प्रतिक्षा फक्त तुझ्या होकाराची

कथा * मिनी सिंह

आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे, हे समजल्यावर दिव्याला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, ‘‘एकदा माझे आयुष्य उद्धवस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा… कृपा करा, जशी आहे तसेच मला राहू द्या. माझ्या खोलीतून निघून जा,’’ असे सांगत तिने जवळ असलेली उशी भिंतीवर भिरकावली.

पाणावलेल्या डोळयांनी काहीही न बोलता नूतन खोलीबाहेर आल्या.

शेवटी तिच्या या परिस्थितीला नूतनच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली, याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. दिव्याच्या मनात कुणी दुसरे तर नाही… हेही जाणून घेतले नाही. दिव्याने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की, तिचं अक्षतवर प्रेम आहे… पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले.

अक्षत आणि दिव्या एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. अक्षत दिव्यासोबत दिसताच नूतन त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की, बिचारा घाबरून जायचा. दिव्यावर प्रेम आहे, हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो दिव्याचाच विचार करायचा आणि तीही त्याचीच स्वप्नं पाहायची.

‘‘निलेश चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैसेवाला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला, याचा तुला आनंद व्हायला हवा. नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात?’’

दिव्याचे वडील मनोहर यांनी नूतनला सांगितले. मात्र दिव्या मनापासून लग्नासाठी तयार आहे का? हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही.

आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून दिव्याने जड अंत:करणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवातेवढा हुंडा मिळाला.

‘आमची मुलगी एकुलती एक आहे. आमचे जे काही आहे ते तिचेच आहे. मग नंतर दिले काय किंवा आता लगेच दिले, तरी काय फरक पडणार?’ असा विचार करून मनोहर आणि नूतन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे, हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढया मोठया घरात मुलीचे लग्न ठरवून मनोहर यांच्या जीवनाचे सार्थक झाले, असे लोक कौतुकाने म्हणत.

काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून दिव्या सासरी निघाली. सासरी जाताना तिने पाहिले की, अक्षत एका कोपऱ्यात उभा राहून स्वत:चेच डोळे पुसत होता.

सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूंप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहात होती. तो येताच दिव्याचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वत:ला सावरले, कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की, तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही आणि त्यासाठी माफ कर तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल?

क्षणभर दिव्या सुन्न झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले, हे ऐकून दिव्याच्या मनावर मोठा आघात झाला.

जाणूनबुजून तिला असे का फसवण्यात आले? तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला? असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. दिव्याने संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळी रात्र ठरली.

सकाळी अंघोळ झाल्यावर ती मोठयांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला की, रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला, याचा जाब त्यांना विचारावा. पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे, हेच तिला सूचत नव्हते, कारण रिसेप्शनवेळी निलेश असा काही वागत होता जसे की, त्यांची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. दिव्याला असे वाटले की, कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल.

पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना, असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली. तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल.

एका चांगल्या पतीप्रमाणे निलेश तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू-सासऱ्यांच्या पाया पडला आणि त्याने सांगितले की, तुम्ही दिव्याची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे मनोहर आणि नूतन यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे, हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त दिव्यालाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुढत होती.

सासरी येऊन दिव्याला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसांत एकदाही निलेश दिव्याच्या जवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाचे दोन शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडतेय आणि ती इतकी शांत का आहे, हेच तिला समजत नव्हते. निलेशने विश्वासघात केलाय, हे ती सर्वंना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला? असा विचार करून ती गप्प होती.

एकदा झोपेतच दिव्याला असे वाटले की, कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित निलेश असेल, असा तिने विचार केला, पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती निलेश नव्हे तर त्याचे वडील होते आणि अर्ध्या कपडयांमध्ये पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहात होते.

‘‘तू… तुम्ही, इथे माझ्या खोलीत… का… काय करताय इथे बाबा?’’ असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र निलेशच्या वडिलांनी तिला खेचून स्वत:जवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. दिव्याला तिच्या डोळयांवर विश्वास बसत नव्हता की, तिचा सासराच तिच्यासोबत…

‘‘मी, मी तुमची सून आहे. मग तुम्ही माझ्यासोबत असे…’’ प्रचंड घाबरलेली दिव्या अडखळत बोलत होती.

‘‘सून…’’ मोठयाने हसत तो म्हणाला, ‘‘तुला माहीत नाही का? माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे.’’

हे ऐकून दिव्याला वाटले की, जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, ‘‘वेडयासारखे काय बोलताय? लाज विकून खाल्लीय का?’’

तो मात्र काहीही ऐकायला तयार नव्हता. तो दिव्याच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत दिव्याने दरवाजा उघडला. समोर निलेश आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा.

‘‘खूप झाला हा उंदिर, मांजराचा खेळ… नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसारच घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणले आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होतेय ते होऊ दे.’’

सासूच्या तोंडून हे ऐकून दिव्याला काहीच सूचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल, असे तिला वाटले. कसेबसे स्वत:ला सावरत ती म्हणाली, ‘‘म्हणजे तुम्हाला माहीत आहे की, तुमचा मुलगा…’’

‘‘हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले, नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती.’’

‘‘पण मीच का… हो गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी… का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा, सांगा ना?’’ रागाने दिव्या म्हणाली, ‘‘तुम्हाला काय वाटते, मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे, हे सर्वांना सांगेन.’’

‘‘काय म्हणालीस, सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे… विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की, तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस.’’

दिव्याचे केस ओढत निलेश म्हणाला, ‘‘तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली? जे आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर…’’ बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले.

संपूर्ण रात्र दिव्या बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, ‘‘हे बघ सूनबाई, जे घडतेय ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून आणले आहे.’’

हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल दिव्याला तिरस्कार वाटू लागला होता. दिव्याकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नणंदेचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही दिव्याला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते, हे आता तिच्या लक्षात आले होते.

लग्नाला ३ महिने झाले होते. या ३ महिन्यांत असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनांध नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसेबसे तिने स्वत:ला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. मनोहर जेव्हा कधी मुलीला माहेरी न्यायला यायचे तेव्हा दिव्याशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा दिव्यावर खूप जीव आहे, म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाहीत, असे ते दिव्याच्या वडिलांना भासवायचे.

आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे, असे वाटून मनोहर यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव दिव्याला धोक्यात घालायचा नव्हता, म्हणूनच ती गप्प होती. मात्र त्या दिवशी हद्दच झाली, जेव्हा तिला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले. ती ओरडत होती, पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चूकवून दिव्या पळून गेली.

आपल्या मुलीला असे एकटे आणि भकास अवस्थेत पाहून मनोहर आणि नूतन यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. रागाने ते मुलीच्या सासरी गेले आणि त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेडया मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले, त्यामुळे विश्वासघात तर दिव्याच्या आईवडिलांनी केला आहे.

‘‘हो का, असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही, याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का, याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले, आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालिनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईन की, मी काय करू शकतो. मोठयात मोठया न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला सोडणार नाही… तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप, त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर मनोहर नाव लावणार नाही,’’ असे सांगताना मनोहर यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला.

त्यांचे असे बोलणे ऐकून निलेशच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते, त्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली.

‘‘काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही.’’ घाम पुसत निलेशच्या नराधम बापाने सांगितले.

त्यांना वाटू लागले की, हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांची अब्रु जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या, जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका.

‘पोलीस, कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखी बिघडू नये’, असा विचार करून मनोहर शांत झाले, मात्र निलेशने लवकरात लवकर दिव्याला घटस्फोट द्यावा, अशी अट त्यांनी घातली.

दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे निलेशने निमूटपणे घटस्फोटाच्या अर्जावर सही केली. पहिल्या सुनावणीतच दिव्याला घटस्फोट मिळाला.

आता दिव्या स्वतंत्र झाली होती, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वास उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून रहायची. नीट खात नव्हती. कुणाशी बोलत नव्हती. ‘मुलीला काही होणार तर नाही ना? ती जीवाचे बरेवाईट तर करून घेणार नाही ना?’ असा विचार सतत मनात येत असल्याने मनोहर आणि नूतन यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वत:लाच अपराधी मानत होते. दिव्याने पहिल्यासारखे वागावे, तिला आनंदाने जगावेसे वाटावे, यासाठी काय करायला हवे, हेच त्यांना समजत नव्हते.

‘‘दिव्या बाळा, बघ कोण आले आहे,’’ तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. ‘‘अक्षत,’’ तिच्या तोंडून शब्द फुटले.

एकेकाळी दिव्या आणि अक्षतचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत, हे मनोहर आणि नूतन यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वत:च दिव्याच्या आयुष्याचा निर्णय घेतला. ‘आता मात्र अक्षतच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता,’ असा विचार करून त्यांनी अक्षतची दिव्याशी भेट घडवून आणली.

थोडासे संकोचत अक्षतने विचारले, ‘‘कशी आहेस दिव्या?’’ तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. ‘‘मला विसरलीस का? अगं, मी अक्षत आहे, अक्षत…

आठवतेय का?’’ तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही दिव्या गप्प होती.

अक्षत हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चूकवून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे? कँटिनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे…? तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. दिव्या मात्र भकास नजरेने पाहात होती.

तिची अशी अवस्था पाहून अक्षतचे डोळे पाणावले. तो म्हणाला, ‘‘दिव्या तू स्वत:ला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वत:ला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दु:ख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना?’’

‘‘तर मग, मी काय करू? काय करू? मी तेच केले ना, जे माझ्या आईवडिलांनी सांगितले, पण मला काय मिळाले?’’ डोळे पुसत दिव्याने विचारले. तिचे बोलणे ऐकून नूतन हुंदके देत रडू लागल्या.

दिव्याचे हात आपल्या हातात घेऊन अक्षत म्हणाला, ‘‘कधीकधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की, आपण त्या चुका कुरवाळत बसून स्वत:चे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की, आपण आपली वाट स्वत: शोधायची आणि विश्वासाने त्यावरून मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशेचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे, सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे.

‘‘दिव्या, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे… तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल, याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना? त्यांच्यासाठी, स्वत:साठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल दिव्या…’’

अक्षतच्या बोलण्याचा दिव्यावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, ‘‘आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो. असे का होते अक्षत?’’

‘‘कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ… तुझ्या समोर तुझे सुंदर जग आहे,’’ अक्षतच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की, दिव्या अजूनही मी तेथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे जिथे तू मला एकटयाला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे दिव्या. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळवून टाकेन.

अक्षतच्या छातीवर डोकं ठेवून दिव्या ओक्सबोक्शी रडू लागली, जणू कधीचे साचून राहिलेले दु:ख घळाघळा डोळयांतून ओघळत होते. मनातले दु:ख अश्रूंवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी यासाठी अक्षतनेही तिला मनसोक्त रडू दिले.

बाहेर उभ्या असलेल्या मनोहर आणि नूतन यांच्या डोळयांतूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते.

विस्मरणात जाणारा भूतकाळ

कथा * उषा साने

बऱ्याच वर्षांनंतर मी माझे फेसबूक अकाउंट उघडले, तितक्यात चॅटिंग विंडोमध्ये ‘हाय’ असे ब्लिंक झाले. सुरुवातीला मी लक्ष दिले नाही, मात्र सतत ब्लिंक होतच राहिल्यामुळे मनात विचार आला की, कोणीतरी बोलण्यासाठी आतूर झाले आहे. नक्कीच ती व्यक्ती माझ्या फेसबूकवरील मित्रपरिवारापैकी होती. बोलण्यापूर्वी मी त्या व्यक्तीचे प्रोफाईल पाहिले. त्याचे नाव कौशल होते. मी बोलणे टाळले. कारण मला चॅटिंगची आवड नव्हती. पण समोरची व्यक्ती धीट होती. थोडया वेळानंतर त्या व्यक्तीने पुन्हा मेसेज पाठवला. ‘तुम्ही कशा आहात मॅडम…?’ या प्रश्नाचे उत्तर न देणे शिष्टाचाराला धरून नव्हते. त्यामुळे मनात नसतानाही ‘बरी आहे,’ असे मी लिहिले. त्याला पुढे बोलू न देण्याचा माझा प्रयत्न होता. माझ्याकडे वेळ नाही, असे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पुन्हा मेसेज आला, ‘कामात आहात का मॅडम…?’ माझ्या ‘हो’ अशा त्रोटक उत्तरानंतर त्याने परत मेसेज पाठवला, ‘बरं… पुन्हा केव्हा तरी बोलूयात मॅडम’ मीही ‘हो’ म्हणून सुटकेचा श्वास टाकला. तेवढयात दारावरची घंटी वाजली. घडयाळात पाहिले तर संध्याकाळचे ६ वाजले होते. वाटले की, राजीव कामावरून आला असेल.

जसा मी दरवाजा उघडला तसे, ‘‘काय सुरू आहे मॅडम…?’’ राजीवने विचारले. मला चिडवायची इच्छा झाल्यास तो मला मॅडम म्हणतो. त्याला माहीत आहे की, मॅडम म्हटलेले मला अजिबात आवडत नाही.

‘‘काही विशेष नाही. फक्त नेटवर सर्फिंग करत होते…’’ मी थोडेसे चिडूनच उत्तर दिले. राजीव हसला. तो हसला की मी राग विसरून जायचे. माझा राग कसा घालवायचा, हे राजीवला बरोबर माहीत होते. म्हणूनच मला चिडवल्यानंतर तो अनेकदा असाच मिस्किल हसायचा.

‘‘बरं, आले घातलेली गरमागरम चहा आणि चहासोबत गरमागरम भजी मिळाली तर आपला दिवस, म्हणजे संध्याकाळ मस्त होईल…’’ त्याच्या अशा बोलण्यावर मला हसू आले. बाहेर खरोखरंच पाऊस पडत होता. घरात असल्यामुळे माझ्या ते लक्षात आले नव्हते. मी चहा, भजीची तयारी करू लागले आणि राजीव हात-पाय धुवायला गेला. आपल्या दोघांची आवडीची जागा असलेल्या बाल्कनीत चहा पिऊया, असे तो म्हणाला. तो खूपच आनंदी दिसत होता.

मला रहावले नाही. ‘‘काय झालेय…? खूपच आनंदात दिसतोस…’’ मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

‘‘अरे… तुला कसे समजले…? त्याने आश्चर्याने विचारले.’’

‘‘तुझी अर्धांगिनी आहे. १५ वर्षांत मला इतकेही समजणार नाही का…?’’ मी लटक्या रागात विचारले.

‘‘हो, तू बरोबर बोलतेस.’’ तो थोडेसे गंभीर होत म्हणाला.

काही वेळ आम्ही शांतपणे चहा, भजी खात होतो. काही वेळानंतर राजीव माझ्याकडे खोडकर नजरेने पाहून हसला आणि मी त्याच्या मनातले बरोबर ओळखले.

‘‘खोडकरपणा अजिबात चालणार नाही…’’ मी लाजतच सांगितले. त्यानंतर आम्ही घराच्या अंतर्गत सजावटीबाबत गपा मारू लागलो. घरात सर्व वस्तू अस्ताव्यस्त होत्या. आम्ही अलीकडेच येथे राहायला आलो होतो. घराची अंतर्गत सजावट बाकी होती. कोणत्या खोलीत कोणता रंग लावावा, यावरून राजीव आणि मुलांमध्ये मतभेद होते. आमचे बोलणे सुरू असतानाच मुलगा शुभांग आणि मुलगी शिवानी दोघेही आले. त्यांच्या हट्टामुळे राजीव त्यांना बाजारात घेऊन गेला. पाऊस पडतोय, जाऊ नका, असे म्हणत मी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. राजीवने गाडी काढली. मलाही सोबत येण्याचा आग्रह केला, पण घर नीट करूया, असा विचार करून मी जाणे टाळले.

काम आटोपल्यानंतर थोडी उसंत मिळाली. सहज लॅपटॉपकडे नजर गेली. थोडा वेळ सर्फिंग करूया, असा मी विचार केला. इंटरनेट सुरू केला. फेसबूक सुरू करण्याचा मोह झाला. फेसबूक उघडताच कैलाशने लगेच ‘नमस्कार’ असा मेसेज पाठवला. मला विशेष काही काम नव्हते. राजीव आणि मुले लवकर येणार नव्हती. त्यामुळे विचार केला की, कौशलसोबत गप्पा मारून वेळ घालवू.

‘नमस्कार’ असे मी लिहिले. त्याने लगेच प्रश्न विचारला, ‘तुम्ही फुलपाखरू आहात का?’ मी गोंधळले. हा काय प्रश्न आहे? तितक्यात त्याने मी प्रोफाईवर ठेवलेले चित्र दाखवले. याबाबत मी कधी विचार केला नव्हता. ते चित्र आवडले म्हणून मी प्रोफाईलला ठेवले होते. हाच प्रश्न त्याने पुन्हा विचारताच मी चिडले. काहीतरी कारण देऊन फेसबूक बंद केले. त्याचे नाव डिलिट करावे, असे मला वाटत होते. पुढच्या वेळेस हेच करायला हवे, असा विचार करून मी उठले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले.

पुढचे काही दिवस घराच्या अंतर्गत सजवटीतच निघून गेले. आता ते काम पूर्ण झाले होते. घर सुंदर दिसू लागले होते. त्यामुळे एक खूप मोठे ओझे हलके झाले, असेच काहीसे वाटत होते. त्या दिवशी मुले आणि राजीव यापैकी कोणीच घरी नव्हते. विरंगुळा म्हणून नेट सुरू केला. मेल उघडून पाहिले, पण त्यात एरमाच्या मेलशिवाय विशेष काही नव्हते. तिने लिहिले होते की, तिला नवीन नोकरी मिळाली आहे. त्यासाठी ती लॉस इंजेलिसला जाणार होती. तिची कंपनी लवकरच तिला भारतातही पाठवणार होती. मी मेल करून तिचे अभिनंदन केले आणि भारतात आल्यावर माझ्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. ती माझी फेसबूक मैत्रीणही होती. त्यामुळे मी फेसबूक सुरू केले. कितीतरी मेसेज आले होते. मला आजपर्यंत इतके मेसेज कधीच आले नव्हते. बघितले तर ७-८ मेसेज कौशलचे होते. ‘कशा आहात तुम्ही…?’, ‘नाराज आहात का…?’, ‘तुम्ही फेसबूक बंद करून का ठेवता…?’ इत्यादी. ते मेसेज वाचून मला राग आला.

मी त्याचे नाव डिलिट करणारच होते की, तितक्यात दारावरची घंटा वाजली. मी दरवाजा उघडायला जाणार तोच बाहेरून शिवांगचा आवाज ऐकू आला. ‘‘आई, लवकर दरवाजा उघड, आईस्क्रिम वितळून जाईल.’’

मला माहीत होते की, मी लवकर दरवाजा न उघडल्यास त्याच्या मोठया आवाजामुळे आजूबाजूचे बाहेर येतील. घाईगडबडीत मी नेट बंद करायला विसरले.

राजीव बाहेरून भरपूर जेवण घेऊन आला होता, म्हणजे रात्री जेवण करायची गरज नव्हती. राजीवने चहा मागितला. मी आमच्या दोघांसाठी चहा घेऊन आले. चहा पिताना माझ्या लक्षात आले की, मी नेट बंद करायला विसरलेय. माझे फेसबूक खाते उघडेच होते. नवीन दोन मेसेज माझी वाट पाहात होते. मला ते उघडून बघण्याचा मोह आवरता आला नाही. एक मेसेज कवी प्रदीप यांचा कवी संमेलनात सहभागी होण्याचे आमंत्रण देणारा होता. दुसरा कौशलचा होता. तो वाचून माझा राग अनावर झाला. त्याची गाडी एकाच ठिकाणी अडकली होती. ‘तुम्ही नाराज आहात का…?’ ‘तुम्ही उत्तर का देत नाही…?’ ‘तुम्ही तुमचा फोटो अपलोड का केला नाही…?’ त्याचे नाव कायमचे डिलिट करायचे, असे मी ठरवले आणि तसेच केले. त्यानंतर मात्र मी माझा फोटो अपलोड का केला नाही? असा प्रश्न मला सतत सतावू लागला. फोटो असणे खरंच गरजेचे आहे का…?

हा प्रश्न भूतकाळातील माझ्या कटू आठवणींना उकरून काढण्यासाठी पुरेसा होता, ज्या गाडून टाकण्यासाठी मला बराच वेळ लागला होता. त्यामुळे मला प्रचंड मानसिक त्रास झाला होता. माझ्या घरच्यांना जो सामाजिक आणि मानसिक त्रास झाला होता, तो मला वेडे करण्यासाठी पुरेसा होता. त्या त्रासदायक भूतकाळाची आठवण होताच मी अस्वस्थ झाले. शांतपणे बाल्कनीत जाऊन बसले.

थोडया वेळानंतर राजीव मला शोधत बाल्कनीत आला. त्याने बाल्कनीतला दिवा लावला. मी त्याला तो बंद करायला सांगितला. तो माझ्या जवळ आला.

हळूवारपणे माझ्या केसांवरून हात फिरवत त्याने विचारले, ‘काय झाले…?’ मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्व विसरायचा प्रयत्न कर, त्याने प्रेमाने मला सांगितले. मला काही वेळ एकटीला राहायाचे होते. त्याच्या ते लक्षात आले. काहीही न बोलता तो निघून गेला. मला मात्र त्या अंधारात माझा भूतकाळ लख्ख दिसत होता…

त्या काळोखात माझ्या डोळयांसमोर ती संध्याकाळ जशीच्या तशी जिवंत उभी राहिली. महाविद्यालयात निरोप समारंभ होता. मी बीएससीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. महाविद्यालयातील माझा तो शेवटचा दिवस होता.

ठरल्याप्रमाणे मुलांनी सदरा घातला आणि मुली साडी नेसल्या होत्या. ती खूपच संस्मरणीय संध्याकाळ होती, पण ती माझ्या जीवनात अंधार घेऊन येणार होती, हे मला कुठे माहीत होते…? फोटो काढले जात होते. आमचा एक वर्गमित्र राहुल कॅमेरा घेऊन आला होता. तो आमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा होता. त्याला माझ्याबद्दल आकर्षण वाटायचे, हे मला माहीत होते, पण माझ्यासाठी मात्र तो इतर वर्गमित्रांसारखाच होता. मी नकार देऊनही तो सतत माझे एकटीचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी त्याच्यावर ओरडले. मी सर्वांसमोर ओरडल्यामुळे तो शांतपणे तेथून निघून गेला. मी सुटकेचा निश्वास टाकला, पण मला कुठे माहीत होते की, येणारा काळ माझे आयुष्य उद्धवस्त करणार होता.

काही दिवसांनंतर एके दिवशी पोस्टमन माझ्या नावाचा एक लिफाफा घेऊन आला. आईने तो मला आणून दिला. मी उलटसुलट करून पाहिले, पण त्यावर पाठवणाऱ्याचे नाव नव्हते. उघडल्यावर त्यातील काही फोटो जमिनीवर पडले. ते उचलायला मी खाली वाकले आणि ते फोटो पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्या फोटोंमध्ये मी आणि राहुल विचित्र अवस्थेत होतो. प्रत्यक्षात सत्य असे होते की, मी जवळच काय, पण लांब उभी राहूनही कधी त्याच्यासोबत फोटो काढला नव्हता.

मला रडायला येत होते. जसजसे मी फोटो बघत होते माझे रडणे रागात बदलत होते. मी रागाने ओरडले. तो आवाज ऐकून आई आली. फोटो बघून गोंधळली. तिने माझ्याकडे रागाने बघितले, पण त्यानंतर माझी झालेली दयनीय अवस्था पाहून तिचा राग शांत झाला.

घरात सर्वांना या फोटोंबद्दल समजले तेव्हा आजी प्रचंड संतापली. ‘‘आणखी शिकवा मुलींना आणि तेही मुलांसोबत, मग असे घडणारच.’’

वडील आणि भाऊ मला काहीच बोलले नाहीत, पण ते खूप रागात होते. माझा राहुलवर संशय होता. कारण मी त्याला फोटो काढताना सर्वांसमोर ओरडले होते. त्याचाच तो बदला घेत होता. मी मनातल्या संशयाबद्दल वडिलांना सांगितले. त्यांनी राहुलला जाब विचारला, पण त्याने आरोप फेटाळून लावला. दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे माझे वडील भावाला घेऊन राहुलच्या वडिलांना भेटायला गेले. पण तेथे त्यांचा अपमान झाला.

हळूहळू लोकांना याबद्दल समजले. त्यामुळे लाजेने माझे घराबाहेर जाणे बंद झाले. माझ्या संपूर्ण कुटुंबालाच मानसिक त्रास सहन करावा लागत होता. मी जे आयएएस बनायचे स्वप्न बघितले होते ते पूर्ण होणे तर दूरच, पण माझ्यासाठी पुढचे शिक्षण घेणेही अवघड झाले होते. माझे स्वप्न भंगले होते. वडिलांना माझ्या लग्नाची चिंता सतावत होती. त्यांना लवकरात लवकर माझे लग्न करून द्यायचे होते. मात्र कुठलेही स्थळ आले तरी त्यांना त्या फोटोंबद्दल कुठून तरी समजायचे आणि लग्न मोडायचे. त्यामुळे माझे लग्न होणे कठीण झाले होते.

एके दिवशी राजीवचे वडील आमच्या घरी आले. १०-१२ वर्षांनंतर ते त्यांच्या मित्राला म्हणजे माझ्या वडिलांना भेटायला आले होते. २-३ दिवस ते आमच्याच घरी राहिले. आमच्या घरात काहीतरी बिनसले आहे, हे त्यांनी ओळखले, पण त्याबद्दल विचारणे त्यांना योग्य वाटले नाही. त्यांच्या येण्याने मला काहीसा आधार मिळाला, कारण त्यांच्याशिवाय माझ्याशी घरात कोणीच नीट बोलत नव्हते. मी जास्त करून त्यांच्यासोबतच राहायचे. ते परत जायला निघाले, असे समजल्यावर मी खूपच उदास झाले. मी सतत उदास का असते, याबद्दल त्यांनी मला अनेकदा विचारले, पण मी उत्तर द्यायचे टाळले. नक्कीच काहीतरी झालेय आणि तेही खूपच गंभीर आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते. मात्र इतक्या वर्षांनी मित्राच्या घरी आल्यावर त्याला त्याच्या घरातील तणावाचे कारण विचारणे त्यांना योग्य वाटले नाही.

त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की, त्यांना काहीतरी सांगायचे आहे. जेव्हा ते त्यांच्या घरी जायला निघाले तेव्हा माझ्या वडिलांना म्हणाले की, ‘मला काहीतरी सांगायचे आहे.’ बिनधास्त बोल, असे वडिलांनी सांगताच त्यांनी राजीवसाठी मला मागणी घातली. त्यांनी सांगितले की, राजीव एका मल्टिनॅशनल कंपनीत सीईओ पदावर कार्यरत आहे. हे ऐकून वडील काहीसे गोंधळले. त्यांना माझे लग्न दुसऱ्या जातीच्या मुलाशी लावून द्यायचे नव्हते. त्यांना हेही माहीत होते की, जातीतला मुलगा शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण त्या फोटो प्रकरणामुळे कुणीच होकार द्यायला तयार नव्हते. हे स्थळ घरबसल्या आले होते. वडिलांनी घरातल्यांना विचारले. सर्वांचे मत असेच होते की, राजीवच्या स्थळासाठी होकार द्यावा, पण वडिलांनी होकार देण्यापूर्वी त्यांना फोटो प्रकरणाबद्दल सर्व सत्य सांगायचे ठरवले.

त्या प्रकरणाबद्दल ऐकल्यानंतर राजीवचे वडील हसले आणि म्हणाले, ‘‘अरे मित्रा, आजकाल असे घडतच असते. मी तुझ्या मुलीचा हात यासाठी मागितला, कारण ती खूपच चांगली आहे. मला असे वाटले होते की, मी परजातीचा असल्यामुळे तू लग्नाला तयार नाहीस.’’

त्यानंतर त्यांनी राजीवला बोलावून घेतले. त्याच्या होकारानंतर काही दिवसांतच राजीवची अर्धांगिनी बनून मी त्याच्या घरी आले… राजीवने येऊन बाल्कनीतला दिवा लावला नसता तर कदाचित मी भूतकाळातील त्या काळोखातच स्वत:ला हरवून बसले असते.

त्याने माझा हात त्याच्या हातात घेऊन विचारले, ‘‘आता कसे वाटतेय?’’

‘‘पूर्वीपेक्षा खूप छान,’’ मी उत्तर दिले.

‘‘चल, कुठेतरी मस्त फिरून येऊया,’’ त्याने प्रेमाने सांगितले.

‘‘नको, अजिबात इच्छा नाही, पुन्हा कधीतरी जाऊ.’’

‘‘चल, मग एक काम कर…’’ त्यांच्या अशा मिश्किल बोलण्यामुळे मी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर खोडकरपणाचे भाव होते. मी समजून गेले की, आता तो खोडकरपणे काहीतरी बोलणारच.

‘‘तुझा फोटो फेसबूकवर अपलोड कर. लोकांना कळू दे की, माझी बायको खूपच सुंदर आहे.’’ तो खटयाळपणे म्हणाला.

‘‘तुला ही सर्व गंमत वाटतेय?’’ मी रागाने विचारले.

‘‘विभा, मनातल्या भीतीला पळवून लावायचे असेल तर तुझा फोटो नक्की अपलोड कर.’’ त्याने अतिशय गंभीरपणे सांगितले.

त्याने जे सांगितले ते खरे झाले. मी पूर्ण विचार करून माझा फोटो अपलोड केला. तो पाहून अनेकांनी माझे कौतुक केले आणि तेच कौतुक मला भूतकाळातील भीतीच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी मदतीचे ठरले. प्रत्यक्षात मी त्या अपराधाचे ओझे वाहत होती, जो मी केलाच नव्हता. खरंतर ही समाजाने आखलेली रेषा आहे जिथे पुरुष अपराध करूनही सुटतात आणि त्याची शिक्षा अनेकदा मुलींनाच भोगावी लागते. तिला लहानपणापासून अशीच शिकवण दिली जाते की, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक रूपात तिने न केलेल्या अपराधासाठीही ती स्वत:लाच दोषी मानते.

माझ्यासोबत निदान राजीव होता, त्याने मला या नकोशा भूतकाळातून बाहेर पडायला मदत केली. पण माझ्यासारख्या न जाणो अशा कितीतरी असतील…?  मी स्वत:ला विचारचक्रातून बाहेर काढले.

मी राजीवला कवी संमेलनासाठी मिळालेल्या अमंत्रणाबद्दल सांगितले. तो खुश झाला. फेसबूकवरील माझे कौतुक साजरे करण्यासाठी शहरात नव्यानेच उघडलेल्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे, असे आम्ही ठरवले. बाहेर जाण्यासाठी मी जेव्हा राजीवच्या आवडीची साडी नेसून आले तेव्हा त्याने हळूच शिट्टी वाजवली आणि म्हणाला, ‘‘आज खूपच सुंदर दिसतेस… काय मग आजची रात्र…’’ मी लाजले.

हॉटेल खूपच सुंदर होते. राजीव कार पार्क करायला गेला. मी मुलांना घेऊन आत जाणारच होते, पण तितक्यात हॉटेलच्या दरवाजावर गणवेशात सर्वांना सलाम ठोकणाऱ्या द्वारपालाला पाहून मी तेथेच थबकले. तो राहुल होता. माझ्या डोळयात आश्चर्य होते तर मला पाहिल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मागून येणाऱ्या राजीवने मला प्रवेशद्वाराजवळ असे थांबलेले पाहून प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी काहीही न बोलता आत गेले.

आत गेल्यावर मी त्याला सर्व सांगितले. तसा तो लगेच बाहेर गेला. मी धावतच त्याच्या मागे गेले. तोपर्यंत तो राहुलपर्यंत पोहोचला होता. त्याचा हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘तुझे खूप आभार. तू तसा वागला नसतास तर (माझ्याकडे पाहत) विभा माझ्या आयुष्यात आली नसती…’’ असे बोलून राहुलला आश्चर्याचा मोठा धक्का देऊन तो आत गेला आणि मी अरे… ऐक… असे म्हणत त्याच्या मागे गेले. शांतपणे खुर्चीवर बसले. थोडया वेळानंतर दरवाजाकडे पाहिले. राहुल तिथे नव्हता. जेवून घरी निघालो तेव्हा राहुलच्या जागी नवा द्वारपाल होता. न राहवून राजीवने त्याला राहुलबद्दल विचारले. तेव्हा समजले की, तो नोकरी सोडून गेला होता.

अपराधीपणाची सहल नको

* पूनम अहमद

नेहा कार्यालयातून बाहेर पडली. कपिल बाहेरच बाईकवर तिची वाट पाहत होता. ती तोऱ्यात त्याच्या कमरेला हातांनी धरत मागे बसली. त्यानंतर चेहऱ्यावर स्कार्फ बांधला.

कपिलने स्मितहास्य करीत बाईक सुरू केली. वाहतूक कोंडीतून पुढे गेल्यानंतर जेव्हा बाईक कमी गर्दीच्या रस्त्यावर आली तेव्हा नेहाने कपिलच्या गळयाचे चुंबन घेतले. त्यानंतर कपिलने निर्जन रस्ता पाहून बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली. नेहा हसतच बाईकवरून उतरली. कपिलने हेल्मेट काढताच नेहाने तिचे हात कपिलच्या गळयाभोवती नेले. कपिलनेही तिच्या कमरेभोवती हात नेत तिला आपल्या जवळ ओढले. दोघेही बराच वेळ एकमेकांमध्ये गुंतून गेले होते.

वाढणाऱ्या तर कधी मंदावणाऱ्या श्वासांवर नियंत्रण ठेवत नेहा म्हणाली, ‘‘ऐक ना, आता लगेचच माझ्या घरी यायला तुला आवडेल का?’’

‘‘काय?’’ कपिलला आश्चर्य वाटले.

‘‘होय, घरी कोणीच नाही. चल ना.’’

‘‘तुझे आईवडील कुठे गेले आहेत?’’

‘‘कुठले तरी नातेवाईक वारल्यामुळे त्यांच्या घरी भेटायला गेले आहेत. रात्री उशिरा येतील.’’

‘‘तर मग चल, आपण वेळ का वाया घालवतोय? अगं, मी खूपच अधीर झालो आहे, कारण आपण आता तेच करायला चाललोय जे मागील १५ दिवसांपासून करू शकलो नव्हतो. काय करणार? रुडकीत जागाच मिळत नाही. मागच्या वेळेस माझ्या घरी कोणी नव्हते तेव्हा आपल्याला संधी मिळाली होती.’’

‘‘चल, आता गप्पा मारायची नाही तर काही वेगळेच करायची इच्छा आहे.’’

कपिलने मोठया उत्साहात बाईक नेहाच्या घराकडे वळविली. संपूर्ण रस्ता नेहा चेहरा स्कार्फने झाकून कपिलच्या कमरेभोवती हातांची मिठी घालून त्याला चिकटून बसली होती. दोघे तरुण प्रेमी वेगळयाच धुंदीत होते.

दोघांचे अफेअर २ वर्षांपासून सुरू होते. दोघांची कार्यालये एकाच इमारतीत होती. याच इमारतीत कधी कॅफेटेरिया तर कधी लिफ्टमध्ये भेट होत असल्याने त्यांची ओळख झाली होती. पाहताक्षणीच एकमेकांना ते आवडले होते. नेहाचा धाडसी स्वभाव कपिलला आवडला होता, तर कपिलच्या शांत, सौम्य स्वभावावर नेहा भाळली होती. या २ वर्षांत दोघे अनेकदा शरीरानेही एकमेकांच्या जवळ आले होते.

नेहाला मोकळेपणाने आयुष्य जगायचे होते. कधी कधी तर कपिलला तिच्या जीवनाकडे पाहण्याच्या या बिनधास्त दृष्टिकोनाचे आश्चर्य वाटायचे. नेहाच्या घरी तिचे आईवडील होते. दोघेही कामाला जायचे. छोटा भाऊ महाविद्यालयात शिकत होता. कपिल त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई गृहिणी होती. वडील बांधकाम व्यावसायिक होते. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली होती. कपिलने नेहाबाबत घरी सांगितले होते. नेहाला सून करून घेण्यास दोघेही तयार होते. नेहा कपिलच्या घरी जात असे, पण नेहाच्या घरच्यांना कपिलबाबत काहीच माहीत नव्हते.

नेहमीप्रमाणे कपिलने नेहाच्या घरापासून दूर असलेल्या एका शॉपिंग कॉम्प्लेक्समधील पार्किंगमध्ये बाईक पार्क केली. आधी नेहा तिच्या घरी गेली. त्यानंतर थोडया वेळाने कपिल गेला. याआधीही घरी कोणी नसताना दोघांनी अनेकदा अशा संधीचा चांगलाच फायदा घेतला होता. घरात येताच आपली बॅग एका ठिकाणी ठेवून कपिलने नेहाला मिठीत घेतले. तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव केला. नेहाने त्या वर्षावात स्वत:ला चिंब भिजू दिले. नेहाच्या पलंगावरील हा प्रेमाचा पाऊस काही वेळानंतर थांबला. कपिलने सांगितले, ‘‘प्रिये आता तुझ्याशिवाय राहणे अशक्य झाले आहे. चल ना, लग्न करूया. उशीर कशासाठी करत आहेस?’’

नेहाने त्याकडे दुर्लक्ष करत म्हटले, ‘‘लग्नासाठी इतका अस्वस्थ का होत आहेस? जे नंतर करायचे ते आपण आधीच करत आहोत ना?’’

‘‘अगं, तसं नाही. आता लपूनछपून नाही तर जगजाहिरपणे तुझ्यासोबत मला माझ्या घरात रहायचे आहे.’’

‘‘पण, सध्या लग्न करायची माझी इच्छा नाही, कपिल.’’

‘‘आणखी किती वाट बघायला लावणार आहेस?’’

‘‘पण, मी असे कधीच सांगितले नाही की, मी तुझ्याशी लवकरात लवकर लग्न करेन.’’

‘‘मला मात्र तुझ्याशीच लग्न करायचे आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. नेहा, मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले.’’

‘‘अरे कपिल,’’ असे म्हणत नेहाने पुन्हा आपले हात कपिलच्या गळयाभोवती गुंफले. त्यानंतर म्हणाली, ‘‘चल, तुझ्यासाठी पुन्हा कॉफी आणते. दोघांनी रोमान्स करतच कॉफीचे घोट घेतले. त्यानंतर थोडया वेळाने कपिल निघून गेला. प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप होताच.

हा दोघांमधील नियमच होता की, कपिलच नेहाला तिच्या घरी सोडायला जात असे. घरी गेल्यानंतर कपिलने स्पष्टपणे सांगितले की, तो नेहासोबत होता. त्याची आई सुधाने सांगितले, ‘‘बाळा, तुम्ही दोघे लग्न का करीत नाही? दोघेही चांगले कमावते आहात, मग उशीर कशासाठी करत आहात?’’

‘‘आई, इतक्या लवकर नेहाला लग्न करायचे नाही.’’

‘‘तर मग कधी करायचे आहे. तिच्या आईवडिलांचे काय म्हणणे आहे?’’

‘‘काही नाही आई, अजूनपर्यंत तिने तिच्या घरी आमच्याबाबत काहीही सांगितले नाही.’’

‘‘अरे, असं कसं?’’

‘‘जाऊ दे आई, जसे नेहाला योग्य वाटेल. कदाचित तिला आमच्या नात्याला आणखी वेळ द्यायचा असेल.’’

‘‘बाळा, माझ्या मनात आणखी एक विचार घोळत आहे. तुझे खरेच तिच्याशी पटेल का? ती खूपच बोल्ड आहे आणि तू अतिशय साधा आहेस.’’

‘‘अगं आई, ती आजच्या जमान्यातील मुलगी आहे ना? आजकालच्या मुली या तुझ्या काळातील मुलींपेक्षा थोडया वेगळया आहेत. नेहा बोल्ड आहे, पण चुकीची नाही. तू काळजी करू नकोस. कदाचित तिला आणखी काही वेळ हवा असेल.’’

‘‘पण, मला असे वाटते की, आता तू लग्नाचा गांभीर्याने विचार करायला हवा.‘‘

‘‘बरं, ठीक आहे आई. तिच्याशी बोलतो.’’

२ दिवसांनंतरच नेहाने कपिलला सांगितले की, ‘‘अरे मित्रा, आपली लॉटरी लागली आहे. माझा भाऊ मित्रांसोबत सहलीला जात आहे आणि माझ्या काकांची तब्येत बरी नाही. त्यामुळे माझे आईवडील त्यांना पाहण्यासाठी दिल्लीला जात आहेत. चल, आता तूही तुझ्या घरी सांग की, तू सहलीला जात आहेस. दोघांनीही सुट्टी घेऊया आणि घरात खूप मजा करूया.

‘‘खरंच?’’

‘‘जीवनाचा मस्त आंनद घेऊया. लवकर ये. जेवण बाहेरून मागवू. भरपूर मजा करू.’’

कपिल नेहावर मनापासून प्रेम करत होता. जसे नेहाने सांगितले होते तसेच त्याने केले. सहलीला जातोय असे घरी सांगून कपडे वगैरे घेऊन नेहाच्या घरी आला. दोघांनी मनसोक्त रोमान्स केला. जेव्हा मनाला वाटत होते तेव्हा ते जवळ येत होते. एकमेकांमध्ये हरवून गेले होते.

कपिलने सांगितले, ‘‘प्रिये, तूझ्यासोबतचे हे क्षण म्हणजेच माझे जीवन आहे. तू माझ्या आयुष्यात लवकरच कायमची ये. आता मी अजून थांबू शकत नाही. सांग, तुझ्या आईवडिलांशी माझी भेट कधी घडवून आणणार आहेस?’’

नेहाने प्रेमाने त्याला धक्का दिला. ‘‘तू सतत लग्नाचा विषय का काढतोस? एवढी काय घाई आहे? आणि मी किती वेळा सांगितले आहे की, सध्या माझी लग्न करण्याची इच्छा नाही.’’

आता कपिल गंभीर झाला होता. ‘‘नेहा, असे काय बोलतेस? माझी आई लग्नासाठी माझ्या मागे लागली आहे. शिवाय आता आपण आणखी वाट का पाहत आहोत?’’

नेहाने शांतपणे, पण गंभीर स्वरात सांगितले, ‘‘हे बघ, मला आणखी काही वर्षे लग्नाच्या फंदात पडायचे नाही. मी फक्त २६ वर्षांची आहे आणि जीवनाचा आनंद घेत आहे.’’

‘‘पण, मी ३० वर्षांचा होईन. आज नाही तर उद्या, आपल्याला लग्न करावेच लागेल. एकमेकांच्या इतक्या जवळ आलो आहोत तर मग असे लपूनछपून का आणि कधीपर्यंत भेटत रहायचे?’’

‘‘असे मी कधी म्हटले की, आज नाही तर उद्या आपण लग्न करणारच आहोत म्हणून?’’

‘‘म्हणजे?’’

‘‘हे बघ कपिल, आतापर्यंत मी तुझ्या माझ्या आईवडिलांशी भेट घडवून आणली नाही, कारण आपले ठरवून लग्न होऊच शकत नाही. आपण वेगवेगळया जातीचे आहोत. या वयात जातीवरून मला कुठलाच त्रास करून घ्यायचा नाही. आपण प्रेम, रोमान्स, सेक्स अशी सर्व मजा तर घेतच आहोत. तू लग्नासाठी मागे का लागला आहेस? लग्न तर माझ्यासाठी सध्या खूप दूरची गोष्ट आहे.’’

‘‘तुझे माझ्यावर प्रेम नाही का?’’

‘‘आहे ना?’’

‘‘मग तुझ्या मनाला असे वाटत नाही का की, एकमेकांसोबत राहण्यासाठी आपल्याला लग्न करायला हवे?’’

‘‘नाही, माझ्या मनाला असे काहीच वाटत नाही.‘‘

‘‘बरं सांग, कधीपर्यंत थांबायचे आहे तुला? मी वाट पाहीन.’’

‘‘मला नाही माहीत,’’ कपिलला खूपच गंभीर झालेले पाहून लडिवाळपणे त्याची छेड काढत नेहा म्हणाली, ‘‘मी तुला पुन्हा सांगते. लग्नाचा विचार सोडून दे, जीवनाची मजा घे.’’

‘‘म्हणजे तू माझ्याशी लग्न करणार नाहीस?’’

‘‘नाही.’’

‘‘नेहा, मला काहीच समजत नाहीए. हे सर्व काय आहे?’’ तू २ वर्षांपासून माझ्यासोबत आहेस. हे माहितीही नाही की, आपण किती वेळा शरीराने एक झालो आहोत. तरीही तुझे म्हणणे आहे की, तुला माझ्याशी लग्न करायचे नाही.’’

‘‘आपले शारीरिक संबंध आहेत तर त्यात आपण कोणता गुन्हा केला? आपण एकमेकांना आवडत होतो म्हणून इतके जवळ आलो. यात लग्नाचा काय संबंध?’’

‘‘तर मग लग्न कधी आणि कोणाशी करणार आहेस?’’

‘‘सध्या तरी मला काहीच माहीत नाही. तुझ्याशी लग्न करेन, असा विचार करून मी तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. कपिल, आता ते युग गेले जेव्हा लग्न करण्यासाठी मुली शारीरिक संबंधाला परवानगी देत असत. निदान मी तरी असा विचार करत नाही. मला फक्त जीवनाचा आंनद उपभोगायचा आहे. घर, संसारात सध्या तरी मला अडकायचे नाही. तूही लग्नाच्या मागे न लागता जीवनाचा आंनद घे.’’

‘‘नाही नेहा, मला आपल्या नात्याला नाव द्यायचे आहे.’’

आता नेहा रागावली होती. ‘‘अरे, मग अशी मुलगी शोध जी तुझ्याशी आताच्या आता लग्न करेल.’’

कपिलने भावूक होऊन तिचा हात धरला. ‘‘नेहा, असे कधीच म्हणू नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.’’

‘‘अरे, या सर्व गोष्टी बोलण्यापुरत्या असतात. रोज हजारो मन जुळतात आणि तूटतातही. हे सुरूच राहते.’’

कपिलचे डोळे पाणावले. नकळतच अश्रू गालांवर ओघळले. हे पाहून नेहा हसली. ‘‘हे काय कपिल? इतका भावनिक का होतोस? शांत हो.’’

‘‘माझ्यापासून कधीच दूर जाऊ नकोस नेहा. खरंच माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगत तिला मिठीत घेऊन कपिलने तिचे चुंबन घेतले. नेहाही त्याच्या मिठीत विसावली. थोडा वेळ रोमान्स सुरू राहिला. बराच वेळ दोघांनी एकत्र घालवला. दुसऱ्या दिवशी कपिल घरी जायला निघाला तेव्हा नेहा म्हणाली, ‘‘प्रॅक्टिकल रहायला शिक.‘‘

कपिलने तिच्याकडे रोखून पाहताच ती हसली आणि म्हणाली, ‘‘प्रॅक्टिकल राहण्यातच शहाणपण आहे. भावनिक होऊन मला अपराधीपणाच्या सहलीला पाठवून द्यायचा प्रयत्न करू नकोस.’’

त्यानंतर काही दिवस नेहमी प्रमाणेच गेले, पण नंतर कपिलच्या लक्षात आले की, नेहा त्याला टाळत आहे. कधी फोनवर सांगायची, ‘‘तू जा, माझी मीटिंग आहे. उशीर होईल. कधी भेटलीच तरी घाईत असायची. बाईकवरून आलीच तरी शांतपणे बसायची. पूर्वीसारखा बाईकवरील रोमान्स संपला होता. अंतर ठेवून अनोळखी असल्यासारखी बसत असे. कपिलने कारण विचारल्यास कामाचा ताण आहे, असे सांगायची. कपिलच्या हे लक्षात आले होते की, ती त्याच्यापासून दूर जात आहे. फोन केला तरी ती अनेकदा तो उचलत नसे. काहीतरी कारण सांगत असे.’’

एके दिवशी कपिलने बाईक रस्त्यावर एका निर्जन ठिकाणी थांबवली. विचारले, ‘‘नेहा मला स्पष्टपणे सांग, तू माझ्यापासून दूर का जात आहेस? तुझे असे अनोळखी असल्यासारखे वागणे मला आता सहन होत नाही.’’

नेहानेही आपले मन मोकळे केले. ‘‘कपिल, तू खूपच भावनाप्रधान आहेस. आपल्या आतापर्यंतच्या संबंधांना तुला लग्नात बांधायचे आहे. पण, माझा लग्नाचा विचार नाही. मला माझ्या करियरवर लक्ष द्यायचे आहे. सध्या तरी मला लग्नाच्या भानगडीत पडायचे नाही. तू सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने मला कंटाळा आला आहे. शिवाय तुझ्यासारख्या भावनाप्रधान माणसाशी माझे फार काळ पटणार नाही. म्हणून असे समज की, मी आपले   संबंध तोडत आहे. मला तुला हेच सांगायचे होते.’’

कपिलचा कंठ दाटून आला. ‘‘असे म्हणू नकोस. नेहा, मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही.’’

‘‘अरे, हे सर्व संवाद चित्रपटासाठी ठीक आहेत. कुणावाचून कोणी मरत नाही. चल, आज मला शेवटचे घरी सोड. आता संपले आपले संबंध. तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा. एक चांगली मुलगी बघून लग्न कर आणि हो, मलाही लग्नाला बोलाव. मी येईन. माझ्या मनात अपराधीपणाची कोणतीही भावना नाही. शिवाय मी त्या मुलींसारखी नाही ज्या आपल्या प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाहीत,’’ असे म्हणून नेहा जोरात हसली. कपिलने जड अंतकरणाने तिला घरापर्यंत सोडले.

‘‘बाय कपिल, असे म्हणत तोऱ्यातच नेहा तिच्या घराच्या दिशेने निघाली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही. कपिल मात्र ती नजरेआड होईपर्यंत तेथेच उभा राहून तिला पाठमोरा पाहत होता. त्यानंतर पाणावलेल्या डोळयांनीच तो बाईकवरून माघारी परतला. त्याचे नेहावर खरे प्रेम होते. तिच्याशिवाय तो जगण्याचा विचार करू शकत नव्हता. कसाबसा तो घरी गेला. त्याचा असा उतरलेला चेहरा पाहून आईवडील घाबरले. तब्येत बरी नाही असे सांगून तो २ दिवस घरातच झोपून होता. त्यामुळे आईवडिलांना काळजी वाटू लागली. तो काहीच खात नव्हता. काही बोलतही नव्हता.

आईने त्याचा जीवलग मित्र सुदीपला बोलावले. सुदीपला कपिल आणि नेहाबाबत माहीत होते. तो खूप वेळ कपिलसोबत बसला होता. पण, कपिल काहीच बोलत नव्हता. एखाद्या दगडासारखा बसला होता. खूप वेळानंतर सुदीपच्या काही प्रश्नांची उत्तरे त्याने रडत दिली आणि सांगितले की, नेहाने त्याच्यासोबतचे नाते तोडले आहे. सुदीप बराच वेळ त्याची समजूत काढत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ घरात दुखवटा घेऊन आली. कपिलने रात्रीच हाताची नस कापून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी एका कागदावर लिहून ठेवले होते की, आई मला माफ कर. नेहा मला सोडून गेली आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. बाबा, मला माफ करा.’’ आईवडिलांनी हंबरडा फोडला. सुदीपही  माहिती मिळताच हताशपणे धावत आला. जोरजोरात रडू लागला. प्रसंग बाका होता. कपिलची आई जोरजोरात रडत सतत हेच बोलत होती की, ‘‘एका मुलीच्या प्रेमापायी तू आम्हाला कसा विसरलास? आता आमचे कोण आहे?’’

शेजारी, नातेवाईक सर्व गोळा होऊ लागले. कपिलच्या आईवडिलांना सावरणे सर्वांसाठी अवघड झाले होते. दोघांनाही अश्रू अनावर झाले होते.

सुदीपला नेहाचा खूपच राग आला होता. एके दिवशी तो तिच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेर उभा राहून तिची वाट बघू लागला. ती येताच त्याने स्वत:ची ओळख करून दिली आणि कपिलच्या आत्महत्येबाबत सांगितले. नेहा एक दीर्घ श्वास टाकत म्हणाली, ‘‘ऐकून वाईट वाटले, पण यासाठी माझ्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करू नकोस. तोच कमकुवत मनाचा होता. माझे खरे बोलणे आणि इतर अनेक गोष्टी सहन करू शकला नाही. यात माझी काहीही चूक नाही. त्याच्या आत्महत्येसाठी मी  स्वत:ला अजिबातच दोषी मानणार नाही. नो गिल्ट ट्रिप. मला अपराधीपणाच्यासहलीसाठी पाठवू नकोस, समजले?’’ असे म्हणत ती भराभर चालत पुढे निघून गेली.  सुदीप आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला.

राहो चमकत प्रतिबिंब

कथा * मधु शर्मा कटिहा

अभिनव जाताच अनन्या शांतपणे खाटेवर पहुडली. आठवडाभराकरिता ऑफिसच्या कामासाठी अभिनव लखनऊला निघाला होता. पण जातेवेळी नेहमीप्रमाणेच रुक्षपणे ‘निघतो’ एवढेच बोलून गेला. किती आठवण आली होती तिला अभिनवची जेव्हा तो मागच्या महिन्यात गोव्याला गेला होता. त्यावेळी अनन्या त्याची आतुरतेने वाट पाहात होती. त्याच्या मनात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत होती. इंटरनेटवरील व्हिडीओ पाहून काही पदार्थही बनवायला शिकली होती.

जेव्हा अभिनव घरी आला तेव्हा नोकराकडून स्वयंपाक बनवून न घेता तिने स्वत:च्या हाताने त्याच्यासाठी कोफ्ते आणि खुसखुशीत पराठे बनविले. जेवण झाल्यावर अभिनय हसून तिला ‘धन्यवाद’ म्हणाला तेव्हा अनन्याला खूपच छान वाटले होते.

या वेळेस तिला अशी अपेक्षा होती की, अभिनव बऱ्याच सूचना देऊन जाईल. जसे की, या वेळेस माझी जास्त आठवण काढत बसू नकोस… स्वत:साठी चांगले जेवण बनवून जेवत जा… रात्री उशिरापर्यंत जागू नकोस वगैरे वगैरे. पण अभिनव नेहमीप्रमाणे फक्त ‘निघतो’ एवढेच सांगून टॅक्सीत जाऊन बसला. त्याने एकदाही मागे वळून पाहिले नाही. मनात असे विचार चक्र सुरू असतानाच अनन्याचा डोळा लागला. त्यानंतर मोबाईलची रिंग वाजली आणि ती जागी झाली.

‘‘नुकतीच फ्लाईट लँड झाली आहे,’’ अभिनवचा फोन होता.

‘‘बरं… आता आणखी काही वेळ लागेल ना विमानतळावरून बाहेर पडण्यासाठी? त्यानंतर ऑफिसच्या गेस्ट हाऊसला पोहोचण्यासाठी आणखी १ तास लागेल… तुम्ही ऑफिसमध्ये सांगून गाडीची व्यवस्था करून घेतली आहे ना? रात्री टॅक्सीने जाणे धोकादायक असते… स्वत:ची काळजी घ्या,’’ अनन्याला नेहमीप्रमाणेच अभिनवची काळजी वाटत होती. तिच्यापासून दूर गेलेल्या अभिनवशी बोलण्यासाठी ती काही ना काही बहाणा शोधत असे.

‘‘बरं ठीक आहे,’’ असे मोघम बोलत अभिनवने फोन कट केला.

अनन्याला रडू आले. ती विचार करू लागली की, अभिनव नक्कीच आणखी थोडा वेळ बोलू शकत होता… लग्नाला फक्त ६ महिने झाले आहेत, एवढयातच अभिनव मला कंटाळला आहे असे वाटते… दिव्याचे लग्नही आमच्या लग्नाच्या वेळेसच झाले होते. ते दोघे अजूनही प्रत्येक दिवस हनिमूनसारखाच मजेत घालवत आहेत. त्या दिवशी ती बाजारात नवऱ्याच्या हातात हात घालून मिरवत होती… आणि एक मी आहे जिला अभिनवला खुश ठेवण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करावे लागत आहेत.

अंधार होऊ लागताच अनन्याला जणू निराशेच्या काळोखाने घेरले. या उदास करणाऱ्या विचारचक्रातून बाहेर पडण्यासाठी तिने व्हॉट्सअपवर जाऊन जुन्या मित्र-मैत्रिणींची चॅट उघडली.

‘‘अरे वा, उद्या सर्वांनी इंडिया गेटवर भेटायचे ठरविले आहे… कितीतरी दिवसांनी सर्व भेटणार आहेत… खूप मजेत जाणार उद्याचा दिवस,’’ असा विचार करून अनन्या आंनदी झाली.

‘‘मीही येणार,’’ असे लिहून ती उद्यासाठीच्या ड्रेसची निवड करण्यासाठी कपटाकडे गेली. ड्रेससोबत मॅचिंग दागिने काढून ते टेबलावर ठेवून आनंदाने झोपली.

सकाळी कामवाल्या बाईकडून लवकरात लवकर काम करून घेऊन आनंदाने निघण्याची तयारी करू लागली. करडया रंगाच्या पँटवर गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि रुबीचा चोकर घालून जेव्हा ती लिपस्टिक लावू लागली तेव्हा आरशात स्वत:चे सुंदर रूप पाहून स्वत:वरच खुश झाली. हसतच हातात बॅग घेऊन इंडिया गेटच्या दिशेने रवाना झाली.

तेथे पोहोचली तर संजना, मनिष, निवेदिता, सारांश आणि कार्तिक तिच्या आधीच आले होते.

‘‘हाय ब्यूटीफुल,’’ मनिष नेहमीप्रमाणेच तिला पाहून म्हणाला.

‘‘कोण म्हणेल की तुझे लग्न झाले आहे,’’ सारांश तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत म्हणाला.

तितक्यात कोणीतरी मागून येऊन अनन्याचे डोळे बंद केले.

‘‘साक्षी… ओळखले मी तुला,’’ साक्षीच्या हातांना आपल्या हातांनी बाजूला सारत आनंदाने अनन्या म्हणाली.

साक्षी डोळे विस्फारून अनन्याकडे पाहातच राहिली. ‘‘अरे, माझे तर लग्नाच्या २ महिन्यांनंतरच वजन वाढले… पण तू मात्र अजूनही जशीच्या तशी आहेस…’’

संजनाही लगेचच अनन्याचे कौतुक करत म्हणाली, ‘‘महाविद्यालयातही सर्वांच्या नजरा हिच्या सौंदर्यावर खिळून राहायच्या… संपूर्ण हॉस्टेलमध्ये उत्तराखंडमधून आलेल्या या मुलीचीच चर्चा होती… आम्ही सर्व तर हिला बाहुली म्हणायचो… किती सुंदर दिसतेस…’’

‘‘तुम्ही सर्व कोणत्याही नावाने हाक मारा, पण मी मात्र हिला चुनचून म्हणायचो आणि तेच म्हणणार…’’ संजनाचे बोलणे पूर्ण होण्याआधीच नमन आला आणि नेहमीप्रमाणेच अनन्याच्या सौंदर्याचे कौतुक करू लागला.

‘‘चुनचुन… हो, चुनचुन म्हणायचास तू तिला, पण हेच नाव का ठेवलेस तू या बाहुलीचे?’’ संजनाने उत्सुकतेने विचारले.

‘‘अगं, ते सुंदरसे गाणे आहे ना, चुनचुन करती आई चिडीया… आणि हीदेखील होती ना, छोटीशी चुनचुन करती चिडीया,’’ अनन्याचा गाल ओढत नमन म्हणाला.

‘‘हो…हो… प्रत्येक गोष्टीसाठी गाणे गाण्याची तुझी सवय माझ्या अजूनही लक्षात आहे… पण हे आजच समजले की, चुनचुन हे नावही तू गाण्यातूनच चोरले होतेस…’’ हसतच अनन्या नमनकडे पाहात म्हणाली. तितक्यात तिला स्वातीची आठवण झाली, जी अनन्याच्या या नावाला जळून तिला खूप चिडवत असे.

‘‘स्वाती अजून आली नाही… काल ग्रुपवर तर लिहिले होते की, नक्की येईन,‘‘ अनन्या म्हणाली.

‘‘अगं तिकडे बघ, ती आली… सोबत बहुतेक तिचा नवरा आहे,‘‘ दुरूनच स्वातीला येताना पाहून मनिष म्हणाला.

स्वातीने आल्यानंतर सर्वांची विचारपूस केली. ती नवऱ्याची ओळख करून देणारच होती मात्र त्याआधी तिचा नवराच स्वत:हून म्हणाला, ‘‘हिच्याशिवाय माझे मनच लागत नाही, म्हणून तिचा पदर धरून तिच्या मागोमाग आलो.’’

एकमेकांसोबत मौजमजा करण्यात मग्न झालेले सर्व मित्रमैत्रिणी अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांप्रमाणेच भासत होते. खाण्या-पिण्यात, आनंदाने गप्पागोष्टी करण्यात संपूर्ण दिवस निघून गेला. संध्याकाळ होऊ लागली तसे पुन्हा भेटायचे ठरवून सर्वजण आपापल्या घरी निघाले.

अनन्या घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. चहा बनवून चहासोबत दोन बिस्किटे खाऊन तिने व्हॉट्सअप सुरू केला. ग्रुपवर सर्व आपापल्या मोबाईलमधून काढलेले फोटो शेअर करीत होते. नमनने ग्रुपवर फोटो टाकण्यासोबतच अनन्याच्या नंबरवर तिला तिचा एक फोटो पाठवून त्याखाली एका गाण्याची ओळ लिहिली. ‘‘लडकी ब्यूटीफुल, कर गई चुल…’’

हे वाचून अनन्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हिंदी चित्रपट आणि गाण्यांची आवड असलेल्या नमनला प्रत्येक गोष्टीसाठी चित्रपटातील संवाद आणि गीतांच्या ओळींचा वापर करण्याची सवय होती, हे अनन्याला चांगलेच माहीत होते.

नमन नेहमीच तिचे कौतुक करायचा. पण आज त्याने असे खोडसाळपणे वागून अनन्याच्या सुंदरतेचे केलेले कौतुक तिला खूपच आवडले होते. अभिनवने कधीच मोकळेपणाने तिच्या सौंदर्याची प्रशंसा केली नव्हती.

तिने नमनचे आभार मानले तेव्हा त्याचे उत्तर आले, ‘‘मॅडम, मैत्रीत माफी आणि धन्यवादासाठी जागा नसते… ‘मैने प्यार किया’ चित्रपटात सलमानने असे सांगितले आहे,’’ असे लिहिण्यासोबतच नमनने चुंबन घेत असल्याचा इमोजीही पाठवला.

‘‘हो… हो… मैत्री आहे ते मान्य, पण हा चुंबन घेतानाचा इमोजी कोणासाठी पाठवला आहेस?’’

‘‘तुझ्यासाठीच मैत्रिणी… जर मैत्रीण तुझ्याइतकी सुंदर असेल तर तिच्यावर जीव जडतोच.’’

प्रेमाच्या या गप्पा येथेच संपविण्याच्या हेतूने अनन्याने विषयांतर करीत लिहिले, ‘‘आणखी फोटो पाठव… तू आपल्या ग्रुपमधील सर्वात चांगला फोटोग्राफर आहेस… आज तू बरेच फोटो काढलेस.’’

नमनने भरपूर फोटो पाठवले. ते सर्व अनन्याचेच होते. अनन्याच्या मनाला हे सर्व आवडत होते, पण बुद्धी सतत आठवण करून देत होती की, एका विवाहित महिलेने परपुरुषाशी एवढया मोकळेपणाने बोलणे चांगले नाही.

हसणाऱ्या स्मायलीसह अनन्याने लिहिले, ‘‘अरे वा, माझे एवढे फोटो? उगाच वेळ का वाया घालवतोस तुझा? आता तुही लग्न कर… मग तुझी ती दिवसरात्र गाणे गात राहील, ‘तू काढ माझो फोटो प्रिया…’ आणि मग काढ तिचे भरपूर फोटो.’’

नमनचे उत्तर आले, ‘‘तुझ्यासारखी कोणी असेल तर सांग… करतो लग्न… ‘जगभर फिरलो, पण तुझ्यासारखे कोणीच नाही…’’’

अनन्याला नमचे हे बोलणे असे वाटले जसे तप्त वाळवंटात कोणीतरी पाण्याचा वर्षाव करीत आहे. अभिनवचे रुक्ष वागणे आणि सतत गप्प बसून राहण्याच्या स्वभावामुळे कंटाळलेल्या अनन्याला नमनचे प्रेमळ बोलणे खूपच भावले. ती आपल्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत होती, पण ते तर तिच्या हातून निसटून चालले होते.

रात्री उशिरापर्यंत अनन्या नमनसोबत चॅटिंग करीत होती. तिने कितीही विषयांतर करण्याचा प्रयत्न केला तरी तो मात्र पुन्हा तिच्या सौंदर्याबाबतच बोलत होता. एकमेकांना ‘शुभ रात्री’ असे लिहून चॅटिंग बंद केल्यावर जेव्हा अनन्या झोपायला गेली तेव्हा नमनच्या रंगात रंगून ‘भागे रे मन कही…’ हे गाणे गुणगुणत स्वत:शीच हसली.

पुढचे २-३ दिवस नमन आणि अनन्याने भरपूर चॅटिंग केली. महाविद्यालयीन दिवसांची आठवण काढत नमनने तिला सांगितले की, एके दिवशी त्याच्या बालपणीचा एक मित्र महाविद्यालयात त्याला भेटायला आला होता. तेव्हा अनन्या आपली गर्लफ्रेंड असल्याचे त्याने मित्राला सांगितले होते.

हे वाचल्यावर अनन्याला आश्चर्य वाटले. तिने हसणारे तीन इमोजी टाकले.

‘‘हे काय… तू कशाला हसतेस…? तू माझी गर्लफ्रेंड व्हावीस अशीच माझी इच्छा आहे… जीवन खूप सुंदर होऊन जाईल आपले.’’

‘‘अरे… अरे… असे काय बोलतोस? एका विवाहितेला मागणी घालतोस?’’

‘‘मी असे कुठे म्हटले की, तुझ्या नवऱ्यासोबतचे नाते तोडून तू मला गाणे ऐकवावेस की, ‘मेरे सयाजी से आज मैने ब्रेकअप कर लिया…’ माझी गर्लफ्रेंड हो एवढेच तर सांगत आहे.’’

‘‘महाविद्यालयात असताना असे का नाही विचारलेस मला?’’

‘‘बस… बस… अनन्या, अजून ऐकवू नकोस. उद्या महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी मी अहमदाबादला जाणार आहे… तेथून परत आल्यावर तुला जेवायला घेऊन जाईन. आणि हो, मी कधीच विनंती करीत नाही. फक्त एकदाच सांगतो आणि तेच सांगणे माझ्यासाठी पहिले आणि शेवटचे असते.’’

‘‘अरे वा, किती छान बोललास… ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमान खान… जेवायला जाणे पहिले आणि शेवटचे असेल तर उरलेल्या गप्पा तिथेच मारू,’’ अनन्याने लिहिले आणि त्यानंतर दोघांनी काही दिवसांसाठी एकमेकांचा निरोप घेतला.

नमन गेल्यानंतर काही दिवस अनन्याला एकटेपणा जाणवू लागला. फेसबूकवर मित्र-मैत्रिणींचे स्टेटस आणि त्यांचे फोटो पाहून त्यांना कमेंट देण्यात कसेबसे १-२ दिवस गेले. अखेर अभिनव परत येण्याचा दिवस उजाडला.

अभिनवने आल्यानंतर जे सांगितले ते ऐकून अनन्या आनंदी होण्यासोबतच उदासही झाली. अभिनवच्या कामावर खुश झाल्यामुळे वरिष्ठांनी त्याला बढती दिली होती. अभिनवने सांगितले की, १५ दिवसांच्या आतच त्यांना दिल्लीहून कायमचे हैदराबादला रहायला जावे लागेल.

नमनच्या मैत्रीमुळे खुललेली अनन्या निराश झाली, पण तिच्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता. दुसऱ्याच दिवसापासून ती जाण्याची तयारी करू लागली.

हैदराबादला गेल्यानंतर अभिनव कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडल्यामुळे जास्तच व्यस्त झाला. अनन्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत नव्या घरातील सामानाची व्यवस्था लावण्यात थकून जात असे. कामवाली बाई रोजचे काम उरकायची पण इतर कामात अनन्या तिची मदत घेऊ शकत नव्हती. अनन्याला तेलुगू येत नव्हते आणि कामवाल्या बाईला हिंदी फारसे समजत नव्हते. त्यामुळे कोणत्या कामासाठी मदत हवी आहे, हे अनन्या तिला सांगू शकत नव्हती.

काही दिवसांनंतर अनन्याला अशक्तपणा जाणवू लागला. सतत झोप येऊ लागली. दुपारी जेव्हा ती एखादे पुस्तक वाचायला घ्यायची तेव्हा डोळयावरची झोप तिला एक शब्दही वाचू देत नसे. सकाळीही तिला उठायला उशीर होऊ लागला. सकाळचा फेरफटका मारायला जाणेही बंद झाले होते. झोप आणि सुस्तीपासून दूर राहण्यासाठी ती घरातले काही ना काही काम करत राहण्याचा प्रयत्न करायची, पण झोप तिच्यावर ताबा मिळवायचीच. स्वत:मध्ये होत असलेल्या या बदलांमुळे तिला काळजी वाटू लागली होती. फक्त जेव्हा कधी नमनसोबत चॅटिंग करायची तेवढयापुरतेच तिला थोडे प्रसन्न वाटायचे.

हैदराबादला येऊन ३ महिने झाले होते. त्या दिवशी दोघांना शेजारच्या मुलाच्या वाढदिवसाला जायचे होते. अनन्याने कपाटातून ड्रेस काढला, पण तो तिला खूपच घट्ट होऊ लागला. तिला वाटले की, धुतल्यामुळे ड्रेसचा कपडा आकसला असेल. त्यामुळे ३-४ आणखी ड्रेस काढून ते घालण्याचा प्रयत्न केला, पण कोणताच ड्रेस तिला होत नव्हता. येथे आल्यापासून घरातले काम वाढल्यामुळे ती सैल कुरता आणि गाऊनच घालत असे. त्यामुळे आपले वजन वाढत आहे, हे तिच्या लक्षात आले नाही.

त्यानंतर अनन्याने सकाळचा फेरफटका मारणे, व्यायाम करणे सुरू केले. तरीही वजन नियंत्रणात येत नव्हते, शिवाय प्रचंड थकवा जाणवू लागला होता. चेहराही निस्तेज झाला होता. जेव्हा तिला पाय सुजल्यासारखे वाटू लागले तेव्हा ती अभिनवसोबत डॉक्टरांकडे गेली.

डॉक्टरांनी तिला रक्ताची चाचणी करण्यास सांगितले. चाचणीचा अहवाल आल्यानंतर समजले की, अनन्याला हायपोथायरॉईडिज्म आहे. आपल्या गळयात असलेली थायरॉईड नावाची ग्रंथी जेव्हा जास्त सक्रियपणे काम करू शकत नाही तेव्हा हा आजार होतो. यामुळे शरीराला आवश्यक हार्मोन्स मिळू शकत नाहीत.

डॉक्टरांनी तिला दररोजसाठीची औषधे लिहून दिली आणि काही दिवसांनंतर पुन्हा रक्ताची चाचणी करण्यास सांगितले, जेणेकरून औषधांची योग्य मात्रा ठरवता येईल. सोबतच हेही सांगितले की, एकदा या ग्रंथी निष्क्रिय झाल्यानंतर पुन्हा सक्रिय होणे जवळपास अशक्य असते. पण सध्या तरी घाबरण्याचे कारण नाही.

काही दिवसांनंतर अभिनवला एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला जायचे होते. अनन्यानेही त्याच्या सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या मित्र-मैत्रिणी, विशेष करून नमनला भेटण्याची ही चांगली संधी होती. नमन नेहमी अशी तक्रार करीत असे की, तो प्रशिक्षणावरून परत येण्याआधीच ती हैदराबादला निघून गेली. त्यामुळे त्यांना भेटता आले नाही.

दिल्लीत आल्यावर ते एका हॉटेलमध्ये थांबले. तिथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशीच तिने आपल्या मित्र-मैत्रिणींना जेवणासाठी बोलवायचे ठरविले. ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती त्या हॉटेलचा पत्ता सर्वांना पाठवून तिने तेथेच जेवणाची व्यवस्था केली. आपल्या आवडीचा ड्रेस घालून अनन्या आतुरतेने मित्र-मैत्रिणींची वाट पाहू लागली.

मनिष सर्वात आधी आला. त्याला पाहून अनन्याला खूपच आनंद झाला. पण तिला पाहून चेहरा पाडून आणि डोळे बारीक करून मनिष म्हणाला, ‘‘अरे हे काय? तू… तू इतकी लठ्ठ? हे काय झाले?’’

अनन्याने उत्तर देण्याआधीच नमनही आला. त्यानंतर १-१ करून सर्व आले.

‘‘मी अनन्याला भेटत आहे की एखाद्या काकूबाईला… केवढी जाड झाली आहे… आळशासारखी पडून राहून भरपूर खात असतेस का संपूर्ण दिवस?’’ नमनने हसतच विचारले.

अनन्या रडवेली झाली. ‘‘अरे नाही. मी आळशी झालेली नाही. खूप खाते असेही काही नाही… हायपोथायरॉईडिज्मचा आजार झाला आहे मला… सांगितले तर होते नमन तुला, काही दिवसांपूर्वीच.’’

‘‘माझ्या वहिनीलाही हा आजार आहे, पण तू तर थोडी जास्तच…’’ हसू येणारे आपले गाल फुगवत आणि हातांनी जाड झाल्याचा हावभाव करीत स्वाती म्हणाली आणि मोठयाने हसली.

सर्वांच्या बोलण्यामुळे उदास झालेल्या अनन्याने जेवण मागवले. जेवतानाही मित्र-मैत्रिणी तिला ‘जाडे, आणखी किती खाशील,’ असे चिडवत होते. नमनही त्यांना साथ देत ‘बस… खूप खाल्लेस,’ असे म्हणून सतत तिची प्लेट बाजूला ठेवत होता. जेवण झाल्यानंतर अनन्या सर्वांना बाहेरपर्यंत सोडायला आली.

‘‘ओके… बाय चुनचुन… नाही टूणटूण…’’ असे नमनने म्हणताच सर्व मोठयाने हसले. अनन्याला खूपच वाईट वाटले. उदास होऊन ती हॉटेलच्या आपल्या खोलीत येऊन बसली.

घरी गेल्यानंतर नमनने तिला कुठलाच मेसेज केला नाही, शिवाय तिच्या एकाही मेसेजला उत्तरही दिले नाही.

दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा अनन्याने त्याला फोन केला तेव्हा, ‘सध्या कामात खूपच व्यस्त आहे… वेळ मिळाला की स्वत:च फोन करेन,’ असे सांगून त्याने फोन कट केला.

अनन्या रोज वाट पाहात होती, पण नमनचा फोन किंवा मेसेज आलाच नाही. हैदराबादला परत जाण्याचा दिवसही जवळ येत चालला होता.

अनन्याने परत जाण्याच्या एक दिवस आधी नमनला रागावून मेसेज केला.

त्यावर नमनचे उत्तर आले. ‘एवढी का रागावली आहेस? तुझा राग पाहून मला ‘जवानीदिवानी’ चित्रपटातील एक गाणे आठवले… ‘खल गई, तुझे खल गई, मेरी बेपरवाही खल गई… तू कोणत्या दगडाची बनली आहेस ते तरी सांग?’ असे विचारत त्याने जीभ बाहेर काढून एक डोळा बंद केलेला इमोजी टाकला.

त्याचे हे उत्तर वाचून अनन्याला खूपच राग आला. एकेकाळी नमन माझ्या दिल्लीला येण्याची आतुरतेने वाट पाहात होता आणि आता बोलणे तर दूरच… सतत माझा अपमान करीत आहे. मी तर तीच आहे ना, जी पूर्वी होते… बाह्य सौंदर्य नमनसाठी जास्त महत्त्वाचे आहे का? त्याच्यासाठी अनन्या म्हणजे फक्त गोऱ्या रंगाची ५ फूट १ इंचाची सडपातळ मुलगी होती का…? आता ते रूप उरले नाही म्हणून अनन्या ही अनन्या राहिली नाही…

रात्री झोपण्यासाठी ती खाटेवर गेली आणि अभिनवच्या जवळ जात त्याच्या छातीवर आपला चेहरा लपवत गुपचूप पडून राहिली.

‘‘काय झाले? तब्येत तर बरी आहे ना तुझी? उद्या परत जाणार आहोत म्हणून कदाचित उदास आहेस,’’ तिच्या पाठीवर हात ठेवत अभिनव म्हणाला.

काही वेळ तशीच पडून राहिल्यानंतर अभिनवकडे पाहात अनन्या म्हणाली, ‘‘अभिनव, एक विचारू? मी इतकी लठ्ठ झाले आहे, हे तुला खटकत नाही का? चेहराही सुजलेला, बदलल्यासारखा वाटत आहे… तू तर एका सडपातळ, सुंदर, गोऱ्या मुलीशी लग्न केले होतेस, पण तीच मुलगी आता कशीतरीच झालीय.’’

‘‘हा… हा… अभिनव मोठयाने हसला. नंतर स्मितहास्य करून अनन्याकडे पाहात म्हणाला, ‘‘हे काय अनन्या, हा कसला प्रश्न आहे? हे खरे आहे की, तुला एक आजार झाला आहे आणि त्यात वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते… पण तूच सांग की, आपण जसे लग्नावेळी दिसायचो तसेच शेवटपर्यंत दिसू शकतो का? माझे केस गळू लागले आहेत. मला टक्कल पडले किंवा म्हातारपणी माझे दात पडले तर मीही खराब दिसू लागेन ना?’’

‘‘तुझे अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना?’’ अनन्याच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती.

अभिनव पुन्हा एकदा मोठयाने हसला. ‘‘अनन्या ऐक, तू इतकी समजूतदार आहेस की माझे मन कधी तुझ्याशी प्रेमाने जोडले गेले, हे माझे मलाही समजले नाही. तू माझी काळजी तर घेतेसच, शिवाय प्रत्येक गोष्ट मला सांगतेस. विनाकारण कधीच भांडत नाहीस… मी ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असतो तरीही मला समजून घेतेस.

‘‘पण याआधी तर तू असे कधीच सांगितले नव्हतेस.’’ अभिनवचे आपल्यावरील प्रेम पाहून भावनाविवश होत अनन्याने विचारले.

‘‘मी असाच आहे… मला बोलायला कमी आणि ऐकायला जास्त आवडते… अनन्या विश्वास ठेव, मला अगदी तुझ्यासारखीच जोडीदार हवी होती.‘‘

अनन्या मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.

‘‘एक गोष्ट आणखी सांगेन… शरीराची काळजी घेणे आपल्या सर्वांसाठीच गरजेचे आहे, पण तनाच्या सुंदरतेने कधीच मनाच्या सुंदरतेचा ताबा घेता कामा नये… तू माझ्या मनात डोकावून तुझा चेहरा पाहशील तेव्हा तुला तोच सुंदर चेहरा दिसेल जो काल होता, आज आहे आणि उद्याही तसाच असेल…’’

‘‘बस, अभिनव… आता आणखी काहीच नकोय मला. कोणी मला काहीही म्हटले तरी आता मला त्याची पर्वा नाही… फक्त तुझ्या मनाच्या आरशात माझे प्रतिबिंब असेच चमकत राहो,’’ असा विचार करत अनन्या पाणावलेल्या डोळयांनी अभिनवच्या मिठीत शिरली. त्याच्या प्रेमात विरघळून तिला खूपच शांत, अगदी हलके झाल्यासारखे वाटत होते.

तुझ्या सुखात माझे सुख

कथा * आशा सराफ

आज सूर्य थोडा निस्तेज होता. दाटून आलेले ढग सूर्याला गारवा देत होते. कदाचित उष्णतेनं सूर्यही बेजार झाला असावा. म्हणून तो ढगांच्या कुशीत लपत होता. प्रत्येक तप्त हृदयाला प्रेमाचा शिडकावा हवासाच वाटतो.

संजनालाही या प्रेमाच्या वर्षावात भिजायचं होतं. थोडी फार ती भिजलीही, पण कुठं तरी वर्षाव कमी पडला. ते थेंब आता तिच्या डोळ्यातल्या अश्रूंच्या रूपानं ओघळतात. आज लग्नाचा वाढदिवस. पाच वर्षं झालीत तिच्या लग्नाला. या दिवशी ती आनंदीही असते आणि दु:खीही. आनंद राकेशबरोबर आहे म्हणून आणि दु:ख आईवडिलांना सोडावं लागलं म्हणून.

लग्नानंतर प्रत्येक मुलगी आईबाबांचं घर सोडतेच. पण तिला तर नातंच तोडावं लागलं होतं. पाच वर्षांत तिनं आईवडिलांचं तोंडही बघितलेलं नाही.

लग्नाच्या वाढदिवसाला ती ऑफिसमधून रजा घ्यायची. खरं तर राकेश तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजच्या दिवशी तिचं त्याच्याविषयीचं वेडं प्रेम उफाळून यायचं. इतकी वर्षं झाली, पण वाटायचं जणू कालच घडलेली घटना आहे. तिचे पेपर्स सुरू होते. पेपरला जाताना पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की दोन तरूण मुलं तिच्या पाठी आहेत. पाठलाग करताहेत. ती स्कूटीवरूनच कॉलेजला जायची. वाटेत एका ठिकाणी जरा निर्जन जागा होती. तिथून जाताना तिला भीती वाटे, पण घरी सांगायची सोय नव्हती. तेवढ्याच कारणावरून तिचं शिक्षण बंद केलं असतं त्यांनी. जीव मुठीत धरून ती जायची. पण आज मात्र ती घाबरली. पेपरचं टेन्शन अन् ही दोन उनाड मुलं…तेवढ्यात तिला एक गॅरेज दिसलं. तिनं पटकन् स्कूटी थांबवली.

‘‘काय प्रॉब्लेम आहे मॅडम?’’ एका सावळ्याशा युवकानं प्रश्न केला.

‘‘जरा बघा बरं, चालताना अडकतेय सारखी…काय झालंय कुणास ठाऊक,’’ प्रश्न विचारणाऱ्याकडे तिचं लक्ष नव्हतं. ती मुलं अजून मागे आहेत का तेवढंच ती बघत होती. स्कूटरवरून पाठलाग करणारी ती मुलंही तिथं जवळच थांबली होती.

‘‘मॅडम, स्कूटीत काही दोष नाही,’’ स्कूटी चेक करून तो तरूण म्हणाला.

‘‘नीट बघा, चाकात काही दोष असेल…’’ ती वेळकाढूपणा करत होती. ती दोन मुलं जाण्याची वाट बघत होती.

तिच्याकडे एकदा नीट बघून तो सावळा तरूण म्हणाला, ‘‘चाकंही व्यवस्थित आहेत.’’

‘‘तुम्ही वाद का घालताय? नीट चेक करा ना? माझी परीक्षा आहे. वाटेत गाडी बंद पडली तर?’’ ती जरा चिडून बोलली. एव्हाना ती मुलं निघून गेली होती. तिनं सुटकेचा नि:श्वास सोडला. चेहऱ्यावरचा ताण कमी झाला.

‘‘किती पैसे द्यायचे?’’

‘‘काहीच नाही…पैसे नाहीच द्यायचे.’’ तो तरूण पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला.

‘‘ठिकाय…’’ घाईनं संजनानं स्कूटी सुरू केली. त्या निर्जन स्थळी ती पोहोचली अन् अवचित ती दोन्ही पोरं स्कूटरसमेत तिच्यासमोर आली. घाबरून संजनाच्या घशातून शब्द निघेना…ती घामाघूम झाली. त्या पोरांनी आता संजनाच्या समोरच स्कूटर थांबवली.

‘‘मॅडम, तुमची पर्स…तुम्ही विसरला होता.’’ अचानक झालेल्या या दमदार आवाजातल्या हाकेनं संजना दचकली तशी ती मुलंही दचकली. आवाजाचा मालकही चांगला मजबूत होता. त्याला बघताच त्या पोरांनी पोबारा केला.

ती मुलं पळाली अन् भक्कम सोबत आहे म्हटल्यावर संजनाही सावरली. कशीबशी म्हणाली, ‘‘पण मी पर्स काढलीच नव्हती. तुम्ही पैसे घेतले नाहीत ना?’’

‘‘होय, मी खोटं बोललो. ती मुलं तुमच्या मागावर आहेत हे माझ्या लक्षात आलं होतं म्हणूनच मी इथवर आलो.’’

‘‘धन्यवाद! तुम्ही वाचवलंत मला.’’

‘‘आता गप्पा नंतर. आधी लवकर चला. नाही तर पेपरला उशीर होईल.’’

‘‘तुम्हाला कसं कळलं, माझा पेपर आहे ते?’’

‘‘नंतर सगळं सांगतो. चला लवकर…’’ त्यानं आपली स्कूटर सुरू केली. कॉलेजपर्यंत तो तिला सोडायला आला.

परीक्षा संपेपर्यंत तो तरूण रोज तिला त्याच्या गॅरेजपासून संजनाच्या कॉलेजपर्यंत सोडून यायचा. तिनं काही म्हटलं नव्हतं, तोही काही बोलला नव्हता. पण जे काही होतं ते न बोलता दोघांना समजलं होतं. परीक्षेच्या धामधुमीत तिला इतर कुठं बघायला वेळही नव्हता.

तिची परीक्षा संपली तसा वडिलांनी घरात फर्मान काढला की यापुढे संजनाचं शिक्षण बंद! आता हिचं लग्न करायचं. संजनानं शेवटचा पेपर दिला, त्याच संध्याकाळी ती त्या गॅरेजमध्ये पोहोचली. तोही बहुधा तिचीच वाट बघत होता.

‘‘धन्यवाद!’’ त्याच्याजवळ जाऊन ती म्हणाली.

‘‘तुम्ही कुणाला धन्यवाद देताय?’’ त्यानं हसून प्रश्न केला.

‘‘तुम्हाला?’’ कपाळावर आठ्या घालत तिनं म्हटलं.

‘‘धन्यवाद असे दिले जात नाहीत. तुम्ही माझं नावंही घेतलं नाहीए.’’ हसत हसत त्यानं म्हटलं.

त्याचं हसणं खरोखर मनमोहक होतं.

‘‘ओह सॉरी,’’ ओशाळून संजनानं म्हटलं, ‘‘तुमचं नावं काय आहे?’’

‘‘राकेश.’’

‘‘बरं तर, राकेश, आता सांगा धन्यवाद कसे देतात?’’ संजना थोडी सावरून म्हणाली.

‘‘जवळच एक कॅफे आहे. तिथं कॉफी पिऊयात?’’ गॅरेजच्या बाहेर येत त्यानं म्हटलं.

संजना त्याच्याबरोबर चालू लागली. कॉफी घेताना प्रथमच तिनं लक्षपूर्वक त्याच्याकडे बघितलं. सावळा पण अत्यंत देखणा, रूबाबदार होता तो. स्वत:चं गॅरेज होतं, जे त्यानं स्वबळावर उभं केलं होतं. घर अगदीच साधारण होतं. घरी फक्त म्हातारी आई होती. संजना श्रीमंत घरातली होती. तिला दोन धाकट्या बहिणीही होत्या.

पुढे अभ्यास नाही म्हटल्यावर संजना रोजच दुपारी राकेशच्या गॅरेजमध्ये वेळ घालवू लागली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. लग्न करून एकत्र संसार करण्याची स्वप्नं बघितली गेली. तेवढ्यात बाबांनी तिच्यासाठी एक स्थळ आणलं. संजना घाबरली. तिनं घरी राकेशबद्दल सांगितलं.

वडील बिथरलेच. ‘‘ कसा मुलगा निवडला आहेस तू? रंग रूप नाही, शिक्षण नाही, पैसा नाही, आई लोकांकडे भांडी घासते. घर तर किती दळीद्री…काय बघितलंस तू?’’

‘‘बाबा, तो स्वभावानं खूप चांगला आहे.’’ मान खाली घालून संजनानं सांगितलं.

‘‘स्वभावाचं काय लोणचं घालाचंय? त्याच्या घरात तू एक दिवसही राहू शकणार नाहीस.’’ बाबांचा राग शांत होत नव्हता.

‘‘बाबा, मी राहू शकेन. मी राहीन.’’ हळू आवाजात पण ठामपणे संजना बोलली.

‘‘हे सगळे सिनेमा नाटकातले संवाद आहेत. मला नको ऐकवूस. जग बघितलंय मी…पैसा नसला की दोन दिवसांत प्रेमाचे बारा वाजतात.’’

‘‘नाही बाबा, असं होणार नाही. मला खात्री आहे.’’ संजनानं नम्रपणेच सांगितलं.

आईनं कसंबसं बाबांना शांत केलं. मग ते तिला समजावण्याच्या सुरात म्हणाले, ‘‘हे बघ संजना, संसार असा होत नाही. आत्ता तुला वाटतंय तू सर्व करू शकशील पण ते इतकं सोपं नसतं. अगं, तुझे महागडे ड्रेस, तुझ्या साजुक तुपातलं खाण्याच्या सवयी, हे सगळं त्याला पेलणार नाही. अगं तो गरीब आहे, श्रीमंत असता तरी हो म्हटलं असतं. शिकलेला असता तरी हो म्हटलं असतं. पण असं उघड्या डोळ्यांनी तुला दु:खाच्या खाईत कसा लोटू मी? तुझ्याहून धाकट्या दोघी बहिणींची लग्नं करायची आहेत. समाजातले लोक काय म्हणतील?’’

बाबांचं म्हणणं बाप म्हणून बरोबर होतं. पण संजना अन् राकेशचं प्रेम त्याच्यापेक्षा वरच्या पातळीवर होतं. घरून लग्नाला परवानगी मिळणार नाही हे तर पक्कंच होतं. पळून जाऊनच लग्न करावं लागलं. कपडे, दागिने, सामान सुमान यात संजनाला फारसा इंटरेस्ट नव्हता. तिला फक्त प्रेम हवं होतं अन् राकेश ते तिला भरभरून देत होता.

पावसाचे थेंब पडू लागले होते. संजनानं दोन्ही हात पसरून उघड्या तळहातावर थेंब पडू दिले. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या दोन हातांनी तिच्या मुठी मिटून टाकल्या. ते थेंब आता तिच्या मुठीत बंदिस्त झाले होते.

‘‘राकेश, कधी आलास?’’ त्याच्याकडे वळून तिनं विचारलं.

तिला बाहूपाशात घेत त्यानं म्हटलं, ‘‘मी तर सकाळपासून इथंच आहे.’’

‘‘चल, खोटं बोलतोस…’’ त्याच्या छातीवर डोकं घुसळत तिनं म्हटलं.

‘‘तुझ्या हृदयाला विचार ना? मी कशाला खोटं बोलू?’’

संजना राकेशचा संसार सुखात चालला होता. राकेश तिला काही कमी पडू देत नव्हता. त्या घरात भौतिक समृद्धी नव्हती. पण मनाची श्रीमंती होती. नात्यातला गोडवा, आदर आणि परस्परांवरील अपार विश्वास होता.

एकदा संजना बँकेतून घरी परतत असताना तिची दृष्टी एका मुलीवर पडली…‘‘अरे ही तर पूनम…तिची धाकटी बहिण.’’

पूनमच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. भांगात कुंकू होतं. तिनं हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिनं वळून बघितलं, ‘‘ताई…’’ तिनं संजनाला मिठीच मारली.

‘‘कशी आहेस पूनम?’’ संजनाला एकदम भरून आलं.

‘‘तू कशी आहेस ताई? किती वर्षांनी बघतेय तुला.’’

‘‘घरी सगळे बरे आहेत ना?’’ थोड्याशा संकोचानंच संजनानं विचारलं.

‘‘थांब, आधी त्या समोरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसू, मग बोलूयात.’’ पूनमननं संजनाला ओढतच तिथं नेलं.

कॉफीची ऑर्डर देऊन पूनम बोलू लागली.

‘‘घरी सगळे छान आहेत ताई. छोटीचंही लग्न झालं. सगळ्यांना तुझी खूप आठवण येते.’’

‘‘कशाला खोटं बोलतेस? आई बाबांसाठी तर मी एक कलंकच ठरले ना?’’ संजनाला एकदम रडू अनावर झालं.

‘‘नाही ताई, तसं नाहीए. पण एक खरं, तुझ्या निघून जाण्यानंतर आईबाबा खूप नाराज होते. आमचंही शिक्षण त्यांनी थांबवलं. ठीकाय, जे व्हायचं ते होऊन गेलंय, आता त्याचं काय? तू कशी आहेस? भावजी कसे आहेत?’’

राकेशचा विषय निघताच संजना एकदम आनंदली.

‘‘राकेश खूप म्हणजे खूप चांगले आहेत.’’ तिनं अभिमानानं सांगितलं.

‘‘तुझ्यावर प्रेम करतात ना?’’ तिच्याकडे रोखून बघत पूनमनं विचारलं.

‘‘प्रेम? अगं त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचा सगळा जीव माझ्यात आहे. खरोखरंच ते फार चांगले आहेत. मी न बोलताच माझं मन जाणतात ते. त्यांनी मला शिक्षण पूर्ण करायला लावलं. सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षांना बसवलं, म्हणून तर आज बँकेत ऑफिसर म्हणून रूबाबात राहतेय. स्वत:चा छोटासा फ्लट घेतलाय. सासूबाई पण फार चांगल्या होत्या. अगदी लेकीसारखंच वागवलं मला. दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या. अजून आयुष्यात काय हवं असतं पूनम? एक नवरा जो तुमचा मित्र, संरक्षक, प्रशंसक आहे, ज्यानं तुमच्या गुणदोषांसकट तुम्हाला स्वीकारलंय अन् जो तुमच्यावर भरभरून प्रेम करतो…मला असा नवरा मिळाला हे माझं मोठंच भाग्य आहे पूनम.’’

‘‘खरंच ताई? खूप बरं वाटलं ऐकून.’’

‘‘माझ्या आयुष्यात दु:ख फक्त इतकंच आहे की मी आईवडिलांना दुरावले आहे.’’ क्षणभर संजनाचा चेहरा दु:खानं झाकोळला, पण लगेच स्वत:ला सावरून तिनं म्हटलं, ‘‘ते सोड, तुझं लग्न कुठं झालंय? घरातली मंडळी कशी आहेत?’’

‘‘माझं सासर दिल्लीला आहे. घरातले लोकही बरे आहेत. आता माहेरपणाला आलेय. छोटी चंदीगडला असते…पूनमनं सर्व सविस्तर माहिती दिली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.’’

वाटेत पूनम विचार करत होती की ताई खरोखरंच भाग्यवान आहे. तिच्यावर प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आहे. बाबांनी शोधलेला मुलगा ताईला इतक्या सुखात ठेवू शकला असता का? तिचाच नवरा बघितलं तर पैसेवाला आहे, पण गर्व आहे त्याला श्रीमंतीचा. बायकोवर हक्क आहे त्याचा. प्रेम आहे का? तर ते बहुधा नाही.

पूनमनं वाटेतूनच फोन करून आईबाबांना संजना भेटल्याचं कळवलं.

संजनाला भेळ फार आवडते म्हणून राकेश भेळ घेऊन घरी आला. त्यावेळी घरात काही मंडळी बसलेली होती. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं संजनाकडे बघितलं.

‘‘राकेश, हे माझे आईबाबा आहेत.’’ संजनाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

राकेशनं दोघांना वाकून नमस्कार केला.

‘‘खुशाल रहा. सुखी रहा.’’ बाबांनी तोंड भरून आशिर्वाद दिला. ‘‘पूनमनं संजनाबद्दल सांगितलं, आम्हालाही पोरीचं सुखंच हवं होतं. त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की संजना सुखी होऊ शकणार नाही. पण आता ती आनंदात आहे तर आम्हालाही आनंदच आहे. आणखी काहीही नकोय आम्हाला.’’ बाबांनी राकेशला मिठीत घेत तोंडभरून आशिर्वाद दिले.

संजनाचे आईबाबा त्यांच्यासाठी भेटवस्तू, फळं, मिठाई, फरसाण असं बरंच काही घेऊन आले होते. ते जायला निघाले, तेव्हा राकेश त्यांना पोहोचवायला बाहेरपर्यंत गेला. बऱ्याच वेळानं तो परत आला तेव्हा, संजनानं म्हटलं, ‘‘कुठं गेला होतास?’’

‘‘अगं तुझं आवडतं चॉकलेट आणायला गेलो होतो. आज इतका आनंदाचा दिवस आहे. आनंद साजरा करायला नको का?’’ तिच्या तोंडात चॉकलेट कोंबत त्यानं म्हटलं.

काळ पुढे सरकत होता. तो कधी कुणासाठी थांबतो? मुठीतून वाळू निसटावी तसा भराभर काळ पुढे सरकला.

त्यादिवशी संजनाला ती आई होणार असल्याचं कळलं ती अतीव आनंदानं डॉक्टकडून रिपोर्ट घेऊन घरी परतली. राकेशसाठी हे सरप्राइज असणार. राकेशला किती आनंद होईल. त्याला तर आनंदानं रडूच येईल. येणाऱ्या बाळाबद्दल त्यानं किती किती प्लानिंग करून ठेवलंय. ती घरी पोहोचली, तेव्हा राकेश घरात नव्हता. मात्र एक पत्र तो लिहून ठेवून गेला होता. किती तरी वेळ ती पत्र वाचून सुन्न होऊन बसून राहिली होती. पत्रातलं अक्षर राकेशचं होतं. पण राकेश असं करू शकेल यावर तिचा विश्वास बसेना.

‘‘प्रिय संजना,

हे पत्र वाचून तुला खूप दु:ख होईल ते मला ठाऊक आहे. खरंतर मी तुला सोडून जाऊच शकत नाही, पण तरीही मी तुझ्याजवळ असणार आहे. तू प्रश्न विचारू नकोस. माझ्याकडे उत्तर नाहीए. केव्हा येईन सांगता येत नाही पण येईन हे त्रिवार सत्य! गॅरेज तुझ्या नावावर आहे. तिथं काम करणारी मुलं तुला सर्वतोपरी मदत करतील. घरही तुझ्याच नावावर आहे. तू माझं सर्वस्व आहेस. आपल्या बाळाची छान काळजी घे. स्वत:ची काळजी घे. माझी काळजी करू नकोस. सुखात राहा, आनंदात राहा. मी येतोच आहे.

तुझ्यावर प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…

तुझाच राकेश.’’

प्राणापेक्षा अधिक प्रेम करणारा…कुठं गेला तो तिला सोडून? का गेला? असं न सांगता जाण्यासारखं काय घडलं? रडता रडता संजना बेशुद्ध पडली.

काही वेळानं आपोआपच शुद्ध आली. तिला सावरायला आता राकेश नव्हता. ती विचार करून दमली. तिचं काही चुकलं का? राकेश दुखावला जाईल असं काही तिच्याकडून घडलं का? पण उत्तर कशाचंही सापडत नव्हतं. तिनं बऱ्याच ठिकाणी चौकशी केली, कुणालाच काही माहीत नव्हतं. नऊ महिने तिला कसेबसे काढले, तिलाच ठाऊक, नऊ महिने उलटले अन् तिनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. पाच वर्षं ती दोघं बाळाची वाट बघत होती. बाळ जन्माला आलं तेव्हा राकेश नव्हता. मुलीचं नाव तिनं राशी ठेवलं. राकेशनंच ठरवलं होतं ते नाव.

सहा वर्षं उलटली. राकेश नाही, त्याच्याबद्दलची काही बातमी नाही. आज पुन्हा लग्नाचा वाढदिवस. ती बाल्कनीत बसली होती. राकेश येईल अशी आशा होती.

एकाएकी मोगऱ्याचा सुंदर वास आला. राकेश तिच्यासाठी मोगऱ्याची फुलं घेऊन यायचा, तेव्हा असाच सुंदर वास दरवाळयचा. राकेश तिच्यासमोर खरोखरंच हात पसरून उभा होता. ओंजळीतली फुलं त्यानं संजनावर उधळली अन् तिला जवळ घेण्यासाठी हात पसरले.

‘‘कोण तू? मी तुला ओळखत नाही.’’

‘‘संजना…’’ चेहऱ्यावरचं तेच लाघवी हास्य, डोळ्यात अश्रू आणि कातर स्वर.

‘‘मेली संजना…इथं नाही राहत ती…’’

संजनाला भावना आवरत नव्हत्या. राकेशनं तिला मिठीत घेतलं. प्रथम तिनं प्रतिकार केला अन् मग स्वत:च त्याला मिठी मारली.

‘‘कुठं गेला होतास तू?’’

‘‘दुबईला?’’ तिचे अश्रू पुसून तो म्हणाला.

‘‘दुबईला? कशाला?’’ आश्चर्यानं तिनं विचारलं.

‘‘पैसे मिळवायला.’’

‘‘न सांगता निघून जाण्याजोगं काय घडलं होतं?’’

‘‘मला तुला सुखात ठेवायचं होतं.’’

‘‘सुखासाठी पैसे लागतात? मी कधी मागितले पैसे? कधी तरी तुला टोमणे मारले पैशावरून? मी तर तशीच सुखात होते.’’

‘‘नाही संजना, माझ्या लक्षात आलं होतं की आईवडिलांकडे येणंजाणं सुरू झाल्यावर तुला आपली गरीबी जाणवू लागली होती. त्यांच्याकडून मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू घेताना तुला संकोच व्हायचा, कारण परत तेवढाच तोलामोलाचा आहेर आपण करू शकत नव्हतो. तुझ्या घरच्या कार्यक्रमांना जायला तू टाळाटाळ करायचीस कारण तिथं सगळेच नातलग, परिचित, श्रीमंत असतात. ‘मला वेळ नाही, जमणार नाही, म्हणून तू टाळत असायचीस. हे सगळं मला कळत होतं.’’

‘‘तुला आठवतंय, आईनं दिलेली निळी साडी…’’

‘‘ती ४०,००० ची?’’

‘‘हो. तीच. ती नेसून तू मला विचारलं होतंस, कशी दिसतेय?’’ खरं तर तू कायमच मला सुंदर दिसतेस. पण त्या दिवशी तुला मिठीत घेताना मला ती साडी बोचत होती…मला एकदम मी फार छोटा आहे, खुजा आहे अशी जाणीव झाली…अशी साडी आहे या परिस्थितीत मी तुला घेऊन देऊ शकत नाही हेही मला समजलं. अन् मी अस्वस्थ झालो. माझ्या संजनाला तिच्या नातलगांमध्ये ताठ मानेनं कसं वावरता येईल याचा विचार करू लागलो?

‘‘एक दिवस एका मित्रानं म्हटलं तो मला दुबईत भरपूर पैसा देणारी नोकरी मिळवून देऊ शकतो. म्हणून मी दुबईला गेलो. तिथं मी भरपूर पैसा कमवलाय संजना, आता तू तुझ्या नातालगांसमोर गर्वानं आपलं वैभव दाखवू शकशील. मोठ्ठा बंगला, झगमगीत गॅरेज…सगळं सगळं देईन मी तुला.

‘‘अरे, पण निदान मला सांगून जायचंस?’’

‘‘सांगितलं असतं तर तू जाऊ दिलं असतंस? तू तर हेच म्हणाली असतील, मी सुखी आहे, आनंदात आहे, मला काहीही नकोय, पण मी तुला गेल्या काही वर्षांत फारच फार दुखवलंय. तू म्हणशील ती, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. फक्त मला क्षमा केली एवढंच म्हण…प्लीज…संजना.’’ त्यानं तिचे हात आपल्या हातात घट्ट धरून ठेवले होते.

तेवढ्यात त्याचं लक्ष पॅरामिटरवर ठेवलेल्या फोटोफ्रेमकडे गेलं. त्यानं आश्चर्यानं संजनाकडे बघितलं.

‘‘माझी मुलगी आहे.’’ संजनानं हात सोडवून घेत म्हटलं.

‘‘नाही, आपली मुलगी आहे.’’ त्यानं ठासून म्हटलं, ‘‘राशी नाव ठेवलं ना हिचं?’’ त्याच्या चेहऱ्यावर तेच मनमोहक हास्य होतं.

‘‘तुला इतकी खात्री होती?’’ संजनानंच आता आश्चर्याने विचारले.

‘‘खरं तर माझ्यावर, स्वत:वर माझा जेवढा विश्वास नाहीए, तेवढा तुझ्यावर आहे संजना.’’ त्यानं मिठीत घेतलं.

खरोखर एकमेकांवर असं प्रेम अन् आत्मविश्वास किती लोकांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला येतो?

चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची

* कुसुम सावे

‘‘अरे वा आई, कानातले खूपच सुंदर आहेत. कधी घेतलेस? रंजोने आपली आई प्रभाच्या कानातल्या झुमक्यांकडे पाहत विचारले.

‘‘गेल्या महिन्यात आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा सूनबाई अपर्णाने मला हे झुमके आणि तुझ्या वडिलांना घडयाळ दिले. तिने हे सर्व कधी खरेदी केले ते समजलेच नाही,’’ प्रभाने सांगितले.

डोळे विस्फारत रंजो म्हणाली, ‘‘वहिनीने दिले? अरे वा. त्यानंतर उसासा टाकत म्हणाली, मला तर तिने कधीच असे काही घेऊन दिले नाही. सासू-सासऱ्यांना मस्का मारत आहे. भरपूर मस्का लाव.’’ तिचे लक्ष कानातल्यांकडेच होते. ती म्हणाली, ‘‘कोणी का दिले असेना, पण आई मला तुझे झुमके खूपच आवडले.’’

आवडले असतील तर तुला घेऊन टाक बाळा, त्यात काय मोठे? असे म्हणत प्रभाने लगेचच कानातून झुमके काढून रंजोला दिले. आपण दिलेले झुमके सासूने तिच्या मुलीला देऊन टाकले, हे समजल्यावर अपर्णाला काय वाटेल? याचा विचार प्रभाने एकदाही केला नाही.

प्रभाने झुमके देताच रंजोने लगेचच ते स्वत:च्या कानात घातले. त्यानंतर नाटकी चेहरा करीत म्हणाली, ‘‘तुला मनापासून द्यायचे नसतील तर हे झुमके परत घे आई, नाहीतर मागाहून घरातले, खास करून बाबा म्हणतील की जेव्हा कधी रंजो येते, तेव्हा काही ना काही घेऊन जातेच.’’

‘‘असे काय बोलतेस बाळा, कोण कशाला काय म्हणेल? आणि तुझा या घरावर हक्क नाही का? तुला आवडले असतील तर तूझ्याकडेच ठेव. तू घातलेस किंवा मी घातले, त्यात काय मोठे? माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत.’’

‘‘खरंच आई? अरे वा… तू किती चांगली आहेस’’, असे म्हणत रंजोने आईला मिठी मारली. नेहमी ती अशीच वागायची. जे आवडायचे ते स्वत:कडे ठेवायची. ती वस्तू समोरच्यासाठी किती मोलाची आहे, याचा ती साधा विचारही करीत नसे. खूप प्रेमाने आणि पै पै जोडून अपर्णाने आपल्या सासूसाठी ते झुमके विकत घेतले होते. पण, प्रभाने कसलाच विचार न करता ते मुलीला दिले. ती सांगू शकत होती की, हे झुमके तुझ्या वहिनीने खूपच प्रेमाने मला विकत घेऊन दिले आहेत, त्यामुळे मी तुला असेच दुसरे घेऊन देईन. पण, मुलीसमोर सुनेच्या भावनांची कदर प्रभाने कधीच केली नाही.

‘‘आई बघ, मला हे झुमके कसे दिसतात? चांगले दिसतात ना, सांग ना आई?’’ आरशात स्वत:ला न्याहाळत रंजोने विचारले. ‘‘पण आई, माझी एक तक्रार आहे.’’

‘‘आता आणखी कसली तक्रार आहे?’’ प्रभाने विचारले.

‘‘मला नाही, तुझ्या जावयाची तक्रार आहे. तुम्ही ब्रेसलेट देणार, असे सांगितले होते त्यांना, पण अजून घेऊन दिले नाही.’’

‘‘अरे हो, आठवले.’’ प्रभा समजावत म्हणाली, ‘‘बाळा, सध्या पैशांची चणचण आहे. तुला माहीतच आहे की, तुझ्या वडिलांना खूपच कमी पेन्शन मिळते. अपर्णा आणि मानवच्या पगारावरच घरखर्च चालतो.’’

‘‘हे सर्व मला सांगू नकोस आई. तू आणि तुझा जावई मिळून काय ते बघून घ्या. मला मध्ये घेऊ नका,’’ झुमके आपल्या पर्समध्ये टाकत रंजोने सांगितले आणि ती निघून गेली.

‘‘सूनेने दिलेले झुमके तू रंजोला दिलेस?’’ प्रभाच्या कानात झुमके नाहीत, हे पाहून भरतने विचारले. त्यांच्या लक्षात आले होते की, रंजो आली होती आणि तीच झुमके घेऊन गेली.

‘‘हा… हो, तिला आवडले म्हणून देऊन टाकले,’’  काहीसे कचरतच प्रभाने सांगितले आणि ती तेथून जाऊ लागली, कारण तिला माहीत होते की, हे ऐकून भरत गप्प बसणार नाहीत.

‘‘काय म्हणालीस तू, तिला आवडले? आपल्या घरातली अशी कोणती वस्तू आहे, जी तिला आवडत नाही, दे उत्तर? जेव्हा कधी येते तेव्हा काही ना काही घेऊन जातेच. जराही लाज वाटत नाही का तिला? त्या दिवशी आली होती तेव्हा सुनेची पर्स, जी तिला तिच्या मैत्रिणींनी दिली होती ती घेऊन गेली. कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की, ती मनाला वाटेल तशी वागेल,’’ प्रचंड रागावलेले भरत तावातावाने बोलत होते.

आपल्या पतीच्या अशा बोलण्याने नाराज झालेली प्रभा म्हणाली, ‘‘अशी तुमची कोणती संपत्ती घेऊन गेली ती, ज्यामुळे तुम्ही तिला इतके बोलत आहात? फक्त झुमकेच तर घेऊन गेली ना, त्यात काय मोठे? रंजो तुम्हाला पहिल्यापासूनच आवडत नाही.’’

परंतु, आज भरत यांच्या रागाचा पारा चांगलाच चढला होता. त्यामुळेच ते संतापत म्हणाले, ‘‘तुझी संपत्ती देऊ नकोस असे तुला कोणी सांगितले आहे का? जे द्यायचे आहे ते सर्व देऊन टाक. पण, कोणीतरी प्रेमाने दिलेली भेटवस्तू अशी दुसऱ्याला देऊन टाकणे योग्य आहे का? जर सूनबाई असे वागली असती तर तुला कसे वाटले असते? किती प्रेमाने तिने तुझ्यासाठी झुमके आणले होते आणि तू ते कुणा दुसऱ्याला देऊन टाकताना क्षणभरही विचार केला नाहीस.’’

‘‘सारखे कुणा दुसऱ्याला, असे का म्हणत आहात? अहो, मुलगी आहे ती आपली आणि मी माझ्या मुलीला एकदा काही दिले म्हणजे कायमचे देऊन टाकले, समजले? मोठे आले सुनेचे चमचे, हूं,’’ तोंड वाकडे करीत प्रभा म्हणाली.

‘‘अगं, तुझी मुलगी तुझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहे, आणखी काही नाही. काय कमी आहे तिला? आपल्या मुलगा, सुनेपेक्षा जास्त कमावतात ते दोघे पतीपत्नी. तरी कधी वाटले तिला की, आपल्या आईवडिलांसाठी किमान २ रुपयांचे काहीतरी घेऊन जाऊया? कधीच नाही. आपले सोडून दे. तिने तिच्या भाचीसाठी आजपर्यंत कधी एखादे खेळणे तरी खरेदी करून आणले आहे का? कधीच नाही. तिला फक्त घेता येते. मला दिसत नाही का? सर्व पाहतोय मी, तू मुलगी, सुनेत किती भेदभाव करतेस ते. सुनेचे प्रेम तुला बेगडी वाटते आणि मुलीचे नाटक म्हणजे प्रेम वाटते. असे डोळे विस्फारून पाहू नकोस माझ्याकडे, समजेलच तुलाही कधीतरी, बघच तू.’’

‘‘खरंच, कसे वडील आहात तुम्ही? मुलीच्या सुखालाही नजर लावता. माहीत नाही रंजोने तुमचे काय बिघडवले आहे, ज्यामुळे ती नेहमीच तुमच्या डोळ्यात खुपते.’’ रडवेल्या स्वरात प्रभा म्हणाली.

‘‘ए… कमी अकलेच्या बाई, रंजो, माझ्या डोळयांना खुपत नाही, उलट काही केल्या सूनबाई अपर्णा तुला आवडत नाही. संपूर्ण दिवस घरात बसून अराम करीत असतेस. ऑर्डर देत राहतेस. तुला कधी असे वाटत नाही की, सुनेला कामात मदत करावी आणि तुझी मुलगी, ती तर येथे आल्यावर हातपाय हलवायचेही विसरून जाते. सर्व काही करते अपर्णा या घरासाठी. बाहेर जाऊन कमावते आणि घरही चांगल्या पद्धतीने सांभाळते. तरीही तुझी तिच्याबद्दल काही ना काही तक्रार असतेच. तू मुलगी, सुनेत इतका भेदभाव का करतेस?’’

‘‘कमावून आणते आणि घर सांभाळते म्हणजे उपकार करीत नाही आपल्यावर. घर तिचे आहे, मग सांभाळणार कोण?’’ नाराजीच्या स्वरात प्रभा म्हणाली.

‘‘अच्छा, म्हणजे घर फक्त तिचे आहे, तुझे नाही? मुलगी कधीही आली की तिच्या पाहुणचारात काही कमी पडू देत नाहीस. पण तुला कधी असे वाटत नाही की, कामावरून थकून आलेल्या सुनेला किमान एक ग्लास पाणी देऊया. फक्त टोमणे मारता येतात तुला. अगं, सूनच नाही, तर तिच्या मैत्रिणीही खटकतात तुला. कधीही आल्या तरी त्यांना काहीतरी वाईट बोलतेसच. तुला असे वाटते की, त्या तुझ्या आणि तुझ्या मुलीविरोधात अपर्णाचे मन कलुषित तर करणार नाहीत ना? म्हणून त्यांना बघून घेत नाहीस, जाऊ दे. मी कोणत्या दगडासमोर डोके फोडत आहे? तुझ्याशी बोलणेही कठीण आहे.’’ असे म्हणत भरत आपले पाय आपटत तेथून निघून गेले.

पण, खरंच तर बोलत होते भरत. या घरासाठी अपर्णा खूप काही करीत होती, तरीही प्रभाची तिच्याविरोधात तक्रार असायची. नातेवाईक असोत किंवा शेजारी, सर्वांना ती हेच सांगायची की, सुनेच्या राज्यात राहायचे म्हणजे तोंड बंद करूनच जगावे लागणार, नाहीतर मुलगा, सून आम्हाला कधी वृद्धाश्रमात पाठवतील, हे समजणार नाही. जमाना बदलला आहे. आता सुनेला नाही तर सासूला घाबरून राहावे लागते. प्रभाचे हे बोलणे ऐकून अपर्णा मान खाली घालत असे, पण कधीच उलटून बोलत नसे. मात्र तिच्या डोळयातून वाहणारे अश्रू तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांचे साक्षीदार असत.

अपर्णाने या घरात पाऊल टाकताच प्रभाला स्वत:ची आई मानले होते. प्रभा मात्र अजूनही तिला दुसऱ्याच्या घरची मुलगी, असेच समजत असे. अपर्णाने प्रभासाठी काहीही केले तरी प्रभाला ते नाटकी वाटायचे आणि ‘‘आई, तुझी तब्येत तर बरी आहे ना?’’ असे रंजोने एकदा जरी विचारले तरी प्रभाचा आंनद गगनात मावेनासा व्हायचा.

त्या दिवशी अपर्णा केवळ एवढेच म्हणाली होती की, ‘‘आई जास्त चहा तुमच्या आरोग्यासाठी चांगली नाही. शिवाय डॉक्टरांनीही तुम्हाला चहा पिऊ नका असे सांगितले आहे. हॉरलेक्स घेऊन आले आहे मी, तुम्ही दुधासोबत हे प्या, असे म्हणत तिने प्रभासमोर ग्लास ठेवले. प्रभाने तिचा हात झटकत ते तिच्या हातातून काढून घेतले व टेबलावर आपटत म्हणाली, ‘‘तू मला डॉक्टरांच्या नावाने सल्ले देऊ नकोस. जे मागितले आहे तेच दे. नंतर पुटपुटत म्हणाली, ‘मोठी आली मला शिकविणारी, चांगले बनण्याचे नाटक हिच्याकडून शिका.’ अपर्णाची प्रत्येक गोष्ट तिला बेगडी आणि नाटकी वाटत असे.

मानव ऑफिसच्या कामासाठी शहराबाहेर गेला होता. अपर्णाही आपल्या चुलत भावाच्या लग्नाला गेली होती. पण मनातल्या मनात तिला अशी भीती वाटत होती की, सासू तसेच सासऱ्यांना एकटे सोडून आली आहे, त्यांची तब्येत तर बिघडणार नाही ना? हाच विचार करून तिने लग्नाला येण्यापूर्वीच रंजोला दोघांकडे लक्ष ठेवण्यास व दिवसातून कमीत कमी एकदा येऊन त्यांना बघून जा, असे सांगितले होते. हे ऐकून रंजो रागावत म्हणाली होती की, ‘‘वहिनी, तू सांगितले नसतेस तरी मी माझ्या आईवडिलांची काळजी घेतली असती. तुला काय वाटते, तू एकटीच आहेस का त्यांची काळजी घेणारी? अगं, मुलगी आहे मी त्यांची, सून नाही, समजले का?’’ रंजोच्या अशा बोलण्यामुळे अपर्णा खूपच दुखावली होती, तरीही गप्प बसली. मात्र, अपर्णा गेल्यानंतर रंजो एकदाही माहेरी आली नाही, कारण आल्यावर तिला काम करावे लागले असते. कधीकधी फोन करून विचारपूस करायची आणि सोबतच वेळ नसल्यामुळे भेटायला येऊ शकत नाही, पण वेळ मिळताच नक्की येईन, असे खोटेच सांगायची. प्रभा विचार करायची, आपल्या मुलीकडे खरंच वेळ नसेल नाहीतर भेटायला नक्की आली असती.

एका रात्री अचानक भरत यांची तब्येत खूपच बिघडली. प्रभा इतकी घाबरली की, काय करावे तिला काहीच सूचत नव्हते. तिने मानवला फोन लावला, पण त्याचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर होता. त्यानंतर तिने मुलगी रंजोला फोन लावला. बेल वाजत होती, पण कोणी फोन उचलत नव्हते. जावयालाही फोन लावला, पण त्यानेही उचलला नाही. प्रभाने रंजो व तिच्या नवऱ्याला अनेकदा फोन लावला, पण कुणीही फोन उचलला नाही. ‘कदाचित ते झोपले असतील म्हणून फोनची रिंग त्यांना ऐकू आली नसेल,’ प्रभाला वाटले. अखेर नाईलाजाने तिने अपर्णाला फोन लावला. एवढया रात्री प्रभाचा फोन आलेला पाहून अपर्णा घाबरली.

प्रभा काही बोलण्याआधीच अपर्णाने घाबरत विचारले, ‘‘आई, काय झाले? बाबा ठीक आहेत ना?’’ प्रभाच्या हुंदक्यांचा आवाज येताच ती समजून गेली की, नक्कीच काहीतरी घडले आहे. तिने काळजीने विचारले, ‘‘आई, तुम्ही रडत का आहात? सांगा ना आई, काय झाले?’’ त्यानंतर सासऱ्यांबाबत समजताच ती म्हणाली, ‘‘आई तुम्ही घाबरू नका, बाबांना काहीही होणार नाही. मी काहीतरी करते, असे म्हणत तिने फोन ठेवला आणि लगेचच तिची मैत्रीण शोनाला फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. बाबांना तातडीने रुग्णालयात घेऊन जा, अशी शोनाला विनंती केली.’’

अपर्णाच्या ज्या मैत्रिणीकडे प्रभाला पाहायलाही आवडत नव्हते आणि तिला ती सतत बंगालन म्हणायची, आज तिच्यामुळेच भरत यांचा जीव वाचला होता. डॉक्टरांचे म्हणणे होते की, मेजर अटॅक होता. रुग्णाला घेऊन येण्यास जरा जरी उशीर झाला असता तर जीव वाचविणे अवघड होते. तोपर्यंत अपर्णा आणि मानवही रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर काही वेळाने रंजोही आपल्या पती व मुलासोबत तेथे आली. मुलगा, सुनेला पाहून जोरजोरात हुंदके देत रडतच प्रभा म्हणाली, आज शोना नसती तर कदाचित तुमचे बाबा जिवंत नसते.

अपर्णाचेही अश्रू थांबत नव्हते. सासऱ्यांना काही झाले असते तर ती स्वत:ला कधीच माफ करू शकली नसती. सासूला मिठी मारत ती म्हणाली, रडू नका, आता सर्व ठीक होईल. शोनाचे तिने मनापासून आभार मानले कारण, तिच्यामुळेच सासऱ्यांचा जीव वाचला होता.

दुसरीकडे आपल्या आईला वहिनीच्या गळयात पडून रडताना बघताच रंजोही रडण्याचे नाटक करीत म्हणाली, ‘‘आई, अगं बाबांना काही झाले असते तर माझाही जीव गेला असता. किती दुर्दैवी आहे मी, जिला तुझा फोन आला, हेच समजू शकले नाही. सकाळी तुझे मिस कॉल पाहिले आणि त्यानंतर तुला फोन लावला तेव्हा कुठे मला सर्व काही समजले. नाहीतर इथे मला कोणी काहीच सांगितले नसते,’’ अपर्णाकडे रागाने बघत रंजो म्हणाली. अपर्णा प्रभाच्या जवळ गेलेली तिला आवडले नव्हते.

ती प्रभाची समजूत काढतच होती तोच तिचा ७ वर्षांचा मुलगा अमोल म्हणाला, आई, तू खोटे का बोलतेस? आजी, ‘‘आई खोटे बोलत आहे. तुझा फोन आला तेव्हा आम्ही टीव्हीवर चित्रपट पाहत होतो. तुझा फोन पाहून आई म्हणाली होती की, माहीत नाही एवढया रात्री कोण मेले जे माझी आई मला त्रास देत आहे. पप्पा तिला म्हणाले, फोन घे, कदाचित एखादी मोठी अडचण आली असेल. तरीही तिने फोन घेतला नाही आणि त्यांनाही घेऊ दिला नाही. ती आरामात चित्रपट बघत राहिली.’’

अमोलचे बोलणे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रंजोला तर तोंड वर करून पाहणेही अवघड झाले होते. प्रभा कधी आपल्या नातवाकडे तर कधी मुलीकडे एकटक बघत होती.

सत्य बाहेर येताच रंजोला ओशाळल्यासारखे झाले. तिला चांगलाच धक्का बसला होता, त्यामुळे आपल्या मुलाला मारत म्हणाली, ‘‘वेडा कुठला, काहीही बडबड करतो. त्यानंतर उसने अवसान आणत तिने सांगितले, ‘‘आई… अगं दुसऱ्याच कोणाचा तरी फोन होता तो, त्यामुळे मी तसे म्हणाले होते.’’ त्यानंतर समजूत काढत म्हणाली, ‘‘बघ ना आई, काहीही बोलतो हा, त्याला काही कळत नाही. लहान आहे ना.’’

आपण जे काही ऐकले ते खरे आहे, यावर प्रभाचा अजूनही विश्वास बसत नव्हता. म्हणाली, ‘‘याचा अर्थ तू त्यावेळी जागी होतीस आणि तुझा फोनही तुझ्या जवळच होता. इतक्या रात्री तसेच काही महत्त्वाचे कारण असेल म्हणूनच तुझी आई तुला फोन करीत असेल, असा तू एकदाही विचार केला नाहीस का? चांगली परतफेड केलीस तू माझ्या प्रेमाची आणि विश्वासाची. शोना नसती तर आज मी माझ्या सौभाग्याला मुकले असते. ज्या सुनेचे प्रेम मला बेगडी, बनावटी वाटत होत, हे आज मला समजले. तुझ्या मुलाने खरे सांगितले नसते तर मी यापुढेही खोटया भ्रमातच जगत राहिले असते.’’

आपल्या हातून सोन्याचे अंडे देणारी कोंबडी निसटून चालली आहे, हे पाहून रंजो उगाचच काकुळतीला येत म्हणाली, ‘‘नाही आई, तू गैरसमज करून घेत आहेस.’’

‘‘गैरसमज झाला होता बाळा, पण आता माझ्या डोळयावरची आंधळया प्रेमाची पट्टी उघडली आहे. तुझे बाबा बरोबर सांगायचे की, तू माझ्या ममतेचा गैरफायदा घेत आहेस. तुझ्या मनात माझ्यासाठी थोडेसेही प्रेम नाही.’’ असे म्हणून तिच्याकडे पाठ फिरवत तिने अपर्णाला सांगितले, ‘‘चल सूनबाई, बघून येऊया, तुझ्या बाबांना काही हवे तर नसेल ना?’’ रंजो, सतत आई, आई अशा हाका मारत होती, पण प्रभाने एकदाही मागे वळून पाहिले नाही, कारण तिचा भ्रमनिरास झाला होता.

एक होती इवा

कथा * पूनम साने

फ्रांसचा बीच टाऊन नीस फ्रेंच रिवेरियाची राजधानी आहे. तिथं उत्तम संग्रहालयं आहेत, सुंदर चर्चेस आहेत, रशियन ऑर्थोडॉक्स कैथिड्रल आहे, तिथूनच जवळ असलेल्या हॉटेल नीग्रेस्कोच्या कॅफेटेरियात बसून इवा आणि जावेद कॉफी पित होते. इवाच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आलेली होती, ‘‘जावेद,’’ ती कातर आवाजात म्हणाली, ‘‘मला वचन दे, तू कोणतंही वाईट काम करणार नाहीस.’’

‘‘इवा मी फार त्रस्त आहे गं! माझ्या हृदयात एक आग भडकलेली असते. इथं मी फार अपमान सहन केलाय. मी जणू तुच्छ वस्तू आहे असं मला इथले लोक वागवतात. छे, मी कंटाळलोय या छळाला. आता मी फार पुढे गेलो आहे या वाटेवर…मला परत फिरता येणार नाही.’’

‘‘नाही जावेद, मी तुझ्याखेरीज राहू शकत नाही हे तुला ठाऊक आहे, तू पकडला गेलास तर काय होईल, कल्पना तरी आहे का? गोळ्या घालून ठार मारतील तुला…’’

‘‘चालेल मला. पण हे लोक माझा अपमान करतात ते मला सहन होत नाही.’’

इवानं त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. एकत्र राहण्याची सोनेरी भविष्याची स्वप्नं, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, किती किती गोष्टी ती सांगत होती, पण जावेद अतिरेकी मित्रांच्या सहवासात कट्टर अतिरेकी झालेला होता.

घड्याळ बघत जावेदनं म्हटलं, ‘‘इवा, मला एक महत्त्वाची मिटिंग आहे. प्रथमच मला काही काम देताहेत ते लोक, त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरायला हवं. सायंकाळी वेळ मिळाला तर भेटतो. औरवोर (बाय) बोलून जावेदनं तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले अन् तो निघून गेला.’’

एक नि:श्वास सोडून इवा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूंमुळे तिचे सुंदर डोळे झाकोळून गेले.

हॉटेल नीग्रेस्कोमध्ये इवा हॉस्पिटलिटी इंचार्ज होती. खरं तर तिने ड्यूटीवर जायला हवं होतं. पण जावेदच्या बोलण्यामुळे ती फार दु:खी झाली होती. तिनं मैत्रिणीला थोडा वेळ चार्ज घ्यायला सांगितला अन् ती थोडा वेळ बाहेर आली. आत तिचा जीव गुदमरत होता. फॉर्मुला वनचा एक खूपच छान सर्किट नीस आहे. हॉटेलच्या अगदी मागेच, त्या वाटेनं ती बीचवर पोहोचली. क्वेदे एतादयूनीस     बीचवर एका कोपऱ्यात बसून ती तिथं खेळणाऱ्या मुलांकडे बघू लागली. मुलं आपल्याच नादात मजेत खेळत होती. कुणी वाळूत किल्ले बनवत होती, कुणी फुग्यांमागे धावत होती.

इवा जावेदचाच विचार करत होती. तिला तिची व जावेदची पहिली भेट आठवली.

दोन वर्षांपूर्वी ती एलियांज रिवेरिया स्टेडिअममध्ये फुटबॉलची मॅच बघायला गेली असताना जावेद भेटला. दोघं जवळ जवळ बसली होती. दोघंही लिव्हरपूल टीमचे फॅन होते. दोघंही त्याच टिमला चिअर करत होती. टीमनं केलेल्या प्रत्येक गोलवर दोघंही जल्लोष करत होती. दोघांची नजरानजर झाली की दोघंही हसत होती अन् जेव्हा त्यांचा संघ जिंकला तेव्हा आनंदातिरेकानं त्यांनी एकमेकांना मिठीच मारली. आपण उत्साहाच्या भरात हे काय केलं या विचारानं दोघांना नंतर खूपच हसायलाही आलं. मग त्यांची मैत्रीच झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनाही वाटलं की ते एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत.

जावेद बांगलादेशातून एमबीए करण्यासाठी आला होता. फुटबॉल म्हणजे त्याला जीव की प्राण. बरेचदा तो इवाला म्हणायचासुद्धा. ‘‘मी खरं तर इथं अभ्यासासाठी नाहीच आलो…मला फुटबॉल मॅच बघायला इथं पाठवलंय.’’

तो आपल्या शाळेत आणि कॉलेजातही फुटबॉल टीमचा कॅप्टन होता. अभ्यासात हुशार, वागायला सज्जन, सभ्य अन् व्यक्तिमत्त्व आकर्षक. त्यामुळे इवाला तो मनापासून आवडला होता. जावेदच्या एमबीएनंतर त्याला नोकरी मिळाली की दोघं लग्न करणार होती.

जावेदनं तिला सांगितलं होतं की त्याचे कुंटुंबीय अत्यंत कट्टर मुसलमान आहेत. फ्रेंच मुलगी त्यांच्या घरातली सून होऊ शकणार नाही. पण इवाच्या प्रेमाखातर तो कुटुंबियांना सोडायलाही तयार होता.

हे ऐकून इवानं त्याला मिठीच मारली. ती दोघं आता मनानं जवळ आलीच होती, पण त्यांच्यात शारीरिक जवळीकही निर्माण झाली होती. फ्रेंचच्या क्लासला जाऊन जावेद उत्तम फ्रेंच बोलायला लागला होता. इवाही त्याच्याकडून हिंदीचे धडे घेत होती. प्रेम खरं कोणतीच भाषा, देश, धर्म, रंग मानत नाही. प्रेम होतं तेव्हा फक्त प्रेमच होतं. नाहीतर काहीच होत नाही. एकमेकांची भाषा, संस्कार शिकून घेत त्यांचं प्रेम उंच उंच जात होतं. पण जावेदमध्ये होणारा बदल इवाला खुपत होता. तिला वाटणारी काळजी ती कुणाजवळ बोलूनही दाखवू शकत नव्हती. तशीही एकटी अनाथ होती. मैत्रिणीजवळ तिला हे बोलता येत नव्हतं.

कॉलेजात बरेचदा रेसिझमचा वाईट अनुभव घेतल्यानंतर जावेदच्या मनात सूडाची भावना मूळ धरू लागली होती. इवा त्याची समजूत घालायची पण जावेदला तिचं बोलणं मानवत नव्हतं. खरं तर तो एक साधारण मुलगा होता. काहीतरी बनून दाखवण्यासाठी तो इथं आला होता. आपल्या उज्ज्वळ भविष्याची स्वप्नं आणि फुटबॉल या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी होत्या. मग जातीवादाच्या एक दोन घटनांमुळे तो खूपच दुखावला गेला होता. कॉलेजचे कोच मिस्टर मार्टिन नेहमीच जावेदच्या खेळाचं खूप कौतुक करायचे पण कॉलेजच्या टीमची घोषणा झाली तेव्हा जावेदचं नाव कुठेच नव्हतं. त्यानं याचं कारण विचारलं तेव्हा मुलांनी    उत्तर दिलं, ‘‘तू आमच्याबरोबर, आमच्या टीममध्ये खेळण्याचं स्वप्न बघू कसा शकतोस?’’

यावर इतर मुलं फिस्सकन हसली होती अन् जावेद खूप दुखावला गेला होता. त्यानंतरही खूप वेळा कॉलेजच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यानं त्याचं मत सांगितलं तर विद्यार्थी त्याची चेष्टा करायचे. ‘‘आता बांगलादेशी स्टूडंट आम्हाला शिकवणार, त्यांची मतं आम्ही ऐकून घ्यायची.’’

हळूहळू तो रेसिझमचा बळी ठरला होता. आता तो फेसबुकवर सिरियस स्टेटस टाकायचा. ‘लाइफ इज नॉट ईझी’ किंवा ‘तुमची ओळख इथं गुणांवरून नाही तर जातीवरून ठरते’ ‘आय एम टायर्ड’ या आणि अशाच तऱ्हेच्या स्टेटसवरून अगदी स्पष्ट कळत होतं की त्याच्या हृदयात दु:खाचा लाव्हा असून तो बंडखोरी करायला बघतो आहे.

त्याचे हे स्टेटस वाचूनच काही लोकांनी त्याच्याशी संपर्क केला होता. हळूहळू तो अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकला. दहशतीच्या त्या जगात तो खोल खोल जात होता. आता परतीचा मार्ग बंद झाला होता.

इवाला हे सगळं जाणवत होतं, कळत होतं तिला. हल्ली भीती वाटायला लागली होती. तिनं एक दिवस जावेदला म्हटलं, ‘‘जावेद, मला फक्त तू हवा आहेस. तुझ्या सोबतीनं आयुष्य काढायचं आहे. तू इथं कफर्टे्रबल नसशील तर आपण तुझ्या देशात, तुझ्या गावी जाऊन राहू. मी करीन तुझ्या कुटुंबाशी एडजस्ट. पण तू मला सोडून जाऊ नकोस.’’

‘‘नाही इवा, माझे कुटुंबीय तुला स्वीकारणार नाहीत. तू दु:खी होशील, मी तुला दु:खी बघू शकत नाही. मला आता इथंच आवडतंय.’’

‘‘पण जावेद, इथं तू भरकटला आहेस. तू चुकीचा मार्ग धरला आहेस, त्यामुळे मी दु:खीच आहे.’’

‘‘हा मार्ग चुकीचा नाहीए. हे लोक माझ्या जातीचा उल्लेख करून माझा अपमान करत नाहीत. त्यांच्यासाठी काही केलं तर तो माझा बहुमान ठरेल.’’

‘‘नाही रे जावेद, या वाटेनं गेल्यास तुला काहीही मिळणार नाही. आपण संपून जाऊ. अरे, अजून आपलं आयुष्य सुरू होतंय. अजून आपल्याला संसार करायचाय, घर मांडायचं आहे. अजून किती तरी मॅचेस एकत्र बघायच्या आहेत. आयुष्य जगलोच कुठंय अजून? खूप काही करायचंय…’’

पण जावेदचा ब्रेनवॉश झाल्यामुळे इवाचं कोणतंच बोलणं त्याला त्याच्या मार्गावरून माघारी घेऊन येऊ शकत नव्हतं. आता त्याला एकच गोष्ट कळत होती, दहशतवाद अन् सगळं संपवणं. या गोष्टींनी कधीच कुणाचं भलं केलं नाही. पण तो आता अशाच जगात जगत होता जिथं फक्त आक्रोश होता, अश्रू होते, प्रेत अन् रक्तपात होता.

सायंकाळी तो इवाला भेटायला आला तेव्हा घाबरलेली इवा त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. तिच्या मनात वाईट शंकांनी थैमान घातलं होतं.

‘‘इवा, मला गुडलक म्हण. आज पहिल्याच मोठ्या मोहिमेवर निघालोय.’’

‘‘कुठं? कुठली मोहीम?’’

‘‘उद्या बेस्टिल डेच्या परेडमध्ये एक ट्रक घेऊन जायचंय.’’

‘‘का? ट्रकचं काय करणार?’’

‘‘काही नाही, त्या गर्दीत ट्रक घुसवायचा.’’

इवा पुन्हा रडू लागली, ‘‘जावेद, वेडा झालाय का तू? अरे कुणाचा जीव गेला म्हणजे? नाही, तू असं काही करायचं नाही.’’

जावेद असं अघोरी काही करेल यावर इवाचा विश्वास नव्हता. एकदोनदा त्यानं मरण्याची धमकी दिली होती. कधी म्हणायचा तो आत्मघातकी होणार आहे. अंगावर बॉम्ब बांधून घेणार आहे, कधी म्हणायचा गननं स्वत:लाच गोळी मारणार आहे. पण इवानं समजूत घातली म्हणजे पुन्हा तो नॉर्मल  व्हायचा.

‘‘सॉरी इवा, जगलो वाचलो तर पुन्हा भेटू.’’

‘‘नाही जावेद, जायचं नाही. ही नाटकं बंद कर.’’

जावेदनं तिला मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं. त्या एका क्षणात दोघांनाही त्यांनी एकत्र घालवलेले सुखद क्षण आठवले. पटकन् इवाला दूर ढकलत जावेद लांब लांब टांगा टाकत बाहेर निघून गेला.

‘‘जावेद थांब, जाऊ नकोस…’’ इवा हाका मारत होती.

जावेद निघून गेला होता. इवा रडत होती. पण रडून काहीच होणार नव्हतं. ‘जावेदला अडवायला हवं’ तिनं विचार केला, तिचं प्रेम त्याला रोखेल, त्यानं कुणाचा जीव घ्यायला नको. मी त्याला अशी विनाशाच्या वाटेवर जाऊ देऊ शकत नाही. माझ्या प्रेमाच्या बळावर मी त्याला माघारी वळवेन. मी स्वत:च ट्रकसमोर उभी राहीन. तो सांगत होता की त्याला गर्दीत ट्रक घुसवायचा होता.

दुसऱ्या दिवशी १४ जुलैला बेस्टिल डे, फ्रेंच नॅशनल डे साजरा व्हायचा होता. या दिवशी इथे युरोपातली सर्वात मोठी मिलिटरी परेड होते. रस्त्यावर अतोनात गर्दी असते. म्हातारी कोतारी माणसं, तरुण मुलं, मुली सगळेच आतषबाजी बघायला उत्सुक असतात.

इवाला एकदा वाटलं होतं पोलिसांना सांगावं. त्यांची मदत घ्यावी. पण काय नेम, ते तिलाच तुरुंगात डांबतील. जावेद कदाचित बोलतोय, पण असं काही करणारही नाही. तरीही इवा जावेदनं सांगितलेल्या ठिकाणी जाऊन उभी राहिली. जावेदचा फोन बंद होता. इवा त्याला गर्दीत शोधत होती.

तेवढ्यात गर्दीकडे येणाऱ्या एका ट्रकला एका बाइकवाल्या पोलिसानं अडवण्याचा प्रयत्न केला. ट्रक थांबला नाही. इवाला दिसलं ट्रक जावेद चालवत होता. ती स्वत:च ट्रकसमोर जाऊन उभी राहिली.

क्षणभर जावेदचे हात थरथरले. ट्रकसमोर इवा हात पसरून उभी होती. इवा रडत होती. थरथरत होती. पण जावेद आता थांबणार नव्हता. त्यानं ट्रकचा स्पीड कमी केला नाही की ट्रक थांबवला नाही. ट्रक इवाला अन् तिच्याबरोबर इतर अनेकांना चिरडत पुढे निघाला. क्षणात पोलिसांनी गोळ्यांचा पाऊस पाडला. जावेद तिथंच गतप्राण झाला. सगळीकडे आक्रोश, रडारड, रक्ताच्या चिळकांड्या, रक्तमांसाचा चिखल, रक्तात पडलेली प्रेतं, पोरांना घेऊन धावणारे आईबाप, घाबरून रडणारी माणसं…विदारक दृश्य होतं.

इवा अन् जावेद दोघंही मरण पावले होते. प्रेमाचा पराजय झाला होता. दहशतवादाच्या रक्तरंजित खेळात, प्रेतांचा खच, कण्हण्याचे आवाज, घाबरून गेलेल्या लोकांचे चित्कार, तडफडणारी माणसं, भीती, भय, दु:ख अश्रू हेच उरले होते. प्रेमावरचा विश्वास उडालेली इवा मरण पावली होती अन् अतिरेक्यांच्या संगतीत काय घडतं हे जावेदचं प्रेत सांगत होतं.

पुन्हा चूक होणे नाही

कथा * सुदीप्ती सत्या

सकाळच्या वेळी माझं घर अगदी केराच्या बादलीसारखं दिसतं…नवरा ऑफिसात, दोन्ही मुलं कॉलेजात अन् धाकटा लेक शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते. सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही.

खोल्यांचे केर काढून फरशा पुसून होताएत तोवर मोबाइल वाजला. कामाच्या वेळी असे मेसेजेसही फार वैताग आणतात. फोन बघितला तर मोठ्या नणंदेचा होता. सगळा राग वैतागून विसरून मी फोन घेतला. इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काही सीरियस तर नाही ना? हा विचार बाजूला सारून मी म्हटलं, ‘‘ताई, नमस्कार बऱ्या आहात ना?’’

‘‘मी बरी आहे गं! पण मोहनाची तब्येत बरी नाहीए. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. ती जेवतखात नाहीए. रात्र रात्र जागी असते. विचारलं तर म्हणते झोप येत नाही. जीव घाबरतो…’’ बोलता बोलता ताईंना रडू यायला लागलं.

‘‘हे कधीपासून होतंय?’’

‘‘एखाद महिना झाला असावा, कदाचित जास्त ही…’’

‘‘ताई, रडू नका, मी आहे ना? आजच जाते मी तिला भेटायला. आता नऊ वाजलेत म्हणजे यावेळी ती कॉलेजमध्ये गेलेली असेल. मी संध्याकाळी भेटते तिला. वाटलं तर इथं घरी घेऊन येईन…तुम्ही अगदी शांत राहा. ब्रेकफास्ट झाला का तुमचा?’’

‘‘नाही…’’

‘‘कमाल करता…इतका वेळ उपाशी आहात? आधी खाऊन घ्या. चहा घ्या अन् काळजी करू नका…मलाही आता भराभरा कामं आटोपायची आहेत. मी एक दोन दिवसात तुम्हाला सगळं सांगते…आजच जातेय मी मोहनाकडे…’’

फोन ठेवून मी कामाला लागले. मोहनाचा विचार डोक्यात होताच.काय झालं असेल मोहनाला? इतकी हुशार, गोड गुणी पोरगी…आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्वगुण संपन्न म्हणून नावाजली जाते. इंजीनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ‘तिच्याकडून काही शिका’ असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते.मुलं हसून उडवून लावतात.  punhaa chuke hone naahi

दुपारचा स्वयंपाक आटोपून मी मेथीच्या पुऱ्या, गोडाचे भोपळयाचे घारगे केले. बटाट्याचा कीस तळून घेतला. हे पदार्थ मोहनाला फार आवडतात. होस्टेलवर ते मिळतही नाहीत. माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच कळवलं नाही. सरप्राइज द्यायचं असं ठरवलं. संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले. तिथेच चिठ्ठी ही लिहून ठेवली. नवऱ्याला फोन करून मी मोहनाला भेटायला जातेय एवढं त्याच्या कानावर घातलं.

मोहनाचं कॉलेज अन् होस्टेल माझ्या घरापासून निदान पंचवीस किलोमीटर अंतरावर होतं. दोन बसेस बदलून जावं लागतं. भरपूर वेळ खर्च होतो. म्हणूनच वरेचवर मला जाता येत नाही. इंजीनियरिंगच्या भरगच्च अभ्यासातून इकडे यायला मोहनालाही जमत नाही.

मी होस्टेलवर पोहोचले, तेव्हा मोहनाची मैत्रीण भारती भेटली. ‘‘अरे मामी? नमस्कार…कशा आहात?’’ तिनं हसून विचारलं.

‘‘नमस्कार, कशी आहेस तू? मोहना कुठं भेटेल?’’

‘‘तिच्या रूमवर.’’

‘‘थँक्यू…’’ मी तिचा निरोप घेऊन वॉर्डनच्या केबिनमध्ये जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या अन् मोहनाच्या रूमवर पोहोचले. दार बंद होतं…कडी नसावी, पण मी दारावर टकटक करताच धक्क्यानं ते उघडलं अन् मी आत गेले. पलंगावर आडवी झालेली मोहना वर गरगरणाऱ्या पंख्याकडे शून्य नजरेनं बघत होती. आवाजानं दचकून तिनं विचारलं, ‘‘कोण आहे?’’ मला बघताच उठून बसली.

‘‘अय्या…मामी तू?’’ तिनं आनंदानं मिठी मारली.

तिचा चेहरा ओलसर होता…‘‘रडत होतीस का?’’ मी विचारलं.

‘‘नाही…’’

मी तिच्याकडे नीट बघितलं…पार कोमेजली होती पोर, हडकली होती. डोळे सुजल्यासारखे…मी प्रेमानं विचारलं, ‘‘काय झालंय तुला? सकाळी तुझ्या आईचा फोन आला, तुला बरं नाहीए म्हणून, अशावेळी तू सरळ माझ्याकडे यायचंस किंवा स्वत:च्या घरी जायचं…इथं येणाऱ्या डॉक्टर मॅडमना दाखववलंस का? काही औषधं वगैरे घेते आहेस का?’’ मी एकामागोमाग एक प्रश्न एकदमच विचारले.

‘‘अगं मामी, बरी आहे मी. तू अशी हवालदिल होऊ नकोस. बैस तू. मी चहा घेऊन येते.’’ पलंगावरून उतरत मोहनानं म्हटलं.

‘‘मी चहा घेऊनच निघालेय…तू कुठंच जाऊ नकोस. तुझ्यासाठी बघ मी मेथीच्या पुऱ्या, भोपळ्याचे घारगे अन् तुझ्या आवडीचा बटाट्याचा चिवडा आणलाय.’’ मी डबा तिच्यापुढे धरला. मला वाटलं होतं ती नेहमीप्रमाणे झडप घालून डबा उघडेल…पदार्थ तोंडात टाकेल…बोटांनी ‘मस्त’ची खूण करेल. पण तसं काहीच झालं नाही.

‘‘नंतर खाईन,’’ म्हणत तिनं डबा शेजारच्या स्टुलवर ठेवला. डब्याच्या धक्क्यानं स्टुलावरचं पुस्तक खाली पडलं. पुस्तकात ठेवलेली गोळ्यांची स्ट्रिप त्यातून बाहेर आली. मी ती उचलली. नीट बघितली. ‘‘काय गोळ्या झोप येण्यासाठी आहेत…तुला झोप येत नाही?’’ मी तिच्याकडे बघत विचारलं.

तिनं माझी नजर टाळली…‘‘नाही, तसं काही नाहीए. मी चहा घेऊन येते कॅन्टीनमधून,’’ ती घाईनं म्हणाली.

‘‘तुला घ्यायचाय का?’’

‘‘नाही, मला नकोय.’’

‘‘तर मग राहू दे, मलाही थोड्या वेळात निघायचंय. अभ्यास कसा चाललाय?’’

‘‘फारसा चांगला नाही…’’

मला जाणवलं, मोहना बोलताना नजर टाळतेय, एरवी आनंदानं चिवचिवणारी मोहना आज मोकळेपणानं बोलत नाहीए. माझं लग्न झालं, तेव्हा चिमुरडी होती ती. तेव्हापासून आम्हा मामीभाचीचं गुळपीठ होतं. सगळ्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करायची. माझीही ती फार लाडकी होती.

काहीतरी बिघडलंय खास. तिच्या मनावर ताण असेल तर तिनं बोलून मन मोकळं केलं पाहिजे. त्यासाठी थोडा अधिक वेळ मिळायला हवा. नेमकं काय करावं याचा विचार करत असताना तिची रूमपार्टनर भारती आली. तिनं वह्या पुस्तकं शेल्फमध्ये ठेवली अन् बॅडमिंटनची रॅकेट व शटल उचललं.

‘‘मामी, हिला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा. रात्रभर खोलीत फेऱ्या मारत असते. सतत बैचेन, सतत उसासे…मीच डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अभ्यास पार बोंबालला आहे. धड जेवत खात नाही…मला तर वाटतंय की कुणाच्या तरी प्रेमात पडलीय.’’ भारतीनं हसत हसत म्हटलं.

‘‘गप्प रहा गं! तोंडाला येईल ते बोलतेय.’’ मोहनाचा चेहरा लाल झाला होता.

‘‘अगं मला नाही, तर निदान मामीला तरी सांग त्या लव्हरचं नाव. मामी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी,’’ हसत हसत भारती बाहेर सटकली.

‘‘इडियट!’’ मोहनानं आपला राग व्यक्त केला. मी संधीचा फायदा घेत तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले अन् विचारलं, ‘‘खरंच कुणी आहे का? मला सांग, मी बोलते तुझ्या आईशी.’’

तिनं पटकन् आपले हात ओढून घेतले. ‘‘कुणीच नाहीए.’’

मी तिचा चेहरा माझ्या हातांच्या ओंजळीत घेतला. ‘‘अगदी खरं खरं सांग, नेमकं काय झालंय? मी तुझी मामी आहे. तुझ्या जिवाभावाची थोर वयाची मैत्रीणही आहे. काय त्रास आहे तुला? झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप का येत नाही?

माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? एखादी चूक घडली आहे का? ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे? काय डाचतंय तुझ्या मनात? एकदा मन मोकळं कर, माझ्याकडून तुला पूर्ण सहकार्य आहे. कदाचित मी काही मार्ग काढू शकेन, कॉलेजचा काही प्रॉब्लेम आहे का? होस्टेलमध्ये काही घडलंय का? की आणखी काही आहे? तू अगदी निर्धास्त होऊन मला सांग.’’

मी वारंवार तिल विश्वास दाखवूनही मोहना जेव्हा काहीच बोलेना तेव्हा मी जरा कठोरपणे म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुला जर काहीच बोलायचं नसेल तर मीही निघते…तुझा प्रॉब्लेम तूच बघ.’’ मी उठून उभी राहिले.

‘‘मामी…’’ अत्यंत करूण स्वरात तिनं हाक मारली. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. क्षणभर मी हेलावले, पण कठोरपणे म्हणाले, ‘‘येते मी…’’

ती ताडकन् उठली अन् मला मिठी मारून गदगदून रडायला लागली. ‘‘मामी, माझ्याकडून एक चूक घडलीय…’’

‘‘कसली चूक?’’ मी तिला शांत करत विचारलं.

‘‘एका पुरूषाशी संबंध.’’

विजेचा झटका बसावा तशी मी दचकले. हे काय करून बसलीय पोर. कुणा मुलावर प्रेम वगैरे गोष्ट वेगळी. मोहनाचं रडणं सुरू होतं. मला खरं तर रागच आला पण ही वेळ रागावण्याची नव्हती. तिच्याकडून नेमकं काय ते समजून घेणं अधिक गरजेचं होतं. मी तिच्यासकट पलंगावर बसले.

यावेळी तिला प्रेमळ शब्दांची, आधाराची गरज होती. माझ्या तोंडून एखादा शब्द उणा अधिक गेला तरी ती कदाचित मी गेल्यावर आत्महत्त्याही करेल. मी अगदी शांतपणे तिच्याशी बोलू लागले. ‘‘तू तुझा प्रॉब्लेम सांग, प्रत्येक गोष्टीवर सोल्यूशन असतंच!’’ मी तिला समजावलं.

मोहनानं सांगितलं की ती नेहमीच होस्टेलच्या जवळ असलेल्या चंदन स्टेशनरीकडे फोटोकॉपी काढून घ्यायला जायची. नोट्स, सर्टिफिकेटच्या झेरॉक्स सतत लागतात. होस्टेलच्या सर्वच मुलीं त्या दुकानाचा खूप आधार आहे. झेरॉक्स, कुरिअर, स्टेशनरी असे तीनचार व्यवसाय त्या एकाच दुकानातून होतात.

दुकानाचा मालक चंदन मागच्याच भागात राहतो. त्याची पत्नी रीताही अधुनमधुन दुकान सांभाळते. मदतीला एक पोरगा अजून असतो.

वरचेवर तिथे गेल्यामुळे मोहनाचीही चंदन व रीतासोबत चांगलीच ओळख होती. काही मुलींशी रीताची विशेष गट्टी होती. ती त्यांना कधी तरी चहा फराळही द्यायची. रीताला सात व पाच वर्षांची दोन मुलं होती. त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी रीताला कुणी शिकवणारी मुलगी हवी होती. तिनं मोहनाची रूममेट भारतीला विचारलं. कॉलेजनंतर दोन तास भारती बॅडमिंटनचं कोचिंग घ्यायची. तिला ट्यूशन घेणं जमणारं नव्हतं. भारतीनं मोहनाला विचारलं. मोहना हुशार होतीच. लहान मुलांना शिकवायलाही तिला आवडायचं. पैसेही मिळतील. दोन तास सत्कारणी लागतील म्हणून मोहना कबूल झाली. रोजच घरी जाणं सुरू झाल्यावर रीता व चंदनशीही ती अधिक मोकळेपणानं वागू लागली.

चंदन जरी विवाहित अन् दोन मुलांचा बाप होता तरीही थोडा भ्रमर वृत्तीचा होता. दिसायला अत्यंत देखणा, बोलणं मिठ्ठास…मोहनाही अल्लड वयातली सुंदर तरूणी. दोघंही एकमेकांकडे चोरून बघायची.

आपलं वय, आपली परिस्थिती याची जाणीव दोघांनाही होती, पण भिन्नलिंगी आकर्षणातून एकमेकांकडे आकृष्ट झाली होती.

एक दिवस रीताच्या माहेराहून फोन आला. तिची आई सीरियस होती. हॉस्पिटलमध्ये होती. घाबरलेल्या रीतानं फक्त धाकट्याला बरोबर घेतलं, चार कपडे पिशवीत कोंबले आणि ती घाईनं माहेरच्या गावी निघून गेली.

त्याचवेळी शहरातल्या एका आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्याची आंबड उठली. भराभर दुकानं बंद झाली. पोलिसांच्या गाड्या शहरात, शहराबाहेर चहू बाजूंनी अंगणात फिरत होत्या.

चंदननेही दुकान बंद केलं अन् तो घरात आला. रीता घाईनं गेली होती घरकामाचा पसारा पडून होता. मोहना मोठ्या मुलाला शिकवत होती, पण त्याला आज अजिबात अभ्यास करायचा नव्हता.

तेवढ्यात लुंगी बनियान अशा वेशातला चंदन चहाचे कप हातात घेऊन आला.

‘‘मोहना, चहा घे.’’

चहाचा कप त्याच्याकडून घेताना मोहनाच्या बोटांना त्याच्या बोटांचा स्पर्श झाला. ती एकदम मोहरली. हृदयाची धडधड वाढली. ‘‘ताई कधी येणार?’’ तिनं विचारलं.

तिथंच खुर्चीवर बसून चहा पित चंदननं म्हटलं, ‘‘लवकरच येईल.’’

‘‘चहा फारच छान झालाय,’’ मोहनानं हसून म्हटलं.

‘‘तुमच्यासारख्या मॅडमना माझ्या हातचा चहा आवडला हे माझं भाग्य!’’

अमृतनं बघितलं बाबा अन् टिचर गप्पा मारताहेत, तो तेवढयात तिथून पळाला.

‘‘अरे, अरे…अमृत…’’

कप ठेवून मोहना त्याला पकडायला धावली अन् तिचा पाय घसरला…पडलीच असती पण चंदननं सावरली तिला.

‘‘मॅडम, माझ्या घरात हातपाय मोडून घ्यायचेत का?’’ त्यानं तिला पलंगावर बसवत विचारलं.

चंदनच्या बळकट बाहूंनी सावरलं अन् मोहनाच्या हृदयानं ठाव सोडला. तिच्या हातापायाला कंप सुटला. तिच्या कंरगळीला लागलं होतं. ती स्वत:ला सावरत करंगळी चोळू लागली.

‘‘दुखतंय का?’’

‘‘हो…’’

‘‘आणा मी नीट करतो.’’ म्हणत चंदननं कंरगळी धरून जोरात ओढली. मोहना किंचाळली…कटकन् आवाज आला अन् करंगळी बरी झाली.

तिच्या पावलावरून हात फिरवत चंदननं म्हटलं, ‘‘मोहना, तुझे पायही किती सुंदर आहेत. कोमल, रेखीव गोरेपान.’’

मोहनाच्या अंगावर रोमांच फुलले, तो काय बोलतोय हे लत्रात येण्याआधी ती बोलून गेली. ‘‘तुमच्या गोऱ्यापान छातीवरचे हे काळेभोर केस किती छान दिसताहेत…’’

चंदननं तिला मिठीत घेतलं, चुंबन घेतलं, दोन तरूण देह एकांतात एकमेकांत विरघळले, कळत होतं तरीही सावरता आलं नाही.

दोघांनाही भान आलं, आपली चूक उमगली, मोहना घाईनं होस्टेलवर आली. प्रचंड घाबरली होती ती.

चंदनही स्वत:ला गुन्हेगार समजत होता. मोहना पश्चात्तापाच्या अग्नित होरपळत होती. माहेराहून परत आलेल्या रीतानं, शिकवायला का येत नाही विचारल्यावर ‘प्रोजेक्टचं काम आलंय, वेळ नाही’ असं तिनं सांगितलं.

मोहनाची झोपच उडाली. आपण काय करून बसलो…आईबाबांनी केवढ्या विश्वासानं आपल्याला इथं पाठवलंय अन्…आपल्या धाकट्या बहिणी…किती अभिमान आहे त्यांना मोहनाचा. हे सगळं घरी कळलं तर?

‘‘मामी हे सगळं कसं सहन करू?’’ मोहनाचा बांध पुन्हा फुटला.

‘‘शांत हो बेटा, ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहील. तू अजिबात काळजी करू नकोस.’’ मी तिला थोपटून आश्वस्त करत होते, पण शंकेची पाल मनात चुकचुकत होती…

‘‘मोहना, तुझे पिरिएड्स कधी झालेत…’’

‘‘नाही झालेत अजून…’’ तिनं निरागसपणे म्हटलं.

मला थोडं टेन्शन आलं. पण वरकरणी तसं न दाखवता मी तिला म्हटलं, ‘‘हे बघ, तू पटकन् आवर…दोनचार दिवस माझ्याकडेच रहायचंय, त्या हिशेबानं कपडे पिशवीत भरून घे.’’

‘‘पण मामी.’’

‘‘आता वेळ घालवू नकोस, मी वॉर्डनकडून चार दिवस घरी जाण्याची परवानगी घेऊन येते.’’

वॉर्डननं परवानगी दिली. वाटेत मी मोहनाला म्हटलं, ‘‘घरी  गेल्यावर माधवी, पल्लवी तुला बघून खूप खुश होतील…तू त्यांच्याशी नेहमीच्या मोकळेपणानं वाग. मात्र जे काही घडलंय ते अजिबात सांगू नकोस. उद्या जरा आपण दोघीच बाहेर जाऊन येऊ.’’

घरी पोचताच माझ्या मुलांनी मोहनाचा ताबा घेतला. ‘‘तू अशी हडकुळी का झालीस?’’ या प्रश्नावर तिनं ‘‘अभ्यासाचं टेंशन आलंय,’’ म्हणून सांगितलं.

माझ्या नवऱ्यानंही तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. मी बेमालमपणे सर्व स्थिती सांभाळून घेतली.

नवऱ्याशी खोटं बोलल्याबद्दल मी मनातल्या मनात त्यांची क्षमाही मागितली. मोहनाच्या सुखासाठी मी काहीही करायला तयार होते.

रात्री मोहनाच्या आईला फोन केला. ‘‘तिला अभ्यास थोडा जड जातोय, पण ती सर्व करेल, मी तिला चार दिवस घरी घेऊन आलेय,’’ असं सांगून तिलाही आश्वस्त केलं.

मोहना जरी मुलांमध्ये रमली होती तरी अजून ती आतून उमलून आली नव्हती. डोळ्यातले उदास भाव तिची मन:स्थिती सांगत होते.

रात्री ती पल्लवी माधवीबरोबर झोपली अन् अगदी गाढ झोपली. माझी झोप मात्र रूसली होती. मोहनाला चंदनचं आकर्षण वाटलं याच चूक काहीच नव्हतं. पण तरूण वयातही स्वत:वर ताबा ठेवता आला पाहिजे. आईमुलगी, बाप लेक यांच्यात मोकळेपणाने चर्चा, संवाद व्हायला हवा. आज मोहना आहे, उद्या माझ्या मुलीही अशाच नादावल्या तर? आपल्या मुलींना विश्वासात घेऊन सावध करणं ही आमची म्हणजे आयांची जबाबदारी आहे.

पल्लवी माधवीशी मीसुद्धा जवळीक साधायला हवी. स्त्री पुरूष संबंध, निसर्ग स्त्रियांच्या बाजूचा नसतो, एकत्र सुखाचा अनुभव घेतला तरी पुरूष जबाबदारीतून सही सलामत सुटतो. अडकते ती स्त्री…मुलींनी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्याइतकी आई त्यांची मैत्रीण व्हायला हवी.

हसती खेळती मुलगी. एखाद्या घटनेनं अशी हादरून जाते. कोमेजते…मोहनाला प्रेमानं विश्वासानं जवळ घेतलं म्हणूनच ती मोकळेपणानं सांगू शकली, नाहीतर कदाचित तिनं ताण असह्य होऊन आत्महत्त्याही केली असती.

सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांना डबे देऊन त्यांना त्यांच्या मोहिमेवर पाठवलं. मुलं जायला तयार नव्हती. पण शेवटी एकदाची गेली.

आमचा नाश्ता अंघोळी आटोपून मी मोहनाला घेऊन बाहेर पडले. ‘‘आपण कुठं जातोय मामी?’’ तिनं जरा काळजीनं विचारलं.

‘‘माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे. आपण तिच्याकडे जातोय.’’

डॉक्टरनं तपासून ‘काळजीचं कारण नाही’ म्हणून सांगितलं. ‘‘या वयात अभ्यासाच्या टेन्शनमुळे मासिक पाळी थोडी मागे पुढे होते. मी गोळ्या देतेय…सुरू केल्यावर पाळी सुरू होईल. पण ही अशक्त आहे, चांगलं खायला प्यायला घाला. इंजीनियरिंगच्या अभ्यासात तब्येत धडधाकट लागते,’’ डॉक्टरांनी हसून म्हटलं.

मैत्रिणीला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही बाहेर पडलो. वाटेत आम्ही मोहनासाठी एक सुंदरशी पर्स आणि सॅन्डल्स घेतल्या. तिच्या आवडीचं चॉकलेट आइस्क्रिम खायला घातलं. त्यापूर्वी आम्ही एका हॉटेलातच जेवून घेतलं.

मोहनाच्या मनातली सर्व भीती, सर्व काळजी मुख्य म्हणजे अपराधीपणाची भावना मला काढून टाकायची होती. आता तीही आनंदात दिसत होती.

दिवसभर मजा करून आम्ही घरी परतलो. एकाएकी तिनं मला मिठी मारली…‘‘मामी, आज मला इतकं छान अन् हलकं हलकं वाटतंय…’’

‘‘तू जर काल मला रागावली असतीस, दोष दिला असतास तर मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर बोलू शकले नसते. मनातल्या मनांत कुढत बसले असते.

कदाचित मी माझं आयुष्य संपवून टाकलं असतं.’’

‘‘पण तू इतकं मला जपलंस, इतकी प्रेमानं वागलीस, त्यामुळेच मी विश्वासानं सगळं तुला सांगितलं…’’

‘‘पण अजूनही मला स्वत:चाच राग येतोय. मनातून अपराधीही वाटतंय.’’ बोलता बोलता तिचे डोळे भरून आले.

मी तिला पलंगावर बसवली. तिला पाणी प्यायला दिलं. ‘‘बाळा, चूक तर खरंच मोठी घडली होती, पण तुला चूक कळली, पश्चात्ताप झालाय, यातच सगळं भरून पावलं.’’

‘‘आता यापुढे या घटनेचा उल्लेखही कधी करायचा नाही. वेड्या वयातली ती चूक होती. जन्मभर तिची बोच, तो सल घेऊन जगायचं नाही. पुढे केवढं मोठं आयुष्य पडलंय…ते जबाबदारीनं आणि आनंदात जगायचं.’’

‘‘तुझं काही चंदनवर प्रेम नव्हतं. जे घडलं तो एक अपघात होता. संबंध मनातून प्रेम उमलतं, तेव्हा निर्माण होतात. प्रियकर-प्रेयसी, पती-पत्नी यांच्यात आधी मनातून प्रेम निर्माण होतं, तेव्हा ते शारीरिक संबंधातही दिसून येतं.’’

‘‘आता चंदनला विसर. तो ही आता तुझ्याकडे बघणार नाही. त्याची चूक त्यालाही कळलीच असणार.’’

‘‘लवकरात लवकर यातून बाहेर पड. तब्येत चांगली कर. झपाटून अभ्यासाला लाग. मला खात्री आहे की तू एक अतिशय यशस्वी इंजीनियर म्हणून स्वत:ला सिद्ध करशील.’’ मी हाताच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला अन् तिच्या कपाळावर ओठ टेकले.

तिनं पुन्हा मिठी मारली. ‘‘मामी, पुन्हा एकदा थँक्स! किती धन्यवाद देऊ तुला.’’

थोड्याच वेळात तिनं आईला फोन केला.

‘‘आई, आता मी एकदम छान आहे. अगं, मामी ना, डॉक्टर आहे. बघ, कशी ठणठणीत बरी केलीय मला.’’ मोहनाच्या निर्मळ हास्यानं सगळंच वातावरण आनंदी झालं.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें