कथा * सुधा कस्तुरे
‘आजी, अगं, तुला ठाऊक आहे का? आईनं लग्न केलंय.’’ माझ्या पंधरा वर्षांच्या नातीनं मला सांगितलं. सकाळच्या प्रहरी तिच्याकडून ही बातमी ऐकून बॉम्ब पडल्यासारखी मी हादरले.
‘‘तुला कसं समजलं? फोन आला होता का?’’
‘‘नाही, फेसबुकवर पोस्ट केलंय,’’ रीनानं म्हटलं.
मी घाईनं तिच्याकडून मोबाइल घेतला. त्या पुरूषाचं प्रोफाइल बघून मी हतबद्ध झाले. तो पाकिस्तानातला होता. मी दोन्ही हातांनी माझं डोकं दाबून धरलं, ‘‘ही मुलगी काय करेल ते थोडंच आहे. का अशी छळतेय ती आम्हाला?’’ मी स्वत:शीच पुटपुटले.
रीनानं लगेचच आपल्या आईला ‘अनफ्रेंड’ केलं. दहावीला आहे. अगदी लहान नाहीए. बरंच काही कळंत तिला.
घरात एकदम शांतता होती. माझे पती घरी नव्हते. थोड्या वेळानं ते घरी आल्यावर त्यांना ही बातमी समजली. तेही हादरलेच! मग थोड्या वेळानं म्हणाले, ‘‘बरं झालं. निदान लग्न करून स्वत:चा संसार मांडावा अन् आम्हाला जबाबदारीतून मुक्त करावं. निदान स्वत:च्या मुलांना सांभाळावं. आता या वयात आम्हाला नातवंडं सांभाळून होत नाहीत...तू शांत हो...काळजी करू नकोस.’’
‘‘काळजी आहेच हो! मुक्ती कुठली मिळतेय? उलट जबाबदारी वाढलीच आहे. ज्याच्याशी लग्न केलंय तो कुणी पाकिस्तानी आहे. आता ती तिथंच राहील. म्हणून तर काही बोलली नव्हती. आता मुलं आपल्यालाच सांभाळावी लागतील. अर्थात् तिनं हे सांगितलं असतं तर आपण परवानगी दिलीच नसती. आपल्या देशात मुलं नाहीएत का? मला म्हणाली होती की ऑफिसच्या कामासाठी मुंबईला जाते आहे.’’ मी म्हटलं.
ते चकित होऊन माझ्याकडे बघत राहिले.
‘‘कुणी मुलगी इतकी स्वाथी कशी होऊ शकते जिला म्हाताऱ्या आईबाबांची काळजी नाही...कुणी आई इतकी कठोर कशी होऊ शकते, जिला आपल्या मुलांची माया नाही,’’ मी संतापून बोलत होते.
‘‘खरंच! आपली नाही, निदान तिनं मुलांची तरी काळजी घ्यायला हवी...तिच्या मुलांना खरं तर आपणच वाढवतो आहेत. तिच्याबरोबर एकत्र राहताना घरात कायम ताणतणाव असायचा. आता ती नाहीए म्हणताना आपण निदान निवांत राहू शकू.’’ यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.