माझी वेळ

कथा * डॉ. शिल्पा जैन सुराणा

‘‘शिवानी, माझे शर्ट कुठेय?’’ पुनीतने मोठयाने हाक मारत विचारले.

‘‘अरे तू पण ना…? हे काय, इथेच तर आहे… पलंगावर.’’ शिवानी खोलीत येत म्हणाली.

‘‘शर्ट तर फक्त बहाणा होता. तू इकडे ये ना. संपूर्ण दिवस काम करत असतेस.’’

शिवानीला आपल्या मिठीत ओढत पुनीत खटयाळपणे म्हणाला.

‘‘सोड ना, काय करतोस…? खुप कामं आहेत मला.’’ लटक्या रागात शिवानी म्हणाली.

‘‘अगं वहिनी…  सॉरी… सॉरी… चालूदे तुमचे… मी जाते.’’ दरवाजा उघडा असल्यामुळे पावनी सरळ आत आली होती. तिला पाहून दोघांनाही लाजल्यासारखे झाले.

‘‘अगं नाही, असे काहीच नाही. काही काम होते का पावनी?’’ शिवानीने आपल्या नणंदेला विचारले.

‘‘वहिनी, नवी कामवाली आली आहे. आई बोलावतेय तुला.’’ पावनीने सांगितले.

शिवानी या घरची सून नाही तर या घराचा आत्मा आहे. ती या घरात आली आणि अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे प्रेमाचा सुगंध पसरवत घराशी एकरूप झाली. शिवानी आणि पुनीतच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. घरात पाऊल टाकताच एका जबाबदार गृहिणीप्रमाणे तिने घराची सर्व जबाबदारी घेतली. शिवानीच्या सासू-सासऱ्यांना तिचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. पावनीलाही ती नणंद न मानता छोटया बहिणीप्रमाणे वागवते.

लग्नानंतर काहीच दिवसांनी शिवानीच्या सासूबाईंना पॅरालिसेस म्हणजे पक्षघाताचा झटका आला. त्यांचे अर्धे शरीर अधू झाले. मात्र शिवानीने केलेल्या सेवेमुळे सहा महिन्यांच्या आतच तिच्या सासूबाईंची तब्येत खूपच सुधारली. ती अगदी मुलीप्रमाणे सासूची काळजी घेत होती. सासूबाईही तिला आपली मुलगी मानायच्या. सासऱ्यांना मधुमेह होता. शिवानी त्यांचे औषध वेळेवर द्यायला विसरली, असा एकही दिवस गेला नव्हता. शिवानी या घराशी एकरूप झाली होती.

‘‘आई, उद्या शाळेत विज्ञानाचा प्रकल्प द्यायचाय. शिक्षकांनी सांगितले की, उद्या सर्वांना प्रकल्प पूर्ण करून द्यावाच लागेल.’’ विभोरने सांगितले.

‘‘अरे बापरे… पुन्हा प्रकल्प…? शिक्षक मुलांना अभ्यासाला लावतात की त्यांच्या पालकांना, हेच समजत नाही. कधी हा प्रकल्प तर कधी तो…’’ शिवानी वैतागली होती.

‘‘शिवानी, तुझा फोन आलाय,’’ सासूने आवाज दिला.

‘‘आले आई,’’ शिवानी म्हणाली.

‘‘बाळा, तू कपडे बदल, मी लगेच येते,’’ शिवानीने विभोरचा गाल थापटत सांगितले.

‘‘हॅलो शिवानी, मी ज्योती. पुढच्या आठवडयात आपल्या महाविद्यालयातील सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र भेटणार आहेत. तू येशील ना…? खूप मजा येईल. आपण सर्व मिळून जुन्या आठवणींना उजाळा देऊ. किती मजा केली होती आपण… तू यायला नकार देऊ नकोस,’’ ज्योतीने सांगितले.

‘‘एकत्र भेटायचे… माझ्यासाठी शक्य नाही ज्योती… घरात खूप काम आहे. वेळ असतोच कुठे?’’ शिवानी म्हणाली.

शिवानी, तू खरंच बदलली आहेस… तुझ्याकडे कधीच वेळ नसतो. कुठे गेली आमची ती रॉकस्टार? आम्ही ठरवले होते की, बऱ्याच दिवसांनी तुझ्याकडून गिटारवर तेच गाणे पुन्हा ऐकायचे…

श्रेया अमेरिकेहून येणार आहे आणि तू इथेच राहूनही तुझ्याकडे वेळ नाही… चल, यायचा प्रयत्न कर,’’ असे म्हणत ज्योतीने फोन ठेवला.

‘‘सर्वांनी एकत्र भेटायचे?’’ ती स्वत:शीच पुटपुटली आणि पुन्हा कामाला लागली. रात्रीचे जेवण आणि सर्व कामं आटपून थकून स्वत:च्या खोलीत आली. कपडे बदलण्यासाठी तिने कपाट उघडले. अचानक तिची नजर महाविद्यालयातील त्या जुन्या अल्बमकडे गेली.

‘‘आई, झोप येतेय, चल ना…’’ तिची ओढणी पकडत विभोर म्हणाला. शिवानीने अल्बम बाजूला ठेवला आणि विभोरला झोपवू लागली. तो झोपल्यावर ती अल्बम पाहू लागली. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. संपूर्ण महाविद्यालयात ती रॉकस्टार म्हणून ओळखली जायची. कितीतरी मुलांना ती आवडायची, पण तिने कधीच कोणाला भाव दिला नाही.

संगीताची आवड तिला लहानपणापासूनच होती.  त्यातच वडिलांनी तिला गिटार आणून दिली आणि ती रॉकस्टार झाली. महाविद्यालयात कार्यक्रम असो किंवा आंतर महाविद्यालयीन स्पर्धा असो, ती नेहमीच प्रथम क्रमांक पटकवायची… ती शिमला सहलीचे फोटो बघू लागली. शेकोटी पेटवली होती आणि ती गिटारवर गात होती…

‘‘उद्या असू ना असू आपण,

क्षण आठवतील हे क्षणोक्षण,

क्षण हे आहेत प्रेमाचे क्षण,

चल ये माझ्यासोबत चल,

चल… कसला विचार… छोटेसे आहे जीवन.’’

त्यावेळी ती फक्त गात नव्हती तर ते क्षण मनापासून जगत होती.

‘‘काय झाले? आज झोपायचे नाही का? घडयाळाकडे बघ. रात्रीचे ११ वाजलेत.’’ पुनीत म्हणाला आणि जणू ती त्या जुन्या क्षणांमधून अचानक बाहेर आली.

‘‘हो,’’ शिवानीने सांगितले आणि कपडे बदलायला गेली.

दुसऱ्या दिवशी उठून सर्वांचा नाश्ता बनवला. विभोरला अंघोळ घालून शाळेत पाठवले. कामवाली यायची वेळ झाली होती. तिने उष्टी भांडी धुवायला ठेवली. सासऱ्यांसाठी चहा बनवायला ठेवला आणि मशीनमध्ये कपडे धुवायला टाकले. घडयाळात बघितले तर १० वाजले होते. पुनीत ११ वाजता कामाला जाईल. त्याचा डबा बनवणे बाकी होते. सकाळच्या वेळेस शिवानी एखाद्या रोबोसारखीच असते… ११ वाजले. बहुतेक आजही कामवाली येणार नाही, असा विचार करत शिवानीने डबा तयार केला. काही कामानिमित्त ती तिच्या खोलीत गेली. काल रात्री तिने तो अल्बम टेबलावरच ठेवला होता. तिने तो उघडला. त्यानंतर स्वत:ला आरशात बघितले.

‘‘कुठे गेली ती शिवानी?’’ स्वत:ला आरशात बघत शिवानी विचार करू लागली. पदवी घेतल्यानंतर वडिलांची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्यांनी शिवानीचे लग्न करायचे ठरवले. त्यातच पुनीतचे स्थळ आले आणि त्यांनी होकार दिला. या घरात आल्यानंतर एक अल्लड मुलगी कधी इतकी जबाबदार झाली, हे शिवानीला समजलेच नाही.

तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. मात्र आज तिच्या चेहऱ्यावर हास्य तेव्हाच येते जेव्हा घरातील सर्व आनंदी असतात. तिने शेवटी कधी गिटार हातात घेतली होती, हे तिला आता आठवतही नाही. या नव्या आयुष्यात ती इतकी गुंतून गेली होती की, तिने गुणगुणनेही सोडून दिले होते.

‘‘शिवानी,’’ पुनीतने आवाज दिला. ती धावतच खाली गेली.

‘‘शिवानी, कामावर जायची वेळ झालीय… माझा डबा कुठे आहे?’’ पुनीतने विचारले.

ती स्वयंपाकघरात गेली आणि डबा आणून पुनीतच्या हातात दिला.

‘‘वहिनी, आज मी सिनेमा बघायला जाणार आहे. कदाचित यायला उशीर होईल. तू सर्व बघून घेशील ना?’’ पावनीने शिवानीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत विचारले.

‘‘हो, पण खूप उशीर करू नकोस,’’ शिवानी म्हणाली.

‘‘माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, लाडक्या वहिनी,’’ असे म्हणत तिने शिवानीचे गाल प्रेमाने ओढले. शिवानीने स्मितहास्य केले

आणि ती पुन्हा कामाला लागली… पण आज तिचे लक्ष कामात लागत नव्हते.

‘‘शिवानी, शिवानी, बाळा बघ… दूध उतू जातेय,’’ सासूबाईंनी सांगितले.

‘‘हो, आई,’’ शिवानी म्हणाली.

विभोर शाळेतून आला. तो नाराज होता. शिवानीने विचारताच रडू लागला.

‘‘आई, तू वाईट आहेस. काल मी तुला विज्ञानाचा प्रकल्प बनवून द्यायला सांगितले होते. तू बनवून दिला नाहीस. शिक्षक ओरडले.’’ शिवानीला आठवले की, विभोरने तिला सांगितले होते, पण तीच विसरून गेली. विभोर खूपच उदास झाला होता.

रात्रीचे ८ वाजले होते. पुनीत यायची वेळ झाली होती. शिवानीने जेवण वाढायला घेतले. तितक्यात पुनीत आला.

‘‘चला, हात धुवून घ्या, जेवण तयार आहे,’’ शिवानीने पुनीतला सांगितले.

तितक्यात पावनीही आली.

‘‘इतका उशीर का झाला पावनी?’’ सासूबाईंनी विचारले.

‘‘ते… म्हणजे काम होते माझे. वहिनीला सांगून गेले होते.’’ पावनीने सांगितले.

‘‘शिवानी, तू सांगितले नाहीस,’’ सासूबाईंनी विचारले.

‘‘मी विसरले,’’ शिवानी म्हणाली.

‘‘शिवानी, तू जरा जास्तच विसरभोळी झाली आहेस. आज तू मला रिकामा डबा दिला होतास.’’ पुनीतने सांगितले.

‘‘बाबा, माझा प्रकल्प बनवून द्यायलाही आई विसरली… शिक्षक ओरडले मला.’’ विभोरने तोंड वेडेवाकडे करत सांगितले.

शिवानीच्या डोळयात अश्रू जमा झाले. ती रडू लागली. तिचे रडणे सर्वांसाठीच अनपेक्षित होते.

‘‘अरे पुनीत, चुकून झाले असेल… आणि विभोर, तू खेळात मग्न झाला असशील. पुम्हा एकदा आईला आठवण करून द्यायला काय झाले होते तुला?’’ शिवानीच्या सासूबाई म्हणाल्या.

‘‘नाही आई, कोणाचीच काही चूक नाही. चूक माझी आहे. कदाचित मीच एक चांगली सून नाही, चांगली आई नाही, मी प्रयत्न करतेय, पण मला जमत नाही… मला माफ करा…

माझ्याकडून तुम्हाला असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करू शकले नाही,’’ हुंदके देत शिवानी म्हणाली.

‘‘नाही बाळा, तू आमच्या सर्वांचा श्वास आहेस,’’  सासूबाईंनी सांगितले, पण काही केल्या शिवानीचे रडणे थांबत नव्हते.

‘‘पुनीत, शिवानीला तुमच्या खोलीत घेऊन जा,’’ शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले.

शिवानीला असे रडताना पाहून सर्वच गोंधळून गेले. कोणालाच शिवानीबद्दल काहीच तक्रार नव्हती. अचानक शिवानीला काय झालेय, हाच प्रश्न सर्वांना सतावत होता.

३ दिवसांनंतर शिवानीचा वाढदिवस होता. सर्वजण एकत्र जमा झाले आणि विचार करू लागले की, शिवानीला नेमके काय झाले असावे? त्यानंतर सर्वांनी ठरवले की, तिचा हा वाढदिवस तिच्या कायम लक्षात राहील, असा साजरा करायचा.

‘‘पावनी काय करतेस तू?’’ शिवानीने विचारले.

‘‘वहिनी, तू फक्त डोळे उघडू नकोस,’’ पावनीने तिच्या हातांनी शिवानीचे डोळे बंद केले होते.

डोळे उघडताच शिवानीने पाहिले की, तिच्या आवडीच्या पिवळया गुलाबांनी घर सजले होते. समोरच टेबलावर एक मोठा केक ठेवला होता. सर्व शिवानीकडे बघत होते.

‘‘शिवानी बाळा, हे तुझ्यासाठी,’’ तिच्या सासऱ्यांनी पलंगाकडे बघत सांगितले.

तिथे एक मोठा खोका होता.

‘‘आई, बघ तर खरं, काय आहे त्या खोक्यात…’’ विभोर आनंदाने म्हणाला.

शिवानीने तो खोका उघडला आणि तिच्या डोळयातून अश्रू ओघळू लागले.

ती तिच्यासाठी नवीन गिटार होती.

‘‘शिवानी, जेव्हापासून तू या घरत आलीस, सर्व घराची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतलीस… पण आम्ही सर्वजण कदाचित आमची जबाबदारी विसरलो. तू आमच्या सर्वांची काळजी घेतलीस… पण त्या जुन्या शिवानीला विसरलीस. घर-संसार, जबाबदाऱ्या कधीच संपत नाहीत बाळा… पण आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे की, तू काही वेळ स्वत:साठीही राखून ठेवावा.

‘‘आजपासून आम्हाला आमची जुनी शिवानी परत हवीय. जिच्या गाण्यांनी या घराला नवी ऊर्जा मिळायची. तुझ्या काही जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करू.’’ शिवानीच्या  सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगितले.

‘‘सूनबाई, आजपासून विभोरला बस स्थानकावर सोडून यायची जबाबदारी माझी. येताना मी किराणा सामान घेऊन येईन. याच निमित्ताने माझे थोडे चालणेही होईल.’’ शिवानीच्या सासऱ्यांनी सांगितले.

‘‘वहिनी, आजपासून मी दररोज १ तास विभोरला शिकवित जाईन,’’ पावनी म्हणाली.

‘‘आणि हो, सूनबाई… स्वयंपाकघरातील छोटी-मोठी कामं मी करेन. तू मला नुसते बसवून ठेवलेस तर मी उगाचच आजारी पडेन,’’ शिवानीच्या सासूबाईंनी स्मितहास्य करत सांगितले.

‘‘आजपासून घरातल्या सर्व हिशोबाची जबाबदारी आणि बिल भरण्याचे काम माझे असेल. चल, आता रडणे बंद कर. २ दिवसांनंतर महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींना भेटायला जायचे आहे ना…? तू सांगितले नाहीस तर आम्हाला कळणार नाही का…? आणि हो, तिथे आमच्या रॉकस्टार शिवानीला गिटारवर जबरदस्त सादरीकरण द्यायचे आहे ना…? तर मग सर्वांनी आपापल्या जागेवर बसा… आता आपल्यासमोर येत आहे आपली रॉकस्टार शिवानी,’’ पुनीत हळूच तिला डोळा मारत म्हणाला.

शिवानीच्या डोळयातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. आता शिवानी गिटार वाजवत होती आणि घरातील सर्वजण एका सुरात गात होते.

‘‘एकमेकांवर खूप प्रेम करतो आम्ही…’’

भरला पापाचा घडा

कथा * संजीव जामकर

हॅलो पप्पा, माझं कॅम्पस सिलेक्शन झालं आहे.’’ ऐश्वर्या जवळजवळ ओरडतच फोनवर बोलत होती. तिचा आनंद ओसंडून वाहत होता.

‘‘अरे व्वा! अभिनंदन पोरी…कोणत्या कंपनीत झालंय?’’ पप्पांचाही आवाज आनंदानं ओथंबला होता.

‘‘रिव्होल्यूशन टेक्नोलॉजीमध्ये. खूप मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बऱ्याच देशात शाखा आहेत या कंपनीच्या.’’ ऐश्वर्या आनंदानं सांगत होती. ‘‘कॉलेजमध्ये सर्वात जास्त पॅकेज मलाच मिळालंय. बहुतेकांना तीन ते साडे तीन लाखांचं पॅकेज मिळालं आहे, मला मात्र साडे चार लाखांचं पॅकेज दिलंय…पण?’’

‘‘पण…पण काय?’’

‘‘पप्पा, कंपनी दोन वर्षांचा बॉन्ड करून घेते आहे…मला समजत नाहीए…मी हो म्हणू की नको?’’

‘‘अगं, इतर कंपन्याही एक वर्षाचा बॉन्ड तर मागवतातच ना? चांगली सुरूवात होतेय तर दोन वर्षांचा बॉन्ड भरायला काहीच हरकत नाहीए. कारण दोन वर्षांनंतर कंपनी बदलावीशी वाटली तर तुला यापेक्षा वरचा जॉब मिळेल ना? उलट तुझ्या बरोबरीच्या मुलांना त्यावेळी जेमतेम तेवढा पगार मिळेल ज्यावर तू आज सुरूवात करते आहेस.’’ पप्पांनी समजावलं.

‘‘थँक्यू पप्पा, तुम्ही माझी काळजी दूर केलीत.’’

ऐश्वर्या लखनौच्या इंजिनियअरिंग कॉलेजची विद्यार्थीनी होती. प्रत्येक सेमिस्टरला टॉप करायची. सगळ्यांनाच तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होतं. तिलाच सर्वात जास्त पॅकेज मिळणार हेही सर्व जाणून होते.

दोन दिवसांनी घरी पोहोचली, तेव्हा आईनं औक्षण करून तिचं स्वागत केलं. बाबांनी तिला जवळ घेऊन आशिर्वाद दिला. ‘‘तुला पोस्टिंग कुठं मिळेल?’’ आईनं विचारलं.

‘‘बंगळुरूला.’’

घरात एखाद्या सणा उत्सवाचं वातावरण होतं. त्या आनंदात सुट्या कधी संपल्या समजलंही नाही. ऐश्वर्या जेव्हा कंपनीत जॉईन झाली तेव्हा तिथली भव्यता बघून चकित झाली. बंगळुरूच्या आयटी हबमध्ये एका मल्टी स्टोरीड बिल्डिंगच्या सहाव्या माळ्यावर कंपनीचं आलिशान ऑफिस होतं.

सकाळी दहा वाजता कंपनीतले सर्व कर्मचारी मिनी ऑडिटोरियममध्ये पंधरा मिनिटं मेडिटेशन करायचे. त्यानंतर सर्व आपापल्या डिपार्टमेंटला निघून जायचे. ज्यूनिअर कर्मचाऱ्यांसाठी हॉलमध्ये लहान लहान क्यूबिकल्स होती. मॅनेजर आणि इतर वरच्या ऑफिसर्ससाठी केबिन्स होती. सर्व क्यूबिकल्स अन् केबिनची सजावट एकारखीच होती. त्यावरून कंपनीच्या ऐश्वर्याचा अंदाज करता येत होता.

ऐश्वर्याचं काम प्रोजेक्ट मॅनेजर सुशांतच्या टीममध्ये होतं. सुशांतची गणना कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये व्हायची. आपल्या योग्यतेमुळेच त्यानं फार लवकर इतकी वरची जागा मिळवली होती.

पहिल्याच दिवशी त्यानं ऐश्वर्याचं स्वागत करत म्हटलं होतं, ‘‘ऐश्वर्या, आमच्या टीममध्ये तुझं स्वागत आहे. माझी टीम कंपनीची लीड टीम आहे. कंपनीचे सर्वात महत्त्वाचे प्रोजेक्ट या टीमला मिळतात. मला खात्री आहे, तुझ्या येण्यामुळे आमची टीम अधिक बळकट होईल.’’

‘‘सर, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन.’’ ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर शालीन आत्मविश्वास झळकत होता.

सुशांत खरंच बोलला होता. कंपनीचे महत्त्वाचे प्रोजेक्ट त्यांच्याच टीमला मिळत होते. अर्थातच इतरांच्या मानानं या टीमच्या लोकांना मेहनतही अधिक करावी लागत होती. बघता बघता नोकरीचा एक महिना संपलासुद्धा. या काळात ऐश्वर्याला फार काम दिलं गेलं नाही पण तिला कामाचं स्वरूप, कामाची पद्धत समजून घेता आली. खूप काही शिकायला मिळालं.

पहिला पगार मिळताच तिनं पंचवीस हजार रूपयांची खरेदी केली आणि विमानाचं तिकिट काढून ती घरी लखनौला पोहोचली.

‘‘मम्मा, ही बघ बंगलोर सिल्कची साडी अन् पश्मिता शाल…तुझ्यासाठी.’’

आईच्या खांद्यावर साडी ठेवत ती म्हणाली, ‘‘बघ किती छान दिसतेय तुला.’’

मम्मा खूप खुश झाली. खरंच साडी अन् शाल सुंदरच होती.

‘‘पप्पा, हा तुमच्यासाठी सूट आणि हे घडयाळ…’’ दोन पाकिटं बाबांना देत तिनं म्हटलं.

सूट पप्पांच्या आवडीच्या रंगाचा होता. घड्याळही एकदम भारी होतं. त्यांचाही चेहरा खुलला.

‘‘केवढ्याला गं पडलं हे सगळं?’’ शालवरून हात फिरवत आईनं विचारलं.

‘‘फार नाही गं! पंचवीस हजार रूपये खर्च झाले.’’ हसून ऐश्वर्याने म्हटलं.

ऐकून आईचे डोळे विस्फारले…‘‘अन् आता सगळा महिना कसा काढशील?’’

‘‘जसा आधी काढत होते…पप्पा झिंदाबाद,’’ खळखळून हसंत ऐश्वर्यानं म्हटलं.

‘‘बरोबर आहे. अजून माझ्या रिटायरमेंटला अवकाश आहे. मी माझ्या लेकीला सहज पोसू शकतो.’’ बाबाही हसत म्हणाले.

दोन दिवस राहून ऐश्वर्या परत कामावर रूजू झाली. दुसऱ्याच दिवशी तिच्या सिनिअरनं लंच नंतर तिला एक टास्क करायला दिला. ऐश्वर्या मन लावून काम करत होती पण टास्क पूर्ण झाला नव्हता. सात वाजून गेले होते. बरेचसे एम्प्लॉई घरी निघून गेले होते. ती काम करत बसली होती.

‘‘ऐश्वर्या मॅडम, अजून घरी गेला नाहीत तुम्ही?’’ आपल्या चेंबरमधून बाहेर पडलेल्या सुशांतची नजर ऐश्वर्यावर पडली.

‘‘सर, एक टास्क होता. अजून पूर्ण झाला नाहीए. पण मी करेन…’’

‘‘मला बघू देत. काय आहे ते कळेल.’’ सुशांतनं म्हटलं.

ऐश्वर्या कॉम्प्युटर समोरून बाजूला झाली. सुशांतनं काही क्षण स्क्रीनवर ओपन असलेल्या प्रोग्रॅमकडे बघितलं अन् मग त्याची बोटं सराईतपणे की बोर्डवर काम करू लागली.

पाच सात मिनिटातच सुशांत हसत बाजूला झाला. ‘‘हा घ्या तुमचा टास्क पूर्ण झाला.’’

किती वेळ ऐश्वर्या जे काम करत बसली होती ते सुशांतनं इतक्या कमी वेळात पूर्ण केलं होतं. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तिच्या मनात आदर व कौतुक दाटून आलं.

‘‘थँक्यू सर,’’ अत्यंत कृतज्ञतेनं तिनं म्हटलं.

‘‘त्याची गरज नाहीए,’’ मंद स्मित करत त्यानं म्हटलं, ‘‘त्यापेक्षा माझ्याबरोबर एक कप कॉफी घेणार का?’’

ऐश्वर्याही दमलीच होती. तिलाही गरम चहा किंवा कॉफीची गरज होती. तिनं लगेच होकार दिला.

सुशांतनं तिला एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. हॉलमध्ये बरीच गर्दी होती. पण वर टेरेसवरही बसायची सोय होती. तिथं गर्दीही बेताची होती. वातावरण शांत होतं. टेरेसवरून बाहेरचं दृश्यही दिसत होतं. शहरातले दिवे बघून तारे जणू पृथ्वीवर उतरले आहेत असं वाटत होतं.

‘‘ऐश्वर्या, कंपनीतर्फे दोन इंजिनिअर्सना अमेरिकेला पाठवायचं आहे. तू त्यासाठी अप्लाय का केलं नाहीस?’’ कॉफीचा घोट घेत सुशांतनं विचारलं.

‘‘सर, मी अजून अगदीच नवी आहे ना, म्हणून मी अप्लाय केलं नाही.’’

‘‘प्रश्न नवं किंवा जुनं असण्याचा नाहीए, प्रश्न हुशारीचा, टॅलेंटचा आहे. आणि प्रामाणिकपणा अन् हुशारी तुझ्यात आहेच. तू अप्लाय करायला हवंस. तीन लाख रूपये दर महिन्याला, शिवाय कंपनीतर्फे बोनस…एक वर्षांनंतर परत आल्यावर तुझी मार्केटव्हॅल्यू केवढी वाढलेली असेल विचार कर.’’ सुशांत शांतपणे तिला समजावून सांगत होता.

‘‘पण सर, तरीही मी खूप ज्यूनिअर आहे, माझ्याहून सीनियर्सही आहेत. तरी माझी निवड होईल?’’

‘‘त्याची काळजी करू नकोस. हा प्रोजेक्ट माझा आहे. कोणाला अमेरिकेला पाठवायचं, कोणाला नाही, हा निर्णय माझा असेल.’’

ऐश्वर्याला लगेच निर्णय घेता येईना. ती विचार करत होती.

कॉफी संपवून सुशांतनं म्हटलं, ‘‘घाई नाहीए. नीट विचार करून सांग. उद्या सायंकाळी आपण इथंच भेटूयात. त्यावेळी तुझा निर्णय सांग.’’

ऐश्वर्या घरी आली. शांतपणे विचार केला तेव्हा तिला जाणवलं की ही संधी चांगली आहे. सहा महिन्यात पप्पा आता रिटायर होतील. तिचं पॅकेज जरी वर्षांला साडेचार लाखाचं होतं तरी हातात सध्या फक्त तीस हजार रूपये येत होते. एवढ्यात तिचं जेमतेम भागत होतं, घरी पाठवायला पैसेच उरत नव्हते. तिनं ठरवलं अमेरिकेची संधी घ्यायचीच.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी ती जेव्हा रेस्टॉरंटच्या गच्चीवर पोहोचली, तेव्हा सुशांत तिची वाट बघत उभा होता. मंद आवाजात वाद्यसंगीत वाजत होतं. फारच प्रसन्न सायंकाळ होती.

ऐश्वर्यानं जेव्हा अमेरिकेला जायला तयार असल्याचं सांगितलं, तेव्हा सुशांत म्हणाला, ‘‘योग्य निर्णय घेतला आहेस तू. तिथून परतल्यावर तुझ्या करिअरला अधिकच झळाली मिळेल. मी प्रयत्न करेन…आपली सहयोगी कंपनी तुझ्या राहण्याचीही सोय करेल.’’

हे ऐकल्यावर तर ऐश्वर्याचा चेहरा एकदम खुलला. अमेरिकेत राहण्याचा खर्च फार येतो हे ती ऐकून होती. मग तर एका वर्षांत ती बराच पैसा वाचवू शकली असती. तिनं कृतज्ञतेनं म्हटलं, ‘‘सर, तुम्ही माझ्यासाठी इतकं करताय, त्याची परतफेड मी कशी करेन तेच मला कळत नाहीए.’’

‘‘मनात आणलंस तर तू आजही करू शकतेस.’’ सुशांतने म्हटलं.

‘‘कशी?’’ नवल वाटून ऐश्वर्याचे टपोरे डोळे अधिकच विस्फारले.

‘‘असं बघ, हे जग ‘गिव्ह अॅन्ड टेक’च्या फॉर्मुल्यावर चालतं. टीचर विद्यार्थ्यांना शिकवतो तेव्हा तो फी घेतो. डॉक्टर रोग्यावर उपचार करतो तेव्हा तो पैसे घेतो, अगदी आईवडिलही मुलाला वाढवतात, तेव्हा म्हातारपणी त्यानं आपल्याला सांभाळावं ही अपेक्षा असतेच. सरकार जनतेसाठी ज्या सोयी, सुविधा, सेवा पुरवते त्याचा मोबदला टॅक्सरूपात घेतेच. एकूणात या जगात फुकटात काहीही मिळंत नसतं.’’ सुशांत एखाद्या तत्त्वत्याप्रमाणे बोलत होता. ऐश्वर्या फार गोंधळली होती…तिला समजेना काय नेमकं सांगताहेत सुशांत सर. तिनं चाचरत विचारलं, ‘‘म्हणजे मला काय करावं लागेल?’’

‘‘फक्त काही दिवसांसाठी माझी हो. मी तुला करिअरच्या अशा उंचीवर पोहोचवेन की लोकांना तुझा हेवा वाटावा,’’ सुशांतनं थेट तिच्या डोळ्यात बघत म्हटलं.

सगळी गच्ची आपल्या भोवती फिरतेय असं वाटलं ऐश्वर्याला. कॉलेजात कायम तिनं टॉप केलं होतं. पण इथं तिच्या बुद्धिचं अन् योग्यतेचं महत्त्वच नव्हतं. ती फक्त एक यादी होती. तारूण्याचा सौदा करत होता सुशांत. फक्त देह व्यापाराचा एक सुसंस्कृत प्रस्ताव समोर ठेवून अपमान जिव्हारी लागला होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं.

‘‘ऐश्वर्या, मी बळजबरी करत नाहीए. ही एक ऑफर आहे. तुला कबूल असेल तरी ठीक आहे, नसेल तरी ठीक आहे. कंपनीतल्या तुझ्या पोझिशनला काहीही धक्का लागणार नाही. तू नेहमीप्रमाणेच आपलं काम करत राहशील.’’ अत्यंत मृदू अन् गोड शब्दात सुशांतनं म्हटलं.

‘‘क्षमा करा सर, तुम्ही मला समजण्यात चूक केलीत. मी विकाऊ नाही.’’ अश्रू कसेबसे थोपवत ऐश्वर्या उठून उभी राहिली.

‘‘अरे? उठलीस का? निदान कॉफी तर घे,’’ एक शब्दही न बोलता ऐश्वर्या तिथून निघाली ती सरळ आपल्या फ्लॅटवर पोहोचली. घरी येऊन मात्र तिचा बांध फुटला. तिला रडू आवरेना, नोकरीतल्या यशासाठी शॉटकट घेणाऱ्या अनेक मुलींबद्दल तिनं ऐकलं होतं. पण तिलाही त्या परिस्थितीचा सामना करावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता पुढे काय? इथं काम करणं जमेल का? सुशांत या गोष्टीचा वचपा म्हणून तिच्यासाठी अडचणींचा डोंगर उभा करेल…तर मग नोकरी सोडायची का?…पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड करून दिलाय…

त्या रात्री ती जेवली नाही. झोपही लागली नाही. काय करावं ते कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी ती घाबरतच ऑफिसला पोहोचली. तिला वाटलं होतं सुशांत तिला फैलावर घेईल. पण त्याची वागणूक अगदी नॉर्मल होती. जणू काही घडलंच नव्हतं.

आठवडाभर ऐश्वर्या भेदरलेलीच होती. पण मग नॉर्मल झाली. तिला वाटलं, सुशांतला आपल्या वागणुकीचा पश्चात्ताप झाला असावा. नंतर एक दिड महिना गेला. सगळंच आलबेल होतं.

एक दिवस सुशांतने तिला आपल्या चेंबरमध्ये बोलावून म्हटलं, ‘‘ऐवर्श्या, अमेरिकेतले हे आपले खास क्लाएंट आहे. त्यांचा हा जरूरी प्रोजक्ट आहे. अठ्ठेचाळीस तासात पूर्ण करायचा आहे. करू शकशील?’’

‘‘मी पूर्ण प्रयत्न करते सर.’’

‘‘गुड! हे कंपनीचे खास क्लाएंट आहेत, त्यामुळे कुठंही काहीही चूक व्हायला नको हे लक्षात ठेवायचं.’’ सुशांतनं सांगितलं.

‘‘ओके सर,’’ म्हणत ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. तिनं आधी तो प्रोजेक्ट पूर्ण वाचला तेव्हा तिला वाटलं, हे तर सोपं आहे. ती सहजच पूर्ण करू शकेल.

ऐश्वर्यानं काम सुरू केलं, पण तिचा अंदाज चुकला. जसजशी ती प्रोजेक्टवर पुढे जात होती तसतसा तो अधिकच क्लिष्ट होत होता. दुपारपर्यंत ती फारसं काही करू शकली नाही. अठ्ठेचाळीस तासात हे काम पूर्ण होणार नाही याची तिला जाणीव झाली.

लंचनंतर ती सुशांतला या संदर्भात विचारायला गेली, पण तो कुठल्या तरी मिटिंगसाठी बाहेरगावी गेला होता. तो दुसऱ्याच दिवशी येणार होता म्हणून कळलं. तिनं इतर सिनियर्सशीही बोलून बघितलं, पण या क्लाएंटचा असा प्रोजेक्ट कुणीच केलेला नसल्यानं कुणीच तिला मदत करू शकलं नाही.

दुसऱ्या दिवशी ऑफिसात आल्या आल्या सुशांतनं तिचं काम बघितलं, अन् तो भडकलाच, ‘‘काय हे? तू काहीच काम केलं नाहीए? मी नव्हतो ऑफिसात तर हातावर हात ठेवून बसून राहिलीस?’’

‘‘तसं नाही सर, यात काही प्रॉब्लेम आले. मी इतर सिनियर्सना विचारलं, पण कुणीच सांगू शकलं नाही. शेवटी मी क्लांयटलाही दुपारी फोन लावले, पण त्यांनी उचलला नाही.’’ ऐश्वर्यानं तिची अडचण सांगितली.

‘‘ऐश्वर्या, शुद्धीवर आहेस का तू?’’ सुशांत केवढ्यांदा ओरडला. ‘‘अगं, शिकलेली, आयटी कंपनीत नोकरी करणारी तू. तुला एवढंही कळू नये? तू जेव्हा फोन करत होतीस तेव्हा अमेरिकेत रात्र होती अन् त्यावेळी लोक झोपलेले असतात. नशीब म्हणायचं की त्याची झोपमोड झाली नाही, नाही तर तुझी नोकरीच गेली असती.’’

‘‘पण सर, मी काय करायचं?’’ ऐश्वर्याला आपल्या हतबलतेमुळे रडूच फुटलं.

‘‘आपलं डोकं वापरायचं आणि काम पूर्ण करायचं.’’ सुशांत संतापून म्हणाला. मग त्यानं प्रोजेक्टबद्दल तिला काही सूचना केल्या अन् तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला.

ऐश्वर्यानं शर्थ केली पण प्रोजेक्ट त्या दिवशी पूर्ण होऊ शकला नाही. सुशांतनं तिला मेमो दिला.

हळूहळू सुशांतचा खरा रंग दिसायला लागला. तो मुद्दामच सर्वात कठिण टास्क ऐश्वर्याला द्यायचा. कमी वेळात तो पूर्ण व्हायला हवा म्हणायचा. अन् काम पूर्ण      झालं नाही तर सरळ मेमो हातात द्यायचा. शिवाय अत्यंत अपमानास्पद भाषा वापरून रागवायचा.

एक दिवस ऑफिसात गेल्या गेल्याच ऐश्वर्याला त्यान बोलावून घेतलं, ‘‘तीन महिन्यात अकरा मेमो मिळालेत तुला. कामात सुधारणा झाली नाही तर कंपनी तुम्हाला डिसमिस करू शकते. ही शेवटची संधी आहे.’’

अपमानित ऐश्वर्या आपल्या सीटवर येऊन बसली. जर बोलल्याप्रमाणे तिला खरोखर डिसमिस केलं गेलं तर तिला दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणं अशक्य होऊन बसेल. त्यापेक्षा आपणच राजिनामा दिला तर? पण तिनं तर दोन वर्षांचा बॉन्ड भरून दिलाय. नोकरी सोडली तर तिला कंपनीला पाच लाख रूपये द्यावे लागतील. तीन महिन्यांनी पप्पा रिटायर होतील. इतकं असहाय्य वाटलं ऐश्वार्याला…डोळयांत पाणीच आलं तिच्या.

‘‘काय झालं गं ऐश्वर्या? इतकी उदास का आहेस? कसली काळजी वाटतेय?’’ स्नेहानं तिच्या खांद्यावर हात ठेवत आपलेपणानं विचारलं. हल्ली त्यांची चांगली मैत्री झाली होती.

ऐश्वर्याला बोलावसं वाटलं…पण काय सांगणार? तिच्या डोळयातून टपटप अश्रू वहायला लागले.

‘‘इथं नको, कॅन्टीनमध्ये बसूयात.’’ स्नेहानं हात धरून तिला सीटवरून उठवलीच.

स्नेहानं तिला त्यांच्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये न नेता दुसऱ्या मजल्यावरच्या एका कॅन्टीनमध्ये नेलं. सकाळची वेळ असल्यामुळे तिथं गर्दी नव्हती. स्नेहानं खोदून खोदून विचारल्यावर ऐश्वार्या हुंदके देत सगळी हकिकत सांगितली. स्नेहाचा चेहरा संतापानं लाल झाला.

‘‘याचा अर्थ हा चांडाळ, हा घृणित खेळ तुझ्याबरोबरही खेळतोय.’’ दात ओठ खात तिनं म्हटलं.

‘‘ ‘तुझ्या बरोबरही’चा काय अर्थ?’’ दचकून ऐश्वार्यनं विचारलं.

‘‘अगं, त्यानं मलादेखील अमेरिकेला जाण्याची लालूच दिली होती. मी नकार दिल्यानंतर गेले दोन महिने मलाही छळतोय.’’ स्नेहानं सांगितलं.

विचार करत ऐश्वर्या बोलली, ‘‘याचा अर्थ ज्या दोघी मुली अमेरिकेला गेल्या आहेत, त्यांनी याची अट मान्य…’’ ऐश्वर्यानं वाक्य पूर्ण करण्याआधीच त्वेषानं स्नेहा बोलली, ‘‘त्यांचं खरं खोटं त्या जाणोत. पण या माणसाचं सत्य आपल्याला ठाऊक आहे. याला धडा शिकवायलाच हवा, नाहीतर हा नेहमीच नव्या मुलींना खेळणं समजून त्यांच्या चारित्र्याशी खेळत राहील.’’

‘‘पण…पण आपण काय करू शकतो?’’

स्नेहानं कॉफी घेता घेता तिच्या डोक्यातली योजना ऐश्वर्याला समजावून सांगितली. सगळा बारीक सारीक तपशील नीट समजून घेतला गेला. त्यानंतर दोघी पुन्हा आपल्या ऑफिसात आल्या.

त्यानंतर लंचच्या थोड्या आधी ऐश्वर्या सुशांतच्या चेंबरमध्ये गेली. ‘‘सर, थोडं बोलायचं आहे.’’

‘‘अं?’’

‘‘सर, मला या ऑफिसात काम करणं जमत नाहीए.’’

‘‘तर?’’

‘जर अजूनही शक्य असेल तर मी अमेरिकेला जायला तयार आहे, तुम्ही मदत केलीत तर मोठीच कृपा होईल.’’

‘‘शक्य, अशक्य सगळं माझ्याच हातात आहे, पण तिथं जाण्याची अट तुला माहीत आहे…ती मान्य असेल तर बघ…’’ सुशांतनं तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत म्हटलं.

‘‘सर, इतक्या घाईत मी सांगू शकणार नाही…पण आज सायंकाळी तुम्ही माझ्या फ्लॅटवर याल का? तोपर्यंत मी अजून नीट विचार करून तुम्हाला निर्णय सांगेन.’’

‘‘ओ के बेबी, बरोबर आठ वाजता मी पोहोचतो.’’ आपला आनंद लपवत सुशांतनं म्हटलं.

कसाबसा तो दिवस ऐश्वर्यानं रेटला. सायंकाळी घरी आली. स्नान करून सुंदर साडी नेसली. मेकअप केला. तिचं हृदय धडधडत होतं पण निर्णय पक्का होता.

बरोबर आठ वाजता दाराची बेल वाजली. तिनं दार उघडलं. दारात सुशांत उभा होता. त्यानं आत येऊन दार लावून घेतलं अन् ऐश्वर्याकडे बघून म्हणाला,

‘‘साडीत सुंदर दिसते आहेस तू?’’

ऐश्वर्यानं काहीच उत्तर दिलं नाही. तिच्याजवळ जात सुशांतनं म्हटलं, ‘‘आजची रात्र एकदम स्पेशल, संस्मरणीय कर. मी तुला नक्की अमेरिकेला पाठवतो.’’

ऐश्वर्यानं अंग चोरून घेतलं. तिचं गप्प राहणं म्हणजे तिची स्वीकृती समजून सुशांतची हिम्मत वाढली. त्यानं तिला पटकन मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं.

कसंबसं स्वत:ला सोडवून घेत तिनं म्हटलं, ‘‘सर, हे काय करताय तुम्ही?’’

‘‘तुझं करीयर घडवाचंय ना? त्याची तयारी.’’

पुन्हा तिला मिठीत घेत त्यानं तिचं चुंबन घ्यायचा प्रयत्न केला.

‘‘करियर घडवताय की आयुष्य नासवताय?’’ संतापून ऐश्वर्यानं विचारलं.

‘‘ऐशू, इतक्या जवळ आल्यावर आता मागे फिरता येणार नाही. तुझ्या प्रोबेशन पिरियड संपता संपता मी तुला प्रमोशन पण देतो…फक्त जे घडतंय ते घडू दे.’’ सुशांत आता चांगलाच पेटला होता.

‘‘घडूही दिलं असतं…पण…’’

‘‘पण काय?’’

‘‘जर या लॅपटॉपचा वेब कॅमेरा ऑन नसता तर,’’ ऐश्वर्यानं टेबलावरच्या लॅपटॉपकडे बोट दाखवलं.

लॅपटॉप बघताच सुशांतनं दचकून उडीच मारली. जणू समोर मोठ्ठा साप बघितला असावा. त्यानं घाबरून विचारलं, ‘‘कॅमेरा ऑन आहे?’’

‘‘फक्त ऑनच नाहीए. तर या कॅमेऱ्यातील सर्व गोष्टी दूर कुठं तरी रेकॉर्डही होत आहेत.’’ ऐश्वर्या शांतपणे म्हणाली.

सुशांत प्रचंड घाबरला, ‘‘रेकॉर्डिंग होतंय?’’

‘‘होय सर, तुम्हा सारख्यांना फक्त स्त्रीचं शरीर दिसतं. तिची बुद्धी, तिची श्रम करण्याची तयारी, तिची योग्यता यांची काहीच किंमत नसते का? तुम्ही जेवढा अभ्यास केलाय, तेवढाच आम्हीही केलाय. तुम्ही नोकरीत पुढे जाता पण आम्ही जाऊ म्हटलं तर आम्हाला अब्रूची किंमत द्यावी लागते. पण आता तसं होणार नाही. तू आता आमचं शोषण करू शकणार नाहीस. तुला तुझ्या दृष्टकृत्याची किंमत मोजावीच लागेल.’’ ऐश्वार्यानं म्हटलं.

सुशांतचा चेहरा पांढराफटक झालेला. त्यानं घाईनं लॅपटॉप बंद केला.

‘‘एवढ्यानं काही होणार नाही. अजून एक छुपा कॅमेरा सगळं चित्रण करतोय. तुझ्या पापाचा घडा भरलाय सुशांत.’’

‘‘अजून एक कॅमेरा?’’ सुशांत प्रचंड घाबरला होता.

‘‘तुझ्यासारख्या विषारी सापांपासून सावध राहायला त्याची गरज होतीच ना?’’ तिरस्कारानं हसत ऐश्वयानं म्हटलं, ‘‘तुझी नोकरी आता संपली आजच हे रेकॉर्डिंग कंपनीच्या चेयरमेनकडे पोहोचवलं जाईल.’’

‘‘असं करू नकोस, अगं, माझी लहान लहान मुलं आहेत. त्यांचं आयुष्य मातीमोल होईल. माझी पत्नी रस्त्यावर येईल.’’ हात जोडून सुशांत गयावया करत होता.

‘‘कंपनीतला स्टाफही खरं मुलांसारखाच असतो. आमची नाही दया आली?’’

‘‘प्लीज, प्लीज मला क्षमा कर. माझ्या पत्नीला हे कळलं तर ती आत्महत्त्या करेल…’’ सुशांतनं अक्षरश: ऐश्वर्याचे पाय धरले.

ज्या सर्वशक्तीमान सुशांतसमोर कंपनीचा स्टाफ घाबरून असायचा तोच आज ऐश्वर्याच्या पायावर लोळण घेत होता.

तिरस्कारानं त्याच्याकडे बघत ऐश्वर्यानं म्हटलं, ‘‘मला किंवा कुणालाच यापुढे इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं धाडस करू नका, पण जे केलंय त्याची शिक्षा भोगावीच लागेल.’’

‘‘माझी नोकरी गेली तर त्याची शिक्षा माझ्या कुटुंबाला भोगावी लागेल. त्यांच्यासाठी मला क्षमा कर. मी वचन देतो यापुढे मी अजिबात अशी वागणूक ठेवणार नाही. म्हणंत असशील तर कंपनी सोडून जातो.’’

ऐश्वर्यानं काही उत्तर देण्याआधीच तिचा मोबाइल वाजला. फोन नेहाचा होता. तिनं मोबाइल ऑन करून स्पीकरवर टाकला. नेहाचा आवाज ऐकू आला. ‘‘ऐश्वर्या, तो बरोबर बोलला. त्याच्या दृष्कृत्याची शिक्षा त्याच्या बायकोमुलांनी का भोगावी? त्यांचा काय दोष आहे? मी सर्व रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवलंय. गरज पडल्यास त्याची वापरही करू. पण सध्या त्याला एक संधी द्यायला हवी.’’

‘‘ठीक आहे.’’ ऐश्वर्यानं मोबाइल बंद केला. त्याच्याकडे बघत तिनं म्हटलं, ‘‘ठीक आहे. तुझ्या पापाची फळं तुझ्या कुटुंबाला भोगावी लागू नयेत म्हणून आम्ही सध्या पुढली अॅक्शन घेत नाहीए. मात्र यापुढे सावध राहा.’’

‘‘धन्यवाद! खूप खूप धन्यवाद…मी उद्याच या कंपनीचा राजिनामा देतो.’’

‘‘त्याची गरज नाही. उलट तू इथं आमच्या डोळ्यांपुढेच असायला हवा. आमची नजर असेल तुझ्यावर…आणि मी आता तुझ्या बरोबर काम करणार नाही. तू आपली टीम बदल. काय कारण द्यायचं ते मॅनेजमेंटला दे,’’ ऐश्वर्यानं कडक आवाजात तंबी दिली.

सुशांतला बदलत्या काळातल्या स्त्री शक्तीचा अंदाज आला होता. आता तो स्त्री शक्तीला कमी लेखणार नव्हता. थकलेल्या पावलांनी त्यांने आपल्या घराचा रस्ता धरला.

प्रिये तुझ्याचसाठी

कथा * रमणी मोटे

हमीसारखंच कार्तिक अन् रोहिणीच्या वादाचं पर्यवसान भांडणात झालं. भांडण थांबवण्याचा उपाय म्हणून कार्तिक गप्प बसला अन् आपल्या खोलीत लॅपटॉप उघडून काम करू लागला.

रोहिणी खूपच उत्तेजित झालेली होती. भांडणाची खुमखुमी मिटलेली नव्हती. त्याच अवस्थेत तिनं काही वेळ हॉलमध्ये फेऱ्या मारल्या अन् एकाएकी ती घराबाहेर पडली.

गेटमधून बाहेर पडतेय तोवर वॉचमन धावत आला, ‘‘मॅडम, कुठं बाहेर निघालात. टॅक्सी मागवू का?’’

‘‘नको, मी जवळच जाऊन येतेय,’’ रोहिणीनं म्हटलं.

रात्रीचे दहा वाजले होते. पण कुलाब्याच्या रस्त्यांवर अजूनही भरपूर वर्दळ होती. दुकानंही उघडी होती. लोक खरेदी करत होते. हॉटेल्स अन् स्वीटमार्टमधूनही लोक गर्दी करून होते.

रोहिणीच्या मनात खळबळ माजली होती. हल्ली जेव्हा जेव्हा रोहिणीचं कार्तिकशी भांडण व्हायचं, तेव्हा विषय नेमका कार्तिकच्या कुटुंबावरच येऊन थांबायचा. कार्तिक त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मोठ्या तिघी बहिणी होत्या. आईवडिलांचा तो लाडका होता तसाच तिघी बहिणींचाही लाडका होता. ही पाच माणसं सतत त्याच्या कौतुकात मग्न असायची.

अर्थात त्याबद्दल रोहिणीची काही तक्रार नव्हती. पण कधीकधी तिला वाटायचं की तिचा नवरा अजूनही अगदी लहानसं बाळ आहे. तो स्वत:च्या मनानं काहीच निर्णय घेऊ शकत नाही. दिवसाकाठी एकदा तरी तो आई आणि बहिणींशी बोलतोच. त्याशिवाय त्याला चैन पडत नाही.

या गोष्टीवरून रोहिणी चिडते तेव्हा तो म्हणतो ‘‘बाबा गेल्यावर मीच त्यांचा आधार आहे. माझ्या जन्मापासून आई आजारी आहे. तिघी बहिणींनीच मला वाढवलं आहे. वडील गेल्यावर परिस्थिती फार बिकट होती. आईनं कसे ते दिवस काढले तिलाच ठाऊक! त्या ऋणातच राहतो मी.’’

तो असा भावनाविवश झाला की रोहिणी गप्प बसते. पण तिला एक गोष्ट समजत नाही…मुलांचं पालनपोषण, त्यांना वाढवणं हे आईबापांचं कर्तव्यच असतं. त्यांनी ते केलं तर त्यात त्यांचे उपकार कसे ठरतात? तिच्याही आईवडिलांनी तिला वाढवलंच ना? पण ती वाद घालत नाही. एरवी तिची कार्तिकबद्दल काहीच तक्रार नाही. तिचं त्याच्यावर प्रेम आहे. कार्तिकही तिच्यावर जीव टाकतो. तो अत्यंत सज्जन माणूस आहे. भरपूर कमवतो. पैशाली तोटा नाहीए. पण त्यांचं प्रेम इतर लोकांमध्ये विभागलं जातंय हेच तिचं दु:ख आहे.

जेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हा कार्तिकनं तिला म्हटलं होतं, ‘‘तू माझा हृदय स्वामिनी आहेस, जिवाची जिवलग आहेस. तुला हवं तसं तू आपलं घर मांड, सजव, हवं तसं चालव…मी तर स्वत:लाही तुझ्या हवाली केलंय. पैसा ही भरूपर देईन. फक्त एकच विनंती आहे, मी माझ्या कुटुंबाशी फार बांधील आहे, गुंतलोय मी त्यांच्यात…आणि म्हणूनच मला वाटतंय की तू ही त्यांच्याशी चांगले संबंध ठेव. त्यांना मान दे, मी माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही आणि माझ्या बहिणींनाही दु:खी बघू शकत नाही.’’

रोहिणीला आठवलं, हनीमूनसाठी ती दोघं सिंगापूरला गेली होती. कित्ती कौतुक केलं होतं कार्तिकनं तिचं. ती अगदी तृप्त तृप्त झाली होती. खूप मजा केली. परतायच्या आदल्या दिवशी ती दोघं बाजारात फिरत असताना कार्तिक एका ज्वेलरी शॉपपाशी थबकला. ‘‘ये ना, इथं जरा बघुयात काय काय आहे.’’ त्यांन तिचा हात धरून दुकानांत प्रवेश केला.

मनातल्या मनात ती सुखावली…कार्तिक तिच्यासाठी दागिना खरेदी करतो बहुतेक.

दोघांनी मिळून बरेच दागिने बघितले. एक नेकलेस उचलून कार्तिकनं म्हटलं, ‘‘हा कसा वाटतोय?’’

‘‘वाह! हा तर फारच सुंदर आहे.’’ आनंदून तिनं म्हटलं.

‘‘तुला नक्की आवडलाय ना? आपल्या हनीमून ट्रिपची आठवण म्हणून घेतोय तुझ्यासाठी.’’ तो प्रेमानं म्हणाला.

‘‘कार्तिक, तुम्ही किती चांगले आहात…’’ ती भारावून बोलली.

‘‘पण खूप महाग आहे…’’

‘‘तू पैशांची काळजी करू नकोस आणि हे बघ, एक एक बरासा नेकलेस माझ्या तिघी बहिणींसाठीही पसंत कर. इथून परत गेल्यावर त्यांनाही माझ्याकडून गिफ्टची अपेक्षा असेलच ना?’’

मध्येच बहिणी आल्यामुळे रोहिणीला मनातून जरा रागच आला होता. पण तसं न दाखवता तिनं विचारलं, ‘‘आणि आईंसाठी?’’

‘‘आईसाठी छानशी शाल घेऊयात…’’ त्यानं म्हटलं.

भरपूर खरेदी करून ती दोघं परत आली. त्यानंतर प्रत्येक सणावारी तो बहिणींना काहीतरी भेटवस्तू पाठवायचाच. जेव्हा ऑफिसच्या कामानिमित्तानं त्याला परदेशी जावं लागायचं, तेव्हा त्याच्या भाचा, भाचींकडून त्यांना हव्या असलेल्या वस्तूंची यादी आधीच घरी पोहोचलेली असे. त्याच्या माणसांनी काही म्हणायचा अवकाश की ती गोष्ट तो ताबडतोब करायचा.

खरं तर रोहिणीला याबद्दलही आक्षेप नव्हता. कार्तिक एका आयटी कंपनीत नोकरी करत होता. भरपूर कमवत होता. त्याचं काहीही करायला तो मुखत्यार होता. तिला खटकणारी बाब होती त्याचा वेळ. त्याचा मौल्यवान वेळ जो तिला फक्त स्वत:साठी हवा असायचा, तो वेळ कार्तिक त्याच्या कुटुंबीयांसाठी देत होता. त्याचा वेळ अन् त्याचं प्रेम यात तिला कुणाचाही वाटा नको होता. त्यावर फक्त तिचा अन् तिचाच हक्क आहे असं तिला वाटायचं.

आजचं भांडण त्यावरूनच तर झालेलं. लवकरच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस येणार आहे. रोहिणीच्या मनात होतं यंदा परदेशात कुठं तरी जाऊन लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा. पण कसचं काय? तिच्या भिशी पार्टीतल्या दोन तीन बायका इटलीला जाऊन आल्या अन् सतत तिथली वर्णनं ऐकवतात…किती सुंदर आहे अन् त्यांनी किती मजा केली…ते ऐकून ऐकून रोहिणीचे कान किटले होते. तिच्या एक दोन मैत्रिणींचे नवरे अरबपती होते. त्या तर सतत पैसे खर्च करून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायच्या. रोहिणीला त्यांचा फार हेवा वाटायचा.

यंदा तिनं बऱ्याच शर्थीनं कार्तिकला तयार केलं होतं की ती दोघं इटलीला जातील. मनसोक्त पैसा खर्च करायचा, चैन चंगळ करूनच परतायचं.

मनातल्या मनात तिनं किती तरी वेळा चित्र रंगवलं होतं की फ्रेंच शिफॉनची देखणी साडी नेसून महागातल्या परदेशी परफ्यूमचा फवारा अंगावर मारून परदेशी चॉकलेटचा मोठा डब्बा हातात घेऊन ती भिशीपार्टींला गेली आहे…सगळ्या जणी मनातून खूप जळताहेत, हेवा करताहेत पण वरकरणी तिचं कौतुक करताहेत.

पण आज जेवण झाल्यावर जेव्हा तिनं हा विषय काढला, तेव्हा कार्तिक म्हणाला, ‘‘यावेळी बाहेर जाणं मला अवघडंच वाटतंय…’’

‘‘का?’’

‘‘अगं, सगळ्यात मोठी माझी शकुंतला अक्का…तिच्या थोरल्या मुलीचं लग्न ठरलंय ना? तुला सांगितलंही होतं मी…तर आजच सकाळी तिचा फोन आला की एवढ्यातच त्यांच्याकडे साखरपुडा समारंभ आहे आणि आपलं तिथं जाणं फारच गरजेचं आहे. शेवटी मीच एकुलता एक मामा आहे ना? मला पुढाकार घ्यायला हवा.’’

‘‘तुमच्या घरात तर सतत काही ना काही चालूच असतं.’’ ती जरा चिडून म्हणाली, ‘‘कधी कुणाचं बारसं, कुणाचा वाढदिवस, कुणाचं जावळ अन् काय न् काय!’’

‘‘अगं, लग्नाचा वाढदिवस तर दरवर्षीच येतो ना? लग्नं दरवर्षी होतात का? अक्कानं खूप बजावून अन् आग्रहानं बोलावलंय…कुठलीही सबब तिला चालणार नाहीए.’’

‘‘मला एक सांगा, आपण आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे कधी जगूच शकणार नाही का?’’

तिचा संताप बघून तो शांपतपणे म्हणाला, ‘‘डार्लिंग, अशी चिडू नकोस. अगं, मॅरेज एनव्हसरी साजरी करायला आपण पुढल्या वर्षी जाऊयात ना? आत्ताच ठरवं, कुठं जायचं. किती रहायचं…मी सगळं प्लॉनिग तुझ्यावर सोपवतो.’’

‘‘हो…हो…तर…फारच उपकार आहेत तुमचे. मी सगळा प्लॅन ठरवेन अन् तुमच्या बहिणीचा फोन आला की सगळंच ओम फस्स! सगळं सगळं कॅन्सल!!’’

‘‘अगं, नेहमी असं होतं का?’’

‘‘होतं…नेहमीच असं होतं…आमचं स्वत:चं म्हणून काही आयुष्य नाहीए आम्हाला.’’

‘‘तू उगीचच चिडते आहेस. तुला कधी काही कमी पडू दिलंय का मी? तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, तुझे सगळे हट्ट पुरवतो.’’

‘‘त्यात काय मोठंसं?… ते तर सगळेच नवरे करतात…पण तेच नवरे जे बायकोबरोबर खरोखर प्रेम करतात.’’

‘‘म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी तुझ्यावर प्रेम करत नाही?’’ कार्तिकनं रोहिणीच्या डोळ्यात रोखून बघत विचारलं.

‘‘वाटतं तर तसंच.’’

‘‘रोहिणी, हे मात्र तू अति करते आहेस. तुलाही ठाऊक आहे, माझं तुझ्यावरचं प्रेम बघून माझे मित्र मला चिडवतात, बायकोचा गुलाम म्हणतात.’’

‘‘ते असं म्हणतात? नवल आहे…इथं तर माझे कोणतंही म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. मी काही म्हटलं की ‘आता जमणार नाही?’ हेच मला ऐकवलं जातं…खरं तर तुम्हाला ‘आईचं बाळ’ किंवा ‘बहिणींचा आज्ञाधारक भाऊ’ म्हणायला हवं.’’

कार्तिक खळखळून हसला, ‘‘तू म्हणजे ग्रेट आहेस.’’ एवढं बोलून त्यानं रोहिणीला गालावर प्रेमानं थोपटलं अन् टीव्ही. ऑन केला.

रोहिणी अजूनही भुणभुणत होती. तिला हा विषय उद्यावर ढकलायचा नव्हता. जो काही निर्णय असेल तो आजच, आत्ताच व्हायला हवा. म्हणून पुन्हा तिनं विचारलं, ‘‘तर मग, काय ठरवलंय तुम्ही?’’

‘‘कशाबद्दल?’’ अगदी सहज आश्चर्यानं कार्तिकनं विचारलं.

‘‘हे घ्या! मघापासून मी काय बोलतेय? निरर्थक बडबड वाटली का तुम्हाला? आपण इटलीच्या टूरवर जातो आहोत की नाही?’’

‘‘सांगितलं ना, की यावेळी जरा अवघड आहे…तुमला माहीत आहे. मला सुट्टया फार कमी असतात. यावेळी लग्नाला जायला हवं. पुढल्या वर्षी इटली…अगदी नक्की!’’

‘‘अजिबात नाही…असली पोकळ आश्वासनं मला नको आहेत.’’

‘‘अगं, हे बघ, पुढल्या वर्षीही इटली तिथंच असणार आणि आपण दोघंही तिथं जाणार…’’

‘‘हो, आणि तुमचं कुटंबही इथंच असणार अन् त्यांचे काही तरी कार्यक्रमही मध्येच उपटणार!’’

‘‘कधी कधी तू फारच बालिशपणा करतेस…’’

‘‘हो, हो, आहेच मी मूर्ख, अक्कलशून्य, स्वार्थी, आप्पलपोटी, सगळे, सगळे दुर्गुण ठासून भरले आहेत माझ्यात.’’

‘‘यावेळी तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही. आत्ता तू संतापलेली आहेस, उद्या शांत डोक्यानं ठरवूयात. मी जरा माझं ऑफिसचं काम संपवतो.’’ एवढं बोलून कार्तिकनं त्याचा लॅपटॉप ऑन केला.

रोहिणीच्या मनासारखं न झाल्यामुळे ती धुमसत होती. थोड्याच वेळात ती घराबाहेर पडली.

अजूनही रस्त्यावर चांगलीच वर्दळ होती. सिनेमा थिएटर दिसताच तिला वाटलं तिकिट काढून आत जावं, दोन तास मजेत जातील. पण तेवढ्यात विचार आला की ती घरात नाही हे बघून कार्तिक काळजी करेल. तिला शोधेल…इथे, तिथे फोन करेल…तिनं बेत बदलला. गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं चालू लागली.

खूप लोक समुद्रकाठी बसून गप्पा मारत वाऱ्याच्या झाळुकींचा आनंद उपभोगत होते. रोहिणीही तिथंच बसली. दृष्टी पार समुद्राच्या अंतावर स्थिरावली होती.

समुद्रात दोन तीन जहाजं नांगरून पडलेली…त्यांच्या वरचे दिवे समुद्राच्या पाण्यात विलोभनीय दिसत होते. रोहिणीला वाटलं, सरळ समुद्रात उडी घ्यावी. काही क्षणांत तिचं आयुष्य संपेल.

मग तिला मन:चक्षुसमोर दृष्य दिसलं. तिच्या निर्जीव देहाला कवटाळून कार्तिक आक्रोश करतोय. म्हणतोय, तू इतकी रागावशील, मला वाटलंच नव्हतं. मी तुझे म्हणणं मान्य केलं असतं तर तू मला अशी एकट्याला टाकून गेलीच नसतीस…

पण छे! जीव बीव नाही हं द्यायचा. अजून काहीच जग बघितलं नाही अन् एवढं काय घडलंय की जीव द्यावा? ठीक आहे, नवऱ्याशी भांडण झालंय, पण ते तर सगळ्याच नवरा बायकोत होतं, तो वैवाहिक जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. कधी भांडण, कधी प्रेम, खरं तर तिच्या आयुष्यात प्रेम आणि सुखंच जास्त आहे. दु:ख खरं तर नाहीच, पण तिच्या आठमुठेपणामुळे ती दु:खी होते.

कधीकधी कार्तिकही अडून बसतोच ना? त्यावेळी तिला खूप राग येतो. त्यावेळी ती फार उत्तेजित होते…विचलित मन:स्थितीत तिला काय करावं ते समजत नाही. मग असं काहीबाही मनांत येतं. लग्नाला चार वर्षं झालीत. अजून मूलबाळ नाही…कदाचित त्यामुळेच तडजोड करणंही जमत नसेल…

विचारांच्या तंद्रीत किती वेळ गेला तिला कळलंच नाही. ती भानावर आली तेव्हा तिच्या जवळपासची सर्वच गर्दी ओसरली होती. आइस्क्रिम वगैरे विकणारेही आपापलं सामान आवरून निघून गेले होते. ताज हॉटेलसमोर होती थोडी वर्दळ…मेन गेटशी दरवाजात उभे होते.

आता रस्त्यावर भडक वेषभूषेतल्या बऱ्याच महिला दिसत होत्या. तंग कपडे, विचित्र हावभाव…तसल्याच असाव्यात त्या स्त्रिया.

थोड्या थोड्या वेळात गाडीतून लोक यायचे. कुणा एकी जवळ थांबायचे. भाव ठरला पटला तर ती स्त्री त्या गाडीत बसायची अन् निघून जायची. तो सगळा प्रकार बघून रोहिणीला गंमत वाटली.

तेवढ्यात एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्यात तीन चार तरूण होते. कारच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून एकानं म्हटलं, ‘‘हाय ब्युटीफुल? एकटीच बसली आहेस? ये, आमच्या बरोबर…मजा करू, हिंडू फिरू?’’

रोहिणी दचकली…हे कॉलेज तरूण तिला वेश्या समजाहेत की काय?

हरामखोर…त्यांना एक सभ्य, कुलीन स्त्री अन् वेश्या यातील फरक कळू नये? शी, इथं थांबण्यात अर्थ नाही, घरी जायला हवं.

ती घाईनं चालू लागली. कार तिच्याजवळून फुरर्कन निघून गेली…अन् काही क्षणांतच माघारी वळून पुन्हा तिच्याजवळ आली.

‘‘ये ना डार्लिंग, तुला हॉटेलात नेतो, बीयर पिऊयात, नॉनव्हेज खाऊयात…तुला चायनीज आवडतं? चल, महागड्या हॉटेलात तुला जेवायला घालतो. आपण डान्स करू…ये ना,’’ पुन्हा एका तरूणानं खिडकीतून डोकं बाहेर काढत तिला म्हटलं.

तिनं संताप गिळून शांतपणे म्हटलं, ‘‘तुमचा गैरसमज झालाय, मी एक गृहिणी आहे. स्वत:च्या घरी निघालेय.’’

‘‘असं? तर मग तुला घरी सोडतो…कुठं राहतेस तू?’’

ती मुलं तिच्या चालण्याच्या स्पीडनंच कार चालवत होती. सतत तिच्याशी बोलत होती. रोहिणीच्या लक्षात आलं, या मुलांकडे पैसे नाहीएत…गाडीही बहुधा चोरलेली असावी. त्यांना फुकटात मिळेल तेवढी चंगळ करायची आहे.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करून रोहिणी चालत होती. तेवढ्यात त्यांनी गाडी तिच्यापुढे आडवी घातली. एक जण खाली उतरला अन् त्यानं तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. ‘‘इतका हट्टीपणा कशासाठी करतेस स्वीटी? चल, आमच्याबरोबर…तुला सुपर टाइम देतो. आय प्रॉमिस…’’

‘‘खबरदार हात लावाल तर…मी पोलिसांना बोलवेन. आरडा ओरडा करेन…’’ रोहिणी कडाडली.

तेवढ्यात आणखी एक कार तिच्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीत कार्तिक होता.

‘‘रोहिणी, पटकन् ये. गाडीत बैस.’’ त्यानं जोरात हाक मारली. त्या मुलांना झटकून रोहिणी गाडीत बसली. कार्तिकला बघून मुलं पटकन् कारमध्ये बसून निघून गेली.

‘‘इतक्या रात्री हे काय भलतंच सुचलं तुला?’’ कार्तिकनं झापलंच तिला. ही काय बाईनं एकटं दुकटं फिरायची वेळ आहे? कधी गं तुला समजून येणार? कसले गुंड मवाली फिरत असतात. शिकार शोधत असतात…त्यांच्या तावडीत सापडली असती तर?’’

‘‘काय झालं असतं?’’

‘‘ती पोरं तुला गाडीत घालून घेऊन गेली असती…’’

‘‘अशी बरी घेऊन गेली असती? पोलीस असतात ना?’’

‘‘आत्ता इथं जवळपास होता एक तरी पोलीस?’’

रोहिणी गप्प होती.

‘‘तुला त्यांनी गाडीत घालून नेली असती…रेप करून कुठं तरी फेकून मोकळे झाले असते…अगं कळंत नाही तुला? अक्कल शेण खायला गेली का?’’ कार्तिक संतापून म्हणाला.

‘‘असं नसतं झालं. मी मोठ्यांदा ओरडले असते. लोक आले असते…’’

‘‘बोलायच्या गोष्टी आहेत सगळ्या. पाच मिनिटात सगळं घडलं असतं…कुणाला काही समजलंही नसतं…तू एकटी होतीस…ती चौघं तरूण मुलं होती. विचार कर…खरं तर बायकांनी स्वत:च विचार करायला हवा. अनोळखी माणसापाशी लिफ्ट मागणं, निर्जन रस्त्यावर एकटं फिरणं किती धोक्याचं आहे.’’

रोहिणी आता गप्प बसून होती. दोघं घरी पोहोचली…घरात पोहोचताच कार्तिकनं तिला मिठीत घेतली, ‘‘एक वचन दे…कधीही आपलं भांडण झालं तरी तू एकटी अशी घराबाहेर पडणार नाहीस म्हणून.’’ त्यानं खिशामधून इटलीच्या प्रवासाची विमान तिकिटं अन् तिथल्या हॉटेल बुकिंगची कागद पत्रं काढून तिच्या हातात ठेवली.

‘‘हे काय? तुम्ही तर म्हणाला होता की यंदा जमणार नाही म्हणून?’’ रोहिणीनं आश्चर्यानं विचारलं.

‘‘म्हटलं होतं, पण माझ्या लाडक्या बायकोचं म्हणणं मी टाळू शकत नाही ना?’’

‘‘नको, तिकिटं कॅन्सल करा.’’

‘‘का?’’

‘‘अहो, शंकुतला अक्कांकडे लेकीचं लग्न आहे. आपल्याला जावं लागेल ना?’’

‘‘अक्काला सांगेन काही तरी कारण…नाही जमत यायला.’’

‘‘घ्या! म्हणजे पुन्हा सगळ्यांकडून ऐकून घ्यायचं की रोहिणी सासरच्यांशी फटकून वागते अन् नवऱ्यालाही मुठीत ठेवलंय…त्यालाही आमच्यात मिसळू देत नाही.’’

आश्चर्यानं तिच्याकडे बघत कार्तिकनं म्हटलं, ‘‘कमाल करतेस गं! चित पण तुझा, पट पण तुझा? अगं छापा, काटा एक काही तरी ठरव ना? कसं काय करावं मी?’’

‘‘असंच आहे माझं!’’ त्याला मिठी मारत अतीव समाधानानं अन् गर्वानं रोहिणीनं म्हटलं.

पुनर्विवाह

कथा * कुसुम आगरकर

पूजा दिल्लीच्या या नव्या कॉलनीत राहायला आल्यापासून तिचं लक्ष सतत समोरच्या फ्लॅटकडे असायचं. तो फ्लॅट तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीच्या अगदी समोर पडायचा. काहीसं गूढ पण मनाला ओढ लावणारं घर असं तिनं त्याचं नाव ठेवलं होतं. सुमारे ३०-३५ वर्षांचा एक पुरूष सतत आतबाहेर करताना दिसायचा. त्याची धावपळ कळायची. एक वयस्कर जोडपंही अधूनमधून दिसे. ५-६ वर्षांचा एक गोजिरवाणा मुलगाही दिसायचा.

त्या घराविषयीची पूजाची उत्सुकता अधिकच चाळवली जेव्हा त्या घरात तिला एक तरूण सुंदर मुलगीही दिसली. क्वचितच ती बाहेर पडत असावी. तिचा सुंदर निरागस चेहरा आणि उन्हाळ्यातही तिनं डोक्याला बांधलेला स्कार्फ बघून पूजाचं कुतुहुल आणखी वाढलं.

शेवटी एकदा पूजानं तिच्या दूधवाल्या गवळ्याला विचारलंच, ‘‘भाऊ, तुम्ही समोरच्या घरातही रतीब घालता ना? कोण कोण राहतं तिथं?’’

हे ऐकून दूधवाल्यानं सांगितलं, ‘‘ताई, गेली वीस वर्षं मी त्यांच्याकडे रतीब घालतोय. पण हे वर्ष मात्र त्यांच्यासाठी फारच वाईट ठरलं आहे.’’ बोलता बोलता त्याचे डोळे भरून आले, कंठ दाटून आला. कसाबसा तो बोलला, ‘‘कधी शत्रूवरही अशी वेळ येऊ नये.’’

‘‘भाऊ शांत व्हा…मी सहजच बोलले…’’

पूजाला थोडं अपराधी वाटलं. तरीही नेमकं काय घडलं ते जाणून घेण्याची उत्सुकताही वाढली.

दूधवाल्यालाही कुठं तरी मन मोकळं करावं असं वाटलं असावं. तो स्वत:ला सावरून बोलायला लागला, ‘‘काय सांगू ताई. लहानशी, भाहुलीसारखी होती सलोनी, तेव्हापासून दूध घालतोय मी. बघता बघता ती मोठी झाली. अशी गुणी, हुशार अन् सुंदर पोर की तिला कुणीही पसंत करावी. पण तिच्यासारख्या रत्नासाठी तेवढंच तोलामोलाचं स्थळ हवं होतं.

‘‘एक दिवस आकाशसाहेब त्यांच्या घरी आले. स्वत:ची ओळख करून देऊन म्हणाले की कदाचित सलोनीनं तुम्हांला सांगितलं नसेल पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे अन् आम्हाला लग्न करायचं आहे.

‘‘आकाशसाहेब स्वत: दिसायला चांगले, उच्चशिक्षित, उत्तम नोकरी, चांगलं घराणं, एकुलता एक मुलगा…अजून काय हवं? सलोनीच्या आईवडिलांना एकदम पसंत पडले. त्यांनी म्हटलं, ‘‘आम्हाला जावई म्हणून तुम्ही पसंत आहात, पण तुमच्या आईवडिलांना हे नातं पसंत आहे का?’’

‘‘हे ऐकून आकाशसाहेब उदास मनाने मग बोलले की त्यांचे आईवडिल कार अपघातात दोन वर्षांपूर्वी वारले. काका, काकू, मामामामी, मावशी आत्या वगैरे सर्व नातलग आहेत. त्यांना हे लग्न पसंत आहे.’’

‘‘आमच्याकडून लग्नाला होकार आहेच पण तुम्हाला एक विनंती आहे की लग्नानंतरही तुम्ही सलोनीसह इथं वरचेवर यावं. ती आमची एकुलती एक मुलगी आहे. तुम्ही दोघं इथं येत राहिलात की आम्हालाही एकटं वाटणार नाही. शिवाय तुमच्या रूपानं आम्हाला मुलगा मिळेल.’’

आकाशला त्यात काहीच अडचण नव्हती. थाटामाटात लग्न झालं. वर्ष दीड वर्षात बाळही झालं.

‘‘मग हे तर सर्व फारच छान आहे…तुम्हाला वाईट कशाचं वाटतंय?’’ पूजानं आश्चर्यानं विचारलं.

‘‘सांगतो ना,’’ दूधवाल्यानं म्हटलं. एकदा दूध घालायला गेलो तर घरात आकाशसाहेब, सलोनी अन् शौर्य बाळ सगळेच बसलेले दिसले. सलोनी तर खूपच दिवसांनी भेटली म्हणताना मी म्हटलं, ‘‘कशी आहेस सलोबेबी? किती दिवसांनी दिसते आहेस? येत जा गं लवकर…आम्हालाही फार आठवण येते तुझी.’’ पण मला नवल वाटलं, काका,काकी वरून माझ्याशी अत्यंत प्रेमानं आदरानं बोलणारी माझी सलोबेबी काहीही उत्तर न देता आत निघून गेली. मला वाटलं, लग्न झाल्यावर मुली परक्या होतात, दुरावतात, कधीकधी त्यांना सासरच्या श्रीमंतीचा गर्व होतो. मी मुकाट्यानं तिथून निघालो. पण मला नंतर समजलं की सलोनीला तिचा आजारानं थकलेला, उदास चेहरा मला दाखवायचा नव्हता. एरवी सतत आनंदी असणारी, उत्सहानं सळसळणारी…तिला ब्लड कॅन्सर झाला होता.

यावेळी ती इथं उपचारासाठी आली होती. तिचा ब्लड कॅन्सर थर्ड स्टेजमध्ये होता. औषधा पाणी, प्रयत्नांची पराकाष्ठा चालली होती पण गुण येत नव्हता.

सगळ्यात नामवंत हुषार डॉक्टरांनाही दाखवलं. सलोबेबीची तब्येत दिवसेदिवस खालावते आहे. वारंवार किमो थेरेपीमुळे लांबसडक केस गळून टक्कल पडलंय, म्हणूनच तिला सतत स्कार्फ बांधावा लागतो. कितीवेळा रक्त बदललं…कुठं काही कमी नाहीए उपचारांत. आकाशासाहेब तर सर्व कामं सोडून तिच्या उशाशी बसून राहतात. खूप प्रेम आहे त्यांचं तिच्यावर.

दूधवाला निघून गेला. सायंकाळी विवेक ऑफिसमधून घरी परतल्यावर पूजानं त्याला सकाळची सगळी कहाणी ऐकवली. ‘‘या दुखद कथेतला चांगला भाव म्हणजे आकाश एक अत्यंत चांगला नवरा आहे. सलोनीची इतकी सेवा करतोय. लग्न संसार पूर्णपणे भिनलेत त्याच्या वृत्तीत. नाही तर हल्लीची ही तरूण मुलं, लिव्ह इन रिलेशनशिप काय अन् सतत भांडणं, सेपरेशन आणि घटस्फोट काय…’’

एकदम तिच्याच लक्षात आलं, ऑफिसातून थकून आलेल्या नवऱ्याला चहा तरी विचारायला हवा. आल्या आल्या हे काय पुराण सुरू केलं. ती स्वयंपाकघराकडे वळली. तिचं लक्ष समोरच्या घराकडे गेलं.

आज तिथं बरीच गडबड सुरू होती. घरात माणसांची संख्याही वाढली होती. काही तरी बोलणं वगैरे सुरू होतं. तेवढ्यात एम्बुलन्सचाही आवाज आला…पूजा एकदम स्तब्ध झाली…सलोनीला काही…?

पूजाची शंका खरी ठरली. सालोनीची तब्येत फारच बिघडल्यामुळे तिला हॉस्पिटलला हलवलं होतं. त्यांच्याशी फारशी ओळख नव्हती तरी पूजा अन् विवेक दुसऱ्यादिवशी तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले…आकाशची तडफड बघवत नव्हती. डॉक्टरांनी हात टेकले होते. शेवटी तेच घडलं. त्याच रात्री सलोनीची प्राणज्योत मावळली.

त्यानंतर सुमारे दोन अडीच महिन्यांचा काळ उलटला. त्या घराकडे लक्ष गेलं की पूजाला सलोनीचा तो सुंदर निरागस चेहरा आठवायचा. आकाशची तडफड आठवायची. ‘‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’’ हे पटायचं अन् कर्तव्यदक्ष, प्रेमळ नवरा म्हणून आकाशचं कौतुक वाटायचं.

त्यादिवशी दुपारी दोनचा सुमार असेल. सर्व कामं आटोपून पूजा दुपारी आडवी होणार, तेवढ्यात दाराची घंटी वाजली. दारात एक स्त्री उभी होती. तिला हल्लीच समोरच्या घरात पूजानं बघितलं होतं.

‘‘आमंत्रण द्यायला आलेय. मोठ्या मालकीणबाईंनं पाठवलंय मला.’’

‘‘काय आहे?’’

‘‘उद्या लग्न आहे. नक्की या.’’

पूजा काही बोलेल, विचारेल इतकाही वेळ न देता ती तडक निघून गेली. बहुधा ती फार घाईत असावी.

ती निघून गेली…जाता जाता पूजाची झोप उडवून गेली. पूजा विचार करत होती. कुणाचं लग्न असावं? कारण लग्नाच्या वयाचा कुणीच तरूण किंवा तरूणी त्या घरात नव्हते.

सायंकाळी विवेक येताच पूजानं मनातली खळबळ त्याच्यासमोर मांडली. तिला वाटत होतं की तिच्याप्रमाणेच विवेकही चकित होईल, विचार करेल, कुणाचं लग्न? पण तसं काहीच झालं नाही. तो नेहमीप्रमाणे शांतच उभा होता. सहज म्हणाला, ‘‘शेजारी आहेत आपले. जायला हवं.’’

‘‘पण तुम्हाला माहीत आहे का लग्न कुणाचं आहे ते? कुणाच्या लग्नाला आपण जाणार आहोत?’’ पूजानं जरा नाराजीनंच विचारलं. तिला वाटलं विवेक तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय.

‘‘अगं, लग्न आकाशचंच आहे, शौर्यचं तर लग्न करता येणार नाही ना? किती लहान आहे तो? सलोनीच्या आईवडिलांचीच इच्छा आहे की लग्न लवकर व्हावं. कारण आकाशला याच महिन्यांत ऑफिसच्या कामानं परदेशी जायचं आहे. गेले कित्येक महिने सलोनीच्या आजारपणामुळे तो हा प्रवास टाळत होता. सलोनीच्या चुलत बहिणीशीच त्याचं लग्न होतंय.’’

हे ऐकून पूजाच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं तिला. ज्या आकाशबद्दल आदर्श नवरा म्हणून तिला प्रचंड आदर आणि कौतुक वाटत होतं. तो आकाश बायकोच्या मृत्युला दोन महिने होताहेत तोवरच पुन्हा बोहल्यावर चढतोय? मग ते प्रेम, ती सेवा, ती तडफड सगळा देखावाच होता का?

नवऱ्याच्या आयुष्यातलं बायकोचं स्थान फक्त ती जिवंत असेपर्यंतच असतं का? बायको मेली की तिचं नावही पुसून टाकायचं आयुष्यातून?…मला काही झालं तर विवेकही असंच करेल का? पूजा या विचारांनी इतकी दु:खी झाली, भांबावली की पटकन सोफ्यावर बसली. दोन्ही हातांनी तिनं डोकं दाबून धरलं. सगळं घर फिरतंय असं तिला वाटलं.

विवेकनं तिला आधार दिला. ‘‘काय झालं पूजा? काय होतंय?’’ त्यांने तिला प्रेमळ शब्दात विचारलं.

पूजानं उत्तर दिलं नाही…‘‘तुला धक्का बसलाय का? शांत हो बरं! अगं, तुला काही झालं तर माझ्याकडे कोण बघणार?’’ त्यांनी तिला जवळ घेत, समजूत घालत म्हटलं.

एरवी विवेकच्या या शब्दांनी सुखावणारी पूजा एकदम तडकून ओरडली, ‘‘तर मग तुम्हीही या आकाशसारखी दुसरी बायको घेऊन या. सगळे पुरूष मेले असेच दुटप्पी अन् स्वार्थी असतात.’’

तिला थोपटून शांत करत अत्यंत संयमानं विवेकनं म्हटलं, ‘‘तू उगीच डोक्यात राख घालून स्वत:चं बी.पी. वाढवू नकोस. आकाशला सलोनीच्या आईवडिलांनीच आग्रह केला आहे, कारण आकाशला ते आपला मुलगाच मानतात ना? त्याचं एकटेपणाचं दु:ख बघवत नाहीए त्यांना. शिवाय लहानग्या शौर्यलाही आईची माया हवीय ना? त्यांनीच समजावून सांगितलं की तू लग्न कर. तुझ्या पत्नीच्या रूपात आम्हाला आमची मुलगी मिळेल. त्यांनीच पुढाकार घेऊन आपल्या पुतणीशी त्याचं लग्न जुळवलं आहे.’’

एव्हाना पूजा थोडी सावरली होती. विवेकनं तिला पाणी प्यायला दिलं. पुन्हा त्याच स्निग्ध, शांत आवाजात तो बोलू लागला, ‘‘पूजा आयुष्य म्हणजे केवळ आठवणी आणि भावना नसतात. वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. प्रसंगी भावनांना मुरड घालावी लागते. वास्तवाला सामोरं जावं लागतं. दु:ख विसरून भविष्याकडे वाटचाल करणं याला ‘जीवन ऐसे नाव.’’’

‘‘पण त्याचं सलोनीवर…’’

‘‘प्रेम होतंच. अजूनही आहेच. ते कायमच असेल. दुसरं लग्न करतोय म्हणजे सलोनीला विसरला असं नाहीए. पण सलोनी आता परत येणार नाही, पण या पत्नीत तो आता सलोनीला बघेल. ही त्याची सलोनीला अत्यंत सार्थ आणि व्यावहारिक श्रद्धांजली आहे.’’

‘‘हे लग्न म्हणजे स्त्री आणि पुरूष एकमेकांचे पूरक असल्याचा पुरावा आहे. संसार रथासाठी दोन्ही चाकं लागतात. आकाशच्या संसाराचा रथ जेवढ्या लवकर मार्गावर येईल तेवढं चांगलं ना?’’

आता मात्र पूजाला आपल्या खोट्या विचारांची लाज वाटली. विवेकनं किती  शांतपणे अन् डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न डोळसपणे विचार केला होता. खरोखर आकाश पुन्हा लग्न करतोय यात अयोग्य, अनुचित काय आहे? त्याच्या प्रेमाला बेगडी ठरवण्याचा अधिकार तिला कुणी दिला?

पूजानं विवेकचा चहा आटोपला…रात्रीचा स्वयंपाक व जेवण झाल्यावर ती म्हणाली, ‘‘उद्या लग्नाला जाताना काय कपडे घालायचे ते आत्ताच ठरवूयात. म्हणजे सकाळी घाई होणार नाही. लग्नाला जायचं म्हणजे व्यवस्थित जायला हवं ना?’’

विवेकनं हसून मान डोलावली.

तू माझ्यासाठी काय केलंस

कथा * पद्मा आगाशे

रात्रीचे दोन वाजून गेलेले. अजून प्रसून घरी आला नव्हता. गेले काही दिवस तो रोजच रात्रीपर्यंत घराबाहेर असायचा. उमाही त्याची वाट बघत जागी होती.

गेटच्या आवाजानं ती उठून बाहेर आली. ड्रायव्हरनं दारुच्या नशेत असलेल्या प्रसूनला आधार देत घरात आणलं.

उमा संतापून ओरडली, ‘‘अरे काय दुर्दशा करून घेतली आहेस स्वत:ची? किती अधोगती अजून करून घेशील? स्वत:ची अजिबात काळजी नाहीए तुला?’’

प्रसूनही तसाच ओरडला. शब्द जड येत होते पण आवाज मोठाच होता, ‘‘तू आधी उपदेश देणं बंद कर. काय केलं आहेस गं तू माझ्यासाठी? मला लग्न करायचंय हजारदा सांगतोए, पण तुला तुझ्या आरामातून वेळ मिळेल तेव्हा ना? स्वत:चा मुलगा असता तर दहा ठिकाणी जाऊन मुलगी शोधली असती.

‘‘तुला माझ्या पैशांवर मजा मारायला मिळतेय, साड्या, दागिने, आलिशान गाडीतून फिरायला मिळंतय, तुला काय कमी आहे? पण मला तर माझ्या शरीराची भूक भागवायला काहीतरी करायलाच हवं ना? आधीच मी त्रस्त असतो त्यात तुझ्या बडबडीने डोकं उठतं.’’ तो लटपटत्या पायांनी त्याच्या खोलीत निघून गेला. धाडकन् दार लावून घेतलं.

प्रसूनच्या बोलण्यानं उमाच्या हृदयाला भोकं पडली. ती उरलेली सगळी रात्र तिनं रडून काढली. प्रसून तिच्या बहिणीचा मुलगा. त्याच्यासाठी तिनं आपलं सगळं आयुष्य वेचलं. वडिलांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं. लग्न केलं नाही. सगळं लक्ष केवळ प्रसूनवर केंद्रित केलं होतं.

मीराताईचे यजमान सुरुवातीला प्रसूनला भेटायला यायचे. पण उमाच्या लक्षात आलं त्यांचा तिच्यावरच डोळा आहे. एकदा त्यांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिनं सरळ त्यांच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर ते कधीच इकडे फिरकले नाहीत. उमानंही त्यानंतर कुठल्याही पुरुषाला आपल्या आयुष्यात जागा दिली नाही.

प्रसूनच तिचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ होता. त्याच्या आनंदातच तिचाही आनंद होता. तिच्या अती लाडानंच खरं तर तो बिघडला होता. अभ्यासात बरा होता. पण त्याच्या डोळ्यांपुढे स्वप्नं मात्र पैसेवाला, बडा आदमी बनण्याची होती.

तो बी. कॉम झाल्यावर उमानं एमबीएला एडमिशन मिळवण्यासाठी खूप पैसे खर्च केले. एकदा त्याला नोकरी लागली की छान मुलगी बघून लग्न करून द्यायचं अन् आपण आपलं म्हातारपण आनंदात घालवायचं असा उमाचा बेत होता.

प्रसून दिसायला वडिलांसारखाच देखणा होता अन् त्यांच्यासारखाच लंपट अन् बेजबाबदारही. जेव्हा तो एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला होता तेव्हाच जया नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला. खरं तर त्यानं तिच्या करोडपती वडिलांचा पैसा बरोबर हेरला होता. त्याच्या देखण्या रूपावर अन् गोड गोड बोलण्यावर भाळलेल्या जयानं एक दिवस घरातून खूपसे दागिने घेऊन पळ काढला.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी उमाच्या घराचा दरवाजा ठोठावला. तिला बिचारीला काहीच कल्पना नव्हती. ती पोलिसांना काय सांगणार? दोन दिवस पोलीस कोठडीत काढल्यावर तिची सुटका झाली.

दोन महिने लपतछपत काढल्यावर शेवटी पोलिसांनी जया व प्रसूनला शोधून काढलंच. जयाच्या वडिलांनी आपला पैसा व प्रतिष्ठेच्या जोरावर लेकीला तर सोडवली पण प्रसून मात्र दोन वर्षं तुरुंगात होता.

उमासाठी हा फार मोठा धक्का होता. पैसा गेला, समाजात नाचक्की झाली. पण प्रसूनचं प्रेम ती विसरू शकली नाही. तो तुरूंगातून सुटून आला तेव्हा ती त्याच्यासाठी तुरुंगाबाहेर उभी होती. तिच्या खांद्यावर डोकं टेकवून प्रसून लहान मुलासारखा रडला. मग त्यांनी ते शहर सोडण्याचा निर्णय घेतला.

थोडंफार सामान घेऊन दोघंही पुण्याला आली. बऱ्याशा वस्तीत छोटं घर घेतलं. प्रसून नोकरी शोधू लागला. उमानं काही ट्यूशनस मिळवल्या. प्रसूनला एका प्लेसमेंट एजन्सीत नोकरी मिळाली. अंगभूत हुशारी व तीक्ष्ण नजर या जोरावर प्रसूननं तिथली कामाची पद्धत पटकन शिकून घेतली. त्या धंद्यातले बारकावे जाणून घेतले. वर्षभरातच त्यानं स्वत:ची कंपनी सुरू केली.

पाच-सहा वर्षं चांगली गेली. आता पॉश कॉलनीत बंगला, आलिशान गाडी, शोफर, पैसा अडका सगळं होतं, पण प्रसूनचं लग्न होत नव्हतं. एक जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सहा महिने राहिली पण मग तीही सोडून गेली.

प्रसून अत्यंत तापट अन् अहंकारी होता. पत्नीला गुलाम म्हणून वागवण्याच्या त्याच्या वृत्तीमुळेच मुली लग्नाला नकार द्यायच्या.

प्लेसमेण्टसाठी येणारी मुलं कमिशन देऊन निघून जायची. पण श्रेयाला त्यानं चांगल्या नोकरीचं आमिष दाखवून तिच्याशी लैंगिक संबंधही ठेवले. वर त्याची फोटोग्राफी करून तिला ब्लॅकमेल करू लागला. ती घाबरून त्याला भरपूर पैसे देऊ लागली. मग तर त्यानं अनेक मुलींना या पद्धतीनं फसवलं. श्रेयानं व इतर दोघींनी पोलिसात तक्रार केल्यावर ऑफिसवर पोलिसांनी धाड घातली. कसाबसा तो त्या प्रकरणातून सुटला. या सर्व गोष्टींचा उमाला अजिबात पत्ता नव्हता.

दुसऱ्यादिवशी सकाळी चहाचा ट्रे घेऊन उमा जेव्हा प्रसूनच्या खोलीत गेली, तेव्हा तो चांगल्या मूडमध्ये होता. रात्रीच्या रागाचा कुठे मागमूसही नव्हता.

‘‘प्रसून तू इंटरनेटवर तुझा प्रोफाइल रजिस्टर करून घे. एखादी चांगली मुलगी भेटेलही.’’ तिनं प्रेमानं म्हटलं.

‘‘होय, मावशी, मी केलंय.’’ तो ही उत्तरला.

‘‘मी ही प्रयत्न करतेय.’’ मावशी म्हणाली.

‘‘मावशी, कुणी घटस्फोटितही चालेल. मीही आता चाळीशीला आलोच की!’’ प्रसून म्हणाला.

मावशीनं मॅरेज ब्यूरोमध्ये नांव नोंदवलं. प्रोफाइल बनवून नेटवर टाकलं. चांगले फोटो त्यावर टाकले.

इकडे प्रसूनला ऑनलाइन चॅटिंग करताना मान्यताची फ्रेण्डरिक्वेस्ट दिसली. त्यानं होकार दिला. दोघांचं चॅटिंग सुरू झालं. मान्यता स्वच्छ मनाची मुलगी होती. तिनं  स्वत:विषयी सगळं खरं खरं प्रसूनला सांगितलं. प्रसूननंही तिला खूप गोड गोड बोलून भुलवलं. त्यानं अधिक खोलात जाऊन माहिती मिळवली की मान्यताच्या वडिलांचा व्यवसाय आहे. कनॉट प्लेसमध्ये तीन मजली घर आहे. खाली दुकानं आहेत. त्यांचं भाडंच लाखात येतं अन् मान्यताच त्या सगळ्याची एकमेव वारस आहे.

त्यानं उमाला म्हटलं, ‘‘मावशी माझ्यासाठी हे स्थळ खूपच योग्य आहे. मान्यताचा घटस्फोट झालाय. तिला एक लहान मुलगा आहे. आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. पुन्हा लग्न करणार नाही म्हणतेय. पण तिला लग्नासाठी राजी करावं लागेल. त्यानं प्रोफाइल उघडून मान्यताचे फोटो मावशीला दाखवले.’’

अशाबाबतीत हुशार प्रसूननं एजंटच्या मध्यस्तीने मान्यताच्या घराच्या जवळच एक फ्लॅट भाड्यानं मिळवला. उमा तिथं शिफ्ट झाली. तिनं सोसायटीत सगळ्यांच्या ओळखी करून घेतल्या. तिथल्या किटी पार्टीची ती सभासद झाली.

एक दोनदा प्रसून येऊन गेला. ‘माझा मुलगा’ अशी तिनं ओळख करून दिली. सोसायटीत तर बस्तान चांगलं बसवलं.

मग एका किटी पार्टीत मान्यताच्या आईशीही ओळख झाली. ती ओळख उमानं जाणीवपूर्वक वाढवली. मुद्दाम त्यांच्याकडे येणंजाणं वाढवलं.

‘‘माझा मुलगा आहे. शिक्षण, रूप, पैसा, व्यवसाय सगळं आहे पण लग्न करायचं नाही म्हणतो. तरूण वयात कुणा मुलीच्या प्रेमात होता. तिनं विश्वासघात केला. प्रेमभंगांचं दु:ख अजून पचवता आलेलं नाहीए. मध्यंतरी यावरूनच आमचा वाद झाला. त्याच्या रागावर मी इथं येऊन राहिलेए.’’ असं उमानं त्यांना सांगितलं.

उमानं एकदा मुद्दामच विचारलं, ‘‘माफ करा, पण तुम्ही अन् मान्यता, तिचे बाबा असे उदास अन् दु:खी का दिसता?’’

मान्यताच्या आईला, निशाला एकदम रडू फुटलं, ‘‘काय सांगू ताई तुम्हाला? अहो, इतक्या थाटामाटात आम्ही मान्यताचं लग्न करून दिलं होतं. श्रीमंत कुटुंबातला एकुलता एक मुलगा. पण वर्षभरही आमची पोरगी राहू शकली नाही. त्या मुलाचे दुसऱ्या एका स्त्रीशी संबंध होते. हे असं कोणती पत्नी सहन करेल?’’

मान्यतानं नवऱ्याला प्रेमानं खूप समजावलं, पण तो ऐकत नव्हता. आम्ही दोघांनीही जावयाची समजूत घातली. मुलीचा संसार उधळू नये असंच आम्हालाही वाटत होतं. पण त्यानं जणू न सुधारण्याची शपथच घेतली होती.

त्यात एक दिवस त्यानं मान्यताला मारहाण केली. त्यानंतर ती जी इथं आली ती परत गेलीच नाही. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती. तिच्या सासूसाऱ्यांना मुलाचं प्रकरण माहित होतं पण चांगली सून घरात आली की तो बदलेल या आशेवर त्यांनी लेकाचं लग्न केलं होतं.

त्यांनी हात जोडून क्षमा मागितली. आम्ही दिलेलं सर्व सामान, दागिने, कपडे सगळं परत केलं. एक कोटी रुपयांची एफडी मान्याताच्या नावे केली, पण त्या पैशानं सुखसमाधान कसं मिळणार?

आमचं तर आयुष्यच अंधकारमय झालंय. तिच्या लहानग्या आयुष्यामुळेच आमच्या आयुष्यात थोडा फार आनंद आहे. मान्यता तर अजूनही त्या धक्क्यातून सावरली नाहीए. लग्न करायला नाहीच म्हणते. तिच्या बाबांनी तिला विरंगुळा म्हणून शाळेत नोकरी लावून दिली आहे.

आता उमानं लहानग्या आयुषवर लक्ष केंद्रित केलं. ती त्याला कधी बागेत न्यायची, कधी होमवर्क करवून घ्यायची, कधी गाणी गोष्टी सांगायची. प्रसून दिल्लीला आलेला असताना मुद्दाम उमानं निशा अन् मदनला, मान्यताच्या बाबांना घरी चहाला बोलावलं. त्याचं देखणं रूप, त्याची मर्यादेशील वागणूक व हसरा, आनंदी स्वभाव बघून दोघांनाही तो खूप आवडला. पण आपली मुलगी घटस्फोटित आहे, या प्रथमवराला कसं विचारावं या विचारानं ते गप्प बसले.

प्रसून अन् उमानं ठरवलेल्या योजनेप्रमाणेच सगळं चाललेलं होतं. आता त्यांनी मान्यतावर लक्ष केंद्रित केलं. आता प्रसून पुन्हा पुन्हा दिल्लीला येत होता. उमानं निशा व मदनला सांगितलं की प्रसूनला मान्यता आवडली आहे. तो तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आयुषलाही तो आपला मुलगा मानायला तयार आहे.

निशा व मदनला तर फारच आनंद झला. प्रसूनही बराच वेळ आयुषबरोबर घालवायचा. येताना त्याच्यासाठी खाऊ व खेळणी आणायचा. त्याच्याबरोबर व्हिडिओ गेम्स खेळायचा.

एक दिवस आयुषनं मान्यताला म्हटलं, ‘‘मम्मा, प्रसून काका किती छान आहेत. मला आवडतात ते.’’

मान्यतालाही प्रसूनविषयी आर्कषण वाटत होतं. त्याचं देखणं रूप अन् मोठमोठ्या गोष्टी यामुळे तीही त्याच्यात गुंतत चालली होती. हळूहळू तो आयुष व मान्यताला आइसक्रीम खायला नेऊ लागला. कधी तरी उमा,   मान्यता अन् प्रसून सिनेमालाही गेले. आता तर उमानं उघडच बोलून दाखवलं की मान्यता व प्रसूनचं लग्न झालं तर किती छान होईल म्हणून निशा व मदननं विचार केला की एकदा प्रसूनच्या एजन्सीविषयी माहिती काढावी. मदनलाही मुलगा आवडला होता. त्यांनी पुण्याला जाऊन यायचं ठरवलं. पण ही गोष्ट उमा अन् प्रसूनला कशी समजली कोण जाणे. प्रसून तर सरळ त्यांना एअरपोर्टला रिसीव्ह करायला पोहोचला. त्यांना आपलं ऑफिस दाखवलं. मोठा बंगला दाखवला. गाडीतून सगळीकडे फिरवलं. पंचतारांकित हॉटेलात त्यांना लंचला नेलं.

इतर कुणाला त्यांच्याजवळ येऊ दिलं नाही. कुणाला त्यांना भेटू दिलं नाही. साध्या सरळ मदनला प्रसूनचं वैभवी आयुष्य खरंच वाटलं. आता त्यांना मान्यता व प्रसूनचं एकत्र असणं यात गैर वाटेना. दोघांच्या लग्नाचा बेत त्यांच्या मनात पक्का होता.

लबाड प्रसूननं मान्यताच्या वाढदिवसाला एका पार्टीचा कार्यक्रम ठरवला. मान्यतासाठी हे सरप्राइजच होतं. त्या दिवशी उमानं तिला एक डिझायनर साडी भेट म्हणून दिली. मान्यताही मनापासून नटली. त्या साडीत ती खूपच छान दिसत होती. आई, वडिल, आयुष यांच्याबरोबर जेव्हा ती हॉटेलात पोहोचली तेव्हा तिथं खूपच मोठी पार्टी बघून ती चकित झाली. प्रसूननं केवढा मोठा केक ऑर्डर केला होता. मान्यताला प्रसूनबद्दल आदर वाटला. त्यातच भर म्हणून तिच्या आईवडिलांनी या वेळीच मान्यता व प्रसूनच्या साखरपुड्याची अनाउंसमेट केली. मदननं दोन हिऱ्यांच्या आंगठ्या प्रसून व मान्यताच्या हातात देऊन त्या एकमेकांना घालायला लावल्या. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा गजर झाला. मान्यताही खूप आनंदात होती. तिनं प्रसूनसोबत डान्सही केला.

आता तर तिला सतत प्रसूनजवळ असावं असं वाटायचं. त्यांचं गोड गोड बोलणं, तिचं कौतुक करणं तिला फार आवडायचं. आयुषनं तर एक दिवस तिला म्हटलं, ‘‘आता प्रसून काकांना बाबा म्हणणार आहे. शाळेत सगळ्या मुलांचे बाबा येतात. माझेच बाबा येत नाहीत. आता मी माझ्या मित्रांना दाखवेन की हे बघा माझे बाबा.’’

लग्नाची खरेदी जोरात सुरू होती. आमंत्रण पत्रिकाही छापून झाल्या. अजून मान्यतानं तिच्या?शाळेत तिच्या लग्नाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. तिच्या बोटातली हिऱ्याची अंगठी बघून तिच्या सहकारी टीचर्सनं तिला छेडलं तरी तिनं त्यांना दाद दिली नव्हती.

पण प्रिन्सिपल मॅडमनं एकदा तिला ऑफिसात बोलावून विचारलंच, ‘‘मान्यता, लग्न ठरलंय म्हणे तुझं? मनापासून अभिनंदन. नवं आयुष्य सुरू करते आहेस…सुखात राहा. कुठं जाणार आहेस आता?’’

‘‘पुणे,’’ मान्यातानं सांगितलं.

‘‘मला खरंच खूप आनंद झाला ऐकून. अगं तरुण वयात मी ही फसवुकीला सामोरी गेले आहे. विश्वासघाताचं दु:ख मी ही पचवलं आहे. पण अक्षयसारखा नवरा भेटला अन् त्याच्या प्रेमामुळे जीवनातील कटू विषारी अनुभव पचवून आता सुखाचा संसार करते आहे.’’

‘‘होय मॅडम, प्रसूनही फार चांगले आहेत. आयुषवरही ते फार प्रेम करतात. त्यामुळेच मी लग्नाला तयार झालेय.’’

‘‘नाव काय सांगितलंस तू? पुन्हा सांग बरं.’’

‘‘प्रसून! प्रसून नाव आहे त्यांचं. पुण्यात प्लेसमेंट एजेंसी चालवतात. खूप छान व्यवसाय आहे.’’

मॅडम जरा विचारात पडल्या. मग म्हणाल्या, ‘‘साखरपुड्याचे फोटो असतील ना? मला बघायचाय तुझा नवरा.’’

‘‘आता माझ्याकडे नाहीएत फोटो, पण मी तुमच्या ईमेलवर पाठवते. खूपच देखणे आहेत ते.’’

मॅडम जया त्या स्कूलच्या ओनर होत्या. साखरपुड्याचे फोटो बघताच त्या दचकल्या. हो तोच प्रसून ज्याच्या म्हणण्यावरून तरुण अल्लड जया घरातले  दागिने घेऊन पळाली होती. मान्यताला सांगावं का? पण नको, कदाचित इतक्या वर्षांत प्रसून बदलला असेल, सुधारला असेल. तरीही शोध घ्यायला हवा. शहानिशा करावीच लागेल. त्यांनी आपल्या एका वकील मित्राला फोन करून प्रसून व त्याची एजन्सी याची चौकशी करायला सांगितली. तो पुण्यातच राहात होता.

दुसऱ्याच दिवशी त्या मित्रानं बातमी दिली. प्लेसमेट एजन्सीच्या आड सेक्स रॅकेट चालवलं जातं. एजन्सीवर पोलिसांनी बरेचदा धाड घातली आहे. प्रसून अत्यंत नीच व बदनाम माणूस आहे. पोलिसही त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करताहेत.

आता जयाचा संशय खात्रीत बदलला. हा तोच नराधम आहे. तिनं मान्यताला फोन करून ताबडतोब घरी बोलावून घेतलं. ‘‘मान्यता, आय अॅम सॉरी, बातमी वाईट आहे पण तुझ्या भल्यासाठीच सांगते. हा तोच प्रसून आहे ज्यानं मला दगा दिला होता. माझे दागिने लांबवून त्यानं मला भिकेला लावलं होतं. सध्या तो प्लेसमेंट एजेन्सीच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवतो. अनेक मुलींना त्यानं असंच फसवलं आहे. माझ्या मते तुझ्याशी लग्नही केवळ तुझ्या प्रॉपर्टीसाठी करतोय तो. भयंकर लोभी माणूस आहे.’’

ऐकताच मान्यता रडायला लागली. ‘‘मॅडम, माझ्या आयुष्यात सुखाचे दिवस येणारच नाहीत का? असं काय घडतंय माझ्या आयुष्यात…’’

‘‘मान्यता, धीर धर, आधी या नीच माणसाला पोलिसात देऊयात. त्याला कळणार नाही इतक्या पद्धतशीरपणे आपण प्लॅन करूया.’’

मान्यतानं डोळे पुसले. ‘‘होय मॅडम, याला अद्दल घडवलीच पाहिजे. उद्याच याला पोलिसांच्या हवाली करते. तुम्ही उद्या सायंकाळी माझ्या घरी याल का? पाच वाजता?’’

‘‘नक्की येते. पाच वाजता.’’

घरी येऊन मान्यतानं प्रसूनला फोन केला. ‘‘प्रसून जरा येऊन जा. आईबाबा त्यांचं विल करताहेत. तुझी गरज लागेल.’’

‘‘विल करताहेत हे फारच छान आहे. मी उद्या येतो.’’ प्रसून म्हणाला.

प्रसून घरी आला. निशा व मदन त्याचं अतिथ्य करू लागले. त्यांना आदल्या दिवशी घडलेलं काहीच ठाऊक नव्हतं. प्रसूननं मान्यताला म्हटलं, ‘‘आईबाबा तुला जे काही दागिने व कॅश लग्नात देताहेत ते सगळं तू घे. ‘नको नको’ म्हणू नकोस. अन् त्यांनी विल केलं म्हणालीस, ते कुठंय? त्यांच्यानंतर तर सगळं आपल्यालाच मिळणार आहे ना?’’

‘विल’, ‘दागिने’, ‘कॅश’, ‘त्याच्यानंतर सगळं आपलं’ ही भाषा निशा व मदन दोघांनाही खटकली. त्यांनी एकमेकांकडे बघितलं. प्रसून खिडकीपाशी उभं राहून मोबाइलवर बोलत होता. त्यावेळी निशानं म्हटलं, ‘‘मला तर हा लोभी वाटतोय. कॅश अन् विलच्या गोष्टी आत्ता का बोलतोए? आधीच आपल्याकडून धंदा वाढवायचा म्हणून वीस लाखांचा चेक घेतलाए. मान्यतालाही हे कळलं तर ती लग्नाला नकार देईल.’’

‘‘मलाही आज त्यांचं वागणं संशयास्पद वाटतंय. पैशासाठी आमचा खूनही करेल हा.’’ मदन म्हणाले.

तेवढ्यात जया आल्याचा निरोप वॉचमननं दिला. तो जयाला मान्यताच्या दाराशी सोडून गेला. प्रसूननं जयाला प्रथम ओळखलं नाही. मान्यतानं मुद्दाम ओळख करून दिली. ‘‘मॅडम जया, हे माझे होणारे पती प्रसून.’’

जयानं दरडावून म्हटलं, ‘‘अजून किती जणींना फसवून पैसा गोळा करणार  आहेस प्रसून? तुझ्या पापाचा घडा भरलाय. पुण्याहून तुझ्याबद्दलची सगळी माहिती मला मिळाली आहे. ती मी दिल्ली पोलिसांना दिली आहे.’’

हे ऐकून बाबांना तर घेरीच आली. आईही धाय मोकलून रडू लागली. ‘‘मावशी रडू नका. तुमची मुलगी एका नरपिशाच्चाच्या तावडीतून सुटली म्हणून आनंद माना,’’ जयानं त्यांना समजावलं.

प्रसून पळून जायला बघत होता. तेवढ्यात सिक्युरिटीवाल्यांनी त्याला घेरलं. उमा पण तिथं आलेली होती. ती म्हणाली, ‘‘याला क्षमा करा. आम्ही इथून निघून जातो. मी हात जोडते…’’

प्रसून तिच्यावर ओरडला, ‘‘गप्प बैस, तू माझ्यासाठी काय केलं आहे. फक्त सतत म्हणायची लग्न कर, लग्न कर…झालं माझं लग्न…’’

आता उमाचाही संयम संपला, ‘‘माझं सगळं आयुष्य मी याच्यासाठी झिजवलं. तरी याचं म्हणणं मी याच्यासाठी काहीच केलं नाही…आता तर मीच पोलिसांना सांगेन याचे सगळे प्रताप. कोर्टात याच्याविरूद्ध मी साक्ष देईन.’’ ती म्हणाली.

पोलीस प्रसूनला घेऊन गेले.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें