- गरिमा पंकज
अनेकदा एकटेपणा किंवा कंटाळा घालवण्यासाठी आपण सोशल मिडियाचा आधार घेतो आणि हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. कालांतराने ही सवय कधी आपणास व्यसनाच्या जाळयात अडकवते हे कळतदेखील नाही. त्यावेळी मनात असूनही आपण यापासून दूर राहू शकत नाही. अंमली पदार्थांच्या व्यसनाप्रमाणे सोशल मिडियाचे व्यसनही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक स्तरावरही नकारात्मक प्रभाव पाडते.
अमेरिकन पत्रिका ‘प्रिव्हेंटिव मेडिसिन’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका संशोधानानुसार जर आपण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबुक, ट्विटर, गुगल, लिंक्डइन, यूट्यूब, इंस्ट्राग्राम आदींवर एकटेपणा घालवण्यासाठी जास्त वेळ घालवत असाल तर परिणाम उलट होऊ शकतो.
संशोधनाच्या निष्कर्षानुसार, तरुण जितका जास्त वेळ सोशल मिडियावर घालवतात आणि सक्रिय राहतात, त्यांना तितकेच जास्त समाजापासून अल्प्ति राहावेसे वाटेल. यासंदर्भात संशोधनकर्त्यांनी सोशल मिडियावरील सर्वात लोकप्रिय ११ वेबसाईट्सच्या वापराबाबत १९ ते ३२ वर्षे वयापर्यंतच्या १,५०० अमेरिकी तरुणांच्या प्रतिक्रिया घेऊन त्याचे विश्लेषण केले.
अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाचे प्रमुख लेखक ब्रायन प्रिमैक यांच्या मतानुसार, ‘‘आपण सामाजिक प्राणी आहोत, पण आधुनिक जीवनशैली आपल्याला एकत्र आणायचे सोडून आपल्यातील अंतर वाढवत आहे. मात्र आपल्याला असे वाटते की सोशल मिडिया सामाजिक अंतर संपवण्याची संधी देत आहे.’’
सोशल मिडिया आणि इंटरनेटचे काल्पनिक जग तरुणांना एकटेपणाचे शिकार बनवत आहे. अमेरिकेची संघटना ‘कॉमन सैस मिडिया’च्या एका सर्वेक्षणानुसार किशोरवयीन मुलांनाही जवळच्या मित्रांना प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा सोशल मिडिया आणि व्हिडिओ चॅटिंगद्वारे संपर्क साधायला जास्त आवडते. १३ ते १७ वर्षे वयोगटांतील १,१४१ किशोरवयीन मुलांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. ३५ टक्के किशोरवयीन मुलांना व्हिडिओ मेसेजद्वारे मित्रांशी संपर्क साधायला जास्त आवडते. सोशल मिडियामुळे मित्रांना भेटताच येत नाही, हे ४० टक्के मुलांनी मान्य केले. तर फोन किंवा व्हिडिओ कॉलशिवाय राहूच शकत नाही, असे ३२ टक्के मुलांनी सांगितले.
इंटरनेटच्या सवयीमुळे किशोरवयीन मुलांच्या बौद्धिक विकासावर अर्थात सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सातत्याने काल्पनिक जगात रमणारे किशोरवयीन खऱ्या जगापासून अलिप्त होतात. यामुळे ते निराशा, हताशपणा, उदासिनतेची बळी ठरू शकतात.