चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची

* कुसुम सावे

‘‘अरे वा आई, कानातले खूपच सुंदर आहेत. कधी घेतलेस? रंजोने आपली आई प्रभाच्या कानातल्या झुमक्यांकडे पाहत विचारले.

‘‘गेल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा सूनबाई अपर्णाने मला हे झुमके आणि तुझ्या वडिलांना घडयाळ दिले. तिने हे सर्व कधी खरेदी केले ते समजलेच नाही,’’ प्रभाने सांगितले.

डोळे विस्फारत रंजो म्हणाली, ‘‘वहिनीने दिले? अरे वा. त्यानंतर उसासा टाकत म्हणाली, मला तर तिने कधीच असे काही घेऊन दिले नाही. सासू-सासऱ्यांना मस्का मारत आहे. भरपूर मस्का लाव.’’ तिचे लक्ष कानातल्यांकडेच होते. ती म्हणाली, ‘‘कोणी का दिले असेना, पण आई मला तुझे झुमके खूपच आवडले.’’

आवडले असतील तर तुला घेऊन टाक बाळा, त्यात काय मोठे? असे म्हणत प्रभाने लगेचच कानातून झुमके काढून रंजोला दिले. आपण दिलेले झुमके सासूने तिच्या मुलीला देऊन टाकले, हे समजल्यावर अपर्णाला काय वाटेल? याचा विचार प्रभाने एकदाही केला नाही.

प्रभाने झुमके देताच रंजोने लगेचच ते स्वत:च्या कानात घातले. त्यानंतर नाटकी चेहरा करीत म्हणाली, ‘‘तुला मनापासून द्यायचे नसतील तर हे झुमके परत घे आई, नाहीतर मागाहून घरातले, खास करून बाबा म्हणतील की जेव्हा कधी रंजो येते, तेव्हा काही ना काही घेऊन जातेच.’’

‘‘असे काय बोलतेस बाळा, कोण कशाला काय म्हणेल? आणि तुझा या घरावर हक्क नाही का? तुला आवडले असतील तर तूझ्याकडेच ठेव. तू घातलेस किंवा मी घातले, त्यात काय मोठे? माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.’’

‘‘खरंच आई? अरे वा… तू किती चांगली आहेस’’, असे म्हणत रंजोने आईला मिठी मारली. नेहमी ती अशीच वागायची. जे आवडायचे ते स्वत:कडे ठेवायची. ती वस्तू समोरच्यासाठी किती मोलाची आहे, याचा ती साधा विचारही करीत नसे. खूप प्रेमाने आणि पै पै जोडून अपर्णाने आपल्या सासूसाठी ते झुमके विकत घेतले होते. पण, प्रभाने कसलाच विचार न करता ते मुलीला दिले. ती सांगू शकत होती की, हे झुमके तुझ्या वहिनीने खूपच प्रेमाने मला विकत घेऊन दिले आहेत, त्यामुळे मी तुला असेच दुसरे घेऊन देईन. पण, मुलीसमोर सुनेच्या भावनांची कदर प्रभाने कधीच केली नाही.

‘‘आई बघ, मला हे झुमके कसे दिसतात? चांगले दिसतात ना, सांग ना आई?’’ आरशात स्वत:ला न्याहाळत रंजोने विचारले. ‘‘पण आई, माझी एक तक्रार आहे.’’

‘‘आता आणखी कसली तक्रार आहे?’’ प्रभाने विचारले.

‘‘मला नाही, तुझ्या जावयाची तक्रार आहे. तुम्ही ब्रेसलेट देणार, असे सांगितले होते त्यांना, पण अजून घेऊन दिले नाही.’’

‘‘अरे हो, आठवले.’’ प्रभा समजावत म्हणाली, ‘‘बाळा, सध्या पैशांची चणचण आहे. तुला माहीतच आहे की, तुझ्या वडिलांना खूपच कमी पेन्शन मिळते. अपर्णा आणि मानवच्या पगारावरच घरखर्च चालतो.’’

‘‘हे सर्व मला सांगू नकोस आई. तू आणि तुझा जावई मिळून काय ते बघून घ्या. मला मध्ये घेऊ नका,’’ झुमके आपल्या पर्समध्ये टाकत रंजोने सांगितले आणि ती निघून गेली.

‘‘सूनेने दिलेले झुमके तू रंजोला दिलेस?’’ प्रभाच्या कानात झुमके नाहीत, हे पाहून भरतने विचारले. त्यांच्या लक्षात आले होते की, रंजो आली होती आणि तीच झुमके घेऊन गेली.

‘‘हा… हो, तिला आवडले म्हणून देऊन टाकले,’’  काहीसे कचरतच प्रभाने सांगितले आणि ती तेथून जाऊ लागली, कारण तिला माहीत होते की, हे ऐकून भरत गप्प बसणार नाहीत.

‘‘काय म्हणालीस तू, तिला आवडले? आपल्या घरातली अशी कोणती वस्तू आहे, जी तिला आवडत नाही, दे उत्तर? जेव्हा कधी येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच. जराही लाज वाटत नाही का तिला? त्या दिवशी आली होती तेव्हा सुनेची पर्स, जी तिला तिच्या मैत्रिणींनी दिली होती ती घेऊन गेली. कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की, ती मनाला वाटेल तशी वागेल,’’ प्रचंड रागावलेले भरत तावातावाने बोलत होते.

आपल्या पतीच्या अशा बोलण्याने नाराज झालेली प्रभा म्हणाली, ‘‘अशी तुमची कोणती संपत्ती घेऊन गेली ती, ज्यामुळे तुम्ही तिला इतके बोलत आहात? फक्त झुमकेच तर घेऊन गेली ना, त्यात काय मोठे? रंजो तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत नाही.’’

परंतु, आज भरत यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळेच ते संतापत म्हणाले, ‘‘तुझी संपत्ती देऊ नकोस असे तुला कोणी सांगितले आहे का? जे द्यायचे आहे ते सर्व देऊन टाक. पण, कोणीतरी प्रेमाने दिलेली भेटवस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकणे योग्य आहे का? जर सूनबाई असे वागली असती तर तुला कसे वाटले असते? किती प्रेमाने तिने तुझ्यासाठी झुमके आणले होते आणि तू ते कुणा दुसऱ्याला देऊन टाकताना क्षणभरही विचार केला नाहीस.’’

‘‘सारखे कुणा दुसऱ्याला, असे का म्हणत आहात? अहो, मुलगी आहे ती आपली आणि मी माझ्या मुलीला एकदा काही दिले म्हणजे कायमचे देऊन टाकले, समजले? मोठे आले सुनेचे चमचे, हूं,’’ तोंड वाकडे करीत प्रभा म्हणाली.

‘‘अगं, तुझी मुलगी तुझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहे, आणखी काही नाही. काय कमी आहे तिला? आपल्या मुलगा, सुनेपेक्षा जास्त कमावतात ते दोघे पतीपत्नी. तरी कधी वाटले तिला की, आपल्या आईवडिलांसाठी किमान २ रुपयांचे काहीतरी घेऊन जाऊया? कधीच नाही. आपले सोडून दे. तिने तिच्या भाचीसाठी आजपर्यंत कधी एखादे खेळणे तरी खरेदी करून आणले आहे का? कधीच नाही. तिला फक्त घेता येते. मला दिसत नाही का? सर्व पाहतोय मी, तू मुलगी, सुनेत किती भेदभाव करतेस ते. सुनेचे प्रेम तुला बेगडी वाटते आणि मुलीचे नाटक म्हणजे प्रेम वाटते. असे डोळे विस्फारून पाहू नकोस माझ्याकडे, समजेलच तुलाही कधीतरी, बघच तू.’’

‘‘खरंच, कसे वडील आहात तुम्ही? मुलीच्या सुखालाही नजर लावता. माहीत नाही रंजोने तुमचे काय बिघडवले आहे, ज्यामुळे ती नेहमीच तुमच्या डोळ्यात खुपते.’’ रडवेल्या स्वरात प्रभा म्हणाली.

‘‘ए… कमी अकलेच्या बाई, रंजो, माझ्या डोळयांना खुपत नाही, उलट काही केल्या सूनबाई अपर्णा तुला आवडत नाही. संपूर्ण दिवस घरात बसून अराम करीत असतेस. ऑर्डर देत राहतेस. तुला कधी असे वाटत नाही की, सुनेला कामात मदत करावी आणि तुझी मुलगी, ती तर येथे आल्यावर हातपाय हलवायचेही विसरून जाते. सर्व काही करते अपर्णा या घरासाठी. बाहेर जाऊन कमावते आणि घरही चांगल्या पद्धतीने सांभाळते. तरीही तुझी तिच्याबद्दल काही ना काही तक्रार असतेच. तू मुलगी, सुनेत इतका भेदभाव का करतेस?’’

‘‘कमावून आणते आणि घर सांभाळते म्हणजे उपकार करीत नाही आपल्यावर. घर तिचे आहे, मग सांभाळणार कोण?’’ नाराजीच्या स्वरात प्रभा म्हणाली.

‘‘अच्छा, म्हणजे घर फक्त तिचे आहे, तुझे नाही? मुलगी कधीही आली की तिच्या पाहुणचारात काही कमी पडू देत नाहीस. पण तुला कधी असे वाटत नाही की, कामावरून थकून आलेल्या सुनेला किमान एक ग्लास पाणी देऊया. फक्त टोमणे मारता येतात तुला. अगं, सूनच नाही, तर तिच्या मैत्रिणीही खटकतात तुला. कधीही आल्या तरी त्यांना काहीतरी वाईट बोलतेसच. तुला असे वाटते की, त्या तुझ्या आणि तुझ्या मुलीविरोधात अपर्णाचे मन कलुषित तर करणार नाहीत ना? म्हणून त्यांना बघून घेत नाहीस, जाऊ दे. मी कोणत्या दगडासमोर डोके फोडत आहे? तुझ्याशी बोलणेही कठीण आहे.’’ असे म्हणत भरत आपले पाय आपटत तेथून निघून गेले.

पण, खरंच तर बोलत होते भरत. या घरासाठी अपर्णा खूप काही करीत होती, तरीही प्रभाची तिच्याविरोधात तक्रार असायची. नातेवाईक असोत किंवा शेजारी, सर्वांना ती हेच सांगायची की, सुनेच्या राज्यात राहायचे म्हणजे तोंड बंद करूनच जगावे लागणार, नाहीतर मुलगा, सून आम्हाला कधी वृद्धाश्रमात पाठवतील, हे समजणार नाही. जमाना बदलला आहे. आता सुनेला नाही तर सासूला घाबरून राहावे लागते. प्रभाचे हे बोलणे ऐकून अपर्णा मान खाली घालत असे, पण कधीच उलटून बोलत नसे. मात्र तिच्या डोळयातून वाहणारे अश्रू तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांचे साक्षीदार असत.

अपर्णाने या घरात पाऊल टाकताच प्रभाला स्वत:ची आई मानले होते. प्रभा मात्र अजूनही तिला दुसऱ्याच्या घरची मुलगी, असेच समजत असे. अपर्णाने प्रभासाठी काहीही केले तरी प्रभाला ते नाटकी वाटायचे आणि ‘‘आई, तुझी तब्येत तर बरी आहे ना?’’ असे रंजोने एकदा जरी विचारले तरी प्रभाचा आंनद गगनात मावेनासा व्हायचा.

त्या दिवशी अपर्णा केवळ एवढेच म्हणाली होती की, ‘‘आई जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. शिवाय डॉक्टरांनीही तुम्हाला चहा पिऊ नका असे सांगितले आहे. हॉरलेक्स घेऊन आले आहे मी, तुम्ही दुधासोबत हे प्या, असे म्हणत तिने प्रभासमोर ग्लास ठेवले. प्रभाने तिचा हात झटकत ते तिच्या हातातून काढून घेतले व टेबलावर आपटत म्हणाली, ‘‘तू मला डॉक्टरांच्या नावाने सल्ले देऊ नकोस. जे मागितले आहे तेच दे. नंतर पुटपुटत म्हणाली, ‘मोठी आली मला शिकविणारी, चांगले बनण्याचे नाटक हिच्याकडून शिका.’ अपर्णाची प्रत्येक गोष्ट तिला बेगडी आणि नाटकी वाटत असे.

मानव ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता. अपर्णाही आपल्या चुलत भावाच्या लग्नाला गेली होती. पण मनातल्या मनात तिला अशी भीती वाटत होती की, सासू तसेच सासऱ्यांना एकटे सोडून आली आहे, त्यांची तब्येत तर बिघडणार नाही ना? हाच विचार करून तिने लग्नाला येण्यापूर्वीच रंजोला दोघांकडे लक्ष ठेवण्यास व दिवसातून कमीत कमी एकदा येऊन त्यांना बघून जा, असे सांगितले होते. हे ऐकून रंजो रागावत म्हणाली होती की, ‘‘वहिनी, तू सांगितले नसतेस तरी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असती. तुला काय वाटते, तू एकटीच आहेस का त्यांची काळजी घेणारी? अगं, मुलगी आहे मी त्यांची, सून नाही, समजले का?’’ रंजोच्या अशा बोलण्यामुळे अपर्णा खूपच दुखावली होती, तरीही गप्प बसली. मात्र, अपर्णा गेल्यानंतर रंजो एकदाही माहेरी आली नाही, कारण आल्यावर तिला काम करावे लागले असते. कधीकधी फोन करून विचारपूस करायची आणि सोबतच वेळ नसल्यामुळे भेटायला येऊ शकत नाही, पण वेळ मिळताच नक्की येईन, असे खोटेच सांगायची. प्रभा विचार करायची, आपल्या मुलीकडे खरंच वेळ नसेल नाहीतर भेटायला नक्की आली असती.

एका रात्री अचानक भरत यांची तब्येत खूपच बिघडली. प्रभा इतकी घाबरली की, काय करावे तिला काहीच सूचत नव्हते. तिने मानवला फोन लावला, पण त्याचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यानंतर तिने मुलगी रंजोला फोन लावला. बेल वाजत होती, पण कोणी फोन उचलत नव्हते. जावयालाही फोन लावला, पण त्यानेही उचलला नाही. प्रभाने रंजो व तिच्या नवऱ्याला अनेकदा फोन लावला, पण कुणीही फोन उचलला नाही. ‘कदाचित ते झोपले असतील म्हणून फोनची रिंग त्यांना ऐकू आली नसेल,’ प्रभाला वाटले. अखेर नाईलाजाने तिने अपर्णाला फोन लावला. एवढया रात्री प्रभाचा फोन आलेला पाहून अपर्णा घाबरली.

प्रभा काही बोलण्याआधीच अपर्णाने घाबरत विचारले, ‘‘आई, काय झाले? बाबा ठीक आहेत ना?’’ प्रभाच्या हुंदक्यांचा आवाज येताच ती समजून गेली की, नक्कीच काहीतरी घडले आहे. तिने काळजीने विचारले, ‘‘आई, तुम्ही रडत का आहात? सांगा ना आई, काय झाले?’’ त्यानंतर सासऱ्यांबाबत समजताच ती म्हणाली, ‘‘आई तुम्ही घाबरू नका, बाबांना काहीही होणार नाही. मी काहीतरी करते, असे म्हणत तिने फोन ठेवला आणि लगेचच तिची मैत्रीण शोनाला फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन जा, अशी शोनाला विनंती केली.’’

अपर्णाच्या ज्या मैत्रिणीकडे प्रभाला पाहायलाही आवडत नव्हते आणि तिला ती सतत बंगालन म्हणायची, आज तिच्यामुळेच भरत यांचा जीव वाचला होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की, मेजर अटॅक होता. रुग्णाला घेऊन येण्यास जरा जरी उशीर झाला असता तर जीव वाचविणे अवघड होते. तोपर्यंत अपर्णा आणि मानवही रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर काही वेळाने रंजोही आपल्या पती व मुलासोबत तेथे आली. मुलगा, सुनेला पाहून जोरजोरात हुंदके देत रडतच प्रभा म्हणाली, आज शोना नसती तर कदाचित तुमचे बाबा जिवंत नसते.

अपर्णाचेही अश्रू थांबत नव्हते. सासऱ्यांना काही झाले असते तर ती स्वत:ला कधीच माफ करू शकली नसती. सासूला मिठी मारत ती म्हणाली, रडू नका, आता सर्व ठीक होईल. शोनाचे तिने मनापासून आभार मानले कारण, तिच्यामुळेच सासऱ्यांचा जीव वाचला होता.

दुसरीकडे आपल्या आईला वहिनीच्या गळयात पडून रडताना बघताच रंजोही रडण्याचे नाटक करीत म्हणाली, ‘‘आई, अगं बाबांना काही झाले असते तर माझाही जीव गेला असता. किती दुर्दैवी आहे मी, जिला तुझा फोन आला, हेच समजू शकले नाही. सकाळी तुझे मिस कॉल पाहिले आणि त्यानंतर तुला फोन लावला तेव्हा कुठे मला सर्व काही समजले. नाहीतर इथे मला कोणी काहीच सांगितले नसते,’’ अपर्णाकडे रागाने बघत रंजो म्हणाली. अपर्णा प्रभाच्या जवळ गेलेली तिला आवडले नव्हते.

ती प्रभाची समजूत काढतच होती तोच तिचा ७ वर्षांचा मुलगा अमोल म्हणाला, आई, तू खोटे का बोलतेस? आजी, ‘‘आई खोटे बोलत आहे. तुझा फोन आला तेव्हा आम्ही टीव्हीवर चित्रपट पाहत होतो. तुझा फोन पाहून आई म्हणाली होती की, माहीत नाही एवढया रात्री कोण मेले जे माझी आई मला त्रास देत आहे. पप्पा तिला म्हणाले, फोन घे, कदाचित एखादी मोठी अडचण आली असेल. तरीही तिने फोन घेतला नाही आणि त्यांनाही घेऊ दिला नाही. ती आरामात चित्रपट बघत राहिली.’’

अमोलचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रंजोला तर तोंड वर करून पाहणेही अवघड झाले होते. प्रभा कधी आपल्या नातवाकडे तर कधी मुलीकडे एकटक बघत होती.

सत्य बाहेर येताच रंजोला ओशाळल्यासारखे झाले. तिला चांगलाच धक्का बसला होता, त्यामुळे आपल्या मुलाला मारत म्हणाली, ‘‘वेडा कुठला, काहीही बडबड करतो. त्यानंतर उसने अवसान आणत तिने सांगितले, ‘‘आई… अगं दुसऱ्याच कोणाचा तरी फोन होता तो, त्यामुळे मी तसे म्हणाले होते.’’ त्यानंतर समजूत काढत म्हणाली, ‘‘बघ ना आई, काहीही बोलतो हा, त्याला काही कळत नाही. लहान आहे ना.’’

आपण जे काही ऐकले ते खरे आहे, यावर प्रभाचा अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणाली, ‘‘याचा अर्थ तू त्यावेळी जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्या जवळच होता. इतक्या रात्री तसेच काही महत्त्वाचे कारण असेल म्हणूनच तुझी आई तुला फोन करीत असेल, असा तू एकदाही विचार केला नाहीस का? चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची. शोना नसती तर आज मी माझ्या सौभाग्याला मुकले असते. ज्या सुनेचे प्रेम मला बेगडी, बनावटी वाटत होत, हे आज मला समजले. तुझ्या मुलाने खरे सांगितले नसते तर मी यापुढेही खोटया भ्रमातच जगत राहिले असते.’’

आपल्या हातून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी निसटून चालली आहे, हे पाहून रंजो उगाचच काकुळतीला येत म्हणाली, ‘‘नाही आई, तू गैरसमज करून घेत आहेस.’’

‘‘गैरसमज झाला होता बाळा, पण आता माझ्या डोळयावरची आंधळया प्रेमाची पट्टी उघडली आहे. तुझे बाबा बरोबर सांगायचे की, तू माझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहेस. तुझ्या मनात माझ्यासाठी थोडेसेही प्रेम नाही.’’ असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवत तिने अपर्णाला सांगितले, ‘‘चल सूनबाई, बघून येऊया, तुझ्या बाबांना काही हवे तर नसेल ना?’’ रंजो, सतत आई, आई अशा हाका मारत होती, पण प्रभाने एकदाही मागे वळून पाहिले नाही, कारण तिचा भ्रमनिरास झाला होता.

बहुरुपी

कथा * रीता कोल्हटकर

एका आर्ट गॅलरीत माझी आणि हर्षची पहिली भेट झाली होती. पाच मिनिटाच्या त्या ओझरत्या भेटीत बिझनेस कार्ड, व्हिजिटिंग कार्डची देवाण घेवाण झाली होती.

‘‘माझी स्वत:ची वेबसाइट आहे. त्यावर मी माझ्या सर्व पेंटिग्जचे फोटो टाकले आहेत. त्यांच्या किमती सकट.’’ बिझनेस कार्डच्या वेबसाइटच्या लिंकवर बोट ठेवत मी म्हटलं.

‘‘अरे व्वा! मी नक्की तुमची सर्व पेंटिग्ज बघतो. त्यानंतर तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवून फिडबॅकसुद्धा देतो. आर्ट गॅलरीत तर मी इतकी वर्षं जातोय, पण तुमच्यासारखी कलाकार मात्र कधी भेटलीच नाही. युवर एव्हरी पेंटिंग्ज इज सेईंग थाउजंड वर्ड्स,’’ माझ्या पेंटिग्जकडे निरखून बघत हर्ष म्हणाला.

‘‘हर्ष, तुम्हाला भेटून खरंच खूप हर्ष झालाय मला. स्टे इन टच.’’ मी त्यावेळी खूपच उत्साहित होऊन म्हटलं होतं. त्या छोट्याशा भेटीत मला तो ‘कलेचा पुजारी’ वाटला होता. अद्वितीय वाटला होता.

प्रत्यक्षात आमची भेट पाचच मिनिटं झाली होती, पण त्या आधी अर्धा तास मी दुरून त्याच्यावर लक्ष ठेवून होते. तो प्रत्येक पेंटिंगपाशी थांबून निरीक्षण करत होता. त्याच्या जवळच्या छोट्याशा डायरीत काही नोंदी करत होता.

‘‘नक्कीच हा कुणी तरी कलेतला दर्दी दिसतोय. कलेची पारख आहे याला.’’ माझ्या मनानं कौल दिला.

हर्षची भेट होऊन सहा महिने उलटले होते. या काळात त्यानं किंवा मी, एकमेकांना कधीच फोन वगैरेही केला नाही. माझ्या वेबसाइटवरून माझ्या पेंटिग्जची विक्री होत नव्हती. मी पेंटिग्ज विकली जावीत म्हणून खूप प्रयत्न करत होते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या वेबसाइटची लिंक पोहोचावी असा माझा प्रयत्न होता. लोक मला ओळखतात, कमी ओळखतत किंवा जास्त ओळखतात हा मुद्दाच नव्हता. पण मला कलेचा क्षेत्रात नाव अन् पैसा मिळवायचाच आहे हा ध्यास होता. तेच माझं ध्येय, तेच माझं लक्ष होतं. शेवटी एक दिवस मी हर्षला एक मेसेज पाठवलाच.

त्यानं लगेच रिस्पॉन्सही दिला. ‘‘आज माझ्याबरोबर कॉफी घ्यायला आवडेल का?’’

मी चकितच झाले. पाच मिनिटांच्या भेटीनंतर सहा महिने अगदी अलिप्त असलेला हा माणूस मी एक मेसेज काय टाकला तर सरळ एकत्र कॉफी घेऊयात म्हणतोय?

‘‘विचित्रच दिसतोय,’’ मी जरा रागातच मनातल्या मनात म्हटलं अन् त्याच्या विचारण्यावर काही उत्तरही दिलं नाही. चार दिवसांनी माझ्या पेंटिग्जचं प्रदर्शन भरणार होतं, मी त्या कामांत गुंतले अन् नंतर हर्षला पार विसरले, आपल्या प्रयत्नांच्या बळावर आपली कला आणि आपल्यातला कलाकार सिद्ध करण्यावर मी भर दिला होता. काही दिवस मधे गेले अन् त्याचा फोन आला. ‘‘एक कप कॉफी घ्यायला माझ्याबरोबर, वेळ आहे का?’’

‘‘तू मला ओळखत नाहीस, मी तुला ओळखत नाही, अशावेळी ही कॉफी एकत्र घेण्याची बळजबरी का? एक मेसेज तुला टाकला याचा अर्थ मी रिकामटेकडी आहे अन् तुझ्याबरोबर टाइमपास करू शकते असा गैरसमज करून घेऊ नकोस,’’ मी स्पष्टच सांगितलं.

‘‘मी तुझी कला, त्यातली खोली आणि गांभीर्य समजून घेतलंय. त्या प्रवासातच मला तू ही समजली आहेस. जग जेवढा मान एम एफ हुसेनला देतंय तेवढाच मान मी तुला देतो आहे. पहिल्यांदाच जेव्हा तुझं नाव मी माझ्या मोबाइलमध्ये सेव्ह केलं तेव्हा त्यापुढे पेंटर सफिक्स असं लिहिलंय. तू स्वत: विश्वास ठेव किंवा ठेवू नकोस. पण एक दिवस कलेच्या क्षेत्रात तू एम एफ हुसेनच्याही पुढे जाशील…राहता राहिली बाब एकमेकांना ओळखण्याची तर ती ओळख वाढवली तरच वाढेल ना?’’

स्वत:चं कौतुक ऐकायला कुणाला आवडत नाही? हर्षच्या शब्दांनी मी ही सुखावले. त्याच्याकडून स्वत:ची प्रशंसा ऐकायला मला आवडू लागलं. त्या नादात मी तासन् तास फोनवर त्याच्याशी बोलू लागले. प्रत्येकवेळी तो माझा, माझ्या पेंटिग्जची, माझ्या कलेची इतकी प्रशंसा करायचा की माझ्या स्वप्नांना पंख फुटू लागले. मनांतल्या मातीत पडून असलेल्या पैसा, मान्यता, लोकप्रियतेच्या बियांना कोंब फुटू लागले.

‘‘मी किती मानतो हे तुला कळायचं नाही. हिंदुस्थानातल्या सव्वा कोटी लोकांनी मिळून जेवढं कुणाचं कौतुक केलं असतं, तेवढं मी एकटा करतोय तुझं कौतुक. महिने उलटले तुला एक कप कॉफी घ्यायला ये म्हणतोय, एवढं बोलल्यावर तर एखादा दगडही विरघळला असता.’’ एक दिवस हर्षचा फोन आला.

मी अर्थात्च दगड नव्हते. मी विरघळले यात नवल ते काय? पहिल्या भेटीनंतर आम्ही वरचेवर अन् पुन्हापुन्हा भेटू लागलो. ओळखीचं रूपांतर दाट मैत्रीत झालं होतं. अशाच एका भेटीत त्यानं सांगितलं की त्याचं लग्न झालेलं आहे. एक मुलगी आहे तीन वर्षांची. बायकोचं नाव मीनाक्षी, ती युनिव्हर्सिटीत संस्कृतची लेक्चरर आहे. तो स्वत: काहीच काम करत नाही.

‘‘मला काही करायची गरजच काय? माझ्या एम.एल.ए. बापानं रग्गड कमवून ठेवलंय. पुढल्यावेळी मलाही एम.एल.ए.चे तिकिट मिळतंय. चार दोनशे रुपयांच्या नोकरीत काही अर्थच नाही.’’ अत्यंत दर्पानं हर्ष बोलला.

मुळात तरुण मुलाचं काहीही न करणं अन् एवढा दर्प मला सहन न होणाऱ्यापलीकडलं. पण मला त्याक्षणी ते फारसं खटकलं नाही…मी बहुधा त्याच्या प्रेमात होते. तरीही मी विचारलंच.

‘‘नोकरी करण्यात अर्थ नाही तर मीनाक्षीसारखी नोकरी करणारी बायको कशी काय केलीस?’’

‘‘मूर्ख आहे ती. आपलच म्हणणं रेटत असते. लग्नापूर्वी तिनं अन् तिच्या घरच्यांनी कबूल केलं होतं की ती नोकरी सोडेल…पण लग्नानंतर ती बदलली. हटून बसली. नोकरी सोडणार नाही म्हणून. करतेय काकूबाई

नोकरी…एमएलएच्या कुटुंबात कसं राहायचं हे तिला अजूनदेखील कळलेलं नाही.’’ हर्षच्या चेहऱ्यावर दर्प अन् बोलण्यात सामान्य व्यक्तींबद्दलचा तिरस्कार ओसंडून जात होता.

त्याचं बोलणं ऐकून मी हतप्रभ झाले. माझं अंतर्मन मला सावध करत होतं की मी एका वाईट माणसासोबत आहे. हा माणूस चांगला, सभ्य, सज्जन नाही. तरीही माझ्या नकळत मी त्याच्यासोबत वाहवत जात होते. तो माझं कौतुक करत होता, सतत माझी प्रशंसा करत होता. आपल्या एम.एल.ए. वडिलांच्या नावाचा वापर करून मला खूप मोठ्या प्रदर्शनात पेंटिग्ज लावण्याचं प्रॉमिस करत होता. मलाही वेडीला ते सर्व खरं वाटत होतं. त्याचे एम.एल.ए. वडील मला माझं ध्येय गाठायला मदत करतील अशी वेडी आशा मी बाळगून होते. माझ्या मनातल्या प्रसिद्धी, पैसा मिळवण्याच्या दिव्याला त्यामुळे तेल मिळत होतं. त्या मिणमिणणाऱ्या उजेडात हर्षच्या खोटेपणाचा काळोख मला धडसा दिसतच नव्हता.

‘‘तू माझ्यासाठी मंदिरातल्या मूर्तीसारखी आहेस. मी काय म्हणतो तेवढं फक्त ऐकत जा. त्याहून जास्त माझ्या प्रेमात पडू नकोस. कारण मी विवाहित आहे. अन् एकदा तुला तुझ्या यशाच्या शिखरावर पोहोचवलं की तुझा माझा संबंध संपला.’’ त्यानं स्पष्टच सांगितलं.

‘‘तू विवाहित आहेस हे मला ठाऊक आहे. मलाही तू माझ्याशी लग्न करावं ही अपेक्षा नाहीए. पण मला एक कळत नाहीए की जर या वाटेवर आपण पुढे जाणार नाही आहोत तर आपण विनाकारणच का भेटतो आहोत?’’

‘‘पूजा करतो मी तुझी. तुला यशाच्या शिखरावर पोहोचलेलं बघायचंय मला. मला तुझ्याकडून काहीही नकोय. पण मी तुझा मित्र आहे. तुला प्रोत्साहन देतोय. पुढल्या वर्षी थायलंडला होणाऱ्या पेंटिग्जच्या प्रदर्शनात तुला ललित कला अकादमीची स्कॉलरशिप मिळवून देणार आहे. माझ्या वडिलांचे मोठमोठ्या लोकांशी कॉण्टेक्ट आहेत. त्यामुळे मलाच हे शक्य आहे. तुझी दोन तीन इंटरनॅशनल एक्द्ब्रिबिशन्स झाली की तुला प्रसिद्धी मिळायला वेळ लागणार नाही.’’

हे असं ऐकलं की माझं मन भरून यायचं. खूप छान वाटायचं. वाटायचं की मी प्रसिद्ध होईन, न होईन पण माझं एवढं कौतुक करणारा प्रशंसक आहे हे भाग्य तरी कमी आहे का? करतोय बिच्चारा माझ्यासाठी प्रयत्न. आता आम्ही रोजच भेटत होतो. पण हर्षची वृत्ती हल्ली बदलली होती. हल्ली तो अंगचटीला येऊ बघायचा. पूजा, मंदिरातली मूर्ती वगैरे न बोलता हल्ली त्याच्या डोळ्यात काही वेगळंच दिसत होतं.

‘‘एक मागू का तुझ्याकडे?’’

‘‘काय?’’

‘‘मी तुला मिठीत घेऊ शकतो?’’

‘‘अजिबात नाही…’’

‘‘फक्त एकदाच! प्लीज…मला काय वाटतं ठाऊक आहे?’’

‘‘काय?’’

‘‘मला असं वाटतं की मी तुला मिठीत घ्यावं अन् काळ तिथंच थांबावा…तुला वेडीला खरंच कल्पना नाहीए की मी तुला किती मानतो…किती किंमत आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल. एवढा मान कोणताही पुरूष कुठल्याही स्त्रीला देणार नाही…’’

अन् मी सरळ त्याच्या बाहुपाशात शिरले. ‘‘पूजा करतो तुझी. तुला उंच आकाशात विहरताना बघायचं मला.’’ माझ्या केसांतून बोटं फिरवत तो पुन्हा:पुन्हा तेच बोलत होता.

‘‘हर्ष, प्लीज, मला घरी जाऊ देत. उद्यापर्यंत एकदोन पेंटिग्ज पूर्ण करायची आहेत.’’

‘‘ठिक आहे. लवकरच भेटतो. या आठवड्यात संधी मिळताच वडिलांशी बोलून तुला ललित कला अकाडमीची स्कॉलरशिप मिळवून देतो.’’

काही दिवसानंतर आम्ही दोघं आमच्या नेहमीच्या रेस्ट्रॉरंन्टमध्ये समोरासमोर बसलो होतो. डिनर संपेपर्यंत रात्र झाली होती. गेले काही दिवस सतत पाऊस होता. आज दिवसभर सोनेरी उन्हानं दिवस प्रसन्न वाटला होता. हर्षनं जवळच्याच बागेत फिरून थोडे पाय मोकळे करण्याबद्दल सुचवलं. हवा खरोखर फार छान होती. मीही आढेवेढे न घेता होकार दिला.

‘‘जरा तिकडे बघ, काय चाललंय तिथं?’’ पार्कातल्या एका कोपऱ्यात झाडात दडलेल्या कबुतरांच्या जोडीकडे बोट दाखवत म्हटलं.

‘‘कुठ काय आहे? काहीच नाही…’’ मी मुद्दाम तिकडे दुर्लक्ष करत म्हटलं.

‘‘असं बघ, प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. कोणताही जीव ही भावना नाकारू शकत नाही. मग आपणच त्यापासून दूर का राहावं?’’ माझ्याकडे गुढपणं बघत हर्षनं म्हटलं.

‘‘हर्ष, काय बोलायचंय ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलू नकोस.’’

‘‘बोलायचं काय? मी विवाहित आहे हे तुला ठाऊक आहे. सगळ्या शहरात माझ्या वडिलांचा दबदबा आहे. त्यामुळेच मी या मार्गावर तुझ्याबरोबर फार काळ राहू शकत नाही. पण जी प्रगाढ मैत्री आपल्या दोघांमध्ये आहे, ती मैत्री मला एवढा अधिकार तर नक्कीच देते की मी कधीतरी तुला किस करू शकतो…खरं ना? अन् वावगं काय आहे? प्रेम ही तर सर्व कालिक, सर्वव्यापी भावना आहे.’’

मी काही प्रतिक्रिया देणार, काही बोलणार, त्या पूर्वीच त्यानं मला पटकन् एका झाडाआड ओढलं अन् माझ्या ओठांवर स्वत:चे ओठ ठेवले. एक दिर्घ चुबंन घेऊन तो म्हणाला, ‘‘बघ तू, एक दिवस जगातल्या सर्वश्रेष्ठ चित्रकारांमध्ये तुझी गणना होईल. जगातल्या ख्यातनाम आर्ट गॅलरीत तुझी चित्र मांडलेली असतील. गेले काही महिने माझे पपा फार कामात होते, त्यामुळे तुझ्या स्कॉलरशिपसाठी मला बोलता आलं नाही. पण आज घरी गेलो की आधी हाच विषय काढतो.’’

काही क्षणांच्या या अनैच्छिक जवळकीनंतर त्यानं मला मिठीतून मुक्त केलं अन् तेच जुनं दळणं पुन्हा तो दळू लागला.

मीही मूर्खासारखी मान डोलावली. जणू मी त्याच्या हातातली कठपुतळी होते.

‘‘रिलॅक्स डार्लिंग, लवकरच तू एमएफ हुसेनच्या बरोबरीनं उभी राहशील…चल, मी तुला तुझ्या फ्लॅटवर सोडतो. मग मी माझ्या घरी जाईन.’’ कारचा दरवाजा माझ्यासाठी उघडत हर्षनं म्हटलं.

घरी पोचेतो बरीच रात्र झाली होती. बाहेरूनच हर्षनं ‘गुडबाय’ केलं. मी मात्र खूपच सैरभैर झाले होते. खूप अस्वस्थ, बेचैन वाटत होतं. कळत नकळत मी अशा एका वाटेवर पोहोचले होते, जिथून मला काही म्हणता काही मिळणार नव्हतं, मिळवता येणार नव्हतं. दूरवर नजर टाकली तरी काहीही दिसत नव्हतं. माझं ध्येय, माझं लक्ष्य…काहीच दृष्टीपथात नव्हतं. माझ्या लक्षात आलं होतं की मी एका भूलभुलैय्यात अडकले होते. माझ्या नशिबात नेमकं काय होतं? ही माझी नियती होती की माझाच मूर्खपणा? मी हर्षच्या प्रेमात वेडी झाले होते की त्याच्या एमएलए वडिलांच्या मोठेपणाची मला भुरळ पडली होती?

प्रश्नांची भेंडोळी डोक्यात गरगरत होती. माझी अन् हर्षची ओळख होऊन एव्हाना दोन वर्षं झाली होती. तो खरोखर मला देवी मानून माझी पूजा करत होता? ही कसली पूजा? त्याला खरोखर वाटतंय का की मी एक महान पेंटर होईन? खराखुरा मित्र म्हणून तो मला मदत करतो. का? गेल्या दोन वर्षांत त्यानं माझं काय भलं केलंय? माझं नाव व्हावं, मला पैसा मिळावा म्हणून त्यानं काय प्रयत्न केलेत?

विचार करता करताच कधीतरी मला झोप लागली. पण सकाळी जागी झाले तरी तेच प्रश्न पुन्हा:पुन्हा फणा काढून समोर येत होते. त्यांची उत्तरं मात्र मिळत नव्हती. त्याच क्षणी मला लक्षात आलं की गेली दोन वर्षं मी हर्षमध्ये इतकी गुंतले होते की इतर मित्रमैत्रीणींना पूर्णपणे दुरावले होते. मला एकदम माझ्या जुन्या दोस्त मंडळींची तीव्रतेने आठवण झाली. निदान श्रेयाकडे जाऊन यावं असा विचार करून मी भराभर आवरलं अन् निघालेच!

‘‘इतके दिवस कुठं ग दडून बसली होतीस? किती आठवण यायची तुझी? काहीच पत्ता नव्हता तुझा.’’ श्रेयाच्या आईनं मायेनं जवळ घेतलं, तेव्हा नकळत माझे डोळे भरून आले.

‘‘काही नाही मावशी, एक दोन मोठे प्रोजेक्ट होतं. पेंटिग्ज करण्यातच गुंतले होते, पण मलाही तुमची फार आठवण यायची.’’ मी म्हणाले.

मला पुन्हा जवळ घेत मावशी म्हणाली, ‘‘ठिक आहे, आता आलीस हे ही छान केलंस, काय घेतेस? चहा की कॉफी? की खायला करू काहीतरी?’’

‘‘ ते नंतर, आधी सांगा, श्रेया कुठाय? दिसत नाहीए घरात?’’

‘‘श्रेया येईलच! तुझं खाणंपिणं आटोपतंय तोवर तीही येईलच की! आज तिच्या सतार वादनाचा कार्यक्रम आहे. खूप दिवस ती मेहनत करत होती, या कार्यक्रमामुळे तिला बराच फायदा होईल असं म्हणत होती. भलं व्हावं पोरीचं…’’ बोलता बोलता मावशी भावनाविवश झाल्या.

मला मनातल्या मनात लाज वाटत होती. माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या आयुष्यातल्या एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगी मी नसावं, मला त्याची माहितीही नसावी? इतका दुरावा आमच्यात कधी निर्माण झाला?

मावशींशी बोलता बोलता तासभर कधी संपला ते कळलंच नाही. दाराची घंटी वाजली. मावशीनं दार उघडताच एखाद्या वादळासारखी श्रेया घरात शिरली अन् तिने आईला मिठीच मारली. आनंदानं तिचा चेहरा केवढा उजळला होता. सर्वांगावर जणू तेज आलं होतं.

‘‘आई, अगं आज ना कार्यक्रम खूपच छान द्ब्राला.’’ आनंदानं चित्कारत होती श्रेया. ‘‘अगं आपले एमएलए साहेब सहकुटुंब कार्यक्रमाला आले होते. तेच आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होते. कार्यक्रमानंतर त्यांचा मुलगा मला मुद्दाम भेटायला आला. हर्ष नाव आहे त्याचं. अगं, त्यानं माझ्या सतार वादनाचं केवढं कौतुक केलं.’’ म्हणाला, ‘‘युवर म्युझिक इज द फुड फॉर द सोल.’’ मला म्हणाला, ‘‘एक दिवस तू रवीशंकरांसारखीच ख्यातर्कीती सतार वादक होशील.’’ मला त्यानं प्रॉमिस केलंय, तो मला संगीत अकाडमीची स्कॉरलरशिप मिळवून देणार आहे.’’

श्रेयाचं माझ्याकडे लक्षच गेलेलं नव्हतं. ती तिच्याच नादात होती. पण हर्ष आणि त्याचं बोलणं मला आमच्या पहिल्या भेटीची आठवण करून देत होतं. त्या हलकटानं आता श्रेयाचा मासा जाळ्यात ओढला होता. माझं अवसानंच गळालं. स्वत:च्या भावनांना आवर घालणं अवघड झालं. मला आता ताबडतोब घरी जायचं होतं. मला कुणालाही काही सांगायचं, विचारयचं नव्हतं. आता मला गेल्या दोन वर्षांतल्या माझ्या आणि हर्षच्या मैत्रीचा शेवट करायचा होता.

तेवढ्यात श्रेयाचं लक्ष माझ्याकडे गेलं. तिनं धावत येऊन मला मिठी मारली.

‘‘श्रेया, अगं मला बरं वाटत नाहीए…मी तुला नंतर भेटते. आता मला घरी जाऊ दे…’’ मी श्रेयाचा चेहरा माझ्या दोन्ही हातांच्या ओंजलीत घेऊन तिचे लाड केले. माझा आवाज खोल गेला होता.

‘‘अगं, खरंच, किती वेल आणि थकलेली वाटते आहेत तू? मी येऊ का तुला घरी सोडायला?’’ श्रेया मनापासून म्हणाली.

‘‘नको, फक्त रिक्षा मागवून दे…’’

मावशी व श्रेयाचा निरोप घेऊन कशीबशी घरी पोहोचले तोवर संध्याकाळ झाली होती. पण माझ्या मनावर साचलेला काळोख मात्र पूर्णपणे दूर झाला होता. त्या प्रकाशात मला हर्षचं विकृत रूप स्पष्ट दिसत होतं. कसला बहुरूपी होता. सोंग घेणारा बहुरूपी. जो आपल्या सुविद्य पत्नीला मान देत नाही तो इतर स्त्रियांना काय मान देणार? त्याला कलेतलं खरं तर काहीच कळत नाही. पण चांगलं रंग रूप अन् एमएलए बाप याच्या बळावर तो नवोदित कलाकार, तरूणींना आमिषं दाखवत जाळ्यात ओढतो. माझ्यासारख्या मूर्ख मुली फसतात. खरं तर मला कळायला हवं होतं की गेल्या काही वर्षात जे काही नाव मी मिळवलं होतं ते स्वत:च्या मेहनतीवर, जो पैसा मिळवला ती पेंटिग्ज माझ्या बळावर विकली म्हणून. माझी कला, माझी प्रतिभा हेच माझं साधन होतं. कुणा अशिक्षित एमएलएच्या उडाणटप्पू, अकर्मत्य मुलाच्या शिफारसीमुळे नाही.

मुळात माझ्या आणि हर्षच्या कथेची सुरूवातच चूक होती. काळाबरोबर त्यात जे काही अध्याय जोडले जात होते त्यामुळे ती अधिकच बिघडत होती. आता माझ्या मनाच्या आरशावरची धुळ पुसली गेली होती. हर्षचा विद्रुप चेहरा स्पष्ट दिसला होता. तो माझ्या आयुष्यात मला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आलाच नव्हता. पतनाच्या निसरड्या वाटेवर तो मला घेऊन गेला हाता. ही कथा फार सामान्य अन् हीन अभिरूचीची झाली होती. तिची शोकांतिका, विद्रुप शोकांतिका होण्यापूर्वीच तिचा शेवट करायला हवा. त्याचक्षणी श्रेयाला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी काय काय करायचं याचा निर्णय घेतला अन् पुढे हर्षला कधीही न भेटण्याचाही निर्णय घेतला. माझा मोबाइल उचलला अन् त्यावरचा हर्षचा नंबर कायमचा ब्लॉक करून टाकला.

आता मला खूप छान वाटत होतं. स्वत:विषयीची ग्लानी किंवा दयेची भावना आता नव्हती. पूर्ण आत्मविश्वासानं, आत्म तेजानं माझा चेहरा उजळला होता.

काट्यानं काटा निघाला

कथा * दीपा थोरात

‘‘ऐकतेस ना? ती पॉलिसीवाली ब्रीफकेस जरा आणून दे ना रीमा…’’ बैठकीच्याखोलीतून विवेकनं हाक मारली.

रीमा ओले हात पुसत पुसत बाहेर आली, ‘‘मला आत नीट ऐकायला आलं नाही, काय म्हणताय?’’

‘‘अगं, ती विम्याच्या फायलींची सूटकेस हवी आहे.’’ विवेक म्हणाला. तेवढ्यात आतून कुकरच्या दोन शिट्या पाठोपाठ ऐकायला आल्या. ‘‘बघ, बघ, तुला तुझा मित्र बोलावतोय…शिट्या वाजवतोय…’’ विवेकनं हसून मस्करी केली.

‘‘भलत्या वेळी कसली चेष्टा? माझं कामं संपेनात अन् तुम्ही मध्येच हाक मारता.’’

‘‘अगं, हे कामही महत्त्वाचंच आहे. पॉलीसी मॅच्युअर झाली की क्लेम करता येईल.’’

‘‘खरंच? मग कुठं तरी फिरायला जाऊयात का?’’ खूपच उत्सुकतेनं रीमानं विचारलं.

‘‘आणि ऋचालीच्या लग्नाचं काय?’’ विवेकनं विचारलं.

‘‘अजून लहान आहे ती. दोन तीन वर्षं तरी अजून तिचं लग्न नाही करणार.’’

‘‘पण त्यानंतर तरी कोणती लॉटरी लागणार आहे? हाच पैसा तिच्या लग्नासाठी जपून ठेवावा लागेल. लगेच पुढे दोन तीन वर्षांत लेकाचंही लग्न करावंच लागेल ना? आता पोरांची लग्नं की आपला दुसरा हनीमून तूच ठरव.’’ ब्रीफकेस उघडून फायलींमधले कागद बघत विवेकनं म्हटलं.

रीमा काही न बोलता आपल्या कामाला लागली. खरंच दिवस किती भराभर संपतात, वर्षांमागून वर्षं सरतात. रीमाच्या लग्नाला पंचवीस वर्षं झालीत. लग्न झालं तेव्हा ती फक्त एकोणीस वर्षांची होती. साखरपुडा ते लग्न यात सहा महिने वेळ होता. लग्नाला होकार द्यावा की नकार हेच तिला ठरवता येत नव्हतं. विवेकचं आकर्षक व्यक्तिमत्त्व, त्याची चांगली नोकरी भुरळ घालत होती. पण तिचं आत्तापर्यंतचं आयुष्य लखनौसारख्या शहरात, चांगल्या वस्तीत, मोकळ्या वातावरणात गेलं होतं. लग्नानंतर तिला कानपूरपासून बऱ्याच आत असलेल्या एका छोट्याशा गावात, जुनाट वळणाच्या घरातल्या एकत्र कुटुंबात राहावं लागणार होतं. ते तिला पचनी पडत नव्हतं. स्वप्नं सोनेरी होतं. पण त्यावर विद्रुप डागही होते.

शेवटी एकदाची लग्न होऊन ती सासरी आली. अजून तिचं पदवीचं एक वर्ष शिल्लक होतं. इथल्या त्या कोंदट वातावरणात तिचा जीव घाबरा व्हायचा. तिनं विवेककडे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी मागितली. या निमित्तानं तिला माहेरी जायला मिळायचं. डिग्री पूर्ण झाली मग तिनं कॉम्प्युटरचा डिप्लोमाही करून टाकला. विवेक तिला भरपूर पाठिंबा देत होता. बालवाडीचाही एक कोर्स तिनं तेवढ्यात उरकून घेतला. लग्नाला पाच वर्षं झाली तोवर पदवी डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स, बालवाडीचं सर्टिफिकेट अन् ऋचा अन् रोहन अशी दोन बाळं तिच्या पदरात होती. सासरच्या घरात सासू, सासरे, दोघं दीर, दोन जावा, त्यांची चार मुलं अन् एक सतत घरात असणारी मोलकरीण अशी चौदा माणसं होती. घर एकत्र होतं. स्वयंपाक एकत्रच असायचा. शेतातून धान्य, भाज्या मिळायच्या. वरकड खर्चाला सासऱ्यांची पेंशन अन् तिन्ही भावांकडून आईला दर महिन्याला खर्चाची रक्कम मिळायची. दोन्ही जावांचं कामावरून भांडण व्हायचं. रीमा न बोलता चटचट कामं उरकायची. तिचं सुंदर रूप, कामाचा उरक, शिक्षण, येणाऱ्यांशी चांगलं वागणं, बोलणं यामुळे थोडक्या काळात ती सर्वांची लाडकी झाली होती. पण तिच्या एकूणच बुद्धिनं, रूपानं सुमार असलेल्या जावा तिचा सतत दुस्वास करायच्या. त्या दोघी कायम एक असायच्या. पण रीमा हसून साऱ्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. दरम्यानच्या काळात विवेकला दिल्लीला नोकरी लागली. रीमाला वाटलं, बरं झालं, या जंजाळातून मुक्ती मिळाली. पण विवेकनं तिला दिल्लीला घर करणं आता जमणार नाही हे समजावून सांगितलं. तिनंही ते समजून घेतलं.

विवेक औषधांच्या कंपनीत एरिया मॅनेजर होता. रीमाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या गावात हल्ली बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. तालुक्याचा दर्जा गावाला मिळाला होता. नवीन शाळाही उघडली होती. दोन्ही मुलांचे एडमिशन्स तिथं झाले अन् रीमालाही तिथं कॉम्प्युटर टीचर म्हणून नोकरी मिळाली. विवेकनं तिला आईवडिलांकडून नोकरीची परवानगी मिळवून दिली. दोन्ही जावांचा जळफळाट झाला. त्यांनी सासूचे कान भरायचा प्रयत्न केला. पण सासूला दोन्ही वेळा वेळेवर चहा अन् जेवण मिळण्याशी काम होतं. त्या वेळा रीमानं कधीच चुकवल्या नाहीत. पण घरातल्या एकूण वातावरणात तिचा जीव गुदमरायचा. अशात छोटूचं विनोदी बोलणं, त्याची तत्पर मदत यामुळे तिला ताज्या वाऱ्याची झुळुक मिळाल्याचा भास व्हायचा.

नाव छोटू असलं तरी तो लहान नव्हता. चांगला उंचबिंच लांबरूंद तरूण होता. त्याच्या बलवीर या नावानं त्याला कधीच कुणी हाक मारली नाही. अभ्यासात त्याचं लक्ष नव्हतं. कसा बसा मॅट्रिक झाला अन् मग समाज सेवेतच गुंतला. कुणाला इस्पितळात पोहोचव, कुणाचा गॅस सिलिंडर आणून दे, लग्नकार्यात स्वत: उभं राहून मांडव घालून दे, वांजत्रीवाला ठरवून दे अशी घरातली बाहेरची कामं सतत करायचा. घरची कार सतत तो दामटायचा. थोरले दोघं भाऊ कार चालवायला शिकलेच नाहीत. हक्काचा छोटू हाताशी होताच. छोटू त्याच्या आईवडिलांना उतार वयात झालेला. त्यामुळे त्यांचा छोटूवर फार जीव अन् आईबापांची संपत्ती आपलीच आहे हे छोटूनं ठरवूनच टाकलं होतं.

बोलणं वागणं अगदी नम्र होतं छोटूचं. हात जोडून उभा राहिला की समोरच्याला भरूनच यायचं. रीमाच्या सासऱ्यांच्या बॉसचा तो मुलगा. त्यांचाही छोटूवर जीव होता. दिवसभरात एक दोन फेऱ्या त्याच्या सहजच व्हायच्या.

रीमाला म्हणायचा, ‘‘वहिनी, तुमचं माझं वय जवळजवळ सारखंच असेल पण तुम्ही कधी रिकाम्या नसता अन् मी कायम रिकामाच असतो.’’

‘‘तर मग कर ना काही काम. निदान शाळेत जा. अकरावी, बारावी करून टाक.’’

‘‘नाही जमणार मला.’’

‘‘कॉम्प्युटरचा कोर्स कर. चांगली नोकरी मिळेल.’’

‘‘बरं बघतो. पण वहिनी तुम्ही खरंच खूप स्वीट आहात.’’

रीमाला हसायला आलं.

‘‘तुम्हाला ठाऊक आहे का? तुमचं हसणं वेड लावतं मला. तुम्हाला हसताना बघितलं की चेहऱ्यावरून नजर हलत नाही. मला तर विवेकदादाचा हेवाच वाटतो.’’

‘‘असं काही तरी बोलू नकोस.’’ रीमा रागावून म्हणाली.

‘‘खरंच सांगतोय मी. तुमचे डोळे. तुमचं हसणं एकदा कुणी बघेल, ऐकेल तर जन्मभर विसरणार नाही.’’

‘‘तू आता निघ अन् काहीतरी अभ्यास सुरू करशील तेव्हाच भेटायला ये.’’ रीमा त्याला हाकलायला बघत होती.

‘‘तुम्हाला ही सगळी चेष्टा वाटतेय? मी खरं सांगतो. काय सुंदर फिगर आहे तुमची. दोन मुलांची आई तर वाटतंच नाही तुम्ही. लोकांना अजूनही वाटतंय तुम्ही लग्नाची मुलगी आहात म्हणून!’’

‘‘आता पुरे. तू निघ. मला संताप अनावर होईल असं काही बोलूही नकोस.’’ पटकन् तोडून टाकत रीमानं म्हटलं अन् ती सरळ आपल्या खोलीत निघून आली.

स्वत:च्या खोलीतल्या डे्सिंग टेबलसमोर उभी राहून तिनं आपल्या प्रतिबिंबाकडे बघितलं. ती खरोखर सुंदरच होती. लग्न झालं नसतं तर इतर मैत्रिणींप्रमाणे युनिव्हर्सिटीत किंवा कॉलेजातच पीएचडी करत असती. पण कॉलेजचं आयुष्य फारच लवकर संपलं. संसाराच्या रामरगाड्यात कसंबसं शिक्षण पूर्ण करू शकली. एक मात्र खरं की नवरा सतत तिच्या पाठीशी होता. त्यानं तिच्या शिक्षणाला प्रतिबंध केला नाही. संसार, मुलं सांभाळून अभ्यास करणं, परीक्षा देणं सोपं नक्कीच नव्हतं. पण ते तिनं जिद्दीनं केलं.

जुन्या आठवणी कशाला अन् किती काढायच्या म्हणत ती आरशासमोरून बाजूला झाली. पण मन मात्र भूतकाळातून बाहेर यायला तयार नव्हतं.

तिच्या माहेरी चुलत बहिणीचं लग्न होतं. विवेकपाशी खूप हट्ट करून त्याच्यासह ती मुलांना घेऊन माहेरी आली होती. स्वत:च्या लग्नातही ती ब्युटी पार्लरला गेली नव्हती. यावेळी मात्र नवरीच्या जोडीनं तिनंही सगळे सोपस्कार करून घेतले होते. नटूनथटून ती विवेकसमोर येऊन उभी राहिली, तेव्हा क्षणभर तो बघतच राहिला. मग जरा करडेपणानं म्हणाला, ‘‘इतकं नटायची काय गरज होती? लग्न तुझं नाहीए…’’

‘‘माझ्या बहिणीचं आहे. अन् आईबाबा, बाकीचे कुठं गेले? मुलं…?’’

‘‘सगळे टॅक्सीनं पुढे गेलेत. तुझं नटणं संपेना…घर लॉक करून या म्हणून सांगितलंय…दादाने त्याची बाईक ठेवलीय…आपण बाईकनं जाऊयात.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘तर मग चला नं लवकर,’’ ती उतावळेपणानं म्हणाली.

‘‘बाइकची किल्ली तर आण. ती वर बेडरूममध्येच आहे.’’

माहेरच्या घरातली रीमाची खोली अजूनही तिच्यासाठीच राखून ठेवलेली असते.

‘‘प्लीज अहो, तुम्हीच आणा ना वरून? हा लेहंगा घालून जिना चढणं, उतरणं फार त्रासदायक होतं.’’ तिनं म्हटलं.

‘‘तर मग बसा घरीच.’’ विवेक म्हणाला.

रागानं रीमा उठली अन् जिना चढून खोलीत आली. पलंगावरच किल्ली होती. किल्ली उचलून ती वळतेय तोवर विवेकनं तिला मिठीत घेतली अन् दोघंही बेडवर कोसळली. विवेकच्या प्रेमाला उधाण आलं होतं.

‘‘अहो असं काय करताय? माझा सगळा मेकअप बिघडला ना? कसंबसं स्वत:ला सोडवून घेत रीमानं म्हटलं, लवकर निघायला हवं. सगळे तिथं वाट बघत असतील?’’

‘‘बघू देत वाट! मला आता धीर निघत नाहीए…’’

‘‘प्लीज, आपण लवकर घरी येऊ…पण आता चला ना?’’

‘‘तू तिथे गेलीस की रमशील आपल्याच लोकांमध्ये,’’ विवेकनं मिठी अधिकच घट्ट केली. एक चुंबन घेतलं.

‘‘प्रॉमिस! लवकर घरी येऊ. पण आता चला.’’ विवेकनं किल्ली घेतली अन् जिना उतरू लागला. पटकन् स्वत:चा अवतार ठिकठाक करून ती ही निघाली.

लग्नाच्या हॉलमध्ये विवेक सतत तिच्याजवळ होता. नातलग मैत्रिणी सर्वांनी किती चेष्टा केली तिची. विवेकला तिच्या नटण्यावर एवढ्यासाठीच आक्षेप होता की तिचं सौंदर्य आणखी कुणी बघावं हे त्याला आवडत नव्हतं. आपण होऊन तो कधी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत नसे, पण त्याचा स्वभाव आता तिला कळला होता.

विवेक नसताना तिला किती उदास वाटतं. ते दुसऱ्याला समजणार नव्हतं. दिवसा घरकाम, मुलं, शाळा या सगळ्यात वेळ जायचा. पण रात्री मात्र फार लांबलचक अन् कंटाळवाण्या वाटायच्या. घरात लॅन्डलाइन फोन होता. विवेकचा फोन बरेचदा सासू, सासरे किंवा दिर उचलायचे. रीमाला कधी तरी बोलायला मिळायचं.

त्या दिवशी मात्र फोन तिनंच उचलला. विवेक म्हणाला तो मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घरी पोहोचतोय. त्यानं तिला अर्ध्या दिवसाची सुट्टी घे म्हणूनही बजावलं. मुलांना रिक्शा करून घरी येऊ दे, हेही सांगितलं. ‘‘दुपारी तू मला हवी आहेस.’’ तो म्हणाला.

‘‘अहो पण रात्री घरीच आहात ना?’’

विवेक एकदम रागावला, ‘‘मग मी सुट्टी कॅन्सल करतो?’’

‘‘बरं बर, मी घेते सुट्टी…रागावू नका,’’ तिनं हॉलमध्ये नजर फिरवली. सुर्दैवानं तिथं कुणी नव्हतं. एक तर फोन अगदी भर चौकात असावा अश्या जागी अन् यांना रोमान्स सुचतोय…

तिनं घरात सकाळीच सांगितलं लंच टाइमपर्यंत विवेक येतोय. शाळेत मंथली टेस्ट चालू होत्या. शाळेत प्रिसिंपलच्या परवानगीनं कॉम्प्युटरचे पेपर्स सकाळीच आटोपून घेतले. घरी एक समारंभ आहे म्हणून हाफ डे घेतेय सांगून वेळ मारू नेली.

ती शाळेच्या गेटपाशी पोहोचतेय तोवर छोटू मोटरसायकल घेऊन समोर आला.

‘‘वहिनी, घरी जायचंय?’’

‘‘चला, मी सोडतो.’’

खरं तर रिक्शा मिळाली असती तर बरं झालं असतं. पण रिक्शा लवकर मिळेलच याची खात्री नाही. उशीर झाला तर पुन्हा विवेक चिडेल.

‘‘कसला विचार करताय वहिनी? आज लवकर कशा काय निघालात?’’

‘‘जरा बरं वाटत नाहीए…’’

‘‘वहिनी, थोडं स्वत:कडेही लक्ष द्या. तुम्ही ना, फारच भोळ्या आहात. दादा तिकडे मजा करतोय अन् तुम्ही मात्र इथं सतत खपताय.’’

‘‘कसली मजा अन् कसलं काय? एकटे राहतात, घरचं जेवण नाही, सतत प्रवास. हे सगळं ते आमच्यासाठीच करताहेत. मुलांच्या भवितव्यालाठीच सगळं चाललंय.’’

‘‘या गोष्टी फक्त बोलायच्या असतात. तिथं तर नाइट क्लब, दारू, पोरी सगळंच असतं. कोण बायकोची आठवण काढतंय?’’

तिला वाटलं सांगावं छोटूला की विवेक आताही घरी तिची वाट बघत तळमळतोय. पण ती काही बोलली नाही. घरापाशी मोटर सायकलवरून उतरल्यावर कोरडेपणानंच म्हणाली, ‘‘चहा घेऊन जा.’’

‘‘नको…तुम्हाला बरं नाहीए. पण नंतर येतो. जरा काही कॉम्प्युटरबद्दल विचारायचं आहे.’’

‘‘बराय, पुढल्या पंधरवड्यात ये. आता मुलांच्या टेस्ट चालू आहेत.’’

‘‘तुमची आज्ञा शिरसावंद्य स्वीट वहिनी.’’ झटक्यात बाइक वळवून तो निघून गेला अन् रीमानं सुटकेचा नि:श्वास सोडला.

सासूसासरे व्हरांड्यातच बसलेले होते. ‘‘आज लवकर कशी आलीस? विवेक आलाय म्हणून का? त्याचं जेवणखाणं झालंय..तू काळजी कशाला करतेस?’’ सासूनं म्हटलं.

काही न बोलता खाली मान घालून ती खोलीकडे निघाली. ‘‘अगं तो झोपला असेल, तू आमच्यासाठी चहा कर बरं!’’ सासरे म्हणाले.

खोलीत विवेक उतावीळपणे तिची वाट बघत होता. त्यानं जणू झडपच घातली तिच्यावर. ‘‘किती दिवस झाले तुला भेटून.’’

‘‘फक्त एकच महिना.’’ तिनं हसून म्हटलं. त्याच्या प्रेमवर्षावात ती चिंब भिजली. विवेकनं तृप्त चेहऱ्यानं तिच्याकडे बघत म्हटलं, ‘‘मी आता झोपणार आहे. तू काय करणार आहेस?’’

‘‘मला आधी जरा तोंड हातपाय धुवून कपडे बदलून घेऊ देत. सासूबाईंना चहा हवा होता. मुलंही येतच असतील. अजून जेवण व्हायचंय माझं…तुम्हाला काय? झोपा आता मुकाट्यानं.’’ तिनं त्याचे केस विस्कटून टाकत हसून म्हटलं.

त्या दिवशी सासूसासऱ्यांशी, दोघी जावांशी अगदी मुलांशीही तिला खोटं बोलावं लागलं होतं.

विवेक रजा संपवून निघून गेला होता. तिनं कपाट आवरायला घेतलं होतं. सुट्टीचा दिवस होता. पुस्तक काखोटीला मारून छोटूनं घरात प्रवेश केला. सरळ तो तिच्या बेडरूममध्येच आला. ती दचकली. सावरून म्हणाली, ‘‘चल बाहेर, व्हरांड्यातच बसूयात.’’

‘‘चालेल ना.’’ पलंगावर बसत तो म्हणाला, ‘‘तुमचा बेड खूपच छान आहे हं! पण एकटीला तुम्हाला यावर झोप येत नसेल ना?’’

काही उत्तर न देता रीमा खोलीबाहेर पडली. मागोमाग छोटूही आला.

‘‘वहिनी, मी मस्करी करत होतो. तुम्ही तर रागावलात.’’

रीमाला जाणवत होतं, विवेक इथं नसताना छोटूची मस्करी मर्यादा ओलांडते. ती जितकी त्याला टाळायला बघते तेवढी त्याच्याकडून मदत घ्यावी लागते. मध्ये ऋचा पायऱ्यांवरून पडली. भरपूर रक्त आलं. छोटूंनच ओळखीच्या डॉक्टरकडे नेऊन जखमेला टाके घातले. पुढेही दोन दिवस फॉलोअपसाठी त्याच्याच गाडीतून तो रीमाला व तिला नेत होता.

खेळताना मुलाचा पाय मुरगळला. छोटूचीच मदत होती. सासूबाईंचं ब्लडप्रेशर शूट झालं. छोटूनं धावपळ केली. त्याचे उपकार घेतले म्हणताना तिला त्याला तोडूनही टाकता येत नव्हतं.

एक दिवस आला अन् म्हणाला, ‘‘मी हल्ली विमा एजंट झालोय. एक पॉलिसी तर तुम्हाला घ्यावीच लागेल.’’

रीमानं ऋचाच्या नावानं एक पॉलिसी घेतली. कारण घेतली नसती तर तो घरातून हलणार नाही हे तिला ठाऊक होतं.

‘‘याला म्हणतात समजूतदारपणा. यू आर रीयली स्वीट वहिनी.’’ छोटूनं म्हटलं.

‘‘दादा कधी येणार आहेत?’’

‘‘तुला का आठवण येतेय त्यांची?’’ रीमानं रागानं विचारलं.

‘‘तुमचा एकटेपणा बघवत नाहीए मला. हे इतकं तरूण वय काय असं एकट्यानं झुरण्याचं वय आहे का?’’

‘‘असतात काही काळासाठी तसे योग.’’

‘‘पण तुम्ही असं विरक्त का राहायंच…छान मौजमजा करायची.’’

‘‘म्हणजे काय?’’ तिनं मुद्दामच विचारलं.

‘‘वहिनी, तुमच्याकडे तर डबल लायसेन्स आहे.’’

छोटू मर्यादा ओलांडतो आहे हे लक्षात आलंच होतं. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकावा म्हणून तिनं विचारलं, ‘‘मौजमजा करायला लायसेन्स लागतं?’’

‘‘म्हणजे एक तर तुम्ही विवाहित आहात, त्यातून तुमचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशनही झालंय. आता तर मुक्त पक्ष्यांप्रमाणे आकाशात भरारी घ्यायची.’’

‘‘म्हणजे काय? मला काहीच कळलं नाही.’’

‘‘वहिनी, अगं तुझा हा भाबडेपणाचं मला वेड लावतो. अगं, दादा दिल्लीला दुसऱ्या कुणा स्त्रीबरोबर मजा करतो. तसं तूही इथे कुणा दुसऱ्याबरोबर मजा करायची.’’

इतका संताप आला रीमाला, पण तसं न दाखवता तिनं म्हटलं, ‘‘हा तर माझ्या पतीचा विश्वासघात ठरेल.’’

‘‘नाही, अजिबात नाही. हा तर फक्त थोडासा टाइमपास असतो. समजायचं एक सिनेमा बघितला. सिनेमा संपला की तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी.’’

‘‘अजून लग्न झालं नाहीए तुझं, म्हणूनच तुला या नात्याचं पावित्र्य, त्याच्या मर्यादा, त्याचं महत्त्व कळत नाहीए. तुझं लग्न होऊ दे. मग मी सांगेन तुला की एक सिनेमा तुझ्या बायकोचा विवेकनाही दाखव, मग कसं वाटेल तुला.’’

‘‘मला काही वाटणार नाही. मी संकुचित विचारांचा नाही. मोकळ्या विचारांचा आहे. माझी बायको काय करते यानं मला फरक पडणार नाही.’’ छोटू वरवर बेपर्वाइनं बोलला पण त्याचा चेहरा पडला होता.

रीमानं जणू त्याला आव्हानच दिलं. ‘‘ठिक आहे, तू आपल्या बायकोला खरोखर एवढं स्वातंत्र्य देतोस का? ते मी ही बघेनच! मग कळेल की बोलतो तो खरंच करतो का की फुकटचीच वटवट असते.’’

वर्षभरातच विवेकबरोबर ती कानपूरला गेली. बिऱ्हाड मांडलं. खूप आनंदात होती रीमा, एक दिवस अचानक छोटूचा फोन आला.

‘‘बऱ्याच दिवसांनी आठवण आली आमची? कसा काय फोन केलास?’’ आश्चर्यानं रीमानं विचारलं.

‘‘काय वहिनी, माझ्या लग्नाला आला नाहीत तुम्ही?’’ जरा नाराजीनं त्यानं म्हटलं.

‘‘तू आम्हाला पत्रिकाच पाठवली नाहीस. तिथल्या घरी दिली असशील. त्यांनी तर लग्न झाल्यावरच आम्हाला कळवलं…असू दे, काही हरकत नाही. तुला अन् तुझ्या वधूला खूप खूप शुभेच्छा…’’

‘‘वहिनी, एक काम होतं, म्हणून फोन केला. माझ्या बायकोला बी.एडसाठी कानपूरच्या कॉलेजात एडमिशन मिळालं आहे. तिला राहाण्यासाठी एखादी जागा बघाल का?’’

‘‘अरे व्वा! ही तर आनंदाची बातमी आहे. घराची काळजी करू नकोस. इथं आमचा थ्री बेडरूम फ्लॅट आहे. दोन आम्ही वापरतो. एक तर बंदच असतो. तुम्ही तिथं राहू शकता. काहीच त्रास होणार नाही. तू तर म्हणालाच होतास ना की तुझी बायको फिल्मपण दाखवेल, तर दादाही इथं आहेत. ते तिची काळजी घेतील. तू येच बायकोला घेऊन.’’

खाट्कन फोन बंद झाला. याचा अर्थ छोटूची बायको त्यांच्याकडे येणार नाही.

रीमाला हसायला आलं. ती तर चेष्टा करत होती अन् छोटू घाबरला होता.

विवेक पाणी पिण्यासाठी आत आला होता. रीमाला हसताना बघून त्यानं विचारलं, ‘‘काय झालं?’’

‘‘काही नाही,…मला एक सांगा, छोटूकडून घेतलेल्या पॉलिसीची मुदत कधी पूर्ण होतेय?’’

‘‘पुढच्याच वर्षी. दोन लाख मिळतील. लेकीच्या लग्नाची सोय झालीय…पण तू का विचारते आहेस?’’

‘‘सहजच! एक तरी काम चांगलं केलं छोटूनं.’’

‘‘त्यानं वाईट काम काय केलं होतं? मला ही कळू देत.’’ विवेकनं म्हटलं.

‘‘त्यानं वाईट काम केलं असं मी कधी म्हटलं.’’

‘‘तुम्हां बायकांशी वाद कुणी घालायचे? जाऊ दे झालं.’’

‘‘हे मात्र बरोबर बोललात.’’ रीमा हसत म्हणाली.

मनात म्हणाली, ‘‘काट्यानं काटा निघाला.’’

वॉर्निंग साइन बोर्ड

कथा * सुधा ओढेकर

आपलं ऑफिस संपवून निशा निधीला घ्यायला शाळेच्या पाळणाघरात पोहोचली तेव्हा नेहमी धावत येऊन तिला बिलगणारी निधी नीट चालूही शकत नसल्याचं तिला जाणवलं.

निशाला बघताच तिथली अटेंडंट म्हणाली, ‘‘मॅडम, निधी आज दुखतंय म्हणत होती. डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी हे औषध दिलंय. या गोळ्या दिवसातून दोनदा अन् या तीनदा द्यायच्या आहेत.’’

‘‘तुम्ही मला फोन का केला नाही?’’

‘‘केला होता मॅडम, पण लागला नाही. डॉक्टरांकडे नेलं होतं.’’

‘‘बरं, डॉक्टरांची चिठ्ठी?’’

‘‘मला फक्त हे एवढंच दिलं गेलंय. चिठ्ठी नाहीए.’’

कदाचित तिच्याकडून प्रिस्क्रिप्शन हरवलं असेल म्हणून खोटं बोलतेय. निशाने तरीही शाळेला धन्यवाद दिले. शाळा खरंच चांगली आहे. तिने निधीला उचलून आणून कारमध्ये बसवले. निधी लगेच झोपली. खरं तर शाळा दुपारी अडीचला सुटते. पण घरी कुणी बघणारं, सांभाळणारं नाही म्हणून नाइलाजाने निशा निधीला शाळेच्या पाळणाघरात ठेवते. आपल्या अत्यंत व्यस्त अन् धावपळीच्या आयुष्यात आपण पोरीवर अन्याय करतोय असंही तिच्या मनात येई. मुलीकडे लक्ष द्यायचं तर नोकरी सोडावी लागेल. पण पुन्हा अशी चांगली नोकरी मिळणार नाही ही गोष्टही तेवढीच खरी.

घरी गेल्यावरही निधी झोपलेलीच होती. तिला उचलून निशाने बेडवर झोपवली. कदाचित आता तिचं दुखणं थांबल्यामुळे किंवा डॉक्टरांच्या गोळीमुळे तिला गाढ झोप लागली आहे तेव्हा झोपू दे असा विचार करून निशाने रात्री निधी जेवली नाही तरी तिला तशीच झोपू दिली. रात्री केव्हा तरी झोपेत निधी बडबडत होती. निशाची झोप उघडली. तिने निधीला थोपटलं तेव्हा लक्षात आलं की निधीला ताप आहे. ती झोपेतच बडबडत होती. ‘‘मी घाणेरडी मुलगी नाही. मला पनिश करू नका.’’

निधी असं का बोलतेय ते निशाला कळेना. तिला शाळेत कुणी शिक्षा केली का? कुणी पनिश केलं का? पण का? तिला जे दुखतंय ते कशामुळे? तिने दुसऱ्या दिवशी ऑफिसची रजा टाकली.

निधी सकाळी दहाच्या सुमारास जागी झाली. निशा तिच्या जवळच होती. निशाला मिठी मारून ती रडायला लागली. रडता रडताच बोलली, ‘‘ममा, मी शाळेत जाणार नाही.’’

‘‘का गं, बेटा? शाळेत कुणी तुला काही म्हटलं का?’’ निशाने आश्चर्याने विचारलं.

‘‘मी शाळेत जाणार नाही,’’ पुन्हा ती तेच म्हणाली.

‘‘पण बाळा, शाळेत तर सर्वंच मुलांना जावं लागतं?’’

‘‘नाही, नाही…मी जाणार नाही…’’ ती हुंदके देत रडत म्हणाली.

‘‘बरं बरं…रडू नकोस. तू म्हणशील तेव्हाच तुला शाळेत पाठवेन.’’ निशाने तिला थोपटून शांत करत म्हटलं.

तिने मनात ठरवलं, उद्या सकाळी आधी शाळेत जाऊन टीचरला भेटलं पाहिजे. अत्यंत उत्साहाने शाळेला जाणाऱ्या या पोरीला एकाएकी शाळेचा तिटकारा का वाटू लागला? शिवाय झोपेत ती सारखी पनिश…पनिश म्हणत होती. त्याबद्दलही विचारायचं हे ठरवल्यावर तिचं मन शांत झालं.

निशाने निधीला दूध दिलं, ब्रेकफास्ट दिला. निधी पुन्हा झोपली होती. बेचैन होती. नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. चिवचिवत नव्हती. निशाने तिला स्पंज करून कपडे बदलले तेव्हा निधीच्या पॅण्टीवर रक्ताचे डाग दिसले. निशा दचकली. सातव्या वर्षीच पाळी सुरू झाली की काय? अन् सारखं दुखतंय…दुखतंय का म्हणतेय? किती कोमेजलली आहे…निशाने सरळ डॉ. संगीताला फोन केला अन् ती निधीला घेऊन तिच्या क्लीनिकमध्ये गेली.

डॉ. संगीताने निधीला तपासलं अन् अभावितपणे ती बोलून गेली, ‘‘ओह…नो…’’

‘‘काय झालं, डॉक्टर?’’

तिला बाजूला घेऊन खाजगी आवाजात डॉ. संगीता म्हणाली, ‘‘निशा, अगं या पोरीवर रेप झालाय…’’

‘‘रेप?’’ निशा केवढी दचकली.

‘‘पण केव्हा? कुठे? काल तर ती शाळेतच होती. इतर कुठे गेलीच नव्हती,’’ आश्चर्य अन् भीती, काळजी यामुळे निशाला बोलणं सुधरेना.

‘‘पण हे सत्य आहे निशा, केवळ अंदाज नाही.’’

‘‘देवा रे!’’ डोकं धरून निशा तिथल्या खुर्चीवर बसली. काय चाललंय या जगात? इतक्या कोवळ्या, अजाण, निष्पाप पोरीवर बलात्कार? माणुसकीचे वाभाडे काढणारे हे राक्षस…कोण असेल हा सैतान?

‘‘निशा, तू आधी स्वत:ला सांभाळ. शांत हो, आपल्याला या अजाण पोरीला सावरायचं आहे. नेमकं काय, केव्हा, कुठे घडलं याचा छडा लावावा लागेल,’’   डॉ. संगीताने निशाला समजावलं.

निशाने निधीकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही वेदना होती. ती मुकाट बसून होती. डॉ. संगीताने तिला प्रेमाने विचारलं, ‘‘बाळा, तुला हा त्रास कसा झाला?’’

निधीने उत्तर दिलं नाही. ती गप्प बसली होती. तिला प्रेमाने जवळ घेत निशाने म्हटलं, ‘‘डॉक्टर आण्टी विचारताहेत त्या प्रश्नाचं उत्तर दे ना, तुला कसं दुखलं, त्रास कशामुळे झाला?’’

‘‘नाही मम्मा, मी सांगणार नाही. टीचर मला मारतील.’’

‘‘का?’’

‘‘टीचर म्हणाल्या, तू घरात कुणाला काही सांगितलंस तर मी तुला मारीन. घरी तुझे आईबाबाही तुला रागावतील. तू चूक केली आहेस. तू वाईट, घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट मिळाली आहे. पण ममा, मी काहीच केलं नाहीए गं…खरंच…’’ ती लहानगी पुन्हा रडायला लागली. डॉक्टरही गडबडून गेली.

‘‘बाळा, तू आम्हाला सांग, आम्ही तुला रागावणार नाही, उलट त्या टीचरलाच रागावू. तू न घाबरता सांग. टीचर इथे येणार नाही. मीच तिला रागावणार आहे. सांग, रडू नकोस. मी तर तुला औषध देऊन बरं करणार आहे.’’

डॉ. संगीताने अन् निशाने वारंवार समजावल्यावर निधीने जे सांगितलं ते ऐकून दोघी अवाक् झाल्या. एका स्वीमिंग इन्स्ट्रक्टरचं हे काम होतं.

‘‘निशा, त्या नराधमाच्या विरुद्ध केस कर. निधीचं सगळं बोलणं मी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केलंय. तिच्या तपासणीचे रिपोर्ट मी व्यवस्थित तयार करते. मी साक्ष देईन कोर्टात.’’ संतापाने डॉ. संगीता लालेलाल झाली होती.

निशाने रात्री निधी झोपल्यावर दीपकला सगळं सांगितलं. दीपक संतापला. ‘‘मी त्या हरामखोराला असा सोडणार नाही. त्याला तुरुंगातच पाठवतो.’’

‘‘मलाही तुमच्यासारखाच संताप आला होता दीपक, पण मला भीती वाटली. या सर्व प्रकारात आपल्या मुलीची अन् आपलीही बेअब्रू होईल. पोरीला समाजात वावरता येणार नाही. तिच्या बालमनावर विपरीत परिणाम होईल.’’

‘‘तू म्हणतेस ते खरंय, पण अशाने त्या गुन्हेगाराला बळ मिळतं. आज आपल्या मुलीच्या बाबतीत जे घडलं, ते उद्या आणखीही कुणाच्या बाबतीत घडेल.’’

शेवटी त्यांनी एफआरआय नोंदवली. एका अल्पवयीन मुलीवरील रेपच्या संदर्भात डॉ. संगीता अन् तिची साक्ष महत्त्वाची ठरली.

निधीने आरोपीला ओळखल्यावरही शाळा हा आरोप मान्य करत नव्हती. पण मीडिया अन् अनेक पालकांनी मुद्दा लावून धरला. शेवटी त्या नराधमाला पोलिसांनी अटक केली.

दुसऱ्यादिवशी सगळ्या वर्तमानपत्रातून ठळकपणे ही बातमी प्रसिद्ध झाली. यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलच्या सात वर्षांच्या मुलीवर रेप. स्वीमिंगच्या क्लासनंतर मुलगी कपडे बदलायला वॉशरूमकडे केली तेव्हा इन्स्ट्रक्टरही तिच्या मागे मागे तिथे गेला. तिच्या तोंडात बोळा कोंबून त्याने तिला जीवे मारण्याची भीती दाखवून बलात्कार केला. वर पुन्हा कुणाजवळ बोललीस तर खबरदार म्हणून धमकीही दिली. क्लास टीचरने तिला घाबरलेली व रडताना बघितली तेव्हा तिने काय झालं म्हणून विचारलं. ती लहान पोरं फक्त दुखतंय म्हणत होती, रडत होती. क्लास टीचरने प्रिन्सिपलला सांगितलं. प्रिन्सिपलने डॉक्टरांना बोलावून चेकअप करवून घ्या म्हणून सांगितलं.

डॉक्टरने जुजबी काही तरी औषधं देऊन वेळ भागवली. टीचरने मुलीला धमकावलं की याबद्दल घरी काही सांगू नकोस, तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला पनिशमेण्ट दिली आहे. घरी बोललीस तर तुझे आईबाबाही तुला रागावतील.

निशा म्हणाली, ‘‘वाचा बातमी, सगळीकडे आपली बेअब्रू होतेय.’’

‘‘उगीच काही तरी बोलू नकोस. निधीचं किंवा आपलं नाव कुठेही आलेलं नाहीए.? खरं तर त्या क्लास टीचरला, प्रिन्सिपलला अन् त्या नालायक डॉक्टरलाही कोर्टात खेचायला हवंय.’’

‘‘पण आज नाही तर उद्या आपलं नाव बाहेर कळेलच ना?’’

‘‘नाही कळणार. अन् त्या हरामखोर गुन्हेगाराला मी असा सोडणारही नाहीए. मी चांगला वकील मिळवला आहे.’’

‘‘पण यात खूप वेळ जाईल. निधी आता त्या शाळेत जायचं नाही म्हणतेय. तिच्या मनातली भीती कमी करण्यासाठी आपण दुसऱ्या शहरात जाऊ.’’

‘‘म्हणजे?’’

‘‘तुम्ही बदली करून घ्या.’’

‘‘ते इतकं सोपं नाहीए.’’

‘‘निधीसाठी काहीही करावं लागलं तरी ते करायला हवं. मी माझ्या ऑफिसमध्ये बोलले आहे. मला दिल्लीला बदली मिळतेय.’’

‘‘ठीक आहे, मीही प्रयत्न करतो.’’

निधीला घेऊन निशा दिल्लीला आली. तिच्या एका मैत्रिणीकडे उतरली. ऑफिसमध्ये जॉइन केलं अन् मग निधीच्या अॅडमिशनसाठी एका प्रसिद्ध शाळेत एकटीच गेली. टी.सी. बघून प्रिसिपॉलने म्हटलं, ‘‘यलो लाइन इंटरनॅशनल स्कूल याच शाळेतल्या स्वीमिंग इन्स्ट्रक्टरने एका लहान मुलीवर रेप केला होता ना? पेपरला वाचलं होतं.’’

‘‘होय मॅडम, आम्हीही वाचलं होतं. माझी इथे बदली झाली आहे म्हणून मी मुलीला घेऊन इथे तिच्या अॅडमिशनसाठी आले आहे.’’

‘‘तुम्ही भाग्यवान आहात. आठवड्यापूर्वीच एक मुलगी वडिलांची बदली झाल्यामुळे दुसऱ्या गावी गेली आहे. त्या जागी तुमच्या मुलीला अॅडमिशन देता येईल.’’

‘‘थँक्यू मॅडम,’’ निशाने कृतज्ञतेने हात जोडून नमस्कार करत त्यांचा निरोप घेतला.

‘‘मोस्ट वेलकम!’’

निशा ज्या मैत्रिणीकडे उतरली होती तिचीही मुलगी त्याच शाळेत शिकत होती. तिनेच ही ‘डीपीएस’ शाळा सुचवली होती.

घरी येऊन निशाने निधीला शाळेविषयी सांगितलं तर ती म्हणाली, ‘‘मला शाळेत जायचं नाही.’’

‘‘अगं, पण ही शाळा वेगळी आहे. छान आहे. तुला आवडेल.’’

‘‘मला नाही जायचं…’’

‘‘अगं. शुची पण तुझ्याच शाळेत शिकते.’’

‘‘ती माझ्या वर्गात बसेल?’’

‘‘नाही बाळा, ती थोडी मोठी आहे ना, तिचा वर्ग वेगळा असेल पण तुझ्याबरोबर शाळेत जाईल, तुझ्याबरोबर परत येईल.’’

शुचीने निधीकडे बघून हसत संमतीदर्शक मान हलवली.

निशाने शनिवार, रविवार निधीला मानसिक दृष्टीने तयार करण्यात घालवला. दोन दिवस तिने निधीला अन् शुचीलादेखील आपल्या कारने शाळेत सोडलं. त्यानंतर शाळेच्या बसचे पैसे भरून झाल्यावर शुची व निधी स्कूल बसने जाऊयेऊ लागल्या.

नव्या वातावरणात शाळेच्या एकूणच सेटअपमध्ये निधी लवकरच रमली. शुचीच्या संगतीत हसू, खेळू, बोलू लागली. पण अजूनही ती रात्री मध्येच दचकून जागी व्हायची किंवा ‘मला पनिश करू नका,’ असं म्हणत झोपेतच रडायची. तिला एखाद्या सायकॉलॉजिस्टची गरज होती.

शुचीच्या घरी तरी किती दिवस राहाणार. सुर्देवाने शुचीच्या आईने अलकाने बातमी आणली की त्यांच्याच अपार्टमेण्टमध्ये एक फ्लॅट रिकामा झालाय. घरमालक तिच्या माहितीतले असल्याने निशासाठी तो भाड्याने मिळवण्यात अडचण आली नाही. शनिवार, रविवारच्या सुट्टीत अलकाच्या मदतीने निशाने आपलं बिऱ्हाड बाजलं नव्या फ्लॅटमध्ये नेलं. दीपकने गरजेच्या काही वस्तू टे्रनच्या ब्रेकव्हॅनमधून पाठवून दिल्यामुळे घर आता बऱ्यापैकी सोयिस्कर झालं.

त्यातच समाधानाची गोष्ट म्हणजे दीपकचा फोन आला. ‘‘निशा, शाळेने त्या इन्स्ट्रक्टरला काढून टाकलंय. शिवाय वकिलाला घेऊनच प्रिन्सिपल, क्लासटीचर अन् त्या डॉक्टरलाही भेटलो. जो हलगर्जीपणा प्रिन्सिपल अन् डॉक्टरने केला अन् ‘तू घाणेरडी मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली. घरी सांगू नकोस,’ असं धमकावणाऱ्या टीचरलाही कोर्टाचा हिसका देतो म्हटल्यावर डॉक्टर अन् प्रिन्सिपलने स्पेशल शरणागती पत्करून माफीनामा लिहून दिलाय. त्या टीचरलाही नोकरीवरून काढून टाकली  आहे शिवाय ट्रीटमेण्टचा खर्च शाळा देणार आहे.’’

दुसरी चांगली बातमी म्हणजे वकिलाने कोर्टाकडून परवानगी मिळवली आहे की मुलगी लहान आहे शिवाय तिला सायकिक ट्रीटमेण्ट व जागा बदलण्यासाठी दिल्लीला पाठवली आहे तेव्हा तिला कोर्टात हजर राहाण्याची सक्ती करू नये किंबहुना तिला कोर्टात गैरहजर राहाण्याची परवानगी द्यावी. डॉ. संगीता साक्ष द्यायला येणार आहेत अन् त्यांनी मोबाइलवर रेकॉर्ड केलेलं निधीचं स्टेटमेण्ट कोर्टात चालणार आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ऑफिसने दिल्लीला पाठवण्याचं कबूल केलंय. दीड दोन महिन्यांत मी तिथे पोहोचेन.

निशाने दीपकचं अभिनंदन केलं. तो सतत केसच्या मागावर असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अन् एक नि:श्वास सोडला. मनावरचा ताण थोडा कमी झाला होता.

अलका हाउसवाइफ असल्याने शुची अन् निधी तिच्या घरातच शाळा सुटल्यावर राहायच्या. निशा आली की मग त्या आपल्या घरी यायच्या.

निशाने इंटरनेटवरून सायकियाट्रिस्ट डॉक्टर सुभाषचा पत्ता मिळवला व भेटीची वेळ ठरवून घेतली. आधी ती एकटीच डॉक्टरांना भेटायला गेली. निधीची केस त्यांना समजावून सांगितली अन् त्यांच्याकडून मदत हवीय असं म्हटलं.

डॉक्टर चांगले होते. ते म्हणाले, ‘‘उद्या याचवेळी तुम्ही पेशंटला घेऊन या. मुलगी लहान वयात वाईट अनुभवाला सामोरी गेली आहे. आपण हळुवारपणे तिच्या मनातली भीती काढून टाकू. तुमची मुलगी लवकरच पुन्हा अगदी नॉर्मल, आनंदी अन् निर्भर आयुष्य जगू लागेल. मी खात्री देतो. तुम्ही अगदी नि:शंक राहा.’’

‘‘मीही तेवढ्याच आशेने आलेय तुमच्याकडे.’’

दुसऱ्यादिवशी निशा निधीला घेऊन डॉक्टर सुभाषना भेटली. डॉक्टरांनी त्यांचं हसतमुखाने स्वागत केलं. निधीला नाव विचारलं. शाळा, वर्ग, मैत्रिणींबद्दल विचारून थोडं बोलतं केलं. मग म्हणाले, ‘‘निधी, अगं तुझी ममा सांगत होती, कधी कधी रात्री झोपेत तू ‘मला पनिश करू नका, पनिश करू नका, मी वाईट मुलगी नाहीए’ असं  म्हणतेस, दचकून उठतेस. तुला कोण पनिश करतं, बेटा?’’

निधीने आईकडे बघितलं.

‘‘सांग बाळा, न घाबरता सांग.’’

‘‘पण तू तर म्हणाली होतीस की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून?’’

‘‘इतर कुणालाच नाही सांगायचं, पण हे तर डॉक्टरकाका आहेत ना? ते आपल्याला बरं करतात. त्यांना सांगितलं तर ते तुझ्या मनातली भीती दूर करतील, भीतीला हाकलून लावतील.’’ निशाने तिला प्रेमाने जवळ घेत म्हटलं.

‘‘बरं, गुड गर्ल. आता मला सांग की तुला त्या पोहणाऱ्या काकांनी त्रास दिला होता? तू वाईट मुलगी आहेस म्हणून तुला शिक्षा केली असं म्हटलं होतं?’’

निधी एकदम रडवेली झाली. ‘‘पण मी घाणेरडी मुलगी नाहीए. मी काहीच केलं नाहीए…मी…’’

‘‘हो ना बाळा, मी तेच तुला सांगतोय, तू घाणेरडी नाहीस, वाईट नाहीस, तू छानच आहेस. चांगली मुलगी आहेस. घाणेरडे अन् वाईट तर ते काका आहेत, ज्यांनी तुला त्रास दिला.’’

‘‘पण मग सुजाता मॅम पण म्हणाली की मी वाईट आहे म्हणून मला पनिश केलं,’’ निधी म्हणाली.

‘‘तुला माहीत आहे का? तुमच्या प्रिन्सिपल मॅडमने सुजाता मॅमला शाळेतून काढून टाकलंय. कारण तिने तुला ‘घाणेरडी मुलगी आहेस म्हणून पनिश केलं’ असं दटावलं अन् ‘घरी सांगू नकोस, तुझे आईवडील तुलाच रागावतील असं म्हटलं होतं. म्हणजे सुजाता मॅमलाच शिक्षा झाली. ना? आता ती शाळेत कुणाला त्रास देऊ शकणार नाही.’’

निधीला काय बोलावं ते कळेना.

‘‘बरं मला असं सांग, तू समजा आपल्या एखाद्या मैत्रिणीला मारलंस, तिला रक्त आलं तर चूक कोणाची?’’

‘‘माझी…’’

‘‘तर मग वाईट कोण?’’

‘‘मी…’’

‘‘बरोबर. पण जेव्हा त्या काकांनी तुला त्रास दिला तेव्हा तुझी चूक नव्हती. म्हणजे तू वाईट नाहीस, तर ते काका वाईट. खरं ना?’’

‘‘पण ममाने मला कुणाला काही सांगू नकोस असं का म्हटलं?’’

‘‘आई बरोबर म्हणाली, ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात ना, त्या पुन:पुन्हा बोलायच्या नाहीत. छान, छान नवं काही तरी करायचं, नवं काही तरी बोलायचं, कळलं?’’

‘‘हं!’’

‘‘तर आता निधी एक खूपच छान शहाणी मुलगी आहे. तिला कुणीही पनिश करणार नाही. ठीक आहे?’’

‘‘ओ. के.’’

‘‘निशा मॅडम, पुढल्या आठवड्यात पुन्हा एकदा या. मला खात्री आहे. आपण यशस्वी होऊ. लवकरच सगळं छान होणार आहे.’’

डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघी घरी परतल्या. त्याच रात्री दीपकचा फोन आला,  यलो लाइन इंटरनॅशनल स्कूलमध्ये सी.सी.टीव्ही लावले गेले आहेत. इतरही अनेक शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्यात येत आहेत. निशाच्या मनात आलं, आता काहीही केलं तरी निधीच्या बाबतीत घडलेली घटना बदलली जाणार नाही. खरं तर, ‘‘तुम्ही सीसी कॅमेऱ्याच्या नजरेत आहात,’’ या वाक्याला अर्थच नसतो.  ती एक तऱ्हेची जाहिरात होते. कॅमेरा आहे याची जाणीव लोकांना नको, पण कॅमेऱ्याने आपलं काम बजावायला हवं.

निधीची केस कोर्टात शेवटच्या टप्प्यात होती. वकील फार चांगला होता. त्याच्यावर जबाबदारी सोपवून दीपकही दिल्लीला ऑफिसमध्ये जॉइन झाला होता. डॉ. सुभाषच्या ट्रीटमेण्टमुळे निधी आता त्या घटनेच्या प्रभावातून बाहेर पडली होती. शाळेत तिचा परफॉर्मन्स छान होता. टीचर तिच्यावर खूष होत्या. आपापल्या ऑफिसच्या कामात निशा अन् दीपकनेही प्रमोशन्स मिळवली होती. एकूण सगळं छान चाललं होतं. पण मध्येच एक बलात्काराची बातमी पेपरला आली अन् निशाचं भावविश्व पुन्हा ढवळून निघालं.

बातमीत म्हटलं होतं की सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याचे फुटेज तपासताना त्यात काही माणसं दिसताहेत. पण त्यांचे चेहरे झाकलेले असल्याने तपासावर मर्यादा येताहेत.

अशा कॅमेऱ्यांचा उपयोगच काय? निशाने तिरमिरीत वृत्तपत्रांसाठी पत्र लिहायला घेतलं :

महोदय,

आपल्याकडे सिनेमात दाखवतात तसं किंवा एरवीही पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत येतात. तो आवाज गुन्हेगारांना पळून जाण्याचाच इशारा असतो. अपराधी तेवढ्यात निसटतो. तसेच जागोजागी असलेले सी.सी. कॅमेरे लावले आहेत, तिथे आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात असेही फलक लावले आहेत. ही सूचना गुन्हेगाराला सावध करते. त्या भागात वावरताना तो शिताफीने कॅमेऱ्याची नजर चुकवतो किंवा चेहरा अन् शरीर झाकून घेतो. मग गुन्हे घडतील अन् गुन्हेगार तावडीत न येता मोकाट फिरतील.

खटकणारी आणखी एक बाब म्हणजे, ‘आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहात’ असे फलक जागोजागी दिसतात. कुठे कॅमेरे चालू असतात तर कुठे महिनोंमहिने बंद पडलेले असतात. ते नीट करायला हवेत एवढीही जाणीव प्रशासनाला नसते. असे अर्धवट उपाय काय कामाचे? शासनाला गंभीरपणे या बाबतीत विचार करायला हवा.

पत्र लिहून तिने दिल्लीतल्या सर्वच प्रमुख व दुय्यम वर्तमानपत्रांना पाठवली. काही छापूनही आली, पण सहा महिने होऊनही बलात्काराच्या केसमध्ये आरोपी सापडले नाही. निधीच्या केसमध्येही अपराध्याला अजून शिक्षा झालेली नाही ही खंत होतीच. केसचा निकाल कधी लागेल कुणास ठाऊक.

निधी अन् शुचीने ज्युडो कराटेचा क्लास सुरू केला होता. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या संस्था आता अधिकच सक्रिय होत्या. शाळेतर्फेही मुलींच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न केले गेले होते. काळोख्या ढगाला रुपेरी किनार दिसू लागली होती.

एक धाडसी निर्णय

कथा * शकिला हुसेन

अपघाताची बातमी समजताच जुबेदाला धक्का बसला. इमरानशी लग्न होऊन फक्त तीन वर्षच झाली होती. इमरानच्या बाइकला एका ट्रकनं धडक दिली होती. घरातील सर्व लोकांबरोबर जुबेदाही हॉस्पिटलमध्ये गेली. डोक्याला जबर दुखापत झाली होती. इतरही खूप जखमा होत्या. डॉक्टर ऑपरेशन करायचं म्हणाले. त्यासाठी एक लाख रूपये हवे होते. सासऱ्यांना घेऊन जुबेदा घरी आली. एक लाखाचा चेक भरून बँकेतून पैसे काढले. परत हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिचं आयुष्य पार उध्वस्त झालं होतं. इमरान हे जग सोडून गेला होता. जुबेदा हे कळताच बेशुद्ध पडली. हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार आटोपेपर्यंत पाच सहा तास गेले.

इमरानचं शव घरी पोहोचताच शवयात्रा म्हणजे जनाजाची तयारी सुरू झाली. जुबेदा शुद्धीवर आली होती पण तिला काहीच समजत नव्हतं. तिची थोरली बहिण कहकशा तिच्याजवळ होती. तिच्या नवऱ्याबरोबर ती जुबेदाच्या घरी आली होती. बाहेर जनाजा उचलला गेला अन् आत जुबेदाच्या आत्येसासूनं लोखंडी अडकित्त्यानं जुबेदाच्या हातातल्या काचेच्या बांगड्या फोडायला सुरूवात केली. कहकशानं त्यांना अडवून म्हटलं, ‘‘का फोडताय तिच्या बांगड्या?’’

‘‘आमच्या खानदानाची रीत आहे तशी. नवऱ्याचा जनाजा उठताच त्याच्या विधवेच्या बांगड्या फोडून तिचे हात भुंडे केले जातात.’’ आतेसासू म्हणाली.

जुबेदाची अवस्था बघून कहकशा म्हणाली, ‘‘तुम्ही आधी ते लोखंडी हत्यार काढा. मी तिच्या काचेच्या बांगड्या काढून टाकते.’’

पण म्हातारी आत्येसासू हटूनच बसली. ‘‘बांगड्या फोडण्याची पद्धत असते.’’

शेवटी जरा कठोरपणे  कहकशां म्हणाली, ‘‘तुमचा उद्देश विधवेचे हात भुंडे करणं एवढाच आहे ना? मग बांगड्या काढल्या काय अन् फोडल्या काय? काय फरक पडतो?’’ तिनं जुबेदाच्या दोन्ही हातातल्या काचेच्या बांगड्या हळूवारपणे उतरवून घेतल्या अन् तिच्या सोन्याच्या दोन दोन बांगड्या तेवढ्या पुन्हा हातात घातल्या.

यावरूनही आत्येसासूनं तारांगण घातलं. पुन्हा कहकशाने त्यांची समजूत घातली, ‘‘तुमच्या घराण्यात बांगड्या फोडण्याची पद्धत आहे, हे मान्य. पण सोन्याच्या बांगड्या काही फुटणाऱ्या नाहीत. त्या फोडतही नाही कुणी, तर राहू देत ना तिच्या हातात.’’

फुणफुणंत सासूबाई गप्प बसल्या.

जुबेदाला विधवेचा वेष म्हणून पांढरा सलवार सूट घालायला लावला. मग त्यावरून एक पांढरी चादर पांघरून तिला सासूनं एका खोलीत नेऊन बसवलं. ‘‘आता तू या खोलीतून बाहेर पडायचं नाही. कारण तू आता इद्दतमध्ये आहेस (इद्दत म्हणजे पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीला साडे चार महिने एकांतवासात काढावे लागतात. या काळात ती कुठल्याही पुरूषाच्या समोर येत नाही, संपर्कात येत नाही.)’’

जुबेदालाही खरं तर एकांत हवाच होता. तिला फार मोठा मानसिक धक्का बसला होता. विश्रांतीची गरज होती. कहकशानं तिला अंथरूणावर झोपवली. ती हलके जुबेदाला थोपटू लागली. तिला समजावतही होती.

जुबेदाच्या अश्रुंना खळ नव्हता. तिला तिचे मागचे दिवस आठवत होते.

इमरान पती म्हणून खूप प्रेमळ, समजूतदार अन् हौशी होता. लग्नानंतर दोघांनीही एक महिन्याची रजा घेतली होती. हनीमून नंतरचे दिवस नातलगांकडे मेजवान्या व फिरण्यात भराभर संपले. दोघंही आपापल्या नोकरीवर रूजू झाले.

इमरान सकाळी नऊला घरातून बाहेर पडत असे. त्यानंतर जुबेदाला शाळेसाठी निघावं लागायचं. अजूनपर्यंत जुबेदाला स्वयंपाकघरात काम करावं लागलं नव्हतं. एकदाच फक्त तिनं खीर बनवली होती. आज ती प्रथमच स्वयंपाकघरात आली. तिनं भराभर पराठे तयार केले. जावेनं ऑमलेट बनवलं. नाश्ता होता होताच खूप वेळ गेला. जेवणाचा डबा करायला वेळच नव्हता. दोघंही नाश्ता करून कामावर गेले.

सायंकाळी दोघं घरी परतल्यालर जुबेदानं तिच्यासाठी व इमरानसाठी चहा केला. इतरांचा चहा आधीच झाला होता. चहा घेता घेता ती दुसऱ्या दिवशी स्वयपाक कसा, काय, केव्हा करायचा याचं प्लॅनिंग करत असतानाच सासूचा तोफखाना सुरू झाला. ‘‘सगळा दिवस घराबाहेर राहायचं. घरातली थोडी तरी जबाबदारी घ्यायला हवी ना? एकटी बिचारी रूमा काय काय करेल? दोन लहान मुलं आहेत तिला. त्यांनाही सांभाळायचं असतं. शिवाय आम्हा म्हाताराम्हातारीचं बघायचं असतं. उद्यापासून सकाळी नाश्ता आणि जेवण बनवून जात जा. समजलं का?’’

जुबेदा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली. सर्वांसाठी चहा आणि पराठे तयार केले. रूना भाभीनंही कामात मदत केली. पटकन् जुबेदानं एक भाजी चिरून फोडणीला घातली. थोड्या चपात्या करून दोघांचे लंचबॉक्स भरून घेतले. इतकी घाई केली तरी उशीर झालाच. असंच मग रोज व्हायचं. कधी वरण शिजवायला वेळ कमी पडायचा. कधी सर्वांसाठी चपात्या करायला जमायचं नाही. त्यातल्या त्यात सगळं नीट व्हावं हा प्रयत्न करायची तरीही दर दोन दिवसांनी सासूचं लेक्चर ऐकावं लागायचंच. शेवटी इमराननं एक स्वयंपाकीण स्वयंपाकासाठी नेमली. तिचा पगार जुबेदा द्यायची. आता जुबेदा अन् रूना दोघींनाही बराच रिलीफ मिळाला. सकाळचा चहा, नाश्ता व ऑफिस, शाळेचा डबा दोघी मिळून करायच्या. सकाळ सांयकाळचा स्वयंपाक बाई करायची. त्यामुळे आयुष्य खूपच सुकर झालं होतं.

प्रॉब्लेम असा होता की सासू अत्यंत जुनाट विचारांची होती. तिला जुबेदाच्या नोकरीमुळे येणारा पैसा तर हवा होता, पण जुबेदाची नोकरी मात्र आवडत नव्हती. सासऱ्यांची सर्व पेंशन तिच्या हातात असायची. स्वत:साठी ती भरपूर पैसा खर्च करायची. घरखर्चाला मात्र पैसे देणे तिला नको वाटे. सतत पैशाच्या नावानं रडगाणं गायची. इमरान आणि सुभान घराचा खर्च बरोबरीनं करायचे. जुबेदा सणावाराला घरातील सर्वांसाठी फळफळावळ, मिठाया वगैरे आणायची. प्रत्येकासाठी त्याला आवडेल, उपयोगी पडेल अशी भेटवस्तू आणायची. त्यावेळी सासू खूष असायची. तरीही जुबेदाला घालूनपाडून बोलण्याची एकही संधी ती सोडत नव्हती.

जुबेदा नाजुकशी आणि सुंदर होती. शिक्षित कमावती होती. इमरान तर तिच्यावरून जीव ओवाळून टाकायचा तेच अम्माला आवडत नसे.

जुबेदाला सर्व कळत होतं. पण इमरानच्या प्रेमापुढे तिला इतर सर्व त्रास विसरायला व्हायचा. ती त्याच्या संगतीत सुखी व आनंदी होती. सासूला कधी एका शब्दानं उलटून बोलत नसे. जावेशीही प्रेमानं वागे, तिला यथायोग्य मान देई. रूना तशी बरी होती, पण जुबेदाचं सौंदर्य, शिक्षण, नोकरीमुळे हातात असणारा पैसा, आत्मविश्वास यामुळे तिच्या मनात ईर्शा असायची. ती मनातून तिचा हेवा करायची. कारण सुभानकडून तिला अगदी मोजकाच पैसा खर्चासाठी मिळायचा.

आता अम्मानं एक नवाच सूर लावला होता. लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. अजून मूळबाळ नाही झालेलं, यात जुबेदाचा काहीच दोष नव्हता पण सासू सतत घालून पाडून बोलायची. अपमान करायची. ‘‘रूनाला पाच वर्षांत दोन मुलं झाली. ही एक दुल्हन बघा…वांझ आहे की काय. वाळलेल्या खोडासारखी…फळ नाही, फूल नाही…घरात मुलं खेळायला हवीत. त्याशिवाय घराला शोभा नाही.’’

सासूनं स्वत: कधी रूनाची मुलं सांभाळली नव्हती. तिला मदतही करत नव्हती. व्यवस्थित थोडं फार शिवण केलं तर किंवा मुलांनी खूपच आग्रह केला तर त्यांच्यासाठी एखाद्या खास पदार्थ शिजवणं या व्यतिरिक्त ती काहीही करत नसे. सगळा वेळ शेजारी पाजारी कुचाळक्या करण्यात अन् फुकटचे सल्ले देण्यातच जायचा.

अम्माचे टोमणे ऐकून इमरानही कंटाळला. तो जुबेदाला घेऊन एक्सपर्ट डॉक्टरकडे गेला. दोघांची संपूर्ण तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी निर्वाळा दिला. ‘‘दोघंही पूर्णपणे निरोगी आहेत. काहीच प्रॉब्लेम नाहीए. मूल नक्की होईल, उगीच टेन्शन घेऊ नका.’’

दोन महिने अम्मा बरी शांत होती. मग पुन्हा एक नवा राग आळवायला सुरूवात झाली. ‘करामत पीर’कडे जायचं. त्या पीराचा एक एंजट अधूनमधून अम्माकडे यायचा. आपल्या परीनं पीर बाबांचा महिमा समजावून सांगायचा. दरवेळी अम्माकडून भरपूर पैसे पीर बाबाचा ‘चढावा’ म्हणून घेऊन जायचा.

अम्मा सतत ‘करामती पीर’ची पिरपिर चालू ठेवायची. जुबेदा लक्ष देत नसे. दुर्लक्ष करायची.

त्यादिवशी कसली तरी सुट्टी होती. सगळे घरीच होते. सकाळच्या ब्रेकफास्टनंतर लॉनमध्ये बसून घरगुती गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात अम्मानं हुकुम दिला, ‘‘चल, जुबेदा, पटकन आवर. आज आपण करामती पीरबाबाकडे जाऊयात. खूप दिवस सहन करतेय तुला मूल नसणं. पीरबाबा एक ताईत देतील. त्यामुळे तुला मूल होईल. आज तुला चलावंच लागेल.’’

हलक्या आवाजात जुबेदानं म्हटलं, ‘‘अम्मा, माझा विश्वास नाहीए या सगळ्यावर. मुख्य म्हणजे पीरबाबा ताईत देतील, मला मूल होईल यावर तर अजिबातच विश्वास नाहीए माझा.’’

हे ऐकताच अम्माचा पारा एकदम चढला. संतापून ती किंचाळायला लागली, ‘‘या शिकलेल्या मुलींचा हाच आडमुठेपणा आवडत नाही मला. आता या शहाण्या पोरीचा पीरबाबावर विश्वास नाहीए. अगं, त्या शेजारच्या सकीनाला, पीरबाबाकडे गेल्यामुळेच दिवस राहिलेत. त्या सलामत मुलीला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं, तिलाही पीरबाबांमुळे मुलं झालीत. बाबाचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे तो जे ताईत देतो त्यानं हमखास मुलगाच होतो. तू चल, तुलाही होईल.’’

आता जुबेदा जरा ठामपणे म्हणाली, ‘‘अम्मा माझा जर विश्वासच नाहीए या गोष्टींवर तर मी का जायचं? माझ्या मते तो सगळा भोंदूपणा आहे. डॉक्टरांनी खात्री दिलीय की माझ्यात दोष नाहीए. मला मूल नक्की होईल तर मी इतरांचं का ऐकू? तुमच्या आग्रहामुळेच आम्ही दोघं डॉक्टरला भेटून, सर्व तापसण्या करून आलो ना? शेवटचं सांगते, पीरबाबाकडे जाणार नाही.’’

अम्मानं रागानं इमरानकडे बघितलं. तो प्रेमानं अन् शांतपणे अम्मीला म्हणाला, ‘‘अम्मी, माझाही विश्वास नाहीए या सगळ्यांवर. जुबेदावर मी अजिबात बळजबरी करणार नाही. तिला नकोय तर तिला नेऊ नकोस.’’

झालं! अम्माला तर अश्या मिरच्या झोंबल्या. इमरान-जुबेदा एकीकडे आणि अख्ख कुटुंब एकीकडे. सगळेच ओरडू लागले. शिव्या देऊ लागले. जुबेदा उठली अन् आपल्या खोलीत जाऊन तिनं दार लावून घेतलं. सगळेच तिच्याशी अबोला ठेवून होते. एकट्या इमरनाचा आधार होता. जुबेदा बराच वेळ शाळेत घालवायची. घरात मूकपणे तिची ठरलेली कामं करायची. उरलेला वेळ आपल्या खोलीत वाचन करायची. पण तिनं एका शब्दानं कुणाला प्रत्युत्तर दिलं नाही. मुकाट्यानं सगळं सहन केलं. दीड दोन महिन्यांत पुन्हा सर्व वातावरण पूर्वीसारखं झालं. दिवस रात्रीचं चक्र सुरूच होतं…

कहकशानं जुबेदासाठी गरम दूध आणलं होतं. आपल्या विचारातून जुबेदा भानावर आली. कहकशानं तिला दूध आणि ब्रेडच्या दोन स्लाइस बळेबळे खायला लावल्या. दोन दिवस नातेवाईक जेवण पाठवत होते. घरात स्वयंपाक होत नव्हता.

तिसऱ्या दिवशी सियूम होता (मृत्यूनंतरचा तिसरा दिवस). त्या दिवशी घरी स्वयंपाक होतो. सगळे नातलग व मित्र आणि परिचित जेवण करतात. सियूमचा कार्यक्रम खूपच दणक्यात झाला.

सगळा दिवस जुबेदाला त्या सर्व लोकांच्या गराड्यात बसून काढावा लागला. पुन्हा पुन्हा इमरानचा एक्सिडेंट, त्याचा मृत्यू, त्याच्या जखमा, रडणं, त्याला मूल नसण्याचे उल्लेख, तिच्याबद्दलची खोटी सहानुभूती. सियूमच्या भव्यपणाची, उत्तम स्वयंपाकाची प्रशंसा…या सगळ्यांमुळे जुबेदा फार वैतागली. थकून गेली. तिला वाटत होतं की इथून कुठंतरी दूर पळून जावं.

तिला विश्रांतीची गरज आहे हे कहकशाच्या लक्षात आलं. ती जुबेदाला तिच्या खोलीत नेऊ लागली तशी सासू कडाडली, ‘‘अजून तिला इथंच बसू देत. आज पूर्ण दिवस बायका पुरसा द्यायला (सहानुभूती दाखवायला) येतील. तिनं इथंच बसायला हवं.’’

‘‘तिला घेरी येतेय. तिला बसवत नाहीए. मी तिला खोलीत नेते. थोडी पडली की बरं वाटेल तिला.’’ कहकशांनं नम्रपणे म्हटलं.

त्यानंतर एक महिन्याने फारोहा झाली. फारोहा म्हणजे जवळचे नातेवाईक पक्वान्नांचं जेवण आयोजित करतात. या कार्यक्रमालाही पन्नाससाठ लोक होतेच. खर्च भरमसाट होत होता. जुबेदा मुकाट्यानं बघत होती.

कहकशा त्यानंतर स्वत:च्या घरी गेली. सियमनतंर ती घरी गेली अन् फारोहाच्यावेळी पुन्हा आली. धाकट्या बहिणीची तिला काळजी वाटत होती.

इमरानला जाऊन आता सव्वा महिना झाला होता. त्या दिवशी पांढरा सूती सलवार सूट घालून जुबेदा शाळेत जायला तयार झाली. तिला बघून सासू व आत्येसासू गळा काढून रडायला लागल्या. तिला दूषणं देऊ लागल्या. ‘‘किती नालायक आहे, कसली अवलक्षणी आहे…इद्दत अजून पूर्ण झाली नाही अन् घराबाहेर पडते आहे.’’

सगळा कालवा ऐकून सासरे व थोरला दीरही वाट अडवून उभे राहिले. सासरे म्हणाले, ‘‘तू शाळेत जाऊ शकत नाहीस. घराबाहेर पडायची परवानगी नाहीए. मी मौलाना साहेबांना बोलावतो. तेच तुला समजावून सांगतील.’’

मौलाना आले. जुबेदाला एका पदद्याआड बसवलं गेलं. कहकशाही तिच्याजवळ बसली. मौलानांनी एक मोठं भाषण झाडलं, त्याचा मथितार्थ असा, ‘‘पति निधनानंतर स्त्री साडेचार महिने कुणाही बाहेरच्या पुरूषाच्या संपर्कात यायला नको. तिचं कुणा बाहेरच्या पुरूषाशी संभाषण नको. भडक, रंगीत कपडे घालायचे नाहीत. खोलीबाहेर पडायचं नाही.’’

मौलानांचं बोलणं ऐकून सर्वांनाच चेव आला. सगळेच एकदम बोलू लागले. पाच मिनिटं सर्वांना बोलू दिल्यावर जुबेदानं कडाडत्या आवाजात म्हटलं, ‘‘एक मिनिट! मला काही सांगायचंय, ते नीट ऐकून घ्या.’’

खोलीत तिच्या आवाजानं एकदम शांतता पसरली. जुबेदा म्हणाली, ‘‘मौलाना साहेब, मी जगातील सर्वात प्रसिद्धा अन् जाणत्या आलिमना आणि इस्लामचे फार मोठे स्कॉलर यांना यू ट्यूबवर प्रश्न केला होता की इद्दतच्या काळात स्त्री घराबाहेर पडू शकत नाही का? त्यांनी जे उत्तर दिलं ते मी रेकॉर्ड करून ठेवलंय. तुम्ही ही ऐका. उत्तर असं आहे, ‘‘अगदी नाईलाज असेल तर स्त्री घराबाहेर पडू शकते. काही सरकारी किंवा कोर्टाचं काम असेल तरीही तिनं बाहेर पडायला हरकत नाही. जर ती स्वत: कफील असेल (कमवती/नोकरी करणारी) तर तिला बाहेर जायची परवानगी आहे. बुरखा पांघरून स्त्री घराबाहेर पडू शकते. त्या परिस्थितीत तिला साडे चार महिन्यांची इद्दत पूर्ण करणं गरजेचं नाहीए.

आलिम साहेबांचं हे वक्तव्य ऐकून एकदम शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही.

पडद्याआडून अत्यंत मर्यादशीलपणे पण पूर्ण आत्मविश्वासाने जुबेदा बोलली. ‘‘तुम्ही सर्वांनी आलिम साहेबांचा फतवा ऐकलाच आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मला नोकरीसाठी बाहेर पडायला परवानगी आहे. माझा सरकारी नोकरी आहे. सव्वा महिन्याची रजा मला मिळाली होती. आता घरी राहणं शक्य नाही. गरज म्हणून आणि नाइलाज म्हणून मला नोकरीसाठी घराबाहेर पडावंच लागेल. माझी शाळा मुलींची शाळा आहे. तिथं प्रिसिंपलपासून शिपाईदेखील महिलाच आहेत. तेव्हा पुरूषांशी माझा संबंध येतच नाही. आलिम साहेबांच्या बयानानुसार मी नोकरीवर जाऊ शकते.’’

इतक्या मोठ्या माणसाच्या हुकुमाचा अनादर करणं मौलवींनाही शक्य नव्हतं. ते गप्प झाले. इतरही सर्व गप्प बसले. त्याच दिवशीपासून जुबेदानं बुरखा घालून घराबाहेर पडायला सुरूवात केली. शाळेत तिचा वेळ छान जायचा. विद्यार्थ्यांमध्ये ती लोकप्रिय होती. स्टाफ व प्रिंसिपल तिला समजून घेत होते. तिच्या हिंमतीचं कौतुक करत होते. घर व शाळा दोन्ही आघाड्यांवर आता शांतता होती.

एक दिवस जुबेदा शाळेतून परतली, तेव्हा रूना भाभीचा चेहरा उतरलेला होता. डोळे रडून रडून सुजले होते. तिनं रूनाला काय झालं म्हणून विचारलं तर तिनं उत्तर दिलं नाही. पण त्या दिवसानंतर रूनानं जुबेदाशी बोलणंच बंद केलं. काय घडलंय ते जुबेदाला समजत नव्हतं. शेवटी एकदाचं सगळं उघड झालं. तो सुट्टीचा दिवस होता. ती सकाळचा नाश्ता आटोपून भाजी चिरत होती. त्यावेळी अम्मानं विषय काढला. ‘‘हे बघ जुबेदा, तू खूप लहान वयात विधवा झाली आहेस. तुझं वय फक्त सत्तावीस वर्षांचं आहे. पहाडासारखं आयुष्य समोर आहे. कुणा पुरूषाच्या आधाराविना तू हे आयुष्य कसं काढू शकशील? आम्ही काय आज आहोत, उद्या नसू. हे जग फार वाईट आहे. तरूण सुंदर विधवेला सुखानं जगू देणार नाही. लांडग्यासारखे लोक टपलेले असतात. माझं म्हणणं ऐक अन् दुसरं लग्न करून घे.’’

मनातला संताप आवरत जुबेदानं शांतपणे म्हटलं, ‘‘अम्मा, माझ्या लग्नाचं सोडा, तुम्ही हीनाच्या (नणंदेच्या) लग्नाची काळजी करा. तिचं लग्नांचं वय होतंय.’’

सासू गोडीत म्हणाली, ‘‘जुबेदा, अगं आम्ही तिच्या लग्नाचं बघतोच आहोत. पण तुझ्यासाठी तर घरातच मुलगा आहे ना? सुभान आहे ना? इमरानहून तीन चार वर्षच मोठा आहे तो. आपल्या धर्मात पुरूषाला चार बायका करण्याचा अधिकार आहेच आणि भावाच्या विधवेशी लग्न करणंही धर्मसंमत आहे. तुलाही त्याचा आधार होईल. मी सुभानशी बोलले आहे. तो तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. फक्त तू हो म्हण.’’

जुबेदा एकदम संतापलीच. ‘‘अम्मा, किती वाईट बोलताय तुम्ही? मला हे अजिबात मान्य नाही. सुभानभाईंकडे मी नेहमीच माझा मोठा भाऊ म्हणून बघत आले आहे. तेच नातं मी जपणार आहे. रूना भाभीचा संसार उध्वस्त करण्याचं पाप मी करणार नाही. त्यांचा सुखाचा संसार का म्हणून मोडायचा? यापुढे पुन्हा हा विषय काढू नका.’’ काम तसंच टाकून ती खोलीत निघून गेली. तिनं दार आतून लावून घेतलं. तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता. सासूचे शब्द पुन:पुन्हा डोक्यात घण घातल्यासारखे आदळत होते. ‘‘सुभान तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.’’ त्याला काय? सुंदर, कमी वयाची, कमावती बायको मिळाली तर तो नाही कशाला म्हणेल? हलकट कुठला, लाज नाही वाटत हो म्हणायला?

रूनासारखी समर्पित बायको, दोन गोजिरवाणी मुलं असताना पुन्हा लग्न का करावंसं वाटतं? रूना भाभी तिच्याशी का बोलत नव्हती, ते तिला आता समजलं. तिच्या आणि सुभानच्या लग्नाच्या गोष्टी ऐकून ती बिचारी दुखावली होती. घाबरलीही होती. इमरान गेल्यावर घरखर्च आता सुभानवरच होता. बेताचा पगार…त्यामुळे त्याची नजर जुबेदाच्या पगारावर असणार. काही वर्षात फ्लॅटही तयार होईल. त्यावरही हक्क सांगता येईल. तिला खरं तर सुभानची दयाच आली. कसा माणूस आहे हा? आईनं काहीही म्हटलं की मान डोलावतो…तिनं त्या क्षणी निर्णय घेतला. ती लग्न करणार नाही. आता तिला खूप विचारपूर्वक पुढलं पाऊल उचलावं लागणार आहे. कारण या लग्नामुळे या लोकांचा खूपच फायदा होणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करायची त्यांची तयारी असेल. सारा दिवस, सारी रात्र ती विचार करत होती.

शाळेच्या प्रिंसिपल मॅडमचा जुबेदाला खूप आधार वाटायचा. त्या अत्यंत हुशार, कर्तबगार, दूरदर्शी अन् सर्वांना समजून घेणाऱ्या होत्या. जुबेदाविषयी त्यांना खूपच सहानुभूती आणि आत्मियता होती. जुबेदानं त्यांना आपली अडचण सांगितली आणि त्यांचा सल्ला मागितला. थोडा विचार करून त्या म्हणाल्या, ‘‘मला वाटतं सध्या काही दिवस तू या सर्व लोकांपासून दूर रहावंस हे उत्तम. त्यामुळे तू हे नको असलेलं लग्न टाळू शकशील. आपल्या इथून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात एक खूप छान मुलींची शाळा उघडली आहे. त्यांना तरूण, उत्साही शिक्षिका हव्या आहेत. तिथली प्रिंसिपल माझी कलीगच होती. तुला होस्टेल वॉर्डनचा विशेष पगार, राहायला क्वार्टर आणि जेवायला मेसची व्यवस्था असेल. समवयस्क टीचर्सही भेटतील. तुझ्या हुशारीला तिथं वाव मिळेल. मी तुझं नाव सुचवते त्यांना. सोबत एक पत्रही देईन. तीन चार वर्षांनी तू ट्रान्सफरही मागू शकशील. विचार कर आणि मला सांग.’’

जुबेदाला ही कल्पना पटली. तिनं बहिणीचा सल्ला घेतला. तिनंही संमती दिली. तिनं लगेच होकार कळवला. प्रिसिंपलनं ट्रान्सफर फॉर्म मागवला. जुबेदाकडून भरून घेतला. उत्तम रिपोर्ट देऊन योग्य त्या विभागात पाठवालाही गेला.

कहकशालाही हा लग्नाचा विषय अजिबात आवडला नव्हता. म्हणूनच इथून जाण्याचा विचार तिनं उचलून धरला. तिनं म्हटलं, ‘‘जुबेदा, तुझी जॉइनिंग ऑर्डर आल्याबरोबर मला कळव. मी अरशदबरोबर येईन अन् कारनं तुला तुझ्या मुक्कामी सोडून, तुझं सामान तिथं बसवून आम्ही परत येऊ.’’

जुबेदानं ही सगळी योजना अगदी गुप्त ठेवली होती. शाळेतही याबाबत फारसं कुणाला ठाऊक नव्हतं. घरात ती अगदी नॉर्मल वागत होती. तिला बरोबर फारसं सामानही न्यायचं नव्हतं. कपड्यांची एक सूटकेस, महत्त्वाची कागदपत्र अन् इतर काही सामान अशा दोन सूटकेसेस तिनं भरून घेतल्या होत्या. पंधरा दिवसात तिची ट्रान्सफर ऑर्डर आली. शाळेनं तिला रिलीव्ह केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच कहकशा अन् अरशद गाडी घेऊन आले. नाश्ता आटोपल्यावर तिनं सासूसासऱ्यांना बदलीविषयी सांगितलं. शाळेच्या प्रिंसिपलही आल्या होत्या. त्यांनीही तिला आजच निघायला हवं, उद्या जॉइन करायचंय हे पटवून दिलं.

ट्रान्सफरबद्दल ऐकून सगळेच दचकले. शॉकच बसला. सुभान म्हणाला, ‘‘ तू जाऊ नकोस, मी पैसे वगैरे देऊन ही बदली रद्द करून घेतो. माझ्या ओळखी आहेत.’’

सासूसासरेही समजूत घालू लागले. पण तिनं शांतपणे सांगितलं, ‘‘मला प्रमोशन मिळालंय. तिथं अगदी सुरक्षित वातावरण आहे. माझा निर्णय ठाम आहे. तुम्ही काळजी करू नका.’’

जुबेदाला ठाऊक होतं, हा निर्णय तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे. एक घाव की दोन तुकडे. उगीच भिजत घोंगडी घालायची नाहीत. तिचा आत्मविश्वास अन् शांत संयमी वागणं बघून सगळे चकित झाले होते.

रूना भाभीची गळाभेट घेऊन तिनं म्हटलं, ‘‘भाभी, तुम्ही माझ्याबद्दल फार चुकीची कल्पना करून घेतली. तुमचा संसार मी कधीच उधळणार नव्हते. मीही एक स्त्री आहे. तुमची व्यथा वेदना मी समजू शकते. मी आता इथून दूर जाते आहे तुम्ही आनंदात राहा.’’

‘‘मला क्षमा कर जुबेदा. माझं फार चुकलं. पण तुझं एकटेपण मलाही कळतंय गं!’’

माझी काळजी करू नका भाभी. मी कामात स्वत:ला गुंतवून घेईन. नवं काही शिकेन. तिथं खूप लोकांच्या संपर्कात असेन अन् मी लग्नच करणार नाही असंही नाही, पण मला समजून घेणारा, सहकार्य करणारा चांगला कुणी भेटला तरच मी लग्नाचा निर्णय घेईन. सध्या तरी मी नव्या कामावर मन केंद्रित करणार आहे. मला खात्री आहे की मला चांगला जोडीदार नक्कीच मिळेल.

सगळ्यांचा निरोप घेऊन जुबेदा आयुष्याच्या नव्या वाटेवर आत्मविश्वासानं चालू लागली. एक सुंदर आयुष्य तिची वाट बघत होतं.

पळस

कथा * प्रियंवदा

वाईट चालींची, चरित्रहीन, रखेल अशी विशेषणं तिच्यासाठ वापरली जात होती. ते ऐकून अर्पिता अवाक् झाली. ही धरती दुभंगावी अन् आपण त्यात लुप्त व्हावं, अशा जागी लपावं जिथं कुणी तिला बघू शकणार नाही, नातलग तर कुजबुजतंच होते पण शलभच्या पत्नीनंही तिच्यासाठी असे अपशब्द वापरावेत? ती तर अर्पिताची खास मैत्रीण होती…तरीही तिनं असं म्हणावं?

अर्पिताचं नांव शलभच्या नांवाशी जोडलं गेलं होतं. त्यांचे संबंध अनैतिक आहेत हे बोललं जात होतं भरल्या कंठानं तिनं शलभला विचारलं, ‘‘आपलं नातं अनैतिक आहे असं म्हणतात, खरंय का ते? कारण तुमचं लग्न झालंय. विवाहित आहात तुम्ही. त्यामुळे मला तुमच्याबरोबर राहण्याचा हक्क नाहीए. पण इथून मला इतरांनी तुमची रखेल म्हणावं?’’

शलभला काट्यासारखा टोचला होता हा प्रश्न, अर्पिताचे अश्रू अखंड वाहत होते. रडता रडताच म्हणाली, ‘‘इतकी बेअब्रू झाल्यावर आता माझ्याशी कोण लग्न करेल?’’

तिला दिलासा देत शलभनं म्हटलं, ‘‘मी शोधेन तुझ्यासाठी मुलगा. तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी.’’

‘‘माझ्याशिवाय तुम्ही राहू शकाल?’’

अर्पिताच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी शलभनं तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून तिला थोपटायला सुरूवात केली. थोड्याच वेळात अर्पिताला गाढ झोप लागली. तिच्या निरागस चेहऱ्याकडे शलभ बघत होता. अजूनह गालावरचे अश्रू सुकले नव्हते. अर्पिताच्या अनेक आठवणी त्याच्या मनांत जाग्या झाल्या. समुद्राच्या लाटांसारख्या असताता आठवणी. उंचबळून येतात अन् परत जाताना, भरून न येणारं एकाकीपण, विचित्र रिकामपण मागे ठेवून जातात.

अर्पिता नात्यानं शलभची कझिन होती, वयानंही त्याच्याहून बरीच लहान होती. ते अंतर त्यांच्या आवडी-निवडी, बोलणं, वागणं यातूनही जाणवायचं. शलभला लहानपणी बघितलेली अर्पिता आठवत होती. अर्पिताला शलभ अजिबातच आठवंत नव्हता.

अर्पिताच्या आयुष्यात चढउतार खूप होते. आई वारल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं. अर्पिता आजोळी राहू लागली. आयुष्य खडतर होतं. त्यातूनच ती शहाणी होत गेली. पण स्वभावात त्या कडवट आठवणींचा ठसा उमटलाच.

किती तरी वर्षांनी अर्पिता शलभला भेटली. तो तिला अजिबात परका वाटला नाही, उलट इतर कुणाबद्धल वाटला नव्हता तो आपलेपणा, जिव्हाला त्याच्याबद्धला वाटला.

काही दिवसातच तिला तो इतका जवळचा वाटू लागला की तिनं लहानपणापासून ज्या मुलांवर प्रेम करत होती, ते प्रेमप्रकरणही शलभला सांगितलं. दोघांना लग्न करायचंय पण घरातले तयार नाहीत हेदेखील तिनं शलभला सांगितलं.

‘‘तो मुलगा मुस्लिम आहे. त्याचं नाव आसिफ आहे. तो दिल्लीला नोकरी करतो. मीही नोकरी करेन, पेइंगगेस्ट म्हणून दिल्लीत राहणं सोपं आहे. कोर्टात रजिस्टर लग्न करूनच मग घरी सांगू.’’ एका दमात तिनं शलभला सांगितलं. ‘‘तुम्ही मला दिल्लीला घेऊन चला,’’ तिनं शलभला म्हटलं.

शलभनं तिला खूप समजावलं पण अल्लड वय अन् प्रेमात वेडं झालेलं मन…तिची समजूत पटेना.

त्यावेळी शलभला दिल्लीलाच पोस्टिंग मिळालं होतं. चांगली कंपनी, चांगली नोकरी, सुखी कौटुंबिक आयुष्य…अर्पिताच्या घरात शलभच्या नोकरीचा, वडिलकीचा दबदबा होता. तिच्या आईवडिलांना त्यानं समजावून सांगितलं. तिच्या भविष्याचा विचार करून त्यांनी परवानगीही दिली.

अर्पिता आनंदानं खुलून आली. आसिफला भेटायला ती शलभबरोबर दिल्लीला आली. अर्पिताची सगळी जबाबदारी तिच्या वडिलांनी शलभवर टाकली होती. त्यानंही ती आनंदानं स्वीकारली होती.

दिल्लीला पोहोचल्यावर शलभनं तिला पी.जी. म्हणून जागा मिळवून दिली. जवळच्याच एका स्टोअरमध्ये नोकरीही मिळाली. लवकरच अर्पिता दिल्लीच्या अतिशय धावपळीच्या आयुष्यात रूळली. तिला ते आयुष्य आवडायला लागलं. रविवारी आसिफ यायचा. मग दोघं बाहेर फिरायची, कधी सिनेमा, कधी जेवण, कधी भटकंती नंतर आइस्क्रीम.भराभर दिवस जात होते.

मार्च महिना आला. पळसाच्या झाडांवर लाललाल फुलांनी रंगोत्सव मांडला. लहानपणापासून अर्पिताला ही फुलं फार आवडायची. लाल रंग तिचा आवडता होता. गावी तिच्या घरासमोर पळसाची झाडं होती. दिल्लीत कुठंही पळस फुललेला दिसला की तिला घरीच असल्यासारखं वाटायचं.

होळीचा सण काही दिवसांवर आला. होळी झाली की ती आसिफबरोबर रजिस्टर लग्न करणार होती. तसा फॉर्मही त्यांनी भरला होता. पण घडलं वेगळंच. होळीच्या दोन दिवस आधी अर्पिता आजारी असल्याचा निरोप शलभला मिळाला. शलभ तिच्या निवासस्थानी गेला तेव्हा अर्पिता तापानं फणफणली होती.

अर्पिताच्या दोघी रुममेट्सनी शलभला सांगितलं की आसिफनं रजिस्ट्रार ऑफिसमध्ये फॉर्म भरल्यानंतर अर्पितावर धर्म बदलण्यासाठी खूपच दबाव आणला. धर्म बदलणार नाही म्हटल्यावर त्यानं हे लग्न होऊच शकत नाही असं सांगून अर्पिताशी संबंध तोडले अन् तो दिल्ली सोडून कुठंतरी निघून गेलाय. जे स्वप्न डोळ्यात घेऊन अर्पिता दिल्लीला आली होती, ते स्वप्न उधळलं गेलं होतं. कल्पनेच्या भराऱ्या घेताना पंखच मोंडले होते. रक्तबंबाळ झाले होते.

पी.जी.च्या मालकांची परवानगी घेऊन शलभ रात्रभर तिथेच थांबला. त्यानं तिच्या वडिलांशी संपर्क केला. तिला परत घरी पोहोचवू का म्हणून विचारलं पण त्यांनी, ‘‘आता काय ते तुम्हीच बघा,’’ म्हणून हात झटकले. सकाळी शलभनं अर्पिताला आपल्या फ्लॅटवर आणलं. इथं तो एकटाच राहत होता. त्यानं अर्पिताच्या सेवेसाठी एक नर्स ठेवली. त्याच्या ऑफिसच्या वेळ व्यतिरिक्त तो अर्पिताची काळजी घ्यायचा. अर्पिताला मानसिक धक्का फारच जबर बसला होता. इतक्या वर्षांचं प्रेम केवळ धर्मावरून संपू शकतं? आसिफ असा विश्वासघात करू शकतो हेच तिच्या गळी उतरत नव्हतं. जात किंवा धर्म प्रेमाच्या आड का यावा, हे तिच्या बुद्धीला उमजंत नव्हतं.

शलभनं तिची परोपरीनं समजूत घातली. मानसिक धक्क्यातून सावरायला त्यानं खूपच मदत केली. शारीरिक अन् मानसिक आजारातून पूर्ण बरी झाल्यावर शलभनं त्याच्याच ऑफिसात नोकरीही लावून दिली. अर्पितानं आता शलभच्या घराची जबाबदारी स्वत:वर घेतली. सकाळी उठून चहा, ब्रेकफास्ट तयार करणं, दोघांचे डबे तयार करणं, ऑफितून आल्यावर रात्रीचा स्वयंपाक अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये तिनं स्वत:ला गुंतवून घेतलं.

बरेचदा शलभला ऑफिसात उशीरापर्यंत थांबावं लागे. घरी यायला उशीर होई. अर्पिता तो घरी येईपर्यंत जागी राहून त्याचं जेवण गरम करून वाढायची. रात्री कधी कधी भयानक स्वप्नं पडून तिला जाग यायची. घाबरून ती आपल्या खोलीतून शलभच्या अंथरूणात येऊन झोपायची. शलभ तिला थोपटून शांत करायचा.

अर्पिताच्या आयुष्यातला तो अवघड काळ शलभच्या आधारावरच पार पडला. अशा काळातच काही नवी नाती तयार होतात तर काही जुन्या नात्यांना तडे जातात. तीन चार महिनेच झाले होते. पण त्यांना वाटायला लागलं जणू जन्मोजन्मीची ओळख आहे. एकमेकांचे चेहरे बघूनच त्यांना एकमेकांच्या मन:स्थितीची कल्पना यायची. शलभनं हल्ली आपल्या गावी जाणं खूपच कमी झालं होतं. कधी गेलाच तर परतीचं रिझर्वेशन अर्पिता आगाऊ करवून घेत होती.

अर्पिता आणि शलभची जवळीक वाढत होती अन् बायकोबरोबरचं शलभचं नातं खूपच बिघडलं होतं. शलभची वागणूक, त्याचं अर्पिताबरोबर असणं, बायकोला सहन होत नव्हतं. ती प्रचंड चिडचिड करायची. तिला घटस्फोट देऊन अर्पिताशी लग्न करावं असंही शलभच्या मनांत आलं होतं. पण मुलाचा लोभस, निरागस चेहरा डोळ्यापुढे यायचा. त्याचं वडिलांवर जिवापाड प्रेम होतं.

दोन्ही घरात, नातलगांमध्ये कुजबुज सुरू झाली. कुजबुज हळूहळू वाढली अन् शलभवर आरोप व्हायला लागले. शलभचं शांत सुखी आयुष्य ढवळून निघालं. नात्यांच्या अग्नीपथावरून चालताना पाय भाजून फोड येणं स्वाभाविकच होतं. पण ते फोड इतक्या यातना देतात हे दोघांना आता जाणवायला लागलं.

शलभ विचारातून भानावर आला. अर्पिताचं डोकं मांडीवरून खाली उशीवर ठेवलं. पाय मोकळे करायला बाल्कनीत येऊन उभा राहिला. आकाशात प्रभात समयीची लाली दिसत होती. जणू पळसाची फुलं कुसकरून उधळली असावीत. समोरचं पळसाचं झाड निष्पर्ण होतं. पण फुलांनी डवरलं होतं. जणू जुनी नाती तोडून नवी नाती निर्माण झाली होती.

आता शलभवर अर्पिताच्या लग्नाची आणखी एक जबाबदारी येऊन पडली होती. त्यानं मनापासून प्रयत्न केले अन् ओळखीतलाच एक मुलगा तिच्यासाठी निवडला. ऑफिसातल्या सहकाऱ्याचा घाकटा भाऊच होता. मुलाला अन् घरच्यांना अर्पिता पसंत पडली अन् लग्न ठरलं.

शलभची बायको चिडलेली होती. शलभला एकट्यालाच सर्व खर्च व तयारी करायची होती. तो आपल्या परीनं सगळं करत होता. सावत्र आई व वडीलही अर्पिताच्या लग्नाला येणार नव्हते. खर्चही करणार नव्हते. वनमॅन आर्मी बनून शलभ सगळ्या आघाड्या लढवंत होता.

आता नवं नातं जपायचं म्हणून अर्पिताही शलभपासून दूर राहत होती. अर्पितासाठी, अर्पितामुळे शलभनं घरच्या मंडळींशी, बायकोशी संबंध तोडले होते अन् तीच अर्पिता आता त्याला दुरावली होती. आता ती रात्री त्याच्यासाठी जागत नव्हती. सकाळीही मुकाट्यानं चहाच कप त्याच्यासमोर ठेवत होती.

पुन्हा नवा ऋतू येऊ घातला होता. वातावरणांत बदल जाणवंत होता. शलभला खूपच एकाकी वाटत होतं. अर्पिताचा नवा संसार, नवं आयुष्य सुरू होतंय म्हणून समाधान अन् आनंद होता. पण इतर नाती तुटल्याचं दु:खही होतं. शेवटी लग्नाचा दिवसही. विवाहाचे सर्व विधी पूर्ण झाले. अर्पिताच्या डोळ्यात अश्रू होते. तिला रडूं अनावर झालं. शलभचं घर तिनं मनापासून सजवलं होतं. भिंतींचा रंग, दाराखिडक्यांचे पडदे, सर्व तिच्या पसंतीचं होतं. बाल्कनीतल्या छोट्याशा बागेत तिनंच लावलेली फुलझाडं डोलंत होती. अश्रूभरल्या डोळ्यांनी अर्पितानं सगळं मनांत साठवून घेतलं. आता या घरातून तिची पाठवणी झाल्यावर पुन्हा ती इथं येणार नव्हती.

घराच्या फाटकाशी तिचा आवडता पळस उभा होता. शलभही मनांतून हेलावला होता. अर्पिता जाताना त्याच्या आयुष्यातला आनंद आणि रंगही घेऊन जातेय. हे त्याला समजंत होतं. पण त्यानं आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली होती. सन्मानाचं आयुष्य अन् चांगला जोडीदार त्यानं तिला मिळवून दिला होता. त्याच्या मनांवरचं ओझं उतरलं होतं.

कन्या न तू, वैरीणी

कथा * सुधा कस्तुरे

‘आजी, अगं, तुला ठाऊक आहे का? आईनं लग्न केलंय.’’ माझ्या पंधरा वर्षांच्या नातीनं मला सांगितलं. सकाळच्या प्रहरी तिच्याकडून ही बातमी ऐकून बॉम्ब पडल्यासारखी मी हादरले.

‘‘तुला कसं समजलं? फोन आला होता का?’’

‘‘नाही, फेसबुकवर पोस्ट केलंय,’’ रीनानं म्हटलं.

मी घाईनं तिच्याकडून मोबाइल घेतला. त्या पुरूषाचं प्रोफाइल बघून मी हतबद्ध झाले. तो पाकिस्तानातला होता. मी दोन्ही हातांनी माझं डोकं दाबून धरलं, ‘‘ही मुलगी काय करेल ते थोडंच आहे. का अशी छळतेय ती आम्हाला?’’ मी स्वत:शीच पुटपुटले.

रीनानं लगेचच आपल्या आईला ‘अनफ्रेंड’ केलं. दहावीला आहे. अगदी लहान नाहीए. बरंच काही कळंत तिला.

घरात एकदम शांतता होती. माझे पती घरी नव्हते. थोड्या वेळानं ते घरी आल्यावर त्यांना ही बातमी समजली. तेही हादरलेच! मग थोड्या वेळानं म्हणाले, ‘‘बरं झालं. निदान लग्न करून स्वत:चा संसार मांडावा अन् आम्हाला जबाबदारीतून मुक्त करावं. निदान स्वत:च्या मुलांना सांभाळावं. आता या वयात आम्हाला नातवंडं सांभाळून होत नाहीत…तू शांत हो…काळजी करू नकोस.’’

‘‘काळजी आहेच हो! मुक्ती कुठली मिळतेय? उलट जबाबदारी वाढलीच आहे. ज्याच्याशी लग्न केलंय तो कुणी पाकिस्तानी आहे. आता ती तिथंच राहील. म्हणून तर काही बोलली नव्हती. आता मुलं आपल्यालाच सांभाळावी लागतील. अर्थात् तिनं हे सांगितलं असतं तर आपण परवानगी दिलीच नसती. आपल्या देशात मुलं नाहीएत का? मला म्हणाली होती की ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जाते आहे.’’ मी म्हटलं.

ते चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले.

‘‘कुणी मुलगी इतकी स्वाथी कशी होऊ शकते जिला म्हाताऱ्या आईबाबांची काळजी नाही…कुणी आई इतकी कठोर कशी होऊ शकते, जिला आपल्या मुलांची माया नाही,’’ मी संतापून बोलत होते.

‘‘खरंच! आपली नाही, निदान तिनं मुलांची तरी काळजी घ्यायला हवी…तिच्या मुलांना खरं तर आपणच वाढवतो आहेत. तिच्याबरोबर एकत्र राहताना घरात कायम ताणतणाव असायचा. आता ती नाहीए म्हणताना आपण निदान निवांत राहू शकू.’’ यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

‘‘ते ठीक आहे, पण आपण तरी कुठवर सांभाळणार? आणि खर्चाचं काय? मुलांच्या खर्चाला पैसे नकोत का?’’ मी हताशपणे म्हणाले.

‘‘खरंय!’’ त्यांनी म्हटलं.

‘‘बघूया, काय करता येईल…मार्ग तर काढावाच लागेल.’’

आम्हाला मुलगा नाही. एकुलती एक मुलगी मंजिरी. लाडाकोडात वाढवलं तिला. सॉफ्टवेयर इंजिनियर झाली. नोकरीला लागली. पण तिचं सगळंच वागणं खटकणारं होतं. जिवापाड प्रयत्न केले पण तिचे गुण वेगळेच होते. तिचं वागणं आम्हाला पटत नव्हतं. तिला दुसरा मुलगा झाला तेव्हापासून आम्ही तिची पहिली मुलगी अन् या मुलाला सांभाळायला तिच्या बरोबरच राहत होतो.

कित्येकदा तिच्या वागण्यांत, वाईट बोलण्यानं आम्ही दुरावलो जात होतो. मग आता इथं रहायचं नाही असं ठरवून पुन्हा आपल्या घरी येत होतो. पण मग मुलांचे होणारे हाल बघून आम्हाला परत तिथं जावंच लागायचं. आमचा जीव मुलांमध्ये गुंतलेला होता. त्याचा फायदा मंजिरी घ्यायची.

आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न केला की ती आम्हाला ऐकवायची, ‘‘तुम्ही मला वाढवलंत तसं मला माझ्या मुलांना वाढवायचं नाहीए.’’ तिला वाढवताना आमचं काय चुकलं होतं ते आम्हाला अजूनही कळलेलं नाही. निर्लज्जपणा, बेजबाबदारपणा, अती महत्त्वाकांक्षा, त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती हे सगळं तिच्यात कुठून आलं ते ही आम्हाला समजलेलं नाहीए.

खरं तर कष्ट केल्याशिवाय तिला सगळं हवं असतं. ऑफिसातही कामं टाळण्यासाठी चक्कर येणं, जीव घाबरणं अशी नाटकं करून सुट्या घ्यायची. डॉक्टरकडून खोटे रिपोर्ट तयार करून घेऊन आम्हाला घाबरवायची अन् उपचारांचा खर्च आमच्याकडून वसूल करायची.

आम्हाला ती इमोशनली ब्लॅकमेल करायची. सुरूवातीला तिचे रिपोट्स बघून आम्ही घाबरून जात असूं. वाटायचं, हिला काही झालं तर या मुलांचं काय व्हायचं? पण ती अगदी बिनधास्त असायची. नंतर कळलं की ती गुगलवरून अशा आजारांची माहिती मिळवायची नोकरी सोडायची, काही तरी बिझनेस सुरू करायचा, पुन्हा त्यात तोटा झाला की तो बंद करून नोकरी सुरू करायची….तिला तीच सवय लागली होती जणू. घरकामात तर अजिबातच तिचं लक्ष नव्हतं. बाई किंवा हॉटलच्या स्वयंपाकावरच मुलं वाढंत होती.

तिला अमेरिकेचं आकर्षण होतं. तिथलाच नवरा हवा होता. नेटवरून तिनंच अमेरिकेतल्या एका मुलाशी लग्न ठरवलं. तो भारतात आला. आम्ही लग्न करून दिलं. पण त्या मुलाची संपूर्ण माहिती काही तिनं आम्हाला दिली नाही. आम्हाला शोधही घेऊ दिला नाही. लग्न करून ती अमेरिकत निघून गेली अन् दीडच वर्षात पोटात बाळ घेऊन भारतात परत आली ती पुन्हा त्याच्याकडे न जाण्यासाठीच!

अमेरिकेत गेल्यावर तिला कळलं की तो विवाहित आहे. आधीच्या दोन बायकांपासून त्याला मुलंही आहेत. तिनं तिथून पळ काढला. पुन्हा भारतात आली. आम्हाला धक्काच बसला होता. तिचं बाळंतपण निस्तरलं. तान्ह्या मुलीला आमच्याजवळ ठेवून घेतलं. मंजिरीला दिल्लीला नोकरी मिळाली म्हणून ती एकटीच दिल्लीला गेली.

एकदा अवचित आम्ही लहानग्या रीनाला घेऊन दिल्लीला मंजिरीकडे गेलो तर अजून एक धक्का बसला. ती कुणा तरूणाबरोबर लिव्ह इनमध्ये राहत होती. काय करावं या मुलीला आम्हाला समजत नव्हतं. आम्हाला बघताच तो मुलगा जो पळाला तो आजता-गायत परत आला नाही. मंजिरी तेव्हा चार महिन्यांची गरोदर होती. गर्भपात करण्याची वेळ निघून गेली होती. अगदी नाईलाज म्हणून आम्हाला तिच्याबरोबर दिल्लीला रहावंच लागलं.

मधल्या काळात मंजिरीची एक दोन प्रेमप्रकरणं आणखी झाली. पण आमच्या भाग्यानं तिला त्यातून दिवस गेले नव्हते. ती प्रकरणंही निकाली निघाली…पण आतचा हे लग्न, त्यातून पाकिस्तानी माणसाशी…मंजिरीला अक्कल का येत नाही? किती वेळा चुका कराव्यात माणसानं. आता हा माणूस तरी आयुष्याच्या शेवटापर्यंत निभवणार आहे का? त्यातून अजून एखादं मुल झालं तर?

केवळ कल्पनेनंच मला कापरं भरलं. तिचा भूतकाळ बघता माहितीतला कुणी पुरूष तिला स्वीकारेल हे शक्यच नाही. नातलग, समाज आमची कींव करतो. आम्ही चांगले आहोत. मंजिरीसाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय, हेसुद्धा सगळे जाणून आहेत. पण म्हणून उघड्या डोळ्यांनी कुणी मंजिरीला आपलं म्हणेल हे शक्यच नाही आणि आता जे काही तिनं केलंय त्यानंतर तर तिला भारतात येऊन आपल्या मुलांनाही भेटायला तोंड कुठं आहे? नक्कीच तो कुणी तरी खूप श्रीमंत असामी असणार. पैशासाठी मंजिरीनं त्याला आपल्या जाळ्यात ओढलं असेल. पैशासाठी ती काहीही करू शकते. बघूया, लवकरच काय ते समोर येईल…किती दिवस अशा गोष्टी लपून राहतात?

रीनानं तिला फेसबुकवर अनफ्रेंड केल्यावर मंजिरीला हे तर लक्षात आलं की तिच्या लग्नाची बातमी सर्वांना समजली आहे. महत्त्वांचं म्हणजे तिची लेक तिच्यावर फारच नाराज आहे. मग रोजच मंजिरीचे फोन येऊ लागले, आम्ही ते घेत नव्हतो. पण एकदा मीच विचार केला की निदान तिच्याशी बोलून घ्यायला हवं. मुलांच्या भवितव्याचाही विचार करायलाच हवा ना?

शेवटी एकदा मी फोन उचलला अन् ‘हॅलो’ म्हटलं, ती लगेच बोलायला लागली, ‘‘रीनाला समजव जरा. मला ही माझं आयुष्य आनंदातच जगायचा हक्क आहे म्हणावं. माझ्या लग्नामुळे कुणाला काय त्रास होतोय? आणि मी माझ्या मुलांची जबाबदारी घेते आहे. मी सांभाळीन त्यांना. काहीही कमी पडू देणार नाही. कारण ज्याच्याशी मी लग्न केलंय तो मोठा व्यापारी, व्यवसायी आहे. गडगंज पैसा आहे त्याच्याकडे…’’

एकूण माझा अंदाज बरोबरच होता. पैसा बघून त्याच्याशी माझ्या पोरीनं लग्न केलं होतं. काही दिवस गेले अन् कुरियरनं एक भलं मोठं पार्सल आलं. त्यात महागडे मोबाईल, मुलांसाठी उंची ब्रॅन्डेड कपडे अन् काही खेळणी होती. शिवाय ऑनलाइन खाण्याचे किती तरी पदार्थ केक, पेस्ट्री, चॉकलेट, सुका मेवा वगैरे पाठवलं होतं…आमच्या मुलीनं तिच्या मुलांसाठी. पण धाकट्या चिंटूखेरीज कुणालाच ते बघून आनंद झाला नाही.

पुन्हा एकदा तिचा फोन आला. मुलांचा व्हिसा काढून घ्या. ती मुलांसाठी पाकिस्तानची एयर तिकिटं पाठवते आहे. अन् आमच्यासाठी आमच्या घरी जाण्यासाठी ही विमानाची तिकिटं पाठवते आहे.

रीना संतापून म्हणाली, ‘‘मला नाही जायचंय तिकडे. आय हेट हर…नाती, मी तुझ्याजवळच राहणार आहे.’’

चिंटू म्हणाला, ‘‘मला जायचंय आईकडे…पण ती इथं का येत नाही?’’

मला काहीच बोलणं सुधरेना. शेवटी पुन्हा तिचा फोन आला तेव्हा मी म्हटलं, ‘‘तुझा निरोप मिळालाय. तू मुलांना जन्म दिला आहेस, तेव्हा त्यांच्यावर तुझ्च हक्क आहे. कायदा ही तुझ्याच बाजूनं असणार…आम्ही फक्त केयर-टेकर आहोत. आमचं नातं थोडीच आहे मुलांशी…फक्त त्यांची काळजी घेऊन  वाढवलंय त्यांना. खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्यात जीव गुंतलाय. एकदा ती तिकडं गेली की आम्ही त्यांना बघूही शकणार नाही, की व्याकूळ होऊ आम्ही, याची कल्पना आहे का तुला?’’

‘‘अन् खरंच तुला मुलांची इतकी काळजी असती तर हे पाऊल उचलण्यापूर्वी तू विचार केला असता, अगं,, मुलांना मुळात प्रेम अन् वेळ हवा असतो. ढीगभर पैसा नको असतो. मला कळंतच नाही की तू आमची मुलगी असून अशी कशी निपजलीस? आमच्या भावना तुला समजायच्याच नाहीत…तू मुलांची काळजी घेशील यावर माझा विश्वास नाही…अन् त्या सावत्र बापावर तरी विश्वास कसा ठेवावा आम्ही?

‘‘चिंटूची इच्छा आहे, त्याला पाठवून देते, पण, रीनाला नाही पाठवणार. काळ तसाच वाईट आहे…वयात आलेली पोर…तिला मायेची, संरक्षणाची गरज आहे. मला जमेल तसं मी करेन…पण रीना राहील माझ्याजवळंच.’’

एवढं बोलून मी फोन बंद केला. माझ्या पतींनी अन् रीनानं मला शाबासकी दिली. त्यांना निर्णय पटला होता…रीनानं तर आनंदानं मला मिठीच मारली.

मला क्षमा कर

कथा * सुशीला दानवे

दुपारपासूनच पाऊस लागला होता. थांबायचं नाव घेत नव्हता. घरात शांतता होती. खोलीत तर विशेषच नमिताला कधी कधी अशी शांतता हवीशी वाटायची. रेडिओ, टीव्ही, डेक सगळं बंद करून आपल्याच विचारात मग्न राहायला तिला आवडायचं.

आपल्यातच मग्न असताना तिला वाटलं शेजारच्या खोलीत काही आवाज झाला. लक्षपूर्वक पुन्हा ऐकलं. नंतर काहीच आवाज आला नाही. आपल्याला एकटेपणाचं भय वाटलं की काय असं तिच्या मनात आलं. पावसामुळे बाहेरही अंधारून आलं होतं?

नमितानं खिडकीतून बाहेर बघितलं, त्याचवेळी पुन्हा तिला काहीतरी आवाज ऐकू आला. अंधारातच तिनं सर्वत्र नजर फिरवली. तिनं दार बंद करताना व्यवस्थित बंद केल्याचं तिला आठवत होतं. चुकून कडी घालायची राहिली का?

घराबाहेर पडताना आईनं बजावलं होतं, ‘‘घराच्या खिडक्या, दारं नीट बंद कर हं.’’

तिनं हसून आईला ऐकवलं होतं, ‘‘अगं मी आता काही लहानशी मुलगी नाहीए. वकील झालेय. पीएचडी करतेय. ज्युडो-कराटे शिकलेय. एखाद्या गुंडाला सहज लोळवीन.’’

तरीही आईनं बजावलं होतं, ‘‘तू एक मुलगी आहेस, स्त्री आहेस, मुलीला अब्रू जपावी लागते. समाजाला भिऊन राहावं लागतं.’’

‘‘आई, तू अजिबात काळजी करू नकोस. मी स्वत:ची नीट काळजी घेईन,’’ तिनं आईला आश्वस्त केलं.

आज तर ती घराबाहेरच गेली नव्हती. आईबाबा घराबाहेर पडले त्याला काही तासच झाले होते. ती असा विचार करते आहे तोवर तिला पुन्हा घरात कुणीतरी वावरतंय असा भास झाला. तिनं दिवा लावला. पण वीज गेली होती. तिला एकदम भीती वाटली.

ती मेणबत्ती घ्यायला उठली, तेवढ्यात वीज आली. पाऊस अजूनच जोरात कोसळू लागला. कदाचित पावसाच्याच आवाजानं तिला भास झाला असावा. अंधारामुळेही भीती वाढतेच. आत्ता फक्त सायंकाळचे सात वाजले होते.

तहान लागली होती, म्हणून नमिता उठली. स्वयंपाक घरात जाऊन तिनं तिथला दिवा लावला अन् फ्रीजकडे वळली अन् नकळत किंचाळली. ‘‘कोण आहेस तू?’’ कशीबशी ती बोलली.

काळ्या फडक्यात चेहरा झाकलेला तो कोणी पुरूष होता. त्यानं नमिताच्या तोंडावर हाताचा तळवा दाबून धरत धमकी दिली, ‘‘ओरडू नकोस. परिणाम वाईट होईल.’’ त्याचा हात ढकलत नमितानं म्हटलं, ‘‘काय हवंय तुला? कोण आहेत तू?’’

‘‘मूर्ख मुली…एखाद्या तरूण पुरूषाला तरूण मुलीकडून काय हवं असतं? बरेच दिवस तुला बघत होतो. आज संधी मिळाली.’’

त्याच्या हातातून स्वत:ला सोडवून घेत नमितानं त्याला म्हटलं, ‘‘बडबड बंद कर. मी तुला घाबरत नाही. ताबडतोब इथून चालता हो. मी पोलिसांना बोलावतेच.’’ पण ती फोनपाशी पोहोचण्याआधीच त्यानं तिला धरलं अन् उचलून पलंगावर टाकलं. तो तिचे कपडे फाडायचा प्रयत्न करत असतानाच नमिता त्याला चावत, बोचकारत होती. तिनं आपल्या दोन्ही पायांनी त्याच्या मांड्यांच्या मधोमध एक जबरदस्त प्रहार केला. तो एकदम कळवळला. दूर जाऊन पडला. विजेच्या वेगानं उठून नमिता खोलीबाहेर धावली. तिनं खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला. नमितानं ड्राँइंगहॉलमधून पोलिसांना फोन केला. पोलिसही लगेच आले. पण खोलीचं दार उघडलं, तेव्हा खोलीत कोणीत नव्हतं. खिडकीचे गज वाकवून तो धटिंगण पसार झाला होता. खोलीतल्या एकंदर अवस्थेवरून नमितानं किती जोरदार प्रतिकार केला होता हे सहज कळत होतं.

आईबाबांना कळवताच तेही टॅक्सीनं ताबडतोब आले. आईच्या गळ्यात पडताच नमिताला रडू फुटलं.

तिच्या चेहऱ्यावर हातापायावर ओरखडे होते. मुक्कामाराचे निळे डाग होते.

नमितानं आईवडिलांना, पोलिसांना पूर्ण हकीगत सांगितली. ‘‘आई, माझं ज्युडोकराटेचं ट्रेनिंग माझ्या कामी आलं. मीही त्याला सणसणीत लाथ घातली. चावले, बोचकारलं…स्वत:ला सही सलामत वाचवू शकले.’’ नमिता आता सावरली होती.

पण प्रेसला कशी, कोणी विकृत बातमी दिली, कुणास ठाऊक. वणवा पसरावा तशी बातमी पसरली. मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी. आईवडिल हादरले…खरंच बलात्कार झाला का? नमितानं तर तसं सांगितलं नाही.

नमितानं आईवडिलांना सांगितलं, ‘‘माझ्यावर विश्वास ठेवा. बातमी कुणी, कशी दिली मला ठाऊक नाही, पण तसं काहीच घडलं नाहीए. मीच त्याला धडा शिकवलाय. माझ्यावर विश्वास नाही का?’’

आईबाबा अजूनही घाबरलेले, चिंताक्रांत होते. ‘‘ही बातमी घरोघरी वाचली जात असेल…आमच्या मुलीबद्दल लोक काय काय बोलतील…मला फार भीती वाटतेय,’’ आई बाबांना म्हणत होती.

तेवढ्यात फोनची घंटी वाजली. लोक सहानुभूती दाखवत होते. दु:खात सहभागी असल्याचं सांगत होते.

‘‘आम्हाला आमच्या मुलीच्या कतृत्त्वाचा अभिमान वाटतोय. तिनं त्या धटिंगणाला धडा शिकवला. पेपरनं चुकीची बातमी दिली आहे,’’ आई बाबा प्रत्येकालाच सांगत होते.

सायंकाळ होता होता योगेशचा फोन आला. त्याच्या मुलाशी नमिताचं लग्न ठरलं होतं. डिंसेंबरमध्ये लग्न व्हायचं होतं.

‘‘पेपरला बातमी वाचली. वाईट वाटलं. मी नंतर फोन करतो.’’

त्यांच्या बोलण्याच्या एकूण पद्धतीवरून बाबा घाबरले, विचलित झाले. आईला म्हणाले, ‘‘पेपरच्या या बातमीनं आपला सत्यानाश केलाय. योगेशजींचा फोन होता. त्यांच्या बोलण्याची पद्धत विचित्र वाटली. ते म्हणाले, ‘‘तुम्ही आता वाईट मन:स्थितीत असाल, मी तुमचा त्रास वाढवत नाही…नंतर बोलतो.’’

पोलीस आणि मिडियावाले घरी येतच होते, ‘‘आम्ही नमिताचा इंटरव्ह्यू घेऊ इच्छितो.’’

‘‘इतकं गलिच्छ खोटं नाटं छापूनही समाधान झालं नाही का? मुलीनं स्वत:ला वाचवलं, त्या दुष्टाला हाणलं ते पुरेसं नाही का?’’

मिडियावाले मुकाट झाले. पण पोलीस म्हणाले, ‘‘तसं नाही सर, आम्हाला गुन्हेगार पकडायचा आहे. नमिता मॅडमनं त्याला ओळखायला आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे.’’

‘‘पोलिसांना बोलावून तू फार मोठी चूक केली आहेस पोरी, किती त्रास होतोय,’’ वैतागून बाबा म्हणाले.

‘‘पण बाबा, अन्यायाला वाचा फोडायला हवी असं तुम्हीच म्हणता ना?’’ नमितानं त्यांना शांत करत म्हटलं. ‘‘खरं काय घडलं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना?’’

‘‘नाही गं पोरी, नाही. केस फाइल करून तू घोळ केला आहेस. त्याचे परिणाम बघते आहेस ना? सगळीकडे बातमी पसरली आहे. अशा घटनांची वाच्यताच करायची नसते.’’

बाबांचं बोलणं ऐकून नमिताला गरगरायला लागलं. ‘‘हे काय बोलताय बाबा? सत्यवीर कर्मवीर असलेल्या माझ्या बाबांच्या मनात असले विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. तुम्ही मला अन्याय, अत्याचार लपवायला सांगताय? बाबा, तुम्हीच म्हणायचा ना, की मी माझ्या मुलींना हुंड्यात देणार आहे उच्च शिक्षण, उच्च विचार, निर्भयता अन् अन्यायाविरूद्ध बोलायची, लढायची ताकद अन् आज मी पूर्ण क्षमतेनं शरीरबळ, आत्मबळ वापरून स्वत:ला सिद्ध केलंय तर माझं कौतुक करण्याऐवजी, मला आधार देण्याऐवजी माझा धिक्कार करताय? लोकांच्या बोलण्याला घाबरता? स्वत:च्या मुलीवरच अविश्वास दाखवताय? ’’

ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेजात शिकणारी नमिताची धाकटी बहिण रीतिका घरी आली होती. तिनं मिठी मारून ताईचं कौतुक केलं. तिच्या येण्यानं, तिच्या धीरानं थोडं बरं वाटलं.

आईबाबांना वाटणारी भीती शेवटी खरी ठरली. फोनवरच योगेशजींनी अत्यंत नम्रपणे पण ठामपणे नमिता आणि प्रांजलचं लग्न मोडल्याची बातमी सांगितली. त्यांच्यावर जणू वजाघात झाला. आई नमितावरच ओरडली, ‘‘स्वत:च्या शौर्याची अशी दवंडी पिटवून काय मिळालं तुला? सुरक्षित राहिलीस, तेवढं पुरेसं नव्हतं? विनाकारण ठरलेलं लग्न मोडलं…’’

‘‘बरं झालं ना आई, त्यांची संकुचित विचारसरणी आधीच कळली ते. लग्नानंतर असं काही घडलं असतं तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का? पण त्यांना तरी कशाला दोष द्यायचा? माझीच माणसं जिथं मला परकी झालीत, तिथं इतरांचं काय?’’ बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला.

नमिताला कळत नव्हतं की तिचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे. अविश्वासाचं मळभ दाटून आलेलं. तिच्या बोटात अजूनही साखरपुड्याची अंगठी होती. ती अंगठी प्रांजलनं तिच्या बोटात घातली, तेव्हा त्याचा झालेला स्पर्श, त्यातील प्रेम, आपुलकी, त्यामुळे देहावर उठलेलं रोमांच…सगळं सगळं खोटं होतं का? किती स्वप्न बघितली होती तिनं. अजूनही ती हिऱ्याची अंगठी तिच्या अनमिकेत होती. पण या क्षणी तिला त्या हिऱ्याची बोच असह्य वाटली. नाती इतकी तकलादू असतात का? न घडलेल्या घटनेमुळे ती तुटतात?

या एका घटनेनं विश्वासाची भावना पार धुळीला मिळाली. प्रांजलच्या आईवडिलांचं जाऊ दे. त्यानंतरही निदान एकदा भेटायचं, बोलायचं, सत्य जाणून घ्यायचं? तोही इतक्या क्षुद्र मनोवृत्तीचा निघावा?

आज आठ दिवसांनी नमिता घराबाहेर पडत होती. युनिव्हर्सिटीत जाऊन बघायचं होतं. मित्रमैत्रिणी, शिक्षक, सहकारी कशी काय प्रतिक्रिया देतात.

तिला आवरून घराबाहेर पडताना बघितलं अन् आई बोललीच, ‘‘अगं, इतक्यात अशी तयार होऊन बाहेर पडू नकोस. घटना जरा जुनी झाली की लोकांना विसर पडतो.’’

नमिता संतापलीच, ‘‘कोणती घटना? काय झालंय? तू विनाकारण का माझ्या मागे असतेस आई? अगं असं वागून तू मला किती दुखावते आहेस, हे कळतंय का तुला? तुझं सगळं प्रेम, माया, ममता कुठं गेली गं?’’ अन् मग शांत होऊन ती म्हणाली, ‘‘आई, जे होईल ते सोसायला मी समर्थ आहे. तू उगीच माझी काळजी करू नकोस.’’

युनिव्हर्सिटीत सगळ्यांनीच तिच्या धाडसाचं कौतुक केलं. कुणालाही तिच्यावर अविश्वास दाखवावा असं वाटलं नाही. नमिता सुखावली. तिनं पीएचडीचा प्रबंध पूर्ण केलाच होता. लवकरच तिला डॉक्टरेट मिळणार होती. आता तिनं प्रशासनिक सेवेच्या परीक्षेसाठी कंबर कसली. समाजात स्वत:ला सिद्ध करायला पॉवरही हवीच.

जे ठरवलं ते मिळवायचं हा तिचा स्वभाव होता. तिनं कठोर परिश्रम केले अन् पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी छापून आली. ‘भारतीय प्रशासनिक परीक्षेत डॉ. नमिता साठे यांना प्रथम क्रमांक मिळाला.’

आता तिचे प्रचंड कौतुक सुरू झाले. आईबाबाही आनंदले. पण तिला जवळ घेऊन कौतुक करू शकले नाही. त्यांच्यात पडलेली दरी साधली जात नव्हती. ज्या क्षणी तिला आधाराची अत्यंत गरज होती, तेव्हाच त्यांनी तिला दूर लोटली होती हे शल्य नमिताही विसरू शकली नव्हती.

उत्तम अधिकारी म्हणून ती नावाजली जात होती, पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकत होतं. काय ते तिला समजत नव्हतं. तिला लक्षात आलं, त्या काळात तिनंही स्वप्नं बघितलं होतं, उत्तम पत्नी, उत्तम गृहिणी, उत्तम सून, उत्तम आई होण्याचं. आपलं प्रेम, आपल्यातली माया, ममता तिला आपल्या कुटुंबावर उधळायची होती. पण ते झालंच नाही. कधीमधी रात्रीच्या अंधाऱ्या एकांतात ती रडून घ्यायची. आपल्या भावनांना वाट करून द्यायची. पण आता तिला नाती गोती नको होती. तिचा विश्वासच उडाला होता.

पण तिला खूप स्थळं सांगून येत होती. आईवडिल लग्न करण्यासाठी सतत दबाव आणत होते. स्थळ नाकारू नये म्हणून विनवत होते. पण तिने स्पष्टच सांगितलं, ‘‘या विषयावर पुन्हा बोलायचं नाही. मला संसार करायला वेळ तरी कुठं आहे? मी अशीच सुखात आहे.’’

पण कधी कधी कथा कांदबरी किंवा सिनेमात शोभावेत असे प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात. कामाच्या निमित्तानं नमिताला खूप प्रवास करायला लागायचा. एकदा अशीच ती दिल्लीला निघाली होती. सामान व्यवस्थित लावून तिनं वाचायला सुरूवात केली.

गाडी सुटायला काही क्षणांचा अवधी असतानाच कुणी प्रवासी डब्यात चढले अन् सामान नीट लावू लागले. सहजच नमिताचं लक्ष गेलं. ती दचकलीच! तो प्रांजल होता. क्षणांत तिनं निर्णय घेतला, आपली जागा बदलायला हवी.

त्याच क्षणी प्रांजलचंही तिच्याकडे लक्ष गेलं. त्याचा चेहरा आनंदानं उजळला. कुठलीही प्रस्तावना न करता तो एकदम म्हणाला, ‘‘मला याच चमत्काराची प्रतीक्षा होती नमिता…मी वाट बघत होतो आपल्या भेटीची.’’

नमितानं काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. पण प्रांजल मात्र आपली बाजू मांडण्यासाठी उतावीळ आणि आग्रही होता.

नमिताला बोलायची संधी न देता तो बोलू लागला, ‘‘तू यू.पी.एस.सीत पहिली आलीस त्या दिवशीच खरं तर तुझं अभिनंदन करायचं होतं. पण माझं धाडस झालं नाही. मी तुझा अपराधी आहे. मी भ्याड, भित्रा होतो गं…पण मीही तुझ्यासारखीच मेहनत घेतली अन् प्रशासनिक अधिकारी झालो. मनात होतं, आपली नक्की भेट होईल. तसे आज भेटलो, मला क्षमा कर. तू धाडसी आहेस. मी मात्र कमी पडलो…’’ त्याच्या देहबोलीत, चेहऱ्यावर, बोलण्यात पश्चात्ताप अन् क्षमायाचना होती.

‘‘माझ्या आईनं बाबांना सांगितलं की तिला अशी धाडसी सून नकोय. सरळसाधी संसार करणारी सून हवीय. शेवटी बाबांना फोन करावा लागला. मी तुला भेटायला येणार होतो, पण आईनं ‘जीव देईन’ अशी धमकी दिली. शेवटी मी ही सांगितलं ठिक आहे. मी आत्ता भेटत नाही, पण मी कुठल्याही मुलीशी लग्न करणार नाही. मनात ठरवलंच होतं की तुझ्याशिवाय माझी पत्नी इतर कुणी असूच शकत नाही. माझ्या प्रतिज्ञेमुळे आईही गोंधळली आहे. तिला आता आपली चूक उमगली आहे. पण तरीही मी तुला भेटायचं धाडस करू शकलो नाही.’’

नमिता दगडी मूर्तीसारखी निश्चल बसली होती. खरं तर तिला प्रांजलला सांगायचं होतं की तिचं हृदय आता कोरडं वाळवंट आहे. प्रेमाचे झरे पार आटले आहेत. स्त्रीसुलभ प्रेमळपणा, सौम्यपणा, साधेपणा सगळं आता ती विसरली आहे. प्रांजलनं यापुढे तिच्याशी संपर्क करू नये. पण ती काहीच बोलली नाही.

प्रांजलच्या बोटात आजही साखरपुड्याची अंगठी होती. प्रांजलने खरोखर आपलं हृदय तिच्यापुढे उघडं केलं होतं. पुढला प्रवास नि:शब्दपणेच झाला.

त्यानंतरच्या आठवड्यात नमिता ऑफिसातून घरी आली, तेव्हा प्रांजलचे आईवडिल ड्रॉइंगरूममध्ये बसलेले तिला दिसले. किती तरी वर्षांत आईनं उत्साहानं, प्रेमानं उच्चारलेले शब्द तिच्या कानावर आले, ‘‘नमिता, अगं, बघ तरी कोण आलंय…’’

‘‘या दोघांनीच ही किमया केलीय बहुतेक. तरीच आईच्या मनातलं किल्मिष नाहीसं झालंय.’’ मनांतल्या मनात म्हणत नमिता त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. आयुष्यातत त्यांची तोंडं बघणार नाही असं तिनं ठरवलं होतं, त्याच माणसांना तिला सामोरं जावं लागलं.

प्रांजलची आई पटकन् उठली. नमिताचे हात आपल्या हातात घेऊन तिनं नमिताला शेजारी बसवलं. तसेच तिचे हात धरून ती म्हणाली, ‘‘मला क्षमा कर मुली. तुझ्यासारखी हिरकणी आमच्या नशिबानं लाभली होती, पण आम्हालाच पारख करता आली नाही. आमचं चुकलं माझ्या मुलाचं दु:ख, त्याचा संताप मला बघवत नाहीए. माझं अज्ञान, माझा अहंकार, माझी चूक या सगळ्याचं प्रायश्चित्त माझ्या मुलाला भोगावं लागतंय. मी तुझी अपराधी आहे, माझा मुलगा नाही. मला एक संधी दे…मी क्षमा मागते तुझी,’’ बोलता बोलता त्या खूपच भावनाविवश झाल्या. प्रांजलच्या वडिलांच्याही चेहऱ्यावर तेच भाव होते. नमिताला कठोर होता आलं नाही. काही न बोलता ती उठून आतल्या खोलीत निघून गेली.

त्या रात्री तिला झोप येईना. ट्रेनमध्ये क्षमा मागणारा, स्वत:ची चूक कबूल करणारा प्रांजल पुन्हापुन्हा डोळ्यांपुढे येत होता. मधल्या काळात तो भेटून गेला नाही याचा राग आता उरला नव्हता. कारण आपण भ्याडपणे वागलो हे त्यानं प्रांजळपणे कबूल केलंच होतं. आता त्याचे आईवडिलही क्षमा मागून गेले होते. ती तरी त्यांच्यासमोर कुठं रौद्ररूप दाखवू शकली होती? नमिताला रडू यायला लागलं. बराच वेळ रडून झाल्यावर तिला मोकळं वाटलं. मग झोपही लागली.

आठ दिवसांनी आई तिच्याजवळ येऊन बसली. ‘‘इतके दिवस तुला विचार करायला वेळ दिला. आता एकदा काय तो निर्णय घेऊन टाक गं! योगेश पुन्हापुन्हा फोन करताहेत…आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचं?’’ आई आशेनं तिच्याकडे बघत होती.

तिनं आईकडे बघितलं अन् उठून उभी राहत ती सहजपणे म्हणाली, ‘‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. मी तयार आहे.’’

आई आनंदानं, समाधानानं उठून जाण्याऱ्या लेकीकडे बघत राहिली. घरात पुन्हा एकदा आनंद दाटला. दुसऱ्याच दिवशी आईबाबा लग्नाची तारीख ठरवण्यासाठी इंदौरला निघून गेले.

सुखाचा सोबती – अंतिम भाग

दीर्घ कथा * सीमा खापरे

पूर्व भाग :

शाळकरी वयातच सुमाची भेट वसंतशी झाली. ती त्याच्या प्रेमात होती. तिला वसंतशी लग्न करायचं होतं. वसंत मात्र सातत्याने तो विषय टाळत होता. शेवटी वसंतच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सुमा व वसंतचं लग्न झालं. सुमाला एक मुलगीही झाली अन् वसंतने आपलं खरं रूप दाखवायला सुरूवात केली. सुमाला जेव्हा समजलं की त्याला आधीच्या लग्नाची बायको व मुलंही आहेत, तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी झाली.

– आता पुढे वाचा…

आकाशपाताळ एक करणं म्हणजे काय याचा प्रत्यय सुमाला वसंतशी लग्न करताना आला होता. लग्न फार म्हणजे फारच साधेपणाने झालं. वसंतकडून कुणी दोघंतिघं अन् हेमाताई, रमण भावोजी अन् विलियम…लग्नसमारंभाचा उत्साह नाही की पाहुण्यांची वर्दळ, चेष्टामस्करी नाही. पण सुमा मात्र खूप आनंदात होती. जे हवं ते मिळवलं होतं तिने. रमण भावोजींनी गावातच तिला एक घर घेऊन दिलं. हेमाताईने घरासाठी लागणारं सगळं सामान आणलं. घर मांडून दिलं. शिवाय बराचसा पैसा तिच्या अकांउटला टाकला होता. वसंत तरीही नाराजच होता. ताई भावोजींसमोर काही बोलला नाही. ते गेल्यावर मात्र त्याने मनातला सगळा राग काढला.

त्याच्या मते तिच्या लोकांचा वसंतवर विश्वास नाही म्हणूनच त्यांनी घर, सामान, वगैरे सर्व सुमाच्या नावे केलं होतं. त्याचं हे रूप बघून ती चकित झाली. हतबद्ध झाली. हेमाताईने त्यांच्या हनीमूनसाठी उटीची तिकिटं अन् हॉटेलचं बुकिंगसुद्धा करून ठेवलं होतं. वसंत संतापून बोलला, ‘‘आता आमचा हनीमूनही तुझ्या बहिणीच्या इच्छेप्रमाणे होणार का?’’

‘‘मग तू ठरव दुसरी कुठली जागा?’’ तिने त्याला प्रेमाने म्हटलं.

‘‘बघूया…’’ वसंतने टाळलंच. हनीमून झाला नाही. लग्नानंतर दोन महिन्यांतच वसंतने धंद्यासाठी हवे आहे म्हणून तिच्या अकाउंटमधून दोन लाख रूपये तिला काढायला लावले. सुमा बघत होती, वसंतला लग्नाविषयी अजिबात आस्था नव्हती. नवी नवरी, तिची नव्हाळी या बाबतीत तो अगदीच रूक्षपणे वावरत होता. बायकोकडे चक्क दुर्लक्षच करत होता. तिला फार एकाकी अन् उदास वाटायचं.

वसंत तोंडाने वाद घालत नव्हता, भांडण करत नव्हता पण त्याचा तो थंडपणा तिला सहन होत नव्हता. ती आतल्या आत मिटून गेली, खंतावत राहिली,

कित्येकदा तो बाहेर जायचा. गेला की अनेक दिवस बाहेरच असायचा. सांगितलेल्या दिवशी कधीच परत येत नसे. ती घाबरून रात्र रात्र जागी राहायची. तो कुठे आहे, काय करतो आहे, तिला काहीच ठाऊक नसायचं. घरात आपण टेलिफोन घेऊयात असं तिने अनेकदा म्हटलं पण ‘‘ठीकाय, बघूयात,’’ म्हणून तो ती गोष्ट टाळायचा.

हेमाताईने तिला दोन मोबाइल फोन घेऊन दिले. एक तिच्यासाठी, दुसरा वसंतसाठी, पण वसंतचा फोन कायम स्विच ऑफ असे नाही तर तो फोन डिस्कनेक्ट करून टाके. हेमाताईशी ती जवळजवळ रोजच बोलायची. पण ‘‘सगळं ठीक आहे,’’ याव्यतिरिक्त काहीही बोलत नसे. काय सांगणार? वसंतच्या कागाळ्या, तक्रारी ती कोणत्या तोंडाने ताईला सांगणार होती?last-part-inside-image

घरात तेल, तांदूळ, डाळ, पीठ, साखर आहे किंवा नाही याच्याशी वसंतला काहीच देणंघेणं नसे. ‘‘घरातलं सामान संपलंय, सामान आणायला हवंय,’’ वगैरे म्हटलं की तो पार गप्प बसायचा किंवा घराबाहेर निघून जायचा. तिला त्याचा हा अलिप्तपणा, कोरडेपणा विलक्षण खटकायचा. शेवटी तीच बँकेतून पैसे काढून आणायची. घरसामान आणायची. घरातल्या इतर काही गरजेच्या गोष्टी आणायची. वसंतबरोबर लग्न करून संसार करण्याची जी स्वप्नं तिने बघितली होती, ती पार धुळीला मिळाली. वसंतच्या प्रेमात ती वेडी झाली होती. आता त्याच्या या कोरड्या वागण्याने एकदम उद्ध्वस्त झाली. पूर्वीचा तो प्रेमळ वसंत कुठे गडप झाला तेच कळत नव्हतं.

रमण भावोजींनी तिला सगळी कॅश रक्कम न देता घर अन् संसाराचं सामान का घेऊन दिलं ते तिला आता लक्षात येत होतं.

लग्नाला आता वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला होता. वसंत गेले वीस दिवस बाहेर होता. घरातली कामं कशीबशी आटोपून ती बाहेरच्या बाल्कनीत येऊन उभी राहिली.

‘‘कशी आहेस, सुमा?’’ तिने आवाजाच्या दिशेने वळून बघितलं. शेजारची निर्मला तिच्या बाल्कनीतून विचारत होती.

‘‘बरी आहे मी,’’ तिने थोडक्यात आटोपायला बघितलं. ‘‘तुम्ही कशा आहात?’’

‘‘एकदम मजेत. वसंत भाऊ परत आले की नाही?’’

सुमा वैतागली. म्हणाली, ‘‘अजून नाही आलेले. दोन एक दिवस लागतील.’’

‘‘अरेच्चा? कालच तर मी त्यांना बिग बाजारमध्ये बघितलं. मी हाकदेखील मारली पण ते बहुधा घाईत होते.’’ निर्मला खोचकपणे म्हणाली.

तिरमिरीसरशी आत येऊन सुमाने वसंतला फोन केला. त्यानं फोन घेतला अन् फोनवरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. तिला एकदम रडायलाच आलं. ती खूप वेळ रडत होती. मग तिने हेमाताईला फोन करून सगळं सांगितलं. इतके दिवस जे तिने लपवून ठेवलं होतं ते सगळं सगळं तिने हेमाताईला सांगितलं. त्याच दिवशी वसंत घरी आला अन् रडतरडत आयुष्य सुरू झालं.

मनाच्या अशा विषण्ण, उदास अवस्थेतच दिवस गेल्याचं सुमाच्या लक्षात आलं. ती आनंदाने मोहरली. तिने खूप आनंदाने ही बातमी वसंतला सांगितली. तर तो संतापून बोलला, ‘‘वेड लागलंय तुला? अगं तुलाच सांभाळताना जीव जातोए माझी, अन् आणखी ही एक जबाबदारी? मला मूल नकोय…अजिबात नकोय.’’

‘‘काय बोलतोस रे?’’ ती खूप दुखावून आश्चर्याने म्हणाली. पुन्हा भांडण…रडणं…ज्या बातमीने घरात आनंद पसरायला हवा त्याने त्या घरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वसंतला मूल नको होतं अन् ती कुठल्याही परिस्थितीत गर्भपाताला तयार नव्हती. एकेक दिवस उगवत होता अन् मावळत होता.

अन् मग वसंतनेही आपला हट्ट सोडला. तो सुमाची काळजी घेऊ लागला. सुमाला आश्चर्य वाटलं हे एकाएकी परिवर्तन कसं? वाळवंटात गुलाब बहरले कसे? कारण त्याच्या निगेटिव्हिटीचीच तिला सवय झाली होती. पण सुखद बदल नेहमीच हवेसे वाटतात. एकूण गरोदरपणाचे नऊ महिने अवघड असूनही चांगले गेले. वसंतने सुमाचेच पैसे वापरून बाळाच्या जन्माआधीच बाळासाठी लागणारं सर्व सामान घरात आणून टाकलं. वसंतचं प्रेम थेंबाथेंबाने पुन्हा तिला मिळत होतं. तेवढ्यावरच ती खूश होती. बाळाच्या येण्याची वाट बघत होती. या बाळामुळेच वसंत बदलला आहे, असं तिला वाटत होतं.

सुमाला मुलगी झाली. वसंतने चांगल्या इस्पितळात बाळंतपणाची व्यवस्था केली होती. बाळाला कुशीत घेताना अत्यानंदाने सुमाला रडू आलं. आई होण्याचा आनंदच अपूर्व होता.

हेमाताई, रमण भावोजींनाही खूप आनंद झाला. बाळासाठी बाळलेणी, सुमा, वसंतसाठी ढीगभर आहेर घेऊन ती दोघं आली होती. थाटात बारसं झालं. वसंतच्या व्यवस्थापनाचं खूप कौतुक झालं. मुलीचं नाव ठेवलं शुभदा, लाडाने तिला शुभी म्हणायचे.

वसंतला पुन्हा धंद्याच्या कामाने शहराबाहेर जायचं होतं. तो शुभीला मांडीवर घेऊन खेळवत होता. सुमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने विचारलं, ‘‘काय विचार करतो आहेस?’’

‘‘सुमा, आपल्या मुलीला मी खूप चांगलं शिक्षण देईन. शहरातल्या सगळ्यात चांगल्या शाळेत तिला घालीन. बघ तू, आपली मुलगी राजकन्येसारखी वाढेल. मला तिच्यासाठी काय काय करायचं आहे. मला हल्ली बाहेर जाण्याचाही कंटाळा येतो. तुम्हां दोघींना सोडून जावंसं वाटत नाही. मी इथेच काम सुरू करीन म्हणतो.’’

सुमाला समजेना. इतका आनंद कुठे ठेवावा. कसा सांभाळावा. तिला फक्त वसंतचं प्रेम अन् त्याने कष्टाने कमवलेला पैसा एवढंच हवं होतं अन् नेमकं तेच तिला मिळत नव्हतं. पण लेकीच्या पायगुणाने वसंत बदलला होता.

इतक्यातच वसंत पुन्हा काळजीत असल्यासारखा वाटत होता. तिने विचारलं तर ‘काही नाही…’ म्हणून टाळायचा. पण एक दिवस मात्र तो हमसाहमशी रडायला लागला. सुमा घाबरली.

‘‘अरे काही तरी बोल ना? काही सांगशील तर ना मला कळेल?’’ तिने म्हटलं.

‘‘माझ्या पार्टनरने मला दगा दिला…फसवलं. मला अंधारात ठेवून त्याने सगळा पैसा आपल्या नावावर करून घेतला. मी पार बुडालो गं…’’ वसंत पुन्हा गदगदून रडू लागला.

तिच्या पायाखालची जमीन हादरली, ‘‘तू…तू… पोलिसात तक्रार दिलीस का?’’ तिने विचारलं.

‘‘ते सगळं केलंय मी…मी त्याला असा सोडणारही नाहीए…मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे. पण त्याला बराच वेळ लागेल. कोर्टात केस करायलाही खूप पैसा लागेल. तोवर आपण जगायचं कसं? नवा काही व्यवसाय सुरू करायला तरी पैसा हवा ना जवळ?’’ तो अगदी बापुडवाणा झाला होता.

‘‘तू शांत हो…आपण बघूया…काहीतरी मार्ग निघेल…’’ तिने म्हटलं. पण ते शब्द अगदी पोकळ होते हे तिलाही कळत होतं.

वसंत खूप धावपळ करत होता. तो सतत काळजीत असायचा. तीही त्यामुळे काळजीत असे. किती तरी दिवसांनी थोडा सुखाचा काळ आयुष्यात आला होता. तोही असा झटक्यात संपला. वसंतला पुन्हा नव्याने धंदा सुरू करायचा होता त्यासाठी त्याला पैसे हवे होते. आता तर सुमाच्या अकाउंटलाही फार पैसे उरले नव्हते. वसंतची चिडचिड सुरू होती. ती त्याला समजावत होती, ‘‘अरे, सगळेच काही लाखो रुपये घालून बिझनेस सुरू करत नाहीत. काही छोटासा धंदा बघ, कमी पैशांतून सुरू करून वाढवता येईल असा व्यवसाय शोध. अन् नाही तर सध्या एखादी नोकरीच बघ. व्यवसायाचं नंतर बघू अन् नाहीतर तुझ्या वडिलांना विचार ना ते आर्थिक मदत करू शकतील का?’’

वसंत एकदम भडकला. ‘‘तुझ्याशी लग्न केलं नसतं तर आईवडील अन् त्यांची प्रॉपटी माझीच होती. पण तुझ्याशी लग्न करून बसलो. आता मी कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे पैसे मागू? अन् पैसे मला एकट्याला थोडीच हवेत? पैसा मिळेल तेव्हाच मुलीला चांगल्या शाळेत घालता येईल ना?’’

‘‘पण मग मी तरी कुठून आणू पैसा? माझे आईवडील तरी कुठे जिवंत आहेत?’’ तीही संतापून बोलली.

‘‘पण आईवडिलांचं घर तर आहे ना? तुझाही वाटा आहेच ना त्यात? तुझ्या बहिणीला सांग, तुझा वाटा तुला देईल ती.’’ वसंतने स्पष्टच सांगितलं.

ऐकून ती अवाक् झाली. पार बधीर झाली. विचार करण्याची शक्तीच नाहीशी झाली तिची. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा ती शून्यावरच येऊन पोहोचली. घरात कायम तणावाचं वातावरण होतं. फक्त आता वसंत घराबाहेर जात नव्हता अन् मुलीला प्रेमाने सांभाळत होता.

एक दिवस तो प्रेमाने तिला म्हणाला, ‘‘हे बघ सुमा, मला समजून घे. अगं, माझ्याकडे पैसे असते तर मी तुझ्याकडे तरी असा दीनवाणा होऊन पैशाची याचना केली असती का? मला पैसा उभा करता आला असता तरी मी तुला एका शब्दाने पैसे मागितले नसते अन् तुझे आईवडील जर त्या घरात असते तरी मी चकार शब्दाने घर विकण्याबद्दल बोललो नसतो. ते घर रिकामं पडून आहे. तू अन् हेमाताईच त्या घराच्या वारसदार आहेत. या क्षणी तुला म्हणजे आपल्याला पैशाची गरज आहे तर ते घर विकून आपण पैसा उभा करू शकतो. मी एक एक पैशाचा हिशेब देईन तुला. अन् जे काही पैसे मी घेतोए ना , ते तुला व्याजासकट परत करीन. मला माझ्या मुलीसाठी माझंही आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. एकदाच फक्त माझ्यावर विश्वास ठेव.’’

आठदहा दिवस ओळीने हेच संवाद तो बोलत होता. शेवटी तिने सगळा धीर गोळा करून कसाबसा हेमाताईकडे विषय काढला. हेमाताई एकदम संतापली.

‘‘अगं, आईबाबांची एकमेव आठवण आहे ती. आपलं माहेर, आपल्या बालपणीच्या अगणित आठवणी रेंगाळताहेत त्या घरात. ते घर विकणार नाही. तुझा तो नालायक वसंत सतत पैसे मागतो अन् तू देतेस, गेल्या दोन अडीच वर्षांत त्याने फक्त मनस्ताप दिलाय तुला. सतत काळजी अन् टेन्शन. सुखाचे दिवस नवऱ्याने द्यायचे असतात बायकोला. हा तर फक्त छळ करतोए तुझा. आधी त्याला मूल नको होतं. आता त्याला मुलीचा पुळका आलाय. तिच्या नावावर पैसे काढायला बघतोए. ते घर घशात घालायचं आहे त्याला. तुला हे सगळं कसं कळत नाहीए? शेवटचा पैसा संपल्यावर भीक मागायची वेळ आली म्हणजे कळणार आहे का? अगं तुला मुलगीच मानतो आम्ही दोघं म्हणून आजवरच्या दिलेल्या पैशांचा कधी हिशोब मागितला नाही अन् मागणारही नाही. त्या घरात तुझा वाटा आहेच पण बाहेरच्या कुणा उपटसुंभाला मी तो मिळू देणार नाही…’’ बोलता बोलता हेमाताई रडायलाच लागली.

तिला त्यावेळी कळलं ती किती खुजी आहे. हेमाताईचं तिच्यावर किती प्रेम आहे. सदैव त्या प्रेमापोटी ती सुमाला सांभाळून घेते. पण वेडी सुमा… तिला ताईच्या प्रेमाची मातब्बरी नाहीए. अजूनही तिचा वसंतच्या प्रेमावर विश्वास आहे. खरंच, प्रेम आंधळं असतं.

तिला रडू अनावर झालं. किती तरी वेळ रमण भावोजी अन् हेमाताई तिची समजूत घालत होती. वसंत लफंगा आहे. तुझ्यासारखी भाबडी अन् बापाचा पैसा असलेली सुंदर पोरगी त्याने प्रेमाचं नाटक करून ताब्यात घेतली आहे. गेल्या अडीच तीन वर्षांत त्याने एक पैदेखील कमवली नाहीए. आतासुद्धा पार्टनरने लुबाडलं ही चक्क थाप आहे. मुलीच्या नावाचा वापर करून त्याला सुमाचा उरलेला पैसाही लुबाडायचा आहे.

तरीही सुमाला वाटत होतं की यावेळी ती पैसे वसंतच्या हातात सोपवणार नाही. पण वसंतने काही तरी करणं गरजेचं होतं. घरखर्च कसा चालणार? बँकेत जेमतेम वर्षभर घरखर्च चालेल एवढाच पैसा होता. काहीही करून एकदा वसंतने व्यवसाय सुरू करावा. पैसा मिळवावा, विस्कटलेली संसाराची घडी नीट बसावी एवढीच तिची माफक अपेक्षा होती. त्यासाठीच तिला पैशांची नितांत गरज होती.

रमण भावोजी अन् हेमाताईला समजत होतं की सुमाचं वय अन् समजूत (म्हणजे अक्कल) वसंतची लबाडी लक्षात येईल एवढी नाहीए. ती भाबडी पोर आपला विस्कटलेला संसार पुन्हा सुरळित व्हावा या आशेने हे सगळं करते आहे. रमण भावोजींनी खरं तर आतापर्यंत हेमाच्या वाटणीच्या पैशांपैकीही कितीतरी रक्कम सुमालाच दिली होती. ते स्वत: चांगलं कमवत होते त्यामुळे हेमाला माहेरच्या पैशांची तशी गरज नव्हती. पण वडिलांचा आशीर्वाद व त्यांच्याकडून वारसा म्हणून मिळणारा पैसा शेवटी दोघी बहिणींचा होता. रमण भावोजींनी शेवटी घर विकलं अन् अर्धा पैसा सुमासाठी वेगळा काढला. त्यातील निम्माच त्यांनी सुमाच्या नावावर केला अन् निम्मा शुभीच्या नावाने फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला. काहीही करून त्या हलकट वसंतच्या हाती सगळा पैसा पडू नये म्हणून ती दोघं जपत होती.

पण वसंतच्या हुशारीमुळे त्यांची खटपट निरर्थक ठरली. काही महिन्यांतच वसंतने सगळा पैसा उडवला अन् पुन्हा तीच रडकथा सुरू झाली. आता तर तो दोन दोन महिने घराबाहेर असायचा.

शेवटी घर अन् मुलीची जबाबदारी अंगावर घेऊन ती पुन्हा एकटी उभी होती. दोघांचं नातं अत्यंत कडवट अन् विखारी होतं. काही तरी चुकतंय हे आता तिला जाणवत होतं. मुलीला शाळेत घालताना तिने फक्त स्वत:चं नाव लावलं होतं. फार फार त्रास तिला सोसावा लागला होता. तिचं सगळं अवसान आता संपलं होतं, अगतिकपणे ती रमण भावोजींना म्हणाली होती, ‘‘मला यातून मुक्त करा. मला मोकळा श्वास घ्यायचा आहे.’’

रमणने पोलिसात तक्रार केली. स्वत:चे सोर्सेस वापरून वसंतची माहिती मिळवली होती. खरी परिस्थिती कळली तेव्हा सुमा महिनाभर अंथरुणाला खिळून होती.

वसंतची आधी दोन लग्नं झालेली होती. पहिली बायको वारली…नेमकं काय झालं ते कुणालाच ठाऊक नव्हतं. तिचा खून झाल्याची कुजबुज होती. दुसऱ्या पत्नीला तिच्या दोन मुलांसह वसंतचे आईवडील सांभाळत होते. वसंत अक्षरश: मवाली अन् उनाड होता.

आता वसंतशी असलेल्या नात्याला अर्थच नव्हता. हेमाताईने सुमा व शुभीला आपल्या घरी आणलं. ते घर आवरून, कुलूप घालून बंद केलं. सुमाला सावरायला वेळ लागेल हे त्यांना कळत होतं. शेवटी एकदाचा तिचा घटस्फोट मंजूर झाला. त्या कागदपत्रांवर सही करताना सुमाला वाटत होतं या क्षणी आपलं आयुष्य संपवावं. प्रेमाचा मृत्यू म्हणजे माणसाचाही मृत्यूच ना? ओक्साबोक्शी रडली ती त्या दिवशी.

वर्षंभर हेमा अन् रमणने तिला खूप मायेने, प्रेमाने सांभाळलं. हेमाची इच्छा होती तिने इथेच राहावं पण सुमाला तिथे नको वाटत होतं. आधीच्या कॉलेजच्या गावी जाऊन स्वत:च्या घरी रहावं तेही तिला झेपणारं नव्हतं.

एक दिवस अचानक विलियमने हेमाकडे फोन केला अन् सुमाची विचारपूस केली. सगळी परिस्थिती नीट समजून घेतली. सुमाला इथे नोकरी मिळू शकते. तिने इथे येऊन राहावं, असं सांगितलं.

रमणनेच पुन्हा पुढाकार घेतला. आधीचं लग्नात घेऊन दिलेलं घर विकलं. विलियमच्या शेजारी एक छोटासा फ्लॅट घेऊन दिला. हेमाताईने तिचं घर मांडून दिलं अन् तिचं नवं आयुष्य सुरू झालं.

मेजर आनंदकडे नोकरी करताना तिचं दु:ख, वैफल्य ती विसरली. हळूहळू ती कामं शिकली. स्टोअर सांभाळणं, इन्स्टिट्यूटची कामं, ट्रेड फेयरची व्यवस्था एक ना दोन कामं सतत असायची. तिला मेजर आनंदविषयी अनामिक ओढ वाटत होती.

चंपानेरला त्यांनी एक मोठा मेळा भरवला होता. स्थानिक शेतकरी अन् कलाकारांच्या मालाला सरळ ग्राहक भेटत होता. त्यामुळे हा वर्ग खूष होता. ऑफिस स्टाफचे काही लोक तिथेच रात्रंदिवस राहिले होते. शुभीमुळे ती मात्र सकाळी उठून जाऊन सायंकाळी परत येत होती.

मेळ्याला उत्तम प्रतिसाद होता. सगळं छान सुरळित सुरू असताना एक दिवस अचानकच वादळ व पावसाला सुरुवात झाली. सुमाला शुभीची काळजी वाटली. तिने शुभीला कधीच रात्री एकटं ठेवलं नव्हतं. तिची घालमेल मेजर आनंदच्या लक्षात आली. ते स्वत: गाडी काढून तिला पोहोचवयाला निघाले.

वाटेत गाडी बिघडली. सुमा घाबरली. तिच्या मनात नाही नाही ते विचार येऊ लागले. मेजरने खाली उतरून बॉनेट उघडलं पण फॉल्ट लक्षात येईना. ते पुन्हा गाडीत बसले अन् फोन करू लागले. तिला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेतला. आश्चर्याने ते तिच्याकडे बघू लागले.

‘‘तुम्ही कुणालाही फोन करायचा नाही,’’ ती चिडून ओरडली.

‘‘पण का? मेकॅनिकला फोन करावाच लागेल. गाडी नीट झाली नाही तर आपण जाणार कसे? काय झालंय तुम्हाला?’’ आश्चर्याने त्यांनी विचारलं.

‘‘मी आधी फोन करणार.’’ तिने विलियमला फोन लावला. मेजर गाडीतून उतरून एका झाडाला टेकून उभे राहिले. दोन्ही हात पॅण्टच्या खिशात होते अन् ते सुमाकडे आश्चर्याने बघत होते.

पाऊस पडतोय, रस्त्यावर सामसूम, संध्याकाळ दाटून आलेली. सुमाच्या मनात एक अनामिक भीती अन् तिचं लक्ष मेजरकडे गेलं. ते पावसात भिजत अजूनही झाडाला टेकून उभे होते. सुमाला स्वत:चीच लाज वाटली. इतक्या चांगल्या माणसाविषयी आपण चुकीचा विचार केलाच कसा याचं वैषम्यही वाटलं.

गाडीचं दार उघडून ती बाहेर आली अन् गारठ्याने शहारली.

‘‘सर, आत या,’’ तिने म्हटलं.

‘‘का?’’ त्यांनी हसत विचारलं.

‘‘तुम्हीही भिजलात अन् मीही भिजतेय…या ना,’’ तिन वैतागून म्हटलं.

ते गाडीत येऊन बसले. ‘‘आता माझी भीती नाही ना वाटत?’’ त्यांनी हसून विचारलं अन् फोन लावला. फोन लागला. ते काही बोलले. पलीकडून जे काही सांगितलं गेलं ते ऐकून ते वैतागले. ‘‘ओह, नो,’’ ते म्हणाले.

‘‘काय झालं?’’ सुमाने विचारलं.

‘‘दरड कोसळल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. आता सर्व रात्र गाडीतच काढावी लागेल.’’

‘‘बाप रे!’’ तिच्या घशाला कोरड पडली. हातपाय गार झाले होते. आता अशा ओल्या कपड्यात रात्र काढायची?

मेजर आनंदनं कॅम्पमध्ये फोन केला. तिथल्या कार्यकर्त्यांने म्हटलं, ‘‘इथेही खूप पाऊस पडतोए, इथून माणूस पाठवता येणार नाही.’’

‘‘आता काय करायचं?’’ तिने घाबरून विचारलं.

‘‘आता शांत डोक्याने इथेच बसून नामस्मरण करायचं. वाट बघण्याखेरीज काही करता येणार नाही. अरे तुम्ही खूप भिजला आहात. एक काम करा, व्हॅनच्या मागच्या सीटवर बॅगेत काही कपडे आहेत. तुम्ही कपडे बदलून घ्या. माझ्या बॅगेत टॉवेल, थर्मासमध्ये चहा अन् थोडी बिस्किटं आहेत. तुम्ही कपडे बदला मग चहा घ्या. थोडं बरं वाटेल.’’ बॅगेतून धुतलेला टॉवेल तिला देऊन मेजर गाडीतून उतरून झाडाखाली जाऊन उभे राहिले.

मेळ्यातल्या स्टॉलवर विकण्यासाठी तयार केलेले ते कपडे होते. गावातल्या बायका घालतात तसा घाघरा कुरता होता. तिने त्यातला तिच्या मापाचा पोषाख निवडला. गाडीतला दिवा मालवून कपडे बदलले. केस कोरडे केले. ओढणी अंगावर घट्ट लपेटून घेतली. खूप बरं वाटलं. मनोमन तिने मेजरला धन्यवाद दिले.

मेजरना तिने गाडीत बोलावलं. ते स्वत: खूप भिजले होते. पण आर्मीच्या कठोर शिस्तीमुळे त्यांना त्याचा त्रास वाटत नव्हता. त्यांनी तिला चहा दिला. चहा, बिस्किटं घेतल्यावर तिला खूपच छान वाटायला लागलं. मेजरने मागची सीट अॅडजस्ट करून तिच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली. कृतज्ञ नजरेने त्यांच्याकडे बघत तिने प्रश्न केला, ‘‘तुमचं काय?’’

‘‘मी जागा राहीन… मला सवय आहे…तुम्ही शांतपणे झोपा.’’

पाऊस थांबून पडत होता. तिला खरोखर गाढ झोप लागली. सकाळी सहाला मेजरने तिला हलवून उठवलं. रात्रभर त्यांनी केलेल्या फोनमुळे शेवटी एक मेकॅनिक आपल्या सहकाऱ्याबरोबर मोटारसायकलने येऊन धडकला होता.

‘‘चल. तुला आधी घरी सोडतो. आता हा गाडी घेऊन येईल.’’ मेजरने प्रथमच तिला एकेरी हाक मारली होती.

ती घाघरा ओढणी सांभाळून मोटारसायकलवर त्यांच्या मागे बसली.

‘‘सर, आतल्या कच्च्या रस्त्याने जा. मोठ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे टॅफिक जाम आहे,’’ मेकॅनिक म्हणाला. रस्ता खराब होता. ती मेजरना घट्ट धरून बसली होती. या क्षणी तिच्या मनात भीती नव्हती. खूप सुरक्षित वाटत होतं.

बाइक घरासमोर थांबली, ‘‘सर, या ना, चहा घेऊन जा,’’ तिने म्हटलं.

ते फक्त हसले अन् बाइक वळवून निघून गेले. ती वळून घरात आली तेव्हा समोर विलियम उभी होती. तिला अशा पोशाखात बघून ती चकित झाली होती. पण सुमाचं हे रूप तिला आवडलं होतं.

चहा घेताघेता तिने सगळी हकिगत विलियमला सांगितली. तिने कपडे बदलले अन् अंथरुणावर अंग टाकलं. तिला ताप भरून होता.

तिकडे मेजर आनंदही तापाने फणफणले होते. सुमाने यमुनाला फोन करून ती आजारी असल्याचं सांगितलं. यमुनाने खट्याळपणे हसत म्हटलं, ‘‘मेजरही तापाने…तूही तापाने…दोघं एकाच वेळी…त्यातून सारी रात्र एकत्र…काय गं? काय चाललंय?’’

तीही मुक्तपणे हसली. तिला का कोण जाणे पण खूप आनंदी अन् मोकळं मोकळं वाटत होतं. किती तरी वर्षांनी ती अशी मोकळा श्वास घेत होती. तिला वाटलं मेजर आनंदची विचारपूस केली पाहिजे. तिच्यामुळेच ते भिजले होते. तिने त्यांच्यावर संशय घेतला होता. ते तर तिची मदत करत होते. काय गरज होती त्यांना गाडी काढून तिला पोहोचवायची?

तिने फोन केला, ‘‘हॅलो सर, मी सुमा.’’

‘‘बोला, कशा आहात?’’

‘‘मी बरी आहे. तुम्ही कसे आहात?’’

‘‘बराय मी, शुभी कशी आहे? प्रथमच एकटी राहिली ना?’’ तिला नवल वाटलं. तिच्या मुलीचं नाव त्यांना ठाऊक होतं. तिची चौकशी ते करत होते. जन्मदाता बाप तिला विचारत नव्हता. तिला खूप समाधान वाटलं.

तिने हेमाताईला फोन केला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागली. मेजर आनंदविषयी तिच्या मनात आता अपार आदर होता. स्वत:चं दु:ख विसरून इतरांना आनंद देत होते ते. किती माणसं जोडली होती त्यांनी. केवढी मोठी टीम त्यांच्यासाठी राबत होती. पावसाने विस्कळीत झालेला मेळा, त्यातले स्टॉल्स पुन्हा तेवढ्याच उत्साहाने उभारले होते. मेळा यशस्वी झाला होता. सगळेच खूश होते.

सकाळी सुमा झोपून उठली तेव्हा समोर हेमाताईला बधून चकित झाली. ‘‘तू कशी आलीस?’’

‘‘तुला भेटायला आले…तू एक गोष्ट मला सांगितली नाहीस…’’

‘‘काय?’’

‘‘मेजर आनंद…’’

ती गप्प झाली. तिला प्रेमाने जवळ घेत हेमा म्हणाली, ‘‘एक चांगली संधी तुला मिळाली आहे. ती सोडू नकोस.’’ तिच्या समोरच हेमाताईने मेजर आनंदला फोन करून जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं.

मेजर आनंद आले. सहजपणे शुभी अन् हेमाताईला भेटले. त्यांची अदबशीर वागणूक पाहून हेमाताई खूपच प्रभावित झाली. शुभीशीही ते छान बोलले. तिने त्यांना स्वत: काढलेली चित्रं दाखवली.

गप्पा मारत जेवणं झाली. विलियमही जेवायला होती. निरोप घेताना सर्वांच्या समोरच मेजरने तिला विचारलं, ‘‘माझ्याबरोबर माद्ब्राझी जीवनसंगिनी म्हणून राहायला तुला आवडेल?’’

सुमा गप्प होती. तिला शुभीबद्दल काही बोलायचं होतं. मेजरने शुभीला जवळ घेतलं. ‘‘हिला मी माझी मुलगी मानली आहे अन् बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर माझा विश्वास आहे,’’ ते म्हणाले. हेमाताई अन् विलियमने तिच्या वतीने होकार दिला. ताबडतोब हेमाताईने रमणला फोन लावून लगेच यायला सांगितलं.

रमणने आपल्या परीने सगळी विचारपूस केली अन् लग्नाचा दिवसही नक्की केला.

साध्या पद्धतीने, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडला.

हेमाताईने तिला नववधूसारखी नटवून रात्री मेजरच्या खोलीत पाठवून दिली. किती तरी वर्षांनी आज तिचं हृदय जोरात धडधडत होतं. मेजर खोलीत आले. त्यांनी तिचा हात हलकेच हातात घेतला अन् हलकेच तिच्या गालावर चुंबन घेत म्हटलं, ‘‘आयुष्यभर एकमेकांचे उत्तम मित्र म्हणून राहू. सहयोगी अन् जीवनसाथी म्हणून प्रेम करू. मग एक सांग, तुला माझी भीती नाही ना वाटत?’’

ती लाजली अन् तिने त्यांना मिठी मारली. त्यांनीही तिला मिठीत घेतलं. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी तिची अवस्था झाली होती.

नातं जन्मांतरीचं – दूसरा भाग

(अंतिम भाग)

दिर्घ कथा * रजनी दुबे

आत्तापर्यंत आपण वाचलंत :

आयएएसच्या कोचिंगसाठी पारूल दिल्लीतल्या एका गर्ल्स होस्टेलमध्ये येऊन राहिली होती. एकदा ती जेवायच्या सुट्टीत बाहेर पडली अन् पावसात अडकली. पावसापासून बचाव व्हावा म्हणून ती एका बंगल्याच्या व्हरांड्यात जाऊन उभी राहिली. तेवढ्यात आतून रांगत एक लहान मुलगी व्हरांड्यात आली. पारूलनं तिला उचलून घेतलं व ती घरात गेली. तिथं बाळाची आजी भेटली. मग पारूल रोजच तिला व आजींना भेटायला जाऊ लागली. तिथंच डॉ. प्रियांशुशी भेट झाली. त्यानं पारूलला लग्नाची मागणी घातली. दोन्ही घरातून या नात्याला सहर्ष स्वीकृती मिळाली. पारूल लग्न होऊन घरी आली. प्रिया, ते बाळ म्हणजे डॉ. प्रियांशुच्या दिवंगत बहिणीची मुलगी होती. बाळाच्या वडिलांचा घरात कधी उल्लेख होत नव्हता. पण पारूलला एकदा त्यांचा पत्ता मिळाला व तिनं शेखरला, प्रियाच्या वडिलांना पत्र टाकलं…

आता पुढे वाचा :

सुमारे एक महिन्यानंतर घराची डोअर बेल वाजली. बाहेर कुणी अनोळखी माणूस उभा होता. ‘‘डॉ. प्रियांशु, मिसेस पारूल व कमलाबाईंना बोलवा. कोर्टाचं समन्स आहे,’’ त्यानं म्हटलं. एव्हाना आई पण तिथं आल्या होत्या. त्यानं आमच्या सह्या घेऊन काही कागद आम्हाला दिले व तो निघून गेला. मी ते कागद जेव्हा वाचले, तेव्हा घेरी येईल की काय असं मला वाटलं. शेखरनं आमच्यावर केस केली होती. आम्ही त्याच्या नावाचा वापर प्रियंवदाच्या अनौरस मुलीचा बाप म्हणून केल्याचा आरोप आमच्यावर केला होता. त्याखेरीज त्याची बेअब्रू केली होती व त्याच्या संपत्तीवर अधिकार सांगत होतो असंही त्यात म्हटलं होतं.

एवढंच नाही तर बिचाऱ्या निरागस प्रियालाही त्यात त्यानं ओढलं होतं. प्रतिवादी क्रमांक ४ प्रिया-वय-९ महिने. (आत्मजा-वडील अज्ञात) मला एकदम धक्काच बसला, कुणी माणूस एवढा निष्ठूर कसा होऊ शकतो अन् इतक्या खालच्या पातळीवर कसा उतरू शकतो? मला रडूच यायला लागलं. आई पण रडत होत्या. त्या सर्व कागदपत्रात माझ्या पत्राची झेरॉक्सही टाचणीनं लावलेली होती. त्याचाच आधार घेत त्या हलकट माणसाने कोर्टात धाव घेतली होती अन् कोर्टाला विनंती केली होती की आम्ही प्रियाच्या वडिलांच्या जागी त्याचं नाव लावण्यावर प्रतिबंध करण्यात यावा. नुकसानभरपाई म्हणून त्यानं आमच्याकडून काही लाख रूपये मागितले होते. मी तर हतबद्ध झाले.

तेवढ्यात मम्मींनी फोन करून प्रियांशुला घरी बोलावून घेतलं. त्या दिवशी प्रथमच मी त्यांना इतकं संतापलेलं बघितलं…प्रथम अन् शेवटचंही.

माझे खांदे धरून गदागदा हलवत ते म्हणाले, ‘‘काय गरज होती त्या हलकटाला पत्र लिहिण्याची? मुळात तो माणूसच नाहीए. आधी प्रियंवदाला नादी लावलं. जेव्हा बाबा तिला संपत्तीत थारा देत नाहीत हे लक्षात आलं, तेव्हा त्यानं तिला गरोदर अवस्थेत एकटी टाकली अन् निघून गेला. ती बिचारी उपाशी तापाशी बेशुद्धावस्थेत पडलेली शेजाऱ्यांनी बघितली अन् तिला सरकारी इस्पितळात घेऊन गेले. माझ्या सुर्दैवानं माझा एक डॉक्टर मित्र तिथं काम करत होता. त्यानं प्रियंवदाला ओळखलं अन् मला फोन केला. मी तिथं पोहोचलो. बहिणीला घरी आणली. विचार कर, ज्या मुलीचा बाप इतका प्रतिष्ठित डॉक्टर, भाऊ परदेशातून डिग्री घेऊन आलेला, स्वत:चं हॉस्पिटल अन् ती अनाथासारखी मळकट, फाटक्या कपड्यात किती दिवसांची उपाशी सरकारी दवाखान्यात होती. आम्ही तिला घरी आणली, तोवर फार उशीर झाला होता. प्रियाला जन्म देतानाच ती मृत्यू पावली. बाबांनाही या गोष्टीचा फारच धक्का बसला…थोडे दिवस आधी आम्हाला कळलं असतं तर प्रियंवदाला आम्ही वाचवू शकलो असतो.’’

थोडे क्षण थांबून पुन्हा प्रियांशु बोलायला लागले. ‘‘मग आम्ही प्रियंवदाच्या मृत्यूची बातमी त्याला दिली. मेरठला त्याच्या घरी गेलो. बायकोच्या चितेला अग्नि देण्यासाठी त्याला विनंती केली. पण तो नालायक साफ नाही म्हणाला.’’

त्याचे वडिल म्हणाले, ‘‘हे बघा, जे व्हायचे, ते घडून गेलंय. आता या गोष्टीची उगीच फार वाच्यता करू नका. तुमच्या मुलीच्या नादात तो आम्हाला दुरावला होता. त्याला एकापेक्षा एक चांगली स्थळं सांगून येताहेत. आम्ही त्याचं लग्न करतो आहोत. इथलेच चांगले खानदानी लोक आहेत. तुम्ही निघा…उगीच तमाशे नकोत.’’ मुकाट्यानं मी व बाबा परत घरी आलो. त्या धक्क्यानं पाच दिवसातच बाबा गेले. एक दिर्घ श्वास सोडून यांनी पुन्हा माझ्याकडे रागानं बघितलं अन् म्हणाले, ‘‘त्या नरपशूचं नावही मला ऐकायला नको वाटतं अन् तू हे काय करून बसलीस?’’

मी फक्त रडत होते. बोलणार काय? केवढा अनर्थ करून बसले होते. काही वेळ कुणीच काही बोललं नाही. मग मी डोळे पुसून म्हटलं, ‘‘एकदा वकील काकांचा सल्ला घेऊयात का?’’

आईही म्हणाल्या, ‘‘हो रे, एकदा वकील साहेबांना भेटून तर घ्या. मग काय करायचं ते बघू.’’

हे मुकाट्यानं माझ्यासोबत आले. आम्ही दोघं वकिलकाकांच्या घरी गेलो.

लग्नापूर्वी मी त्यांच्याकडे जातच होते. कधी कधी त्यांच्याबरोबर कोर्टातही जात होते. काका त्यांच्या ऑफिसमध्येच बसलेले होते. आम्ही सगळे कागद त्यांच्या पुढ्यात ठेवले.

त्यांनी लक्षपूर्वक सगळे पेपर्स बघितले. मग म्हणाले, ‘‘घाबरण्यासारखं काहीच नाहीए. फक्त लग्न झालं होतं हे सिद्ध करावं लागेल. लग्नाचा फोटो अन् मॅरेज सर्टिफिकेट लागेल. मुलीचं बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेच.’’

प्रथमच प्रियांशु म्हणाले, ‘‘फोटो प्रियंवदानं पाठवला होता, पण बाबांनी रागानं तो फाडून टाकला. बहुधा त्यातच लग्नाचं सर्टिफिकेटही असेल.’’

वकील काका विचारात पडले. म्हणाले, ‘‘हा माणूस फारच कलुषित प्रवृत्तीचा दिसतोय. पूर्ण तयारीनिशी तो कोर्टात गेलाय…तरी हरकत नाही. लग्नाचे कुणी साक्षीदार तर असेलच ना? कोणी मित्र, मैत्रीण, भटजी, शेजारी…त्यांची साक्ष आपल्याला काढता येईल.’’

वकील काकांकडून सगळं नीट समजून घेऊन अन् साक्षीदार कसे मिळवायचे याचा विचार करून आम्ही तिथून निघालो. चार पाच दिवस सतत आम्ही प्रियवंदाचे मित्रमैत्रीणी आणि शेजारी शोधत होतो. पण दिल्लीसारख्या महानगरात ते काम सोपं नव्हतं. किती मंदिरं, किती देवळं, पंडित, भटजींना विचारलं. प्रियंवदाच्या मित्र मैत्रिणींना तर तिच्या प्रेमप्रकरणाची व लग्नाचीही कल्पना नव्हती. प्रत्येकाचं म्हणणं होतं की ती इतकी शांत अन् सज्जन मुलगी होती की शेखरसारख्या मुलाबरोबर तिचं प्रेमप्रकरण असणं शक्यच नाही. शेखरच्या काही मित्रांनां ती दोघं बरोबर फिरायची एवढं ठाऊक होतं, पण लग्नाबद्दल माहीत नव्हतं. पूर्वी जिथं प्रियंवदा राहत होती अन् ज्या शेजाऱ्यांनी तिला इस्पितळात दाखल केलं होतं, ती माणसंही आता तिथं राहत नव्हती. सात दिवस सतत भटकल्यानंतर आम्ही पुन्हा वकील काकांसमोर होतो. आमच्याकडे एकही पुरावा नव्हता. प्रियाच्या जन्माचं प्रमाणपत्र होतं, पण त्यावरच शेखरनं आक्षेप घेतला होता की स्वत:चं इस्पितळ असल्याचा फायदा घेऊन प्रियांशु त्यांना कारण नसताना प्रियाचे वडिल असल्याचं म्हणताहेत. काय करावं तेच आम्हाला सुचत नव्हतं.

वकील काका म्हणाले, ‘‘कोर्टात फक्त पुरावे लागतात. शेखरनं आधीच सगळी फिल्डिंग सज्ज करून ठेवली आहे. त्याला खोटा ठरवायला आपल्याकडे काहीच पुरावा नाहीए.’’

मला खरंतर बिचाऱ्या प्रियंवदाचा खूपच राग आला. दिल्लीसारख्या शहरात राहणारी, श्रीमंत घरातली मुलगी इतका मूर्खपणा कसा करू शकते. कुठल्याही पुराव्याशिवाय लग्न केलं…मूल होऊ घातलेलं अन् नवरा सोडून गेल्यावर मुकाट उपाशी राहिली, पण आता चिडून रागवूनही उपयोग नव्हता. ‘‘आपण प्रोटेस्ट करू शकतो,’’ असं वकील काका म्हणाले.

‘‘तो कोर्टात जिकंला तर काय होईल?’’ प्रियांशुनं विचारलं.

‘‘प्रियाला बाप म्हणून शेखरचं नाव लावता येणार नाही…अन् त्याच्या इस्टेटीत वाटा मिळणार नाही,’’ वकील काकांनी समाजावलं.

काही वेळ विचार करून प्रियांशु म्हणाले, ‘‘प्रियाला बाप म्हणून त्याच्या नावाची गरजच नाहीए अन् संपत्तीचं म्हणाल तर बाबांनी प्रियंवदाच्या नावानं ठेवलेली संपत्तीच इतकी आहे की प्रियाला कधीच आयुष्यात दहाद भासणार नाही.’’

‘‘मग तर सोपेच झाले,’’ वकील काका म्हणाले, ‘‘तुम्ही कोर्टात जाऊच नका. हजर राहिला नाहीत तर कोर्ट एकतर्फी डिक्रि त्याला देईल.’’

मला हे खरं तर पूर्णपणे पटलं नव्हतं. पण आम्हाला दुसरा काही पर्यायही उपलब्ध नव्हता. जेव्हा जेव्हा मी प्रियाला बघायचं, तेव्हा तेव्हा मला त्या नोटीशीमधला (आत्मजा-वडील अज्ञात) हे शब्द फारच खटकायचे. मी शेखरला ते पत्र लिहिण्याचा भोचकपणा केला नसता तर ही वेळच आली नसती. दिवस सरतच होते. एक दिवस टपाल आलं त्यात शेखरचं पत्र अन् कोर्टाच्या निर्णयाची कॉपी होती. त्यात प्रिया शेखरची मुलगी नाही अन् मी, आई व प्रियांशुनं तिचे वडिल म्हणून शेखरचा उल्लेख करू नये अशी तंबी होती. शेखरनं अगदी शिस्तबद्ध डाव टाकला होता.

मी बराच वेळ ती पत्रं हातात घेऊन बसून होते. आईंना व प्रियांशुला कसं सांगावं याचा विचार करत होते. एकाएकी मला काय सुचलं तर मी प्रियाला कडेवर घेऊन सरळ वकील काकांच्या ऑफिसात पोहोचले. मी जे बोलले त्याला वकिल काकांची पूर्ण सहमती होती. परतताना माझ्या हातात काही महत्त्वाचे पेपर्स होते. मी गेल्या गेल्या ते मम्मींना अन् प्रियांशुना दाखवले. ‘‘यावर प्लीज सही करा,’’ मी म्हटलं. त्यांनी आश्चर्यानं माझ्याकडे बघितलं. प्रियाला कवटाळत मी म्हटलं, ‘‘मी प्रियाला कायदेशीर दत्तक घेऊन माझी मुलगी म्हणून वाढवणार आहे. प्रियाचे वडिल डॉ. प्रियांशु आणि आई पारूल असणार आहे.’’

आईंना तर आनंदानं रडूच फुटलं. त्यांनी मला प्रियाला मिठीत घेऊन खूप आशिर्वाद दिले. प्रियांशुही भिजल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञता होती. आता काम सोपं होतं. आम्ही कोर्टाकडून रीतसर सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रियाला दत्तक घेतलं.

आता तिच्या नावापुढे वडिलांचं नाव होतं डॉ. प्रियांशु. मला खूपच समाधान वाटलं. पण मनांत एक भीती होती की प्रिया मोठी झाल्यावर तिला जर घरातल्या गडी माणसांकडून किंवा बाहेरच्या कुणाकडून काही कळलं तर? त्याचवेळी मला बाळ होणार असल्याची चाहूल लागली. प्रियाला भावंड मिळणार याचा आनंद मला उपभोगता येत नव्हता. शेवटी आईंनी माझ्या बाबांना बोलावून घेतलं. त्यांनी मला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन उपचार केले. त्यांनी प्रियांशुलाही दिल्ली सोडून दूर कुठंतरी जाण्याचा सल्ला दिला. माझ्या बाबांनी सुचवलं, रायपूरला त्यांचं हॉस्पिटल आहेच. मोठं घरही आहे. प्रियांशु तिथं प्रॅक्टिस करू शकतील. प्रियांशु व बाबांनी मिळून रायपूरचं हॉस्पिटल आधुनिक करून घेतलं. रायपूरचं घरही रिनोव्हेट करून त्याला दिल्लीच्या घरासारखं करून घेतलं. माझ्या व प्रियाच्या सुखासाठी आईही रायपूरला राहायला कबूल झाल्या. एवढी सगळी तयारी झाल्यावर लहानसा प्रियंक आणि त्याहून थोडी मोठी प्रिया यांना घेऊन आम्ही रायपूरला आलो.

माहेरी आता कुणी नव्हतंच. माझे काकाकाकू मुलाकडे कॅनडाला होते. इथं कुणालाही प्रियाच्या पूर्वायुष्याबद्दल काहीही माहीत नव्हतं. दोघं मुलं माझीच म्हणून वाढत होती. प्रिया तर आधीपासून मला आई अन् यांना बाबा म्हणत होती. या वातावरणात आम्ही लवकरच रूळलो. उत्तम डॉक्टर म्हणून प्रियांशुनंही इथं लवकरच जम बसवला.

आयुष्य मजेत चाललं होतं. दोन्ही मुलं अभ्यासात अन् इतर एक्टीव्हिटीजमध्ये अव्वल होती. आपसात दोघांचं छान पटायचं. प्रिया त्यावेळी नववीत असेल.

अवचित तिने मला प्रश्न केला, ‘‘मम्मा, आजोबा सांगत होते तुला कलेक्टर व्हायचं होतं…मग का नाही झालीस?’’ मी यांच्याकडे बघितलं. ते म्हणाले, ‘‘कलेक्टर व्हायचं होतं, पण तुझ्या मम्माला तुझी आई होण्याची फार घाई झाली होती, त्यामुळे ती आई झाली अन् मग कलेक्टर व्हायचं राहून गेलं.’’

मी म्हटलं, ‘‘बाळा, माझं स्वप्नं होतं कलेक्टर व्हायचं. पण तुझे बाबा मला बघून असे माझ्या प्रेमात पडले की मला त्यांच्याशी लग्न करावंच लागलं. मग तू मिळालीस आम्हाला अन् मला आपल्या स्वप्नाचा विसर पडला.’’ बोलता बोलता मी त्या जुन्या काळात रमले.

प्रियाला काय वाटलं कुणास ठाऊक. माझ्या गळ्यात हात घालून म्हणाली, ‘‘डोंट वरी मम्मा. तुझं स्वप्नं आता तुझी मुलगी पूर्ण करेल.’’ मग भावाचा कान धरून म्हणाली, ‘‘हे बघ रे, मी आता डॉक्टर होणार नाही. डॉक्टर तुला व्हायचंय. मी आता कलेक्टर होणार. आईचं स्वप्नं पूर्ण करणार.’’

त्या दिवशीपासून ती खरंच अशा उत्साहानं अभ्यासाला लागली की मला तिचं कौतुकच वाटलं. तिनं सायन्सचे विषय बदलून आर्टसचे विषय घेतले. एम.ए. झाल्यावर यूपीएससीच्या परीक्षा दिल्या. तिथं यश मिळवल्यावर मसुरीला ट्रेनिंग पूर्ण केलं. त्यानंतर तिची नेमणूक रायपूरलाच अतिरिक्त कलेक्टरच्या पदावर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून झाली. तिच्या बॅचची अजून सहा मुलं होती. आम्ही त्या सर्वांनाच डिनरसाठी बोलावलं. सगळीच मुलं हुशार, मनमिळाऊ, अत्यंत सुसंस्कृत अन् तरूण वयाला साजेशा उत्साहानं ओतप्रोत अशी होती. मजेत जेवणं आटोपली. माझ्या लक्षात आलं की त्यापैकी एका मुलाशी प्रियाची वागणूक थोडी वेगळी होती. तोही तिच्याकडेच अधिक लक्ष देत होता. त्यांनी आपापली ओळख करून दिली, तेव्हा कळलं होतं की त्याचं नाव शरद आहे. तो गुजरातमधला आहे. वडील आर्मीत आहेत. मी एकदम ‘मुलीची आई’ या भूमिकेतून त्याच्याकडे बघायला लागले. प्रियासाठी, तिचा नवरा म्हणून मला हा मुलगा एकदमच आवडला. दोघं एकमेकांना ओळखतात अन् बहुधा ती एकमेकांच्या प्रेमातही असावीत…मी यांना तसं बोलूनही दाखवलं. पण यांनी माझं म्हणणं पार उडवून लावलं. ‘‘अगं, किती जुन्या पद्धतीनं विचार करतेस? नव्या काळातली मुलं आहेत. आपसात मोकळेपणानं राहतात. तू लगेच प्रेमात आहेत वगैरे कसं ठरवतेस?’’ मी मात्र माझ्या मुद्दयावर ठाम होते अन् दोनच दिवसात मला त्याची प्रचिती आलीय. सायंकाळी प्रिया घरी आली तेव्हा तिच्या बरोबर शरदही होता. मी लगेच चहा फराळाची तयारी केली. ते सगळं आटोपत आलं तेव्हा शरद अन् प्रियाच्या एकमेकांना काही खाणाखुणा सुरू आहेत, असं माझ्या लक्षात आलं.

मी एकदम सावध झाले. एखादी गोष्ट हवी असली किंवा स्वत:च्या मनासारखं करून घ्यायचं असलं की दोन्ही मुलं मला आई म्हणतात. एरवी मी मम्मा असते. मी ही म्हटलं, ‘‘बोल ना, काय म्हणतोस?’’

मग शरदनं अगदी शांतपणे प्रियाच्या व त्याच्या ओळखीपासून सगळी हकीगत सांगितली. स्वत:बद्दलही सांगितलं. वडिल आर्मित ब्रिगेडियर आहेत. आईही सोशल वर्कर आहे. तो एकच मुलगा. बहीण विवाहित आहे. त्यांच्या घरी प्रिया सर्वांना पसंत आहे. त्याची प्रियाशी लग्न करण्याची इच्छा आहे. प्रियाही त्याला पसंत करते. त्याला आता माझी अन् बाबांची संमती हवी आहे. मला तर मुलगा आवडलाच होता. प्रियांशुचीही या नात्याला हरकत नव्हती…पण त्याचवेळी मला वाटलं की शरदला प्रियाच्या दत्तक प्रकरणाबद्दल माहिती असायला हवी. मी त्याला म्हटलं, ‘‘मला जरा तुझ्याशी एकट्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे.’’

प्रिया हसत हसत म्हणाली, ‘‘बघ रे बाबा, आई नक्की तुला ब्लॅकमेल करेल, माझ्या मुलीचा पिच्छा सोड, भरपूर पैसे देते म्हणेल, तर ते पैसे ठेऊन घे. फिल्मी हिरोसारखा पैसे नको म्हणू नकोस, उलट ती ऑफर करेल त्यापेक्षा अधिकच पैसे माग…मग आपण शॉपिंगला जाऊ.’’

मी तिच्या विनोदाकडे दुर्लक्ष करून शरदला माझ्या खोलीत घेऊन गेले. खोलीचं दार बंद करून घेतलं. कपाटातून ती जुनी फाईल काढली. त्याला सांगितलं, ‘‘प्रिया माझी व प्रियांशुची मुलगी नाही. आम्ही तिला दत्तक घेतलीय. ती प्रियंवदाची व शेखरची मुलगी आहे.’’ सगळी हकीगत सांगितली. जुनी कागदपत्रं दाखवली.

‘‘प्रियाला किंवा कुणालाच हे सत्य ठाऊक नाही. मी तर तिला स्वत:च्या रक्ताचीच मुलगी मानते, पण…तू आता तिचा आयुष्याचा जोडिदार होतो आहेस, तेव्हा तुला हे माहीत असायला हवं, या भावनेतून हे सगळं सगळं सांगितलं आहे. काय निर्णय असेल तो सांग.’’

मी जे केलं ते योग्य अयोग्य मला कळत नव्हतं. हे सगळं उघड करायला हवं होतं की नव्हतं? मुलीचं आयुष्य मी स्वत:च उद्ध्वस्त करत होते का?

मी डोळे मिटून घेतले. शरदनं माझे हात आपल्या हातात घेतले व म्हणाला, ‘‘मम्मा, यू आर ग्रेट…सगळं मला सांगितलंत, एवढा विश्वास माझ्यावर ठेवला याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रियाशी लग्न करणार हा निश्चय आता अधिकच दृढ झाला आहे. तुम्ही अगदी निर्धास्त राहा.’’

त्यानंतर शरदचे आईवडिल आमच्याकडे आले. खेळकर वातावरणात आमची भेट द्ब्राली. साखरपुडा करून घ्यायचा असं ठरलं. प्रियंकही एव्हाना त्याचं एम.एस पूर्ण करून अमेरिकेहून परतला होता. आम्ही हॉटेलातच हा समारंभ आयोजित केला होता. माझ्या बाबांचे आर्मीतले, रिटायर झालेले मित्र राज्यपाल झाले होते. बाबांनी नातीच्या साखरपुड्यात त्यांनाही बोलावलं होतं. प्रिया व शरदचे कलीग, मित्रमैत्रीणी, शरदच्या घरचे, अगदी जवळचे नातेवाईक, आमची परिचित मंडळी असे सगळे जमले होते. समारंभ खूपच आनंदात व उत्साहात पार पडला…त्याच समारंभाचे फोटो बघत असताना तो फोन आला होता.

आता मी पूर्णपणे शुद्धीवर आणि भानावरही आले होते. प्रिया कुठाय माझ्यावर रागावली आहे का ती? तेवढ्यात मुलगा जागा झाला. धडपडून उठला अन् माझ्या जवळ येत आनंदानं ओरडला, ‘‘आई… कसं वाटतंय? तुझ्या लाडक्या लेकीनं तर मला गेले चार दिवस धारेवर धरलं होतं. काल तेव्हा मी परोपरीनं समजावलं की आई आता पूर्ण बरी आहे, उद्या सकाळपर्यंत डोळे उघडेल तेव्हा कुठं बाबांना घरी घेऊन जाण्याच्या निमित्तानं तिला घरी पाठवली. दोघंही शंभरदा बजावून गेलेत की रात्री जरी आई शुद्धीवर आली तरी ताबडतोब फोन कर…’’

तेवढ्यात त्याची नजर दाराकडे गेली अन् तो म्हणाला, ‘‘घ्या, हे आलेच तुमचे देवदास अन् तुझी चमची…न बोलावता हजर व्हायची सवय आहे ना?’’ त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होतं. आनंदानं चेहरा उजळला होता.

मी बघितलं दारातून प्रिया अन् प्रियांशू त्वरेनं आले अन् माझ्या बेडशेजारी येऊन उभे राहिले. प्रिया तर माझ्या छातीवर डोकं ठेवून रडायलाच लागली…‘‘काय हे आई, किती घाबरवून सोडलंस गं! माझ्या लग्नाच्या दु:खानं जर असं झालं असेल तर मला लग्नच करायचं नाही…’’

मुलगा लगेच म्हणाला, ‘‘पुरे गं, आईला आनंद सहन झाला नाही. तिला खूपच आनंद झालाय…खरं तर आनंदानं हार्ट अटॅक मला यायचा की चला, घरावरचं एक संकट शरदकडे गेलं. आता घरावर एकछत्र साम्राज्य माझं!’’

प्रियानं खोट्या रागानं त्याचा कान धरला. ‘‘मोठा आलाय अमेरिकेतून शिकून. चार दिवस लावलेस आईला बरं करायला…आधी डॉक्टरी तर कर नीट. मग कर घरावर साम्राज्य.’’

दोघांचं ते प्रेमळ भांडण बघून मला किती छान वाटत होतं. प्रिया अगदी नॉर्मल वाटत होती म्हणजे तो आज नसावा…मला थोडं निवांत वाटलं.

एका आठवड्यातच मी घरी निघाले होते. शरद गाडी चालवत होता. प्रियांशु त्याच्या शेजारी होते. प्रिया माझ्या शेजारी होती. अचानक तिनं म्हटलं, ‘‘मला कळलंय, तुला कसला धक्का बसला…का तुला अॅडमिट करावं लागलं. तो माणूस आला होता, ज्याच्यामुळे हे सगळं घडलं.’’

मी दचकून तिच्याकडे बघितलं. प्रियांशुनं मागे वळून बघितलं अन् म्हणाले, ‘‘होय पारूल, तो आला होता. अगं, मला एकदम समजेना काय करावं ते, पण फार बरं झालं तू शरदला सगळं समजावून सांगितलं होतंस अन् ती फाइल कुठं होती ते ही त्याला ठाऊक होतं. त्यानंच प्रियाला ती सारी कागदपत्रं दाखवली. मी प्रियाला सगळी खरी खरी हकीगत सांगितली. या दोघांनी तर त्याला असा काही झापलाय की काय सांगू. माझ्या बहिणीच्या अन् बाबांच्याही आत्म्याला शांती मिळाली असेल.’’

मला आता एकूणच सगळं काही जाणून घ्यायची उत्सुकता वाटत होती. त्याचा सगळा पैसा त्याच्या नालायक मुलांनी उधळला होता. एक कुठंतरी फरार होता. दुसरा भीक मागत होता. त्यानं विचार केला असेल की तुला धाक दाखवून पैसा मिळवता येईल. पण तू तर त्याचा फोन ऐकूनच बेशुद्ध पडलीस, हॉस्पिटलला अॅडमिट करावं लागलं. तो घरी आला तर प्रियाच सामोरी आली. तो विचार करून आला होता की मुलीकडून दर महिन्याला काही पैसे त्याला जीवन जगण्यासाठी मिळावेत. पण शरद आणि प्रियानं ते कागद त्याच्या डोळ्यापुढे नाचवले. प्रियानं तर त्याला धमकावलंच…तू कोण? मी तुझी मुलगी नाही. तू माझा बाप नाही असं कोर्टातून तू लिहून घेतलंस ना? तर मी तुला पैसे का म्हणून द्यायचे? केस आता मी ठोकते तुझ्यावर. तुझ्यामुळे माझी आई इस्पितळात आहे. आमच्या कुटुंबाला तुझ्यामुळे त्रास झालाय. एवढं बोलून प्रिया थांबली नाही. तिनं सरळ एसपीला फोन केला. पोलीस संरक्षण हवंय…ताबडतोब पोलीस आले. त्याला घेऊन गेले. दोन दिवस होता पोलीस कोठडीत.

प्रियानं मला मिठी मारली. ‘‘तुझी मुलगी काही लेचीपेची नाहीए आई. अन् आपलं नातंही तकलादू नाहीए…कुणाच्या धमकीनं ते तुटेल असं तुला वाटलंच कसं? अगं, त्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता…आता कळेल त्याला…उपाशी मरेल तो…’’

माझ्या लेकीला जणू माझा चेहरा वाचता आला. मला आश्वस्त करत म्हणाली, ‘‘आई, काळजी करू नकोस. मी आणि शरदनं मेरठच्या कलेक्टरला फोन करून त्याला वृद्धाश्रमात ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जोपर्यंत जगेल तोवर त्याला निराश्रित म्हणून पेन्शन मिळेल…अगदी उपाशी अन् रत्यावर नाही राहणार.’’

मी भरल्या डोळ्यांनी, तिच्या सुबुद्धपणाचं कौतुक वाटून तिच्याकडे बघत होते. परत मला बिलगत ती म्हणाली, ‘‘मला या जगात आणण्याचे त्याचे उपकार आहेतच ना? त्याशिवाय मला तुझ्यासारखी आई कशी मिळाली असती? तेच कर्ज फेडलंय मी. आता फक्त कृपा करून मी त्याला भेटायला जाईन किंवा याहून अधिक काही करेन अशी अपेक्षा करू नकोस.’’

मी हसून तिला कुशीत घेतली. घर आलं होतं. गाडी थांबली. प्रियानं मला सांभाळून उतरवून घेतलं अन् आधार देऊन घरात नेऊ लागली. आमचं नातं कागदावर झालं होतं पण ते रक्ताच्या नात्याहून अधिक गाढं अन् मनोज्ञ होतं…जणू जन्मांतरीचं नातं होतं.                             (समाप्त)

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें