* पारुल भटनागर
सुट्टी म्हणजे विश्रांती आणि खूप मजा, पण कधी कधी आपल्या एका छोटयाशा चुकीमुळे, विश्रांती ऐवजी, सुट्टी आपल्यासाठी तणावाचे कारण बनते.
आता तुम्ही विचार कराल की, हे असे कसे घडू शकते? यामागचे कारण असे की, आपण सुट्टीत फिरायला जायचे ठिकाण आपल्या आवडीनुसार निवडतो. ती जागा मुलांसाठी योग्य आहे का? मुलांना मजा करण्यासाठी तिथे काही आहे का? याचा विचार करत नाही. या सगळयाचा विचार न करता आपण तिथे जातो तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की, आपण केलेले नियोजन फसते आणि मुले तसेच आपणही तिथे मजा करू शकत नाही. तिथे गेल्यावर आपला वेळ मुलांना सांभाळण्यातच जातो, कारण ती जागा मुलांसाठी अनुकूल नसते. त्यामुळे यावेळी मुलांसोबत सुट्टीचे नियोजन करताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या मुलांसोबत या ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता :
गोवा
तुम्ही थंडीपासून दूर अशी जागा शोधत आहात का, जी सुंदर आहे? जर तुम्हाला थंडीपासून दूर राहायचे असेल तर गोवा हे सर्वात चांगले ठिकाण आहे, जे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांना आकर्षित करते. समुद्र किनाऱ्यावर लाटांमध्ये खेळण्याचा आनंद लुटण्यासोबतच, तुम्ही मुलांना पाण्यातील खेळ खेळायला लावू शकता. इथे बागा, समुद्र किनारे आहेत जिथे पाण्यातील खेळांचा आनंद घेण्यासोबतच तुम्ही सूर्य स्नानाचाही आनंद घेऊ शकता.
येथे एक स्नो पार्क म्हणजे बर्फाचे उद्यानदेखील आहे, जिथे तुमची मुलं दुप्पट मजा घेऊ शकतात. येथे येऊन तुम्ही राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग, बाइकिंग, बनाना राईड, बलून राईड यांसारख्या मजेदार खेळांचा आनंद घेऊ शकता.
लॅन्सडाउन, उत्तराखंड
उत्तराखंड हे निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. लॅन्सडाउन हे उत्तराखंडमधील एक लहान शहर आहे. हे ठिकाण हिरवाईने नटलेले असून येथील डोंगरातून वाहणारऱ्या नद्या आणि धबधबे मनाला वेगळीच शांतता देतात. हे ठिकाण विश्रांतीसाठी तसेच मजा करण्यासाठी अतिशय योग्य असून ते ट्रेकिंग प्रेमींना भुरळ घालते.