* सुमन बाजपेयी
अहमदाबाद, ज्याला स्थानिक भाषेत अम्दावाद म्हटले जाते ते गुजरातमधील एक महत्त्वाचे शहर आहे. हे भारतातील ७व्या क्रमांकाचे सर्वात मोठे महानगर क्षेत्र असून गुजरात राज्याची जुनी राजकीय राजधानी अशीही त्याची ओळख आहे. पर्यटनासंदर्भात केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळेच सध्या हे एक आवडते पर्यटन स्थळ बनले आहे.
आमच्या भटकंतीची सुरुवात आम्ही गांधी आश्रमापासून केली. आमचा ग्रुप असल्यामुळे आम्ही खासगी गाडी केली होती. त्यामुळे वाहतुकीसाठी लागणारा अतिरिक्त वेळ वाचला.
गांधी आश्रम : गुजरात हे जितके अजरामर संस्कृती आणि वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहे तितकेच पर्यटन स्थळांसाठीही लोकप्रिय आहे. पोरबंदरमध्ये जन्मलेल्या गांधीजींना अहमदाबादबाबत विशेष आत्मीयता होती. म्हणूनच तर तेथे साबरमती आश्रमाची स्थापना करण्यात आली. १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांचे निवासस्थान येथेच होते. कस्तुरबाही येथेच राहत. दोघांच्या खोल्या येथे पहायला मिळतात. साबरमती ज्याला आता गांधी आश्रम असे संबोधले जाते त्या आश्रमातील सर्व वातावरण असे काही भारावल्यासारखे आहे की, जणू बापूजी येथेच आपल्या जवळपास असल्यासारखा भास होतो. येथील संग्रहालयात गांधीजींशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध आहे. गांधीजींच्या जीवनाशी जोडली गेलेली दुर्मीळ चित्रे पाहून वाटते की, जणू ते अजूनही आपल्यातच आहेत.
दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर महात्मा गांधींनी भारतात आपला पहिला आश्रम २५ मे १९१५ रोजी अहमदाबादमधील कोचराब येथे स्थापन केला. या आश्रमाला १७ जून १९१७ रोजी साबरमती नदीच्या किनारी स्थलांतरित करण्यात आले. साबरमती नदी किनारी वसल्याने त्याचे ‘साबरमती आश्रम’ असे नामकरण करण्यात आले. तो ‘हरिजन आश्रम’ आणि ‘सत्याग्रह आश्रम’ या नावानेही ओळखला जातो.
महात्मा गांधीजी १९१७ ते १९३० पर्यंत साबरमती आश्रमात वास्तव्यास होते. १२ मार्च १९३० रोजी मिठाच्या सत्याग्रह आंदोलनासाठी त्यांनी येथूनच दांडी यात्रेची सुरुवात केली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथेच बसून ते ब्रिटिश राजवटीविरोधात योजना आखत. हा आश्रम ३ वेगळयाच ठिकाणांनी वेढला आहे. एकीकडे विशाल साबरमती नदी आहे, दुसरीकडे स्मशानभूमी तर तिसरीकडे कारागृह आहे. गांधीजी येथे राहणाऱ्यांना सत्याग्रही म्हणत. त्यांचे असे मानणे होते की, सत्याग्रहींच्या जीवनात दोनच पर्याय असतात - कारागृहात जाणे किंवा जीवनाचा अंत करून स्मशानभूमीला आपलेसे करणे.