* सोमा घोष
भारत हा असा देश आहे, जिथे दरवर्षी जगाच्या तुलनेत अकाली जन्मलेल्या शिशुंची मृत्यूसंख्या जास्त आहे. याची कारणे अनेक आहेत, गर्भधारणेनंतर मातेला योग्य पोषण न मिळणे, गर्भधारणेनंतरही मातेने वजनदार कामे करणे, मुदतपूर्व बाळाचा जन्म झाल्यानंतर रुग्णालयात आधुनिक तांत्रिक यंत्रणेचा अभाव, इत्यादी. याशिवाय काही अकाली बाळ फक्त एक महिना जगू शकतात.
तंत्रज्ञान सोपे आहे
निओनॅटोलॉजी चॅप्टर बद्दल, ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे’ निओनॅटोलॉजीस्ट डॉ. नवीन बजाज ‘आंतरराष्ट्रीय कांगारू केअर अवेअरनेस डे’ निमित्त सांगतात की कांगारू केअर हे अकाली जन्मलेल्या आणि नवजात बालकांची काळजी घेण्याचे तंत्र आहे.
मुख्यत: ज्या मुलांचा जन्म वेळेच्या आधी झाल्यामुळे त्यांचे वजन कमी असते, त्या बाळांसाठी कांगारू केअरचा उपयोग केला जातो. या तंत्रामध्ये मुलाला पालकांच्या उघडया छातीवर चिकटवून ठेवले जाते, ज्यामुळे बाळाच्या त्वचेचा थेट पालकांच्या त्वचेशी संपर्क होतो, जे अतिशय प्रभावी तसेच वापरण्यासही सोपे होत असते आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते. हे तंत्र वेळेआधी किंवा मुदतीनंतर जन्मलेल्या सर्व बाळांची चांगली काळजी घेण्यासाठी फायदेशीर आहे.
डॉ. नवीन म्हणतात की कांगारू केअर तंत्राने बाळाची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम व्यक्ती म्हणजे त्याची आई असते, परंतु काहीवेळा काही कारणांमुळे आई मुलाला कांगारू काळजी देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत वडील किंवा कुटुंबातील जवळचा कोणताही सदस्य, जो मुलाची जबाबदारी सांभाळू शकतो, जसे की भावंड, आजी-आजोबा, नाना-नानी, काकू-मावशी, आत्या काका इत्यादींपैकी कोणीही बाळाला कांगारू केअर देऊन आईच्या जबाबदारीचा एक भाग वाटून घेऊ शकतात.
कांगारू केअर कधी सुरू करावे
डॉक्टरांचा असा विश्वास आहे की कांगारू केअर किंवा त्वचेपासून त्वचेशी संपर्क साधण्याचे तंत्र बाळाच्या जन्मापासूनच सुरू केले पाहिजे आणि प्रसूतीनंतरच्या संपूर्ण कालावधीत चालू ठेवता येते. या तंत्राच्या वापराचा कालावधी सुरुवातीला कमी ठेवला पाहिजे.
सुरुवातीला ३० ते ६० मिनिटे, त्यानंतर हळूहळू आईला याची सवय होते, हे तंत्र वापरण्याचा आत्मविश्वास जेव्हा आईला होतो, तेव्हा हे तंत्र जास्तीत जास्त काळ वापरता येते, विशेषत: कमी वजनाच्या बाळांसाठी कांगारू केअरचा कालावधी जेवढा जास्त असेल, तेवढा चांगला असतो. मुलाला कांगारू केअर देताना आई स्वत: ही विश्रांती घेऊ शकते .
कांगारू केअरची प्रक्रिया
बाळाला आईच्या स्तनांमध्ये ठेवायला हवे, त्याचे डोके एका बाजूला झाकलेले असावे जेणेकरून त्याला श्वास घेणे सोपे होईल. मुलाचे पोट आईच्या पोटाच्या वरच्या भागाशी चिकटलेले असावे, हात आणि पाय वाकलेले असावेत, बाळाला आधार देण्यासाठी स्वच्छ, सुती कापड किंवा कांगारू पिशवी वापरली जाऊ शकते. अकाली जन्मलेल्या किंवा कमी वजनाच्या बाळांची काळजी घेण्यासाठी कांगारू केअर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पण हे तंत्र वेळेवर जन्मलेल्या किंवा योग्य वजन असलेल्या मुलांसाठीही फायदेशीर आहे.
वडिलांचा आणि कांगारू केअर यांचा संपर्क
डॉक्टर बजाज सांगतात की मातांप्रमाणेच वडीलदेखील त्वचेपासून त्वचेचा संपर्क तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलाची काळजी घेऊ शकतात. हे बाळ आणि वडील दोघांसाठी फायदेशीर आहे. हे तंत्र वडिलांना मुलाची भूक आणि तणावाचे संकेत समजण्यास मदत करते. वडील बाळाला कांगारू केअर देत असताना, आई आराम करू शकते आणि बाळाची काळजी घेण्यासाठी तिची ऊर्जा टिकवून ठेवू शकते.
कांगारू केअरचे फायदे
* त्वचेपासून त्वचेचा संपर्क झाल्यामुळे मेंदूच्या विकासास आणि भावनिक संबंधांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळते, डोळयांचा डोळयांशी संपर्क होत असल्यामुळे प्रेम, आपलेपणा आणि विश्वास यामुळे सामाजिक प्रतिभा ही विकसित होण्यास मदत मिळते.
* या तंत्राचा वापर स्तनपानास प्रोत्साहन देते. हे मूल आणि आई दोघांच्याही आरोग्यासाठी फायदेशीर आहे, याशिवाय बाळाच्या पोषण आणि विकासामध्ये स्तनपानाचे योगदान महत्त्वाचे आहे.
* हिवाळयात कमी वजनाच्या बाळाच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवले जाते.
* या तंत्रज्ञानाने काळजी घेतल्या गेलेल्या बालकांचे वजन चांगले वाढते, ते जास्त काळ शांतपणे झोपतात, जागल्यावरही शांत राहतात आणि कमी रडतात.
त्यामुळे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ आणि डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की सर्व मुलांसाठी कांगारू केअर तंत्राचा वापर करावा जेणेकरून त्यांचा योग्य विकास होईल.