कथा * भावना गोरे
‘‘आकाश, तू आपल्या तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीस, अरे लग्नाला दहा वर्षं झालीत, पण अजूनही मला चिंटू गोटूपेक्षा तुझ्याकडेच जास्त लक्ष द्यावं लागतंय.’’ घाईघाईनं आकाशचा जेवणाचा डबा भरता भरता कोमल बोलत होती. तेवढ्यात आकाशचा फोन वाजला अन् तो घाईनं जाऊ लागला.
‘‘अरे, निदान डबा तरी घे...’’ हातात डबा घेऊन कोमल त्याच्या मागे धावली.
टिफिन घेताच आकाशची गाडी फुर्रकन निघून गेली.
आज कोमलला जरा निवांतपणा मिळाला. तिनं चहा करून घेतला अन् ती चहा घ्यायला शांतपणे खुर्चीवर बसली. लग्नानंतर कोमलला पाच वर्षं मूलबाळ नव्हतं. त्या काळात सकाळचा चहा ती अन् आकाश एकत्रच घ्यायची.
शेजारी राहणाऱ्या शीला मावशींचा नवरा परदेशात होता. दोन्ही मुलंही मोठी होऊन परदेशी निघून गेलेली. पण ती मजेत एकटी राहायची. अभिमानानं म्हणायची, ‘‘जवळ नाहीएत तर काय झालं? पण दोन मुलगे आहेत ना माझे.’’
कोमलला स्वत:ला मूल नाही म्हणून फार वाईट वाटे. पण आकाश तिला धीर द्यायचा. ‘‘होतील गं, तुलाही दोन मुलगे होतील...डॉक्टरांनी सांगितलंय ना, होईल तुला बाळ...तू अजिबात काळजी करू नकोस.’’
त्याच्या प्रेमळ स्पर्शानं, आपुलकीच्या बोलण्यानं कोमलला खूप आधार वाटायचा. तिचं दु:ख कमी व्हायचं.
कोमलची शेजारीण दिव्या रेडिओवर नोकरी करत होती. तिची लहानगी मुलगी मिनी कोमलला खूप आवडायची. एकदा कोमल बाल्कनीत उभी होती. सहज नजर खाली गेली तर मिनी शाळेची बॅग घेऊन तिच्या घरासमोर बसून होती. घर बंद होतं. कोमलला वाईट वाटलं. तिनं मिनीला वर बोलावून घेतलं. तिला खायला प्यायला दिलं. मग दिव्याला फोन केला, तर समजलं की अचानक एक मीटिंग ठरली, त्यामुळे दिव्याला यायला उशीर होतोय. कोमलनं तिला म्हटलं, ‘‘मिनी माझ्या घरी मजेत आहे, काळजी करू नकोस.’’
‘‘दिव्या घरी परतल्यावर तिनं कोमलचे मनापासून आभार मानले.’’
‘‘यापुढे तू काळजी करू नकोस, तुला उशीर झालाच तर मी मिनीची काळजी घेईन.’’ कोमलनं म्हटलं.