* कुसुम सावे
‘‘अरे वा आई, कानातले खूपच सुंदर आहेत. कधी घेतलेस? रंजोने आपली आई प्रभाच्या कानातल्या झुमक्यांकडे पाहत विचारले.
‘‘गेल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा सूनबाई अपर्णाने मला हे झुमके आणि तुझ्या वडिलांना घडयाळ दिले. तिने हे सर्व कधी खरेदी केले ते समजलेच नाही,’’ प्रभाने सांगितले.
डोळे विस्फारत रंजो म्हणाली, ‘‘वहिनीने दिले? अरे वा. त्यानंतर उसासा टाकत म्हणाली, मला तर तिने कधीच असे काही घेऊन दिले नाही. सासू-सासऱ्यांना मस्का मारत आहे. भरपूर मस्का लाव.’’ तिचे लक्ष कानातल्यांकडेच होते. ती म्हणाली, ‘‘कोणी का दिले असेना, पण आई मला तुझे झुमके खूपच आवडले.’’
आवडले असतील तर तुला घेऊन टाक बाळा, त्यात काय मोठे? असे म्हणत प्रभाने लगेचच कानातून झुमके काढून रंजोला दिले. आपण दिलेले झुमके सासूने तिच्या मुलीला देऊन टाकले, हे समजल्यावर अपर्णाला काय वाटेल? याचा विचार प्रभाने एकदाही केला नाही.
प्रभाने झुमके देताच रंजोने लगेचच ते स्वत:च्या कानात घातले. त्यानंतर नाटकी चेहरा करीत म्हणाली, ‘‘तुला मनापासून द्यायचे नसतील तर हे झुमके परत घे आई, नाहीतर मागाहून घरातले, खास करून बाबा म्हणतील की जेव्हा कधी रंजो येते, तेव्हा काही ना काही घेऊन जातेच.’’
‘‘असे काय बोलतेस बाळा, कोण कशाला काय म्हणेल? आणि तुझा या घरावर हक्क नाही का? तुला आवडले असतील तर तूझ्याकडेच ठेव. तू घातलेस किंवा मी घातले, त्यात काय मोठे? माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.’’
‘‘खरंच आई? अरे वा... तू किती चांगली आहेस’’, असे म्हणत रंजोने आईला मिठी मारली. नेहमी ती अशीच वागायची. जे आवडायचे ते स्वत:कडे ठेवायची. ती वस्तू समोरच्यासाठी किती मोलाची आहे, याचा ती साधा विचारही करीत नसे. खूप प्रेमाने आणि पै पै जोडून अपर्णाने आपल्या सासूसाठी ते झुमके विकत घेतले होते. पण, प्रभाने कसलाच विचार न करता ते मुलीला दिले. ती सांगू शकत होती की, हे झुमके तुझ्या वहिनीने खूपच प्रेमाने मला विकत घेऊन दिले आहेत, त्यामुळे मी तुला असेच दुसरे घेऊन देईन. पण, मुलीसमोर सुनेच्या भावनांची कदर प्रभाने कधीच केली नाही.