कथा * पूनम अत्रे
संध्याकाळी सहा वाजता ऑफिसमध्ये लोक एक एक करून निघायला लागले, तशी सियानंही आपलं सामान आवरता आवरता एक चोरटी नजर अनिलकडे टाकली. ऑफिसमध्ये नवाच आलेला सर्वात देखणा, उमदा, हसरा, मनममिळाऊ अनिल तिला बघताच आवडला होता. चुंबकासारखी ती त्याच्याकडे ओढली गेली होती.
त्याचवेळी अनिलनंही तिच्याकडे बघितलं अन् दोघंही हसले. एकाच वेळी आपापल्या खुर्च्यांमधून दोघं उठले. लिफ्टपर्यंत सोबतच आले. अजून तीनचार लोक लिफ्टमध्ये होते. सियाच्या लक्षात आलं की अनिलही तिच्याकडे चोरट्या नजरेनं बघत असतो.
गेटमधून बाहेर पडल्यावर अनिलनं विचारलं, ‘‘सिया, तुम्ही कुठं जाणार आहात? मी स्कूटरवरून सोडू तुम्हाला?’’
‘‘नको, थँक्स! मी रिक्षानं जाते.’’
‘‘या ना? एकत्रच जाऊयात...’’
‘‘बरं...’’
अनिलनं बाईक स्टार्ट केली. सिया मागे बसली. अनिलच्या कपड्यांना येणारा सेंटचा मंद सुवास सियाला आवडला. बनारसच्या या ऑफिसात दोघंही नवीनच होते. सियाची नियुक्ती त्याच्या आधी झाली होती.
अनिलनं एकाएकी गाडी रस्त्याच्या कडेला घेत थांबवली. तसं दचकून सियानं विचारलं, ‘‘काय झालं?’’
‘‘काही नाही,’’ म्हणत अनिलनं खिशातून गुटख्यांची पुडी काढली अन् अगदी स्टायलिशपणे गुटखा तोंडात टाकला. मग हसून सियाकडे बघितलं.
‘‘हे काय?’’ सियानं दचकून विचारलं.
‘‘माझा फेवरेट पानमसाला...मावा?’’
‘‘तुम्हाला याची सवय आहे?’’
‘‘हो. अन् ही माझी स्टायलिश सवय आहे...’’
सियाच्या कपाळावर आठ्या अन् चेहऱ्यावर तिरस्कार बघून त्यानं विचारलं, ‘‘का? काय झालं?’’
‘‘या सगळ्या तुमच्या आवडी आहेत?’’
‘‘हो...पण काय झालं?’’
‘‘नाही, काही नाही...’’ सिया पुढे काहीच बोलली नाही, तशी अनिलनं बाइक स्टार्ट केली.
हळूहळू हे रोजचं रूटीन झालं. ऑफिसला येताना सिया रिक्षानं यायची. परतताना अनिलच्या स्कूटरवरून जायची. तिच्या घराच्या थोड्या अलिकडेच तो तिला सोडायचा. हळूहळू दोघांची मैत्री वाढत होती.
अनिलला मॉडर्न, स्मार्ट, सुंदर सिया फारच आवडली होती. आपली आयुष्याची जोडीदार म्हणूनच तो तिच्याकडे बघत होता. हीच स्थिती सियाचाही होती. दोघांनाही खात्री होती की त्यांची निवड त्यांच्या घरातल्यांनाही आवडेल.
अनिलनं तर सियाची निवड फायनल केलीच होती पण सिया मात्र एका मुद्दयावर थोडी अडखळत होती. अनिलची सतत गुटखा, मावा किंवा पानमसाला तोंडात भरायची सवय तिला फारच खटकायची. तिनं अनिलला अनेकदा याबद्दल समजावलंही, त्यातले धोके, आरोग्याची हानी वगैरे विषय तो थट्टेवारीने न्यायचा.