कथा * श्री प्रकाश
सागरची बोट बँकॉकहून मुंबईला जायला अगदी तयार होती. तो इंजिनमध्ये आपल्या शिफ्टवर होता. त्याची बोट मुंबईहून बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँग वरून टोकियोला जायची. आता परतीच्या प्रवासात तो बँकाकपर्यंत आला होता. तेवढ्यात बोटीच्या ब्रिजवरून (ज्याला कंट्रोलरूम म्हणतात) मेसेज आला, रेडी टू सेल.
सागरनं शक्तिमान एयर कॉम्प्रेसर स्टार्ट केला. वरून पुन्हा आदेश आला डेड स्लो अहेड. त्यानं इंजिनमध्ये कंप्रेस्ड एयर आणि ऑइल घातलं अन् शिप बँकॉक पोर्टवरून निघालं. त्यानंतर ब्रिजवरून येणाऱ्या आदेशाप्रमाणे शिप स्लो किंवा फास्ट चालत होतं. अर्ध्या तासानंतर शिप ‘हाय सी’ मध्ये होतं. त्यावेळी आदेश मिळाला, ‘फुल अहेड.’
आता बोट फुलस्पीडनं पाणी कापत मुंबईच्या दिशेनं जात होती. सागर निवांत होता. आता फक्त तीन हजार नॉटिकल माइल्सचा प्रवास उरला होता. साधारण आठवड्याच्या आतच तो मुंबईला पोहोचला असता. मुंबई सोडून त्याला आता चार महिने झाले होते.
आपली चार तासांची ड्यूटी आटोपून सागर त्याच्या केबिनमध्ये सोफ्यावर विश्रांती घेत होता. मनोरंजनासाठी त्यानं आपल्या लॅपटॉपवर रूस्तम सिनेमाची सीडी लावली. पण पूर्ण सिनेमा त्याला बघून होईना. यापूर्वी एक जुना सिनेमा होता, ‘ये रास्ते हैं प्यार के’ तो त्यानं बघितला होता. त्या जुन्या सिनेमावरूनच हा नवा सिनेमा बेतलेला होता. त्यात एका मर्चंटनेव्हीच्या ऑफिसरची कथा होती...त्याच्या पत्नीच्या बदफैलीपणाची.
त्याच्या मनांतही संशय पिशाच्चानं थैमान मांडलं. त्याच्या गैर हजेरीत त्याची पत्नी शैलजाही असंच काही करत असेल का? त्यानं ताबडतोब तो विचार मनातून झकून टाकला. शैलजा अशी नाही. तिचं सागरवर मनापासून प्रेम आहे. ती तर सतत त्याला फोन करत असते. ‘लवकर ये, मी तुझी वाट बघतेय...मला इथं तुझ्यावाचून करमत नाहीए...सध्या तर सासूबाई पण इथं नाहीएत. त्या गावी गेल्या आहेत.’
सागरचं लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांतच त्याला टोकियोला जावं लागलं. शैलजा मुंबईतच होती. सागरनं एका सुंदर अपार्टमेंटमध्ये सर्व सुखसोयींनी सुसज्ज फ्लॅट घेतला होता. दरवाज्यावर रिंग डोअर बेल, ज्यात कॅमेरा, सेंसर आणि फोनचीही सोय असते लावून घेतला होता. त्यात बाथरूमच्या माध्यमातून वेगवेगळ्या निवडक सेलफोन एप्सशी संपर्क असतो.