कथा * रमणी मोटे
हमीसारखंच कार्तिक अन् रोहिणीच्या वादाचं पर्यवसान भांडणात झालं. भांडण थांबवण्याचा उपाय म्हणून कार्तिक गप्प बसला अन् आपल्या खोलीत लॅपटॉप उघडून काम करू लागला.
रोहिणी खूपच उत्तेजित झालेली होती. भांडणाची खुमखुमी मिटलेली नव्हती. त्याच अवस्थेत तिनं काही वेळ हॉलमध्ये फेऱ्या मारल्या अन् एकाएकी ती घराबाहेर पडली.
गेटमधून बाहेर पडतेय तोवर वॉचमन धावत आला, ‘‘मॅडम, कुठं बाहेर निघालात. टॅक्सी मागवू का?’’
‘‘नको, मी जवळच जाऊन येतेय,’’ रोहिणीनं म्हटलं.
रात्रीचे दहा वाजले होते. पण कुलाब्याच्या रस्त्यांवर अजूनही भरपूर वर्दळ होती. दुकानंही उघडी होती. लोक खरेदी करत होते. हॉटेल्स अन् स्वीटमार्टमधूनही लोक गर्दी करून होते.
रोहिणीच्या मनात खळबळ माजली होती. हल्ली जेव्हा जेव्हा रोहिणीचं कार्तिकशी भांडण व्हायचं, तेव्हा विषय नेमका कार्तिकच्या कुटुंबावरच येऊन थांबायचा. कार्तिक त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मोठ्या तिघी बहिणी होत्या. आईवडिलांचा तो लाडका होता तसाच तिघी बहिणींचाही लाडका होता. ही पाच माणसं सतत त्याच्या कौतुकात मग्न असायची.
अर्थात त्याबद्दल रोहिणीची काही तक्रार नव्हती. पण कधीकधी तिला वाटायचं की तिचा नवरा अजूनही अगदी लहानसं बाळ आहे. तो स्वत:च्या मनानं काहीच निर्णय घेऊ शकत नाही. दिवसाकाठी एकदा तरी तो आई आणि बहिणींशी बोलतोच. त्याशिवाय त्याला चैन पडत नाही.
या गोष्टीवरून रोहिणी चिडते तेव्हा तो म्हणतो ‘‘बाबा गेल्यावर मीच त्यांचा आधार आहे. माझ्या जन्मापासून आई आजारी आहे. तिघी बहिणींनीच मला वाढवलं आहे. वडील गेल्यावर परिस्थिती फार बिकट होती. आईनं कसे ते दिवस काढले तिलाच ठाऊक! त्या ऋणातच राहतो मी.’’
तो असा भावनाविवश झाला की रोहिणी गप्प बसते. पण तिला एक गोष्ट समजत नाही...मुलांचं पालनपोषण, त्यांना वाढवणं हे आईबापांचं कर्तव्यच असतं. त्यांनी ते केलं तर त्यात त्यांचे उपकार कसे ठरतात? तिच्याही आईवडिलांनी तिला वाढवलंच ना? पण ती वाद घालत नाही. एरवी तिची कार्तिकबद्दल काहीच तक्रार नाही. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. कार्तिकही तिच्यावर जीव टाकतो. तो अत्यंत सज्जन माणूस आहे. भरपूर कमवतो. पैशाली तोटा नाहीए. पण त्यांचं प्रेम इतर लोकांमध्ये विभागलं जातंय हेच तिचं दु:ख आहे.