कार पामिस्ट्री आणि वधूची निवड

मिश्किली * सुदर्शन सोनी

पूर्वी लग्नं जुळवताना पत्रिका अन् कुंडलीचं भारीच प्रस्थ होतं. शास्त्री, पंडित, गुरूजी वगैरे मंडळी मुलाची अन् मुलीची पत्रिका तपासायचे, अभ्यासायचे अन् मग त्यांचे गुण कितपत जुळतात ते बघायचे. जास्तीत जास्त गुण जुळले तर वर पक्ष आणि वधू पक्ष दोन्हीकडे आनंदी आनंद साजरा व्हायचा. लग्न ठरायचं. मग साक्ष गंध, साखरपुडा, श्रीमंती, लग्न वगैरे वगैरे…खरं तर पत्रिकेत चौतीस, छत्तीस गुण जुळले म्हणून ते लग्न अगदी शंभर टक्के यशस्वी होईल असं काही नसतं. प्रत्येकातच काही गुण, काही अवगुण असतात. त्यामुळे पतीपत्नीत मतभेद होतात, भांडणं होतात, मनभेद झाले तर एकमेकांबद्दल घृणा, तिरस्कार निर्माण होऊन संसाराचे तीन तेरा होतात.

पण हल्ली बरं का, पत्रिका बघून गुण जुळवण्याचं प्रस्थ थोडं कमी झालंय. आता इतर बरंच काही बघतात. मुळात मुलीचं शिक्षण अन् तिचं कमवतं असणं, ती किती कमवते याला महत्त्व आलंय. मुलांमध्येही हेच बघतात, मग इतर काही अवगुण, दोष याकडे दुर्लक्ष करून कमवण्यालाच महत्त्व आणि पसंती दिली जाते. तरीही बेबनाव, मतभेद, मनभेद होतातच. आईबापही त्रस्त असतात की असा मुलगा किंवा मुलगी कशी मिळवावी, जी आयुष्यभर घरात टिकून राहील. मधेच सोडून निघून जाणार नाही. आम्हाला तर वाटतं, तो काळ दूर नाही जेव्हा अशा संसारात टिकून राहणाऱ्या लोकांचा जाहीर सत्कार केला जाईल.

गंगूरामकडे एक लेटेस्ट टेक्निक आहे. बऱ्याच अभ्यासानंतर ती त्यानं विकसित केलेय. तसं तर माणसाला पारखायला त्याचं व्यक्तिमत्त्व जाणून घ्यायला हस्ताक्षर, जन्मतारीख, फूल हुंगून वगैरे अनेक प्रकारे परीक्षा करण्याच्या पद्धती आहेत. पण गंगूनं शोधलेली ही टेक्निक  खूपच यशस्वी ठरते आहे. वधू-वराला व वर-वधूला पसंत करत आहे.

या नव्या टेक्निकमध्ये तुम्ही फक्त प्रॉस्पेक्टिव वधूला गाडी चालवत असताना ऑबझर्व्ह करायचं आहे की ती कार कशी चालवते? त्यावेळी कशी वागते. यामागेही एक कथा आहे. एका सकाळी गंगू मॉर्निंगवॉकला निघाला होता. समोरून एक कार आली. आता कार येणं यात विशेष ते काय? पण विशेष होतंच. कारण ती कार कुणी खडूस, कठोर हातांचा पुरूष चालवत नव्हता, तर एक कोमलांगी सुंदरी, तरूणी चालवत होती.

तर समोरून एक कार येत होती. रस्ता खूपच अरूंद होता. पण त्या सुंदरीनं आपली गाडी रस्त्याच्या खाली घेतली नाही तर समोरच्या गाडीला खाली उतरायला भाग पाडलं…बस्स! तेव्हापासून गंगूची ट्यूब पेटली. अगदी साक्षात्कारच झाला म्हणाना. आता गंगूनं चक्क अभ्यासच सुरू केला. विषय: मुली कोणत्या परिस्थितीत, कार कशी चालवतात. अर्थात् त्यासाठी त्याला खूपच कष्ट करावे लागले. अनेक कारचा पाठलाग करावा लागला. काही वेळा तर मार खाण्यापर्यंत वेळ आली. पण, सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर गंगूला काही गोष्टी लक्षात आल्या. त्या त्यानं ‘कार पामिस्ट्री’ या नव्या विषयांअंतर्गत तुमच्या आमच्या ज्ञानवृद्धीसाठी प्रसिद्ध केल्या आहेत. तेव्हा वाचकहो, वाचाच!

पहिलाच मुद्दा हा की जर अशा मुलीला तुम्ही सून म्हणून घरात आणणार असाल तर लक्षात घ्या, ही पॅट्रीआर्कल नाहीए, मॅट्रिआर्कल आहे. म्हणजे मातृसत्ताक पद्धतीवर ठाम विश्वास ठेवणारी आहे. तुमच्या मुलावर ही कायम दबाव आणेल. त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याची किल्ली कायम गाडीच्या किल्लीप्रमाणेच तिच्या पर्समध्ये अथवा खिशात राहील.

दुसरा मुद्दा जर कार ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. मागे तर कार आहेतच, पुढेही अर्धा किलोमीटरपर्यंत कार्सची रांग लागली आहे, अन् ही बया कर्कश्श आवाजात सतत आपल्या गाडीचा हॉर्न वाजवत असेल तर तुम्हाला वॉर्न करतो की ही फार कडक स्वभावाची पोरगी असेल. ती अजिबात वाट बघू शकत नाही. तिच्यात पेशन्स नाहीत. तिला सगळंच ताबडतोब हवंय.

तिसरा मुद्दा कारचा गेअर बदलताना ती कारला हादरा देत असेल तर या मुलीत आत्मविश्वासाची कमतरता आहे. तिचा आत्मविश्वास कमी पडतो हे मानून चाला. काही केलं तर केलं…नाही तर नाही. पण त्याचवेळी ती स्वत:ला गावातील सर्वात उत्तम कारड्रायव्हर मानत असते. अशी मुलगी जर सून म्हणून घरात आली आणि तिनं स्वयंपाकघरात पदार्थ तयार केला तर मत देताना जरा विचार करून द्या. फार परखड मत देऊ नका. तिला राग येईल.

चौथा मुद्दा थोड्याच अंतरावर ट्रफिक खूप आहे किंवा वळण आहे वा स्पीड ब्रेकर आहे हे माहीत असूनही कार हळू चालवत नाही. याउलट भरधाव वेगानं गाडी चालवत असेल तर सेव्ह एनर्जी या सिद्धांतावर ती विश्वास ठेवत नाही हे जाणून घ्या. तिला सून म्हणून घरात आणलं तर पंखा, दिवा, एसी, वॉशिंग मशीन वगैरे बंद करण्यासाठी एक नोकर घरात घेऊन यावा लागेल. ते परवडत नसेल तर तुम्हाला किंवा तुमच्या लाडक्याला हे काम करावं लागेल ही खूणगाठ मनाशी बांधून घ्या. वीज महामंडळात नोकरी असेल तर उत्तमच!

पाचवा मुद्दा कार मागे घेताना जर मुलगी मागे वळून न बघता गाडी रिव्हर्स करत असेल तर ती अत्यंत बेजबाबदार आहे असं मानायला हरकत नाही. कारण तिची विचारसरणी अशी आहे की प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो तेव्हा तिनं मागे बघण्यापेक्षा इतरांनीच पुढे अन् सगळीकडे बघत आपला जीव वाचवणं हे अधिक योग्य ठरतं. अशी मुलगी घरातल्या कुणाचीही काळजी घेणार नाही. घरात एकच अंड आणि दोनच ब्रेड स्लाइस असतील तर ती पटकन् त्या खाऊन मोकळी होईल. कारण ज्याला गरज असेल तो जाईल अन् पुन्हा घेऊन येईल.

सहावा मुद्दा अशी मुलगी जी सतत जोरातच गाडी हाणत असते, तर ती हायपर असते. गल्ली असो, रूंद रस्ता असो, हायवे असो की लोवे असो हिचा स्पीड कायम हायच असतो. तिला सतत ताणात राहण्याची सवय असते. टेन्स पर्सनॉलिटीला, शांतपणे, संयमानं कोणतंही काम करता येत नाही अन् टेन्शनमध्ये असणं हीच फॅशन असते असं मानणारी ही मुलगी असेल.

सातवा मुद्दा जर कार चालवताना मुलगी समोर खड्डा दिसत असतानाही कार दाणकन् खड्यात घालते तर याचा अर्थ ती भलतीच बिनधास्त आहे. ती मॉलमध्ये खरेदीला गेली तर नवऱ्याचे सगळे खिसे रिकामे केल्याशिवाय परत येणार नाही. क्रेडिट कार्ड बरोबर न ठेवण्याचा शहाणपणा नवऱ्यानं दाखवावा, नाहीतर कंगालच व्हाल. पण अशा मुली बोल्ड असतात, वेळ पडल्यास साहस दाखवण्यात नवरा क्लीन बोल्ड होईल पण ही महामाय समोरच्याला बुकलून काढेल. जोखीम घ्यायला तिला आवडतं.

आठवा मुद्दा मागून एखादी गाडी पौंपौं करत आली अन् कार चालवणारीनं पटकन् तिला साइड दिली तर पोरगी ‘एडजेसिटंग नेचर’ची आहे यावर विश्वास ठेवा. ‘जा रे बाबा, तुलाच घाई आहे, जा तू पुढे,’ असं समजुतीनं घेणारी आहे हे त्यावरून कळतं, याउलट मागून येणाऱ्या गाडीनं कितीही हॉर्न दिला तरीही मख्खपणे गाडी चालवत राहणं आणि साईड न देणं ही गोष्ट अजिबात एडजेस्ट न करणाऱ्या स्वभावाची निर्देशक आहे. हटवादी अन् ताठर स्वभाव यातून लक्षात येतो.

मग मंडळी, आता आपण आपल्या ‘कु’ किंवा ‘सु’ पुत्रासाठी वधूसंशोधन करणार असाल तर उगीचच इतर गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा, मुलीकडून फक्त कार चालवून घ्या…म्हणजे मुलीचे गुण तुम्हाला पटकन् कळतील अन् निर्णय घेणं सोपं होईल.

लठ्ठपणा घालवा : फुक्कट

मिश्किली * कुशला पाठक

त्यादिवशी ऑफिसातून दमून भागून घरी पोहोचलो. सौ.नं. दार उघडलं अन् अत्यंत उत्साही आवाजातत म्हणाली, ‘‘अहो, ऐकलंत का? आज एक फारच आनंदाची बातमी आहे. म्हणतात ना, काखेत कळसा अन् गावाला वळसा, तसं झालंय बघा. आपल्या घरासमोर जे पार्क आहे ना तिथं एक कॅम्प लागतोय. लठ्ठपणा घालवा. अन् अगदी फुक्कट. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देणारं शिबिर.’’

‘‘तर मग यात आनंदाची बातमी काय आहे? शहरात सतत अशी शिबिरं होतच असतात,’’ मी म्हणालो.

सौ. संतापलीच, ‘‘तुम्हाला अजून रिटायर व्हायला अवकाश आहे, पण तुमचा मेंदू मात्र पार रिटायर झालाय. अहो, तुम्ही स्वत:च सतत मला म्हणत असता की मी फार लठ्ठ झाले. पार्ट्यांना, समारभांना मला सोबत नेण्याची तुम्हाला लाज वाटते. आठवंतय का, त्या राजीव शुक्लाच्या पार्टीला मला नेलं नव्हतं. काय तर म्हणे, त्याच्या चवळीच्या शेंगेसारख्या बायकोसमोर मी भोपळ्यासारखी दिसेन, म्हणाला होतात. तर तो लठ्ठपणाच समूळ नष्ट करण्यासाठी ही शिबिरं घेतली जातात.

रविवारी शिबिराचं उद्घाटन आहे अन् मघाच मी सांगितलं ना, हे अगदी फुक्कट आहे. नि:शुल्क…पैसे लागणार नाहीत. आहे ना आनंदाची बाब?’’

‘‘छान, छान! जरूर जा त्या शिबिरीला. पण त्या आनंदात माझा पामराचा चहा फराळ विसरलीस का? ऑफिसातून दमून आल्यावर गरमागरम चहा हवासा वाटतो गं!’’ मी तिला थोपवत बोललो.

‘‘हो तर! चहा फराळ बरा आठवतो. एरवी अनेक गोष्टी सोयिस्करपणे विसरता तुम्ही. रविवार अन् माझं शिबिर पण विसराल, स्वत:चं जेवणखाणं नाही विसरत कधी,’’ संतापानं पाय आपटत सौ. स्वयंपाकघरात गेली. आतून बराच वेळ आदळआपट ऐकू येत होती. पण त्यानंतर ट्रे मधून बाहेर आलेला चहा अन् पोहे मात्र फक्कडच होते.

परवाच रविवार होता. शनिवारी रात्री बागेत मंडप, शामियाना घालून कॅम्पची तयारी झाली. जागोजागी जाहिरातींचे फलक झळकत होते. सकाळ होता होता कॅम्पच्या प्रवेशद्वारापाशी लठ्ठ स्त्रीपुरूषांच्या रांगा सुरू झाल्या. तिथं तीन खुर्च्यांवर तीन सुंदऱ्या बसल्या होत्या. कॅम्पसाठी येणाऱ्या लोकांच्या रजिस्टे्रशनसाठी त्यांना तिथं बसवलं होतं.

या नि:शुल्क शिबिरात रजिस्ट्रेशनसाठी १०० रु. फी होती. स्त्रीपुरूष शंभराच्या नोटा फेकत होते. सौ.नंही १०० रुपये भरले. लोकांकडे अंगावर चरबीचे थर असतात अन् खिशात नोटांचा महापूर असतो.

पहिल्या दिवशी तिथं संन्याशासारखी वेषभूषा असलेल्या काही लोकांची भाषणं झाली. त्यांनी आहार नियंत्रणावर खूप काही सांगितलं. तळलेल्या वस्तू, मिठाया खाऊ नका वगैरे समजावलं. पण बागेच्या एका कोपऱ्यात भजी, मिसळ, भेळ, समोसे वगैरेंचे स्टॉल मांडलेले दिसत होते.

स्टॉल्सच्या जोडीनं काही मॉडर्न सजावटीची रेस्टॉरंट्स पण होती. तिथं रंगीबेरंगी जाहिरातीतले पिझ्झा, बर्गर, डोशाचे मोठमोठे फोटो होते, बघूनच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असे. बऱ्याच लोकांनी तर पाणीपुरी, भेळ, वगैरे चापून खाल्लं. ‘निशुल्क वजन घटवा’ शिबिराचाच हा एक भाग आहे असं त्यांना वाटलं होतं.

लठ्ठपणा, मेद, चरबी, मोटापा वगैरे शब्द वापरत संन्याशासारख्या दिसणाऱ्या अन् भगवे कुर्ते झब्बे घातलेल्या लोकांनी मोठमोठी भाषणं दिली. अधिक वजनामुळे हायब्लडप्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, डिप्रेशन, किडनीचे विकार, सांधेदुखी वगैरे अनेक विकार होतात, खेरीज कॅन्सरचा धोका जाड्या माणसांना अधिक असतो हेही समजावून सांगितलं. पण संन्यासी, बाबामंडळींचं मात्र त्यांना ऐकावसं वाटतं. म्हणूनच देशातील संन्याशी मंडळी बघता बघता कोट्यधीश होताहेत. सर्वांनी आता लठ्ठपणा आणि इतर आजार बरे करण्याचे कारखाने घातलेत अन् बाजारापेठांवर कब्जा केलाय. एक कुणी संन्याशी बाबा तर म्हणे औषधं विकता विकता तुरूंगातही गेलेत आणि तिथंही औषधं विकताहेत.

दोन-तीन दिवस लठ्ठपणा या विषयावर भाषणं पार पडल्यावर मंचावरून घोषणा करण्यात आली की ज्या स्त्री पुरूषांना हार्ट प्रॉब्लेम, हाय किंवा लो प्रेशर, शुगर, किडनी प्रॉब्लेम वगैरे वगैरे असतील, त्यांनी शिबिरात उभारलेल्या स्टॉल्सवरून औषधं विकत घ्यावीत. मुळात तुमचा रोग बरा झाल्याखेरीज तुमचा लठ्ठपणा कमी होणार नाही. झालं! सगळीच्या सगळी लठ्ठ गर्दी त्या स्टॉल्सकडे धावली. प्रत्येक स्टॉलपुढे आता औषधांसाठी रांगा लागल्या.

त्या दिवशी आम्ही सौ. सोबत त्या रांगेत लागू शकलो नव्हतो, कारण ऑफिसमधल्या बॉसनं आम्हाला रजाच दिली नव्हती. सौ.च्या या लठ्ठपणा निवारण शिबिरापायी आमच्या तीन सुट्ट्या आधीच खर्ची पडल्या होत्या. आम्ही घरी पोहोचलो, तेव्हा टेबलावर औषधांच्या कित्येक बाटल्या अन् बरेचसे डबे मांडून ठेवलेले दिसले.

‘‘बाबांच्या शिबिरातून पाचशे रुपयांची औषधं आणली आहेत. ते म्हणाले होते की रोग असतो तोपर्यंत चरबी कमी होत नाही.’’

‘‘अगं, पण तुला तर कोणताच रोग नाही…मग इतकी औषधं कशाला?’’ मी आश्चर्यानं विचारलं.

नाराजीनं सौ. उद्गारली, ‘‘तुम्हाला कुठं कळतंय की आम्हाला काय त्रास आहे? कुठला रोग आहे? अहो, मला बद्धकोष्ठ आहे. अन् बाबा म्हणाले माझा हा लठ्ठपणा त्यामुळेच आहे. आता जेव्हा आधी त्या बद्धकोष्ठावर उपाय करेन तेव्हाच ना माझा लठ्ठपणा दूर होईल?’’

‘‘अगं पण, बद्धकोष्ठासाठी एवढी महागाची औषधं कशाला? अर्धी पपई खाल्ली किंवा रोज एक मुळा खाल्ला तर पोट खळखळून स्वच्छ होतं की!’’ मी निरागसपणे बोललो.

सौ. रागाने म्हणाली, ‘‘नुसते पाचशे रुपये ऐकून तुम्ही डोळे पांढरे करताय. बाबांनी सांगितलंय तीन चार वेळा तरी एवढी औषधं घ्यावी लागतील, तेव्हाच बद्धकोष्ठ दूर होईल. मी म्हणते, तुमच्या लक्षात कसं येत नाही की ते लठ्ठपणा दूर करण्यासाठी पैसा घेतच नाहीएत. मग रोग दूर करण्यासाठी औषधांवर थोडा खर्च केला तर बिघडलंच कुठं?’’

दुसऱ्या दिवशी सर्व लठ्ठ भारती शिबिरार्थींना योगासनं शिकवण्याचा कार्यक्रम होता. उत्तानपादासन, धनुरासन, नौकासन, भुजंगासन, चक्रासन वगैरे प्रकार करून दाखवले गेले. कुणाला काय जमेल, आसनं नेमकी कशी करावीत हे काहीही त्यांनी सांगितलंच नाही. ‘सर्व आसनं नियमित करा’ एवढं सांगून शिबिराचा समारोप झाला.

गेल्या काही दिवसात या शिबिरानं मला खूप दमवलं होतं. दुसऱ्या दिवशी इतकी छान झोप लागली असताना अचानक सौ.च्या किंकाळ्या ऐकायला आल्या. धडपडत उठून जाऊन बघितलं तर सौ. लादीवर आडवी तिडवी पडलेली. ‘‘अहो, मेले…मेले…मला उचला. माझी मान मोडलीए…’’ ती विव्हळत बोलली.

मी अजून बहुधा पूर्ण जागा झालो नव्हतो. मी दारातूनच वदलो. ‘‘सकाळी सकाळीच का आरडाओरडा प्रिये? शेजारी पाजारी धावत येतील. काय झालंय चौकश्या करतील, तुलाच त्यांना चहा फराळ द्यावा लागेल, त्यापेक्षा…’’

‘‘आता उभ्या उभ्या भाषण देणार की मला मदत करणार? वरच्या पट्टीत सौ. ओरडली, ‘‘मला आधी डॉक्टरांकडे न्या. मला फार दुखतंय, सहन होत नाहीए. बहुधा मान मोडलीए…ओह…मी मेले…’’

सौ.चा आरडाओरडा वाढतच होता. शेजाऱ्यांच्या मदतीनं तिला जवळच्याच नर्सिंगहोममध्ये नेलं. सौ.ला बरीच दुखापत झाली होती. दंडाला प्लॅस्टर घातलं. तीन हजारांचं बिल डॉक्टरनं दिलं.

लठ्ठपणा कुठं इंचभरही कमी झाला नव्हता. तीन हजार प्लॅस्टरचे, हजार रुपयांची औषधं आणि इतर काही असे मिळून पाच हजार खर्च झाले होते. फुक्कट शिबिर आम्हाला चांगलंच महागात पडलं होतं.

सौ.चं श्वान प्रेम आणि मी

मिश्किली * संतोष शेणवी

काही सिनेमा नट्यांना कुत्र्यांसमवेत फोटो काढून ते छापायची फार हौस असते. असे डॉगी किंवा पपी सोबतचे त्यांचे फोटो बघितले की सौ. उसासे टाकते.

‘‘माझ्याकडेही असाच एखादा छकुला, गब्दुल्ला डॉगी असता तर…’’ ती स्वत:शी पुटपुटते…‘‘मग मी ही असाच झोकात सेल्फी काढून घेतला असता. त्याला घेऊन रोज वॉकिंगला गेले असते, मैत्रीणींवर इंप्रेशन मारलं असतं.’’

एकदा ऑफिसातून घरी पोहोचलो, तेव्हा सौ.च्या मैत्रिणीची पार्टी चालू होती. सौ. सांगत होती, ‘‘अगं काय सांगू? हल्ली तर डॉगींचाच काळ आहे, म्हणजे सध्या ना तिच फॅशन आहे. एकाहून एक सरस देशी, विदेशी कुत्रे मिळताहेत…मलाही असा एखादा डॉगी मिळाला तर किती मज्जा येईल. डॉगीचीही एक वेगळीच ऐट असते हं!’’

त्यावर तिच्या (मूर्ख) सख्यांनीही आपापल्या कुवतीप्रमाणे तिला सल्ले दिले, आपली मतं सांगितली. थोड्याच वेळात त्या निघून गेल्या. सौ. बेडरूममध्ये जाऊन रडत बसली. रडताना ती माझा उद्धार करतच होती.

‘‘कुठल्या दरिद्री माणसाशी लग्न झालंय माझं…एक कुत्रा नाही खरेदी करता येत त्याला. नशिबच फुटकं आहे माझं. लग्नापूर्वी किती स्वप्नं बघितली होती मी…ऐटीत मी चालतेय…सोबत झोकात चालणारा डॉगी आहे.’’

मनातल्या मनात मी म्हटलं, ‘‘अरेच्चा, मी कुणा डॉगीपेक्षा कमी आहे की काय? लग्न झाल्यापासून सतत सौ.च्याच अवतीभोवती घुटमळतो, घोटाळतो आहे. प्रामाणिकपणे, अगदी इमाने इतबारे मी तिचाच आहोत. तरीही शेवटी एकदा ऑफिसला रजा टाकून मी कुत्रा ऊर्फ डॉगी शोधायला निघालो.’’

सगळ्यात आधी मी डॉगी विकणाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. तेव्हा समजलं डॉगीच्या किंमती हजारोंमध्ये (हजारो रूपयात) असतात. शिवाय त्यांचा आहारही त्यांच्या डाएट चार्ट प्रमाणे असतो. (भलेही तुम्ही उपाशी राहा.) शिवाय त्यांना वेळोवेळी इजेक्शन वगैरे द्यावी लागतात. डॉगीचा स्पेशल डॉक्टरांकडून ‘चेकअप’ करवून घ्यावा लागतो. तुम्ही उन्हाळ्यानं बेजार, हैराण व्हा किंवा थंडीत कुडकुडत बसा. डॉगीसाठी घरात कूलर आणि हिटर हवाच हवा. ही विलायती कुत्री, सॉरी, डॉगी तशीही नाजूक असतात. जरा दुर्लक्ष झालं तरी ती लगेच कोमेजतात म्हणे.

हे सर्व ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की घरात एक तर मी राहणार किंवा डॉगी…पण सौ. तिचा हट्ट सोडायला तयार नव्हती.

प्रसंगाचं गांभिर्य समजूत घेत मी सौ.ची समजूत घातली की आपले देशी डॉगीही चांगलेच असतात. आपण एखादं देशी कुत्रंच पाळूया. ते बिचारं आपल्याला दुवा देईल. त्याचंही भलं होईल, आपली हौस भागेल. त्याला विलायती डॉगीसारखा मेकअप करून देऊया.

दुसऱ्याच दिवशी सकाळी मी फिरून येत असताना एक गावठी कुत्रं माझ्या मागे मागे येऊ लागलं. मी जरा चुचकारलं अन् ते थेट घरातच आलं की! प्रथम मी त्याला दूधपोळी खाऊ घातली. मग समोरच्या व्हरांड्यात साखळीनं बांधून ठेवलं. सौ.नं त्याच्याकडे इतक्या प्रेमाने अन् अभिमानानं बघितलं की खरं सांगतो माझा अगदी तिळपापड का काय म्हणतात तो झाला. लग्नानंतर आतापर्यंत एकदाही सौ.नं इतक्या प्रेमानं अन् अभिमानानं माझ्याकडे बघितलं नव्हतं.

वर मानभावीपणे म्हणते कशी, ‘‘बरं का, आता मी माझं सगळं प्रेम या डॉगीवर उधळणार आहे. अन् बरं का, तुमच्याबद्दल असं प्रेम मला वाटलंच नव्हतं हो!’’

दुसऱ्याच दिवशी सकाळी सौ.नं डॉगीची साखळी हातात घेतली अन् त्यांची जोडी फिरायला बाहेर पडली. आता ते गावठी कुत्रंही ऐटीत चालत होतं. तेवढ्यात दुसऱ्या मोहोल्ल्यातील तीन चार कुत्री आमच्या डॉगीवर भुंकायला लागली. सौ.च्या हातात काठी होती, त्यामुळे आमच्या डॉगीवर त्यांनी हल्ला चढवला नाही. पण सौ. पुढे पुढे, मागे मागे कुत्र्यांची फौज, एक डोळा त्या कुत्र्यांवर, दुसरा डोळा आपल्या डॉगीवर, सतत एका हातात डॉगीची साखळी, दुसऱ्या हातानं काठी आपटत भुंकणाऱ्या कुत्र्यांना दूर ठेवणं या गडबडीत सौ.चा पाय खड्ड्यात गेला. जबरदस्त मुरगळला. कशीबशी जोडी घरात आली. सौ.चा दुखरा पाय बरा करण्यासाठी भरपूर पैसे खर्च झाले. त्या काळात ती अंथरूणातून उठतच नव्हती.

आमच्या काळज्या, चिंता अन् कटकटी कमी होण्याऐवजी वाढतच चाललेल्या. मला डॉगीला सांभाळण्यासाठी ऑफिसातून रजा घ्यावी लागली. त्याला बांधून ठेवला तर तो भुंकून कहर करायचा. लोकांनी सल्ला दिला की त्याला मोकळा राहू दे. मग तर त्यानं संपूर्ण घराचाच ताबा घेतला. सर्व स्वैर संचार करायचा. त्याला न्हाऊ घालायची जबाबदारीही आता माझ्यावर आली.

डॉगीला घरी आणलं, तेव्हा आमची रमाबाई मोलकरीण महिन्याची रजा घेऊन गावी गेली होती. ती रजा संपवून कामावर आली. नवा चेहरा, नवा माणूस बघून डॉगीनं भुंकत तिच्यावर उडी घेतली. घाबरून रमाबाई पळायला लागली अन् पायऱ्यांवरून धडपडली. तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं. आमच्या डॉगीमुळे, आमच्याच उपचारांचा खर्चही आमच्याच डोंबलावर आला. प्लॅस्टर निघेपर्यंत दोन महिने भरपगारी रजा शिवाय इतर घरातल्या कामांनाही ती जाऊ शकणार नाही म्हणून वर दहा हजार रूपये रोख द्यावे लागले. (त्या सटवीनं पोलिसात जायची धमकी दिली ना?) रमाबाई येऊन काम सांभाळेल, मला थोडा दिलासा, थोडी विश्रांती मिळेल वगैरे सर्व आशा पार मावळल्या. डॉगीचं अन् घरातलं करता करता पुरता दम निघाला.

घरात डॉगी आहे म्हणताना आम्ही नि:शंकपणे सिनेमाला, पार्ट्यांना रात्री उशिरापर्यंत जाऊ शकत होतो. पण आमचा डॉगी हल्ली आळशी व्हायला लागला होता. एकदा आम्ही नसताना घरात चोरी झाली. हा हरामखोर मजेत ब्रेडमटण खात बसला होता. मी ऐकून होतो की कुत्रा आपल्या मालकाशी कधीही दगलबाजी करत नाही पण चोरानं ब्रेडमटण खायला घातलं अन् हा स्वामीभक्ती विसरला.

वर सौ.नं मलाच ऐकवलं, ‘‘अहो, डॉगी पळालाय. उंदीर नाही. आजपर्यंत तुम्ही कधी त्याला ब्रेडमटण खायला घातलंत का? नाही ना? मग ज्यानं ते दिलं, त्याच्याशी तो प्रामाणिक राहिला.’’

हेही सत्यच होतं. एक धडा शिकलो. तोंड मिटून गप्प बसलो.

माझ्या एवढ्या वर्षांच्या आयुष्यात मी कधी एका पैचं घेतलं नव्हतं. पण या डॉगीच्या पायी माझ्यावर कर्जाचा डोंगरच झाला होता.

एका रात्री डॉगी जरा जास्तच भुंकत होता. माझ्या एक लक्षात आलं होतं की गल्लीतली कुत्री रात्री अपरात्री गळे काढतात, तेव्हा लोकांना त्रास होत नाही. पण आमचा डॉगी भुंकतोय म्हटल्यावर शेजाऱ्यांना खूपच त्रास होतो. कुणा हलकटानं पोलिसांना फोन केला अन् पोलिस, त्यांच्यासोबत पशुसंरक्षणवाले आमच्या घरात दाखल झाले. आमच्यावर कुत्र्याला उपाशी ठेवण्याचा गुन्हा दाखल झाला.

मी आपल्या परीनं त्यांना समजावत होतो, ‘‘भाऊ साहेब, तुमचा गैरसमज झालाय, हे बघा अजूनही याच्याजवळ ब्रेडबटर ठेवलेलं आहे. मला कर्ज घ्यावं लागलंय तरीही कुत्र्याला आम्ही अजिबात त्रास होऊ दिला नाहीए.’’

पोलीस इन्स्पेक्टर हसत हसत म्हणाले, ‘‘तर मग साहेब, थोडं कर्ज अजून घ्या, म्हणजे हे प्रकरण मिटेल नाही तर तुम्हाला मुक्या जिवाला त्रास दिल्याच्या, छळ केल्याच्या आरोपावरून तुरूंगात जावं लागेल.’’

शहाण्याला शब्दाचा मार. मी दुसऱ्याच दिवशी कुत्र्याच्या पालनपोषणासाठी प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज घेतलं. ताबडतोब ते मंजूर झालं. माझ्या तब्येतीसाठी पैसे हवे होते, ते आजतागायत मिळालेले नाहीत.

त्यातल्या त्यात समाधानाची अन् आनंदाची बाब म्हणजे हल्ली सौ.चं श्वानप्रेम कमी कमी व्हायला लागलं होतं. एक दिवस ती म्हणाली, ‘‘बरं का, जे झालं ते झालं. डॉगीमुळे आपली शान वाढली होती हे तर खरंच शिवाय कुत्र्यापासून सावधानचा बोर्ड दारावर लावला गेला. आता तो बोर्ड आपण नको काढूयात. काढला तर लोकांना चेष्टा करायला एक विषय मिळेल. माझं ना, फारच चुकलं. मी तुमचा मान राखला नाही. तुमची किंमत मला कळली नाही. खरं तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला समजलं होतं की तुम्ही माझे सगळ्यात जास्त विश्वासू पती आहात. तर आता तो विश्वास तुम्हालाही सार्थ ठरवावा लागेल. म्हणजे असं की दाराशी कुणाचीही चाहूल लागली की तुम्ही डॉगीसारखं, भुंकायला लागायचं, मग मी म्हणेन, ‘‘ऐकलंत का, जरा, डॉगीला मागच्या व्हरांड्यात बांधून ठेवा. बाहेर कुणी आलंय, मी दार उघडते, समजलं का?’’

या डॉगी प्रकरणानं मी इतका वैतागलो होतो की सौ. जे म्हणेल, ते करायला मी तयार होतो. मग एकदा रात्रीच्या अंधारात मी डॉगीला लांब, खूप लांब सोडून आलो.

आता सौ. आणि घराच्या इभ्रतीसाठी मी वेळी अवेळी भो भो भो भो भुंकत असतो.

पतीपत्नीतील प्रेमळ संवाद

 * नरेश साने

मथळा वाचून वाचकांनी दचकू नये हे संभाषण शृंगार रसातील नसून थोडं वेगळं आहे. भारतीय पतीपत्नीत दररोज घडणाऱ्या स्पेशल रोमँटिक संभाषणाची बातमी यातून मिळेल. जे विवाहित आहेत त्यांना समजण्याची गरजच नाही. हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडत असतं अन् जे भाग्यवान अजूनही अविवाहित आहेत त्यांच्यासाठी ही फुकटची ट्यूशन किंवा धडा आहे. पटलं तर शिका, मानसिकदृष्ट्या स्वत:ची तयारी करा किंवा आमच्या अनुभवाला पाचकळ विनोद समजून दुर्लक्ष करा. जे करायचं ते करा, तुमची मर्जी! आम्हाला काहीच टेन्शन नाहीए.

किस्सा ट्रेनमधला आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागता लागता आम्ही चपळाईनं जनरल बोगीत जागा पटकावली. पण या चपळाईला काही अर्थच नव्हता कारण डब्यात अजिबात गर्दीच नव्हती. माझ्या समोरच्या सीटवर विंडोजवळ एक नवयौवना बसली होती. तिच्या शेजारी एका मुलानं आपलं सामान रचून अख्खी बर्थ अडवली आहे. माझ्या शेजारीही एक कॉलेज युवती येऊन बसली आहे. ट्रेन हळूहळू सरकायला लागली आहे.

तेवढ्यात अचानक डब्यातल्या सगळ्याच प्रवासी मंडळींचे लक्ष त्या नवयौवनेकडे वेधलं जातं. कानाला मोबाइल लावून मोठ्या आवाजात अगदी स्टायलिशपणे ती बोलू लागली. तिचं बोलणं मजेशीर आहे. इतर कुणीच बोलत नसल्यामुळे तिचं बोलणं अधिकच जोरात ऐकायला येतंय. सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे आहे. ती मात्र बिनधास्त आहे. तुम्हीही ऐका ते संभाषण :

‘‘तुम्ही कुठं आहात? मी ही मागच्या जनरल बोगीतच आहे.’’

‘‘अहो सांगतेय ना, मागच्या डब्यात.’’

‘‘कोणत्या जगात वावरता हो?’’ युवती हसत हसत म्हणते, ‘‘मी गेटवरच उभी आहे. नीट बघाल तर दिसेन ना?’’ आम्ही सगळेच दचकलो. कारण ती जागेवर बसूनच बोलतेय. डब्याच्या दारात ती उभी नाहीए.

आता ट्रेननं वेग धरला. बोलणं सूरुच आहे. ‘‘आधी मला सांगा, तुम्ही आहात कुठं? स्टेशनवर आहात तर मला का दिसत नाही? कुणाच्यातरी सोबत असाल…ती कोण तुमची क्लोज फ्रेण्ड नक्कीच ती सोबत असणार… म्हणूनच तर बायकोला ओळख दाखवत नाहीए तुम्ही…’’

‘‘अस्स?…म्हणजे रेल्वेनं तुमच्यासाठी स्पेशल डबा लावला अन् त्यात तुम्ही चढलात.’’

‘‘अहो किती वेळ सांगतेए… मी डब्याच्या दारातच उभी आहे. बाई गं…पाय निसटला माझा…थोडक्यात वाचले हो…’’

‘‘तर-तर? तुम्हाला कशाला काळजी वाटेल माझी?…तुम्हाला तर वाटेल, बरं झालं, ब्याद गेली…तुम्हाला तेच हवंय ना? पुरे हो…मला काही सांगू नका…मला सगळं माहित आहे…’’

‘‘आता हे शब्द तर तुम्ही उच्चारूच नका…तिलाच सांगा… जिच्याबरोबर तुम्ही दिवसरात्र चॅटिंग करत असता…खरंच…किती किती दुष्ट आहात हो तुम्ही…मला जर कल्पना असती की तुम्ही मला ट्रेनमध्ये एकटी सोडणार आहात तर मी ट्रेनमध्ये बसलेच नसते…खरं सांगते…’’

‘‘हो, माहिती आहे, किती काळजी घेता माझी…लोक आपल्या बायकोवर किती प्रेम करतात, किती जपतात अन् तुम्ही, तुम्हाला तर मी मेलेय का जिवंत आहे यानं काहीच फरक पडणार नाहीए…’’

एकीकडे युवती आपल्या बॅगेतून खाण्याचे पदार्थ काढतेए. सॅण्डविच, ब्रेड रोल खाता खाता पुन्हा संभाषण सुरूच आहे. डब्यातल्या प्रत्येक प्रवाशाचं लक्ष तिच्याकडेच आहे. माझ्या शेजारी बसलेली कॉलेजकन्यका हसली. मी शांतपणे सर्व घटनाक्रम समजून घेतोय.

एवढ्यात एक स्टेशन निघून गेलं. पतीपत्नी अजूनही भेटलेले नाहीत. संभाषण मात्र आता अधिक तीव्र होतंय.

‘‘मला वेडी समजता का हो तुम्ही? मी मागचे पुढचे सगळे डबे फिरून बघितलेत…कुठं लपून बसला आहात?’’

‘‘मला उगीचच चिडायला लावू नका. मागच्या डब्यात असता तुम्ही, तर मला दिसला असता ना?…सगळं समजतं मला…तुम्ही मुद्दाम माझ्यापासून दूर राहताय.’’

‘‘छे हो, चूक माझीच आहे. मी अशी वेड्यासारखी प्रेम करते तुमच्यावर…अन् तुम्ही मला मूर्ख बनवता…’’

‘‘एन्जॉय करा…मला काहीही टेंशन नाहीए. माझं काय…राहीन अशीच…तुम्ही तुमच्या नवीन मैत्रीणीसोबत आयुष्य घालवा…’’

‘‘नाही…खरं सांगतेय…आता तर सरळ घटस्फोट घेणार मी…’’

‘‘आता काय सगळं ट्रेनमध्येच सांगू का मी? मी काही बोलत नाही याचा अर्थ माझ्या तोंडात जीभ नाही किंवा मी मुकी आहे असा नाही…’’

‘‘फॉर गॉड्स सेक…इट इज टू मच यार…आता भेटा तर खरं, मग दाखवते तुम्हाला…’’

तरुणीच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य अन् फिरकी घेण्याचं समाधान आहे. अन् बोलण्यातून मात्र राग झळकतो आहे. आम्ही त्यामुळे कन्फ्यूस्ड आहोत…(बावळटासारखे घटनेचा अन्वयार्थ लावण्यात गुंतलो आहोत).

अचानक त्या नवयौवनेच्या दुसऱ्या मोबाइलची रिंग वाजते. ती तो मोबाइल उचलून बोलू लागते. या मोबाइलवरचं संभाषण तसंच राहातं.

युवती आता हसत हसत तिच्या आईशी वार्तालाप करते आहे. ती मघापासूनचा सगळा किस्सा आईला अगदी रंगवून सांगते आहे. वर म्हणते, ‘‘अगं आई, मी त्याला असा ताणला नाही तर तो अगदी अलगद माझ्या हातातून निसटून जाईल. खरोखर फारच केअरलेस आहे तो. असं ठेवते म्हणून लायनीवर असतो, नाहीतर…’’

या बोलण्यात व्यत्यय येतो तो पहिला फोन पुन्हा वाजायला लागतो म्हणून. युवती आईला, ‘‘नंतर बोलते’’ म्हणून फोन बंद करते अन् पहिला फोन उचलते.

‘‘अरेच्चा? मी कुठं जाणार? सगळा डबा शोधतेय मी…तुम्हाला शोधण्यासाठी…मी बरी हरवेन?…’’

‘‘खरंय…खरंय…तुमच्यासारखी मी नाहीए…यू आर मोस्ट केअरलेस पर्सन…’’

‘‘बरं…बरं…काही हरकत नाही…घरी पोहोचा. बघतेच मी तुम्हाला?’’

एव्हाना पुन्हा स्टेशन आलं होतं. हे माझं उतरण्याचं ठिकाण होतं. आता त्या संभाषणातून नाइलाजानं मला बाहेर पडावं लागत होतं. पुढे नेमकं काय घडलं कळणार नव्हतं. पण या चाळीस मिनिटांच्या प्रवासात क्षणभरही बोअर झालं नव्हतं. मनोमन मी याचं समाधान मानलं की माझी सौ. यावेळी माझ्यासोबत नव्हती. नवऱ्याला मुठीत ठेवण्याच्या अशा टिप्स फुकटात मिळाल्या तर कोणती बायको असली सुवर्ण संधी सोडेल? तिनं हे ऐकलं असतं तर माझी काही खैर नव्हती.

एक गोष्ट मात्र कळली, पतीपत्नीतील भांडणं समोरच्याला विचित्र वाटली तरी त्याच्या मुळाशी त्यांचं प्रेम असतं अन् खरंय ना? ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्याशीच आपण मनातलं बोलतो ना? पतीपत्नी प्रियकर प्रेयसीही असतात आणि मित्रही. त्यामुळेच त्यांना एकमेकांवर अधिकार गाजवावा असं वाटतं. भारतीय संसाराचं हेच वैशिष्ट्य आहे की रोजरोज भांडत नवरा बायको एकत्र राहातात, पाश्चिमात्त्य लोकांना यांचं कोतुक वाटतं अन् नवलही!

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें