कथा * डॉ. नीरजा श्रावस्ती
दाराची घंटी वाजली म्हणून भानूने दार उघडलं. दारात त्याची मामेबहीण पम्मी म्हणजे प्रमिला एका हातात स्ट्रोलर सूटकेस अन् दुसऱ्या हातात भली मोठी पर्स घेऊन हसतमुखाने उभी होती.
‘‘अगं, अचानक कशी आलीस?’’
‘‘आत तर येऊ दे, मग सांगते,’’ म्हणत पम्मी सरळ ड्रॉइंगरूममध्ये आली अन् बॅग एकीकडे ठेवून सोफ्यावर बसली.
मोठ्याने, जरा रागीट सुरात भानूने बायकोला हाक मारली, ‘‘घंटी वाजलेली ऐकली नाहीस का? कोण आलंय बघ.’’
भानूचा आवाजाचा टोन अन् बोलायची पद्धत प्रमिलाला खटकली. बायकोला असं बोलायचं?
‘‘मामामामी कसे आहेत?’’
‘‘मजेत! तुझ्या आवडीचे लाडू करून पाठवलेत आईने.’’ पम्मीने बॅगेतून लाडूचा डबा काढून भानूला दिला अन ती चप्पल काढून स्वयंपाकघरात गेली.
नमिताने कणिक तिंबून ठेवली होती अन् ती धुतलेले हात नॅपकीनला पुसत होती. पम्मीने सरळ तिला मिठीच मारली.
‘‘अरेच्चा? पम्मी? एकटीच आलीस?’’
‘‘हो, परवा माझा इथे एका कंपनीत इंटरव्ह्यू आहे. शिवाय पुढल्या आठवड्यात अजून दोन इंटरव्ह्यू आहेत.’’
‘‘मामामामी बरे आहेत?’’
‘‘एकदम मजेत! वहिनी, अगं तू आठ दिवस त्यांच्याकडे राहून काय आलीस, आईबाबा तुझ्या प्रेमातच पडले आहेत. प्रत्येक बाबतीत तुझंच उदाहरण देतात.
‘सून असावी तर नमितासारखी’ असं प्रत्येकाला सांगतात. काय जादू केली आहेस गं त्यांच्यावर?’’ हसून प्रमिला म्हणाली. तिच्या प्रसन्न हसण्याकडे नमिता बघतच राहिली.
‘‘आता चहा वगैरे ठेवशील की स्वत:चं कौतुकच ऐकत बसशील?’’ आत आलेला भानू खेकसला तशी नमिता पटकन् चहाकडे वळली.
‘‘पम्मी, तू फ्रेश हो, तोवर चहा नाश्ता होतोय.’’ भानूने म्हटलं. तशी खालच्या आवाजात त्याला दमात घेत पम्मीने म्हटलं, ‘‘दादा, हाऊ रूड यू आर. ही काय पद्धत झाली बायकोशी बोलायची? लग्नाला अजून दोन महिनेच होताहेत.’’
‘‘पायातली वहाण पायातच हवी,’’ म्हणत भानू निर्लज्ज हसला.
प्रमिला स्नान करून येतेय तोवर नमिताने चहाचा थर्मास अन् स्टफ टोस्ट आणि खेकडा भजी तयार ठेवली होती.
‘‘वहिनी, अगं, किती फास्ट कामं करतेस तू? माझी अंघोळ होईतो इतकं सगळं तयारही केलंस?’’ कौतुकाने पम्मीने म्हटलं. स्वत:च्या बशीत तिने दोन टोस्ट अन् दोन तीन भजी घेतली अन् टोमॅटो सॉसबरोबर चव घेत मनापासून खाऊ लागली. ‘‘व्वा! मस्तच आहे हं! दादा, तू घे ना...’’