पद्मा अग्रवाल
‘श्यामली बुटिक’ लखनऊ शहरात या बुटिकची कोणी ओळख करून देण्याची गरज नाही. गरज असण्याचा प्रश्नच येत नाही, कारण उत्कृष्ट काम हेच श्यामलीजींच्या जीवनातील ध्येय होते. हेच ध्येय नजरेसमोर ठेवून काम केल्यामुळे काही वर्षांतच त्यांचे बुटिक शहरातील सर्वोत्तम बुटिक ठरले.
श्यामलीजींचा गोड, मधुर आवाज आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य तसेच ग्राहकांची आवड समजून घेऊन वेळेत काम पूर्ण करून देण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ग्राहक खुश होत असत.
आता तर त्यांची मुलगी राशीही फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून आली आहे आणि तीही त्यांना कामात मदत करीत आहे. मुलगा शुभ अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आणि पुढे तेथेच स्थायिक झाला.
सोम त्यांच्या बुटिकचे व्यवस्थापक आहेत. पिकलेले केस, डोळयांना लागलेला चष्मा आणि थकलेले शरीर त्यांना जणू कामातून निवृत्त होण्याचा इशारा देत असल्याचा भास होतो.
रात्रीचे ८ वाजत आले होते. श्यामलीजी बुटिक बंद करण्याच्या विचारात होत्या. तितक्यात धावपळ करीत आणि धापा टाकत वन्या तेथे आली. तिने विचारले, ‘‘माझा लेहंगा तयार झाला आहे का?’’
‘हो, हो... तू एकदा घालून बघ, म्हणजे मी लगेच तुला देते.’
वन्या ट्रायल रूममध्ये गेली. तेथून लेहंगा घालून आलेल्या वन्याने श्यामलीजींना आनंदाने मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘तुमचे खूप खूप आभार. तुमच्या हातात जादू आहे.’’
वन्यासोबत आलेल्या तिच्या आई प्रज्ञाने पर्समधून लग्नाची पत्रिका काढून दिली आणि म्हणाल्या, ‘‘ताई, तुम्हाला लग्नाला नक्की यायचे आहे.’’
श्यामलीजींनी पत्रिका उघडली आणि म्हणाल्या, ‘‘पत्रिका खूपच सुंदर आहे.’’
‘‘७ डिसेंबर... फारच छान, नक्की येईन.’’
७ डिसेंबर ही तारीख पाहताच श्यामलीजींना आपला भूतकाळ आठवला. जुन्या आठवणी डोळयासमोर उभ्या राहिल्या...
लखनऊजवळ सुलतानपूर नावाचे छोटेसे शहर आहे. त्या तेथील निवासी होत्या. ३ बहिणी आणि २ भावांमध्ये त्या सर्वात मोठया होत्या. अभ्यासापेक्षा जास्त त्यांना शिवणकामाची आवड होती. लहानपणी त्या आईची ओढणी किंवा साडी वापरून आपल्या बाहुलीसाठी विविध प्रकारचे कपडे स्वत:च तयार करीत असत.