शेवटचं ते स्मितहास्य

कथा * कुसुम अंतरकर

एकदाच, फक्त एकदाच प्राची होकार दे गं, अगदी थोडक्या वेळाचा प्रश्न आहे. नंतर तर सर्वांचं आयुष्य पुन्हा जसं होतं तसंच सुरू राहील. या गोष्टीचा कोणताही दुष्परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही ही माझी जबाबदारी.’’

शुभाचं बोलणं प्राचीच्या कानावर पडलं तरी ते मेंदूत शिरलं नाही. कदाचित ती समजून घ्यायला बघत नव्हती. हे असं नाटक करता येईल, ती करू शकेल याची तिला खात्री वाटत नव्हती.

‘‘सॉरी शुभा, हे मला नाही झेपणार, तुला नाही म्हणताना मलाही खूप यातना होताहेत पण, नाही गं! नाही…नाहीच झेपणार मला.’’

‘‘एकदाच गं! दिव्यचा थोडा विचार कर, तुझ्या या निर्णयामुळे त्याला केवढा आनंद मिळणार आहे.’’

या गोष्टी शुभानं प्राचीला सांगायची गरज नव्हती. ती तर सदैव दिव्यच्याच विचारात गुंतलेली असायची. दिवस रात्र तिच्या मनात दुसरा विचारच नव्हता.

प्राची बोलत नाहीए हे बघून शुभा तिथून उठली अन् प्राचीला पुन्हा जुन्या आठवणींचे कढ आवरेनात.

दिव्य आणि प्राचीची भेट एका मॉलमधल्या लिफ्टमध्ये झाली होती. लिफ्ट अचानक बंद पडल्यामुळे प्राचीचा जीव घाबरा झाला आणि ती जोरजोरात ओरडू लागली. पटकन् दिव्यनं तिला मदत केली. काही क्षणांतच लिफ्टही सुरू झाली. दिव्यनं तिला घरापर्यंत सोबत केली.

त्यानंतर त्याच्या भेटीगाठी वाढल्या. ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली. दोघांचं एकमेकांच्या घरी जाणंयेणं होतं अन् घरातून लग्नाला विरोधही नव्हता.

दिव्यला एक धाकटी बहीण होती. प्राची तर एकुलती एकच होती. दोन्ही घरांमध्ये या लग्नामुळे आनंदच झाला होता. सगळं कसं छान चाललेलं अन् अचानक या आनंदाला ग्रहण लागलं.

दिव्यच्या पोटात अधूनमधून दुखायचं. प्रथम त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. पण एक दिवस दुखणं असह्य झाल्यावर त्यानं डॉक्टरला दाखवलं. त्याला तपासताना डॉक्टर गंभीर झाले. त्यांनी केस तज्ज्ञ डॉक्टरकडे रेफर केली. अनेक तपासण्या, सोनोग्राफी व इतर सोपस्कार झाले अन् निदान झालं कॅन्सरचं. अमांशयाचा कॅन्सर तोही लास्ट स्टेजमधला. दीव्य अन् त्याच्या घरच्यांच्या अंगावर तर जणू वीज कोसळली. जेमतेम चार ते सहा महिनेच आयुष्य उरलं होतं दिव्यचं.

घरात आता काळजी आणि अश्रू होते. या बातमीनं दोन्ही घरातला आनंद हिरावून घेतला होता. केवढी स्वप्नं बघितली होती दोघांनी…प्राची आणि दिव्यनी. पण आता तर सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी झाली होती. कुणाच्याच डोळ्यातळे अश्रू थांबत नव्हते.

एक दिवस दिव्यजवळ बसलेल्या प्राचीला त्यानं म्हटलं, ‘‘प्राची, सगळं संपलंय गं आता…तू इथं येत जाऊ नकोस,’’ वेदनेनं त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता.

‘‘नाही दिव्य, असं म्हणू नकोस. तिला जर इथं येऊन तुझ्याजवळ बसून बरं वाटत असेल तर तिला येऊ देत ना.’’ शुभानं त्याला म्हटलं, ‘‘जेवढं आयुष्य आहे ते अगदी आनंदानं, पूर्णपणे उपभोगून घे, या उरलेल्या दिवसात तुला जे करायचं आहे ते करून टाक. मृत्यूपूर्वी सगळ्या इच्छा पूर्ण व्हायलाच हव्यात. त्यामुळे तुला मृत्यूची भीती वाटणार नाही.’’

‘‘या दु:खाच्या, वेदनेच्या सावटातही तू तुझं आयुष्य असं जगून घे की मृत्यूलाही वाटलं पाहिजे की चुकीच्या जागी आलोय की काय? क्षण अन् क्षण आनंद साजरा करूयात. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. यापुढे आजारपण वगैरे काहीच बोलायचं नाही.’’

शुभाच्या म्हणण्यानंतर दोन्ही घरातलं वातावरण एकदमच बदललं. काळजी अन् दु:खाची जागा, आनंदानं, आशेनं अन् हास्यविनोदानं घेतली. छोट्यातला छोटा आनंदही थाटात साजरा केला जात होता. घरात कायम उत्सवाचं वातावरण असायचं. दिव्यला कुठलाही त्रास होणार नाही. याकडे शुभा जातीनं लक्ष देत होती.

एक दिवस शुभानं आईला म्हटलं, ‘‘आई तुझी इच्छा होती ना दिव्यचं लग्न खूप थाटात करायचं म्हणून? दिव्य तुझा एकुलता एक मुलगा आहे, मला वाटतं तुझी ही इच्छा पूर्ण व्हायला हवी.’’

आईनं तिला थांबवत म्हटलं, ‘‘शुभे, अगं बाकी सगळं जे काही तू करते आहेस ते ठिक आहे, पण लग्न? अगं, दिव्यही या गोष्टीला तयार होणार नाही. अन् थाटात लग्न करायचं तर पैसा हवा ना? आपले सगळे पैसे दिव्यच्या उपचारांवरच खर्च होताहेत…’’ आईला पुढे बोलवेना. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले.

आईचे डोळे पुसत शुभानं म्हटलं, ‘‘तुझ्या भावना कळताहेत मला. पण अगं, प्राची अन् दादाला कित्येकदा मी त्यांच्या लग्नाच्या संदर्भात बोलताना ऐकलंय. नवरदेवाचा वेष घालून लग्नाला उभं राहण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहायला नको. मी लग्नासाठी त्याचं मन वळवेन. अन् हे लग्न म्हणजे खरं लग्न नाहीए गं! फक्त जाणाऱ्या जिवाच्या समाधानासाठी, त्याची अखरेची इच्छा पूर्ण करणं आहे. लग्नाचं नाटकच समज गं! फक्त तू मानसिक तयारी ठेव. मी बाबांनाही सगळं समजावून सांगते.

उद्याच मी प्राचीच्या घरी जाते. आपल्याकडे वेळ फारच कमी आहे. दादाच्या मृत्यूची घटका कधीही येऊ शकते. आपल्याला घाई केली पाहिजे. राहिला प्रश्न पैशांचा, तर ती ही व्यवस्था मी करते. नातलग, मित्र, परिचित सगळ्यांची मदत घेईन.’’

त्याप्रमाणेच शुभा प्राचीला भेटायला गेली होती, पण प्राचीनं तिला नकार दिला. तरीही शुभा निराश झाली नाही.

‘‘मी माझ्या दिव्य दादाचं लग्न थाटात करेन. त्याला सर्व आनंद मिळवून देईन. करवली म्हणून त्याच्या लग्नात मिरवून घेईन. काहीही झालं तरी मी आता मागे हटणार नाही.’’

ती घरी येताच दिव्यनं विचारलं, ‘‘प्राची तयार झाली?’’

‘‘हो झाली ना. तिचं खरोखरंच प्रेम आहे तुझ्यावर.’’ शुभाचं बोलणं ऐकून दिव्यच्या चेहऱ्यावर पसरलेलं तेज बघून तिचा निर्णय अजूनच पक्का झाला.

शुभानं दिव्यच्या लग्नाची कल्पना अन् त्यासाठी लागणारी आर्थिक मदत या बाबतीत सगळ्या सोशल साइट्सवर पोस्ट टाकली आणि सर्वच संवेदनशील मित्र, परिचित, नातलगांनी आपापल्या परीनं मदत केली. पुरेसा पैसा मिळाला अन् लग्नाची तयारी सुरू झीली.

कुठल्याही लग्न घरात जसं वातावरण असतं तसंच वातावरण दिव्यच्या घरात होतं. नवरी व नवरदेवाचे पोशाख, घराची साधी व कलात्मक सजावट, फराळाचे पदार्थ, शिंपी, कासार, सोनार वगैरेंची वर्दळ यामुळे लग्नघर गजबजलं होतं.

लग्न चार दिवसांवर आलेलं अन् शुभाला खूपच काळजी पडली होती की नवरी आणायची कुठून? तिनं सर्वांना खोटंच सांगितलं होतं की प्राची आणि तिच्या घरची मंडळी लग्नाला तयार आहेत म्हणून. आता काय करायचं?

‘एकदा पुन्हा प्राचीला विनंती करून बघूयात,’ असं ठरवून शुभानं पुन्हा एकदा प्राचीचं घर गाठलं.

प्राचीनं खोलीचं दार उघडलं नाही. पण प्राचीची आई शुभाशी अत्यंत प्रेमानं वागली. ‘‘शुभा, पोरी तुझ्या भावना आम्हाला समजतात गं! आम्ही तुला पूर्णपणे सहकार्य करू, पण प्राचीला समजावणं किंवा राजी करणं आम्हाला जमणार नाही. दिव्यचा अंतिम क्षण ती बघू शकणार नाही. कदाचित त्यामुळेच ती तयार होत नाहीए. तशीही ती खूप भावनाप्रधान आहे आणि दिव्यच्या या जीवघेण्या आजारानं अधिकच हळवी झाली आहे.’’ प्राचीच्या आईनं शुभाला सांगितलं.

‘‘पण मावशी, दिव्यचं काय? त्याचा काय दोष आहे म्हणून नियतीनं त्याला अशी शिक्षा द्यावी? तो जर इतकं भोगतोय, सोसतोय तर प्राचीला थोडं नाटक करायला काय हरकत आहे?’’ शुभा संतापून म्हणाली.

‘‘तू चुकतेस, शुभा, दिव्य इतकंच प्राचीही भोगतेय, सोसतेय. तिचं मनापासून प्रेम आहे त्याच्यावर, म्हणूनच तिचा जीव तुटतोय. तू एक लक्षात घे. काही दिवसांतच दिव्य हे जग सोडून जाईल. त्याच्याबरोबर त्याच्या यातना, वेदना, सोसणं, भोगणं सगळं सगळं संपेल. पण प्राचीला तर सगळा जन्म हे दु:ख घेऊनच जगावं लागणार आहे. तिची स्थिती तर दिव्यपेक्षाही दयनीय आहे. म्हणूनच आम्ही तिच्यावर दबाव आणू शकत नाहीए.

‘‘शिवाय समाजाचा अन् प्राचीच्या भविष्याचाही विचार करायला हवा. लग्न झाल्याझाल्या पतिचा मृत्यू अन् तिच्यावर वैधव्याचा शिक्का बसणार…कुणा कुणाला सांगणार की हे फक्त नाटक होतं. तुला वाटतं तेवढं ते सोपं नाहीए,’’ प्राचीच्या आईनं शुभाला नीट समजावून सांगितलं.

त्यादिवशी शुभाला प्रथमच दिव्यपेक्षाही प्राचीची दया आली. पण तिनं हुशारीनं या परिस्थितीवरही तोडगा काढला.

‘‘मावशी, आपण एक युक्ती करूयात. हल्ली दिव्यला थोडं कमी दिसायला लागलं आहे. आपण प्राचीच्या जागी तिच्याशी बऱ्यापैकी साम्य असलेली मुलगी नवरी म्हणून उभी केली तर? दिव्यला कळायचंही नाही…’’

‘‘अगं हो, प्राचीची एक मैत्रीण आहे. खूप साम्य आहे दोघींमध्ये. एकदा एका नाटकात दोघींनी जुळ्या बहिणीची भूमिका केली होती. लोकांनाही खूप कौतुक वाटलं होतं. शिवाय ती खूप गरीब कुटुंबातली आहे. पैसा मिळतोय, त्यातून पुन्हा हे माणुसकीचं काम आहे म्हणून ती तयार होईल…पण एक मात्र खरं की सप्तपदी, होमकुंडाभोवतीचे फेरे वगैरे खूप सगळं खोलात जाऊन नको करायला. कारण अजून तिचंही लग्न व्हायचंय.’’

‘‘मावशी, अगदी निर्धास्त असा तुम्ही. आपण अगदी नाटकच करतो आहोत. पुन्हा सर्व विधी करण्याइतकी दिव्यची तब्येत बरोबर नाही, तो फार वेळ बसूही शकणार नाही.’’

लग्नाचा दिवस उजाडला. घराजवळच्या एका बागेत छोटासा मांडव घातला होता. दिव्य नवरदेवाच्या वेशात नटला होता. जवळचे आप्त, मित्र जमले होते. सजवलेल्या एका कारमधून वधू अन् तिचे नातलगही येऊन पोहोचले.

लग्नाचे औपचारिक विधी झाले. दिव्य तर इतका आनंदात होता की हा काही दिवसांत मरणार आहे हे खरंच वाटत नव्हतं. शुभाला तेच हवं होतं.

नवरी लेहेंगा चुनरी या पोशाखात होती. तिनं चक्क घुंगटही घेतला होता.

‘‘चला आता सप्तपदी, मंगळसूत्र वगैरे विधी सुरू करू.’’

लगेच प्राचीचे आईवडिल व शुभा सावध झाली. आता नवरीला इथून बाजूला करायला हवं, नाही तर खरोखरीचं लग्न लागेल अन् अनर्थ होईल. प्राचीच्या आईनं म्हटलं, ‘‘गुरूजी, नवरीला जरा बरं नाहीए, जीव घाबरतोय तिचा, तिला थोडी विश्रांती घेऊ द्या. मग पुढले विधी करूयात. तोपर्यंत नवरदेवही थोडी विश्रांती घेतील.’’

तेवढ्यात आपला घुंगट बाजूला करून नवरीनं म्हटलं, ‘‘नाही गुरूजी. माझी तब्येत इतकीही बिघडलेली नाहीए की मला विश्रांती घ्यावी लागेल.’’ नवरीकडे बघताच शुभासकट सगळ्यांनाच धक्का बसला. कारण नवरी स्वत: प्राचीच होती.

झालं असं की जेव्हा प्राचीला कळलं की शुभानं दिव्यच्या नवरीसाठी ईशाची, तिच्या मैत्रिणीची निवड केली आहे, तेव्हा त्या लग्नात दिव्यची नवरी दुसरी कुणी असणं प्राचीला पटलं नाही. दिव्यची नवरी फक्त प्राचीच असणार म्हणून प्राची स्वत:च नवरीच्या वेशात तयार होऊन आली होती.

तिच्या डोळ्यात आज अश्रू नव्हते. चेहऱ्यावर आनंद आणि ओठांवर हसू होतं. आपलं सर्व दु:ख पोटात दडवून ती दिव्यच्या आनंदोत्सवात सहभागी झाली होती. हाच दिव्यला मिळणारा शेवटचा आनंद होता. तो प्राचीनंच त्याला द्यायला नको का?

शुभानं तर आनंदातिशयानं प्राचीला मिठीच मारली. प्राचीनं तबकातला हार दिव्यच्या गळ्यात घातला. त्याचे हात हातात घेऊन त्या हाताचं चुंबन घेतले. दिव्यच्या चेहऱ्यावर, ओठांवर इतकं लोभस हास्य विलसत होतं की लोक बघत राहिले. पण एवढे काही त्याच्या अशक्त शरीराला झोपले नाहीत. तो खाली कोसळला अन् बेशुद्ध झाला. त्याचे प्राण अनंतात विलीन झाले पण हासुद्धा चेहऱ्यावरचं ते दिव्य स्थित तसंच होतं.

प्राचीच्या या अप्रत्याशित निर्णयानं दिव्यचे कुटुंबीय भारावले. जन्मभर ते तिच्या ऋणातून मुक्त होणार नव्हते. यापुढे प्राचीची संपूर्ण जबाबदारी आता त्यांची होती.

प्रॉपर्टीतला वाटा

कथा * डॉ. लता अग्निहोत्री

आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची, ‘‘मुलींची काळजी नाही वाटत, पण त्यांच्याबाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते.’’ खरंच किती सार्थ होते तिचे शब्द. आज मला त्या शब्दांचा अर्थ पुरेपूर कळतोय…प्रचिती येतेय. आईला माझ्या भविष्यातल्या परिस्थितीची कल्पना होती का? एक नाही तीन मुली होत्या तिला. म्हणूनच काळजी करायची ती. आधी शिक्षण, मग लग्न…वृंदा म्हणजे मी सर्वात लहान होते.

आईला काळजीत बघितली की बाबा म्हणायचे, ‘‘कशाला विनाकारण स्वत:ला त्रास करून घेतेस? अगं प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन येतो.’’

‘‘पुरे पुरे, तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते? बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न किती मुलं आहेत तुम्हाला? जेव्हा मी सांगते तीन मुली, एक मुलगा, तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू? मग एकेकीचे कमेंट सुरू होतात.’’

‘‘हल्लीच्या काळात एक मूल वाढवायचं म्हणजे किती सायास पडतात, तुम्हाला तर चार मुलं आहेत.’’

दुसरी म्हणते, ‘‘तीन मुली म्हणजे खूप टेंशन असेल ना हो तुम्हाला?’’

बाबा मध्येच तिला अडवायचे. ‘‘अगं, हे टेंशन त्या बायकांना येतंय…तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस. आता पुन्हा कुणी म्हटलं काही, तर सरळ त्यांना म्हणायचं, आमच्या मुली आहेत. आम्ही त्यांना सांभाळतोय…तुम्ही अजिबात टेंशन घेऊ नका.’’

बाबा गंमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे. पण आईची काळजीही खरीच होती. कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता. त्यानंतर आम्ही तिघी बहिणी कृष्णा, मृदुला अन् वृंदा पाठोपाठ घरात आलो. बाबा विद्युत विभागात मोठ्या हुद्दयावर होते, त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या. घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते. त्या लाडाकोडानंच माझा स्वभाव थोडा हट्टीही झाला होता. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं हा मला माझा अधिकार वाटायचा. माझा हट्ट पूर्णही केला जायचा. म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली, तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात.

मग आई पटकन् दादाला किंवा ताईला म्हणायची, ‘‘अरे, ती लहान आहे, का तिला रडवता? घेऊ देत ना तिला काय हवंय ते? अशी कशी तुम्ही थोरली भावंडं?’’

बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. अमृत दादाला बिझनेसमध्ये रूची होती अन् गतीही होती. त्यामुळे त्यानं एमबीए करून व्यवसायात जम बसवला. कृष्णा अन् मृदुलाची लग्न चांगली स्थळं बघून करून दिली. अमृतदादाचंही लग्न झालं. शहराच्या भरवस्तीत भलं मोठं बंगलेवजा घर बांधलं गेलं. आता घरात दादा, वहिनी, आई अन् बाबा, मी एवढीच माणसं होतो. आम्हा बहिणींवर बाबांचा फार जीव होता. दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची. ते म्हणायचे, ‘‘वृंदाचं लग्न मी घाईनं नाही करणार…अमृतची मुळंबाळं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन.’’

सगळं कसं छान चाललेलं अन् एका अपघातात बाबांचा आकस्मिक मृत्यू झाला. आई अन् मी, आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं. बाकी सर्वांची लग्नं झाली होती, पण माझं स्वप्नं अजून कोवळीच होती. बाबा माझं लग्नं थाटात करणार होते. पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार? लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यांवरचं ओझं बनून गेले.

बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं होतं. त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती. पण वडील असणं अन् वडील नसणं या दोन स्थितींमध्ये आकाशपातळा एवढं अंतर असतं. घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे. एक प्रकारचा कोंदटपणा वाटायचा.

बिझनेसच्या निमित्तानं दादाला खूपदा इकडे तिकडे जावं लागे. अशाच एका भेटीत त्याला वरूण भेटला. उमदा, होतकरू, सज्जन मुलगा म्हणून तो त्याच्या मनांत भरला. वरूणला वडील नव्हते. आई व तो एवढंच कुटुंब होतं. आईला तर अगदी गंगेत घोडं न्हालं असं वाटलं.

वरूणचा स्वत:चा व्यवसाय होता. घरात आम्ही तीनच माणसं होतो. सचोटीनं वागून, खूप कष्ट करून वरूणनं धंदा छान वाढवला होता. मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते. लग्नाला दोन वर्ष होऊन गेली होती. लहानगा प्रियांश आल्यावर तर सुखाचा पेला काठोकाठ भरला होता.

काळ भराभर सरकत होता. बाबांच्या मृत्यूचं दु:ख आता पुसट व्हायला लागलं होतं. पण हल्ली वरूण रोज पाय दुखत असल्याची तक्रार करायचे.

सुरूवातीला वाटलं, दगदग फार होतेय. विश्रांती कमी पडते, त्यामुळे पाय दुखत असतील. स्वत:चं घर बांधायचं म्हणून वरूणनं बँकेतून लोन घेतलं होतं. ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जिवाचा आटापिटा करत होते. मिठाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेव, मोहरीचं तेल गरम करून पायांना मालिश कर, झोपताना पायाखाली उशा ठेवून बघ असे अनेक घरगुती उपचार मी अन् आई करत होतो. त्यांचं वजन खूप कमी झालं होतं. रात्र रात्र झोपेविना जायची. त्यानं चिडचिडेपणा वाढला होता. केस पांढरे झाले. चार महिन्यांत ते चाळीस वर्षांचे वाटू लागले होतेजवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं. नेमकी व्याधी कुणालाच कळली नव्हती. मी रात्ररात्र त्यांचे पाय दाबत बसायची. कधी तरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचं, मग म्हणायचे, ‘‘झोप तू आता.मला थोडं बरं वाटतंय.’’properti vata inside photo

शेवटी मुंबईला न्यायचं ठरलं. प्रियांश सातआठ महिन्यांचाच होता. आई आणि एक मित्र अखिलेश त्यांना मुंबईला घेऊन गेले. ‘‘तू काळजी करू नकोस. आम्ही तुला सगळं कळवू. तू फक्त तुझ्या अन् बाळाची काळजी घे,’’ वरूणनं अन् आईंनी मला वारंवार बजावलं.

ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होते. त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते. ‘अजून तपासण्या चालू आहेत,’ एवढंच उत्तर मिळत होतं. आई म्हणायच्या, ‘‘रिपोर्ट अजून आले नाहीत. आम्हीही वाट बघतोय.’’

गेल्याच्या पाचव्या दिवशी अखिलेश, वरूण आणि आई परत आले. मला कळवलं नव्हतं, अवचितच आले अन् मी चकित झाले.

‘‘आई, अचानक आलात? निदान झालं का? आता उपचार व्यवस्थित करता येतील…डॉक्टर काय म्हणाले?’’

‘‘कुणी तरी बोला ना?’’ मी रडकुंडीला आले. वरूणचा चेहरा उतरला होता. आईंची स्थिती तर चरकातून पिळून काढलेल्या उसासारखी होती. त्यांनी मला मिठी मारली अन् आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वरूणचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून वरूणला वाढवलं, शिकवलं. मुलाचा बहरलेला व्यवसाय अन् संसार बघून ती आपलं दु:ख विसरली. सगळं छान चालू असतानाच मुलाला कॅन्सर झाला असून आता तो केवळ चार पाच महिनेच काढेल हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती? आपल्या अंतिम क्षणी आपल्या प्रेताला खांदा द्यायला, अग्नी द्यायला वरूण मुलगा आहे हे समाधान त्यांना आयुष्य जगायला उभारी देत होतं, तोच मुलगा आता मरणार म्हटल्यावर त्या बाईनं काय करायचं?

डॉक्टरांनी निदान केलं की फुफ्फुसांचा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. जे काही दिवस हातात आहेत तेवढाच वरूणचा सहवास आम्हाला मिळणार.

ज्या घरात प्रियांशच्या दुडदुडण्याचा, त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता, तिथं आज वरूणच्या वेदनेचा हुंकार अन् आईचे उसासेच फक्त ऐकायला येत होते. त्या दोघांना धीर देताना, सांभाळून घेताना मला रडायलादेखील फुरसत मिळत नव्हती. काहीतरी चमत्कार होईल, वरूण बरे होतील, या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते.

खरं तर कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हतं. डॉक्टरांनी त्यांचे उपाय संपल्याचं जाहीर केलं होतं. पण आईची वेडी माया, अन् पत्नीचा सप्तपदीतल्या वचनांवरचा भाबडा विश्वास आशा दाखवत होता. वरूण बरे होतील अशी आशा आम्हाला वाटत होती.

पण धर्म आणि आस्था नावाची काही गोष्टच नाहीए या जगात, तरीसुद्धा व्यक्ति जेव्हा समस्यांनी नाडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून भोंदुगिरीच्या मागेच धावायला लगातो. मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो. पेशंट अन् नातलग दोघंही हाय खातात.

आईची वेडी माया अन् पत्नीची भाबडी आशा, विश्वास, श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही. कसंही करून आपला रूग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते.

पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. धंदा पूर्ण बंद पडला होता. वरूणसाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात प्रियांशकडेही माझं दुर्लक्ष झालं होतं. तो आजारी पडला. खरंच नियती सगळ्या बाजूंनी परीक्षा घेत होती. जेमतेम पाच महिने वरूण काढू शकले.

आईंची स्थिती तर बघवत नव्हती. प्रियांश नसता तर आम्ही दोघींनीही त्याच दिवशी जीव दिला असता. पण जिवंत होतो म्हणूनच पुढले अनेक प्रश्नही आ वासून समोर उभे होते. धंदा बंद पडलेला. बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं. यामुळे लोनचे हफ्ते फेडणे अशक्य होतं. ते घर हातचं गेलं.

अवघड परिस्थितीतच आपलं कोण, परकं कोण हे समजतं असं म्हणतात ते खोटं नाही. माझ्या या वाईट काळात माझ्या दोघी बहिणींनी त्यांच्या परीनं शक्य ती सर्व मदत मला केली. मात्र अमृत दादा मोकळेपणानं वागत नाहीए खरं तर टाळतोय असं मला जाणवलं…पण अचानक आलेल्या या चौफेर संकटांनी मी इतकी भांबावले होते, इतकी हतबल द्ब्रा झाले होते की यावर फारसा विचार करण्याचीही शक्ती नव्हती माझ्यात. खरं तर आई अजून हयात होती. पण आता घरात आईची सत्ता नव्हती.

आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते. आई विधवा, तिची लेक मी ही विधवा…बाबा असतानाची आई मला आठवते. माझा गैरवाजवी हट्ट पुरवण्यासाठी ती दोघा ताई व अमृतदादाला रागे भरून मला ती वस्तु मिळवून देत असे.

मनात सतत रूखरूख असायची की वरूणच्या मृत्यूमुळे मी प्रियांशला त्याचं हक्काचं बालपण पुरेपूर उपभोगू देऊ शकत नाहीए. दोघी ताई त्यांचं खाणंपिणं, खेळणी कपडे सगळं बघत होत्या. ती त्यांची माया होती. प्रियांशचा हक्क थोडीच होता. भाड्याच्या एका खोलीत मी प्रियांश अन् आईंना घेऊन राहत होते.

मुलाच्या मृत्यूनं उन्मळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्री अनंतात विलिन झाला. नोकरी करणंही मला शक्य नव्हतं. लहानग्या प्रियांशला सांभाळायला कुणी नव्हतं.

समोर एक निरूद्देश आयुष्य होतं. दुसरीकडे बाळाचा अंधकारमय भविष्यकाळ. काय करू? कुठं जाऊ? कुणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते.

तेवढ्यात कृष्णाताई माझ्याजवळ येऊन बसली. मी एकदम दचकले…‘‘ताई! कधी आलीस? मला कळलंही नाही.’’

‘‘हो गं! ही वेल बघ, किती हौसेनं लावली होती. आठवणीनं रोज पाणी घालायची, केवढी बहरली आहे, पण कालच्या वादळानं ज्या झाडाच्या आधारानं ती वर चढली होती ते झाडंच उन्मळून पडलं…आता ही वेल नाही जगायची.

माझ्यासारखीच ती ही आधारहीन झालीय. माझ्या आयुष्याचं काय होणार कुणास ठाऊक?’’

‘‘फार विचार करतेस…चल उठ, असाच विचार करत बसशील तर प्रियांशला कशी सांभाळशील?’’

ताईनं तिथं पडलेला एक बांबू झाड उन्मळून पडल्यामुळे झालेल्या खडड्यात रोवला अन् ती वेल त्यावर चढवली.

‘‘बघ, मिळाला ना आधार तुझ्या वेलीला? आत वेल मरत नाही नक्की…’’ ताईनं हसून म्हटलं.

‘‘खरंच ताई, मानवी आयुष्यही इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं?’’

‘‘प्रयत्न केला तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो, वृंदा.’’ ताई गंभीरपणे म्हणाली.

‘‘म्हणजे? तुला काय म्हणायचंय?’’

‘‘वृंदा, अमृतदादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकतेय. या संकटात ज्यानं सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाहीए. मला नवल वाटतंय, आईही काही बोलत नाहीए. काय प्रॉब्लेम आहे तिला, मला समजंत नाहीए.’’

‘‘ताई, एक तर आता वय झालंय, दुसरं म्हणजे बाबांचं नसणं…तीही असहाय आहे गं! हे म्हातारपण ती दादाच्याच जिवावर जगणार ना?’’

‘‘पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का? तुझ्या बाबतीतही तिचं काही कर्तव्य आहे ना. घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे. तिला बाबांची पेन्शन मिळतेय. ती काही दादावर अवलंबून नाहीए.’’ ताई जरा रागातच बोलली.

‘‘ताई, अगं, आई समाजाला बदलू शकत नाही ना? आजही म्हातारे आईवडिल मुलीपेक्षा मुलांकडेच राहण्याला प्राधान्य देतात गं!’’

‘‘खरंच गं बाई, माझी ही छोटीशी बहीण किती किती समजूतदार झालीय.’’ ताई कौतुकानं म्हणाली. मग बोलली, ‘‘ते सोड वृंदा, मी, मृदुला अन् तुझ्या दोन्ही भावोजींनी असं ठरवलंय की आम्ही दादाशी बोलू. आज काळ बदलला आहे, वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा. तसा कायदाही झाला आहे.’’

मी थोडं घाबरून चकित मुद्रेनं तिच्याकडे बघितलं, तेव्हा ती म्हणाली, ‘‘अगं वेडे, ही नातीगोती, हे संबंध आपल्याला अडीअडचणीला मदत मिळावी म्हणूनच असतात ना? अशावेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची?’’

शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रापर्टीतला काही हिस्सा तू वृंदाला दे. कृष्णा आणि मृदुलाताईनं तर म्हटलं की आम्ही लिहून देतो, ‘‘आम्हाला काही नको, पण वृंदाला मात्र वाटा मिळू दे. तिच्या संकटाच्या काळात खरं तर स्वत:हून तू पुढाकार घ्यायला हवा होतास.’’

पण अमृतदादाची संपत्तीतला वाटा द्यायची इच्छा नव्हती. शेवटी कुणा नातलगानंच त्याला समजावलं ‘‘बाकी बहिणी मागत नाहीएत, एकीलाच द्यावं लागतंय, तेवढं देऊन मोकळा हो, उद्या कोर्टात केस गेली तर सरळ चार वाटे होतील, तुला फक्त एक हिस्सा मिळेल.’’ शेवटी अगदी नाइलाजानं दादानं निर्णय घेतला. वहिनीला हा निर्णय अजिबातच आवडला नाही.

शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला. मीही लाचार होते. सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले…हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबडी आशा मनात होती.

शेवटी रक्ताचं नातं आहे. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगतं का? काही नाही तर निदान मी माझ्या माणसांत होते…पण माझी समजूत चुकीची होती. इथं तर नात्यांची व्याखाच बदलली होती. कुणीच माझं नव्हतं.

घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे आले होते. नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या. मलाही हे सगळं नको होतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी घरबसल्या मुलांच्या टयूशन्स घ्यायला लागले. शेजारी पाजारी सहानुभूतीनं वागत होते. मला ट्यूशन्स मिळवून द्यायला त्यांनी मदत केली. अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करत होते.

वहिनी तर स्वत:हून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती. मी काही बोलेन तेवढ्याचं उत्तर ती द्यायची. दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा. आई पूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची. तिनंही आता तिथं बसणं बंद केलं.

तिला कदाचित सूनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त रहायचं असेल. मला आईचा राग येत नव्हता, उलट कीव यायची तिचीच. माझ्यामुळे उगीचच तिच्या जिवाचे हाल होताहेत असं वाटायचं. दादाची मुलं पारूल आणि मनीष मोठी होती. माझ्या घरात यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीनं सांगितलेलं त्यांना समजत होते. पण प्रियांश लहान होता. त्याला काहीच कळत नव्हतं. तो त्यांच्यात खेळायला बघायचा.

एक दिवस प्रियांश दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला. शेवटी मुलंच ते…मी मुलांना शिकवत होते, तेवढ्यात वहिनीचा कर्कश्य आवाज कानी आला. ‘‘घरावर हक्क दाखवताच आहात आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का?’’

मी गप्प बसले. लहान असला तरी चूक प्रियांशचीच होती. मी मुकाट्यानं खेळणं परत करून आले. पण नंतर अशा घटना सातत्यानं व्हायला लागल्या. बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची.

एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते, तेवढ्यात वहिनी आरडा ओरडा करत आली, ‘‘तुम्ही इथं कमाई करत बसा, तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय…हा एवढा महागाचा फ्लॉवर पॉट फोडला. मला हे सगळं नाही हं चालणार…’’

तेवढ्यात मनीष म्हणाला, ‘‘मम्मी, अगं तो पारूलच्या हातून फुटलाय, प्रियांशच्या नाही.’’

वहिनी त्याच्यावर ओरडली, ‘‘गप्प बैस मूर्खा, तुला काय कळतंय?’’

मुलं निरागस असतात. खरं ते बोलतात पण मोठ्यांना ते मानवत नाही. मी अजिबात वाद घातला नाही. वहिनीला सॉरी म्हटलं. माझ्यावर उपकार होते तिचे.

वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं. खरं तर मलाही तिथं राहणं नकोच होतं. पण तरूण एकटी विधवा, पदरात लहान मूल…कुठं जाणार? कशी राहणार? शिवाय ताई व भावजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता. निदान प्रियांश मोठा होई तो मला इथंच राहायला हवं.

आता मी प्रियांशला माझ्याजवळ ठेवायची. त्याला कुठं जाऊ द्यायची नाही. उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरूवात व्हायला नको होती मला.

पण लहान मूल ते. किती त्याला बांधून ठेवणार? सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं. दोन दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती. मी ट्यूशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती. आईची सेवा करत होते, तेवढ्यात प्रियांशच्या रडण्याचा आवाज आला. तो खूप जोरात कळवळून रडत होता. पाठीवर, पायांवर पट्टीनं मारल्याचे वळ होते. कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कुणास ठाऊक.

बापाविना पोरकं लेकरू, त्या कोवळ्या बाळाचा इतका दुस्वास का करतेय वहिनी? माझ्यावरचा राग त्या अश्राप बाळावर काढतेय? त्याला जवळ घेऊन शांत केलं. वळांवर खोबऱ्यांचं तेल लावलं. त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते. शेवटी त्याला झोप लागली.

 

माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं. कितीही कायदे करा, कानून करा…पण माणसांचे विचार बदलत नाही. मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो. प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवते आहे.

आम्ही मुली आहोत, पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असता ना? त्यावेळी दादानं काय केलं असतं? बहिणीला तिच्या पडत्या काळात, मदत म्हणून जी थोडी फार जागा त्यानं दिली, त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय? वडिलांच्या इस्टेटीतला वाटा घ्यायचा तर नात्यांवर प्रेम, भाषा, जबाबदारी या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला हवं.

समाज आणि कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय? तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागेल. लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात? आईलासुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते? खरंतर माहेराच्या सुखसमृद्धासाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते, पण तिच्या अडचणीत तिनं माहेराकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात? का? का?…

माझिया प्रियाला

कथा * अनुजा कुलकर्णी

निशा सधन कुटुंबात वाढलेली एकुलती एक लाडाची मुलगी. त्रिकोणी कुटुंब एकदम सुखी होते. आई बाबा दोघांची आवडती होती अनिशा. एकुलती एक असल्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीला नकार मिळाला नव्हता. तिने काही बोलायचा अवकाश, लागलीच हवं ते तिला मिळत असे. या गोष्टीचा अनिशाने कधी गैरफायदा घेतला नव्हता. पण अनिशा खूप स्वतंत्र विचारांची होती. अनिशाने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिला मनासारखा उत्तम जॉबसुद्धा मिळाला. आता तिच्या आईला वेध लागले होते ते तिच्या लग्नाचे. आईला माहिती होतं की अनिशा घाईने लग्न करणार नाही. पण ‘बोलून घेऊ’ असा विचार करून एके दिवशी आईने हे अनिशाशी बोलायचा निर्णय घेतला.

‘‘अनिशा, मस्त मूड दिसतो आहे आज? काही विशेष?’’ अनिशाची आई बोलली.

‘‘नाही गं आई. जॉबमध्ये मजा येतेय, सो खुश आहे. मनासारखं काम करता येत आहे. उगाच कोणाची लुडबुड नसते. मला अशाच ठिकाणी काम करायचं होतं.’’

‘‘व्वा! जॉब आवडला आहे हे छान. बरं सांग, लग्नाबद्दल काय मतं आहेत तुझं? बरेच दिवस बोलायचं होतं, पण राहूनच जात होतं. आज निवांत दिसलीस म्हणून म्हटलं बोलून घेऊ.’’ अनिशाची आई बोलली आणि तिचं बोलण ऐकून अनिशाने कपाळावर हात मारून घेतला.

‘‘लग्न? हा एकच विषय असतो का गं आई. माझ्या कामाबद्दल बोल, ऑफिसबद्दल बोल, मित्र मैत्रिणींबद्दल बोल. पण ते नाही तर सारखं लग्न हाच विषय तुझ्या डोक्यात. तुला माहिती आहे लग्न हा माझ्यासाठी महत्वाचा विषय नाहीए.

म्हणजे आत्ता तरी नाही. सो मी आता जाते आणि मी बोलत नाही तोपर्यंत हा विषय प्लीज नको गं.’’

अनिशा इतकं बोलली आणि तिथून निघून गेली. तिच्या आईनेसुद्धा तो विषय तिथेच बंद केला आणि कामाला लागली.

पाहता पाहता दिवस पुढे सरत होते. अनिशाने ताकीद दिल्यामुळे आईने परत लग्नाचा विषय काढला नाही आणि अनिशा तिच्या रुटीनमध्ये बिझी झाली.

अनिशाला कामावर जॉईन होऊन एक वर्ष झालं. अनिशा छान मूडमध्ये होती. अनिशाने नवीन कपडे घातले आणि ती ऑफिसला पोहोचली. ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्या तिला नील दिसला. त्याच्या हातात भला मोठा पुष्पगुच्छ होता. अनिशाला पाहून त्याने तो पुष्पगुच्छ तिला दिला. अनिशा खूप खुश झाली.

‘‘काँग्रॅट्स अनिशा…आज तुला इथे जॉईन होऊन एक वर्ष झालं बघ बरोबर.’’

‘‘तुझ्या लक्षात आहे नील. थँक्यू सो मच. खरं तर मी पूर्णपणे विसरले होते. सकाळी कॅलेंडर पाहिलं तेव्हा आठवलं.’’

‘‘मी कसा विसरेन अनिशा. एक वर्षापूर्वी मी तुला पाहिलं आणि त्या दिवसापासून तुझ्या आकंठ प्रेमात बुडालो आहे.’’ नील पुटपुटला. पण हे त्याला मोठयाने बोलायची हिंमत नव्हतीच. तो काय बोलतो आहे हे अनिशाला ऐकू आले नाही म्हणून तिने त्याला प्रश्न केला.

‘‘नील, आत्ता काही बोललास?’’

‘‘नाही गं. मी काही नाही बोललो. सो तू सांग, आज पार्टी देणार आहेस की नाही?’’

‘‘पार्टी कसली रे…’’

‘‘काय अनिशा. इथे एक वर्ष झालं अन् त्याचं सेलिब्रेशन तो बनता है ना…’’ नील बोलला आणि त्याचं बोलणं ऐकून अनिशाच्या चेहऱ्यावर छान हसू आले.

‘‘आधी काम करू, मग संध्याकाळी जाऊ कुठेतरी. आणि हो, मी इतकीही कंजूस नाही…पार्टी देईन… फक्त तुला, कारण तू माझी बेस्टी आहेस…आणि तसंही, इतर कोणाच्या लक्षात आहे असं मला वाटत नाही, सो त्यांना पार्टी द्यायचा प्रश्नसुद्धा नाही.’’

अनिशाचं बोलणं ऐकून नील खुश झाला. त्याने खिशात हात घातला. तो जरा अस्वस्थ झाला. मग मात्र त्याने खिशातून हात बाहेर काढला. अनिशा ते पाहत होती. नील अस्वस्थ का आहे हे विचारणार होती, पण तितक्यात नील बोलायला लागला.

‘‘चला आता कामाला लागू नाहीतर काम झालं नाही तर जास्त वेळ थांबून काम पूर्ण करावं लागेल.’’

अनिशा फक्त हसली आणि तिला जाणवलं की नील तिच्यापासून काहीतरी लपवतो आहे. अनिशाला नीलशी बोलायचं होतं, पण तिच्या डोळयासमोर काम येत होतं… म्हणून ती काम करायला तिच्या डेस्कवर गेली. अनिशा तिथून गेली आणि नीलने पुन्हा खिशात हात घातला आणि स्वत:शीच हसून बोलला.

‘‘साहेब करा थोडी हिंमत आणि बोला जे वाटतंय ते. आता फार उशीर करून चालणार नाही.’’

मग मात्र नीलसुद्धा त्याच्या डेस्कवर जाऊन काम करायला लागला.

होता होता दुपार झाली. लंच ब्रेक झाला. नील पुन्हा अनिशाच्या डेस्कजवळ आला. मग दोघांनी कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण केलं. जेवतानासुद्धा नील सारखा खिशात हात घालून काहीतरी चाचपडत होता. पण काही बोलत मात्र नव्हता. दोघांचं जेवण आवरलं आणि दोघे पुन्हा आपल्या कामाला लागले. अनिशाला जाणवत होतं की नीलला तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण तो ते बोलणं टाळत होता. संध्याकाळ झाली. ऑफिसमधले सगळे काम आवरून बाहेर पडत होते. अनिशानेसुद्धा तिचं काम आवरलं आणि बॅग भरली. ती नीलच्या येण्याची वाट पाहायला लागली. पण नील काही आला नाही. मग शेवटी तिच उठली आणि नीलच्या डेस्कपाशी गेली. नीलचं काम आवरलं होतं, पण तो डोळे मिटून काहीतरी विचार करत होता. त्याला उठवणं खरं तर अनिशाच्या जीवावर आले होते, पण तिने शेवटी नीलला हाक मारलीच.

‘‘नील, झोपलास का काय? आणि आवर की. जायचं आहे ना आपल्याला?’’

नील ने काही प्रतिसाद दिला नाही. मग मात्र अनिशा अस्वस्थ झाली. तिने नीलला हलवलं आणि परत बोलली.

‘‘नील…चल की…’’

मग मात्र नील भानावर आला.

‘‘ओह सॉरी…मी काहीतरी विचार करत होतो आणि तंद्री लागली. तू कधी आलीस? मला नाही कळलं खरंच.’’

‘‘आत्ताच आले रे. मी सकाळपासून पाहतेय, इतका का अस्वस्थ आहेस?’’

‘‘काही नाही. नको जायला आज तुझ्या पार्टीला. नंतर कधीतरी जाऊ अनिशा.’’

‘‘काय झालं आहे नील? सकाळी तूच तर म्हणलास पार्टी हवीये आणि आता तूच म्हणतो आहेस, आत्ता पार्टी नको. आपण इथून बाहेर पडू. मग एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि बोलू. आणि तू अस्वस्थ वाटतो आहेस आज. सारखा खिशात हात घालतोस, पण काहीतरी पुटपुटतो आहेस. मला त्याबद्दल बोलायचं आहे. नेहमी माझ्याबरोबर असतोस, माझी इतकी काळजी घेतोस. आता आज माय टर्न… बघू, काय त्रास देतंय माझ्या मित्राला.’’ अनिशा हसली आणि तिने नीलचा हात धरून त्याला उठवलं. मग मात्र दोघे ऑफिसमध्ये थांबले नाहीत. ते एका छान रेस्टॉरंटमध्ये गेले आणि अनिशाने खायची ऑर्डर दिली, मग ती बोलायला लागली.

‘‘आता बोल. काय होतंय तुला आज? आपण एक वर्ष सोबत आहोत. नेहमीच सोबत असतो. तुला काही झालं की तू आधी मला सांगतोस, पण आज मात्र असा का वागतो आहेस मला कळत नाहीए.’’

‘‘सोड गं अनिशा. मला माहिती आहे. तुझं उत्तर नाहीच असणारे. मग कशाला ना उगाच. तुला त्रास, मला त्रास. आणि आज सारखं वाटतं…बोलावं पण मग असा विचार येतो, जाउदे…उगाच गैरसमज नको.’’

‘‘तू काय बोलतो आहेस नील? थोडं स्पष्ट बोलशील का?’’

‘‘काय बोलू स्पष्ट?’’

‘‘जे तुझ्या मनात आहे ते.’’

‘‘मी बोलेन, पण अजिबात वाईट प्रतिक्रिया द्यायची नाही बघ.’’

‘‘नाही रे…तू सांग तर खरं…’’

नीलने खिशात हात घालून एक डबी काढली आणि त्यातून एक अंगठी  काढली. अनिशाने ते पाहिलं आणि ती खुश झाली.

‘‘ओह माय नील. तुला कोणीतरी आवडते आणि ही अंगठी तिच्यासाठी? कधी करणारेस प्रपोज? ओह…मला आत्ता कळलं, तू अस्वस्थ का आहेस. तुला भीती वाटते आहे का? घाबरू नकोस. मी आहे. घे बोलावून इथे…’’ अनिशा उत्साहाने बोलली.

‘‘अनिशा…तुला काहीच समजत नाही की तू न समजल्याचं नाटक करतेस गं? मला तू आवडतेस. तू आणि फक्त तू…तुला तर काही कळतंच नाही ना आणि आता कळलं आहे तर तू नाही म्हणणार. मला माहिती आहे. मी तुला चांगलं ओळखतो. तुला आत्ता लग्न नकोय. तुझी तिच बडबड…नको होतं मला हे सगळं, पण आज माझा भावनांवर कंट्रोल राहिला नाही गं.’’ नील उदास होऊन बोलला, ‘‘तुला कधीच माझं प्रेम कळलं नाही ना? मला तर वाटलं होतं, तुला कधीतरी कळेल आणि तू आपणहून विचारशील. पण जाऊ दे. मी जातो आता. तू खा एकटी.’’ नील उदास होऊन बोलला. अनिशासुद्धा ओशाळली. तिच्यासमोर तिचं प्रेम तिची वाट पाहत होतं, पण ती सतत स्वत:मध्येच मग्न असायची. तिला तिची चूक कळली.

‘‘थांब नील. मला नव्हतं कळलं हे प्रेम आहे आणि सगळं स्वत:च ठरवणार तर मला सांगितलंस कशाला? तू आधी विचारू शकला असतास. पण कधी विचारलं मला? आपण जनरल बोलयचो लग्नाबद्दल, पण तुझं प्रेम आहे हे कधी बोललास? आज तू सांगितलं, पण स्वत:च निर्णय देऊन मोकळासुद्धा झालास. मी लग्नाचा विचार कधी सिरिअसली केलाच नव्हता. तू माझा खूप छान मित्र आहेस.’’

‘‘हो ना. तू भारी. जगावेगळी. तुला प्रेम कळत नाही…कशाला बोलतो आहे तु?याशी?’’ नील उखडून बोलला.

‘‘शट अप नील… मा?याकडे बघ…’’ तिने डावा हात पुढे केला.

‘‘आता काय?’’

‘‘अंगठी घाल… मला कळलं नव्हतं. पण आत्ता मी विचार केला. तुला माझ्यापेक्षा अजून चांगली कोणी मिळणार नाहीए. आय वरी फॉर यु नील…’’

अनिशा स्वत:शीच हसली आणि तिचं बोलणं ऐकून नील खूप खुश झाला. त्याने अनिशाच्या बोटात अंगठी घातली आणि तिचा हात हातात घट्ट दाबून ठेवला. मग तो मनसोक्त हसत बोलला, ‘‘माझिया प्रियाला प्रीत कळली…’’ मग दोघे आपल्या प्रेमाच्या जगतात हरखून गेले.

एक दिवसाचा बॉयफ्रेंड

कथा * गिरीजा पालकर

‘‘तू एक दिवसासाठी माझा ब्रॉयफ्रेंड होशील का?’’ त्या मुलीचे हे शब्द सतत माझ्या कानात घुमत होते. मी खरं तर गोंधळून, बावचळून तिच्याकडे बघत होतो. दाट काळे केस अन् हसऱ्या चेहऱ्यावरचे दोन चमकदार डोळे बघून माझं हृदय धडधडायला लागलं. कुणा अनोळखी मुलीकडून अशा तऱ्हेची मागणी आल्यावर दुसरं काय होणार?

मी चांगल्या कुटुंबातला चांगला हुशार मुलगा आहे. लग्नाच्या बाबतीतही माझी मतं ठाम होती. आधी एकदा मी प्रेमात पडलो होतो, पण आमचं प्रेमप्रकरण अगदीच अल्पजीवी ठरलं होतं. त्या मुलीनं माझा विश्वासघात केला. मला ती सोडून गेलीच…खरं तर ही जगच सोडून गेली.

खूप प्रयत्न करूनही मी तिला विसरू शकलो नाही. मग ठरवलं की आता ठरवूनच लग्न करूयात. घरचे लोक ठरवतील, त्या मुलीशी लग्न करून मोकळं व्हायचं.

पुढल्या महिन्यांत माझा साखरपुडा आहे. मुलीला बघितलंही नाहीए. घरच्यांना ती खूपच खूप आवडली आहे. सध्या मी सुट्ट्यांमध्ये मामाकडे आलोय. मी परत घरी गेलो की साखरपुड्याची तयारी सुरू होणार.

‘‘सांग ना, तू माझा एक दिवसाचा…’’ तिनं आपला प्रश्न पुन्हा विचारला.

‘‘मी तर तुला…तुम्हाला…ओळखतही नाही…’’ मी अजूनही बाबरलेलाच होतो.

‘‘ओळखत नाही म्हणूनच तर एक दिवसाचा बॉयफ्रेंड म्हणतेय…नेहमीसाठी नाही विचारलं,’’ तिनं तिचे मोठे मोठे डोळे फडफडवत म्हटलं, ‘‘खरं तर दोनचार महिन्यांतच माझं लग्न होणार आहे. माझ्या घरातली माणसं फार जुनाट विचार सरणीची अन् कट्टर आहेत. ब्रॉयफ्रेंड तर दूर, मी कुणा मुलाशी कधी बोलतही नाही. मी ही आता हे सगळं भाग्य म्हणून स्वीकारलंय. घरचे ज्या मुलाशी लग्न ठरवतील, त्याच्याशी मी मुकाट्यानं लग्न करणार आहे. पण माझ्या मैत्रिणी म्हणतात, लग्नाची मजा तर लव्हमॅरेजमध्ये आहे. निदान एक दिवस तरी बॉयफ्रेंडबरोबर हिंडून फिरून बघायचं आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहेत…फक्त मलाच नाहीए.’’

‘‘एक गोष्ट खरी की मी खूपच संवेदनशील, भावनाप्रधान मुलगी आहे. कुणावर प्रेम करेन तर अगदी मनापासून करेन. त्यामुळेच अशा गोष्टींबद्दल मनात थोडी धाकधूक आहे. मला कळतंय की मी आजकालच्या मुलींसारखी स्मार्ट नाही हे तुम्हाला जाणवतंय. पण बिलीव्ह मी. मी आहे ही अशी आहे. मला फक्त कुणी सज्जन मुलगा एका दिवसासाठी बॉयफ्रेंड व्हायला हवाय…प्लीज…तू मला मदत कर ना?’’

तिच्या एवढ्या सरबत्तीनं मी गारद झाल

‘‘ओके. पण जर मी खरोखरंच तुझ्या प्रेमात पडलो तर?’’

‘‘तर काय? ते एक स्वप्न होतं असं समजून विसरून जायचं. एवढं लक्षात ठेवूनच माझ्याबरोबर यायचं. फक्त एकच दिवस…मस्त हिंडू, फिरू, खाऊपिऊ, एकूणांत मजा करू…बोल, काय म्हणतोस? अन् हे बघ, तशीही मी तुझ्याहून पाच वर्षांनी मोठी आहे. मी तुझ्या ड्रायव्हिंग लायसेन्सवर तुझं वय बघितलंय. खरं तर मघाशी तुझ्याकडून ते अवधानानं खाली पडताना मी बघितलं आणि तुला ते परत करावं म्हणूनच मी आले…पण तू एक खूपच सज्जन मुलगा आहेस असं मला मनातून जाणवलं. तू माझा गैरफायदा घेणार नाहीस असं वाटलं, म्हणून मी तुझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला?’’

मला हसू आलं…ही मुलगी माझ्याहून पाच वर्षं लहान असावी अशी दिसतेय अन् म्हणतेय पाच वर्ष मोठी आहे? असेल बुवा? पण मला मजा वाटत होती. तिला ‘नाही’ म्हणवेना. मी म्हणालो, ‘‘असं कर, परवा सकाळी आठ वाजता इथंच मला भेट. त्या दिवशी अख्खा दिवस मी तुझा बॉयफ्रेंड! ओके!’’

‘‘ओके! थँक्यू.’’ ती हसली. निघून गेली.

घरी परतल्यावरही मी सगळा वेळ तिचाच विचार करत होतो.

दोन दिवसांनी मी ठरलेल्या वेळी तिथं पोहोचलो, तेव्हा ती माझी वाट बघत होती.

‘‘हाय डियर…’’ म्हणत ती पुढे आली.

‘‘हाय…’’ मी जरा संकोचलोच.

पण तिनं पुढे होऊन पटकन् माझा हात पकडला अन् म्हणाली, ‘‘चल, आत्तापासून तू माझा बॉयफ्रेंड अन् मी तुझी गर्लफ्रेंड…अजिबात संकोच करू नकोस, लाजू नकोस…मोकळेपणानं वाग रे!’’

‘‘बस्स, आजचा एक दिवस, मग ती कुठं अन् मी कुठं,’’ मी स्वत:चीच समजूत घातली.

मग आम्ही दोन अनोळखी व्यक्तींनी सगळा दिवस खूप जुनी ओळख असल्यासारखा घालवला.

तिचं नाव प्रिया होतं. मी गाडी चालवत होतो अन् ती माझ्या शेजारी बसली होती. तिचे दाट केस तिच्या खांद्यावर विखुरले होते. तिनं लावलेल्या परफ्यूमचा मंद सुंगध येत होता. त्या सुंगधाने मी वेडावलो होतो. मी एक गाणं गुणगुणायला लागलो. ती टक लावून माझ्याकडे बघत होती, म्हणाली, ‘‘छान गातोस की तू?’’

‘‘होय…गातो थोडंफार…त्याचं काय आहे, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते ना, तेव्हा गाणं असं आपोआप ओठांवर येतं.’’

मी डायलॉग मारला अन् ती खळखळून हसली. तिच्या त्या निर्मळ हसण्यानं मला पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं आठवलं. मला काय होतंय ते मलाच कळेना.

तेवढ्यात तिनं आपलं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं अन् गोड आवाजात विचारलं, ‘‘माय प्रिन्स चार्मिंग, आपण कुठं जातोय?’’

‘‘तू म्हणशील तिथं जाऊयात. पण मला इथली एक फार सुंदर जागा माहीत आहे. सर्वांत रोमँटिक जागा…तुलाही आवडेल ती.’’ मीही आता मोकळा झालो होतो.

‘‘शुअर! तुला वाटेल तिथं घेऊन चल. माझा तुझ्यावर शंभर टक्के विश्वास आहे.’’

‘‘एवढा विश्वास का बरं?’’

‘‘कुणा कुणाच्या डोळ्यात लिहिलेलं असतं की हा माणूस शंभर टक्के विश्वास ठेवण्यायोग्य आहे…म्हणून तर मी तुला निवडलं ना बॉयफ्रेंड म्हणून.’’

‘‘ए…, हे बघ, उगीच इमोशनल होऊ नकोस. हो, नंतर त्रास होईल.’’

‘‘कुणाला? मला की तुला?’’

‘‘कदाचित दोघांना…’’

‘‘नाही. मी अत्यंत प्रॅक्टिकल आहे. मी फक्त एकच दिवस तुझ्यासोबत असणार आहे. कारण मला ठाऊक आहे. आपल्या या नात्याला फक्त एकाच दिवसाची परवानगी आहे.’’

‘‘होय, ते खरंच. मी माझ्या घरात त्यांच्या मर्जीविरूद्ध नाही वागू शकत.’’

‘‘अरे बाबा, घरातल्यांच्या मर्जीविरूद्ध वागायला कोण सांगतंय? मी स्वत: माझ्या बांबाच्या वचनाला बांधिल आहे. त्यांच्या मित्राच्या मुलाशी माझं लग्नं व्हायचंय. सहा महिन्यांनी तो इंडियात येणार आहे. लगेच साखरपुडा अन् पाठोपाठ लग्न…लग्नानंतर मी कदाचित पॅरिसला जाणार…कायमचीच!’’ ती सहजपणे बोलली.

‘‘म्हणजे, तू सुद्धा, त्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातल्या सिमरनसारखी एखाद्या अनोळखी व्यक्तिशी लग्न करणार आहेस? ज्याला कधी बघितलंही नाही, अशा माणसासोबत?’’ मी थेट तिच्या डोळ्यांत बघत विचारलं.

ती ही हसत म्हणाली, ‘‘हो, साधारण तसंच! पण डोंट वरी, मी तुला त्या

सिनेमातल्या शाहरूख खानसारखं माझ्या आयुष्यात येऊ देणार नाही.’’

‘‘तर मग हे सगळं का? माझ्या भावनांशी का खेळते आहेस?’’

‘‘अरेच्चा? मी कुठं खेळतेय? ती तर आधीच स्पष्ट सांगितलं होतं की आपलं हे नातं फक्त आजच्या, एकाच दिवसापुरतं आहे म्हणून!’’

‘‘होय, तेही खरंच, इट्स ओके. आय एम सॉरी, चला, आपलं ठिकाण आलं.’’

‘‘अय्या, कित्ती छान!!’’ तिच्या तोंडून उत्स्फूर्त दाद आली. चेहऱ्यावर आनंद झळकला.

आम्ही त्या ठिकाणी थोडं फिरलो. मग ती माझ्या जवळ येत म्हणाली, ‘‘आता तू मला मिठीत घे…सिनेमात दाखवतात तसं…’’

ती माझ्याजवळ आली. तिच्या केसांचा माझ्या खांद्यावर स्पर्श होत होता. मला एकदम माझ्या गर्लफ्रेंडची, बिंदुची आठवण आली. एकाएकी मनात ओढ उत्पन्न झाली. तिच जवळ आहे असं वाटलं.

मी एकदम दूर झालो. ‘‘नाही, मला नाही जमणार हे. कुणा परक्या मुलीला का म्हणून मी जवळ येऊ द्यावं?’’

‘‘का रे बाबा? तुला भीती वाटतेय का? मी याचा व्हिडियो बनवून वायरल करेन म्हणून?’’ ती?खट्याळपणे म्हणाली अन् मग खळखळून हसली…तेच निर्मळ हसू…

मी तोंड फुगवून म्हणालो, ‘‘कर ना व्हिडियो…मला काय? तसंही मी मुलगा आहे, माझी अब्रू थोडीच जातेय?’’

‘‘तेच तर मी तुला समजावते आहे. तू मुलगा आहेस. तुला काय फरक पडणार आहे?’’ ती पुन्हा प्रसन्न हसली. मग म्हणाली, ‘‘पण एक गोष्ट खरी, तू ना आजकालच्या मुलांसारखा नाहीएस.’’

‘‘आजकालच्या मुलांसारखा म्हणजे काय? सगळी माणसं एकसारखी नसतात.’’

‘‘तेच तर! म्हणूनच मी तुला निवडलाय ना? कारण तू माझा गैरफायदा घेणार नाहीस हे मला माहीत होतं. दुसरा कुणी असता, तर त्याला तर ही संधी म्हणजे लॉटरी लागली असं वाटलं असतं.’’

‘‘तुला माझ्याबद्दल इतकी खात्री कशी काय? मी कसा आहे, कसा नाही हे तुला कुठं ठाऊकाय?’’

‘‘तुम्हारी आँखों ने सब बता दिया है मेरी जान,’’ ती अगदी सिनेमाच्या स्टाइलनं बोलली. ‘‘सज्जनपणा डोळ्यांमधून कळतो, तुला माहीत नाही?’’

या मुलीचं वागणं, बोलणं, सगळ्यांनीच मी प्रभावित झालो होतो. खरंच खूप वेगळी होती ती, आम्ही गप्पा मारत तळ्याच्या काठावर फिरलो. ती माझ्या अगदी जवळ येऊन म्हणाली, ‘‘तुझ्या गर्लफ्रेंडला हग नाही करणार?’’ तिनं मला मिठी मारली.

मला वाटलं, काळ जणू तिथंच थांबलाय. काही वेळ आम्ही स्तब्ध उभे होतो. माझ्या हृदयाची वाढलेली धडधड तिलाही जाणवली असावी. मी ही तिला आवेगानं मिठी मारली. जणू धरती अन् आकाशच एकत्र आलंय असा भास झाला. काही क्षणांतच ती माझ्यापासून दूर झाली…लांब जाऊन उभी राहिली.

‘‘बस्स! यापुढे जायचं नाही. स्वत:वरचा ताबा सुटायला नको…चल, परत जाऊयात.’’ ती म्हणाली.

मीही मला सावरत काही न बोलता तिच्या मागून चालायला लागलो. माझ्या श्वास अडखळत होता. घशाला कोरड पडली होती. गाडीत बसताच मी पाण्याची अख्खी बाटली पोटात रिचवली.

तिला हसायला आलं, ‘‘महाशय, दारूची बाटली एका झटक्यात रिकामी केल्यासारखे पाणी प्यायलात!’’

तिच्या बोलण्यानं मलाही हसायला आलं.

‘‘खरंय, तू इतकी छान आहेस ना? मला तर वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडतोय…’’

‘‘भलतंच काय? अरे पाच वर्षांनी मोठी आहे मी तुझ्याहून. प्रेमात वगैरे पडण्याचा तर विचारच करू नकोस.’’

‘‘पण मी काय करू? माझं मन एक म्हणतंय, माझा मेंदू दुसरंच काही म्हणतोय…’’

‘‘चालायचंच. तू फक्त आजचा विचार कर. विशेषत: लंचचा…भूक लागलीय आता.’’

‘‘एक सुंदर जागा ठाऊक आहे मला. बिंदुला घेऊन मी तिथं एकदा गेलो होतो. तिथंच जाऊयात आपण.’’ मी गाडी वृंदावन रेस्टॉरंटच्या वाटेला वळवली.

‘‘तिथल्या जेवणाची चव अगदी घरच्यासारखी असते. मुख्य म्हणजे एकूण मांडणीही अशी छान आहे की आपण रेस्टॉरंटमध्ये आहोत असं वाटतंच नाही. बागेतच वेताच्या टेबलखुर्च्या मांडल्या आहेत. सगळीकडे छान हिरवळ आहे.’’ मी माझं ज्ञान पाजळलं.

ती उत्सकुतेनं ऐकत होती. तिथं पोहोचल्यावर एकदम खूष झाली. ‘‘खरंच, किती छान आहे ही जागा. प्रसन्न वातावरण अन् घरच्या चवीचं जेवण…किती मज्जा ना?’’

मी तिचा चेहरा न्याहाळत होतो. तिचं मन अगदी निर्मळ होतं. वागण्यात सहज सच्चेपणा होता. जेवण झाल्यावर आम्ही अजून थोडे भटकलो. खूप गप्पा मारल्या. आता आम्ही अधिक मोकळे झालो होतो. शाळा कॉलेजच्या गोष्टी, कुटुंबातल्या, घरातल्या लोकांबद्दल बोललो. थोडी फार ‘प्यार मोहब्बत की बातें’ पण बोललो. बघता बघता सायंकाळ झाली अन् तिची जायची वेळही झाली. मला वाटलं माझा प्राण माझा देह सोडून जातोय. मी घाबरा झालो.

‘‘प्रिया, तुझ्याशिवाय मी कसा राहू शकेन गं? प्रिया, तुझा मोबाइल नंबर दे मला.’’ मी व्यथित अत:करणाने बोललो.

‘‘आर यू सीरियस?’’

‘‘येस, आय एम सीरियस,’’ मी तिचा हात धरला. ‘‘मी तुला विसरू शकत नाही प्रिया. मला वाटतंय मी तुझ्या प्रेमात पडलोय.’’

‘‘आपलं डील विसरू नकोस मयंक.’’ तिनं आठवण करून दिली.

‘‘अगं पण, मित्र म्हणून मैत्री ठेवायला काय हरकत आहे?’’

‘‘नाही, नकोच. मला स्वत:वर ताबा ठेवता आला नाही तर? नकोच, रिस्क नको.’’

‘‘तर मग मी तुझ्याशी लग्न करतो,’’ मी घाईनं म्हणालो. तिला निरोप द्याच्या कल्पनेनंच माझे डोळे भरून आले होते. या एका दिवसांतच तिनं असा काही जिव्हाळा दिला होता की वाटत होतं जन्मभर हिच्याचबरोबर राहावं.

तिनं थोडं लांब जाऊन हात हलवला. ‘‘गुडबाय मयंक, माझं लग्न बाबांनी ठरवलेल्या मुलाशीच होणार. तुला संधी नाहीए. विसर मला तू…’’

ती निघून गेली अन् मी दगडाच्या मूर्तीसारखा तिथंच उभा होतो. मन भरून आलं होतं. जड पावलांनी गाडीत येऊन बसलो आणि स्टियरिंगवर डोकं टेकवून गदगदून रडू लागलो. बिंदू पुन्हा एकदा मला सोडून गेली होती…जायचंच होतं तर माझ्या आयुष्यात आलीच कशाला?

कसाबसा शांत झालो. घरी पोहोचलो. पण मी अत्यंत बेचैन होतो. कोण होती, कुठून आली, कुठं गेली. एका दिवसात माझ्या आयुष्यात उलथापालथ करून गेली. मी मामाच्या घरून माझ्या घरी परतलो. घरी साखरपुड्याची तयारी सुरू होती. मला घरच्यांनी पसंत केलेल्या मुलीला एकदा भेटायचं होतं. म्हणजे मी तिला भेटावं असं घरच्यांचं म्हणणं होतं. पण मला इच्छाच नव्हती.

‘‘मला लग्न करायचं नाही,’’ मी जाहीर केलं अन् घरात वादळ उठलं.

आईनं वेगळ्यानं मला बाहेर नेऊन विचारलं, ‘‘कुणी दुसरी आवडलीय का?’’

‘‘हो.’’ मी सांगून मोकळा झालो.

‘‘ठिक आहे. तिथं बोलणी करूयात. पत्ता अन् फोननंबर दे.’’

‘‘माझ्याकडे नाहीए…’’

‘‘पत्ता नाही, फोन नंबर नाही…असं कसं प्रेम?’’ आई म्हणाली.

‘‘आई, मला ठाऊक नाही. तिची इच्छा काय होती. पण मला वेड लावलं अन् स्वत:चा काहीच ठावठिकाणा न सांगता निघून गेली.’’

मग मी आईला सगळी कथा सांगितली. आईही काही बोलली नाही. अजून काही दिवसांनी घरच्यांच्या हट्टामुळे मला मुलीला भेटायला जावंच लागलं, सगळी वडीलधारी बैठकीच्या खोलीत होती. मुलगी दुसऱ्या खोलीत…मी तिथं गेलो. मुलगी दाराकडे पाठ करून भिंतीकडे तोंड करून बसली होती. मला काहीच सुचत नव्हतं.

मुलीकडे न बघताच मी बोलायला सुरूवात केली, ‘‘हे बघा, मला तुमची फसवणूक करायची नाहीए. खरं तर मी दुसऱ्याच एका मुलीच्या प्रेमात पडलोय.

तिच्याखेरीज इतर कुणाशी लग्नाची कल्पनाही मी करू शकत नाही. मी तुमची क्षमा मागतो…पण तुम्ही मला नकार द्या…प्लीज…’’

‘‘खरंच नकार देऊ?’’ मुलीनं विचारलं. मी दचकलो…हा तर प्रियाचा आवाज. मी वळून बघितलं. प्रियानंदेखील तोंड वळवळं. खरोखर, ती प्रिया होती.

‘‘तू?’’ आश्चर्यानं मी किंचाळलोच.

‘‘शंका आहे का?’’ तेच निर्मळ हसू.

‘‘पण मग…ते सगळं…?’’

‘‘खरं तर मला ठरवून केलेले लग्न नको होतं. मला प्रेमविवाह करायचा होता. म्हणून आधी तुझ्याकडून तुझं माझ्यावरचं प्रेम वदवून घेतलं. मग या लग्नाला होकार दिला. कसं होतं सरप्राईझ?’’

‘‘फारच छान.’’ मी तिला मिठीत घेत कबूली दिली.

पुन्हा चूक होणे नाही

कथा * सुदीप्ती सत्या

सकाळच्या वेळी माझं घर अगदी केराच्या बादलीसारखं दिसतं…नवरा ऑफिसात, दोन्ही मुलं कॉलेजात अन् धाकटा लेक शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते. सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही.

खोल्यांचे केर काढून फरशा पुसून होताएत तोवर मोबाइल वाजला. कामाच्या वेळी असे मेसेजेसही फार वैताग आणतात. फोन बघितला तर मोठ्या नणंदेचा होता. सगळा राग वैतागून विसरून मी फोन घेतला. इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काही सीरियस तर नाही ना? हा विचार बाजूला सारून मी म्हटलं, ‘‘ताई, नमस्कार बऱ्या आहात ना?’’

‘‘मी बरी आहे गं! पण मोहनाची तब्येत बरी नाहीए. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. ती जेवतखात नाहीए. रात्र रात्र जागी असते. विचारलं तर म्हणते झोप येत नाही. जीव घाबरतो…’’ बोलता बोलता ताईंना रडू यायला लागलं.

‘‘हे कधीपासून होतंय?’’

‘‘एखाद महिना झाला असावा, कदाचित जास्त ही…’’

‘‘ताई, रडू नका, मी आहे ना? आजच जाते मी तिला भेटायला. आता नऊ वाजलेत म्हणजे यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असेल. मी संध्याकाळी भेटते तिला. वाटलं तर इथं घरी घेऊन येईन…तुम्ही अगदी शांत राहा. ब्रेकफास्ट झाला का तुमचा?’’

‘‘नाही…’’

‘‘कमाल करता…इतका वेळ उपाशी आहात? आधी खाऊन घ्या. चहा घ्या अन् काळजी करू नका…मलाही आता भराभरा कामं आटोपायची आहेत. मी एक दोन दिवसात तुम्हाला सगळं सांगते…आजच जातेय मी मोहनाकडे…’’

फोन ठेवून मी कामाला लागले. मोहनाचा विचार डोक्यात होताच.काय झालं असेल मोहनाला? इतकी हुशार, गोड गुणी पोरगी…आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्वगुण संपन्न म्हणून नावाजली जाते. इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ‘तिच्याकडून काही शिका’ असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते.मुलं हसून उडवून लावतात.  punhaa chuke hone naahi

दुपारचा स्वयंपाक आटोपून मी मेथीच्या पुऱ्या, गोडाचे भोपळयाचे घारगे केले. बटाट्याचा कीस तळून घेतला. हे पदार्थ मोहनाला फार आवडतात. होस्टेलवर ते मिळतही नाहीत. माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच कळवलं नाही. सरप्राइज द्यायचं असं ठरवलं. संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले. तिथेच चिठ्ठी ही लिहून ठेवली. नवऱ्याला फोन करून मी मोहनाला भेटायला जातेय एवढं त्याच्या कानावर घातलं.

मोहनाचं कॉलेज अन् होस्टेल माझ्या घरापासून निदान पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं. दोन बसेस बदलून जावं लागतं. भरपूर वेळ खर्च होतो. म्हणूनच वरेचवर मला जाता येत नाही. इंजीनियरिंगच्या भरगच्च अभ्यासातून इकडे यायला मोहनालाही जमत नाही.

मी होस्टेलवर पोहोचले, तेव्हा मोहनाची मैत्रीण भारती भेटली. ‘‘अरे मामी? नमस्कार…कशा आहात?’’ तिनं हसून विचारलं.

‘‘नमस्कार, कशी आहेस तू? मोहना कुठं भेटेल?’’

‘‘तिच्या रूमवर.’’

‘‘थँक्यू…’’ मी तिचा निरोप घेऊन वॉर्डनच्या केबिनमध्ये जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या अन् मोहनाच्या रूमवर पोहोचले. दार बंद होतं…कडी नसावी, पण मी दारावर टकटक करताच धक्क्यानं ते उघडलं अन् मी आत गेले. पलंगावर आडवी झालेली मोहना वर गरगरणाऱ्या पंख्याकडे शून्य नजरेनं बघत होती. आवाजानं दचकून तिनं विचारलं, ‘‘कोण आहे?’’ मला बघताच उठून बसली.

‘‘अय्या…मामी तू?’’ तिनं आनंदानं मिठी मारली.

तिचा चेहरा ओलसर होता…‘‘रडत होतीस का?’’ मी विचारलं.

‘‘नाही…’’

मी तिच्याकडे नीट बघितलं…पार कोमेजली होती पोर, हडकली होती. डोळे सुजल्यासारखे…मी प्रेमानं विचारलं, ‘‘काय झालंय तुला? सकाळी तुझ्या आईचा फोन आला, तुला बरं नाहीए म्हणून, अशावेळी तू सरळ माझ्याकडे यायचंस किंवा स्वत:च्या घरी जायचं…इथं येणाऱ्या डॉक्टर मॅडमना दाखववलंस का? काही औषधं वगैरे घेते आहेस का?’’ मी एकामागोमाग एक प्रश्न एकदमच विचारले.

‘‘अगं मामी, बरी आहे मी. तू अशी हवालदिल होऊ नकोस. बैस तू. मी चहा घेऊन येते.’’ पलंगावरून उतरत मोहनानं म्हटलं.

‘‘मी चहा घेऊनच निघालेय…तू कुठंच जाऊ नकोस. तुझ्यासाठी बघ मी मेथीच्या पुऱ्या, भोपळ्याचे घारगे अन् तुझ्या आवडीचा बटाट्याचा चिवडा आणलाय.’’ मी डबा तिच्यापुढे धरला. मला वाटलं होतं ती नेहमीप्रमाणे झडप घालून डबा उघडेल…पदार्थ तोंडात टाकेल…बोटांनी ‘मस्त’ची खूण करेल. पण तसं काहीच झालं नाही.

‘‘नंतर खाईन,’’ म्हणत तिनं डबा शेजारच्या स्टुलवर ठेवला. डब्याच्या धक्क्यानं स्टुलावरचं पुस्तक खाली पडलं. पुस्तकात ठेवलेली गोळ्यांची स्ट्रिप त्यातून बाहेर आली. मी ती उचलली. नीट बघितली. ‘‘काय गोळ्या झोप येण्यासाठी आहेत…तुला झोप येत नाही?’’ मी तिच्याकडे बघत विचारलं.

तिनं माझी नजर टाळली…‘‘नाही, तसं काही नाहीए. मी चहा घेऊन येते कॅन्टीनमधून,’’ ती घाईनं म्हणाली.

‘‘तुला घ्यायचाय का?’’

‘‘नाही, मला नकोय.’’

‘‘तर मग राहू दे, मलाही थोड्या वेळात निघायचंय. अभ्यास कसा चाललाय?’’

‘‘फारसा चांगला नाही…’’

मला जाणवलं, मोहना बोलताना नजर टाळतेय, एरवी आनंदानं चिवचिवणारी मोहना आज मोकळेपणानं बोलत नाहीए. माझं लग्न झालं, तेव्हा चिमुरडी होती ती. तेव्हापासून आम्हा मामीभाचीचं गुळपीठ होतं. सगळ्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करायची. माझीही ती फार लाडकी होती.

काहीतरी बिघडलंय खास. तिच्या मनावर ताण असेल तर तिनं बोलून मन मोकळं केलं पाहिजे. त्यासाठी थोडा अधिक वेळ मिळायला हवा. नेमकं काय करावं याचा विचार करत असताना तिची रूमपार्टनर भारती आली. तिनं वह्या पुस्तकं शेल्फमध्ये ठेवली अन् बॅडमिंटनची रॅकेट व शटल उचललं.

‘‘मामी, हिला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. रात्रभर खोलीत फेऱ्या मारत असते. सतत बैचेन, सतत उसासे…मीच डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अभ्यास पार बोंबालला आहे. धड जेवत खात नाही…मला तर वाटतंय की कुणाच्या तरी प्रेमात पडलीय.’’ भारतीनं हसत हसत म्हटलं.

‘‘गप्प रहा गं! तोंडाला येईल ते बोलतेय.’’ मोहनाचा चेहरा लाल झाला होता.

‘‘अगं मला नाही, तर निदान मामीला तरी सांग त्या लव्हरचं नाव. मामी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी,’’ हसत हसत भारती बाहेर सटकली.

‘‘इडियट!’’ मोहनानं आपला राग व्यक्त केला. मी संधीचा फायदा घेत तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले अन् विचारलं, ‘‘खरंच कुणी आहे का? मला सांग, मी बोलते तुझ्या आईशी.’’

तिनं पटकन् आपले हात ओढून घेतले. ‘‘कुणीच नाहीए.’’

मी तिचा चेहरा माझ्या हातांच्या ओंजळीत घेतला. ‘‘अगदी खरं खरं सांग, नेमकं काय झालंय? मी तुझी मामी आहे. तुझ्या जिवाभावाची थोर वयाची मैत्रीणही आहे. काय त्रास आहे तुला? झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप का येत नाही?

माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? एखादी चूक घडली आहे का? ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे? काय डाचतंय तुझ्या मनात? एकदा मन मोकळं कर, माझ्याकडून तुला पूर्ण सहकार्य आहे. कदाचित मी काही मार्ग काढू शकेन, कॉलेजचा काही प्रॉब्लेम आहे का? होस्टेलमध्ये काही घडलंय का? की आणखी काही आहे? तू अगदी निर्धास्त होऊन मला सांग.’’

मी वारंवार तिल विश्वास दाखवूनही मोहना जेव्हा काहीच बोलेना तेव्हा मी जरा कठोरपणे म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुला जर काहीच बोलायचं नसेल तर मीही निघते…तुझा प्रॉब्लेम तूच बघ.’’ मी उठून उभी राहिले.

‘‘मामी…’’ अत्यंत करूण स्वरात तिनं हाक मारली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. क्षणभर मी हेलावले, पण कठोरपणे म्हणाले, ‘‘येते मी…’’

ती ताडकन् उठली अन् मला मिठी मारून गदगदून रडायला लागली. ‘‘मामी, माझ्याकडून एक चूक घडलीय…’’

‘‘कसली चूक?’’ मी तिला शांत करत विचारलं.

‘‘एका पुरूषाशी संबंध.’’

विजेचा झटका बसावा तशी मी दचकले. हे काय करून बसलीय पोर. कुणा मुलावर प्रेम वगैरे गोष्ट वेगळी. मोहनाचं रडणं सुरू होतं. मला खरं तर रागच आला पण ही वेळ रागावण्याची नव्हती. तिच्याकडून नेमकं काय ते समजून घेणं अधिक गरजेचं होतं. मी तिच्यासकट पलंगावर बसले.

यावेळी तिला प्रेमळ शब्दांची, आधाराची गरज होती. माझ्या तोंडून एखादा शब्द उणा अधिक गेला तरी ती कदाचित मी गेल्यावर आत्महत्त्याही करेल. मी अगदी शांतपणे तिच्याशी बोलू लागले. ‘‘तू तुझा प्रॉब्लेम सांग, प्रत्येक गोष्टीवर सोल्यूशन असतंच!’’ मी तिला समजावलं.

मोहनानं सांगितलं की ती नेहमीच होस्टेलच्या जवळ असलेल्या चंदन स्टेशनरीकडे फोटोकॉपी काढून घ्यायला जायची. नोट्स, सर्टिफिकेटच्या झेरॉक्स सतत लागतात. होस्टेलच्या सर्वच मुलीं त्या दुकानाचा खूप आधार आहे. झेरॉक्स, कुरिअर, स्टेशनरी असे तीनचार व्यवसाय त्या एकाच दुकानातून होतात.

दुकानाचा मालक चंदन मागच्याच भागात राहतो. त्याची पत्नी रीताही अधुनमधुन दुकान सांभाळते. मदतीला एक पोरगा अजून असतो.

वरचेवर तिथे गेल्यामुळे मोहनाचीही चंदन व रीतासोबत चांगलीच ओळख होती. काही मुलींशी रीताची विशेष गट्टी होती. ती त्यांना कधी तरी चहा फराळही द्यायची. रीताला सात व पाच वर्षांची दोन मुलं होती. त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी रीताला कुणी शिकवणारी मुलगी हवी होती. तिनं मोहनाची रूममेट भारतीला विचारलं. कॉलेजनंतर दोन तास भारती बॅडमिंटनचं कोचिंग घ्यायची. तिला ट्यूशन घेणं जमणारं नव्हतं. भारतीनं मोहनाला विचारलं. मोहना हुशार होतीच. लहान मुलांना शिकवायलाही तिला आवडायचं. पैसेही मिळतील. दोन तास सत्कारणी लागतील म्हणून मोहना कबूल झाली. रोजच घरी जाणं सुरू झाल्यावर रीता व चंदनशीही ती अधिक मोकळेपणानं वागू लागली.

चंदन जरी विवाहित अन् दोन मुलांचा बाप होता तरीही थोडा भ्रमर वृत्तीचा होता. दिसायला अत्यंत देखणा, बोलणं मिठ्ठास…मोहनाही अल्लड वयातली सुंदर तरूणी. दोघंही एकमेकांकडे चोरून बघायची.

आपलं वय, आपली परिस्थिती याची जाणीव दोघांनाही होती, पण भिन्नलिंगी आकर्षणातून एकमेकांकडे आकृष्ट झाली होती.

एक दिवस रीताच्या माहेराहून फोन आला. तिची आई सीरियस होती. हॉस्पिटलमध्ये होती. घाबरलेल्या रीतानं फक्त धाकट्याला बरोबर घेतलं, चार कपडे पिशवीत कोंबले आणि ती घाईनं माहेरच्या गावी निघून गेली.

त्याचवेळी शहरातल्या एका आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्याची आंबड उठली. भराभर दुकानं बंद झाली. पोलिसांच्या गाड्या शहरात, शहराबाहेर चहू बाजूंनी अंगणात फिरत होत्या.

चंदननेही दुकान बंद केलं अन् तो घरात आला. रीता घाईनं गेली होती घरकामाचा पसारा पडून होता. मोहना मोठ्या मुलाला शिकवत होती, पण त्याला आज अजिबात अभ्यास करायचा नव्हता.

तेवढ्यात लुंगी बनियान अशा वेशातला चंदन चहाचे कप हातात घेऊन आला.

‘‘मोहना, चहा घे.’’

चहाचा कप त्याच्याकडून घेताना मोहनाच्या बोटांना त्याच्या बोटांचा स्पर्श झाला. ती एकदम मोहरली. हृदयाची धडधड वाढली. ‘‘ताई कधी येणार?’’ तिनं विचारलं.

तिथंच खुर्चीवर बसून चहा पित चंदननं म्हटलं, ‘‘लवकरच येईल.’’

‘‘चहा फारच छान झालाय,’’ मोहनानं हसून म्हटलं.

‘‘तुमच्यासारख्या मॅडमना माझ्या हातचा चहा आवडला हे माझं भाग्य!’’

अमृतनं बघितलं बाबा अन् टिचर गप्पा मारताहेत, तो तेवढयात तिथून पळाला.

‘‘अरे, अरे…अमृत…’’

कप ठेवून मोहना त्याला पकडायला धावली अन् तिचा पाय घसरला…पडलीच असती पण चंदननं सावरली तिला.

‘‘मॅडम, माझ्या घरात हातपाय मोडून घ्यायचेत का?’’ त्यानं तिला पलंगावर बसवत विचारलं.

चंदनच्या बळकट बाहूंनी सावरलं अन् मोहनाच्या हृदयानं ठाव सोडला. तिच्या हातापायाला कंप सुटला. तिच्या कंरगळीला लागलं होतं. ती स्वत:ला सावरत करंगळी चोळू लागली.

‘‘दुखतंय का?’’

‘‘हो…’’

‘‘आणा मी नीट करतो.’’ म्हणत चंदननं कंरगळी धरून जोरात ओढली. मोहना किंचाळली…कटकन् आवाज आला अन् करंगळी बरी झाली.

तिच्या पावलावरून हात फिरवत चंदननं म्हटलं, ‘‘मोहना, तुझे पायही किती सुंदर आहेत. कोमल, रेखीव गोरेपान.’’

मोहनाच्या अंगावर रोमांच फुलले, तो काय बोलतोय हे लत्रात येण्याआधी ती बोलून गेली. ‘‘तुमच्या गोऱ्यापान छातीवरचे हे काळेभोर केस किती छान दिसताहेत…’’

चंदननं तिला मिठीत घेतलं, चुंबन घेतलं, दोन तरूण देह एकांतात एकमेकांत विरघळले, कळत होतं तरीही सावरता आलं नाही.

दोघांनाही भान आलं, आपली चूक उमगली, मोहना घाईनं होस्टेलवर आली. प्रचंड घाबरली होती ती.

चंदनही स्वत:ला गुन्हेगार समजत होता. मोहना पश्चात्तापाच्या अग्नित होरपळत होती. माहेराहून परत आलेल्या रीतानं, शिकवायला का येत नाही विचारल्यावर ‘प्रोजेक्टचं काम आलंय, वेळ नाही’ असं तिनं सांगितलं.

मोहनाची झोपच उडाली. आपण काय करून बसलो…आईबाबांनी केवढ्या विश्वासानं आपल्याला इथं पाठवलंय अन्…आपल्या धाकट्या बहिणी…किती अभिमान आहे त्यांना मोहनाचा. हे सगळं घरी कळलं तर?

‘‘मामी हे सगळं कसं सहन करू?’’ मोहनाचा बांध पुन्हा फुटला.

‘‘शांत हो बेटा, ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहील. तू अजिबात काळजी करू नकोस.’’ मी तिला थोपटून आश्वस्त करत होते, पण शंकेची पाल मनात चुकचुकत होती…

‘‘मोहना, तुझे पिरिएड्स कधी झालेत…’’

‘‘नाही झालेत अजून…’’ तिनं निरागसपणे म्हटलं.

मला थोडं टेन्शन आलं. पण वरकरणी तसं न दाखवता मी तिला म्हटलं, ‘‘हे बघ, तू पटकन् आवर…दोनचार दिवस माझ्याकडेच रहायचंय, त्या हिशेबानं कपडे पिशवीत भरून घे.’’

‘‘पण मामी.’’

‘‘आता वेळ घालवू नकोस, मी वॉर्डनकडून चार दिवस घरी जाण्याची परवानगी घेऊन येते.’’

वॉर्डननं परवानगी दिली. वाटेत मी मोहनाला म्हटलं, ‘‘घरी  गेल्यावर माधवी, पल्लवी तुला बघून खूप खुश होतील…तू त्यांच्याशी नेहमीच्या मोकळेपणानं वाग. मात्र जे काही घडलंय ते अजिबात सांगू नकोस. उद्या जरा आपण दोघीच बाहेर जाऊन येऊ.’’

घरी पोचताच माझ्या मुलांनी मोहनाचा ताबा घेतला. ‘‘तू अशी हडकुळी का झालीस?’’ या प्रश्नावर तिनं ‘‘अभ्यासाचं टेंशन आलंय,’’ म्हणून सांगितलं.

माझ्या नवऱ्यानंही तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. मी बेमालमपणे सर्व स्थिती सांभाळून घेतली.

नवऱ्याशी खोटं बोलल्याबद्दल मी मनातल्या मनात त्यांची क्षमाही मागितली. मोहनाच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार होते.

रात्री मोहनाच्या आईला फोन केला. ‘‘तिला अभ्यास थोडा जड जातोय, पण ती सर्व करेल, मी तिला चार दिवस घरी घेऊन आलेय,’’ असं सांगून तिलाही आश्वस्त केलं.

मोहना जरी मुलांमध्ये रमली होती तरी अजून ती आतून उमलून आली नव्हती. डोळ्यातले उदास भाव तिची मन:स्थिती सांगत होते.

रात्री ती पल्लवी माधवीबरोबर झोपली अन् अगदी गाढ झोपली. माझी झोप मात्र रूसली होती. मोहनाला चंदनचं आकर्षण वाटलं याच चूक काहीच नव्हतं. पण तरूण वयातही स्वत:वर ताबा ठेवता आला पाहिजे. आईमुलगी, बाप लेक यांच्यात मोकळेपणाने चर्चा, संवाद व्हायला हवा. आज मोहना आहे, उद्या माझ्या मुलीही अशाच नादावल्या तर? आपल्या मुलींना विश्वासात घेऊन सावध करणं ही आमची म्हणजे आयांची जबाबदारी आहे.

पल्लवी माधवीशी मीसुद्धा जवळीक साधायला हवी. स्त्री पुरूष संबंध, निसर्ग स्त्रियांच्या बाजूचा नसतो, एकत्र सुखाचा अनुभव घेतला तरी पुरूष जबाबदारीतून सही सलामत सुटतो. अडकते ती स्त्री…मुलींनी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्याइतकी आई त्यांची मैत्रीण व्हायला हवी.

हसती खेळती मुलगी. एखाद्या घटनेनं अशी हादरून जाते. कोमेजते…मोहनाला प्रेमानं विश्वासानं जवळ घेतलं म्हणूनच ती मोकळेपणानं सांगू शकली, नाहीतर कदाचित तिनं ताण असह्य होऊन आत्महत्त्याही केली असती.

सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांना डबे देऊन त्यांना त्यांच्या मोहिमेवर पाठवलं. मुलं जायला तयार नव्हती. पण शेवटी एकदाची गेली.

आमचा नाश्ता अंघोळी आटोपून मी मोहनाला घेऊन बाहेर पडले. ‘‘आपण कुठं जातोय मामी?’’ तिनं जरा काळजीनं विचारलं.

‘‘माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे. आपण तिच्याकडे जातोय.’’

डॉक्टरनं तपासून ‘काळजीचं कारण नाही’ म्हणून सांगितलं. ‘‘या वयात अभ्यासाच्या टेन्शनमुळे मासिक पाळी थोडी मागे पुढे होते. मी गोळ्या देतेय…सुरू केल्यावर पाळी सुरू होईल. पण ही अशक्त आहे, चांगलं खायला प्यायला घाला. इंजीनियरिंगच्या अभ्यासात तब्येत धडधाकट लागते,’’ डॉक्टरांनी हसून म्हटलं.

मैत्रिणीला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही बाहेर पडलो. वाटेत आम्ही मोहनासाठी एक सुंदरशी पर्स आणि सॅन्डल्स घेतल्या. तिच्या आवडीचं चॉकलेट आइस्क्रिम खायला घातलं. त्यापूर्वी आम्ही एका हॉटेलातच जेवून घेतलं.

मोहनाच्या मनातली सर्व भीती, सर्व काळजी मुख्य म्हणजे अपराधीपणाची भावना मला काढून टाकायची होती. आता तीही आनंदात दिसत होती.

दिवसभर मजा करून आम्ही घरी परतलो. एकाएकी तिनं मला मिठी मारली…‘‘मामी, आज मला इतकं छान अन् हलकं हलकं वाटतंय…’’

‘‘तू जर काल मला रागावली असतीस, दोष दिला असतास तर मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर बोलू शकले नसते. मनातल्या मनांत कुढत बसले असते.

कदाचित मी माझं आयुष्य संपवून टाकलं असतं.’’

‘‘पण तू इतकं मला जपलंस, इतकी प्रेमानं वागलीस, त्यामुळेच मी विश्वासानं सगळं तुला सांगितलं…’’

‘‘पण अजूनही मला स्वत:चाच राग येतोय. मनातून अपराधीही वाटतंय.’’ बोलता बोलता तिचे डोळे भरून आले.

मी तिला पलंगावर बसवली. तिला पाणी प्यायला दिलं. ‘‘बाळा, चूक तर खरंच मोठी घडली होती, पण तुला चूक कळली, पश्चात्ताप झालाय, यातच सगळं भरून पावलं.’’

‘‘आता यापुढे या घटनेचा उल्लेखही कधी करायचा नाही. वेड्या वयातली ती चूक होती. जन्मभर तिची बोच, तो सल घेऊन जगायचं नाही. पुढे केवढं मोठं आयुष्य पडलंय…ते जबाबदारीनं आणि आनंदात जगायचं.’’

‘‘तुझं काही चंदनवर प्रेम नव्हतं. जे घडलं तो एक अपघात होता. संबंध मनातून प्रेम उमलतं, तेव्हा निर्माण होतात. प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी यांच्यात आधी मनातून प्रेम निर्माण होतं, तेव्हा ते शारीरिक संबंधातही दिसून येतं.’’

‘‘आता चंदनला विसर. तो ही आता तुझ्याकडे बघणार नाही. त्याची चूक त्यालाही कळलीच असणार.’’

‘‘लवकरात लवकर यातून बाहेर पड. तब्येत चांगली कर. झपाटून अभ्यासाला लाग. मला खात्री आहे की तू एक अतिशय यशस्वी इंजीनियर म्हणून स्वत:ला सिद्ध करशील.’’ मी हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला अन् तिच्या कपाळावर ओठ टेकले.

तिनं पुन्हा मिठी मारली. ‘‘मामी, पुन्हा एकदा थँक्स! किती धन्यवाद देऊ तुला.’’

थोड्याच वेळात तिनं आईला फोन केला.

‘‘आई, आता मी एकदम छान आहे. अगं, मामी ना, डॉक्टर आहे. बघ, कशी ठणठणीत बरी केलीय मला.’’ मोहनाच्या निर्मळ हास्यानं सगळंच वातावरण आनंदी झालं.

सान्यांचं एक्सक्लूझिव दुकान

मिश्किली * अशोक माटे

सान्यांना रिटायर होऊन अजून चारच दिवस झाले होते. पण घरात बसून घरच्यांच्या कटकटीनं ते जाम कंटाळले होते. बिघडलेलं डोकं आणि आखडलेले सांधे नीट करण्यासाठी, त्याचबरोबर घरातल्या मंडळींची कटकटही बंद करण्यासाठी त्यांनी काही तरी करायलाच हवं हा निर्णय घेतला. रिटायर झाल्यावर पगारही कमी झाला होता तर उत्पन्नांचं एक साधनही असावं, थोडा स्वार्थ, थोडा परमार्थही व्हावा म्हणून ते थोडं घराबाहेर फिरून आले.

या भटकंतीत त्यांनी आपल्या वॉर्डाचा एक सर्व्हे घेतला. घरी येऊन बायकोनं दिलेली कोल्ड कॉफी घेता घेता ते आपल्या सर्व्हेचाही विचार करत होते. त्यांच्या लक्षात आलं की सध्या माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त झाली आहे…पण त्यांच्यासाठी एकही दुकान नाही. गरीब बिचाऱ्या मुक्या प्राण्यांनी आपल्या गरजा पूर्ण कशा बरं करायच्या? कुत्र्यांनी आपल्या आवडीच्या वस्तू आपल्या मालकांना सांगून आवडीच्या दुकानातून मागवायच्या कशा? ते काही नाही, कुत्र्यांसाठी एक स्पेशल जनरल स्टोअर उघडायचंच! समस्त कुत्री किती खुश होतील, शिवाय उगाचच लांब लांब जाऊन वस्तू आणण्याचा त्रास वाचतोय म्हटल्यावर कुत्र्यांचे मालकही खुश होणार. शिवाय चार पैसे सानेही मिळवणार म्हणून तेही आनंदात.

आपला प्रोजेक्ट फायनल करण्याआधी साने साहेबांनी आळीतल्या काही कुत्र्यांच्या मालकांची भेट घेतली. त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. त्या सर्वांचं विश्लेषण केलं, त्यातून ते या निष्कर्षावर पोहोचले की या कामात माणसांच्या गरजा पुरवणाऱ्या दुकानापेक्षा कुत्र्यांच्या गरजा पुरवणाऱ्या दुकानांची गरज जास्त आहे. तेव्हा तर त्यांनी ‘जनरल शॉप फॉर पेट्स’ उघडायचं हे ठरवून टाकलं. माणसांना काय म्हणायचं ते म्हणू देत, त्यांना काय वाटायचं ते वाटू देत, दुकान कुत्र्यांच्या सामानाचंच असणार होतं.

काल ते माझ्या घरी आले. त्यावेळी मी माझ्या गावठी कुत्र्याचे केस विंचरत होतो. मी स्वदेशीचा पुरस्कर्ता नाही, पण सगळी कुत्री एकसारखीच असतात असं मला वाटतं. माणसं देशी, विदेशी, विलायची असू शकतात. एक वाकडं शेपूट प्रत्येक कुत्र्याला असतं, दुसरी ओळख म्हणजे कुत्री भुंकतात, चावतातसुद्धा. पण हल्ली माणसांनी भुंकायला अन् चावे घ्यायला सुरूवात केलीय, तेव्हापासून कुत्री बरी सभ्य झालीत.

खरं तर त्यावेळी मला माझ्या कुत्र्याबरोबर फिरायला जायचं होतं. गेले काही महिने मी स्वत:च्या फिटनेससाठी त्याच्या फिटनेसबाबत अधिक जागरूक झालो होतो. फिरायला जाताना माझे केस विंचरलेले नसले तरी चालतं पण कुत्र्याचे केस विंचरलेले हवेतच. माझं पोट बिघडलं तरी फरक पडत नाही, कुत्र्याचं पोट चांगलं रहायलाच हवं. लोक खरं तर तुमच्यापेक्षाही तुमच्या कुत्र्याकडेच जास्त लक्ष देऊन बघतात. अहो माणूस स्वत:ला नीटनेटका ठेवतो, नटवतो, सजवतो, त्यात काय विशेष? पण ज्याचा कुत्रा अगदी व्यवस्थित असतो तो खरा आदर्श मालक.

‘‘बोला साने साहेब, कसं येणं केलंत? कसं चाललंय निवृत्तीचं आयुष्य?’’ मी कुत्र्याचे केस विंचरून झाल्यावर त्याच कंगव्यानं माझे केस विंचरत विचारलं. त्यावेळी कुत्रा विलक्षण श्रद्धेनं माझ्याकडे बघत होता. तोच माझा मालक आहे असं वाटत होतं.

माझी कुत्र्यावरची अगाध श्रद्धा बघून साने पटकन् माझ्या कुत्र्याच्या पाय पडले अन् बोलले, ‘‘नक्की, नक्कीच चालणार…’’

आश्चर्यानं मी विचारलं, ‘‘काय चालणार?’’ कालपर्यंत आळीतल्या माणसांसकट कुत्र्यांना शिव्या देणारे सानेबाबा माझ्या कुत्र्याच्या पाय पडतात…यांचं हृदयपरिवर्तन झालंय काय?

‘‘माझं दुकान हो, तुमच्यासारखे पाच सात कुत्रा उपासक भेटलेत तरी माझं दुकान मस्त चालेल.’’ ते हसत हसत बोलले अन् हात जोडून कुत्र्याला व मला नमस्कार करून चालू लागले.

दुसऱ्याच दिवशी सान्यांच्या घराला लागून असणाऱ्या गॅरेजवजा खोलीच्या बाहेर एक अत्यंत सुंदर बोर्ड लागलेला बघितला. अतिशय आकर्षक रंगसंगती, सुंदर अक्षरं अन् लिहिलेलं ‘‘साने एक्सक्लूझिव पेट शॉप’’ मी चकितच झालो. इतका सुंदर बोर्ड? दुरूनच नजरेत भरत होता. खरं तर आमच्या आळीत एखादं वाणसामानाचं दुकान उघडायला हवं होतं,   तिथं सानेबाबा चक्क एक्सक्लूझिव शॉप फॉर पेट्स उघडाताहेत? कमाल झाली. आमच्या परीस कुत्री भारी ठरली की!

मी दुकानाच्या बोर्डकडे अन् माझ्या कुत्र्याकडे आळीपाळीनं बघत होतो. कुत्र्यानंही एकदा माझ्याकडे रोखून बघितलं अन् मग दुकानाच्या बोर्डाकडे बघून समाधानानं मान डोलावली. मी मुकाट माघारी फिरलो.

तेवढ्यात एकदम नटूनथटून साने घराबाहेर आले. इतकं व्यवस्थित तयार झालेलं तर मी त्यांना त्यांच्या लग्नातही बघितलं नव्हतं. मला बघताच ते ठेवणीतलं हास्य चेहऱ्यावर आणून म्हणाले, ‘‘काय राव, कशी वाटली आयडीया? एकदम एक्सक्लूझिव आहे ना?’’

मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्यांच्याकडे बघत होतो.

‘‘अहो, मी बराच वेळ सर्व्हे केला. माझ्या लक्षात आलं की इथं केवळ कुत्र्यांसाठी छानसं शॉपच नाहीए. माझ्या हेदेखील लक्षात आलं की कुत्र्यांना माणसांच्या दुकानातून सामान घ्यायला लाज वाटते. खूपदा त्यांच्या गरजेच्या वस्तू माणसांच्या दुकानात नसतात. तेव्हाच ठरवलं, हे काम करायचं, मुक्या प्राण्यांची सेवा होईल, समाजसेवेचं पुण्य मिळेल, शिवाय दोन पैसे आपल्यालाही मिळतील.’’

‘‘म्हणजे, हिंदीत म्हण आहे, ‘आम के आम, गुठलियों के दाम’ तसंच म्हणा की!’’

‘‘बरोबर! तर सर, उद्या तुमच्या या गुणी श्वानाच्या हातून मी माझ्या दुकानाची फीत कापणार आहे. मला कृतार्थ करा.’’ हात जोडून साने वदले.

‘‘या मंगल प्रसंगी अजून कोण कोण येणार आहेत?’’ मी विचारलं, तर ते बोलले, ‘‘आजूबाजूचे सगळे श्वान प्रेमी आपल्या श्वानांसह येतील. मी स्नॅक्सही देणार आहे.’’

‘‘कुणाला? कुत्र्यांना?’’

‘‘नाही, दोघांना, म्हणजे माणसांनाही…’’

‘‘माझ्या मते एखाद्या विलायती श्वानाच्या हातून केलं तर? ती मंडळी जरा जास्तच ‘फसी’ आणि ‘टची’ असतात.’’

‘‘तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला त्यांचे ते नखरे झेपणार नाही. शिवाय मी विलायची, देशी असं काही मानत नाही. माणसं भलेही ‘वसुधैव कुटुंबकम्’ मानत नसली तरी कुत्री मानतात…शिवाय सध्या बहुमत स्वदेशीचंच आहे.’’

आपण मानलं सान्यांना. केवढा सर्व्हे, केवढा अभ्यास…यांचं दुकान नक्कीच, म्हणजे नक्कीच चालणार.‘‘मग काय काय ठेवणार दुकानांत?’’

‘‘श्वानांच्या गरजेचं सगळं सगळं ठेवणार? सुईपासून सिंहासनापर्यंत सगळं. एकदा दुकानांत शिरलं की हवं ते सगळं घेऊनच बाहेर पडायचं. क्वालिटी उत्तम, त्यात तडजोड नाही. म्हणजे बघा सध्या देशात कुत्र्यांच्या खाण्याच्या वस्तू माणसं खाताहेत…पण माझ्या दुकानांत माणसांच्या सामानापेक्षाही उत्तम क्वालिटीचं सामान मी ठेवतोय. कुठेही फसवणूक नाही. अहो, मुक्या जिवाला काय फसवायचं? माणसांना फसवावं एक वेळ…कुत्र्याचा साबण, शाम्पू, टूथपेस्ट, कपडे, पावडरी, क्रीमपासून त्यांच्या ब्रेकफास्ट, लंच, डिनरपर्यंतच्या सर्व गोष्टी म्हणजे कंप्लिट रेंज ऑफ पेट्स, तेही अगदी वाजवी भावात! श्वानसेवा करूनच आता मी आयुष्य घालवणार आहे. कुत्र्याच्या मालकांनाही त्या वस्तू स्वत:साठी वापरताना अभिमानच वाटेल.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘ओरिजनल प्रॉडक्ट्स अगदी स्वस्तात…तर हे (कुत्र्याकडे बोट दाखवून) उद्याचे चीफगेस्ट नक्की हं! बरोबर दहा वाजता पोहोचा. सोबत वहिनींनाही नक्की आणा, अजून मला खूप कामं आटोपायची आहेत. फोटोग्राफर, प्रेस रिपोर्टर, हारतुरे, स्नॅक्स…सगळंच आहे ना? त्याशिवाय समारंभाला शोभा कशी येणार? बराय येतो.’’

मला काही बोलायचं होतं पण त्यापूर्वीच सानेसाहेब त्यांच्या एक्सक्लूझिव शॉपच्या उद्घाटनाच्या तयारीसाठी निघून गेले.

पक्क्या मैत्रिणी

कथा * विभा साने

विनिता ज्या घरात भाड्यानं राहत होती, तिथंच एक नवीन भाडेकरू म्हणून पल्लवीही राहायला आली. या आधुनिकेला बघून ही बया आपला संसार मोडणार असंच विनिताला वाटलं…पण घडलं उलटंच. त्या दोघी पक्क्या मैत्रिणी बनल्या…

प्रमोशनवर बदली होऊन निशांत पुण्यात आला. महत्त्वाकांक्षी निशांतला तिथल्या पॉश एरियात कंपनीने सुंदर घर घेऊन दिलं होतं. पंढरपुरातून बस्तान हलवून त्याची बायको विनिता व मुलगा विहान प्रथमच अशा मोठ्या शहरात आली होती. दुमजली बंगल्याच्या वरच्या भागात हे कुटुंब राहत होतं अन् खालच्या तेवढ्याच मोठ्या घरात घरमालक व त्याची पत्नी राहत होती.

घरालगतच्या गॅरेजच्या वरही एक वन बेडरूम किचन हॉल असा सुंदरसा फ्लॅट होता. विनिताचं घर अन् तो रिकामा फ्लॅट यासाठी सुंदर कठडे असलेला संगमखरी जिना होता.

इथं येताच एका चांगल्या शाळेत विहानचं अॅडमिशन केलं. शाळा तशी फार लांब नव्हती. पण विनिताला स्कूटी चालवता येत नसल्यानं निशांतलाच मुलाला शाळेतून आणणं, पोहोचवणं करावं लागे. काही दिवस सुरूवातीला हे जमलं, पण ऑफिसच्या कामाची जबाबदारी जशी वाढत गेली तसा निशांतला ऑफिसमध्ये अधिकाधिक वेळ घालवावा लागायचा. तो पार दमत होता.

एक दिवस त्यानं विनिताला म्हटलं, ‘‘तू स्कूटी चालवायला शिकून घे ना, निदान विहानला शाळेत सोडणं, शाळेतून परत आणणं आणि इतर बारीक सारीक कामं तू करू शकशील.’’

‘‘छे बाई, मी कशाला शिकू स्कूटी? मला गरजच नाहीए बाहेरची कामं करायची. ही कामं पुरूषांनीच करायची. आमच्या घरी तशीच पद्धत आहे…मी घरातच बरी!!’’ विनितानं म्हटलं.

नाइलाजानं विहानसाठी ऑटोरिक्षाची व्यवस्था करावी लागली. त्यानंतर पुन्हा हा विषय निघाला नाही. विनिता हौशी होती. उत्तम गृहिणी होती. बोलकी अन् मनमिळावू होती. पण घराच्या बाहेरचं क्षेत्र तिला अपरिचित होतं. दोन महिन्यांत तिनं घर मनासारखं लावून घेतलं. घरमालकिणीच्या मदतीनं मोलकरीणही चांगली मिळाली.

घर मांडून झाल्यावर विनितानं शेजारपाजारच्या घरात राहणाऱ्या लोकांशी ओळख करून घेण्याची मोहीम उघडली. पण लहानशा गावातून आलेल्या विनिताला मोठ्या शहरातल्या उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या लोकांना फार संबंध वाढवायला आवडत नाही, त्यांचे संबंध फक्त हाय, हॅलो अन् तोंडभरून हसणं एवढ्यापुरते मर्यादित असतात हे कळायला थोडा वेळ लागला. एक दोन बायकांशी ओळख झाली, पण तीसुद्धा अगदी औपचारिक…त्यामुळे घरकाम आटोपलं की ती टीव्ही लावून बसायची. अधूनमधून खाली मालकीणबाईंकडे जायची.

घरमालक व मालकीण वयस्कर होते. त्यांची मुलं अमेरिकेत स्थायिक झालेली असल्यानं ती दोघं सहा महिने मुलांकडे अन् सहा महिने भारतात असायची. विनिता सुगरण होती. एखादा छानसा पदार्थ ती अधुनमधून त्या म्हाताऱ्यांनाही देऊन यायची. तिच्या प्रेमळ वागण्यानं त्यांनाही खूप समाधान वाटायचं. लहानगा विहानही त्यांना आजीआजोबा म्हणायचा. शाळेच्या गंमती सांगायचा. विनिता निशांतही त्यांना काका काकूच म्हणत होते. बहुधा रविवारच्या सुट्टीला ते चौघं कधी वर तर कधी खालच्या घरात चहा एकत्रच घ्यायची.

असेच एका रविवारी चौघे खालच्या लॉनवर चहा घेत असताना काकांनी विचारलं, ‘‘एवढ्यात सुट्टी घेऊन गावी किंवा फिरायला वगैरे जायचा विचार आहे का तुमचा?’’

निशांतनं सांगितलं, ‘‘नाही काका, सध्या सहा आठ महिने तर मी कुठं जायचा विचारही करू शकत नाहीए. ऑफिसच्या कामाची जबाबदारी इतकी वाढलीय ना?’’

विनितानं विचारलं, ‘‘काका, तुम्ही हा प्रश्न का बरं विचारलात?’’

‘‘कारण आम्हाला सहा महिने मुलांकडे जायचंय, तेव्हा इथली, घराची काळजी राहणार नाही आम्हाला…’’ काकूंनी म्हटलं.

विनिताला मात्र जरा दचकायला झालं. घरी आल्यावरही तिला तिच काळजी लागून राहिली. खालचे लोक गेले तर ती अगदीच एकटी पडेल…रोज काही ते भेटत नाहीत पण त्यांचे आवाज येतात…चाहूल असते.

विनिताला गंभीर मूडमध्ये बघून निशांतने तिला विचारलंच, ‘‘ का गं? काकाकाकू जाणार म्हणून तू नर्व्हस का झाली आहेस?’’

विनितानं त्याला आपला प्राब्लेम सांगितल्यावर त्यालाही पटलं की सकाळी आठपासून रात्री आठपर्यंत तो घराबाहेर असतो. एवढ्या मोठ्या घरात विनिता अगदीच एकटी पडेल.

काही वेळानं विनिता म्हणाली, ‘‘निशांत, आपण काकाकाकूंना गॅरेजच्या वरच्या घरात भाडेकरू ठेवायला सांगूयात का? त्यांना भाडंही मिळेल अन् आपल्याला सोबतही होईल.’’

निशांतलाही ही कल्पना आवडली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना त्यानं काकाकाकूंना ही आयडिया सांगितली. त्यांनाही ती आवडली अन् त्यांनी भाडेकरू शोधायची कामगिरीही निशांतच्याच अंगावर टाकली.

पाच सहा दिवसांनंतर विनिता अन् काकाकाकू गप्पा मारत असताना सायंकाळी एक कार फाटकाशी थांबली. गाडीतून स्मार्ट जीन्सटॉप, हायहिल सॅन्डल, खांद्यावर मोठीशी बॅग अशा वेशातली एक तरूणी उतरली. तिनं विचारलं, ‘‘उमेश साहेबांचं घर हेच का?’’

‘‘होय, मीच उमेश, बोला, काय काम आहे?’’

‘‘गुड इव्हनिंग सर, मी पल्लवी,’’ असं म्हणून तिनं काकांशी हस्तांदोलन केलं. ‘‘आज निशांतकडून कळलं तुमच्याकडे एक?फ्लॅट रिकामा आहे…भाड्यानं देण्यासाठी…मी त्याचसाठी आले आहे.’’

‘‘अच्छा, तर ती फॅशनेबल मुलगी भाडेकरू म्हणून येतेय.’’ मनांतल्या मनांत म्हणत विनिता उठून आपल्या घरी निघाली. तेवढ्यात काकांनी काकूंशी अन् विनिताशी पल्लवीची ओळख करून दिली. पल्ल्वीनं दोघींना हॅलो म्हटलं अन् काकांशी बोलत ती वरचा फ्लॅट बघायला निघून गेली. विनिताला तिचं वागणं खूपच खटकलं. वयानं इतकी लहान असूनही तिनं नुसतं ‘हॅलो’ म्हटलं. वाकून नमस्कार नाही, पण निदान हात जोडून नमस्कार करायला काय हरकत होती?

वरून त्यांचं बोलणं ऐकायला येत होतं. पल्ल्वी सांगत होती, ती एका मल्टीनॅशनल कंपनीत एझिक्युटिव्ह पोस्टवर आहे. ‘‘असं बघा, माझे कामाचे तास फिक्स नसतात. शिफ्ट ड्यूटी असते. येण्याजाण्याच्या वेळाही अनिश्चित असतात. कधी रात्री यायला उशीर होतो तर कधी पहाटेच उठून मी फ्लाइट घेते. टूरही बरेचदा असतात. तुम्हाला हे सगळं चालेल ना?’’

‘‘काहीच हरकत नाहीए,’’ काकांनी परवानगी दिली.

‘‘मी आधी यासाठीच सगळं सांगतेय, कारण सध्या मी जिथं राहतेय त्यांना या सगळ्या गोष्टी चालत नाहीएत. मी रात्री उशीरा घरी येते म्हणजे माझं चारित्र्य वाईट असणार असं त्यांना वाटतंय…किती संकुचित विचार…छे!’’

पुढे काय झालं ते विनिताला कळलं नाही. ती आपल्या घरी निघून गेली. विनिताच्या मते पल्लवी खूपच आधुनिक आणि बिनधास्त होती.

त्या सायंकाळी निशांतला घरी यायला खूपच उशीर झाला. आल्या आल्या तो जेवला अन् लगेच झोपी गेला. त्यामुळे पल्लवीबद्दल विचारायला तिला जमलंच नाही. पुढल्या शनिवारी विनिता शॉपिंग वगैरे करून उशीरा घरी परतली. तेव्हा वरच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये दिवा लागलेला होता. बहुधा नवीन भाडेकरू आलेले दिसताहेत असा विचार करून ती वर गेली तर फ्लॅटला कुलूप होतं.

रात्री बारा वाजता घंटीच्या आवाजानं विनिताची झोप उघडली. तिनं निशांतला उठवून खाली बघून यायला सांगितलं…कदाचित काका काकूंना काही प्रॉब्लेम झाला असेल.

थोड्याच वेळात निशांत परत आला तर विनितानं विचारलं, ‘‘कोण होतं? काय झालं?’’

‘‘काकांची नवी भाडेकरू पल्लवी…’’

‘‘निशांत, तुला कुणी घरगुती, समजदार भाडेकरू नाही का मिळाला? आता ही अशीच वेळी अवेळी घंटी वाजवून त्रास देणार…काककाकू तर उद्या परवाच जाताहेत. त्यांच्या लेकांकडे…रहायचं आपल्याला आहे.’’ विनितानं म्हटलं.

निशांतला प्रचंड झोप येत होती. तो त्यावेळी वाद घालण्याच्या मन:स्थितीत नव्हता. फक्त इतकंच बोलला, ‘‘ती उच्चशिक्षित, नोकरी करणारी मुलगी आहे. केव्हा येते, केव्हा जाते याच्याशी आपल्याला काय करायचंय? आज पहिलाच दिवस आहे. जिन्याच्या दाराची किल्ली बरोबर न्यायला विसरली होती…’’ अन् तो पुन्हा ढाराढूर झोपी गेला.

विनिताला निशांतचं हे बोलणं अजिबात रूचलं नाही. पण तिला पल्लवीचा मात्र खूपच राग आला. विनिता तशी शांत, समजूतदार होती. निशांतला ऑफिसातून यायला उशीर झाला तरी ती कधी चिडचिड करत नसे उलट हसतमुखानं गरमागरम चहा करून देऊन त्याचा श्रमपरिहार करायची.

रविवारी सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. चहा करताना विनिताला पल्लवीची आठवण आली. तिनं निशांतला न विचारताच तिचाही चहा केला अन् वर देऊन आली. दारावर टकटक केली तेव्हा झोपाळू डोळ्यांनी पल्लवीनं दार अर्धवट उघडलं, चहा कप घेतला अन् थँक्स म्हणून दरवाजा लावून घेतला.

विनिता गोंधळली. दोन मिनिटं बोलावं एवढंही कळत नाही या बाईला. कदाचित तिच्या झोपेत व्यत्यय आला असेल. संपूर्ण दिवस घराचं दार बंदच होतं. सायंकाळी पल्लवी व्यवस्थित नटूनथटून खाली आली. चहाचा कप परत केला. पण विनिताशी बोलण्याऐवजी सगळा वेळ निशांतशीच गप्पा मारत होती. विहानशीही थोडी फार बोलली.

विनितानं विचारलं, ‘‘चहा करू का?’’ तर म्हणाली, ‘‘नको थँक्स!’’ मी चहा घेत नाही. विनिताच्या मनात आलं, ही बया नक्की दारू पित असणार. मग विनितानं म्हटलं, ‘‘स्वयंपाक घर लावून झालं का? स्वयंपाकासाठी काही मदत हवी आहे का?’’ पल्लवी फाडकन् उत्तरली, ‘‘छे छे स्वयंपाकाची भानगड मी नाही ठेवली. कोण करत बसेल एवढा?खटाटोप? उगाचच वेळ घालवायचा…मी बाहेरून मागवते किंवा बाहेरच जेवते.’’

थोड्याच वेळात ती कारमध्ये बसून निघून गेली. जाण्यापूर्वी निशांतला म्हणाली, ‘‘आज मी माझी किल्ली बरोबर ठेवली आहे बरं का निशांत…काळजी नको करूस.’’ यावर निशांत जोरात हसला अन् ती ही हसली.

रात्री झोपताना विनितानं म्हटलं, ‘‘शी गं बाई! कशी आहे ही पल्लवी…मुलींची म्हणून काही लक्षणं नाहीएत तिच्यात. सगळीच कामं पुरूषांसारखी करते. लग्न करून संसार कसा करणार ही? अशा मुलींचं सासरी पटतही नाही. नवरा त्रस्त असतो, नाहीतर डिव्होर्स तरी होतो.’’

हसून निशांतनं म्हटलं, ‘‘तिला स्वयंपाक करायला आवडत नाही, यात तिला नाव ठेवण्यासारखं काय आहे? ती किती धीट, स्मार्ट अन् हुशार आहे, हे का बघत नाही? ऑफिसच्या कामात परफेक्ट आहे. कुणावर अवलंबून नाही. हिचा नवरा दु:खी राहिल हे आपण कोण ठरवणार? ज्यांच्या बायका आजच्या काळातही घरातच राहतात, बाहेरचं कोणतंही काम करत नाही, वाहन चालवत नाहीत, प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असतात असे नवरेही दु:खी असू शकतात की! खरं तर बाई काय किंवा पुरूष काय बदलत्या काळानुरूप सर्वांनीच बदलायला हवं, नवे बदल स्वीकारले पाहिजेत.’’

विनिताला निशांतच्या बोलण्यातला टोमणा बरोबर समजला. ती स्वत: प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून असते. वाहन चालवता येत नाही…पल्ल्वीचं त्यानं इतकं कौतुक करणंही तिला खूप खटकलं. तिच्या मनानं तिला सावध केलं, ‘‘बघ हं विनिता, अशाच मुली दुसऱ्यांचे संसार उधळतात…जपून रहा. सध्या निशांत पल्लवीचं फारच कौतुक करतोय…’’

काकाकाकू अमेरिकेला जाऊन बरेच दिवस झाले होते. पल्लवी आपल्या कामांत अन् विनिता आपल्या आयुष्यात एकदम रमलेल्या होत्या. स्वत:च्याही नकळत विनिता पल्लवीवर, तिच्या येण्याजाण्यावर, कोण सोडायला येतं, कोण घ्यायला येतं, तिनं काय कपडे घातलेत वगैरे बारीक लक्ष ठेवून होती. हे पल्लवीलाही कळत होतं, पण त्याकडे ती जाणून बुजून दुर्लक्ष करत होती. कारण तिच्यामते विनितासारख्या हाऊस वाइफ्स्ना स्वयंपाक करणं अन् लोकांवर लक्ष ठेवणं या पलीकडे उद्योगच नसतो.

अशा तऱ्हेनं हाय, हॅलो होऊनही दोघींच्यात एक अदृश्य भिंत उभी होती. खरं म्हणजे दोघी स्त्रिया, एकाच वयाच्या, दोघीही शिक्षित, तरीही दोघींच्या विचारसरणीत, संस्कारात खूपच म्हणजे टोकाचा फरक होता. एकीसाठी नवरा, संसार, मुलगा हेच सगळं जग होतं तर दुसरीसाठी घर ही फक्त झोपण्यासाठी अन् राहण्याची सोय एवढंच महत्त्व होतं.

एकदा विनिताच्या लक्षात आलं की चोवीस तासांपेक्षाही अधिक वेळ लोटला होता, पण पल्लवी कुठं जाता येताना दिसली नाही. पण मग विचार केला कदाचित टूरवर गेली असेल, जावं लागतं तिला किंवा नसेल बाहेर जावसं वाटलं. तर स्मार्ट मॅडम घरातच विश्रांती घेत असतील. पण तरीही राहवेना तेव्हा विहानला म्हणाली, ‘‘जा, वर जाऊन पल्लवी आंटीबरोबर खेळून ये थोडावेळ.’’ विहान वर गेला अन् लगेचच धावत खाली आला. ‘‘मम्मा, अगं आंटी झोपून आहे, तिला ताप आलाय.’’

हे ऐकताच हातातलं काम सोडून विनिता वर धावली. दारावरची घंटी दाबली. आतून क्षीण आवाज आला, ‘‘दार उघडंय.’’

विनिता दार ढकलून आत गेली. पल्लवी पलंगावर पांघरूण घेऊन अर्धवट ग्लानीत पडून होती. कपाळावर हात ठेवला तर चटकाच बसला. भरपूर ताप होता. विनितानं घरात नजर फिरवली. प्रचंड पसारा…एकही वस्तू जागेवर नव्हती. ती पटकन् खाली आली. थर्मामीटर, पाण्याचा बाहुल, दोन स्वच्छ रूमाल, फ्रीजमधली पाण्याची बाटली अन् यूडी केलनची बाटली घेऊन पुन्हा वर धावली. ताप बघितला, एकशे तीन…तिनं बाऊलमध्ये गार पाणी ओतलं त्यात यूडी केलनचे थेंब घातले अन् कपाळावर गार पाण्याच्या पट्टया ठेवायला सुरूवात केली. थोड्याच वेळात ताप कमी द्ब्राला. पल्लवीनं डोळे उघडले. तिला थोपटत विनितानं विचारलं, ‘‘औषध आहे का? गोळी वगैरे घेतली का?’’

पल्लवीनं खुणेनं शेल्फकडे खूण केली. तिथं गोळ्या होत्या. विनितानं खाली येऊन कपात दुध व दोनतीन बिस्किटं घेतली. पल्लवीला दोन बिस्किटं खायला घालून दूध घ्यायला लावलं अन् दोन गोळ्या दिल्या. दमलेली पल्लवी पुन्हा अंथरूणात आडवी झाली अन् तिनं डोळे मिटून घेतले. विनिता बराच वेळ हलक्या हातानं तिचं डोकं चेपत बसली होती. तिला गाढ झोप लागली तेव्हा विनिता आपल्या घरी आली. दोन तासांनी विनिता गरमागरम सूप अन् ताजे भाजलेले टोस्ट घेऊन वर गेली. अत्यंत प्रेमानं तिनं सूप अन् टोस्ट पल्लवीला घ्यायला लावले. पुढले चार दिवस विनितानं पल्लवीसाठी खूपच काही केलं. एखाद्या कुशल नर्सप्रमाणे तिची सेवा केली.

तिच्या त्या प्रेमळ, निस्वार्थ सेवेनं पल्लवी मनातल्या मनात शरमिंधा झाली होती. विनितासारख्या हाऊसवाईफ फक्त हेरगिरी करतात हे स्वत:चं विधान तिलाच खटकत होतं. योग्यवेळी विनितानं केलेल्य मदतीमुळेच पल्लवीचं आजारपण थोडक्यात आटोपलं होतं. ती मनातून खूपच कृतज्ञ होती.

यानंतर पल्लवीची वागणूक बदलली. आता ती विनिताशी मोकळेपणानं बोलायची. विनिताचं बघून तिनं आता आपलं घरही स्वच्छ अन् व्यवस्थित ठेवायला सुरूवात केली होती.

हल्ली तर निशांतचं काम अधिकच वाढलं होतं. एक दिवस तो ऑफिसातून घरी परतला तो अत्यंत आनंदात शीळ वाजवतच. विनितानं चहा केला. चहा घेता घेता तो सांगू लागला की त्याच्या कामावर कंपनी खुश आहे. त्याला एका ट्रेनिंगसाठी फ्रांसला पाठवते आहे कंपनी. जर ते ट्रेनिंग त्यानं उत्तमरित्या पूर्ण केलं तर दोन वर्षं कुटुंबासह त्याला फ्रान्समध्ये जॉब करायची संधी मिळेल.

परदेश गमनाची संधी हे ऐकून विनिताही आनंदली. पण ट्रेनिंगसाठी निशांतला एकट्यालाच जायचंय हे ऐकून ती एकदम दचकली. निशांतशिवाय ती एकटी कशी राहू शकेल? तिच्या सासरी किंवा माहेरी तिच्याजवळ येऊन राहण्यासारखं कुणीच नव्हतं. विनितानं स्वत:ला सावरत आधी त्याचं अभिनंदन केलं. मग हळूच म्हणाली, ‘‘जर तुम्हाला फ्रान्सला जायचंय, तर मला अन् विहानलाही घेऊन जा. मी तुम्हाला एकट्याला तर जाऊच देणार नाही. तुम्ही गेल्यावर तीन महिने मी विहानसोबत एकटी कशी राहणार याचा थोडा तरी विचार केलाय का तुम्ही?’’

भविष्यातली सोनेरी स्वप्नं रंगवत असलेल्या निशांतला विनिताचं हे बोलणं अजिबातच रूचलं नाही. तो एकदम भडकला. ‘‘तो तुझा प्रॉब्लेम आहे. माझा नाही. कधीपासून सांगतो, काळानुसार स्वत:ला बदल. वाहन चालवायला शिक, कॉम्प्युटर शिकून घे. घराबाहेरची कामं अंगावर घे. पण तू तर सगळी कामं पुरूषांची अन् बायकांची अशी वाटणीच करून टाकली आहेस. म्हणे आमच्याकडे अशीच पद्धत आहे…’’

‘‘इतके कष्ट करून आता ही सोन्यासारखी संधी हाती आली आहे तर तुझ्यासाठी ती संधी सोडून देऊ? नाही, अजिबात नाही. तुला एकटीला राहता येत नसेल तर विहानला घेऊन तू तुझ्या आईकडे जाऊन रहा किंवा माझ्या आईकडे जाऊन राहा. मोठ्या शहरात राहून तू, तुझे विचार बदलतील असं वाटलं होतं, पण तू थेट गावंढळच राहून गेलीस. कुठं नोकरीत उच्चपद मिळवताना आधार देणाऱ्या बायका असतात अन् कुठं अशा पाय मागे ओढणाऱ्या बायका…’’

चहाचा कप खाली ठेवून तो उठला अन् टॉवेल घेऊन वॉशरूममध्ये शिरला. विनिताच्या डोळ्यात पाणीच आलं. तिचा इतका सुंदर मांडलेला संसार मोडणार की काय? पण निशांत तरी काय करणार? मोठी कंपनी, मोठा हुद्दा, परदेशवारी, भरपूर पगार ही सगळी त्याची स्वप्नं होती अन् तो विनितालाही सतत नवं काही शिकण्यासाठी प्रोत्साहन देत होता. आपणच कमी पडलो…आपली चूक झाली हे विनिताला मान्य होतं.

आजच्या काळात गृहिणीलाही घराबाहेरचं जग माहीत असायला हवं. समर्थपणे घराबाहेरही वावरता आलं पाहिजे. इतक्या वर्षात प्रथमच विनिताला शिकलेली असूनही खूप खूप असहाय वाटलं. कारण ती फक्त घर एके घर एवढंच करत राहिली होती. इतकी मोठी संधी, असा आनंदाचा प्रसंग असूनही पतीपत्नीमध्ये विनाकारण ताण उत्पन्न झाला होता.

दुसऱ्या दिवशी चहा प्यायच्यावेळी पल्लवीही तिथं पोहोचली. आल्या आल्या तिनं अत्यंत उत्साहानं, आनंदानं निशांतचं अभिनंदन केलं आणि पार्टी पाहिजे म्हणून सांगितलं.

निशांतचा राग अजून शांत झाला नव्हता. तो थोडा कडवटपणे म्हणाला, ‘‘कशाची पार्टी अन् काय? मी या आयुष्यात काहीही करू शकणार नाही पल्लवी.’’

पल्लवीला काहीच समजेना…विनिताला वाटलं, या बिनधास्त पोरीला हे सगळं कळायला नको, ती तर माझी खूपच चेष्टा करेल…मला बावळट म्हणून खूप हसेल. पण निशांतनं रागारागात सगळी हकीगत, त्याचा प्रॉब्लेम, त्याची समस्या पल्लवीला सांगून टाकली.

विनिताला तर ही धरती दुभंगून आपल्याला पोटात घेईल तर बरं असं वाटत होतं. पण पल्लवीनं सगळं शांतपणे ऐकून घेतलं अन् मग हसायला लागली. हसता हसताच म्हणाली, ‘‘डोंट वरी निशांत, अहो ही काय समस्या आहे का? हा प्राब्लेम काही दिवसात सुटतोय बघा. तुम्ही तुमचं पॅकिंग अन् माझ्या पार्टीची तयारी सुरू करा.’’

चकित झालेला निशांत तिच्याकडे बघतच राहिला. विनिताकडे वळून पल्लवीनं म्हटलं, ‘‘विनिता नर्व्हस होऊ नकोस किंवा घाबरूनही जाऊ नकोस. आपल्याला अमुक एक करायचंच आहे, शिकायचंच आहे, हे एकदा ठरवलं ना की मग पुढ सगळं अगदी सोपं होतं. मी आजपासूनच तुला कॉम्प्युटरचे, इंटरनेटचे धडे देते. निशांत जाण्याआधी बाहेरचीही काही कामं तू करायला लागशील. ती जबाबदारी माझी, निशांत परत येण्यापूर्वीच तू कार चालवायला, स्कूटर चालवायलाही शिकणार आहेस…मी आलेच.’’ ती पटकन् वर निघून गेली.

विनिताही चकित झाली होती. ही बिनधास्त बाई, जिला ती दुसऱ्यांचे संसार मोडणारी समंजत होती, ती तर चक्क विनिताचा मोडणारा संसार साधायला मदत करतेय. इतकी जबाबदार अन् संवेदनशील आहे पल्लवी असा विचार तर विनितानं कधीच केला नव्हता.

पल्लवी येताना लॅपटॉप घेऊन आली होती. तो ऑन करत तिनं म्हटलं, ‘‘विनिता, मी तुझा गुरू आहे. हे सगळं मी तुला शिकवेन, पण तुलाही माझा गुरू व्हावं लागेल.’’

‘‘म्हणजे असं बघ, तुझा हा सुंदर संसार बघून मलाही आता लग्न करावं, घर मांडावं असं वाटायला लागलंय. पण अगं, घरातलं कोणंतही काम मला येत नाही. एखाद्या हाऊसवाईफसाठी जेवढं बाहेरचं जग जाणून घेणं गरजेचं आहे, तेवढंच नोकरी करणाऱ्या स्त्रीलाही घरातली कामं येणं गरजेचं आहे. आता आपण एकमेकींना जे येत नाही ते शिकवू म्हणजे झालोच ना गुरूशिष्य?’’ पल्लवीनं हसत म्हटलं.

‘‘खरंय,’’ अत्यंत कृतज्ञतेनं पल्लवीचे हात आपल्या हातात घेत विनितानं म्हटलं, ‘‘पण माझी एक अट आहे, आपलं हे नातं, स्टूडंट-टीचरचं, गुरूशिष्याचं नको…आपण पक्क्या मैत्रिणी होऊन हे काम करूयात.’’

‘‘एकदम मान्य!’’ पल्लवीनं म्हटलं. ‘‘अन् मिस्टर निशांत, तुम्हालाही किचनमध्ये काही धडे गिरवावे लागतील. फ्रान्समध्ये चहाचा कप घेऊन विनिता समोर येणार नाही. तेव्हा थोडी फार पोटपूजा करता येण्याइतपत तुमचीही तयारी असू दे…काय?’’

यावर तिघंही मनापासून हसले. वातावरण एकदम हलकंफुलकं अन् आनंदी झालं होतं.

विष प्राषी (अंतिम भाग)

दिर्घ कथा * राकेश भ्रमर

 

आत्तापर्यंत आपण वाचलंत :

व्यवसायानं आशीष डॉक्टर होता. नंदिता नावाच्या एका सुंदर, मोठ्या कंपनीत सीनिअर मॅनेजर असलेल्या मुलीशी त्याचं लग्नं झालं. पण लग्नानंतर नंदिता खुश नव्हती. पत्नी म्हणून तिनं आशीषला कधी समर्पण केलंच नाही. शरीरानं अन् मनानंही त्यांच्यात दुरावा होता. एक दिवस आशीषनं तिला खूप प्रयत्नांती बोलती केली. नंदितानं सांगितले की तिचं एका व्यक्तीवर प्रेम आहे. त्याच्यासाठी ती वेडी झाली आहे. आश्चर्य म्हणजे तो माणूस विवाहित आहे हे ही तिला माहित आहे. हे ऐकून आशीषला जबर धक्का बसला.

शेवटी नंदिताला त्यानं घटस्फोट दिला. नंतर त्यानं पुन्हा लग्न केलं ते दिव्याशी. प्रेमळ, सालस, समजूतदार दिव्याच्या सहवासात आठ वर्षं आशीष अत्यंत सुखात होता. त्यांचा मुलगा पाच वर्षांचा झाला होता. शाळेत जाऊ लागला होता.

दहा वर्षांनंतर अचानक एक दिवस नंदिता त्यांच्या क्लिनिकमध्ये भेटायला आली. तिने आपली कर्म कहाणी ऐकवली. स्वत:ची हीन, दीन, दयनीय परिस्थिती ऐकवली, स्वत:च्या वागणुकीबद्दल पुन:पुन्हा क्षमा मागितली अन् मदतीची याचनाही केली. कोमल हृदयाच्या आशीषनं माणुसकीच्या नात्यानं तिला मदत करण्याचा निर्णय घेतला.

तिला राहण्यासाठी फ्लॅट मिळवून दिला. नोकरीही मिळवून दिली. भरपूर पैसे त्यात खर्च झाले. खर्चाची आशीषला काळजी नव्हती. पण पत्नीपासून चोरून हे सर्व करण्याचा सल मनांत होता.

नोकरी मिळाल्याबद्दल तोंड गोड करायला घरी या असा नंदितानं वारंवार आग्रह केल्यामुळे आशीष तिच्या फ्लॅटवर गेला. नंदिता नटूनथटून त्याचीच वाट बघत होती…

पुढे वाचा…

 

नदिताचं सौंदर्य बघून आशीषला वाटलं, हे सौंदर्य खरं तर त्याच्या हक्काचं होतं. नंदितानं थोडं संयमानं, समजुतीनं घेतलं असतं तर तीही आज त्याचीच असती. पण आज ती त्याची नाही ही वस्तुस्थिती आहे, या क्षणी ती कुणाचीही नाही हे ही खरं आहे. ती स्वतंत्र आहे. कुणावरही ती प्रेम करू शकते, कुणाचीही ती प्रेमपात्र म्हणून निवड करू शकते.

‘‘या, या…मला खात्री होती तुम्ही यालंच.’’ ती लाडीकपणे म्हणाली. तिच्या चेहऱ्यापेक्षा तिची देहबोली अधिक चंचल होती. पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी ती तळमळत, तडफडत होती. आशीषच्या येण्याचा तिला खरंच आनंद झाला होता की ती मुद्दाम हे सगळं नाटक करत होती हे कळायला मार्ग नव्हता. ती इतकी मोकळेपणानं वागत होती. जणू आजही ती आशीषची बायको होती. त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता, दहा वर्षं त्यांनी एकमेकांना बघितलंही नव्हतं असं कुठंच जाणवत नव्हतं.

तिच्या त्या मनमोहक विभ्रमांमुळे आशीषही विचलित झाला. तो तरूण पुरूष होता. सुंदर स्त्रीचे चंचल मोहक विभ्रम कुणाही पुरूषाला भुरळ घालतातंच. त्यात अनैसर्गिक काहीच नाही. त्यातून नंदिता एकेकाळी त्याची पत्नी होती. तिचं शरीर त्यानं हाताळलं होतं…इतक्या वर्षांनी जेव्हा ते सौंदर्य स्त:हून समोर आलंय तेव्हा चित्त विचलित होणं स्वाभाविक होतं.

वरकरणी अगदी शांत चित्तानं आशीष, आत येऊन सोफ्यावर बसला. नंदितानं घर खूपच सुंदर मांडलं होतं. कलात्मकता अन् उच्च अभिरूची जाणवत होती. (अर्थात सर्व सामान आशीषनंच घेऊन दिलं होतं. पैसा त्यानंच खर्च केला होता.) नंदिताचा हा गुण त्याच्या संसारात त्याला कधीच जाणवला नव्हता. कारण त्यावेळी मनानं ती त्याच्या संसारात नव्हतीच. ती प्रजीतच्याच जगात रमलेली होती. आशीष, त्याचं घर, त्याचा संसार तिचा कधी नव्हताच!

चहा घेऊन आशीष उठला तेव्हा नंदितानं त्याचा हात धरून विचारलं, ‘‘कोणत्या शब्दात आभार मानू?’’ आशीषच्या अवघ्या झिणझिण्या आल्या. तो स्पर्श त्याला नकोसा वाटला नाही. या क्षणी तो स्पर्श हवासा अन् उत्तेजित करणारा होता. गेल्या दहा वर्षांत नंदिताचं फक्त वय वाढलं होतं…पण तिचं सौंदर्य आजही तेवढंच उन्मादक, टवटवीत अन् दिलखेचक होतं. कुणीही पुरूष घायाळ होईल असं तिचं सौंदर्य होतं.

झटक्यात आशीषनं हात सोडवून घेत कोरडेपणानं म्हटलं, ‘‘आभार मानायची गरज नाहीए, माणूसच माणसाची मदत करतो.’’

माणसाला सौंदर्य आवडतं. मग ते सौंदर्य आधी उपभोगलेलं असो की नवीन असो. त्याचा प्रभाव माणसाच्या देह मनांवर असतो. नंदिताचं सौंदर्य आशीषनं अनुभवलेलं होतं पण आज ती अगदी वेगळी अन् पूर्णपणे नवीन भासत होती. चुंबकासारखं आकर्षण होतं तिच्यात.

घरी येईपर्यंत आशीष शांतचित्त झाला होता. समोरच दिव्या वाट बघत काही काम करत बसली होती. आशीषनं तिच्याकडे निरखून बघितलं…ती ही सुंदर होती. टवटवीत अन् प्रसन्न दिसत होती. डॉक्टरची बायको म्हणून वावरताना आपली अदब अन् रूबाब राखून होती. पण तिचं सौंदर्य शालीन होतं.   समर्पणाची, जबाबदारीची जाणीव असणारं  होतं. नंदिताचं सौंदर्य चंचल अन् फुलपाखरी होतं.

नंदिताला त्यानं एक स्थिर आयुष्य दिलं होतं. त्याचं त्याला मानसिक समाधान होतं. पण त्याचा मोबदला म्हणून काही मागावं, घ्यावं असं त्याला मुळीच वाटत नव्हतं. तो तिला कधी फोनही करत नसे पण नंदिता मात्र दिवसाकाठी दोन तीनदा त्याला फोन लावायची. कधी तो उचलायचा कधी दुर्लक्ष करायचा. ती फोनवर गोड गोड बोलायची, जुन्या गोष्टी उकरून काढून पुन:पुन्हा क्षमा मागायची. पुन:पुन्हा जाणवून द्यायचा प्रयत्न करायची की ती त्याच्या ऋणांत आहे. त्या ऋणातून तिला मुक्त व्हायचं आहे. आशीष हसून तिचं बोलणं टाळायचा, दुर्लक्ष करायचा. त्याला तिच्याकडून काहीच नको होतं, हे तिला कळायला हवं होतं.

नंदिता रोजच त्याला आपली घरी बोलवायची. तिच्या आग्रहात इतकं आर्जव असायचं की नाही म्हणणं आशीषच्या जिवावर यायचं. दुसरं म्हणजे या शहरात ती एकटी आहे. तिच्या अजून ओळखी नाहीत. तिला आधाराची गरज आहे या भावनेनंही आशीष तिला नकार देऊन दुखवत नव्हता. चारपाच दिवसांनी एकदा तो तिच्याकडे जायचा. तिची बडबड ऐकायचा. तिनं केलेले काही तरी खाऊन, कधी चहा घेऊन घरी यायचा.

एक दिवस नंदिता त्याच्या शेजारी सोफ्यावर येऊन बसली. आशीष दचकला अन् थोडा बाजूला झाला. त्यानं अंग चोरून घेतलं.

हसून नंदितानं म्हटलं, ‘‘तुम्ही माझ्यापासून असे दूर दूर का असता? एके काळी मी तुमची पत्नी होते. अजूनही आपल्या नात्यात आपलेपणा आहे. मग असा दुरावा का?’’

कोरडेपणानं आशीष म्हणाला, ‘‘मी असा बरा आहे.’’

‘‘पण मी नाहीए.’’ ती अजून जवळ सरकली. ‘‘माझ्या मनांत अपराधीपणाची भावना आहे. मी तुम्हाला किती त्रास दिला, मनस्ताप दिला. पण तुम्ही ते सगळं अगदी सहजपणे सहन केलं. कधी मला रागावला नाहीत. मारझोड केली नाही, बळजबरी केली नाही, तरीही मला कळलं नाही की तुम्हाला त्रास देऊन मी अपराधीपणाच्या भावनेने होरपळत आहे. तुम्ही जर त्यावेळी कठोरपणे वागला असता, तर कदाचित तुम्हाला सोडून जाण्याची घोडचूक मी केली नसती. माझ्या या अपराधीपणाच्या भावनेतून मी कशी मुक्त होऊ?’’

आता यातून कसं मुक्त व्हायचं हा नंदिताचा प्रश्न होता, आशीष काय सांगणार? तिनं निर्णय घ्यायला हवा.

‘‘मी इथं तुमच्या माध्यमातून नोकरी मिळवायला आले नव्हते. सुखासीन, आनंदी आयुष्य जगण्यासाठी आले नव्हते. हे तर मला मुंबईतही करणं शक्य होतं. सोडलेली नोकरी परत धरता आली असती. नवी नोकरीही मिळवता आली असती. ते तेवढं अवघड नव्हतं.’’

आशीष दचकला. ती मनांतलं काहीतरी बोलत होती. म्हणजे तिला तसा प्रॉब्लेम, दु:ख किंवा अडचण नव्हतीच, ती फक्त त्याच्यासाठी इथं आली होती.

‘‘बरं तर, मग?’’जरा बेचैन होऊन आशीषनं विचारलं. खरं त्याला अजून बरंच काही विचारायचं होतं, पण त्यानं न विचारताही ती सगळं सांगेल हे त्याला ठाऊक होतं. तिचा स्वभाव चंचल होता, थोडा बालिश…मनांतलं सगळं बोलून टाकल्याखेरीज तिला चैन पडत नसे.

नंदितानं आपला हात त्याच्या डाव्या मांडीवर ठेवला. पण आपल्याच विचारात असलेल्या आशीषला ते जाणवलं नाही.

‘‘जोपर्यंत माणूस स्वत: दु:ख भोगत नाही, तोवर त्याला दुसऱ्याच्या दु:खाची कल्पना येत नाही. जेव्हा त्यानं मला नाकारलं, ठोकरलं, सोडून गेला तेव्हा मला जाणीव झाली…की मी तुम्हाला नाकारलं, तुमचा विश्वासघात करत होते तेव्हा तुम्हाला किती वेदना झाल्या असतील. माझ्या हृदयाच्या चिंधड्या झाल्या, मी कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची उरले नाही. त्यावेळी मनांत आलं, सरळ आत्महत्त्या करावी. आयुष्य संपवावं.

‘‘पण मग मनांत विचार आला, माझ्यामुळे तुम्ही इतकं दु:ख सहन केलं, विषाचा घोट पचवला, विषप्राशन करून विष प्राषी झालात, तर त्यानं दिलेलं विष मी का पचवू नये? मी ठरवलं, मी तुम्हाला भेटेन. तुम्ही मला क्षमा केलीत तर माझं दु:ख कमी होईल.

‘‘तुम्ही मला भेटलात. मला जाणवलं की तुमच्या निर्मळ मनांत माझ्याविषयी कडवटपणा नाहीए, त्यामुळे मला खूप बरं वाटलं. दु:ख कमी झालं. सुखाच्या सागरात डुंबल्यासारखं वाटतंय. मला आता जगावंसं वाटतंय. मला आता खूप काही मिळवायचं आहे, जे माझ्या मूर्खपणामुळे मी याआधी घालवून बसले.’’

आशीष गप्प बसून होता.

‘‘तुम्ही माझ्या अपराधांना क्षमा केली, माझं दु:ख दूर केलंत पण माझं प्रायश्चित्त अजून कुठं झालंय? ते व्हायचं आहे…’’

‘‘ते काय?’’ आशीषनं थेट नंदिताच्या डोळ्यात बघत विचारलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण खात्रीही होती की आशीष तिचं म्हणणं टाळणार नाही. अश्रूभरल्या डोळ्यांमधला आत्मविश्वास आशीषला चकित करून गेला.

भावना विवश होऊन नंदितानं त्याचे दोन्ही हात घट्ट धरले. ‘‘मला ठाऊक आहे, तुमचं मन फार मोठं आहे. म्हणूनच मी याचना करते आहे, मला प्राय:चित्त घेऊ द्या. आयुष्यभर तुमच्याबरोबर राहू द्या.’’

आशीषला जणू शॉक बसला. झटक्यात हात सोडवून घेत तो उठून उभा राहिला, ‘‘काय?’’

नंदिताही उठून उभी राहिली. ‘‘तुम्ही इतके दचकलात का? मी काही विचित्र नाही बोलले. या जगात किती तरी माणसं लग्नं न करता एकत्र राहतात. मी तर तुमची पूर्व पत्नीच आहे. माझा तुमच्यावर काहीही हक्क नाही पण मला माझं उर्वरित आयुष्य आता तुम्हालाच समर्पित करायचं आहे.’’

‘‘हे…हे कसं शक्य आहे?’’ आशीषला बोलणं सुधरेना.

‘‘सगळं काही शक्य आहे. फक्त मनाला समजवायला पाहिजे.’’

‘‘माझं लग्न झालंय. घरात पूर्ण समर्पित पत्नी आहे. लहान मुलगा आहे. तुझ्याबरोबर कसा राहणार मी?’’

‘‘मी दिलेल्या मनस्तापाचं, अपमानाचं विष प्यायलात अन् जगता आहात.    आता सुखाचा घोट घेऊन माझ्याबरोबर आनंदात राहा. मला तुमच्याकडून काहीही नको, संपत्ती, मुलंबाळं, कशावरही मी हक्क सांगणार नाही. मला फक्त तुम्ही हवे आहात. तुमची सोबत, सहवास हवाय…तुम्हाला समर्पित व्हायचंय…’’

आशीषला गरगरायला लागलं. तो स्वत: डॉक्टर होता. विचारी होता. कठिण आणि प्रतिकूल परिस्थितीतही कधी तो डगमगत नसे. नंदिताच्या दुसऱ्या पुरूषाबरोबरच्या संबंधांविषयी समजलं तेव्हाही तो एवढा भांबावला नव्हता. त्याही परिस्थितीतून त्यानं मार्ग काढला पण आज त्याला काही कळेनासं झालं होतं.

नंदिताला जे हवंय, ते कधीच शक्य नाही. निदान त्याच्यासाठी तरी ते अशक्यच होतं. एकदा विषाची चव चाखली होती. दुसऱ्यांदा ती विषपरीक्षा नको. उघड्या डोळ्यांनी, जाणूनबुजून तर नकोच नको…

नंदिता त्याला चिकटून उभी होती. तिनं त्याला मिठी घातली, ‘‘इकडे बघा, नाही म्हणू नका,  मी खूप आशेनं तुमच्याकडे आले आहे. इथं येण्याचा एकमेव उद्देश जन्मभर तुमची सेवा करणं हाच होता. हे करूनच मी आपल्या चुका सुधारू शकेन. माझ्या पापाचं प्रायश्चित्त घेऊ शकेन.’’

‘‘तुमच्या खेरीज दुसऱ्या कुणालाच मी समर्पित होऊ शकत नाही. तुम्ही मला स्वीकारलं नाहीत तर जन्मभर मी अविवाहित राहीन. तुमचीच वाट बघेन.’’ तिच्या आवाजात विवशता, असहायता होती. जर आशीषनं तिला आधार दिला नाही तर ती मोडून पडेल… पण. आशीषवर कशाचाच परिणाम झाला नाही.   मात्र त्याच्या डोक्याच्या शिरा तडकताहेत असं त्याला वाटलं. चारी बाजूला बॉम्बस्फोट होताहेत अन् सगळं उद्ध्वस्त होतंय असं त्याला वाटलं.

गडबडीनं नंदिताला दूर सारून तो दाराकडे जायला निघाला. पुन्हा नंदितानं त्याचे हात धरले.

‘‘तुम्ही जाताय, तर मी तुम्हाला अडवणार नाही. मात्र मी तुमची वाट बघेन. तुमची प्रतीक्षा करेन. याच शहरात राहीन…तुमचा निर्णय कळवा.’’

काही न बोलता आशीष घराबाहेर आला. साऱ्या शहराची वीज गेल्यासारखा सगळीकडे अंधार होता. मात्र काही घरातून दिवे जळंत होते, रस्ते अंधारात बुडाले होते. आशीषला असं वाटत होतं हे रस्ते म्हणजे अंधाऱ्या गुहा आहेत. त्यातून तो मार्ग काढतोय.

त्याला समजंत नव्हतं. हे असं का घडतंय? तो कधीच कुणासा त्रास देत नाही पण त्याला मात्र त्रास सोसावा लागतो. दु:ख सहन करतोय म्हणजे दु:खाला आमंत्रण थोडीच देतोय?

कशी त्यानं नंदिताच्या बिल्डिंगच्या बाहेर उभी असलेली गाडी स्टार्ट केली, कधी ती मुख्य रस्त्यावर आणली, कधी गाडी त्याच्या घराच्या वाटेवर धावू लागली, त्याला काही कळंत नव्हतं. शरीराला कंप सुटला होता. पण हातपाय काम करत होते. मेंदू बधीर झाला होता. पण दुसरं कुणी तरी सूचना देत असल्याप्रमाणे आशीषच्या योग्य त्या हालचाली होत होत्या अन् गाडी योग्य मार्गावर चालली होती.

गाडी चालवताना समोरून येणाऱ्या गाड्यांच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यांवर येत होता. डोळे दिपत होते. पुन्हा पुन्हा डोळे उघडून मिटून आशीष समोर बघत होता.

किती वेळ असा गेला कुणास ठाऊक. पण गाडी त्याच्या घराजवळ आली तेव्हा शरीराचा कंप थांबला होता. मेंदू तरतरीत झाला होता. मनावर ताबा आला होता मात्र मघा नंदिनीच्या घरी घडलेल्या प्रसंगाचा ताण चेहऱ्यावर दिसत होता. अजून त्या वादळाच्या खुणा शिल्लक होत्या.

गाडी गॅरेजमध्ये लावून आशीष घरात आला. या क्षणी दिव्याशी भेट होऊ नये असं त्याला वाटत होतं. पण ती त्याचीच वाट बघत होती. रात्र बरीच झाली होती. मुलगा झोपी गेला होता. दिव्याला त्याची वाट बघण्याशिवाय दुसरं कामंच नव्हतं. घरात प्रवेश करणाऱ्या आशीषचा थकलेला चेहरा बघून ती पटकन् उठली. त्याला आधार देत तिनं सोफ्यावर बसवलं. ‘‘किती दमलाय तुम्ही,’’ ती मायेनं म्हणाली.

आवाजातली काळजी आशीषला सुखावून गेली. आशीषनं एकदा तिच्याकडे बघितलं अन् सोफ्याच्या पाठीवर डोकं टेकून डोळे मिटून घेतले.

दिव्यानं पट्कन लिंबाचं मधुर सरबत आणलं, ग्लास त्याच्या ओठाशी लावून म्हणाली, ‘‘किती दमता तुम्ही, इतकं काम नका करत जाऊ. पेशंट तर येतच असतात. पण त्यावर थोडं नियंत्रण नको का? अतिश्रमानं तुम्ही आजारी पडलात तर मग पेशंटची काळजी कोण घेणार? तुम्ही आनंदी, तरतरीत तर आम्ही ही सुखी आणि आनंदी. यामुळे कामं कमी करायची.’’ तिच्या स्वरातली काळजी अन् अधिकार आशीषला सुखावून गेला. तिच्या स्पर्शानं त्याला खूप बरं वाटलं.

‘‘किती उतरलाय चेहरा…चला थोडं खाऊन घ्या. रात्री पाय चेपून देते. शांत झोपा. उद्या बरं वाटेल.’’ दिव्यानं म्हटलं.

आशीषला डोळे उघडायला होत नव्हते. दिव्याचा शब्द न शब्द कानांत शिरत होता. समजंत होते पण डोळे उघडावेसे वाटत नव्हते. तिला बिचारीला कुठं ठाऊक होतं की तिचा नवरा आत्ता केवढ्या मोठ्या वादळात सापडला होता. त्यातून सही सलामत बाहेर पडू शकला हेच खूप झालं. आशीष हे सगळं दिव्याला सांगणारही नव्हता. तिनं प्रेमानं जोपासलेला श्रद्धेनं जोपासलेला तिचा सुखी संसार असाच अभंग रहायला हवा. तिचा आनंद हिरावता कामा नये.

दिव्यानं त्याला कधीच दुखवलं नव्हतं. कधी त्यांचे मतभेद झाले नव्हते. या प्रकरणांत दिव्याचा काहीच संबंध नव्हता. दुसऱ्या कुणाच्या कृत्याची शिक्षा तिला कशाला? जे विष तो प्यायला होता त्याचा एक थेंबही तो दिव्याला देणार नव्हता. हे विष अजून किती छळणार होतं कुणास टाऊक?

ती रात्र सरली. सकाळी सगळं आलबेल होतं, आशीषलाही खूप बरं वाटत होतं. शांतपणे उठून त्यानं दैनंदिन कामं आटोपली. मनांतल्या मनांत काही योजना तयार झाली होती. आज सगळ्याचा निकाल लावायचा. काहीच अधांतरी नको राहायला.

दिव्या स्वयंपाकघरात होती. स्नान आटोपून आशीष बैठकीच्या खोलीत आला. मोबाइल बघितलाच नव्हता. खूप खूप मेसेजेस होते. एक मेसेज नंदिताचा होता. ‘‘तुम्ही व्यवस्थित घरी पोहोचलात ना? मला तुमची काळजी वाटते?’’

त्यानं उत्तर लिहिलं, ‘‘मी उत्तम आहे. तू ही तशीच असशील, नंदिता. मी आयुष्यात भरपूर विष प्यायलो आहे. कुणामुळे ते तू जाणतेस. तुला एकच सांगतो, आता यापुढे माझी विष प्राषनाची शक्ती संपली आहे. एक थेंबही विष मी पचवू शकणार नाही. मला आता शांतपणे जगायचं आहे. माझ्या मुलावर, बायकोवर, संसारावर माझं प्रेम आहे. त्यांच्यावर अन्याय करणं मला मान्य नाही. कारण मला आयुष्य जगायचं बळ त्यांनीच दिलं आहे. तुलाही सल्ला देतो,    आता इकडे तिकडे धावणं, भटकणं बंद कर, चांगला जोडीदार शोधून लग्न कर,  सुखाचा संसार कर. यापुढे मला भेटण्याचा प्रयत्नही करू नकोस. फोन, मेसेज काहीही करू नकोस.’’

नंदिताला मेसेज पाठवल्यावर आशीषला एकदम हलकं वाटलं. आता त्याच्या मनांत शंका, कुशंका, पूर्वग्रह, काळजी, वेदना अगदी काही म्हणता काही नव्हतं. त्याला आतून जाणवलं की गेली दहा वर्षं जो विषघट त्याच्या मनांत सतत थेंब थेंब झिरपत होता तो एकाएकी फुटून सगळं विष वाहून गेलंय. आता तो विषमुक्त झाला आहे.

आतून बाहेर येत दिव्यानं म्हटलं, ‘‘नाश्ता तयार आहे. येताय ना?’’

त्यानं तिच्याकडे बघितलं, स्नान आटोपून ती अगदी ताजीतवानी दिसत होती. नटलेली नव्हती तरीही तिचं सात्विक सोज्वळ रूप अन् चेहऱ्यावरचं स्निग्ध हसू मोहात पाडत होतं. हा मधुपट जवळ असताना आता त्याला कुणाची भीती वाटत नव्हती. खुषीत येऊन त्यानं शीळ घातली अन् तो डायनिंग टेबलपाशी येऊन बसला.

                                                                           – समाप्त

सांझ की दुलहन – पहिला भाग

दिर्घ कथा * मीना गोगावले

(पहिला भाग)

‘‘कहीं दूर जब दिन ढल जाए, सांझ की दुलहन बदन चुराए, चुपके से आए, मेरे खयालों के आंगन में…’’ गाणं गुणगुणतच राजन बाथरूममधून बाहेर आला अन् म्हणाला, ‘‘वहिनी, माझा ब्रेकफास्ट…मला लवकर जायचंय आज.’’

त्याच्याकडे बघत हसून राधिकेनं म्हटलं, ‘‘काय भाऊजी? विशेष खुशीत दिसताय?

हल्ली रोजच ‘सांझ की दुलहन’ आठवतेय तुम्हाला?’’

‘‘काही नाही गं, रेडियोवर ऐकलं अन् सहज गुणगुणलो.’’

‘‘एखादं गाणं गुणगुणावसं वाटतं त्याचं काय कारण असतं माहीत आहे?’’

‘‘मला नाही माहीत,’’ काहीशा बेपवाईनं राजननं उत्तर दिलं.

‘‘याचा अर्थ असा की गाण्याचे शब्द तुमच्या हृदयात खोलवर झिरपले आहेत. एखादं गाणं जेव्हा नकळत ओठांवर येतं, तेव्हा मनात ती प्रतिमा आधीच तयार झालेली असते.’’

‘‘काही तरीच काय वहिनी…तू ही ना…’’

‘‘ऑफिसात कुणी बघून ठेवली आहे का? असेल तर मला सांगा, मी सांगते तुमच्या दादांना. ठरवून टाकूयात लग्न.’’

‘‘नाहीए गं कुणी, असती तर सांगितलंच असतं ना?’’

‘‘खरं?’’

‘‘अगदी खरं!’’ हसून राजननं म्हटलं अन् तिच्याकडे बघत म्हणाला, ‘‘एक सांगू?’’

‘‘सांग ना.’’

‘‘वहिनी, मला ना, सांझ की दुलहनच पाहिजे.’’

‘‘आता ती कशी असते बाई? आम्ही तर अशी कुणी नवरी बघितलीच नाहीए?’’

‘‘खूप खूप सुंदर! उतरून येणाऱ्या सायंकाळसारखी शांत, सर्व प्रकाश आपल्यात समावून घेतलेली, डोंगरामागे दडणाऱ्या सूर्याच्या सावळ्या प्रकाशासारखी, पानांमधून डोकावणाऱ्या कवडशांसारखी, रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशासारखी, डोळ्यातल्या स्वप्नासारखी…अतिशय सुंदर…!!’’

‘‘म्हणजे थोडक्यात तुम्हाला कवितेशी लग्न करायचंय.’’

‘‘कविता नाही वहिनी. ती प्रत्यक्षात असणार आहे. जशी सोनेरी गुळाबी संध्याकाळ स्वप्नातली असूनही प्रत्यक्षात असतेच ना? मला तिच हवीय, हुंडा नाही, मानपान नाही, काही नको.’’

‘‘म्हणजे तुम्ही शोधताय?’’

‘‘नाही, अजून तसं काहीच नाही.’’

‘‘मग?’’

‘‘आता तर फक्त मिटल्या डोळ्यातून डोकावते.’’

‘‘असं  मग काय म्हणते? सांगा की…’’

‘‘काही नाही. फक्त येते अन् जाते, उद्या येते एवढं वचन देते.’’

‘‘भाऊजी, स्वप्नं बघायला लागलात…चांगला संकेत आहे. बाबांना सांगते,’’

नाश्त्याची बशी त्याच्या हातात देत राधिका हसून बोलली.

राधिकेचा दीर राजन खूपच संवेदनशील, अतिशय सज्जन, मनाचा निर्मळ अन् खूप प्रेमळ. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा. सगळ्या सोसायटीत राजनदादा म्हणून प्रसिद्ध. कॉलनीतले सगळेच त्याच्या ओळखीचे. वाटेत चालताना, भेटलेल्या कोणी, आजही अडचण सांगितली की राजननं त्याला मदत केलीच म्हणून समजा. अन् वर सहजपणे म्हणेल, ‘‘त्याला गरज होती, मी मदत करू शकत होतो…केली!’’

‘‘असे बरे भेटतात तुम्हाला चालता चालता?’’ राधिका म्हणायची.

‘‘भेटतात खरे!’’

‘‘भाऊजी मग ‘ती’ का नाही भेटत?’’

‘‘ती अशी नाही भेटायची वहिनी.’’

‘‘मग कशी भेटायची?’’

‘‘त्यासाठी तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. चालता चालता साधी सामान्य माणसं भेटतात. पण वहिनी, ‘ती’? ती स्पेशल आहे ना?’’

इतके दिवस सगळे त्रस्त होते. राजन लग्नाला होकात देत नव्हता. लग्न करणारच नाही म्हणायचा. पण आज मात्र त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितली होती.

राजन ऑफिसला निघून गेला अन् राधिका विचार करू लागली की इतका निर्मळ मनाचा अन् भाबडा आहे हा मुलगा, त्याला हवंय तसं पवित्र सौंदर्य आजच्या काळात असेल का? कुठं अन् कशी शोधावी त्याच्या आवडीची ‘सांझ की दुलहन’?

तेवढ्यात तिचा नवरा शिबू खोलीतून बाहेर आला. ‘‘कसला विचार करतेस?’’ त्यानं विचारलं.

‘‘इतकी सुंदर अन् पवित्र कुठं मिळेल?’’

‘‘काय घ्यायचंय तुला? कसली खरेदी?’’

‘‘भाऊजींसाठी नवरी…सांझ की दुलहन’’

‘‘उगीच चेष्टा करू नकोस.’’

‘‘अहो, एवढ्यात सांगून गेलेत, त्यांना कशी नवरी हवी आहे ती. स्वप्नातल्या सांजवेळेसारखी सुंदर, आज तर तुमचा भाऊ अगदी कवीच झाला होता.’’

‘‘भाऊ कुणाचा आहे? अन् लाडका दीर कुणाचा आहे?’’ राधिकेकडे हसून बघत शिबूनं म्हटलं, ‘‘चला, काही तरी बोलला एकदाचा.’’

‘‘काहीतरी नाही, बरंच बोललेत.’’

‘‘तर मग शोध ना जे काही हवंय त्याला ते.’’

‘‘कुठून आणायची अशी परी? तिचे चोचले असणार? ते कुणी पुरवायचे?’’

‘‘दीर भावजय आहेत ना चोचले पुरवायला. त्यानं बघून ठेवलीय का?’’

‘‘नाही.’’

‘‘मग?’’

‘‘अजून कल्पनेतच आहे. पण ती प्रत्यक्षात येईल म्हणालेत.’’

‘‘मग एखाद्या कवीला गाठा, कविता लिहून घ्या अन् द्या त्याला दुलहन म्हणून.’’

‘‘अहो पण निदान आता लग्नाला होकार तरी दिलाय ना? प्रयत्न करायलाच हवेत.’’

‘‘तर मग करा प्रयत्न. येडाच आहे…मी निघालो कामावर?’’ अन् शिबू निघून गेला. हा आणखी एक येडा. सतत काम काम. थांबायचं नाव नाही. सतत उंच आकाशात भराऱ्या जमीनीवर येणं ठाऊकच नाही. कुणी अडवणारं नव्हतं. शिबूनं आपल्या कामाचा पसारा एवढा वाढवालाय की आता त्याला स्वत:साठी वेळ देता येत नाहीए.

राधिका त्या उंच उडणाऱ्या पक्ष्याकडे बघत होती. आता कधी तरी रात्रीच तो खूप उशिरा घरी परतणार…सायंकाळी परतणारे पक्षी वेगळेच असतात. शिबू चांगला होता, पण बायकोची काळजी घेणं त्याला जमत नव्हतं. त्याचा तो पिंडच नव्हता.

तेवढ्यात बाहेरून सासरे म्हणाले, ‘‘सूनबाई, दूधवाला आलाय.’’

‘‘हो बाबा…’’ तत्परतेनं पातेलं घेऊन राधिका बाहेर धावली. दूध घेतलं अन् म्हणाली, ‘‘बाबा, तुम्हीही नाश्ता करून घ्या.’’

‘‘मांड टेबलवर, आलोच.’’

त्यांना वाढता वाढता राधिकेनं म्हटलं, ‘‘बाबा, एक सांगायचं होतं…’’

‘‘बोल ना?’’

‘‘राजन भाऊजी लग्न करायला तयार झालेत.’’

‘‘अरे व्वा! कशी हवीये मुलगी?’’

‘‘खूप खूप सुंदर हवी आहे.’’

‘‘एवढंच ना? अगं वाटेल तेवढ्या सुंदर मुली आहेत. त्यानं फक्त पसंत करावी, बार उडवून देऊ. सूनबाई, तू ही आघाडी सांभाळ. मी ती सांभाळतो.’’ बाबांनाही एकदम उत्साह आला होता.

‘‘कधीपासून दुसऱ्या सुनेची वाट बघत होतो शिवाय…’’

‘‘शिवाय काय बाबा?’’

बाबा काहीच बोलले नाहीत.

राधिकाला कळत होतं. तिच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती. अजून घरात बाळाची चाहूल लागली नव्हती. बाबांची तिच खंत होती.

बाबांकडे एक नातलग आले होते. ते म्हणाले, ‘‘अहो, मुलगी तुम्ही बघा, होकार द्यालच. एकदा त्यांच्या घरी जाऊन या.’’

बाबांनी त्या नातलगानं दिलेली माहिती राधिकेला दिली. राधिका सगळ्या घरादाराची काळजी घेते. सगळ्यांना आनंद वाटावा म्हणून झपाटते. तिच्या मनांत शंका आली. राजन खूपच भाबडा आहे अन् ही मुलगी हॉस्टेलला राहिलेली. घरात जमवून घेईल का?

रात्री उशिरा शिबू आल्यावर तिनं विषय काढला.

शिबूनं समजूत काढली, ‘‘होस्टेलला राहणारी प्रत्येक मुलगी लवंगी मिरची नसते गं! स्मार्ट असेल, कारण तिथलं वातावरणच तसं असतं…तू काळजी करू नकोस.’’

बाबांनी फर्मान काढलं, ‘‘आज सगळे अमुक अमुक ठिकाणी जाणार आहेत. राजन, तुलाही यावं लागेल.’’

राजननं काहीही न विचारता ‘हो’ म्हटलं. ‘खरंच किती साधा आहे, कुठं जाणार, कशाला जाणार एवढंही विचारलं नाही,’ राधिकेच्या मनात आलं.

त्यांच्या घरी गेले. मुलगी समोर आली…खरोखरच अप्रतिम लावण्य होतं. बघताच राधिका म्हणाली, ‘‘भाऊजी, सांझ की दुलहन, हीच आहे.’’

हसून राजननं संमती दिली.

इतर काही ठरवायचं नव्हतंच. पण बाबांनी ठामपणे एवढं मात्र सांगितलं, ‘‘आम्हाला काहीही नको, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, त्याचा राग मानू नये. आमच्या घरात मोठी सून आहे. सगळं घर ती कौशल्याने सांभाळते. तिच्यामुळेच घरात शांतता, सौख्य, समाधान अन् आनंद आहे. नव्या सुनेनं ते सौख्य, तो आनंद, समाधान कायम ठेवावं.’’

राधिका विचार करत होती, या सुंदरीनं स्वत:च्या हातानं कधी ग्लासभर पाणीही घेतलं नसेल…किती नाजूक आहे ही…नखशिखांत सौंदर्य आहे.

घरी आल्यावर एकदाच राधिकेनं म्हटलं, ‘‘एवढं हे सौंदर्य, हे लावण्य आपण सांभाळू शकू? ती छान काम करेल?’’

‘‘नाही केलं तर आपण करू,’’ सहजपणे राजन उद्गारला.

‘‘तिचे नखरे, कोडकौतुक, चोचले झेपतील आपल्याला?’’

‘‘मी करेन ना सर्व,’’ राजन म्हणाला.

शिबूनं म्हटलं, ‘‘राधिका, नको काळजी करूस.’’

बाबांनीही म्हटलं, ‘‘सूनबाई, सगळं राजनवर सोपव. ती अन् तो बघून घेतील.’’

दिवसभर कामानं क्षीणलेली राधिका अंथरूणावर पडली, पण झोप लागत नव्हती. एकच गोष्ट मनात येत होती, राजन फार सरळ मनाचा अन् भाबडा आहे. ही सुंदरी त्याला समजून?घेईल का?

लग्नघरात जोरात तयारी सुरू झाली. राधिकेलाच सगळं बघायचं होतं. प्रत्येक जण तिलाच हाक मारायचा. पायाला चक्र लावून ती फिरत होती. नवरानवरीच्या पोषाखाबद्दल चर्चा झाली.

बाबांना गंमत वाटायची. ते म्हणायचे, ‘‘मॉडर्न युग आहे, चालू द्या.’’

नवरीच्या साड्या खरेदी केल्यावर राजननं राधिकेला विचारलं, ‘‘वहिनी, तुझी साडी मी पसंत करू की दादा करेल?’’

‘‘तुमच्या दादानं यापूर्वी कधी काही पसंत केलं होतं तर आत्ता करतील?’’ राधिकेनं म्हटलं. तिच्या मनात आलं की शिबूनं तर एवढ्या वर्षांत कधी म्हटलं नाही की ही साडी तुला शोभून दिसतेय की या साडीत तू किती सुंदर दिसतेस…आतासुद्धा त्याला खरेदीला चल म्हटलं तर ‘‘तुम्हीच जा’’ म्हणाला अन् कामावर निघून गेला. नकळत तिचे डोळे पाणावले.

‘‘वहिनी, काय झालं?’’

‘‘काही नाही…चला माझी साडी निवडूयात.’’

दुकानदारानं बऱ्याच साड्या दाखवल्या, जरीची सुंदर काळी साडी राजननं निवडली.

‘‘नाही भाऊजी, लग्नात काळा रंग अशुभ मानतात.’’

‘‘कुणी सांगितलं?’’

दुकानदारही म्हणाला, ‘‘मॅडम हा रंग तर सध्या फॅशनमध्ये आहे. तुमच्या गोऱ्या रंगावर ती खूप खुलून दिसेल.’’

शेवटी एक काळी अन् एक हिरवीगार अशा दोन साड्या राजननं वहिनीसाठी खरेदी केल्या.

घरी परतताना राजन म्हणाला, ‘‘तुझं दु:ख मला कळतंय वहिनी. मी मात्र सुंदरीला सुखात ठेवणार आहे. तिच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत हे मी बघेन अन् आलेच अश्रू तर ओठांनी टिपून घेईन.’’

‘‘भाऊजी, तुम्ही खरोखर खूप चांगले आहेत.’’ उदास हसून राधिका म्हणाली.

‘‘वहिनी, तिला एकदा घरात येऊ दे, ती तुझी मैत्रीण म्हणूनच वागेल. तू तिची थोरली ताई असशील.’’

राधिकेला तर आता त्या संध्यासुंदरीचा हेवाच वाटायला लागला. पण ती खुशीत होती. घर पाहुण्यांनी गजबजलं होतं. सगळे राधिकेच्या व्यवस्थापनाचं कौतुक करत होते. त्यामुळे ती सुखावली होती. थोरली जाऊ म्हणून कामं करत मिरवतही होती. बाबांनी तीन दिवस सतत सनई चौघडा लावला होता. सनईच्या सुरातच नव्या सुनेनं उंबरठ्यावरचं तांदळाचं माप ओलांडून घरात प्रवेश केला. कुणीतरी म्हणालं, ‘‘सूनबाई तांदूळ उधळेल अन् राजननं ते गोळा करायचे.’’

राधिकेच्या मनात आलं तिला आधीच सांगायला हवं होतं, माप हळूच ढकलं…पण तो बोलली नाही.

काही दिवसातच राधिकेच्या मनातली शंका खरी ठरली. सुंदरी खरोखर राणीच होती. सकाळी दहा वाजता झोपून उठायची. बाबांना चोरून राजन तिला चहा करून द्यायचा.

बाबांनी सुंदरीला म्हटलं, ‘‘राधिकेला घरकामात मदत करत जा,’’ तरी ती असहाय्यपणे म्हणाली, ‘‘मला येत नाहीत कामं करायला…मी कशी करू? काही बिघडलं तर?’’

राधिकानं बाबांना सांगितलं, ‘‘असू देत बाबा, ती झोपूनच उठते किती उशीरा.’’

तिचं स्वर्गीय सौंदर्य कोमेजून जाऊ नये म्हणून राधिका तिला स्वयंपाकघरात येऊच देत नसे. तिच्या ते पथ्यावरच पडायचं. तिचे सगळे नखरे राधिका सहन करत होती.

सुंदरी घरात आल्यावर राधिकेला मैत्रीण मिळाली नाही, उलट ती अधिकच एकटी झाली. कारण आता राजनही सतत सुंदरीभोवती असायचा. पूर्वी राधिका आपलं सुखदु:ख त्याच्याजवळ बोलायची. स्वयंपाकघरात ती काम करत असताना तो तिच्याबरोबर गप्पा मारायचा. पण आता तो सुंदरीजवळ असायचा. आपलं सगळं वागणं राधिका सहन करते, तिच्या चुकाही ती सावरून घेते. तिला कधी कुणासमोर उघडं पडू देत नाही हे सुंदरीच्या लक्षात आलं होतं. त्याचा ती पुरेपूर फायदा घेत होती. घरातलं वातावरण बिघडत होतं. राधिका जिवाचा आटापिटा करून सगळं सांभाळत होती. वातावरण आनंदी राहावं म्हणून प्रयत्न करत होती. पण सुंदरीनं जणू घरातली शांतता भंग करण्याचा, घरातले नियम, मर्यादा मोडण्याचा चंगच बांधला होता. रोज मैत्रिणीबरोबर पार्टीला जायचं.

एक दिवस बाबांनी यावर आक्षेप घेतला.

‘‘मी करते त्यात वाईट काय आहे? माझ्या मैत्रीणींबरोबरच असते ना?’’ तिनं बाबांनाच उलट विचारलं.

‘‘राजनला विचारत जा.’’

राजननं हो म्हटलं.

तिचा घराबाहेर राहण्याचा वेळ वाढत होता. बाबांनी म्हटलं, ‘‘राजन, अरे इतकी सूट देणं किंवा तिनं एवढं स्वैरपणे वागणं बरोबर नाही. शेवटी ती घरातली सून आहे. तुझी वहिनीही आहे ना घरात? ती कधी अशी वागली नाही.’’

‘‘ठिक आहे बाबा, तिच्या मैत्रिणीबरोबरच जाते ना? तुम्ही नका टेंशन घेऊ…मी आहे?’’

‘‘तुला ठाऊक आहे का, यावेळी होस्टेलची मुलंही बरोबर आहेत?’’ बाबा जरा रागानंच म्हणाले.

पहिल्यांदाच, आयुष्यात पहिल्यांदाच राजननं बाबांना प्रत्युत्तर दिलं, ‘‘बाबा, ती होस्टेलमध्ये राहून शिकली आहे. मोकळ्या वातावरणात वाढली, वावरली आहे. तिला एकदम कसं नको म्हणू? हळूहळू समजेल तिला. मी समजावेन.’’

बाबा बोलले नाहीत. पण ते दुखावले गेले आहेत हे राधिकेच्या लक्षात आलं.

चहाचा कप घेऊन ती बाबांजवळ आली. कोमलपणे म्हणाली, ‘‘बाबा, सध्या नवी आहे ती. एखादं बाळ झालं की आपसूक घरात राहील. बघा तुम्ही…’’ तिनं चहाचा कप बाबांच्या हातात दिला. दोघंही एकमेकांकडे बघून हसली.          (क्रमश:)

विष प्राषी- (भाग- 1)

दिर्घ कथा * राकेश भ्रमर

एखाद्याला विसरायला दहा वर्षांचा काळ तसा कमी नसतो. पण आठवणीत  कडवटपणाचं विष भिनलेलं असेल तर मात्र विसरणं तेवढंसं सोपं नसतं. गेली दहा वर्षं डॉ. आशीष हे विष पित होता. आता कुठं तोंडाचा कटवटपणा जरा कमी झाला होता, तेवढ्यात विषाचं प्रमाण दुप्पट झालं.

दुपारी दीडचा सुमार. यावेळी डॉक्टर क्लिनीक बंद करतात. पण अजून एक पेशंट उरला होता. त्यांनी त्या पेशंटला आत पाठवायला सांगितलं अन् शेजारच्या स्टुलावरचा पेपर बघायला सुरूवात केली.

 

vish prasshi marathi story

पेशंट दार उघडून आत आल्यावरही त्यांची नजर पेपरवरच होती. त्यांनी एका हातानं पेशंटला बसायची खूण केली अन् पेपर बाजूला करून पेशंटकडे बघितलं अन् ते एकदम दचकले.

डोळ्यापुढे काजवे चमकल्याचा भास झाला. चेतना लुप्त झाल्यासारखी वाटली. चेहऱ्यावर प्रचंड आश्चर्य…ते पापणी न हलवता समोर बसलेल्या स्त्रीकडे बघत होते. मग भानावर येत त्यांनी म्हटलं, ‘‘तू…? म्हणजे तुम्ही?’’

स्थिर आवाजात ती म्हणाली, ‘‘होय, मीच.’’ तेवढं बोलून ती गप्प बसली अन् टक लावून डॉक्टरांकडे बघत राहिली. दोघंही एकमेकांकडे बघत होती. डॉक्टर आशीषला पुढे काय बोलावं ते सुचेना.

थोडा वेळ असाच गेल्यावर डॉक्टरांनी आपल्या डोक्यातील निरर्थक विचार परतवून लावत स्वत:ला संयत केलं अन् मग व्यावसायिक डॉक्टरप्रमाणे प्रश्न केला, ‘‘बोला, काय त्रास होतोय तुम्हाला?’’

आशीषच्या या प्रश्नावर ती स्त्री जरा बावरली. किंचित कापऱ्या आवाजात म्हणाली, ‘‘मला काही आजार नाहीए, मी फक्त तुम्हाला भेटायला आले आहे. एरवी तुमची भेट होणं शक्य नव्हतं. म्हणून पेशंट होऊन आले. माझं काही म्हणणं आहे, ते ऐकून घेण्यासाठी थोडा वेळ काढला का?’’ तिच्या स्वरात याचना होती.

डॉक्टर अत्यंत सज्जन व सहृदयी होते. क्वचित कधी चिडले असतील. चुकीच्या गोष्टींचा संताप आला तरी ते तो राग दाखवत नसत. टोकाच्या प्रतिक्रिया कधी देत नसतं. आजही त्या स्त्रीला बघून ते अस्वस्थ झाले. जुन्या आठवणी, कडू जहर विषासारख्या त्रास देऊ लागल्या. पण त्या स्त्रीचा त्यांना राग आला नाही. खरं तर याच स्त्रीनं दहा वर्षांपूर्वी त्यांचं आयुष्य विषाक्त करून सोडलं होतं. अजूनही ते विष ते घोट घोट पचवताहेत.

पण आज अवचित ती स्वत:हून त्यांच्यासमोर येऊन बसली होती. तिच्या येण्याचा उद्देश काय? का आली आहे ती इथं? कारण आता तिचा त्यांचा काहीही संबंध नाहीए…एकदा वाटलं सरळ नकार द्यावा, पण विचार केला, बोलल्याखेरीज तिच्या येण्याचा उद्देश तरी कसा समजणार?

स्वत:वर ताबा ठेवत ते म्हणाले, ‘‘ही वेळ माझी घरी जाण्याची असते. तुम्ही सायंकाळी येऊ शकाल?’’

अत्यंत उत्साहानं तिनं विचारलं, ‘‘किती वाजता?’’

‘‘मी सायंकाळी इथंच असेन, सातच्या सुमाराला या.’’

‘‘ठीक आहे,’’ प्रथमच त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं.

‘‘बराय, मी येते सायंकाळी.’’ म्हणत ती उठून उभी राहिली.

ती गेल्यावर डॉक्टर पुन्हा आठवणींच्या दाट जंगलात हरवले. आपल्याला घरी जायचंय, हेसुद्धा ते विसरले. त्यांच्या अटेंडंटनं सुचवलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं.

घरी बायको वाट बघत होती. ‘‘आज उशीर झाला?’’ तिनं विचारलं.

‘‘आमच्या धंद्यात असं होतं. अचानक कुणी पेशंट येऊन धडकतो, अटेंड करावाच लागतो.’’ त्यांनी बोलता बोलता हात धुतले अन् ते जेवायला बसले.

बायकोसमोर ते अगदी नेहमीसारखेच नॉर्मल वागत होते. पण मन थाऱ्यावर नव्हतं. शांत तळ्यात कुणी उगीचच दगड फेकून तरंग उठवावेत तसं झालं होतं. पण हा काही बारकासा दगड नव्हता तर अख्खा डोंगर कुणी पाण्यात ढकलून दिला होता.

‘‘आज जरा दमलोय थोडा आराम करतोय. डिस्टर्ब करू नको,’’ असं सांगून ते खोलीत गेले.

बायकोनं संशयानं त्यांच्याकडे बघितलं, ‘‘डोकं दुखतंय का? बाम चोळून देऊ?’’

‘‘नाही…तसं काहीच नाहीए. पण दमलोय.’’ एवढं सांगून ते अंथरूणावर आडवे झाले.

बायकोला थोडं नवल वाटलं. असं डॉक्टर सहसा वागत नाहीत. पण तिला बरीच कामं होती. फारसा विचार न करता ती आपल्या कामांना लागली. मुलगा शाळेतून यायचा होता. कामाची बाई आता येणार. मुलाचं खाणंपिणं आटोपून आधी त्यांचा होमवर्क करून घ्यायचा, मग त्याला ग्राउंडवर पाठवायचं. सायंकाळचा डॉक्टरांचा चहा, खाणं. मग ते क्लीनिकला गेले की तिला थोडा वेळ आराम करायला मिळायचा.

बेडवर पडून डोळे मिटून घेतले होते तरी डॉक्टर जागेच होते. झोप येणार नव्हती. मेंदूत खूप खळबळ सुरू होती. मनांत आठवणींचं वादळ घोंघावत होतं. उगीचच ते कूस पालटत होते. असंबद्ध आठवणी हळूहळू नीट वळणावर आल्या…खरं तर डॉक्टरांना त्या आठवणी अजिबात नको होत्या. पण ते माणसाच्या हातात नसतं.

विद्यार्थी दशेत असल्यापासूनच आशीष हुषार आणि थोडा गंभीर स्वभावाचा होता. हुषारीच्या बळावरच त्याला कुठंही डोनेशन द्यावं लागलं नाही. मेडिकल कॉलेजला अॅडमिशन झालं. एमबीबीएसनंतर एमडीही झाल्यावर एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नोकरी लागली. पण तिथं त्याचा जीव रमत नव्हता. त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी हवी होती. त्यासाठी तो प्रयत्न करत होता.

एव्हानां लग्नासाठी स्थळं सांगून येऊ लागली होती. वडील सरकारी नोकरीत होते. आईदेखील नोकरी करत होती. छोटंसं कुटुंब होतं. आईवडिलांनी त्याला कशी मुलगी हवीय हे विचारून घेतलं. त्याच्या स्वभावाला साजेशीच मुलगी ते बघत होते.

गंभीर अन् अभ्यासू वृत्तीचा असला तरी आशीष खडूस आणि माणूसघाणा नव्हता. तारूण्यातलं प्रेम आणि रोमांस त्याच्या आयुष्यातही डोकावून गेलंच. प्रेमाचं सप्तरंगी इंद्रधनुष्य त्याच्या आयुष्यात उगवलं. अनेक तरूणी त्याच्याकडे आकर्षिंत व्हायच्या तर त्यालाही अनेकजणी आवडायच्या, पण खूप खोलवर प्रेम रूजलं नाही. भेटल्या तशा मुली दुरावल्याही…

प्रेमाचा मुसळधार पाऊस नव्हता, पण रिमझिम होती. मनानं तो त्यात भिजत होता. पण वाटेवरच्या वळणावर एकेक जण गळायला लागली. एक खरं की आशीषची कुणाबद्दल तक्रार नव्हती. कुणाची आशीषबद्दल तक्रार नव्हती. आयुष्यात खूप खुसपटं न काढणाऱ्यांचंच भलं होतं. आशीष त्यामुळे सुखी होतं.

आशीषची ‘बायको कशी असावी’ याबद्दल काहीही अट नव्हती. त्यानं सगळंच त्याच्या आईवडिलांवर सोपवलेलं होतं. जी मुलगी ते निवडतील तिच्याबरोबर तो आपलं सर्व आयुष्य काढणार होता. त्याला काही डॉक्टर मुलीही सांगून येत होत्या. पण आई व बाबा जी मुलगी बघून पसंत करतील, असं म्हणून त्यानं डॉक्टर मुली नाकारल्या होत्या. महानगरातली मुलगी बघावी की साध्या शहरातील यावरही आईबाबांची चर्चा झाली.

शेवटी एक मुलगी सर्वांनाच पसंत पडली. ती एमबीए झाली होती. एका मोठ्या कंपनीत एचआर डिर्पाटमेंटमध्ये सीनियर मॅनेजर म्हणून काम करत होती.

एकमेकांना पाहणं, पसंत करणं वगैरे औपचारिक गोष्टी आटोपल्यावर नंदिता व आशीषचं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांतच आशीषला जाणवलं की नंदिताच्या प्रेमात नव्या नवरीची ओढ नाहीए. वैवाहिक आयुष्याबद्दल कुठलाही उत्साह नाहीए. रात्रीदेखील अंथरूणात तिच्याकडून कुठलाच प्रतिसाद नसतो. ती अगदी थंड असते.

आशीष डॉक्टर असल्यामुळे मानवी शरीराची त्याला पूर्ण ओळख होती. आधुनिक जीवनात मुली किती स्वतंत्र अन् स्वच्छंद असतात हे ही तो जाणून होता. कदाचित नवेपणामुळे ती बुजत असेल, हळूहळू मोकळी होईल, जसजशी ओळख वाढेल तसतसं प्रेम वाढेल असा विचार करून आशीष फार बोलला नाही.

पण तो काही मानसशास्त्रज्ञ नव्हता. नंदिताच्या मनांत नेमकं काय आहे, ती उदास अन् अबोल का असते. कुठल्याच बाबतीत ती उत्साह का दाखवंत नाही, घरकामातही तिला गती नव्हती, मुळात आवडच नव्हती, असं का त्याला कळत नव्हतं.

घरात ती दोघंच होती. कामाला एक बाई होती. घरातली बहुतेक सगळी कामं तिच करायची. तिची नोकरी व आशीषचं क्लीनिक यानंतर दोघांकडेही एकमेकांसाठी पुरेसा वेळ असे. पण नंदिता कधी आशीषशी बोलण्याचाही प्रयत्न करत नव्हती.

ऑफिसातून आली की ती इतकी थकलेली असायची की सरळ अंथरूणातच शिरायची. कोमेजलेला चेहरा, थकलेला देह, जणू हजारो किलोमीटर अंतर पायी तुडवून आली आहे. रात्री तिच्याशी प्रणय करताना तर आशीषला वाटायचं आपण एखाद्या प्रेताशी संभोग करतो आहोत.

डॉक्टर आशीषला एवढं लक्षात आलं होतं की नंदिता कुमारी नाही. तिच्या शरीरानं यापूर्वीही देहसुख भोगलेलं आहे. लग्नापूर्वी ती कुणाशी तरी बांधील होती. पण लग्नानंतरही ती त्याच कुणाशी बांधील आहे. आशीष तिचा नवरा असला तरी तिचं मन, तिचं शरीर आणखी कुणाचं तरी आहे. दिवसा ती त्या व्यक्तीबरोबर असते अन् स्वत:च्या हक्काच्या घरी पतल्यावरही ती इथली नसतेच.

काही दिवसातच ही बाब आशीषच्या लक्षात आली. पण ती त्याच्यापासून दूर का असते, उदास का असते. नवीन लग्न झाल्यावर इतक्या चांगल्या पतीबरोबर ती प्रेमानं का नांदू शकत नाही, हे त्याला कळत नव्हतं. आशीष व नंदिनी नवरा बायको होती. तिला जर हे संबंध आवडत नव्हते तर तिनं लग्नाला होकार का दिला. सरळ नकार देऊन मोकळी का झाली नाही? घरच्यांच्या दबावामुळे तिला हे लग्न करावं लागलंय का? दुसऱ्या कुणाशी तरी शरीरानं, मनानं गुंतलेली असल्यावर त्याच्याशीच लग्न करायचं होतं…तो माणूस आधीच विवाहित होता का? तसं असेल तर ती आजही त्याच्याशी संबंध ठेवून का आहे? स्वत:चं लग्न झाल्यावर तर ती त्याच्याशी संबंध तोडू शकते ना? स्वत:चा संसार चांगला करावा ना?

आशीषला ठाऊक होतं. नंदिता स्वत:हून काहीच सांगणार नाही. पुढाकार त्यालाच घ्यायला हवा. उगीच उशीर करण्यात अर्थ नाहीए. जी आग दुसऱ्या कुणी लावली आहे, त्या आगीत आपण का व्यर्थ होरपळायचं?

एका सायंकाळी अगदी शांत आणि गंभीर आवाजात त्यानं म्हटलं, ‘‘नंदिता, तुझ्या भूतकाळाबद्दल मी तुला काही विचारणार नाही, आत्ताबद्दलही काही बोलणार नाही, पण तुला एवढंच सांगतो की ज्या आगीत तू होरपळते आहेस, त्यात मला होरपळायला लावू नकोस. माझा काय अपराध आहे? माझा अपराध इतकाच की तुझ्याशी लग्न केलंय. पण तेवढ्यासाठी मी ही काळ्यापाण्याची शिक्षा भोगू शकत नाही. तुझी काय इच्छा आहे, ते एकदा मला अगदी स्पष्ट सांगून टाक.’’

नंदिता भकास चेहऱ्यानं त्याच्याकडे बघत होती. ती काही विचार करत होती. क्षणभर तिचे डोळे ओलावल्याचा भास झाला…मग वाटलं आता ही रडायला सुरूवात करेल. तिनं मान खाली घातली अन् ती कापऱ्या आवाजात बोलू लागली, ‘‘मला माहीत होतं, एक दिवस हे होणार आहे. मला खरं तर तुमचं आयुष्य असं नासवायचं नव्हतं. पण समाज आणि कुटुंबाची काही बंधनं, आपल्याला हवं ते, हवं तसं करू देत नाहीत. घरच्यांशी इच्छा अन् त्यांचा दबाव इतका असतो की आपल्याला झुकावंच लागतं. त्यामुळे मी असं आयुष्य जगतेय, जे माझं नाही, घरच्यांचं किंवा माझ्या कुटुंबाचंही नाही अन् समाजाचं तर नाहीच नाही.’’

‘‘तुझी कोणती असहायता किंवा नाईलाज आहे ते मला ठाऊक नाही पण तू सांगितलंस तर आपण त्यावर काही उपाय शोधू शकू.’’

‘‘नाही, माझ्या समस्येवर काही तोडगाच नाहीए. कृपा करून तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी जाणूनबूजुन तुमची उपेक्षा करते असं समजू नका. खरं तर माझ्या मनात असलेल्या अपराधाच्या जाणीवेमुळे मी इतकी अपसेट असते की तुमच्याशी मोकळेपणानं वागू शकत नाही. माझ्या अपराधामुळे मला नीट वागताच येत नाही. आतल्या आत मी जळतेय…कुढतेय.’’

‘‘तुझ्या हातून काही अपराध घडला असेल तर तू त्याचं प्रायश्चित घेऊ शकतेस.’’

‘‘तेच तर अवघड आहे, माझा अपराध माझा पिच्छा सोडत नाहीए.’’

आशीषला काहीच कळलं नाही. त्यानं नंदिताकडे अशा नजरेनं बघितलं की तिला काही सांगायचं असेल तर तिनं सांगावं.

नंदिता म्हणाली, ‘‘तुमच्यापासून काही लपवण्याचं कारणच नाहीए. मी तुम्हाला सांगते, कदाचित त्यामुळे माझ्या मनातली अपराधाची भावना थोडी कमी होईल. मला कळतंय की मी जी चूक करतेय, त्याला क्षमा नाही…मी प्रयत्न करूनही त्यापासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकत नाही..तो ही माझा पिच्छा सोडत नाहीए.’’

‘‘तर मग तू माझा पिच्छा सोड. मी तुला मुक्त करतो. तू त्याच्याशी लग्न कर.’’

हे ऐकून नंदिता अवाक् झाली. ती थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यात भीती दाटून आली. ती एकदम किंचाळली, ‘‘नाही, तो माझ्याबरोबर लग्न करू शकत नाही…त्याचं लग्नं झालेलं आहे.’’ आशीषला वाटलं आपल्या डोक्याच्या चिंध्या होताहेत. नंदिता हा कोणता खेळ खेळतेय. एकीकडे तिला स्वत:च्या नवऱ्याशी चांगले संबंध ठेवता येत नाहीएत अन् ज्याच्याशी तिचं लग्न झालेलं नाही, होऊ शकत नाही तो तिचं सर्वस्व आहे.

त्याच्याबरोबरचे अनैतिक संबंध ती तोडू शकत नाही. तो हलकट नंदिताच्या शरीराशी, तिच्या आयुष्याशी खेळतोय. स्वत:च्या सार्वजनिक छबीसाठी तो माणूस आपलं कुटुंब, पत्नी, मुलंबाळं सोडू शकत नाही, पण त्याच्यासाठी नंदिता आपलं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे. या पोरीला विवेक नाही. ती भावनाविवश होतेय, मोहात गुरफटतेय, पुन्हापुन्हा चुका करतेय अन् नेमकी कोणती वाट निवडावी, ज्यामुळे आपलं आयुष्य सुखी होईल हे तिला कळत नाहीए.

डॉक्टर आशीषला कळेना की तिला नेमकं काय हवंय? त्याच्या मनात बरेच प्रश्न होते, पण तो काहीच बोलला नाही.

नंदिताच सांगू लागली, ‘‘तो माझं पहिलं प्रेम होता. मी भाबडी, हळवी होते, तो लबाड, चतुर होता. त्यानं माझ्या भावनांना हात घातला. मी बहकले. सरळ देह त्याच्या स्वाधीन केला. नंतर समजलं तो विवाहित आहे, तरीही मी त्याला आयुष्यातून हाकलून लावला नाही. मी त्याच्याशी संबंध तोडू शकत नाही, त्याला बघितलं की मी वेडी होते. माझं भान हरपतं, काहीतरी विचित्र आकर्षण आहे त्याच्यात. त्याचं बोलणं मला गुंगवून ठेवतं. मी ओढली जाते त्याच्याकडे.

‘‘लग्नानंतर मी खूप प्रयत्न केले, त्याला भेटायचं नाही असं ठरवलं, त्याच्या समोर जायचंच नाही असं ठरवलं पण जेव्हा तो माझ्यासमोर नसतो, तेव्हा मी त्याचाच विचार करत असते. त्याला भेटण्यासाठी तळमळत असते. त्याच्याशिवाय कुणाचा विचार मी करूनच शकत नाही…तुमचासुद्धा नाही.

‘‘माझं शरीर मी तुम्हाला देते तेव्हाही माझं मन त्याच्याजवळ असतं. मला कळतंय, मी तुमच्याशी एकनिष्ठ नाही. मी तुमचा विश्वासघात करतेय. वैवाहिक जीवनात प्रामाणिकपणे समर्पण करण्याऐवजी मी तुम्हाला त्रास देते आहे…पण माझा माझ्यावर ताबा नाही. मी एक दुबळी स्त्री आहे. हाच माझा गुन्हा आहे.’’

‘‘कुणीही पुरूष किंवा स्त्री दुर्बळ नसते. आपण केवळ भावना आणि प्रेमाचं कारण पुढे करतो. जगात आपण इतक्या गोष्टी सोडून देत असतो. नातलग, आईबाप, कितीतरी आवडत्या गोष्टी आपण सोडतो, तर मग एखादी वाईट गोष्ट आपण का त्यागू शकत नाही? कदाचित वाईट गोष्टींचं आकर्षण जास्त असतं म्हणून. तुझ्या बाबतीत नेमकं काय घडतंय मला ठाऊक नाही…पण…एकदा लग्न झाल्यावर तू त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न का केला नाहीस?’’

‘‘केला, खूप केला. पण मन त्याच्याकडेच ओढ घेतं. तो माझ्या ऑफिसातही नाहीए. दुसरीकडे काम करतो. तो मला फोनही करत नाही, पण मग मी बेचैन होते. स्वत:च त्याला फोन करून बोलावून घेते. मी काय करू?’’

आशीषकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण त्याच्या लक्षात आलं नंदिता दृढ निश्चयी किंवा दृढ चरित्र्याची मुलगी नाहीए. ती भावुक आहे. अपरिपक्व आहे. तिचा विवेक कमी पडतो. ती परिस्थितीला शरण जाते. चांगलं वाईट कळलं तरी वाईटाला सोडायची तिची तयारी नाहीए…त्यातच तिला सुख वाटतंय, आनंद मिळतोय…भले ही तो आनंद निर्मल नाही, अनैतिक पद्धतीनं मिळवलेला आहे.

– क्रमश :

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें