आपले घर

कथा * रितु वर्मा

कार्यालयातील घडयाळात संध्याकाळचे ५ वाजताच जियाने घाईघाईत स्वत:ची बॅग उचलली आणि भराभर पावले टाकत मेट्रो स्टेशनच्या दिशेने निघाली. आज तिचे मन स्वच्छंदी पाखराप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत होते. कारण आज तिला पहिला पगार मिळाला होता. तिला घरातल्या सर्वांसाठी काही ना काही घ्यायचे होते. रोज संध्याकाळ होत आली की तिचे शरीर आणि मन दोन्हीही थकून जायचे. पण आज मात्र तिचा उत्साह कायम होता. चला, आता जियाची ओळख करून घेऊया…

जिया आजच्या युगातली २३ वर्षीय नवतरुणी आहे. सावळा रंग, कैरीसारखे बटबटीत डोळे, छोटे नाक, मोठाले ओठ असल्यामुळे सौंदर्याच्या व्याख्येत तिचा कुठेच नंबर लागत नव्हता. मात्र तिचा चेहरा सोज्वळ होता. ती घरात सर्वांची लाडकी होती. आयुष्यात जे हवे ते सर्व आतापर्यंत तिला मिळाले होते. फार मोठी स्वप्ने नव्हती तिची. ती थोडक्यातच समाधान मानायची.

भराभर पावले टाकत ती दुकानाच्या दिशेने निघाली. आपल्या २ वर्षांच्या भाच्यासाठी तिने रिमोटवर चालणारी गाडी घेतली. वडिलांसाठी त्यांच्या आवडीचे अत्तर, आई आणि वहिनीसाठी साडी आणि चुडीदार घेतला. भावासाठी टाय घेतला तेव्हा लक्षात आले की, तिच्याकडे फारच कमी पैसे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे स्वत:साठी ती काहीच खरेदी करू शकली नाही. अजून संपूर्ण महिना बाकी होता. पण तिच्याकडे मात्र कमी पैसे शिल्लक होते. त्यातच तिला महिना काढायचा होता. आईवडिलांकडून तिला काहीच घ्यायचे नव्हते.

जशी ती कपडयांच्या दुकानातून बाहेर पडली तिला शेजारच्या पडद्यांच्या दुकानात आकाशी आणि मोरपिशी रंगाचे खूप सुंदर पडदे दिसले. अशा प्रकारचे पडदे आपल्या घरातही असावे असे फार पूर्वीपासून तिच्या मनात होते. दुकानदाराला किंमत विचारताच ती ऐकून मात्र जियाला घाम फुटला. दुकानदाराने स्मितहास्य करीत सांगितले की, हे चंदेरी सिल्कचे पडदे आहेत, म्हणूनच किंमत थोडी जास्त आहे. पण यामुळे तुमचे घर खूपच आकर्षक दिसेल.

काही वेळ तेथेच उभी राहून ती विचार करू लागली. त्यांनतर तिने ते पडदे विकत घेतले. जेव्हा ती दुकानातून बाहेर पडली तेव्हा खूपच आनंदी होती. लहानपणापासूनच आपल्या घरात असे पडदे लावायची तिची इच्छा होती. पण आईकडे जेव्हाही तिने ही इच्छा बोलून दाखविली त्या प्रत्येक वेळी घरच्या गरजांपुढे तिची इच्छा मागे पडली. आज तिला असे वाटले जणू ती खरेच स्वतंत्र झाली आहे.

ती घरी पोहोचेपर्यंत रात्र होत आली होती. रात्रीच्या जेवणासाठी सर्व जण तिची वाट पाहात होते. भाच्याची पापी घेऊन तिने सर्व भेटवस्तू टेबलावर ठेवल्या. सर्वच कुतूहलाने तिची खरेदी पाहू लागले. अचानक आईने विचारले, ‘‘तू स्वत:साठी काय आणले आहेस?’’

जियाने हसतच पडद्यांची पिशवी तिच्या हातात दिली. पडदे पाहून आई म्हणाली, ‘‘हे काय आहे…? हे तू घालणार आहेस का?’’

जिया हसतच म्हणाली, ‘‘माझ्या लाडक्या आई, हे आपण घरात लावणार आहोत.’’

आईने पडदे पुन्हा पिशवीत ठेवले आणि म्हणाली, ‘‘हे तुझ्या घरी लाव.’’

जिया काहीच न समजल्यासारखे आईकडे बघतच राहिली. आई असे का बोलली, याचा विचार करू लागली. आईचे बोलणे ऐकून तिची भूक मरून गेली.

वहिनीने हसतच तिच्या गालावरून हात फिरवत सांगितले, ‘‘माझे स्वत:चे घर कोणते आहे, हे मला अजूनपर्यंत समजलेले नाही. जिया, तू स्वत:चे घर स्वत: घे,’’ असे म्हणत वहिनीने प्रेमाने तिला घास भरवला.

आज संपूर्ण घरात पक्वान्नांचा घमघमाट सुटला होता. आईने जणू तिच्या पाककलेचा सर्व कस लावला होता. कचोऱ्या, रसगुल्ले, गाजराचा हलवा, ढोकळा, पनीरची भजी, हिरवी चटणी, समोसे असे कितीतरी पदार्थ होते. वहिनी लाल रंगाची साडी नेसून छान तयार झाली होती. वडील आणि भाऊ उभे राहून संपूर्ण घराचे निरीक्षण करत होते. कुठली कमतरता राहू नये याची काळजी घेत होते. आज जियाला बघायला येणार होते. प्रत्यक्षात जियाला जो आवडला होता त्याला घरातल्यांकडून आज होकार मिळणार होता. अभिषेक तिच्याच कार्यालयात काम करत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. या मैत्रीला आता त्यांना नात्यात गुंफायचे होते.

बरोबर ५ वाजता एक चारचाकी गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली. त्यातून ४ लोक उतरले. सर्व घरात आले. जिया पडद्याआडून हळूच पाहात होती. जिन्स आणि आकाशी रंगाच्या शर्टमध्ये अभिषेक फार छान दिसत होता. त्याची आई लीला ही आजच्या युगातील आधुनिक महिला वाटत होती. छोटी बहीण मासूमाही खूपच सुंदर होती. वडील अजय अत्यंत साधे दिसत होते.

अभिषेकच्या आई आणि बहिणीच्या सौंदर्यापुढे जिया खूपच फिकी वाटत होती. पण तिचा भोळाभाबडा स्वभाव, साधी तितकीच सरळ विचारसरणी किंबहुना तिच्यातील साधेपणा अभिषेकला आवडला होता. जियामध्ये कुठलाच नाटकीपणा नव्हता. एकीकडे आपल्या आईमध्ये अभिषेकला प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांचा आभास व्हायचा तर दुसरीकडे जियामध्ये नैसर्गिक फुलांचा सुगंध असल्यासारखे वाटायचे.

स्वत:च्या वडिलांना त्याने नेहमीच तडजोड करून जगताना पाहिले होते. त्याला स्वत: असे आयुष्य जगायचे नव्हते. म्हणूनच आईचा लाडका असलेला, तिची प्रत्येक गोष्ट ऐकणारा अभिषेक काहीही झाले तरी आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आईला देऊ इच्छित नव्हता.

जिया समोर येताच अभिषेक प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहू लागला. लीला आणि मासूमाच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य होते. त्यांना जिया जराही आवडली नव्हती. अजय यांना मात्र जिया चांगल्या विचारांची मुलगी वाटली, जी त्यांच्या कुटुंबाला प्रेमाने अगदी सहज सांभाळू शकेल. लीलाने अभिषेककडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद होता. त्यामुळे त्या जियाला नकार देऊ शकल्या नाहीत.

जियाला त्यांनी स्वत:च्या हातांनी हिऱ्याचा सेट घातला. पण त्यांच्या चेहऱ्यावर जराही आनंद नव्हता. जिया हे समजून गेली होती की, ती फक्त अभिषेकची आवड आहे. आपल्या घरात स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी तिला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

दोन महिन्यांनंतरची लग्नाची तारीख ठरली. नवरीच्या रूपात जिया खूप छान दिसत होती. अभिषेक आणि तिच्यावर लोकांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. लीलाही अत्यंत सुंदर दिसत होत्या. कन्यादान करताना जियाच्या आईवडिलांचे डोळे पाणावले. ती त्यांच्या घराचा श्वास होती. पाठवणीवेळी अजय यांनी हात जोडून सांगितले, ‘‘सून नाही तर मुलगी घेऊन जात आहोत.’’

काहीच दिवसांतच जियाच्या हे लक्षात आले होते की, या घरावर लीला यांचे राज्य आहे. ते त्यांचे घर आहे आणि लग्नापूर्वीचे घर हे जियाच्या आईवडिलांचे घर होते. पण मग तिचे घर कुठे आहे? या प्रश्नाचे उत्तर तिला काही केल्या मिळत नव्हते.

कालचीच गोष्ट होती. जियाने दिवाणखान्यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लीला यांनी हसत सांगितले की, ‘‘जिया, तू अभिषेकची पत्नी आहेस. या घराची सून आहेस. पण हे घर माझे आहे. म्हणूनच तुझे निर्णय आणि तुझे अधिकार तुझ्या खोलीपुरतेच मर्यादित ठेव.’’

जियाने सर्व निमूटपणे ऐकून घेतले. अभिषेकला जेव्हा तिने हे सांगायचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, थोडा वेळ जाऊ दे. त्यांनी हे सर्व आपल्यासाठी, आपल्या सुखासाठीच तर केले आहे ना?

जिया इच्छा असूनही स्वत:च्या मनाला समजावू शकत नव्हती. आनंदी राहणे ही तिची सवय होती, पण हार मानून गप्प बसणे तिचा स्वभाव नव्हता.

पाहता पाहता एक वर्ष लोटले. आज रियाच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. तिने अभिषेकसाठी घरातच पार्टी द्यायचे ठरविले. त्यासाठी सर्व मित्र-मैत्रिणींना आमंत्रण दिले. दुपार झाली आणि तितक्यात लीला यांच्या किटी पार्टीच्या मैत्रिणी आल्या.

जियाने लीला यांना सांगितले, ‘‘आई, आज मी माझ्या काही मित्र-मैत्रिणींना घरी बोलावले आहे.’’

लीला प्रत्युत्तर देत म्हणाल्या, ‘‘जिया तू आधी मला विचारायला हवे होतेस…’’ आता मी काहीच करू शकत नाही. तू तुझ्या मित्र-मैत्रिणींना दुसरीकडे कुठेतरी बोलाव.’’

जिया काहीच बोलली नाही. आपल्या अधिकारांची मर्यादा तिला माहीत होती. पण त्याच वेळी मनातल्या मनात तिने एक निर्णय घेतला.

जियाने संध्याकाळच्या पार्टीसाठी घराऐवजी हॉटेलचा पत्ता आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअप केला. अभिषेकलाही तेथेच बोलावले. अभिषेकने जियाला पिवळा व लाल रंग असलेली कांजीवरम साडी आणि खूपच सुंदर झुमके भेट म्हणून दिले. जियासारखी साध्या, सरळ विचारसरणीची जोडीदार मिळाल्यामुळे अभिषेक खूपच आनंदी होता.

जियाला आयुष्याबाबत काहीच तक्रार नव्हती. पण तरीही कधीकधी तिने पहिल्या पगारावेळी खरेदी केलेले ते चंदेरी सिल्कचे पडदे तिला चिडवत आहेत, असा भास तिला व्हायचा. अभिषेक जियाला सर्व प्रकारे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत होता, पण जियाची स्वत:चे घर असावे, ही इच्छा तो समजून घेऊ शकत नव्हता. जियाला आपल्या घराला आपले म्हणण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळेच तिला ते आपले वाटत नव्हते. हा तिच्या जीवनातील असा रिकामा कोपरा होता जो तिचे आईवडील, अभिषेक किंवा तिचे सासूसासरे यापैकी कोणीच भरून काढू शकत नव्हते. जियाने हळूहळू या घरातील सर्वांच्याच मनात स्वत:ची जागा निर्माण केली. लीला आता तिच्याशी तुटकपणे वागत नव्हत्या. मासूमाच्या मासूम, खोडकर जीवनाचा ती एक भाग झाली होती.

आज सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. दिवाळीचा सण तसाही आपल्यासोबत आनंद, उत्साह आणि नवी उमेद जगवणारे अगणित रंग घेऊन येतो. घराचे रंगकाम सुरू होते. जेव्हा अभिषेक पडदे बदलू लागला तेव्हा जिया म्हणाली, थांब. त्यानंतर धावत जाऊन कपाटातून ते चंदेरी सिल्कचे पडदे घेऊन आली.

अभिषेक काही बोलण्याआधीच लीला म्हणाल्या, ‘‘जिया, असे पडदे माझ्या घरात लावले जाणार नाहीत.’’

जिया प्रश्नार्थक नजरेने अभिषेककडे पाहू लागली. तिला वाटले तो आईला समजावेल. आई, हे जियाचेही घर आहे. पण अभिषेक काहीच बोलला नाही. जिया नाराज झाली, हे पाहून तो म्हणाला, ‘‘इतके कशाला वाईट वाटून घेतेस? पडद्यांचे काय एवढे कौतुक?’’

सासरी आल्यानंतरची ही पहिलीच वेळ होती जेव्हा रियाचे डोळे पाणावले. ते पाहून अभिषेक चिडला.

आजकाल जियाचा बराच वेळ कार्यालयातच जात असे. अभिषेकच्या लक्षात आले होते की, ती सतत मोबाईलवरच बोलत असते आणि त्याला पाहातच घाबरून फोन ठेवते. अभिषेकचे जियावर मनापासून प्रेम होते. तिचे नेमके काय चालले आहे, हे तिला विचारावेसे त्याला वाटत होते, पण जियाच्या जीवनातील त्याची जागा दुसऱ्या कोणी घेतली तर नसेल ना, याची त्याला भीती वाटत होती.

एका संध्याकाळी अभिषेकने जियाला सांगितले, ‘‘जिया, तू शुक्रवारी सुट्टी घे. कुठेतरी जवळच फिरायला जाऊया.’’

जियाने उदास स्वरात सांगितले, ‘‘नको अभिषेक, कामावर खूप काम आहे.’’

जियाच्या वागणुकीत झालेला बदल अभिषेक मनात असूनही समजून घेऊ शकत नव्हता. ती रात्रीही उशिरापर्यंत लॅपटॉपवर काहीतरी करत बसायची. अभिषेकने आवाज देताच घाबरून लॅपटॉप बंद करायची. अभिषेक तिच्या जवळ जायचा जितका प्रयत्न करत होता तितकीच ती त्याच्यापासून दूर जात होती.

न जाणो ते काय होते, ज्याच्यासाठी ती वेडी झाली होती. जियाच्या भावानेही त्या दिवशी अभिषेकला फोन करून विचारले की, ‘‘आजकाल जिया घरी एकही फोन करत नाही. सर्वकाही ठीक आहे ना?’’

अभिषेकने सांगितले, ‘‘सर्व ठीक आहे, फक्त सध्या कामावर खूप काम करावे लागते.’’

पाहता पाहता २ वर्षे लोटली. आता अभिषेकच्या व जियाच्या आईवडिलांनाही वाटत होते की, त्यांनी बाळाचा विचार करावा.

आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस होता. यावेळेस लीला यांनी पार्टी ठेवली होती. जियाने खूप सुंदर फिकट तांबडया रंगाचा स्कर्ट आणि कुरता घातला होता. अभिषेकची नजर तिच्यावरच खिळली होती. बाळाची गोड बातमी कधी देणार, असे विचारून सर्वजण त्यांना चिडवत होते.

रात्री एकांतात जेव्हा अभिषेकने जियाला सांगितले की, जिया मलाही बाळ हवे आहे. त्यावेळी जियाने नकार दिला. रात्री ती त्याच्या सोबत होती, मात्र ती मनाने नव्हे तर फक्त शरीराने त्याच्याजवळ आहे, याची त्याला जाणीव झाली. त्यामुळे तो रात्रभर झोपू शकला नाही.

दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण शहर तेजोमय झाले होते. आज बऱ्याच दिवसांनंतर अभिषेकला जियाचा चेहरा उजळलेला दिसला.

जियाने अभिषेकला सांगितले, ‘‘अभिषेक आज मला तुला काही सांगायचे आहे आणि काही दाखवायचेही आहे.’’

अभिषेक तिच्याकडे प्रेमाने पाहात म्हणाला, ‘‘जिया, काहीही सांग फक्त असे सांगू नकोस की, तुझे माझ्यावर प्रेम नाही.’’

जिया मोठ्याने हसली आणि म्हणाली, ‘‘तू वेडा आहेस का? तू असा विचार करूच कसा शकतोस?’’

अभिषेक स्मितहास्य करत म्हणाला, ‘‘तू गेल्या वर्षभरापासून माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस. आपण एकत्र कुठेच गेलेलो नाही.’’

अभिषेकला जियाला काय सांगायचे आहे हे समजत नव्हते. जियाने गुलाबी आणि नारिंगी रंग असलेली चंदेरी सिल्कची साडी नेसली होती. सोबत खडयांचा सुंदर सेट घातला होता. हातात हिऱ्यांचे कडे आणि खूप साऱ्या बांगड्या होत्या. आज तिच्या चेहऱ्यावर अशी काही लाली पसरली होती की, अभिषेकला तिच्यासमोर सारे फिके वाटू लागले. रांगोळी काढून झाल्यानंतर जियाने अभिषेकला तिच्यासोबत येण्यास सांगितले. अभिषेकने लगेचच आपल्या चारचाकी गाडीची चावी घेतली.

जिया हसून म्हणाली, ‘‘आज मी तुला माझ्यासोबत माझ्या कारने नेणार आहे.’’

दोघेही निघाले. कार जणू हवेशी गप्पा मारत वेगाने पुढे जात होती. काही वेळानंतर ती एका नव्या वसाहतीच्या दिशेने निघाली. गाडी चालवत असताना जिया म्हणाली, ‘‘अभिषेक, आज मला तुला काही सांगायचे आहे. तू नेहमीच माझी अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतलीस, पण लहानपणापासूनच माझे एक स्वप्न होते, जे माझ्या डोळयात कायमचे घर करून बसले होते.

आईवडिलांनी सांगितले की, तू लग्न होऊन जिथे जाशील ते तुझे घर असेल. तू भेटल्यावर वाटले की, माझे स्वप्न पूर्ण झाले. पण अभिषेक, काही दिवसांनंतर माझ्या लक्षात आले की, काही स्वप्ने अशी असतात जी वाटून घेता येत नाहीत. लग्नाचा अर्थ असा होत नाही की, तुमच्या स्वप्नांचे ओझे तुमच्या जोडीदाराने वाहावे. माझी तुझ्याबद्दल किंवा इतर कोणाबद्दलही काहीच तक्रार नाही. पण अभिषेक आज माझे एक स्वप्न पूर्ण झाले आहे,’’ असे सांगत तिने एका नवीनच तयार झालेल्या सोसायटीसमोर गाडी थांबवली. अभिषेक काहीच न बोलता तिच्या मागून चालला होता. एका नव्या फ्लॅटच्या दरवाजावर तिची नेमप्लेट होती.

अभिषेक आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला. छोटे पण खूपच सुंदर सजवलेले घर होते. तितक्यात हवेची झुळूक आली आणि जियाच्या त्या स्वत:च्या घरातले मोरपिशी रंगांचे चंदेरी सिल्कचे पडदे हलू लागले. जिथे तिचा अधिकार केवळ घरावरच नाही तर घरातील प्रत्येक गोष्टीवर होता.

ते उमळून येणं

कथा * पूनम अत्रे

गौरी हसते ना तेव्हा माझ्यया अवतीभवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. या वयातही तिचं हसणं किती निर्मळ अन् निरागस आहे…तिच्या स्वच्छ, निष्कपट मनांचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसतं.’’ अनिरूद्ध सांगत होता अन् शेखर ऐकत होता. गौरी शेखरची बायको होती अन् तिचा प्रियकर अनिरूद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार अन् संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरूद्धला मारून मारून अर्धमेला केला असता. पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कातल्या बाकावर बसून अनिरूद्धची बडबड ऐकून घेत होता.

‘‘चला निघूया…माझं काय? सध्या मी एकटा जीव सदाशिव…पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुंलंबाळं असतील ना? ती वाट बघतील…’’

‘‘का हो? आज गौरी भेटायला नाही येणार?’’

‘‘आज शनिवार. आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते अन् तिचा नवरा अन् मुलं यातच तिचा प्राण वसलेला आहे.’’

‘‘तरीही ती तुम्हाला भेटते? का?’’

‘‘तुम्हाला नाही समजणार.’’

‘‘सांगून तर बघा…’’

‘‘नंतर कधी तरी…बाय…’’ बोलून अनिरूद्ध गेलासुद्धा. पण संतापानं ठणकणारी आपली कानशिलं दाबत शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्याव्या का? तिच्या प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघडं करावं? नाही, शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही. गौरी त्याच्यावर जिवापाड प्रेम करते. त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं अन् कशासाठी चाललंय? हा अनिरूद्ध मध्येच कुठून टपकला?

गेल्या तीन महिन्यातल्या घडामोडी त्यानं आठवून बघितल्या. तो बघत होता गौरी हल्ली खूप उत्साही अन् आनंदात दिसते. स्वत:विषयी बरीच जागरूक झालीय. सकाळी फिरायला जाते. ब्यूटीपार्लरला जाते. फेशिअल, हेअर स्टाइल काय अन् काय…पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घालते. सुंदर तर ती होतीच, आता तर खूपच स्मार्टही दिसते. नवरा, मुलं, घरकाम, मुलांचे अभ्यास, वेळच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. अजूनही करते पण हल्ली स्वत:वरही लक्ष देतेय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते.

शेखरवर तिचं प्रेम होतंच. अजूनही ती त्याची कोणतीच मागणी अमान्य करत नाही, पण तरीही काहीतरी बदललंय. काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतंय. आजतागायत गौरीनं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नव्हती. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं चारित्र्य…कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती. त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं. पण गौरीतला हा बदल कशामुळे का? हे कळायला हवं. तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची. काय करावं? त्यानं मनात अनेक योजना तयार केल्या.

शेखरला गौरीचा मोबाइल चेक करायचा होता. पण त्याचं धाडस होत नव्हतं. त्याच्या घरातला हा अलिखित नियम होता, कोणी कुणाच्या फोनला हात लावत नसे. मुलांना दिलेले फोनही त्यांनी कधीच चेक केले नव्हते. पण काहीतरी करायला हवंय.

एकदा गौरी अंघोळ करायला गेली असताना शेखरनं तिचा मोबाइल चेक केला. कुणा अनिरूद्धचे बरेच मेसेजेस होते. त्यातल्या बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गौरीनं आपल्या नवऱ्याची अन् मुलांची खूप स्तुती केली होती. अनिरूद्धला भेटायचे प्रोग्राम होते. अनिरूद्ध? कोण आहे हा अनिरूद्ध? शेखरनं आठवून बघितलं अन् त्याला आठवलं.

गौरी एक दिवस म्हणाली होती, ‘‘शेखर, आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटला. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं. तो इथंच आहे. बनारसला.’’

‘‘असं?’’

‘‘हो ना? मी कधी तरी तुमच्याशी त्याची भेट घालून देईन. कधी तरी घरी बोलावू का त्याला?’’

‘‘त्याची फॅमिली आहे इथं?’’

‘‘नाही. फॅमिली लखनौला आहे. त्याची बायको नोकरी करते. दोन्ही मुलंही तिथंच शिकताहेत. सध्या बदलीमुळे इथं एकटाच राहतोय. अधूनमधून जात येत असतो लखनौला.’’

‘‘ठीक आहे, बघूया बोलवण्याचं कधीतरी…’’ कोरडेपणाने शेखरने म्हटलं होतं. त्यानंतर गौरीनं कधी हा विषय काढला नाही. पण गौरीत होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होतं. आज, अगदी याक्षणीही ती मुलांची समर्पित आई, शेखरची त्याला समर्पित पत्नी अन् घराला समर्पित गृहिणी होती. तरीही शेखरला काहीतरी खटकत होतं.

फोन चेक केल्यानंतर शेखरनं ही बाब जरा गंभीरपणे घेतली. सामान्य बुद्धिच्या, असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं, शिव्या देणं, अपशब्द वापरणं या गोष्टी त्याच्या सुसंस्कृतपणात बसत नव्हत्या. या विषयावर इतर कुणाशी बोलून गौरीबद्दल वाईट मत बनवणं त्याला मान्य नव्हतं. ती त्याची पत्नी होती अन् दोघांचंही एकमेकांवर विलक्षण प्रेम होतं.

एक दिवस गौरी म्हणाली, ‘‘शेखर, आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. मोबाइलवरून आपण संपर्कात राहूच.’’

शेखर एकदम सावध झाला. ‘‘कुठं जायचं आहे?’’

‘‘एका फ्रेंडला भेटायला?’’

‘‘कोण? फ्रेंड?’’

‘‘रचना.’’

शेखरनं पुढे काहीच विचारलं नाही. पण दुपारी तो ऑफिसातून निघाला अन् घराच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला. मुलं शाळेतून आली. शेखरनं अंदाज बांधला की ती मुलांचं खाणंपिणं वगैरे आटोपून आता बाहेर पडेल. तसंच झालं. गौरी नटूनथटून घराबाहेर पडली. मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला. आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला. पण एकदम अनिरूद्धचा विचार मनात येताच मनांत संताप दाटून आला.

गौरी पायीच निघाली. थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती. तिथल्या एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एका पुरुषानं हात हलवला. आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कोण बरं? अरेच्चा हा तर रोज बागेत सायंकाळी फिरायला येतो. शेखरच्या मनात आलं… आत्ताच्या आत्ता गौरीला हात धरून ओढत आणावं अन् तिच्या पापाचं माप तिच्या पदरानं घालावं. पण त्यानं तसं काही केलं नाही. तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला. ऑफिसला गेलाच नाही. मुलं त्याला बघून चकित झाली. तो गुपचूप बेडरूममध्ये जाऊन अंथरूणावर पडून राहिला. खूप थकलेला, दुखावलेला, त्रस्त, आतून बाहेरून भाजून निघत…हे घर, सगळं हौशीनं घेतलेलं सामान, किती कष्टानं उभा केलेला संसार, मुलं, त्यांच्या भवितव्याची स्वप्नं…आज सगळंच विस्कटल्यासारखं झालं.

नालायक, निर्लज्ज, विश्वासघातकी, मनातल्या मनात तो गौरीला काय काय दूषणं देत होता.

शेखर त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आईवडिल गावी रहायचे. गौरीचेही आईवडिल आता हयात नव्हते. ती ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. अशा बदफैली बायकोसोबत राहायला नको वाटत होतं. पण असं काय घडलंय? त्यांचे संबंध आजही चांगलेच आहेत. तर मग गौरीला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता भासली ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकृष्ट द्ब्राली? समजा त्याच्याकडून असं घडलं असतं तर? तो एखादीच्या नादी लागला असता तर? गौरीनं काय प्रतिक्रिया दिली असती? त्यानं एकूण परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वत:चं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं अन् संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं.

तो जर असा बहकला असता तर गौरीनं निश्चितपणे प्रेमानं, संयमानं सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता. इतक्या वर्षांची तपश्चर्या करून थाटलेलं घर, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं असं क्षणात विस्कटू दिलं नसतं. त्यानंही गौरीला समजून घ्यायला हवं. नेमकं काय आहे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं.

दोन तासातच गौरी आली. तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं. शेखरला पलंगावर झोपलेला बघून ती दचकली. प्रेमानं त्याच्याजवळ बसत, त्याच्या केसातून बोटं फिरवत म्हणाली, ‘‘मला फोन का केला नाहीत? मी लगेच आले असते ना?’’

‘‘रचनाला सोडून?’’

‘‘तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाहीए माझ्या आयुष्यात.’’ गौरीनं त्याच्या गालावर ओठ टेकवले.

शेखरनं तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, ‘‘खूप सुंदर दिसते आहेस…’’

‘‘खरं?’’

‘‘तुझी फ्रेंड कशी आहे?’’

‘‘बरी आहे.’’ एवढं बोलून गौरी उठली अन् म्हणाली, ‘‘चहा करून आणते. तुम्हाला खायला काही करू का?’’

‘‘नको…चहाच कर…’’

गाणं गुणगुणत गौरी चहा करायला गेली. शेखर स्तब्ध होता. इतकी फ्रेश, इतकी आनंदात का? काय घडलंय? बस्स, याच्यापुढे शेखरला काही कल्पना करावीशी वाटली नाही. त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती.

शेखर आता रोज नियमितपणे बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला. तो मनमिळाऊ अन् स्मार्ट होता. त्यानं बघता बघता अनिरूद्धशी ओळख करून घेतली…जाणूनबुजून मैत्री वाढवली. स्वत:चं नाव त्यानं विनय सांगितलं.

अनिरूद्धशी मैत्री वाढवून त्याच्याकडून शेखर त्याच्या अन् गौरीच्या नात्याविषयी जाणून घेणार होता. दोघांची मैत्री वाढली होती. गौरीचं नाव न घेता शेखर अनिरूद्धला आपल्या संसाराविषयी, ऑफिसविषयी सांगायचा.

अनिरूद्धनंही सांगितलं, ‘‘सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करतेय. दोन मुलांची शाळाही छान आहे. तिथून काही दिवसांसाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही. कारण तिथं त्यांचं उत्तम चाललं आहे. त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतंय.’’

शेखर दचकला. म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही? याचाच अर्थ हे नातं ही अस्थिरच आहे. पुढे त्याचं काय होईल? शेखर वाट बघत होता की अनिरूद्ध त्याच्या अन् गौरीच्या संबंधांबद्दल त्याच्याशी केव्हातरी बोलेल. तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी दुपारी एखाद्या लंचहोमला न्यायचा. ‘‘आजही माझी बायको माहेरी गेली आहे. चल, आपण एकत्र जेऊयात.’’

अनिरूद्धशी जवळीक वाढवत होता तो अन् एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं. शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं. ‘‘इथं माझी एक मैत्रीण राहते. गौरी नाव आहे तिचं.’’

शेखरच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. हाताचे तळवे घामेजले. कुणा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं.

‘‘गौरी खूप चांगली आहे. आम्ही एकत्र शिकत होतो. अचानक फेसबुकवर भेटली.’’ अनिरूद्ध सांगत होता.

‘‘असं? लग्न झालंय तिचं?’’

‘‘हो…लग्न झालंय, नवरा, दोन मुलं…त्या तिघांमध्येच तिचा प्राण वसतोय. ती कुठंही असू देत तिचा जीव नवरा अन् मुलांमध्येच गुंतलेला असतो.’’

‘‘मग ती तुमच्याबरोबर?’’

‘‘मैत्री आहे आमची.’’ अनिरूद्धनं विषय टाळला.

शेखरनंही त्याला फार छेडलं नाही. पण त्यानंतर अनिरूद्ध अधूनमधून गौरीचा विषय काढायचा. त्यानं बोलताना हे ही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकांची मित्र होती…त्यांचं नातं प्रियकर प्रेयसीचं कधीच नव्हतं अन् आजही नाही.

अनिरूद्ध निघून गेला तरीही बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करंत होता. मग उठून खिन्न मनानं घरी परत आला.

शनिवार होता. सुट्टी होती. गौरीनं पाठीमागून त्याला मिठी मारत विचारलं, ‘‘कसल्या विचारात आहात? फिरून आलात अन् असे खिन्न का दिसताय?’’

शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली. तिला दूर सारत तो म्हणाला, ‘‘काही नाही, कामाचं टेन्शन आहे.’’

‘‘गारगार सरबत देऊ? की गरम चहा आवडेल?’’ गौरीनं विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली अन् तो खोलीत गेला. गौरी स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

हल्ली शेखरची मन:स्थिती फारच विचित्र होती. गौरीसमोर तो काही बोलू शकत नव्हता पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा. तिला चांगली बदडून काढावी असं वाटायचं, अनिरूद्धला समोर आणून उभं करावं अन् जाब विचारावा असं वाटायचं.

पण इतकी वर्षं निष्ठेनं संसार करणारी गौरी आठवायची. तिचं समर्पण, तिचं निर्मल मन, कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं…मग अनिरूद्ध तिच्या आयुष्यात का आहे? आज अनिरूद्धकडून सगळंच जाणून घ्यायचं या विचारानं त्यानं अनिरूद्धला फोन लावला.

‘‘काय करतो आहेस? आज लंच एकत्र घेऊयात?’’

‘‘अरे, आज रविवार…तुझी फॅमिली…’’

‘‘आज त्यांना एका ठिकाणी लंचला बोलावलंय. मी तिथं बोअर होईन म्हणून आधीच त्यांची क्षमा मागून आपला कार्यक्रम ठरवलाय.’’

‘‘बरंय, येतो मी.’’

ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले. शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर शेखरनं विचारलं, ‘‘तुझ्या फ्रेंडचं कसं चाललंय? कुठवर आलंय प्रकरण? फक्त मैत्रीच आहे की अजून…?’’

‘‘हे असं सगळं सांगायचं नसतं, मित्रा.’’ हसून अनिरूद्ध बोलला.

‘‘म्हणजे? तुमच्या मैत्रीत शारीरिक/लैंगिक संबंधंही…’’

त्याचं बोलणं अर्ध्यावर तोडत अनिरूद्ध म्हणाला, ‘‘चल, आज तुला सांगतोच सगळं…गौरी खरोखर अतिशय चांगली आहे. पूर्वीपासूनच ती मर्यादशील, शीलवान होती. आजही ती तशीच आहे. ती आदर्श गृहिणी, प्रेमळ समर्पित पत्नी अन् उत्तम आई आहे. आमच्यात पूर्वी होती तशीच निखळ मैत्री अजूनदेखील आहे. पूर्वी आम्ही भेटत असू तेव्हा जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो. मग एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलायचो. ती नि:संकोचपणे मला भेटायला येते. एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना मी प्रथमच तिचा हात धरला. हात हातात घेतला अन् मला वाटलं…खरंच किती मृदु अन् उबदार आहे हा स्पर्श…सगळं जगच असं असतं तर? मी आवेगानं तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं. तिनं प्रथम विरोध केला, पण नंतर जे घडायला नको ते घडून गेलं. खरं सांगतो त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती. फक्त आपलेपणाची ऊब अन् जाणीव होती. मला स्वत:लाही वाटलं की मी असा उमलून आलोय आत्ता, तसा पत्नीबरोबर प्रणय करताना उमलून येत नव्हतो. गौरीनंही मान्य केलं, जे घडलं त्या क्षणांची, त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. तिच्या पतीबरोबरच्या प्रणयात ती अशी उमलून येत नाही. ती असोशी, ती ऊब, तो आपलेपणा अन् समर्पण पती बरोबरच्या सहवासात तिला मिळत नाही. तिचा नवरा खूप चांगला आहे पण अशा एकांतात, भावनोत्कट क्षणांतही तो एखाद्या मशीनसारखा वागतो. त्याच्या स्पर्शातली जादूच जणू नाहीशी झाली आहे.

आमच्यात घडलेल्या…अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणांनी आम्हा दोघांना भरभरून सुख दिलं. नुसतंच सुख नाही, समाधान अन् ऊर्जाही दिली. गौरीला प्रत्येक गोष्टीची हौस आहे, आवड आहे. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडतो. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंदोत्सव म्हणून जगायचा असतो. सर्वांगानं उमलून येऊन, मनाच्या गाभाऱ्यातही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमँटिक समर्पण करायचं असतं. तिचं तिच्या नवऱ्यावर निरतिशय प्रेम आहे. ती त्याचा विश्वासघात करणार नाही. पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यातली एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे. कधी कधी काही क्षणांत माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्याक्षणी गौरीला असंच वाटलं.’’ अनिरूद्ध बोलत होता. जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता.

शेखर श्वास रोखून अनिरूद्धचं बोलणं ऐकत होता. अनिरूद्ध अजूनही बोलतच होता. ‘‘गौरी म्हणजे प्रेमासाठी आसूसलेलं वाळवंट आहे अन् मला वाटतं, तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढंगाप्रमाणे धोधो बरसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं, झोपणं, जेवणं, कार्यक्रमाला जाणं, नातेवाईंकांकडे जाणं, त्यांना घरी बोलावणं वगैरे सगळं सगळं आहे पण प्रणयातली ऊब, ऊष्मा नाहीशी झाली आहे. तिचा नवरा प्रेमळ आहे, त्याला तिचा अभिमान वाटतो. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही. विसाव्याचं एकमेव स्थान म्हणजे तिचा नवराच आहे, पण…हा पणच एक मध्ये येतो. तिच्या प्राणांहून प्रिय असलेल्या त्याला गौरीला प्रेम हवंय हे कळत नाही.’’

शेखर आत्तापर्यंत स्वत:ला जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता. याक्षणी मात्र त्याचा स्वत:विषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता.

‘‘मित्रा, आज मी माझं मन तुझ्याजवळ मोकळं केलंय. पण माझ्या मनावर एक ओझं, एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केलाय का? पण काय        करू? ती तिच्या करियरमध्ये मग्न आहे. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकांपासून पण तिला माझं नसणं जाणवत नाही. अन् इथं गौरी आपल्यानवऱ्याबरोबर राहतानाही प्रेमाचे उत्कृट क्षण शोधते आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना? माझे ट्रान्सफरसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

शेखरनं दचकून विचारलं, ‘‘ट्रान्सफर? तुझी ट्रान्सफर?’’

‘‘हो ना, सीमा इथं यायची नाही. मुलांना बाबा त्यांच्या जवळ हवे आहेत अन् घर सांभाळणं ही एकट्या सीमाचीच जबाबदारी नाहीए ना? संसार दोघांचा असतो…’’

समोर बसलेला अनिरूद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला. त्याच्यापेक्षा समजूतदार अन् मोठ्या मनाचा. बिल अनिरूद्धनंच दिलं. मग एकमेकांचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले.

शेखर घरी पोहोचला तोवर दुपार उलटून गेली होती. मुलं दिसली नाहीत. ‘‘मुलं कुठायेत?’’ त्यानं विचारलं.

‘‘मित्राकडे बर्थ डे पार्टीला गेलीत.’’

‘‘याचा अर्थ घरात फक्त आपण दोघंच आहोत?’’

‘‘हं!’’

खरं तर मघापासून त्याच्या मनांत गौरीबद्दल खूप राग होता. पण तिला बघताच    त्याचा राग निवळला. त्यानं गौरीला एकदम उचलून घेतलं. गौरी चकित झाली अन् मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं आपण कसं काय करतोय याचं स्वत: शेखरलाही आश्चर्य वाटत होतं. त्यानं गौरीवर प्रेमाचा पाऊस पाडला. चकित झालेली गौरी तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली. शेखरला स्वत:लाच जाणवलं की गौरीबरोबर असा वेळ घालवल्याला किती तरी वर्षं उलटून गेली होती. गेली कित्येत वर्षं तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवतो आहे. गौरीच्या चेहऱ्यावरची तृप्ती अन् आनंद शेखरला किती काही समजावून गेला.

किती तरी वेळ शेखरनं गौरीला मिठीतून मोकळी केली नाही. तेव्हा हसून गौरी म्हणाली, ‘‘आज काय झालंय तुम्हाला?’’

‘‘का? तुला आवडत नाहीए?’’

‘‘मी तर अशा क्षणांची वाटच बघत आहे…खरं तर असे क्षण शोधत असते…मला का नाही आवडणार?’’ शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतली. दोघं किती तरी वेळ खूप काहीबाही बोलत होती. किती तरी वर्षांनी दोघांनी असा वेळ एकमेकांसोबत घालवला होता.

थोड्या वेळानं मुलं घरी आली. मग दोघांनी काही वेळ मुलांबरोबर गप्पा करण्यात, त्यांच्या पार्टीची गम्मतजम्मत ऐकण्यात घालवला.

पुढले दोन दिवस शेखर खूप गडबडीत होता. बागेत फिरायलाही नाही गेला, त्यामुळे अनिरूद्धही भेटला नाही. तिसऱ्या दिवशी बागेत अनिरूद्धची भेट झाली.

‘‘माझी बदली झाली आहे. मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय.’’

शेखर दचकला, ‘‘अन् तुझी मैत्रीण? तिला माहीत आहे हे?’’

‘‘अजून नाही. आता फोन करून सांगेन.’’

‘‘का? तुमची भेट नाही झाली?’’

‘‘नाही, तिच्या मुलांच्या परीक्षा आहेत. ती कुणालाही हा महत्त्वाचा वेळ देऊ शकत नाही.’’

‘‘याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही?’’

‘‘असंच दिसतंय.’’

दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गौरीकडे बघितलं. तिला अनिरूद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का? त्याच्या जाण्यानं ती दु:खी, उदास झाली आहे का? पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही. गौरी मुलांचा अभ्यास घेत होती. शेखर फ्रेश होऊन आला तशी तिनं मुलांना म्हटलं, ‘‘मी  पप्पांसाठी चहा करते. तुम्ही तुमचा अभ्यास करा.’’

ड्राइंगरूममध्ये चहा घेताना शेखरनं प्रथम आपल्या ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या. मुलांच्या अभ्यासाची चौकशी केली. मग सहजच विचारलं, ‘‘तुझ्या त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालं? नाव काय त्याचं तू सांगितलं होतंस?’’

‘‘तो अनिरूद्ध…चांगलाय. तो परत जातोय लखनौला. त्याची ट्रान्सफर झाली आहे.’’

‘‘अरेच्चा? ट्रान्सफर झालीय?’’

‘‘चांगलं झालं ना, त्यांचं घर आहे तिथं, बायको, मुलं इथंच बिचारा एकटा होता. बरं, आता तुम्ही टीव्ही बघा, आराम करा. मी स्वयंपाकांचं बघते अन् मग पुन्हा मुलांचा अभ्यास घेते,’’ गौरीनं म्हटलं.

अनिरूद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गौरीला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्यानं गौरीला जवळ ओढून मिठीत घेतलं.

अंतरी उजळले दिवे

* सुरेखा सावे

ऑफिसातून घरी परतताना रात्रीचे आठ वाजून गेले होते. घरात शिरताच प्रतिमाचा बिघडलेला मूड श्रवणला जाणवला. कारण एरवी हसून स्वागत करणारी प्रतिमा बरीच काळजीत दिसत होती. दिवसभरातल्या आळीतल्या, घरातल्या सर्व वितंबातम्या आल्या आल्या श्रवणला सांगून मगच ती इतर कामाला लागायची. पण आज तिनं मुकाट्यानं चहाचा कप पुढ्यात ठेवला.

तिची क्षमा मागत श्रवणनं म्हटलं, ‘‘सॉरी, मी तुला फोन करू शकलो नाही…अगं महिन्याच्या शेवटच्या दिवशी ना, काम जरा जास्तच असतं…’’

‘‘तुमच्या कामाची कल्पना आहे मला…पण मला दुसरीच काळजी सतावते आहे…’’ प्रतिमा म्हणाली.

‘‘अरे? आम्हालाही कळू देत काय दु:ख आहे माझ्या चंद्रमुखीला.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘दुपारी मोठ्या वहिनींचा फोन आला होता अमेरिकेहून, उद्या सायंकाळी सासूबाई इथं पोचताहेत…’’

‘‘हात्तिच्या! एवढंच ना? मग त्यात काळजीचं काय कारण आहे? आईचं घर आहे ती केव्हाही येऊ शकते ना?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘तुम्हाला समजत नाहीए. अमेरिकेत राहून त्या खूपच कंटाळल्या. आता त्या इथंच राहायचं म्हणताहेत…’’ प्रतिमा अजूनही काळजीत होती.

‘‘तर मग छानच झालं की! घरात चैतन्य वाढेल. भांडी जास्त आवाज करतील. एकता कपूरच्या सीरियल्सबद्दल तुला चर्चा करायला रसिक श्रोता मिळेल. सासवासुना मिळून आळीतल्या महिला मंडळात धमाल कराल…हा…हा…हा…’’

‘‘तुम्हाला सगळी चेष्टाच वाटतेय. माझ्या जिवाला घोर लागलाय.’’ प्रतिमानं म्हटलं.

‘‘अगं राणी, घोर तर माझ्या जिवाला लागायला हवा. तुम्हा सासूसुनेच्या शीतयुद्धात मीच हुतात्मा होतो. जात्यातल्या धान्यासारखी अवस्था असते माझी. तुला काही म्हणू शकत नाही की आईला काही म्हणू शकत नाही…’’

प्रतिमा गप्पच होती. थोडा वेळ थांबून श्रवणनं म्हटलं, ‘‘तुला एक सुचवू का? पटलं तर बघ, काही टीप्स देतोय…मला वाटतं तुझं टेंशन त्यामुळे संपेल.’’

प्रतिमानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. मागच्या वेळी सासूबाई क्षुल्लक कारणावरून नाराज होऊन इथून गेल्या होत्या. ती कडू आठवण मनांत ताजी होती.

‘‘हे बघ प्रतिमा, जोपर्यंत बाबा हयात होते तोवर मला आईची काळजी नव्हती. पण बाबा गेल्यावर आलेला एकटेपणा तिला पेलवंत नाहीए. तिला खूप असुरक्षित, एकाकी वाटतं. तूच विचार कर, ज्या घरात तिचं एकछत्री साम्राज्य होतं, ते घर आता नाही. लग्नानंतर मुलांचा ताबा सुनांनी घेतला. जे घर तिनं काडी काडी जोडून तयार केलं होतं, ते बाबांच्या मृत्युनंतर बंद करावं लागलं…

‘‘आईला एकटं ठेवायचं नाही म्हणून मग ती इथं अन् दादाकडे अमेरिकेला राहते…म्हणजे तिला राहावं लागतं. इथं तिला मोकळेपणा वाटत नाही. त्यामुळे तिची चिडचिड होते. गावातल्या घरात असलेला मोकळेपणा, तिची सत्ता इथं तिला मिळत नाही. मनांतला असंतोष संधी साधून उफाळून येतो…’’

प्रतिमाला श्रवणचं बोलणं पटत होतं. ती लक्षपूर्वक ऐकत होती.

‘‘एक लक्षात घे, आईला आपल्याकडून पैसा अडका नकोए. बाबांची पेन्शन तिला पुरून उरते. तिला थोडी विचारपूस, थोडा मानसन्मान हवा असतो. तेवढं मिळालं की ती खुष होते. थोडी तडजोड तुला करावी लागेल. करशील का?’’

‘‘करेन, प्रयत्न तरी नक्कीच करेन.’’

‘‘असं बघ,’’ श्रवण पुढे बोलू लागला. ‘‘अगं या वयस्कर लोकांमध्ये ‘अहं’ फार असतो. तसा तो आपल्यातही असतोच. पण दोघांचे अहंकार एकमेकांना भिडले की प्रचंड स्फोट होतो. कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं, मनं दुभंगतात अन् अगदी कारण नसताना माणसं एकमेकांची वैरी होतात. आपण फक्त एवढीच काळजी घ्यायची की आईचा अहंकार दुखावला जाणार नाही, आई तशी प्रेमळ आहे गं! अजून तुला तिचा फारसा सहवासच मिळाला नाहीए. पण तुझ्या सेवेनं, तुझ्या नम्र वागण्यानं, तुझ्या गोड बोलण्यानं तू तिला जिंकून घेशील याची मला खात्री आहे.’’

‘‘म्हणजे मी नेमकं काय करायचं?’’

‘‘अगदी सोप्पं आहे. आईसमोर दोन्ही खांद्यांवरून पदर घेऊन वावरायचं, तिला वाकून नमस्कार करायचा. तिला काय हवं नको याकडे जातीनं लक्ष द्यायचं. रात्री झोपण्यापूर्वी तिचे दुखरे पाय चेपायचे, बघ ती कशी हुरळून जातेय ती.’’

‘‘करेन की! लक्षात ठेवून सर्व करेन.’’ प्रतिमा आता बऱ्यापैकी रिलॅक्स झाली होती.

‘‘आणि एक गोष्ट…प्रत्येक काम करण्याआधी आईला विचारून घेत जा. घरात घडणार तेच आहे जे तुला अन् मला हवंय, पण तिचा विचार घेतला, तेवढा मोठेपणे तिला मिळाला की तिचं प्रेमळ मन सुखावतं. तिच्या म्हणण्याला मान दिलास की बघ ती तुझे कसे लाड करेल…’’

‘‘तुम्ही बघाल, यावेळी मी त्यांना तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही.’’

रात्रीची जेवणं आटोपल्यावर प्रतिमानं थोडा वेळ बसून पुढील काही दिवसांच्या कामाचं वेळापत्रक आखून घेतलं. रात्री अगदी शांत झोप लागली तिला.

सकाळी लवकर उठून तिनं सासूबाईची खोली अगदी झकास स्वच्छ करून घेतली. त्यांच्या गरजेच्या सर्व वस्तू आवर्जून तिथं मांडल्या. त्यांना आवडणाऱ्या भाज्या फ्रीजमध्ये विराजमान झाल्या.

वेळेवारी प्रतिमा आणि श्रवण एयरपोर्टवर पोहोचले. मुलगा सून दिसताच आईचे डोळे आनंदानं चमकले. त्यांची ट्रॉली स्वत:कडे घेत प्रतिमानं वाकून नमस्कार केला. आईला कृतार्थ वाटलं. तिनं तोंडभरून आशिर्वाद दिला.

नातू दिसला नाही तेव्हा आजीनं विचारलं, ‘‘सुनबाई नातू दिसत नाहीए गं?’’

‘‘आई, तो झोपला होता…म्हणून कामवाल्या काकूंना घरी बसवून तुम्हाला घ्यायला आले.’’

‘‘अगं, मुलांना असं गडीमाणसांवर सोपवू नये. हल्ली काय न् काय ऐकायला येतं ना?’’ आई म्हणाल्या.

‘‘खरंय आई, यापुढे लक्षात ठेवेन.’’ प्रतिमानं आश्वासन दिलं.

घरी पोहोचताच पाच वर्षांचा नातू धावत आला अन् त्यानं आजीला मिठी मारली. आजीला त्यानं आजीची खोली दाखवली. स्वच्छ नीटनेटकी मांडलेली खोली व आकर्षकरित्या मांडलेलं सामान बघून आई सुखावल्या.

‘‘आई तुम्ही स्नान करणार आहात की आत्ता फक्त हातपाय तोंड धुताय?’’

गरम चहाचा कप सासूच्या हातात देत सुनेनं विचारलं.

‘‘मला वाटतं मी स्नान केलं की माझं आखडलेलं अंग मोकळं होईल. विमानात बसून दमले गं बाई!’’ सासूबाई चहा घेता घेता बोलत होत्या.

स्नानगृहात दोन बादल्या सणसणीत गरम पाणी स्वच्छ पंचा, सुगंधी साबण सगळी जय्यत तयारी होती.

रात्रीची भाजी आईंना विचारून केली होती. स्वयंपाक छान होता. सासूबाई मनापासून जेवत होत्या. नातू शेजारीच जेवायला बसला होता. सून गरम फुलके करून वाढत होती.

जेवताना मुद्दामच श्रवणनं म्हटलं, ‘‘प्रतिमा, उद्या नाश्त्याला भाजणीचं थालीपीठ कर ना. पण आईला नीट विचारून घे. छान खुसखुशीत व्हायला हवं.’’

‘‘आई, उद्या मला जरा सांगाल हं…’’ प्रतिमानं म्हटलं. आई सुखावल्या.

आईंच्या खोलीची स्वच्छता मोलकरणीकडून न करवता प्रतिमा स्वत:च करायची. कारण आईंना प्रत्येक गोष्ट अगदी स्वच्छ, व्यवस्थित व जागच्या जागी हवी असायची. मोलकरीण इतक्या निगुतीनं सगळं करेल हे शक्यच नव्हतं.

एक दोन दिवसांनंतर प्रतिमा आईंच्या खोलीत काहीतरी काम करत असताना एक फाइल सापडत नाही यावरून श्रवणनं घर डोक्यावर घेतलं. प्रतिमा त्यावेळी आईंचे वाळलेले कपडे घड्या घालून ठेवत होती. आई म्हणाल्या, ‘‘अगं, ते सोड ते काम. तो बघ काय म्हणतोय, सगळं घर डोक्यावर घेतलंय.’’

अंघोळीच्या आधी डोक्याला व अंगाला तेल लावायची सवय होती आईंना. त्यांच्यासाठी खास लाकडी घाण्यावरचं तेल प्रतिमानं आणून ठेवलं होतं. आईंना तेलाची बाटली हातात घेताच प्रतिमा म्हणाली, ‘‘आई, मी लावून देते तेल…बघा माझ्या हाताची कमाल. खूप बरं वाटेल तुम्हाला.’’

‘‘राहू दे गं! तशीच घरातली, बाहेरची बरीच कामं असतात तुला…’’

‘‘कामं होतील हो,’’ म्हणत प्रतिमानं बाटली उघडून त्यांच्या डोक्याला तेल लावायला सुरूवात केली.

‘‘आई, अजूनही तुमचे केस किती छान आहेत. तरूण वयात तर तुम्ही ब्युटी क्वीनच असाल ना?’’

‘‘अगं, आमच्या वेळी अशी काही प्रस्थं नव्हतीच ना? पण श्रवणचे बाबा मला अधूनमधून चिडवायचे, तुझ्या कॉलेजातली किती मुलं तुझ्यावर मरत होती सांग बरं! बोलता बोलता या वयातही त्यांच्या गोऱ्या चेहऱ्यावर गुलाबी छटा पसरली.’’

प्रतिमाला गंमत वाटली. तिनं मुद्दाम त्यांना छेडलं.

‘‘हे म्हणत होते की त्यांचे बाबा तुम्हाला माहेरीही जाऊ देत नसत. एक दिवसही तुम्ही नसलात तर त्यांना करमत नसे…खरं आहे का हे?’’

आता मात्र आई चक्क लाजल्या. प्रेमानं तिला एक चापटी मारून म्हणाल्या, ‘‘चल, फाजिल कुठली, माझी चेष्टा करतेस काय? चल, निघ इथून…’’

हलक्या हातानं प्रतिमानं त्यांचं अंग रगडून दिलं. गरम पाण्याच्या अंघोळीनं त्या खूपच सुखावल्या. मनापासून सेवा करण्याचा आनंद प्रतिमालाही सुखावून गेला.

एक दिवस श्रवणनं ऑफिसातून येताना सिनेमाची दोन तिकिटं आणली. आईंना सिनेमा आवडत नसे. त्यांना नाटक बघायला आवडायचं. प्रतिमानं विचारलं, ‘‘आई सिनेमाला जायचंय आपल्याला…आवरून घ्या. तसा वेळ आहे अजून.’’

‘‘नाही गं! मुळात मला ना, सिनेमाची आवड नाही…असं कर, तुम्ही दोघं जा. बाळाला मी बघते.’’

प्रतिमा काही क्षण तिथेच घुटमळली. ‘‘खरंच, जा तू तेवढंच तुम्हा दोघांना एकत्र राहता येईल.’’ आई म्हणाल्या.

व्वा! आंधळा मागतो एक डोळा…तसं झालं. दोघं पिक्चर बघून आली तेव्हा आईंनी स्वयंपाक तयार ठेवला होता. प्रतिमाला आवडणारे भोपळ्याचे काप अन् श्रवणच्या आवडीची फणसाची भाजी! व्वा!! प्रतिमानं पटकन् गस पेटवला अन् तयार असलेल्या कणकेच्या फुलक्या लाटायला घेतल्या.

‘‘प्रतिमा, तू बैस श्रवणबरोबर, मी देते गरम फुलके.’’ आईंनी म्हटलं.

‘‘नको आई, सगळा स्वयंपाक एकटीनं केलात तुम्ही. तुम्हीच बसा. आता होताहेत फुलके.’’ प्रतिमानं म्हटलं.

श्रवणनं तोडगा काढला. ‘‘प्रतिमा तू पटापट फुलके कर. आपण सगळे एकत्रच जेवूयात.’’

एकाच टेबलवर सगळे एकत्र जेवायला बसले. आईंना खूपच छान वाटलं. त्यांचे डोळे पाणावले. ‘‘आई काय झालं?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘तुझ्या बाबांची आठवण आली. आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.’’ आई म्हणाल्या.

‘‘खरंय आई, पण आज हा आनंद ते तुमच्या डोळ्यांनी बघताहेत.’’ प्रतिमानं मृदु आवाजात म्हटलं.

मग ती श्रवणला म्हणाली, ‘‘अशी भाजी फक्त आईच बनवू शकतात. आई, तुमच्या हातची चव माझ्या हाताला आली पाहिजे.’’

‘‘तू ही छान करतेस गं स्वंयपाक,’’ आई म्हणाल्या.

‘‘मी तुमच्यासारखीच सुगरण होण्याचा प्रयत्न करतेय आई.’’ प्रतिमानं म्हटलं. श्रवण सासूसुनेचं सख्य बघून सुखावला होता. एकमेकांना मान देण्यानं घरात केवढं सुख भरभरून वाहत होतं.

दिवाळीचा बोनस घेऊन श्रवण घरी आला अन् त्यानं ते पाकीट प्रतिमाला दिलं. प्रतिमा म्हणाली, ‘‘आपण आईंना देऊयात. त्यांना बरं वाटेल.’’

आईंनी पाकीट बघितलं, ‘‘तुझे बाबा असाच बोनस आणून माझ्या हातात ठेवायचे. आता तू बोनसचे पैसे माझ्या सुनेला देत जा.’’ आई मनापासून म्हणाल्या.

आता प्रतिमालाही समजलं होतं की तिची सासू अत्यंत साधी, नीटनेटकेपणाची आवड असणारी, सुगरण अन् प्रेमळ बाई आहे. तिला पैसा, अडका, कपडा, लत्ता काहीच नकोय. सुर्देवानं तिचं आरोग्य चांगलं असल्यामुळे औषधांचाही खर्च नसतो. फक्त थोडी विचारपूस, थोडा मोठेपणा मिळाला की त्यांना सुरक्षित वाटतं. मुलाच्या बरोबरीनं त्या सुनेवर प्रेम करतात. नातू तर त्यांच्या काळजाचा तुकडा आहे.

दिवाळीची साफसफाई करताना प्रतिमा स्टुलावरून पडली. पाय मुरगळला. आईंनी तिला पलंगावर बसवलं. पायाला आयोडेक्स चोळलं. व्यवस्थित क्रेप बँडेज बांधलं.

‘‘वा, वा! सुनेनं सासूची सेवा करायची तर सूनच सेवा करवून घेतेय.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘गप्प रे!’’ आई त्याच्यावर डाफरल्या. ‘‘ही माझ्या मुलीसारखी आहे. मी तिची काळजी नाही घ्यायची तर कुणी घ्यायची?’’

‘‘आई, मुलीसारखी का म्हणता? मी मुलगीच आहे तुमची.’’ प्रतिमानं म्हटलं. आईंना भरून आलं. तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या, ‘‘खरंच म्हणतेस पोरी, मला मुलगी नव्हती. तुझ्या रूपानं मुलगी मिळाली.’’

आंबेहळदीचा लेप व भरपूर विश्रांती यामुळे लवकरच प्रतिमाचा पाय बरा झाला. दिवाळीचा उत्साह सगळ्यांनाच होता. सासूसुनेनं मिळून घराची सजावट बदलली. फराळाचे पदार्थही नेहमीपेक्षा जास्त केले. कारण एकमेकींची मदत होती. प्रतिमाला चिरोटे अन् अनरसे खूप छान जमत नसत. यावेळी तिनं आईंकडून त्यातले सर्व बारकावे समजून घेतले होते. दोन्ही पदार्थ छान जमले होते. आईंच्या संमतीनं तिनं यंदा तिच्या मैत्रिणींना फराळाला बोलावलं होतं. एक दिवस सोसायटीतल्या समस्त सासवाही फराळाला येणार होत्या.

‘‘माझा नंबर लागणार आहे की नाही?’’ श्रवणनं विचारलं.

‘‘नाही!’’ सासूसून एकदमच बोलल्या अन् सगळे हसायला लागले.

तेवढ्यात अमेरिकेहून दादाचा फोन आला. नंदिनीनं काही तरी म्हटल्यावर आई दुखावल्या होत्या. नाराज होऊन इथं आल्या होत्या. नंदिनीला अन् दादाला फार पश्चात्ताप होत होता. आईची क्षमा मागायला ती दोघं दिवाळीतच येणार होती. दादा अन् नंदिनीवहिनीला आईला सरप्राइज द्यायचं होतं म्हणून ही गोष्ट कुणाला सांगू नये म्हणून दादानं बजावलं होतं. श्रवणला खूप आनंद झाला. कितीतरी वर्षांनी सगळे असे एकत्र दिवाळी साजरी करणार होते.

आपला आनंद आणि उत्साह लपवताना श्रवणला खूपच सायास पडत होते. प्रतिमानं विचारलंसुद्धा, ‘‘तुम्ही खूपच आनंदात आहात…काय विशेष घडलंय?’’

‘‘छे: कुठं काय? तुम्हा सासवासुनांचा आनंद, उत्साह अन् प्रेम बघून मलाही आनंद होतोय.’’ श्रवणनं म्हटलं.

‘‘दृष्ट नका लावू हं आमच्या प्रेमाला.’’ प्रतिमानं दटावलं.

नर्कचतुर्दशीची पहाटेची अभ्यंग स्नानं, फटाके, फराळ वगैरे आटोपले. सायंकाळी लक्ष्मीपूजन होतं. आईनं आपल्या सूटकेसची किल्ली प्रतिमाला दिली अन् त्यातून लाल रंगाचा मखमली बॉक्स काढून आणायला सांगितलं. प्रतिमानं डबा आईच्या हातात दिला. तसा तो उघडून आईनं त्यातून सोन्याचा भक्कम नेकलेस काढून प्रतिमाला दिला. ‘‘सूनबाई, हा हार तुझ्या सासऱ्यांनी माझ्यासाठी खास घडवून आणला होता. आता यावर तुझा हक्क आहे. रात्री पुजेच्यावेळी नक्की घाल.’’ आईंचे डोळे भरून आले.

प्रतिमानं तो हार हातात घेऊन कपाळाला लावला आणि आईला नमस्कार केला. आईनं मनापासून आशिर्वाद दिले.

सायंकाळी पुजेची तयारी मांडून झाली दिवे पणत्यांनी घरदार, अंगण परिसर उजळला. तेवढ्यात बाहेर टॅक्सी थांबली.

आई पूजेसमोर येऊन बसली तेवढ्यात दादावहिनी येऊन आईच्या पाया पडले. आईला वाटलं आम्ही दोघं आहोत, ‘‘चला, पूजा सुरू करूयात,’’ ती म्हणतेय तोवर तिच्या लक्षात आलं की आम्ही दोघं बाजूला होतो. तिच्या पायाशी दादावहिनी आहेत. ती चकित झाली. तिला अजिबात कल्पना नसताना अमेरिकेतून नातवंड, मुलगा, सुनेनं येऊन आनंदाचा, आश्चर्याचा धक्का दिला होता. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

‘‘आई मला क्षमा करा,’’ नंदिनीवहिनीच्या डोळ्यांत अश्रू होते. आईनं तिला आवेगानं जवळ घेतली. तिचेही डोळे वाहत होते. पण दोघींच्या चेहऱ्यावर आनंद होता. बाहेर दिवे लखलखत होते. इथे घरातही सर्वांच्या मनांत दीप उजळले होते.

तडा गेला विश्वासाला

कथा * सुमन बाजपेयी

सकाळपासून भेटायला येणाऱ्या लोकांची वर्दळ घरात सुरू झाली होती. फोनही सतत वाजत होता. लॅन्डलाईन नंबर आणि मोबाइल अटेंड करण्यासाठीही एका चपराश्याची ड्यूटी लावलेली होती. तोच फोनवर सर्वांना सांगत होता, ‘‘साहेब आता व्यस्त आहेत. थोड्या वेळानं बोलतील,’’ तो सर्वांची नावं अन् नंबरही टिपून ठेवत होता. कुणी एखादा फारच अडून बसला तर तो चपरासी साहेबांकडे बघायचा, त्यांनी नाही म्हणून मान हलवली की तो क्षमा मागून फोन बंद करायचा.

साहेबांना इतक्या लोकांनी गराडा घातला होता की त्यांच्यापर्यंत पोहोचणंच मुळात अवघड होतं. त्यातला प्रत्येकजण अगदी हिरिरीनं सिद्ध करू बघत होता. जणू तोच रमणसाहेबांचा एकमेव जवळचा आहे. तोच त्यांचा आधार आहे. त्यांच्यावर आलेल्या संकटातून तोच एकटा त्यांना सांभाळू शकतो. धीर देणारी सांत्वन करणारी एकाहून एक सरस वाक्य त्या माणसांच्या मुखातून निघत होती.

‘‘ऐकून धक्काच बसला हो.’’

‘‘घडलं हे फारच वाईट झालंय…’’

‘‘सर, आम्ही इतकी वर्षं ओळखतोय तुम्हाला, तुम्ही कसे आहात ते आम्हाला ठाऊक आहे. तुमच्यासारखा सज्जन आणि प्रामाणिक माणूस असं करणारच नाही. तिनं मुद्दाम घडवून आणलंय हे सगळं.’’

‘‘होय ना? रमण सरांना कोण ओळखत नाही? ज्या डिपार्टमेन्टमध्ये लाच घेतल्याशिवाय एक कागद पुढे सरकत नाही, त्या डिपार्टमेंटमध्ये ते इतकी वर्ष स्वच्छ चारित्र्यानं वावरले. कधी एक पैसा कुणाकडून घेतला नाही अन् एका स्त्रीवर बळजबरी केल्याचा आरोप लावला जातोय त्यांच्यावर!’’

‘‘सर, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यावर हा आरोप लावू देणार नाही.’’

‘‘एमसीडी इतकं मोठं व्यवस्थापन आहे…इथं तर असं काही तरी नेहमीच चालू असतं.’’

‘‘सर तुम्ही हे मनाला लावून घेऊ नका. सीमा तशीही चवचाळ स्त्री आहे. तिला सगळेच ओळखतात.’’

गर्दी वाढत होती तशा चर्चाही वाढत होत्या. सहानुभूती दाखवणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसत होता.

कारण रमण अत्यंत शुद्ध, स्वच्छ चारित्र्याचा होता. इतरांना त्याचा हेवा वाटे, धाकही वाटे. ज्यांना त्यानं लाच घेऊ नका असा सज्जड दम दिला होता. त्यांना तर आज त्याच्यावर एका स्त्रीनं तिच्या अब्रूवर रमण उठलाय असा डांगोरा पिटलाय म्हटल्यावर मनांतून त्यांना सुप्त समाधान वाटत होतं. आता जर सस्पेंड झाला तर काय होईल? कोर्टात केस होईल. अब्रूची लक्तरं वेशीवर टांगली जातील. घरीदारी कोणी मान तरी देईल का?

रमणची बायको अनुराधा सकाळपासून स्वत:च्या खोलीतून बाहेरही आली नव्हती. जेव्हापासून तिला तिच्या नवऱ्यावर आलेला आळ आणि त्याला कदाचित सस्पेंड करतील ही बातमी कळली होती. तिच्या डोळ्यातले अश्रू थांबलेच नव्हते. रमण असं करणार नाही याबद्दल तिला खात्री होती, पण इतका उघड आरोप झालाय म्हणजे…काहीतरी असेलही ही शंका जीव कुरतडत होती. एमसीडीमधला इतका मोठा अधिकारी इतकी खालची पातळी गाठू शकतो या कल्पनेनंच ती अर्धमेली झाली होती.

दुपारपर्यंत घरी आलेले सगळे लोक रमणचा निरोप घेऊन, त्यांच्याशी हात मिळवून निघून गेले होते. रविवार होता म्हणून इतकी मंडळी येऊही शकली होती. बरेच लोक सुट्टी घ्यावी लागली नाही म्हणून, अनेकजण न येण्याबद्दल काही कारण द्यावं लागलं नाही, म्हणून आनंदातच होते. त्यांच्यावर जळणारे, त्यांचा हेवा करणारेदेखील, दिलाशाचे बोल बोलून निघून गेले. थकलेले, त्रासलेले आणि इभ्रतीवर डाग लागल्यामुळे दुखावलेले रमण पार गोंधळून गेले होते.

इतकी वर्ष चारित्र्य निष्कलंक ठेवलं अन् आता मान खाली घालायची वेळ आली. एवढीशीही चूक नसताना इतका अपमान सहन करावा लागतोय…घरच्यांना, नातलग, परिचितांना काय उत्तर द्यायचं? पाय ओढत कसेबसे रमण आपल्या खोलीत आले.

त्यांना बघताच पत्नी अनुराधा तिथून उठून बाहेर जाऊ लागली. तिच्या सगळ्या नातलगांनी त्याच खोलीत ठिय्या दिला होता. रमणनं तिचा हात धरला. ते इतर लोकांना म्हणाले,

‘‘मला अनुराधेशी थोडं बोलायचं आहे. तुम्ही सर्व काही वेळासाठी बाहेर गेलात तर बरं होईल.’’

‘‘मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीए.’’ त्यांचा हात झटकून टाकत अनुराधा रागानं म्हणाली, ‘‘काय उरलंय आता सांगायला अन् ऐकायला? कुठं तोंड दाखवायला जागा नाही उरली मला. अहो, निदान मुलांचा तरी विचार करायचा होता. दोन मुलं आहेत तुम्हाला अन् बेचाळीस वर्षांचं वय आहे. या वयात असं वागताना लाज नाही वाटली?’’ बोलता बोलता तिला परत रडू कोसळलं.

‘‘राधा, तू शिकलेली आहेस. रोज पेपर वाचतेस, अगं, स्त्रियांच्या बाजूने कायदे झाल्यापासून पुरूषांना अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतंय. अगं, मला अडकवलंय यात…यातलं एकही अक्षर खरं नाहीए. आक्रस्ताळ्या अन् कष्ट न करता सर्व हवं असलेल्या स्त्रिया असं वागतात हे तर तुलाही ठाऊक आहे ना? अन् तू मला ओळखत नाहीस का? माझं किती प्रेम आहे तुझ्यावर, मुलांवर आणि संसारावर. तुला माहीत आहे ना? मी असं कसं वागेन? तू तरी निदान मला समजून घेशील ना?’’

‘‘इतकं सगळं झाल्यावर आता आणखी काय समजून घ्यायचं शिल्लक राहिलं आहे? तुम्हीच विचार करा. कुणीही स्त्री असं कशाला करेल? त्यात तिचीही बेअब्रू आहेच ना? ती ही विवाहित आहे. विनाकारण इतका मोठा आरोप तुमच्यावर का करेल ती? तिनं खोटेपणा केला हे सिद्ध झालं तर तिची नोकरी जाईल, ती सस्पेंड होईल एवढंच नाही तर तिचाही संसार उद्ध्वस्त होईल ना? मला उगीच काही तरी सांगू नका. पुढे काय होईल कुणास ठाऊक पण आता तरी मी तुमच्याबरोबर राहू शकणार नाही. मी मुलांना घेऊन आजच माहेरी जाते आहे. इतक्या वर्षांच्या वैवाहिक जीवनात तुमच्यावर कायम विश्वास ठेवला मी, तुम्ही मात्र विश्वासघात केलात माझा,’’ राधा फुत्कारली.

‘‘उगीच भलते आरोप करू नकोस. मी कोणतीही चूक केली नाहीए. न केलेल्या गोष्टींची शिक्षाही मी भोगणार नाही. इनव्हेस्टिगेशनमध्ये खरं काय ते समोर येईलच. मागे ही मी तुला सांगितलं होतं की माझ्या हाताखाली काम करणारी सीमा फार आळशी अन् कामचोर आहे. ती माझ्या नावावर लोकांकडून पैसे घेते. साहेबांनीच मागितले आहेत म्हणून खोटं बोलते. त्यामुळे तिचं प्रमोशन होत नाहीए. एमसीडी असा विभाग आहे जो सर्वात वाईट अन् भ्रष्ट म्हणून ओळखला जातो. तिथंही मी माझं नाव निष्कलंक ठेवलंय. आमच्या विभागात तर एकापेक्षा एक निकम्मी बिनकामाची माणसं पैसेवाली होऊन बसली आहेत.’’

‘‘मी लाच घेत नाही, अन् कुणाला घाबरतही नाही. काम स्वच्छ अन् प्रामाणिकपणे करतो म्हणून मला पुढे शत्रूही खूप आहेत. बरेच दिवसांपासून सीमा प्रमोशनसाठी मागे लागली आहे. खूप त्रास देते आहे. मी तिला मध्यंतरी रागावलो, जरा समज दिली, तेव्हाच तिनं मला धमकी दिली की ती मला बघून घेईल. गुरूवारी पुन्हा ती माझ्या केबिनमध्ये आली आणि प्रमोशन देताय की नाही असं विचारलं.

‘‘मी जेव्हा ‘नाही’ म्हटलं तेव्हा तिनं स्वत:च आपला ब्लाऊज फाडला. साडी फाडली अन् मोठमोठ्यानं रडून ओरडून मी तिच्यावर बळजबरी करतोय असा कांगावा केला. लोक लगेच गोळा झाले. मी तिला मॉलेस्ट करतोय. असं ती रडून रडून सांगू लागली. स्टाफमधल्या स्त्रियांनी तिला बाहेर नेलं. काही लोक माझ्या बाजूनं बोलू लागले. काहींनी सीमाची बाजू घेतली. आता इनव्हेस्टिगेशनमध्ये खरं काय ते कळेलच. माझ्या शिपायानं सांगितलंय की त्यावेळी माझ्या केबिनमधला सी.सी. कॅमेरा चालू होता. त्यात सगळं रेकॉर्ड झालंच असेल. मी निर्दोष आहे.’’ उत्तजेना अन् अशक्तपणामुळे रमण थरथरत होता.

याचवेळी त्याला पत्नीची अन् मुलांच्या आधाराची गरज होती. पण पत्नीच त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यामुळे त्याला फारच मोठा मानसिक धक्का बसला होता. अंगातली शक्ती संपल्यासारख वाटत होतं. विश्वासाच्या मुळांनांच हादरा बसला होता, त्यामुळे नातीही दुभंगली होती. त्याला कळेना, कुठं चुकलं त्याचं? बायकोमुलांवर आयुष्य उधळलं, तरी असं का व्हावं?

‘‘उगीच काही तरी रचून कहाणी सांगू नका, इतके मोठे ऑफिसर आहात अन् एका सामान्य स्त्रीला बदनाम करताय? तुम्हाला बदनाम करून तिला काय मिळणार आहे? अन् ती जर खरीच चवचाल असती तर तिनं इतरांबरोबरही असाच प्रयोग केला असता ना? अजून कुणी काही तक्रार नाही केलीये तिच्याबद्दल…’’ राधा काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती.

‘‘तुझं म्हणणं खरं आहे. तिनं हे असं प्रथमच केलंय. पण तिच्याबद्दल सगळे लोक वाईटच बोलतात. तिची राहणी हा तर सर्व पुरूषांच्या मनोरंजनाचा विषय आहे. पुरूषांना जाळ्यात ओढायलाच जणू ती अशी वागते.’’

‘‘शी:शी, रमण, असे विचार आहेत तुमचे?’’ राधा पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्या माहेरची मंडळी आत आली.

‘‘अनु, कसला विचार करते आहेस? अजूनही या माणसाबरोबरच रहायचंय तुला? सगळीकडे छी थू, चाललीय त्याच्या नावानं, मुलांवर किती वाईट परिणाम होईल या गोष्टीचा. शाळेतली इतर मुलं किती त्रास देतील तुझ्या मुलांना…चल, तू आमच्याबरोबर चल.’’ अनुराधेच्या भावानं म्हटलं.

‘‘नाही तर काय? तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही आहोत तुला आधार द्यायला. शिवाय तू नोकरीही करते आहेस, राधाच्या आईनं अत्यंत तिरस्कारानं जावयाकडे बघत म्हटलं. जणू त्यांचा अपराध सिद्ध झाला होता.

आजपर्यंत सासरची जी माणसं रमणच्या चांगुलपणाचे गोडवे गातावा थकत नव्हती ती आता त्यांचा तिरस्कार करत होती. रमणला खूप वाईट वाटलं, तो स्वत: निर्दोष होता हे त्रिवार सत्य होतं. पण अजून ते लोकांच्या पचनी पडत नव्हतं. त्यांनी रमणला आरोपीच्या पिंजऱ्यातच उभं केलं होतं.

‘‘बाबा, तुम्ही तरी समजवा ना यांना,’’ रमणनं सासऱ्याकंडे बघत विनवणी केली. अनुराधेचे बाबा अत्यंत शांत व समंजस होते. विचार केल्याशिवाय ते कोणतीही कृती करत नसत.

‘‘हो गं अनु. तू नवऱ्यावर विश्वास ठेवायलाच हवा. माझा रमणवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही इतकी वर्ष एकत्र राहताय…तुला ठाऊक आहे रमण किती सज्जन अन् स्वच्छ चारित्र्याचा आहे. तो असं वागणारच नाही. तू आपला संसार मोडू नकोस?’’ बाबा म्हणाले.

सासूबाई एकदम भडकल्या, ‘‘आपल्या मुलीची कड घेण्याऐवजी तुम्ही या माणसाची बाजू घेता आहात ज्यानं एका स्त्रीच्या अब्रूला हात घातला? आत्तापर्यंत कुणास ठाऊक किती जणींशी त्याचे संबंध आले असतील. आमची पोर गरीब…तिला कळलंच नसेल काही, भलेपणाच्या आड माणूस काय वाट्टेल ते करू शकतो.’’

‘‘आई, काय बोलताय? मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. संकटाच्या वेळीच आपल्या माणसांचा आधार हवा असतो. पण तुम्ही आणि राधाही माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. इतक्या वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतरही जर नवरा बायकोतला विश्वास भक्कम नसेल तर नात्याला अन् एकत्र राहण्याला तरी काय अर्थ आहे?’’

‘‘राधा, आता मी तुला अडवणार नाही, माझ्याकडून तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण एकच सांगतो, हे घर तुझंच होतं, तुझंच आहे, पुढेही तुझंच राहील.’’

क्षणभर राधाचं मन डगमगलं. ती चूक करतेय का? रमणसारखा पती अन् पिता दुसरा नसेल. इतक्या वर्षांत त्यानं कधी तिला दुखावलं नव्हतं. कधी अपमान केला नव्हता. कुठली बंधनं घातली नव्हती. कधी काही कमी पडू दिलं नव्हतं. तर मग आज तिचा विश्वास का डळमळतोय? दुसऱ्या कुणी काही सांगितलं तर तीही लगेच दोष का काढते आहे? ती क्षणभर थबकली. रमणशी काही बोलणार तेवढ्यात आईनं हात धरून ओढत तिला खोली बाहेर काढलं. मुलं बावरून कोमेजून उभी होती.

‘‘आई, बाबा काय म्हणताहेत ते नीट समजून घे ना.’’ अठरा वर्षांची मोठी मुलगी पुढंही काही बोलणार तोच तिची आजी कडाडली, ‘‘गप्प राहा तू, लहान आहेस, तुला काय कळतंय?’’

आजीचा ओरडा ऐकून ती गप्प बसली. पण तिचा बाबांवर पूर्ण विश्वास होता अन् आईनंही बाबांचं म्हणणं समजून घ्यावं असं तिला वाटत होतं. चौदा वर्षांचा धाकटा भाऊ रडायला लागला होता. तिनं त्याला जवळ घेऊन धीर दिला. ती त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली. तिला स्वत:लाही रडायला येत होतं. आजीसकट सगळ्यांचा खूप खूप राग आला होता. तिच्या बाबांना कुणी नावं ठेवलेली तिला अजिबात आवडत नव्हती.

राधा आणि मुलं निघून गेल्यावर ते घर रमणला खायला उठलं. त्यांना आता सीमाची भीती वाटू लागली. ती कोर्टातही सांगेल की रमणनं पूर्वीही तिच्याबरोबर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. एवंढच नव्हे तर सेक्स संबंधासाठीही विचारलं होतं. रमणची बाजू कितीही भक्कम असली तरी त्याच्याकडे पुरावा कुठं होता. एकमेव भिस्त होती ती खोलीतल्या सीसी कॅमेऱ्याच्या फुटेजवर, पण ती फिल्म त्यांनी डोळ्यांनी बघितलीच नव्हती. कारण ती आता कोर्टातच दाखवली जाणार. पण कायदे अशा बाबतीत स्त्रियांच्या बाजूचे असतात. त्यातून हे सर्व प्रतिष्ठित ऑफिसच्या प्रतिष्ठित ऑफिसरसोबत घडलं होतं. जो अत्यंत भीरू होता. कायदा विकत घेणं त्याला जमणार नव्हतं. जे एरवी गुंडपुंड सहज करतात.

बायकोमुलं सोडून गेली. बरेचसे नातलगही दूर झाले. मित्रही थोडेच उरले…रमणला एकाएकी खूप भीती वाटली. घशाला कोरड पडली. घरात अंधारात एकटेच बसून होते. पाणी हवं होतं प्यायला पण उठवंसं वाटेना. सवयीप्रमाणे ‘राधा…’ म्हणून हाक मारणार तेवढ्यात आठवलं की ती इथं नाहीए.

अन् अचानक समोर अनुराधा दिसली. हा भास की वस्तुस्थिती? तो दचकून सावरून बसला. खोलीतला दिवा लावत राधा म्हणाली, ‘‘मला क्षमा करा रमण. मी तुमच्यावर रागावले, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. विश्वास ठेवला नाही. या गुन्ह्यांसाठी द्याल ती शिक्षा मी भोगेन. फक्त मला क्षमा करा. मला खरं काय ते कळलं आहे, तुमची बाजू कळली आहे.’’ तिनं त्यांना मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. पश्चात्ताप झाला होता तिला.

‘‘अगं, पण अजून केस, इनव्हिगेशन पूर्ण कुठं झालंय?’’ रमणच्या मनातली भीती आता पूर्णपणे गेली होती. खोलीतल्या उजेडात, राधाच्या मिठीत त्यांना खूप सुरक्षित वाटत होतं.

राधानं त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. ती बोलू लागली.

‘‘सीमाचा नवरा मला भेटायला आला होता. त्यांनी मला सांगितलं की ते सार्वजनिकरित्या हे बोलू शकणार नाही. कारण ते स्वत: आजारी आहेत. घर सीमाच चालवते. पण त्यांनी तुमची क्षमा मागितली आहे. कारण सीमानं हा सगळा बनाव मुद्दाम घडवून आणला आहे. एरवी तुमच्या प्रामाणिकपणाची अन् शुद्ध चारित्र्याची तिलाही भीती वाटते पण ती फार महत्त्वाकांक्षी आहे. कष्ट न करता सगळं मिळावं हा एक अजून दुर्गण तिच्यात आहे. तिच्यामुळे आपण विभक्त झालो हे त्यांच्या मनाला फार लागलंय. त्यांनीच मला सांगितलयकी मी तुमच्याजवळच रहावं. केसचा निकाल लागला की कलंकही धुतला जाईल.’’

‘‘तुम्ही तिला पैसे खाऊ देत नव्हता. प्रमोशन देत नव्हता, तिच्या विरूद्ध अॅक्शन घेण्याची वॉर्निंगही दिली होती. म्हणूनच तिनं हा डाव रचला.’’

‘‘या संकटातून आपण सहीसलामत बाहेर पडू. मला खात्री आहे तुमचं प्रेम, तुमचं चारित्र्य, सगळ्याचाच मला अभिमान वाटतोय यापुढे मी असा वेडेपणा करणार नाही.’’

या वळणावर, अशा अवेळी

कथा * नीता दाणी

मोबाइलची घंटी वाजली म्हणून संध्याने फोन घेतला. त्यावरचा नंबर अन् नाव बघून तिच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. ती मुकाट बसून राहिली. दहा मिनिटातच तिच्या लॅण्डलाइन फोनची घंटी वाजली. आय डी कॉलरवरून नंबर चेक केला तर तोच होता…क्षणभर तिला वाटलं फोन उचलून बोलावं…पण मनाला आवर घालून तिने त्याही फोनकडे दुर्लक्षच केलं.

मग ती आपल्या रोजच्या कामाला लागली. घराची स्वच्छता, ब्रेकफास्ट, चहा, डबा भरणं, ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं, सायंकाळी थकून घरी परत येणं हीच तिची दिनचर्या होती. घरी परतल्यावर रिकामं घर अन् एकटेपणा अंगावर यायचा. दमलेलं शरीर कसंबसं ओढत ती चहा करून घ्यायची. टीव्ही सुरू करून सोफ्यावर बसायची. कार्यक्रम डोळ्यांना दिसायचे. काही मेंदूपर्यंत पोहोचायचे अन् काही कळायचेही नाहीत. झोप येईपर्यंत टीव्ही सुरू असायचा. त्या आवाजामुळे घरात थोडं चैतन्य जाणवायचं. मध्येच केव्हा तरी सकाळी केलेली पोळीभाजी गरम करून ती जेवायची अन् मग झोप!

पण रात्रीच्या वेळी नीरव शांततेत थोडा जरी आवाज झाला तरी ती फार घाबरायची. दचकून जागी व्हायची. एकदा रात्री ती झोपलेली असताना बाहेरच्या दाराची घंटी वाजायला लागली. एवढ्या रात्री कोण आलं असेल या विचाराने ती घाबरली. कसाबसा धीर गोळा करून ओरडून विचारलं, ‘‘कोण आहे?’’ काहीच उत्तर मिळालं नाही. कापऱ्या हातांनी तिने खिडकी उघडून बघितली. कुणीच दिसलं नाही.

कंपाउंडच्या गेटची घंटी सतत वाजतच होती. शेवटी धाडस करून ती खोलीबाहेर आली. घराचा मुख्य दरवाजा उघडून लॉनवर आली, तेव्हा लक्षात आलं, बाहेरून जाणाऱ्या कुणा वात्रट वाटसरूने बेलचं बटन दाबलं होतं. अन् ते तसंच दाबलेलं राहिल्यामुळे घंटी अखंड वाजत होती. तिने घंटीचं बटन बंद केलं. भराभर आत येऊन पुन्हा दारं लावली. पण त्यानंतर सारी रात्र तिने जागून काढली होती.

संध्याच्या नवऱ्याच्या मृत्युला बरीच वर्षं झालीत. दोन्ही मुलींची लग्नं झालीत. एक मुलगी अमेरिकेत असते, दुसरी भारतातच पण बरीच लांब राहाते. संध्याची नोकरी चांगली आहे. भरपूर पगार व इतर सोयी आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत ती बिझी असते. दिवस कसा संपतो ते कळत नाही. पण संध्याकाळी घरी आल्यावर मात्र दिवसभराचा थकवा अन् एकाकीपणा एकदम अंगावर येतो. मुलींशी रोजच फोनवर, स्काइपवर बोलणं होतं. पण त्या आपापल्या संसारात मग्न आहेत. त्यांना आपलं घर सोडून आईची काळजी घेणं जमत नाही. कधी तरी बरं नसलं तर हा एकाकीपणा अजूनच अंगावर येतो.

एक दिवस ऑफिस संपवून संध्या घरी परतली तेव्हा तिच्या लेटर बॉक्समध्ये एक पत्र आलेलं होतं. तिने पत्र घेतलं, कुलूप उघडून ती घरात आली. सोफ्यावर बसून तिने पत्र उघडलं.

‘‘संध्या, फोनवर तुम्ही भेटत नाही म्हणून मी पत्र लिहितोय. माझ्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याशी संवाद होणं गरजेचं आहे.

आमच्या चार वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर माझी पत्नी देवाघरी गेली. तेव्हापासून आमच्या एकुलत्या एका मुलाला मी एकट्यांनेच वाढवलंय. मनात दुसऱ्या लग्नाचा विचारही कधी आला नाही. पण आयुष्याच्या या वळणावर तुमची भेट झाली आणि आपण एकत्र यावं असं वाटायला लागलं. माझा मुलगा वारंवार मला म्हणतो, आग्रह करतो की मी एक सुसंस्कृत शालीन अशी एकाकी स्त्री स्वत:ची सहचरी म्हणून निवडावी. एकटं राहू नये. म्हणूनच या वयात मी असा विचार करू धजलो आहे. दोन वर्षांत मी रिटायर होतोय. भरपूर पेन्शन मिळेल. त्याखेरीज जंगम स्थावर प्रॉपर्टी आहे. देवदयेने आरोग्य उत्तम आहे. नियमित आहार, विहार, विश्राम, व्यायाम यामुळे शरीर व मेंदू व्यवस्थित काम करताहेत.

सध्या फक्त तुमचाच विचार सतत मनात असतो. लोक काय म्हणतील याला मी फार महत्त्व देत नाही. प्रत्येक व्यक्तिला आनंदी राहाण्याचा, प्रेम मिळवण्याचा अन् आधार मिळवण्याचा हक्क आहे असं मी मानतो. तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल. उणेअधिक लिहिले असल्यास क्षमस्व!’’

पत्र वाचताना तिचं हृदय धडधडत होतं. हात कापत होते. पत्र वाचून तिने बाजूला सारलं. लिहिणाऱ्याच्या भावना स्पष्ट अन् प्रामाणिक होत्या. त्यामुळे ती भारावली होती.

रात्री जेवण झाल्यावर तिने टीव्ही लावला तेवढ्यात मोबाइल वाजला. तिने म्हटलं, ‘‘क्षमा करा, तुम्हाला वाटतंय तसं घडू शकणार नाही. मी माझ्या आयुष्यात सुखी अन् संतुष्ट आहे. मी एकटी नाही, माझं कुटुंब आहे.’’ तिने एवढं बोलून फोन स्विच ऑफ केला. टीव्ही बंद करून अंथरुणावर पडली. केव्हा तरी उशिरा झोप लागली.

दुसऱ्यादिवशी नेहमीप्रमाणे ऑफिसची कामं आवरून ती घरी निघण्याच्या तयारीत असतानाच एक व्यक्ती समोर येऊन ठाकली. ती दचकली.

‘‘तुम्ही?’’

‘‘होय मीच! यावंच लागलं मला. तुम्ही एकाएकी अशा का वागू लागलात? आधी ‘हो,’ आता ‘नाही’ बोलत नाही. फोन उचलंत नाही, आधी तुम्ही मला मौनातच स्वीकृती दिली होती ना?’’

संध्या त्याच्या नजरेला नजर देऊ शकली नाही. कशीबशी बोलली, ‘‘माझं चुकलंच, या वयात हे मला शोभणार नाही. मला घरी लवकर जायचंय.’’ पुढे तिला बोलवेना.

‘‘लोक काय म्हणतील या काळजीनेच तुम्ही स्वत:ला असं कोंडून घेताय…मला माहीत आहे.’’

‘‘प्लीज, मला एकटं सोडा. मला कुठल्याही नात्याच्या बंधनात अडकायचं नाहीए.’’ संध्या चिडचिडून म्हणाली.

घरी परतून ती थकून सोफ्यावरच आडवी झाली. चहाची नितांत गरज होती. पण उठून चहा करून घेण्याचीही शक्ती वाटत नव्हती. त्याक्षणी तिला रडू कोसळलं. ती शेखरशी खोटं बोलली होती. ‘मी एकाकी नाही, माझं कुटुंब आहे.’ खरं तर ती अगदी एकाकीच होती.

एकदा एका पार्टीला संध्या मोकळे केस सोडून, थोडा मेकअप करून गेली होती. तिच्या सगळ्याच सहकाऱ्यांनी तिला म्हटलं होतं, ‘‘संध्या, अगं किती सुंदर दिसतेस तू. वयाच्या मानाने दहा वर्षांनी तरुण दिसतेस. तब्येतही निरोगी आहे. तू खरं म्हणजे दुसरं लग्न कर.’’

संध्या त्यावेळी घाबरली होती. स्वत:च्या प्रशंसेने संकोचली होती. पण दोन चार दिवसातच तिचा एक पुरुष सहकारी त्याच्या एका मित्राला घेऊन तिच्याकडे आला अन् लग्नाचं प्रपोजल तिच्यापुढे मांडलं.

शेखरने स्वत:ची सर्व माहिती तिला व्यवस्थित दिली. तो एका प्रतिष्ठित कंपनीत उच्च पदावर काम करतो. पत्नीला जाऊन खूप वर्षं झालीत. एकच मुलगा आहे तो डॉक्टर आहे. त्याचं लग्न झालंय. तो दोन मुलांचा बाप आहे. मुलाला वडिलांच्या एकाकीपणाची जाणीव आहे. त्याचाच फार आग्रह आहे की वडिलांनी स्वत:साठी एक जीवनसंगिनी शोधावी.

त्या प्रपोजलमुळे संध्या विचलित झाली. शेखरचे फोन नेहमीच येऊ लागले. कधी ती जुजबी बोलून फोन बंद करायची. कधी फोन उचलायचीच नाही. कधी फोन उचलला तरी तिच्या तोंडून शब्द फुटत नसे.

मौनातला होकार शेखरला कळत होता, पण त्याला अभिप्रेत असलेला शाब्दिक होकार मात्र अजून मिळाला नव्हता.

संध्याला सासरचे कुणीच नातलग नव्हते. माहेरी वडील अन् दोघे विवाहित भाऊ होते. तिने वहिनीशी शेखरसंदर्भात चर्चा केली. तिच्याकडून बातमी घरात सर्वांना कळली. कुणाकडूनच सकारात्मक प्रतिसाद नव्हता. वडील तर संतापून म्हणाले, ‘‘अगं, तुझं वय मोहमाया सोडून अध्यात्माकडे वळण्याचं आहे. लग्न अन् संसाराच्या गोष्टी कशा करू शकतेस तू? रिकामा वेळ असला तर समाजसेवा कर. या वयात नव्या बंधनात अडकण्याची अवदसा कशी आठवली तुला?’’

घरच्यांच्या प्रतिक्रिया तिने शेखरला सांगितल्या अन् म्हणाली, ‘‘तुम्ही तुमच्यासाठी योग्य अशी सहचरी निवडा…मी अशीच एकटी बरी आहे.’’

त्यानंतरही शेखर तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर मात्र त्याचे फोन येणं बंद झालं होतं. दिवस उलटत होते. आता संध्यालाच फोन येत नाही म्हणून चुकल्यासारखं वाटत होतं. माझ्या रूक्ष, कोरड्या वागण्याने शेखर दुखावले गेले का? की शेखरचंच मन बदललं? तेच बरं म्हणायचं…आता या वयात कुठली नाती नकोतच.

पण दुसरं मत म्हणे, स्वत:हून तू फोन कर. फोन करू की नको या द्वंद्वातच काही दिवस गेले अन् एक दिवस शेवटी तिने एक मिस कॉल दिलाच. त्यावेळीही तिचं हृदय जोरात धडधडत होतं.

तिच्या मोबाइलवर ताबडतोब मेसेज आला, ‘‘मी फार काळजीत आहे, सध्या फोन करू शकत नाही.’’

तिने उलट मेसेज पाठवला, ‘‘काय झालं? कसली काळजी?’’ पण उत्तर आलं नाही.

दुसऱ्या दिवसापासून ती रोजच्याप्रमाणे कामाला लागली. उगीचच आपण फोन केला असं तिला वाटत राहिलं. अचानक एकदा मोबाइलची घंटी वाजली. फोन शेखरचा होता. त्याने सांगितलं की त्याचा डॉक्टर मुलगा इतर काही डॉक्टरांच्या टीमबरोबर एका ठिकाणी मदतकार्यासाठी गेला असताना स्वत:च गंभीर आजारी झाला. उपचारासाठी त्याला दिल्लीला आणलाय. आता त्याची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली आहे. मधल्या काळात फार काळजी वाटत होती. धावपळ फार झाली. वेळ मिळत नव्हता. तुम्ही कशा आहात? स्वत:ची काळजी घ्या. बाय, फोन ठेवतो. हॉस्पिटलला जायचंय. त्यानंतर संध्याला फोन आला नाही. तिनेही केला नाही.

एकदा सायंकाळी ऑफिसमधून ती आपल्या स्कूटरवरून घरी निघालेली असताना एकाएकी तिला चक्कर आली. डोळ्यांपुढे अंधारी आली अन् एक किंकाळी फोडून ती वाहनासहित जमिनीवर आदळली. पुढे काय झालं ते तिला कळलं नाही. शुद्धीवर आली तेव्हा ती इस्पितळात होती.

तिने ऑफिसच्या सहकाऱ्यांना फोन केला. दोघीतिघी लगेच आल्या. तिच्यावरचे उपचार जाणून घेतले. औषधं आणली अन् तिला घरी घेऊन आल्या. तिला खायला घातलं, गोळ्या दिल्या. रात्री व सायंकाळी खाण्यासाठी लागणारे पदार्थ व गोळ्या तिच्या बेडजवळच्या टेबलवर मांडून ठेवल्या अन् मग त्या परत गेल्या. ‘‘आठ दिवस रजा घे. आम्ही सर्व सांभाळू,’’ असं बजावून त्या गेल्या.

संध्याच्या सर्वांगाला भरपूर मुका मार लागला होता. वेदनाशामक गोळी व झोपेची गोळी यामुळे ती रात्री बऱ्यापैकी झोपू शकली. सकाळी मात्र जाग आली तेव्हा डोकं प्रचंड दुखत होतं. सर्वांग ठणकत होतं. सणसणून ताप भरला होता. अंथरुणातून उठवत नव्हतं. पण फोन वाजत होता. तिने कसाबसा फोन उचलून कानाला लावला.

‘‘हॅलो संध्या, कशा आहात तुम्ही?’’ त्या प्रश्नातल्या आपलेपणाची भावना तिला स्पर्शून गेली. तिला एकदम भरून आलं. ‘‘ताप आलाय, झोपून आहे, अपघात झाला.’’ दाटल्या कंठाने तिने म्हटलं अन् फोन तिच्या हातातून गळून पडला.

तिने कसाबसा चहा करून घेतला. दोन बिस्किटं अन् चहा संपवून तापाची अन् अंगदुखीवरची गोळी घेऊन ती पडून राहिली. गोळी अन् तापाची गुंगी यामुळे किती वेळ गेला ते तिला कळलं नाही पण दारावरच्या घंटीच्या आवाजाने तिला जाग आली.

दरवाजा उघडला अन् दारातल्या व्यक्तिला बघून ती एकदम दचकली, बावरली अन् लाजलीही. झोपेतून उठून आल्यामुळे साडी अन् केस अस्ताव्यस्त होते.

कशीबशी म्हणाली, ‘‘तुम्ही…?’’

‘‘आता तरी येऊ द्या,’’ शेखरने म्हटलं.

ती पटकन् दारातून बाजूला झाली. तिच्या हातापायावरच्या मुक्या माराच्या खुणांकडे बघत तो म्हणाला, ‘‘जबरदस्त अॅक्सिडेंट झालाय…अरे? तुम्हाला भरपूर तापही आहे?’’ तिच्या कपाळाला अन् मनगटाला हात लावून त्याने म्हटलं.

‘‘तुम्ही अशाच गाडीत बसा. डॉक्टरकडे जाऊन येऊ.’’ त्याच्या शब्दाला संध्याला नाही म्हणवेना.

शेखरचे डॉक्टर छान होते. त्यांनी संध्याला अधिक परिणामकारक औषधं दिली. कशी अन् केव्हा घ्यायची ते समजावून सांगितलं.

शेखरने  तिला घरी आणून सोडली. तिच्या स्वयंपाकघरात जाऊन स्वत: सांजा तयार केला. तिला दुधाबरोबर खायला घातला. गोळ्या दिल्या. संध्याने आज्ञाधारक मुलाप्रमाणे सगळं करून घेतलं.

‘‘आता शांतपणे पडून राहा, झोप लागेल तुम्हाला. झोपून उठल्यावर खाण्यासाठी काही तरी करून ठेवतो अन् लॅचचं दार ओढून घेऊन मी जातो. काहीही गरज भासली तर ताबडतोब फोन करा. संकोच करू नका.’’ एवढं बोलून शेखर पुन्हा स्वयंपाकघरात गेला. बायकोविना इतकी वर्षं काढली होती. त्यामुळे एखाद्या गृहिणीच्या कौशल्याने तो स्वयंपाकघरात वावरत होता.

शेखर निघून गेल्यावरही संध्याला त्याचं ते सहज वावरणं, तिची काळजी घेणं, त्याचा तो ओझारता स्पर्श पुन:पुन्हा आठवत होता. तिच्या एकाकी, नीरस आयुष्यात त्यामुळे थोडा ओलावा आला होता.

संध्याची तब्येत हळूहळू पूर्वपदावर आली. एक दिवस तिच्या मुलीचा स्वप्नाचा फोन आला. तिच्या पाच वर्षांच्या मुलाला घेऊन ती भारतात आईला भेटायला येणार म्हटल्यावर संध्याच्या उत्साहाला उधाण आलं. नातवाच्या, लेकीच्या स्वागतासाठी तिने बरीच तयारी केली.

त्यांच्या येण्याने घरात एकदम चैतन्य आलं. ‘‘आई, हा शेखर कोण आहे?’’ स्वप्नाच्या या अनपेक्षित प्रश्नाने संध्या एकदम दचकली.

‘‘कलीग आहेत.’’ संध्याने तुटक उत्तरात विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

‘‘तुझ्या मोबाइलवर त्यांचे कॉल्स बघितले.’’

संध्याने काहीच उत्तर दिलं नाही. पण तिचं बावरलेपण, हातांची थरथर यामुळे स्वप्ना अधिकच रोखून बघत राहिली.

एकदा रात्री अकरा वाजता संध्याच्या मोबाइलची रिंग वाजली. तिने पटकन् मोबाइल उचलला अन् ‘‘सध्या नातू, मुलगी आलेली आहेत,’’ असं उत्तर देऊन फोन बंद करण्याआधीच शेखर बोलला,

‘‘फारच छान! मुलीशी आपल्या एकत्र येण्याविषयी बोलून ठेवा. तुम्ही म्हणत असाल तर मी स्वत: येऊन तिच्याशी बोलतो.’’

‘‘नको…नको.’’ संध्या घाबरली. तिने फोन स्विच ऑफ केला.

आईचा चेहरा अन् थरथरणारे हात बघून स्वप्नाने विचारलं, ‘‘एवढ्या रात्री कुणाचा फोन होता, ममा?’’

उत्तर न देता संध्या पलंगावर आडवी झाली.

‘‘काय झालं, ममा? तू अशी बावरलेली, अस्वस्थ का आहेस? काही प्रॉब्लेम आहे का?’’ संध्याने मानेनेच नकार दिला.

संध्याच्या मनात कल्लोळ चाललेला. स्वप्नाला सांगावं का? तिची प्रतिक्रिया काय असेल? आईच्या आयुष्यात दुसरा पुरुष मुलींना आवडेल का? सगळं ऐकून घेतल्यावर ती अन् स्वप्ना सहज मोकळेपणाने आपसांत बोलू शकतील का? संध्याची फार तडफड होत होती. आपल्या भावना, आपली नवी मैत्री, त्यामुळे जीवनात आलेला आनंद हे तिला कुणाशी तरी शेयर करायची इच्छा होती पण समाजाची भीती, मुलींचा तुटकपणा यामुळे ती फार तणावात होती.

स्वप्नाने पुन:पुन्हा विचारल्यावर तिने शेखरबद्दल सगळं स्वप्नाला सांगितलं. पण तिचा कठोर चेहरा अन् एकूणच आविर्भाव बघून ती घाबरी झाली.

‘‘ममा, तुला कुणीतरी इमोशनली ब्लॅकमेल करतंय. तुला कळत नाहीए, तू फार साधी, सरळ आहेस. तुझी नोकरी, घर, पैसा बघून तुला कुणी तरी जाळ्यात ओढायला बघतंय. आता त्याचा फोन आला तर मला दे. चांगली फायर करते त्याला.’’

‘‘अगं पण बाळा, आर्थिकदृष्ट्या ते माझ्याहूनही भक्कम आहेत. माझ्या नोकरी, प्रॉपर्टीशी त्यांना काहीच देणंघेणं नाहीए…’’

‘‘पण ममा, आता या वयात तुला हे नवं खूळ काय सुचतंय? अगं, किती तरी स्त्रिया तुझ्यासारख्या एकट्या राहताहेत पण म्हातारपणी कुणी लग्न करत नाहीत. ही गोष्ट माझ्या सासरी समजली तर ते लोक काय म्हणतील? किती चेष्टा करतील ते…अन् शिवाय, आम्ही आहोत ना तुला? काही दु:ख, त्रास असेल तर आम्हाला सांग ना…कुणातरी बाहेरच्याला काही तरी सांगून सहानुभूती कशाला मिळवायची?’’ स्वप्ना संतापून बोलत होती. अधिकच रागाने बोलली, ‘‘अन् हे जर राहुलला, तुझ्या जावयाला समजलं की त्याची सासू पुन्हा लग्न करून संसार थाटतेय तर त्याला काय वाटेल?’’

संध्याला त्या क्षणी इतकं अपराधी वाटलं की तिच्या डोळ्यांत पाणीच आलं.

स्वप्ना परत जायला निघाली तेव्हा म्हणाली, ‘‘आई, मी लवकरच पुन्हा येईन, रिटायरमेंटनंतर तू माझ्याकडेच राहायचंस…ठरलं…’’

संध्या फक्त उदास हसली.

‘‘मी कोमललाही सांगितलंय. तीही इथे येणार आहे.’’

‘‘बरं!’’

स्वप्ना गेली अन् घर एकदम रिकामंरिकामं, उदास झालं. स्वत:ला सावरून संध्या रोजच्या दिनक्रमाला लागली. शेखरचा फोन आला तरी ती उचलत नव्हती.

कोमल, तिचा नवरा नीरज अन् मुलगी रेखा घरी आले अन् संध्याचं घर पुन्हा एकदा चैतन्याने न्हाउन निघालं. अधूनमधून संध्या रजा टाकायची, मग सिनेमा, बाहेर भटकणं, शॉपिंग, हॉटेलिंग असा भरगच्च कार्यक्रम असायचा. संध्या आनंदात होती.

‘‘आई, हे शेखर कोण आहेत?’’ कोमलने खट्याळपणे हसत विचारलं.

संध्या एकदम स्तब्ध झाली, कोमेजली. आता कोमलही कठोरपणे बोलेल.

‘‘मला स्वप्नाताईने सांगितलं होतं.’’

संध्या कासावीस झाली. बोलणं सुधरेना.

‘‘ममा, अगं, ही तर फारच छान गोष्ट आहे. आम्ही दोघी बहिणी तुझ्यापासून लांब असतो. पुन्हा आमच्या संसाराच्या व्यापात तुझ्याकडे लक्षही देऊ शकत नाही. अशावेळी तुला भक्कम आधार असेल तर किती छान होईल. स्वप्नाताईला समजावून सांगावं लागेल. ते माझ्याकडे लागलं. तू शेखर अंकलना अन् त्यांच्या मुलाला घरी बोलावून घे. नीरजनाही त्यांना भेटायचं आहे.’’

संध्या लेकीकडे डोळे विस्फारून बघतंच राहिली. कोमलनेच शेखरला फोन करून सायंकाळी घरी येण्याचं आमंत्रण दिलं.

सुर्दैवाने शेखरचा डॉक्टर मुलगाही तेव्हा आलेला होता. त्या संध्याकाळी संध्या, नीरज, कोमल, शेखर व डॉ. अमोल अशी सर्व एकत्र जमली. मोकळेपणाने गप्पा झाल्या. चहा, फराळ आटोपला.

डॉ. अमोल म्हणाला, ‘‘माझ्या व्यवसायामुळे मी बाबांकडे पुरेसं लक्ष देऊ शकत नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केलंय. आता त्यांनाही सुख मिळावं, प्रेमाचं, हक्काचं माणूस मिळावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठीच मी इथे आलोय..’’

संध्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. कोमल अन् नीरजला शेखर अंकल अन् डॉ. अमोल एकदम पसंत पडले होते. त्यांच्याकडून या नात्याला होकार होताच.

डॉ. अमोल उठून संध्याजवळ येऊन बसला. तिचे हात हातात घेऊन म्हणाला, ‘‘मावशी, आता मनात कुठलाही किंतू बाळगू नकोस. आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. आयुष्याच्या या वळणावर माझे बाबा तुझी वाट बघताहेत. त्यांना सोबत कर. मी अन् माझ्या दोघी बहिणी कोमल अन् स्वप्ना…सतत तुमच्या मदतीला असू.’’

‘‘खरंय आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता हसा बरं? आमचा सर्वांचा आनंद तुमच्या हसण्यातच सामावला आहे.’’ नीरजने म्हटलं. सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं. जावयाकडे बघून संध्या प्रसन्न हसली. शेखरही सुखावला. सगळेच आनंदात होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें