मिश्किली * अशोक माटे
सान्यांना रिटायर होऊन अजून चारच दिवस झाले होते. पण घरात बसून घरच्यांच्या कटकटीनं ते जाम कंटाळले होते. बिघडलेलं डोकं आणि आखडलेले सांधे नीट करण्यासाठी, त्याचबरोबर घरातल्या मंडळींची कटकटही बंद करण्यासाठी त्यांनी काही तरी करायलाच हवं हा निर्णय घेतला. रिटायर झाल्यावर पगारही कमी झाला होता तर उत्पन्नांचं एक साधनही असावं, थोडा स्वार्थ, थोडा परमार्थही व्हावा म्हणून ते थोडं घराबाहेर फिरून आले.
या भटकंतीत त्यांनी आपल्या वॉर्डाचा एक सर्व्हे घेतला. घरी येऊन बायकोनं दिलेली कोल्ड कॉफी घेता घेता ते आपल्या सर्व्हेचाही विचार करत होते. त्यांच्या लक्षात आलं की सध्या माणसांपेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त झाली आहे...पण त्यांच्यासाठी एकही दुकान नाही. गरीब बिचाऱ्या मुक्या प्राण्यांनी आपल्या गरजा पूर्ण कशा बरं करायच्या? कुत्र्यांनी आपल्या आवडीच्या वस्तू आपल्या मालकांना सांगून आवडीच्या दुकानातून मागवायच्या कशा? ते काही नाही, कुत्र्यांसाठी एक स्पेशल जनरल स्टोअर उघडायचंच! समस्त कुत्री किती खुश होतील, शिवाय उगाचच लांब लांब जाऊन वस्तू आणण्याचा त्रास वाचतोय म्हटल्यावर कुत्र्यांचे मालकही खुश होणार. शिवाय चार पैसे सानेही मिळवणार म्हणून तेही आनंदात.
आपला प्रोजेक्ट फायनल करण्याआधी साने साहेबांनी आळीतल्या काही कुत्र्यांच्या मालकांची भेट घेतली. त्यांचे इंटरव्ह्यू घेतले. त्या सर्वांचं विश्लेषण केलं, त्यातून ते या निष्कर्षावर पोहोचले की या कामात माणसांच्या गरजा पुरवणाऱ्या दुकानापेक्षा कुत्र्यांच्या गरजा पुरवणाऱ्या दुकानांची गरज जास्त आहे. तेव्हा तर त्यांनी ‘जनरल शॉप फॉर पेट्स’ उघडायचं हे ठरवून टाकलं. माणसांना काय म्हणायचं ते म्हणू देत, त्यांना काय वाटायचं ते वाटू देत, दुकान कुत्र्यांच्या सामानाचंच असणार होतं.
काल ते माझ्या घरी आले. त्यावेळी मी माझ्या गावठी कुत्र्याचे केस विंचरत होतो. मी स्वदेशीचा पुरस्कर्ता नाही, पण सगळी कुत्री एकसारखीच असतात असं मला वाटतं. माणसं देशी, विदेशी, विलायची असू शकतात. एक वाकडं शेपूट प्रत्येक कुत्र्याला असतं, दुसरी ओळख म्हणजे कुत्री भुंकतात, चावतातसुद्धा. पण हल्ली माणसांनी भुंकायला अन् चावे घ्यायला सुरूवात केलीय, तेव्हापासून कुत्री बरी सभ्य झालीत.