* गरिमा पंकज
32 वर्षांच्या अन्वेषाने मनालीला एकटीने जायचे ठरवले तेव्हा घरात एकच खळबळ उडाली. तिच्या सासरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. अन्वेषा स्वत: थोडी गोंधळली होती. सुमारे १० वर्षांपूर्वी अविवाहित असताना ती एकटी जयपूरला गेली होती आणि तिने सहलीचा पुरेपूर आनंद लुटला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिचे लग्न झाले आणि नंतर तिला ही संधी कधीच मिळाली नाही, कारण तिला जिथे कुठे जायचे असायचे तिथे पती राहुल सोबत असायचा.
पण, या काळात अन्वेषाला स्वत:वरचा आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवू लागले होते. गृहिणी झाल्यासारखे तिला वाटत होते, प्रत्यक्षात लहानपणापासूनच तिने पुढे जाण्याचे स्वप्न पाहिले होते. आता तिचा मुलगा ८ वर्षांचा झाला होता, त्यामुळे ती निश्चिंत झाली होती. गेल्या वर्षीच तिने स्वत:चे करियर करण्याचा विचार केला आणि घरच्यांची परवानगी घेऊन नोकरीत रुजू झाली. यामुळे तिला स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाल्यासारखे वाटले.
आता तिला कार्यालयीन कामासाठी मनालीला जायचे होते. तिने विचार केला की, तिथे गेल्यावर १-२ दिवस फिरून घ्यायचे. राहुल त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे सोबत येऊ शकत नव्हता, त्यामुळे सासरचे तिला मनालीला एकटीला पाठवायला तयार नव्हते. अन्वेषाने राहुलला फोनवरून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. राहुलला तिला दुखवायचे नव्हते. अन्वेषा खूप हुशार, सुशिक्षित आहे, ती स्वत:ची काळजी सहज घेईल, हे त्याला माहीत होते.
स्वप्नांचा पाठलाग
राहुल घरी येताच त्याच्या आई-वडिलांनी हा विषय काढला. तेव्हा त्याने फेसबुकवर एका नातेवाईकाच्या मुलीचा फोटो त्यांना दाखवला आणि म्हणाला, ‘‘बाबा ही सुरभी, नीलम काकूंची मुलगी, १०-१२ वर्षांची असताना ती आपल्या घरी आली होती, आठवतंय का?’’
‘‘अरे वा, मुलगी एवढी मोठी झाली? आणि कुठे फिरतेय?’’
‘‘आई, ती एकटीच लंडनला गेली आहे. आज तिसरा दिवस. एकटयाने प्रवासाचा आनंद घेताना तिच्या चेहऱ्यावर किती आत्मविश्वास आहे ते बघ. अन्वेषानेही तिच्या आयुष्यात हा थरार अनुभवावा असं तुला वाटत नाही का?’’