रविवारची एक संध्याकाळ

कथा * रमा अवस्थी

संध्याकाळ होत आली होती. पर्वताच्या मार्गावर संध्याकाळ अधिकच गडद होत चालली होती. शैलेन गाडीत बसून विचार करीत होता की, कुठे मुंबईतील गर्दी आणि कुठे ही डोंगरांमधील शुद्ध हवा. आज कितीतरी वर्षांनंतर तो आपल्या घरी आपल्या आईवडिलांना भेटायला निघाला होता. त्याचे घर कुर्ग येथे होते. कुर्ग निसर्ग सौंदर्य आणि कॉफीच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. त्याची बहीण इरा, जी त्याची बहीण कमी आणि मैत्रीण जास्त होती ती अमेरिकेहून आली होती. जास्त करून त्याचे आईवडिल त्याच्यासोबत मुंबईत राहत, कारण आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या शैलेनकडे वेळ नव्हता. तो आपल्या कुटुंबासह मुंबईत राहत होता. परंतु यावेळी इरा आली होती आणि तिला यावेळेस आपला वेळ कुर्गमध्ये घालवायचा होता. तिला भेटण्यासाठी आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शैलेन ३ दिवसांसाठी आपल्या घरी निघाला होता. मायसोरच्या पुढे असलेली तांदळाची शेती आणि स्वच्छ, सुंदर गावांना मागे टाकत त्याची गाडी पुढे निघाली होती. त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ता नयनरम्य होता.

सहजच शैलेनला आठवण झाली की, इराला तिच्या बालपणीच्या मैत्रिणींना भेटून त्यांच्यासह शाळेत जाण्याची इच्छा आहे. यावेळेस तिच्याकडे वेळेची कमतरता नव्हती. इरा आणि तिच्या सर्व मैत्रिणी एकाच शाळेत शिकल्या होत्या. त्यांना पुन्हा एकत्र मिळून शाळेत जायचे होते आणि खूप वर्षांनंतर अखेर ती संधी मिळाली होती.

‘‘मला, बरेच झाले,’’ शैलेनने मनातल्या मनात विचार केला. तोही त्याच शाळेत शिकला होता. इरा आणि तिच्या मैत्रिणींपेक्षा तो ३ वर्षांनी मोठा होता. भाऊबहीण एकमेकांच्या सुखदु:खाचे वाटेकरी तर होतेच, पण सोबतच सर्व गुपिते एकमेकांना सांगत असत. एकमेकांची रहस्ये सर्वांपासून लपवून ठेवत. याची आठवण होताच शैलेनला हसू आले. त्याला इराच्या मैत्रिणी आठवल्या. त्या सर्व इराप्रमाणेच खोडकर होत्या. अनेकदा तो इराच्या मैत्रिणींना सोडायला त्यांच्या घरी जात असे. त्याने इराच्या बऱ्याच मैत्रीणींना सायकल चालवायला शिकविली होती.

या वेळेस तो इराला विचारणार होता की, तिच्या सर्व खोडकर मैत्रिणी कुठे आहेत व कशा आहेत? तसे तर फेसबूक आणि व्हॉट्सअपमुळे सर्व एकमेकांच्या संपर्कात होत्या. शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आणि चेहरे आठवू लागले. हे चेहरे आणि नावे त्याच्या आयुष्यासाठी विशेष महत्त्वाची नव्हती, पण या सर्वांसोबत त्याच्या बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या होत्या. शैलेनला आठवले की, जेव्हा त्याचे लग्न मुंबईत होणार, असे पक्के झाले होते तेव्हा इराच्या सर्व मैत्रिणी खूपच निराश झाल्या होत्या. त्या सर्वांना त्याच्या लग्नात सहभागी व्हायचे होते, कारण त्यांच्यासाठी भरपूर मजा करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी मिळणार नव्हती. नंतर जेव्हा रिसेप्शन कुर्गमध्ये होणार, असे ठरले तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद परतला.

गाडी कॉफीच्या बागांमधून पुढे चालली होती आणि शैलेनला इराच्या मैत्रिणींची नावे आठवू लागली होती. या चेहऱ्यांमधील एक वेगळा चेहराही होता ज्याची आठवण होताच शैलेनचा जीवनातील उत्साह अधिकच वाढल्यासारखे वाटायचे. तो चेहरा वेदाचा होता. वेदा ही इराच्या खास मैत्रिणींपैकी एक होती. वेदात असे वैशिष्ट्य होते की, ती तिच्या चेहऱ्यावरील खोडकरपणाला निरागसतेत सहज बदलू शकत होती. तसा तर शैलेन इराच्या सर्व मैत्रिणींना भेटत असे. पण एका रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले की, त्यानंतर त्याला वेदाला भेटताना अवघडल्यासारखे वाटू लागले होते.

शैलेन वेदाला शेवटचे भेटला त्या गोष्टीलाही आता १६ वर्षांहून अधिक काळ लोटला होता. ती शैलेनच्या रिसेप्शनलाही येऊ शकली नव्हती. त्या रविवारच्या संध्याकाळी असे काही घडले होते की, जे आजही शैलेनला जगण्याची प्रेरणा देत असे. तसे तर एक सुखी आयुष्य जगण्यासाठी जे काही हवे ते सर्व त्याच्याकडे होते, पण तरीही रविवारची ती संध्याकाळ नसती तर सर्व अधुरे राहिले असते. १६ वर्षांपूर्वी सोशल मीडिया नव्हता. त्यावेळेस चिठ्ठी म्हणजे प्रेमपत्र लिहिली जायची. त्या रविवारच्या संध्याकाळी अशीच एक चिठ्ठी शैलेनला मिळाली होती. त्या चिठ्ठीत त्याचे खूप कौतुक करण्यात आले होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक मदतीसाठी (सायकल शिकविणे, गृहपाठासाठी मदत करणे इत्यादी) धन्यवाद देण्यासह शेवटी असे लिहिले होते की, शैलेनने त्या रात्री ८ वाजता फोनची वाट पाहा. पत्राच्या शेवटी वेदाचे नाव लिहिले होते.

शैलेन ती चिठ्ठी हातात घेऊन तिथेच बसून राहिला. तसे तर त्या चिठ्ठीत त्याच्यावर प्रेम असल्याबाबत कुठलाच उल्लेख उघडपणे केलेला नव्हता, पण चिठ्ठी लिहिणारी मुलगी वेदाच होती, हे स्पष्ट झाले होते. तिला तो आवडत असे. पहिल्या आणि कदाचित शेवटच्या वेळेस असे घडले होते की, एखाद्या मुलीने त्याचे कौतुक केले होते. महानगरांमध्ये आणि त्याच्या परदेशातील प्रवासात अनेक महिला मैत्रिणींनी आणि महिला सहकर्मचाऱ्यांनी त्याचे कौतुक केले होते, पण त्या सर्वंमध्ये नाटकीपणा जास्त होता. ही चिठ्ठी आणि त्यातील भावना शैलेनला दवबिंदूच्या थेंबाप्रमाणे सुखावह वाटत असे.

त्या काळात भावनांमध्ये खरेपणाची ऊब होती, आजच्याप्रमाणे त्या वरवरच्या, थंड नव्हत्या. आजही ती चिठ्ठी शैलेनने जपून ठेवली होती. जेव्हा कधी शैलेनला ती चिठ्ठी आणि त्यात लिहिलेले शब्द आठवायचे तेव्हा त्याचा थकवा बऱ्याच अंशी निघून जायचा.

तो त्या रविवारच्या संध्याकाळी फोनची वाट पाहत होता. पण वेदाने ८ वाजताची चुकीची वेळ निवडली होती. रविवारच्या रात्री शैलेनचे वडील सर्वांसोबत जेवत आणि फोनही त्याच खोलीत होता. वेदा फोन करण्यासाठी वेगळा एखादा दिवस निवडू शकत होती.

शैलेन रात्रीचे ८ वाजण्याची वाट पाहात होता. चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे फोन आला आणि तोही ८ वाजताच. फोन वडिलांनी घेतला. जेव्हा ते घरी असायचे तेव्हा तेच फोन घ्यायचे. पण फोन कट झाला आणि पुन्हा आलाच नाही. पुढचे काही दिवस शैलेनने वेदाचा विचार करण्यात घालवले. त्यानंतर तो वेदाला भेटला, पण तेव्हा परिस्थिती अशी नव्हती की, तो तिला चिठ्ठीबाबत विचारू शकला असता. त्यानंतर हळूळू सर्व आपापल्या आयुष्यात पुढे गेले.

शैलेन मुंबईला आला. इरा अमेरिकेला आणि वेदा बंगळुरुला गेली. त्यानंतर असे ऐकायला मिळाले होते की, वेदाचे लग्न बंगळुरुलाच झाले होते. पण शैलेन ती चिठ्ठी विसरू शकला नाही. आजही रविवरचीच संध्याकाळ होती आणि शैलेन आपल्या घरी कुटुंबियांना भेटायला चालला होता. आता त्याची गाडी वळणदार रस्यावरून घराच्या दिशेने निघाली होती. अचानक मोबाईल वाजला. इराने फोन केला होता.

‘‘आणखी किती वेळ लागेल?’’ इराने उतावीळपणे विचारले.

‘‘बस आणखी अर्धा तास… कॉफी तयार ठेव… मी पोहोचतोच आहे,’’ शैलेनने उत्तर दिले.

तेवढयात इराने विचारले, ‘‘ओळख कोण आहे माझ्यासोबत?’’

तिने अचानक विचारलेल्या या प्रश्नामुळे शैलेन गोंधळला. कोण असेल बरं?

तितक्यात इरा म्हणाली, ‘‘अरे माझी सर्वात प्रिय मैत्रीण वेदा.’’

शैलेनचे हृदय धडधडू लागले. त्याला पुन्हा एकदा ती चिठ्ठी आणि रविवारची संध्याकाळ आठवली. तो स्वत:शीच हसला. वेदा आली होती, या गोष्टीचा त्याला आनंद झाला. संध्याकाळ गडद होत चालली होती. शैलेन घरी पोहोचला. तेथे पोहोचताच आईवडिलांच्या पाया पडला.

तेवढयात मागून आवाज आला, ‘‘हॅलो, कसा आहेस?’’

शैलेनने मागे वळून पाहिले असता वेदा समोर उभी होती.

‘‘हॅलो वेदा, कशी आहेस?’’

शैलेनने तिच्याकडे पाहात हसत विचारले.

‘‘मजेत,’’ वेदाने उत्तर दिले.

शैलेनने पाहिले की, वेदात फारसा बदल झाला नव्हता. तेच डोळे, तसाच चेहरा, तोच निरागसपणा आणि या सर्वांमागे तोच खोडकर स्वभाव. काही औपचारिक गोष्टी आणि एकमेकांच्या कुटुंबाची विचारपूस केल्यानंतर त्यांनी कॉफी प्यायला सुरुवात केली. शैलेन मनोमन विचार करू लागला की, वेदा रविवारची ती संध्याकाळ विसरली असेल का? तसे पाहायला गेल्यास आठवणीत ठेवण्यासारखे होते तरी काय? एका चिठ्ठीचा विसर पडणे सोपे होते. पण शेवटी काहीही झाले तरी ती चिठ्ठी वेदाने स्वत:च्या हाताने लिहिली होती. स्वत: लिहिलेल्या चिठ्ठीला ती कशी काय विसरली? तसेही आजच्या फेसबूकच्या युगात एका छोटयाशा चिठ्ठीचे महत्त्व तरी कितीसे असणार? पण त्या काळात चिठ्ठीमुळेच दोन हृदये जोडली जात होती.

त्या चिठ्ठीने शैलेनला एक जाणीव करून दिली होती. कोणाला तरी आपण आवडत असल्याची सुखद जाणीव.

ही जाणीव जीवनात अत्यावश्यक असलेल्या हवा आणि पाण्याइतकी महत्त्वाची नसली तरी तिचे असणे जीवन आणखी सुंदर बनविते. पण आश्चर्य म्हणजे वेदाला हे काहीच आठवत नव्हते. वेदा आणि शैलेन, दोघेही आपापल्या आयुष्यात गर्क होते, हे खरे असले तरी भूतकाळात जगलेल्या काही क्षणांची आठवण नव्याने जागी करायला काहीच हरकत नव्हती. म्हणूनच वेदाने ज्या भावना एके दिवशी पत्राच्या रुपात शब्दबद्ध केल्या होत्या त्या भावना शैलेनच्या नसतानाही त्याला आठवत होत्या, पण असे वाटत होते की, वेदा विसरून गेली होती.

शैलेनला या सर्वांची जाणीव होताच अस्वस्थ झाल्यासारखे वाटले. रात्रीचे १० वाजले होते. तो बाल्कनीत बसला होता. तेवढयात इरा कॉफी घेऊन आली. शैलेन तसे तर इरापासून काहीच लपवित नसे, पण न जाणो कोणता विचार करून वेदाच्या चिठ्ठीबाबत त्याने इराला काहीच सांगितले नव्हते. आज अनेक वर्षांनंतर शैलेनला असे वाटू लागले की, वेदाच्या चिठ्ठीबद्दल इराला सांगायला हवे. इरा तेथेच बसून कॉफी पीत होती आणि आपल्या मोबाईलवर काहीतरी पाहात होती.

‘‘वेदा कुठे कामाला जाते का?’’ शैलेनने विषयाला हात घातला.

‘‘हो’’, मोघम उत्तर देऊन इरा पुन्हा मोबाईल पाहू लागली.

‘‘कुठे?’’ शैलेनने विचारले.

‘‘तिचे बंगळुरूमध्ये एनजीओ आहे.’’ इराचे लक्ष अजूनही मोबाईलमध्येच होते.

शैलेन पुढे बोलण्यासाठी उगाचच गळा खाकरत म्हणाला, ‘‘तुला माहीत आहे का, वेदाने मला एक चिठ्ठी लिहिली होती. खूप आधी, जेव्हा तुम्ही महाविद्यालयात शिकत होता. मी त्या चिठ्ठीला कोणतेच उत्तर दिले नव्हते.’’

आता मात्र इराने मोबाईल बाजूला सारत भावाकडे पाहिले. ‘‘कोणती चिठ्ठी, तीच का, जी छोटूच्या हातून पाठविण्यात आली होती?’’ इराने हसून विचारले.

‘‘हो, हो, तीच… तुला माहीत आहे का?’’ शैलेनला इराने त्या चिठ्ठीचा विषय हसण्यावारी घेतल्याचा राग आला होता. तो सोडून त्या चिठ्ठीशी जोडले गेलेले इतर सर्वच ही गोष्ट एवढी हसण्यावारी का घेत होते?

‘‘ती चिठ्ठी वेदाने लिहिली नव्हती. मधू आणि चंदाने लिहिली होती,’’ इराने जांभई देत सांगितले.

‘‘याचा अर्थ काय? मधू आणि चंदाने लिहिली होती, कशासाठी?’’ शैलेनने विचारले. मधू आणि चंदाही इराच्या मैत्रिणी होत्या आणि त्याही खूपच खोडकर होत्या.

शैलेनने विचारलेला प्रश्न ऐकून इरा हसू लागली. ‘‘अरे भावा, तू विसरून गेलास का? तो दिवस एप्रिल फूलचा होता.’’

मधू आणि चंदाचा चेहरा शैलेनच्या डोळयांसमोर आला.

‘‘पण चिठ्ठीखाली नाव वेदाचे होते.’’ शैलेनने सांगितले.

‘‘आता कोणाचे तरी नाव लिहावेच लागणार होते, त्यामुळे वेदाचे नाव लिहिले,’’ इराने उत्तर दिले.

‘‘वेदाला ही गोष्ट माहिती होती का?’’ शैलेनने आश्चर्यचकित होत विचारले.

‘‘कोणती गोष्ट? चिठ्ठीची का? सुरुवातीला काहीच माहीत नव्हते, पण नंतर त्यांनी मला आणि वेदाला सांगितले होते की, त्यांनी १ एप्रिल असल्याने तुला वेदाच्या नावाने मूर्ख बनवले होते,’’ इराने आळसावत सांगितले.

‘‘पण त्यांनी वेदाचे नाव लिहायला नको होते,’’ शैलेन पुटपुटला.

‘‘हो, लिहायला तर नको होते, पण त्यामुळे काही फरक पडणार नव्हता, कारण त्यांना माहीत होते की, तू एक सज्जन मुलगा आहेस,’’ डोळयांवर प्रचंड झोप असतानाही इराने उत्तर दिले.

शैलेन मनोनम हसत असा विचार करू लागला की, तो १ एप्रिल संपूर्ण १६ वर्षे साजरा झाला, असे कदाचित पहिल्यांदाच घडले असेल. पण काही का असेना, भलेही तो त्याला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न असला तरी त्या घटनेने त्याच्या जीवनातील आनंदात भर घातली होती. अजाणतेपणी का होईना, पण त्या मुलींनी असे काही केले होते ज्यामुळे शैलेनच्या जीवनातील आनंद वाढला होता.

जाणीव

कथा * सोनाली बढे

सकाळी राघव ऑफिसला जायला निघाला, तेव्हा त्याचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं. आजची तारीख बघितली अन् मनात काहीतरी खळ्ळकन् फुटलं. आज नऊ जानेवारी. त्याच्या एकटेपणाला आज एक वर्ष पूर्ण झालं होतं.

जुई त्याच्या आयुष्यातून निघून गेली. त्याला एक वर्ष झालं. जुई त्याची पत्नी. म्हणायला त्यांचं नातं आजही होतं. कायेदशीर दृष्टीनं ती दोघं पतीपत्नी होती. पण नातं फक्त नावालाच होतं. जुई आता त्याच्याजवळ राहत नव्हती. हे नातं टिकवण्यासाठी राघवनं प्रयत्न केला नव्हता. जुईनंदेखील कायेदशीर घटस्फोट घेतला नव्हता.

मनात घोंघावणाऱ्या वादळानं आता राघव पार अवस्थ झाला होता. आपली ऑफिस बॅग, लॅपटॉप अन् मोबाइल त्यानं खोलीतल्या टेबलावर ठेवला. काम करणाऱ्या शांती मोलकरणीला ‘एक कप कॉफी कर’ असं सांगून तो आपल्या कपाटाकडे वळला. त्यात निळ्या रंगाचं एक पाकीट होतं. पाकिटावर अत्यंत सुबक अक्षरात ‘राघव’ असं लिहिलं होतं. जुईचं सुंदर अक्षर हे तिचं एक वैशिष्ट्य होतं.

‘‘राघव या कोऱ्या कागदांवर आज मी माझी व्यथा मांडायचा प्रयत्न करते आहे. खरं तर लिहिताना माझे हात कापताहेत. हे पत्र तुला मिळेल तेव्हा मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलेली असेल. तुझं हे बेगडी जीवन मला सोसत नाहीए. फक्त जाण्यापूर्वी काही गोष्टी तुला सांगाव्यात असं वाटतं. काल मला पुन्हा तेच भीतिदायक स्वप्न पडलं. तू मला तुझ्या ऑफिसच्या कुठल्यातरी पार्टीला घेऊन गेला आहेस. ओळखीच्या काही लोकांशी नमस्कार वगैरे झाल्यावर काही जुजबी गप्पा मी मारते अन् बघता बघता सर्वांच्या चेहऱ्यावर विकृत, खुनशी हास्य उमटतं.

बघता बघता ते हास्य गडगडाटात बदललं. सगळेच ओरडायला, किंचाळायला लागतात. त्या सगळ्या घाबरून टाकणाऱ्या आवाजातच मला तुझा चेहरा दिसतो. खूपच भीतिदायक…चेहऱ्यावर कमालीची घृणा, डोळ्यात क्रौर्य, डोक्यावर दोन शिंग, तू जणू यमदूत दिसतो आहेस. मी घाबरून किंचाळते. जागी होते तेव्हा जानेवारीच्या थंडीतही मी घामानं चिंब भिजलेली असते. मी या स्वप्नाबद्दल तुझ्याशी बोलले तेव्हा ‘तू तुझ्या डोक्यात भलतंच काही असतं, म्हणून तुला अशी स्वप्न पडतात असं सांगून उडवून लावलं होतंस. खरी गोष्ट ही आहे की तुझ्यामुळेच माझ्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्यातून हे स्वप्नं मला पुन्हा:पुन्हा पडत होतं.

आता विचार करते तेव्हा लक्षात येतं की किती छोटीशी गोष्ट होती. माझं वजन एकदम वाढलं होतं. खरंतर मनातली असुरक्षितपणाच्या भावनेनंच मला थायराइडचा त्रास पुन्हा सुरू झाला होता. वरवर बघता गोष्ट साधी होती. आईसबर्गवरवर बघताना केवढासा दिसतो. त्याचा पाण्याखालचा भाग मात्र खूपच मोठा अन् अदृश्य असतो. म्हणूनच मोठाली जहाजं त्याच्यावर आपटून फुटतात. त्या न दिसणाऱ्या कामासारखंच माझं झालं होतं. मनातही भीती, आधाराचा अभाव यामुळे मी सैरभैर असायची.

वाचतावाचता राघवचे डोळे भरून आले. त्याला आठवलं, तो हल्ली किती संतापी झाला होता. बारीक सारीक गोष्टींवरून संतापायचा. सगळा राग जुईवर काढायचा, हेच त्याचं रूटीन झालं होतं. सुरूवातीला असं नव्हतं. त्यांचं वैवाहिक आयुष्य खूपच सुखी होतं. हळूहळू कामाचा त्याग, नोकरीतली जीवघेणी स्पर्धा यामुळे तो खूप बदलला, सगळं फ्रस्टे्रशन मग जुईवर काढायचा.

खरंतर पुढे वाचायचं धाडस होत नव्हतं राघवला. पण ते वाचायलाच हवं, तिच त्याची शिक्षा होती. त्यानं वाचायला सुरूवात केली.

‘‘आठ महिन्यांपूर्वी केलेल्या ब्लडटेस्टमध्ये मला हायपोथायरॉईडिझम आहे हे लक्षात आलं. त्यामुळे वजन एकदम वाढतं. त्यात माझा काय दोष होता?’’

‘‘जाडी, ढप्पी, म्हैस कुठली…’’ तू ओरडायचा, ‘‘लठ्ठ, मठ्ठ, जाडी’’, ‘‘कुरूप, बेढब, बोदी’’ तू मला हेच सतत ऐकवायचास…कदाचित अगदी पहिल्यापासूनच मी तुला आवडत नसेन. वाढलेलं वजन हे एक कारण किंवा निमित्त मिळालं होतं तुला. लोकांना माझा हसरा चेहरा आणि खळखळून हसणं आवडायचं. पण तुला तेही नकोसं वाटायचं. खरंय, एखादं माणूस आवडेनासं झालं की त्याचं काहीच मग आपल्याला आवडत नाही. आपल्याला त्याचा रागच राग येतो.

‘‘जर तुझं माझ्यावर खरोखर प्रेम असतं तर माझ्या वाढलेल्या वजनामुळे तू असा तिरस्कार केला नसता. किमान तू संवेदनशील असावं असं मला वाटायचं. पण तू तर सतत मला टोमणे मारायचास, शोधून शोधून, उकरून उकरून माझे दोष काढायचास. लोकांपुढे माझा अपमान करायचास, माझ्या किती तरी सवयी मी तुझ्यासाठी बदलल्या .पण तू तर अजिबात बदलला नाहीस. दारू पिणं, सिगारेट ओढणं, उशिरापर्यंत दिवा लावून काम करत बसणं, मित्र जमवून पत्ते कुटत बसणं, यातलं काय सोडलंस तू? मी मात्र तुझी प्रत्येक आवडनिवड जपली. तुला जे आवडतं, तेच मी करत होते. तुला आवडणारं शिजवत होते, तुला आवडणारे खात होते, तुला आवडणारेच कपडे, रंग वापरत होते, तुला आवडेल तेच बोलत होते, तेवढेच ऐकत होते. मला माझं अस्तित्त्वच उरलं नव्हतं. मी म्हणजे तूच झाले होते. माझं स्वत:चं असं काही उरलंच नव्हतं. माझी स्वत:ची ओळखच उरली नव्हती.’’

राघवच्या डोक्यात जणू कुणी घणाचा घाव घातला होता. पण ते दु:ख आज तो सहन करणार होता. जुईला त्याच्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या दु:खाचा तेवढाच एक उतारा होता. जुईचं हरवलेलं अस्तित्त्व पुन्हा मिळवून द्यायला हवं. तो पुढे वाचू लागला.

‘‘तू घातलेले पसारे मी आवरायची, तुझे मळवून आणलेले कपडे मी धुवायची, केर काढायची, लादी पुसायची, बाथरूम-टॉयलेट स्वच्छ करायची, स्वयंपाक मी करायची, बाजारहाट, निवडणं, चिरणं, भाजणं सगळं सगळं मी करत होते. तू फक्त ऑफिसात जाऊन यायचा की, ‘दमलो’ म्हणून सोफ्यावर बसायचा, आवडीचे टीव्ही प्रोग्रॉम बघायचास, एक ग्लास पाणी कधी हातानं घेऊन प्यायला नाहीस, इतर कामाचं काय सांगायचं? पण तू थकत होतास अन् मी मात्र तुला ताजी, टवटवीत हवी असायची. तक्रारी फक्त तूच करणार, टोमणे फक्त तूच देणार कारण वाईट मी होते. दोष माझ्यात होते.

‘‘तू तर जणू देवदूत होतास. तुझ्यात फक्त गुण होते. माझ्या अपेक्षा काही फार नव्हत्या. बायकोला नवऱ्याकडून थोडं कौतुक, थोडं प्रेम हवं असतं, तेवढंही तू मला देत नव्हतास. घरकामात मदत कुठून करणार होतास? मुळात मी तुला आवडतच नव्हते. मी फक्त काम करणारं मशीन होते अन् रात्री तुला सुखवणारी दासी.

‘‘अंथरूण अन् स्वयंपाकघर या पलीकडेसुद्धा एक स्त्री असते, ही तुझ्या समजूतीपलीकडची गोष्ट होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या वजनामुळे मी त्रस्त असतानाही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य तुला खटकत होतं, सहन होत नव्हतं. तू किती चिडायचास? का? मला येणारा थकवा, मानसिक ताण दूर करण्यासाठी मी हसत होते तर चिडत का होतास तू? तुझ्या संगतीतले ते त्रस्त दिवस अन् झोपेवाचून घालवलेल्या असंख्य रात्रीचं काय? तुला वाटायचं, मी आपल्या वजनामुळे लज्जित व्हावं, का म्हणून? माझा दोष थोडीच होता तो? लज्जित तू व्हायला हवंय. तुझ्यामुळे मला त्रास झालाय.

‘‘राघव, तुला ठाऊक आहे, तुला टक्कल पडायला लागलंय. तुझ्या चेहऱ्यावर एक ओंगळ मसा आलाय, पण मी तर कधीही म्हटलं नाही की त्यामुळे तू वाईट दिसतोस? खरं तर माझं वाढलेलं वजन हे एक निमित्त मिळालं होतं तुला. तुझा राग काढायला, माझा अपमान करायला ते एक निमित्त होतं. आता माझा थायरॉइड आटोक्यात आलाय. नियमित औषधोपचार, व्यायाम, प्राणायम करून मी आता वजन बऱ्यापैकी कमी केलंय. तरीही तू कधी एका शब्दानं मला म्हटलं नाहीस, मी खूप आशेनं तुझ्याकडे बघायची, माझ्यात झालेला बदल तुला जाणवतोय का हे मला बघायचं होतं. पण नाही…राघव, घृणेचा, तिरस्काराचा वटवृक्ष वाढतो, पसरतो तशी याची मुळंही खोलवर जातात. मलाच स्वत:चं नवल वाटतं की इतकी वर्षं मी का अन् कशी काढली तुझ्याबरोबर? सतत स्वत:चं मन मारायचं, इच्छा मारायच्या, स्वत:चं स्वतंत्र अस्तित्त्व, स्वत:ची ओळखही विसरायची…सोपं नव्हतं!

‘‘पण आता बस्स झालं! खूप झालं! तुझ्याकडून मार खाणं, तुझ्याकडून घाणेरडं बोलणं ऐकणं, स्वत:चा अपमान सहन करणं आता मला मान्य नाही. माझा रोग शारीरिक होता. पण तू मानसिक रूग्ण आहेस. तुझ्यासारख्या मनाच्या रोग्याबरोबर राहून मला रोगी व्हायचं नाहीए. हा जन्म एकदाच लाभतो. हे आयुष्य भरभरून जगायचंय मला. मी आज स्वत:ला तुझ्या बंधनातून मुक्त करते आहे. मला मोकळ्या मनानं जगायला आवडतं, खळखळून हसायला, प्रसन्न चेहऱ्याने वावरायला आवडतं. माझ्या वाढलेल्या वजनासकट ज्यांनी मला प्रेमानं स्वाकीरलं, ती माणसं मला आवडतात. माझ्याशी प्रेमाने बोलणारी, मला सन्मानानं वागवणारी माणसं मला आवडतात. पण तू त्यातला नाहीस. प्रेम कधी केलंच नाहीस माझ्यावर.

थरथरणाऱ्या हातात ते पत्रही थरथरत होतं. राघव सुन्न बसून होता. या एक वर्षांनं त्याला खूप काही शिकवलं होतं. बायको फक्त शोपीस नसते. ती आयुष्यातली मौल्यवान मिळकत असते. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. या वर्षभरात अनेक मुली त्याच्या आयुष्यात आल्या. कुणाला त्याचा भरपूर पगार दिसत होता तर कुणाला उच्च पद, पण प्रत्येकीनं स्वत:चे नखरे दाखवले. एकदा सॅली डिसुझाबरोबर जेवण घेत असताना त्याचा फोन वाजला. तो पाचच मिनिटे फोनवर बोलत होता, तेवढ्यात संतापून ती जेवण टाकून निघून गेली. जुईनं कधीच असा त्रागा केला नव्हता. एकदा रात्री झोपायला पिंकी ग्रेवाल त्याच्यासोबत हॉटेलात गेली अन् त्याच्या सिगरेटच्या वासानं भडकून तिथं एकटाच सोडून निघून गेली. जुईनं तक्रारीचा चकार शब्द कधी काढला नव्हता. कधीही घरात, अंथरूणात किंवा एरवीही तिच्या काहीच मागण्या नव्हत्या.

गेल्या वर्षभरात बरेचदा त्यानं ठरवलं होतं की जुईला फोन करूयात. आपल्या वागणुकीबद्दल क्षमा मागूयात…पण ते जमलं नव्हतं. पण आता मात्र तो अजिबात थांबणार नाहीए. तो आत्ताच तिच्याकडे जाणार आहे अन् तिची क्षमा मागणार आहे. तिच्या मोठेपणाची त्याला जाणीव आहे. तिच्या कष्टांची त्याला जाणीव आहे. तिनं त्याच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल तो कृतज्ञ आहे. तो तिच्या ऋणात आहे. एवढंच नाही तर तो हे ही सांगणार आहे की तिचं हसणं त्याला खूप आवडतं. तिच्या हायपोथायरॉइडची तो काळजी घेईल. त्याचं तिच्यावर प्रेम आहे. ती जशी आहे, तशीच त्याला खूप खूप आवडते.

समानतेचा काळ

कथा * प्राची भारद्वाज

गिरीश सायंकाळी ऑफिसातून घरी आला, तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. पण आता त्याला या गोष्टीची सवय झाली होती. अशावेळी त्याला चेतन भगतचं वाक्य आठवायचं, ‘‘घरच्या पुरूषानं गरम पोळीचा हट्ट धरला नाही तर त्या घरातली स्त्री घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसह स्वत:चं करियरही उत्तम सांभाळू शकेल,’’ या वाक्यामुळे तो शांत चित्ताने वावरू शकायचा. सुमोनाच्या अन् त्याच्या पहिल्या भेटीत तिनं ऐकवलं होतं, ‘‘माझा स्वत:चा मेंदू आहे तो स्वत:चा विचार करतो अन् त्याप्रमाणेच चालतो.’’

तिचा तडकफडक स्वभाव, तिचा फटकळपणा वगैरे लक्षात आल्यावरही तिच्यावर भाळलेल्या गिरीशनं तिच्याशी लग्न करायचं ठरवलं. अन् एकदा लग्न झाल्यावर त्यानं कायम सहकार्यही केलं.

घरकामात तो तिला जमेल तेवढी मदत करायचा. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तो वॉशिंगमशीनमधून कपडे धुवून वाळत घालायचा. तेवढ्या वेळात सुमोना दोघांचे डबे अन् ब्रेकफास्ट बनवायची. बाई नाही आली तर सुमोना केरफरशी करायची, तोवर तो भांडी धुवून ठेवायचा. पण त्याला स्वयंपाकघरात मात्र काही करता येत नव्हतं. एकटा कधीच राहिला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर स्वयंपाक करायची वेळच आली नव्हती. आधी आईच्या हातचं जेवायचा. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, तेव्हा अॅफिसच्या कॅन्टीनचं जेवण जेवू लागला. तेवढ्यात घरच्यांनी लग्न करून दिलं अन् सुमोनानं स्वयंपाकघर सांभाळलं.

घरात आल्यावर एक ग्लास गार पाणी पिऊन गिरीश घर आवरू लागला. अजून सुमोना घरी आली नव्हती. आज बाईनं दांडी मारली. त्यामुळे सकाळी अगदी गरजेचं तेवढंच घरातलं आटोपून दोघंही ऑफिसला गेली होती.

‘‘अरे, तू कधी आलास? मला यायला जरा उशिरच झाला.’’ घरात येता येता सुमोनानं म्हटलं.

हॉलमधलाला पसारा आवरत गिरीश म्हणाला, ‘‘हा काय एवढ्यातच आलोय, जेमतेम पंधरा मिनिटं झाली असतील.’’

‘‘आज आमच्या टीममध्ये पुन्हा जोरदार वादविवाद झाला. त्यामुळेच थोडा उशीर झाला. त्या संचितला ओळखतास ना?’’

तो म्हणाला, ‘‘बायकांना प्रमोशन सहज मिळतं…बस्स, बॉसकडे हसून बघायचं की मिळालं प्रमोशन…’’ हे काय बोलणं झालं? मला रागच आला…मीही ऐकवलं त्याला, ‘‘आम्ही ही अभ्यास करतो, मेहनतीनं चांगले मार्क मिळवून डिग्री घेतो अन् कॉम्पिटिशनमध्ये बरोबरीनं राबून नोकरीतलं प्रमोशन मिळवतो. खरं तर आम्हालाच उलट घर, मुलं अन् नोकरी सांभाळताना जास्त श्रम करावे लागतात. ग्लास सीलिंगबद्दल ऐकलं नाहीए बहुतेक.’’

‘‘तू मानतेस ग्लास सीलिंग? तुला तर कधीच कुठल्या भेदभावाला सामोरं जावं लागलं नाहीए?’’

‘‘मला सामोरं जावं लागलं नाही कारण मी एक समर्थ, सशक्त स्त्री आहे. मी अबला नाही. कुणा पुरूषानं माझ्याशी स्पर्धेत जिंकून दाखवावं…’’

‘‘बरं बाई, पण आता या पुरूषावर कृपा करून अत्याचार करू नकोस. जरा लवकर जेवायवा घाल.’’ गिरीशला भयंकर भूक लागली होती.

‘‘आता? एवढयात ग्लास सीलिंगबद्दल बोललो ना आपण? मी ही एवढ्यातच ऑफिसातून आले आहे. मी ही दमले आहे अन् तुला…’’

‘‘काय करू? जेवायखायच्या बाबतीत तुझ्यावरच आश्रित आहे मी…एरवी मदत करतंच असतो ना? आता तुझ्यावर अत्याचार करतो असा चेहरा करू नकोस, फक्त खिचडी केलीस तरी चालेल.’’

सुमोनानं नाइलाजानं स्वयंपाक केला, कारण मागे दोन तीनदा तिनं उशीर झाल्यामुळे बाहेरून जेवण मागवलं होतं. तेव्हा गिरीशचं पोट बिघडलं हातं. गिरीश स्वच्छताप्रिय होता तर सुमोनाला घरातली घाण किंवा पसारा त्रासदायक वाटत नसे. जेवायच्या टेबलावरचा पसारा ती मजेत सोफ्यावर ढवळून जेवण मांडायची, अन् हॉलमध्ये बसायच्यावेळी सोफ्यावरचा पसारा पुन्हा डायनिंग टेबलवर ठेवायची.

गिरीशनं काही म्हटलंच तर उलटून म्हणायची, ‘‘इतकं खटकतंय तर तूच ठेवा ना उचलून… मीही तुझ्यासारखीच नोकरी करतेय. ऑफिस सांभाळतेय. ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. स्त्री-पुरूष समान आहेत.’’

एकदा गिरीशची आई आली होती. दोघांमधलं हे असं संभाषण ऐकून तिला राहवलं नाही. ती म्हणाली, ‘‘बरोबरीचा मुद्दा अगदी बरोबर आहे. समानता असायला हवीच. पण एकूणच घर, संसार, समाज नीट चालण्यासाठी काही कामं स्त्रीपुरूषांमध्ये विभागली गेली आहेत. दोघांनी मिळून कामं करावीत हे बरोबर आहे. पण तरीही काही क्षेत्र ही स्त्रियांची अन् काही पुरूषांची असतात.’’

त्यांचं बोलणं तिनं एका कानानं ऐकलं अन् दुसऱ्यानं सोडून दिलं.

सुमोनाचा हेकेखोरपणाही गिरीश सहन करत होता. त्यांच्या खोलीत त्यानं सुमोनाला मिठीत घेतलं तरी ती त्याला झिकारायची, ‘‘मी पुढाकार घेईन याची वाट का बघत नाहीस तू? प्रत्येक वेळी तुझीच मर्जी का म्हणून?’’

‘‘मी तुझ्यावर बळजबरी करत नाहीए सुमोना, तुझीइच्छा नसेल तर राहील…’’

‘‘माझ्यावर बळजबरी कुणीच करू शकणार नाही…तूसुद्धा!’’

‘‘अगं मीही तेच म्हणतोय ना? मी बळजबरी करत नाहीए…यात भांडायचं कशाला?’’ सुमोनाच्या अशा आठमुठ्या अन् आखडू वागण्यानं गिरीश त्रस्त होता.

काही महिन्यांनंतर सुमोनाची आई त्यांच्याकडे आली. मुलीचा संसार बघून तिला बरं वाटलं. पण त्यांच्यासमोर बरेचदा गिरीश सुमोनाची बरोबरीची, समानतेची वादावादी झाली. गिरीशला अचानक ऑफिसच्या टूरवर जावं लागलं. त्यानं ऑफिसातून सुमोनाला फोन केला, ‘‘जरा माझी बॅग भरून ठेव ना, प्लीज…’’

‘‘अरे व्वा? सरळ हुकूम करतोय बॅग भरून दे म्हणून. मला माझी कामं नाहीत का? स्वत:च काम स्वत: करायला काय झालं? त्याला टूरवर जायचंय तर त्यानं लवकर घरी येऊन आपली बॅग भरून घ्यावी. लग्नाच्या आधीही करतच होता ना स्वत:चं काम? ऑफ्टर ऑल समानतेचा काळ आहे. बरोबरीचे हक्क आहेत.’’

सुमोनाच्या आईला तिचं हे वागणं खटकलं, ‘‘हे काय सुमोना? तू त्याची बायको आहेस, त्याचं काम तूच नको का करायला? घर, संसार मिळावा म्हणून पुरूष लग्न करतो. एकटं राहायचं तर लग्नाची गरजच काय? उद्या तू म्हणशील मुलं मीच का जन्माला घालायची? गिरीशनं घालावीत.’’

‘‘तू तर माझ्या सासूसारखीच बोलते आहेत,’’ आईचं बोलणं सुमोनाला आवडलं नाही.

आई प्रेमाने म्हणाली, ‘‘अगं, आई असो की सासू, तुला सांगतील ते चांगलंच सांगतील. त्यांच्याकडे अनुभव असतो जगाचा, संसाराचा. म्हणून त्यांचं म्हणणं ऐकावं.’’

‘‘पण आई, मी ही त्याच्यासारखीच शिकलेली आहे. गिरीशसारखीच माझीही नोकरी आहे, त्याच्या एवढंच कमावते आहे, मग मी एकटीनंच का संसार ओढायचा? तुला ठाऊक आहे की मी नेहमीच स्त्री मुक्तीची अन् स्त्रीपुरूष समानतेची समर्थक होते अन् आहे.’’

‘‘तू थोडा अतिरेक करते आहेस सुमोना. अगं स्त्रीवाद म्हणजे पुरूषांशी वैर करणं किंवा सतत भांडण करणं नाही. संसार पतिपत्नीच्या समंजपणानं अन् सहकार, सहचार्याने चालतो. गिरीश तर तुला खूपच समजून घेतो. सहकार्य करतो, नुसती त्यानं बॅग भरून दे म्हटलं तर इतकं आकांडतांडव कशाला?’’

आईचं म्हणणंही सुमोनानं उडवूनच लावलं.

लग्नाला वर्ष होता होता गिरीशनं स्वत:ला सुमोनाच्या अपेक्षेनुरूप बदल घडवून आणला होता. त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं अन् बायकोला सुखात ठेवावं, तिनं सुखी रहावं अशी त्याची इच्छा होती. पण सुमोनाचा स्त्रीवाद काही थांबायला तयार नव्हता. गिरीशचे काही सहकारी घरी आले होते. त्यांच्या ऑफिसच्या गप्पा सुरू झाल्या, तेव्हा त्यांच्या बॉसचा विषय निघाला. ‘‘बॉस मॅडम इतक्या आखडू का आहेत? तेच कळत नाही. सरळ शब्दात तर त्या बोलतच नाहीत.’’

गिरीशच्या एका मित्रानं एवढं म्हटलं अन् सुमोना अशी बिथरली…‘‘एका स्त्रीला बॉस म्हणून सहन करणं तुम्हा पुरूषांना कसं मानवेल? हाच बॉस पुरूष असता तर त्याला सहन केलंच असतं ना? पण इथं एक स्त्री आहे तर लागले तिची चेष्टा करायला, तिला नावं ठेवायला…तिच्याशी जमवून घ्यायला नको का तुम्ही हाताखालच्या लोकांनी?’’

‘‘अरेच्चा? वहिनींना एकाएकी काय झालं?’’ सगळेच चकित झाले.

तिच्या वागण्यानं गिरीशही वैतागला…‘‘सुमोना, तू आम्हा सर्वांना ओळखतेस, आमच्या बॉसला तू बघितलंही नाहीस अन् तिची कड घेते आहेस?’’ त्यानं म्हटलं.

एव्हाना गिरीशच्या लक्षात आलं होतं की सुमोनाच्या मनात पुरूषांविषयी विनाकारण राग आणि द्वेष आहे. ती पुरूषाला बाईचा शत्रूच मानते. स्वत:ला ती श्रेष्ठ स्त्री समजते अन् घरातल्या कामातही विनाकारण बरोबरी, समानता हे विषय आणत असते.

एका रात्री गिरीश, सुमोना जेवायला बाहेर गेली होती. सुमोनाच्या आवडत्या हॉटेलात, तिच्या आवडीचे पदार्थ होते. जेवण झाल्यावर दोघं त्यांच्या गाडीत बसून घरी यायला निघाली. तेवढ्यात तीन मोटरसायकलवर ८-९ जणांचं टोळकं त्यांच्या गाडीच्या मागे लागलं. मोठमोठ्यानं अचकट विचकट बोलत, आरोळ्या ठोकत ते शिट्याही वाजवत होते.

‘‘मी आधीच म्हटलं होतं. या रस्त्यानं नको जाऊयात. तुम्हाला हाच रस्ता नेमका का घ्यावासा वाटला? आता काय करायचं?’’ सुमोना खूपच घाबरली होती.

‘‘काय करणार? घाबरायचं नाही. ऑफ्टर ऑल हा समानतेचा काळ आहे?’’

गिरीशचं बोलणं ऐकून सुमोना गारच पडली. तिचं वाक्य आज गिरीशनं म्हटलं होतं.

घाबरलेल्या सुमोनानं गिरीशला म्हटलं, ‘‘गिरीश, तू माझा नवरा आहेस, मला सुरक्षित ठेवणं ही तुझीच जबाबदारी आहे. बरोबरी समानता आपल्या जागी अन् मला सुरक्षित ठेवणं, गुंडांपासून वाचवणं आपल्या जागी. तुला तुझं कर्तव्य करावंच लागेल.’’

गिरीशनं काही उत्तर दिलं नाही. फक्त गाडीचा स्पीड एकदम वाढवला अन् काही मिनिटातच गाडी सरळ पोलीस चौकीत येऊन थांबली. तिथं पोहोचताच ते टोळकं त्यांच्या मोटरसायकलसह पळून गेलं. शांतपणे गिरीशनं गाडी मुख्य रस्त्यावर आणून सरळ घर गाठलं. दोघांनीही हुश्श केलं. कुणीच काहीही बोललं नाही. गिरीश गप्प होता कारण त्याला सुमोनाला विचार करायला वेळ द्यायचा होता. सुमोना गप्प होती. कारण आज तिला तिची चूक उमगली होती.

सकाळी दोघं उठून आपापलं आवरून ऑफिसला निघून गेली. संभाषण नव्हतंच, मात्र अबोला भांडणातून आलेला नसल्यानं तणाव जाणवत नव्हता. ऑफिसात काम करताना तिच्या कॉम्प्युटरवर गिरीशचा मेसेज दिसला.

‘‘सुमोना, तू हिंदीतल्या ख्यातनाम कवींचं नाव ऐकलं आहे? विनोदी कवी म्हणून काका हाथरसी ओळखले जातात. त्यांचीच ही कविता आहे :-’’

‘दुलहन के सिंदूर से शोभित हुआ ललाट, दूल्हेजी के तिलक को रोली हुई अलौट. रोली हुई अलौट, टौप्स, लौकेट, दस्ताने, छल्ला, बिछुआ, हार, नाम सब हैं मर्दाने. लालीजी के सामने लाला पकड़े कान, उन का घर पुर्लिंग है, स्त्रीलिंग दुकान. स्त्रीलिंग दुकान, नाम सब किस ने छांटे, काजल, पाउडर हैं पुर्लिंग नाक के कांटे. कह काका कवि धन्य विधाता भेद न जाना, मूंछ मर्दों की मिली किंतु है नाम जनाना…

अर्थात, स्त्री अन् पुरूषातला झगडा सनातन आहे. तरीही दोघं एकमेकांचे पुरक, सहाय्यक आहेत ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ज्यांना हे कळत नाही, त्यांचं सोड, पण नवरा बायकोनं एकमेकांशी भांडणं, सतत बरोबरी करणं यानं कोणताच संसार सुखी होत नाही. सुखी संसारातच वंशवेल विस्तारते. घरातल्या मुलांनाही चांगले संस्कार मिळतात. सुमोना, तुझ्या तकलादू स्त्री वादातून बाहेर पड. मी स्वत: स्त्रियांचा सन्मान करतो हे तू जाणतेस. माझं प्रेम ओळख,. त्यातला खरेपणा जाणून घे…’’

त्या सायंकाळी गिरीश घरी आला, तेव्हा टेबलवर गरमागरम जेवण तयार होतं. छानपैकी नटलेली सुमोना हसऱ्या चेहऱ्यानं त्याची वाट बघत होती. तो आत येताच तिनं त्याला मिठी मारली अन् ती म्हणाली, ‘‘माझॆ काम मी केलंय हं! आता तुझी पाळी.’’

जेवण झाल्यावर गिरीशनं सुमोनाला उचलून घेतलं अन् तो बेडरूमकडे निघाला. हसऱ्या चेहऱ्यानं सुमोना त्याला बिलगली.

वारसा

कथा * पल्लवी पुंडे

अलीकडे वारंवार माझ्या मनात येतं की माणसाला त्याच्या कर्माची फळं या जन्मातच भोगावी लागतात. म्हणजे मी टेलिव्हिजनवरच्या क्रिमिनल आणि अध्यात्मिक कार्यक्रमांनी भारावून गेलोय म्हणून असं म्हणतोय असं समजू नका. मी रोज धर्मग्रंथ वाचतो असंही समजू नका. मी कुणा बुवा बांबांचा भक्तही नाही अन् पश्चात्तापाचं महत्त्व मला कळलंय असंही नाही.

सध्या माझी मुलगी राशी हिची मैत्री, तिच्या रमण नामक सहकाऱ्याशी फारच वाढली आहे. रमण विवाहित आहे, हे माझ्या काळजीचं कारण आहे. राशी एका प्रायव्हेट बँकेत मॅनेजर आहे. रमण सीनिअर मॅनेजर आहे. राशी पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार होती. बँकेतही तिच्या हुशारीचं कौतुक होतं. पण रमणबरोबर तिची जवळीक वाढतेय हे मला खटकत होतं. खरंतर मला मनातून फार भीती वाटत होती. माझी पत्नी शोभा आमच्या मुलाकडं न्यू जर्सीला यू.एस.ला गेली होती. तिला तिथं असं काही कळवणं योग्य नव्हतं. जे काही करायचं होतं, जो निर्णय घ्यायचा होता, तो मलाच घ्यायचा होता. आज माझा भूतकाळ मला वाकुल्या दाखवत माझ्यासमोर उभा होता.

मुजफ्फरनगरला मी नव्यानंच बदलून गेलो होतो. बिऱ्हाड अजून दिल्लीतच होतं. शोभाला दुसरं बाळ होऊ घातलेलं. पहिला मुलगाही अजून तसा लहानच होता. इथं मी जेमतेम दोनच वर्षं काढणार होतो. त्यामुळे बिऱ्हाड मांडायचा विचार नव्हता.

बँकेला जवळ असं एक छोटसं घर भाड्यानं घेतलं होतं. शेजारी एक कुटुंब राहत होतं. एक तरूण स्त्री आणि तिची दोन मुलं, बहुधा जुळी असावीत. तिसरी-चौथीत शिकत असावीत. बँकेत काम करणाऱ्या रमेशकडून समजलं होतं की ती स्त्री विधवा आहे. तिचा नवरा ही बँकेतच होता. काही वर्षांपूर्वी तो वारला होता. बँकेनं त्याच्या पत्नीला नोकरीवर ठेवून घेतलं होतं. मधल्या काळात ती सासरच्या लोकांबरोबर राहत होती, पण आता तिनं इथं स्वतंत्र बिऱ्हाड केलं होतं.

‘‘विनय सर, सांभाळून रहा हं! बाई एकदम चालू आहे.’’ रमेशनं मला सांगितलं होतं. रमेश तिला आपल्या जाळ्यात ओढायचा प्रयत्न करत होता हे मला बँकेतल्याच एका कर्मचाऱ्यानं सांगितलं होतं. तिनं त्याची डाळ शिजवू दिली नव्हती. म्हणताना रमेश तिच्याबद्दल इथं तिथं वाईट बोलत होता.

सौजन्याचा गुण तर आम्हाला वारसा हक्कानं मिळाला आहे. शेजाऱ्यांशी प्रेमानं वागा, त्यांना मदत करा, ही आम्ही लहानपणापासून ऐकलेली शिकवण आहे. शेजारी एखादी तरूण देखणी स्त्री असते, तेव्हा तर आम्ही पुरूष मंडळी अधिकच सौजन्यानं वागतो.

मी त्या दिवशी ऑफिसातून परतलो, तेव्हा ती तिच्या घराच्या पायऱ्यांवर बसून होती.

‘‘तुम्ही इथं का बसला आहात?’’ मी विचारलं. ‘‘सर, काय झालं…म्हणजे, माझी किल्ली हरवलीए. मुलं येतीलच आता…त्यांच्याकडे असते दुसरी किल्ली. तोवर इथं बसून वाट बघतेय त्यांची.’’ ती कशीबशी बोलली.

‘‘तुम्ही काळजी करू नका माझ्या घरात या.’’

‘‘अं?’’

‘‘म्हणजे, माझ्या घरात येऊन बसा. मी किल्ली बनवणाऱ्याला घेऊन येतो.’’

‘‘मी इथंच थांबते…तुम्ही किल्लीचं बघा.’’

‘‘ठिक आहे.’’

थोड्याच वेळात रचनाचं घर उघडलेलं होतं अन् मी आत सोफ्यावर बसून तिच्या हातचा चहा घेत होतो. दहा मिनिटातच तिची मुलंही आली. मुलं समजूतदार अन् गोड होती. थोड्याच वेळात माझी त्यांची छान बट्टी जमली.

माझ्या मुलालाही कधी एवढा वेळ दिला नसेल जेवढा मी निखिल आणि अखिलसाठी देत होतो. त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणं, त्यांचा अभ्यास घेणं, रविवारी त्यांना फिरायला नेणं हे अगदी सहज अन् मजेमजेत सुरू होतं. मी तिला हक्कानं एकेरी नावानं संबोधू लागलो होतो. तिनं त्यावर कधी आक्षेपही घेतला नव्हता. प्रत्येक गोष्टीत ती माझा सल्ला घ्यायची. शाळेच्या पिकनिकला तिनं मुलांना पाठवलं होतं, ते माझ्याच सल्ल्यावरून.

बँकेत दोन दिवसांचा स्ट्राइक होता. आम्ही घरीच होतो. नेहमीच सुट्टीच्या दिवशी मी रचनाच्या घरी जेवायला जात असे. पण आज मुलं घरी नव्हती. ती शाळेच्या पिकनिकला गेली होती.

दारात उभं राहून मी विचारलं, ‘‘आत येऊ शकतो का?’’

‘‘विनय सर? तुम्हाला परवानगीची गरज कधीपासून भासायला लागली?’’

आम्ही दोघं जेवलो. मला जाणवलं आज रचना जरा बेचैन वाटतेय. तिनं मागचं आवरलं, मग आम्ही दोघं टीव्ही बघत बसलो. रचनाला मी विचारलं, ‘‘बरं नाहीए का?’’

‘‘डोकं दुखतंय सकाळपासून.’’ ती उत्तरली.

मी तिच्याजवळ सोफ्यावर जाऊन बसलो अन् हलक्या हातानं तिचं कपाळ चेपायला लागलो. कपाळ दाबता दाबता माझे हात तिच्या कानशिलांवरून खांद्यावर आले. तिनं डोळे मिटून घेतले होते. दोघांच्याही शरीराची थरथर एकमेकांना जाणवत होती. काही तरी बोलण्यासाठी तिनं ओठ उघडले अन् मी ते माझ्या ओठांनी बंद केले.

त्यानंतर तिनं डोळे उघडले नाहीत. आम्ही एकमेकांच्या जवळ जवळ येत गेलो. संकोच वाटत नव्हता, उलट जणू दोघांच्या देहांना याच जवळीकीची आस होती असं वाटत होतं. मनानं मनाची, देहानं देहाची भाषा समजून घेतली होती.

‘‘डोळे उघडू नकोस आज मी तुझ्या डोळ्यात मुक्कामाला आहे.’’ मी तिच्या कानांत हळूवार बोललो.

किती वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत होतो कुणास ठाऊक. तिच्यापासून दूर होत मी म्हटलं, ‘‘रागावली नाहीस ना माझ्यावर?’’

‘‘मला स्वत:चाच राग येतोय. तुम्ही विवाहित आहात…असं घडायला नको होतं.’’

‘‘रचना, शोभाशी माझं लग्न म्हणजे एक तडजोड आहे. आमच्या घरच्यांनी लग्न करून दिलंय आमचं. तेच नातं कसंबसं निभावतोय मी. प्रेमाची जाणीव आज प्रथमच तुझ्या संगतीत झाली आहे.’’

‘‘पण, लग्न ते लग्नच ना?’’

‘‘रचना, सप्तपदी झाली म्हणजे प्रेम निर्माण होतं का? लग्नानंतर नवराबायकोत सेक्स घडतोच. पण प्रेम नाही निर्माण होत. तुला पश्चात्ताप होतोय का?’’

‘‘विनय, तुम्ही म्हणता त्या प्रेमाचा साक्षात्कार मलाही झाला आहे. प्रेम शक्ती देतं. वासना असेल तर पश्चात्ताप होतो. माझं लग्न झालं त्या माणसावर मी प्रेम करू शकले नाही. फक्त त्यानं माझं शरीर वापरलं. मनापर्यंत तो पोचलाच नाही. नंतर जे पुरूष जवळ येण्याचा प्रयत्न करत होते त्यांना मीच जवळ येऊ दिलं नाही कारण त्यांच्या डोळ्यातली वासना…त्यांच्या गलिच्छ विचारांचाच तिटकारा वाटायचा मला. तुम्ही मात्र मला नेहमीच मानानं वागवलंत. माणूस म्हणून वागवलंत…अन् मी माझं शरीर तुमच्या स्वाधीन केलं. विधवा स्त्रीनं दुसरं लग्न केलं तर आता चालतं समाजाला. पण असे संबंध अनैतिकच ठरतात. मी आज चारित्र्यहीन ठरले आहे.’’

त्यानंतर आम्ही सततच एकमेकांबरोबर रात्री घालवू लागलो. तिची मुलं झोपली की सकाळीच उठायची. आम्ही निर्धास्त होतो. अधूनमधून सिनेमा, शॉपिंग, पिकनिक असं छान आयुष्य चाललं होतं.

अधूनमधून मी दिल्लीला घरी जात असे. दोन्ही मुलांसाठी भरपूर खाऊ, खेळणी घेऊन जायचो. शोभासाठीही साड्या, दागिने, तिच्या आवडीच्या गोष्टी नेत होतो. बघता बघता दोन वर्षं झाली. आता शोभा बदली घेण्यासाठी फारच जीव खात होती. इकडे रचना आमच्या संबंधांना काही तरी नाव, नात्याचा दर्जा मिळावा म्हणून गळ घालत होती. अन् मी या दोन बायकांना सांभाळू शकत नव्हतो.

रचनानं जे मला दिलं ते शोभाकडून कधीच मिळालं नव्हतं. पण शोभा माझा कायदेशीर पत्नी होती. त्या नात्याला असणारा सामाजिक सन्मान, नैतिक आधार अन् माझी मुलं हे सर्व रचना मला देऊ शकत नव्हती. शेवटी मी बदलीसाठी विनंती पत्र पाठवलं.

‘‘तुम्ही दिल्लीला जाताय?’’

मी रचनाला पत्ता लागू दिला नव्हता, पण तिला कळलंच.

‘‘हो…जावं लागणारच ना?’’

‘‘मला सांगावं असंही वाटलं नाही?’’

‘‘हे बघ रचना, हे नातं आता आपण संपवूयात.’’

‘‘पण तुम्ही तर माद्ब्रयावर प्रेम करत होता?’’

‘‘हो, करत होतो, आता नाही करत?’’

‘‘आता नाही करत?’’

‘‘तेव्हा मला भान नव्हतं, आता मी भानात आहे.’’

‘‘पण तुम्ही शोभाला घटस्फोट देणार होता, माझायाशी लग्न करणार होता…मग? आता काय झालं?’’

‘‘वेडी आहेस तू? दोन दोन बायका कशा करणार मी? अन् शोभाचा दोष काय? काय म्हणून मी घटस्फोट मागणार?’’

‘‘पण आता मी काय करू? कशी जगू? कुठं जाऊ?’’

‘‘उगीच तमाशे करू नकोस. मी तुझ्यावर बळजबरी केली नाहीए. जे घडत होतं, ते तुझ्या इच्छेनंच घडत होतं.’’

‘‘ठिक आहे. तुम्ही मला सोडण्याचा निर्णय घेतलाय. तेही बरोबरच आहे. पत्नी, मुलं, यांचा तुमच्यावर हक्क आहे. वाईट एवढंच वाटतं की स्पष्ट सांगायचं धाडस नाहीए तुमच्यात. मला कळलं नसतं तर कदाचित तुम्ही मला न सांगताही निघून गेला असता पण ज्या प्रेमाच्या गोष्टी बोलत होतात, त्या प्रेमाला एवढीही अपेक्षा नसावी?’’

‘‘तू माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस.’’

‘‘केवढा दांभिकपणा! मला वापरून घेतलंत अन् आता चक्क फेकून देताहात?’’

‘‘हो, हो! वापरलं तुला. काय करून घेशील? अन् तुला ही सुख मिळालंच ना? पुरेपूर पैसे दिलेत मी. किती खर्च केलाय ते विसरलीस का?’’

मी खरंतर फारच खालच्या पातळीवर उतरलो होतो. रचनानं मला कधीच तिच्यासाठी किंवा मुलांसाठी खर्च करू दिला नव्हता. उलट मीच तिच्याकडे जेवत होतो. चहा फराळ करत होतो. तिच्या एकटेपणाला सोबत करण्याचा मोठेपणा मिरवत होतो.

‘‘तुम्ही अन् तुमच्यासारख्या पुरूषांनी असहाय, एकटया स्त्रीचा गैरफायदा घेऊ नये म्हणून मी तुम्हाला धडा शिकवणार आहे. मला स्वत:चीच लाज वाटतेय, इतक्या हीन, हलकट माणासावर मी प्रेम केलं…देह अन् मन समर्पित केलं.’’

‘‘रचनानं माझ्यावर बलात्काराची केस ठोकली. ही बातमी कळताच माझ्या घरचे लोक, शोभा अन् तिच्या माहरेची मंडळी सगळीच मुजफ्फरनगरला आली. मी अक्षरश: रडून रडून शोभाची क्षमा मागितली.

‘‘मला एकच सांगा, जर तुम्ही तिथं नसताना, माझे एखाद्या पुरूषाशी असे संबंध झाले असते अन् मी तुमची क्षमा मागितली असती तर तुम्ही क्षमा केली असती?’’

मी काही बोलूच शकलो नाही.

‘‘उत्तर द्या विनय, गप्प बसू नका,’’ शोभा म्हणाली.

‘‘न…नाही…बहुधा.’’

‘‘बहुधा…अं? तुम्ही नक्कीच मला क्षमा केली नसती. पुरूष अनैतिक वागला तर स्त्रीनं त्याला क्षमा करावी असं समाजाला वाटतं. पण चुकून कुणा स्त्रीकडून असं घडलं तर लगेच तिला बदफैली, व्यभिचारी ठरवून समाज मोकळा होतो. खरंच, मला रचनाचा राग येत नाहीए, तिरस्कार वाटत नाहीए, मला तिचं कौतुक वाटतंय अन् दयाही येतेय. तिला केवढ्या मानहानीला सामोरं जावं लागतंय म्हणून दया येतेय अन् तिनं दांभिक पुरूषी अहंकाराला आव्हान दिलंय म्हणून कौतुक वाटतंय.’’

मी घायकुतीला आलो, ‘‘तू मला क्षमा करणार नाहीस.’’

‘‘मी तिच्यासारखी धाडसी नाहीए. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मुलांची आई म्हणून क्षमा करते आहे. एक पत्नी आणि एक स्त्री म्हणून क्षमा करणार नाही. तुम्ही कायम अपराधीच राहाल.’’

सगळ्या आळीतले लोक रचनालाच दोष देत होते. तिच्या सौंदर्यावर, तिच्या सर्वगुण संपन्न असण्यावर जळणाऱ्या बायका अन् ज्यांना तिनं कटाक्षानं दूर ठेवलं होतं ते पुरूष अशावेळी मागे कसे राहणार? एकटी, देखणी विधवा स्त्री…तिला कोण आधार देणार?

रचना कोर्टात केस हरली. मी माझे सगळे सोर्सेस वापरून उत्तम वकील दिला. पाण्यासारखा पैसा खर्च केला. माझी समाजात पत होती अन् सामाजिक पाठिंबा होता.

रचनाला कुणाचाच आधार नव्हता. आता तिला तिथे राहणंही शक्य नव्हतं. मुलांनाही फार त्रास झाला होता. तिनं एका रात्रीत शहर सोडलं. त्यापूर्वी ती माझ्याकडे आली होती.

‘‘माझ्या मूर्खपणाची शिक्षा मला मिळाली आहे. माझ्या मुलांना मात्र विनाकारण त्रास झाला. पण मी त्यांना खूप शिकवेन, मोठं करेन. त्यांना मानानं जगता येईल एवढं मी नक्कीच करेन. पण एकच सांगते, तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका. कुणा भोळ्याभाबड्या जिवाचा विश्वासघात करू नका, मुलांनाही करू देऊ नका.’’

ती निघून गेली…मीही दिल्लीला आलो. नव्यानं संसार, नोकरी एकूणच सगळं आयुष्य सुरू झालं. पण माझ्या अन् शोभात जो दुरावा निर्माण झाला होता, तो कधीच भरून आला नाही. तिनं म्हटलंच होतं, एक स्त्री, एक पत्नी, एक बदफैली पुरूषाला चारित्र्यहिन नवऱ्याला क्षमा करणार नव्हती. खरं तर मी तरी स्वत:ला कुठं क्षमा करू शकलो होतो? अन् रचनाला तरी कुठं विसरू शकलो होतो?

मी कुठलंच नातं प्रामाणिकपणे निभावलं नव्हतं. माझ्या मुलीच्या बाबतीतही तेच घडतंय का याची मला भीती वाटत होती. माझा भूतकाळ, त्यातील घटना जणू याक्षणी माझ्यापुढे उभ्या राहून खदाखदा हसत होत्या.

मी ताडकन् उठलो…नाही, राशीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही? मी तिच्याशी बोलतो, तिला समजावतो, माझा मुलगी आहे ती, माझं नक्की ऐकेल. तिनं नाही ऐकलं तर मी त्या रमणला जाऊन भेटेन. त्याच्या बायकोला भेटेन. पण खरं तर अशी वेळ येणारच नाही. राशीलाच सांगून काम भागेल.

मी तिच्या खोलीच्या दाराशी पोहोचलो. हळूच बघितलं तर ती तिच्या मित्राशी व्हिडिओ चॅट करत होती. बोलण्यात रमणचं नाव ऐकून मी तिथच थबकलो अन् आडूनच ऐकू लागलो.

‘‘तुझ्यात अन् रमण सरांमध्ये काय चाललंय?’’

‘‘या वयात जे चाललं तेच!’’ जोरात हसून राशीनं म्हटलं.

‘‘तुला ठाऊक आहे ना. ते विवाहित आहेत.’’

‘‘ठाऊक आहे मला.’’

‘‘तरीही तू?’’

‘‘राशी, तुझा मित्र म्हणून सल्ला देतोय, जो माणूस स्वत:च्या पत्नीशी प्रामाणिक राहू शकत नाही, तो कुणाशीही प्रामाणिक राहणार नाही…तुला केव्हाही डच्चू देतील ते…’’

खदाखदा हसली राशी. ‘‘पुरुष मला सोडणार नाही, मीच सोडते पुरूषांना.’’ दंभ होता तिच्या बोलण्यात.

‘‘अरे, आता तो कोंबडा स्वत: मरायला तयार आहे. तर त्यात माझी काय चूक? अं? त्याला बावळ्याला वाटतंय, मी त्याच्या प्रेमात पार बुडाले आहे म्हणून. पण त्या मूर्खाला हे कळतच नाहीए की मी त्याचा वापर करते आहे. त्याला वापरून मी पुढली पायरी गाठणार आहे. ज्या दिवशी तो मी अन् माझा स्वप्नं, माझी महत्त्वाकांक्षा यांच्यामध्ये येईल, त्याच दिवशी मी त्याच्यावर रेपची केस ठोकेन. तुला ठाऊक आहे, सध्या कोर्टात स्त्रियानांच न्याय मिळतो.’’

माझ्या छातीत जोरदार कळ उठली अन् मी खाली कोसळलो. माझ्या कानात रचनाचे शब्द घुमत होते. ‘‘तुमच्या या नीच, हलकट वृत्तीचा वारसा तुमच्या मुलांना देऊ नका…’’

पण वारसा मुलांना मिळाला होता…

नवरे सासू

कथा * पौर्णिमा अत्रे

कवितानं मनगटावरच्या घड्याळात बघितलं. सहा वाजत आलेले बघून ती दचकली. कपिलची ऑफिसातून परतायची वेळ झाली होती. खरं तर त्यांची भिशी पार्टी आटोपली होती, पण अजून गप्पा संपत नव्हत्या. कुणालाच घरी जाण्याची घाई नव्हती.

आपली पर्स उचलून कविता म्हणाली, ‘‘मी निघते, सहा वाजून गेलेत.’’

डोळे वटारून नीलानं म्हटलं, ‘‘तुला कसली एवढी घाई झालीये? नवराबायको दोघंच तर आहात. घरी सासू, नणंद वगैरे कुणीही नाही…माझ्या घरी बघ, मी घरी पोहोचेन तेव्हा सासू संतापानं लाल झालेली दिसेल…अन् मग बंबार्डिंग सुरू करेल. पण त्यासाठी मी माझा आत्ताचा आनंद थोडीच घालवणार आहे.’’

‘‘नाही तर काय? कविता तू इतकी घाई नको करूस. आपण रोज रोज थोडीच भेटतो?’’ अंजलीनं म्हटलं.

‘‘खरंय गं! पण कपिल येतच असतील.’’

‘‘तर काय झालं? नवरा आहे, सासू थोडीच आहे? जाऊयात ना थोड्या वेळानं.’’

कविता बसली खरी, पण सगळं लक्ष कपिलच्या येण्याकडेच लागलेलं. आज     दुपारी नेमकी ती टीव्हीवर येत असलेला एक जुना मराठी सिनेमा बघत बसली. सगळी कामं तशीच राहिली आहेत अन् मग ही भिशी पार्टी…हॉल पसरलेला, बेडरूममध्येही पसारा…

भिशीच्या पार्टीत मजा तर येतेच. खूप दिवसांनी सगळ्या समवयस्क मैत्रिणी भेटतात. छान छान गप्पा, छान छान खाणंपिणं…पण हे सगळे आपलं घर अगदी व्यवस्थित आवरून घराबाहेर पडलं तरच एन्जॉय करता येतं. या क्षणी तिला फक्त घरातला पसारा दिसत होता.

तिला आता तिथं बसवेना. ताडकन् उठली. ‘‘मी निघतेच, मला घरी कामं आहेत,’’ ती म्हणाली.

‘‘अगं, घरी गेल्यावर कर ना? इतकी काय घाई करते आहेस? घरी काय सासू, आजे सासू हातात काठी घेऊन उभ्या आहेत का?’’ वैतागून सीमानं म्हटलं, ‘‘अशी घाबरते आहे, जशी घरी सासवांची फौज आहे.’’

कवितानं फक्त हसून मान डोलावली अन् ती सर्वांना बाय करून तिथून निघाली. घर फार काही लांब नव्हतं. पायीच जाऊयात, सकाळी फिरणंही झालं नाहीए असा विचार करून ती भरभरा चालायला लागली. मैत्रिणींचं बोलणं आठवून तिला हसू येत होतं. सगळ्या म्हणत होत्या, ‘‘घरात सासू, आजेसासू, चुलतसासू, आत्तेसासू, मामेसासू अशा अनेक सासवा असतात कुणाकुणाला, पण नवरे सासू ऐकलीये कधी कुणी? तिला पुन्हा हसायला आलं. तिच्या घरात नवरेसासू आहे. तिचं लग्न झालं, तेव्हा सगळ्या मैत्रिणींना केवढी असूया वाटली होती.’’

‘‘कविता, भाग्यवान आहेस बाई, काय छान छान नवरा पटकावला आहेस,      एकटाच आहे, सासू नाही, सासरे नाहीत, दीर नाही, नणंदा नाहीत, मजेत जगशील सगळं आयुष्य.’’

स्वत: कवितालाही तसंच वाटलं होतं. खूपच आनंदात तिनं कपिलशी लग्न झाल्यावर मुंबईला संसार थाटला होता. कपिल एकटा होता. तिनं ठरवलं होतं की ती त्याच्यावर इतकं प्रेम करेल, इतकं प्रेम करेल की त्याचं सगळं एकटेपण तो विसरेल. ती आणि कपिल… किती सुंदर आयुष्य असेल.

कपिल जेव्हा तीन वर्षांचा होता, तेव्हाच त्याचे आईवडिल वारले होते. तो दिल्लीला मामामामींकडेच वाढला होता. शिक्षण संपलं, नोकरी लागली अन् तो मुंबईत आला. सप्तरंगी स्वप्नं घेऊन कवितानं संसाराला सुरूवात केली अन् तिच्या लक्षात आलं की कपिलला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू जागच्या जागी लागते. स्वच्छ अन् व्यवस्थित लागते. स्वत:च सगळी कामं करणाऱ्या कपिलला गलथानपणा, गचाळपणा, अव्यवस्थितपणा अजिबात खपत नाही. तो लगेच चिडतो.

कवितावर तो खूप प्रेम करायचा. पण सतत तिला सूचनाही द्यायचा. सासूसासरे नसले तरी कपिल तिला सासूसारखाच धारेवर धरायचा. त्यामुळेच तिनं मनातल्या मनात त्याचं नाव ठेवलं होतं नवरे सासू.

कपिलला अधूनमधून ऑफिसच्या टूरवर जावं लागायचं. त्यावेळी तिला एकटेपणा तर वाटायचा. पण मनातून थोडा सुटकेचा आनंदही असायचा…चला, आता तीन चार दिवस तरी तिला कुणी काही म्हणणार नाही. सततच्या सूचनांचा भडिमार असणार नाही. तिच्या मैत्रिणींच्या सासुबाई कुठं गावाला वगैरे गेल्या की त्यांनाही असंच मोकळं वाटत असेल असं तिच्या मनात यायचं. मग ती अगदी मजेत कोणतीही वस्तू कुठंही ठेवायची. कोणंतही काम केव्हाही करायची. म्हणजे ती खूपच गलथान किंवा अव्यवस्थित अथवा आळशी होती असं नाही, पण शेवटी घर आहे. म्यूझियम किंवा हॉटेल नाही. माणसाला तिथं आराम, दिलासा अन् निवांतपणा मिळायला हवा. अगदी प्रत्येक गोष्ट जिवाचा आटापिटा करून जागच्या जागी ठेवायची म्हणजे जरा अतिच नाही का होत? सायंकाळी नीट बघून घेईन की प्रत्येक गोष्ट जागच्या जागी, स्वच्छ आहे ना? तरीही कपिलला कुठं तरी धूळ दिसायची, कुठं तरी डाग दिसायचा, अन् मग तो त्यावरून बोलायचा. गप्प बसणं त्याला ठाऊकच नव्हतं.

तो स्वयंपाकघरात आला की कविताला वाटे साक्षात् सासूबाईच आल्या आहेत. ‘‘हा डबा इथं का ठेवला आहे? फ्रिज इतका गच्च भरलेला का आहे? पाण्याच्या बाटल्या रिकाम्या का? गॅसची शेगडी नीट स्वच्छ केलेली नाही, ओट्याच्या भिंतीवरच्या टाइल्स किती अस्वच्छ दिसताहेत. मोलकरणीला नीट स्वच्छ करायला सांग.’’ असं त्याचं सतत चालायचं.

कधीकधी कविता कपिलला चिडवायला म्हणायची, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही ना, ‘टू इन वन’ आहात म्हणून?’’

‘‘म्हणजे?’’ तो विचारायचा.

‘‘तुम्ही स्वत: आहातच, तुमच्यात माझी सासूही वास करून आहे, ती फक्त मलाच दिसते.’’

यावर कपिल थोडासा ओशाळायचा अन् मग मोकळेपणानं हसून कविताला मिठीत घ्यायचा. तिही मग पुढे काय बोलणार? तिनं लग्नानंतर लगेच ठरवलं होतं की नवरे सासूला कधीही उलटून बोलणार नाही. शब्दांत शब्द वाढवयाचा नाही. भांडणं, वाद घालणं हा तिचा स्वभाव नव्हता. ठीक आहे. तो बोलतो, तर बोलू देत. ऐकून घ्यावं, जमेल तशी स्वत:त सुधारण करावी. नाही जमलं तर ‘सॉरी’ म्हणावं. आत तर लग्नाला २० वर्षं झालीत. एक मुलगी आहे. सुरभी तिचं नाव. मायलेकी मिळून बापाची फिरकी घेत असतात. दोनच पर्याय आहेत. एक तर या नवरे सासूबाई सोबत भांडण करायचं किंवा त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं. ती भांडत नाही. थोडं फार दुर्लक्ष करते, कधी स्वत:च पटकन् त्यानं दाखवलेली त्रुटी दुरूस्त करते किंवा सॉरी म्हणून हसून प्रसंग निभावून नेते.’’

विचारांच्या नादात ती आपल्या घरापर्यंत पोहोचली. त्याचवेळी कपिलही कारमधून उतरला. दोघं एकमेकांकडे बघून हसली. कवितानं मनातच आता पुढे काय संभाषण होईल याचा अंदाज घेतला. ‘‘हा इतका पसारा का झालाय? सारा दिवस काय करतेस तू? सुरभीचा हा चार्जर अजून इथंच लोळतोय…वेळेवर तो जागच्या जागी का गेला नाही?’’ वगैरे वगैरे वगैरे.

ती अन् कपिल लिफ्टनं सोबतच वर आली. ती लॅचला किल्ली लावत होती, तेवढ्यात कपिलनं म्हटलं, ‘‘कविता, उद्या काम करणाऱ्या बाईकडून दरवाजा नीट पुसून घे बरं. केवढी धूळ साठलीय बघ.’’

‘‘बरं,’’ कवितानं हसून मान्य केलं. मनातल्या मनात ती स्वत:ला सावध करत म्हणाली, ‘‘कविता, तुझी नवरे सासू आली हं! सांभाळून राहा.’’

समाधान

कथा * ऋचा गुप्ते

शेजारच्या खोलीतून मघापासून बोलण्याचे आवाज ऐकायला येत होते. संभाषण साधच असावं पण दोघंही इतकी हसत होती की सांगता सोय नाही. काय करताहेत दोघं? रमणच्या छातीत शूळ उठला होता. रमणच्या मनात आलं की उठून त्या कोपऱ्यातल्या खोलीत जाऊन दार लावून मोठ्या आवाजात संगीत सुरू करावं. नकोच ते हसण्या बोलण्याचे आवाज. तरीही मनात एक किडा वळवळत होता. तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता.

काजल गात होती :

‘‘काल पाहिले मी स्वप्न गडे

नयनी मोहरली गं आशा

बाळ चिमुकले खुदकन् हसले

काल पाहिले मी स्वप्न गडे.’’ काजल गात होती अन् रोहन शिटीवर तिला साथ देत होता. सोफ्यावर पडल्या पडल्या रमणनं मनातच त्याला शिवी दिली ‘निर्लज्ज कुठला.’ कुणास ठाऊक आता काय सांगतोय काजलला…इतकी का हसतेय ती…आता मात्र रमणचा संयम संपला. संतापून उठला अन् पाय आपटत काजलच्या खोलीत पोहोचला.

‘‘काय चाललंय मघापासून खिदळणं? इतकं काय घडलंय? अरे, मला स्वत:च्या घरातही काही वेळ शांतता लाभू नये का?’’

रोहननं ‘‘सॉरी-सॉरी’’ म्हणत तिथून काढता पाय घेतला. काजल मात्र अजूनही गुणगुणत होती.

‘‘इवली जिवणी, इवले डोळे,

भुरूभुरू उडती केसही कुरळे,

रूणुझुणु रूणुझुणु वाजती वाळे,

रंग सावळा, तो कृष्ण रडे,

काल पाहिले मी स्वप्न गडे…’’

रोहन तिथं नसल्याने आता रमणला तिचं गुणगुणणं आवडू लागलं. त्याने डोळे भरून काजलकडे बघितलं. सातवा महिना लागला होता. किती सुंदर दिसत होती ती. सर्वांगावर तेज आलं होतं. पूर्वीची एकेरी अंगलट आता गोलाईत बदलली होती. मातृत्त्वाच्या तेजानं झळाळत होती काजल.

गरोदरपणी स्त्री सर्वात छान दिसते. मातृत्त्वामुळे आयुष्याला येणाऱ्या परिपूर्णतेचं समाधान तिला वेगळंच सौंदर्य देतं. रमण अगदी भान हरवून काजलकडे बघत होता, तेवढ्यात रोहननं खोलीत प्रवेश केला. त्याच्याकडे बघताच रमणचं मन कडू झालं. तो झटक्यात वळला. रोहननं वहिनीसाठी काही फळं कापून आणली होती. त्यानं ती प्लेट रमणच्या पुढे केली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून रमण खोलीतून बाहेर पडला.

रमणनं सरळ कोपऱ्यातली खोली गाठली अन् कर्कश्श आवाज संगीत लावून खोलीचं दार बंद करून घेतलं. पलंगावर पडून डोळे मिटले तरी कानात रोहन आणि काजलचं हसणंच घुमत होतं. पुन्हा:पुन्हा त्या दोघांचं बोलणं त्याला ऐकायला येत होतं. एकूणच त्याच्या देहमनावर काजल आणि रोहननं असा काही कब्जा केला होता की त्याला इतर काही सुचतंच नव्हतं. त्याचं मन अस्वस्थ होतं, बेचैन झाला होता तो.

त्यातच जुन्या स्मृती चाळवल्या गेल्या. त्यामुळे तर तो अजूनच वैतागला होता. आपण चक्क नरकात राहतोय असं त्याला वाटायला लागलं. आपण एखाद्या धगधगत्या अग्नीकुंडात उभे आहोत असाही भास झाला. पिता होण्याचं जे सुख त्याला हवं होतं, त्याचा मार्ग असा अग्नीपथाचा असेल असं त्याला वाटलंच नव्हतं.

काही महिन्यांपूर्वी सगळंच किती छान होतं. रमणच्या मनात आलं…पण खरंच छान होतं की त्यावेळीही मनात काही बोच होतीच? आठवणींचे धागे उसवायला लागले.

लग्नाला सात वर्षं उलटली होती. सुरूवातीची वर्षं, करीअर, प्रमोशन्स, घर, घरातल्या इतर जबाबदाऱ्या यातच खर्ची पडली होती. त्यामुळे रमण व काजलनं मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. दोघांची जोडी फारच छान होती. अगदी अनुरूप अशी. दोघांवरही दोन्ही घरातून खूपच दबाव येत होता. आता घरात पाळणा हलायला हवा. दोघांचे आईवडिल, इतर वडिलधारी, नातलग मंडळी एवढंच काय मित्रमंजळीही आता विचारू लागली होती. रमणच्या लग्नाच्या सातव्या वाढदिवसाला त्याचे सासूसासरे आले होते.

समारंभ छान झाला. काजलचे वडील म्हणाले, ‘‘सुरेख समारंभ केलात तुम्ही. एवढ्या वर्षात प्रथमच लग्नाचा वाढदिवस साजरा करताय. खरंच, खूप आनंद वाटला.’’

यावर काजलनं उत्तर दिलं, ‘‘होय बाबा, यावेळी खासच प्रसंग आहे. माझ्या धाकट्या दिराचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालंय. यापुढील शिक्षण तो स्वत:च्या स्कॉलरशिपवर पूर्ण करणार आहे. आमचा रोहन डॉक्टर झाला ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आहे. जणू आमची तपश्चर्या फळाला आली. तो आनंद साजरा करायला आम्ही हा समारंभ आयोजित केलाय.’’

रमणच्या आईनं काजलच्या आईला म्हटलं, ‘‘ताई, आता तुम्हीच या दोघांना समजवा. घरात नातवंडं बघायला आम्हीही आतुरलो आहोत. आता अधिक उशीर करायला नको.’’

‘‘खरंय तुमचं म्हणणं, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. वेळच्यावेळी सर्व होणं जरूरी आहे. आमचंही वय होतंय ना आता…’’

आता रमण आणि काजललाही आपल्या बाळाचे वेध लागले होते. पण काही महिन्यातच काजलच्या लक्षात आलं की काही तरी चुकतंय. दोघांनीही आपली पूर्ण तपासणी करून घेतली. इतकी वर्षं मुलाचा विचारच केला नव्हता. आता मूल हवंय अन् होत नाही म्हटल्यावर दोघंही काळजीत पडली. तपासणीत रमणमध्ये दोष आढळला. असा देखणा, निरोगी, हुशार तरूण पण मूल जन्माला घालणं त्याला शक्य नव्हतं.

‘‘रमण हताश झाला. पण काजलनं त्याला धीर दिला. पूर्ण विचारांती स्पर्मबँकेतून स्पर्म घेऊन काजलच्या स्त्री बीजांशी त्यांचा संयोग घडवून काजलच्या गर्भाशयात ते सोडणं आणि मग गर्भाशयात गर्भ वाढवणं असा निर्णय घेतला गेला.

काजलला वाटत होतं की ही बातमी गुप्त ठेवावी. पण रमणचं म्हणण पडलं की आपण ही गोष्ट लपवूया नको.’’

मग सगळ्या कुटुंबीयांसमोर रमणचा हात हातात घेऊन काजलनं त्यांचा प्लॅन सांगितला.

रोहननं म्हटलं, ‘‘छोटी आई, तुम्ही इतर कुठंही जाऊ नका. मी जिथं काम करतो, तिथं या गोष्टीची उत्तम व्यवस्था आहे. मी त्या विभागाच्या मुख्य डॉक्टरांशी बोलतो.’’

दोघांच्या आईवडिलांनी एकमेकांशी चर्चा केली, तेव्हा रमण अन् काजल आपल्या बालकनीत बसून समोर बागेत खेळणाऱ्या मुलांकडे बघत आपलं मूल कसं असेल याचं स्वप्न विणत होते.

काजल सतत रमणबरोबर होती. त्याच्या दोषाबद्दल ती चकार शब्द बोलत नव्हती. उलट जणू तिच्यात दोष आहे असंच वागत होती.

काजलची सासू म्हणजे रमणच्या आईनं म्हटलं, ‘‘असं घडतं का?’’

‘‘अशा पद्धतीनं जन्माला आलेलं मूल निरोगी असतं का?’’ रमणच्या वडिलांनी विचारलं.

काजलच्या आईनं म्हटलं, ‘‘पण मूल कुठल्या वंशाचं, घराण्याचं असेल हे कसं कळावं?’’ काजलच्या वडिलांनी म्हटलं, ‘‘जर हाच पर्याय असेल तर आपल्याच कुटुंबातील कुणाचे स्पर्म मिळवता येतील का? निदान कुळ, घराणं याबाबतीत संशय उरणार नाही.’’

बराच वेळ सगळे गप्प होते. शेवटी रमणनंच म्हटलं, ‘‘आम्ही गुपचुप हे करू शकलो असतो, पण तुम्हाला विश्वासात घेतलंय ते तुमच्याकडून आधार मिळेल या आशेवर.’’

‘‘तुम्ही सर्व नि:शंक राहा. ही पद्धत आज सर्वमान्य आहे. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण झाला आहे. मी स्वत: यात जातीनं लक्ष घालतोय ना?’’ रोहननं सर्वांना आश्वस्त केलं.

शेवटी एकदाचं डॉक्टरांनी सांगितलं की काजल गरोदर आहे. काजलनं ऑफिसकडून दिर्घ रजा घेतली. घरात बाळ येणार म्हटल्यावर सगळेच हर्षविभोर झाले होते. प्रत्येकजण नव्या बाळाची आपल्या परीनं कल्पना करत होता. आनंद व्यक्त करत होता. काजलला तर कुठं ठेवू अन् कुठे नको असं तिच्या सासूला अन् आईला वाटत होतं.

सध्या सासूनं काजलचा ताबा घेतला होता. त्यामुळे रमणच्या वाट्याला ती कमी येत होती. रमणलाही खूप आनंद झाला होता. त्यांचं स्टेटस बदलणार होतं. तो बाबा व्हायचा होता. तो बाळाच्या जन्माची वाट बघत होता.

सगळं काही सुरळीत चालू होतं. दर चेकअपनंतर डॉक्टर समाधान व्यक्त करत होते. याच काळात रमणला जाणवलं की रोहनच्या फेऱ्या हल्ली वाढल्या आहेत. त्यातून तो डॉक्टर. आईवडिलांना सतत तब्येतीसाठी त्याचीच गरज पडत होती. पण रोहन आला की काजलची जास्त काळजी घेतो असं रमणला वाटे. हल्ली त्याच्या डोक्यात संशयाचा किडा वळवळू लागला होता. हे वीर्यदान रोहननंच केलेलं असेल का?

खरंतर असं नसेल. पण रमणला वाटत होतं. त्याच्याकडे पुरावा काहीच नव्हता. पण त्याच्यात असलेल्या दोषामुळेच त्याला असं वाटत होतं.

रोहनला बघितलं की त्याला आपण मूल जन्माला घालायला असमर्थ आहोत ही बोच फराच टोचायची. रोहनचं काजलकडे येणं त्याला मुळीच सहन होत नव्हतं. एक गोष्ट त्याच्या लक्षात आली होती की जे त्याला काजलसाठी करावंसं वाटतं, ते त्यानं करण्याआधीच रोहननं करून टाकलेले असतं. रोहनसकट घरातील सर्व मंडळी जेव्हा गप्पा, हास्य विनोद करत असतात, तेव्हा रमण त्यात सामील होत नाही, हे कुणाच्या लक्षातच आलं नाही. काही न काही कारण सांगून तो तिथून निघून जात असे. हळूहळू स्वत:च्या नकळत रमण मिटत गेला. ज्या उत्साहानं बाळाच्या स्वागतासाठी तो आपल्या पापण्यांच्या पायघड्या घालून बसला होता, तो उत्साह ओसरू लागला. एक विचित्र विरक्ती त्याच्या मनात घर करू लागली होती. रमणला वाटे या घरात त्याच्या संसारात तोच ‘नकोसा’ आहे. काजल त्याला बोलावून घ्यायची. जवळ बैस म्हणायची. पण तो तिच्याजवळ जातच नसे.

रोहन अन् काजल एकमेकांशी बोलायची तेही त्याला आवडत नव्हतं. आता तर त्याच्या मनात यायचं की रोहनच जर या बाळाचा पिता असेल तर मी कशाला मधेमधे लुडबुड करू?

या विचारानं मनात मूळ धरलं अन् मग सगळंच बदललं. आता तर तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसातच घालवू लागला. वरचेवर टूरवर जाऊ लागला. काजलला त्याचं दूरदरू राहणं खटकत होतं. गरोदरपणाचे शेवटचे दिवस तर काजलसाठी फारच अवघड होते. तिला उठताबसताना मदत लागायची. सासू मदत करायची. रोहन मदत करायचा पण रमण जवळ येत नव्हता. नवरा बायकोत एक अदृश्य भिंत उभी होती. खरं तर रमणचं लग्न झालं, तेव्हा रोहन लहानच होता. काजलला तो छोटी आई किंवा वहिनी आई म्हणायचा. काजलही त्याचं खूप कौतुक करायची. त्यानं डॉक्टर व्हावं ही तिचीच इच्छा होती. ‘‘शी! हे काहीच्या काहीच झालंय सगळं. यापेक्षा आम्हाला मूल नसतं झालं तरी चाललं असतं.’’ संतापून तो स्वत:शीच पुटपुटला. नको नको ते विचार त्याची बुद्धी भ्रष्ट करत होते. तो धुमसत होता. काय करावं ते सुचत नव्हतं.

तेवढ्यात रोहनची हाक ऐकू आली, ‘‘दादा, लवकर ये वहिनीआईला त्रास होतोय, तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल.’’

‘‘तूच घेऊन जा. मी जाऊन काय करणार? मी काही डॉक्टर नाही, मला आज हैदराबादच्या टूरवर जायचंय…मी निघालो आहे…पंधरा दिवसांनी येईन…’’ रमण अगदी अलिप्तपणे म्हणाला.

काजलचा चेहरा वेदनेनं पिळवटला होता. तरी तिनं स्वत:च्या मनाची समजूत घातली की हा अलिप्तपणा रमणच्या मनातील न्यूनगंडातून आलेला आहे. होणाऱ्या बाळाचा तो जैविक पिता नाही, हे शल्य त्याला बोचतंय. हा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला, तेव्हाच काऊंसिलिंग करणाऱ्या सायकोलॉजिस्ट डॉक्टरनं तिला याबाबतीत सांगून सावध केलं होतं. त्यामुळे तिनं रमणला काहीच म्हटलं नाही.

अकराव्या दिवशी काजल भरल्या ओटीनं परत आली. या अवधीत रमणनं एकदाही, फोनवरसुद्धा तिची चौकशी केली नव्हती. तो पंधराव्या दिवशी परत आला. आईनं म्हटलं, ‘‘तू बाबा झालास…अभिनंदन! काजलला भेट ना, ती वाट बघतेय.’’

तो खोलीत गेला. पाळण्याकडे बघितलंही नाही. काजलला त्याची मन:स्थिती समजत होती. तिनंही त्याच्या वागण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. तो आपल्या नेहमीच्या त्याच्या कोपऱ्यातल्या खोलीत गेला आणि त्यानं म्युझिक सुरू केलं. त्याचवेळी त्याच्या कानांवर संगीतापेक्षाही मधुर असा सूर आला…अरे? हा तर बाळाच्या रडण्याचाच आवाज…मुलगा आहे की मुलगी? कुणी त्याला सांगत का नाहीए? अन् बाळाला कुणी गप्प का करत नाहीए? त्याला काहीच समजेना…संगीत बंद केलं अन् बाळाच्या रडण्याचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू आला.

बाळ रडतंय…रमण खोलीत फेऱ्या घालतो आहे. कुणीच नाहीए का बाळापाशी? त्याची आई? आजी? दुसरी आजी? बाळाचा आवाज आता दमल्यासारखा वाटतोय.

तेवढ्यात त्याचा मोबाइल वाजू लागला. नंबर नवा वाटला. त्यानं फोन कानाला लावला. ‘‘दादा, मी रोहन बोलतोय, प्लीज सगळं ऐकून घे. फोन बंद करू नकोस. मी ऑस्ट्रेलियात, सिडनीला आलोय. मला इथं एक कोर्स करायचाय. शिवाय जॉबही मिळाला आहे. दादा, तू आणि छोट्या आईनं माझ्यासाठी खूप खूप केलंय. पण दादा, गेले काही महिने छोट्या आईनं खूप मानसिक ताण सोसलाय. तुझा अलिप्तपणा तिला किती छळत होता, त्याची कल्पनाही तुला नाहीए. दादा, तू रागवू नकोस, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण जेव्हा छोट्या आईला तुझी सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हाच तू तिच्यापासून दूर राहिलास,’’ बोलता बोलता रोहन रडायला लागला. रमणच्या मनात आलं किती मोठा झालाय रोहन, केवढी समजूत आहे त्याला. मीच मूर्ख स्वत:च्या कल्पनेतल्या विकृतीत अडकलो.

रमण काही बोलणार, तेवढ्यात रोहन म्हणाला, ‘‘दादा, बाळं रडताहेत का? मला फोनवर त्याच्या रडण्याचा आवाज येतोय…’’

बाळं? म्हणजे जुळी आहेत का? फोन तसाच घेऊन रमण खोलीत धावला. पाळण्यात दोन छोटी छोटी बाळं सर्व शक्ती एकटवून रडत होती.

‘‘रोहन, बाळा, धन्यवाद! फोन करत राहा…अन् लवकर घरी ये…’’ त्यानं फोन बंद केला अन् त्या लहानग्यांना दोन्ही हातांनी उचलून कवटाळून धरलं. त्याच्या मनात आलं, अगदी रोहनच्या स्पर्मपासून जरी ही बाळं झाली असली तरी काय फरक पडतो? आता ही बाळं त्याची आहेत. तो या बाळांचा पिता आहे. मनातून एक समाधान डोकावत होतं…जर रोहन या मुलांचा बाप असता तर तो त्यांना सोडून गेलाच नसता. म्हणजे ही बाळं रोहनची नाहीत. केवळ मोठं समाधान…!

एक मित्र आहे माझा

कथा * पूनम अहमद

मी बेडरूमच्या खिडकीपाशी उभी राहून बाहेरचा पाऊस बघत होते. अमित अजून अंथरूणातच होते. जागे होते पण मोबाइलवर गर्क होते. मी खिडकीतून हात बाहेर काढून हलवला. नेमकं तेव्हाच त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं.

‘‘कोण आहे?’’ त्यांनी विचारलं.

‘‘मला माहीत नाही…’’ मी उत्तरले.

‘‘तर मग हात कुणाला बघून हलवलास?’’

‘‘मला त्याचं नांव ठाऊक नाही…’’

‘‘रिया, काय बोलतेस हे कळतंय का तुला? ज्याचं नांव माहीत नाही, त्याला बघून हात हलवतेस?’’

मी गप्प बसले. त्यांनीच चेष्टेच्या सुरात विचारलं, ‘‘आहे कोण? स्त्री की पुरूष?’’

‘‘पुरूष…’’

‘‘अरेच्चा? कमालच आहे…अगं, सांग तरी कोण आहे?’’

‘‘मित्र आहे माझा…’’

ताडकन अमित उठले. रविवारी सकाळी इतकी स्फूर्ती? मला कौतुकच वाटलं. मी बोलूनही दाखवलं, ‘‘अरे व्वा? इतक्या चपळाईनं उठलात? काय झालं?’’

‘‘काही नाही, बघायचं होतं कुणाला बघून तू हात हलवंत होतीस ते…सांगत का नाहीस कोण होता तो?’’

एव्हाना अमित थोडे नाराज झाले होते अन् खूपच बैचेनही दिसंत होते. मी त्यांच्या गळयात हात घातले. अगदी प्रामाणिकपणे म्हणाले, ‘‘खरंच सांगत, मला त्याचं नांव ठाऊक नाही. तो काय करतो, कुठला आहे, मला काहीही ठाऊक नाही.’’

‘‘मग त्याला हात का केलास?’’

‘‘तेवढीच ओळख आहे…’’

अमितला काही समजलं नाही. माझे हात गळ्यातून काढत म्हणाले, ‘‘काय बोलतेस काही कळंत नाहीए…ओळख ना पारख…अन् हात हलवला.’’

‘अहो, त्याचं नावं नाही ठाऊक पण ओळख आहे ना?’’

‘‘म्हणजे काय?’’

‘‘असाच जाता येता दिसतो कधीमधी. एकाच सोसायटीत राहतो…किती तरी लोकांशी हाय, हॅलो होतंच ना? त्या सर्वांची नांवं गावं ठाऊक असायला हवीत असं कुठं लिहिलंय?’’

‘‘ठीक आहे…मी वॉशरूममधून येतो तोवर चहा, नाश्ता काय करतेस ते बघ.’’ अमितनं विषय तिथंच संपवला.

रविवार असल्यानं मुलंही उशीरा उठणार होती. मी सर्वांच्या आवडीचा ब्रेकफास्ट करायला घेतला.

कांदा चिरताना सहज माझी नजर खिडकी बाहेर गेली. तो नेमका बाहेरून काहीतरी पार्सल पॅक करून घेऊन येताना दिसला. आज रविवार…त्याची बायकोही आज आराम करत असणारर. त्याची माझी नजरानजर झाली. तो हसला अन् निघून गेला.

दहा वर्षांपूर्वी आम्ही अंधेरीतल्या या सोसायटीत फ्लॅट घेतला. सुंदर अन् मोठी सोसायटी आहे. बऱ्याच बिल्डिंगा आहेत. आमच्या बिल्डिंगच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याचा फ्लॅट आहे. मी तिसऱ्या माळ्यावर राहते. तो पाचव्या. सुरूवातीपासूनच मी त्याला बघतेय. कधी ‘हॅलो’ म्हणायला लागले ते आठवंत नाही पण आजतागायत ते सुरू आहे.

या दहा वर्षांच्या काळातही मला त्याचं नांव नाही कळलेलं. त्यालाही माझं नांव ठाऊक नसेल. खरं तर आमच्यात असं काही नातंही नाहीए की नांवं माहीत असावीत. पण इतक्या वर्षांत एवढं मात्र झालं आहे की आता आम्ही सहज म्हणून नाही तर जाणून बुजून एकमेकांकडे बघतो. त्याचा एकुलता एक मुलगा आता बारा वर्षांचा होतोय. नकळंतच मला त्याचं सगळं रूटीन माहीत झालंय.

माझ्या बेडरूमच्या खिडकीतून त्याची कोणत्या तरी खोलीची खिडकी दिसते. साधारण वर्षभरापूर्वीच तो त्या खिडकीपाश उभा असलेला अवचित दिसला तेव्हा मला कळलं की तो तिथं राहतो. मात्र तो खिडकीपाशी उभा आहे हे जाणवलं की मी तिकडं बघंतही नाही. आपण त्याच्या खिडकीकडे बघावं हे मला पटलंही नाही.

हो,पण एक खरं, तो रस्त्यावरून जाताना आवर्जून माझ्या खिडकीकडे बघंत जातो. जर मी तिथं असले तर आम्ही एकमेकांना हात हलवून अभिवादन करतो. कधीकधी मी सोसायटीच्या बागेत वॉक घ्यायला जाते तेव्हा तो त्याच्या बायको मुलासोबत बागेत आला तर बायकोच्या लक्षात येणार नाही अशा बेतानं हसून हॅलो म्हणतो. मला गंमत वाटते अन् हसायला येतं.

मला त्याचं सगळं रूटीन लक्षात आलंय. सकाळी सात वाजता तो मुलाला शाळेच्या बसवर सोडायला येतो. मग त्याची नजर माझ्या किचनच्या खिडकीवर रेंगाळते. नजरानजर झाली की तो गोड हसतो. साडे नऊला त्याची सुंदर बायको ऑफिसला जाते. दहाच्या सुमाराला तो निघतो. चारपर्यंत परत येतो अन् सोसायटीच्या डेकेअर सेंटरमधून मुलाला घेतो. सातपर्यंत त्याची बायको परत येते.

माझ्या बेडरूम अन् किचनच्या खिडकीतून आमच्या सोसायटीचा मेनरोड दिसतो. घरातले सगळे माझी चेष्टा करतात…अमित आणि मुलं म्हणतात, ‘‘सगळ्यांची बित्तबातमी असते तुला?’’

‘‘ममा, किती मस्त टाइमपास असतो तुझा. तुला घराबाहेर पडावंही लागत नाही. मनोरंजन अन् बातम्या तुला घर बसल्या मिळतात.’’ मुलांची कमेंट असते.

‘‘रिया, माझं आटोपलं आहे…’’ अमितनं हाक दिली.

‘‘हो आलेच,’’ आम्ही दोघं डायनिंग टेबलवर येतोय तोवर मुलंही आलीच. मोठी तनुश्री वीस वर्षांची. धाकटा राहुल १७ वर्षांचा.

रविवारची निवांत सकाळ. मनाजोगता नाश्ता सगळेच प्रसन्न मूडमध्ये होते. तनुनं म्हटलं, ‘‘आज आम्ही सगळे उमाच्या घरी पिक्चर बघणार आहोत. तिची आई आम्हाला लंच देते आहे.’’

‘‘कोण कोण आहेत?’’ मी विचारलं.

‘‘आमचा संपूर्ण ग्रुप आहे. मी, पल्लवी, निशा, टीना, रिद्धी, नीरज, विनय आणि संजय.’’

अमित म्हणाले, ‘‘नीरज, विनयला तर मी ओळखतो पण संजय कोण आहे?’’

‘‘आमचा नवा मित्र.’’

मला चिडवण्यासाठी अमितनं म्हटलं. ‘‘ठीक आहे, पण मुलांनो, तुम्हाला मम्मीचा मित्र ठाऊक आहे का?’’

राहुलनं दचकून विचारलं, ‘‘काय?’’

‘‘हो ना, तुझ्या मम्मीचाही एक मित्र आहे.’’

‘‘पप्पा, उगीच का चिडवताय मम्मीला?’’ तनु गुरगुरली.

‘‘आईचा कसा मित्र असेल?’’ राहुलनं म्हटलं.

अत्यंत भाबडा चेहरा करून अमितनं म्हटलं, ‘‘विचार तिलाच! मी खोटं कशाला बोलू?’’

आमच्या घरातलं वातावरण मोकळं आहे. मुलांशीही आम्ही मित्रत्त्वानं वागतो. एकमेकांची चेष्टामस्करी, एकमेकांची खेचणं असं सतत चालतं. त्यामुळे घरात हास्याची कारंजी सतत उसळंत असतात अन् वातावरण प्रसन्न राहतं.

तनुनं जरा गंभीरपणे विचारलं, ‘‘मम्मा, बाबा खोटं बोलताहेत ना?’’

का कुणास ठाऊक पण मी जरा बैचेन झाले. ‘‘नाही, खोटं तर नाहीए…’’

‘‘मॉम, काय चेष्टा करतेस? कोण आहे? काय नांव?’’

मी हळूच म्हणाले, ‘‘नांव मला नाही माहीत.’’ त्यावर तिघंही मोठ्यांदा हसले.

राहुलनं विचारलं, ‘‘मम्मा, तुझा मित्र राहतो कुठं?’’

‘‘नाही माहीत.’’ नकळंत मी खोटं बोलले. यावर तिघंही इतके हसले, इतके हसले की सांगता सोय नाही. तो समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो हे मी मुद्दामच नाही सांगितलं. अमितचं सगळं लक्ष मग कायम त्या बिल्डिंगकडे असेल. उगाचच स्वत:च्या जिवाला घोर लावून घेतील.

तनु म्हणाली, ‘‘बाबा तुम्ही उगीचच मस्करी करताय हं! मम्मीला तर काहीच ठाऊक नाहीए…मग कुणी तिचा मित्र कसा असेल?’’

‘‘अगं पोरी, तुझी आई त्याची मैत्रीण आहे. म्हणून तर त्याच्या हॅलोला हात हलवून उत्तर देत होती.’’

मी म्हटलं, ‘‘तुम्ही तिघांचे मित्र असू शकतात तर माझा मित्र असायला हरकत का असावी? आज तुमच्या बाबानं मला हात हलवताना बघितलं तेव्हापासून त्यांचा जीव थाऱ्यावर नाहीए. संशय घेताहेत ते…’’

‘‘अगं, पण आम्हाला आमच्या मित्रांची नांव अन् ठावठिकाणा माहीत असतो…’’ तिघं पुन्हा जोरात हसली.

यावर माझ्याकडे उत्तर नव्हतं…मग मी ही त्यांच्या हास्यात सामिल झाले. तेवढ्यात मोलकरीण आली आणि मी तिथून उठून स्वयंपाकघरात आले. तिला घासायची भांडी काढून द्यायला लागले. मुलं अन् अमित त्यांच्या कामाला लागले.

माझे हात कामं उरकंत होते पण मन मात्र विचार करत होतं. मला त्याचं नावं माहीत नाहीए पण त्याला जाता येताना बघणं हा माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता. काहीही न सांगता बोलता मला इतकं जाणवलंय की बायकोबरोबर असली तर तो हात हलवंत नाही. फक्त एक स्माइल देतो. मुलाला स्कूलबसमध्ये बसवलं की तो माझ्या किचनकडे नक्कीच बघतो. मला आता त्याच्या कारचा नंबर पाठ झालाय. मी दुरूनही त्याची कार ओळखू शकते.

त्याच्या पार्किंगची जागा मला ठाऊक आहे. खरं तर हे सगळं जरा विचित्र आहे पण हे जे काही ‘जरा’ आहे ना ते मला आवडतं. सार दिवस मला एक एनर्जी मिळते. हे ‘जरा’ कुणाचं नुकसानही करत नाहीए.

माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे. हे ‘जरा’ त्या प्रेमात बाधा आणंत नाही…म्हणजे या ‘जरा’मुळे तसा काहीच त्रास किंवा प्रॉब्लेम नाहीए. अमित आणि मुलांच्या बरोबर असताना या ‘जरा’चा अजिबात त्रास नसतो. आमचं आयुष्य मजेत जातंय.

तो फार देखणा आहे असं नाही. अमित खरोखरंच देखणे आहेत. त्याची बायको माझ्यापेक्षा सुंदर आहे तरीही हे जे काही ‘जरा’ आहे ते मला एक आनंद, एक आत्मविश्वास देतं की मला एक मित्र आहे. भलेही मला त्याचं किंवा मला त्याचं नांव माहीत नाही…पण म्हणून काय झालं? जे आहे ते खूप छान आहे…छानच आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें