* नम्रता पवार
मुंबईत बऱ्याच महिला स्कूटर चालवतात. परंतु एखादी बाई, बाईक वा बुलेट चालवताना दिसली की लोकं आपोआप माना वळवून पाहतात आणि त्या नजरांमध्ये कुतूहल दिसते की, अरे व्वा, बाई बुलेट चालवतेय. अगदी आपल्याकडे गुढी पाडव्याच्या ज्या शोभायात्रा असतात त्यामध्ये देखील आता अनेक महिला नऊवारी साडी नेसून आपल्याला बुलेटवर स्वार होताना दिसतात आणि हा खरोखरंच एक कुतुहलाचा, कौतुकाचा विषय असतो. मात्र त्याचवेळी यांना कोणी बरं शिकवलं असेल एक तर नवरा, भाऊ किंवा वडिलांनीच शिकवलं असेल हाच विचार मनात येतो आणि जेव्हा मी याबद्दलची माहिती घेतली तेव्हा एक नाव समोर आलं ते म्हणजे ‘फर्स्ट गियर मोटर सायकल ड्रायव्हिंग स्कूल’च्या संचालिका शुभांगी मांजरेकर यांचं. चला तर त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया...
तुमच्या ड्रायव्हिंग स्कूलचा प्रवास कसा सुरू झाला?
२०१४ पासून मी प्रोफेशनली शिकवायला सुरुवात केली. त्या अगोदर मी शिकवत होते, परंतु ते फक्त ऑफिसमधील सहकारी आणि मैत्रिणींपुरतं मर्यादित होतं. मी स्वत: २०१४ पासून लॉन्ग डिस्टन्स ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली. तेव्हा मला रिअलाईज झालं की अनेक महिलांना दुचाकी चालवायला शिकायची असते, परंतु शिकवायला कोणी नसतं. बेसिक हंड्रेड सीसी मोटरसायकल, बुलेट, स्कुटी मी शिकवते. माझं ड्रायव्हिंग स्कूल हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं पहिलं ड्रायव्हिंग स्कूल आहे. मात्र आता महिलांसोबतच मी पुरुषांनादेखील दुचाकी चालवायला शिकवते.
जेव्हा तुमच्याकडे एखादी स्त्री शिकायला येते तेव्हा तिच्याकडे पाहून सर्वप्रथम तुमच्या मनात काय येतं?
अनेक महिलांना दुचाकी चालवायला शिकायची असते, परंतु घरी त्यांना कोणी शिकवणारं नसतं किंवा तेवढा वेळही नसतो. माझ्याकडे सुरुवातीला ज्या महिला येतात, अगोदर त्यांच्या मनात एक थोडा संकोच असतो, भीती असते, कुतूहल असतं. काहींना त्यांच्या हाईटबद्दल शंका असते, माझी हाईट कमी आहे मी शिकू शकेन का? वजनाबद्दल प्रॉब्लेम असतो, त्यामुळे प्रत्येकीला मोटिवेट करून शिकवावं लागतं. बरेचदा त्यांना असं वाटत असतं की आपण घरातील छोट्याछोट्या गोष्टींसाठी घरातील पुरुषावर अवलंबून राहता कामा नये म्हणजे अगदी मुलांना शाळेत, क्लासेसला सोडायला जायचं असेल किंवा मार्केटमध्ये जायचं असेल.





