* गरिमा पंकज
पूर्वी महिला रुढीवादी परंपरेचा प्रभाव असल्यामुळे इंटिमेट हायजीनबाबत बोलायला लाजत. याचे दुष्परिणाम त्यांनाच सहन करावे लागत. त्यांना वेगवेगळया इन्फेक्शनचा अर्थात संसर्गाचा सामना करावा लागत असे. आता मात्र जग बदलले आहे. मुली असो किंवा महिला, त्यांना या विषयावरची सर्व माहिती हवी असते, जेणेकरून त्या निरोगी राहतील.
इंटिमेट हायजीन म्हणजे काय?
इंटिमेट हायजीन म्हणजे अंतर्गत स्वछता. हा पर्सनल अर्थात खासगी हायजीनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. महिलांसाठी अंतर्गत स्वछता राखणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे त्यांना स्वच्छ आणि प्रसन्न वाटते, शिवाय खाज, किटाणूंचा संसर्ग किंवा यूटीआयसारख्या गंभीर आजारांपासूनही रक्षण होते.
मात्र या भागावर साबणाचा जास्त वापर केल्यास तेथील त्वचा रुक्ष होते. जळजळ होऊ लागते. पीएच बॅलन्स (३-५ ते ४.५) बिघडू शकतो. शरीराच्या या भागातील टिश्यूज खूपच संवेदनशील असतात. त्यामुळेच या भागाची जास्त स्वछता किंवा कमी स्वछता, या दोन्हीमुळे समस्या निर्माण होऊ शकते.
इंटिमेट हायजीन राखण्याची योग्य पद्धत
* प्रत्येक महिलेला दिवसातून कमीत कमी दोनदा शरीरातील अंतर्गत भागाची हळूवारपणे स्वच्छता करायला हवी. या भागातील त्वचेवर अति गरम पाणी, रसायनांचा अति वापर केलेला साबण आदींचा वापर करू नका. नेहमी सौम्य साबणाचाच वापर करा.
* ज्या पाण्याचा वापर करणार असाल ते पाणी खूप गरम किंवा थंड असता कामा नये. स्वच्छ, कोमट पाण्याचाच वापर करा.
* अंतर्गत भाग नेहमीच हळूवारपणे धुवा किंवा पुसा. जर तुम्ही टॉवेलने तो भाग जोरात घासून पुसला तर त्या भागातील संवेदनशील टिश्यूजचे नुकसान होऊ शकते.
* या भागातील त्वचा नेहमी सुकी असावी.
* अंतर्गत भागातील स्वच्छतेसाठी सुगंधी रसायनांचा वापर केलेले कुठलेच उत्पादन वापरू नका, कारण ही रसायने योनीच्या आरोग्यासाठी घातक असतात.
* आपल्या अंतर्गत कपडयांच्या स्वछतेकडेही लक्ष द्या. ते चांगल्या साबणाने धुवून उन्हात सुकवा, जेणेकरून यातील किटाणू नष्ट होतील.
* पिरिएड्सवेळी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. प्रत्येक ३-४ तासांनंतर सॅनिटरी पॅड बदला.