* निभा सिन्हा
वसुधाने ऑफिसमधून येताच पती रमेशला विचारले की, अतुल आता कसा आहे? आणि ती अतुलच्या खोलीत निघून गेली. तिने त्याच्या डोक्याला हात लावला, तेव्हा जाणवले की तो तापाने फणफणला आहे.
ती घाबरून ओरडली, ‘‘रमेश, याला तर खूप ताप आहे. डॉक्टरकडे न्यावे लागेल.’’
रमेश खोलीत येईपर्यंत वसुधाची नजर अतुलच्या पलंगाशेजारी ठेवलेल्या औषधावर पडली, जे त्याला दुपारी द्यायचे होते.
ताप वाढण्याचे कारण वसुधाच्या लक्षात आले. तिने रमेशला विचारले, ‘‘तू अतुलला वेळेवर औषध दिले होतेस का?’’
‘‘मी वेळेवरच औषध आणले होते, पण तो झोपला होता. मी १-२ वेळा हाका मारल्या, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही, तेव्हा मी औषध इथेच ठेवून निघून गेलो. मी विचार केला की तो उठेल, तेव्हा स्वत:हून घेईल. मला काय माहीत, त्याने औषध घेतले नसेल.’’
आधीच वैतागलेली वसुधा चिडून म्हणाली, ‘‘रमेश, औषध घेणे आणि घ्यायला लावणे यात फरक असतो. तुला काय माहीत म्हणा या गोष्टी. कधी मुलांची देखभाल करशील, तेव्हा कळेल ना.’’ मग तिने अतुलला २-३ बिस्किटे खायला घालून औषध दिले आणि त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवू लागली. अर्ध्या तासानंतर त्याचा ताप थोडा कमी झाला, त्यामुळे लगेच डॉक्टरकडे धावाधाव करण्याची गरज पडली नाही.
खरे म्हणजे, वसुधाचा १० वर्षांच्या मुलगा अतुलला ताप होता. तिच्या सुट्टया संपल्या होत्या, त्यामुळे रमेशला मुलाच्या देखभालीसाठी सुट्टी घ्यावी लागली होती. ऑफिसला निघण्यापूर्वी वसुधाने रमेशला पुन्हा-पुन्हा समजाविले होते की, अतुलला वेळेवर औषध दे, पण ज्या गोष्टीची भीती होती, तीच घडली.
७५ वर्षीय विमला गुप्ता हसत म्हणते, ‘‘ही कहाणी तर घराघरांतील आहे. मागच्या आठवडयातच मी माझ्या सुनेबरोबर शॉपिंग करायला गेले होते. तेव्हा दोन वर्षांच्या नातीला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या आजोबांवर सोपविली होती. नातीला सांभाळण्याच्या नादात आजोबांनी ना वेळ पाहिली आणि ना ही घरातील आवश्यक गोष्टी लक्षात ठेवल्या. ते घराला सरळ कुलूप लावून नातीला सोबत घेऊन पार्कमध्ये निघून गेले. तेवढया वेळात मोलकरीण येऊन माघारी निघून गेली होती. आम्ही घरी परतलो, तेव्हा भरपूर खरकटया भांडयांबरोबरच आवरण्यासाठी किचन आमची वाट पाहत होते. त्यांनी एक काम केले. मात्र दुसरे बिघडवून ठेवले.’’