाहीए.’’

दुकानदार अगदी नाटकीपणाने म्हणाला, ‘‘आपला हुकूम सर आँखों पर, आप आइए तो साली साहिबा. तुमच्यासाठी सगळं तयार ठेवतो.’’

ज्वेलरचं हे दुकान म्हणजे फार मोठी शोरूम नव्हती. पण तो ज्वेलर स्वत: उत्तम कारागीर होता. ऑडर्स घेऊन दागिने तयार करायचा. शहराच्या एका कॉलनीत त्याचं दुकान होतं. काही खास गिऱ्हाइकांसाठी तो ऑर्डर केलेले दागिने तिथे ठेवायचा. तिथूनच खरेदीविक्री चालायची. ऑर्डर केलेला माल घ्यायला, तयार मालातून खरेदी करायला अन् नवी ऑर्डर द्यायला गिऱ्हाइकं येतजात असायची. स्वातीच्या एका मैत्रिणीने या ज्वेलरची अन् स्वातीची ओळख करून दिली होती. पण त्या मैत्रिणीलाही हा ज्वेलर स्वातीला कमी किमतीत दागिने कसे देतो हे कोडंच होतं. मैत्रिणीने त्याच्याकडे कधी न बघितलेली डिझाइन्स स्वातीने त्याच्याकडून डिस्काउंटवर मिळवली होती.

‘‘भावोजी, काही वेगळी डिझाइन्स दाखवा ना? ही तर सगळी गेल्या वेळी दाखवलेलीच आहेत.’’ ज्वेलरच्या डोळ्यांत थेट बघत स्वातीने म्हटलं.

ज्वेलरच्या डोळ्यांत काही तरी वेगळी चमक होती. तो तसा नॉर्मल दिसण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वातीने ज्वेलरच्या हातावर हळूच हात ठेवला. मग त्याच्या दंडाला हळूच स्पर्श केला. त्या स्पर्शाने ज्वेलर बेचैन झाला. तोही अधूनमधून स्वातीच्या बोटांना, मनगटाला, हाताला स्पर्श करू लागला. स्वातीला ते खटकलं. तरीही स्पेशल डिस्काउंट घ्यायचा आहे म्हटल्यावर तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

आज दुकानात ग्राहक नव्हतेच अन् एरवी असणारी पाचसात हेल्पर मुलंही दिसत नव्हती. फक्त एकच मुलगा होता. ज्वेलरने त्या मुलाला एक यादी दिली अन् हे सामान बाजारातून आणून टाक म्हणून सांगितलं. ‘‘अन् हे बघ, जाण्याआधी फ्रीजमधून कोल्ड्रिंकच्या दोन बाटल्या काढून उघडून आणून दे, मग जा,’’

दुकानदाराच्या ऑर्डरप्रमाणे मुलगा काम करू लागला.

‘‘नवी डिझाइन्स दाखवा ना?’’ स्वातीने लाडिकपणे म्हटलं.

‘‘दाखवतो ना, कालच आलेली आहेत. केवळ तुमच्यासाठीच वेगळी काढून ठेवली आहेत.’’

‘‘अय्या? खरंच?’’ स्वाती आनंदून बोलली.

‘‘एक ऐकता का? तुम्ही आतल्या केबिनमध्ये या. कारण सगळा माल बाहेर काढून ठेवणं जरा जोखिमीचं असतं अन् आता तर तो पोरगा हेल्परही नाहीए मदतीला.’’

मुलगा कोल्ड्रिंक देऊन निघून गेला होता. आता दुकानात फक्त स्वाती अन् दुकानाचा मालक दोघंच होती. एक क्षणभर स्वातीला भीती स्पर्शून गेली. यापूर्वी इतकी एकटी ती कधीच कोणत्याही दुकानात नव्हती. दुकानदार आपला गैरफायदा घेईल का? तिला तसं काही नको होतं. थोडं लाडिक बोलणं, थोडा हाताबोटांवर स्पर्श एवढ्यावरच तिने डिस्काउंट मिळवले होते. आजही तसंच घडायला हवं होतं. पण तिच्या छातीत धडधडू लागलं. लवकर खरेदी करून बाहेर पडायला हवं. आतला आवाज सांगत होता. धाडस करून ती आतल्या केबिनमध्ये शिरली. आपण अगदी नॉर्मल आहोत हे दाखवण्यासाठी म्हणाली, ‘‘जिजाजी, आज काय झालंय? असे उदास का आहात?’’

‘‘छे:छे: तसं काहीच नाहीए.’’

‘‘काही तरी आहे नक्कीच! मला नाही सांगणार?’’

‘‘तुम्ही नेकलेस बघा…बघता बघता बोलता येईल.’’

स्वाती दिसायला सुंदर होती. खास मेकअप अन् दागिने यामुळे रूप अधिकच खुललं होतं. ज्वेलर एव्हाना चांगलाच विचलित झाला होता. त्याने एकदम धाडस दाखवत स्वातीच्या हाताला स्पर्श केला. स्वाती दचकली, पण, ठीक आहे, नुसत्या स्पर्शाने काय होतंय म्हणून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

स्वातीच्या या वागण्याने दुकानदाराचं धाडस वाढलं. तो चेकाळलाच. त्याने तिचा हात धरून तिला आपल्याकडे ओढली.

स्वाती घाबरली, हात सोडवून घेत जरबेने म्हणाली, ‘‘हे काय करताय?’’

ज्वेलरने काही न बोलता पुन्हा तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. आता मात्र स्वाती घाबरली. त्याचं धाडस बघून चकित झाली. आतापर्यंत ती स्वत:च्या फायद्यासाठी पुरुषांना खेळवत होती. पण हा खेळ चांगलाच महागात पडत होता. तिने क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्या हातातल्या पर्सचा दमका त्याच्या तोंडावर मारला. दुकानदार हेलपाटला. त्याच्या हातातून स्वातीचा हात सुटला. आता स्वातीने दोन्ही हातांनी त्याला थोबाडायला सुरूवात केली अन् त्याला धक्का दिला. पटकन् आपली पर्स उचलली. धावतच ती केबिनबाहेर अन् मग दुकानाबाहेर आली. आपल्या गाडीत बसली. संताप अन् अपमानाने चेहरा लाल झाला होता. शरीर थरथरत होतं. पटकन् कार स्टार्ट करून तिथून स्वाती निघाली ती सरळ घरीच आली. मनात विचारांचं थैमान होतं. स्वत:चाच राग येत होता. थोडक्यात अनर्थ टळला होता. काहीही वाईट घडू शकलं असतं.

इतकी वर्षं स्वाती ज्याला हलकाफुलका मजेदार खेळ समजत आली होती तो खेळ विस्तवाशीच होता, हे तिला कळलं होतं.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !

कथा * पौर्णिमा आरस

डिसेंबर महिन्याची किटी पार्टी रियाच्या घरी होती. हाउसी म्हणजे तंबोलाचा खेळ रंगात आला होता. शेवटचा नंबर अनाउन्स झाला अन् मालिनीची बॉटम लाइन पूर्ण झाली. पंचावन्न वर्षांची मालिनी त्या किटीतली सर्वात वयस्कर सदस्य होती. एरवी मालिनी किती उत्साहात असायची, पण आज बॉटम लाइन पूर्ण होऊनही ती विमनस्क बसून होती. सगळ्यांनी आपापसांत डोळ्यांनीच ‘काय झालंय?’ असं विचारलं अन् कुणालाच काही माहिती नसल्याने नकारार्थी माना हलवत त्यांनी ‘काही ठाऊक नाही,’ असंही सांगितलं.

किटीतली सर्वात लहान सभासद होती रिया. तिनेच शेवटी विचारलं, ‘‘मावशी, आज काय झालंय तुम्हाला? इतके नंबर कापले जाताहेत तरी तुम्ही अबोल, उदास का?’’

‘‘काही नाही गं!’’ उदास होऊन मालिनीने म्हटलं. अंजलीने आग्रहाने म्हटलं, ‘‘मावशी, काही तरी घडलंय नक्की. सांगा ना आम्हाला…’’

अनीता मालिनीची खास मैत्रीण होती. तिने विचारलं, ‘‘पवन बरा आहे ना?’’

‘‘बरा आहे की!’’ मालिनीने उत्तर दिलं, ‘‘चला, हा राउंड पूर्ण करूयात.’’

‘‘बरं तर, हा राउंड होऊन जाऊ दे,’’ इतरांनीही संमती दिली.

हाउसीचा पहिला राउंड संपला तेव्हा रियाने विचारलं, ‘‘न्यू ईयरचा काय कार्यक्रम ठरवलाय तुम्ही?’’

सुमन म्हणाली, ‘‘अजून काहीच ठरलेलं नाहीए. बघूयात, सोसायटीत काही कार्यक्रम असेल तर…’’

नीताचा नवरा विनोद सोसायटीच्या कमेटीचा सभासद होता. तिने म्हटलं, ‘‘विनोद सांगत होते यंदा आपली सोसायटी न्यू ईयरचा कोणताही कार्यक्रम करणार नाहीए. कारण कमिटी मेंबर्समध्ये काही मुद्दयांवर मतभेद आहेत?’’

सारिका वैतागून म्हणाली, ‘‘खरं तर आपल्या सोसायटीत किती छान कार्यक्रम व्हायचा. बाहेर जाण्याची गरजच वाटत नसे. बाहेर एक तर सर्व हॉटेल्समधून गर्दी भयंकर. तासन्तास ताटकळत उभं राहावं लागतं. शिवाय ते जेवण महाग किती पडतं? जा, खा अन् परत या. यात कसली आलीय मजा? सोसायटीचा कार्यक्रम खरंच छान असतो.’’

रियाने पुन्हा विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय बेत आहे? पवनकडे जाणार आहात का?’’

‘‘सांगणं अवघड आहे. अजून तरी काहीच ठरलेलं नाहीए.’’

हाउसीचा एक आणखी राउंड, थोड्या गप्पाटप्पा, खाणंपिणं झालं अन् किटी पार्टी संपली. मंडळी घरोघर निघून गेली.

मालिनीही घरी आली. कपडे बदलून ती पलंगावर आडवी झाली. समोरच शेखरचा, तिच्या नवऱ्याचा फोटो होता. त्याकडे नजर जाताच तिचे डोळे अश्रूंनी डबडबले.

शेखरला जाऊन आता सात वर्षं झाली होती. मॅसिव्ह हार्टअॅटक आला अन् काहीही करायची उसंत न देता शेखर गेला. एकुलता एक मुलगा पवन अन् ती मुलुंडच्या टू बेडरूम फ्लॅटमध्ये आत्तापर्यंत राहात होती. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. बरे आनंदात दिवस जात होते. पण नीतूला, म्हणजे सुनेला वेगळं घर हवं होतं. पवनचाही तिला पाठिंबा होता. खरं तर मुलगी नसल्याने मालिनीने नीतूला मुलीसारखंच प्रेम दिलं होतं. तिचे सगळे दोष पोटात घातले होते. सर्व लाड पुरवले होते.

पवनचं ऑफिस अंधेरीला होतं. पवनने म्हटलं, ‘‘आई, येण्याजाण्यात वेळही फार जातो शिवाय दमायलाही होतं. मी विचार करतोय अंधेरीतच एक फ्लॅट घ्यावा…’’

‘‘तुला जे योग्य वाटेल ते कर. हे घर भाड्याने द्यावं लागेल ना? इथलं सर्वच सामान शिफ्ट करायचं का?’’ मालिनीने विचारलं.

‘‘भाड्याने? हे घर भाड्याने का द्यायचं? तुला राहायला हे घर लागेलच ना?’’

मालिनीला धक्काच बसला. ‘‘मी इथे? एकटीच? एकटी कशी राहीन मी?’’

‘‘त्यात काय झालं? अगं, तिथे मी वन-बेडरूमचं घर घेणार आहे. तिथे तुला अडचण होईल ना? इथे बरी मोकळीढाकळी राहाशील. तुझ्या भरपूर ओळखी आहेत इथे. नव्या ठिकाणी या वयात अॅडजेस्ट व्हायला त्रासच होतो गं! शिवाय अधूनमधून आम्ही येऊ इथे. तूही येत जा तिथे.’’

यावर सगळे अश्रू डोळ्यांतून मागे परतून लावून मालिनीने परिस्थिती स्वीकारली होती. दुसरा पर्यायही नव्हता. उत्साहाने दोघं नव्या घरात निघून गेली. आर्थिकदृष्ट्या मालिनीला काही प्रॉब्लेम नव्हता. शेखरने छान नियोजन करून ठेवल्यामुळे मालिनीच्या हातात भरपूर पैसा होता. शिवाय ती विचारी, समंजस अन् धीराची होती. गेली वीस वर्षं ती या सोसायटीत राहात होती. सर्वांशी तिचे संबंध सलोख्याचे होते. मदतीला धावून जाण्याचा स्वभाव, सर्वांशी जमवून घ्यायची वृत्ती यामुळे सोसायटीतल्या लहानथोर सर्वांनाच तिच्याबद्दल आपुलकी अन् आदर वाटत असे. एम.ए.बी.एड असल्याने ती लहान मुलांच्या ट्यूशन्स घेत होती. तो एक छान विरंगुळा होता.

नीतूला दिवस गेल्यावर पवन अधूनमधून मालिनीला आपल्या घरी नेत होता. सासू सुनेचे सर्व डोहाळे पुरवत होती. बाळंतपणाच्या महिनाभर आधीच मालिनी पवनच्या घरी जाऊन राहिली. नीतूला मुलगा झाला. नीतूचे आईवडील परदेशातच राहात असल्यामुळे ते इथे येऊन राहाणं शक्यच नव्हतं. लहानग्या यशची तीन महिने छान काळजी घेतली मालिनीने. बाळंतिणीलाही भरपूर विश्रांती, तेलमालिश, सकस, सात्त्विक आहार, सगळंच यथासांग केलं. यश तीन महिन्यांचा झाला अन् पवनने आईला परत तिच्या घरी आणून सोडलं. लहानग्या यशला सोडून येताना मालिनीला रडू अनावर झालं होतं. पण काय करणार?

सणावाराला, काही समारंभ असला म्हणजे पवन त्यांना घ्यायला यायचा. त्याही आनंदाने जायच्या. पण तिथं पोहोचल्याबरोबर घरातली सगळी कामं त्यांच्या अंगावर टाकून दोघं नवराबायको खरेदीसाठी, भटकण्यासाठी, मित्रांना भेटण्यासाठी निघून जायची. यशलाही त्यांच्यावरच सोपवून जायची. जाताना अमूक खायला कर, तमुक खायला कर हेही बजावून जायची. यशला सांभाळून सगळं करताना त्याची धांदल व्हायची. जीव दमून जायचा. काम झालं की लगेच पवन त्यांना घरी सोडून यायचा. इथे घरी त्यांची खूप जुनी मोलकरीण होती. तिचा मालिनीवर जीव होता. ती मनोभावे तिची सेवा करत असे. मालिनीची कुतरओढ तिला समजत होती.

यंदाच्या दिवाळीला पवनने मालिनीला घरी नेलं. ढीगभर फराळाचे जिन्नस तिच्याकडून करवून घेतले. चार दिवस सतत काम केल्याने मालिनीची कंबर दुखायला लागली. ते नीतूच्या लक्षात येताच तिने पवनला म्हटलं, ‘‘आजच आईला घरी सोडून ये. सगळं काम तर झालंच आहे. आता आरामच करायचाय तर त्यांनी त्यांच्या घरी करावा.’’

ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पवनने आईला तिच्या घरी नेऊन सोडलं. मालिनीला त्या क्षणी लक्षात आलं, मुलगा किंवा सून तिची नाहीत. यापुढे ती कधीही त्यांच्या घरी जाणार नाही. दिवसभर राबून दमलेल्या जिवाला दोन प्रेमाचे शब्द हवे होते. पण तिथे तर कोरडा व्यवहार होता. समोरच्या फ्लॅटमधल्या सारिकाने त्यांचं घर उघडं बघितलं तर ती चकित झाली.

‘‘मावशी, आज तुम्ही इथे? पवन…पवन अन् नीतूही आली आहेत का?’’

‘‘नाही आली,’’ भरल्या कंठाने मालिनीने म्हटलं. त्यांची विद्ध नजर सगळं सांगून गेली. सारिकाला काही विचारण्याची गरजच भासली नाही. तिनेच पटकन् घराचा केर काढला. पुसून घेतलं. दारापुढे रांगोळी घालून चार पणत्याही लावल्या. एका ताटात फराळाचे पदार्थ रूमालाखाली झाकून आणून टेबलावर ठेवले. रात्री जेवायचं ताटही घेऊन आली अन् बळजबरी मालिनीला चार घास खायला दिले.

त्या दिवसाच्या आठवणीने आत्ताही मालिनीचे डोळे पाणावले. आज रियाकडे जाण्यासाठी मालिनी आवरत असतानाच पवनचा फोन आला, ‘‘आई न्यू ईयरला तुला घ्यायला येतो. माझे बॉस अन् कलिग्ज डिनरसाठी येणार आहेत.’’

एरवी फोन केला तर पवन, ‘मी बिझी आहे, नंतर फोन करतो,’ म्हणून फोन कट करायचा. आजचा फोन दिवाळीनंतर प्रथमच आला होता. नीतूही केव्हातरी अगदी औपचारिक फोन करते.

फोनच्या आवाजाने मालिनी पुन्हा वर्तमानकाळात आली. फोन नीतूचाच होता.

‘‘आई, नमस्कार, कशा आहात?’’

‘‘बरी आहे मी. तुम्ही तिथे कसे आहात?’’

‘‘आम्ही ठीकठाक आहोत आई, पवनने तुम्हाला सांगितलंच असेल. न्यू ईयरची पार्टी आहे. वीस एक लोक असतील. तुम्ही दोन दिवस आधीच या. मला तर स्वयंपाक येत नाही. तुमच्या हातचं जेवण सर्वांना आवडतंही! तर, तुम्ही तयारीत राहा. मी नंतर पुन्हा फोन करते,’’ फोन बंद झाला.

‘किती चतुर अन् लबाड, स्वार्थी अन् कोरडी आहेत ही माणसं’?मालिनीच्या मनात आलं. पोटचा पोरगाच असा आहे तर सुनेला काय दोष द्यायचा? जाऊ दे. आता आपण फक्त आपला विचार करायचा. त्यांच्या हातातली कठपुतली नाही व्हायचं. दिवाळीत काम करून कंबर दुखून आली होती. आठ दिवस लागले बरं व्हायला. आता पुन्हा तिथे जायचं नाही. कशाला त्रास करून घ्यायचा स्वत:ला?

डिसेंबरची किटीपार्टी रेखाच्या घरी होती.

न्यू इयर सेलिब्रेशनचा विषय निघाला, ‘‘खरं तर जागा लहान पडते, नाही तर काही कार्यक्रम ठरवायला हरकत नाही.’’ अंजलीने म्हटलं.

रेखाने विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय कार्यक्रम आहे? पवनकडे जाणार का?’’

‘‘अजून ठरवलं नाहीए,’’ मालिनीने म्हटलं. ती काही तरी विचारात गढली होती.

‘‘मावशी, कसला विचार करताय?’’

सर्वांच्याकडे बघत मालिनी म्हणाली, ‘‘विचार असा करतेय की तुम्ही न्यू इयरची पार्टी माझ्या घरी करू शकता. भरपूर मोकळी जागा आहे, माझं रिकामं घर तुम्हा सर्वांच्या येण्याने आनंदाने भरून जाईल.’’

‘‘काय म्हणता? तुमच्या घरी?’’ आश्चर्याने सर्वांनी म्हटलं.

‘‘त्याला काय झालं? आपण दणक्यात करू पार्टी,’’ मोकळेपणाने हसत मालिनीने म्हटलं.

‘‘काय मस्त कल्पना आहे…पण मावशी. तुम्ही पवनच्या घरी…’’ रिया म्हणाली.

‘‘यावेळी सगळं वेगळंच करायचं आहे. नव्या वर्षांची सुरुवात आपल्या घरापासूनच करायची. झकास सेलिब्रेशन करून. डिनर बाहेरून ऑर्डर करू. गेम्स खेळू,  मुलं कार्यक्रम देतील. डिनर करू…मजा येईल. खरं तर आपला हा ग्रूप जिथे जमतो ना, तिथे मजाच मजा असते.’’

रियाने तर आनंदाने मालिनीला मिठीच मारली. ‘‘व्वा! मावशी, किती मज्जा. जागेचा प्रॉब्लेम सुटला अन् इतका छान कार्यक्रमही ठरला. व्वा!’’

‘‘आणि बरं का मावशी, कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही सगळ्याजणी मिळून सांभाळू सगळं. अन् खर्च सगळे मिळून वाटून घेऊयात,’’ सारिकाने सांगितलं.

‘‘अगं, तुम्हा सगळ्यांनाच सांगते,’’ मालिनीने म्हटलं, ‘‘फक्त न्यू ईयरच नाही, तुम्हाला एरवीही कधी काही समारंभाची पार्टी करायची असेल तर माझं घर मोकळंच असतं अन् माझ्या घरात तुम्ही सगळे आलात तर मलाही आनंदच वाटतो ना? एकाकी आयुष्यात तेवढंच चैतन्य अन् आनंद.’’

‘‘पण मावशी, पवन…घ्यायला आला तर?’’

‘‘नाही, मी जाणार नाही, इथेच राहाणार आहे.’’

त्यानंतर काही दिवसांनी सगळ्या मालिनीच्या घरी जमल्या. पार्टीला कोण कोण येणार? एकूण किती माणसं, मोठी किती, मुलं किती, मेन्यू काय, कुठून काय आणायचं, कोणावर कसली जबाबदारी असेल, म्युझिक, माइक, लायटिंग, तंबोला, मुलांचे कार्यक्रम सर्व गोष्टी अगदी तपशीलवार ठरल्या. लिहून काढल्यामुळे गडबडघोटाळ्याला वाव नव्हता. न्यू ईयर सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू झाली.

तीस डिसेंबरला सकाळी पवनचा फोन आला. ‘‘आई, तुला घ्यायला येतोय, आवरून तयार राहा.’’

‘‘नाही रे बाळा, यावेळी मी येऊ शकणार नाही.’’

‘‘का?’’

‘‘माझाच काही कार्यक्रम ठरला आहे.’’

पवन वैतागून म्हणाला, ‘‘तुझा कसला कार्यक्रम? एकटीच तर आहेस तिथे…’’

‘‘नाही रे, एकटी नाहीए मी. खूप लोक आहेत इथे सोबतीला. न्यू ईयरची पार्टी ठेवलीय घरी.’’

‘‘आई, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? या वयात पार्टी करते आहेस? अन् इथे माझ्याकडे कोण करेल सगळं?’’

‘‘वयाचा विचार तर मी केला नाही…पण यावेळी मला जमणार नाही.’’

आता पवनने सूर बदलला, ‘‘आई, यावेळी तू एकटी नको राहूस. मुलाच्या घरी तुला अधिक चांगलं वाटेल ना?’’

‘‘एकटी तर मी गेली कित्येक वर्षं राहतेच आहे रे, त्याची मला सवय झालीए.’’

पवनने संतापून म्हटलं, ‘‘जशी तुझी इच्छा…’’ त्याने रागानं फोन आपटला.

त्याचा रागाने लाल झालेला चेहरा बघून नीतूने विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘आई येत नाहीए.’’

‘‘का?’’

‘‘तिच्या घरी पार्टी ठेवलीए तिने.’’

‘‘का? अन् कशाला? आता इथल्या पार्टीचं कसं व्हायचं? मला तर इतक्या लोकांचा स्वयंपाक जमणारच नाही.’’

‘‘पण आता तर तुलाच करावं लागेल.’’

‘‘छे: छे:, मला नाही जमणार.’’

‘‘पण मी सगळ्यांना बोलावून ठेवलंय.’’

‘‘तर मग हॉटेलमधून मागवून घे.’’

‘‘छे: छे:, फारच महाग पडतं ते.’’

‘‘मग बघ काय करायचं ते.’’

दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. शेवटी पवनने सर्वांना फोन करून आई आजारी असल्याने पार्टी कॅन्सल केल्याचं सांगितलं. दोघंही आईवर अन् एकमेकांवरही संतापलेली होती.

‘‘तू आईशी चांगली वागली असतीस तर आज असं खोटं बोलावं लागलं नसतं,’’

पवन म्हणाला, ‘‘आईने कामाशिवाय इथे राहिलेलं तुला खपत नव्हतं ना सतत, लगेच तिला पोहोचवाचा लकडा लावायचीस?’’

‘‘मला काय म्हणतोस? झी आई आहे, तूच तिला समजून घ्यायला कमी पडलास, मी तर सून आहे…मी काय करणार?’’

दोघं एकमेकांना दोष देत राहिली. भांडणं संपेना. दोघांची तोंडं फुगलेली.

हाउसी, लायटिंग, माइक, म्युझिक, गेम्स, मुलांची नाटकं, डान्स, चविष्ट जेवण या सगळ्याबरोबर ‘हॅप्पी न्यू ईयर’चा घोष. असं सगळं सगळं झालं. पण ते पवनकडे नाही, मालिनीच्या घरी. नववर्षांच्या शुभेच्छांच्या वर्षांवात मालिनी न्हाऊन निघाली. यापुढची सगळीच वर्षं अशी आनंदात जाणार होती.

संशय पिशाच्च

कथा * श्री प्रकाश

सागरची बोट बँकॉकहून मुंबईला जायला अगदी तयार होती. तो इंजिनमध्ये आपल्या शिफ्टवर होता. त्याची बोट मुंबईहून बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँग वरून टोकियोला जायची. आता परतीच्या प्रवासात तो बँकाकपर्यंत आला होता. तेवढ्यात बोटीच्या ब्रिजवरून (ज्याला कंट्रोलरूम म्हणतात) मेसेज आला, रेडी टू सेल.

सागरनं शक्तिमान एयर कॉम्प्रेसर स्टार्ट केला. वरून पुन्हा आदेश आला डेड स्लो अहेड. त्यानं इंजिनमध्ये कंप्रेस्ड एयर आणि ऑइल घातलं अन् शिप बँकॉक पोर्टवरून निघालं. त्यानंतर ब्रिजवरून येणाऱ्या आदेशाप्रमाणे शिप स्लो किंवा फास्ट चालत होतं. अर्ध्या तासानंतर शिप ‘हाय सी’ मध्ये होतं. त्यावेळी आदेश मिळाला, ‘फुल अहेड.’

आता बोट फुलस्पीडनं पाणी कापत मुंबईच्या दिशेनं जात होती. सागर निवांत होता. आता फक्त तीन हजार नॉटिकल माइल्सचा प्रवास उरला होता. साधारण आठवड्याच्या आतच तो मुंबईला पोहोचला असता. मुंबई सोडून त्याला आता चार महिने झाले होते.

आपली चार तासांची ड्यूटी आटोपून सागर त्याच्या केबिनमध्ये सोफ्यावर विश्रांती घेत होता. मनोरंजनासाठी त्यानं आपल्या लॅपटॉपवर रूस्तम सिनेमाची सीडी लावली. पण पूर्ण सिनेमा त्याला बघून होईना. यापूर्वी एक जुना सिनेमा होता, ‘ये रास्ते हैं प्यार के’ तो त्यानं बघितला होता. त्या जुन्या सिनेमावरूनच हा नवा सिनेमा बेतलेला होता. त्यात एका मर्चंटनेव्हीच्या ऑफिसरची कथा होती…त्याच्या पत्नीच्या बदफैलीपणाची.

त्याच्या मनांतही संशय पिशाच्चानं थैमान मांडलं. त्याच्या गैर हजेरीत त्याची पत्नी शैलजाही असंच काही करत असेल का? त्यानं ताबडतोब तो विचार मनातून झकून टाकला. शैलजा अशी नाही. तिचं सागरवर मनापासून प्रेम आहे. ती तर सतत त्याला फोन करत असते. ‘लवकर ये, मी तुझी वाट बघतेय…मला इथं तुझ्यावाचून करमत नाहीए…सध्या तर सासूबाई पण इथं नाहीएत. त्या गावी गेल्या आहेत.’

सागरचं लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांतच त्याला टोकियोला जावं लागलं. शैलजा मुंबईतच होती. सागरनं एका सुंदर अपार्टमेंटमध्ये सर्व सुखसोयींनी सुसज्ज फ्लॅट घेतला होता. दरवाज्यावर रिंग डोअर बेल, ज्यात कॅमेरा, सेंसर आणि फोनचीही सोय असते लावून घेतला होता. त्यात बाथरूमच्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडक सेलफोन एप्सशी संपर्क असतो.

डोअरबेल वाजली किंवा दरवाजाजवळ कुठलीही हालचाल जरी झाली तर बाहेरची व्यक्ति सेलफोनवर दिसते. ‘टॉक’ बटन दाबलं की घरातून त्या व्यक्तिशी बोलताही येतं. सागरनं आई व शैलजाच्या फोन व्यतिरिक्त मुंबईतल्या आणखी एका जवळच्या नातलगाच्या फोनशीही डोअरबेल कनेक्ट केली होती. त्याच्या गैरहजेरीत एकट्या राहणाऱ्या शैलजाच्या सुरक्षिततेसाठी तो सर्वतोपरी दक्ष होता.

सागरची पत्नी दिवसा कुठंतरी एक पार्ट टाइम जॉब करायची. बाकी वेळ ती घरातच असायची. सासूबरोबर तिचं छान जमायचं. पण सध्या सासूबाई सांगलीला गेल्या होत्या. त्यामुळे शैलजा एकटी कंटाळली होती. सागरनं मुंबईला पोहोचण्याची अंदाजे वेळ तिला कळवली होती, पण नक्की वेळ तो सांगू शकला नव्हता. तशी फ्लॅटची एक किल्ली त्याच्याजवळ असायचीच.

शिपनं एव्हाना अर्ध अंतर ओलांडून भारतीय समुद्रात प्रवेश केला होता. तीन दिवसांपेक्षाही कमी वेळात सागर मुंबईत पोहोचणार होता. बोट समुद्राच्या लाटांवर हेलकावत होती. सागरचं मनही शैलजाच्या ओढीनं व्याकूळ झालं होतं. तेवढ्यात त्याचा सहकारी दारावर टकटक करून आत आला आणि म्हणाला, ‘‘अरे, ‘रूस्तम’ बघून झाला असेल तर ती सीडी मला दे ना.’’

मित्र कम सहकारी सीडी घेऊन गेला अन् सागरच्या मनात पुन्हा संशयानं ठाण मांडलं. सिनेमात दाखवलेल्या स्त्रीसारखी शैलजाही कुणा दुसऱ्या पुरूषाच्या प्रेमात असेल का? पुन्हा स्वत:च त्यानं मनाला समजावलं, असा संशय घेणं बरोबर नाही. शैलजा तशी नाहीए.

सागरची बोट मुंबई बंदराच्या जवळ होती, पण तिथं जहाज नांगराला जागा नसल्यानं समुद्रात थोड्या अंतरावर नांगर टाकून बोट उभी केली गेली होती. सायंकाळ होऊ घातली होती. त्याचं वायफाय काम करू लागलं होतं. त्याच्या फोनवर मेसेज आला, ‘रिंग एट योर डोर,’ मुंबईत पाऊस सुरू झाला होता.

त्यानं त्याच्या फोनवर बघितलं की जीन्स घातलेली अन् हातात छत्री घेतलेली कुणी व्यक्ति दारात उभी आहे. तेवढ्यात शैलजानं दार उघडून हसून त्या व्यक्तिला आलिंगन दिलं अन् घरात घेतलं. छत्रीमुळे ती व्यक्ति त्याला नीट दिसली नव्हती. सागरला ते विचित्र वाटलं.

थोड्याच वेळात कंपनीच्या लाँचनं तो किनाऱ्यावर पोहोचला. तिथून त्यानं टॅक्सी केली. घरो पोहोचेपर्यंत मध्यरात्र झालेली होती. तो आपल्या अपार्टमेंटमध्ये पोहोचला. फ्लॅटपाशी पोहोचल्यावर त्यानं आपल्या जवळच्या लॅचकीनं हलकेच दरवाजा उघडला. आत फ्लोअर लाइटचा मंद उजेड होता.

बेडरूमचा दरवाजा उघडा होता. बेडवर शैलजा नाइटी घालून झोपलेली होती. तिच्या शेजारी अजून कुणी तरी होतं. जीन्स अन् टीशर्ट मधली व्यक्ति त्याला पाठमोरी दिसत होती. त्या व्यक्तिनं उशी डोक्याखाली न घेता तोंडावर घेतली होती. त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. शैलजाचा हात त्या व्यक्तिच्या अंगावर होता. शैलजाचा कुणी प्रियकर आहे का? तो दबक्या पावलांनी खोलीबाहेर आला. फ्लॅट लॉक केला अन् सरळ हॉटेलात जाऊन थांबला.

त्याला झोप लागत नव्हती. केव्हातरी थोडीशी डुलकी लागली. सकाळी त्यानं चहा अन् ब्रेकफास्ट मागवला. अन् शैलजाला फोन केला, ‘‘आत्ताच पोहोचलो मुंबईत. तू कशी आहेस?’’

‘‘मी छान आहे. काल तुमची वाट बघत होते. त्यामुळे दरवाजा आतून लॉक केला नव्हता. पण रात्री बाराच्या सुमाराला झोपले. खूप दमले होते. इतकी गाढ झोप लागली की सकाळी मेडसर्व्हंट आली तेव्हाच जाग आली.’’

‘‘दोन तासात पोहोचतोय.’’

आपली लहानशी स्ट्रोलर बॅग घेऊन तो टॅक्सीनं घरी पोहोचला. त्यानं बेल वाजवली. शैलजानं दार उघडलं अन् त्याला मिठीच मारली. तो सरळ बेडरूममध्येच पोहोचला. ‘‘शैलजा टॉवेल दे. मला अंघोळ करायची आहे.’’

‘‘ही बाथरूम बिझी आहे. गेस्टरूमवाल्या बाथरूममध्ये करता का अंघोळ?’’

‘‘बाथरूममध्ये कुणी आहे का?’’

‘‘हो…’’

‘‘कोण आहे.’’

‘‘बाहेर आल्यावर कळेलच. घाई कशाला?’’

‘‘हॉलमध्येच बसा. मी चहा आणते, मग बोलूयात.’’ शैलानं चहा आणला. दोघांनी चहा घेतला, फारसं संभाषण झालं नाही. ‘‘मी ब्रेकफास्टचं बघते,’’ म्हणून शैला किचनमध्ये गेली.

पाचच मिनिटांत तिनं आतून सांगितलं, ‘‘बाथरूम रिकामी आहे. स्नान आटोपून घ्या.’’

सागर बाथरूममध्ये गेला. काल बघितलेली जीन्स आणि टीशर्ट होता.

त्यानं टबबाथचा विचार बाद केला अन् शॉवर सुरू केला. शैलजानं दारावर टकटक करत म्हटलं, ‘‘किती वेळ लागेल अजून? लवकर डायनिंग टेबलवर या. मस्त गरम गरम नाश्ता तयार आहे.’’

तो कपडे घालून फ्रेश होऊन डायनिंग टेबलपाशी आला. शैलजानं ज्यूसचा ग्लास त्याच्या हातात दिला अन् गरम छोले भरलेला बाऊल टेबलवर ठेवत ती म्हणाली, ‘‘गरमागरम भटुरे आणि कचोरी घेऊन येते.’’

‘‘ते सगळं नंतर. आधी इथं बैस. मला तुझ्याशी बोलायचं आहे.’’

तेवढ्यात किचनमधून कुणीतरी म्हणालं, ‘‘शैलू, तू बैस बाहेरच मी येतेय कचोरी भटुरे घेऊन.’’

पाठोपाठ एक स्त्री गरमगरम कचोरी अन् भटुरें घेऊन किचनमधून बाहेर आली. अन् तिने हातातला ट्रे टेबलवर ठेवला.

सागर आश्चर्यानं तिच्याकडे बघत होता, ‘‘माझ्याकडे बघत बसलात तर हे गरम छोले भटूरे गार होतील,’’ ती हसून म्हणाली.

‘‘सागर, ही नीरू. माझ्या मामेभावाची बायको. ही माझ्याबरोबर कॉलेजला होती, त्यामुळे वहिनी कम मैत्रीण असं नातं आहे आमचं. यांच्या लग्नाला मला जाता आलं नव्हतं. पूर्वी ही गुवाहाटीला होती आता नाशिकला आहे. माझा भाऊ आर्मीत आहे. सध्या तो एका ट्रेनिंगवर गेलाय. म्हणून ही मला भेटायला आलीय.’’

‘‘बाथरूममध्ये जीन्स टी शर्ट कुणाचेय?’’

‘‘माझेच कपडे आहेत. काल सायंकाळी इथं आल्यावर आम्ही दोघी क्लबहाऊसमध्ये गेलो. भरपूर बॅडमिंटन खेळलो. खूप दमलो होतो. मी तर कपडे न बदलताच झोपले,’’ नीरूनं म्हटलं.

‘‘नाही, क्लबमध्ये आधी आम्ही रूस्तम सिनेमाही बघितला. तुला बघायचाय का?’’ शैलजानं विचारलं.

‘‘तुम्ही पण ‘रूस्तम’ बघितलात?’’ आश्चर्यानं सागरनं विचारलं.

‘‘त्यात एवढं आश्चर्य कसलं वाटतंय?’’ नीरूनं म्हटलं.

‘‘नाही, आश्चर्य नाही. मी पण एवढ्यातच शिपवर बघितला.’’ सागरनं सफाई दिली. त्याच्या मनांतला ‘रूस्तम’, संशय पार निघून गेला होता.

शैलजानं म्हटलं, ‘‘तुम्ही काही सांगणार होता ना?’’

आता विचारण्यासारखं काहीच नव्हतं. सागरनं म्हटलं, ‘‘अगं मला सुट्टी फक्त दहा दिवसंच मिळाली आहे. पुन्हा दहा दिवसांनी टोकियोची व्हिजिट आहे.’’

‘‘मी आजच सायंकाळी जाते आहे. दहा दिवस तुम्ही दोघं मनसोक्त मजा करा.’’ नीरूनं म्हटलं.

‘‘आणि जमलं तर मलाही यावेळी बोटीवर घेऊन चल…एकटीला इथं कंटाळा येतो.’’ शैलजानं म्हटलं.

सागरनं फक्त मान डोलावली.

गुंतता हृदय हे

कथा * रेखा नाबर

चल उतर लवकर स्टेशन आलं.’’

‘‘मानसी, स्टेशन आलय. पण चर्नीरोड, चर्चगेट यायला अजून दोन स्टेशन्स आहेत झोपली होतीस का?’’

‘‘चांगली जागी आहे मी. चर्नीरोडलाच उतरायचय. चल लवकर.’’

मानसीने सुरभीला खाली उतरण्यास भाग पाडले. एरवी बडबड करणारी मानसी आज दादरला चढल्यापासून डोळे मिटून गप्प बसली होती.

‘‘मानसी, बरं वाटत नाहीए का? आज अगदी गुमसुम आहेस.’’

‘‘तेच सांगायचंय तुला. चल, समोरच्या हॉटेलात बसू या.’’

‘‘काय बिघडलं असेल हिचं? सुरभीच्या मनात तर्क विर्तकाची चक्रे फिरू लागली.’’

‘‘सुरभी, आईबाबांनी माझं लग्न ठरवलंय.’’

‘‘काय? तुला न विचारताच?’’

‘‘बाबांनी म्हणे त्यांच्या मित्राला श्यामकाकांना वचन दिलं होतं, त्यांच्या महेशशी माझं लग्न होईल असं.’’

‘‘इतकी वर्षं कधी उल्लेख केला नाही तो!’’

‘‘बोलू नये, पण बोलतेच. संसाराचा गाडा ओढायला माझा पगार हवा होता ना?’’

खरेच होते ते. तिच्या बाबांचा तुटपुंजा पगार. घर चालवायला अपुरा पडत होता. मानसी शिकवण्यासुद्धा करीत असे. ती बी.ए. झाली. तिला एम्. ए. करायचे होते.

‘‘मानु, एका डिग्रीपर्यंत शिक्षण पुरे झालं. आता नोकरी शोधायला लाग. माधवचं शिक्षण व्हायचंय. त्याला इंजीनिअरींग करायचं आहे. माझ्या एकटच्या मिळकतीत ते शक्य नाही.’’

नशिबाने तिला लवकरच नोकरी मिळाली. नोकरी करताना तिने एम्.ए. (अर्थशास्त्र) केले. तिला बढती मिळाली. तरीही तिच्या लग्नाचा विचार वडिलांच्या मनाला शिवला नाही. ऑफिसांतील रमेश दिघेबरोबर तिचे सुर जुळले होते. कितीतरी दिवस त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या. ‘मेड फॉर इच अदर’ जोडी होती. त्या अवधीत तिने दुसऱ्यांदा एम्.ए. (राज्यशास्त्र) केले. ती ऑफिसर झाली व आता वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला कारण माधवचं इंजीनिअरींगचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. सुरभी तिची अगदी सख्खी मैत्रिण असल्यामुळे तिला मानसीच्या जीवनपथाची समग्र माहिती होती.

‘‘मानसी, रमेशचा विचार केलायस का? तू सांगितलंस का आईबाबांना?’’

‘‘ते काही ऐकून घ्यायला तयारच नाहीत. मला शपथ घातली त्यांनी, शिवाय धमकीसुद्धा दिली की महेशशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न केलं तर ते जीव देतील.’’

तसा महेश सर्वच बाबतीत रमेशपेक्षा उजवा होता. पण प्रेमात गुंतलेले मन कधी असला विचार करत नाही.

‘‘मग आता तू काय ठरवलंस?’’

‘‘महेशशी लग्न करण्याखेरीज काही पर्याय ठेवलाच नाहीए आईबाबांनी नाहीतर आत्महत्त्या.’’

‘‘खुळी की काय तू? जीव कस्पटासमान आहे का फेकून द्यायला?’’

‘‘पण रमेशचं वाईट वाटतं गं.’’

‘‘हो ना. त्याला हे सांगायला हवं. जीवावर येतंय अगदी. सुरभी तू सांगशील का गं प्लीज?’’

‘‘छे छे ही तुमच्यातली वैयक्तिक बाब आहे. मी कशी लुडबूड करणार त्यात?’’

‘‘पण तू आम्हा दोघांची जवळची मैत्रीण आहेस ना?’’

मी माझ्या नकारावर ठाम नाही राहू शकले. शेवटी मलाच ते काम करावे लागले. डोके दुखत होते म्हणून कँटीनमध्ये कॉफी प्यायला चालले होते. रमेश कँटीनमधून बाहेर येताना दिसला. परतण्याचा विचार करीत होते.

‘‘सुरभी, बरं झालं भेटलीस. चल, मी परत येतो कँटीनमध्ये. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय.’’

‘‘रमेश, मी घाईत आहे रे. खूपच डोकं दुखत होतं. म्हणून क्रोसिन घेतली. वर गरम कॉफी घेते म्हणजे बरं वाटेल.’’

‘‘मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे.’’

या धर्मसंकटातून सुटका नसल्याची सुरभीची खात्री पटली.

‘‘कोणता प्रश्न पडलाय तुला?’’

वेड पांघरून पेडगावला गेले.

‘‘सुरभी, हल्ली मानसीला काय झालंय? फोन केला तर कट करते आणि माझ्या वाऱ्यालासुद्धा उभी राहत नाही. माझं काही चुकलंय का?’’

तो इतका काकुळतीला येऊन बोलत होता की तिला सांगणे भाग पडले, ‘‘हे बघ रमेश, तू सुरभीविषयी गैरसमज करून घेऊ नकोस. तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवलंय.’’

रमेश जवळजवळ किंचाळलाच.

‘‘ठरवलंसुद्धा? हिला न विचारता? कसं शक्य आहे?’’

‘‘तसंच आहे. तिच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं.’’

‘‘ते वचन मानसीने का पाळायचं? मी कोर्ट मॅरेज करायला तयार आहे. आमच्या घरातले तिला आनंदाने स्विकारतील.’’

सुशिक्षित, सुंदर, सुस्वभावी मानसी कोणालाही आवडेल अशीच होती.

‘‘ते सगळं खरं असलं, तरी तिच्या आईवडिलांनी तिला शपथ घातली आहे. ठरवलेल्या मुलाशी लग्न केलं नाहीस तर जीव देऊ अशी धमकीसुद्धा दिलीय, हे सगळं सांगायचा धीरच होत नाहीए तिचा. नाईलाज आहे रे.’’

‘‘मग काय बोलणंच खुटलं,’’ असे म्हणून लांब उसासा सोडून, निराश मनाने तो निघून गेला. मानसीला सांगितल्यावर ती रडरड रडली. पुढच्याच आठवड्यांत रमेशची अहमदाबादला बदली झाली. म्हणजे त्याने करवूनच घेतली. तो गेल्यावरच आम्हाला ते कळले.

‘‘सुरभी, माझ्या जगण्यातला रसच संपलाय. रस काढल्यावर उरलेल्या चिपाडासारखं आयुष्य माझं. काय ही माझ्या प्रेमाची परवड? मरत नाही म्हणून जगायचं.’’

‘‘अशी निराश नको होऊस मानसी. तुझ्या जीवनातल्या नवीन पर्वाला आरंभ होतोय. काहीही कारणाने का असेना, तू महेशला जीवनसाथी म्हणून स्विकारलं ना, मग त्याच्याशी प्रामाणिक राहा. रमेशने बदली करून घेतली. ते एका अर्थी बरंच झालं.’’

‘‘मला तर त्याची फसवणूक केल्यासारखं वाटतंय. माहिती नाही मी महेशला साथ देऊ शकेन का?’’

‘‘मानसी, तुला खंबीर झालंच पाहिजे. मनाच्या पाटीवरून भूतकाळ पुसून टाक. मला माहिती आहे. सांगणं सोपं आहे. वागणं कठीण आहे. पण मनाचा निर्धार कर आणि पुढे हो.’’

सतत मनावर बिंबवून तिला लग्नाला तयार केली. ऑफिसमध्ये सर्वांनाच तिच्या व रमेशच्या संबंधांबद्दल माहिती होते. त्यामुळे या विवाहाबाबत तिच्यावरच टपका ठेवला गेला.

‘‘आजकालच्या मुली बिनदिक्कत दुसऱ्याच्या भावनांशी खेळतात.’’

‘‘पैसेवाला मिळाल्यावर कसलं प्रेम आणि कसलं काय?’’

‘‘बरं द्ब्राझालं. रमेशनं बदली करून घेतली. नाहीतर झुरून वाट लागली असती त्याची.’’

वस्तुस्थिती फक्त सुरभीलाच माहिती होती. पण कोणाकोणाचं तोंड बंद करणार म्हणून तिने गप्प राहणंच पसंत कले. लग्नाला ऑफिसातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सदस्य हजर होते. एका महिन्याच्या रजेनंतर ती हजर झाली, तेव्हा बरीच फ्रेश वाटत होती. सिल्कची भारी साडी, ठसठशीत मंगळसूत्र, हिरवा चुडा यामुळे तिचं मुळचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. सुरभीला राहावलं नाही.

‘‘आज खुशीत दिसतोय एक माणूस. मस्त झाला ना हनिमून?’’

‘‘झाला एवढंच खरं. मला महेशच्या ठिकाणी रमेशच दिसतो गं. मग मी बेचैन होते. त्याला साथ नाही देऊ शकत. अपेक्षाभंग होत असणार त्याचा. पण मी तरी काय करू? एक मात्र खरं. महेश खूप चांगला आहे. माझा मूड सांभाळून वागत होता. माझा शब्द पडू देत नव्हता. त्याला माझा भूतकाळ माहीत असेल का गं? सांगायला अवसरच मिळाला नाही.’’

‘‘खरोखरच चांगला जोडीदार मिळालाय तुला. आता मन लावून संसार कर.’’

‘‘माझ्या प्रेमाच्या थडग्यावर संसाराची इमारत कशी उभी करू? हतबल आहे मी.’’

त्यांच्या घरी जणू लक्ष्मी पाणी भरत होती. महेशसुद्धा हौशी होता. नेहमी मानसी भारी भारी साड्या नेसून येत होती. परफेक्ट मॅचिंग ही तर तिची खासियतच होती. लग्नाला दोन वर्षं झाली, तरी काहीच प्रगती न झाल्यामुळे तिची सासू कुरकुर करू लागली.

‘‘सुरभी, हल्ली आई खूपच चिडचिड करतात. मला मूल न होण्याबद्दल टोचून बोलतात. सारखी व्रतवैकल्य आणि पूजाअर्चा करायला लावतात. महेशलासुद्धा सांगता येत नाही. माझं आयुष्य म्हणजे समस्या आणि दु:खाचा सागरच आहे.’’

‘‘असं नसतं मानसी. आयुष्य हे सुखदुखाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र असतं. पण ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वता एवढे’ असं प्रत्येकालाच वाटतं. मला सांग तुला मुल हवंय ना?’’

‘‘आता लग्न केलंय तर मूल व्हायला हवं. निदान सासूबाईंसाठी.’’

‘‘मग तुम्ही डॉक्टरकडे जा आणि त्यांचा सल्ला घ्या.’’

ती दोघंही डॉक्टरकडे गेली. रिपोर्ट्सवरून दोघांमध्ये काहीही दोष नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. मानसीचा जीव भांड्यात पडला.

‘‘मानसी, तू महेशच्या सहवासांत सुखी आहेस ना?’’

‘‘आहे, कारण मी त्यांच्यात रमेशला बघते.’’

‘‘तसं करू नको मानसी. रमेश हा तुझा भूतकाळ आहे. तो मागे पडला आहे. पण महेश तुझा वर्तमान आणि भविष्य आहे. तुझं सुख त्याच्यावरच अवलबूंन आहे, हे मनावर बिंबव आणि तू त्याच्याशी समरस हो.’’

‘‘प्रयत्न करीन. पण प्रेम जबरदस्तीने केलं जात नाही ते आपोआप होतं.’’

ऑफिसमधील नवरात्रीच्या कार्यक्रमाला ती सुरेख दिसत होती. हिरवी जरीची साडी, हिरवा मॅचिंग साज, भरघोस गजरे. एकच गोष्ट खटकत होती. तिने अंगभर पदर घेतला होता. एरवी ती एका खांद्यावर पिन करीत असे.

‘‘मानसी, इतका छान साज केला आहेस. काकूबाईसारखा अंगभर पदर कशाला घेतलास? नेहमीसारखा पिन कर ना!’’

‘‘अगं, लो नेकचा ब्लाऊज आहे ना, म्हणून अंगभर पदर.’’

‘‘मानसी, हल्ली सगळ्यांचेच लो नेक ब्लाऊज असतात. तुझी गोरीपान पाठ छान दिसेल, हिरव्या बॅकग्राऊंडवर.’’

‘‘काहीतरी काय? आहे तसंच छान दिसतं.’’

‘‘ते काही नाही, मीच करते,’’ असे म्हणत सुरभी तिचा पदर बाजूला करायला लागली.

‘‘एकदा सांगितलं ना, मला असाच पदर हवाय म्हणून,’’ ती एवढ्या जोरात ओरडली की सुरभी तिच्यापासून लाबंच गेली. नंतर ती धावतच वॉशरूममध्ये गेली. काहीतरी गडबड असल्याचे जाणवून सुरभीसुद्धा तिच्यामागे धावली. ओक्साबोक्शी रडत असलेल्या मानसीने पदर बाजूला केला व सुरभीकडे पाठ केली.

‘‘सुरभी, नीट बघ.’’

‘‘अरे बाप रे, हे कधी झालं?’’

‘‘कधी आलाय माहिती नाही. कालच माझ्या लक्षात आलं. खरं तर आज मी हेअरस्टाइल करणार होते. काल संध्याकाळी ट्राय केली आणि पुढे मागे आरसा ठेवून बघत होते तर या पांढऱ्या डागाने डोळ्यापुढे काळोखी आणली.’’

‘‘महेशला सांगितलं का?’’

‘‘नाही. मी आपणहून सांगणारच नाही, कळेल तेव्हा कळेल.’’

‘‘आपण ताबडतोब डॉक्टरकडे जाऊ या.’’

डॉक्टरांनी औषधे दिली, परंतु बरे होण्याची खात्री दिली नाही. जवळजवळ एका महिन्याने तिने सुरभीला परत चर्नीरोडला गाडीतून खाली खेचले.

‘‘सुरभी, त्याला कळलं गं. त्याने सासूबाईला सांगितलं. दोघांनीही माझ्यावर आग पाखडली.’’

‘‘औषधे घेतेस ते सांगितलं का?’’

‘‘सांगितलं गं. पण त्याना वाटतंय लग्नाआधीपासूनच हे डाग आहेत आणि आम्ही त्यांना फसवलय. त्यांनी मला ताबडतोब घर सोडायला सांगितलंय. घटस्फोट देणार आहे तो. सुरभी, माझ्या नशिबात संसार सुख नाहीच आहे. दोन वेळा डाव अर्ध्यावर सोडलाय. काय करू मी आता? जीव देण्यावाचून पर्यायच नाही. असं विद्रुप घेऊन कशाला जगायचं?’’

ती धाय मोकलून रडू लागली. कॉफीशॉपमधील सगळी त्यांच्याकडे पाहू लागली. सुरभीला काही सुचेना.

‘‘मानसी, कूल डाऊन. शांत हो, सगळे आपल्याकडेच पाहतायत. त्याने घराबाहेर काढलं तर माहेरी राहा. तिथेही राहायचं नसेल तर वर्किंग वुमेन्स होस्टेल्स आहेत की भरपूर. तुझी नोकरी अबाधित आहेच. न जाणो वैद्यकिय उपचारांनी तुला बरंही वाटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ती माहेरी राहायला गेली.

घटस्फोटाची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली. कुठलीही वाईट गोष्ट लवकर पसरते. या रिवाजानुसार तिच्या शरीरावरील पांढरे डागसुद्धा पसरू लागले.’’

दादावहिनी कुरकुर करू लागले.

‘‘मानु, तुझ्यावर वाईट परिस्थिती आलीय हे खरंय. पण आमच्या पदरी मुलगी आहे. तिच्या भवितव्याचा प्रश्न आहे, तेव्हा तू योग्य दिशेने विचार करावास असं मला वाटतं.’’

ज्या भावाच्या भल्यासाठी तिने आपल्या भवितव्याचा विचार बाजूला सारला होता, त्याच भावाने तिला असहाय्य केले. तिच्या मनाला यातना झाल्या. आधार होता फक्त सुरभीचा. वकिलांकडे, कुटुंबन्यायालयांत खेटा घालताना तिचीच साथ होती. घटस्फोट तर होणारच होता. तोपर्यंत दादाकडे राहायचे व नंतर वर्किंग वुमेन्स होस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तिने हालचालसुद्धा सुरू केली. अखेर निर्णयाचा दिवस आला. महेशला समोर बघून तिला भडभडून आले. तिने सुरभीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाच.

‘‘सुरभी, मी लगेच होस्टेलवर जाणार आहे.’’

‘‘मानसी, तुझं सामान?’’

‘‘आणलीय ना बॅग. दादावहिनी कुठे आहे. तू येतेस ना बरोबर?’’

दादा वहिनी कोर्टात हजर होती.

‘‘हो तर. आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर असणार आहे.’’

मानसीला कडक उन्हात थंडांव्याचा भास झाला. तेवढ्यात महेश तिच्याजवळ आला. बॅग तिच्याजवळ ठेवली.

‘‘हे तुझे कपडे आणि दागिने, ऑल द बेस्ट.’’

तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सुरभीने समजूत घातली.

‘‘मानसी, शांत हो. आपण परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलंय ना? मग कच नाही खायची.’’

शांतपणे तिने दादाकडची बॅग घेतली व दोघीही बाहेर आल्या. त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. समोर रमेश उभा होता. संमिश्र भावनांचा कल्लोळ मानसीच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ती अवाक् झाली, सुरभीनेच आश्चर्य व्यक्त केले.

‘‘रमेश, तू आणि इथे? कशासाठी आलास?’’

‘‘सुरभी, माझा घटस्फोट वगैरे काही नाही. मी माझ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी आलोय.’’

त्याने लाल गुलाबाचे फूल मानसीच्या हातात दिले, तेव्हा ती भानावर आली.

‘‘मला आजच घटस्फोट मिळणार ते तुला कसं कळलं?’’

‘‘आमच्या सेक्शनचा संतोष जाधव आहे ना, तो तुझा सगळा वृत्तांत मला देत होता. मी कायम त्याच्या संपर्कात होतोच. मला सगळी इथ्थंभूत माहिती आहे.’’

‘‘छुपा रूस्तम निघाला हा संतोष.’’

‘‘पण बरंच झालं ना?’’

‘‘रमेश, हे बघ तू जर दयेपोटी माझा स्विकार करत असशील तर ते मला मान्य नाही. एकटं राहण्याचं मानसिक धैर्य आलंय मला.’’

‘‘मानसी, मी तुद्ब्रझ्या स्वभावावर आणि गुणवत्तेवर प्रेम केलं. शरीरावर नाही. दोघांचंही पहिलं प्रेम आहे हे. मर्मबंधांतल्या ठेवीसारखं जपू या. डागाळलेला चंद्र सर्वांना शीतलता देतोच ना? तशीत तू माझ्या जीवनांत ये आणि चांदण्यांची बरसात कर.’’

‘‘अखेर हरवलेलं गवसलं माझं प्रेम’’ असं म्हणून मानसीने आवेगाने रमेशला मिठी मारली. सुरभीने सावध केले.

‘‘हे फॅमिली कोर्ट आहे. भानावर या. एक मात्र खरं इथे लग्न मोडतातच असं नाही. पुनर्मिलनसुद्धा होऊ शकतं.’’

रमेशनं काव्यातून भावना व्यक्त केल्या.

‘‘प्रेम म्हणजे प्रेम असतं. सर्वांचं सेम नसतं.’’

‘‘अहो कवीराज, बहोत खूब. आता या दोन बॅगा आणि त्याची मालकीण सांभाळा. तुम्ही हाकलून देण्याआधीच निघते. शेवटचा दिस गोड जाहला.’’ खद्खदून हसत तिघेही मार्गस्थ होतात. वातावरणांत धून लहरते.

‘‘हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे.’’

ही ऍन्ड शी

 * डॉ. सुरेंद्र मोहन

आधी तुम्हाला ‘ही’ अन् ‘शी’ ची ओळख करून द्यायली हवी. ‘ही’ म्हणजे हिमांशु एम.एन.सीमध्ये मोठ्या हुद्यावर काम करतो, सतत विमानानं फिरत असतो.

‘शी’ म्हणजे शिल्पा. सुंदर दिसणारी एक सज्जन बाई आहे. सक्सेसफुल होममेकर अन् सक्सेसफुल फॅशन डिझायनर आहे. फारच बिझी असते. तिचं आपल्या घरावर अन् व्यवसायावर खूप प्रेम आहे. तिचं रूटीन ठरलेलं आहे. प्रत्येकवेळी ती कामात असते, पण प्रत्येक कामासाठी ती वेळ काढते. शी इज ग्रेट.

शिल्पा हिमांशुची भेट मुंबई, कोलकात्ता फ्लाइटच्यावेळी एअरपोर्टवर झाली. सुंदर स्मार्ट शिल्पा हिमांशुला आवडली. दाट केसांचा, सडपातळ बांध्याचा, उंच, देखणा हिमांशु शिल्पालाही पसंत पडला. बरेच दिवस त्यांचं डेटिंग चाललं अन् मग दोन्ही कुटुंबांच्या संमतीनं त्यांचं लग्न झालं.

कोलकात्त्याच्या एका मोठ्या रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. वाढतं वय शिल्पाकडे बघून जाणवत नाही. हिमांशु मात्र वयस्कर वाटू लागलाय. वजन अव्वाच्या सव्वा वाढलंय. ढेरी ज्या वेगानं वाढली, तेवढ्याच झपाट्यानं डोक्यावरच्या केसांनीही रजा घेतली. या दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आनुंवशिक म्हणूनही आल्या आहेत.

‘‘शिलू हिमूचं काही बरं चाललेलं नाहीए…’’ मोनानं दिव्याला ब्रेकिंग न्यूज सांगितली.

मोनाला चित्रपट तारे तारकांबद्दलच्या बातम्या विशेषत: त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दलच्या बातम्यांमध्ये विशेष इंटरेस्ट होता. छिद्र दिसलं की डोकावणं अन् फट दिसली की कान लावणं हे तिचं आवडते छंद होते.

‘‘तुला कसं कळलं? बातमी पक्की आहे ना?’’ दिव्या पूर्ण बातमी जाणून घेणारी होती.

‘‘अगं, माझी मेड म्हणजे मोलकरीण गौरी सध्या शिल्पाकडे काम करतेय, कारण तिची मेड गावी गेलीय. तर गौरीनं सांगितलं, दोघं नवरा बायको वेगवेगळे झोपतात. तिनं काही तरी डिव्होर्स असं ऐकलं, बाकी सगळं इंग्लिशमध्ये होतं ते तिला नीटसं समजलं नाही.’’ मोना म्हणाली.

‘‘शिल्पा मॅडम, आता फॅशन सेलिब्रेटी झाल्यात ना?…बिच्चारा हिमांशु…शिल्पाला त्यानं केवढा सपोर्ट केला होता,’’ दिव्यानं हिमांशुची बाजू घेतली.

‘‘शिल्पानं स्वत:ला चांगलं मेंटेन केलंय. राहतेही अगदी टिपटॉप…आता त्यांची जोडी फारच विजोड दिसते,’’ मोनाने शिल्पाची कड घेतली.

‘‘तिच्या हसबंडचं स्टेटस आणि पॅकेज तर चांगलं आहे…’’ दिव्या म्हणाली.

‘‘फॅशन जगताचं वेगळं असतं हो…अजून कुणीतरी भेटला असेल. हृदयाची कुणी गॅरेंटी देत नाही. ते कुणावरही भाळतं,’’ मोना हसून म्हणाली.

मोना, दिव्या, मंजिरी,शालिनी, रागिणी, मोहिनी, अल्पना, नेहा, स्नेहा, प्रतिभा या सगळ्या एकाच बिशी ग्रुपच्या मेंबर होत्या. पूर्वी शिल्पाही त्यांच्यात होती. पण ती कामात गुंतत गेली तशी ती त्यातून बाहेर पडली. तरीही त्या सगळ्याजणी शिल्पाशी मैत्री ठेवून होत्या.

अल्पनाच्या फ्लॅटवर त्या दिवशी पार्टी झाली. तिचा नवरा ऑफिसच्या टूरवर होता. लहान मुलं झोपी गेली होती. रमीचे डाव अन् पनीर, कांद्याची भजी जोडीला असल्यावर गप्पा कुचाळक्यांना ऊत आला तर त्यात नवल काय? शिल्पा हिमांशुच्या ब्रेकअपची हॉट न्यूज होतीच.

‘‘तुझ्या गौरीनं अजून काय काय सांगितलं?’’ मंजिरीचं कुतुहल स्वस्थ बसू देत नव्हतं तिला.

‘‘डिव्होर्स इतका सोप्पा नसतो गं!…शिवाय मुलगी राजस्थानातल्या प्रसिद्ध शाळेत शिकतेय…’’ मोनाकडे फारसं काही सांगायला नव्हतं.

‘‘पेरेंट्समध्ये वाद, ताणतणाव असेल की कुटुंब एकसंघ राहत नाही, मुलांवर त्याचा फारच वाईट परिणाम होतो.’’ शालिनीनं काळजी व्यक्त केली.

‘‘खरं तर, नवरे ना, बायकोची प्रगती सहन करू शकत नाहीत.’’ पत्ते वाटता वाटता शालिनीनं आपलं मत सांगितलं.

‘‘शिल्पानं अर्थात्च अगदी विचारपूर्वक स्टेप घेतली असेल,’’ नेहानं आपले विचार मांडले.

‘‘शिल्पाला भेटायला हवं. आपली मैत्रीण आहे ती, मॉरल सपोर्ट देणं ही आपली जबाबदारी आहे.’’ रागिणीनं आपला विश्वास बोलून दाखवला.

‘‘मी ही येईन तुझ्याबरोबर,’’ मोनालाही आपल्या जबाबदारीची जाणीव झाली.

रविवारी शिल्पा घरीच होती. हिमांशू जयपूरला गेलेला…कारण लेकीला पुढल्या वर्गात दाखला घ्यायचा होता. शिल्पाला खरं तर जयपूरला जायचं होतं. पण नेमकं इथं काही तरी महत्त्वाचं काम निघालं. हिमांशुला जयपूरहून मुंबईला जावं लागणार होतं, त्यामुळे शिल्पाची इथं असण्याची गरज जास्तच वाढली.

बऱ्याच दिवसानंतर मोना अन् रागिणी घरी भेटायला आल्यामुळे शिल्पाला आनंद झाला. तिनं प्रेमाने, अगत्यानं त्यांचं स्वागत केलं.

‘‘हल्ली माझं काम खूपच वाढलंय…मलाही खूप इच्छा असते तुम्हाला भेटायची, पण वेळ कमी पडतो….’’ शिल्पानं आपली अडचण सांगितली.

‘‘गौरीचं काम आवडलं?’’ मोनानं विचारलं.

‘‘बरं करतेय…तशीही मीरा येतेच आहे चार दिवसांनी,’’ शिल्पाची गौरीच्या कामाबद्दल तक्रार नव्हती अन् तिची मेड मीरा चार दिवसात दाखल होणारच आहे.

‘‘आणि काय म्हणतेस? संसार छान चाललाय? लेकीला इतक्या लांब पाठवलंस अभ्यासासाठी…तशी ती लहानच आहे अजून…’’ रागिणीला शिल्पाकडून सगळं जाणून घेण्याची घाई झाली होती.

‘‘खरं सांगू? मुलीला…संस्कृतीला होस्टेलला ठेवलीय. पण फार आठवण येते तिची…मग आम्ही दोघं एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून एकत्रच रडतो. त्यामुळे दु:ख हलकं होतं…पण तिथं तिचा अभ्यास आणि एकूणच प्रगती छान चालली आहे. इथं तसं होत नव्हतं. तिच्या भल्याचा विचार करूनच आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलाय,’’ लेकीच्या आठवणीनं शिल्पाचे डोळे भरून आले.

‘‘मुलीवरच फुलस्टॉप घेतलाय?…संस्कृतीला एखादा भाऊ हवा ना?’’ रागिणीनं सरळच विचारलं.

‘‘चला, आधी खाऊ, पिऊ मग या विषयावर बोलू…’’ शिल्पानं स्वयंपाकघराकडे वळत म्हटलं.

गाजराचा हलवा, रसगुल्ले, समोसा अन् फरसाण असं पोटभर हादडून झालं.

गरमागरम कॉफीही ढोसून झाली. मग शिल्पा म्हणाली, ‘‘संस्कृतीनंतर आम्ही दुसरं मुल होऊ दिलं नाही. कारण तिच्यावरच आम्हाला पूर्ण लक्ष द्यायचं होतं. तिचं शिक्षण, नोकरी अथवा करिअर, लग्न, चांगला नवरा हेच आमचं ध्येय आहे. आता दुसऱ्या बाळाला फार उशीर झालाय, त्यावेळी आम्ही दोघांनी दुसऱ्या बाळाऐवजी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं आणि आता तर आम्ही स्लीपडायव्होर्स घेतलाय.’’ शिल्पानं म्हटलं.

‘‘डायव्होर्स घेतलाय? हिमांशुशी पटत नाहीए का? की तो मारहाण करतो? छळ करतो? तू कधीच बोलली नाहीस?’’ रागिणीनं एकदम प्रश्नच प्रश्न विचारले.

‘‘छे छे, आमचे संबंध अगदी सलोख्याचे आहेत. हिमांशूचं माझ्यावर प्रेम आहे. ते माझी काळजी घेतात. माझ्या गरजांचा विचार करतात, त्या गरजा पूर्ण करतात. मला आधार वाटतो त्यांचा. मी त्यांच्याविषयी तक्रार करावी असं कधीच वागत नाहीत ते,’’ हिमांशु विषयीचा अभिमान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडू लागला.

‘‘तुम्ही दोघं एकत्र राहता…हा कसला अर्धवट डिव्होर्स आहे तुमचा?’’ शिल्पाचं बोलणं मोनाच्या खरं तर डोक्यावरूनच गेलं होतं.

‘‘आमचा फक्त स्लीप डिव्होर्स आहे. आम्ही एकत्र एका बेडवर झोपत नाही. रात्री वेगवेगळ्या खोलीत झोपतो…नाइट डिव्होर्स म्हणतात त्याला. हिमांशु रात्री उशीरापर्यंत काम करतात. त्यांना सकाळी लवकर उठवत नाही. मी रात्री लवकर झोपते. माझा दिवस सकाळी सहाला सुरू होतो. आम्ही दोघंही आपापल्या कामामुळे खूप दमतो. त्यामुळे पुरेशी झोप दोघांसाठीही अत्यंत आवश्यक आहे. हिमांशुना रात्री घोरायची सवय आहे. मला त्रास होतो त्याचा. मला त्यांच्या घोरण्याचा त्रास होतो या गोष्टीचा हिमांशुला त्रास होतो. म्हणून त्यांनीच सुचवलं की आपण वेगेळे झोपूयात. मला प्रथम ते विचित्र वाटलं, पण मग दोघांचा सोयीचा विचार करून आम्ही तो प्रयोग अंमलात आणला. आज आम्हाला दोघांनाही पुरेशी झोप अन् त्यामुळे मानसिक स्वास्थ्य लाभतं.’’ शिल्पानं सविस्तर समजावलं.

‘‘म्हणजे तुमच्यात काही भांडण, प्रॉब्लेम वगैरे नाहीए?’’ मीनाचं आश्चर्य अजून संपलंच नव्हतं.

‘‘अजिबात नाही. उलट एकमेकांवरील प्रेमामुळेच, एकमेकांचा अधिक विचार करून आम्ही हा निर्णय घेतलाय. यात वाईट काहीच नाही. एकाच बेडवर नवराबायकोवं झोपणं हा विचार आता जुना झालाय. उलट स्लीप डायव्होर्सनं नवरा बायकोमधलं प्रेम वाढतं असा माझा अनुभव आहे. हल्ली तर मानसोपचार तज्ज्ञही याचा सल्ला देतात. यासाठी कोर्ट किंवा वकील काहीच लागत नाही,’’ शिल्पानं सांगितलं.

रागिणी अन् मोना पार निराश झाल्या. मुकाट्यानं तिथून उठल्या. त्यांना फ्लश करायला ब्रेकिंग न्यूज मिळाली नव्हती. ही आणि शी अगदी मजेत होती.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें