* गरिमा पंकज
दिवाळीत घरोघरी दिवे लावले जातात. नातलगांना विविध प्रकारची मिठाई भेट दिली जाते. पण तुम्ही कधी दुसऱ्यांच्या घरातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करून पाहिला आहे? दिवाळीच्या दिवशी असे करून जो आनंद मिळतो त्याचाही अनुभव घेऊन पाहा.
मिळून साजरी करा दिवाळी
सद्यस्थितीत कितीतरी लोक महानगराच्या गर्दीतही एकटे, एकाकी राहतात. दिवाळीत त्यांच्यासोबत आनंद साजरा करणारे कुणीच नसते. कुठे वृद्ध आईवडील एकटे राहतात तर कुठे तरुण मुले-मुली शिक्षण किंवा नोकरीनिमित्त घरापासून दूर एकटे राहतात. काही असेही असतात, जे लग्न न केल्यामुळे एकटे राहतात तर कुणी जोडीदाराच्या मृत्यूमुळे एकटे पडतात.
तसे तर प्रत्येक सोसायटी, ऑफिस किंवा इन्स्टिट्यूटमध्ये दिवाळीचा आनंद दिवाळीच्या एक दिवस आधीच साजरा केला जातो. पण महत्त्वाचे क्षण ते असतात, जेव्हा कुणी दिवाळीच्या संध्याकाळी आपल्या घरात एकाकी असतो. त्यावेळी त्याच्यासोबत इतर कुणी दिवाळी साजरी करणारा नसतो.
अशावेळी आपली जबाबदारी असते की आपण अशा एकाकी लोकांच्या जीवनात आनंदाचा दीप उजळवण्याचा प्रयत्न करायचा. तसेही सध्या एकत्र कुटुंब पद्धतीच्या अभावामुळे लोक एकटेच आपल्या छोटयाशा कुटुंबासह दिवाळी साजरी करतात. अशावेळी दोन-तीन कुटुंबातील लोक सण साजरा करण्यासाठी एकत्र आले तर निश्चितच दिवाळीचा आनंद द्विगुणित होईल.
तुम्ही तुमच्या आजूबाजूला एकटया राहणाऱ्या वृद्धांना किंवा तरुणांना आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आमंत्रण देऊ शकता. त्यांच्यासह मिळून दिवे लावा. फटाके वाजवा आणि एकमेकांना मिठाई भरवा.
कुणाच्या घरी दिवाळी साजरी करायला येणाऱ्यानेही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ज्याने तुम्हाला आमंत्रण दिले आहे त्याच्या कुटुंबासाठी मिठाई, फटाके घेऊन जा. त्याचे घर सजवालया मदत करा. त्याच्या मुलांना आपल्या घरी घेऊन या, जेणेकरून दिवाळीची मजा आणि रंगत तुम्ही तुमच्या घरातही अनुभवू शकाल.
वृद्धांसोबत मजा
पत्रकार प्रियाने सांगितले ‘‘जेव्हा मी नोकरीसाठी पहिल्यांदाच दिल्लीत आले होते तेव्हा ३ वर्षं एनडीएमसीच्या एका हॉस्टेलमध्ये राहत होते. तेथेच बाजूला एनडीएमसीचा वृद्धाश्रम होता जिथे वृद्ध, एकाकी महिला राहत होत्या. मी अनेकदा त्यांच्याकडे जाऊन गप्पा मारायचे, त्यांच्यासोबत टीव्ही पाहायचे, खाण्यापिण्याचे पदार्थ शेअर करायचे. अनेक वृद्ध महिलांशी माझे जिव्हाळयाचे नाते निर्माण झाले होते. गेल्या दिवाळीत मी माझे घर सजवत होते., तेव्हा अचानक त्या वृद्ध महिलांची आठवण झाली. मग काय, मी सजावटीचे काही सामान, फटाके आणि मिठाई घेऊन तेथे पोहोचली. मला पाहाताच त्यांचा उदास चेहरा आनंदाने फुलला. वृद्धाश्रमाचा बाहेरील भाग मी खूप चांगल्याप्रकारे सजवला. त्यांना मिठाई भरवली. त्यांच्यासोबत फटाके वाजवले. खरंच खूप मजा आली.