* अवनीश शर्मा
सीमाने ऑफिसमधून मोबाइलवरूनच आपल्या प्रमोशनची न्यूज आपल्या पतीला म्हणजेच राजीवला सांगितली. त्याने जेव्हा ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली, तेव्हा पूर्ण घरात आनंदाची लहर पसरली.
‘‘किती फरक पडेल आता तिच्या पगारात?’’ राजीवचे वडील रमाकांत यांच्या डोळ्यांत लोभाची चमक स्पष्ट झळकू लागली.
‘‘माझ्या मते निदान ३०-४० हजारांचा फरक तरी पडला पाहिजे. शेवटी, वहिनी एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते,’’ त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मोठ्या मुलाऐवजी छोट्या मुलाने म्हणजेच संजीवने मोठ्या उत्साहात दिलं.
या नंतर काही वेळ हॉलमध्ये शांतता होती. मग एकेक करून प्रत्येकजण आपापल्या मनातील इच्छा प्रकट करू लागले.
‘‘आता माझं कोटामध्ये अॅडमिशन करून दे दादा,’’ सविताने मोठ्या आपुलकीने राजीवला आपली इच्छा सांगितली.
‘‘माझी बाइक ‘लिस्ट’ मध्ये सर्वात टॉपला असणार,’’ संजीवच्या आवाजात थोडा उच्च स्वर होता. ‘‘मेट्रोचे धक्के खाऊन खाऊन मी आता कंटाळलो आहे.’’
‘‘हे सगळे खर्च नंतर होतील. आधी टेरिसवर दोन रूमचा सेट बनेल,’’ रमाकांतच्या कठोर आवाजाने सविता आणि संजीवच्या डोळ्यांत नैराश्याचे आणि दु:खाचे भाव झळकले.
‘‘आपल्याला काही पैसे साठवूनसुद्धा ठेवले पाहिजेत,’’ राजीवच्या आईने सुचित्राने सगळ्यांना समजावले, ‘‘उद्या सविताचंसुद्धा लग्न करायचं आहे आपल्याला. हिच्या नावाने बँकेत काही पैसे प्रत्येक महिन्याला नक्की जमा झाले पाहिजेत.’’
राजीवने आपल्या मनातील इच्छा तोंडावर आणू दिली नाही. तो एका सरकारी शाळेत रसायन विज्ञान शिकवायचा. एखादी छोटी मोठी फॅक्ट्री किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट सुरु करण्याची इच्छा कित्येक वर्षांपासून त्याच्या मनात होती. सीमाच्या वाढलेल्या पगारावर आता बँकेतून लोन मिळेल. त्या पैशातून तो टेरिसवर २ ऐवजी ४ खोल्या बांधू इच्छित होता. निरुपयोगी असलेल्या खोल्यांमध्ये आधी कोचिंग सेंटर सुरु करण्याची इच्छा मनात खोलवर रुजत जात होती, पण राजीवने याविषयी सगळ्यांसमोर चर्चा केली नाही.
फक्त ४ वर्षाच्या असलेल्या सीमाच्या मुलाला आपल्या आईच्या वाढलेल्या पगारात काही रुची नव्हती आणि तो कार्टून चॅनल पाहण्यात मग्न होता. सीमा संध्याकाळी ऑफिसमधून घरी आली, तेव्हा तिचं अगदी जल्लोशात स्वागत झालं. ऑनलाइन चायनीज ऑर्डर करण्यात आलं. ड्रॉईंग रूममध्ये तासभर चालणाऱ्या पार्टी दरम्यान सगळ्यांनी सीमासमोर आपापल्या मनातल्या इच्छा व्यक्त केल्या.





