कथा * गरिमा पारवे
‘‘माया , तू चढ बरं आधी...नेहा, अदिलला माझ्याकडे दे, अगं, अगं...साभांळून,’’ गाडी सुटायला केवळ पाच मिनिटं उरलेली...सीमानं आपलं सामान व्यवस्थित लावून पर्समधलं मासिक हातात घेतलंच होतं तेवढ्यात डब्याच्या दारातून येणाऱ्या त्या आवाजानं अगदी अभावितपणे तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली.
हाच तो आवाज जो सीमाला कधी काळी फार आवडत होता. आवाजात गांभीर्य होतंच पण एक मधाळ, मादक अशी किनार होती. इतकी वर्षं उलटली तरी सीमा त्या आवाजाच्या आकर्षणातून मुक्त झाली नव्हती. अजूनही कधी तरी वाटायचं की अचानक हा आवाज तिला साद घालेल आणि जे तिला त्यावेळी ऐकावसं वाटलं होतं ते सांगेल.
आज किती तरी वर्षांनी सीमानं तो आवाज ऐकला होता, पण त्या आवाजात त्यावेळी असलेला सच्चेपणा अन् तो मधाळ गोडवा नाहिसा झाला होता. आवाजात सच्चेपणाऐवजी त्रागा अन् गोडव्याऐवजी कोरडी खरखर जाणवंत होती. तो कधी हमालावर डाफरत होता, बायकोवर खेकसत होता, मुलांवर ओरडत होता...आयुष्यातल्या काटेरी वाटेवरून चालताना असं घडतंच का? की त्या दोघांमध्ये त्या काही निर्माण झालेल्या दुराव्यामुळे असं घडलं होतं?
बरेचदा दोन व्यक्तींमधलं नातं अबोलच राहतं. अंतर कमी होत नाही पण हृदयातली कळही जिरत नाही. सीमाचं अन् त्या आवाजाच्या मालकाचं म्हणजे नवनीतचं नातं असंच काहीसं होतं. सीमाला फारच उत्सुकता होती त्याला एकदा बघायची. दहा बारा वर्षं उलटली होती. ती सीटवरून उठली अन् दरवाज्याकडे बघू लागली. एक माणूस आपल्या बायकोमुलांसह येताना दिसला.
सीमानं लक्षपूर्वक बघितलं...नवनीतचे डोळे फक्त पूर्वीचे होते. पण तो मूळ वयापेक्षा खूपच वयस्कर दिसत होता. पूर्वीचे दाट केस जाऊन बऱ्यापैकी टक्कल पडलं होतं. शरीरावर चरबीचे थर साठले होते. ढेरपोट्याच दिसत होता. डोळ्यातले पूर्वीचे खेळकर मिश्किल भाव नाहीसे होऊन त्या जागी गर्व अन् धूर्तता विराजमान झाली होती. कॉलेजच्या दिवसांतला हाच का तो हॅन्डसम नवनीत?