मॅट्रेस केअर टीप्स

* शकुंतला सिन्हा

प्रत्येक जण मॅट्रेस म्हणजे बिछाना विचारपूर्वकच खरेदी करतो, जेणेकरून तो दीर्घकाळ चांगला राहील. पण यासाठी त्याची देखभाल कशी करायची, याची माहिती असणेही गरजेचे आहे.

पलटून घालणे : यात तथ्य आहे की, बिछाना फ्लिप करून (एका बाजूने पलटणे) घातल्यास तो दीर्घकाळ चांगला राहतो. पण फार पूर्वी असे केले जायचे. सध्या जितके बिछाने येतात ते केवळ एकाच बाजूने वापरता येतील असे असतात.

बाहेरून स्वच्छ दिसतात याचा अर्थ स्वछ आहे असा होत नाही : बिछाना स्वच्छ दिसत असला तरी त्याचा अर्थ तो स्वच्छ आहे असा नाही. त्याच्या पृष्ठभागावर  डाग असू शकतात. याशिवाय त्याच्या आत धूलिकण असू शकतात. एका व्यक्तीच्या शरीरातून दरवर्षाला सुमारे २८५ एमएल घाम निघतो आणि ४५४ ग्रॅम मृत त्वचेच्या पेशी गळून पडतात.

घरीच बनविलेल्या क्लिनरने स्वच्छ करणे शक्य : काही जण शाम्पूपासून बनविलेले पाणी इत्यादींपासून तयार केलेल्या क्लिनरने बिछाना स्वच्छ करणे योग्य समजतात. पण असे केल्यामुळे पाणी बिछान्याच्या आत जाईल.

बिछान्याच्या देखभालीसाठी काही टीप्स

बिछान्याला हवा सपोर्ट : बिछाना नेहमीच चांगला सपोर्ट असलेल्या जागेवरच ठेवा.

उडया मारणे : बिछान्यावर मुलांना उडया मारायला देऊ नका. अन्यथा आतील कापसाचे आच्छादन आणि स्प्रिंग (स्प्रिंगवाला बिछाना असल्यास) खराब होते.

फिरवत रहा : ३ ते ६ महिन्यांनी त्याला १८० डिग्रीने तुम्ही फिरवू शकता. म्हणजे डोक्याचा भाग पायाखाली नेऊ शकता. अन्यथा एकाच ठिकाणी तो जास्त दबला जाईल. जर दररोज खाटेवर बसून एखादे काम करीत असाल जसे की, बुटांची लेस बांधणे इत्यादी. अशावेळी एकाच ठिकाणी नेहमी बसू नका अन्यथा त्याच ठिकाणी जास्त दाब आल्याने तो खराब होईल.

बिछान्याला अतिरिक्त चादर घालून सुरक्षित ठेवा : सुरुवातीपासूनच बिछान्यावर एक अतिरिक्त चादर घाला, जेणेकरुन धूलिकण आत जाणार नाहीत आणि घामाचे डागही पडणार नाहीत.

नियमित स्वच्छता : बिछाना दीर्घकाळपर्यंत चांगला रहावा यासाठी तो नियमित साफ करा. वेळोवेळी वॅक्युम करा. खाटेवरील चादर आणि बिछान्यावर घातलेली अतिरिक्तचादर वरचेवर स्वच्छ धुवा, जेणेकरून धूलिकण, घाम आणि मृत त्वचेच्या पेशी आत जाणार नाहीत. अन्यथा जंतू तयार होऊन बुरशी लागण्याची शक्यता जास्त वाढेल.

बिछाना ऊन, हवेत ठेवा : दर काही महिन्यांनी बिछाना हवा, उन्हात ठेवा. यामुळे धूलिकण आणि घामाची दुर्गंधी इत्यादी दूर होईल. पण हो, त्यावेळी वातावरण चांगले असायला हवे. वातावरणात ओलावा नसावा. दुर्गंधी घालविण्यासाठी बिछान्यावर बेकिंग सोडा भुरभुरा. त्यानंतर वॅक्युम करा.

प्रवासाहून आल्यानंतर विशेष काळजी घ्या, कारण त्यावेळी इतरांच्या खाटेवर झोपावे लागते. तुम्ही हॉटेलमध्ये राहून आला असाल तर तुमच्या सामान आणि कपडयातून किटाणू आले नाहीत ना, याकडे लक्ष द्या. चांगल्या स्टार हॉटेलमध्येही असे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कर्ज घेण्यापूर्वी या 8 गोष्टी जाणून घ्या

* गृहशोभिका टीम

प्रत्येक गरज भागवण्याएवढा पैसा तुमच्याकडे असेल तर? पण जगात काही मोजक्याच लोकांकडे हे आहे. वास्तविक जीवनात, आपल्यापैकी अनेकांना आपल्या काही विशेष गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घ्यावे लागते. बँका तुम्हाला स्वस्त कर्जाच्या जाहिराती, फोन कॉल्सचे आमिष दाखवतात.

बँक प्रतिनिधी तुम्हाला विविध आकर्षक ऑफर्सचे आमिष दाखवून कर्ज घेण्याचे आमिष दाखवतात. कर्ज मिळवणे जितके सोपे आहे तितकेच ते परतफेड करणे अधिक महाग होते. इतर सर्व गोष्टींप्रमाणे, कर्ज घेण्याचेदेखील काही फायदे आणि काही तोटे आहेत.

त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून कर्जाची परतफेड करताना तुम्हाला कमीत कमी अडचणी येतील.

  1. आपण परतफेड करू शकता तितके कर्ज घ्या

जोपर्यंत आपल्याकडे एक लांब चादर आहे तोपर्यंत आपले पाय पसरवा. तज्ञांचे म्हणणे आहे की कर्जाची परतफेड करण्यासाठी तुमचा मासिक हप्ता तुमच्या उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त नसावा. कर्ज घेणे सोपे आहे, नुसते कर्ज घेऊ नका.

  1. कर्ज परतफेडीचा कालावधी कमी ठेवा

कर्ज परतफेडीचा कालावधी कमी ठेवणे शहाणपणाचे आहे. कार्यकाळ जितका जास्त तितका EMI कमी. याद्वारे तुम्ही 25-30 वर्षांसाठी कर्ज घेण्याचा विचार करू शकता. तथापि, कर्जाचा कालावधी जितका कमी असेल तितका ते तुमच्यासाठी चांगले आहे. कर्जाचा हप्ता जास्त असेल, परंतु कर्जाची परतफेड लवकरच होईल.

  1. नियमित हप्ते भरण्याची सवय लावा

जितक्या लवकर तुम्ही कर्जाची परतफेड कराल तितके चांगले. क्रेडिट कार्ड बिलासारखे अल्प मुदतीचे कर्ज असो किंवा गृहकर्जासारखे दीर्घ मुदतीचे कर्ज असो, पेमेंट नियमितपणे केले पाहिजे. ईएमआयची परतफेड करण्यात डिफॉल्ट किंवा पेमेंटमध्ये उशीर झाल्यास तुमच्या क्रेडिट प्रोफाइलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

  1. खर्च करण्यासाठी कर्ज घेऊ नका

हा गुंतवणुकीचा मूलभूत नियम आहे. पैसे उधार घेऊन कधीही गुंतवणूक करू नका. फिक्स्ड डिपॉझिट्स आणि बाँड्ससारख्या उत्तम सुरक्षित गुंतवणुकीमुळे तुम्हाला कर्जाच्या हप्त्यांप्रमाणे परतावा मिळत नाही. विवेकाधीन खर्चासाठी देखील कर्ज घेऊ नये.

  1. जेव्हा कर्ज मोठे असते तेव्हा विमा आवश्यक असतो

तुम्ही मोठे घर किंवा कार लोन घेत असाल तर त्यासाठी इन्शुरन्स कव्हर घ्यायला विसरू नका. कर्जाच्या रकमेइतकीच मुदतीची योजना घ्या जेणेकरून तुम्हाला काही झाले तर त्याचा कुटुंबावर भार पडणार नाही.

  1. एकाच वेळी अनेक कर्ज घेतल्यावर

जर तुम्ही एकाच वेळी अनेक कर्जे घेतली असतील तर त्या सर्वांचे एका स्वस्त कर्जात रूपांतर करावे. सर्वात महागडे कर्ज प्रथम फेडा. यानंतर, स्वस्त कर्जाची परतफेड हळूहळू करा.

  1. निवृत्ती निधी बाजूला ठेवा

आपल्या सर्वांचे आर्थिक प्राधान्य असते. मुलांच्या बाबतीत आम्ही तडजोड करत नाही, जे खरे आहे. मात्र मुलांच्या भविष्यासोबतच तुमच्या भविष्याचाही विचार करायला हवा. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी निवृत्ती निधीशी तडजोड करणे शहाणपणाचे नाही. भावनेतून कोणताही आर्थिक निर्णय घेऊ नका.

  1. घरातील लोकांना कर्जाची माहिती

कर्ज घेण्यापूर्वी पती आणि कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. तुमचा कोणताही निर्णय तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करतो. जर तुम्ही तुमच्या पतीपासून आर्थिक बाबी लपवत असाल तर त्याचा तुमच्या नातेसंबंधावरही परिणाम होऊ शकतो.

Diwali Special: उत्सवप्रसंगी असे सजवा घर

* नितीश चंद्रा, मॅडहोम डॉट कॉम

सण, उत्सव सुरू होताच सर्वांमध्येच उत्साह संचारतो. सर्वांनाच आपापल्या घरांना सजावट करून पारंपरिक तसेच आधुनिक रूप द्यायचे असते, जेणेकरून येणाऱ्या आप्तेष्टांसोबत दुप्पट उत्साहाने सण साजरा करता येईल.

आपल्या घराची सजावट नव्या ढंगात करण्यासाठी अशा अनेक वस्तू आहेत. विविध सजावटीच्या सामानासह तुम्ही अनेक प्रकारे घर सजवू शकता आणि प्रियजनांकडून प्रशंसा ऐकू शकता.

प्रकाश : घर आकर्षक बनवण्यामध्ये विविध प्रकारच्या लाइट्स खूप महत्त्वाच्या असतात. दिवाळी, नाताळ, गुरूनानक जयंती इ. सणांमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशाचे काही वेगळेच महत्त्व आहे. चमकदार रंगांच्या शानदार मेणबत्त्या, विविध आकारांमध्ये उपलब्ध असणारे मेणबत्ती स्टॅन्ड, टी लाईट स्टॅन्ड, ग्लास वोटिवच्या संग्रहाच्या वापराने तुम्ही आपल्या घरातील उत्सव उजळू शकता. भारतीय घरांमध्ये जर तांब्याचा दिवा नसेल तर सण अपूर्ण वाटतो. घराच्या दारावर कंदिलाच्या आकाराचे वोटिव किंवा लॉनमध्ये मेणबत्ती टी, लाइट हॉल्टर्सद्वारे घराला सुंदर रूप देऊ शकता. सुंगधित मेमबत्त्यांचा वापर तुम्हाला मंत्रमुग्ध करू शकेल. सुरेख लॅम्पशेड्सद्वारे तुम्ही इंटिरियरला नवा लुक देऊ शकता. कोपऱ्यात ठेवलेला एखादा लांब लॅम्प शेड तुमच्या खोलीत प्रकाश पसरून बेडरूमचं सौंदर्य आणखी खुलवेल.

सेंटर पीसेस : सेंटर पीसेस शिवाय देशी डेकोर अपूर्ण आहे. यांचा वापर करून आपल्या घराला पारंपरिक रूप देऊ शकता. हल्ली विविध रूपात उपलब्ध पारंपरिक किंवा आधुनिक शैलीतील मुर्त्या सर्वांत जास्त पसंत केल्या जातात. यामध्ये तुम्ही लाल नारिंगी रंगाच्या नैसर्गिक फुलांचा वापर करून चैतन्य आणू शकता.

फुलदाणी : भारतीय संस्कृतीत फुलांना विशेष महत्त्व आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत करण्यासाठी घर सुगंधित आणि सुंदर दिसावे म्हणून फुलांचा वापर केला जातो. लिली, ट्यूलिप आणि ऑक्रिडची फुले घराला सुगंधित ठेवतात. बाजारात मिळणाऱ्या फुलदाण्यांमध्ये तुम्ही ही फुले ठेवू शकता. यामुळे घरातील सौंदर्य अजून उठावदार होईल.

रग्ज आणि गालिचे

फरशीवर रग्ज किंवा गालिचे अंथरून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता. घराच्या बाहेरील भागात जसे की अंगण आणि मोकळ्या भागात हातांनी विणलेले सुंदर गालिचे किंवा रग्जचा वापर करून तुम्ही पाहुण्यांवर छाप सोडू शकता.

चादरी/कुशन कव्हर/रूफुस

उत्सव सणांच्या दिवसांत बिछान्यावरील गडद रंगीत चादरींचा संग्रह घरात सकारात्मक उर्जा आणू शकतो. खोल्यांमध्ये असलेले शानदार डिझाइनचे कुशन कव्हर्ससुद्वा सर्वांचे लक्ष वेधून घेतील. बागेत सुंदर रूफुसचा वापर करून बाग अधिक सुंदर बनवू शकता.

ऐक्सेंट फर्निचर

ऐक्सेंट फर्निचर आपल्या अनोख्या डिझाइनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हल्ली बाजारात ऐक्सेंट खुर्च्या, वुडन चेस्ट, साईड टेबल्स तर सुंदर काउचेजसुद्धा उपलब्ध आहेत. या उत्सवांमध्ये अशा फर्निचरचा वापर करून आपण घराची शोभा वाढवू शकता व आपल्या सर्वोत्तम निवडीचीही सर्वांना जाणीव करून देऊ शकता.

डेकोरेटिव्ह आरसे

डेकोरेटिव्ह आरशांच्या वापरामुळे घरात अतिरिक्त जागेचा भास होतो आणि प्रवेश करतेवेळची छाया प्रतिबिंबित करतो. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा प्रवेशही होतो. या लहान परंतु कलात्मक वस्तूंनी तुम्ही घराचे सौंदर्य वाढवू शकता.

दस्तकारी आरशांचा वापर घराला विशेष सौंदर्य मिळवून देतो. तुम्ही बाजारात उपलब्ध आरसे जसे बाथरूममधील आरसा, विंटेज किंवा डेकोरेटिव्ह आरसा यापैकी योग्य पर्याय निवडावा.

कोरोना काळातील अनुभव आणि बदल

– मधु शर्मा कटिहा

कोरोना काळ असा काळ आहे ज्याची कधी कोणी कल्पनादेखील केली नव्हती. कोरोनाव्हायरसचा कहर अशाप्रकारे झाला आहे, की मनुष्य ज्याला सामाजिक प्राणी म्हटले जाते, त्यालाच समाजापासून अंतर बनवून राहणे भाग पडत आहे. हा असा काळ आहे जेव्हा अडचणीदेखील नव्या नव्या आहेत आणि त्यांचे निराकरणदेखील. कोरोना आता इतक्या लवकर जाणार नाहीए. त्यामुळे कोरोना काळात घेतले जाणारे काही निर्णयदेखील आता पुष्कळ काळापर्यंत सोबत राहतील. एक नजर टाकूया विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या त्यांच्या बदलांवर, जे येणाऱ्या भविष्यात जीवनाचा अविभाज्य घटक बनवणार आहेत.

डिजिटल क्रांती

लॉकडाऊनच्या काळात विविध क्षेत्रांत इंटरनेटवर अवलंबित्व वाढले आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन जीवनाची महत्त्वाची अंगे बनून समोर आली आहेत. एका रिपोर्टनुसार भारतात लॉकडाऊनदरम्यान इंटरनेटच्या वापरात १३ टक्के वाढ झालेली आहे.

नव्या मालिकांची शूटिंग न झाल्यामुळे टीव्हीवर जुने कार्यक्रम पुन्हा दाखवले जात आहेत. यामुळे मनोरंजनासाठी लोक इंटरनेटचा आधार घेत आहेत. जवळपास १.५ करोड लोकांचे नेटफ्लिक्स जोडले जाणे इंटरनेटवर लोकांचे अवलंबित्व दाखवते.

शिक्षण क्षेत्रात ऑनलाईन क्लासेसची सुरुवात झाली आहे. शिक्षण तज्ज्ञांचे मानणे आहे, की उच्च शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्रांती आता दूरची गोष्ट नाही. भविष्यात या गोष्टीवर विचारविनिमय करून शिक्षणाचा काही भाग वर्गात, तर काही ऑनलाईन करवला जाऊ शकतो.

या दिवसांत विविध कार्यालयांमधील बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. प्रायव्हेट आणि सरकारी दोन्ही कार्यालयांमध्ये बैठका गुगल, हँग आउट आणि झुमसारख्या अॅप्सवर होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांच्या मंत्र्यांच्या आपसातील मिटींग्स आणि विविध क्षेत्रांवर नजर ठेवण्याचे कार्यदेखील ऑनलाईन केले जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे हे रूप एका मर्यादेपर्यंत भविष्यातदेखील आपलेसे केले जाईल. कार्यालयांत दररोजच्या मिटिंगमध्ये खाणे-पिणे आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेत पुष्कळ खर्च होत होता.

सरकारी अधिकारी दीपक खुराना यांचे म्हणणे आहे, की येणाऱ्या काळात मिटींग्स ऑनलाइनदेखील होऊ लागतील. यामुळे वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होईल.

टेक्निक्सच्या नव्या वापरापासून फिल्मी जगतदेखील वेगळे राहिलेले नाही. विशेषज्ञांच्या अनुसार लॉकडाऊननंतर जेव्हा फिल्म आणि टीव्ही सिरियल्सचे शूटिंग होईल तेव्हा सोशल डिस्टंसिंग लक्षात घेत अंतरंग दृश्य प्रत्येक कलाकाराकडून वेगवेगळे करवून घेऊन शूट केले जातील आणि त्या तुकडयांना टेक्निकच्या सहाय्याने जोडले जाईल.

मास्कची सोबत

कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी मास्क घालणे अशात अनिवार्य झाले आहे. मास्क आता दीर्घकाळापर्यंतचा साथीदार असणार आहे. याचा भविष्यात वापर फक्त व्हायरसपासून बचाव असणार नाही, तर रोजगाराच्या नव्या संधी देणारादेखील ठरेल.

वाईट काळाचा संधीसारखा वापर करीत बाजारात आतापासूनच विविध प्रकारचे मास्क येऊ लागले आहेत. भारतात मधुबनी आणि मंजुषा पेंटिंगवाले मास्क, डिझायनर्सनी तयार केलेले, प्रिंटेड आणि मेसेज लिहिलेले, तसेच सुती कापडांचे तीन थर असणारे आणि कप मास्क आलेले आहेत.

मूकबधिर ओठांच्या हालचाली आणि चेहऱ्यांचे हावभावावरून बोलणे समजतात आणि समजावतात. मास्कमध्ये चेहरा लपला जाण्याने त्यांना समस्या होऊ नये यासाठी पारदर्शक मास्क बनवण्याचादेखील निर्णय घेतला गेलेला आहे.

मास्क लावण्याने व्यक्तिचा अर्धा चेहराच दिसतो. परिणामस्वरूपी कित्येक वेळा ओळखणे कठीण होते. ही गोष्ट लक्षात घेत केरळच्या कोट्टायम आणि कोचीमधील काही डिजिटल स्टुडिओमध्ये मास्कवर चेहऱ्याचा तो भाग प्रिंट करण्याचे कार्य सुरू केले आहे, जो मास्कच्या पाठीमागे लपला जात होता. हा मास्क लावल्यावरदेखील व्यक्ती ओळखण्यात अडचण येणार नाही. हे टेक्निक लवकरच भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये येणार आहे.

हे तर आता निश्चित आहे, की मास्क भविष्यात जीवनाचे महत्त्वाचे अंग बनेल. हे घालणे आता किती आवश्यक होणार आहे, हे दर्शवण्यासाठी बीच वेअर बनवणाऱ्या इटलीच्या एका डिझायनरने बिकिनीसोबत मॅचिंग मास्क बनवून एका मॉडेलला फोटोमध्ये घातलेले दाखवले आणि त्याला ट्रायकिनी नाव दिले.

स्वच्छतेशी संबंध

कोरोना काळात सगळे स्वच्छतेविषयी सावध झाले आहेत. वारंवार साबणाने हात धुणे, फळे, भाज्या मीठ किंवा कोमट पाण्याने धुणे आणि घराच्या आजूबाजूच्या भागाला सॅनिटाईझ करणे शिकले आहेत. स्वच्छतेची ही सवय येणाऱ्या काळात दररोजच्या सवयींमध्ये सामील होईल. लोकांच्या जागोजागी थुंकून घाण पसरवण्याच्या सवयीवरदेखील आता लगाम लागेल. कोरोनाव्हायरसचे भय लोकांच्या मनात राहील आणि ते स्वत: थुंकण्याची सवय सोडण्यासोबतच ते करणाऱ्या लोकांनादेखील अवश्य टोकतील.

बिना बँड बाजा आणि वरातीचे विवाह

लॉकडाऊनमध्ये बहुतेक लग्ने स्थगित होत आहेत, परंतु काही जोडयांनी कोर्टात विवाह केला आहे आणि काहींनी फक्त कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत विवाह संपन्न करवून घेतला आहे. मागच्या दिवसांमध्ये उत्तर प्रदेशात सोनू आणि ज्योतीचा विवाह १० लोकांच्या उपस्थितीत झाला. जिथे सोनू फक्त ३ लोकांच्या वऱ्हाडासोबत सासरी पोहोचला, तिथे ज्योतीच्या घरून पाच सदस्य या विवाहात सामील झाले.

लॉकडाऊन ३.० मध्ये गृह मंत्रालयाद्वारे प्रस्तुत केलेल्या सूचनांच्या अनुसार विवाह समारंभात ५० लोकच सामील होऊ शकतात, तरी काही राज्यांनी ही संख्या आणखी कमी ठेवलेली आहे. सोशल डिस्टंसिंगसाठी हे योग्यदेखील आहे. कोरोना काळानंतरदेखील दीर्घकाळापर्यंत समारंभांमध्ये गर्दी न जमवून मर्यादित संख्येत लोकांची उपस्थिती राहील अशी आशा आहे. याचे एक कारण कोरोनाच्या भयामुळे आपसात अंतर ठेवणे आहे, तर दुसरे कारण व्यर्थ खर्च रोखणे असेल.

कोरोना काळात आलेल्या आर्थिक संकटामुळे खर्च चहूकडून कमी करण्याची सवय आता लावावी लागेलच. अर्थ तज्ञांचे मानणे आहे की शंभर वर्षात असे आर्थिक संकट आलेले आहे.

तुम्ही आहात तर आम्ही आहोत

कोरोना विरुद्ध लढल्या जाणार या युद्धात डॉक्टर्स, पोलीस आणि सफाई कर्मचारी महत्त्वाची भूमिका वठवत आहेत. समाज त्यांचे महत्त्व जाणत आहे आणि त्यांना सन्मानितदेखील केले जात आहे. आत्तापर्यंत समाज, जो सफाई कर्मचाऱ्यांपासून अंतर ठेवून राहायचा, शक्यता आहे की आता समजेल की यांची एका दिवसाची अनुपस्थितीदेखील किती जाणवते. आता यांना यथोचित सन्मान दिला जाईल.

जीवनात कुटुंबाची भूमिकादेखील या लॉकडाऊनदरम्यान सगळे समजून चुकले आहेत. दिल्लीच्या पटेल नगरमध्ये राहणाऱ्या मनीषचे म्हणणे आहे की रोजच्या धावपळीच्या जीवनात त्यांना ना मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळायची आणि ना आपल्या सासू-सासऱ्यांसोबत. लॉकडाऊनदरम्यान सर्वांना एकत्र वेळ घालवण्याची जी संधी मिळाली आहे त्यामुळे आपसातील बंध विकसित झालेला आहे. भविष्यातदेखील अशाच प्रकारे वडीलधारे नव्या पिढीच्या समस्यांना समजून घेतील तसेच नवीन पिढी त्यांच्या अनुभवांनी स्वत:ला उजळवत राहील. कौटुंबिक सदस्यांचे बॉण्डिंग आता दिवसेंदिवस मजबूत व्हावे हीच वेळेची मागणी आहे.

प्रत्येक स्थितीत आनंदी

लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत जीवन सुखकर बनवण्याचे कार्य कोणत्या न कोणत्या रूपात होत राहिले आहे. पहिला लॉकडाऊन होताच स्वत:ला चिंतामुक्त ठेवून मन रमण्याचे विविध उपाय शोधण्याची कसरत सुरू झाली. काही घरांमध्ये विविध रेसिपीज बनल्या, तर कुठे शिवणकाम, पेंटिंग, पुष्परचना इत्यादींच्या मदतीने स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचे प्रयत्न झाले. काही लोकांनी जुने छंद पुन्हा आजमावले, तर काहींनी नवी कला शिकण्यात रुची दर्शवली.

नोएडाचे रहिवासी सुमित किचनमध्ये पाय ठेवत नव्हते, परंतु लॉकडाऊनदरम्यान आपली पत्नी वंदिताकडून त्यांनी जेवण बनवायला शिकले.

गुरुग्रामच्या राहणाऱ्या दिव्याने लग्नाआधी ब्युटीशियनचा कोर्स केला होता. आपल्या या कलेला उपयोगात न आणू शकण्याने त्या नेहमी निराश होत असत, परंतु जेव्हा सलुन न उघडू शकल्यामुळे त्यांनी पतीचे केस कापले तेव्हा लक्षात आले की गुण कधीच वाया जात नाहीत.

तरुण वर्ग लॉकडाऊनदरम्यान जंक फुडपासून दूर राहून संगीत ऐकणे आणि वेब सिरीज आधी पाहण्यात मन रमवणयासोबतच सोशल डिस्टंसिंगचेदेखील पालन करीत आहे.

हे तर सगळेच समजून चुकले आहेत की कोव्हिड-१९ आपला पिच्छा लवकर सोडणार नाहीए. सिनेमा, पार्टी, रेस्टॉरंट आणि सुट्टीच्या दिवशी गर्दीच्या जागी फिरणे आता दूरचे स्वप्न आहे. त्यामुळे घरात राहून आता प्रत्येक स्थितीत आनंदी मनस्थिती बनवून कोरोनाव्हायरससोबत, दूर राहण्याच्या मार्गावर चालावे लागेल.

कोरोना काळाने सर्वांनाच जीवन जगण्याचा एक वेगळा मार्ग दिला आहे. रस्ता नवीन आहे तर याची आव्हानेदेखील वेगळी आहेत. व्यक्तिगत, सामाजिक आणि आर्थिक जीवनात समस्यांशी लढताना भविष्याच्या उत्तममतेसाठी प्रयत्न होत आहेत, तसेच तांत्रिक क्षेत्रात नव्या शक्यता शोधल्या जात आहेत. गरज आहे, की आता या काळातील अनुभवांमुळे विषम परिस्थितींचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करणे शिकायला हवे.

घरच्या जबाबदाऱ्यांबाबत पुरुष किती जागरूक

* निभा सिन्हा

वसुधाने ऑफिसमधून येताच पती रमेशला विचारले की, अतुल आता कसा आहे? आणि ती अतुलच्या खोलीत निघून गेली. तिने त्याच्या डोक्याला हात लावला, तेव्हा जाणवले की तो तापाने फणफणला आहे.

ती घाबरून ओरडली, ‘‘रमेश, याला तर खूप ताप आहे. डॉक्टरकडे न्यावे लागेल.’’

रमेश खोलीत येईपर्यंत वसुधाची नजर अतुलच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या औषधावर पडली, जे त्याला दुपारी द्यायचे होते.

ताप वाढण्याचे कारण वसुधाच्या लक्षात आले. तिने रमेशला विचारले, ‘‘तू अतुलला वेळेवर औषध दिले होतेस का?’’

‘‘मी वेळेवरच औषध आणले होते, पण तो झोपला होता. मी १-२ वेळा हाका मारल्या, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही, तेव्हा मी औषध इथेच ठेवून निघून गेलो. मी विचार केला की तो उठेल, तेव्हा स्वत:हून घेईल. मला काय माहीत, त्याने औषध घेतले नसेल.’’

आधीच वैतागलेली वसुधा चिडून म्हणाली, ‘‘रमेश, औषध घेणे आणि घ्यायला लावणे यात फरक असतो. तुला काय माहीत म्हणा या गोष्टी. कधी मुलांची देखभाल करशील, तेव्हा कळेल ना.’’ मग तिने अतुलला २-३ बिस्किटे खायला घालून औषध दिले आणि त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवू लागली. अर्ध्या तासानंतर त्याचा ताप थोडा कमी झाला, त्यामुळे लगेच डॉक्टरकडे धावाधाव करण्याची गरज पडली नाही.

खरे म्हणजे, वसुधाचा १० वर्षांच्या मुलगा अतुलला ताप होता. तिच्या सुट्टया संपल्या होत्या, त्यामुळे रमेशला मुलाच्या देखभालीसाठी सुट्टी घ्यावी लागली होती. ऑफिसला निघण्यापूर्वी वसुधाने रमेशला पुन्हा-पुन्हा समजाविले होते की, अतुलला वेळेवर औषध दे, पण ज्या गोष्टीची भीती होती, तीच घडली.

७५ वर्षीय विमला गुप्ता हसत म्हणते, ‘‘ही कहाणी तर घराघरांतील आहे. मागच्या आठवडयातच मी माझ्या सुनेबरोबर शॉपिंग करायला गेले होते. तेव्हा दोन वर्षांच्या नातीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या आजोबांवर सोपविली होती. नातीला सांभाळण्याच्या नादात आजोबांनी ना वेळ पाहिली आणि ना ही घरातील आवश्यक गोष्टी लक्षात ठेवल्या. ते घराला सरळ कुलूप लावून नातीला सोबत घेऊन पार्कमध्ये निघून गेले. तेवढया वेळात मोलकरीण येऊन माघारी निघून गेली होती. आम्ही घरी परतलो, तेव्हा भरपूर खरकटया भांडयांबरोबरच आवरण्यासाठी किचन आमची वाट पाहत होते. त्यांनी एक काम केले. मात्र दुसरे बिघडवून ठेवले.’’

या गोष्टी वाचताना तुम्ही असा विचार तर करत नाहीए ना की, अरे इथे तर आपलेच रडगाणे सांगितले जातेय. हो, बहुतेक महिलांची ही तक्रार असते की पती किंवा घरातील एखाद्या पुरुष सदस्याला काही काम सांगितल्यास समस्या वाढतात. शेवटी असे का घडते की पुरुषांकडून केली जाणारी घरातील कामे बहुतेक महिलांना आवडत नाहीत. त्यांच्या कामात शिस्त नसते किंवा ते जाणीवपूर्वक ते काम अर्धवट सोडतात?

पुरुषांच्या पद्धती अन् प्रवृत्तीमध्ये भिन्नता

याबाबत अनुभवी असलेल्या विमला गुप्ताचे म्हणणे आहे की खरे तर स्त्री-पुरुषांच्या काम करण्याच्या प्रवृत्ती आणि पद्धतीमध्ये फरक असतो. बहुतेक पुरुषांना लहानपणापासून घरातील कामांपासून दूर ठेवले जाते, तर मुलींना घरातील कामे शिकविण्यावर भर दिला जातो. अशा वेळी पुरुषांना अशी कामे करण्याबाबत आत्मविश्वास नसतो आणि ते ऑफिसप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी कामे उरकण्याचा प्रयत्न करतात. खास करून घरसंसाराच्या कामांबाबत त्यांना जे सांगितले जाते, ते आपली डयुटी समजून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ते त्या कामाबाबत विशेष काळजी घेत नाहीत.

याउलट स्त्रिया स्वभावानेच काम करण्याबाबत अपेक्षेपेक्षा जास्त प्रामाणिक असतात. त्या केवळ कामच करीत नाहीत, तर त्याच्याशी संबंधित इतर अनेक गोष्टींबाबत जास्त जागरूक असतात.

बेफिकीर व आळशी

दूध गॅसवर ठेवून विसरून जाणे, दरवाजा उघडा ठेवणे, टीव्ही पाहता-पाहता झोपी जाणे, पाणी पिऊन फ्रिजमध्ये रिकामी बॉटल ठेवणे, सामान इकडे-तिकडे पसरवून ठेवणे, आणखीही अशा अनेक छोटया-मोठया गोष्टी असतात, त्या पाहून म्हटले जाते की पुरुष स्वभावानेच बेफिकीर, स्वतंत्र आणि निष्काळजी असतात. पण प्रत्यक्षात असे नाहीये की ते घरातील काम योग्य पद्धतीने करू शकत नाहीत.

तज्ज्ञांच्या मतानुसार, वास्तविकता ही आहे की, त्यांनी काही हालचाल न करताच सर्व काही मॅनेज होते. त्यामुळे ते आळशी बनतात आणि घरातील कामे करण्यास टाळाटाळ करू लागतात. एक महत्त्वपूर्ण सत्य हेही आहे की काही पुरुषांना घरातील कामे करणे कमीपणाचे वाटते. ते तासंतास एका जागी बसून टीव्हीवर रटाळ कार्यक्रम पाहू शकतात, पण घरातील कामे करत नाहीत.

दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण

ही गोष्ट अनेक पुरुषांनी मान्यही केलीय की, घर आणि ऑफिस मॅनेज करणे आपल्या आवाक्यातील गोष्ट नाही, पण महिला नोकरदार असो किंवा गृहिणी, आजच्या काळात त्यांचा एक पाय किचनमध्ये तर दुसरा बाहेर असतो. गृहिणी महिलांनाही घरातील कामांबरोबरच बँक, शाळा, वीज-पाण्याचे बिल भरणे, शॉपिंगसारखी बाहेरील कामे स्वत:लाच करावी लागतात. तर याच्या तुलनेत पती क्वचितच घरातील कामांत त्यांना मदत करतात. जर महिला नोकरदार असेल, तर कामाचा भार जरा जास्तच वाढतो. त्यांना आपल्या ऑफिसच्या कामांबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्याही नेटकेपणाने पेलाव्या लागतात. महिलांना आपल्या घरच्या जबाबदाऱ्यांपासून कधीही मुक्त होता येत नाही. दुहेरी जबाबदाऱ्या पेलल्यामुळे नोकरदार असूनही त्या नेहमी घरसंसाराच्या रहाटगाडग्यात गुंतलेल्या असतात.

अनुभव अन् परिपक्वता

मीनल एक उच्च अधिकारी आहे. तिचे स्वत:चे रूटीन खूप व्यस्त असते. तरीही ती सांगते, ‘‘सकाळचा वेळ कसा पळतो हे तर विचारूच नका. तुम्ही कितीही उच्च पदावर कार्यरत असाल, पण घरातील सदस्य आपणाकडून मुलगी, पत्नी, सून आणि आईच्या रूपात अपेक्षा ठेवतातच. याउलट पुरुषांकडून कमी अपेक्षा ठेवल्या जातात. अशा वेळी मग नाइलाज गरज म्हणून म्हणा किंवा महिलांना मल्टिटास्कर बनावेच लागते. अर्थात, एका वेळी अनेक कामे करणे उदा. एका बाजूला दूध उकळतेय, तर दुसऱ्या बाजूला वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतले जात आहेत, मुलांचा होमवर्क घेतला जात आहे, तर त्याच वेळी पतीची चहाची फर्माइश पूर्ण केली जात आहे. ही कामे करुनच महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक अनुभवी आणि परिपक्व होतात.’’

एका संशोधनानुसार, स्त्रियांचा मेंदू पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतो, त्यामुळे त्या एका वेळी अनेक कामे पूर्ण करू शकतात.

जॉर्जिया आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या एका स्टडी रिपोर्टनुसार, महिला जास्त अलर्ट, फ्लेझिबल आणि ऑर्गनाइज्ड असतात. त्या चांगल्या लर्नर असतात. अशा प्रकारचे संदर्भ देऊन ही गोष्ट सिद्ध केली जाऊ शकते की पुरुषांमध्ये घरातील जबाबदाऱ्या निभाविण्याची क्षमता स्त्रियांपेक्षा कमी असते.

आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आधुनिक काळात पत्नी जर नोकरी करून पतीला त्याच्या बरोबरीने आर्थिक मदत करते, तर पुरुषांचीही जबाबदारी बनते की त्यांनीही घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात स्त्रीला तिच्या बरोबरीने स्वत:ला घराप्रती जागरूक व निपुण सिद्ध करावे.

हिवाळा : फनी दिसण्याचा मोसम

* मोनिका गुप्ता

हिवाळा सुरू होताच महिलांच्या पोशाखात विशेष असा बदल येऊ लागतो. थंडीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी महिला अनेक प्रकारचे उपाय करून पाहतात. काही तर या सीजनला फॅशन सीजनच समजतात. काही महिला असे काही कपडे परिधान करतात की त्यांना पाहून कडाक्याच्या थंडीतही आपल्याला घाम येऊ लागतो आणि हसू आवरता आवरत नाही.

तर मग या, काही महिलांनी परिधान केलेल्या काही अशाच खास पोशाख पद्धतींविषयी जाणून घेऊया, ज्या पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

प्रत्येक महिलेला सुंदर दिसावे असे वाटत असते आणि याची सर्वाधिक उदाहरणे थंडीच्या मोसमात पाहायला मिळतात. बदलत्या मोसमातसुद्धा यांना स्वत:ला इतरांहून वेगळे दाखवायचे असते. कधी कधी त्यांचा हा वेगळा लुक फनी लुक बनतो.

आता हेच पहा ना, आजच्या युवा मुलींच्या डोक्यावर कानटोपी, गळयात मफलर, लाँग जॅकेट, पण नजर जेव्हा त्यांच्या पायावरील पातळ चुडीदार किंवा सलवारवर जाते तेव्हा तुम्हाला घाम येणे निश्चित असते. तुम्ही हाच विचार करत राहता की अरे ही कोणती फॅशन आहे? डोक्याला थंडी वाजते, शरीर, हात सर्वाना थंडी वाजते, पण पायांना थंडी वाजत नाही.

अशा अनेक अंदाजात तुम्हाला महिलांचा अजब फनी लुक पाहायला मिळत असतो.

बारीक स्त्रीसुद्धा दिसू लागते जाडी

आता ज्या महिला अतिशय बारीक असतात, त्यांच्यासाठी तर फुग्यात हवा भरल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. स्वेटरच्या ओझ्याखाली या बिचाऱ्या दबून जातात. स्वेटरवर स्वेटर, जे त्यांना जाड दाखवण्यासाठी पुरेसे असतात, पण कधी यांच्या गोलमटोल शरीरावरून नजर हटवून त्यांच्या चेहऱ्यावरही लक्ष द्या. अरे, शरीरावर तर स्वेटरचा थर चढवलात, पण चेहऱ्याचे काय. जरा विचार करा जेव्हा शरीर जाडजूड दिसतं आणि चेहरा मात्र बारीक तेव्हा ते किती फनी दिसत असेल.

ओळखणे कठीण आहे

काही महिला यादरम्यान स्वत:ला अशा काही झाकून घेतात की त्यांना ओळखणं मुश्किल होऊन बसते. इतकेच कशाला कुणी पती आपल्या पत्नीला, कुणी बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला ओळखण्याआधी १० वेळा विचार करेल. जरा कुठे थंडी पडू लागली की या स्वत:ला अशा काही झाकून ठेवतात की जणू काही थंडीचा सर्वाधिक परिणाम यांच्यावरच होत आहे.

मफलर वुमन

थंडीचा मोसम येताच सोशल मिडियावर दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल हे सर्वप्रथम निशाण्यावर असतात. कोणी त्यांना आले मफलर मॅन किंवा एक मफलर पुरुष अशा फनी टोपणनावांनी संबोधतात.

इतकेच नाही तर केजरीवाल यांची मफलर घालण्याची स्टाइल हल्ली फॅशन आयकॉन बनली आहे. काही महिला मोठया प्रमाणावर केजरीवाल मफलर परिधान करताना दिसून येतात. जर तुम्हाला वाटत असेल की केजरीवाल मफलर स्टाइल आहे तरी काय तर तुम्हाला आम्ही येथे सांगतो. खरंतर थंडीच्या मोसमात केजरीवालजी मफलर जरूर परिधान करतात. त्यांची मफलर घालण्याची स्टाइल फार वेगळी आहे. ते डोक्यापासून मानेपर्यंत मफलर गुंडाळून घेतात. हा केजरीवाल मफलर लुक इतका फेमस झाला आहे की सोशल मिडियावर याचे मिम्सही बनू लागले आहेत.

अनेक महिला आणि पुरुष या केजरीवाल मफलर अंदाजात दिसू लागले आहेत. ते स्वत:ला मफलरमध्ये असे काही गुरफटून टाकतात की जणू काही मफलर हटवला तर थंडी यांच्या मानगुटीवरच येऊन बसेल.

मोजे आणि चपलांची लढाई

थंडीपासून रक्षण करण्याचे आपण सर्व उपाय अजमावून पाहतो आणि हेच उपाय करताना आपण कधी कधी स्वत:लाच एक फनी लुक देत असतो.

आता तुम्ही कामावर जाणाऱ्या स्त्रियांकडेच पाहा ना. थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला पूर्ण पॅक करून घेतात, पण कधी तुम्ही त्यांच्या पायांकडे पाहिले आहे का. विश्वास ठेवा तुम्ही आपले हसू रोखू शकणार नाही.

मोजे आणि चपलांची लढाई पाहायला फार मजा येते. आता या असे मोजे घालतात, ज्यामुळे यांची बोटे चपलांमध्ये सरकतच नाहीत. पूर्ण रस्ताभर ही लढाई सुरू असते आणि कधी कधी या लढाईत महिला पडता पडता स्वत:ला सांभाळताना दिसतात.

थंडीत नो मॅचिंग

थंडीसुद्धा कमालच करते. कधी तुम्हाला आळसाच्या रजईत स्वत:ला झाकून ठेवते तर कधी रंगबेरंगी कपडयात लपेटून टाकते.

थंडीपासून बचाव करण्याचे अनेक बहाणे शोधले जातात. ज्या महिला स्वत:ला नेहमी फॅशनेबल ठेवत होत्या, ज्या नेहमी प्रत्येक गोष्ट मॅचिंग करून घालत होत्या, तुम्ही पाहू शकता थंडी येताच हातमोजे वेगळया रंगाचे, जरा नीट लक्ष द्याल तर कळेल की मोजेही रंगीबेरंगी दिसतात. मग दिवसा थोडे गरम होऊ लागल्यावर जेव्हा या महिला आपला स्वेटर काढतात, तेव्हा तुमच्या लक्षात येते की यांची साडी वेगळी आणि ब्लाउज वेगळया कलरचा आहे. म्हणजे थंडी हा असा मोसम आहे जो काहीही करवून घेऊ शकतो.

मंकी कॅपची जादू

तुम्ही थंडीत पुरुषांना मंकी कॅप घालताना पहिले असेलच. पण जरा विचार करा, हीच मंकी कॅप जर महिलांनी परिधान केली तर ते कसे दिसेल. हा विचार करूनच हसू येऊ लागते की महिला आणि मंकी कॅप किती फनी लुक दिसेल जेव्हा महिला मंकी कॅपमध्ये दिसू लागतील.

बाहेर तर महिला मंकी कॅप घालत नाहीत, पण जेव्हा त्या घरी असतात तेव्हा थंडीपासून बचाव करण्यासाठी मंकी कॅपची जादूच कामी येते.

खरंतर मंकी कॅप डोक्यापासून मानेपर्यंत थंडीपासून संरक्षण देते आणि महिला जेव्हा घरात असतात, तेव्हा मंकी कॅप घालून थंडीपासून तर स्वत:चा बचाव करतातच, त्याचबरोबर क्युट आणि फनी लुकमध्येही दिसून येतात.

मुलांच्या पुढे येताहेत मुली

* मोनिका गुप्ता

एक काळ होता जेव्हा मुली घरकामात आपल्या आईला मदत करण्यापुरत्या मर्यादित होत्या. घरातील स्वयंपाक-पाणी, पाहुण्यांचे आदरातिथ्य बस्स एवढेच त्यांचे जग होते. शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना विवाहाच्या बेडीत बांधले जाई. परंतु बदलत्या काळाबरोबर मुलींविषयी ना केवळ आई-वडील तर समाजाचीही विचारसरणी बदलली आहे. आज बदलत्या काळाच्या स्पर्धेत मुली प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा पुढे जात आहेत.

सीबीएसई बोर्ड, यूपी बोर्ड, आयसीएसई बोर्ड या सगळयांमध्ये मुलींचा रिजल्ट मुलांपेक्षा चांगला लागतो.

समाजाच्या रूढीवादी विचारसरणीवर मात करत आज मुली आपल्या प्रगतीच्या आकाशात उड्डाण भरत आहेत आणि त्याचबरोबर आपले कर्तव्यही पूर्ण निष्टेने बजावत आहेत.

असे नाही की मुले आपले कर्तव्य पार पाडण्यात चुकत आहेत पण ज्याप्रकारे घरातील महिला वा मुली कुटुंब सांभाळण्याबरोबरच बाहेर समाजातही आपली एक ओळख बनवत आहेत, त्या तुलनेत मुले असे करत नाहीत. ते फक्त बाहेरच्या कामांपुरतेच मर्यादित राहतात.

विचारसरणी बदलण्याची गरज

जेव्हा एक मुलगी घरातील कामांबरोबरच बाहेरची कामे ही करते, तर मग घरातील मुले का करू शकत नाहीत? घरकामांमध्ये मुलांची आवड कमी दिसून येते. जर घरातील महिला स्वयंपाकाची कामे करते तर पुरुष घरातले पंखे स्वच्छ का करू शकत नाही. हे आवश्यक नाही की घरातील कामे म्हणजे स्वयंपाक घर सांभाळणे आहे. घरात स्वयंपाकाशिवायही बरीच कामे असतात, जी पुरुषांद्वारे सहजपणे केली जाऊ शकतात. जसे प्लंबरला किंवा इलेक्ट्रिशियनला बोलावणे वगैरे.

महिला आठवडयाचे सातही दिवस घर व बाहेर सांभाळते. अशावेळी घरातील पुरुषमंडळी या कामांसाठी आपला वेळ का नाही काढू शकत?

खरेतर आपल्या समाजात आधीपासूनच विभाजन करून ठेवले आहे. हे आधीपासूनच निश्चित असते की कोणते काम मुलगा करेल आणि कोणते काम मुलगी.

याच कारणाने मुलांची विचारसरणी हे मानते की हे काम फक्त महिलांचे आहे. पण आता ही मानसिकता प्रत्येक घराची नाहीए, कारण आपल्या समाजात बदल होत आहेत आणि बदलत्या समाजात काही कुटुंबे अशीही आहेत, जेथे प्रत्येक काम बरोबरीचे असते.

याविषयी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर संगीता कुमारीचे म्हणणे आहे, ‘‘व्यक्तिला लिंग-भेद करण्याआधी एक मनुष्य असण्याचे कर्तव्य निभवायला हवे. जर आपण अजून ही या स्वतंत्र देशात अशा रूढीवादी विचारसरणीला प्रोत्साहन देत राहिलो तर आपली मानसिकता, आपले विचार नेहमीच संकुचित राहणार.’’

ज्यामुळे भेदभाव होणार नाही

देश स्वतंत्र झाला. काळ बदलला. पण काही गोष्टींचे स्वतंत्र होणे अजून बाकी आहे. दिल्ली रहिवासी बिझनेस वुमन प्रीती सांगतात, ‘‘मला २ मुले आहेत आणि ते मला कधी मुलगी नसल्याची उणीव भासू देत नाहीत. घरातील कामांत माझी मदत करतात. माझी पूर्ण काळजी घेतात. आपल्या व्यस्त शेड्युलमुळे मीच त्यांना जास्त वेळ देऊ शकत नाही.’’

कोणाही मनुष्याला बाह्य दृष्टीने बदलणं खूप सोपं असतं, परंतु मानसिक रूपाने बदलणे खूप अवघड.

आजही अशी घरे आहेत, जेथे मुली नाही नाहीत आणि लोक तरसतात की किती बरे झाले असते जर त्यांना एक मुलगी असती तर. तसेच अशीही घरे आहेत की जेथे मुली नाहीत आणि ते या गोष्टीचा जणू उत्सव साजरा करतात. हे ते लोक आहेत, जे आपल्या समाजाला रूढीवादी विचारसरणीचा गुलाम बनवू पाहत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचे मानणे आहे की आपण लहानपणापासून आपल्या मुलांना रुल एंड रेग्यूलेशनचे धडे शिकवू लागतो. काही असे रुल्स, जे आमच्या मुलांना मर्द बनवतात. जर मुलगा रडला तर त्याला शिकवले जाते की रडणे मुलांचे नव्हे तर मुलींचे काम आहे. अशी शिकवण दिल्यामुळेच मुले असे आचरण करू लागतात आणि घरकामांमध्ये इंटरेस्ट घेत नाहीत. कारण त्यांना माहीत असते, जे काम आपल्यासाठी नाहीच आहे, ते का करायचे. जर आपण अशाप्रकारचे धडे शिकवणे बंद केले तर आपल्या समाजातील हा भेदभाव संपूर्ण जाण्यास वेळ लागणार नाही.

जेव्हा मुलांचे बोलणे आणेल लाज

* डॉ. गौरव गुप्ता

नेहमीच आपण लोकांना हे सांगताना ऐकतो की मुलं तर आता मुलांप्रमाणे वागतच नाहीत. अनेक मुलं अशा काही गोष्टी बोलतात की कुटुंबातील लोकांना दुसऱ्यांच्या समोर लाजिरवाणं वाटतं. उदा :

खासगी गोष्ट बोलणे

अनेक मुलं कुटुंबातील खासगी गोष्टी उदा. आईवडिलांच्या आपसातील संबंधांच्या गोष्टी किंवा दुसरी एखादी गोष्ट अशा प्रकारे बोलतात की आईवडिलांना शरमिंधा वाटते.

याबाबत अनेक प्रचलित घटनांची पुनरावृत्ती होणे चुकीचं ठरणार नाही. काही मित्र घरात गप्पा मारत होते, इतक्यात लाइट गेला. एक जण लाइटची व्यवस्था करण्यासाठी आत गेला. यादरम्यान तिथेच बसलेला एक मित्र ५ वर्षांच्या मुलाला विचारू लागला,  ‘‘बाळा, तुला काळोखात भीती तर वाटत नाहीए ना?’’

तो पटकन म्हणाला, ‘‘मी बाबांसारखा डरपोक नाहीए. मला जेव्हा कधी भीती वाटते, तेव्हा मी आईजवळ जाऊन झोपतो. पण बाबांना तर रोज रात्री भीती वाटते आणि तेही आईजवळ येऊन झोपतात.’’

सांगायलाच नको, सर्वजण खोखो करून हसले आणि मुलांचे आईवडील लाजेने लाल झाले.

इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलणे

मुलं केवळ खासगी गोष्टीच नव्हे, काही अशा गोष्टीही दुसऱ्यांच्यासमोर बोलतात, ज्या कधी त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्याबाबत बोललेल्या असतात.

एका घराची घंटी वाजली, तेव्हा ७ वर्षांचा मुलगा धावत दरवाजा उघडायला गेला आणि मग तिथूनच ओरडला, ‘‘आई, काका आलेत.’’

आईने विचारलं, ‘‘कुठले काका?’’

तो म्हणाला, ‘‘आई, तेच काका, जे गेल्यानंतर तू नेहमी बाबांना सांगतेस की तुमचा हा भिकारी मित्र नेहमी जेवणाच्या वेळी टपकतो. खादाड कुठला. नकोही म्हणतो आणि खातही जातो.’’

तुम्हाला कळलंच असेल, त्या व्यक्तीसमोर आईला किती लाज वाटली असेल.

अनेकदा मुलं कुटुंबातील सदस्यांची आपसात झालेल्या भांडणांची इतरांसमोर पोलखोल करून घरच्यांना लाज आणतात.

अशा स्थितींपासून वाचण्यासाठी मुलांसमोर केवळ त्या गोष्टींचीच चर्चा करा, ज्या त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत.

शिव्या देणे

काही मुलं शिव्या द्यायला शिकतात. अर्थात, मुलांना तेवढी समज नसते, ना ही त्यांना माहीत असतं की शिव्या देणे वाईट गोष्ट आहे. त्यामुळे ती कोणासमोरही शिव्या देऊ लागतात.

अशावेळी आईवडिलांनी आपली मुलं कुठून शिव्या घालायला शिकत आहेत, याकडे लक्ष ठेवावे. याला ते स्वत: तर जबाबदार नाहीत ना. अनेक कुटुंबांत रागात शिव्या घालणे सामान्य गोष्ट आहे.

घराच्या आर्थिक स्थितीची पोलखोल करणे

घरात अनेक प्रकारच्या समस्या असतात, पण लोक समाजात आपला एक स्तर बनवून राहतात. अनेकदा मुलं घरातील आर्थिक स्थितीची पोलखोलही करतात.

उदा. घराची स्थिती ठीक नाही, तर एखाद्या खास फंक्शनसाठी आपण आपल्या एखाद्या मैत्रिणीची साडी किंवा दागिने मागून घातलेत. पार्टीत कोणीतरी कौतुक केल्यानंतर आपण हे सांगू लागलात की आपली साडी आणि दागिने किती किमती व चांगले आहेत. पण आपल्या मुलाने सर्वांसमोर हे सांगितलं की, आईजवळ पैसे नव्हते. तेव्हा आपल्याला किती लाजिरवाणं वाटेल, हे आपणच जाणू शकता.

मोठ्या आवाजात बोलणे

अनेक मुलांना लगेच राग येतो आणि ती जोरजोरात ओरडून बोलू लागतात. घरात आई सहन करत त्यांचं बोलणं मानते. त्यामुळे ती बाहेरही तसंच वागू लागतात.

समजा, आई कोणाकडे तरी डिनरसाठी गेली असेल किंवा कोणाला आपल्या घरी आमंत्रित केलं असेल. पाहुण्यांसमोर आईने आपल्या मुलांना एखाद्या कामासाठी नकार दिला. अशावेळी ती आपलं तेच खरं करण्यासाठी ओरडू लागली, तर लज्जित होण्यापासून वाचण्यासाठी आईला त्यांचं बोलणं मान्यही करावं लागतं, शिवाय पाहुण्यांसमोर तिची इमेज खराबही होते.

शॉपिंगसाठी हट्ट करणे

जर मूल मॉल किंवा एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये काही खरेदी करण्यासाठी हट्ट करत असेल आणि आईवडील घेऊन देण्यास नकार देत असतील, तेव्हा ते रडू लागते आणि वाट्टेल ते बोलू लागते. अनेकदा तर मूल एवढं उत्तेजित होतं की ते आपल्या आईला सर्वांसमोर बोलू लागते की तू घाणेरडी आहेस, मला काही घेऊन देत नाहीस आणि जमिनीवर लोळू लागतात. अशावेळी आईवडिलांचा चांगलाच तमाशा बनतो.

अपशब्द बोलणे

अनेक मुलं एवढी उध्दट असतात की घर आणि बाहेरच नाही, तर शाळेत शिक्षक व इतर मुलांनाही अपशब्द बोलायला मागे-पुढे पाहत नाहीत. जाडा, भिकारी, वेडा, चोर यांसारख्या अपशब्दांचा विचार न करता वापर करतात.

मुलांचे वागणे असे ठीक ठेवा

आईवडिलांसाठी मुलाला जन्म देण्यापेक्षा मोठी जबाबदारी त्यांच्या चांगल्या देखभालीची असते. कुटुंबाला मुलाची पहिली शाळा म्हटली जाते. या शाळेत मुलाने काय शिकावं, हे संपूर्णपणे आईवडिलांवर अवलंबून असते.

लहानपणापासूनच चांगल्या सवयी लावा

मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की मुलाच्या जीवनातील पहिली ६ वर्षे त्याच्यासाठी ब्लू प्रिंट असतात. अशावेळी आईवडिलांसाठी खूप आवश्यक आहे की त्यांनी मुलांना चांगल्या सवयी लावाव्या.

वाईट संगतीपासून दूर ठेवा

आपल्या मुलाच्या शाळेतील आणि आजूबाजूच्या मित्रांवर नजर ठेवा. जर एखाद्या मुलाचं वागणं वाईट असेल किंवा त्याच्या घरातील वातावरण खराब असेल, तर अशा मुलांसोबत आपल्या मुलाला राहू देऊ नका.

जर आपलं मूल एखादी चुकीची गोष्ट बोलत असेल, तर त्याला विचारा की हे सर्व तो कुठून शिकला. जर शेजारीपाजारील एखाद्या मुलाकडून शिकला असेल, तर त्याच्या आईवडिलांना याबाबत जरूर सांगा. जर शाळेतून शिकून आला असेल, तर पेरेंट्स-टीचर मीटिंगमध्ये या गोष्टीवर जरूर चर्चा करा.

मुलासोबत वेळ घालव

आईवडील आपल्या खासगी जीवनात एवढे व्यस्त असतात की त्यांच्याजवळ आपल्या मुलासाठी वेळच नसतो. आपण कितीही व्यस्त असलात, तरी आपल्या मुलासाठी वेळ जरूर काढा. त्यांच्या संगतीचा आनंद घ्या. लक्षात ठेवा, मुले आपल्या आईवडिलांकडे पाहूनच शिकत असतात.

आपलं वागणं घरातील इतर लोकांसोबत कसं आहे, याचा परिणाम आपल्या मुलावर खोलवर होतो.

शक्य असेल, तर आपल्या घरातील प्रौढांना आपल्यासोबतच ठेवा. त्यामुळे आपण डे केयरच्या मोठ्या फीपासूनही वाचू शकता आणि मुलंही आईवडिलांकडून सतत शिकत राहतील.

काय आहे सोशल मिडियाचे व्यसन

– गरिमा पंकज

अनेकदा एकटेपणा किंवा कंटाळा घालवण्यासाठी आपण सोशल मिडियाचा आधार घेतो आणि हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. कालांतराने ही सवय कधी आपणास व्यसनाच्या जाळयात अडकवते हे कळतदेखील नाही. त्यावेळी मनात असूनही आपण यापासून दूर राहू शकत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणे सोशल मिडियाचे व्यसनही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक स्तरावरही नकारात्मक प्रभाव पाडते.

अमेरिकन पत्रिका ‘प्रिव्हेंटिव मेडिसिन’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधानानुसार जर आपण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, ट्विटर, गुगल, लिंक्डइन, यूट्यूब, इंस्ट्राग्राम आदींवर एकटेपणा घालवण्यासाठी जास्त वेळ घालवत असाल तर परिणाम उलट होऊ शकतो.

संशोधनाच्या निष्कर्षानुसार, तरुण जितका जास्त वेळ सोशल मिडियावर घालवतात आणि सक्रिय राहतात, त्यांना तितकेच जास्त समाजापासून अल्प्ति राहावेसे वाटेल. यासंदर्भात संशोधनकर्त्यांनी सोशल मिडियावरील सर्वात लोकप्रिय ११ वेबसाईट्सच्या वापराबाबत १९ ते ३२ वर्षे वयापर्यंतच्या १,५०० अमेरिकी तरुणांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याचे विश्लेषण केले.

अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाचे प्रमुख लेखक ब्रायन प्रिमैक यांच्या मतानुसार, ‘‘आपण सामाजिक प्राणी आहोत, पण आधुनिक जीवनशैली आपल्याला एकत्र आणायचे सोडून आपल्यातील अंतर वाढवत आहे. मात्र आपल्याला असे वाटते की सोशल मिडिया सामाजिक अंतर संपवण्याची संधी देत आहे.’’

सोशल मिडिया आणि इंटरनेटचे काल्पनिक जग तरुणांना एकटेपणाचे शिकार बनवत आहे. अमेरिकेची संघटना ‘कॉमन सैस मिडिया’च्या एका सर्वेक्षणानुसार किशोरवयीन मुलांनाही जवळच्या मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मिडिया आणि व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधायला जास्त आवडते. १३ ते १७  वर्षे वयोगटांतील १,१४१ किशोरवयीन मुलांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. ३५ टक्के किशोरवयीन मुलांना व्हिडिओ मेसेजद्वारे मित्रांशी संपर्क साधायला जास्त आवडते. सोशल मिडियामुळे मित्रांना भेटताच येत नाही, हे ४० टक्के मुलांनी मान्य केले. तर फोन किंवा व्हिडिओ कॉलशिवाय राहूच शकत नाही, असे ३२ टक्के मुलांनी सांगितले.

इंटरनेटच्या सवयीमुळे किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक विकासावर अर्थात सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सातत्याने काल्पनिक जगात रमणारे किशोरवयीन खऱ्या जगापासून अलिप्त होतात. यामुळे ते निराशा, हताशपणा, उदासिनतेची बळी ठरू शकतात.

सोशल मिडियाचे जाळे हळूहळू मोहजालात अडकवून आपले किती नुकसान करत आहे, हे लक्षात घ्या. आजकाल घरात जास्त कुणी नसल्याने आईवडीलच मुलांचे मन रमावे यासाठी त्यांच्या हातात स्मार्टफोन देतात. त्यानंतर एकटेपणामुळे कंटाळलेली मुले स्वत:च स्मार्टफोनमध्ये आपले जग शोधू लागतात. सुरुवातीला सोशल मिडियावर नवेनवे मित्र जोडणे त्यांना खूपच आवडते, पण हळूहळू या काल्पनिक जगाचे वास्तव समजू लागते. याची जाणीव होते की जग जसे एका क्लिकवर आपल्यासमोर येते, तसेच एका क्लिकवर गायबही होते आणि आपण राहतो एकटे, एकाकी, खचून गेलेले. त्याचप्रमाणे जी मैलो न् मैल दूर राहूनही आपल्या मनासह विचारांवर ताबा मिळवतात अशी खोटी नाती काय उपयोगाची?

एकदा का कोणाला सोशल मिडियाची सवय लागली की तो सतत आपला स्मार्टफोन विनाकारण चेक करत राहतो. यामुळे त्याचा वेळ फुकट जातोच, शिवाय काहीतरी चांगले करण्याची क्षमताही तो गमावून बसतो.

माणूस सामाजिक प्राणी आहे. समोरासमोर बोलून जे समाधान, आपलेपणा आणि कुणीतरी सोबत असल्याची सुखद जाणीव होते, ती सोशल मिडियावर तयार होणाऱ्या नात्यांमधून कधीच होत नाही. शिवाय सोशल मिडियावर असता तेव्हा तुम्हाला वेळेचे भान राहत नाही. सातत्याने खूप काळ स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्याही निर्माण होतात.

आरोग्यावर होतो परिणाम

सतत स्मार्टफोनचा वापर केल्याने झोप कमी येते. दृष्टी कमजोर होऊ लागते. शारीरिक हालचाल कमी होत असल्याने अनेक प्रकारचे आजार जडतात. स्मरणशक्तीही कमी होते.

आजकाल लोकांना प्रत्येक समस्येचे तात्काळ उत्तर हवे असते. त्यांना इंटरनेटवर प्रत्येक प्रश्नाचे लगेच उत्तर मिळते. यामुळे ती सारासार विचार करण्याची क्षमता गमावू लागतात. बुद्धीचा वापर कमी होत जातो. हे एखाद्या नशेप्रमाणे आहे. लोक तासन्तास अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग करत राहतात, पण साध्य काहीच होत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें