* नम्रता पवार

मुंबईत बऱ्याच महिला स्कूटर चालवतात. परंतु एखादी बाई, बाईक वा बुलेट चालवताना दिसली की लोकं आपोआप माना वळवून पाहतात आणि त्या नजरांमध्ये कुतूहल दिसते की, अरे व्वा, बाई बुलेट चालवतेय. अगदी आपल्याकडे गुढी पाडव्याच्या ज्या शोभायात्रा असतात त्यामध्ये देखील आता अनेक महिला नऊवारी साडी नेसून आपल्याला बुलेटवर स्वार होताना दिसतात आणि हा खरोखरंच एक कुतुहलाचा, कौतुकाचा विषय असतो. मात्र त्याचवेळी यांना कोणी बरं शिकवलं असेल एक तर नवरा, भाऊ किंवा वडिलांनीच शिकवलं असेल हाच विचार मनात येतो आणि जेव्हा मी याबद्दलची माहिती घेतली तेव्हा एक नाव समोर आलं ते म्हणजे ‘फर्स्ट गियर मोटर सायकल ड्रायव्हिंग स्कूल’च्या संचालिका शुभांगी मांजरेकर यांचं. चला तर त्यांच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊया…

तुमच्या ड्रायव्हिंग स्कूलचा प्रवास कसा सुरू झाला?

२०१४ पासून मी प्रोफेशनली शिकवायला सुरुवात केली. त्या अगोदर मी शिकवत होते, परंतु ते फक्त ऑफिसमधील सहकारी आणि मैत्रिणींपुरतं मर्यादित होतं. मी स्वत: २०१४ पासून लॉन्ग डिस्टन्स ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली. तेव्हा मला रिअलाईज झालं की अनेक महिलांना दुचाकी चालवायला शिकायची असते, परंतु शिकवायला कोणी नसतं. बेसिक हंड्रेड सीसी मोटरसायकल, बुलेट, स्कुटी मी शिकवते. माझं ड्रायव्हिंग स्कूल हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं पहिलं ड्रायव्हिंग स्कूल आहे. मात्र आता महिलांसोबतच मी पुरुषांनादेखील दुचाकी चालवायला शिकवते.

जेव्हा तुमच्याकडे एखादी स्त्री शिकायला येते तेव्हा तिच्याकडे पाहून सर्वप्रथम तुमच्या मनात काय येतं?

अनेक महिलांना दुचाकी चालवायला शिकायची असते, परंतु घरी त्यांना कोणी शिकवणारं नसतं किंवा तेवढा वेळही नसतो. माझ्याकडे सुरुवातीला ज्या महिला येतात, अगोदर त्यांच्या मनात एक थोडा संकोच असतो, भीती असते, कुतूहल असतं. काहींना त्यांच्या हाईटबद्दल शंका असते, माझी हाईट कमी आहे मी शिकू शकेन का? वजनाबद्दल प्रॉब्लेम असतो, त्यामुळे प्रत्येकीला मोटिवेट करून शिकवावं लागतं. बरेचदा त्यांना असं वाटत असतं की आपण घरातील छोट्याछोट्या गोष्टींसाठी घरातील पुरुषावर अवलंबून राहता कामा नये म्हणजे अगदी मुलांना शाळेत, क्लासेसला सोडायला जायचं असेल किंवा मार्केटमध्ये जायचं असेल.

अनेकदा तर काही स्त्रिया घरी सांगूनही येत नाहीत, कारण त्यांना घरून परवानगी नसते. काहींचं वय झालं तरी पण गाडी शिकायची इच्छा अपूर्ण राहिलेली असते ते स्वप्न असतं त्यांच्यासाठी. तेव्हा मात्र मला यांना गाडी शिकवायला हवी, ते मी ठरवते. कारण सुरुवातीला मलादेखील गाडी शिकवायला कोणी फारसं तयार नव्हतं.

तुमच्या करिअरची सुरुवात ड्रायव्हिंग स्कूलनेच झाली का?

नाही. मी माझ्या करिअरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून केली. एका एक्सपोर्ट हाऊसमध्ये मी मोठया पोस्टवर कामही करत होते. बरेच वर्ष मी या इंडस्ट्रीत होते. मुलींच्या जन्मानंतर मी एडवर्टाइजिंगमध्ये काम करायला सुरुवात केली.

तुमच्या दिवसाची सुरुवात कशी असते?

माझ्या दिवसाची सुरुवात पहाटे पाचलाच होते. पहाटे पाहिलं सेशन सहा वीस ते साडे आठपर्यंत माझं ट्रेनिंगचं काम सुरू असतं. त्यानंतर ऑफिसला जाते आणि मग रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा मोटर सायकलचं ट्रेनिंग देते.

गाडी चालवायला शिकवताना फिटनेस किती महत्त्वाचा आहे?

फिटनेस खूपच महत्त्वाचा आहे, कारण एकतर मी जेव्हा दुचाकी चालवायला शिकवते तेव्हा सुरुवातीला त्यांच्यासोबत चालत, बाईकच्या बेसिक स्पीडने धावत शिकवावं लागतं. मी स्वत: फिटनेसबाबत अगोदरपासूनच जागरूक असल्यामुळे या गोष्टी मी सहजपणे करते.

तुम्ही स्पोर्ट्समध्येदेखील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताय काय सांगाल याबद्दल?

माझी मुलगी दादरच्या समर्थ व्यायाम शाळेत जिम्नॅस्टिकसाठी जात असे. तेव्हा तिथे मला वय वर्षे तीस ते शंभर या वयोगटासाठी स्पर्धा असल्याचं समजलं आणि मी भाग घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी १०० मीटर, २०० मीटर रनिंग करत असे. मला त्यासाठी देखील मेडल्स मिळाली होती. यादरम्यान माझा एक अपघात झाला आणि धावण्यावर मर्यादा आल्यात. मग मात्र मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळा फेक, भालाफेक अशा स्पर्धांमध्ये मेडल्स जिंकून महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. आता देखील मी जबलपूरला नॅशनल्ससाठी जाणार आहे. बुलेटवरून तुमचं किती आणि कसं फिरणं झालंय?

मी २०१४ च्या अगोदर फक्त पुणे केलं होतं. २०१४ नंतर मी गोवा, बंगलुरु, कर्नाटका, हिमाचल प्रदेश अशा बऱ्याच ठिकाणी गेली आहे. माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, त्या ग्रुपसोबत मी जाते. मुंबई पनवेल मुंबई, मुंबई पुणे मुंबई, कर्नाटका, उत्तराखंडला गेली आहे. मी २४ तास लॉन्ग डिस्टन्स ड्राईव्ह केलेलं आहे. तो एक रेकॉर्ड असतो आणि २४ तासात तुम्हाला १६०० किलोमीटर गाडी चालवायची असते. त्यामध्ये फक्त पेट्रोल आणि टॉयलेट ब्रेक असतो. पुणे टू बेंगलुरू आणि बेंगलुरू टू पुणे बॅक केलं होतं. ही सोलो राईड होती.

महिलांसाठी बाईक वा बुलेट शिकणं खरोखरंच सोपं आहे का?

नक्कीच सोपं आहे. पहिले दोन दिवस तर मी बेसिक इन्फॉर्मेशन दिल्यानंतर गाडीला किक मारणं आणि ती स्टॅन्डवरून उतरवून परत चढवणं हेच शिकवते. कारण कुठेही पार्किंग करताना किंवा गाडी मिडल स्टॅन्डला लावताना त्रास होता कामा नये. कारण लोकांचं लक्ष तुमच्याकडे असतं, एक तर एक बाई म्हणून तुम्ही गाडी चालवत असता. तसंच तुमची उंची, वय, वजन यामुळे काही फरक पडत नाही. अगदी चार अकरा उंची असलेली महिलादेखील दुचाकी शिकू शकते.

बॉलीवूडमध्येसुद्धा मोटर सायकल शिकवली आहे का?

बॉलीवूडमध्ये काही जणांना मी शिकवलं आहे. सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी यांना शिकवलं आहे. सोनाक्षी सिन्हा यांना त्यांच्या एका फिल्मच्या प्रोजेक्टसाठी शिकवलं आहे. खूपच छान अनुभव होता तो. त्यानंतर सोनाक्षीने तिची मैत्रीण हुमा खान हिला माझा रेफरन्स दिला. ‘फॅमिली मॅन’मधील हाश्मी यांना शिकवलं आहे. अजून एक प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी मी नुकतंच ट्रेनिंग दिलं आहे.

महिला ड्रायव्हर्सबद्दल लोकांची मते वेगवेगळी आहेत, अनेकदा महिला ड्रायव्हर्सना नावं ठेवली जातात, काय सांगाल त्याबद्दल?

एक तर बायकांना फ्रीडम नसतं, त्यामुळे त्या सुरुवातीला तशा घाबरलेल्या असतात. मात्र मला तरी महिला ड्रायव्हर जास्त सावध आणि नियम पाळणाऱ्या वाटतात. वेगावर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे अपघात टाळले जातात. गाडी चालवताना संयम आणि शिस्त ठेवतात.

मला तरी वाटतं ड्रायव्हिंग चांगली की वाईट हे जेण्डरवर नाही, तर व्यक्तीच्या कौशल्यावर आणि अनुभवावर अवलंबून असतं. चांगले आणि वाईट ड्रायव्हर स्त्री-पुरुष दोन्हीमध्ये असतात. मला वाटतं ‘महिला ड्रायव्हर’ ही टीका नाही, तो फक्त एक गोड गैरसमज आहे.

बाईकिंगमुळे महिलांच्या स्वभावात काय फरक जाणवतो?

खूप फरक जाणवतो. जेव्हा येतात तेव्हा लो कॉन्फिडन्स असतात. बऱ्याचदा ऑर्थोडॉक्स फॅमिलीतून आल्यामुळे त्यांना डिसिजन घेता येत नाहीत. मात्र बाईक शिकल्यानंतर एक आत्मविश्वास मिळतो. कारण ती एखादी गोष्ट त्या थोड्या दिवसात आत्मसात करतात. बऱ्याच मुली हल्ली लाँग डिस्टन्स ड्राईव्ह करतात.

तुम्ही आमच्या महिला वाचकांना काय सांगाल?

मला वाटतं की घरातील जबाबदाऱ्या या आपल्याला पार पाडाव्याच लागतात. आपली आवड आपल्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडूनच जोपासायला हवी. काही वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना देणे गरजेचे आहे. एकदा का तुमची मुलं मोठी झाली की तुम्ही प्रत्येकाला तुमच्यावरती डिपेंडंट बनवू नका. मी नसली तर हे होणारच नाहीये असं प्रत्येकीला वाटत असेल, तर त्यातून बाहेर यायला हवं. प्रत्येक बाईला स्वत:च पण एक जगणं असतं, तिच्या इच्छा आकांक्षा असतात, त्या प्रत्येकीने जोपासल्या पाहिजेत, कारण आयुष्याच्या शेवटी मला हे आवडत असूनही मी केलं नाही ही खंत राहता कामा नये.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...