कथा * प्रियंवदा
वाईट चालींची, चरित्रहीन, रखेल अशी विशेषणं तिच्यासाठ वापरली जात होती. ते ऐकून अर्पिता अवाक् झाली. ही धरती दुभंगावी अन् आपण त्यात लुप्त व्हावं, अशा जागी लपावं जिथं कुणी तिला बघू शकणार नाही, नातलग तर कुजबुजतंच होते पण शलभच्या पत्नीनंही तिच्यासाठी असे अपशब्द वापरावेत? ती तर अर्पिताची खास मैत्रीण होती...तरीही तिनं असं म्हणावं?
अर्पिताचं नांव शलभच्या नांवाशी जोडलं गेलं होतं. त्यांचे संबंध अनैतिक आहेत हे बोललं जात होतं भरल्या कंठानं तिनं शलभला विचारलं, ‘‘आपलं नातं अनैतिक आहे असं म्हणतात, खरंय का ते? कारण तुमचं लग्न झालंय. विवाहित आहात तुम्ही. त्यामुळे मला तुमच्याबरोबर राहण्याचा हक्क नाहीए. पण इथून मला इतरांनी तुमची रखेल म्हणावं?’’
शलभला काट्यासारखा टोचला होता हा प्रश्न, अर्पिताचे अश्रू अखंड वाहत होते. रडता रडताच म्हणाली, ‘‘इतकी बेअब्रू झाल्यावर आता माझ्याशी कोण लग्न करेल?’’
तिला दिलासा देत शलभनं म्हटलं, ‘‘मी शोधेन तुझ्यासाठी मुलगा. तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी माझी.’’
‘‘माझ्याशिवाय तुम्ही राहू शकाल?’’
अर्पिताच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी शलभनं तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून तिला थोपटायला सुरूवात केली. थोड्याच वेळात अर्पिताला गाढ झोप लागली. तिच्या निरागस चेहऱ्याकडे शलभ बघत होता. अजूनह गालावरचे अश्रू सुकले नव्हते. अर्पिताच्या अनेक आठवणी त्याच्या मनांत जाग्या झाल्या. समुद्राच्या लाटांसारख्या असताता आठवणी. उंचबळून येतात अन् परत जाताना, भरून न येणारं एकाकीपण, विचित्र रिकामपण मागे ठेवून जातात.
अर्पिता नात्यानं शलभची कझिन होती, वयानंही त्याच्याहून बरीच लहान होती. ते अंतर त्यांच्या आवडी-निवडी, बोलणं, वागणं यातूनही जाणवायचं. शलभला लहानपणी बघितलेली अर्पिता आठवत होती. अर्पिताला शलभ अजिबातच आठवंत नव्हता.
अर्पिताच्या आयुष्यात चढउतार खूप होते. आई वारल्यावर वडिलांनी दुसरं लग्न केलं. अर्पिता आजोळी राहू लागली. आयुष्य खडतर होतं. त्यातूनच ती शहाणी होत गेली. पण स्वभावात त्या कडवट आठवणींचा ठसा उमटलाच.