श्यामली

पद्मा अग्रवाल

‘श्यामली बुटिक’ लखनऊ शहरात या बुटिकची कोणी ओळख करून देण्याची गरज नाही. गरज असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण उत्कृष्ट काम हेच श्यामलीजींच्या जीवनातील ध्येय होते. हेच ध्येय नजरेसमोर ठेवून काम केल्यामुळे काही वर्षांतच त्यांचे बुटिक शहरातील सर्वोत्तम बुटिक ठरले.

श्यामलीजींचा गोड, मधुर आवाज आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य तसेच ग्राहकांची आवड समजून घेऊन वेळेत काम पूर्ण करून देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ग्राहक खुश होत असत.

आता तर त्यांची मुलगी राशीही फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून आली आहे आणि तीही त्यांना कामात मदत करीत आहे. मुलगा शुभ अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आणि पुढे तेथेच स्थायिक झाला.

सोम त्यांच्या बुटिकचे व्यवस्थापक आहेत. पिकलेले केस, डोळयांना लागलेला चष्मा आणि थकलेले शरीर त्यांना जणू कामातून निवृत्त होण्याचा इशारा देत असल्याचा भास होतो.

रात्रीचे ८ वाजत आले होते. श्यामलीजी बुटिक बंद करण्याच्या विचारात होत्या. तितक्यात धावपळ करीत आणि धापा टाकत वन्या तेथे आली. तिने विचारले, ‘‘माझा लेहंगा तयार झाला आहे का?’’

‘हो, हो… तू एकदा घालून बघ, म्हणजे मी लगेच तुला देते.’

वन्या ट्रायल रूममध्ये गेली. तेथून लेहंगा घालून आलेल्या वन्याने श्यामलीजींना आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘तुमचे खूप खूप आभार. तुमच्या हातात जादू आहे.’’

वन्यासोबत आलेल्या तिच्या आई प्रज्ञाने पर्समधून लग्नाची पत्रिका काढून दिली आणि म्हणाल्या, ‘‘ताई, तुम्हाला लग्नाला नक्की यायचे आहे.’’

श्यामलीजींनी पत्रिका उघडली आणि म्हणाल्या, ‘‘पत्रिका खूपच सुंदर आहे.’’

‘‘७ डिसेंबर… फारच छान, नक्की येईन.’’

७ डिसेंबर ही तारीख पाहताच श्यामलीजींना आपला भूतकाळ आठवला. जुन्या आठवणी डोळयासमोर उभ्या राहिल्या…

लखनऊजवळ सुलतानपूर नावाचे छोटेसे शहर आहे. त्या तेथील निवासी होत्या. ३ बहिणी आणि २ भावांमध्ये त्या सर्वात मोठया होत्या. अभ्यासापेक्षा जास्त त्यांना शिवणकामाची आवड होती. लहानपणी त्या आईची ओढणी किंवा साडी वापरून आपल्या बाहुलीसाठी विविध प्रकारचे कपडे स्वत:च तयार करीत असत.

हे सर्व पाहून आईने सांगितले होते की, तुला फॅशन डिझायनिंगचे शिक्षण देईन. बीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी फॅशन डिझायनिंगचे धडे गिरवले.

वडिलांना त्यांच्या लग्नाची काळजी सतावत होती. हुंडा देण्याइतके भरपूर पैसे त्यांच्याकडे नव्हते. ते सतत नेटवरील लग्नाच्या साईट्सवर मुलांचा शोध घेत होते.

श्यामलीजींचा चेहरा गोल तर रंग गव्हाळ होता. रेखीव चेहऱ्याची ती नाजूक, आकर्षक मुलगी होती. त्यांचा कमनीय बांधा आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य कुणालाही आकर्षित करेल असेच होते. त्या जेवण खूपच चविष्ट बनवायच्या. म्हणूनच वडिलांसाठी त्या अन्नपूर्णा होत्या.

वडिलांना सोम यांची माहिती आवडली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीची माहिती आणि फोटो त्यांच्या वडिलांना पाठवला. सोमच्या वडिलांचे लखनऊमधील अमिनाबाद येथे चांगले चालणारे औषधांचे दुकान होते. सुखवस्तू कुटुंब आणि एकुलता एक मुलगा असल्यामुळे श्यामलीजींचे वडील खुश होते.

सोम यांचे वडील केशवजींचा फोन आला आणि घरात लगबग सुरू झाली. त्यांनी श्यामली यांचा मेल आयडी मागितला. तेव्हापासून सोम आणि श्यामलीजींचे मेलवर चॅटिंग सुरू झाले. सोम यांच्या गोड, प्रेमळ बोलण्याने जणू श्यामलीजींच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या.

लवकरच लग्न झाले. मनात भविष्याची सुखद स्वप्ने रंगवत सोम यांचा हात धरून त्यांनी त्यांच्या आलिशान घरात प्रवेश केला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

सोम यांच्या मिठीतील श्यामलीजींचा यावर विश्वासच बसत नव्हता की, जीवन इतके सुंदर असू शकते.

त्या सोम यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. मात्र नवऱ्याचा स्वभाव त्यांना नीटसा समजू शकला नव्हता. १-२ महिन्यांनंतर त्यांच्या लक्षात आले की सोम दुकानात केवळ पैसे घेण्यासाठी जात. मित्रांसोबत सिगारेट ओढणे, दारू पिणे, मुलींसोबत मजा मारणे, हाच त्यांचा दिनक्रम होता.

हळूहळू शुल्लक कारणावरूनही सोम त्यांना ओरडू लागले. त्यामुळे त्यांना नवऱ्याची भीती वाटू लागली होती.

एका संध्याकाळी सोम यांनी त्यांना तयार होऊन क्लबला येण्यास सांगितले. त्या त्यांच्या खोलीत तयारी करू लागल्या. दरम्यान सोम व त्यांच्या वडिलांचे जोरजोरात सुरू असलेले बोलणे त्यांच्या कानावर पडले.

त्यानंतर खोलीत आलेल्या सोम यांच्या चेहऱ्यावरील तणाव पाहून त्यांनी काळजीने विचारले की, वडील एवढे का चिडलेत? त्यावर तू गरज नसलेल्या गोष्टीत नाक खुपसू नकोस, असे उद्धट उत्तर त्यांना मिळाले.

त्या दिवशी श्यामलीजी खूपच छान तयार झाल्या होत्या. काळया साडीत अतिशय सुंदर दिसत होत्या.

वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे क्लबला पोहोचायला त्यांना उशीर झाला. तिथे कॉकटेल पार्टी सुरू होती. सेक्सी कपडे घातलेल्या महिलांच्या हातात दारूचे ग्लास होते. श्यामलीजी घाबरून सोम यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांच्यासाठी ते वातावरण खूपच नवीन आणि विचित्र होते.

सोम यांचे मित्र अतुलने श्यामलीजींना दारूने भरलेला ग्लास दिला.

श्यामलीजींनी घाबरून सांगितले, ‘‘मी ड्रिंक करीत नाही.’’

सोम यांनी जबरदस्तीने तो ग्लास श्यामलीजींच्या ओठाला लावला. ‘‘असे गावठी वागणे आता सोडून दे. श्रीमंतासारखी वाग आणि त्यांच्यासारखी मजा मार.’’

श्यामलीजींच्या डोळयांतून अश्रू ओघळू लागले. त्या कोपऱ्यात जाऊन बसल्या. मांसाहारी जेवण पाहून त्या जेवल्यादेखील नाहीत.

त्या दिवशी त्यांच्या अशा वागण्यामुळे आपली लाज गेली, असे सोम यांना वाटू लागले. तेथून परत येताना रस्ताभर ते श्यामलीजींना ओरडत होते. शिव्यांची लाखोली वाहत होते.

इतक्या शिव्या दिल्यानंतरही श्यामलीजींकडून जबरदस्तीने त्यांनी शरीरसुख घेतलेच.

त्या रात्रभर रडत होत्या. अशा परिस्थितीत काय करावे, हेच त्यांना सुचेनासे झाले होते.

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली, मात्र अघटित घडले होते. त्यांचे जीवनच बदलून गेले होते.

रात्री सोम यांचे वडील झोपी गेले ते सकाळी उठलेच नाहीत.

सर्व काही बदलले होते. सोम यांची आई श्यामलीजींना अपशकुनी असे म्हणून जोरजोरात रडत होती. त्यांच्या लग्नाला केवळ २ महिनेच झाले होते.

नातेवाईक भेटायला आले. सर्वांसमोर सोम यांच्या आईचे एकच रडगाणे सुरू होते. हुंडा न घेता सुनेला घरात आणले, पण ती आली आणि तिने माझे सौभाग्य हिरावून घेतले. आम्हाला पुरते उद्धवस्त केले.

सोम दु:खात होते, पण ते आईला गप्प बसायला सांगू शकत होते. मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही. ते श्यामलीजींपासून अंतर ठेवून वागू लागले. असे असले तरी रात्री मात्र श्यामलीजींच्या शरीरावर अधिकार गाजवायचे. त्यांची इच्छा काय आहे, हे जाणून न घेताच शरीरसुखाची आपली भूक भागवल्यानंतर सोम त्यांच्याकडे पाठ फिरवून झोपत.

दरम्यान त्यांना नवीन पाहुण्याची चाहूल लागली. आनंदाने हसावे की ढसाढसा रडावे, हेच त्यांना समजेनासे झाले होते. विरोध करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि तेवढी हिंमतही नव्हती. त्यांना आपले लग्न मोडायचे नव्हते. नात्यांना निभावून नेणे गरजेचे असते, यावर त्यांचा विश्वास होता. दोन्ही घरची लाज समाजाच्या वेशीवर टांगली जावी, हे त्यांना मान्य नव्हते. सोम आता औषधाच्या दुकानात व्यस्त झाले होते. श्यामलीजींचेही काहीतरी स्वप्न असेल, इच्छा असतील, याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. घरातल्यांचे प्रेम आणि आदर मिळावा एवढीच त्यांची अपेक्षा होती, पण त्या केवळ एक चालती-बोलती मशीन बनून राहिल्या होत्या, जिचे काम होते सासू आणि सोम यांना कुठल्याही परिस्थितीत आनंदात ठेवणे. कोणी घरी आले तर त्यांचा पाहुणचार करणे.

त्यांनी संपूर्ण दिवस स्वत:ला घरकामत व्यस्त करून घेतले होते. तरीही त्यांनी बनवलेले जेवण सोम यांना कधीच आवडत नव्हते. हे काय बनवलेस? मला मटार-पनीरची भाजी हवी आहे. हे ऐकून त्या बिचाऱ्या थकून भागून रात्री ११ वाजता पुन्हा भाजी बनवायच्या तयारीला लागत.

जेव्हा कधी त्यांचे आईवडील त्यांना भेटायला येत किंवा माहेरी पाठविण्याची विनंती करीत तेव्हा सासू अतिशय प्रेमाने वागून माहेरी पाठवण्यास नकार देत असे. ते पाहून आपल्या मुलीला खूपच चांगले, सुखवस्तू कुटुंब मिळाले, जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला, आपण धन्य झालो, असेच श्यामलीजींच्या आईवडिलांना वाटत असे.

आपल्या आईच्या खांद्यावर डोके ठेवून तिला सर्व सांगावे, असे श्यामलीजींना वाटत असे, पण मनातले सांगण्यासाठी सासू आणि सोम एक क्षणही त्यांना एकटे सोडत नव्हते.

राशीचा जन्म झाल्यानंतर वर्षभरातच शुभ झाला. त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिकच वाढली. संसार आणि मुलांमध्ये त्या अडकल्या.

जेव्हा सोम त्यांना ओरडत, त्यांचा अपमान करीत तेव्हा त्यांना स्वत:चाच राग येत असे. आपणच हे सर्व का सहन करीत आहोत? मुले फक्त माझीच आहेत का? सोमही त्यांचे वडील आहेत, असे त्यांना वाटे.

सोम यांच्यासाठी त्या केवळ शरीराची भूक भागविण्यापुरत्या राहिल्या होत्या.

सोम यांनी दुकानाचा पसारा वाढवला होता. त्यामुळे ते कामात जास्तच व्यस्त झाले होते.

दुकानात कॉम्प्युटरवर काम करण्यासाठी एक मुलगी होती. तिचे नाव नईमा होते. ती खूपच सुंदर आणि फॅशनेबल होती. सोम तिच्या प्रेमात पडले. ते तिला आपल्यासोबत क्लबला घेऊन जात. तिथे पॉप संगीताच्या तालावर नृत्य आणि दारूचे ग्लास रिचवले जात होते. तिथे ती सोम यांच्या मनाप्रमाणे वागत असे. त्यामुळे काही दिवसांतच ती सोम यांची गरज आणि त्यांचे संपूर्ण विश्व झाली.

एके दिवशी दुकानाचे व्यवस्थापक महेशजी यांनी आपले नाव समजू देऊ नका, अशी अट घालत सोमच्या आईला सांगितले की, सोम वाईट मार्गाला लागले आहेत. बनावट औषधे विकत आहेत. अनेकदा मुदत संपलेली औषधेही सर्रास विकतात. त्यांनी अमली पदार्थ विकण्याचे कामही सुरू केले आहे, त्यामुळे ते कधीही संकटात सापडू शकतात.

हे ऐकल्यानंतर सासूला श्यामलीजींची आठवण आली. वेळीच त्याला लगाम घाल, नाहीतर तो स्वत:सोबत आपल्या सर्वांच्या आयुष्याचीही वाट लावेल, असे त्यांनी शयामलीजींना सांगितले.

सोम यांच्यासोबतचे नाते केवळ औपचारिकतेपुरते उरले होते. दुसरीकडे हातात हरामाचा पैसा खेळू लागला होता. त्यामुळे सोम मुलांसाठी महागडी खेळणी आणत. श्यामलीजी आणि स्वत:च्या आईसाठी महागडया भेटवस्तू आणत.

ते नेहमीच रात्री उशिरा घरी येत. त्यांच्या तोंडून दारूची दुर्गंधी येत असे, पण भांडण नको, असा विचार करून श्यामलीजी सर्व निमूटपणे सहन करीत होत्या.

त्यांना महागडया भेटवस्तू, भरजरी साडया नको होत्या. त्या केवळ पतीच्या निर्मळ प्रेमाच्या भुकेल्या होत्या. त्यांच्या मिठीत शिरून प्रेमाने गप्पा माराव्यात, एवढीच त्यांची अपेक्षा होती.

नियतीने स्त्रीला इतकी दुबळी बनवले आहे की, आपला संसार मोडू नये यासाठी ती आपले अस्तित्वच पणाला लावते.

आता तर सोम यांनी आणलेल्या भेटवस्तू त्या उघडूनही पाहत नसत.

एके दिवशी सोम चिडून म्हणाले, एवढया महागडया साडया आणून देतो, पण तुझा उदास आणि निराश चेहरा पाहिला की, मला तुझ्याकडे बघावेसेही वाटत नाही.

श्यामलीजींनी हिंमत करून त्यांना मुलांची शपथ घालून दारू पिऊ नका, क्लबला जाऊ नका, असे सांगितले. मात्र कुठलीच लाज न बाळगता सोम म्हणाले की, मी दारू पिऊ नको तर काय करू? तुझ्यासोबत राहून मी मानसिक आणि शारीरिकदृष्टयाही समाधानी नाही. माझी आणि तुझी मानसिकता खूपच वेगळी आहे. त्यामुळे आपले कधीच एकमत होऊ शकत नाही.

मी तुला सर्व खर्च करीत आहे. तुझ्या मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन दिला आहे. तुला महागडया भेटवस्तू, साडया, दागिने आणून देतो. आपल्याकडे गाडी आहे, ड्रायव्हर आहे. तू एवढया मोठया आलिशान घरात राहतेस. तुला आणखी काय हवे?

बायको आहेस. बायको बनूनच रहा. जर येथे रहायचे नसेल तर तुझ्या गावी निघून जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी मुले येथेच राहतील.

इतके बोलल्यानंतर सोम क्लब किंवा दुसरीकडे कुठेतरी निघून गेले. त्या घाबरून गप्प बसल्या. मुले त्यांचा जीव की प्राण होती. तीच त्यांच्या जीवनाचा आधार होती. त्यांच्यासाठीच तर त्या जगत होत्या. त्यांचे गप्प बसणे आणि निमूटपणे सहन करण्याच्या स्वभावामुळेच सोम यांची हिंमत वाढत चालली होती. त्यामुळेच नईमासोबत ते बिनधास्तपणे फिरत होते. बऱ्याचदा ते तिला घरी घेऊन येत असत. अनेकदा स्वत: घरी येत नसत.

श्यामलीजी शांतपणे सर्व सहन करीत होत्या. त्यांचे दु:ख अश्रूंच्या रूपात त्यांच्या डोळयातून वाहत असे. एकांतपणा हा त्यांच्या प्रत्येक दु:खातील सोबती होता. बंड पुकारणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. जास्त काही बोलल्यास आपला संसार मोडेल, मुले अनाथ होतील, याची त्यांना जाणीव होती. आपल्या अशा असहाय्यतेमुळे अनेकदा त्या स्वत:वरच रागवत. तरीही संसार मोडेल या भीतीने त्या हिंमत करूनही बोलू शकत नव्हत्या. छोटीशी राशी जेव्हा त्यांचे अश्रू पुसून रडू नकोस असे सांगत असे तेव्हा त्यांच्यासाठी अश्रू रोखणे अधिकच अवघड होत असे.

दुकानातील वयस्कर व्यवस्थापकांनी २-३ वेळा त्यांनाही फोन करून सांगितले होते की, सोम यांचा बनावट औषधांचा तसेच अमली पदार्थ विक्रीचा अवैध व्यवसाय वाढतच चालला आहे.

हे असेच चालू राहिले तर लवकरच ते एखाद्या प्रकरणात अडकतील. हे ऐकून श्यामलीजी काळजीत पडल्या. त्यांचे स्वत:चे आणि त्यांच्या लाडक्या मुलांचे भविष्यही पणाला लागले होते. दुकानातील इतर काही मुलांकडेही त्यांनी विचारपूस केली, तेव्हा त्यांना समजले की, खरोखरच सोम वाईट मार्गावर भरकटत खूप पुढे निघून गेले आहेत.

अखेर एके दिवशी एक वाईट घटना घडलीच. त्यांच्या दुकानातून खरेदी केलेल्या नकली औषधांमुळे एका मुलाचा मृत्यू झाला. प्रकरण चांगलेच पेटले. ती माणसे काठया घेऊन आली. त्यांनी दुकानाची तोडफोड केली. सोम यांनाही चांगलाच चोप दिला. पोलीस आले. त्यांना कसेबसे पैसे देऊन सोम यांनी प्रकरण मिटवले, पण याच दरम्यान त्या मृत मुलाच्या वडिलांनी ‘ड्रग्स कंट्रोल डिपार्टमेंट’ला तक्रारीचा मेल केला. त्यांच्या पथकाने अचानक येऊन दुकानावर छापा टाकला.

प्रकरण गंभीर होते. लोकांच्या जीवाशी खेळ केल्याच्या आरोपाखाली सोम यांना अटक झाली आणि औषधांचे दुकानही सील करण्यात आले. त्यांनी चांगला वकील शोधण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला.

जामीन मिळण्यासाठी सुमारे ३ महिने लागले. घरखर्च भागविणे अवघड झाले. एकेक करून घरातील सर्व नोकरांना काढून टाकावे लागले. मुलांसाठी दूध विकत घेणेही अशक्य झाले. घरातले काही सामान विकून कसेबसे काही पैसे मिळत होते.

सोम जामिनावर सुटून घरी आले तेव्हा त्यांना ओळखणे अवघड झाले होते. रंग काळा पडला होता आणि शरीर कृश झाले होते. त्यांना कोणाच्याही समोर यायचे नव्हते. इतकेच नव्हे तर मुलांसोबत बोलणेही ते टाळत होते. शांतपणे आपल्या खोलीत झोपून छताकडे एकटक पाहत रहायचे.

नवीन मार्ग शोधण्याऐवजी सोम निराशेच्या गर्तेत खोलवर अडकत गेले. सांत्वनाच्या नावाखाली नातेवाईक आणि ओळखीच्या माणसांनी मारलेले टोमणे, त्यांनी रोखलेल्या नजरांनी ताज्या जखमांवर जणू मीठ चोळण्याचे काम केले. त्यामुळे घरातील सर्वांचेच जीवन अवघड झाले.

श्यामलीजींसाठी ही परीक्षेची वेळ होती. आता स्वत:हून पुढाकार घेऊन घरची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करणे त्यांच्यासाठी गरजेचे होते.

एकीकडे निराशेने ग्रासलेले सोम तर दुसरीकडे १२ वर्षांची राशी आणि ११ वर्षांचा शुभ होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी घराचा मोर्चा सांभाळला. सोम यांना     निराशेतून बाहेर काढण्याचा त्या प्रयत्न करीत होत्या. मुलांकडेही त्यांचे व्यवस्थित लक्ष होते.

मित्र-मैत्रिणींच्या ओळखीतून एका मोठया बुटिकमध्ये त्यांना फॅशन डिझायनरची नोकरी मिळाली. लवकरच श्यामलीजी किती हुशार आहेत, हे बुटिकच्या मालक असलेल्या कल्पनाजींनी अचूक हेरले. त्यांनी डिझाईन केलेले कपडे ग्राहकांना आवडू लागले. वर्षभरातच त्या बुटिकचा व्यवसाय मोठया प्रमाणावर वाढला. सोबतच श्यामलीजींचा पगारही वाढला.

जीवनाची गाडी पुन्हा रुळावर येऊ लागली होती. नोकरीला लागून त्यांना जवळपास २ वर्षे झाली होती. आता स्वत:चे बुटिक सुरू करावे असे त्यांना वाटू लागले. मात्र त्यासाठी पैशांची गरज होती.

त्यांनी महिला गृहउद्योग योजनेअंतर्गत बँकेत कर्जासाठी अर्ज दिला आणि  त्यानंतर घरातील एका खोलीत आपले बुटिक सुरू केले. ४ शिलाई मशीन आणि काही कारागीर मुलींना सोबत घेऊन त्यांचा हा व्यवसाय सुरू झाला. कष्ट करण्याची प्रचंड तयारी आणि कल्पक संकल्पनांमुळे अल्पावधीतच त्यांचा व्यवसाय नावारूपाला आला.

शहरात त्यांच्या बुटिकच्या आणखी २ शाखा सुरू झाल्या. सुमारे ४० लोकांना त्यांच्यामुळे रोजगार मिळाला.

राशीने आवाज दिल्यामुळे त्या भूतकाळातील या आठवणीतून बाहेर पडल्या. ‘‘आई, कसला विचार करतेस? घरी जायचे नाही का?’’

त्या वर्तमानात परत आल्याच होत्या की, तेवढयातच त्यांच्या मोबाइलची रिंग वाजली. ‘‘श्यामली मॅडम का?’’

‘‘हो.’’

‘‘अवघड परिस्थितीवर मात करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल महिला दिनानिमित्त ‘विजय नगरम हॉल’मध्ये तुमचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. उद्या आम्ही आमंत्रणपत्रिका घेऊन तुम्हाला भेटायला येणार आहोत.’’

‘‘धन्यवाद,’’ असे म्हणताना श्यामलीजी भावूक झाल्या होत्या. मोबाईल स्पीकरवर असल्यामुळे तेथे असलेल्या सर्वांनाच ही आनंदाची बातमी समजली होती.

सोमही भावूक झाले होते. त्यांनी प्रेमाने श्यामलीजींना आलिंगन दिले. ‘‘श्यामली, मी तुला ते प्रेम आणि सन्मान देऊ शकलो नाही ज्याच्यावर तुझा अधिकार होता. म्हणूनच आता संपूर्ण लखनऊ शहरच तुझा सन्मान करणार आहे.’’

इतक्या वर्षांनंतर सोम यांच्या त्या प्रेमळ आलिंगनामुळे श्यामलीजींना भरून आले होते. त्यांनीही प्रेमाने सोम यांना आपल्या मिठीत कैद केले.

मुलगी राशिकडे लक्ष जाताच त्या लाजल्या.

सोमने फोन करून या सत्कार सोहळयासाठी श्यामलीजींच्या आईवडिलांना आमंत्रण देऊ लागले, जणू आज त्यांचे सर्व दु:ख दूर झाले होते.

दोन्ही हातात लाडू

कथा * सुनीता भटनागर

ऑफिसमधले सर्व सहकारी रंजनाला लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी मागे लागले होते. खरं तर त्यांनी तिच्यावर दबावच आणला होता. तिने मोहितला फोन केला, ‘‘ही सगळी मंडळी उद्याच्या वेडिंग अॅनव्हरसरीची पार्टी मागताहेत. मी त्यांना काय सांगू?’’

‘‘आईबाबांना विचारल्याशिवाय कुणालाही घरी बोलावणं बरोबर नाही.’’ मोहितच्या आवाजात काळजी होती.

‘‘पण मग यांच्या पार्टीचं काय?’’

‘‘रात्री विचार करुन ठरवूयात.’’

‘‘ओ. के.’’

रंजनाने फोन बंद केला. त्याचं म्हणणं तिने सर्वांना सांगितलं तसे सगळे तिला ताणायला लागले. ‘‘आम्ही व्यवस्थित गिफ्ट घेऊन येऊ. फुकट पार्टी खाणार नाही.’’

‘‘अगं, सासूला इतकी घाबरून राहाशील तर सगळं आयुष्य रडतंच काढावं लागेल.’’

थोडा वेळ सर्वांचं ऐकून घेतल्यावर रंजनाने एकदम मोठ्या आवाजात म्हटलं, ‘‘हे बघा, माझं डोकं खाणं बंद करा. मी काय सांगतेय ते नीट लक्षपूर्वक ऐका. उद्या, म्हणजे रविवारी, रात्री आठ वाजता तुम्ही सर्व जेवायला ‘सागररत्न’ रेस्टॉरण्टमध्ये येता आहात. गिफ्ट आणणं कम्पल्सरी आहे अन् गिफ्ट चांगली आणा. आणायचं म्हणून आणू नका. गिफ्ट घरी विसरून येऊ नका.’’

तिच्या या घोषणेचं सर्वांनीच टाळ्या वाजवून स्वागत केलं.

ऑफिस सोडण्यापूर्वी संगीता मॅडमने तिला एकटीला गाठून विचारलं, ‘‘रंजना, तू हे पार्टीचं आमंत्रण देऊन स्वत:वर संकट तर नाही ना ओढवून घेतलंस?’’

‘‘आता जे होईल ते बघूयात, मॅडम,’’ रंजनाने हसून म्हटलं.

‘‘बघ बाई, घरात फारच टेन्शन असलं तर मला फोन कर. मी सगळ्यांना पार्टी कॅन्सल झाल्याचं कळवेन. फक्त उद्याचा दिवस तू रडू नकोस, उदास अन् दु:खी होऊ नकोस..प्लीज…’’

‘‘नाही मॅडम, जे काही रडायचं होतं ते मी गेल्यावर्षी पहिल्या मॅरेज अॅनव्हरसरीलाच आटोपून घेतलंय. तुम्हाला माहीतंच आहे सगळं.’’

‘‘हो गं! तेच सगळं आठवतंय मला.’’

‘‘माझी काळजी करू नका मॅडम; कारण एका वर्षात मी खूप बदलले आहे.’’

‘‘हे मात्र खरंय. तू खूप बदलली आहेस. सासूचा संताप, सासऱ्याचं रागावणं, नणंदेचं टोचून, जिव्हारी लागेल असं बोलणं याचा अजिबात विचार तुझ्या मनात नाहीए. तू बिनधास्त आहेस. हे खरंच कौतुकास्पद आहे.’’

‘‘हो ना मॅडम, आता मी टेन्शन घेत नाही. उगाचच भिऊनही राहात नाही. उद्या रात्री पार्टी नक्की होणार. तुम्ही सरांना अन् मुलांना घेऊन वेळेवर पोहोचा.’’ रंजनाने हसून त्यांचा निरोप घेत म्हटलं.

रंजनाने त्यांची परवानगी न घेता ऑफिस स्टाफला पार्टी द्यायची ठरवलंय हे ऐकून तिची सासू एकदम भडकली. ज्वालामुखीचा स्फोट म्हणायला हरकत नाही.

‘‘आम्हाला न विचारता असे निर्णय घ्यायचा हक्क तुला कुणी दिला, सूनबाई? इथल्या शिस्तीप्रमाणे, नियमांप्रमाणे वागायचं नसेल तर सरळ वेगळं घर करून राहा.’’

‘‘आई, ते सगळे माझ्या इतके मागे लागले होते की काय सांगू? पण तुम्हाला जर ते आवडलं नसेल तर मी सगळ्यांनाच फोन करून पार्टी कॅन्सल केल्याचं कळवून टाकते,’’ अगदी शांतपणे बोलून रंजनाने तिथूच काढता पाय घेतला. ती सरळ स्वयंपाकघात जाऊन कामाला लागली.

सासू अजूनही संतापून बडबडत होती. तेवढ्यात रंजनाची नणंद म्हणाली, ‘‘आई, वहिनीला जर स्वत:च्याच मर्जीने वागायचं आहे तर तू उगीचच आरडाओरडा करून स्वत:चं अन् आमचंही डोकं का फिरवते आहेस? तू इथे तिच्या नावाने शंख करते आहेस अन् ती मजेत आत गाणं गुणगुणते आहे. स्वत:चाच पाणउतारा करून काय मिळतंय तुला?’’

संतापात आणखी तेल ओतणारं आपल्या लेकीचं वक्तव्य ऐकून सासू अधिकच बिथरली. खूप वेळ तिची बडबड सुरूच होती.

रंजना मात्र शांतपणे कामं आवरत होती. सर्व स्वयंपाक तिने व्यवस्थित टेबलवर मांडला अन् मोठ्यांदा म्हणाली, ‘‘जेवायला चला, जेवण तयार आहे.’’

सगळी मंडळी डायनिंग टेबलाशी येऊन बसली. नणंद, सासू अन् नवऱ्याच्या चेहऱ्यावर राग अजून दिसत होता. सासरे मात्र हल्ली निवळले होते. सुनेशी चांगलं वागायचे. पण सासू त्यांना सतत धाकात ठेवायची. आत्ताही ते काही तरी हलकंफुलकं संभाषण काढून वातावरण निवळावं असा प्रयत्न करत होते पण सासूने एक जळजळीत दृष्टिक्षेप त्यांच्याकडे टाकून त्यांना गप्प बसवलं.

रंजना अगदी शांत होती. प्रेमाने सर्वांना वाढत होती. नणंदेच्या कडवट खोचक बोलण्यावर ती हसून गोड भाषेत उत्तर देत होती. सासूला रंजनाच्या गप्प बसण्यामुळे भांडण वाढवता आलं नाही.

आपल्या खोलीत ती पोहोचली तेव्हा मोहितनेही आपला राग व्यक्त केलाच. ‘‘इतर कुणाची नाही तर निदान माझी परवानगी तरी तू निर्णय घेण्यापूर्वी घ्यायला हवी होतीस. मला तुझा निर्णय मान्य नाही. मी उद्या पार्टीला असणार नाही.’’

खट्याळपणे हसत, खांदे उडवून रंजनाने म्हटलं, ‘‘तुमची मर्जी.’’ अन् त्याला काही कळायच्या आत त्याच्या गालावर एक चुंबन देऊन ती वॉशरूमकडे गेली.

रात्री बारा वाजता रंजनाच्या मोबाइलचा अलार्म वाजल्यामुळे दोघांचीही झोप मोडली. ‘‘हा अलार्म का वाजतोए?’’ मोहितने तिरसटून विचारलं.

‘‘हॅप्पी मॅरेज अॅनव्हसरी स्वीट हार्ट.’’ त्याच्या कानाशी ओठ नेऊन अत्यंत प्रेमासक्त स्वरात रंजनाने म्हटलं.

रंजनाचा लाडिक स्वर, तिच्या देहाला येणारा सेंटचा मादक सुगंध अन् डोळ्यातलं आमंत्रण बघून मोहित तर राग विसरला, सुखावला अन् त्याने रंजनाला मिठीत घेतलं.

त्या रात्री रतिक्रीडेत आपलं सर्व कौशल्य पणाला लावून रंजनाने मोहितला तृप्त केलं. नकळत तो बोलून गेला. ‘‘इतकी चांगली गिफ्ट दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे.’’

तिरप्या नजरेने त्याच्याकडे बघत, रंजनाने विचारलं, ‘‘उद्या माझ्याबरोबर चलाल ना?’’

‘‘पार्टीला?’’ मघाचं सर्व प्रेमबीम विसरून मोहितने कपाळावर आठ्या घालत विचारलं.

‘‘इश्श! मी सकाळी पार्कात फिरायला जाण्याबद्दल विचारत होते.’’

‘‘असं होय? जाऊयात की!’’

‘‘खरंच? किती छान आहात हो तुम्ही.’’ त्याला मिठी मारत रंजनाने शांतपणे डोळे मिटून घेतले.

सकाळी सहालाच उठून रंजनाने आपलं आवरलं. छानपैकी तयार झाली. जागा झालेल्या मोहितने तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘यू आर ब्यूटीफूल.’’ रंजनाला हे कौतुक सुखावून गेलं.

मोहित तिला जवळ घेणार तेवढ्यात त्याला चुकवून हसत हसत ती खोलीबाहेर पडली.

स्वयंपाकघरात जाऊन तिने सर्वांसाठी चहा केला. सासूसासऱ्यांच्या खोलीत चहाचा ट्रे नेऊन ठेवला अन् त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

चहाचा कप हातात घेत सासूशी रागाने तिच्याकडे बघत विचारलं, ‘‘सकाळी सकाळीच माहेरी जाते आहेस का?’’

‘‘आम्ही पार्कात फिरायला जातोए, आई,’’ अगदी नम्रपणे रंजनाने म्हटलं.

सासूबाईंनी काही म्हणण्याआधीच सासरे चहा पिता पिता म्हणाले, ‘‘जा, जा, सकाळी फिरणं आरोग्याला हितकारक असतं. तुम्ही अवश्य जा.’’

‘‘जाऊ ना, आई?’’

‘‘कुठलंही काम करण्यापूर्वी माझी परवानगी घेणं कधी सुरू केलंस, सूनबाई?’’

आपला राग व्यक्त करण्याची संधी सासूबाईंनी सोडली नाही.

‘‘आई, तुम्ही माझ्यावर अशा रागावत जाऊ नका ना? आम्ही लवकरच येतो,’’ म्हणत लाडक्या लेकीने आईच्या गळ्यात पडावं तशी ती सासूच्या गळ्यात पडली अन् त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांच्या गालाचा हलकेच मुका घेऊन प्रसन्न वदनाने खोलीबाहेर पडली.

बावचळलेल्या सासूला बोलणं सुधरेना. सासरे मात्र खळखळून हसले.

मोहित आणि ती पार्कात पोहोचली तेव्हा तिथे त्यांच्या परिचयाचे अनेक लोक वॉकसाठी आले होते. वॉक घेऊन ती दोघं तिथल्या प्रसिद्ध हलवायाच्या दुकानात गेली. दोघांनी फेमस आलू कचोरी अन् जिलेबी खाल्ली. घरच्या लोकांसाठी बांधून बरोबर घेतली.

आठ वाजता ती घरी पोहोचली अन् बरोबर आणलेल्या वस्तू ब्रेकफास्ट टेबलवर मांडून सर्वांना खायला बोलावलं. इतका चविष्ट अन् रोजच्यापेक्षा वेगळा नाश्ता बघूनही सासू व नणंदेची कळी खुलली नाही.

दोघीही रंजनाशी बोलतंच नव्हत्या. सासरेबुवांना आता काळजी पडली. बायको अन् मुलगी दोघींचीही सुनेच्या बाबतीतली वागणूक त्यांना अजिबात आवडत नव्हती. पण ते बोलू शकत नव्हते. एक शब्द जरी ते सुनेची कड घेऊन बोलले असते तर मायलेकींनी त्यांना फाडून खाल्लं असतं.

ब्रेकफास्ट अन् दुसरा चहा आटोपून रंजना आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने ती खूप छान नटूनथटून आली अन् स्वयंपाकाला लागली. नणंदेने तिला इतकी सुंदर साडी स्वयंपाक करताना नको नेसू असं सुचवलं, त्यावर ती हसून म्हणाली, ‘‘त्याचं काय आहे वन्स, तुमच्या भावाने आज या साडीत मी फार छान दिसतेय असं म्हटलं आहे. त्यामुळे आता ही साडी अन् हा सगळा साजशृंगार मी रात्रीच उतरवणार आहे.’’

‘‘अगं, पण इतक्या महाग साडीवर डाग पडतील, ती भिजेल, चुरगळेल याची भीती किंवा काळजी नाही वाटत तुला?’’

‘‘भीती अन् काळजीला तर मी कधीच ‘बाय बाय’ केलंय, वन्स.’’

‘‘माझ्या मते एखादा मूर्खच आपल्या वस्तुच्या नुकसानीची काळजी करत असेल.’’ संतापून मेधा म्हणाली.

‘‘मला वाटतं, मी मूर्ख नाहीए, पण तुमच्या भावाच्या प्रेमात मात्र पार वेडी झाले आहे. कारण तो फार चांगला आहे, तुमच्यासारखाच!’’ हसत हसत रंजनाने लाडाने मेधाचा गालगुच्चा घेतला अन् तिची गळाभेट घेतली. अकस्मात घडलेल्या या प्रसंगाने मेधा बावचळली, गोंधळली अन् मग स्वत:ही हसायला लागली.

रंजनाने फक्त एक भाजी बाहेरून मागवली होती. बाकी सर्व स्वयंपाक तिने घरीच केला होता. ‘पनीर पसंदा’ ही भाजी मोहितला अन् मेधाला फार आवडते त्यासाठी तिने मुद्दाम ती बाहेरून मागवली होती.

जेवायला सर्व मंडळी टेबलापाशी आली तेव्हा आवडता मेन्यू बघून मेधाची कळी खुलली मात्र सासूबाईंनी राग बोलून दाखवलाच.

‘‘हल्लीच्या मुलींना ना, उठसूठ पैसे खर्च करायचा सोस आहे. पुढे येणारा काळ कसा असेल सांगता येत नाही, त्यासाठीच आधीपासून बचत करून पैसा शिल्लक टाकावा लागतो. जे लोक पैसा वाचवत नाहीत त्यांना पुढे पश्चात्ताप करावा लागतो.’’

रंजनाने वाढता वाढता हसून म्हटलं, ‘‘खरंच आई, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे.’’ त्यानंतर जेवणं मजेत झाली. सासूच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत त्यांच्या प्रत्येक गोष्टीला रंजना हसून प्रतिसाद देत होती.

त्या दिवशी गिफ्ट म्हणून मोहितला शर्ट अन् रंजनाला साडी मिळाली. त्यांनीही मेधाला तिचा आवडता सेंट, आईंना साडी अन् बाबांना स्वेटर दिला. गिफ्टच्या देवाण-घेवाणीमुळे घरातलं वातावरण जरा आनंदी अन् चैतन्यमय झालं.

सगळ्यांनाच ठाऊक होतं रात्री आठ वाजता ‘सागररत्न’मध्ये पार्टी आहे. पण सहाच्या सुमारास जेव्हा मोहित हॉलमध्ये आला तेव्हा एकूणच वातावरण भयंकर टेन्स असल्याचं त्याला जाणवलं.

‘‘तुम्हाला पार्टीला जायचं आहे तर आमच्या परवानगीविना जा,’’ त्याच्याकडे लक्ष जाताच आईने ठणकावून सांगितलं.

‘‘आज खरं म्हणजे आपण सगळे मिळून कुठे फिरायला किंवा सिनेमाला गेलो असतो तर चांगलं झालं असतं,’’ मेधाने फुणफुण केली.

‘‘रंजना पार्टीला जायचं नाही, म्हणतेय,’’ मोहितच्या या बोलण्यावर ती तिघंही दचकली.

‘‘सूनबाई पार्टीला का जाणार नाही म्हणतेय?’’ काळजीच्या सुरात बाबांनी विचारलं.

‘‘तिचं म्हणणं आहे, तुम्ही तिघं पार्टीला आला नाहीत, तर तीही पार्टीला जाणार नाही.’’

‘‘अरे व्वा? नाटक करायला छान येतंय सुनेला,’’ वाईट तोंड करत सासूबाई वदल्या.

मोहित डोळे मिटून सोफ्यावर गप्प बसून होता. त्या तिघांचेच वाद सुरू होते.

शेवटी बाबांनी अल्टिमेटम दिलं. ‘‘आपल्या सूनबाईचा असा अपमान करण्याचा काहीच हक्क नाहीए. तिच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचा आपल्याबद्दल किती वाईट समज होईल याचा विचार करा. अन् शेवटचं सांगतोय, तुम्ही दोघी पटापट आवरा अन् आपण निघूयात. तुम्ही माझं ऐकलं नाही तर आजपासून मी या घरात जेवण घेणार नाही.’’ बाबांची धमकी मात्र लागू पडली.

सर्व कुटुंब अगदी बरोबर वेळेत ‘सागर रत्न’ला पोहोचलं. रंजनाच्या सहकाऱ्यांचं स्वागत सर्वांनी मिळून, प्रेमाने, आपलेपणाने केलं. संपूर्ण कुटुंब असं प्रसन्न मुद्रेत बघून सर्व पाहुणे मनोमन चकित अन् हर्षिंत झाले होते.

पार्टी छानच झाली. भरपूर गिफ्ट्स मिळाल्या. हास्यविनोदात वेळ इतका छान गेला. त्यासोबत चविष्ट जेवण. होस्ट अन् गेस्ट सगळेच खूष होते.

संगीता मॅडमने तेवढ्यात रंजनाला एकटीला एकीकडे गाठून विचारलं, ‘‘कसं काय राजी केलंस तू सर्वांना?’’

रंजनाचे डोळे चमकले. हसून ती म्हणाली, ‘‘आज मी तुम्हाला माझ्यातला बदल कसा झाला ते सांगते.’’

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी खूप रडले. दु:खी झाले. रात्री पलंगावर पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं, मला रडताना बघून त्यावेळी कुणी हसत नव्हतं. पण मला उदास, दु:खी बघून माझ्या सासूच्या व नणंदेच्या डोळ्यांत आसूरी आनंद दिसत होता. त्यावेळी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की घरातल्या खास आनंदाच्या प्रसंगी कुरापत काढून, समारंभाचा विचका करून, दुसऱ्याला दु:खी करूनच काही लोकांना आनंद मिळतो. हा साक्षात्कार झाला अन् मी ठरवलं यापुढे या लोकांना तशी संधीच द्यायची नाही. आपला आनंद आपण जपायचा. विनाकारण वाद घालायचा नाही. चेहरा पाडायचा नाही, गप्प बसायचं, प्रसन्न राहायचं.

लोकांना मी दोन कॅटेगरीत टाकलंय. काही लोक माझ्या आनंदाने सुखावतात, आनंदी होतात. काहींना माझा आनंद सहन होत नाही. मी या दुसऱ्या कॅटेगरीतल्या लोकांना भाव देत नाही. त्यांना जे करायचं आहे ते करू देत, आपण शांतच राहायचं. प्रेमाने वागायचं.

आता वन्स काय, सासूबाई काय कुणीच मला चिडवू शकत नाहीत, रडवूही शकत नाहीत. मोहितलाही मी सतत तृप्त ठेवते. त्यामुळे आमच्यात भांडणं होत नाहीत अन् तोही माझं ऐकतो.

पूर्वी मी रडायची. आता हसत असते. आपला आनंद, आपल्या मनाची शांतता का म्हणून कुणाला हिरावून घेऊ द्यायची?

ज्यांना मला दु:खी करायचं असतं, ते मला प्रसन्न बघून स्वत:च चिडचिडतात, त्रासतात. मला काहीच करावं लागत नाही अन् त्यांना धडा मिळतो. माझ्या शुभचिंतकांना तर माझा आनंद हवाच असतो. मीही प्रसन्न तेही प्रसन्न!

आता माझ्या दोन्ही हातात लाडू आहेत. मी मजेत जगते आहे. एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली आहे की आपण आनंदी राहातो तेव्हा आपला राग करणारी माणसंही हळूहळू निवळतात. माझी सासू अन् नणंद त्यामुळेच इथे आल्या आहेत आणि त्यांच्या येण्याने मी अधिकच आनंदात आहे.

संगीता मॅडमनने प्रेमाने तिला आलिंगन देत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ‘‘तुझ्यासारखी सून सर्वांना मिळो गं पोरी…अगदी मलासुद्धा!’’ त्या कौतुकाने बोलल्या.

‘‘व्वा! मॅडम किती छान कॉम्प्लिमेंट दिलीत. थँक्यू व्हेरी मच.’’ त्यांच्याशी हस्तांदोलन करताना रंजनाच्या डोळ्यांत अश्रू आले पण ते आनंदाचे अन् समाधानाचे होते.

प्रिय दादा

कथा * कुसुम आठले

श्रावणाचा महिना. दुपारचे तीन वाजलेले. पाऊस पडत असल्यामुळे हवेत सुखद गारवा होता, पण बाजारात वर्दळ नव्हती. सायबर कॅफेत काम करणारे तीन तरूण चहाचे घुटके घेत गप्पा मारत होते. आतल्या एक दोन केबिनमध्ये मुलं व्हिडिओ गेम खेळण्यात मग्न होती. दोन किशोरवयीन मुलं दुपारच्या निवांतपणाचा फायदा घेत मनाजोगत्या साईट उघडून बसली होती.

तेवढ्यात एका स्त्रीनं तिथं प्रवेश केला. तरूण तिला बघून दचकले, कारण खूपच दिवसांनी दुपारच्या वेळात कुणी स्त्री त्यांच्या कॅफेत आली होती. त्यांनी घाईघाईनं चहा संपवून आपापल्या विभागाकडे धाव घेतली.

स्त्री चांगल्या घराण्यातली दिसत होती. राहणी अन् चालण्यातून सुसंस्कृतपणा जाणवत होता. शिक्षणामुळे येणारा आत्मविश्वास हालचालींमधून कळत होता. तिनं छत्री मिटून तिथल्याच एका बादलीत पाणी निथळण्यासाठी ठेवली. केस नीट केले, मग काउंटरवर बसलेल्या मुलाला म्हणाली, ‘‘मला एक पत्र टाइप करून घ्यायचं आहे…मी केलं असतं, पण मला मराठी टायपिंग येत नाही…’’

‘‘तुम्ही मजकूर सांगाल की…’’

‘‘होय, मी बोलते, तू टाइप कर. शुद्धलेखन चांगलं आहे ना? करू शकशील नं?’’

मुलगा किंचित बावरला, पण म्हणाला, ‘‘करतो की!’’

ती बोलायला लागली, ‘‘प्रिय दादा, माझ्याकडून ही शेवटची राखी तुला पाठवते आहे, कारण यापुढे तुला राखी पाठवणं मला जमणार नाही. तू गैरसमज करून घेऊ नकोस. माझी तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाहीए, कारण तो हक्क तू फार पूर्वीच गमावला आहेस.’’

ती काही क्षण थांबली. तिचा चेहरा लाल झाला होता. ‘‘पाणी मिळेल का प्यायला?’’ तिनं विचारलं.

‘‘हो, देतो,’’ म्हणत त्या तरूणानं तिला पाण्याची बाटली दिली. बाई पुढे काय सांगते आहे याबद्दल त्याला उत्सुकता होती. त्याला यात काही तरी गुढ आहे असं वाटू लागलं होतं.

ती पाणी प्यायली, चेहऱ्यावरून रूमाल फिरवला अन् ती मजकूर सांगू लागली, ‘‘किती सुखी कुटुंब होतं आपलं. आपण पाच बहीणभाऊ, तू सर्वात मोठा अन् सुरूवातीपासून आईचा फारच लाडका. बाबांची साधीशी नोकरी होती, पण तुला शिकायला शहरात पाठवलं. बाबांची अजिबात इच्छा नव्हती. पण बाबांच्या इच्छेविरूद्ध जाऊन आईनं तुझी इच्छा पूर्ण केली. त्यासाठी तिनं दोन दिवस उपोषण केलं होतं हे तू ही विसरला नसशील. तुला मेडिकल कॉलेजात अॅडमिशन मिळाली, तेव्हा मी ओरडून ओरडून मैत्रिणींना बातमी दिली होती. त्यांना माझा हेवा वाटला होता. एकीनं तर मुद्दाम म्हटलं होतं, ‘‘तुलाच मेडिकलला प्रवेश मिळाल्यासारखी नाचते आहेस.’’ मी ही आढ्यतेनं म्हटलं होतं, ‘‘दादा असो की मी, काय फरक पडतोय? आम्ही एकाच आईची मुलं आहोत. आमच्या शरीरात रक्त तेच वाहतंय…’’ दादा मी चुकीचं बोलले होते का?

‘‘तू होस्टेलला राहत होतास, जेव्हा घरी यायचास, मी अन् आई सोनेरी स्वप्नांत दंग होत असू. आई स्वप्नं बघायची, तुझं छानसं क्लिनिक आहे. प्रसन्न चेहऱ्यानं, प्रेमळ हसू चेहऱ्यावर घेऊन तू पेशंट तपासतो आहेस, पेशंटची रांग संपता संपत नाहीए. जाताना प्रत्येक पेशंट आदरानं नमस्कार करतो. पैसे देतो व तुझा ड्रॉवर पैशानं ओसंडून वाहतो…ते सगळे पैसे आणून तू आईच्या पदरात ओततोस…आईचा चेहरा आनंदानं, कृतार्थतेनं डवरून येतो…तू आईशी असंच बोलायचा म्हणून ती स्वप्नं बघायची.

‘‘मी स्वप्नं बघायची की मी नववधूच्या वेषात उभी आहे. देखणा, संपन्न घरातला, भरपूर पगाराची नोकरी असणारा माझा नवरा शेजारी उभा आहे. माझ्या पाठवणीसाठी आणलेल्या कारला तू फुलांनी सजवतो आहेस. मला कारमध्ये बसवताना आपण एकमेकांना मिठी मारून रडतो आहेत…

‘‘बाबा व्यवहारी होते. ते आम्हाला अशा स्वप्नातून जागं करायला बघायचे पण आम्हा मायलेकींची झोपेतून जागं व्हायची इच्छाच नसायची. तुझ्या गोड गोड बोलण्यानं तू आम्हाला झुलवत, भुलवत होतास.

‘‘इतर दोघी बहिणी अन् एक भाऊ अजून शिकत होते. पण आईला तुझ्या लग्नाची स्वप्नं पडू लागली होती. सुंदर, शालीन, नम्र सून तिला घरात वावरताना दिसायची. सासू म्हणून मिरवताना तिचा चेहरा अभिमानांनं फुलून यायचा. सुनेच्या माहेराहून मिळालेल्या भेटवस्तूंनी आमचं कायम अभावानं ग्रस्त घर भरून गेलेलं दिसायचं.

‘‘तू होस्टेलहून घरी यायचास, आई किती किती पदार्थ बनवून तुला खायला घालायची. बरोबर डबेही भरून द्यायची. हे सगळं करताना तिला कुठून, कशी शक्ती मिळायची मला कळत नसे. एरवी ती सदैव डोकेदुखीनं वैतागलेली असायची.

‘‘आमची स्वप्नं पूर्ण होऊ घातली होती. तुला डिग्री मिळाली होती. होस्टेलचं सामान आवरून तू घरी यायला निघाला असतानाच तुला लग्नाचा एक प्रस्ताव आला. तुझी वर्गमैत्रीण…तिच्या वडिलांनी तुला बरोबर हेरला होता. तू आईला ही बातमी सांगितलीस अन् आईला खूप आनंद झाला. डॉक्टर सून घरी येणार म्हणजे घरात दुप्पट पैसा येणार हा तिचा भाबडा समज. आई स्वत:च्या भाग्यावर बेहद्द खुष होती. सगळ्या आळीत घरोघरी जाऊन सांगून आली, ‘‘येणारी सूनही डॉक्टर आहे.’’ मी मात्र उगीचच शंकित होते.

‘‘तुझं लग्नं झालं अन् घरात उरले मी…माझ्या लग्नाची काळजी आईला होती.

आईनं तुला विश्वासात घेऊन सांगितलं, ‘‘हे बघ, छोटीसाठी मी थोडे फार दागिने केले आहेत…काही पैसेही साठवून ठेवले आहेत. तू छोटीसाठी छानसा नवरा शोध…तू इथंच राहतो आहेस म्हटल्यावर बाकीची सोय तू बघशीलच!! भाऊ भावजय डॉक्टर आहेत म्हटल्यावर चांगलं स्थळ मिळेलच.’’

‘‘सगळं बरं चाललंय म्हणतोय तोवर एक दिवस वहिनीनं घरात फर्मान काढलं.

‘‘या गावात क्लिनिक काढून फायदा नाही. क्लिनिकसाठी अद्ययावत यंत्रं लागतात. ती घ्यायला तुमच्याकडे पैसा नाही. त्यापेक्षा नोकरी चांगली. माझ्या वडिलांनी आमच्या दोघांसाठी चांगली नोकरी बघितली आहे…आम्ही तिकडेच जातो.’’

‘‘अन् तुम्ही दोघं निघून गेलात. त्यानंतर जेव्हा जेव्हा तू यायचास तेव्हा तुझ्याबरोबर वहिनीनं केलेल्या मागण्यांची अन् आपल्या घराबद्दलच्या असंख्य तक्रारींची यादी असायची. बाबांकडे तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं बळ नव्हतं. इतर तीन भावंडांची काळजी होती. त्यांची शिक्षणं, त्यांची लग्नं…वहिनीचा तोरा, तुझा मिंधेपणा, आईची झालेली निराशा हे सगळं बघून त्यांनी आपापली शिक्षणं पटापट आटोपती घेतली. दोघी ताईंनी सामान्य परिस्थितीतल्या बऱ्यापैकी मुलांशी लग्न करून गरीबीचेच संसार थाटले. रमेश भाऊनं एक छोटीशी नोकरी शोधून घरखर्चाला हातभार लावायचा प्रयत्न केला…दादा, त्या काळात तुझ्या चेहऱ्यावर असहायता अन् काळजीचा संगम मी बघत होते. तुझा हसरा आनंदी स्वभाव पार बदलला होता. तू कायम चिडचिडा अन् तणांवात असायचास.

वहिनीच्या मते तिची सासू गावंढळ, बावळट होती, सासरे हुकुमशहा होते अन् धाकटी नणंद म्हणजे मी त्यांच्यावरचं एक ओझं होते. तुला वाटायचं आईनं वहिनीला समजून घ्यावं. आईत तेवढं बळंच नव्हतं. ती पार कोलमडली होती. समजून घेण्याची जबाबदारी खरं तर वहिनीची होती, पण तिच्यात तो गुणच नव्हता. तू ही आम्हाला वहिनीच्या दृष्टीनंच बघायला लागला होतास…काही अंशी तुझा नाइलाज होता, काही अंशी स्वार्थ…एक दिवस तू ही सांगून टाकलंस की मला एकच काहीतरी निवडायला लागेल.

‘‘आईनं इथंही तिचं प्रेम उधळून दिलं. तू तुझ्या संसारात सुखी रहावंस म्हणून तुला आमच्यापासून कायमचं मुक्त केलं.

‘‘त्यानंतर क्वचितच तू घरी यायचास, एखाद्या परक्या माणसासारखा पण हक्कानं पाहुणचार वसूल करून निघून जायचास. बाबांनी माझ्याकरता स्थळ शोधलं, लग्नही करून दिलं. पण मनांतून मला वाटायचं, तू असतास तर नक्कीच माझ्यासाठी याहून चांगलं स्थळ शोधलं असतंस. मी तुझी किती वाट बघत होते. पण तू अगदी शेवटच्या क्षणी आलास. बाबांनी अन् गरीबीत संसार करणाऱ्या माझ्या बहीण भावानं जमलं तसं माझं लग्न करून दिलं.

‘‘मी सासरी गेल्यावर आई अजूनच एकटी झाली. मी कधी माहेरी गेले तर तिच्या भकास डोळ्यात फक्त तूच दिसायचा. ती म्हणायची, ‘‘दादाला फोन कर गं! कसा आहे, ते विचार, घरी का येत नाही ते विचार, एकदा तरी घरी येऊन जा. घरी येणं बंदच केलंय…’’ ती रडायला लागे. बाबा पुरूष होते. त्यांना रडता येत नव्हतं. पण दु:ख त्यांच्याही चेहऱ्यावर दिसायचं. आईकडे सगळं असूनही काहीच नव्हतं, कारण तिचा लाडका मुलगा रागावून निघून गेला होता. ती मलाच विचारायची, ‘‘माझं काय चुकलं गं? दादाला शिकायला बाहेर पाठवलं हे चुकलं की डॉक्टर सून केली, हे चुकलं?’’ खरं तर तिचं काहीच चुकलं नव्हतं.

‘‘वडिलांनी दादाची आशा सोडली होती. पण आईची माया चिवट होती. बाबांना चोरून, लपवून ती दादाला पत्र लिहित असे. शेजारपाजारच्या मुलांकरवी ते पोस्टात पडेल असं बघायची. पाच सात पत्रानंतर वहिनीचं खडसावल्यासारखं पत्र यायचं, ‘‘बंद करा हे सगळं. आम्हाला सुखानं जगू द्या. किती छळणार आहात?’’

‘‘आई शेवटच्या घटका मोजत होती. पण दादा, तू आला नाहीस. तुला भेटायची आस मनी बाळगून, तुझं नाव घेत आईनं प्राण सोडला. तुला कळवल्यावर तू आलास पण तिचं क्रियाकर्म झाल्यावर…कदाचित आईचं क्रियाकर्म करण्याचा हक्क आपण गमावला आहे, हे तुला समजलं होतं.

‘‘आई तुझं नाव जपत मरून गेली. तुझी वाट बघत होती. पण मरतानाही तुझा वाटा माझ्याजवळ देऊन गेली. कारण ती आई होती. मी ही ते नाकारलं नाही, ठेवून घेतलं तुझ्यासाठी, कारण मी बहीण होते. पण दादा, तू मुलगा म्हणून कमी पडलास.

‘‘दादा, स्वार्थ माणसाला इतकं आंधळं करतो की सगळी नातीच विसरून जावीत? तू असा कधीच नव्हतास. सगळा दोष वहिनीला देऊ नकोस, प्रत्येक गोष्ट तिच्या इच्छेनं करताना एखादी तर गोष्ट स्वत:च्या इच्छेनं करण्याचं धाडस तू का दाखवू शकला नाहीस? तुला जर नात्याची किंमतच नाहीए तर माझी राखी न मिळाल्यामुळे तू विचलित का होतोस? मला कुणी तरी तुझा निरोप पोहोचवतो की यंदा तुला राखी मिळाली नाही…

‘‘दादा, राखी पाठवणं अन् ती मिळणं, एवढ्यातच राखीचा सण समावला आहे का? त्यासाठी जबाबदारीसुद्धा घ्यावी लागते. आज पंचवीस वर्षांत तुझी माझी गाठभेट नाही, तू माझ्याकडे आला नाहीस, मला कधी बोलावलं नाहीस, एवढ्या वर्षांत फक्त माझ्याकडून पाठवली जाणारी राखीच एखाद्या नाजूक तंतूसारखी जीव तगवून होती. पण आता तो धागाही तुटणार आहे. कारण राखी पाठवण्याची माझी इच्छाशक्ती आणि राखीवरचा माझा विश्वासही मोडीत निघाला आहे.

‘‘दादा, मला एकच सांग, घरात आम्ही तिघी बहिणी नसतो तर तू आईबाबांना टाकून गेला असतास? बहिणींची जबाबदारी हेच तुझ्या निघून जाण्याचं कारण होतं ना? अरे, पण आमच्या तुझ्याकडून खरोखरंच काही अपेक्षा नव्हत्या रे! तू एकदाच, फक्त एकदाच आमच्याशी बोलून तुझा प्रॉब्लेम, तुझी चिंता, तुझं दु:ख सांगायचं होतंस…काही तरी उपाय शोधता आला असता. ठीक आहे. आता जर तुला जमलंच तर माझी ही राखी माझी शेवटची आठवण म्हणून तुझ्याकडे जपून ठेव. तुझ्या हृदयात नसली तरी तुझ्या भल्या मोठ्या बंगल्यात तिच्यापुरेशी जागा नक्कीच असेल.’’

मजकूर सांगता सांगता ती स्त्री दु:खी आणि भावनाविवश होऊन थरथरंत होती, पण तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र आले नाहीत. कदाचित तिचे अश्रू आटले असतील, मजकूर लिहून घेणाऱ्याचे डोळे मात्र पाणावले होते.

काम पूर्ण झालं होतं. त्या स्त्रीनं तरूणाला म्हटलं, ‘‘याची एक कॉपी काढून मला दे, ती मी माझ्या दादाला पाठवेन, तुला सांगते, पंचवीस वर्षांनंतर प्रथमच मी हे सर्व लिहिण्याचं धाडस केलंय. इतकी वर्ष मी फक्त सर्वात धाकटी बहीण म्हणूनच जगले.

‘‘एक काम तू आणखी कर. हे माझं पत्र, माझा संदेश, इंटरनेटवरून अशा ब्लॉगवर जाऊ देत ज्यामुळे जास्तीत जास्त लोक तो वाचतील. जगात माझ्या दादासारखे अजूनही काही भाऊ असतील, ज्यांच्याकडून अशी चूक घडली असेल, निदान त्यांना ती चूक सुधारण्याची संधी मिळेल. हा संदेश माझ्या आईला अंतिम श्रद्धांजली म्हणून देते आहे. ती बिचारी मुलाच्या भेटीची आस अन् तो न येण्याचं दु:ख उराशी कवटाळून मरून गेली. तिच्या आत्म्याला निदान यामुळे शांती लाभेल.’’

करायला गेली एक

कथा * राजलक्ष्मी भोसले

‘‘अहो, आज ऑफिसातून येताना जरा भाजी आणाल का?’’ घराला कुलूप घालता घालता संगीतानं म्हटलं.

राहुलनं रागानं तिच्याकडे बघितलं, ‘‘का? तुला काय झालंय? रोज तूच आणतेस ना?’’

‘‘हो…पण आज मला घरी यायला बऱ्यापैकी उशीर होईल. आईकडे जायचंय. तिची तब्येत बरी नाहीए.’’

हे ऐकताच राहुलचं डोकं तापलं, ‘‘तुला तर रोजच माहेरी जायला काहीतरी निमित्त हवं असतं. कधी आईची तब्येत बरी नाही, कधी बाबांचा मूड ठीक नाही,’’ चिडक्या आवाजात राहुल बडबडला.

राहुलचं बोलणं ऐकून संगीता रडवेली झाली. ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. लग्न ठरवतानाच तिनं राहुलला व सासूसासऱ्यांना सांगितलं होतं की लग्न झाल्यावरही आईबाबांची काळजी तिला घ्यावी लागेल. त्यावेळी तर राहुलनं अगदी आनंदानं संमती दिली होती. पण आता जेव्हा ती आईकडे जायचं म्हणते राहुल असाच रिएक्ट होतो. एरवी ती शांतपणे ऐकून घेते. समंजसपणे दुर्लक्षही करते, पण आज मात्र ती खूपच दुखावली गेली. थोडी चिडूनच म्हणाली, ‘‘ठीक आहे. मीही आता परत येणार नाही. तिथंच राहीन.’’

राहुलनं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं. तिला तिच्या बसस्टॉपवर सोडून तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.

संगीताचा मूड आज एकदमच वाईट होता. बस आल्यावर ती त्याच मन:स्थितीत बसमध्ये चढली. ऑफिसमध्ये गेली. कशाबशा काही फायली तिनं हातावेगळ्या केल्या. पण मन कामात लागेना. गडबडीत लंच बॉक्सही घरीच विसरली होती. ती ऑफिसातून निघाली अन् थेट तिच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचली.

दारात संगीताला बघताच आनंदानं रितूनं तिला मिठीच मारली. नंतर तिच्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघत तिनं विचारलं, ‘‘काय झालं गं?’’ राहुलशी भांडलीस का?

‘‘छे छे, तसं काही नाहीए,’’ संगीता म्हणाली.

‘‘अस्स? म्हणजे आता तुला माझ्याशी खोटं बोलावं लागतंय तर?’’ रितूनं नाराज होत म्हटलं.

‘‘नाही गं! तुझ्यापासून काय लपवायचं? तुला तर सगळं ठाऊकच आहे,’’ संगीता म्हणाली.

‘‘बरं तू बस, मी आले,’’ रितूनं तिला सोफ्यावर बसवलं अन् प्यायला पाणी दिलं. मग पटकन् आत जाऊन तिनं जेवणाची दोन ताटं तयार केली अन् संगीताला   स्वत:बरोबर जेवायला लावलं.

पोटात अन्न गेल्यावर संगीतालाही जरा बरं वाटलं. ‘‘आता सांग, तुझ्या सुंदर चेहऱ्यावर काळजीचे ढग का आले आहेत,’’ रितूनं म्हटलं.

‘‘अगं काय सांगू? रोजच्या कटकटींनी जीव वैतागलाय. कधीही माहेरी जायचं नाव काढलं की राहुल भडकतोच! तुला माहीत आहे की मी आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. त्यांना माझी गरज भासते. त्यांना माझ्याखेरीज कुणीही नाही. लग्नापूर्वीच हे मी त्याला सांगितलं होतं की मला आईबाबांची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा तर अगदी उदारपणे ‘हो’ म्हटलं अन् आता आपल्या शब्दाला जागत नाहीए.’’

‘‘म्हणजे पुन्हा तुझ्या माहेरी जाण्यावरुन तुमचं वाजलं अन् तुझा मूड गेलाय,’’ रितूनं म्हटलं, ‘‘पण काळजी नको करूस. आपण यावर उपाय शोधूयात.’’

‘‘कसला बोडक्याचा उपाय? मला तर काही सुचेनासं झालंय…एकीकडे आईबाबा अन् दुसरीकडे राहुल. दोघंही माझेच…अतीव प्रेमाचे…पण दोघांच्या प्रेमात माझं मात्र पार सॅण्डविच झालंय. कधी कधी तर वाटतं की सगळं सोडून कुठंतरी दूर निघून जावं,’’ संगीता म्हणाली.

‘‘खरंय तुझं. कुठंतरी जायला हवं. म्हणजेच राहुलला कळेल की बायको घरात नसली तर घर कसं खायला उठतं.’’ रितूनं म्हटलं.

‘‘म्हणजे तुला माझं म्हणणं पटतंय तर…’’

‘‘पटतंय ना? उगीच थोडी म्हणतेय मी?’’

‘‘पण जायचं कुठं? हीच तर समस्या आहे.’’

‘‘कुठंही जायची गरज नाही. इथं माझ्याकडेच राहा. वरूण एक महिन्यासाठी अमेरिकेला गेलाय. घरी मी एकटीच आहे. आपण दोघी मजेत राहू.’’

‘‘हे तर फारच छान झालं. मी चार दिवस इथंच थांबते. उद्याच ऑफिसमध्ये रजेचा अर्ज देते,’’ संगीता समाधानानं म्हणाली.

‘‘राहुलला काहीच कळू द्यायचं नाही. जरा होऊ दे त्याचीही फजिती. आज तू घरी गेली नाहीस तर कळेलच त्याला तुझी किंमत,’’ रितूनं बजावलं.

संगीताला आता खूपच मोकळं वाटत होतं. रितूलाही संगीताच्या समस्येवर तोडगा निघाल्याचं समाधान वाटत होतं. इथूनच उद्या त्या दोघी मिळून संगीताच्या माहेरी जातील अन् आईबाबांना भेटून येतील असंही त्यांचं ठरलं होतं.

इकडे ऑफिसात गेल्यावर राहुल संगीताशी झालेलं भांडण विसरून आपल्या कामात बिझी झाला. घड्याळानं आठ वाजल्याचं सांगितलं, तेव्हा भानावर आला. घरी पोहोचल्यावर घराला कुलूप बघितलं, तेव्हा त्याला सकाळच्या वादाची आठवण झाली. चिडून तो बडबडत कुलूप उघडू लागला. ‘‘इतक्या वेळा सांगितलं तरी बाईसाहेब आपल्या मनाचंच करणार. नवऱ्याशी भांडण झालं तरी चालेल पण माहेरी जाणारच!’’

रात्री दहा वाजले अन् संगीता घरी आली नाही, तेव्हा राहुलचा राग अधिकच वाढला. आता संगीता घरी आली की या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकायचा असं त्यानं ठरवलं. पण बारा वाजले, संगीताचा पत्ता नव्हता तेव्हा त्याला सकाळचे तिचे शब्द आठवले, तो म्हणाला होता, ‘‘मग तिथेच का राहात नाही.’’ त्यावर तिनं म्हटलं होतं, ‘‘आता मी तिथंच राहीन.’’ आता मात्र त्याला संगीताचा नाही, स्वत:चाच राग आला. स्वत:वर एवढाही संयम ठेवता येत नाही म्हणजे काय? तिला आईकडे जायला आपण अडवायला नको. तो संगीताला फोन करायचा विचार करत होता एवढ्यात फोनची घंटी वाजली. त्यानं धडधडत्या हृदयाने फोन उचलला. फोनवर संगीताचे वडील होते. ‘‘काय झालं बाबा? इतक्या रात्री फोन का केला?’’ त्याने अंमल वैतागूनच विचारलं.

‘‘जरा संगीताशी बोलायचं होतं. ती आज इकडे येणार होती, पण आली नाही, म्हणून काळजी वाटली. तिची तब्येत बरी आहे ना?’’ बाबांनी विचारलं.

हे ऐकून राहुल गडबडलाच. त्यानं घाबरून विचारलं, ‘‘म्हणजे? संगीता तुमच्याकडे नाही आलेली? ती निघाली होती तुमच्याकडे…पण ती घरीही नाहीए.’’

‘‘काय सांगतोस? मग माझी पोरगी आहे कुठे?’’ उत्तर न देता राहुलनं फोन बंद केला.

आता मात्र राहुल घाबरला. तो संगीताच्या मोबाइलवर फोन करत होता. पण प्रत्येक वेळी तिचा मोबाइल स्विच ऑफ येत होता.

सकाळी सगळ्यात आधी राहुल संगीताच्या माहेरी गेला. कदाचित ती तिथंच असेल अन् त्याला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम तिनं हा डाव रचला असेल. पण खरोखर संगीता तिथं नव्हती. अन् काळजीनं आईबाबा काळवंडले होते. त्यानंतर तो तिच्या ऑफिसात गेला. तिथं कळलं की काल ती लंच टाइममध्ये ऑफिसातून गेली ती आलीच नव्हती. अजूनही नाही आलेली. हताश झालेला राहुल सरळ घरी परतला. सगळा दिवस त्याला संगीताचे सगळे चांगले गुण आठवून रडायला येत होतं. आज कदाचित ती घरी परत येईल या आशेवर सगळा दिवस तो घरात तिची वाट बघत होता. पण रात्र झाली तरी संगीताचा पत्ता नव्हता.

इकडे रात्री खूप उशीरापर्यंत रितू अन् संगू गप्पा मारत होत्या. केव्हा तरी उशिरा झोपल्या. सकाळी दारावरच्या घंटीमुळे संगीताची झोप उघडली. रितू अजून गाढ झोपेत होती. कदाचित दूध आलं असेल, आपण ते घेऊ. तेवढयासाठी रितूची झोपमोड कशाला करायला हवी असा विचार करून संगीतानं बाहेरच्या हॉलमध्ये येऊन दार उघडलं.

दारात चार धटिंगण उभे होते. त्यांचे चेहरे बघताच घाबरून संगीता दार लावून घेणार तेवढ्यात त्यातील दोघांनी संगीताला उचललं. एकानं तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. दुसऱ्यानं तोंडात बोळा कोंबला अन् एकाने गाडीत टाकलं. काही वेळासाठी संगीताची शुद्धच हरपली. ती शुद्धीवर आली तेव्हा तो मोकळी होती, पण एका झोपडीवजा घरात होती. ती घाबरून रडायला लागली.

काय करावं, आपण कुठं आहोत. आपल्याला इथं का आणलंय, काहीच तिला समजत नव्हतं. सकाळपासून ती पाण्याच्या घोटाविना तिथं रडंत बसली होती. चारच्या सुमाराला कुणी दोघंजण आले अन् संगीताला तिच्या नवऱ्याबद्दल विचारायला लागले. तिनं राहुलबद्दल सगळी माहिती त्यांना दिली. तर ते म्हणाले, ‘‘आम्हाला वरुणबद्दल माहिती हवीय. राहुलची नकोय.’’

‘‘माझा नवरा राहुलच आहे. वरूण माझ्या मैत्रिणीचा रितूचा नवरा आहे. तो सध्या अमेरिकेला गेलाय. पण तुम्हाला वरूण कशाला हवाय? अन् तुम्ही मला इथं कशाला आणून ठेवलंय?’’

ती दोघं थोडी चकित होऊन, थोडी भांबावून एकमेकांकडे बघत होती. तेवढ्यात तिनं त्यांना पाणी पिण्यासाठी मिळेल का विचारलं. एकानं तिला बाहेरून कुठूनतरी एक तांब्याभर पाणी अन् खायला काहीतरी आणून दिलं अन् जाता जाता दुसरा डाफरला, ‘‘जास्त स्मार्टपणा करू नकोस. तुझ्या नवऱ्यानं आमच्या बॉसकडून कर्ज घेतलंय अन् आता पैसे द्यायला नाही म्हणतोय. जोपर्यंत आमचे पैसे तो देणार नाही तोवर तुला सोडणार नाही. पैसा नाही मिळाला तर तुला विकून पैसे मिळवू.’’

हे ऐकून संगीता भीतिनं पांढरी पडली. बाप रे! कोणत्या संकटात सापडले आहे. इथून कोण सोडवेल? राहुलला निदान फोन करता आला असता तर?

दुसऱ्यादिवशीही संगीता आली नाही, तेव्हा मात्र राहुल पार उन्मळून पडला. तिच्याबद्दल काहीच बातमी नाहीए. याचा अर्थ काहीतरी वाईट घडलं असावं…या विचारानंच तो हवालदिल झाला त्याला रडू यायला लागलं.

तिसऱ्यादिवशी डोअर बेल वाजली. संगीता आली बहुतेक अशा विचारात तो आनंदानं दार उघडायला धावला. दारात त्याचे आईबाबा उभे होते. त्यांना बघून त्याचा संयम संपला. तो वडिलांना मिठी मारून रडू लागला.

त्याला असा घाबरून रडताना बघून ती दोघंही बावरली. ‘‘काय झालंय? सगळं ठीकठाक आहे ना?’’ वडिलांनी विचारलं.

‘‘नाही बाबा, काहीही ठीक नाहीए. संगीता तीन दिवसांपूर्वी घर सोडून गेलीय. अजून परतली नाहीए.’’ राहुल कसाबसा बोलला.

‘‘काय? सूनबाई घर सोडून गेलीय? पण का?’’ आश्चर्यानं आईनं विचारलं, ‘‘नक्कीच तू तिच्याशी भांडला असशील. तिला टाकून बोलला असशील.एरवी माझी सून सोशिक अन् समंजस आहे.’’ आई म्हणाली.

‘‘होय आई, मीच तिला लागट बोललो. नेहमीच मी तिला वाईट बोलतो…म्हणूनच ती रागावून निघून गेली,’’ असं म्हणत राहुलने घडलेली सगळी हकीगत त्या दोघांना सांगितली.

‘‘हे तर फार वाईट द्ब्राझालं. अन् तुद्ब्रांझं फारच चुकलंय. तिनं लग्नापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं की तिच्या आईबाबांना तिच्याशिवाय कुणीही नाहीए तर मग तू तिच्या माहेरी जाण्यावरून का आक्षेप घेतोस? तिनं तुला कधी आमच्यासाठी खर्च करण्याबद्दल हटकलंय? कधी आमच्या सेवेत तिच्याकडून कमी झालीय? सगळं ती नीट करतेय तर तू तिला मदत करायची, सपोर्ट करायचास…’’ राहुलचे बाबा त्याला समजावत म्हणाले.

‘‘खरंय बाबा, माझंच चुकलं. मी तिला समजून घ्यायला कमी पडलो. एकदा ती परत आली की मी तिची क्षमा मागेन, कधीही भांडणार नाही…तिच्या आईबाबांनाही तुमच्याप्रमाणेच समजेन.’’

राहुलचे बाबा व आई येऊनही अजून एक दिवस गेला, अजून संगीताचा पत्ता नव्हता…आता तेही घाबरले. संगीता फोन का करत नाही? खरोखर काही दगाफटका तर झाला नाहीए ना?

इकडे संगीता अचानक नाहीशी झाल्यामुळे रितूही काळजीत पडली. दार उघडं टाकून अचानक कुठं गेली असेल संगीता? बरं, मोबाइलही नेला नव्हता. कदाचित अचानक राहुलचा फोन आल्यामुळे घाईनं निघून गेली असेल… तीही फक्त अंदाज बांधत होती. संगीता, किमान राहुल, कुणाचा तरी फोन येईल म्हणूनही ती वाट बघत होती. शेवटी ती राहुलच्या ऑफिसात पोहोचली अन् तिनं संगीतानं जे काय ठरवलं होतं ते राहुलला सांगितलं अन् ती न सांगताच निघून गेल्यामुळे किती काळजी वाटली तेही सांगितलं. आता मात्र राहुलच्या हातापायातली शक्तीच गेली.

‘‘असे हातपाय गाळून चालणार नाही राहुल. नक्कीच संगीता संकटात आहे. आपण पोलिसात रिपोर्ट करूया,’’ रितूनं त्याला धीर दिला.

मग दोघं पोलीस स्टेशनला गेली अन् संगीता बेपत्ता झाल्याचा रिपोर्ट केला.

पोलिसांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दुसऱ्यादिवशी राहुलला पोलीस ठाण्यातून फोन आला. खबऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार शेजारच्या गावात गुंडांनी काही स्त्रियांना व मुलींना एका घरात कैद करून ठेवलंय. आम्ही तिथं धाड घालतो आहोत. तुमच्या पत्नीचाही तपास लागू शकतो. तुम्हीही आमच्या सोबत चला.’’

संगीताच्या आईबाबांना घेऊन रितुही आली. राहुलचे आईबाबा व ही सगळी माणसं गाडीतून तिथं गेली. पोलीस पार्टीनं आधीच जाऊन गुंडांना ताब्यात घेतलं होतं. घरातून बायका मुलींना बाहेर काढण्यात येत होतं…पण त्यात संगीता नव्हती. राहुलनं निराशेनं मान हलवली. तेवढ्यात एका बंद खोलीकडे एका पोलिसाचं लक्ष गेलं. ती खोली उघडण्यात आली. गुडघ्यात मान खाली घालून संगीता तिथं रडत बसली होती. ती पार सुकून गेली होती.

‘‘थँक्यू इन्स्पेक्टर…ही पाहा माझी बायको,’’ राहुल अत्यानंदानं ओरडला. संगीतानं वर मान केली. राहुलला बघताच ती उठली अन् तिनं राहुलला मिठी मारली.

‘‘मला क्षमा कर संगीता…माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला…मी वचन देतो यापुढे तुला मी माहेरी जाण्याबद्दल कधी ही बोलणार नाही…कधीच अडवणार नाही…चल, घरी जाऊ या,’’ राहुललाही रडू येत होतं.

‘‘सूनबाई, चल घरी…तुझा नवरा आता शहाणा झालाय, सुधारलाय.’’ सासूसासरे एकदमच बोलले, तशी रडता रडता संगीता खुदकन हसली. ती आईबाबांच्या पाया पडली. आपल्या आईला व बाबांना तिनं मिठी मारली. रितूलाही हे सगळं बघून भरून आलं. तिनं हलकेच आपले डोळे टिपले.

मला क्षमा कर

कथा * रेणू श्रीवास्तव

न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरताच आकाशने आईवडिलांना मिठी मारली. किती तरी दिवसांनी मुलाला प्रत्यक्ष भेटल्यामुळे राधाचे डोळे भरून आले. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एक अत्यंत देखणी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. आकाशने आईबाबांचं सामान गाडीच्या डिक्कीत ठेवलं. त्यांना गाडीत मागच्या सीटवर बसवून स्वत: पुढल्या सीटवर बसला. त्या तरुणीने मागे बघत डोळ्यांनीच राधा व अविनाशला ‘वेलकम स्माइल’ दिलं. राधाला वाटलं स्वर्गातली अप्सराच समोर बसली आहे.

मुलाची निवड उत्तम असल्याचं राधाला जाणवलं. दीड दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी एका अपार्टमेंटसमोर थांबली. गाडीतून उतरून जुई दोघांच्या पाया पडली. राधाने तिला प्रेमाने जवळ घेतलं. जुई व आकाशने सामान घरात घेतलं. आकाशचं ते छोटंसं घर सुरेख मांडलेलं होतं. राधा व अविनाश फ्रेश होताहेत तोवर जुईने चहा करून आणला.

दुपारचं जेवण करून राधा व अविनाश झोपली अन् त्यांना गाढ झोप लागली.

‘‘आई, ऊठ ना, तुमच्या जागं होण्याची वाट बघून बघून शेवटी जुई निघून गेली.’’ आकाशने तिला बळेच उठवलं.

अजून झोपायची इच्छा होती तरीही राधा उठून बसली. ‘‘काही हरकत नाही. अमेरिकेतही तू आपल्या जातीची अशी सुंदर गुणी मुलगी निवडलीस हेच खूप आहे. आम्हाला जुई पसंत आहे. फक्त आमची तिच्या घरच्या लोकांशी भेट घडवून आण. लग्न इथेच करायचं आहे तर मग उशीर कशाला?’’

राधाच्या बोलण्याने आकाशचा उत्साह वाढला. म्हणाला, ‘‘तिच्या घरी तिची आजी अन् वडील आहेत. तिच्या लहानपणीच तिची आई वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही. जुई तिच्या आजोळीच वाढली. आजीची इच्छा होती मी घरजावई व्हावं पण मी स्पष्ट शब्दांत नाही म्हणून सांगितलं. उद्या आपण त्यांच्या घरी जाऊयात.’’

राधा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. पोरगा अमेरिकेत राहूनही साधाच राहिला होता. अजिबात बदलला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशारच होता. शाळेपासून इंजिनीयर होईपर्यंत त्याने नेहमीच टॉप केलं होतं. पुढल्या शिक्षणासाठी अमेरिकेला आला. शिक्षण संपवून छानपैकी नोकरीही मिळवली अन् जुईसारखी छोकरीही. लोकांना आमचं हे सगळं सुख पाहून किती हेवा वाटेल या कल्पनेने राधाला हसू फुटलं.

‘‘आई का हसतेस?’’ आकाशने विचारलं.

‘‘काही नाही रे, सियाटलला पण आपण जायचंय ना? आनंद अन् नीताशीही जुईची भेट व्हायला हवी. लग्नाची सर्व तयारी करूनच आली आहे मी.’’ राधाने म्हटलं.

आकाशाने जुईला रात्रीच फोन करून सांगितलं की आईबाबांना ती आवडली आहे.

दुसऱ्यादिवशी जुई सकाळीच भेटायला आली. येताना तिने राधा व अविनाशसाठी आजीने केलेले काही भारतीय पदार्थ आणले होते.

‘‘मी तुम्हा दोघांना आकाशप्रमाणेच आईबाबा म्हटलं तर चालेला ना?’’ जुईने विचारलं.

‘‘चालेल ना? तू आकाशहून वेगळी नाहीए अन् आता आमचीच होणार आहेस.’’

थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर जुईने विचारलं, ‘‘तुम्ही माझ्या आजीला व वडिलांना भेटायला कधी येताय? त्यांना फार उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची.’’

‘‘बघूयात. जरा विचार करून दिवस ठरवूयात,’’ राधाने म्हटलं.

‘‘नाही हं! असं नाही चालणार. मी उद्याच सकाळी गाडी घेऊन येते. तुम्ही तयार राहा.’’ जुईने प्रॉमिस घेतल्यावरच राधाला खोलीत जाऊ दिलं.

दुसऱ्यादिवशी सकाळपासूनच राधा खूप उत्साही होती. बोलत होती. हसत होती. अविनाशने तिला त्यावरून चिडवूनही घेतलं. तेवढ्यात जुई गाडी घेऊन आली.

राधा अन् अविनाश तयार होऊन खोलीतून बाहेर पडली तेव्हा जुईच्या मनात आलं, आकाश देखणा आहेच, पण त्याचे आईबाबाही या वयात किती छान दिसतात.

त्या तासाभराच्या प्रवासात सुंदर रस्ते, स्वच्छ वातावरण अन् झाडाझुडपांच्या दर्शनाने राधाच्या चित्तवृत्ती अधिकच बहरून आल्या.

गाडी जुईच्या घरासमोर थांबली. एका कुलीन वयस्कर स्त्रीने पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. ती जुईच्या आईची आई होती. ती त्यांना ड्राँइंगरूममध्ये घेऊन गेली. जुईचे वडील येऊन अविनाशच्या जवळ बसले. त्यांनी एकमेकांची ओळख करून देत अभिवादन केलं. मग जुईचे वडील राधाकडे वळले. दोघांची नजरानजर होताच दोघांचेही चेहरे बदलले. नमस्कारासाठी उचललेले हात नकळत खाली वळले. इतर कुणाच्या लक्षात आलं नाही पण अविनाशला ते सगळं जाणवलं, लक्षात आलं. राधा एकदम स्तब्ध झाली. मघाचा आनंद, उत्साह पार ओसरला. मनाची बैचेनी शरीराच्या माध्यमातून, देहबोलीतून डोकावू लागली.

जुईची आजी एकटीच बोलत होती. वातावरणात ताण जाणवत होता. अविनाश तो दूर करण्याचा प्रयत्न करत होता.

जुईने अन् आजीने जेवण्यासाठी विविध चविष्ट पदार्थ केले होते. पण राधाचा मूड जो बिघडला तो काही सुधरेना. आकाश अन् जुईलाही या अचानक परिवर्तनाचं मोठं नवल वाटलं होतं.

शेवटी जुईच्या आजीने विचारलंच, ‘‘राधा, काय झालंय? मी किंवा आशीष म्हणजे जुईचे बाबा तुम्हाला पसंत पडलो नाहीए का? एकाएकी का अशा गप्प झालात? ते जाऊ देत, आमची जुई तर पसंत आहे ना तुम्हाला?’’

हे ऐकताच राधा संकोचली, तरीही कोरडेपणाने म्हणाली, ‘‘नाही, तसं काही नाही. माझं डोकं अचानक दुखायला लागलंय.’’

‘‘तुम्ही काही म्हणा, पण अमेरिकेत जन्माला आलेल्या जुईचं संगोपन तुम्ही फार छान केलंय, तिच्यावर केलेले संस्कार, तिला मिळालेलं उच्च शिक्षण व त्यासोबतचं घरगुती वळण, या सर्वच गोष्टींचं श्रेय तुम्हा दोघांना आहे. जुई आम्हाला खूपच आवडली आहे. आम्हाला भारतातही अशी सर्वगुणसंपन्न मुलगी शोधून मिळाली नसती. राधा, खरंय ना मी म्हणतो ते?’’ अविनाश म्हणाला.

राधाने त्यांचं बोलणं कानाआड केलं. पण अविनाशच्या बोलण्याने सुखावलेले, थोडे रिलॅक्स झालेले जुईचे वडील तत्परतेने म्हणाले, ‘‘तर मग आता पुढला कार्यक्रम कसा काय ठरवायचा आहे? म्हणजे एंगेजमेण्ट…अन् लग्न?’’

अविनाशला बोलण्याची संधी न देता राधानेच उत्तर दिलं, ‘‘आम्ही नंतर कळवतो तुम्हाला…आम्हाला आता निघायला हवं…आकाश चल, टॅक्सी बोलाव. आपण मॅनहॅटनला जाऊन मग घरी जाऊ. निशा तिथे आमची वाट बघत असेल. मामामामी येणार म्हणून खूप तयारी करून ठेवली असेल. जुईला तिथे आपल्याला कशाला पोहोचवायला सांगतोस? जाऊ की आपण.’’

राधाच्या बोलण्याने सगळेच दचकले.

‘‘यात त्रास होण्यासारखं काही नाहीए. उलट तुमच्या सहवासात जुई खूप खूश असते.’’ आशीषने, जुईच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘सर, अविनाश, तुमची परवानगी असेल तर मला दोन मिनिटं राधा मॅडमशी एकांतात बोलायचं. जुई सहा वर्षांची असतानाच तिची आई वारली. त्यानंतर स्वत:लाच एका चुकीचं प्रायश्चित्त घेण्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही. जुईच्या आजीनेही फार आग्रह केला. पण मी एकट्यानेच जुईच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली. जोपर्यंत राधा मॅडमकडून लग्नाच्या तयारीसाठी पूणपणे ‘हो’ असा सिग्नल मिळत नाही तोवर माझा जीव शांत होणार नाही.’’

अविनाशने मोकळेपणाने हसून सहमती दर्शवली अन् आशीष व राधाला तिथेच सोडून इतर मंडळी बाहेरच्या लॉनवर आली.

आशीष राधाच्या समोर येऊन उभा राहिला. हात जोडून दाटून आलेल्या कंठाने बोलला, ‘‘राधा, तुझा विश्वासघात करणारा, तुला फार फार मनस्ताप देणारा, मी तुझ्यापुढे उभा आहे. काय द्यायची ती दूषणं दे. हवी ती शिक्षा दे. पण माझ्या पोरीचा यात काही दोष नाहीए. तिच्यावर अन्याय करू नकोस. तुला विनंती करतो, तुझ्याकडे भीक मागतो, जुई अन् आकाशला एकमेकांपासून वेगळं करू नकोस. माझी जुई फार हळवी आहे गं, आकाशशी लग्नं झालं नाही तर ती जीव देईल…प्लीज राधा, मला भीक घाल एवढी.’’

आकाशने भरून आलेले डोळे पुसले, घसा खाकरून स्वच्छ केला अन् तो बाहेर लॉनवर आला. ‘‘जुई बाळा, यांना मॅनहॅटनला घेऊन जा. तिथून घरी सोड अन् त्यांची सर्वतोपरी काळजी घे हं!’’ वडिलांचे हे शब्द ऐकताच जुई व आकाशचे चेहरे उजळले.

राधाने गाडी सरळ घरीच घ्यायला लावली. संपूर्ण प्रवासात ती गप्प बसून होती. घरी पोहोचताच कपडेही न बदलता ती बेडवर जाऊन पडली.

अविनाश टीव्ही बघत बसला.

राधाच्या डोळ्यांपुढे ३२ वर्षांपूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमासारखा उभा राहिला.

आशीष व राधाचा साखरपुडा खूप थाटात पार पडला होता. कुठल्या तरी समारंभात आधी त्यांची भेट झाली अन् मग आशीषच्या घरच्यांनी राधाला मागणी घातली. त्यावेळी मोबाइल नव्हते. रात्री सगळे झोपले की राधा हळूच टेलीफोन उचलून स्वत:च्या खोलीत न्यायची अन् मग तासन्तास राधा व आशीषच्या गप्पा चालायच्या. चार महिन्यांनंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. तेवढ्यात ऑफिसकडूनच त्याला एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं.

त्यामुळे लग्न लांबवण्यात आलं. राधाला फार वाईट वाटलं. पण आशीषच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी एवढा त्याग करणं तिचं कर्तव्य होतं. तिने आपलं लक्ष एमएससीच्या परीक्षेवर केंद्रित केलं. पण सहा महिन्यांसाठी अमेरिकेला गेलेला आशीष पुन्हा परतून आलाच नाही. तिथे तो एका गुजराती कुटुंबात पेइंगगेस्ट म्हणून राहू लागला. अमेरिकन आयुष्याची अशी मोहिनी पडली की त्याने तिथेच राहाण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात सोपा उपाय होता की अमेरिकन नागरिकत्त्व असलेल्या मुलीशी लग्न करायचं अन् तिथेच नोकरी शोधायची. आशीषने कंपनीची नोकरीही सोडली अन् भारतात येण्याचा मार्गही बंद केला. राहात होता त्या घरातल्या मुलीशी त्याने लग्न केलं. पुढे अमेरिकन नागरिकत्त्वही घेतलं. या विश्वासघातामुळे राधा पार मोडून पडली. पण आईवडिलांनी समजावलं, आधार दिला. पुढे अविनाशशी लग्नं झालं. अविनाश खूप प्रेमळ अन् समजूतदार होता. त्याच्या सहवासात राधा दु:ख विसरली. संसारात रमली. दोन मुलं झाली. त्यांना डोळसपणे वाढवलं. मुलंही सद्गुणी होती. हुशार होती. रूपाने देखणी होती. मुलीने बी.टेक. केलं. तिला छानसा जोडीदार भेटला. लग्न करून ती इथे सियाटललाच सुखाचं आयुष्य जगते आहे. जावई मुलगी मल्टीनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी आहेत.

आकाश सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. टेनिस उत्तम खेळतो. टेनिस टूर्नामेंट्समध्येच जुईशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत अन् पुढे प्रेमात झालं. फेसबुकवर जुईची भेट राधाशी आकाशने करून दिली. जुई त्यांना आवडली. त्यांनी लग्नाला होकार दिला. फार खोलात जाऊन चौकशी केली नाही, तिथेच चुकलं. मुलीच्या वडिलांविषयी अधिक माहिती मिळवायला हवी होती. सगळं खरं तर छान छान चाललेलं अन् असा या वळणावर आशीष पुन्हा आयुष्यात आला. कपाटात बंद असलेल्या स्मृती पुन्हा बाहेर आल्या. राधाला काय करावं कळत नव्हतं. मुलाला कसं सांगावं की या पोरीचा बाप धोकेबाज आहे. जुईशी लग्न करू नकोस यासाठी त्याला काय कारण सांगावं? मनावरचा ताण असह्य होऊन राधा हमसूनहमसून रडायला लागली.

अचानक खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. अविनाश जवळ येऊ बसला होता. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, ‘‘राधा, मनातून तू इतकी कच्ची असशील मला कल्पनाच नव्हती. अगं किती क्षुल्लक गोष्टींसाठी स्वत:ला त्रास करून घेते आहेस? काही कानावर होतं…काही अंदाजाने जाणलं…अगं, आशीषने जे तुझ्याबाबतीत केलं, ते खूप लोक करतात. हा देश त्यांच्या स्वप्नातलं ध्येय होतं. जुईकडे बघूनच कळतंय की तिची आई किती सुंदर असेल. व्हिसा, नागरिकत्त्व, राहायला घर, सर्व सुखसोयी, सुंदर बायको त्याला सहज मिळाली तर त्याने केवळ साखरपुडा झालाय म्हणून भारतात येणं म्हणजे वेडेपणाच होता. तुझं अन् त्यांचं तेच विधिलिखित होतं. माझा मात्र फायदा झाला. त्यामुळेच तू माझ्या आयुष्यात आली. अन् तुझी माझी गाठ परमेश्वराने मारली होती तर तू आशीषला मिळणारच नव्हतीस…मला मान्य आहे, मी तुला खूप संपन्न सुखसोयींनी परिपूर्ण आयुष्य नाही देऊ शकलो. पण मनापासून प्रेम केलं तुद्ब्रझ्यावर, हे तर खरं ना? मघापासून आकाश विचारतोय, आईला एकाएकी काय झालंय? मी काय उत्तर देऊ त्याला.’’

अविनाशच्या बोलण्याने राधा थोडी सावरली. डोळे पुसून म्हणाली, ‘‘माझ्या मनात एकच गोष्ट सतत घुमतेय की वडिलांचेच जीन्स जुईत असतील तर? तर ती आमच्या मुलाला आमच्यापासून तोडेल…आशीष किती क्रूरपणे वागला. आईवडिलांनाही भेटायला आला नाही. घरजावई होऊन बसला इथे. त्याच्या मुलीने माझ्या साध्यासरळ पोराला घरजावई व्हायला बाध्य केलं तर? मुलाला बघायला आपण तडफडत राहाणार का?’’

राधाच्या बोलण्यावर अविनाश अगदी खळखळून हसला. तेवढ्यात आकाश आत आला. रडणारी आई, हसणारे बाबा बघून गोंधळला. शेवटी अविनाशने त्याला सर्व सांगितलं. राधाला वाटणारी भीतीही सांगितली.

आकाशही हसायला लागला. आईला मिठी मारून म्हणाला, ‘‘हेच ओळखलंस का गं आपल्या मुलाला? अगं मी कधीच घरजावई होणार नाही अन् मुख्य म्हणजे जुईही मला घरजावई होऊ देणार नाही. उलट आता तुम्ही इथे आमच्याजवळ राहा. मी मोठं नवं घर घेतलंय. उद्या आपण ते बघायला जातोए. इथे राहिलात तर नीताताई अन् भावजींनाही खूप आनंद होईल.’’

राधाची आता काहीच तक्रार नव्हती. महिन्याच्या आतच आकाश व जुईचं थाटात लग्न झालं. नवपरीणित वरवधू हनीमूनसाठी स्वित्झर्लण्डला गेली. लेक अन् जावई नात, नातवासह आपल्या गावी परत गेले.

अविनाशने राधाला म्हटलं, ‘‘आता या भल्यामोठ्या सुंदर, सुखसोयींनी सुसज्ज घरात आपण दोघंच उरलो. तुला आठवतंय, आपलं लग्न झालं तेव्हा घरात ढीगभर पाहुणे होते. एकमेकांची नजरभेटही दुर्मीळ होती आपल्याला. बाहेरगावी जाण्यासाठी माझ्यापाशी रजाही नव्हती. पैसेही नव्हते. पण आता मुलाने संधी दिलीय, तर आपणही आपला हनीमून आटोपून घेऊयात. आपणही अजून म्हातारे नाही आहोत. खरं ना?’’

राधाने हसून मान डोलावली अन् प्रेमाने अविनाशला मिठी मारली.

पती जेव्हा विश्वासघात करतात…

– सरस्वती

आयशाला आपल्या पतीकडून घटस्फोट घ्यायचा आहे. कारण तिच्या पतीचे कोणा दुसऱ्या स्त्रीशी संबंध आहेत. आयशाने २ वर्षांपूर्वीच आयुषशी लग्न केलं होतं. लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. पण एकेदिवशी आयशाला कळलं की तिचे पती ऑफिसमधून बाहेर पडून कोणा दुसऱ्या स्त्रीकडे जातात. आयशा अजून आई झाली नाहीए. त्यामुळे आयुषपासून वेगळं व्हायला तिला कसलीच अडचण नाही. पण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या सगळं काही जाणूनसुद्धा आपले कुटुंबीय आणि मुलांखातर घटस्फोट घेऊ शकत नाहीत.

हे सत्य आहे की विश्वासघातकी जोडीदार कधीच खरा जोडीदार बनू शकत नाही. एकदा विश्वास गमावला की नात्यामध्ये कायमस्वरूपी कडवटपणा निर्माण होतो. आणखी एक लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की पतीचा विश्वासघात सोसणारी स्त्री फक्त एक पत्नीच नसते, तर आईदेखील असते. त्यामुळे पतीशी संबंध बिघडण्याचा मुलांच्या संगोपनावरही वाईट प्रभाव पडतो. विश्वासघात किंवा कृतघ्नपणा प्रत्येक स्त्रीला बोचतो. मग ती कितीही वयाची असो. कृतघ्न जोडीदाराशी कसं वागायचं याचा निर्णय फारच विचारपूर्वक आणि समजूतदारपणे करावा.

योग्य निर्णय घ्या

तुमच्यासोबत विश्वासघात होत आहे या गोष्टीची जेव्हा तुम्हाला जाणीव होते तेव्हा एक आई असल्यामुळे तुम्हाला कधीकधी एखादा कठीण निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही अविश्वासयुक्त वातावरणात राहाण्याऐवजी वेगळं राहाणंच पसंत कराल आणि नातं तोडण्याचा प्रयत्न कराल. पण तुम्ही तुमच्या मुलांसमोर आपल्या अयशस्वी नात्याचं उदाहरण ठेवू इच्छित नसाल,  कुटुंबीयदेखील असा विचार करत असतील की तुम्ही नातं तुटू नये, तुम्ही दडपण आणि नैराश्यात जगत असाल आणि तुमचं आयुष्य फारच कठीण झालं असेल तर समजून जा की आता निर्णयाची वेळ आहे. मग एक तर तुम्ही पतीकडून वचन घ्या की भविष्यात त्यांनी तुमचा विश्वासघात करू नये किंवा त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घ्या. तुमचा योग्य निर्णय तुमचं आयुष्य पुन्हा रूळावर आणू शकतं.

मुलांना आश्वासित करा

तुम्ही जर तुमच्या पतींची वागणूक आणि त्यांच्या कृतघ्नतेला वैतागून त्यांच्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेत असाल तर तुमचा हा निर्णय आपापसांतील संगनमताने व्हायला हवाय. आपल्या मुलांना तुम्ही विश्वासात घेऊन सांगा की तुमच्या घटस्फोटाच्या निर्णयाचं त्यांच्या आयुष्याशी काहीच देणंघेणं नाहीए. त्यांना आधीपेक्षाही जास्त चांगलं जीवन देण्याचं आश्वासन द्या. त्यांना सांगा की, वेगवेगळे राहूनसुद्धा तुम्ही त्यांना पूर्वीसारखंच भरपूर प्रेम कराल.

लक्षात ठेवा, तुमचं नातं तुटल्याने जितका त्रास तुम्हाला होईल त्यापेक्षा कितीतरी जास्त त्रास तुमच्या मुलांना होईल. एक तर आपल्या आईचा घटस्फोट होण्याचं दु:ख आणि दुसरं आपल्या वडिलांपासून दूर जाण्याचं दु:ख, जर लहान मुलं आपल्या आईजवळ असतील.

मुलांच्या प्रश्नांसाठी तयार राहा

लक्षात ठेवा, मुलं या गोष्टीचा आधी विचार करतात की त्यांचे आईवडील वेगळे झाल्यावर त्यांचं आयुष्य कसं होईल. म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आधीपासूनच तयार राहा. जसं की, घर सोडून कोण जाईल, आमच्या सुट्टया कशा जातील? बाबांच्या वाटणीचं काम आता कोण करेल, इत्यादी.

तुम्ही माफ करू शकता का?

जर तुमच्या पतींना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होत असेल आणि ते तुम्हाला वारंवार सॉरी बोलत असतील तर एकदा थंड डोक्याने विचार करून बघा की तुम्ही त्यांना माफ करू शकता की नाही? तुम्ही भविष्यात त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता का? तुम्ही झालेल्या गोष्टी विसरू शकता का? हे असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि आपल्या भावनांचा मान राखून निर्णय घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, सगळं काही विसरून नातं टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पतींना त्यांच्या कृत्याची शिक्षा देऊ शकणार नाही.

नातं वाचवण्याचा प्रयत्न करा

तुमच्या पतींनी जर फक्त एकदाच चूक केली असेल आणि ते त्यासाठी माफी मागत असतील तर घटस्फोटासारखा कठीण निर्णय तुमच्या आयुष्यासाठी चांगला होऊ शकत नाही. हे तुम्हाला ऐकायला चांगलं वाटत नसलं तरी हेच सत्य आहे. काही लोकांचं असं मत असतं की त्यांनी एकदा विश्वासघात केला म्हणजे तो कायम करणार. पण हा विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही तुमचं नातं टिकवून ठेवून आपल्या आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात बरंच काही वाचवू शकता.

मुलांना सांगू नका

आपल्या मुलांना हे कधीच सांगू नका की, तुम्ही त्यांच्या वडिलांना कोणा दुसऱ्या स्त्रीबरोबर असलेल्या संबंधामुळे सोडत आहात. असंही होऊ शकतं की ते तुमच्यासाठी एक चांगले पती ठरले नसतील, पण आपल्या मुलांसाठी कदाचित ते एक चांगले वडील ठरतील. म्हणून तुम्ही जर त्यांना त्यांच्या वडिलांच्या अफेअरबद्दल सांगाल तर त्यांच्या बालमनाला ठेच लागेल आणि त्यातून बाहेर पडायला त्यांना खूप वेळ लागेल.

मुलांना माध्यम बनवू नका

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पतींना हर्ट करण्यासाठी आपल्या मुलांचा वापर करू शकता, जे योग्य नाही. असं करून तुम्ही तुमच्या मुलांचं त्यांच्या वडिलांशी संबंध बिघडवत आहात. मुलांना स्वत: निर्णय घेऊ द्या की त्यांचा त्यांच्या वडिलांच्या बाबतीत काय विचार आहे. थोडे मोठे झाल्यावर ते असं करू शकतात.

आज शहरांमध्ये घटस्फोटाच्या प्रकरणांत फार वाढ होऊ लागली आहे, ज्यामध्ये ८०टक्के कारणं जोडीदाराची कृतघ्नता असते. आज स्त्रिया आत्मनिर्भर होऊ लागल्यात. नात्यांमध्ये असा कडवटपणा घेऊन जगणं त्यांना अजिबात मान्य नाही. हे सत्य आहे की, कृतघ्न जोडीदाराबरोबर राहाण्याचा निर्णय घेणं फारच कठीण आहे, पण एका नात्यामुळे इतर नात्यांचाही उगाच बळी जात असेल तर कदाचित हा विचार करून शक्यतो नातं टिकवण्याचा एक प्रयत्न जरूर करावा. पतीपासून वेगळे होण्याच्या निर्णयाबरोबरच पतींचं संपूर्ण कुटुंबदेखील वेगळं होत असतं. मुलांपासून त्यांचे वडील तर दुरावतातच शिवाय त्यांचे आजीआजोबा, आत्या, काका म्हणजे संपूर्ण कुटुंबच त्यांच्यापासून दुरावतं. घटस्फोटाच्या कठीण निर्णयामुळे फक्त तुमच्या एकटीचंच नव्हे, तर इतरही अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतात. त्यामुळेच नातं वाचवण्याचा पुढाकार घेणं ठीक नाही. लक्षात ठेवा, जो आनंद सर्वांसोबत जगण्यात आहे तो एकटे जगण्यात अजिबात नाही.

उष्ट अन्न

– करूणा साठे

मेरठला पोहोचल्यावर राकेशचं घर शोधायला सीमाला फारसा त्रास झाला नाही. कारमधून उतरून ती बंगल्याच्या गेटपाशी आली. वरकरणी ती अगदी शांत अन् संयमित वाटत असली तरी मनात मात्र प्रचंड खळबळ माजली होती.

बेल वाजल्यावर ज्या स्त्रीनं दार उघडलं, तिलाच सीमानं विचारलं, ‘‘राकेश घरी आहेत का?’’

त्या स्त्रीच्या डोळ्यात एकदम ओळखीचे भाव उमटले. ‘‘तुम्ही सीमा…सीमाचना?’’
तिनं हसून म्हटलं, ‘‘हो, पण तुम्ही कसं ओळखलंत?’’

‘‘एकदा यांनी ऑफिसमधल्या कुठल्या तरी समारंभाचे फोटो दाखवले होते, त्यात तुम्हाला बघितलं होतं, तेच लक्षात राहिलं, या ना, आत या,’’ तिनं प्रेमानं सीमाचा हात धरून तिला घरात घेतलं.

‘‘मी कोण ते तुम्ही ओळखलंच असेल? माझं नाव…’’

‘‘वंदना!’’ सीमानं तिचं वाक्य पूर्ण केलं.

‘‘मी ओळखते तुम्हाला. राकेशच्या फ्लॅटमध्ये तुमचा फॅमिली फोटो आहे, त्यात बघितलंय मी तुम्हाला.’’

चेहऱ्यावर फारशी प्रतिक्रिया न दाखवता वंदनाने सहजच विचारलं, ‘‘यांच्या आजारपणाचं कसं कळलं?’’

‘‘राकेश माझे सीनिअर आहेत,  त्यांच्याशी मला फोनवर रोजच बोलावं लागतं. ऑफिसचे अपडेट्स द्यावे लागतात.’’

सीमाच्या बोलण्यात संकोच किंवा भीतीचा लवलेशही नव्हता. ‘‘आता कशी आहे तब्येत?’’ तिनं विचारलं.

‘‘ते स्वत:च सांगतील तुम्हाला. मी पाठवते त्यांना. मला फक्त एवढंच सांगा की तुम्हाला चहा, कॉफी किंवा सरबत यापैकी काय आवडेल?’’

‘‘गरम कॉफी मिळाली तर मजा येईल.’’

‘‘तुम्ही आमच्या खास पाहुण्या आहात सीमा. आजतागायत यांच्या ऑफिसमधल्या कुठल्याच सहाकाऱ्याला मी भेटले नाहीए. तुम्हीच पहिल्या.’’ अगदी जवळच्या मैत्रीणीशी बोलावं इतक्या आपलेपणानं वंदना बोलत होती.

मग सीमा वंदनाच्या व्यक्तीमत्त्वाचा विचार करू लागली. रंगानं गोरीपान नसली तरी नाकीडोळी आकर्षक होती. चेहऱ्यावर हसरा भाव अन् मार्दव होतं. दोन मुलांची आई होती पण हालचालीत चपळपणा होता. किंचित गोलाई असलेल्या बांध्याला निरोगीपणाचा तजेला होता.

ती फक्त दहावीपर्यंत शिकली आहे हे सीमाला ठाऊक होतं, पण तिच्या वागण्याबोलण्यात सुसंस्कृतपणा अन् आत्मविश्वास होता हे सीमाला मान्य करावंच लागेल.

थोड्या वेळानं राकेशनं ड्रॉइंगरुममध्ये प्रवेश केला. सीमाच्या अगदी जवळ येत त्यानं हसून म्हटलं, ‘‘तुला इथं बघून मला सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. काल फोनवर तू इथं येण्याबद्दल काही बोलली नव्हतीस?’’

‘‘मी सांगितलं असतं तर तू मला इथं येऊ दिलं असतंस?’’ त्याच्या हातावर हात ठेवत सीमानं विचारलं.

‘‘नाही…बहुधा नाहीच.’’

‘‘म्हणूनच मी सांगितलं नाही अन् सरळ येऊन थडकले. आज तब्येत कशी आहे?’’

‘‘गेले दोन दिवस ताप नाहीए, पण फार थकवा वाटतोय.’’

‘‘एकूणच सर्वांगावर अशक्तपणा जाणवतोय…अजून काही दिवस विश्रांती घे,’’ सीमानं म्हटलं.

‘‘नाही, परवा, सोमवारी मी जॉईन होतो. खरंतर तुझ्यापासून फार काळ दूर राहवत नाहीए.’’

‘‘जरा हळू बोल. तुझी बायको ऐकेल,’’ सीमानं त्याला दटावलं. मग म्हणाली, ‘‘एक विचारू?’’

‘‘विचार.’’

‘‘वंदनाला आपल्या प्रेमप्रकरणाबद्दल माहीत आहे का?’’

‘‘असेल, पण कधीच काही म्हटलं नाहीए,’’ राकेशनं खांदे उडवून खूपच बेपर्वाइनं म्हटलं.

‘‘माझ्याशी ती इतकी छान वागली की माझ्याविषयी तिच्या मनात राग किंवा तक्रार असेल असं मला वाटत नाही.’’

‘‘तू माझी परिचित अन् सहकारी आहेस, त्यामुळेच ती तुझ्याशी वाईट वागण्याचं धाडस करणार नाही. तू माझ्या घरात अगदी बिनधास्तपणे वावर. हास, बोल…वंदनाचं टेन्शन घ्यायची गरज नाहीए,’’ प्रेमानं सीमाच्या गालावर थोपटून राकेश समोरच्या सोफ्यावर बसला.

‘‘राकेशच्या आजारपणामुळे सीमाची व त्याची भेट होत नव्हती, त्यामुळे आज त्याच्यासमोर बसून त्याच्याशी गप्पा मारताना सीमाला वंदनाची आठवणही आली नाही. वदंना रिकामा कप, प्लेटस् उचलून घेऊन गेली तरीही ती दोघं बोलतच होती.’’

सीमा राकेशच्या प्रेमात पडली त्याला एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला होता. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा राकेश तिला पहिल्या भेटीतच इतका आवडला की तिच्या नकळत ती त्याच्यावर प्रेम करू लागली. लोक काय म्हणतील याचा विचारही न करता काही महिन्यातच तनमनानं ती त्याला समर्पित झाली.

त्यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली, तेव्हा त्यांनी खूप आकांडतांडव केलं.

‘‘हे बघा, मी आता तीस वर्षांची होतेय. मला लहानशी मुलगी समजून दिवसरात्र मला समजावण्याचा खटाटोप आता सोडा. दोघांनाही सांगतेय, समजलं का?’’ एकदा सीमानं चढ्या आवाजातच त्यांना ऐकवलं. ‘‘माझ्या लग्नाची काळजी करू नका. कारण योग्य वयात तुम्ही माझ्यासाठी चांगला मुलगा बघू शकला नाहीत. माझ्या भविष्याची काळजी, माझ्या सुखदु:खाची चिंता माझी मलाच करू द्या. राकेशशी माझे असलेले संबंध तुम्हाला पसंत नाहीत तर मी वेगळी राहते.’’

सीमाच्या या धमकीमुळे आईबाबा गप्प बसले. त्यांचा राग ते अबोल्यातून व्यक्त करायचे. कमावत्या आणि हट्टी पोरीला बळजबरीनं काही करायला लावणं त्यांना आधीही जमलं नव्हतं, आताही जमणार नव्हतं.

वय वाढत गेलं अन् मनाजोगता जोडीदार भेटला नाही, तेव्हा सीमानं मनातल्या मनातच अविवाहित राहण्याचा निश्चय केला होता. पण एकट्यानं आयुष्य काढणंही सोपं नसतंच. त्याचवेळी फॅमिली मेरठला ठेवून तिच्या गावी नोकरीसाठी आलेल्या एकट्या, देखण्या राकेशनं तिचं मन जिंकून घेतलं. राजीखुशीनं ती त्याला समर्पित झाली.

‘‘मी तुझ्याबरोबर तुझी प्रेयसी, मैत्रीण बनून जन्मभर राहायला तयार आहे. तरीही लग्न करून एकत्र राहण्याची मजाच काही वेगळी असते. तुला काय वाटतं राकेश?’’ सुमारे एक महिन्यापूर्वी सीमानं राकेशच्या फ्लॅटमध्ये सकाळी त्याला बेड टी देता देता विचारलं होतं.

‘‘तू तयार असशील तर आजच मी तुझ्याशी दुसरं लग्न करायला तयार आहे,’’ राकेशनं तिच्या प्रश्नाला फारसं गंभीरपणे न घेता म्हटलं.

सीमा मात्र गंभीर होती. ‘‘असं करणं म्हणजेच स्वत:लाच फसवणं आहे.’’

‘‘तुला जर असं वाटतंय तर मग लग्नाचा विषय कशाला काढतेस?’’

‘‘माझ्या मनातलं तुला नाही तर कुणाला सांगणार मी?’’

‘‘ते बरोबर आहे,’’ राकेश म्हणाला, ‘‘पण आपलं लग्न होऊ शकत नाही…तसा काही पर्यायच नाहीए.’’

‘‘तू माझ्यावर खरं खरं, मनापासून प्रेम करतोस ना?’’

‘‘हा काय प्रश्न आहे?’’ तिच्या ओठांचं चुंबन घेत तो म्हणाला.

‘‘तू नेहमीच मला सांगतोस की तुझी पत्नी वंदना नाही तर मीच तुझी हृदयस्वामिनी आहे, हे खरंय ना?’’

‘‘होय, वंदना माझ्या दोन मुलांची आई आहे. ती सरळसाधी स्त्री आहे. जे आकर्षक व्यक्तिमत्त्व मला आवडतं तशी ती नाही. खरं तर आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलीशी मी लग्नच करायला नको होतं. पण तरीही लग्न करावं लागलं. आता केवळ कर्तव्य म्हणून मी तिच्याशी बांधलेला आहे,’’ राकेश गंभीरपणे म्हणाला.

सीमाही एव्हाना थोडी घायकुलीला आली होती. ‘‘आपल्या प्रेमासाठी, माझ्या आनंदासाठी तू वंदनाला घटस्फोट देऊ शकतोस ना?’’ तिनं आपल्या मनातली इच्छा बोलूनच दाखवली.

‘‘नाही, कधीच नाही. याबाबतीत या विषयावर तू मला कधीच प्रेशराइज करू नकोस. वंदनानं मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर गोष्ट वेगळी. कारण ती पूर्णपणे मला, माझ्या मुलांना, माझ्या संसाराला समर्पित आहे. तिचा काहीही दोष नसताना मी तिला घटस्फोट देणं म्हणजे तिच्यावर अन्याय करणं आहे,’’ राकेश इतक्या कठोरपणे बोलला की त्यानंतर सीमानं हा विषय पुन्हा काढला नाही.

त्याच दिवशी सीमानं वंदनाला भेटण्याचा निश्चय केला. त्यामागे काय हेतू आहे हे ही तिला कळलं नाही. तरीही तिला वंदनाला भेटायचं होतं, समजून घ्यायचं होतं. कदाचित मनात सुप्त इच्छा होती की वंदनाला तिचं अन् राकेशचं प्रेमप्रकरण कळलं की ती आपण होऊनच त्याच्यापासून दूर होईल.

वंदना अत्यंत सालस अन् साधी होती. तिनं ज्या आपलेपणानं सीमाचं स्वागत केलं, त्यामुळे तर सीमाला तिच्याविषयी कौतुकच दाटून आलं. चीड, संताप, हेवा असं काहीच वाटलं नाही.

उलट राकेश वंदनाशी जसं वागत होता, ते तिला खूपच विचित्र आणि असंस्कृतपणाचं वाटत होतं. फक्त ती राकेशवर प्रेम करत होती म्हणूनच ते तिनं सहन केलं होतं.

स्वत:च्या घरातही राकेश तिच्याशी इतका मोकळेपणानं वागत होता की तिलाच संकोच वाटत होता. सीमाचा हात हातात घेणं, सूचक बोलणं, तिच्या गालाला हात लावणं वगैरे बिनधास्त चालू होतं.

वंदनानं हे पाहिलं तर याचा धाक फक्त सीमाला होता. एकदा तर त्यानं सीमाला मिठीत घेऊन तिचं चक्क चुंबन घेतलं…सीमा खूप घाबरली.

‘‘हे काय करतोय राकेश? अरे, वंदनानं बघितलं तर? मलाच खूप लाजल्यासारखं होईल.’’ सीमा खरोखर रागावली होती. धास्तावली तर होतीच.

‘‘रिलॅक्स सीमा,’’ अत्यंत बेपर्वाइनं राकेशनं म्हटलं. तो हसून म्हणाला, ‘‘माझ्या हृदयात तुझ्याविषयी खरं प्रेम आहे. तू माझ्यासाठी वासनापूर्तीचं साधन नाहीस खरं सांगतो. जो आनंद वंदनाच्या संगतीत कधी मिळाला नाही तो तुझ्या संगतीत मिळतो.’’

‘‘पण इथं…घरात वंदना असताना… तिच्या घरात तू माझ्यावर प्रेम करतोस हे मलाच विचित्र वाटतंय…सहन होत नाहीए…’’

‘‘बरं बाई, आता काही गडबड करत नाही. शांत राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव.’’

‘‘काय?’’

‘‘वंदनाला घाबरू नकोस. जर तिनं कधी मला संधी दिली तर मी तुझ्याचकडे येईन. तिला सोडून देईन…’’ राकेश खूपच भावनाविवश झाला होता. त्याचं ते भावनाविवश होणं तिला सुखावून गेलं तरीही मनाच्या एका कोपऱ्यात काहीतरी बोच वाटतच होती.

एकाएकी सीमाला वाटलं, याक्षणी वंदनाशी बोलायला हवं. तिचं एकूण व्यक्तिमत्त्व, तिचे प्लस अन् मायनस पॉईंट जाणून घ्यायला हवेत. तिच्यात कुठं, कसली उणीव आहे अन् कुठं तिचे गुण सीमापेक्षा जास्त ठरतात ते कळायलाच हवं. त्याशिवाय तिला राकेशपासून दूर करता येणार नाही, तोपर्यंत सीमाचं राकेशशी लग्न होणार नाही.

‘‘मला जेवायला घालूनच वंदना स्वत: जेवायला बसते. तू सुरूवात कर, ती नंतर जेवून घेईल,’’ राकेश अलिप्तपणे बोलला. त्याच्या शब्दातून पत्नीविषयीची बेपर्वाई स्पष्ट जाणवत होती. राकेशनं स्वत: खूप उत्साहानं सीमाचं ताट वाढलं.

सीमाला जाणवलं जेवण खरोखर चविष्ट आहे अन् सगळेच पदार्थ राकेशच्या आवडीचे आहेत.

वंदना समोर असतानाच राकेशनं सीमाला विचारलं, ‘‘स्वयंपाक कसा झालाय?’’

‘‘स्वयंपाक अतिशय सुरेख झालाय. प्रत्येक पदार्थ इतका चविष्ट आहे की कौतुक करायला शब्द अपुरे पडतील,’’ सीमानं मनापासून कौतुक केलं.

‘‘वंदना उत्तम स्वयंपाक करते, त्यामुळेच माझं वजन कमी होत नाही.’’

राकेशच्या तोंडून स्वत:चं कौतुक ऐकून वंदनाचा चेहरा आनंदानं डवरून आला हे सीमाच्या लक्षात आलं. राकेश तिच्याकडे बघतही नव्हता, ती मात्र प्रेमळ नजरेने त्याच्याकडेच बघत होती.

वंदनाचं राकेशवर प्रेम आहे. ती कधीच त्याला घटस्फोट देऊन त्याच्यापासून वेगळी होणार नाही. हा विचार मनात येताच सीमा एकदम बैचेन झली.

जेवण झाल्यावर राकेश ड्रॉइंगरूममधल्या दिवाणावर आडवा झाला. थोडा वेळ सीमाशी गप्पा मारल्या अन् त्याला झोप लागली. सीमा तिथून उठून स्वयंपाक घरात आली.

वंदना जेवणाची दोन ताटं वाढत होती, ‘‘तुम्ही अन् आणखी कोणी अजून जेवायचं राहिलंय का?’’ सीमाने विचारलं.

‘‘हे दुसरं ताट त्या पाठीमागच्या घरात राहणाऱ्या माझ्या मैत्रिणीसाठी आहे,’’ घराकडे बोट दाखवत वंदनानं म्हटलं.

‘‘तुमची मैत्रीण इथं येईल जेवायला?’’

‘‘नाही. निशाकडे ताट पोहोचवायचं काम माझा मोठा मुलगा सोनू करेल.’’

‘‘तुमच्या दोन्ही मुलांना तर मी भेटलेच नाहीए, आहेत कुठं दोघं?’’ सीमानं विचारलं.

‘‘छोट्या भानूला थोडा ताप आलाय. तो बेडरूममध्ये झोपून आहे. सोनूला बोलावते मी. सकाळपासून तो निशाकडेच आहे.’’ वंदनानं मागचं दार उघडून सोनूला हाक मारली. काही वेळातच तो धावत आला. वंदनानं त्याची सीमाआण्टीशी ओळख करून दिली. त्यानं दोन्ही हात जोडून नमस्कार केला. मग आईनं सांगितल्याप्रमाणे झाकलेलं ताट घेऊन तो हळूहळू निशाच्या घरी गेला.

‘‘गोड आहे मुलगा,’’ निशानं म्हटलं.

‘‘निशाही त्याच्यावर खूप प्रेम करते. अगदी आपल्या मुलाप्रमाणे. सोनूला दोन दोन आयांचं प्रेम मिळतंय,’’ सीमाच्या डोळ्यात बघत वंदनानं म्हटलं.

किचनला लागून असलेल्या व्हरांड्यात एक छोटसं गोल टेबल होतं. भोवती चार खुर्च्या होत्या. त्या दोघी तिथंच बसल्या. वंदनानं जेवायला सुरूवात केली.

‘‘निशाला स्वत:चं मूल नाहीए का?’’ सीमानं विचारलं.

‘‘तिनं लग्नच केलेलं नाही. तुझ्यासारखीच अविवाहित आहे ती,’’ वंदना आता एकेरीवर आली. ‘‘प्रत्येक स्त्रीच्या हृदयात आईचं प्रेम असतं. तिच्या हृदयातलं प्रेम निशा माझ्या सोनूवर उधळतेय,’’ वंदना हसत म्हणाली.

काही वेळ कुणीच बोललं नाही. मग सीमा म्हणाली, ‘‘मी लग्न करणार नाही असं ठरवलं होतं, पण आता मी कुणाबरोबर तरी लग्न करून वैवाहिक आयुष्य जगायचं ठरवलं आहे.’’ याच संदर्भात बोलायला इथं आले आहे.

 

‘‘मी निशालाही नेहमी म्हणते की लग्न कर, पण ती ऐकत नाही. म्हणते, लग्नाशिवाय मला सोनूसारखा छान मुलगा मिळाला आहे तर विनाकारण कुणा अनोळखी माणसाशी लग्न करून मी आपलं स्वातंत्र्य का घालवून बसू? तिला अगदी खात्री आहे की माझा सोनू तिची म्हातारपणची काठी ठरेल,’’ सीमाच्या बोलण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करत वंदना बोलत राहिली.

‘‘मी आणि राकेश, एकमेकांना ओळखतो, त्याला वर्षापेक्षा अधिक काळ उलटला आहे. ते भेटल्यामुळेच माझ्या आयुष्यात आनंद निर्माण झाला. त्या आधीचं आयुष्य अगदीच नीरस, उदासवाणं, एकाकी होतं,’’ वंदनाचं बोलणं मनावर न घेता सीमानं आपल्या विषय पुढे दामटला.

‘‘आता या निशाच्या आयुष्यातही सगळा आनंद माझ्या सोनूमुळेच आहे. दर दिवशी ती सोनूला काही ना काही गिफ्ट देतच असते.’’

 

‘‘राकेशचे अन् माझे संबंध केवळ सहकारी किंवा मित्रत्त्वाचे नाहीत. आम्ही त्या पलीकडे पोहोचलो आहोत. त्यांचं माझ्यावर अन् माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे,’’ सीमानं आपल्या मनातलं बोलून दाखवलं.

वंदना उदास हसली, ‘‘माझ्या सोनूला स्वत:च्या कह्यात करण्यासाठी निशाने त्याला सतत महागड्या हॉटेलात जेवायला नेऊन त्याची सवय बिघडवली आहे. आता त्याला घरचा, माझ्या हातचा स्वयंपाक आवडत नाही. सतत बाहेरचं चमचमीत खायला हवं असतं त्याला.’’

‘‘तू पुन्हा पुन्हा सोनूबद्दल बोलते आहेस. तू माझ्याशी राकेशबद्दल का बोलत नाहीस?’’ सीमानं आता चिडूनच विचारलं.

खूपच आपलेपणानं, डाव्या हातानं सीमाच्या खांद्यावर थोपटत वंदनानं त्याच लयीत बोलणं सुरू ठेवलं, ‘‘निशाला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. सोनू जर तिचा स्वत:चा मुलगा असता तर तिला असं स्वयंपाक न करता जगता आलं असतं? मुलाची किंवा पाल्याची संपूर्ण जबाबदारी घेणं सोपं नसतं. आपल्या पोटच्या मुलाला स्वत: कष्ट घेऊन, स्वत:च्या हातानं करून घालण्यात कसला आलाय त्रास? ते काही ओझं वाटावं असं काम आहे का?’’

‘‘छे छे, आईला आपल्या मुलासाठी काही करणं म्हणजे ओझं वाटत नाही,’’ सीमानं म्हटलं.

‘‘ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यासाठी, त्याच्या आनंदासाठी काहीही करायला त्रास वाटत नाही, ओझं वाटत नाही. ही निशा तर सोनूला कायदेशीरपणे दत्तक घेण्यासाठी माझ्यावर सतत दबाव आणते आहे.’’

‘‘या बाबतीत तुझं स्वतचं काय मत आहे, वंदना.’’

वंदना तशीच उदास हसली, ‘‘खऱ्या अर्थानं प्रसववेदना सोसल्याशिवाय कुणी स्त्री आई झाली आहे का? आई होऊ शकते का? घर संसाराचा रामरगाडा ओढायला लागणारी उर्जा, शक्ती फक्त आईकडे असते. मुलाला वळण लावणं, गरजेला धाक दाखवणं, एरवी आधार देणं, मदत करणं, निरपेक्ष प्रेम करणं हे आईशिवाय कुणीच करू शकत नाही. मावशी, काकी, मामी, आत्या किंवा मोलानं ठेवलेली बाई आईची जागा घेऊच शकत नाही.’’

‘‘बरोबर बोलते आहेत तू. मीही आता आपला संसार मांडायचा…’’

वंदनानं तिला हातानं गप्प राहण्याची खूण केली. ‘‘निशानं सोनूवर कितीही प्रेम केलं तरी शेवटी तो माझाच मुलगा असेल. समाजात लोक त्याला माझा मुलगा म्हणूनच ओळखतात. निशानं दिलेल्या महागड्या भेटवल्तू, त्याच्यासाठी करत असलेला भरमसाट खर्च, सोनू सध्या तिच्याकडे घालवत असलेला वेळ हे सगळं मान्य केलं तरी तो माझा मुलगा आहे. हे सत्य कुणीच नाकारू शकत नाही…तुला एक विचारू का?’’

‘‘विचार…’’ सीमा एकदम गंभीर झाली. त्यासाठीच तो विषय तिनं लावून धरला आहे.

‘‘माझ्या काळजाचा तुकडा आहे माझा सोनू…समजा अगदी नाइलाजानं, काळजावर दगड ठेवून मी निशाला माझा मुलगा दत्तक दिलाही, तरी ती त्याची आई होऊ शकेल का? सोनूला जन्माला घातल्याचा जो आनंद मी उपभोगला, तो तिला मिळेल का? त्याच्याबरोबर घालवलेल्या गेल्या आठ वर्षांतले अनेक सुखदु:खाचे प्रसंग जे मी जगले, ते तिला जगता येतील का? त्याच्या ज्या काही खस्ता मी खाल्ल्या त्या तिला खाव्या लागल्याच नाहीत…हे सगळे अनुभव ती कुठून मिळवणार? अन् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला रडवून, दु:खी करून ती हसू शकेल का? आनंदात राहू शकेल?’’ वंदनाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

वंदनानं तिच्या हातावर हात ठेवला. तिचा कंठ दाटून आला होता, ‘‘सीमा, तुला धाकटी बहीण मानून माझ्या मनातल्या काही गोष्टी मी तुझ्याशी बोलणार आहे. माझ्या आयुष्यात माझा संसार, माझा नवरा अन् माझी मुलं यांच्या खेरीज दुसरं काहीही नाही. माझं सगळं जीवन या तिन्हीभोवती विणलेलं आहे. राकेशना सोडण्याची कल्पनाही मला असह्य होते.’’

‘‘राकेश तुझ्यावर प्रेम करतात ही गोष्ट माझ्यासाठी फार दु:खद आहे. त्यांचे सगळे दोष पोटात घालून मी त्यांच्यासाठी सतत खपत असते. आनंदानं त्यांची सेवा करते. त्यांचं त्यांच्या दोन्ही मुलांवर जिवापाड प्रेम आहे. मुलांमुळे का होईना ते या घराशी, पर्यायाने माझ्याशीही कायम बांधील राहतील. एरवी त्यांचं प्रेम माझ्यापेक्षा तुझ्यावर अधिक आहे ही भावना मला असुरक्षितपणाची जाणीव करून देते, पण ते आमची बांधीलकी तोडणार नाहीत या भावनेनं खूपच सुरक्षित वाटतं.’’

वंदनाच्या चेहऱ्यावर तेच खिन्न हास्य होतं,  ‘‘माझ्या हृदयात डोकावण्याची क्षमता तुझ्यात असेल तर तुला माझ्याविषयी सहानुभूतीच वाटेल, कारण प्रेमाच्या मोबदल्यात प्रेम न मिळण्याची खंत मला नेहमीच वाटत राहिलीय, ती वेदना फक्त ज्याला प्रेम करूनही प्रेम मिळालं नाही तीच व्यक्ती समजू शकते.’’

राकेश अन् सोनू दोघांच्या वयात खूप अंतर आहे पण तरीही, त्यांच्यात एक साम्य आहे. माझा नवरा तुझ्याशी अन् सोनू निशाशी केवळ त्यांच्या स्वार्थासाठी संबंध ठेवून आहेत. त्या संबंधासाठी घर सोडण्याचं धारिष्ट्य दोघांमध्येही नाही. आईसारख्या खस्ता निशा मावशी काढू शकत नाही हे या वयातही सोनूला कळतं अन् बायको इतकं झिजणं तुला जमणार नाही हे राकेश जाणून आहेत.

सोनू अन् राकेशच्या आनंदासाठी मी त्यांचे निशाशी अन् तुझ्याशी असलेले संबंध कुठल्याही तक्रारीविना स्वीकारले आहेत.

पण माझे त्यांच्याशी असलेले संबंध फक्त माझ्या मृत्यूनंतरच संपतील. मी तर ते दोघं जसे आहेत तसेच त्यांना स्वीकारलंय, कोणतीही तक्रार न करता, मी त्यांच्यासोबत आनंदानं राहतेय, पण मला एक कळलेलं नाहीए की निशा काय किंवा तू काय, तुम्हाला यांच्याशी भावनिक बांधिलकी बाळगायची गरजच का आहे? तिला मुलगा हवाय किंवा तुला नवरा, आयुष्याचा जोडीदार हवाय तर तुम्ही दोघी अगदी नवी सुरूवात का करत नाही? कितीही चविष्ट अन्न असलं, तरी दुसऱ्याचं उष्ट खायची तुम्हाला काय गरज आहे? उष्ट अन्न…मी काय म्हणतेय कळतंय का? ’’

बोलता बोलता वंदनाला अश्रू अनावर झाले. काही क्षण सीमा तशीच उभी होती. मग झटकन पुढे होऊन तिनं वंदनाचे अश्रू पुसले. तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिनं मनापासून म्हटलं, ‘‘थँक यू.’’

पुढे एक अक्षरही न बोलता ती झटकन ड्रॉइंगरूममध्ये निघून आली.

अजूनही राकेश तिथं दिवाणावर झोपला होता. सीमानं टेबलवरची आपली पर्स उचलली अन् राकेशकडे वळूनही न बघता त्याच्या घराबाहेर पडली.

राकेशशी असलेले आपले अनैतिक प्रेमसंबंध कायमचे संपवायचे हाच एक विचार तिच्या मनात प्रबळ.

वेलीच सुचलेलं शहाणपण

– सुधा गुप्ते

बरेच दिवसात निमाशी माझ्या फोनवर संभाषण झालं नव्हतं. अनेकदा फोन करायचं ठरवलं अन् दुसऱ्याच कुठल्यातरी कामात गुंतल्यानं फोन करणं राहून गेलं. निमा माझी लाडकी धाकटी बहीण आहे.

‘‘मावशीची काळजी करू नकोस, अगं ती चांगलीच असेल ना? म्हणून तर तिचं रडगाणं गाणारा फोन आला नाहीए…काही प्रॉब्लेम असता तर तिचा नक्कीच फोन आला असता. रडत भेकत तिनं तुला आपली अडचण सांगितलीच असती.’’ मानवनं माझ्या मुलानं हसत हसत मला टोमणा दिला. धाकट्या मानसीनं हसून त्याला अनुमोदन दिलं. तिनं त्याला हसत हसत दोन्ही हातांचे अंगठे उंचावून ‘बकअप’ केल्याचं मी बघितलं.

हल्लीची मुलं खरोखरंच हुषार अन् जागरूक आहेत. त्यांच्या वयात आम्हाला एवढी समजूत नव्हती हे मान्य करावंच लागेल. नातलगांविषयी एवढं ज्ञान आम्हाला नव्हतं. त्यांनी काहीही म्हटलं तरी आम्हाला ते खरं वाटायचं, पटायचं. शिवाय एकत्र कुटुंबात मुलांचा संबंध फक्त मुलांशीच यायचा. घरातल्या मोठ्या माणसांचे आपापसातले हेवेदावे, रागलोभ किंवा प्रेम, आदर, त्याग वगैरे आमच्यापर्यंत पोहोचत नसे. आता चार माणसांच्या कुटुंबात कुणी कपाळावर किती आठ्या घातल्या, कुणी कुणावर डोळे वटारले हे सगळ्यांच्या लक्षात येतंच.

‘‘अगं आई, काल मी मावशीला मॉलमध्ये बघितलं. कदाचित बँकेतून लवकर बाहेर पडली असेल. केवढी ढीगभर खरेदी केलेली होती? दोन्ही हातात पिशव्या मावत नव्हत्या. तिच्या दोन कलिग्जपण होत्या सोबत.’’

‘‘तुझ्याशी बोलली का?’’

‘‘नाही गं! मी थर्डफ्लोअरला होतो अन् मावशी सेकंड फ्लोअरला होती.’’

‘‘पण ती मावशीच होती कशावरून? दुसरी कुणी असू शकते. तू वरून खाली कसं बघितलंस?’’

‘‘म्हणजे काय? मी काय आंधळा आहे का? अन् वरून खालचं व्यवस्थित दिसतं. चांगली हसत खिदळत होती. तुला फोन करते तेव्हा मात्र सतत रडत असते. मला असं होतंय, माझे पैसे संपले. मला पैशांची अडचण आहे. आनंदाचे क्षण शेयर करताना तिला तुझी आठवण येत नाही अन् थोडाही प्रॉब्लेम आला की रडत तुझ्याकडे येते. अशा माणसांची काळजी कशाला करायची, सोड तिची काळजी करणं. तिचा फोन नाही आला याचाच अर्थ सगळं काही ठीकठाक चाललंय…’’

मुलाचं सडेतोड पण, खरं बोलणं मला आवडलं नाही. मी त्याला रागावून पिटाळून लावलं. विषय तिथंच संपला. पण त्यानं त्याच्या मावशीचं किती सूक्ष्म निरीक्षण केलंय याचं मला कौतुकही वाटलं. तो बोलला ते खरंच होतं. अगदी फुसक्या गोष्टींसाठी रडून भेकून गहजब करणं अन् समोरच्याला पेचात आणणं तिला छान जमतं. पण मोठ्यातला मोठा आनंद ती कधीही बोलून दाखवत नाही. म्हणते, आनंद कधी दाखवू नये. दृष्ट लागते. कुणाची दृष्ट लागते, आमची? माझी? मी तिची मोठी बहीण, आईसारखी तिची काळजी घेते. सतत तिच्या अडचणी सोडवते. आमची कशी दृष्ट लागेल? काहीतरी अंधश्रद्धा. असा कसा स्वभाव हिचा?

आता मागच्या आठवड्यातच तर सांगत होती, पैशांची फारच अडचण आहे. मार्च एंडिंग म्हटलं की पैशांची ओढाताण असतेच. थोडे पैसे देशील का? मी काटकसरीनं राहून काही पैसा शिल्लक ठेवत असते. त्यामुळे मला अशी अडचण कधी जाणवत नाही. हे पैसे मी कुणाच्याही नकळत साठवत असते. ऐनवेळी काही अडचण आलीच तर कामी यावेत हाच माझा उद्देश्य असतो. त्यातून काही पैसे तिला द्यावेत असं मी मनोमन ठरवलंही होतं. तिला दिलेले पैसे परत कधीच मिळत नाहीत हे मलाही ठाऊक आहे. चुकून माकून आलेच तर थोडे थोडे करत अन् तिच्या सोयीनं येतील. आईबाबांनी मरताना मला सांगितलं होतं की धाकट्या बहिणीला आईच्या मायेनं सांभाळ. तिला कधी अंतर देऊ नकोस. निमा माझ्याहून दहा वर्षांनी धाकटी आहे. मी तिची मोठी बहिण आहे, तरीही तिच्या अनंत चुका, मी आईच्या मायेनं पोटात घालते. तिचे अपराध माझ्या नवऱ्यापासून, मुलांपासून, जगापासून लपवून ठेवते. अनेकदा माझा नवरा मला समजावतो, ‘‘शुभा, तू फार भाबडी आहेस. बहिणीवर प्रेम कर. पण तिला स्वार्थी होऊ देऊ नकोस. ती फार आत्मकेंद्रिय आहे. तुझा विचार ती करत नाही. आईवडिलांनीच मुलांना शिकवायला हवं. चुका केल्या तर त्या दाखवून द्यायला हव्यात. गरज पडली तर कान उपटायला हवेत. तू तिला प्रत्येक वेळी पाठीशी का घालतेस? तिला समजव…रागव…’’

‘‘मी काय रागावणार? ती स्वत: शिकलेली आहे, नोकरी करतेय. लहान मुलगी थोडीच आहे ती रागवायला? प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो…’’

‘‘प्रत्येकाचा आपापला स्वभाव असतो तर तिला राहू दे आपल्या स्वभावासोबत. चूक झाली तर जबाबदारीही घेऊ दे स्वत:वर. तू तिला प्रोत्साहन देतेस, जबाबदारी घेऊ देत नाहीस हे मला खटकतं.’’

उमेश म्हणाले ते अगदी बरोबरच होतं. पण काय करू? मनाच्या एका कोपऱ्यात तिच्याकरता वेगळाच जिव्हाळा आहे. मी म्हणते ती लहान नाहीए, पण मी तिला लहान समजून तिच्या चुकांवर पांघरूण घालत असते. मी खरं तर तिला १०-२० हजार रुपये द्यायचे असं ठरवलं होतं. ती म्हणाली होती की या महिन्याचा सगळा पगार इन्कम टॅक्स भरण्यात संपला म्हणून. आता घरखर्च कसा चालणार? पण खरं तर मार्च महिन्यात इन्कम टॅक्स भरायचा असतो हे का तिला माहीत नाही. लोक आधीपासून त्यासाठी तयारी करतात. अरे, पावसाळ्याची बेगमी तर पशूपक्षीही करूनच ठेवतात ना? पावसाळ्यासाठी आपली छत्री आपणच घ्यावी लागते. लोक थोडीच तुमच्यासाठी छत्री घेऊन ठेवतील? आपलं डोकं, आपलं शरीर जर ओलं होऊ द्यायचं नाही तर आपणच प्रयत्न केला पाहिजे. उपाय शोधला पाहिजे. मला नवल वाटलं. निमाकडे पैसे नसताना तिनं मॉलमधून पिशव्या भरभरून खरेदी कशी काय केली? शॉपिंगसाठी पैसे कुठून आले?

उमेशचं म्हणणं योग्यच आहे. मीच तिला बिघडवते आहे. खरं तर मी तिचे कान उपटून तिला योग्य मार्गावर आणायला हवं. काही नाती अशी असतात की ती तोडता येत नाहीत. पण त्यांचा उपद्रव मात्र फारच होतो. आपण नातं निभवायला बघतो, पण त्याचं रूप अक्राळ विक्राळ होतं, आपल्यालाच गिळू बघतं. आता चाळीशीला आलीय निमा. कधी तिच्या सवयी बदलणार? कदाचित कधीच ती तिच्या या चुकीच्या सवयी बदलणार नाही. तिच्यामुळे अनेकदा माझ्या संसारात कुरबुरी होतात, माझी घडी विस्कटते. कुणा दुसऱ्याच्या पाय पसरण्यामुळे माझी चादर, माझं अंथरूण मला पुरत नसेल तर त्यात माझाच दोष आहे. आपल्या अंथरूणात किंवा पांघरूणात मी कुणाला कशाला शिरू द्यावं? आईवडिलांना मुलांचा कान धरून समजावण्याचा, त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा अधिकार असतोच. अर्थात् एका ठराविक वयानंतर मुलं आईबाबांना जुमानत नाहीत अन् आईवडीलही त्यांना काही सांगू धजत नाहीत हा भाग वेगळा. तरीही चूक होत असेल तर सावध करण्याचा हक्क आईबापाला असतोच.

दुपार माझा विचार करण्यात गेली अन् सायंकाळी मी सरळ निमाच्या घराच्या दिशेनं चालू लागले. मानव कोचिंगक्लासला निघाला होता. त्याला त्याच वाटेनं जायचं होतं. मी त्याला वाटेत मला निमाकडे सोडायला सांगितलं. मुद्दामच मी तिला आधी फोन केला नाही. मला दारात बघून निमा एकदम स्तब्ध झाली.

‘‘ताई…तू?’’

निमानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘ताई, अगं फोन न करता कशी आलीस?’’

‘‘म्हटलं तुला आश्चर्याचा धक्का द्यावा. आत तरी येऊ देशील की नाही? दार अडवूनच उभी आहेस?’’

तिला हातानं बाजूला सारत मी आत शिरलेच. समोर कुणीतरी पुरूष बसलेला होता. बहुधा तिच्या ऑफिसमधला सहकारी असावा. टेबलावर खाण्यापिण्याच्या वस्तूंची रेलचेल दिसत होती. हॉटेलातून मागवलेलं असावं. ज्या डब्यांमधून आलेलं होतं, त्यातूनच खाणंही सुरू असावं. ही निमाची फार जुनी अन् घाणेरडी सवय आहे. अन्न व्यवस्थित भांड्यांमधून काढून ठेवत नाही. सामोसे, वडे, भजी वगैरे तर सरळ बांधून आणलेल्या कागदी पाकिटातूनच खायला लागते. आम्हालाही तसंच देते. वर म्हणते, ‘‘शेवटी जाणार तर पोटातच ना? मग उगीच भांड्याचा पसारा कशाला? धुवायचं काम वाढतं.’’

मला बघून तो पुरूषही दचकला. भांबावला. त्याला नक्कीच वाटलं असेल की निमाची बहीण अगदीच गावंढळ आहे. बेधडक घरात शिरलीय.

मी ही पक्केपणानं म्हटलं, ‘‘अगं, हे हक्काचं घर आहे माझं. फोन करून येण्याची फॉर्मेलिटी कशाला हवी होती? एकदम मनात आलं, तुला भेटावं म्हणून, तर आले झालं…का गं, तुला कुठं बाहेर वगैरे जायचं नव्हतं ना?’’

मी मानभावीपणे म्हटलं, ‘‘मध्यंतरी तू म्हणाली होतीस, तुला बरं नाहीए…म्हणून तुझ्या तब्येतीची काळजी वाटून मी आले.’’

‘‘हो…हो ना, हे माझे सहकारी विजय हेदेखील माझ्या तब्येतीची चौकशी करायला आले आहेत.’’

माझ्या प्रश्नानं तिलाही दिलासा दिला. मी तब्येतीचा विषय काढताच तिला विजयच्या तिथं उपस्थित असण्याचं कारण सांगता आलं. एरवी ती दोघंही गोंधळली होती.

माझी बहीण आहे निमा. तिचे सगळे रंगढंग, तिच्या सवयी, तिचे रागलोभ मी चांगले ओळखते. लहानपणापासूनच तिचा चेहरा बघून ती काय करणार आहे, तिच्या मनात काय आहे, तिनं काय केलंय, हे सगळं मी ओळखतेय. माझ्याहून ती दहा वर्षांनी लहान आहे अन् माझी फार फार लाडकी आहे. माझ्या वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत मी घरातली एकुलती एक लेक होते. आईवडिल एका मुलीवरच संतुष्ट होते. पण मला मात्र एकटेपणा सहन होत नव्हता. नातलगांना, अवतीभोवती सर्वांना दोन दोन मुलं होती. प्रत्येकाला एक भावंड होतं. मीच एकटी होते. मोठ्यांमध्ये जाऊन बसलं की ते हाकलायचे, ‘‘जा आत. इथं कशाला बसतेस? आत खेळत बैस.’’ आता एकटी मी काय खेळू? कुणाशी खेळू? निर्जीव खेळणी अन् निर्जीव पुस्तक…मला कुणी तरी सजीव खेळणं हवं होतं. शेवटी मला भावंड आणायचा निर्णय आईबाबांना घ्यावा लागला.

भावंड येणार म्हटल्यावर आईबाबांनी मला समजवायला सुरूवात केली की येणाऱ्या बाळाची सर्व जबाबदारी माझ्यावर असणार आहे. मी स्वत:ला विसरून निमाचं सगळं बघायला लागले. तिच्यापुढे मला आपली सुखदु:ख, आपल्या इच्छा, अपेक्षा कशाचीही तमा वाटत नव्हती. दहाव्या वर्षीच मी एकदम जबाबदार, गंभीर अन् मोठी मुलगी झाले.

निमा केवळ माझ्यासाठी या जगात आली आहे किंबहुना माझ्यासाठीच तिला आणण्यात आलंय ही गोष्ट माझ्या मनावर इतकी खोल कोरली गेली होती की मी तिची आई होऊनच तिला सांभाळू लागले. आम्ही जेवत असताना तिनं कपडे ओले केले तर मी जेवण सोडून आधी तिचे कपडे बदलत असे. त्यावेळी आई उठत नसे. आता वाटतं, आईनं तरी माझ्यावर इतकी जबाबदारी का टाकली? तिचंही ते कर्तव्यच होतं ना की त्यांनी एक बहीण मला देऊन माझ्यावर उपकार केले होते? इतकं मोठं कर्ज माझ्यावर झालं की चाळीस वर्षं मी फेडतेय, फेडता, फेडता मी दमलेय तरी ते कर्ज फिटत नाहीए.

‘‘ताई ये, बैस ना,’’ अगदी अनिच्छेनंच निमा म्हणाली.

माझं लक्ष सोफ्यावर विखुरलेल्या पॉलिथिनच्या पिशव्यांकडे गेलं. त्यावर त्याच मॉलचं नाव होतं, ज्याचा उल्लेख मानवनं केला होता. काही घालून काढून टाकलेले नवे डेसेसही तिथंच सोफ्यावर होते. बहुतेक त्यांची ट्रायल निमानं घेतली असावी किंवा ते घालून त्या तिच्या सहकाऱ्याला दाखवले असावेत.

माझ्या मेंदूनं दखल घेतली…हा माणूस कोण आहे? त्याचे अन् निमाचे संबंध कसे, कुठल्या प्रकारचे आहेत? त्यालाच हे कपडे घालून ती दाखवत होती का?

‘‘तुला ताप आला होता का? सध्या वायरलचीच साथ आहे. हवा बदलाचा परिणाम होतोच,’’ मी सगळे कपडे अन् पिशव्या बाजूला ढकलून स्वत:ला बसण्यापुरती जागा करून घेत विचारलं.

तेवढ्यात तो पुरुष उठला, ‘‘बराय, मी निघतो,’’ त्यानं म्हटलं.

‘‘अहो बसा ना, निदान तुमचं खाणं तरी पूर्ण करा. निमा तूही बैस ना,’’ मी म्हटलं. तसं दचकून दोघांनी माझ्याकडे बघितलं.

‘‘तब्येतीची काळजी घ्या. येतो मी,’’ म्हणत तो निघून गेला. निमाही अस्वस्थपणे बसली होती.

‘‘अगं, आजारी होतीस तर हे असलं हॉटेलचं खाणं, त्यातूनही नूडल्स अन् मंचूरियन कशाला खातेस?’’ मी टेबलवरच्या डब्यांकडे बघत म्हटलं. डब्यात एकच चमचा होता म्हणजे दोघं एकाच चमच्यानं खात होती का?

‘‘हे बघ निमा, थोडं काम होतं तुझ्याकडे. म्हणून मी आलेय. फोनवर बोलणं मला प्रशस्त वाटेना. मला पैसे हवेत. मानसीच्या कोचिंगक्लाससाठी. तुझ्याकडून माझे एकूण चाळीस हजार रुपये येणं आहे. तू निदान पंधरा वीस हजार दिलेस तर माझी सध्याची गरज भागेल…’’

निमानं माझ्याकडे विचित्र नजरेनं बघितलं. जणू ती प्रथमच मला बघत होती…इतके दिवस मी पैसे कधीच परत मागितले नव्हते, त्यामुळेच ते परत करणं तिलाही गरजेचं वाटलं नव्हतं. मी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून बघत होते. एक तर तिची छानशी संध्याकाळ बिघडवून टाकली होती अन् शिवाय ती विवाहबाह्य संबंधात अडकल्याचंही माझ्या लक्षात आलं होतं.

फार फार वाईट वाटतंय मला. आम्ही दोघी एकाच आईबापाच्या पोरी जन्माला येऊनही आम्हा दोघींमध्ये इतका फरक असावा? एकाच घरात वाढलो, एकच अन्न आम्ही खाल्लं, तरीही आमच्या अंगात वाहणाऱ्या रक्तानं असे वेगवेगळे परिणाम दाखवावेत?

‘‘अगं पण ताई, माझ्याकडे पैसे कुठाय?’’ निमा चाचरत म्हणाली.

‘‘का गं? इथं एकटीच राहतेस, घरभाडं बँक भरतेय. नवरा अन् मुलगा तुझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहतात. त्यांचा काडीचा खर्च नाही तुझ्यावर, तर मग सगळा पैसा जातो कुठे?’’

निमा अवाक् होती, सतत तिची बाजू घेणारी, तिला सतत चुचकारून घेणारी तिची ताई आज अशी कशी वागतेय? इतकं कसं बोलतेय? खरं तर निमाच्या वागणुकीमुळे तिचं कुटुंब अन् माझंही कुटुंब नाराजच असायचं. मीच तिच्यासाठी बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तशी होते, कारण मनातून मला उगीचच आशा होती की अजूनही वेळ गेली नाहीए, निमा सावरेल, स्वत:ला बदलेल.

‘‘निमा, मला तुझ्यासारखी नोकरी नाही. नवरा देतो त्या पैशातून घर चालवून मी पैसे शिल्लक टाकते म्हणून पैसा जमतो. अक्षरश: एक एक रूपया करत पैसे जमवले आहेत मी. दोन्ही मुलांचे कोचिंग क्लास गरजेचे आहेत. तिथं भरपूर पैसे भरावे लागतात. तुझे पैसे नको देऊस, फक्त माझे पैसे परत केलेस तरी माझी गरज भागेल,’’ एवढं बोलून मी उठून उभी राहिले.

निमा पुतळ्यासारखी बसून होती. मी कधी अशी वागेन असं तिला वाटलंच नव्हतं. तिच्या आजच्या रंगीत सोनेरी संध्याकाळचा शेवट असा होईल अशी तर तिला कल्पनाही नसेल.

काय बोलणार होती ती? तिच्यासाठी मी भक्कम आधार होते. माझ्या आडोशाला येऊन ती अजयलाही गप्प बसवायची.

बिचारा अजय खरं तर पत्नीपीडित नवऱ्यांच्या संघटनेचा अध्यक्ष शोभला असता. मला ते कळत होतं, पण बहिणीवरचं प्रेम मला ते वळू देत नव्हतं. मीच कमी पडले. निमाला आधीच ऐकवलं असतं तर बरं झालं असतं. ती चुकतेय हे मी का सांगू शकले नाही? मला वाईट वाटतंय, स्वत:चाच राग येतोय.

मला त्या घरात बसवेना. जीव गुदमरत होता. नकारात्मक लहरी सतत अंगावर आदळताहेत असं वाटत होतं. आज प्रथमच मला तिच्यापासून लांब लांब जावं असं वाटू लागलं. तिच्यात एरवी मला आईबाबाच दिसायचे…पण आज नाही दिसले.

‘‘निमा, येते मी…एवढंच काम होतं.’’

मी ताडकन् बोलून चालू लागले. रिक्षावाला समोरच भेटला. त्याला घराचा पत्ता सांगितला. गळा दाटून आला होता. डोकं गरगरत होतं. डोळेही भरून आले होते. डोळे पुसून मी मागे वळून बघितलं…निमा बाहेर आली नव्हती. मला बरंच वाटलं. आता ती पैसे परत करेल न करेल, पुन्हा मागणार नाही. माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं. मी दोन तीनदा दीर्घ श्वास घेतला. हलकं वाटलं. मनातून एक सकारात्मक विचार उमटला…आता नक्कीच निमा बदलेल. ती माझ्यासारखी होण्याचा प्रयत्न करेल.

दिल्या घरी तू सुखी रहा

– कथा प्राच भारद्वाज

रचना वरकरणी शांतपणे घरकाम आटोपत असली तरी मनात प्रचंड वादळ घोंघावत होतं. तिला शारीरिकदृष्ट्या काहीच त्रास नव्हता, पण मन मात्र रक्तबबांळ झालं होतं. ओठांवर नेहमीचं स्निग्ध हसू ठेऊनच ती वावरत होती, पण एकुलता एक लाडक्या लेकीच्या, त्यातून अगदी एवढ्यातच लग्न झालेल्या लेकीच्या आयुष्यात आलेल्या या भूकंपानं मनातून तीसुद्धा हादरलीच होती. फक्त नवरा अन् लेक यांना काही कळू नये म्हणून हास्याचा मुखवटा घालून होती.

रचनानं अलीकडेच पेपरला वाचलं होतं, ‘‘हनीमूनहून परतल्याबरोबर नवविवाहित जोडपी सरळ घटस्फोटाचीच मागणी करतात. अशा तऱ्हेच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे.

खरं तर हनीमूनला गेल्यावर जेव्हा दोघंच सतत एकमेकांबरोबर असतात, तेव्हा त्यांना एकमेकांच्या गुणदोषांची जाणीव होते. मुलांमध्ये तशीही सहनशीलता कमी असते. पण समाजानं ते गृहीत धरलंय. समजूतीची, तडजोडीची अपेक्षा अर्थात्च वधूकडून जास्त असते. पण आता बदललेल्या काळात मुलीही तेवढ्याच असहिष्णू अन् तापटपणे वागू लागल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्या पुरुषांची बरोबरी करतात, प्रसंगी अधिक चांगला परफॉर्मन्स देतात तर मग त्यांनी तडजोड का म्हणून करायची?

पेपरला असं वाचणं अन् आपल्याच घरात असं काही घडणं यात फार फरक असतो. रचनाला त्यामुळेच धक्का बसला होता.

तिनं अन् सुधीरनं खूप थाटात अन् धूमधडाक्यानं आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न करून दिलं होतं. सगळं अगदी रीतसर, विधीवत केलं होतं. किती पाहुणे, नातलग, इष्टमित्र, परिचित लग्नाला आले होते. व्याहीदेखील तोलामोलाचे होते. लतिका अन् मोहन जवळजवळ एक वर्ष कोर्टशिपमध्ये होते. त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली गेली होती. संगीत, मेंहदी, प्रत्येक प्रसंगाला नामवंत बॅण्ड अन् गाणारी मंडळी बोलावलेली. लग्नालाही प्रत्येक क्षेत्रातली बडी बडी मंडळी हजेरी लावून गेली होती. लतिका अन् मोहित खूप आनंदात होते. लेटेस्ट डिझाइनचे पोषाख, दागिने, जेवायला पारंपरिक अन् परदेशी असे मिळून शंभर एक पदार्थ…काही म्हणता काही उणीव नव्हती त्या समारंभात.

हनीमूनचा कार्यक्रमही चांगला वीस दिवसांचा होता. एकविसाव्या दिवशी लेक अन् जावयाला घ्यायला सुधीर अन् रचना भला मोठा फुलांचा गुच्छ घेऊन एयरपोर्टला पोहोचले. विवाहसौख्याच्या तेजानं उजळलेले लेक-जावयाचे चेहरे बघायला ती दोघं आतूर होती. हनीमूनच्या पहिल्या काही दिवसात फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर त्यांचे दोघांचे प्रेमसागरात डुंबत असणारे सेल्फी अन् फोटो बघून आई बाप सुखावले होते. पण एयरपोर्टवर आईबाबांना मिठी मारून झाल्यावर लतिकानं ड्रायव्हरला सांगितलं की तिची बॅग आईप्पांच्या गाडीत ठेव. मोहित बिचारा सासूसासऱ्यांना न भेटताच दुसऱ्या वाटेनं निघून गेला.

चकित झालेल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून लतिका सरळ कारमध्ये जाऊन बसली. हळूहळू सगळी परिस्थिती रचना अन् सुधीरच्याही ध्यानात आली. रचनानं एकूणच परिस्थितीची सूत्रं आपल्या ताब्यात घेऊन सुधीरला शांत राहण्यास सांगितलं. घरातलं वातावरण आनंदी व प्रसन्न राहील याकडे ती विशेष लक्ष देत होती. पूर्वीच्या काळी एकदा सासरी गेलेली मुलगी प्राण गेला तरी परतून माहेरी येत नसे, पण आजचा काळ तसा नसला तरी लग्नसंबंध म्हणजे धक्का लागताच कोलमडून पडेल असं तकलादू नातं नसतंच. लतिका मोकळेपणानं काहीच सांगत बोलत नव्हती. गप्प गप्प बसून असायची. रचनाला फारच वाईट वाटायचं.

‘‘लतिका, मोहितचा फोन आहे तुझ्यासाठी…तो विचारतोय तुझा मोबाइल बंद आहे का?’’ रचनानं सांगितलल्यावरही लतिका हप्पच होती. फोनपाशी गेली काही तरी बोलली, फोन जागेवर ठेवला अन् पुन्हा येऊन आपलं पुस्तक घेऊन बसली. रचनानं ठरवलं आज लेकीशी मोकळेपणाने बोलायचं. सगळं नाही तरी थोडं बहुत तरी कळायलाच हवं काय बिनसलंय दोघांमध्ये. असेल काहीतरी फुसकंच कारण ज्याचा तिच्या हट्टी, लाडोबा लेकीने उगीचच ‘इश्यू’ केलाय.

‘‘काय झालंय लतिका? तू का नाराज आहेस मोहितवर? अगं आता नवा संसार सुरू करायचाय तुम्हाला अन् हनीमून संपताच तुम्ही दोघं वेगवेगळी झालात?’’

‘‘ममा, खरं सांगते, अगं मी अन् मोहित ना अजिबातच कंपॅटिबल नाही आहोत. त्याला माझ्या भावनांची किंमतच नाही. मी तरी त्याची बेपर्वाई का सहन करू? अगं बारीकसारीक विनोदही त्याला कळत नाहीत. एकदम चिडतो. मी माझ्या मित्रांबद्दल बोललेलं त्याला आवडत नाही. लग्नापूर्वी मला वाटायचं तो माझ्या बाबतीत फार पद्ब्रोसिव्ह आहे म्हणून तो असं वागतो. पण आता लग्न झालंय माझा त्याच्याशी अन् तो आता आला माझ्या आयुष्यात तर मी माझे जुने मित्र त्याच्यासाठी सोडून द्यायचे का? त्याला फक्त त्याच्या कुटुंबाचीच काळजी आहे. हनीमून कसला? त्याच्या कुटुंबात मी सेटल होण्यासाठी कसं वागावं याचं टे्निंगच दिलं त्यानं…आता? फोनवरही म्हणाला, ‘‘मी समजून घ्यायला हवं. थोडी तडजोड करायला हवी.’’

लतिकाच्या बोलण्यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्टपणे कळत होती की मोहितला हे लग्न टिकवायचं होतं. त्याला लतिका त्याच्याजवळ हवी होती. खरं तर लतिका अन् तिची आई रचना या दोघी मायलेकीच्या नात्यापेक्षाही मैत्रिणी अधिक होत्या. म्हणूनच तर लतिकानं आपलं मन तिच्यापाशी मोकळं केलं होतं. आता आई म्हणून रचनानं आपली जबाबदारी सिद्ध करायची होती. एकुलत्या एका लाडक्या लेकीला सासरच्या घरी नांदायला पाठवायचं अन् तिचं वैवाहिक आयुष्य सुखी होईल असं काही करायला हवं.

खरं तर वर्षभराच्या कोर्टशिपच्या काळात लतिका अन् मोहित एकमेकांसोबत खूपच खुशीत होते. याचा अर्थ एवढाच की आता जे काही घडतंय ते खूपच तात्पुरत्या वेळेसाठी आहे…कुठलंही नातं स्थिर होण्याआधी अशा उचक्या लागतातच.

नातं नेहमी विश्वासावर टिकून असतं. विश्वासाचं पाणी मिळालं की या उचक्या थांबतातच. अनुभवानं परिपक्व झालेल्या रचनाला एवढं माहिती होतं की नात्यातला दुरावा पटकन् मिटवायला हवा नाहीतर नातं दुभंगतच जातं अन् ते काम दोघांनी मिळून करायचं असतं. तक्रारी किरकोळ आहेत तोवरच हा विषय संपायला हवा.

रचनानं लतिकाला समजावण्याचा प्रयत्न केला, ‘‘हे बघ बाळा, लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ नाही. तुझ्या बाहुली घेऊन तू मैत्रीणींकडे गेलीस. तिच्या बाहुल्यासोबत तुझ्या बाहुलीचं लग्नं झालं. खेळ संपला, पार्टी संपली अन् तू तुझ्या बाहुली घेऊन घरी परतलीस असं खऱ्या आयष्यात घडत नाही. एकदा लग्न झालं की मुलीला सासरीच राहावं लागतं. तिथल्या माणसांमध्ये मिळून मिसळून त्यांना आपलंसं करावं लागतं. प्रत्येक विवाहित मुलीला या संक्रमणातून जावंच लागतं.’’

‘‘प्लीज ममा, हे असलं काहीतरी भंकस तुझ्या तोंडी शोभत नाही. तू इतकी जुनाट विचारांची कधीपासून झालीस? मी काही शोभेची बाहुली नाही. जिवंत मुलगी आहे. मला माझ्या भावना आहेत की नाहीत?’’ लतिका काही समजून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तेव्हा रचनानं ठरवलं आधी मोहितला भेटून त्याच्याशी नीट मोकळेपणानं बोलूयात.

प्रथम दोघांनाही अवघडल्यासारखं झालंच होतं, पण रचनानंच पुढाकार घेत कोंडी फोडली, ‘‘हे बघ मोहित, नात्यानं तरी तू आमचा जावई असलास तरी आमच्या मुलासारखाच आहेस…सध्या तू अन् लतिका दोघंही ताणात आहात…या परिस्थितीतून आपल्याला लवकर बाहेर पडलं पाहिजे. मी अजून फक्त लतिकाचीच बाजू ऐकली आहे, तुझ्या बाजूही मला समजून घ्यायची आहे. तेव्हा तू हातचं काहीही न राखता तुझं मन मोकळं कर. तुझा प्रॉब्लेम कळला तर सोल्युशन शोधणं सोपं होईल.’’

‘‘ममा, तुम्हीच सांगा, ज्या गोष्टी मी पूर्वीच लतिकाला स्पष्टपणे सांगितल्या होत्या, त्याच पुन्हा पुन्हा विचारण्यात काही अर्थ आहे का? लतिकाला ठाऊक आहे आमच्या घरात तुमच्याएवढं पार्टी कल्चर नाहीए. आधीपासून मी तिला याची कल्पना दिली होती. अजून आमच्या घरात जेमतेम आठ दिवस लग्नानंतर राहिली ती तरी तेवढ्या वेळात आपण या पार्टीला जाणार नाही त्या पार्टीलाही जाणार नाही यावरून चिडचिड. आमच्या घरात अजूनही थोडं जुनं वातावरण आहे. घरात आजी आहे. आई, बाबा, दोघं भाऊ, दोघी वहिनी असं एकत्र कुटुंब आहे. हे सगळंही तिला कोर्टशिपच्या काळात ठाऊक होतंच ना? लग्नानंतर काही दिवस तुला आजी अन् आईला सांभाळून घ्यावं लागेल. नंतर तर मी यूएसएसाठी प्रयत्न करतोय, आपण तिकडंच जाऊ बहुधा हेही तिला सांगून झालं होतं. तेव्हा तिनं होकार दिला अन् आता मी माझ्या मर्जीनंच जगणार असा ताठर पवित्रा घेतेय. बरं, घरात असं काय करायचंय सकाळी उठल्यावर मोठ्यांच्या पाया पडायचं, स्वयंपाक काय करायचा याबाबतीत फक्त सल्ला घ्यायचा. बाहेर जायचं झालं तर त्यांना आधी सांगून ठेवायचं. यात जगावेगळं किंवा टॉर्चर होईल असं काय आहे? हे तर अगदी साधे संस्कार आहेत. कुठल्याही मुलीला ते माहीत असावेत किंवा सून म्हणून तिनं ते स्वीकारावेत. माझ्या घरातल्या माझ्या दोघी मोठ्या वहिनीही उच्चशिक्षित अन् समाजात प्रतिष्ठा असलेल्या श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आहेत. त्याही हे सगळं करतात. मग लतिकाला त्यात काय कमीपणा वाटतो तेच मला कळत नाही.’’

रचना विचारात पडली. मोहितही म्हणतोय, लतिकाही म्हणतेय, आम्ही कंपॅटिबेल नाही म्हणजे नेमकं काय? ‘कंपॅटिबिलिटी’ काय असते? प्रत्येक लग्नात तडजोड करावीच लागते. थोडाफार त्यागही करावाच लागतो. एकाच घरात जन्माला आलेल्या बहीणभावातही मतभेद, विचार भिन्नता असतेच. त्यांच्यात भांडणंही होतात. पण त्या नात्यात घटस्फोट नसतो. पतीपत्नी मात्र फटाकदिशी घटस्फोट घेऊन नातं संपवायला बघतात. मोहितच्या एकूण बोलण्यावरून त्याचं लतिकाविषयीचं प्रेम कळतंय.

‘‘खरं सांगतो ममा, लतिका खूप चांगली मुलगी आहे. माझ्या आईबाबानांही ती खूप आवडते. पण तिचा हट्टीपणा अन् अहंकार फार जास्त आहे. मला मान्य आहे की ती एकुलती एक आहे. फार श्रीमंतीत अन् लाडात वाढलीय. पण लग्नानंतर ती एक जबाबदार पत्नी अन् चांगली सून होईल असं मला वाटलं होतं. तिथंच चूक झाली. मी ही तिला समजून घ्यायला कदाचित कमी पडत असेन, पण आपसात मोकळेपणानं बोलल्याशिवाय सुसंवाद कसा स्थापित होणार?’’ मोहितच्या बोलण्यातला समंजसपणा अन् प्रामाणिकपणा रचनाला खूपच भावला.

रचना घरी पोहोचली, तेव्हा लतिका सोफ्यावर लोळत फोनवर मैत्रिणीशी बोलत होती. वेफर्सचं भलंमोठं पाकिट तिनं निम्म्याहून अधिक संपवलेलं होतं. एरवी स्वत:च्या फिगरबद्दल जागरूक असणारी लतिका टेन्शन आलं की बकाबका खात सुटते. तडस लागेपर्यंत खाल्लं की मग ती थोडी रिलॅक्स होते म्हणजे मोहितही टेन्स आहे अन् त्याच्यापासून दूर राहून लतिकाही टेन्स आहेच. दोघांमधल्या अहंकाराच्या भिंतीला भगदाड पाडायची जबाबदारी आई म्हणून रचनानं घेतलीय. प्रत्येक लढाई जिंकलीच पाहिजे असं नसतं तर हरण्यातून धडा घेणं महत्त्वाचं असतं. नातं तुटण्यातून निर्माण झालेला निराशेचा अंधार घर किंवा कुटुंबच नाही तर संपूर्ण आयुष्याला ग्रासून टाकतो. रचना असं होऊ देणार नाही. तिला तिच्या लेकीचं आयुष्य, प्रेम अन् समंजसपणानं उजळलेलं बघायचं आहे.

‘‘अगं, आम्ही भांडलो अन् मी आईच्याच घरी आलेय…काय? तुला ही बातमी सोनलनं दिली? तिला कुणी सांगितलं? अगं, मी तसा विचार करतेय…मोहितशी लग्न करण्याचा माझा निर्णय मला वाटतं चुकलाच.’’

फोनवर बोलण्यात गर्क असलेल्या लतिकाला आई आल्याचं कळलंच नाही. ती बोलतच होती. रचनाच्या मनात आलं, आपणही मुलीला सासरी पाठवायचं आहे यादृष्टीनं तिला पुरेसे संस्कार दिले नाहीत. कदाचित ती निभवून घेईल असंही आपल्याला वाटलं असावं. लग्नाच्या सुरूवातीला मुली खूपच हळव्या असतात. अगदी नव्या वातावरणात, नवी माणसं, नवे आचार विचार यात रूळायला त्यांना वेळ हवाच असतो. खरं तर मुलीच्या आईनं मुलीला हे सगळं समजावणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच मुलाच्या आईनंही मुलाला समजावून सांगायला हवं की बाबारे, वेगळ्या वातावरणातून आलेली मुलगी हळूहळू घरात रूळेल तोवर तूही तिला सांभाळून घे. प्रत्येक गोष्टीची सक्ती करू नकोस. ती अधिकाधिक कंफर्टेबल कशी राहील ते बघ. अशा प्रयत्नांनीच पतीपत्नीतलं नातं दृढ होतं. त्यांच्यात अधिक सलोखा निर्माण होतो. पतीनं दिलेलं सहकार्य पत्नी कायम लक्षात ठेवते.

‘‘नाही गं, माझी आई खूप समजून घेते मला. मला वाटतं की ती याबाबतीतही माझीच बाजू उचलून धरेल,’’ लतिकानं अगदी आत्मविश्वासानं मैत्रिणीला सांगितलं.

शांतपणे लेकीजवळ सोफ्यावर बसत रचनानं म्हटलं, ‘‘बाळा, तू जो काही निर्णय घेशील त्याला माझा पाठिंबाच असेल. इतकी वर्षं प्रत्येक गोष्ट तुझ्या मर्जीनं तुझ्या आवडीनुसार झाली आहे, तशीच पुढेही होईल. तुझं लग्न आम्ही आधुनिक पद्धतीनं केलं तर पुढेही सगळं त्याच इतमामानं करू. तुला मोहितशी लग्न केल्याचा पश्चात्ताप होतोय ना? तर मग घे घटस्फोट अन् हो मोकळी.’’

रचना मायेनं बोलत होती अन् बारकाईनं लतिकाच्या एकूण प्रतिक्रियेकडेही बघत होती. तिच्या या सडेतोड बोलण्यावर लतिकाची जी प्रतिक्रिया होती ती तिला अपेक्षित अशीच होती.

लतिकाचे डोळे विस्फारले अन् तोंडाचा ‘आ’ वासला. ‘‘अं?’’ तिनं बावचळून विचारलं, ‘‘मोहितला सोडू?’’

‘‘हो गं बाळा, सोड मोहितला. नको असलेल्या नात्याचं ओझं वाहू नये. माझ्या माहितीतला एक मुलगा आहे चांगला फॅशनेबल, श्रीमंत, एकुलता एक, सतत पार्ट्या, पिकनिक म्हणजे तुला हवं तसंच सगळं. खरं तर आम्ही तोच तुझ्यासाठी बघितला होता. पण तू मोहितच्या प्रेमात होतीस म्हणून विषयच काढला नाही,’’ रचना प्रेमळपणे म्हणाली.

रचनाचं बोलणं ऐकून आनंदीत होण्याऐवजी ती दुखावल्यासारखी झाली. चकित नजरेनं आईकडे बघत काही बोलणार त्या आधीच रचनानं पुढला बॉम्बगोळा टाकला. ‘‘म्युच्युअल डायव्होर्समध्ये फार वेळ लागत नाही, लग्न टिकलं त्यापेक्षाही कमी वेळात तुला डायव्होर्स मिळेल. तरी मला कळंत नव्हतं वर्षभर तू कोर्टशिप कशी केलीस मोहितबरोबर…चला तर, तुझा एक महत्त्वाचा निर्णय घेऊन झालाय…मला एका पार्टीला जायचंय…आधीच उशिर झालाय… सी यू लेटर…बाय…’’ रचना पर्स उचलून निघूनही गेली.

आईचं असं निघून जाणं लतिकाला फारच खटकलं. आपल्या लेकीची या क्षणाची मन:स्थिती काय आईला कळत नव्हती? अशावेळी पार्टीला जाणं गरजेचं होतं का? पार्ट्यांना जायला तर लतिकालाही आवडतं. लग्नानंतर तिच्या सासरच्या घरी सत्यनारायण होता. लग्नाचे सगळे विधी, रिसेप्शन अन् पूजेत तीन तास बसून नाजुक लतिका अगदी थकून गेली होती. तिचं डोकं सडकून दुखत होतं. घरी प्रसादाला अन् नव्या सुनेला बघायला इतके लोक आले होते.

सासूबाई मात्र शांतपणे खंबीर आवाजात म्हणाल्या, ‘‘आमच्या लतिकाचं डोकं दुखतंय. फार दगदग झालीय गेले दोन दिवस. ती झोपलीय आता. तुम्ही राग मानू नका. समजून घ्या. तीर्थ प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. लग्नाचा व्हिडिओ स्क्रीनवर येतोच आहे. फोटोतलीच सून आता बघा. लतिकाच्यावतीनं मी तुमची क्षमा मागते.’’ लोकांनीही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. प्रसाद व इतर अनेक पदार्थ मनापासून खाऊन लोक घरी गेले. लतिकाची सासू तिच्या खोलीत तिची काळजी घेत बसून होती.

रात्री उशीरा झोपलेली लतिका सकाळी अर्थात्च उशिरा उठली. आई त्यावेळी घरात नव्हती. लतिकानं तिला फोन केला. आईनं फोन उचललाच नाही. नंतर काही वेळानं तिचा मेसेज आला. ‘‘तुझे पपा कामासाठी दुबईला गेलेत म्हणून आज मी माझ्या भावाकडे म्हणजे तुझ्या मामाकडे आलेय. चार दिवस इथंच राहणार आहे.’’ लतिकाला कळेना आईला आत्ताच मामाकडे कशाला रहायला हवंय?

तिनं आईला मेसेज पाठवला. ‘‘लगेच घरी परत ये.’’ त्यावर आईनं उलट मेसेज दिला, ‘‘प्रत्येकाला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगण्याचा हक्क आहे बेबी, तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयात मी भक्कम तुझ्या पाठीशी आहे. मी चार दिवस माझ्या भावाकडे राहिले तर तुला काय त्रास होतोय? धिज इज नॉट फेयर. घरी सखुआजी आहेत, मीना ताई आहेत, सगळे लोक तुझ्या खाण्यापिण्याची, कपड्याची काळजी घेताहेत. तू आनंदात राहा. तुझ्या मित्रमैत्रीणींकडे जा.’’

त्या चार दिवसात लतिका वैतागली. तिच्या सगळ्याच मित्र मैत्रीणींमध्ये तिच्या डिव्होर्सची चर्चा होती. त्यातून विशेष म्हणजे वर्षभर कोर्टशिप झाल्यावर यांच्या हनिमूनमध्ये असं काय घडलं की एकदम डिव्होर्सचीच वेळ आली. तिला पार्टीत तोच अनुभव आला. सिनेमाला यायला मित्राला वेळ नव्हता. शॉपिंगला जायला मैत्रीण मोकळी नव्हती.

लतिकाला लक्षात आलं की खरंच लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं, नाती बदलतात, मित्रमैत्रींणीचाही दृष्टीकोन बदलतो, त्यांच्या प्रतिक्रियाही बदलतात. लग्न म्हणजे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे. तो पोरखोळ नाही. विचारपूर्वक पाऊल उचलायला हवं.

तिनं मोहितचा नंबर फिरवला अन् पलिकडून तो उत्साहानं म्हणाला, ‘‘हं बोल, कशी आहेस?’’

‘‘कसा आहेस तू?’’

त्याच्या मनातलं प्रेम एकदम उफाळून आलं. ‘‘फार दिवस झाले…तुझी खूप आठवण येतेय. आपण भेटूयात?’’

तिलाही ते जाणवलं. एकदम मोकळेपणानं म्हणाली, ‘‘मी आज पाच वाजता तुला तिथंच भेटते.’’

‘‘लग्नाआधी नेहमी आपण जिथं भेटत असू तिथंच हं!’’ मोहितनं म्हटलं.

मोहितनं आपण होऊन पुढाकार घेतल्यानं लताला खूप बरं वाटलं. आज कितीतरी दिवसांनी तिला असं प्रसन्न अन् हलकं हलकं वाटत होतं. मधल्या काही दिवसांत मनावर सतत ताण जाणवायचा. विनाकारण चिडचिड व्हायची. आज मात्र मनात फक्त प्रेम आणि प्रेमच होतं. याक्षणी तिचा कुणावर राग नव्हता. कुणाविषयी तक्रार नव्हती.

वेळेवर कॅफेत पोहोचण्यासाठी ती आवरू लागली. तेवढ्यात माहेरी गेलेली तिची आई घरी परतली. ती खूपच आनंदात होती. ‘‘लतिका एक छान बातमी आहे. मी ज्या मुलाबद्दल तुला बोलले होते ना, तो आजच रात्री जेवायला आपल्याकडे येतोय. तू घरीच राहा. तुला आवडेल तो. तुम्ही एकमेकांना पसंत केलं की आपण मोहितच्या डायव्होर्सचंही बघू अन् मग हे लग्न आणखी धूमधडाक्यात करू? ओ. के. बेबी?’’

रचनाचं बोलणं ऐकून लतिका हतबुद्ध झाली. मोहितवर ती रूसली होती…वैतागून तिनं डिव्होर्सबद्दल म्हटलंही असेल, पण मनातून तिला मोहित हवाच होता. डिव्होर्स तिच्या जिभेनं म्हटलं होतं पण मन अन् मेंदू त्यासाठी कधीच तयार नव्हते. याक्षणी तिला फार प्रकर्षानं याची जाणीव झाली होती. आता तर ती मोहितलाच भेटायला निघाली आहे?

पण आईची चूक नाहीए. ती तर लतिकाच्याच निर्णयाला पाठिंबा देते आहे.

‘‘आई, इतकी घाई का करते आहेस? जेव्हा घटस्फोट घ्यायचं नक्की होईल, तेव्हा मी सांगेन तुला. आता मी बाहेर निघालेय…जरा घाईत आहे,’’ लतिकानं म्हटलं.

‘‘हे बघ बेटू, प्रत्येक वेळी तुझ्या इच्छेनं सर्व गोष्टी घडतील, सगळ्यांनी तुझंच ऐकायचं असं नाही चालणार.’’ नेहमीच्या प्रेमळ आवाजात बोलत नव्हती रचना. चांगलाच कडक आवाज होता तिचा. ‘‘तुला मोहितशी लग्न करायचं होतं, आम्ही करून दिलं. ज्या पद्धतीनं, जे जे हवं तसंच लग्न झालं. तुझ्या इच्छेप्रमाणे वीस दिवसांचा हनीमून प्रोग्रॅम तुला गिफ्ट केला. आता तिथून परत आल्यावर तूच डिव्होर्सबद्दल बोललीस, चला ते ही आम्ही समजून घेतलं. आता डिव्होर्स घे, दुसरं लग्न कर अन् संसार थाट. आम्हालाही किती लोकांच्या किती प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात.’’

लेकीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव बघत होती रचना…अपेक्षित तो परिणाम होतोय हे तिच्या लक्षात आलं.

लतिकाही समजून चुकली की जो काही निर्णय घ्यायचाय तो तिला आजच घ्यायला हवा. आता थोड्या वेळात मोहित भेटतोय अन् रात्री तो दुसरा मुलगा भेटायला येतोय. आई नक्कीच लग्नाचा विषय काढेल, त्यापूर्वी लतिकानं आपला निर्णय आईला सांगायला हवा.

अगदी वेळेवर लतिका कॅफेत पोहोचली. त्यांच्या नेहमीच्याच टेबलवर मोहित तिची वाट बघत होता. त्यानं लगेच दोघांच्या पसंतीचे जिन्नस ऑर्डर केलं. दोघंही थोडी अवघडलेलीच होती.

मोहितनं पटकन् म्हटलं, ‘‘लतिका, प्लीज घरी चल, घरातली सगळी माणसं तुला मिस करताहेत. तुझी आठवण काढताहेत. आई तर रोज विचारते…अगं, कशीबशी मी तिला थोपवून धरलीय नाहीतर ती कधीची तुझ् घरी येऊन तुला घेऊन गेली असती.’’ बोलता बोलता तो भावनाविवश झाला.

पुढे तो काही बोलण्याआधीच भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत लतिकानं विचारलं, ‘‘कधी येतोस मला घ्यायला?’’

दोघंही हसली. एकमेकांचे हात हातात घेऊन घट्ट धरले. न बोलताच त्यांना एकमेकांचे विचार कळले. दोघांनाही एक वर्षाच्या कोर्टशिपमधले प्रेमाचे सगळे क्षण जसेच्या तसे आठवले. ती दोघं एकमेकांसाठीच आहेत. याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. फक्त प्रेम परिपक्व व्हायला थोडा वेळ हवाय… आता त्यांना सगळं कळलंय.

लग्न कधीच एकतर्फी नसतं. लग्न टिकवणं ही दोघांची अन् दोन्ही पक्षांची जबाबदारी असते. त्या सायंकाळी उशिरा माहेरून सासरी निघालेल्या लतिकाला मोहितबरोबर खुशीत असलेली बघून रचनाला हसू येत होते. ‘दिल्या घरी तू सुखी राहा,’ तिचं मन आशिर्वाद देत होतं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें