* प्राची भारद्वाज
‘‘शैलजा, उद्या तू कामाला जाऊ नकोस. सुट्टी घे. नवदुर्गाच्या पहिल्या दिवशी आपल्या घरात कीर्तन असते. माताराणीच्या चरणी आपण दोघी लीन होऊया,’’ असे सासूनं सांगितल्यावर शैलजाला होकारार्थी मान डोलवावी लागली.
शैलजा नवविवाहिता होती. सासरचे वातावरण खूपच धार्मिक असल्याचे तिला लग्नावेळी केलेल्या पूजाविधीतूनच लक्षात आले होते. प्रत्येक मुलीला सासरच्यांशी जुळवून घ्यावे लागते, असा विचार करून शैलजाही तिचा सासरचे प्रत्येक रीतीरिवाज, सण-उत्सव साजरे करू लागली होती.
महानगरात लहानाची मोठी झालेली, आजच्या आधुनिक काळातील मुलगी असूनही, एक चांगली सून होण्यासाठी तिने आपल्या आधुनिक विचारसरणीला मुरड घातली होती.
नि:श्वासे न हि विश्वास: कदा रुद्धो भविष्यति।
कीर्तनीयमतो बाल्याद्धरेनार्मैव केवलम्॥
कैवल्याष्टकम – ४ शास्त्रानुसार श्वासाचे काही खरे नसते. म्हणूनच लहानपणापासूनच भजन कीर्तनात रमायला हवे. या विचारांचा फायदा लांडग्याची कातडी ओढून घेतलेले आजचे ढोंगी भ्रष्ट गुरू घेतात. आता विचार करायची गोष्ट अशी की, जर लहानपणापासूनच भजन कीर्तनात वेळ घालवू लागलो आणि इष्टदेवता किंवा गुरूचा जप सुरू करू लागलो तर मग अभ्यासाला कितीसा वेळ मिळेल, शिवाय करिअरचे नुकसान होईल ते वेगळेच. त्यावर जर आसाराम किंवा राम रहिमसारखा गुरू मिळाला तर काय परिणाम होईल, हे सर्वश्रृत आहे.
कीर्तनाआडून एकच मानसिकता विकली जाते ती म्हणजे पुण्य कमवायचे असेल तर कीर्तन, सत्संग करावा लागेल. जो देवाचे नाव घेणार नाही किंवा इतरांना असे करण्यापासून परावृत्त करेल तो पापाचा भागीदार होईल.
कीर्तन विरुद्ध अवडंबर
कीर्तन ही केवळ देवाच्या नामस्मरणात तल्लीन होण्याची प्रक्रिया नाही तर समाजात आपली श्रीमंती दाखवून देण्याचा योग्य मार्ग बनत चालला आहे. पूजेच्या दरबाराला भारदस्त ओढण्या, लाईटच्या माळा आणि फुलांची सजावट, येणाऱ्या सर्व महिलांची बसण्याची व्यवस्था करणे, धूप, अगरबत्ती, कापूरचे ताट सजवणे, येणाऱ्या लोकांसाठी मृदंग, टाळ यांची व्यवस्था करणे, प्रसादात उपवासाच्या पदार्थांची सोय करणे, हे सर्व हेच दर्शवते.
इतकेच नाही तर कीर्तनानंतर चहा-नाश्त्याची व्यवस्थाही करायची असते. कीर्तन आयोजित करणारी महिला किती हुशार आहे, हे तिच्या कीर्तन मॅनेजमेंटवरुन ठरत असते.
मोक्षाची नाही प्रशंसेचा हव्यास
एका पौराणिक कथेनुसार एकदा नारद मुनींनी ब्रह्माजींना सांगितले, ‘‘असा एखादा उपाय सांगा ज्यामुळे अक्राळविक्राळ काळाच्या जाळयात मी अडकणार नाही.’’
याच्या उत्तरादाखल ब्रह्माजींनी सांगितले:
आदिपुरुषस्य नारायणस्य नामोच्चारणमात्रेण निर्धूत कलिर्भवति.
अर्थात, जर एखाद्याने देवाचे नाव घेतले फक्त तरच तो या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होईल. असाच एक श्लोक पद्म पुराणात आहे :
ये वदंति नरा नित्यं हरिरित्यक्षरद्वयम्।
तस्योच्चारणमात्रेण विमुक्तास्ते न संशय:॥
यात इथपर्यंत सांगण्यात आले आहे की, शुद्ध (पवित्र) किंवा अपवित्र (अशुद्ध), सावध किंवा बेसावध अशा कोणत्याही क्षणी ‘हरि’ नामाचा जप केल्यास किंवा नामोच्चार केल्यास मनुष्याला मुक्ती मिळते. यात कोणतीही शंका नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, ‘मुक्ती’ म्हणजे काय? धर्मानुसार मुक्ती म्हणजे संसार, प्रपंचापासून मुक्त होणे. पुढचा, मागचा जन्म काय आहे, हे कोणी सप्रमाण सांगू शकेल का? कीर्तन केल्यामुळे जन्म-मृत्यूपासून मुक्ती मिळाली, हे देखील कुणीही सिद्ध करू शकत नाही. तर मग मोक्ष म्हणजे काय?
ज्या महिला कीर्तनात टाळमृदंग वाजवतात त्यांना मोक्षाऐवजी आपल्या कलेचे कौतुक जास्त आकर्षित करत असते. त्यांना बसण्यासाठी एक खास जागा तयार केलेली असते. त्या आल्यानंतरच कीर्तन सुरू होते आणि ज्या महिला माईकवर भजन गातात त्यांना तर माईक सोडवतच नाही. माइक जिच्याकडे येतो तिला सूरतालातले काही समजत नसले तरी ती माईक सोडायला तयार नसते. बेसूर आवाज, चुकीचा ताल किंवा मग थरथरणाऱ्या आवाजात भजन गाण्याची जणू स्पर्धा लागते.
व्यक्तिगत स्त्री कशीही असली तरी ती जर धार्मिकतेचा खोटा बुरखा चढवण्यात यशस्वी झाली तर आपला समाज तिला ‘सदाचारी स्त्री’चा मुकुट घालण्यासही मागेपुढे पाहत नाही.
कीर्तन संपले, किटी पार्टी सुरू
कीर्तनानंतर चहा-नाश्ता मिळताच त्याच्यासोबत एकमेकांच्या चुगल्या, उणीधुणी काढायला सुरुवात होते. ज्या महिला काही वेळापूर्वी जोरजोरात भजन गात होत्या की, हे जग मोहजाल आहे, जगातील सर्व नातेवाईक, संपत्ती, खरे-खोटे सर्व येथेच सोडून जायचे आहे, त्याच महिलांमध्ये आता आपली सासू, पती, सून किंवा शेजाऱ्यांबद्दल वाईट बोलण्याची जणू स्पर्धा सुरू होते. पाहायला गेल्यास या सर्व धार्मिक कार्याच्या नावाखाली एकत्र जमलेल्या असतात, पण सत्य हे आहे की, धर्माच्या नावाखाली या सर्व केवळ आपला वेळ घालवण्यासाठी एकत्र आलेल्या असतात.
ज्या महिला मुलांची जबाबदारी किंवा आधुनिक विचारसरणीमुळे कीर्तनात सहभागी होत नाहीत, त्यांना धार्मिकतेचा बुरखा परिधान केलेल्या या महिला बरेच उपदेश करतात. पूजापाठ न केल्यामुळेच जीवनात कष्टाचा सामना करावा लागत आहे, असे सांगतात. दुर्दैवाने आपल्या समाजात पुरोगामीपणापेक्षा रूढीवाद आणि अंधविश्वासाला अधिक महत्त्व दिले जाते. कदाचित हेच कारण आहे की ज्या महिलांकडे काहीही काम उरलेले नसते त्या विदेशी महिलांप्रमाणे आपल्या आसपासच्या समाजात सुधारणा, स्वच्छता आणि समाज सुंदर करण्याऐवजी कीर्तनात वेळ घालवणे पसंत करतात.
बृहन्नारदीय पुराणात असे सांगितले आहे की :
संकीर्तनध्वर्नि श्रृत्वा ये च नृत्यतिंमानवा:।
तेषां पादरजस्पर्शान्सद्य: पूता वसुंधरा॥
अर्थात जे देवाच्या नामस्मरणाचा आवाज ऐकताच भक्तिभावाने लीन होऊन नाचू लागतात त्यांच्या चरणस्पर्शाने पृथ्वी पवित्र होते. यातूनच प्रेरणा घेऊन चैतन्य महाप्रभूंनी सामूहिक कीर्तन प्रणाली सुरू केली. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांनी याच हरिनाम संकीर्तनाचा प्रसार जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत केला.
जर वरील श्लोकांचा अर्थ खरा मानला तर इतक्या ठिकाणी कीर्तन केल्यामुळे आतापर्यंत पृथ्वीचे कितीतरी भले व्हायला हवे होते. पण पृथ्वी तर दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. येथील नैसर्गिक ठेवा संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्याच्यावर प्रदूषणाचा दुष्परिणाम होत आहे…या सर्वांवरील उपाय खरोखरच कीर्तनात आहे का?
हे स्पष्ट आहे की जर आपण आपले जीवन सुंदर बनवू इच्छित असाल तर या जगाला अतिउत्तम बनवावे लागेल आणि आपल्या पृथ्वीला सुधारायचे असेल तर कीर्तनात वेळ वाया घालवण्याऐवजी काम करण्याची आवश्यकता आहे. समाजाला सर्वश्रेष्ठ करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिक विचारांना आपलेसे करावे लागेल.