कथा * सुदीप्ती सत्या
सकाळच्या वेळी माझं घर अगदी केराच्या बादलीसारखं दिसतं...नवरा ऑफिसात, दोन्ही मुलं कॉलेजात अन् धाकटा लेक शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते. सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही.
खोल्यांचे केर काढून फरशा पुसून होताएत तोवर मोबाइल वाजला. कामाच्या वेळी असे मेसेजेसही फार वैताग आणतात. फोन बघितला तर मोठ्या नणंदेचा होता. सगळा राग वैतागून विसरून मी फोन घेतला. इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काही सीरियस तर नाही ना? हा विचार बाजूला सारून मी म्हटलं, ‘‘ताई, नमस्कार बऱ्या आहात ना?’’
‘‘मी बरी आहे गं! पण मोहनाची तब्येत बरी नाहीए. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. ती जेवतखात नाहीए. रात्र रात्र जागी असते. विचारलं तर म्हणते झोप येत नाही. जीव घाबरतो...’’ बोलता बोलता ताईंना रडू यायला लागलं.
‘‘हे कधीपासून होतंय?’’
‘‘एखाद महिना झाला असावा, कदाचित जास्त ही...’’
‘‘ताई, रडू नका, मी आहे ना? आजच जाते मी तिला भेटायला. आता नऊ वाजलेत म्हणजे यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असेल. मी संध्याकाळी भेटते तिला. वाटलं तर इथं घरी घेऊन येईन...तुम्ही अगदी शांत राहा. ब्रेकफास्ट झाला का तुमचा?’’
‘‘नाही...’’
‘‘कमाल करता...इतका वेळ उपाशी आहात? आधी खाऊन घ्या. चहा घ्या अन् काळजी करू नका...मलाही आता भराभरा कामं आटोपायची आहेत. मी एक दोन दिवसात तुम्हाला सगळं सांगते...आजच जातेय मी मोहनाकडे...’’
फोन ठेवून मी कामाला लागले. मोहनाचा विचार डोक्यात होताच.काय झालं असेल मोहनाला? इतकी हुशार, गोड गुणी पोरगी...आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्वगुण संपन्न म्हणून नावाजली जाते. इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ‘तिच्याकडून काही शिका’ असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते.मुलं हसून उडवून लावतात.
दुपारचा स्वयंपाक आटोपून मी मेथीच्या पुऱ्या, गोडाचे भोपळयाचे घारगे केले. बटाट्याचा कीस तळून घेतला. हे पदार्थ मोहनाला फार आवडतात. होस्टेलवर ते मिळतही नाहीत. माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच कळवलं नाही. सरप्राइज द्यायचं असं ठरवलं. संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले. तिथेच चिठ्ठी ही लिहून ठेवली. नवऱ्याला फोन करून मी मोहनाला भेटायला जातेय एवढं त्याच्या कानावर घातलं.