* सुरेखा सावे
ऑफिसातून घरी परतताना रात्रीचे आठ वाजून गेले होते. घरात शिरताच प्रतिमाचा बिघडलेला मूड श्रवणला जाणवला. कारण एरवी हसून स्वागत करणारी प्रतिमा बरीच काळजीत दिसत होती. दिवसभरातल्या आळीतल्या, घरातल्या सर्व वितंबातम्या आल्या आल्या श्रवणला सांगून मगच ती इतर कामाला लागायची. पण आज तिनं मुकाट्यानं चहाचा कप पुढ्यात ठेवला.
तिची क्षमा मागत श्रवणनं म्हटलं, ‘‘सॉरी, मी तुला फोन करू शकलो नाही...अगं महिन्याच्या शेवटच्या दिवशी ना, काम जरा जास्तच असतं...’’
‘‘तुमच्या कामाची कल्पना आहे मला...पण मला दुसरीच काळजी सतावते आहे...’’ प्रतिमा म्हणाली.
‘‘अरे? आम्हालाही कळू देत काय दु:ख आहे माझ्या चंद्रमुखीला.’’ श्रवणनं म्हटलं.
‘‘दुपारी मोठ्या वहिनींचा फोन आला होता अमेरिकेहून, उद्या सायंकाळी सासूबाई इथं पोचताहेत...’’
‘‘हात्तिच्या! एवढंच ना? मग त्यात काळजीचं काय कारण आहे? आईचं घर आहे ती केव्हाही येऊ शकते ना?’’ श्रवणनं विचारलं.
‘‘तुम्हाला समजत नाहीए. अमेरिकेत राहून त्या खूपच कंटाळल्या. आता त्या इथंच राहायचं म्हणताहेत...’’ प्रतिमा अजूनही काळजीत होती.
‘‘तर मग छानच झालं की! घरात चैतन्य वाढेल. भांडी जास्त आवाज करतील. एकता कपूरच्या सीरियल्सबद्दल तुला चर्चा करायला रसिक श्रोता मिळेल. सासवासुना मिळून आळीतल्या महिला मंडळात धमाल कराल...हा...हा...हा...’’
‘‘तुम्हाला सगळी चेष्टाच वाटतेय. माझ्या जिवाला घोर लागलाय.’’ प्रतिमानं म्हटलं.
‘‘अगं राणी, घोर तर माझ्या जिवाला लागायला हवा. तुम्हा सासूसुनेच्या शीतयुद्धात मीच हुतात्मा होतो. जात्यातल्या धान्यासारखी अवस्था असते माझी. तुला काही म्हणू शकत नाही की आईला काही म्हणू शकत नाही...’’
प्रतिमा गप्पच होती. थोडा वेळ थांबून श्रवणनं म्हटलं, ‘‘तुला एक सुचवू का? पटलं तर बघ, काही टीप्स देतोय...मला वाटतं तुझं टेंशन त्यामुळे संपेल.’’
प्रतिमानं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. मागच्या वेळी सासूबाई क्षुल्लक कारणावरून नाराज होऊन इथून गेल्या होत्या. ती कडू आठवण मनांत ताजी होती.
‘‘हे बघ प्रतिमा, जोपर्यंत बाबा हयात होते तोवर मला आईची काळजी नव्हती. पण बाबा गेल्यावर आलेला एकटेपणा तिला पेलवंत नाहीए. तिला खूप असुरक्षित, एकाकी वाटतं. तूच विचार कर, ज्या घरात तिचं एकछत्री साम्राज्य होतं, ते घर आता नाही. लग्नानंतर मुलांचा ताबा सुनांनी घेतला. जे घर तिनं काडी काडी जोडून तयार केलं होतं, ते बाबांच्या मृत्युनंतर बंद करावं लागलं...