कथा * पूनव आरडे
नजरभेटीचा खेळ, दोन डोळ्यांनी, दुसऱ्या दोन डोळ्यांशी शब्दांशिवाय साधलेला संवाद हा माझ्या मते जगातला सर्वाधिक सुंदर आणि रोमांचक खेळ आहे (निदान सुरूवातीला तरी असंच वाटतं). या खेळातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे चार डोळे हा खेळ खेळतात त्यांच्या पलीकडे कुणालाच त्याबद्दल काही शंका येत नाही. मीदेखील सुमारे एक वर्षांपूर्वी हा खेळ सुरू केला होता. इथं मुंबईत जुलै महिन्यात खूप पाऊस पडतो. आमच्या सोसायटीच्या बागेतल्या जॉगिंग ट्रेकवर पाण्यामुळे थोडं शेवाळं साचतं. तिथं पाय घसरण्याची भीति असते. खरं तर मला घराबाहेर म्हणजे सोसायटीच्या बाहेर रस्त्यावर जायला अजिबात आवडत नाही. तिथलं ट्रॅफिक, बसचे हॉर्न, लोकांचा गोंगाट मला नको असतो. म्हणूनच कोलाहलापासून दूर सोसायटीच्या बागेत फिरणं हा माझा नित्यक्रम असतो.
हं, तर पावसाल्यातल्याच एका दिवशी मी घरापासून वीसएक मिनिटांच्या अंतरावर असेलल्या दुसऱ्या मोठ्या पार्कात सकाळच्या ब्रिस्क वॉकसाठी जात होते. तिथंच वाटेत तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. अवचितच आम्ही एकमेकांकडे बघितलं. त्या क्षणार्धाच्या नजरभेटीत जे घडायचं, ते घडून चुकलं होतं. मला वाटतं, हा डोळ्यांचाच दोष असावा. कुणाचे डोळे कुणाच्या डोळ्याला भिडले तर मग त्यावर काही उपाय नाहीए अन् मला वाटतं हाच चार डोळ्यांच्या नजरभेटीचा खेळ आहे.
हं! तर, जेव्हा आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं तेव्हा काहीतरी घडलं. काय घडलं हे सांगणं, त्या क्षणाचं वर्णन करणं, त्या भावनांना शब्दरूप देणं अवघड आहे. पण इतकंच आठवतं की तो सगळा दिवस फारच मस्त गेला. घरी परतताना वाहनांचे कर्कश्श हॉर्नदेखील जाणवले नाहीत. रस्त्यावरच्या कोलाहलानं वैताग आणला नाही. सकाळी सात वाजता मी हवेत उडंत अगदी आनंदानं गाणं गुणगुणत घरी आले.
२२ वर्षांची माझी मुलगी कोमल आठ वाजता कॉलेजला जाते. नवरा नऊ वाजता ऑफिसला जातो. मी रोजच्याप्रमाणे कोमलला हाक मारून किचनमध्ये शिरले. भराभर सकाळची कामं आवरली. दोघं निघून गेल्यावर सगळा दिवस मला खूप उत्साह वाटत होता. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा वॉकसाठी बाहेर पडले. पुन्हा त्याच जागी तो आपल्या मुलाला सायकल चालवायला शिकवत होता. आमची नजरानजर झाली. मनात, देहात एक गोड शिरशिरी जाणवून गेली. नकळत उत्साह संचारला...शरीर जणू पिसासारखं हलकं झालं होतं. नंतर पुढल्या तीनचार दिवसात मला अगदी स्पष्टपणे लक्षात आलं की तो माझा वाट बघतो. पुन्हा:पुन्हा वळून तो त्या वळणाकडे बघत असतो जिथून मी त्या रस्त्यावर येणार असते. मी अगदी दुरूनच त्याला पुन्हा:पुन्हा बघताना पकडलं होतं.