कथा * प्रियदर्शिनी

त्या वेळच्या किटी पार्टीची थीम ‘वनपीस’ होती. पार्टी निशाच्या घरी होती. निशा म्हणजे एकदम मॉडर्न, स्मार्ट, स्लिम अॅन्ड फिट. अशा थीम्स तिलाच सुचायच्या. मागची भिशी अमिताकडे झाली,  तेव्हाच निशानं सांगून टाकलं होतं, ‘‘माझ्या पार्टीची थीम ‘वनपीस’ आहे.’’

यावर गोल गुबगुबीत नेहानं तिला म्हटलं, ‘‘वेड लागलंय का तुला? सोसायटीत कार्टून म्हणून बघतील आमच्याकडे. आमचं काय वय आहे का ‘वनपीस’ घालण्याचं?’’

निशा तशी आडमुठीच, थोडी हट्टीसुद्धा. तिनं शांतपणे म्हटलं, ‘‘जो घालणार नाही, त्याला दंड भरावा लागेल.’’

नेहानं गुरूगुरत विचारलं, ‘‘किती घेशील दंड? १०० रुपयेच ना? दिला…’’

‘‘नाही, शंभर रुपये नाही, किमान हजार रुपये, शिवाय हॉटेलात डिनर.’’

दोघींचं बोलणं ऐकणाऱ्या अंजलीनं गोडीनं म्हटलं, ‘‘निशा, प्लीज…‘वनपीस’ नको ना, दुसरं काही ठरव. का उगीच लोकांना या वयात आपल्यावर हसण्याची संधी द्यायची?’’

‘‘नाही. सगळ्यांनी वनपीसमध्ये यायचं. ठरलं म्हणजे ठरलं.’’

रेखा, मंजू, दीया, अनिता, सुमन, कविता, नीरा या सगळ्या आपापल्या प्रोग्रॅम ठरवू लागल्या.

रेखानं म्हटलं, ‘‘तू तशी हट्टीच आहेस, पण निशा अगं, माझ्या घरात सासूसासरे आहेत याचा तरी विचार कर. माझ्या नवऱ्याला एक वेळ मॅनेज करेन मी, पण सासूबाईंचं काय? त्यांच्या समोरून वनपीस घालून कशी निघणार मी?’’

‘‘तर पर्समध्ये घालून आण. माझ्या घरी येऊन बदलता येतं ना?’’ निशाजवळ उत्तर तयार होतं.

‘‘हो हो, हे जमेल बरं का?’’

मंजू, दीया, अनिता यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यांच्याकडे असे ड्रेसेस असायचे. त्या घालायच्याही. पण नीरा, अनिता, सुमन आणि कवितानं त्यांची अडचण सांगितली. ‘‘आमच्याकडे वनपीस ड्रेस नाहीए. मग?’’

‘‘मग? मग काय? विकत घ्या. असे प्रसंग तर आता येतच राहतील?’’ शांतपणे निशानं म्हटलं.

त्याही सगळ्या ड्रेस विकत घ्यायला तयार झाल्या.

अंजलीचा प्रॉब्लेम जरा वेगळा होता. ती म्हणाली, ‘‘अगं, अनिलना असे मॉडर्न ड्रेस आवडतात, पण माझी तरूण मुलं हल्ली फारच कटकट करत असतात. त्यांना मी साडीखेरीज इतर कोणताही पोशाख घातलेला खपत नाही…मला नाही वाटतं की मला ती पोरं वनपीस घालू देतील.’’

‘‘मग तूही घरून निघताना साडी नेस. पर्समध्ये ड्रेस ठेवून घेऊन ये. माझ्याकडे येऊन बदल की झालं.’’

अंजलीनं कसंबसं ‘हो’तर म्हटलं तरी सगळ्यात जास्त टेंशन तिलाच आलं होतं.

निशाकडच्या किट्टीचा दिवस जवळ येत होता. अंजली घरच्या सगळ्यांबरोबर रात्रीचं जेवण घेत होती. ती गप्प गप्प होती. तिची २३ वर्षांची मुलगी तन्वी अन् २१ वर्षांचा मुलगा पार्थ दोघांनीही विचारलं, ‘‘मॉम, कसला विचार करते आहेस?’’

‘‘काही नाही.’’ एक नि:श्वास सोडून अंजलीनं म्हटलं.

नवऱ्यानं फिरकी घेत म्हटलं, ‘‘काही तरी बोल गं! इतक्या शांततेत जेवायची सवय नाहीए आम्हाला.’’

अंजलीनं रागानं त्यांच्याकडे बघितलं तशी तिघंही हसले. अंजलीनं मग सांगूनच टाकलं, ‘‘पुढल्या आठवड्यात निशाकडे आमची भिशी आहे.’’

‘‘अरे व्वा!’’ तन्वी आनंदानं चित्कारली. निशा आंटी तर नेहमीच मस्त मस्त थीम्स ठेवते…यावेळी काय आहे थीम?’’

अंजलीनं सांगितलं, ‘‘वन पीस.’’

‘‘काय?’’ पार्थ केवढयांदा दचकला. तन्वीला ठसका लागला.

पार्थनं ताडकन् म्हटलं, ‘‘नाही आई, तू नको हं घालूस…’’

‘‘का?’’

तन्वीनं म्हटलं, ‘‘अगं, प्रत्येक पोशाख वापरण्याचं एक वय असतं ना? आणि कसं, निशा आंटीला सगळं छान दिसतं. तुला नाही छान दिसणार…पुन्हा आम्हाला कधी सवय नाही तुला अशा पोशाखात बघायची…ते काही नाही मॉम, तू साडीच नेस.’’

शांतपणे अंजलीने म्हटलं, ‘‘मी तर विचार करतेय, तुझा काळा वनपीस ट्राय करूयात का म्हणून.’’

चिडून पार्थनं म्हटलं, ‘‘नो मॉम, अजिबात नाही. अगं, गुडघ्याच्या थोडा खाली येणारा तो ड्रेस तू कशी काय घालू शकतेस? ताईच घालते तर मला आवडत नाही…’’

तन्वीनं त्याला बजावलं, ‘‘लहान आहेस तू. लहानांसारखंच बोल.’’

अनिल हसत हसत सर्व संवाद ऐकत जेवत होते.

अंजलीनं म्हटलं, ‘‘तुम्ही गप्प का? बोला ना काहीतरी?’’

‘‘तुमचं संभाषण ऐकणंच जास्त छान वाटतंय. वनपीसवर काय अन् केव्हा निर्णय होतोय त्याची वाट बघतोय मी.’’ अनिल हसत म्हणाले.

जेवणं आटोपेपर्यंत त्या वनपीसवर चर्चा सुरू होती. दुसऱ्या दिवशी तन्वी आणि पार्थ कॉलेजात गेले. सुनील त्यांच्या ऑफिसात. मोलकरीणही कामं आटोपून गेल्यावर दुपारी अंजली घरात एकटीच होती. तिनं लेकीचं कपाट उघडलं.

तन्वीचं कपाट कायम विस्कटलेलं, पसरलेलं असायचं. त्यावरून अंजलीची खूप चिडचिडही व्हायची. पण आता चिडचिड करायला वेळ नव्हता. अंजलीनं तन्वीचा तो काळा वनपीस शोधायला सुरूवात केली. शेवटी एकदाचा तो चुरगळलेल्या अवस्थेत तिला दिसला. तिनं तो हातात घेतला, त्याचा अंदाज घेतला अन् तिला खुदकन् हसू आलं. गाणं गुणगुणत तिनं त्या ड्रेसला इस्त्री केली अन् मग तो ड्रेस अंगावर चढवला. छान बसला की तिच्या अंगावर. तिनं आरशात बघितलं…ती छानच दिसत होती. पोटऱ्यांपर्यंतचा त्या घोळदार पण बिनबाह्यांच्या वनपीसमध्ये आरशात दिसणाऱ्या स्वत:च्या रूपावर अंजली खुश झाली. या वयात तरूण लेकीचा ड्रेस अंगात शिरतोय ही बाब नक्कीच सुखावणारी होती. तन्वी थोडी बारीक होती, पण अंजलीच्या अंगावर ड्रेस छान बसला होता.

मागून, पुढून, बाजूनं, सगळीकडून बघून ड्रेस चांगला बसत असल्याची अन् शोभत असल्याची खातरजमा करून तिनं सुटकेचा श्वास घेतला. आता मैत्रिणीबरोबर तिलादेखील मजा करता येणार होती. ही मुलं ना, फारच कटकट करतात. जाऊ दे. घरी कुणालाच काही समजणार नाहीए. सांगायचं नाहीच म्हटल्यावर प्रश्नच कुठं येतो? तिनं घाईनं निशाला फोन केला. ‘‘निशा मी थोडी लवकर येईन. कपडे तुझ्याकडेच बदलेन.’’

‘‘ये की! अगदी मजेत!’’

किट्टी पार्टीच्या दिवशी अनिल, पार्थ अन् तन्वीसोबत सकाळी ब्रेकफास्ट घेत असताना अंजली बऱ्यापैकी उत्साहात होती. चेहरा आनंदानं उजळला होता.

‘‘मॉम, आज तुमची किटीपार्टी आहे का?’’ पार्थनं विचारलं.

‘‘हो, आहे ना.’’

‘‘मग तू काय घालणार आहेस?’’

‘‘साडी.’’

अनिलनं विचारलं, ‘‘कोणती?’’

‘‘मागच्या महिन्यात घेतली होती ना? निळी…तिच.’’

‘‘हो गं आई, तू साडीत खूप छान दिसतेय.’’ तन्वीनं म्हटलं.

पार्थ म्हणाला, ‘‘मॉम, तू किती छान आहेस गं. आमचं सगळं म्हणणं ऐकतेस…तो वनपीसवाला ड्रामा इतर बायकांना करू देत…यू आर बेस्ट मॉम.’’

मनातल्या मनात अंजलीनं म्हटलं, ‘तुम्ही काहीही म्हणा, मला काय करायचंय ते मी ठरवेन. घरातले सगळे नियम माझ्यासाठी असतात. इतरांनी हवं ते करायचं अन् मी यांच्या मर्जीनं चालायचं.’ मनांतल्या मनांत तिनं हसूनही घेतलं.

किटीपार्टीची वेळ ४ ते ६ असायची. सहानंतर सगळ्याजणी आपापल्या घरी जायला निघायच्या. सर्वांची वय ४०-४५च्या दरम्यानची होती. मुलं शाळा-कॉलेजात, नवरे ऑफिसात त्यामुळे वेळ बराच मोकळा मिळायचा. घरून अंजली साडी नेसूनच बाहेर पडणार होती. त्यामुळे कॉलनीत कुणी बघितलं तरी प्रॉब्लेम नव्हताच. घरी परततानाही ती साडीतच असणार होती.

अंजली खूपच उत्तेजित होती. ती चारच्या आधीच निशाच्या घरी पोहोचली. निशा आधीच सुंदरशा वनपीसमध्ये तयार होती. अंजलीनंही साडी बदलून तन्वीचा ड्रेस घातला.

निशानं वरपासून खालपर्यंत अंजलीला बघितलं अन् ती उत्फुर्तपणे म्हणाली, ‘‘व्वा! अंजली यू आर लुकिंग व्हेरी स्मार्ट!’’

अंजली सुखावली. ‘‘थोडा घट्ट वाटतोय का गं?’’

‘‘नाही. छान फिटिंगचा वाटतो. आज बघ, खूप मज्जा येणार आहे.’’

तेवढ्यात रेखा आली. तिनंही कपडे बदलले. बघता बघता सगळ्याजणी आल्या. सगळ्या घरूनच तयार होऊन आल्या होत्या. सगळ्यांनी एकमेकींची प्रशंसा केली अन् खरं तर सगळ्याच जणी खरोखर छान दिसत होत्या. काहीतरी वेगळं केल्याचा आनंद, काहींना घरातल्यांपासून लपवून करण्याचा आनंद अशा सगळ्यामुळे वातावरण छानच झालं होतं. मग जबरदस्त फोटो सेशन झालं. मग कोल्ड्रींक्स, स्नॅक्स, खेळ…निशानं खाण्यासाठी छान छान पदार्थ केले होते. सर्वांनी आडवा हात मारला. नेहमीप्रमाणे, खरं तर नेहमीपेक्षाही अधिक मजा आली.

साडे सहा वाजले तशी सर्वांची निघायची लगबग सुरू झाली. ज्यांनी घरी जाताना कपडे बदलायचे होते, त्यांनी कपडे बदलले. त्यावरून पुन्हा एकदा चेष्टामस्करी, विनोद झाले.

निशा म्हणाली, ‘‘आज आपण लहान मुलांसारखं खोटं वागलो आणि बोललो. खरं तर हे तेवढंसं बरोबर नाही, तरीही मज्जा आली हे नाकारता येणार नाही…’’

‘‘अन् आता पुन्हा अगदी लहान मुलांसारखेच निरागस चेहरे घेऊन आपण आपल्या घरी जातो आहोत.’’ रेखाच्या या म्हणण्यावर पुन्हा एकदा सगळ्या हसल्या.

अंजली घरी पोहोचली, तोवर सात वाजले होते. नवरा अन् मुलं घरी आलेली होती. घराच्या लॅचची एकेक किल्ली प्रत्येकाकडे असायची. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. तिनं घरात प्रवेश करताच पार्थनं विचारलं, ‘‘तुमची पार्टी कशी झाली मॉम?’’

‘‘फारच छान,’’ अंजलीनं म्हटलं. पार्थ हसला.

‘‘मॉम, साडीत तू छान दिसतेस हं.’’ तन्वीनं हसत म्हटलं. ‘‘थँक्स’’ म्हणत अंजली सोफ्याच्या खुर्चीवर बसली. तसं अनिलनं विचारलं, ‘‘तर तुमची पार्टी झक्कास झाली?’’ तो ही हसत होता.

‘‘आमची पार्टी मस्तच झाली…तुम्हाला मात्र भूक लागली असेल ना?’’

‘‘नाही, तन्वीनं चहा केला होता अन् येताना मी गरम पॅटिस आणले होते. त्यामुळे याक्षणी आम्हाला भूक नाहीए.’’ अनिलनं म्हटलं अन् मग हसत म्हणाला, ‘‘छान दिसते आहेस साडीत.’’

आता मात्र अंजलीला शंका आली. नवऱ्याचं हसणं साधं नाहीए हे इतक्या वर्षांच्या संसारानंतर तिला समजलं होतं. मुलंही मघापासून हसातहेत. तिनं आळीपाळीनं प्रत्येकाकडे बघितलं. मग विचारलं, ‘‘तुम्ही मघापासून हसताय कशाला?’’

अनिलनं म्हटलं, ‘‘तुला बघून…’’

‘‘का? मला काय झालंय?’’

तिघं पुन्हा खदखदून हसायला लागली. एकमेकांना टाळ्या दिल्या अन् मग अनिलनं म्हटलं, ‘‘कशा दिसत होत्या तुझ्या मैत्रिणी ‘वनपीस’मध्ये.’’

‘‘चांगल्या दिसत होत्या…’’

‘‘तू ही छान दिसत होतीस…’’

अंजली खुदकन् हसली तसं अनिलनं म्हटलं, ‘‘तन्वीच्या ब्लॅक वनपीसमध्ये.’’

अंजली एकदम दचकली. ‘‘भलंतच काय? मी तर साडी नेसूनच बसलेय ना तुमच्या समोर?’’

‘‘हो, पण तिथं वनपीसमध्ये छान दिसत होतीस, घालत जा तूही…’’ अनिलनं म्हटलं. पण अंजली गोंधळली. तिनं तर तो ड्रेस आता घरीही आणला नव्हता. उगीच घरी यांना कळेल म्हणून.

‘‘अगं, तुझ्या मोबाइलमध्ये फेसबुक ओपन कर.’’ अनिलनं म्हटलं.

अंजलीनं घाईघाईनं फोन बघितला. या सगळ्याजणी घराबाहेर पडताच निशानं त्यांचं फोटो सेशन फेसबुकवर टाकलं होतं. अनिल, तन्वी, पार्थ सगळेच तिच्या फेंड्सग्रुपमध्ये असल्यानं अंजली घरी पोहोचण्याआधीच तिचे फोटे घरच्यांनी बघितले होते.

तिघांनाही फोटो लाइक करून छान छान कॉमेंट्सपण दिल्या होत्या. एवढं सगळं घडून गेल्यावर आता लपवण्यासारखं उरलं तरी काय होतं? अंजलीनं दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला अन् तिलाही मग या तिघांसारखंच हसायला यायला लागलं. हसता हसता ती म्हणाली, ‘‘जळलं मेलं ते फेसबुक…चांगलीच फजिती केलीन की माझी.’’

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...