* मोनिका अग्रवाल
लग्न झाल्यापासून नेहा पती रॉकीला इतर कुणासोबत कुठेही जाऊ देत नसे. रॉकीने कुणाशीही बोललेले तिला आवडत नसे. ती नाराज होत असे. माझ्यावर संशय का घेतेस, असे रॉकीने विचारल्यावर माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे ती हळवी होऊन सांगत असे.
काही कालावधी लोटल्यानंतर तर अशी परिस्थिती निर्माण झाली की नेहा रोज दर दहा मिनिटांनी रॉकीच्या ऑफिसमध्ये फोन करून तो काय करतोय याची विचारपूस करू लागली. कधी घरी येताना माझ्यासाठी माझ्या आवडीचे काहीतरी खरेदी करून आण, असे सांगू लागली. मात्र जेव्हा तो तिच्यासाठी काहीतरी खरेदी करून आणत असे तेव्हा तुझ्यासोबत खरेदीसाठी कोण गेली होती, असे ती संशयाने विचारत असे. काही दिवसांनंतर तर ती सर्व काम सोडून रॉकी काय करतोय, कुठे जातोय, याच्यावरच बारकाईने लक्ष ठेवू लागली. तिच्या अशा संशयी वृत्तीमुळे रॉकीसोबतच त्याचे कुटुंबही त्रासून गेले.
रॉकीचे कामातील लक्ष उडाले. त्याने चांगला जम बसवलेल्या व्यवसायालाही याची आर्थिक झळ बसली. तो आपल्या मित्र परिवारापासून दूर होत गेला होता. नेहाच्या अशा संशयी वागण्यामुळे रॉकी घराबोहर जाऊन नातेवाईकांनाही भेटू शकत नव्हता. संशय आणि होणारे वाद यामुळे दोन कुटुंबातील प्रेमळ नात्याची वीण उसवत गेली. रॉकीने नेहाला सोडून दिले. हे कसले प्रेम जे नेहाच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे संशयाच्या अग्निकुंडात स्वाहा झाले आणि जन्मोजन्मासाठी बांधलेली लग्नगाठ कायमची सुटली.
नव्या नात्यातील गुंता
संशोधनानुसार जेव्हा दोन जीव एकत्र येऊन नव्या नात्याची सुरुवात करतात, तेव्हा प्रारंभी एकमेकांना समजून घेण्यात त्यांना बरीच कसरत करावी लागते. यात अपयश आले तर भविष्यात घटस्फोटाची शक्यता निर्माण होते. मात्र, अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वाढत्या वयात घटस्फोट घेणे मनाला पटत नाही.
मनमिळावू स्वभावाचा राघव हा एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली, तेव्हा मंजिरी त्याला तितकीशी आवडली नव्हती. मात्र घरच्यांच्या आनंदासाठी त्याने लग्नाला होकार दिला. घरच्यांनी त्याच्यासाठी देखणी, कुटुंबवत्सल मुलगी पसंत केली होती जेणेकरून ती राघवच्या प्रत्येक सुख-दु:खात त्याला प्रेमळ साथ देईल.